Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गुटखा किंगला भाजपची उमेदवारी!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील वादग्रस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी व्यक्तींच्या भाजप प्रवेशाचं प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एका अशाच वादग्रस्त व्यक्तीला पक्षात प्रवेश दिल्याने भाजप अडचणीत आला आहे. सध्या आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू आहे आणि ही नगर परिषद लढविण्यासाठी उत्सुक असलेल्या एका गुटखा किंगला भाजपने उमेदवारी दिल्याने एकच खळबळ उडालीय.

धक्कादायक बाब म्हणजे, गुटखा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर बोरुंदिया संपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशांसन मंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी केलं तर या कार्यक्रमाला पुण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, भाजप सहयोगी सदस्य अपक्ष आमदार महेश लांडगे हजर होते.

भाजप गुंडांचा पक्ष बनत चाललाय: शिवसेना

भाजपमधील या इनकमिंगवर शिवसेनेने निशाणा साधला आहे. भाजपमध्ये गुंडाना प्रवेश देण्यासाठी चढाओढ लागली असून भाजप गुंडांचा पक्ष बनत चालल्याची जहरी टीका शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे व खासदार शिवाजीराव अढळराव पाटिल यांनी केली आहे तर शिवसेना जिल्हाधिकारी राम गावडे यांनी बोरुन्दीया यांच्या उमेदवारी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलंय.

कोण आहे सागर बोरुंदिया?

- नाव: सागर बोरुन्दीया (वय ३८)

- आळंदी प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपचा अधिकृत उमेदवार

- २०१४मध्ये अवैध गुटखा साठा आणि गुटखा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल

- गुह्यामध्ये अटक आणि १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटाबंदीची अंमलबजावणी चुकली: बोकील

$
0
0

नोझिया सय्यद । पुणे मिरर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु, नोटाबंदीबाबत आम्ही सादर केलेला 'रोड मॅप' जशाच्या तसा स्वीकारला असता आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली असती तर सर्वसामान्यांचे भले झाले असतेच शिवाय व्यवस्था परिवर्तनही झाले असते. एटीएम बाहेर लोकांच्या रांगा दिसल्या नसत्या, असा दावा अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अनिल बोकील यांनी केला.

चलनातील जास्त मुल्याची नोट बदलण्याची मूळ संकल्पना अनिल बोकील यांनी मांडली होती. त्यासाठी ते जुलैमध्ये मोदींना भेटले होते. नोटा कशा बदलाव्यात आणि त्याअनुषंगाने काय काय केले पाहिजे याचा 'रोड मॅप'च बोकील यांनी मोदींना सादर केला होता. मात्र आपण दिलेल्या पाच उपायांमधील केवळ दोनच उपाय सरकारने स्वीकारले. त्यांच्या पसंतीच्याच पर्यायांना प्राधान्य देण्यात आले. हा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला नाही. तरीही अचानक घेण्यात आलेला हा निर्णय कुणालाच नाकारताही येणार नाही. हा निर्णय स्वीकारण्यास आम्ही सारेच बांधिल आहोत, असे बोकील म्हणाले.

हा प्रस्ताव जशाच्या तसा स्वीकारला असता तर देशात व्यवस्था परिवर्तन झाले असते. पण सरकारने गुंगीचे औषध देण्याआधीच रुग्णाचे ऑपरेशन केले, त्यामुळे रुग्णाला प्राण गमवावा लागला, अशी मार्मिक टिपण्णी करतानाच प्रस्तावानुसार अंमलबजावणी केली असती तर या निर्णयाचा केवळ आणि केवळ काऴा पैसा, दहशतवाद आणि खंडणीखोरीसारख्या प्रकारांवर परिणाम झाला असता असा दावाही त्यांनी केला.

दोन हजाराच्या नोटा परत घ्या

सरकारने दोन हजाराच्या नोटा चलनात आणल्या आहेत. या नोटा परत मागे घेण्यासाठी लवकरच केंद्र सरकारला प्रस्ताव देणार असल्याचेही बोकील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणकडे १०८ कोटींचा भरणा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

महावितरणने थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत तीन लाख थकबाकीदारांनी सुमारे १०८ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. थकीत बिलांपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई या महिन्यातही सुरू राहणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यात बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम गेल्या महिन्यापासून तीव्र करण्यात आली आहे. पुणे परिमंडलात सप्टेंबर महिन्याअखेर सहा लाख १९ हजार वीजग्राहकांकडे सुमारे १९० कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. त्यामध्ये तीन लाख १०० वीजग्राहकांनी थकीत ​बिलांपोटी सुमारे १०८ कोटी रुपयांचा भरणा केला आहे.
सध्या चार हजार ३२५ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला असून, त्यांच्याकडे सात कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे.
थकबाकीदारांकडे असलेल्या बिलांचा भरणा करण्यासाठी येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात स्वीकारण्यात येणार आहेत. याशिवाय महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइटवर; तसेच मोबाइल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदार वीजग्राहकांनी जवळच्या वीजजोडणीतून किंवा वीजचोरीतून वीज वापरल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी खंडित असलेल्या वीजजोडण्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेचे इशारे; पालिकेसाठी रणनीती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी तिरंगी लढतीत भाजप आणि काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळविल्याने महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील पक्षीय राजकारणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीत पडद्यामागे बरेच राजकारण झाल्याने काहींना फायदा झाला; तर काहींना त्याचा फटका बसला. महापालिकेच्या स्तरावर पक्षांतर्गत कुरबुरी आणि कुरघोडी कमी झाल्या नाहीत, तर अंतिम निकालावरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आघाडी-युती होणार की नाही, यावरून अद्याप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिला. तर, भारतीय जनता पक्ष-शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या महायुतीच्या उमेदवाराला सुरुवातीला पाठिंबा देण्यास शिवसेनेने चक्क नकार दिला होता. अखेरच्या क्षणी तडजोड झाली असली, तरी सर्व मते महायुतीच्या उमेदवाराला पडली नाहीत. याचाच अर्थ, युतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळलेला नाही.
महापालिकेत सध्या सत्तेवर असलेल्या आणि केंद्रात आणि राज्यात एकत्र असणाऱ्या चारही पक्षांना महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवायची आहे. तरीही, महापालिकेची निवडणूक आघाडी-युती करूनच लढवावी, अशीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. प्रभागाचा विस्तार खूप मोठा झाला आहे; पण लोकसंख्याही वाढली असल्याने कोणताही एक पक्ष मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे, आघाडी-युती करूनच निवडणूक लढविण्याचा आग्रह वारंवार धरला जातो आहे. आघाडी-युतीचे सर्वाधिकार स्थानिक पातळीवर असतील, असे प्रमुख पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने यापूर्वी स्पष्ट केले असले, शहरातील नेते मात्र वरिष्ठ स्तरावरच निर्णय होईल, असे सांगत आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांची द्विधा मनःस्थिती झाली असून, नक्की स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारी करायची, की आघाडी-युतीच्या दृष्टीने नियोजन करायचे, याचे कोडे सोडवणे त्यांना अवघड झाले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेली प्रभागरचना एखाद्या पक्षाच्या हितासाठी तयार करण्यात आल्याचा वारंवार आरोप केला जात आहे. मात्र, संपूर्ण शहराचा आढावा घेतला, तर नव्या प्रभागरचनेमुळे एखादा पक्ष खरोखरीच जोरदार मुसंडी मारेल, अशी सुतराम शक्यता नाही. त्याशिवाय, स्थानिक स्तरावरील प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि नगरसेवकाचा मतदारांशी असलेला संपर्क या गोष्टी निर्णायक ठरू शकतात. त्यात, अनेक नगरसेवकांचे २०१२ च्या निवडणुकीत असलेले प्रभाग पूर्णतः बदलले गेले आहेत. काही भाग नव्याने जोडण्यात आला आहे. तर, काही भाग वेगळ्याच प्रभागात गेला आहे. त्यामुळे, निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वच उमेदवारांना ‘व्होट बँके’चा भरभक्कम आधार हवा, असे वाटणे स्वाभाविक आहे.
महापालिकेच्या निवडणुकांमध्ये यंदा वैयक्तिक स्तरासह पक्ष पाहूनही मोठ्या प्रमाणावर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यातच, चार भागांतील चार उमेदवार असल्याने पॅनेलमधील एखाद्या उमेदवाराला इतर सर्व उमेदवारांना सोबत घेत पुढे न्यावे लागणार आहे. यात, पक्ष एकसंध असणे अत्यंत गरजेचे असून, कुठेही काही त्रुटी निर्माण झाल्या, तर त्याचा फटका स्वपक्षाच्या उमेदवारांना बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीने त्याची झलक दाखवली आहेत. काँग्रेसने जिल्ह्यातून दिलेल्या उमेदवाराला शहरातून अपेक्षित साथ मिळाली नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटली. त्यामुळेच, काँग्रेसला अधिक सावध पावले उचलणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे, भाजपच्या उमेदवारालाही शिवसेनेकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही. त्यामुळे, महायुतीच्या संख्येपेक्षा कमी मतांचे दान पदरात पडले आहे.
विधान परिषद निवडणुकीतील हे सूचक इशारे लक्षात घेऊन महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी रणनीती ठरवणे, सर्व पक्षांसाठी आवश्यक ठरणार आहे. त्यादृष्टीने, पक्षबांधणी, पक्षसंघटन यावर भर देण्यासह आघाडी-युती झाली, तर त्याचा धर्म पाळला जाईल, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत दिल्या गेल्या पाहिजेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
किरकोळ विक्रेत्यांप्रमाणे घाऊक औषध विक्रेत्यांना पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी नाही. त्यामुळे घाऊक औषध बाजारातून किरकोळ विक्रेत्यांना औषधे खरेदी करता येत नसल्याने त्यांच्याकडे औषधांचा तुटवडा होण्याची भीती व्यक्त होत आहे.
‘देशात औषध विक्रेत्यांची मोठी साखळी आहे. सुमारे आठ लाख औषधे विक्रेते देशात तर राज्यात साठ हजारांहून अधिक आहेत. घाऊक विक्रेत्यांना किरकोळ विक्रेत्यांकडून पाचशे, एक हजार रुपये स्वीकारण्यास परवानगी नाही. ते नोटा स्वीकारत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरकोळ विक्रेत्यांप्रमाणे देशातील घाऊक औषध विक्रेत्यांना पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे,’ अशी माहिती अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दिली.
‘किरकोळ विक्रेते घाऊक विक्रेत्यांकडून औषध खरेदी करतात. शहरासह ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेत्यांना पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी आहे. जीवनावश्यक असल्याने औषधविक्री थांबविता येत नाही. अनेक विक्रेत्यांची बँकेत खाती नाहीत. घाऊक विक्रेते नोटा स्वीकारत नसल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास ग्रामीण भागात औषधांचा तुटवडा होऊ शकतो, अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केली. दरम्यान, ‘आम्हाला मोठ्या नोटा स्वीकारता येत नाहीत. नोटाबंदीमुळे सदाशिव पेठेतील घाऊक औषध विक्रीवर परिणाम झाला आहे,’ अशी माहिती सदाशिव पेठेतील घाऊक औषध विक्रेते निलेश अमृतकर यांनी दिली.
‘नोटाबंदीमुळे किरकोळ औषध विक्रीवरही परिणाम झाला आहे. चेकद्वारे पेमेंट घेणाऱ्या घाऊक विक्रेत्यांकडे औषध खरेदी करताना अडचण येत नाही. परंतु, रोखीने खरेदी करताना वाद होत आहेत. नोटाबंदीमुळे ग्राहकांनी दोन ते तीन महिन्यांची औषध खरेदी करण्यास सुरुवात केली. परंतु, खरेदी न झाल्यास औषधांचा तुटवडा होऊ शकतो,’ असे किरकोळ औषध विक्रेते जयेश कासट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांबाहेरच्या गर्दी मंगळवारी ओसरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या चौदा दिवसांपासून बँकांबाहेर लागणाऱ्या भल्यामोठ्या रांगा मंगळवारी काहीशा कमी झाल्या. बँकांमधील व्यवहारही बऱ्यापैकी सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. असे असले, तरी शहरातील बँकांकडे दोन हजार रुपयांच्याच नोटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा कायम आहे. त्याचबरोबर अजूनही पाचशे रुपयांची नवी नोट बँकांना व्यवहारासाठी उपलब्ध झालेली नाही.
मंगळवारी बँकांबाहेरील रांगा काहीशा कमी झाल्या होत्या. लग्नासाठी अडीच लाख रुपये काढण्याबाबतचे परिपत्रक रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. त्यामुळे या परिपत्रकाआधारे चौकशी करण्यासाठी गर्दी झाली होती. काही बँकांनी ग्राहकांना याबाबतची माहिती देऊन त्यांचे अर्ज स्वीकारले. तर काही बँकांनी अजून इंडियन बँक्स असोसिएशनचे निर्देश आले नसल्याचे सांगत त्यानंतरच अर्ज करण्यास सांगितल्याची तक्रार ग्राहकांनी केली.
बँकांमधील रांग टाळत काही खातेदारांनी ई-गॅलरीमधील कॅश डिपॉझिट मशिनद्वारे पैसे भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सायंकाळनंतरही या ई -गॅलरीबाहेर खातेदारांच्या रांगा दिसून आल्या. पुण्यातील सर्वात मोठी शाखा असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेतही खातेदारांची मोठी रांग होती.
बँकेतर्फे रांगेत उभ्या राहणाऱ्या खातेदारांसाठी मंडप उभारण्यात आला असून खातेदारांसाठी चहापाण्याचीही व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर खातेदारांचे प्रबोधनही केले जात आहे. दरम्यान, पोस्टातही पैसे भरण्यास किंवा जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लागणाऱ्या रांगेचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. पोस्टातील बचत खात्यात पैसे भरण्याचे प्रमाण मोठे असले, तरी काढून घेण्याचे प्रमाण मात्र, नगण्य आहे, असेही पोस्टातील सूत्रांनी सांगितले. पोस्टातर्फेही अनेक ठिकाणी रांगेतील खातेदारांसाठी पाणी, चॉकलेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चारित्र्यांच्या संशयावरून उच्चशिक्षित पत्नीवर तलवारीने वार करत गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी धायरीत घडली. सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेचा खून झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. सिंहगड रोड पोलिसांनी खून करणाऱ्या पतीला अटक केली आहे.
पूजा स्वप्नील भडावळे (वय २२, रा. भैरवनाथ मंदिरामागे, गल्ली क्रमांक १४, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा खून केल्याच्या आरोपावरून पती स्वप्नील देविदास भडावळे (वय २३) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण येथील सुतारवाडी हे पूजाचे माहेर आहे. तिने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले होते. सहा महिन्यांपूर्वीच तिचा स्वप्नीलसोबत विवाह झाला होता. स्वप्नील याचा शेती व्यवसाय असून अलिकडे तो बांधकाम व्यवसायामध्ये उतरला होता. त्याने नुकतेच एक मंगल कार्यालयही बांधायला घेतले होते.
विवाहानंतर काही दिवसांतच स्वप्नील हा पूजाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. या कारणावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत होती. याच कारणावरून सोमवारी रात्रीही त्यांच्यामध्ये वादावादी झाली. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घरी दोघेच होते. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. स्वप्नीलने धारदार तलवारीने तिच्या दोन्ही हातांच्या दंडावर वार केले. त्यानंतर गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. खोलीमध्ये सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. तिला तेथेच टाकून तो बाहेर आला. त्यानेच पोलिसांना फोन करून पत्नीचा खून झाल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) बबन खोडगे व पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्वप्नीलकडे चौकशी केली. त्या वेळी सुरुवातीला त्याने काही माहिती नसल्याचे सांगितले. त्याला पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यानेच खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​आला ‘मंदी’चा महिना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात तेजीचा अनुभव घेतल्यानंतर नोटबंदीमुळे बाजारपेठेत ‘मंदी’चा महिना आला आहे. नोटाबंदीमुळे अनेक क्षेत्रांमधील उलाढाल विस्कळीत झाली असून नोटा-पैसे खर्च न करता जपून ठेवण्याची मानसिकता ग्राहकांमध्ये निर्माण झाल्याचा फटका बसला आहे.
गेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय परिस्थिती, व्याजदर अशा विविध कारणांमुळे बाजारपेठेला मंदीने ग्रासले होते. मात्र, यंदा देशभरात चांगला पाऊस झाला, तसेच व्याजदरही घटविण्याची दिशा स्पष्ट झाली. त्यामुळे दसरा दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली आणि ऑक्टोबरसह नोव्हेंबरच्या पहिल्या टप्प्यातही अनेक व्यावसायिकांनी तेजीचा अनुभव घेतला. मात्र, गेल्या आठ नोव्हेंबर रोजी सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. त्यानंतर बाजारात नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला. नोटा टंचाईमुळे नागरिकांनी खर्चाचे प्राधान्यक्रम बदलले असून आवश्यक गोष्टींवर आणि जपूनच खर्च करू लागले आहेत. त्याबरोबरच परिस्थिती कधी सुधारेल, याबाबत काहीही अंदाज नसल्यामुळे बँका किंवा एटीएममधून मिळणाऱ्या तुटपुंज्या नोटाही घरीच जपून ठेवण्याची मानसिकता ग्राहकांमध्ये वाढली आहे. ग्राहकच खरेदीसाठी पुढे येत नसल्यामुळे अनेक व्यावसायिकांना या महिन्यात मंदीचा अनुभव येऊ लागला आहे.

पर्यटन क्षेत्राला फटका
नोटांच्या तुटवड्यामुळे पर्यटन क्षेत्राला फटका बसला असून बुकिंगचे प्रमाण कमी झाले आहे. अनेक पर्यटक सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. अनेक पर्यटकांकडून आम्हाला कार्ड पेमेंटबाबत मागणी होत आहे. मात्र ते आम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. प्रत्येक व्यवहारामागे बँक आमच्याकडून दीड ते साडे तीन टक्क्यांपर्यंत शुल्क आकारते. पर्यटकांकडून हे शुल्क वसूल करणे शक्य नसल्याने ते पैसे आमच्या खिशातून जातात. त्यामुळे बँकांनी डेबिट-क्रेडिट कार्ड व्यवहारांवरील दर कमी करणे आवश्यक आहे. ट्रॅव्हल एजंटकडील बुकिंग कमी होण्याचा परिणाम केवळ आमच्यापुरता मर्यादित नसून पर्यटनस्थळांमधील हॉटेल व्यावसायिक आणि संपूर्ण पर्यटन क्षेत्रालाही फटका बसला आहे.
- नीलेश भन्साळी (संचालक, पुणे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन )

ग्राहकांची संख्या घटली
पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे रोख रक्कम येण्याचे प्रमाण कमी झाले. रोख नोटा घेऊन येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खरेदीत फरक पडला आहे. ३० टक्के ग्राहकांची संख्या घटली आहे. पूर्वी क्रेडीट कार्डने काही ग्राहक खरेदी करीत होते. आता कार्डद्वारे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन हजार आणि शंभर रुपयांच्या नोटा आता व्यवहारात येऊ लागल्याने येत्या दहा पंधरा दिवसांत परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
- सुरेंद्र जैन, (खजिनदार, रिटेल टेक्स्टाइल गारमेंट सिंडीकेट)

गरजेपुरतीच खरेदी सुरू
लक्ष्मी रस्त्यावर खरेदी करण्यास येणाऱ्या ग्राहक गरजेपुरतेच खरेदी करीत आहेत. नोटांचा तुटवडा जाणवत आहे. नोकरदारांपासून ते विविध प्रकारच्या व्यावसायिकांचे सरकारच्या नव्या येणाऱ्या धोरणांवर लक्ष आहे. ग्राहकांवर सरकारच्या धोरणांचा परिणाम दिसून येत आहे. लगीनसराई सध्या सुरू आहे. परंतु, ग्राहक सध्या त्यांना जेवढ्या वस्तू अथवा कपड्यांची गरज आहे तेवढीच खरेदी करीत आहेत. नोकरदारांच्या व्यवहारावर फारसा परिणाम पडला नाही. एकूणच लक्ष्मी रोडच्या किरकोळ व्यापाऱ्यांवर नोटाबंदीचा परिणाम झाला आहे.
- राहुल बोरा (अध्यक्ष, लक्ष्मी रोड व्यापारी असोसिएशन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​अभियंता तरुणी चिखलीतून बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
चिखली मोरेवस्ती परिसरात राहणारी अभियंता तरूणी बेपत्ता झाली आहे. मी घरातून निघून जात आहे, अशा आशयाची चिठ्ठी तिने लिहून ठेवली आहे. शनिवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ती बेपत्ता झाली असून, तिचा अद्याप शोध लागलेला नाही.
मोहिनी पंडित जोगदंड (२२, रा. दत्त हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली) असे बेपत्ता झालेल्या युवतीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची बहीण शिल्पा शरद शिंदे (२६, रा. दत्त हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा ही मोहिनीची बहीण आहे. शिल्पाने मोहिनीला शनिवारी सकाळी आकराच्या सुमारास तिच्या चिंचवड येथील कार्यालयावर सोडले होते. दरम्यान मोहिनीची दुसरी बहीण सीमा हिला मोहिनीने लिहून ठेवलेली ‘मी घरातून निघून जात आहे’ असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी चिखलीतील राहत्या घरी आढळून आली. त्यानंतर शिल्पा व सीमा यांनी मोहिनीच्या कार्यालयावर जाऊन तिचा शोध घेतला असता त्यांना तिथे मोहिनी भेटली नाही. मोहिनीचा शोध घेतला असता तिचा काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात मोहिनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
मोहिनीचा वर्ण गोरा आणि उंची पाच फूट असून तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट असा पेहराव केला आहे. यासंबंधी काही माहिती मिळाल्यास त्वरित निगडी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप, शिवसेना मनसेमुळेच यश

$
0
0

नवनिर्वाचित आमदार अनिल भोसले यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी बरोबरच काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मनसेने केलेल्या मदतीमुळेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळविता आल्याची भावना आमदार अनिल भोसले यांनी मंगळवारी व्यक्त केली. ‘विधानपरिषदेसाठी आमचे सभासद तुम्हाला मतदान करतील, असा शब्द सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला होता. जिल्ह्यातील सेनेच्या नेत्यांनी हा शब्द पाळला, मात्र शहरातील पक्षप्रमुखांनी शब्द फिरविला. त्यामुळे मताधिक्य घटले,’ असे भोसले म्हणाले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत भोसले यांना ४४० मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम केले. शिवाय काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या मदतीमुळेच एवढे मोठे मताधिक्य मिळाले. सेनेच्या शहरातील प्रमुखांनी आयत्यावेळेस आपला शब्द फिरविला; त्यामुळे भाजपचे उमेदवार अशोक येनपुरे यांना शंभरहून अधिक मते मिळविता आली. भाजपच्या उमेदवाराला शंभर पेक्षा कमी मते पडू नयेत, यासाठी शिवसेनेने आपला शब्द फिरविल्याचे भोसले यांनी सांगितले. या निवडणुकीत काँग्रेसचीही मोठ्या प्रमाणात मते आपल्याला मिळाली. काँग्रेसची १२४ मते असताना उमेदवार संजय जगताप यांना केवळ ७१ मते मिळाली. उर्वरित सर्व मते भोसले यांना पडली. भोसले यांनी काँग्रेसची ५३, सेना, भाजपची १८ मते फोडल्याचे या निवडणुकीच्या निकालात दिसून आले. सर्वच पक्षांनी केलेल्या मदतीमुळे हा विजय अत्यंत सुकर झाल्याची भावना आमदार भोसले यांनी व्यक्त केली.
..
‘पालिका निवडणूक स्वबळावर लढावी’
‘महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही, याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जाईल. मात्र, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून पालिका निवडणूक राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढावी, असे मला वाटते. सध्या काँग्रेसकडे शहरात नेतृत्व नाही. जिल्ह्यातील नेता शहरात आणला तर गट पडतील. काँग्रेस आता पूर्णपणे वेगळी झाल्याने पालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी न करता स्वतंत्र लढले पाहिजे,’ असेही भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व प्रभागांसाठी स्वतंत्र जाहीरनामा

$
0
0

भारतीय जनता पक्षाचा पालिका निवडणुकीसाठी संकल्प

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शहर स्तरावर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासह महापालिकेच्या पुढील निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व प्रभागांचाही स्वतंत्र जाहीरनामा भारतीय जनता पक्षातर्फे तयार करण्यात येणार आहे. या दोन्ही जाहीरनाम्यांचे काम सुरू असून, प्रभाग स्तरावरील जाहीरनाम्यात नागरिकांच्या अपेक्षांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी मंगळवारी पत्रकारांना माहिती दिली. डिसेंबरमध्ये सुरुवातीला शहराचा जाहीरनामा प्रकाशित केला जाईल, तर त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रभाग स्तरावरील स्वतंत्र जाहीरनामे स्थानिक नागरिकांसमोर मांडण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी झालेले प्रभाग सुमारे ८० हजार लोकसंख्येचे, तर ६० ते ७० हजार मतदारांचे आहेत. या प्रभागांमध्ये नागरिकांना नेमक्या कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत, याची माहिती त्यांच्याशी संवाद साधून घेतली जात आहे. त्यांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब प्रभागाच्या जाहीरनाम्यामध्ये उमटावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा गोगावले यांनी केला. डिसेंबरच्या मध्यापर्यंत शहरातील निम्म्या प्रभागांच्या जाहीरनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेत त्यांनी दिले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या गेल्या दोन वर्षांतील विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील दोन महिन्यांत शहराच्या सर्व भागांत अडीचशे कोपरा सभा घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.................
‘स्वाइप मशिन उपलब्ध करणार’
नोटाबंदीनंतर नागरिकांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी किराणा माल, पेट्रोल पंप व्यावसायिक, व्यापारी यांच्यासमवेत बैठका घेतल्या जात आहेत. किराणा मालाच्या दुकानात डेबिट/क्रेडिट कार्ड वापरता यावे, यासाठी आवश्यक स्वाइप मशिन बँकांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यासाठी पक्षातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. कॉसमॉस बँक, जनसेवा, जनता आणि साधना या बँकांच्या संचालकांसोबत चर्चा झाली असून, आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे, असा दावा गोगावले यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळे व्यवहार रोखण्याचे हत्यार

$
0
0

अडीच लाखांहून अधिक रक्कम भरणाऱ्यांची खाती ‘होल्ड’वर

Prasad.Panse@timesgroup.com
Tweet : @prasadpanseMT

पुणे : नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, म्हणजे आठ नोव्हेंबरनंतर, अडीच लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झालेल्या खात्यांचे व्यवहार रोखून (होल्ड) धरले जात आहेत. अशा खातेदारांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस बजावण्यात येत असून, या रकमेच्या स्रोताबाबत त्यांनी केलेला खुलासा समाधानकारक वाटला, तरच निर्बंध उठवण्यात येणार आहेत. तोपर्यंत या खातेदारांना या खात्यातून रक्कम काढता येणार नसल्याचे समजते. विश्वसनीय सूत्रांनी ‘मटा’ला ही माहिती दिली.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने बँकांमधील व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, बँकेत जमा होणाऱ्या रकमेबाबत बँकांकडून दररोज अहवाल मागवण्यात येत आहे. ज्या खात्यांमध्ये एका दिवशी ५० हजार अथवा आठ नोव्हेंबरनंतर अडीच लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे, अशा खातेदारांची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे.

पूर्वी दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत जमा झाल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जात होती. ही माहिती दर तीन महिन्यांनी पाठवण्यात येत होती. अलीकडेच ही मुदत पंधरा दिवसांवर आणण्यात आली होती; मात्र नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बँकेत जमा झालेल्या रकमेचा अहवाल दररोजच थेट प्राप्तिकर विभागाला मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्याची मर्यादा साडेचार हजारांवरून आता दोन हजार रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक खातेदाराला आपले खाते असलेल्या बँकेतूनच नोटा बदलून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे खातेदारांना या बाद नोटा खात्यात भरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

‘अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास प्राप्तिकर विभागाचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीपोटी अनेकांनी आपल्याकडील जुन्या नोटा इतरांना त्यांच्या खात्यावर भरण्यासाठी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इतर वेळी ज्या खात्यांमध्ये पाच ते दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहारही होत नव्हते, अशा खात्यांमध्ये अडीच लाखांपर्यंत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच अशा संशयास्पद खात्यांकडे नजर वळली, असून प्राप्तिकर विभागाने या खातेदारांना नोटीस बजावून त्यांची खाती ‘होल्ड’वर ठेवण्यास सुरुवात केली आहे,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.


हे आहेत ‘रडार’वर

बडे बांधकाम व्यावसायिक, सराफ, उद्योगपती, अधिकारी यांनी आपल्याकडे घरकाम करणाऱ्या महिला, नोकर, ड्रायव्हर, त्याचबरोबर कंपनीतील शिपाई व अन्य नोकरांकडे आपल्याकडील काळा पैसा पांढरा करण्यासाठी दिल्याचा संशय आहे. ‘पाचशे व हजार रुपयांच्या नोटांमधील रक्कम संबंधित नोकर आपल्या खात्यावर भरणार असून, कालांतराने ही रक्कम काढून पुन्हा संबंधित व्यावसायिकांना परत करतील, अशी ही रचना आहे. परिणामी, एरवी कधीही नव्हती इतकी रक्कम काही विशिष्ट खात्यांमध्ये दिसत आहे. त्याला आळा घालण्यासाठीच ही पावले उचलण्यात आली आहेत,’ असे प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल भोसले विजयी

$
0
0

राष्ट्रवादीने गड राखून फोडली काँग्रेस, महायुतीची मते

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार अनिल भोसले यांनी पहिल्याच फेरीत ४४० मते घेऊन निर्विवाद विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार अशोक येनपुरे, काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव करून राष्ट्रवादीचा गड कायम राखतानाच काँग्रेसची ५३ आणि भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीची १८ मते फोडण्याची किमया केली.
या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे येनपुरे राहिले. त्यांना १३३, तर काँग्रेसचे जगताप यांना केवळ ७१ मते मिळाली. अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे; तसेच यशराज पारखी यांना प्रत्येकी तीन मते मिळाली. या मतदार संघात ९४.२७ टक्के मतदान झाले होते. ६९८ मतदारांपैकी ६५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.
शिवाजीनगर येथील गोडाउनमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. आठ मते बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जाहीर केले. पहिल्या फेरीतच भोसले यांनी विजयी आकडा पार केला. त्यांना ४४० मते मिळाली. भोसले विजयी झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची २९८, काँग्रेसची १२४, भाजपची ७१, शिवसेना ७६ आणि आरपीआयची चार मते होती. काँग्रेसची ५३ मते, तर महायुतीची १८ मते फुटल्याचे निदर्शनास आले.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे हे यश मिळाले. प्रचाराच्या काळात पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या विजयाचा पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी उपयोग होईल.
- ​अनिल भोसले

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. या निवडणुकीचा पक्षवाढीला फायदा होईल. आगामी निवडणुकांसाठी धोरण ठरवण्यासाठी त्याचा लाभ होईल.
- अशोक येनपुरे

‘पालिका विजयासाठी सामूहिक नेतृत्त्व हवे’
‘पालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळवायची असेल तर सर्वांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या सामूहिक नेतृत्त्वाची गरज आहे. एककल्ली कारभार करून सत्ता मिळवणे शक्य होणार नाही,’ या शब्दांत विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार अनिल भोसले यांनी पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या कारभारावर तोफ डागली.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भोसले यांनी चव्हाण यांच्या कारभारावर कडक शब्दात टीका केली. ‘निवडणुकीतील विजय राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबच पक्षाचे पदाधिकारी, महापौर, महापालिके‌तील गटनेते, जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या कामाचे यश आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचा झेंडा महापालिकेवर राखण्यासाठी प्रयत्न केले जातील. सत्तेसाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन काम करण्याची गरज आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेऊन सामूहिक चर्चा केली पाहिजे. पक्षाने आपल्या पद दिले म्हणून प्रत्येक निर्णय आपल्या मनाप्रमाणे घेऊन इतरांवर थोपविण्याचे टाळले पाहिजे,’ अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली.
आमदार म्हणून काम करताना यापूर्वी कधीही महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले नव्हते. भविष्यातही पालिकेच्या राजकारणात स्वत:हून ढवळाढवळ करणार नाही. मात्र, पक्षाने जबाबदारी दिल्यास पालिकेत अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्न करीन. पालिका निवडणुकीसाठी पक्षाने जबाबदारी दिल्यास अवश्य काम करीन, असेही भोसले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेनेत युतीवरून तणाव

$
0
0

भाजपचा हात पुढे; मात्र शिवसेनेची स्वबळाची भाषा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होत नाही, तोच महापालिकेच्या आगामी निवडणुकीवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये मैत्रीसाठी आमचा हात सदैव पुढे आहे, अशी भूमिका भाजपने मांडली आहे. युतीचा प्रश्नच निर्माण होत नाही; आम्ही स्वबळावरच लढणार, असा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे.
विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप-सेना-रिपाइं महायुतीचे उमेदवार अशोक येनपुरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत महायुतीची काही मते फुटल्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर होताच, अवघ्या काही तासांत महापालिकेतील संभाव्य युतीवरून भाजप-शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
‘महापालिका निवडणुकीला बराच कालावधी आहे. युतीबाबतचा निर्णय होण्यास आणखी काही वेळ द्यावा लागेल. सध्यातरी या संदर्भात चर्चा झालेली नाही. युतीसाठी आमचा हात नेहमीच पुढे आहे; पण समोरून प्रतिसाद आलेला नाही. औपचारिक चर्चा झाल्यावरच युतीबाबत भूमिका मांडणे योग्य ठरेल’, असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. भाजपने युतीसाठी हात पुढे करण्याची भूमिका मांडली असली, तरी त्यांच्याशी युती करण्यात कोणतेही स्वारस्य नसल्याचा पुनरूच्चार शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी केला. महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार असे स्पष्ट संकेत निम्हण यांनी दिले आहेत. युतीच्या निर्णयाचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असून, स्थानिक स्तरावर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असा दावाही त्यांनी केला.

‘पुण्यात युती नको; पिंपरीत हवी’
राज्यामध्ये होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका भाजप-सेना युतीद्वारे लढविणार असल्याचे अगदी शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आले होते. राज्यात मुंबई, पुण्यासह १० महापालिकांमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने आतापासूनच विविध पक्षांतर्फे चाचपणी सुरू असून, युतीबाबतही कार्यकर्त्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसून येते. पुण्यात भाजपशी युती नको, असा दावा केला जात असताना, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका मात्र युती करूनच लढवाव्या, अशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकार पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चौकाचौकांमध्ये टंगळमंगळ करीत वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. ऑन ड्युटी गैरहजर राहणाऱ्या सोळा पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी गैरहजर पोलिसांची माहिती घेऊन ही कारवाई केली आहे.
वाहतूक पोलिसांकडून चौकामध्ये वाहतूक ​नियमन करताना अनेकदा निष्काळजीपणा करण्यात येतो. पावत्या फाडण्यासाठी हे कर्मचारी आपले ठिकाण सोडून गल्लीबोळात कारवाईची मोहीम हाती घेतात, तसेच चौकांमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडाला तरी त्याची त्यांना फिकीर नसते. अशा कामचुकार वाहतूक पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मुंढे यांनी गेल्या दोन दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आलेल्यांची हजेरी घेण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या ४८ तासांत त्यांना १६ ठिकाणचे कर्मचारी वाहतूक नियमन करताना आढळले नाहीत. त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. तत्कालीन वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनीही अशीच कारवाई करून १९ वाहतूक पोलिसांना निलंबित केले होते. तत्कालीन उपायुक्त सारंग आवाड यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहतूक पोलिसांवर नजर ठेवली होती. मुंढे यांनीही वाहतूक नियमन करताना पोलिसांकडून कुठलीही कसूर होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. ‘दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांना शिक्षाही देण्यात आली आहे. मात्र, करण्यात आलेली कारवाई वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे,’ अशी ​माहिती मुंढे यांनी दिली. दरम्यान, मुंढे यांच्या कारवाईने वाहतूक दलात खळबळ उडाली असून, मंगळवारी दिवसभर चौकांमध्ये कर्मचाऱ्यांचा वावर वाढल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दरोडेखोर टोळी अटकेत

$
0
0

राज्यात १७ बँकांवर दरोडे टाकल्याचे उघडकीस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राहू येथील जिल्हा बँकेवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीने सात जिल्ह्यांतील १७ जिल्हा बँकांच्या शाखेवर सशस्त्र दरोडे टाकून कोट्यवधी रूपयांची लूट केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून २०.२९ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सचिन अप्पा इथापे (वय २७), पृथ्वीराज उर्फ पतंग दत्तात्रय माने (वय २७, रा. कन्हेरगाव, ता. म्हाडा, जि. सोलापूर), माऊली उर्फ पिंट्या शिवाजी सरडे (वय २३), प्रियंका दीपक देशमुख (वय २३),सतीश अप्पा इथापे (वय ३०) आणि मंगल अप्पा इथापे (वय ४६, तिघे रा. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत इथापे आणि त्याच्या साथीदारांनी १० सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेवर दरोडा टाकला होता. दोन रखवालदारांना जखमी करून ६५.५७ लाख रुपये लुटले होते. इथापे आणि लोकरे नाव बदलून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे राहात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या ‘एलसीबी’ला मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांचे पथक चाळीसगाव येथे गेले. पोलिसांनी पाच नोव्हेंबर रोजी सचिन इथापेला अटक केली. त्यावेळी त्याने त्याच्याकडे असलेल्या कार्बाइनमधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला होता.
पोलिसांनी त्याला अटक करून तपास केला. तपासात त्याच्या साथीदारांनी लुटीच्या रकमेतून स्थावर मालमत्ता घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माने, सरडे, देशमुख, सतीश इथापे आणि मंगल इथापे यांना अटक केली. या टोळीने राज्यातील १७ बँकांवर दरोडे टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टाकलेल्या दरोड्यांपैकी नाशिक जिल्ह्यात चार, धुळ्यात दोन, अहमदनगरमध्ये तीन, औरंगाबादमध्ये चार, जळगावातील दोन, पुणे आणि साताऱ्यामध्ये प्र​त्येकी एका जिल्हा बँकेच्या शाखेवर आरोपींनी दरोडे टाकल्याचे निष्पन्न झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या होणार ‘आरटीओ’ची कामे

$
0
0

‘सारथी ४.०’ प्रणालीची १५ डिसेंबरपासून अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नवीन वाहन नोंदणी करणे, विविध प्रकारचे कर भरणे, लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे, अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क भरणे किंवा वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र मिळविणे (आरसीटीसी) आदींसाठी नागरिकांना आता ‘आरटीओ’मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ‘सारथी ४.०’ या प्रणालीद्वारे घरबसल्या किंवा वाहन विक्रेत्याच्या ऑफिसमधून ही कामे ऑनलाइन करता येतील. १५ डिसेंबरपासून या अद्ययावत प्रणालीचा पुणे आरटीओमध्ये वापर करण्यात येणार आहे.
परिवहन विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या ‘सारथी ४.०’ या वेब बेस्ड प्रणालीद्वारे राज्यातील ‘आरटीओ’ची सर्व कार्यालये जोडण्याची योजना आहे. त्याअंतर्गत राज्यातील कोल्हापूर आणि वाशी आरटीओमध्ये यापूर्वी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आता पुणे आरटीओमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आरटीओतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. लवकरच वाहन वितरकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली. आजरी यांनी नुकताच पुणे आरटीओचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
एखाद्या व्यक्तीने नवीन वाहन खरेदी केल्यास, वाहनाच्या नोंदणीपासून विविध कर भरण्यापर्यंत आणि वाहनाला चॉइस नंबर हवा असल्याची त्याची प्रक्रियाही वितरकाच्या कार्यालयातून करणे शक्य होणार आहे. या प्रणालीमध्ये वितरकांसाठी स्वतंत्र पर्याय देण्यात आला आहे. त्याद्वारे त्यांचे व्यवहार ऑनलाइन होतील, असेही आजरी यांनी सांगितले.

‘ई-वॉलेट’वर भर देण्याची गरज
स्कूलबस चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम आखली जाणार आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस आहे. सध्या पाचशे, हजारच्या नोटा बंदीमुळे बाजारात सुट्ट्या पैशांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही रिक्षा चालकांकडून ‘ई-वॉलेट’चा वापर केला जात आहे. रिक्षा चालकांनी या पर्यायाचा भविष्यातही विचार करावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आहे, असे त्यांनी सांगितले.

आरटीओ कार्यालयांना स्वतंत्र ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने हायकोर्टाने सर्व आरटीओतील कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार पुणे आरटीओसाठी दिवे येथील २५ एकर जागेत ब्रेक टेस्टिंग ट्रॅक उभारण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. लवकरच त्या कामाचे टेंडर काढले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात वाहनांना ब्रेक टेस्टसाठी यापुढे दिवे येथे जावे लागेल.
बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायफाय, होर्डिंग कशाला; नगरसेवकांनो कामे करा

$
0
0

शहरातील युवा मतदारांचा जबाबदारी न झटकण्याचा लोकप्रतिनिधींना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तरुणांना खूश करण्यासाठी काही नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डात ठरावीक चौकांमध्ये वायफायची सुविधा दिली आहे... त्यामुळे आम्हाला खूश करण्यापेक्षा, तरुणांना होर्डिंगवर झळकण्याची चटक लावण्यापेक्षा तुम्ही वॉर्डात कामे करा, त्यात युवकांना सामावून घ्या, त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाका अशी मागणी युवा मतदारांनी अर्थातच शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना जबाबदार युवक म्हणून त्यांच्या अपेक्षाही त्यांनी मांडल्या आहेत. नगरसेवकांनी सुरू केलेल्या वायफायचा स्थानिक युवकांपेक्षा बाहेरून शिकायला आलेलेच जास्त वापर करतात, वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्ये कुणालाही रस नाही. प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डमध्ये होणाऱ्या कामांचा तपशील नागरिकांना द्यावा. महापालिकेने प्रत्येक नगरसेवकाला दिला जाणारा निधी आणि तो कोणत्या कामांसाठी दिला जातो याचा तपशील नागरिकांसमोर जाहीर करावा, न होणाऱ्या कामांसाठी नगरसेवकांना जबाबदार धरले जावे, ही जबाबदारी झटकण्याच्या पळवाटाच त्यांना देऊ नयेत, अशी अपेक्षा या युवा मतदारांनी व्यक्त केली आहे. स्मार्टसिटीच्या स्पर्धेत पुण्याला पुढे नेण्यासाठी मेट्रोसारख्या सुविधा लवकरात लवकर द्यायल्या हव्यात आणि शहराचा विकास आराखडा नागरिकांच्या सहभागाने तयार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महापालिकेने चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध केल्यास तरुण आवडीने त्याचा वापर करतील. वर्षानुवर्षे पीएमपीएमएल बदलण्याची केवळ चर्चाच होते. लोकप्रतिनिधींनी कधीच हा प्रश्न गांभीर्याने घेतलेला नाही. पुणेकरांची घोर निराशा केली आहे. बॅटरी ऑपरेटेड रिक्षाही शहरात सुरु करायला हव्यात. महापालिकेने नियमित जॉब फेअर आणि कौन्सेलिंग सेंटर प्रभागात सुरू करावीत. वेस्ट डिस्पोजलसाठी वेगळी व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
यश देशपांडे, एनबीएन, सिंहगड स्कूल ऑफ इंजिनीअरिंग

शहरात चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची गरज आहे. ती नसल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. साथीचे रोग पुण्यात त्यामुळेच अधिक वेगाने पसरतात. कचऱ्याचे नियोजन नाही. सोमेश्वरवाडी परिसरात बसच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. येथील पुलाचे काम गेली अडीच वर्षे सुरू आहे मात्र, ते पूर्णत्वास गेलेले नाही. महापालिकेने असे रखडलेले प्रकल्प तात्काळ पूर्ण करावेत.
मंदार दीक्षित, मॉडर्न कॉलेज

स्मार्टसिटी हा चेष्टेचा विषय ठरतो आहे. त्यामागची कारणे जाणून घेऊन नगरसेवक आणि महानगरपालिकेने पुढचा अजेंडा ठेवणे गरजेचे आहे. नागरिक म्हणूनही आपण निगरगट्ट झालो आहोत, नगरसेवक किंवा ज्या महानगरपालिकेला कर देतो, त्या व्यवस्थेला आपण कोणतेही प्रश्न कधीच विचारत नाही. त्यामुळे पुण्याची आजची अवस्था बिकट आहे. रबरी स्पीड ब्रेकरसारखा घाणेरडा प्रकार बंद करायला हवा. नागरिकांसाठी कसे काम करायचे याचे धडे नगरसेवकांना महानगरपालिकेने द्यायला हवेत. त्यांना परदेशी सहलींना पाठवणे बंद करावे. सिंहगड रोडवर बीआरटीचा अट्टहास करून नागरिकांना आणखी वेठीला धरू नका.
शाल्मली धर्माधिकारी, साक्षी जोशी, गरवारे कॉलेज

सार्वजनिक ठिकाणच्या कचरापेट्या उचलण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचे काही वेळापत्रकच नसल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात कचऱ्याचे थैमान वाढले आहे. महापालिकेच्या दवाखान्यांची माहिती नागरिकांपर्यंत जायला हवी. ते नेमके कुठे आहेत, हेच अनेकांना माहिती नसते. औषध फवारणी नियमित व्हायला हवी. ती के‍वळ तक्रार केल्यावरच होते. सणांच्या दिवसात आणि विकेंडला लक्ष्मी रोडसारखे रस्ते फक्त वॉकिंग प्लाझा म्हणूनच जाहीर करावेत.
गंधाली देशपांडे, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस

अप्पर-इंदिरानगर, सुखसागरनगर, कोंढवा या परिसरात सुविधांची वानवा आहे. कॉलेजकडे जाणारा रस्ताही पावसाळ्यात अतिशय भीषण असतो. या भागात त्यामुळे अपघताही होतात. सरकारच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. नगरसेवकांच्या माध्यमातून त्या नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात.
ओंकार कुलकर्णी, व्हीआयआयटी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार घुमटकरांवर शाईफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी शाई फेकण्याचा प्रकार बुधवारी घडला. निवडणुकीत माझा विजय होणार असून त्या आकसापोटी हल्ला करून शाई फेकल्याचा दावा घुमटकर यांनी केला आहे.

घुमटकर बुधवारी नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी घुमटकर यांना अडवले. 'तुझे पुरोगामी विचारांचे नाटक बंद कर, नाहीतर तुझे नाटक बंद करू,' असे धमकावत त्यांच्याशी दमदाटी करण्यात आली व अंगावर शाई फेकून हल्लेखोर पसार झाले. या प्रकारानंतर घुमटकर यांनी विश्रामबागवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मी पत्रकार भवन येथे चालत जात होतो. त्यावेळी वैकुंठ स्मशानभूमीजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी मला अडवून दमदाटी केली. तुझे पुरोगामी विचारांचे नाटक बंद कर, नाहीतर तुझ नाटक बंद करू. पुण्यात प्रचार करायचा नाही, अशी धमकी मला देण्यात आली. माझ्या अंगावर शाई फेकून हल्लेखोर पसार झाले. माझे कोणाशीही वैर नाही. विरोधकांना पराभवाची जाणीव झाली असून निवडणुकीत मी धूळ चारणार आहे. पुरोगामी विचारांच्या विरोधकांनी हा हल्ला केल्याचा दावा घुमटकर यांनी केला.

डोंबिवली येथे होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घुमटकर यांच्यासह डॉ. अक्षयकुमार काळे, प्रवीण दवणे, मदन कुळकर्णी हे उमेदवार रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मित्रासोबत स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या आकाश रमेश माने या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या पुजारी उद्यानात आज ही दुर्घटना घडली.

आकाश हा त्याच्या मित्रासह स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी गेला होता. पत्रिका वाटत असताना सहजच ते दोघे महर्षीनगर येथील पुजारी उद्यानात गेले. तिथं बोटिंग करत असताना अचानक त्यांची बोट उलटली. त्यात आकाशचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मित्र मात्र वाचला. अग्निशमन दलानं आकाशचा मृतदेह काढला असून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, शवविच्छेदनावरून आकाशच्या नातेवाईकांनी अग्निशमन दलाच्या जवानांशी वाद घातला. ससून रुग्णालयातही आकाशच्या नातेवाईकांनी बरीच गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images