Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सबनीसांची कारकीर्द शब्दबद्ध

$
0
0

वर्षभरातील कार्यक्रम, भाषणांचे संकलन पुस्तकरूपात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची गाजलेली अध्यक्षीय कारकीर्द शब्दबद्ध झाली आहे. सबनीस यांच्या वर्षभराच्या कारकिर्दीवर पुस्तक तयार करण्यात आले असून वर्षभरातील घडामोडींचा आढावा त्यात घेण्यात आला आहे. अध्यक्षीय भाषणाबरोबरच विविध ठिकाणे झालेली भाषणे व लेख या पुस्तकातून वाचायला मिळणार आहेत. संमेलनाध्यक्षांच्या वर्षभराच्या कालावधीवर पुस्तक निघण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले डॉ. सबनीस यांनी आपल्या सडेतोड भाषणाने व मुलाखतीने पिंपरी येथे झालेले ८९वे साहित्य संमेलन गाजवले. तसेच पुढे वर्षभर ते सतत चर्चेत राहिले. सबनीस यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीला वर्ष पूर्ण होत असताना अवघा महाराष्ट्र त्यांनी कार्यक्रम व गाठी-भेटीच्या निमित्ताने पालथा घातला आहे. राज्याच्या दुर्गम भागातही जाऊन ते आपली भूमिका अधिक जोरकसपण मांडत राहिल्याने बऱ्याचदा वादही निर्माण झाले. त्यांचे वर्षभराचे हे ‘साहित्य संचित’ पुस्तकरूपाने एकत्रित करण्यात आले आहे.

वर्डस्म‌िथ प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘मानदंडात्मक संमेलनाध्यक्ष : डॉ. श्रीपाल सबनीस’ या पुस्तकाचे संपादन सचिन इटकर, महेश थोरवे व उद्धव कानडे यांनी केले आहे. १० डिसेंबरला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. पिंपरीच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत. नवी पेठेतील संकल्प कार्यालयात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. साहित्यप्रेमींचा स्नेहमेळावा यानिमित्ताने होणार आहे.

‘साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वर्षभरातील घडामोडींचे संकलन व्हावे, या हेतूने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये साहित्य महामंडळाने न छापलेले डॉ. सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण, संमेलनातील मुलाखतीसह विविध ठिकाणी झालेल्या मुलाखती, बातम्या, वृत्तपत्रांचे अग्रलेख, विविध लेख, नियतकालिकांमधील लेख, पुढे काय करणार याबाबत डॉ. सबनीस यांचा लेख अशा प्रकारचे हे संकलन असेल,’ असे इटकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

डॉ. सबनीस यांचे वर्षभरात सुमारे ३०० कार्यक्रम झाले असून तेथील अनुभव, धमक्या, वाद, पोलिस संरक्षणातील अध्यक्ष असे सारे यंदा प्रथमच घडले आहे. याची नोंद पुस्तकात घेण्यात आली आहे. ३०० कार्यक्रमांची सविस्तर नोंद पुस्तकात असेल. हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर तीन अपघातात सहा जखमी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी लोणावळा
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खंडाळाघाटातील (बोरघाट) खोपोली एक्झिटजवळ झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात सहा जण गंभीर झाले; तर २० ते २५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हे तीनही अपघात सोमवारी अनुक्रमे मध्यरात्री दीड, पहाटे चार व सकाळी दहाच्या दरम्यान अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर झाले. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती.
बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील खोपोली एक्झिटजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास किलोमीटर क्रमांक ३९ येथील तीव्र उतार व वळणावर आठ वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर; तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. पुढे जात असलेल्या ट्रकवर (क्रमांक-एमएच-०६/बीडी-८५२६) मागून वेगात आलेला ट्रक (क्रमांक- आरजे-१८/जीबी-१५४७) जोरात आदळल्याने ट्रकची ऑइल टाकी फुटून ते मार्गावर पसरले. दरम्यान, मागून आलेला टेम्पो (क्रमांक- एमएच-०४/ जीसी-२७०५)ऑइलमुळे निसटून मार्गावर आडवा झाला होता. त्यानंतर काही वेळात मागून आलेल्या आयटेन, व्हॅगनर व स्विफ्ट कार याही ऑइलवरून निसटून एकमेकांवर आदळत असताना त्यामागून आलेल्या दोन खासगी बसेसही एकमेकांवर आदळल्या. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अपघाताची माहिती कळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक काटकर, तानाजी आगलावे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आयआरबी आणि आयर्न देवदूत यंत्रणेच्या आपत्कालीन पथकाने अपघातील जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पनवेलला रवाना केले.
अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, तिन्ही कारमधील प्रत्येकी एक; तर टेम्पो व एका बसमधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी आयआरबी व आयर्न देवदुताच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने मार्गावर उलटलेली वाहने बाजूला करत मार्गावर पसरलेले ऑइल पाण्याने धुऊन मार्ग वाहतुकीस खुला केला.
दुसरा अपघात खोपीली एक्झिट येथील बाह्यवळणावर पहाटे चारच्या सुमारास झाला. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या महाराजा व्हॉल्वो ट्रॅव्हल्सच्या (क्रमांक-एमएच-११/टी-९४९०) चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस मार्गालगत असलेल्या डोंगराच्या कडेला जोरात आदळली. या घटनेत बसमधील पाच जण गंभीर जखमी झाले असून, आठ ते १० जण किरकोळ जखमी झाले आहे. यामधील प्रवासी हे कोणत्या तरी मालिका किंवा चित्रपटाचे चित्रीकरण करणारे असल्याचे प्राथमिक माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
तिसरा अपघात खोपोली एक्झिट जवळच सकाळी दहाच्या सुमारास झाला. पुण्याहून मुंबईकडे जात असलेल्या कंटेनरवर (क्रमांक-एमएच-०४/डीआर-५९७८) मागून भरधाव वेगात आलेली एक वऱ्हाडाची खासगी बस (क्रमांक-एमएच ४३/एच-२४८७) कंटेनरवर आदळली. यात बसमधील सात ते नऊ जण जखमी झाले. या तिन्ही अपघातांचा पुढील तपास खोपोली पोलिस करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने ७४ विद्यार्थ्यांची फसवणूक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आणि शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठगाने ७४ विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली. शुक्रवारी आणि रविवारी वाकड येथे घडला. या प्रकरणी अनुप पंढरीनाथ ढोरमले (रा. अहमदनगर) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनोज मेहरोत्रा (५२, रा. वडगाव-बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मनोज मेहरोत्रा हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कंपनीत नोकरी लावण्याचे काम करतात. आरोपी अनुप याने मनोज यांना फोन करून आपण एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक असून, आमच्या कंपनीमध्ये जाहिरात आणि नोकरीसाठी ट्रेनी मुले, मुली पाहिजे आहेत. त्यामुळे तुमच्या महाविद्यालयात मुलाखत घ्यायचे असल्याचे सांगितले. गरीब मुलांची महाविद्यालयातील फी परत करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणार आहे. त्यासाठी पुण्यातील १० महाविद्यालयांची निवड करायची असल्याचे सांगितले.
कंपनीचे बनावट शिक्के, ओळखपत्र, नियुक्ती पत्र तयार करून कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आणि शिष्यवृत्ती मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी ७४ मुलांकडून प्रत्येकी ५५० रुपये असे एकूण ४० हजार ७०० रुपये उकळले. पैसे देऊनही विद्यार्थ्यांना नोकरी न लावल्यामुळे मनोज मेहरोत्रा यांनी अनुप याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनोज यांनी पोलिसांत धाव घेतली. फौजदार एम. के. आबनावे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हीच ओळखा तुमचा उमेदवार

$
0
0

निवडणूक आयोगातर्फे उमेदवाराची माहिती जाहीर करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या शपथपत्रातील गोषवारा राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्राबाहेर आणि वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये उमेदवारांची मालमत्ता, त्यांच्यावरील गुन्हे याविषयीची माहिती मिळणार असल्याने मतदारांना कोणता उमेदवार कसा आहे, हे समजू शकणार आहे. पुणे आणि लातूर नगरपरिषदांच्या निवडणुकीपासून राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरव राव आदी उपस्थित होते. सहारिया यांनी नगरपरिषदांच्या निवडणुकांचा आढावा घेतला; तसेच राजकीय पक्षांच्या पदधिकाऱ्यांशीही चर्चा केली. सहारिया म्हणाले, ‘उमेदवारांकडून शपथपत्र घेण्यात येते. त्यामध्ये उमेदवारांची स्थावर आणि जंगम मालमत्ता, त्यांच्यावरील दाखल गुन्हे आणि शिक्षा झाली असल्यास त्याबाबतची माहिती असते. शपथपत्रातील माहितीचा गोषवारा तयार करून ती माहिती आयोगाकडून वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन प्रसिद्ध करण्यात येणार आहे; तसेच मतदान केंद्रांबाहेरही लावली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना आपला उमेदवार कसा आहे, ही माहिती समजू शकणार आहे.’
‘उमेदवारांची संपूर्ण माहिती असलेले शपथपत्र आयोगाच्या वेबसाइटवर असणार आहे. त्यावरून उमेदवाराबाबतची सविस्तर माहिती नागरिकांना घेता येणार आहे,‘’ असेही सहारिया म्हणाले. ‘दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या पुणे जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ६८ उमेदवार आहेत. नगरपरिषदेमध्ये २२३ जागांसाठी ८२६ उमेदवार रिंगणात आहेत. १४ डिसेंबर रोजी मतदार होणार असून, १५ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीपासून उमेदवारांची माहिती प्रसिद्ध करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे,’ असेही सहारिया यांनी स्पष्ट केले.
‘निवडणुकीसंदर्भातील कामात कुचराई करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर करवाई केली जाईल. मतदार जागृती करताना मतदानाचे प्रमाण वाढवण्याबरोबरच वस्तू किंवा पैशाच्या स्वरुपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारू वाटपावर नजर ठेवणे; तसेच बहुसदस्यीय पध्दतीनुसार आवश्यक तेवढी मते देणे याबाबतीत मतदारांमध्ये जागृती केली जाणार आहे,’ असे सहारिया यांनी नमूद केले.

मतदान केंद्रात ८०० ते ८५० मतदार
या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्यामुळे मतदारांना तीन किंवा चार मते द्यायची आहेत. दोन उमेदवार असलेल्या प्रभागांमध्ये मतदारांना एक मत नगराध्यक्ष पदासाठी आणि अन्य दोन मते अशी तीन मते, तर तीन उमेदवार असलेल्या प्रभागांमध्ये चार मते द्यावी लागणार आहेत. त्यामुळे लागणारा वेळ विचारात घेऊन मतदार केंद्रांवरील मतदारांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता एक हजार ते १२०० मतदारांऐवजी ८०० ते ८५० मतदार असणार आहेत, असेही सहारिया म्हणाले.

जानकर प्रकरणी​ चौकशी करणार

नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवाराने अर्ज मागे घेणे आणि विशेष निवडणूक चिन्ह देण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अधिकाऱ्यांवर दबाब आणल्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सहारिया म्हणाले. संबंधित व्हिडिओ क्लिप मिळाली असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकाचे अपहरण करणाऱ्याला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील उद्योजकाला कच्चा माल विकण्याच्या बहाण्याने गुडगाव येथे बोलावण्यात आले. तेथे त्याचे अपहरण, तसेच मारहाण करून लुटल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तरुणाला अटक केली. हरियाणा पोलिसांच्या मदतीने डेक्कन पोलिसांनी कारवाई केली.
इम्रान उर्फ जेनेजर जानमोहंमद खान (वय ३१, रा. हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरातील तरुण उद्योजक योगेश देशमुख यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आरोपींनी देशमुख यांना कच्चा माल खरेदीच्या बहाण्याने गुडगाव येथे बोलावले होते. देशमुख गुडगाव येथे गेले असता त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना पळवून नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील फोन, पैसे, क्रेडिट, डेबिट कार्ड काढून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना तेथील हायवेवर सोडून आरोपींनी पळ काढला.
डेक्कन पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी तपास पथक गुडगाव येथे पाठवले. मोबाइल ट्रॅक करून गुडगाव पोलिसांच्या मदतीने आरोपीला गजाआड करूत पुण्यात आणण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ब्रिटिशकालीन तुरुंग अपुरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील गुन्हेगारांची वाढलेली संख्या आणि तुरुंगांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांमुळे कैद्यांना ठेवण्यात येणारे ब्रिटिशकालीन तुरुंग आता अडचण ठरू लागले आहेत. ‘नॅशनल जेल मॅन्युअल’च्या नियमांनुसार तुरुंगाच्या आवारात हॉस्पिटल आणि कोर्ट सुरू करणे शक्य आहे की नाही, याचा आढावा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्यातील बहुतांश तुरुंगामधील कैद्यांची संख्या ही अधिकृत क्षमतेपेक्षा अधिक आहे. या कैद्यांना तुरुंगामध्ये ठेवण्यासाठीची जागा अपुरी पडते आहे. तुरुंगामधील कैद्यांना कोर्टात नेण्या-आणण्यासाठी पोलिसांना अधिक श्रम आणि वेळ वाया घालवावा लागत आहे. कैद्यांना ‘हार्ट अॅटक’सारखी अचानक काही वैद्यकीय समस्या उभी राहिली तर त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेता येत नाही. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाकडून याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्या असल्याने राज्य सरकारकडून पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
गृहविभागाचे प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांच्या अध्यक्षतेसाली दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने राज्यातील विविध तुरुंग, तेथील समस्या आणि जेल मॅन्युअलमधील तरतुदींचा अभ्यास करून उपाययोजनांबाबतचा अहवाल तयार करावा, अशी सूचना राज्य सरकारने या समितीला केली आहे.
मुंबईत आणखी जेलची आवश्यकता
मुंबई-ठाण्यातील कैद्यांची संख्या वाढली तसे नवी मुंबईतील तळोजा तुरुंगाची निर्मिती करण्यात आली. साडेचार हजार कैदी ठेवता येऊ शकतील एवढी क्षमता असलेल्या या तुरुंगाचा वापर पूर्ण क्षमतेने होऊ शकत नसल्याचे दिसते आहे. मुंबई आणि ठाणे या शहरांपासून तळोजा तुरुंगाचे अंतर बरेच आहे. तळोजा तुरुंगामध्ये ठेवलेले ठेवलेले कैदी हे मुंबईतील कोर्टात वेळेत नेणे अडचणीचे होत असल्याने मुंबई आणि ठाण्यातील कैद्यांना आर्थर रोड तसेच भायखळा तुरुंगामध्ये ठेवण्यात येते. ऑर्थर रोड तुरुंगाची क्षमता ८०० आहे तेथे ३००० कैदी ठेवण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गायब’ केलेले रस्ते तत्काळ सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उरुळीकांचन येथील जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर अतिक्रमण करून ‘गायब’ केलेले रस्ते तत्काळ जनतेसाठी खुले करण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने दिला आहे. तर, अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश हवेली उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल बर्गे यांनी दिला आहे.
उरुळीकांचन येथे ११ व्या वित्त आयोगातून बाएफ रस्ता ते रेल्वे स्टेशन रस्ता (६०० मीटर), उरुळीकांचन रेल्वे स्टेशन ते साळुंके वस्ती रस्ता (३०० मीटर) आणि उरुळीकांचन बाएफ ते रेल्वे स्टेशन रस्ता (८०० मीटर) या रस्त्यांची कामे करण्यात आली. ही सर्व कामे २००३ साली पूर्ण करण्यात आली. मात्र, या रस्त्याच्या बाजूने झालेल्या अतिक्रमणामुळे साळुंके वस्ती व तांबे वस्तीतील रस्ता नागरिकांना वहिवाटीसाठी बंद करण्यात आल्याचे आढळून आले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य यांनी हे रस्ते सार्वजनिक रस्ते असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी पंचायत समितीकडे तक्रार केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली. त्या पाहणीमध्ये वरील बाब निदर्शनास आली. नागरिकांना वहिवाटीसाठी ती भिंत पाडणे गरजेचे असल्याचे मत गटविकास अधिकाऱ्यांनी नोंदविले होते. दरम्यान, हे रस्ते ११ आणि १२ व्या वित्त आयोगातून खर्चाने प्रशासकीय मान्यता घेऊन सार्वजनिक हितार्थ तयार केलेले असून ते ग्रामपंचायतीकडे देखभाल दुरुस्तीसाठी हस्तांतरित झालेले आहेत. हे सर्व रस्ते सर्वांसाठी खुले करावेत, असा निर्णय ‘पीएमआरडीए’च्या नगर रचनाकारांनी दिला आहे. हे रस्ते जिल्हा परिषदेच्या निधीतून तयार केले असतील आणि त्यावर अडथळा निर्माण केला असेल, तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची सूचना बर्गे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोशी अभिनव आंदोलनांचेे प्रणेते

$
0
0

डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांचे गौरवोद्गार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नवा कोरा करकरीत विचार मांडून त्याच्या जोरावर संघटना उभारून, अभिनव पद्धतीने आंदोलन करणारे शरद जोशी हे स्वातंत्र्योत्तर काळातील एकमेव नेते होते. खेडी अर्धनग्न, अर्धपोटी असून नरकयातना भोगत असल्याचे वास्तव त्यांनी सर्वप्रथम पुढे आणले. भारतीय स्त्रियांच्या प्रश्नांचीही नेमकी उकल करून सातबारा महिलांच्या नावे करण्याची क्रांती त्यांनी घडवली,’ असे मत ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी व्यक्त केले.
शेतकरी संघटना न्यास आणि ऊर्मी प्रकाशनातर्फे भानू काळे लिखित ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ या चरित्राचे प्रकाशन खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, किसान समन्वय समितीचे अध्यक्ष सरदार भूपिंदर सिंग मान, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, न्यासाचे विश्वस्त गोविंद जोशी या वेळी उपस्थित होते.
‘शेतकऱ्यांच्या समस्या या आर्थिक आजारातून जन्माला आल्या आहेत. आर्थिक आजार हा जात, धर्म, पंथ पाहात नाही, असे सांगून जोशींनी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. समाजवाद ही भंपक कल्पना असल्याचे सांगणाऱ्या जोशींनी शेतमालाला फक्त रास्तभावच मागितला नाही; तर सातबारा महिलांच्या नावावर करून इतिहास घडवला. स्त्रीप्रश्नांची त्यांच्या इतकी नेमकी मांडणी कोणालाही जमली नाही,’ असे गौरवोद्गारही डॉ. दाभोलकर यांनी काढले.
‘शेतीचे अर्थशास्त्र सर्वांच्या चालण्या-बोलण्यात आणण्याचे सर्व श्रेय जोशींना जाते. त्यांच्यामुळेच स्त्री मुक्ती आंदोलन शहरी उंबरठा ओलांडून खेडेगावात गेले. जोशी यांनी मांडलेला भारत विरुद्ध इंडिया हा संघर्ष आपण आजही थांबवू शकलो नाही,’ असे डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले. प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्म आकलन आणि दूरदृष्टी हे शरद जोशींचे वैशिष्ट्य होते. कल्पना सम्राटांना डोक्यावर घेताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचे वास्तव त्यांनी प्रखरपणे मांडले, असे मान म्हणाले. वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​लकी ड्रॉच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘लकी ड्रॉ’ मध्ये टीव्ही लागल्याचे सांगून महिलेला पत्ता देण्याच्या बहाण्याने दुचाकी व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार आंबेगाव पठार परिसरात घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही आंबेगाव पठार येथे राहण्यास आहे. ही महिला चहाची टपरी चालविते. या टपरीवर गोळ्या-बिस्कीटे विक्रीसाठी ठेवलेले असतात. २७ नोव्हेंबर रोजी एक अनोळखी व्यक्ती तिथे आली. या गोळ्यांच्या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला टीव्ही लागला असल्याचे सांगून त्याने महिलेच्या पत्त्याची मागणी केली. मात्र, महिलेला घराचा पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे महिला त्याला आपले घर दाखवण्यासाठी तिच्या दुचाकीवरून घरी घेऊन गेली. त्या व्यक्तीने घर पाहिले. त्यानंतर एका शोरुमध्ये जाऊन त्यांनी टीव्ही पाहिला. त्यानंतर ते परत चहाच्या टपरीकडे निघाले. त्या वेळी दोघांनी एका पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरले. पेट्रोल भरल्यानंतर या अनोळखी व्यक्तीने महिलेला ‘टीव्ही घेण्यासाठी ओळख द्यावी लागते. त्यासाठी तुम्ही तुमच्या कानातील दागिने काढून द्या. त्यावरून मी सराफाची पावती आणतो,’ असे म्हणून सोन्याचे २० हजार रुपयांचे दागिने व दुचाकी घेऊन गेला. मात्र, तो परत आलाच नाही. महिलेने बराच वेळ वाट पाहिली. तो येत नसल्याचे समजल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकीट सवलतीसाठी आधारकार्ड सक्तीचे

$
0
0

ज्येष्ठ प्रवाशांसाठी रेल्वेचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे तिकिटासाठी ज्येष्ठ नागरिकांना सवलत प्राप्त करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामु‍ळे तिकीट आरक्षित करताना किंवा रेल्वेच्या तिकीट काउंटरवर आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागणार आहे. शिवाय प्रवासादरम्यान कार्डही बाळगावे लागणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे ‘आयआरसीटीसी’च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
रेल्वेकडून साठ वर्षांवरील नागरिकांना तिकीट दरात चाळीस टक्के तर, ५८ वर्षीय महिलांना पन्नास टक्के सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिक म्हणून तिकीटदरात सवलत घेणाऱ्यांना ‘टीसी’कडून वयाचा पुरावा मागितल्यानंतर मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा जन्म तारीख नमूद असलेली सरकारी कागदपत्रे दाखविण्यात येत होती. मात्र, रेल्वे एजंटांकडून मोठ्या प्रमाणावर याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी तिकीट आरक्षण करताना देण्यात येणाऱ्या फॉर्मवर ज्येष्ठ नागरिकांची सवलत हवी आहे का, अशी विचारणा करण्यात येत होती. त्यावेळी ओळखपत्राची झेरॉक्स द्यावी लागत नव्हती. दरम्यान, रेल्वेकडून दीडशेहून अधिक प्रकाराच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. या सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या सुमारे दोन ते अडीच कोटी आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.
ज्येष्ठ नागरिकांना आधारकार्ड बंधनकारक करण्याच्या निर्णयामुळे निश्चितच गैरफायदा घेण्याचा प्रकार थांबणार आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांनी सवलतीसाठी अर्ज करताना आधारकार्डची पडताळणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, त्याची पडताळणी कुठे आणि कोणाकडून करून घ्यावी, याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ शकते. प्रवाशांऐवजी रेल्वे प्रशासनानेच त्याची पडताळणी करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी केली.

सक्ती न करण्याची मागणी
देशात आधार कार्ड न काढलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अनेकांना फटका बसणार आहे. त्यामुळे आधार कार्ड बंधनकारक न करता, वयाचा पुरावा म्हणून पूर्वीप्रमाणेच कोणताही सरकारी दस्त स्वीकारण्यात यावा, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.

सवलतींच्या कात्रीसाठी आधार?
रेल्वेतर्फे प्रवाशांना १५० प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, अपंग आदींचा समावेश आहे. रेल्वेकडून वर्षाला सुमारे चौदाशे कोटी रुपयांची सवलत दिली जाते. त्यातील काही सवलती रद्द करण्याचे नियोजन आहे. सातव्या वेतन आयोगासाठी रेल्वेला आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली. मात्र, रेल्वेने हा अतिरिक्त निधी स्वत: उभारावा, असे संकेत आल्यानंतर रेल्वेने उत्पन्नवाढीच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्यातून वेगवेगळ्या सवलतींना कात्री लावण्यात येणार असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी होती. आधार कार्डची सक्ती करून कात्री लावण्याचाच प्रयत्न करण्यात आला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कथायात्रा’ महोत्सव येत्या १६ पासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जागतिकीकरणाच्या शर्यतीत आजीच्या गोष्टी हरवत चाललेल्या असताना त्या गोष्टींना पुन्हा लहान मुलांच्या आयुष्यात स्थान मिळावे, यासाठी ‘भाषा’ संस्थेच्या वतीने येत्या १६, १७ आणि १८ डिसेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘कथायात्रा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा हा महोत्सव ‘पाणी’ या संकल्पनेभोवती गुंफण्यात आला आहे.
या तीन दिवसीय महोत्सवात नृत्य, नाट्य, कथा-कथन, संगीतिका, परिसंवाद, कार्यशाळा, पपेट शो, अभिवाचन, अनुभवकथन यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांच्या माध्यमातून यंदाचा महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती ‘भाषा’ फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती राजे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असणार आहे.
१६ डिसेंबर २०१६ रोजी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘कथायात्रेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ‘सरित्कथा’ या नद्यांची कहाणी सांगणाऱ्या कथक बॅलेचे सादरीकरण होईल. यानंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका आरती अंकलीकर आणि आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेचे गिटारवादक मनोज पंड्या यांचा ‘मल्हारधून’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आजी आजोबा आणि कर्णबधीर मुलांसाठी ‘गोष्ट सांगा’ स्पर्धा, मुंबई येथील पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘ताल' हे बहुभाषिक बालनाट्य, ‘गोपी गाये बाघा बाये’ हा शिल्पा व सौमित्र रानडे यांचा आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेला अॅनिमेशन चित्रपट, कोलकात्याच्या देवाशीष चक्रवर्ती आणि देबारती चक्रवर्ती यांची ‘चला गोष्ट विणू या’ ही कार्यशाळा, माधुरी पुरंदरे यांचे मुलांसाठी कथावाचन, फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे तर्फे लहानांसाठी व मोठ्यांसाठी छायाचित्रण विषयक कार्यशाळा असे अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला ‘डायनासॉर’ हा पपेट शो ‘कटकथा’ या संस्थेतर्फे सादर दाखविण्यात येईल. दुसऱ्या दिवसाची सांगता राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाचा (एनएफएआय) ‘जल’ हा चित्रपट दाखवून होईल.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (रविवार, दि. १८) ‘यक्षप्रश्न’ ही ‘भाषा’ची राज्यस्तरीय लोकप्रिय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येईल. तसेच ‘गोष्ट वर्तमानपत्राची’ ही कार्यशाळा, ‘काबुलीवाला’ कथेवर आधारित ‘डिअर अर्थ’ या लोकनाट्याचे सादरीकरण, ‘कथा मंजूषा’अंतर्गत पर्ण पेठे व आलोक राजवाडे यांचे कथावाचन, शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यावर मोहन शेटे यांचे कथाकथन असे कार्यक्रम रंगणार आहेत.
आंतरराष्ट्रीय परिषद
कथायात्रा महोत्सवाअंतर्गत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून १६ व १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायं. ५ दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे ही परिषद पार पडणार आहे. त्यामध्ये ‘समाज, साहित्य व बहुभाषिकता’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होणार असून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले भाषातज्ज्ञ, प्राध्यापक, अभ्यासक व भाषाप्रेमी सहभागी होतील. लेखिका, परराष्ट्र खात्यातील अधिकारी आणि लंडनच्या नेहरू सेंटरच्या माजी संचालक संगीता बहादूर यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बी. टी. शहानी शाळेची मान्यता रद्दचा प्रस्ताव

$
0
0

‘आरटीई’ची अंमलबजावणी न केल्याचा ठपका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बी. टी. शहानी पूर्व प्राथमिक शाळेवर शिक्षणहक्क कायद्याची (आरटीई) व्यवस्थित अंमलबजावणी न करण्याचा ठपका ठेवून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. मंडळाने ‘आरटीई‘ अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या सहा विद्यार्थ्यांना योग्य ती वागणूक न देण्याचा आणि शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा ठपका ठेवला आहे, अशी माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बी. टी. शहानी शाळेत ‘आरटीई’ अंतर्गत सहा विद्यार्थ्यांनी मोठ्या गटात प्रवेश घेतला आहे. शाला प्रशासनाने या विद्यार्थ्यांना मोठ्या गटात न बसविता इयत्ता पहिलीच्या वर्गात बसविले. तसेच, त्यांना दुजाभावाची वागणूक दिली. या पार्श्वभूमीवर संबंधित मुलांच्या पालकांनी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या माध्यमातून शिक्षण मंडळाकडे तक्रार करण्यात आली, असे सभेचे प्रा. शरद जावडेकर यांनी सांगितले
‘याबाबत शिक्षण मंडळ, शाला प्रशासन, पालक आणि सभेची एकत्रित बैठक घेण्यात आली. बैठकीत मंडळाकडून शाला प्रशासनाला विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी प्रशासनाने विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळाच्या आरटीई अधिकारी वैशाली पांढरे यांना पाहणीच्या सूचना केल्या. पांढरे यांनी शाळेला भेट देऊन शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला,’ असे प्रा. जावडेकर यांनी सांगितले. या अहवालानुसार आरटीईची व्यवस्थित अंमलबजावणी न करण्याचा ठपका ठेवून शाळेवर कलम ‘ख’ अंतर्गत कारवाई केली जाईल. तसेच, शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

‘शिक्षणाधिकारी घेणार निर्णय‘
शिक्षण मंडळाने बी. टी. शहानी इंग्रजी शाळेवर आरटीईची व्यवस्थित अंमलबजावणी न करण्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला. या प्रस्तावावर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी निर्णय घेतील, असे पांढरे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराबाबत अधिक माहितीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना शिवीगाळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुंड बापू नायरच्या वकील वर्षा फडके यांच्या अटकेदरम्यान पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याप्रकरणी फडके कुटुंबीयांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शंकर फडके, सचिन फडके, युवराज फडके आणि तीन महिलांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक फडके यांच्या वडगाव शेरी येथील निवासस्थानी त्यांना अटक करण्यासाठी रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गेले होते. त्यावेळी फडके यांना ताब्यात घेत असताना त्यांच्या कुटुबीयांनी पोलिसांना विरोध केला होता.
या वेळी फडके कुटुबीयांनी पोलिसांना धक्काबुक्की तसेच शिवीगाळ केल्याचे महिला फौजदार पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले
पुणे : हांडेवाडी येथील गॅलक्सी मार्बल अॅण्ड सिरॅमिक्स या दुकानासमोरून पायी चाललेल्या विवाहितेच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावल्याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला पायी जात असताना दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगडचे होणार मॅपिंग

$
0
0

दुर्ग संवर्धन समिती आधुनिक तंत्रज्ञानाने घेणार अचूक नोंदी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
बुरुज, तटबंदी, बालेकिल्ल्याबरोबर गडावरील प्रत्येक लहान-मोठ्या ऐतिहासिक वास्तूंच्या अचूक नोंदी घेण्यासाठी दुर्ग संवर्धन समितीतर्फे राज्यातील वीस किल्ल्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाने मॅपिंग करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर सिंहगड किल्ल्याची निवड करण्यात आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत चार पद्धतीने सिंहगडाची मोजणी होणार आहे.
इतिहास अभ्यासकांनी राज्यातील गडकोटांचा सविस्तर अभ्यास केला असला तरी या किल्ल्यांची अचूक मोजणी अद्याप झालेली नाही. किल्ल्यांवरील वास्तू, त्यांची दिशा, समुद्र सपाटीपासूनची उंची, त्यांच्या सभोवताली असलेल्या भौगोलिक परिसराचा सर्वसमावेशक मोजणी अहवाल शासन दरबारीही उपलब्ध नाहीत. इतिहास संशोधकांनी किल्ल्यांची अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने मोजणी झाली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारच्या दुर्ग संवर्धन समितीकडे केली होती. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत समितीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यामध्ये किल्ल्यांच्या मॅपिंगवर शिक्कामोर्तब झाले.
दुर्ग संवर्धन समितीने गेल्या वर्षभरात विविध किल्ल्यांवर तीस कोटी
रुपयांची कामे केली आहेत. पुढील वर्षातील कामांसाठी टप्प्याटप्प्याने साठ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. समितीने पहिल्यांदाच राज्यातील वीस किल्ल्यांचे सर्वंकष मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोजणीतून संपूर्ण किल्ल्यांचा
सखोल भौगोलिक आराखडा तयार होणार आहे, अशी माहिती दुर्ग संवर्धन समितीचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.
नागपूर येथील एमआरसॅक या सरकारी कंपनीने ही जबाबदारी स्वीकारली आहे. लिदार मशीनच्या साह्याने सॅटलाइट तंत्रज्ञानाच्या आधारे ही मोजणी होणार आहे. या अंतर्गत जीआयएस, टोटल स्टेशन सर्ह्वे आणि आर्किटेक्चरल ड्रॉइंग अशा तीन प्रकारांचा मोजणीत समावेश असेल. कंपनीने यापूर्वी नद्या, डोंगरांची मोजणी केली आहे, पण किल्ल्यांचा त्यांनाही पहिलाच अनुभव ठरणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर सिंहगडाची निवड केली आहे. या मोजणीचा किल्ल्यांच्या डॉक्युमेंटशनसाठी मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती समितीचे सदस्य डॉ. सचिन जोशी यांनी दिली.
शासन दरबारी नोंद नसलेल्या किल्ल्यांच्या डॉक्युमेंटेशनसाठी समितीतर्फे संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तालुकानिहाय अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत. संबंधित किल्ला सध्या खाजगी अथवा
सरकारच्या कोणत्या विभागाच्या ताब्यात आहे, त्याचा सात-बारा, सद्यस्थिती अशी सविस्तर माहिती समितीने पत्राद्वारे मागितली आहे. किल्ल्यांची प्राथमिक अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्यांची शासकीय कागदपत्रांमध्ये नोंद करणे सोपे होणार आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा अपघातात तीन जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रिक्षावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना कोंढवा येथे रविवारी रात्री घडली. रिक्षाचालकाने पेट्रोल वाचवण्यासाठी उतारावर इंजिन बंद केले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून चालकाकडे चौकशी सुरू आहे. नातेवाइकांकडील लग्नकार्य आटोपून घरी येत असताना ही घटना घडली.
शिवनेरीनगरमधील गल्ली क्रमांक तीनमध्ये असलेल्या खड्ड्याच्या उतारावरून रिक्षा घेऊन जात असताना चालकाचे ​नियंत्रण सुटले आणि रिक्षा अतुल चौगुले यांच्या घराला जाऊन धडकली. या घटनेत दोघांचा जागीच तर तिसऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली.
शरीफ इब्राहीम खान (वय ६४), त्यांची पत्नी फैमिदा शरीफ खान (वय ६१) आणि बहीण झहिरा जहीर कुरेशी (वय ६५, सर्व रा. ताळेल चौक, घोरपडी गाव) अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या रिक्षातील प्रवाशांची नावे आहेत. रिक्षाचालक मोमीन बाबूलाल शेख (वय २२, रा. अमर रेसिडेन्सी, कोंढवा) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान कुटुंबीय हे घोरपडीगाव परिसरात राहण्यास आहेत. ते कोंढवा येथील शिवनेरीनगरमधील त्यांच्या नातेवाइकांकडे रिसेप्शनच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी मोमीन याची रिक्षा जाण्यासाठी थांबवली होती. शिवनेरीनगर येथील गल्ली क्रमांत तीनमध्ये उतार आहे. या उतारावरून येताना मोमीन याचे नियंत्रण सुटले आणि महादेव बाबर यांच्या घराशेजारील चौगुले यांच्या घरावर जाऊन ही रिक्षा आदळली. या घटनेची तीव्रता अधिक होती. त्यात रिक्षाचा प्रचंड नुकसान झाले; तर दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रिक्षा चालक हा गंभीर जखमी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​‘परागीभवनामध्ये मधमाशा कुशल’

$
0
0

पुणे ः वनस्पतींचे परागी भवन करणाऱ्या कीटकांमध्ये मधमाशा या सर्वाधिक प्रभावी आणि अत्यंत कुशल आहेत. अनेक प्रयोगातून निसर्गातील त्यांची भूमिका सिद्ध झाली आहे. शाश्वत कृषीचा त्या विश्वासार्ह भाग असल्याने मधमाशा पालनासाठी योजनापूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत केंद्रीय मधमाशा संशोधन संस्थेचे निवृत्त संशोधन अधिकारी डॉ. क. कृ. क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
वन विभागाने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या कार्यशाळेमध्ये वरिष्ठ वन्यजीव शास्त्रज्ञ रेनी बोर्जिस यांनी वनक्षेत्रात मधमाशी पालनावर नियंत्रण आणावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या विधानाला क्षीरसागर यांनी विरोध केला.
जंगलांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात मधमाशांचा मोठा वाटा आहे. एकाच मोहोळातील त्यांची हजारोंची संख्या, त्यांनी निवडलेल्या एकाच जातीच्या वनस्पतीची त्यांची फूल भेट आणि पुष्पनिष्ठा, फुलांना न दुखविता अन्न संकलनाची कला, पुष्परस संकलनासाठी आवश्यक असलेली शरीररचना आणि स्वभावाबद्दल सविस्तर अभ्यास झाला असून कार्ल फॉन फ्रिश यांना त्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे. मधमाशांमुळे वनस्पती वैविध्य टिकून राहते एवढेच नाही तर ते वाढतेही. भीमाशंकर भागात ठेवण्यात येणाऱ्या मोहोळांमुळे परिसंस्थेला काहीच फायदा होत नाही हे विधान अशास्त्रीय आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार देणार तोफांना संरक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गडांवरील बेवारस तोफांना संरक्षित करण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिल्याने या तोफांचे जतन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. राज्यातील गडकोटांच्या नियमित स्वच्छतेसाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी एनसीसी अभ्यासक्रमात ‘स्वच्छता अभियान’ या विषयाचा समावेश करावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
राज्य पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असणाऱ्या गडावरील मौल्यवान तोफ चोरीला गेल्यावर त्यांच्या संरक्षणाची मागणी शासनाकडे केली जात होती. त्याबद्दल ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘गडांवरच्या तोफा तस्करांच्या रडारवर’ हे वृत्त ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पुरातत्त्व खाते आणि दुर्ग संवर्धन समितीतर्फे तोफांच्या जतनासाठी तातडीने उपाययोजना होणार असल्याचे ‘मटा’शी बोलताना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीची बैठक समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत गडांवरील तोफांच्या संरक्षणासाठीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गडांवरील वाढते प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी नियमित स्वच्छता मोहिमांची गरज आहे. त्यासाठी राज्यातील विद्यापीठांनी एनसीसीमध्ये ‘स्वच्छता अभियान’ उपक्रमाचा समावेश करावा, ही सूचनाही तावडे यांनी दिल्याने गडांच्या स्वच्छतेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाला आहे.
राज्य संरक्षित ४९ गडांवर मिळून सुमारे २८० तोफांची नोंद शासनाकडे आहे. राज्यभरातील गडांवरील तोफांचा विचार केल्यास हा आकडा मोठा आहे. त्याची नोंदणी आणि ड्रॉइंग करणेही आवश्यक आहे. परांडा गडासारख्या काही गडांवरच्या तोफा गडांवरच केलेल्या गोडाउनमध्ये आहेत. त्या तोफांचेही ड्राइंग आणि नोंद होणे आवश्यक असल्याचे समितीचे डॉ. सचिन जोशी यांनी सांगितले. सध्या प्राथमिक संरक्षणाच्या दृष्टीने तोफा आहेत त्याच जागेवर फिक्स केल्या जाणार असून त्यांना लोखंडी ग्रिलिंग केले जाणार असल्याचे दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य राजू शेळके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकीअभावी बसखरेदी नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेच्या मुख्य सभेने तातडीने बसखरेदी करण्यासाठी मान्यता दिली. मात्र बस नक्की कोणाकडून घ्यायच्या याबाबत शहराचे पालकमंत्री, महापौर तसेच पालिका आयुक्त यांच्यात एकमत होत नसल्याने ही बस खरेदी रखडली असल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला. सर्वसाधारण सभेने मान्यता देऊनही गेल्या चार महिन्यात यासाठीचे टेंडर का काढले गेले नाही? असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपीएमएल) सुमारे १५५० बस खरेदी करण्याची मान्यता ऑगस्ट महिन्यात झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली होती. या बसची खरेदी कशी करावी, याचे संपूर्ण अधिकार सर्वसाधारण सभेने दिलेले आहेत. मात्र असे असतानाही आजपर्यंत या बसखरेदीची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. पीएमपीसाठी केल्या जाणाऱ्या बस खरेदीमध्ये पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, पालिका आयुक्त कुणाल कुमार हे आपला स्वतंत्र अजेंडा मांडत असल्याने बसखरेदी रखडली आहे. यामुळे पुणेकरांना बस सेवेपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. हा प्रस्ताव मान्य झाल्यापासून या तिघांमधील भांडणे संपुष्टात येऊन एकमत होत नाही.
बस या केरळच्या कंपनीकडून घ्याव्यात असा एक आग्रह आहे, तर या बस नागपूरच्या कंपनीकडूनच घेतल्या जातील, असाही एक आग्रह धरला जात असल्याने बसखरेदीचे टेंडर काढले जात नाही. ‘या तिघांमध्ये सुरू असलेला वाद शहरासाठी चांगला नाही, नागरिकांना वाढीव बसची गरज आहे. हा वाद संपुष्टात येईल, अशा अपेक्षेने आतापर्यंत काँग्रेस गप्प बसली, मात्र यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत बसखरेदीबाबत निर्णय होणार नाही, तोपर्यंत पालिकेची सर्वसाधारण सभा चालू देणार नाही,’ असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांना भीती केवळ एन्काउंटरचीच

$
0
0

पोलिसांकडून सडेतोड उत्तरामुळे गुन्हेगारांमध्ये भय

Prashant.Aher@timesgroup.com

पुणे : कोयते, तलवारीचे वार, तसेच गोळ्या घालून खून करण्याच्या रक्तरंजित प्रकारांचे पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला प्रचंड आकर्षण असल्याचे वारंवार घडलेल्या घटनांमुळे दिसते आहे; मात्र आपल्या क्रौर्याचे किळसवाणे प्रदर्शन करणाऱ्या गुन्हेगारांच्या शरीरांची चाळण करण्यास पोलिसांनी सुरुवात केल्याने अनेक दादा, भाई घाबरले आहेत. कायद्याला भीक न घालणाऱ्या या गुन्हेगारांना ‘गोळी’चीच भाषा समजत असल्याचे नुकत्याच झालेल्या एन्काउंटरवरून दिसते आहे.

गेल्या दोन वर्षांत मावळ, हवेली या दोन तालुक्यांमध्ये राजकीय पदाधिकारी असलेल्या सात व्यक्तींचे खून झाले आहेत. हे सातही खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आले असून, ते केवळ पैसे आणि राजकीय लालसेपोटी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हेगार गजाआड होत असले तरी हे खून थांबत नव्हते. तळेगाव दाभाडे येथील माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा १६ ऑक्टोबर रोजी खून झाला होता.

दाभाडे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. शेळके यांचाही खून करताना क्रौर्याचे किळसवाणे प्रदर्शन गुन्हेगारांनी दाखवले. राजकीय हत्या आणि गुन्हेगारांनी मावळात वर काढलेले डोके वेळीच ठेचणे गरजेचे बनले होते. पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम जाधव यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे काही गुन्हेगार गजाआड झाले. दोघांनी पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ते चकमकीत मारले केले. या घटनेमुळे तरी मावळ शांत होईल, अशी आशा उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.

चाकणनजीकच्या आंबू डोंगरावर पोलिसांबरोबरच गेल्या आठवड्यात झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे ऊर्फ तांबोली हे दोघे ठार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच पिस्तुले आणि ४२ जिवंत काडतुसे जप्त केली होती. दिवसा झालेल्या या घटनेमुळे तळेगावात दहशतीचे वातारवण होते. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचीही हत्या अशाच प्रकारे करण्यात आली होती. आरोपींनी हे दोन्ही खून करताना आपल्या क्रौर्याचे किळसवाणे प्रदर्शन घडवले होते. या प्रकारांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा होती.

पुणे शहराच्या सीमेवर वसलेल्या मावळ, सासवडच्या पायथ्याला आणि उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही महिन्यांत सहा राजकीय पदाधिकाऱ्यांचे खून झाले. जमिनी, त्यातून मिळणारा बक्कळ पैशांची या खुनांच्या घटनांना किनार होती. या सगळ्या घटनांमध्ये खून करण्यासाठी कोयते, पिस्तूल, तलवारीसारखे धारदार हत्यारे वापरण्यात आली होती. खुनाची घटना पाहिल्यानंतर पोटात धडकी भरावी, असे दृश्य घटनास्थळी पाहावयास मिळत असे. खून करणारे गुन्हेगार भले तुरुंगामध्ये गेले असले, तरी त्यांना कुणाचीही भीती वाटत नव्हती. दाभाडे, शिंदे यांच्या एन्काउंटरनंतर या गुन्हेगारांची तिथेही झोप उडाली असेल. मावळातील गुन्हेगारीचा कडेलोट झाला असून त्यांना चोख प्रत्युत्तराची गरज होती, अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.

मावळ, हवेलीतील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची दररोज झाडाझडती घेऊन त्यांना त्यांची ‘जागा’ दाखवण्याची वेळ आली आहे. पोलिस दारासमोर येऊन उभे राहतात, आपल्या पाठीमागे आपले कुटुंब रस्त्यावर येऊ शकते, अशी दहशत या गुन्हेगारांच्या डोक्यात बसणे गरजेचे आहे. पोलिसांनी आपली, आपल्या कुटुंबाची कुंडली मांडली असून, वेळ पडली तर आपल्याला सोडले जाणार नाही, अशी पोलिसांची दहशत प्रत्येक गुन्हेगाराच्या मनात बसणे गरजेचे आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव यांनी देहू रोड येथे महाकालीचा एन्काउंटर केल्यानंतर अनेक गुन्हेगारांनी पुणे जिल्हा सोडून पळ काढला होता. दाभाडे, शिंदे यांच्या एन्काउंटरनंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

तळेगावमध्ये बड्या राजकीय व्यक्तींकडून आपल्या राजकीय डावपेचांसाठी या गुन्हेगारांचा वापर सुरू केला आहे. त्यातून दुसऱ्यासाठी खड्डा खोदण्याच्या प्रयत्नात काही बड्या व्यक्ती खड्ड्यात पडण्याच्या परिस्थितीत आहेत. मावळातील गुन्हेगारांनी राजकीय व्यक्तींच्या खुनाच्या सुपाऱ्या घेण्यास सुरुवात केली असून, ही परिस्थिती मावळासाठी चांगली नाही. लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे या ठिकाणी होत असलेल्या गुन्ह्यांची पाळेमुळे राजकारणाशी जोडली गेली असल्याचे वारंवार तपासात उघडकीस आले आहे.

खुनाच्या काही घटना

- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष बंटी वाळुंज यांच्यावर गेल्या वर्षी कामशेत येथील महाराष्ट्र बँकेसमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. वाळुंज यांच्या खुनानंतर राजकीय हाणामारीच्या तीन घटना घडल्या.

- त्यानंतर बरोबर एक महिन्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा चाकूने भोसकून खून करण्यात याला.

- या घटनेनंतर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरपंच बाळासाहेब केदारी यांचा गळा चिरून खून करण्यात आला. सरपंचपदाच्या निवडणुकीवरून हा खून झाला.

- लोणावळा येथे सात सप्टेंबरला भर चौकात आतवण आपटी गेव्हंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आनंद धोंडू शिंगाडे यांच्यावर चौघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला होता.

- सासवड वडकी नाला येथे १० सप्टेंबरला युवा सेना पदाधिकारी हेमंत गायकवाड या गोळी झाडून खून करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांगावखोर महिलांना अटक करण्यात यश

$
0
0

विनयभंगाचा आरोप करून रिक्षाचालकांना गंडा घालण्याचा प्रकार

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : रिक्षा प्रवासादरम्यान काही अंतर गेल्यावर ‘रिक्षाचालकाने विनयभंग केला,’ असा कांगावा करून चालकाकडून पैसे उकळणारी महिलांची जोडगोळी शहरात वावरत होती. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून रिक्षाचालक नाइलाजास्तव तडजोड करत असल्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल होत नसे. एक प्रकरण तर पोलिस चौकीत गेल्यानंतरदेखील तक्रारदार महिला आणि रिक्षाचालक यांनी मिटवून घेतले आणि महिलांच्या जोडगोळीला पुन्हा एकदा पैसे मिळाले. परंतु रिक्षाचालकाने कालांतराने दाखवलेल्या धैर्यामुळे महिलांच्या त्या जोडगोळीला पकडण्यात पिंपरी पोलिसांना यश आले.

पोलिस अधिकारी, वकील, इस्टेट एजंट अशा वेगवेगळ्या नावाने ही जोडगोळी शहरात फिरून रिक्षाचालकांकडून पैसे उकळण्याचा उद्योग गेल्या अनेक महिन्यांपासून करत होती. खडकी, पिंपरी-चिंचवड, मोशी, हडपसर, कात्रज या पट्ट्यात प्रामुख्याने या जोडगोळीने अनेकांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे यातील एका महिलेला दोन गुन्ह्यांमध्ये शिक्षादेखील झाली होती. पोलिस मागावर असल्याचे समजल्यावर ही जोडगोळी थेट हायकोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धडपडत होती.

शक्यतो शहराच्या एका टोकाला जमीन बघण्यासाठी जायचे असल्याचे सांगून ही जोडगोळी रिक्षाचालकांना दिवसभर फिरवत असे. हातावर पोट असल्याने आणि एकाच प्रवाशाकडून दिवसभाराचे पैसे मिळतील या अपेक्षेने रिक्षाचालकदेखील या महिलांनी सांगितलेल्या ठिकाणी घेऊन जायला तयार होत होते. या जोडगोळीतील एका महिलेचा भाऊदेखील रिक्षा चालवत असल्याने कोणाला कसा गंडा घालायचा हे त्यांना माहीत होते.

दिवसभर फिरताना ही जोडगोळी रिक्षाचालकाशी गप्पा मारून तो राहायला कोठे आहे, त्याच्या घरी कोणकोण आहे, त्याला गंडा घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या मदतीला कोण येऊ शकते याची माहिती त्या प्रवासादरम्यान करून घेत होत्या. संध्याकाळ होताना एखाद्या ठिकाणी रिक्षा थांबवून त्या रिक्षाचालकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याशी लगट करून त्याच्यावरच आरोप करत होत्या. त्यानंतर रिक्षाचालकाला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैसे मागितले जात. मध्यंतरी अशाच प्रकारे हे प्रकरण पिंपरी चौकीत आले. रिक्षाचालक घाबरेल, असे जोडगोळीला वाटले. परंतु त्यानेदेखील ‘पोलिस चौकीत चला’ असे सांगितले. परंतु चौकीत आल्यावर गुन्हा दाखल आणि अटक होणार समजल्यावर रिक्षाचालक या जोडगोळीला पैसे देण्यास तयार झाला.

परंतु काही दिवसांनी या चालकाने घरी मुलांशी आणि मित्रांशी चर्चा करून याबाबत पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज केला. त्यानंतर तपासासाठी हे प्रकरण पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे आले. महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासात निष्णात असलेल्या फौजदार रत्ना सावंत यांच्याकडे हे प्रकरण तपासासाठी सोपवण्यात आले. त्यानंतर हवालदार जी. नायकरे, आर. के. टाकळकर, महिला कर्माचरी एस. आर. पाटील, निकम आदींच्या पथकाने या प्रकरणावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर सर्वप्रथम यातील एका महिलेचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

परंतु जोडगोळीतील मास्टरमाइंड महिला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी थेट हायकोर्टात गेली. परंतु जामीन नाकारल्यानंतर ती गायब झाली होती. काही दिवसांच्या मेहनतीनंतर सध्या संबंधित आरोपी महिला पोलिस अधिकारी असल्याचे सांगून खडकी परिसरात गंडा घालण्याच्या तयारीत असल्याचे पथकाला समजले आणि पोलिसांनी तिला जेरबंद केले. अजूनही या प्रकरणात अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. परंतु रिक्षाचालक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे कोणाकडून खंडणी उकळण्यात आली असल्यास पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images