Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अभिव्यक्तीसाठी लढत राहू

$
0
0

विवेकी, पुरोगामी मंडळींचा ‌निर्धार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘साहित्यिक, कलावंत यांच्या अभिव्यक्तीसाठी लढत राहू, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादणाऱ्यांविरुद्ध आवाज बुलंद केला पाहिजे, मिळेल त्या मार्गाने व्यक्त होत राहणे आपले कर्तव्य आहे,’ असा निर्धार विवेकी, पुरोगामी मंडळींनी गुरुवारी केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सुरू झालेल्या दक्षिणायन उपक्रमांतर्गत ‘अभिव्यक्ती’ या विषयावर गोव्यात आज (शुक्रवारी) राष्ट्रीय मेळावा होत आहे. त्यात सहभागी होणाऱ्या मंडळींची ‘दक्षिणायन संवाद यात्रा’ पुण्यातून गुरुवारी निघाली. कोल्हापूर, धारवाड या मार्गाने संवाद साधत ती पुढे जाणार आहे.
दरम्यान, एस. एम. जोशी सभागृहाबाहेरील कट्ट्यावर झालेल्या विचारमंथनात विवेकी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, सुभाष वारे, मोहन देशपांडे, आनंद करंदीकर, गणेश विसपुते, सुरेश सावंत व उल्का महाजन यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
‘भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने ‘दक्षिणायन’ची सुरुवात झाली. गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्याला देशभरातील मान्यवर लेखक, कवी, विचारवंत, कलाकार, नाटककार, शास्त्रज्ञ, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती संदेश भंडारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदवीप्राप्त ग्रंथपालांच्या वेतननिश्चितीचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथशास्त्राची पदवीप्राप्त ग्रंथपालांच्या वेतनश्रेणी निश्चितीसाठी कार्यवाही करण्याच्या सूचना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक एन. के. जरग यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी व संबंधित विभागाच्या लेखाधिकारी यांना जिल्हास्तरावर शिबिराचे आयोजन करून कार्यवाही करावी लागणार आहे.

शाळेतील ग्रंथपालांना भोळे आयोग, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी दिल्या आहेत. या वेतनश्रेणीमध्ये ज्या ग्रंथपालांकडे ग्रंथशास्त्राची पदवी आणि पदविका आहेत, अशांच्या वेतनात मोठी तफावत होती. त्यामुळे ही तफावत दूर करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार न्यायालयाने संबंधित तफावत दूर करण्याचे आदेश काही महिन्यापूर्वी दिले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने कार्यवाही करून शाळांमध्ये ग्रंथशास्त्राची पदवी असणाऱ्या ग्रंथपालांची वेतनश्रेणी निश्चित करण्यासाठी कार्यवाहीच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. या वेतनश्रेणीचा लाभ संबंधित ग्रंथपालांना मिळण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि लेखाधिकारी यांना शिबिराचे आयोजन करावे लागले. शिबिरात ग्रंथपालांच्या वेतननिश्चितीची पडताळणी करून त्यांना नव्या वेतनश्रणीचे लाभ जानेवारीपासून मिळ‍तील, यादृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहे. दरम्यान, या वेतमश्रेणीचा फायदा राज्यातील सुमारे १२०० ग्रंथपालांना होणार आहे.
...............
शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना सहाव्या वेतन आयोगानुसार चार हजार ३०० रुपये ग्रेड पे मिळणे अपेक्षित होते. तशी मागणी महामंडळाने केली होती. मात्र, सरकारने दोन हजार ८०० रुपयांचा ग्रेड पे दिला आहे. त्यामुळे तो वाढवून देता येण्याबाबत सरकारने विचार करावा - शिवाजी खांडेकर, सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाला ‘गोळीबार’; निघाली दगडफेक

$
0
0

‘एनआयबीएम’ रोडवरील प्रकार; पोलिसांची चांगलीच धावपळ

चित्रपटात शोभेल असा थरार कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील शिवशंभो वडापाव चौकात गुरुवारी सायंकाळी घडला. मराठी चित्रपट दिग्दर्शकाच्या कारची काच अचानक फुटल्यामुळे आपल्यावर गोळीबार झाल्याची त्याची धारणा झाली. त्याने त्वरित या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या कथित गोळीबारामुळे पोलिसांची धावपळ झाली तर, नागरिकांची पाचावर धारण बसली. पोलिसांनी केलेल्या तपासात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दगड फेकून मारल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दुचाकीस्वाराला ओव्हरेटक केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले. संदीप काकडे (रा. फातिमानगर) असे या दिग्दर्शकाचे नाव असून, त्यांनी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काकडे गुरुवारी मित्र श्री. बोस यांच्याबरोबर सासवडला कामानिमित्त गेले होते. परत येताना त्यांनी दुचाकीस्वाराला ओव्हरटेक केले. त्यामुळे दुचाकीचालकाने त्यांना थांबण्यास सांगितले. पण, ते न थांबताच पुढे निघाले. त्यामुळे दुचाकीस्वाराने त्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला. शेवटी एनआयबीएम रोडवरील शिवशंभो वडापाव चौकात दुचाकीस्वाराने त्यांना गाठले. कारपुढे दुचाकी आडवी लावून त्यांना थांबण्यास भाग पाडले.
त्यावेळी दोघा दुचाकीस्वारांनी गाडीच्या दिशेने दगड फेकून मारला. भितीपोटी काकडे आणि त्यांचे मित्र खाली वाकले. दगडामुळे गाडीची काच फुटली. काच फुटल्याच्या आवाजामुळे काकडे यांना गोळीबार झाल्याचा भास झाला. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. गोळीबार झाल्याची माहिती काही वेळातच पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गोवेकर आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी केलेल्या तपासात दगड मारून काच फोडल्याचे समोर आले. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंग सिनीअर्ससाठी आजपासून पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील सर्वच यंग सिनीअर्सच्या चर्चेचा विषय ठरलेला ‘टाइम्स यंग सीनिअर्स’ उपक्रम आजपासून दिमाखात सुरू होणार आहे. या उपक्रमातून ज्येष्ठांना आपली दुसरी इनिंग सुखकर करण्याचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार असून, त्याला विविध उपक्रमांची जोडही असणार आहे.
‘टाइम्स ग्रुप’तर्फे आजपासून २० नोव्हेंबरपर्यंत म्हात्रे पुलाजवळील राजा मंत्री पथावरील (डी. पी. रोड) सिद्धी लॉन्स येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद् घाटन सकाळी ११ वाजता एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या उपस्थितीत होईल.
उतारवयात आरोग्यविषयक समस्या जाणवू लागतात. त्या कशा टाळता येतील, त्यावर उपाययोजना काय, निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांची योग्य आणि सुरक्षित गुंतवणूक कशी आणि कोठे करावी, जीवनशैली अधिक आरामदायी कशी करता येईल, आयुष्यभर काम केल्यानंतर आता देशा-विदेशात मस्त पर्यटन कसे करता येईल, आधुनिक तंत्रज्ञान कसे सहज आत्मसात करता येईल, आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने कसे करता येतील, अशा विविध बाबींची माहिती या ‘यंग सी‌निअर्स’ना या उपक्रमातून मिळणार आहे.
..
आज ‘भावसरगम’चे आकर्षण
यंग सीनिअर्स एक्स्पोमध्ये आज (शुक्रवारी) सायंकाळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा भावसरगम हा कार्यक्रम होणार आहे. सिद्धी लॉन्स येथे सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम खुला असून, महाराष्ट्र टाइम्सच्या मटा कल्चर क्लबचे सभासद असलेल्या यंग सीनिअर्ससाठी खास जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेण्याद्रीला पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

लेण्याद्री येथे गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या मेघःश्याम रामकृष्ण भांडारकर (५९, रा. एरंडोल, जि. जळगाव) या पर्यटकाचा हदयविकाराने मृत्यू झाला. भांडारकर हे गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले होते. ते कुटुंबीयांबरोबर अष्टविनायक यात्रेला निघाले होते. लेण्याद्रीला दर्शनासाठी पायऱ्या चढत जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जुन्नरच्या कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अशीच घटना तीन वर्षांपूर्वीही लेण्याद्री येथे घडली होती. तर काही वर्षांपूर्वी शिवनेरीच्या बालेकिल्ल्यावर ज्येष्ठ शिक्षकाचाही हदयविकाराने मृत्यू झाला होता. लेण्याद्री, शिवनेरी या ठिकाणी पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागते. तासाभराच्या पायपि‍टीनंतर लोक गडमाथ्यावर पोहोचतात. बऱ्याचदा रुग्ण असलेल्या, काही आजार असलेल्या किंवा अनपेक्षित त्रास झालेल्यांना कोणत्याही प्रकारचे प्रथमोपचार मिळणे येथे दुरापास्त आहे. दोन वर्षांपूर्वी हरिश्चंद्रगडावर एका उद्योजकाचाही हदयविकाराने मृत्यू झाला होता. तातडीने उपचार मिळण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे केलेले प्रयत्नदेखील निष्फळ ठरले होते. त्यामुळे किमान शिवनेरी, तसेच लेण्याद्रीच्या पायथ्याशी रुग्ण/पर्यटकांच्या रक्तदाब तपासणीची सुविधा केल्यास पुढील अनर्थ टळू शकतील, अशी मागणी जुन्नर येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. कमलेश घोलप यांनी केली आहे.

लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांकडे याबाबत विचारणा केली असता, किमान पर्यटकांसाठी रक्तदाब तपासणी करण्यासाठीची सुविधा सुरू करण्याबाबतची तयारी त्यांनी दाखवली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष शंकर ताम्हाणे, विश्वस्त जितेंद्र बिडवई यांनी, लवकरच ही सुविधा सुरू केली जाईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विश्व पंजाबी’ची दिंडी बाबा आमटेंना समर्पित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर

पुण्यात आजपासून २० नोव्हेंबरपर्यंत आयोजित पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना समर्पित करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रंथदिंडीची एक फेरी बुधवारी आनंदवनात पोहचली. संयोजकांनी डॉ. विकास आमटे यांना भेटून संमेलनाचे आमंत्रण दिले आणि आनंदवनाचा फेरफटका मारला. भाषा अनेक, देश एक याचा प्रत्यय या ग्रंथदिंडीच्या रूपाने आला. ग्रंथदिंडी काढण्याची सुरुवात आनंदवनाने केली. त्यानंतर आज विविध साहित्य संमेलनांमध्ये ग्रंथदिंडी काढली जाते. मात्र, ही ग्रंथदिंडी काढताना आनंदवनचे साधे स्मरणही केले जात नाही, असे भाष्य सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांनी अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान केले होते. याची दखल घेऊन पुण्यात होणाऱ्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना समर्पित करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. नामदेवांनी पंढरपूरच्या भक्ती मार्गाची लाट पंजाबात नेली. त्यामुळे पंजाब नामदेवांवर नितांत प्रेम करतो व त्यांच्या ‘बाणी’त दंग होतो. बाबांनी वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी काढायला सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या विश्व पंजाबी साहित्य या संमेलनाच्या ग्रंथदिंडी निमित्ताने आनंद होत असल्याचे डॉ. आमटे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व प्रभागांतून वकील निवडणूक लढवणार

$
0
0

पुणे बार असोसिएशनचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रभागांमधून पुणे बार असोसिएशन पुरस्कृत उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. वाढती अराजकता, बेरोजगारी, पुण्यातील खंडपीठाचा प्रश्न, शहरातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी सुशिक्षित उमेदवार असावेत, म्हणून वकिलांनी हा निर्णय घेतला आहे. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष वाय. जी. शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला.
पुणे शहरात मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनतर्फे पुणे जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक चारवर असोसिएशनतर्फे चक्री उपोषण आणि निदर्शने सुरू आहेत. पुण्याला खंडपीठ मिळावे ही वकिलांची आणि पुणेकरांची गेल्या अनेक वर्षांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी वकिलांनी आंदोलनेही केली आहेत. गेल्या वर्षी पुण्यातील वकिलांनी सलग १६ दिवस कामकाज बंद आंदोलन केले होते. खंडपीठ मागणीसंदर्भात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी वकिलांना लेखी आश्वासन दिले होते; मात्र एक वर्ष उलटून गेले तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. खंडपीठाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आंदोलन पुकारण्यात आले आहे.
‘खंडपीठाच्या प्रश्नावर सर्वच पक्षांनी फसविले आहे. खंडपीठाचा प्रश्न तडीस नेण्यासाठी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच प्रभागांतून जे वकील निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत, त्यांना पुणे बार असोसिएशनतर्फे पुरस्कृत करण्यात यावे,’ अशी भूमिका पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मिलिंद पवार यांनी मांडली. ‘हा चांगला प्रस्ताव असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून वकिलांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. वकील रस्त्यावर उतरले; त्या वेळी क्रांती झाली आहे. लवकरच पुणे बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा बोलावून, महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुणे बार असोसिएशन पुरस्कृत वकील उमेदवार उभे करण्याचा ठराव मंजूर करणार आहोत,’ असे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष वाय. जी. शिंदे यांनी जाहीर केले.
या वेळी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विकास ढगे पाटील, अॅड. विकास हिंगे, अॅड. शिरीष शिंदे, अॅड. योगेश पवार, अॅड. भालचंद्र पवार, अॅड. अजय ताकवणे, अॅड. संकेत ठाणगे, अॅड. दत्ता तुपे, अॅड. दीपक नाईक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राठोड दाम्पत्याचा सेवेतून ‘कडेलोट’

$
0
0

‘एव्हरेस्ट’ मोहिमेचा बनाव पडला महागात; पोलिस आयुक्तांची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जगातील सर्वांत उंच एव्हरेस्ट शिखर सर करून तिरंगा फडकविल्याचा दावा करणाऱ्या पुणे पोलिस दलातील राठोड दाम्पत्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही कारवाई केली. एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा त्यांनी बनावच केल्याचे सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी ‘पिंपरी-चिंचवड माउंटनीअरिंग असोसिएशन’ने राठोड पती-पत्नीचा दावा खोटा असून, त्यांची सखोल चौकशी करण्याचा अर्ज पोलिस आयुक्तांकडे केला होता.
शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात नियुक्तीस असलेले दिनेश राठोड (वय ३०) आणि त्यांची पत्नी तारकेश्वरी भालेराव (वय ३०) असे या दाम्पत्याचे नाव आहे. तारकेश्वरी मुख्यालयाच्या ‘अ’ कंपनीत, तर दिनेश ‘सी’ कंपनीत कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला होता. मात्र, काही कारणामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी श्रीमती शुक्ला यांच्याकडे एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्यासाठी अर्ज केला होता. परवानगी मिळाल्यानंतर एक एप्रिलपासून ते दोघेही सुट्टीवर गेले. त्यानंतर थेट सात जून रोजी या दोघांनी एव्हरेस्ट सर केल्याची बतावणी केली. २३ मे रोजीच आम्ही शिखर सर केल्याचा दावाही त्यांनी केला. शिखरावर चढाई केल्याचे त्यांचे फोटोही सोशल मीडीयावर व्हायरल झाले. ही बातमी कळताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला होता.
मात्र, राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल ‘माउंटनीअ​रिंग असोसिएशन’ने शंका उपस्थित करून त्यांचा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. तसेच, याबाबत त्यांची सखोल चौकशी करावी असाही शुक्ला यांच्याकडे दाखल केला होता. शुक्ला यांनी सहायक पोलिस आयुक्त गणपत माडगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. या समितीला चौकशी करून अहवाल देण्याविषयीही बजावले. दरम्यान, समितीने राठोड दाम्पत्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. नेपाळ सरकारकडूनही याबाबतचा अहवाल मागविण्यात आला. मात्र, राठोड दाम्पत्याने समितीसमोर हजेरी लावलीच नाही. तसेच, नेपाळ सरकारकडूनही अहवाल प्राप्त झाला नाही. त्यानंतर समितीने अहवाल शुक्ला यांच्याकडे सादर केला. त्यानुसार शुक्ला यांनी निलंबनाची कारवाई केली.

संपूर्ण मोहिमच संशयास्पद
राठोड दाम्पत्याने २३ मे रोजी एव्हरेस्ट सर केल्याचा दावा केला होता. मात्र, या मोहिमेची माहिती त्यांनी सात जूनला जाहीर केली. त्यामुळेच त्यांच्या यशस्वी मोहिमेभोवती संशय निर्माण झाला होता. गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांनी राठोड दाम्पत्य एव्हरेस्टवर गेले नसल्याचे सांगितले. त्यानुसार पिंपरी चिंचवड माउंनीअरिंग असोशिएशनच्या सदस्यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार दाखल करून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिष्यवृत्तीतूनही उत्तीर्ण-अनुत्तीर्णला फाटा

$
0
0

यंदापासून अंमलबजावणी; पात्र अथवा अपात्र जाहीर करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बोर्डाच्या परीक्षेतील उत्तीर्ण-अनुत्तीर्ण प्रकार बंद करण्यापाठोपाठ राज्य सरकारने शिष्यवृत्ती परीक्षेसाठीही ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ऐवजी यंदापासून, विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र किंवा अपात्र असे घोषित केले जाणार आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षा देता येणार आहेत.
राज्यात यंदापासून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीची पात्रता, परीक्षेचे स्वरूप, वयोमर्यादा, परीक्षेचे शुल्क आदी तांत्रिक बाबींची माहिती देणारा अधिकृत सरकारी निर्णय मंगळवारी प्रसिद्ध झाला. या निर्णयामधून उत्तीर्ण-अनुत्तीर्ण बंद करण्यासोबतच इतर मुद्द्यांविषयीची माहितीही समोर आली.
या निर्णयानुसार, यंदापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र किंवा अपात्र असा शेरा दिला जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे बंधनकारक असेल. त्यापेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार नाही. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती परीक्षा देता येईल. या बोर्डांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या बोर्डांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या ५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रमे कळविला जाईल. मात्र, या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके दिली जातील. शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत बँक खात्याची माहिती व आधार क्रमांकाची माहिती सादर करावी लागणार असल्याचेही या निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची १ जून रोजीची कमाल वयोमर्यादा
प्रवर्ग इयत्ता ५ वी इयत्ता ८ वी
सर्व प्रवर्ग ११ वर्षे १४ वर्षे
दिव्यांग १५ वर्षे १८ वर्षे

परीक्षेचे स्वरूप
पेपर विषय प्रश्नसंख्या गुण वेळ
१ प्रथम भाषा २५ ५० १ तास ३० मिनिटे
गणित ५० १००
एकूण ७५ १५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या हॉटेलांचा वीजवापर रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महावितरणने पश्चिम महाराष्ट्रातील शहरांतील मोठ्या हॉटेलांच्या वीजवापरावर ‘वॉच’ ठेवायला सुरुवात केली आहे. या हॉटेलमधील वीजयंत्रणेची विशेष पथकांद्वारे तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील पाच हॉटेलमध्ये वीजवापरात अनियमितता आढळून आली आहे.
महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाने सुमारे ३० किलोवॉटपेक्षा अधिक वीजभाराची जोडणी असलेल्या मोठ्या हॉटेलांमधील वीजवापराचे विश्लेषण सुरू केले आहे. एकाच दिवशी तसेच वीजवापराच्या मुख्य कालावधीत मोठ्या हॉटेलमधील वीजयंत्रणेची तपासणी करण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत. प्रत्येक पथकात दक्षता, सुरक्षा आणि चाचणी विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पथकाच्या तपासणीत पुणे शहरातील काही हॉटेलांमधील वीजवापर संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यानुसार या पथकांनी रविवारी रात्री सात ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संबंधित मोठ्या हॉटेलांमधील वीजमीटर आणि यंत्रणेची तपासणी केली. त्यामध्ये पाच हॉटेलमधील वीजवापर अनियमित असल्याचे दिसून आले. एका हॉटेलमधील वीजयंत्रणेत फेरफार झाल्याचे आढळून आले आहे. या पाचही हॉटेलमधील अनियमिततेबाबत आणखी तांत्रिक तपासणीचे काम सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील अन्य मोठ्या शहरांमध्ये या प्रकारच्या मोहिमा राबवण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत मोठ्या हॉटेलांमधील वीजवापराचे महावितरणकडून विश्लेषण करण्यात येत आहे. संशयास्पद वीजवापर दिसून येत असलेल्या हॉटेलच्या वीजयंत्रणेची अचानक तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये वीजचोरी किंवा अनधिकृत वीजवापर आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी वीजचोरीचे प्रकार टाळावेत, वीजयंत्रणेच्या वायरिंगमध्ये किंवा यंत्रणेत कोणत्याही प्रकारचे फेरफार करू नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राच्या आदेशामुळे देवस्थाने नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देवस्थान ट्रस्टने दररोज दानपेट्या उघडून त्यातील रक्कम बँकेत जमा करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही देवस्थानांकडून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
कोणत्याही देवस्थान ट्रस्टच्या दानपेट्या या रोजच्या रोज उघडल्या जात नाहीत. आठवड्यातून; तसेच महिन्यातील कोणत्या दिवशी दानपेट्या उघडायच्या हे ठरवून दिलेले असते. ट्रस्टवर विश्वस्त म्हणून काम पाहणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी ठरावीक विश्वस्तांच्या उपस्थितीत दानपेट्या उघडून त्यातील देणगीची मोजणी केली जाते. त्याचा संपूर्ण हिशोब नोंदवून त्यानंतर ही रक्कम ट्रस्टच्या नावाने असलेल्या खात्यात भरली जाते.
देवस्थान ट्रस्टमध्ये कुठलीही व्यावसायिकता नसते. ही एक धार्मिक संकल्पना आहे. ज्या व्यक्तीला वाटते त्या या दानपेट्यांमध्ये देणगी स्वरूपात आपल्या इच्छेने पैसे टाकत असतात. दररोज दानपेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात देणगी जमा होते असे नाही. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने दररोज दानपेट्या उघडून त्यातील रक्कम संध्याकाळी बँकेत जमा करावी, असे म्हणणे व्यवहार्य नाही. याची अंमलबजावणी करायची झाल्यास त्यामुळे अधिकच गोंधळाची स्थिती निर्माण होईल, अशी भीती अॅड. प्रताप परदेशी यांनी व्यक्त केली. देवस्थान ट्रस्टमध्ये नेमलेले विश्वस्त पूर्ण वेळ कार्यरत नसतात. आपला व्यवसाय, नोकरी, कामधंदा संभाळून बहुतांश मंडळी विश्वस्त म्हणून काम करत असल्याने त्यांच्याकडून अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
सध्याची चलन बंद झाल्याची परिस्थिती पाहता, समाज हिताच्या दृष्टीने आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दररोज दानपेट्या उघडण्याचे सरकारचे आदेश योग्य आहेत. या संदर्भात पेट्या उघडण्याच्या वेळी निरीक्षक नेमण्यात यावा, अशी विनंती धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आल्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.
नोटाबंदीमुळे काही दिवसांपासून पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. धर्मादाय आयुक्तालयाने दिलेला आदेश लोकहिताचा आहे. त्यामुळे आता पूर्वी न फोडलेल्या दानपेट्या उघडण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांसह देवस्थानला येणाऱ्या भक्तांना सुटे पैसे नसल्याने प्रवासासह खाण्यापिण्याच्या अडचणी येत असून, अनेकांना सुटे पैसे देण्याची देवस्थानने मदत केली आहे, असे जेजुरीच्या खंडोबा देवस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ससून’मध्ये झाले पहिले अवयवदान

$
0
0

पुणे : ससून हॉस्पिटलमध्ये प्रथमच ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवांचे गरजू पेशंटना दान करण्यात आले. संबंधित ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव काढण्याची प्रक्रिया रात्री उशिरा तज्ज्ञ डॉक्टरांकडून हाती घेण्यात आली.
मुंबईतील केईएम, सायन तसेच अन्य नागपूर, औरंगाबादसारख्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अवयवदान प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. मात्र, ससून हॉस्पिटलमध्ये अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या पुढाकाराने या मोहिमेला प्रारंभ झाला. अवयवदान मोहिमेतील अवयवदान प्रक्रियेचा हा दुसरा टप्पा पार करण्यात ससूनने आघाडी घेतली आहे.
‘कोकणातील वैभववाडी येथील २९ वर्षाच्या तरुणाचा पुण्यात अपघात झाला. उपचारादरम्यान तो ससून हॉस्पिटलमध्ये ब्रेनडेड झाल्याने त्याचे यकृत आणि मूत्रपिंडाचे दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मृत तरुणाचे अवयव काढण्याच्या प्रक्रियेला रात्री उशिरा सुरुवात करण्यात येणार आहे. ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पुण्यातून सातवे हृदय आणि पहिले फुफ्फुस चेन्नई येथील पेशंटला जीवदान देण्यासाठी पाठविण्यात येणार आहे,’ अशी माहिती ससूनच्या सूत्रांनी ‘मटा’ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिझर्व्ह बँकेकडून बँकांमध्ये दुजाभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा वापरातून रद्द केल्याच्या निर्णयाचा फटका सहकारी बँकांना बसतो आहे. ‘आरबीआय’कडून सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप बँक कर्मचारी संघातर्फे गुरुवारी करण्यात आला.
बँक कर्मचारी संघातर्फे पत्रकार भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष गिरीश मेंगे, राहुल आलमखाने, सुनील देसाई, भरत पासलकर आदी उपस्थित होते.
बँक कर्मचारी संघ ९० हून अधिक बँकांचे प्रतिनि‌धित्व करतो आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा वापरातून रद्द केल्याचा फटका सहकारी बँकांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या खातेदार सहकारी बँका आहेत. सहकारी बँकांना पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकरण्याची परवानगी नाही. नवीन चलनात आलेल्या नोटा ग्राहकांना देण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध नाहीत. संबंधितांकडे मागणी केली असता आपल्याला पुरेशा प्रमाणात नोटा दिल्या जात नाहीत, अशी माहिती मेंगे यांनी दिली.
‘आरबीआय’च्या नियमानुसार कायदेशीर बाबी पूर्ण करून सहकारी बँका कार्यरत आहेत. वर्षातून दोनदा आरबीआयकडून पाहणी होते. असे असतानाही सहकारी बँकांच्या बाबतीत मात्र दुजाभाव केला जातो. सहकारी बँकांना असेच डावलले गेले, तर आम्हाला तीव्र आवाज उठवावा लागेल,’ अशी माहिती परिषदेत उपस्थितांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसांची मोहीम मागे

$
0
0

पुणे ः बेशिस्त वाहन चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक विभागाकडून गुरुवारपासून सुरू करण्यात आलेली वाहन तपासणी विशेष मोहीम मागे घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. त्यामुळे विशेष मोहीम सुरू होण्यापूर्वीच रद्द झाली. नोटाबंदीच्या काळात ही कारवाई त्रासदायक होत असून, त्यामुळे कारवाई थांबवावी, अशी विनंती नागरिकांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर वाहतूक विभागाला आदेश देण्यात आले.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर या मोहिमेदरम्यान विशेष लक्ष ठेवले जाणार होते. गुरुवारपासून वाहतूक विभाग शहरात अचानक कोठेही आणि केव्हाही वाहन तपासणी करणार होते. प्रमुख रस्ते, महत्त्वाचे चौक तसेच विविध भागांमध्ये अचानक तपासणी मोहिम राबवली जाणार होती. या मोहिमेला सकाळी सुरुवातही झाली. मात्र, कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांचे नागरिकांसोबत खटके उडाले. त्यानंतर काही नागरिकांनी थेट आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे संपर्क साधून ही कारवाई थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर आयुक्तांनी हे आदेश दिले. अचानक तपासणी करताना वाहतूक पोलिसांकडून नियमावर बोट ठेवून दंड आकारला जाणारच त्यामुळे त्यातून सुटका होणार नाही, अशी नागरिकांची भावना होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी हॉस्पिटलमध्ये चेकवर फुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘चेक द्यायचा असेल, तर अकाउंट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन या. चेक दिला तरी तुम्हाला डिस्चार्ज घेताना अडचणी येऊ शकतील. जोपर्यंत चेक वटत होत नाही, तोपर्यंत डिस्चार्ज मिळणे अशक्य आहे...'
खासगी हॉस्पिटलमधून गुरुवारी पेशंटच्या नातेवाइकांना सुनावण्यात येत होते, तर दुसरीकडे ‘आमच्याकडे चेक असेल तर काय करायचे... चेक चालणार नाही का,’ असा सवाल एक महिला बिलिंग विभागाच्या कर्मचाऱ्याला करीत होती. सरकारने चेक स्वीकारण्याचा आदेश दिला असला, तरी त्याच्या उलट खासगी हॉस्पिटलमध्ये अडवणूक केली जात असल्याने त्या महिलेला माघारी फिरावे लागल्याचे चित्र शहराच्या पूर्व भागातील खासगी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाले. खासगी हॉस्पिटलने नोटाबंदीचा नियम लागू केला आहे. त्यामुळे क्रेडिट, डेबिट कार्ड; तसेच चेकने पेमेंट स्वीकारण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. त्या संदर्भात हॉस्पिटलमधील ‘मटा’च्या प्रतिनिधीने या गोंधळाचा ‘आँखो देखा हाल’ अनुभवला.
शहराच्या पूर्व भागातील हॉस्पिटलमध्ये दुपारनंतर बिलिंग विभागात पैसे भरण्यासाठी फारशी गर्दी नव्हती; पण बिलिंग विभागात काही पेशंटचे नातेवाइक रांगेत उभे होते. बिलिंगच्या काउंटरवर पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याच्या वृत्तपत्रांच्या बातम्यांचे कात्रण लावल्याचे पाहायला मिळाले. रांगेतील पहिल्या दोन व्यक्तींनी कार्ड काढून मशिनवर आपला पीनकोड क्रमांक टाकला आणि पेमेंट करून निघून गेले. त्याच वेळी पाचशे रुपयांच्या नोटा मोजणाऱ्या तरुणावर नजर गेली. त्याच्यासोबत त्याची वृद्ध आई हातात डॉक्टरांनी दिलेला काही तरी कागद घेऊन उभी होती.
रांगेत क्रमांक येताच त्या तरुणाने काउंटरवरील महिला कर्मचाऱ्याकडे पैसे दिले. पैसे न घेताच ती महिला कर्मचारी म्हणाली, ‘अहो, पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. तुम्ही वाचले नाही का? कार्ड पेमेंट करा.’ त्यावर तो तरुण उत्तरला, ‘मॅडम, माझ्याकडे पाचशेच्या नोटा आहेत. त्या स्वीकारल्या जातात की हॉस्पिटलमध्ये. माझ्याकडे कार्ड नाही. आम्ही चाकणजवळील म्हाळुंगेवरून आलोय. एक वर्षाचं बाळ अॅडमिट आहे. त्याच्या उपचाराचे डॉक्टरांनी पैसे भरायला सांगितले. आता तुम्हीच काय ते सांगा. बँकेच्या रांगेत तासभर उभे राहून पैसे काढले. आता कार्ड नाही तर करायचं काय,’ त्याच्या या प्रश्नावर संबंधित महिला असमर्थता व्यक्त करूनत शांत राहिली. त्या वेळी बिलिंग विभागात बसलेल्या एका व्यक्तीने (वरिष्ठ असावेत) त्याला काउंटरवरून बाजूला सरकायला सांगितले आणि तो हताश होऊन तरुण बाजूला झाला.
एरंडवणा भागातील एका हॉस्पिटलमधील प्रसंग. बिलिंग विभागात रांगेत उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्ती कार्ड काढूनच पेमेंट करीत होता. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडे चेकबाबत विचारणा केली. ‘चेक स्वीकारला जाईल का?' त्यावर कर्मचाऱ्यांनी विचारले की, ‘चेक आयपीडीसाठी की ओपीडीसाठी, पेशंट कोठे आहे?' अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्यावर ‘चेक स्वीकारू; पण डॉक्टरांना विचारावे लागेल,’ असे उत्तर कर्मचाऱ्याने दिले.
एकूण काय, खासगी हॉस्पिटलने पुन्हा कार्ड पेमेंटचा पर्याय स्वीकारून चेक घेण्यासदेखील अप्रत्यक्षरीत्या नकार देण्यास सुरुवात केली आहे. चेक घेतल्यास तो ‘क्लिअर’ होईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुढील आठवड्यात ‘डीपी’वर शिक्कामोर्तब?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या जुन्या हद्दीच्या प्रलंबित विकास आराखड्याला (डीपी) पुढील आठवड्यात मान्यता मिळण्याची दाट चिन्हे असून, सरकारी पातळीवर त्यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता २३ नोव्हेंबरला संपल्यानंतर तातडीने डीपी जाहीर केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘डीपी’ला दोन महिन्यांत मान्यता देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातच दिले होते; परंतु महापालिका निवडणूक जवळ येऊन ठेपल्या असताना, डीपीला मंजुरी मिळेल का, याबाबत संभ्रम वाढत चालला होता. विरोधी पक्षांनी त्यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. अखेर, डीपी मान्यतेची प्रक्रिया आता अखेरच्या टप्प्यात असून, पुढील आठवड्यात विकास नियंत्रण नियमावलीसह (डीसी रुल्स) तो जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या शनिवारी (१९ नोव्हेंबर) विधान परिषदेची निवडणूक आहे, तर २२ नोव्हेंबरला त्याची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर, डीपी जाहीर केला जाईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुढील आठवड्यात त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शिक्कामोर्तब होईल, असे समजते.

राज्य सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये महापालिकेच्या ताब्यातून डीपी काढून घेतला. त्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. यामध्ये, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते यांचा समावेश होता. या समितीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारला डीपी सादर केला. त्यामध्ये ३८० आरक्षणे वगळल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. तर, त्यानंतर त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या डीसी रुल्सवरूनही टीका केली गेली.

डीपीबाबत शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीला केवळ भाजपच्याच आमदारांना बोलावण्यात आल्याने त्यावरून शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सरकारवर हल्ला चढविला. डीपीच्या अंतिम मंजुरीसाठी छाननी समिती नियुक्त करून सर्व प्रक्रिया सुरू ठेवली होती. काही महिन्यांपूर्वी ‘डीपी’ मंजूर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.


निवडणुकीची रणनीती

महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अंतिम निर्णय घेऊन विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या संभाव्य हल्ल्याची हवाच काढून घेण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आखली आहे. त्यामुळे सर्वप्रथम डीपीचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर केला जाईल, असे दिसते. याच दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुणे मेट्रोला औपचारिक मान्यता देण्यावरही मोहोर उमटेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । चाकण

पाच वर्षांच्या मुलावर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी राजगुरुनगर न्यायालयाने फाशी सुनावलेल्या कैद्याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. खाडकसिंग जलसिंग पांचाळ (वय ३८) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याने गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुळचा उत्तरप्रदेशमधील हंमीपुर जिल्ह्यातील कोटा येथील असणाऱ्या खाडकसिंगने तीन वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी चाकण पोलीसांनी २०१३मध्ये खडकसिंगला खून आणि अनैसर्गिक बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. २२ सप्टेंबर २०१६ रोजी राजगुरूनगर न्यायालयाने खाडकसिंगला त्याच्या क्रूर गुन्ह्यासाठी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती. फाशीची शिक्षा सुनावल्यापासून खाडकसिंग खचून गेला होता. त्याच नैराश्येतून त्याने गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास कारागृहातील बराकीमधील भिंतीला असलेल्या छिद्रात काठी टाकून त्याला टॉवेल बांधून गळफास घेतला. येरवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत मारोडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधकांनी आत्मपरीक्षण करावे

$
0
0

डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारतीय संशोधकांना आपल्या संशोधनांचे तंत्रज्ञानामध्ये रूपांतर करण्यात अजूनही मर्यादा पडतात. संशोधकांसाठी सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत असले, तरी समाजोपयोगी संशोधने पुढे आणण्यात भारतीय संशोधक मागेच आहेत,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ही परिस्थिती बदलण्यासाठी संशोधकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रोफेसर शं. पु. आघारकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आघारकर संशोधन संस्थेतर्फे प्रोफेसर शं. पु. आघारकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आघारकर संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये ‘गेटिंग रेडी फॉर नॉलेज एरा’ या विषयावर बोलताना डॉ. काकोडकर यांनी देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेतला. भविष्यात या क्षेत्रामध्ये देशाची वाटचाल कशी असावी, याविषयीही त्यांनी आपल्या अपेक्षा मांडल्या.

डॉ. काकोडकर म्हणाले, ‘गेल्या काही काळामध्ये वैज्ञानिक संशोधनांच्या बाबतीत भारतीय संशोधकांची कामगिरी सुधारत चालली आहे; मात्र या संशोधनांचे नव्या तंत्रज्ञानामध्ये रूपांतर करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी पद्धतीने वापर करून घेण्याची मानसिकता विकसित होणे गरजेचे आहे. इस्रायल, स्वीडन, कॅनडा, ब्रिटनसारख्या देशांमध्ये संशोधनांसाठी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीच्या तुलनेत भारतात जास्त गुंतवणूक केली जात आहे. तंत्रज्ञानाच्या निर्मितीत मात्र भारत या देशांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल, तर संशोधकांनी आपण नेमके काय करत आहोत, याविषयी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.’

‘ही परिस्थिती बदलण्यासाठी तंत्रज्ञानाधारित समाजरचनेकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. मूलभूत संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासोबतच खासगी औद्योगिक क्षेत्राच्या मदतीने संशोधने करणे रास्त ठरेल. औद्योगिक क्षेत्राच्या नेमक्या गरजा आणि अडचणी ओळखून पुढे येणारी संशोधने, संशोधनांसाठीच्या गुंतवणुकीचे समाजाला होणारे फायदे यापुढील काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठीच नव्हे, तर देशाच्या एकूण विकासासाठीही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत,’ असेही डॉ. काकोडकर यांनी नमूद केले. संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. किशोर पाकणीकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचेही या वेळी वितरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शत-प्रतिशत ठसा कोणाचा?

$
0
0

वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपची जोरदार तयारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील सर्वाधिक सुशिक्षित ‘एरंडवणा-हॅपी कॉलनी’ (प्रभाग क्र. १३) या भागावर लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मिळालेले वर्चस्व कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार तयारी सुरू आहे. भाजपचा ‘शत-प्रतिशत’चा प्रयत्न सफल होऊ न देण्यासाठी इतर पक्षांकडून सक्षम उमेदवार रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

कोथरूडच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि नगरसेविका मेधा कुलकर्णी व शिवसेनेचे प्रशांत बधे (प्रभाग क्र. ३५), भाजपच्या माधुरी सहस्रबुद्धे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल राणे (प्रभाग क्र. ३६) यांच्या जुन्या प्रभागांचा बहुसंख्य भाग नव्याने अस्तित्वात आलेल्या ‘एरंडवणा-हॅपी कॉलनी’ (क्र. १३) मध्ये समाविष्ट झाला आहे.

हॅपी कॉलनीपासून या प्रभागाची सुरुवात होते. गोसावी वस्ती, पिनाक सोसायटी, जितेंद्र अभिषेकी उद्यान, राहुलनगर, सिटीप्राइड-कोथरूड, पश्चिमानगरी, क्षिप्रा सोसायटी, गिरिजाशंकर सोसायटी, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान, स्वप्नशिल्प, करिष्मा सोसायटी, संगम प्रेस, दशभुजा गणपती, देशपांडे पूरम, पटवर्धन बाग, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, एरंडवणा गावठाण, एसएनडीटी कॉलेज, अभिनव शाळा, फिल्म इन्स्टिट्यूट, शारदा सेंटर, आयुर्वेद रसशाळा, एस. एम. जोशी पूल आणि प्रभात रस्ता असा हा प्रभाग विस्तारला आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बहुसंख्य सुशिक्षित भाग असलेल्या या प्रभागात सर्वाधिक संधी असल्याचा भाजपचा दावा आहे. सध्याच्या चारपैकी दोन विद्यमान नगरसेवक भाजपचे आहेत. लोकसभा-विधानसभेत या भागातून त्यांना लक्षणीय आघाडी मिळाली आहे. साहजिकच येथील उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार चुरस आहे. विद्यमान नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, पक्षाचे सरचिटणीस उज्ज्वल केसकर, संदीप खर्डेकर, त्यांच्या पत्नी मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे, सुनील पांडे, शिवाजी शेळके, प्रशांत हरसुले, गिरीश खत्री, गौरी करंजकर अशी इच्छुकांची मोठी यादी भाजपकडे तयार आहे.

भाजपप्रमाणेच शिवसेनेलाही या भागातून नेहमीच मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक प्रशांत बधे यांच्यासह माजी नगरसेवक राजा बलकवडे, त्यांच्या पत्नी सविता बलकवडे, गजानन थरकुडे, अनिल माझिरे, राजेंद्र पळसकर, छायाताई भोसले आणि उषा केळकर अशा प्रमुख नावांची चर्चा सुरू आहे.

मनसेचे विद्यमान नगरसेवक अनिल राणे याच भागातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी राम बोरकर व त्यांच्या पत्नी प्रभावती बोरकर, मंदार बलकवडे, मनीष अंतुरकर, सुरेखा होले अशी नावे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

या परिसरातून काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा मंत्री महापालिकेवर निवडून गेले होते. त्यामुळे काँग्रेसला मानणारा ठराविक वर्ग या भागात आहे. काँग्रेसकडून मंत्री यांच्यासह राजा साठे, अॅड. सुरेश लांडे, मंगेश खराटे, संदीप मोकाटे, अॅड. अंजली कडू आणि सोनाली मगर अशी नावे चर्चेत आहेत. यामध्ये आणखी नावांची भर पडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी पाडळे, सनी मानकर यांच्यासह इतर काही नावांची चर्चा सुरू आहे. पुढील टप्प्यात आणखी काही नावे पुढे येतील, असे कळते.
................

प्रभाग क्र. १३ : एरंडवणा-हॅपी कॉलनी

लोकसंख्या : ७०,४०७

आरक्षण :

अ : ओबीसी

ब : महिला

क : महिला



ड : खुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांना ‘स्पेशल’ मनस्ताप

$
0
0

हॉलिडे स्पेशल गाड्यांच्या उशिरामुळे प्रवासी ‘लटकले’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दसरा, नवरात्र, दिवाळी आणि छटपूजेसाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यात सुरू केलेल्या चार साप्ताहिक ‘हॉलिडे स्पेशल’ ट्रेनना प्रत्येक फेरीला उशीर झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नियमित गाड्यांच्या वेळापत्रकात या गाड्यांना प्राधान्याचे स्थान नसल्याने सिग्नल न मिळाल्याने या गाड्या नियमित वेळेपेक्षा पाच ते ३६ तासापर्यंत उशिराने धावल्या. या गाड्यांसाठी नागरिकांनी नियमित तिकिटापेक्षा ४०० रुपयांपर्यंत अधिक शुल्क दिले होते.

छटपूजा, दिवाळी, दसरा या सणांच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध् रेल्वेने पुणे-जम्मूतावी, जम्मूतावी-पुणे, पुणे-वाराणसी, वाराणसी-पुणे, पुणे-संत्राराठी (हावडा), संत्राराठी (हावडा)-पुणे, पुणे-जयपूर, जयपूर-पुणे या तीन हॉलिडे स्पेशल गाड्या सुरू केल्या. या तिन्ही गाड्या आठवड्यातून एकदा दोन्ही बाजूंनी फेरी मारतात. पुणे-जम्मूतावी ही गाडी आठवड्यातून एकदा जम्मूतावीला जाते आणि तेथून पुन्हा पुण्याला येते. त्यानंतर या गाडीचा रॅक पुन्हा पुणे-वाराणसी गाडीसाठी वापरला जातो. पुणे-जयपूर ही गाडी जयपूरहून पुण्याला आल्यानंतर ती पुणे-संत्राराठी (हावडा) या मार्गासाठी वापरली जाते. अशा प्रकारे एकाच रॅकवर दोन स्पेशल ट्रेनचे नियोजन केले जात असल्याने रेल्वे प्रवाशांना पाच ते ३६ तासांपर्यंत गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

..............

‘वाऱ्यावर सोडले’

हॉलिडे स्पेशल ट्रेनसाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकडून चारशे रुपयांपर्यंत जादा तिकीट आकारले; मात्र त्या तुलनेत प्रवाशांना सेवा दिली जात नाही. या गाड्यांमध्ये पॅन्ट्री कारची सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांच्या खाण्यापिण्याची गैरसोय होते. रेल्वे प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी केला आहे.
..............
स्पेशल गाड्यांची मुदत वाढवली

पुणे-अजनी, पुणे-अमरावती व सोलापूर-मिरज या मार्गांवर दिवाळीनिमित्त सुरू केलेल्या वातानुकूलित स्पेशल गाड्यांना १२ जानेवारीपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे.
पुणे-अजनी ही गाडी आठवड्यातून दर शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता पुण्यातून सुटेल. ती अजनीला दुसऱ्या दिवशी पहाटे सव्वापाच वाजता पोहोचेल. पुणे-अमरावती गाडी दर बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता पुण्याहून सुटून पहाटे सव्वातीन वाजता अमरावतीला पोहोचेल. सोलापूर-मिरज गाडी दररोज सकाळी सहा वाजता सोलापूरहून सुटणार आहे. ती दुपारी सव्वाबारा मिरजला पोहोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images