Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

समाजजीवनाशी सुसंगत प्राचीन विज्ञान स्वीकारार्ह

$
0
0

डॉ. नारळीकर यांची भूमिका; प्राचीन खगोलशास्त्रावरील परिषदेचे उदघाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्राचीन काळातही विज्ञान होते, हे तथ्य नाकारता येत नाही. मात्र, विज्ञानाच्या इतिहासाचा मागोवा घेताना स्वाभाविक असणाऱ्या घटनांना, शोधांना महत्त्व देणे आवश्यक आहे. तत्कालीन इतिहास आणि समाजजीवन यांच्याशी सुसंगत ठरेल असेच प्राचीन भारतीय विज्ञान स्वीकारणे संयुक्तिक ठरेल,’ असे ठाम मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना व्यक्त केले
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (आयसर) येथे आयोजित नवव्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ओरिएंटल अॅस्ट्रोनॉमी’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे मंगळवारी उदघाटन झाले. या निमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना डॉ. नारळीकरांनी प्राचीन विज्ञानाकडे वास्तवदर्शी नजरेतून पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर, परिषदेचे संयोजक डॉ. मयांक वाहिया, डॉ. अनिकेत सुळे आदी उपस्थित होते.
डॉ. नारळीकर म्हणाले, ‘प्राचीन काळात भारतासह इतरही संस्कृतींमध्ये खगोलशास्त्राचा विकास झाला होता. मात्र, त्याचे नेमके स्वरूप काय होते हे जाणून घेताना तत्कालीन समाजजीवन, त्या काळचे तंत्रज्ञान यांचाही संदर्भ लक्षात घेणे आवश्यक ठरते. त्या काळच्या विकासाशी सुसंगत असेल असेच विज्ञान स्वीकारणे योग्य ठरेल. अन्यथा आपल्या कल्पना वास्तविक स्थितीवर लादल्यासारखे होईल.’
‘प्राचीन काळात भारतातील ग्रंथांचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे विदेशी भाषांमध्ये भाषांतर केले गेले. त्यातून भारतात निर्माण झालेले ज्ञान जगभर पोचले. ही गोष्ट अभिमानास्पद असली, तरी जगभरातील ज्ञान आपल्या भाषांमध्ये का आले नाही याच्या कारणांचाही शोध घ्यायला हवा,’ असेही डॉ. नारळीकर यांनी नमूद केले. ‘पुरातत्त्वशास्त्राच्या अंगाने इतिहासाचे परिपूर्ण आकलन करण्यासाठी तत्कालीन समाजस्थिती, अर्थव्यवस्था, धार्मिक समजुती यांच्यासोबत खगोलशास्त्रातील विकासाचा आणि त्याच्या वापराचाही आधार घेणे आवश्यक आहे,’ असे मत डॉ. जामखेडकर यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेनामी ठेवींचे काय होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोठ्या नोटा बंद करतानाच केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेची नजर पतसंस्थांमधील बेनामी ठेवींकडे वळली आहे. त्यामुळे राज्यातील विविध पतसंस्थामध्ये ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेनामी ठेवींचे काय होणार, या भीतीने अनेक धनदांडग्यांना घाम फुटला आहे. पैसे जाण्याबरोबरच कारवाईची टांगती तलवार त्यांच्यापुढे उभी राहिली आहे.
बेहिशेबी पैसा ठेवण्यासाठी पतसंस्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघड गुपित आहे. बेनामी ठेवी ठेवून त्यावर अधिक दराने व्याज घेण्याचा मार्ग अनेकांनी अनुसरला आहे. येथे थेट नियंत्रणे नसल्यामुळे नियमांतील त्रुटींचा फायदा घेऊन सर्रास बेनामी ठेवी ठेवल्या जात असल्याचे यापूर्वीही आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार; तसेच रिझर्व्ह बँकेने नुकतीच पतसंस्थामधील ठेवीदारांची नावे आणि रक्कम यांची माहिती घेतली होती. त्यानंतर सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. ​निर्णय जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पतसंस्थांमधील व्यवहारांवर निर्बंध आले. आता ठेवींची संपूर्ण माहिती आधीच सरकारकडे आहे. त्याबरोबरच ठेवीदारांना रकमा परत करण्यासाठी कागदपत्रे-ओळखीच्या पुराव्यांचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे बेनामी ठेवींचे काय होणार, हा प्रश्न आहे.
राज्यात एक हजार कोटींपेक्षा अधिक ठेवी असलेल्या दोन नागरी पतसंस्था आहेत. तर १०० ते एक हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या सोळा, १० कोटी ते १०० कोटींपर्यंत ठेवी असलेल्या सुमारे ३९५ तर एक लाख ते १० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवणाऱ्या सुमारे साडेचौदा हजार पतसंस्था राज्यात आहेत. यापैकी काही पतसंस्थांमध्ये बेनामी ठेवींची चर्चा असून, आता हे ठेवीदार आणि संस्थांचे पदाधिकारीही काळजीत पडले आहेत. या बेनामी ठेवी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील गैरप्रकार उघडकीस आला, तर दंडापोटी दुप्पट रक्कम सरकार वसूल करणार आहे. त्यामुळे ही रक्कम काढण्यास फारसे कोणी धजावेल, अशी स्थिती नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी हॉस्पिटलचा जुन्या नोटांना नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या पेशंटांकडून पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा बुधवारपासून स्वीकारण्यात येणार नाहीत, असा निर्णय ‘हॉस्पिटल असोसिएशन ऑफ पुणे’ या संघटनेने घेतला आहे. नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ देण्याबाबत सांगितले असले, तरी प्रत्यक्षात राज्य सरकारकडून कोणताही लेखी आदेश प्राप्त झाला नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
पाचशे, हजार रुपयांच्या नोटांवर सरकारने बंदी आणली. त्या वेळी सरकारने सरकारी हॉस्पिटल, औषध दुकाने, रेल्वे, बस अशा काही मोजक्याच ठिकाणी या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. ही मुदत संपल्याने मंगळवारी संध्याकाळी उशिरा असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत शहरातील २० ते २५ खासगी हॉस्पिटलचा समावेश होता. त्यात दीनानाथ मंगेशकर, पूना, नोबेल, रुबी, जहांगीर, इनलॅक्स बुधराणी, जोशी, इनामदार, सह्याद्री, एन. एम. वाडिया आदी खासगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘शहरातील खासगी हॉस्पिटलने आतापर्यंत पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या. ज्यांना शक्य नव्हते त्यांच्याकडून क्रेडिट, डेबिट कार्ड; तसेच चेक स्वीकारत होतो. अनेकदा चेक दिल्यानंतर पेशंट विसरून जात आहेत. त्यामुळे तातडीच्या वेळीच आम्ही चेकने पेमेंट स्वीकारण्याचा बैठकीत निर्णय घेतला आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत नोटा स्वीकारण्याचे सरकारने आदेश दिले होते. आता पुढील आदेश आम्हाला प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे पेशंटने आरटीजीएस, एनएफटी, ऑनलाइन अथवा प्लास्टिक मनीचा वापर करावा. पेशंटांची गैरसोय होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. शहरातील दोन ते तीन हॉस्पिटलमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत. मुंबईतील हॉस्पिटल असोसिएशनने या पूर्वीपासून नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्या संघटनेशी आम्ही संपर्कात आहोत,' अशी माहिती हॉस्पिटल असोसिएशन ऑफ पुणेच्या सदस्या मंजूषा कुलकर्णी यांनी 'मटा'ला दिली.
राज्याच्या आरोग्य विभागाने खासगी हॉस्पिटलना नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते; तसेच धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनीदेखील हॉस्पिटलना नोटा स्वीकाराव्यात; तसेच पेशंटना नाकारू नयेत, असे आदेश दिले होते; परंतु या आदेशांना शहरातील काही खासगी हॉस्पिटलने केराची टोपली दाखविली आणि नोटा न स्वीकारता कार्ड पेमेंट करण्यावर भर देण्यात आला होता.
..............
राज्य सरकारने दिलेली १४ नोव्हेंबरची मुदत संपली आहे. नव्याने लेखी आदेश दिले नाहीत. त्यामुळे बुधवारपासून आम्ही पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाही. उपचार थांबविण्यात येणार नाहीत; पण उपचारासाठी नव्या नोटा, चेक स्वीकारण्यात येईल. मात्र हॉस्पिटलच्या औषध दुकानांमध्ये पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील.
- बोमी भोट, मुख्य कार्यकारी अधिकारी, रुबी हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमपीडीए’ची दुसरी कारवाई

$
0
0

रेशन धान्याचा काळाबाजार करणारा तुरुंगात स्थानबद्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशनिंगच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या विरोधात ‘एमपीडीए’ची कारवाई करण्यात आली. त्याला नागपूर तुरूंगात स्थानबद्ध करण्यात आले असून, यंदा रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्याच्या विरोधात करण्यात आलेली ही पुण्यातील दुसरी कारवाई ठरली आहे. अविनाश राम कच्छवे (वय ३४, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे. साथीदारांच्या मदतीने शहरातील रेशन दुकानदारांना धमक्या देऊन, मारहाण करून स्वस्त दरात रेशनिंगचे धान्य मिळवण्यचा कच्छवेचा गोरखधंदा होता. लाटलेले धान्य खुल्या बाजारात जास्त दराने विक्री तो करीत असे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याची ही कृष्णकृत्ये सुरू होती. यापूर्वी त्याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याच्याकडून १५ लाख रुपयांचे धान्य जप्त केले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्याच्यावर कारवाई करून ६४ लाख रुपयांचे काळ्याबाजार विक्रीसाठी जाणारे धान्य पकडले होते. जून २०१६मध्ये खडक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून रेशनिंगचे दोन लाख रुपयांचे धान्य पकडले होते. रेशनिंगचे धान्य जास्त दराने विक्री करण्यासाठी आरोपीने दहशत निर्माण केली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते.
त्याच्या विरोधात ‘एमपीडीए’ कारवाईचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी कच्छवेवर एमपीडीएची कारवाई करण्यास परवानगी दिली. आता त्याची रवानगी नागपूर तुरूंगात करण्यता आली आहे.

सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’
सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या मनोज भाऊसाहेब पाडळे (वय २७, रा. विकासनगर, सिंहगड रोड) याच्यावरही ‘एमपीडीए’ची कारवाई करण्यात आली आहे. त्याला अमरावती तुरूंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पाडळेने मे ते सप्टेंबर २०१६ दरम्यान शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे केले आहेत. पोलिस निरीक्षक विष्णू जगताप यांनी त्याच्या विरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी परवानगी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इनोव्हेटिव्ह टिकिटिंग’

$
0
0

कार्यक्षम पीएमपीसाठी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याची संकल्पना

Harsh.Dudhe@timesgroup.com
Tweet : @HarshDudheMT

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला उशीर होणार नाही...ती वाहतूक कोंडीत अडकणार नाही....बसमध्ये प्रवाशाला तिकीट काढताना सुट्ट्या पैशांची अडचण येणार नाही..बसमध्ये इमर्जन्सी अलर्टची सुविधा मिळेल...प्रवाशांची गर्दी असणाऱ्या मार्गांवरच अधिक संख्येने बस जातील...शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पीएमपची स्वप्नवत वाटणारी स्थिती अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याने एका उपकरणाच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
पीएमपीचे व्यवस्थापन आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या ‘इनोव्हेट‌िव्ह टिकिटिंग’ या भन्नाट उपकरणाची संकल्पना सिव्हिल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी सागर अमृता रसाळ याने मांडली आहे. ताथवडेच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल) शाखेत तो अंतिम वर्षात शिकत आहे. या संकल्पनेला जागतिक मान्यता मिळण्यासाठी त्याने पेटंटची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याने या उपकरणाचे प्रोटोटाइप तयार केले असून, त्याची यशस्वी चाचणीही घेतली आहे.
हे उपकरण सध्या उपलब्ध असणाऱ्या टिकिटींग मशिनपेक्षा वेगळे आहे. त्याची जोडणी पीएमपीच्या मध्यवर्ती संगणकीय यंत्रणेला (सर्व्हर) करण्यात येईल. उपकरणामध्ये प्रवाशाला त्याचे आधार कार्ड जोडता येईल. त्यामुळे प्रवाशाने कंडक्टरकडून तिकीट घेतल्यानंतर सुट्टे पैसे नसतील, तर ते उपकरणाद्वारे प्रवाशाच्या खात्यावर जमा होतील. त्यामुळे पुढच्या वेळी प्रवाशाला तिकीट काढताना जमा रकमेचा वापर करता येईल. या उपकरणाद्वारे एखाद्या प्रवासी मार्गावर असलेली प्रवाशांची संख्या काढलेल्या तिकिटांच्या संख्येद्वारे समजणार आहे. त्यामुळे तिकिटांची संख्या वाढल्यास त्या मार्गावर जादा बस सोडता येतील. तसेच, संख्या कमी असल्यास कमी बस सोडण्याचे नियोजन करता येणे शक्य आहे. त्यामुळे संपूर्ण बसचे व्यवस्थापन करणे शक्य होईल. या उपकरणात बस प्रवासात ऑनलाइन तिकिटांचे आरक्षण करण्याची सुविधा असेल. तसेच, एखाद्या बीआरटीमध्ये बस बंद पडल्यास त्याची माहिती बसच्या मागे आणि पुढे असणाऱ्या बसला मिळणार आहे. अशाच प्रकारे रस्त्यावरील वाहतूक कोंडीची पूर्वसूचनाही प्राप्त होईल. त्यामुळे वाहतूक कोंडीत बस अडकणार नाही. एखाद्या बसमध्ये बिघाड झाल्यास त्या बसमधीस प्रवाशांना तत्काळ दुसरी बस उपलब्ध करून देण्यासाठी इमर्जन्सी अलर्टची सोय असेल. यासाठी उपकरणात ‘अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅमिंग’ची यंत्रणा कार्यरत असल्याने ही कामे होणार आहे. बसमधील प्रत्येक उपकरणाला सर्व्हरची जोड असल्याने विविध कार्ये करणे शक्य होणार आहे.
..
स्वीडनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर
इनोव्हेटिव्ह तिकिटिंग उपकरणाद्वारे पीएमपीच्या बसचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. स्वीडनमध्ये असणाऱ्या ट्रान्झिट बस सिस्टीममध्ये अशा प्रकारच्या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. त्यामुळे तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यशस्वीपणे कार्यरत आहे. पीएमपीमध्ये किंवा राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी) यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये हे उपकरण वापरल्यास व्यवस्था अधिक बळकट होईल, असे सागरने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यकृत प्रत्यारोपणानंतर डॉक्टरचे शर्यतीत यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,पुणे

यकृतप्रत्यारोपण झालेल्या डॉक्टराने अवघ्या वर्षभरातच वयाच्या ५६व्या वर्षी पुणे ते गोवा सायकल स्पर्धेदरम्यान अंदाजे ६४३ किलोमीटरचा प्रवास ३८ तास ३६ मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. डॉ. विनय कोपरकर असे या धाडसी डॉक्टरांचे नाव आहे.
वर्षभरापूर्वी यकृत प्रत्यारोपणाशिवाय जगू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी कोपरकरांना सांगितले होते. त्यामुळे यकृत दाता शोधण्याचे काम हाती घेण्यात आले. प्रयत्न करूनही अनेक दिवस दात्याचा शोध लागला नाही. अखेर एकाच्या अवयवदानामुळे कोपरकरांवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर कोपरकर यांनी मोठ्या उत्साहाने सायकलिंगला सुरुवात केली आणि वयाच्या ५६व्या वर्षी पुणे ते गोवा दरम्यानची ६४३ किलोमीटरची सायकल रिले रेस स्पर्धा २८ तास ३६ तास मिनिटांत पूर्ण करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या स्पर्धेत पहाटे, दिवसा, मध्यरात्रीचा प्रवास, कधी चढ तर कधी उताराचा रस्ता, तर काही ठिकाणी असणाऱ्या बिकट वळणांवर मात करून कोपरकर यांनी शर्यत पूर्ण केली. पुणे- गोवा सायकलिंग स्पर्धेत डॉ. कोपरकर यांच्यासह चौघे सहभागी झाले होते. मैथिली जोग, गणेश करचे, उमेश धोईते आदींनी त्यांना साथ दिली.
‘यकृत दाता शोधूनही सापडत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले होते. अखेर दाता मिळाला आणि माझ्यावर यकृत प्रत्यारोपण झाले. ऑपरेशनला एक वर्ष पूर्ण होत असतानाच मी रिले सायकलिंग स्पर्धेत सहभागी झालो. आमच्या फॅन्टॅस्टिक फोर ग्रुपने स्पर्धेच्या मिश्र गटात पहिले पारितोषिक मिळविले. आत्मविश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकते, हे मी दाखवून दिले आहे,’ असे डॉ. विनय कोपरकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जिल्हा बँका मागणार अर्थमंत्र्यांकडे दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिझर्व्ह बँकेने चलनातून बाद झालेल्या नोटा खात्यात भरण्यास आणि बदलून देण्यास जिल्हा सहकारी बँकांना बंदी घातली आहे. ही बंदी अयोग्य असून त्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी सर्व जिल्हा बँकांच्या अध्यक्षांची आज मुंबईत बैठक होणार आहे. या चर्चेनंतर तयार होणारे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बँकिंग कायद्यानुसार बँकिंगचे लायसन्स मिळालेल्या सर्व बँका एकसमान आहेत. रिझर्व्ह बँकेला कोणत्याही बँकेबाबत भेदभाव करता येत नाही. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास अथवा बदलून देण्यास परवानगी नाकारणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. ज्या बँकांकडे कोअर बँकिंग सुविधा आहे, आणि ज्या बँकांकडे ज्या खातेदारांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा ग्राहकांना पैसे भरण्याची किंवा बदलण्याची सुविधा देणे आवश्यक होते. मात्र, सरसकट कोणतीही कारणे न देता ही बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे खातेदारांमध्ये संभ्रमाचे व अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असून ते बँकिंग क्षेत्राला घातक आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना अर्धवट केवायसी असलेल्या खातेधारकांकडून केवळ ५० हजार रूपये मूल्याच्याच नोटा स्वीकारण्याचे बंधन घातले आहे. त्याप्रमाणे जिल्हा बँकांनाही ही परवानगी दिली पाहिजे, असे अनास्कर यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई जिल्हा बँकेतर्फे राज्यातील सर्व जिल्हा बँकांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक मुंबईत बोलावली आहे. त्यावर या विषयावर सविस्तर चर्चा होऊन पुढील दिशा निश्चित केली जाईल.

सहकार विभागाने केली शिफारस

इतर बँकांच्या खातेदारांना पतसंस्थांच्या खात्यात पैसे भरता येण्याची परवानगी द्यावी, अशी शिफारस सहकार विभागाने रिझर्व्ह बँकेला केली आहे. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी ही माहिती दिल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूक्ष्मजीवांचे भव्य काम

$
0
0

‘आघारकर’च्या संशोधनामुळे खनिज तेल उत्पादनात ३० टक्के वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जमिनीमधून खनिज तेल बाहेर काढण्यासाठी कार्यरत असलेल्या मोठमोठ्या मशिनच्या कामाची क्षमता आणि पर्यायाने खनिज तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी सूक्ष्मजीव उपयुक्त ठरतात, असे कोणी सांगितले तर चटकन विश्वास बसणार नाही; मात्र हे शक्य असल्याचे पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने सिद्ध केले आहे. या संशोधनाच्या मदतीने खनिज तेलाचे उत्खनन करणाऱ्या कंपन्यांनी प्रायोगिक तत्त्वावर कामही सुरू केले आहे.

‘आघारकर’मधील संशोधकांनी यासाठी आवश्यक तंत्र विकसित केले आहे. त्या आधारे तयार झालेल्या सूक्ष्मजीवांच्या समूहांच्या मदतीने खनिज तेल उत्पादक कंपन्यांनी केलेल्या प्रायोगिक वापरात खनिज तेल उत्पादनाच्या क्षमतेमध्ये जवळपास ३० टक्क्यांहून अधिक वाढ होत असल्याचे समोर आले आहे. संस्थेचे संचालक डॉ. किशोर पाकणीकर यांनी बुधवारी या तंत्राची माहिती दिली.

खनिज तेल उत्पादनासाठी नेहमीच्या पद्धती वापरल्यास आपल्याकडे जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण साठ्यापैकी ४० टक्क्यांच्या आसपास तेल जमिनीवर आणण्यात कंपन्या यशस्वी होत आहेत. जमिनीखाली खोलवर खडकांच्या फटींमध्ये आणि भेगांमध्ये अडकून राहणारे खनिज तेल या पद्धतीने गोळा करण्यात मर्यादा येतात. ही मर्यादा दूर करण्यासाठी विशिष्ट सूक्ष्मजीवांचा वापर हा उत्तम पर्याय ठरल्याचे डॉ. पाकणीकर यांनी नमूद केले.

‘हे सूक्ष्मजीव जमिनीमध्ये खोलवर गेल्यानंतर एकत्रितपणे काही विशिष्ट वायू तयार करतात. तसेच खडकांच्या पृष्ठभागावर काही विशिष्ट अभिक्रियाही घडवून आणतात. त्यामुळे या खडकांच्या फटी आणि भेगांमध्ये अडकून राहिलेले खनिज तेल खडकापासून वेगळे होऊन प्रवाही होते. हे तेल विहिरींमध्ये गोळा झाल्यावर ते उपसून पारंपरिक पद्धतीने जमिनीवर आणले जाते. या पद्धतीमुळे खनिज तेलाच्या एकूण साठ्यापैकी ७० ते ७५ टक्के साठ्याचा उपसा शक्य झाला आहे,’ अशी माहिती डॉ. पाकणीकर यांनी दिली.

उच्च तापमानातही यशस्वी

परदेशामध्ये अशाच पद्धतीने झालेल्या संशोधनाच्या मदतीने तापमान कमी असलेल्या प्रदेशात खनिज तेलाचे उत्पादन शक्य असल्याचे समोर आले होते; मात्र भारतात खनिज तेलांच्या विहिरींमधील तापमान जवळपास ९५ अंश सेल्सिअसपर्यंत असते. या परिस्थितीत पाश्चिमात्य तंत्राच्या वापरावर मर्यादा पडतात. ‘आघारकर’च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनामुळे या मर्यादाही दूर झाल्या आहेत. तसेच उच्च तापमान असतानाही सूक्ष्मजीवांचा वापर करून खनिज तेलाचे उत्पादन वाढविण्यामध्येही यश आले आहे. अशा पद्धतीचे संशोधन करणारी ‘आघारकर’ ही जगात पहिलीच संस्था ठरल्याची माहितीही डॉ. पाकणीकर यांनी या निमित्ताने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाभोलकर हत्येप्रकरणीसुनावणी २८ नोव्हेंबरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या पिस्तुलातील गोळ्यांचा अहवाल सादर करण्यासाठी कोर्टाकडे मुदत मागितली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी बालगंधर्व रंगमंदिराजवळील शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १० जून २०१६ रोजी वीरेंद्रसिंह तावडेला सीबीआयने अटक केली. या प्रकरणी तावडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपीविरुद्ध आरोपनिश्चतीसाठी सुनावणी होणार आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलातील गोळ्या तपासणीसाठी स्कॉटलंड यार्ड येथे पाठविण्यात आल्या आहेत. आरोप निश्चित करण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा आहे. त्याचा अहवाल मिळेपर्यंत मुदत मिळावी अशी विनंती सीबीआयचे वकील मनोज चलाडन यांनी कोर्टाकडे केली. त्याला तावडेचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीपाद जोशींना आता उपरती झाली असेल

$
0
0

‘दानत नाही’ या वक्तव्यावर सडकून टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मराठी माणसांकडे दानतच नाही,’ असे वक्तव्य करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यावर साहित्य वर्तुळातून चौफेर टीका होत आहे. ‘आतापर्यंतच्या संमेलनांसाठी मराठी माणसांनीच खर्च केला आहे. मराठी माणसांमध्ये दानत नाही, असे म्हणणे हा समस्त मराठी जनांचा अपमान आहे,’ अशा शब्दांत जोशी यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. ‘संमेलने खर्चिक नको, अशी भूमिका घेणाऱ्या अध्यक्षांना पैशाशिवाय काम होत नाही, याची उपरती झाली असेल,’ अशा शब्दांत जोशी यांचा साहित्य वर्तुळातून खरपूस समाचार घेतला जात आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाला सरकारकडून दर वर्षी दिला जाणारा निधी अपुरा पडत असल्यामुळे मराठी भाषिकांकडून आर्थिक सहकार्य घेण्याचा उपक्रम महामंडळाने सुरू केला आहे. महामंडळाच्या खात्यावर केवळ सव्वा लाख रुपयांचा निधी जमा झाला असून, ‘मराठी माणसांची दानतच नाही,’ असे वक्तव्य जोशी यांनी केले होते.

‘महामंडळ संमेलन घेण्याशिवाय कोणतेही भरीव कार्य करत नाही. संमेलनातील भपका, राजकीय बडेजाव यामुळे समाजात महामंडळाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया असून, साहित्यिक उपक्रमातून वातावरण सकारात्मक करायला हवे. मराठी माणसांत दानत नाही, असे म्हणणे हा समस्त मराठीजनांचा अपमान आहे,’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व महामंडळाचे सदस्य प्रा. मिलिंद जोशी यांनी श्रीपाद जोशी यांना घरचा आहेर दिला.

‘महामंडळाची वृत्ती सर्वसमावेशक नसेल तर पैसा कोण देणार,’ असा सवाल ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाणे यांनी केला. ‘महामंडळ इतर राज्यातील संस्थांना संलग्न करून घेते; पण महाराष्ट्रातील कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा अशा महत्त्वाच्या संस्थांना जवळ करत नाही. बेळगाव, निपाणीचा केवळ ठराव मांडला जातो; पण त्यांचे प्रतिनिधित्व नसते. सर्वांना बरोबर घेतले तर महामंडळ ‘अखिल भारतीय’ होईल,’ असा टोला फुटाणे यांनी लगावला.

.............

साहित्य संमेलनांच्या माजी स्वागताध्यक्षांची नाराजी

खर्चाला वाईट ठरविणाऱ्या जोशी यांना आता दानाचे महत्त्व पटले आहे. साहित्यासाठी पैसे खर्च करणे वाईट नाही. मराठी माणसात दानत नाही, या वक्तव्याने हसू आले.
- डॉ. पी. डी. पाटील

मराठी माणूस मोठ्या मनाचा आहे. घुमान, पिंपरी येथे झालेल्या संमेलनांचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. दानत नाही, असे म्हणणे मराठी मनाला दुखावणारे आहे.
- भारत देसडला

आतापर्यंतची संमेलने मराठी माणसानेच भरवली आहेत. सासवडचे संमेलन लोकवर्गणीतून यशस्वी झाले. पैसे मागितले म्हणून कोणी लगेच देत नसतो. तुम्ही ते कसे मागता, समाजात तुमचे संबंध कसे आहेत, यावर ते अवलंबून असते.
- विजय कोलते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूरमध्ये वातावरण तापले

$
0
0

नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू

म. टा. प्रतिनिधी, शिरूर

शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपले बळ शिरूर शहर विकास आघाडीचे प्रकाश धारिवाल यांच्यामागे उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणूक एकतर्फी होणार, की छोट्या-मोठ्या घटकांना बरोबर घेऊन लोकशाही क्रांती आघाडी तगडे आव्हान उभे करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूर शहर विकास आघाडीसमवेत राष्ट्रवादी पालिका निवडणुका लढविणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर येथे जाहीरपणे सांगितले. त्यापाठोपाठ भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनीही धारिवाल यांच्या आघाडीसमवेत पालिका निवडणुकीला असल्याचे जाहीर केले. धारिवाल यांच्या विकास आघाडीच्या पाठीमागे मोठे राजकीय पक्ष एकवटल्याने धारिवाल यांची ताकद वाढली आहे. मागील दोन पालिका निवडणुकीत धारिवाल यांच्या विरोधातील पॅनेलचे नेते असलेले आमदार पाचर्णे विकास आघाडीकडे गेल्याने आता विरोधकांची मोट कोण बांधणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या लोकशाही क्रांती आघाडीचे नेतृत्व माजी नगरसेवक रवींद्र धनक करत आहेत. जनआंदोलनातील नेते अशी त्यांची ओळख असून, मागील दोन नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी विरोधी पॅनेलचे नेतृत्व केले आहे.

सध्याच्या घडीला नगरसेवक पदाकरिता इच्छुक असणारे अनेक जण धारिवाल यांच्या आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. खरे तर यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा पाया व्यापक करण्याची संधी घेऊन पक्षाद्वारे पालिका निवडणुका लढतील असे वाटत होते; पण राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व काँग्रेस या सर्वच पक्षांनी शिरूर शहर विकास आघाडीसमवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिरूर शहर विकास आघाडी, लोकशाही क्रांती आघाडी व जनक्रांती आघाडी अशी तिरंगी लढत होईल असे दिसते. नगरपालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या १७वरून २१ झाली असली, तरी जुन्यापैकी फार थोड्या जणांना नव्याने उमेदवारी मिळेल, असा होरा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. नगराध्यक्षपदाकरिता सत्तारूढ विकास आघाडीकडून सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या पत्नी दीना धारिवाल यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. लोकशाही क्रांती आघाडीकडून योगिता विक्रम पाचंगे (पाटील) यांच्या नावाची चर्चा असून, संजय पाचंगे यांच्या जनक्रांती आघाडीच्या वतीने डॉ. सुनीता पोटे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली आहे.

आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती धारिवाल यांच्या ‘आशीर्वाद’ या निवासस्थानी घेण्यात येत आहेत. एकंदरीत, ऐन थंडीच्या वातावरणात शिरूरचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
............
डॉ. सुनीता पोटे यांचा अर्ज

शिरूरमध्ये इतर आघाड्यांकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू असताना व नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याची चर्चा सुरू असतानाच जनक्रांती आघाडीच्या डॉ. सुनीता संतोष पोटे यांनी नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला. शिरूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता राखीव असून, नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून द्यावयाचे आहे. पोटे यांनी अर्ज दाखल केला, त्या वेळी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, नम्रता गवारी आदी उपस्थित होते. याखेरीज प्रभाग क्रमांक दहामधूनही नगरसेवक पदाकरिता एक अर्ज दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काटेकोर राहिल्यास साधा शेतकरीही श्रीमंत होईल

$
0
0

पशुतज्ज्ञ डॉ. मदने यांचा विश्वास

म. टा. प्रतिनिधी, औंध

‘गायी-म्हशी पाळताना मुक्त संचार गोठा पद्धत वापरल्यास, मूरघासनिर्मिती केल्यास, जातिवंत गायींची पैदास केल्यास, तसेच जनावरांच्या विविध हालचालींच्या नोंदी ठेवल्यास दुग्धव्यवसायात ग्रामीण भागातील साधा शेतकरीही श्रीमंत होऊ शकतो,’ असा विश्‍वास ज्येष्ठ पशुतज्ज्ञ, प्रशिक्षक डॉ. शैलेश मदने यांनी शेरे (ता. मुळशी) येथे व्यक्त केला.

गायी-म्हशींचे संगोपन आणि सौरऊर्जेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार शरद ढमाले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे, सभापती महादेव कोंढरे, शिवसेनेच्या जिल्हा उपसंघटक स्वाती ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील चांदेरे, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय सुर्वे, सरपंच महापरिषदेचे अध्यक्ष हनुमंत सुर्वे, सुनील जागडे, त्याचप्रमाणे शेरे पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक, संतसेवक दिलीप दगडे यांनी या

मेळाव्याचे आयोजन केले होते.

मुक्त संचार गोठ्याचे महत्त्व सांगताना मदने म्हणाले, ‘गायी-म्हशींना एका जागेवर जखडून ठेवल्यास त्यांच्या मलमूत्रामुळे त्यांचे शरीर घाण होते. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूधही कमी होते. जनावरांना जखडून न ठेवता मनसोक्त फिरता आले पाहिजे. जनावरे तणावमुक्त ठेवण्यासाठी मुक्त संचार गोठ्याची उभारणी शेतकऱ्यांनी करावी. कमीत कमी पैशांतही असा गोठा उभारता येतो. यामुळे जनावरे तहान लागल्यावर पाणी पिऊ शकतात. आवश्यक त्या ठिकाणी बसू शकतात.’

‘दुग्धव्यवसाय टाइमपास म्हणून करू नका. दुधापासून इतर उत्पादने तयार करून शेतकरी श्रीमंत होऊ शकतो. गायी-म्हशींना वर्षभर हिरवा चारा मिळावा, यासाठी घरच्या घरी मूरघास तयार केला जातो. पारंपरिक पद्धतीने गायी पाळण्यापेक्षा कमी खर्च आणि कमी श्रमाची छोटी छोटी तंत्रे शेतकऱ्यांनी शिकून घ्यावीत,’ असा सल्लाही मदने यांनी दिला. या वेळी सौर ऊर्जा प्रकल्पतज्ज्ञ उदय भोसले आणि आर. आर. राठी यांनी

ग्रामीण भागात सौर ऊर्जेची निर्मिती कशा पद्धतीने करता येईल याची माहिती दिली. अजय नारखेडे यांनी पॉलिहाउस व नेटहाउसबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. संभाजी चवले यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविकात दिलीप दगडे यांनी शेतकरी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. बाळासाहेब उभे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणी समित्या अध्यक्षांच्या प्रतीक्षेत

$
0
0

@kuldeepjadhavMT
पुणे : जिल्हावार जात पडताळणी समित्यांची घोषणा करून राज्यातील युती सरकारने आघाडी सरकारचीच री ओढली आहे. तत्कालीन आघाडी सरकारने जाहीर केलेल्या जिल्हावार जात पडताळणी समित्यांप्रमाणेच नुकत्याच जाहीर केलेल्या समित्यांवरही अध्यक्षपदासाठी आणखी २५ अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रलंबित प्रकरणे व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी कामकाजासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांसाठी आवश्यक अधिकारी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
आघाडी सरकारच्या काळात नऊ जून २०१४ रोजी जिल्हावार जात पडताळणी समित्यांचा शासन निर्णय काढण्यात आला होता. त्या वेळीदेखील अध्यक्ष व सदस्यपदासाठी बहुतांश अधिकाऱ्यांवर एकापेक्षा अधिक समित्यांचा कार्यभार सोपविण्यात आला होता. यामध्ये महसूल विभागातील अधिकाऱ्यांना अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. त्या वेळी समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. तसेच, या समित्यांसाठी स्वतंत्र पदभार आणि समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनाही अध्यक्षपद मिळावे, या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर त्या समित्या बरखास्त करण्यात आल्या होत्या. आता राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच पुन्हा जिल्हावार जात प्रमाणपत्र समित्या जाहीर केल्या आहेत. मधल्या काळात समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनाही अध्यक्षपद देण्यास सरकारने सहमती दर्शविली. त्यानुसार त्यांना या समित्यांवर स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्या वेळी स्वतंत्र पदभाराचा आग्रह धरणारे अधिकारी आताच्या परिस्थितीवर काही बोलल्याचे अद्याप तरी दिसून आले नाही.
जिल्हावार जात पडताळणी समित्या अस्तित्त्वात येण्यापूर्वी राज्यात ३६ जिल्ह्यांसाठी १५ विभागीय समित्या कार्यरत होत्या. या १५ समित्यांपैकी १० समित्यांनाच पूर्णवेळ अध्यक्ष होते. उर्वरित समित्यांचा कारभारासाठी या १० अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यामुळे या विभागीय समित्यांच्या कामकाजावर परिणाम होऊन जात पडताळणीच्या प्रलंबित अर्जांची संख्या वाढली होती. आता स्थापन केलेल्या जिल्हावार समित्यांची अवस्था विभागीय समित्यांपेक्षा वेगळी नाही. त्यातच आगामी काळ निवडणुकांचा आहे. त्यामुळे जात पडताळणी समित्यांकडील अर्ज मोठ्या संख्येने वाढणार आहेत. या परिस्थितीमध्ये जात पडताळणीचे कामकाज गतीने चालणे अवघड दिसत आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना अर्धन्यायिक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. जात पडताळणीच्या अर्जावर या समित्यांचे अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव यांनी एकत्रितपणे निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र, अध्यक्षांवर सोपविलेल्या एकापेक्षा अधिक समित्यांच्या जबाबदारीमुळे एकत्रितपणे निर्णय घेतला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात राज्यांतील सोशल इनोव्हेटर्स आज पुण्यात

$
0
0

सात राज्यांतील सोशल इनोव्हेटर्स आज पुण्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुजरातमधील सात वर्षांच्या मुलापासून ते अंदमान निकोबारमधील आदिवासींच्या नेत्यांपर्यंत देशातील विविध सोशल इनोव्हेटर्सच्या संकल्पना आज (गुरुवारी) पुणेकरांसमोर उलडणार आहेत. पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) आयोजित चौथ्या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ या परिषदेत या संकल्पना समोर येतील.
‘पीआयसी’तर्फे यशदाच्या सभागृहात आयोजित या परिषदेचे उद्घाटन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते होईल. या वेळी डॉ. आमटे यांच्या हस्ते अंजनी माशेलकर पुरस्काराचे वितरण होईल. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय केळकर, सतीश प्रधान, प्रशांत गिरबाने आदी या वेळी उपस्थित राहतील.
सात राज्यांतील २० सोशल इनोव्हेटर्स यात आपले इनोव्हेशन सादर करतील. यामध्ये आदिवासी, ग्रामीण आणि शहरी सोशल इनोव्हेटर्सचा समावेश असेल. त्यांचे हे इनोव्हेशन समजून घेण्यासाठी देशभरातील आघाडीच्या ३० ते ३५ कॉर्पोरेट कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सि‌बि‌लिटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे नुकताच इंडिया चीन एक्स्चेंज प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत भारतात सोशल इनोव्हेशनचे शिक्षण घेण्यासाठी आलेला एक चिनी इनोव्हेटरही आपले सादरीकरण करणार आहे.
आदिवासी भागातील सोशल इनोव्हेटर्ससोबत अंदमान, निकोबार आणि अरुणाचल प्रदेशातील आदिवासींचे नेतेही उपस्थित असतील, अशी माहिती पीआयसीचे संचालक प्रशांत गिरबाने यांनी दिली. बाणेर रस्त्यावरील यशदाच्या सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकिस्तान हादरला; पण सावधच राहावे

$
0
0

पाकिस्तान हादरला; पण सावधच राहावे

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पाकिस्तान हेच दहशतवादाचे मध्यवर्ती केंद्र आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांना पोसत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बाब जगापुढे मांडली आहे. त्याचबरोबर सर्जिकल स्ट्राइक करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिले आहे. या अनपेक्षित हल्ल्याने पाकिस्तान हादरला असून त्याच्याकडून प्रतिक्रियेची शक्यता असल्याने आपण सर्वांनीच सावध राहण्याची आवश्यकता आहे,’ असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मनीष सभरवाल यांनी रविवारी व्यक्त केले.
‘भारतीय विचार साधना’तर्फे आयोजित ‘भारत -पाक संबंध’ या विषयावरील कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता, ‘भारतीय विचार साधना’चे किशोर शशीतल, भगवान दातार या वेळी उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार जवाहर कौल, ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले, ज्येष्ठ सामारिक तज्ज्ञ प्रा. डॉ. श्रीकांत परांजपे, मेजर गौरव आर्य (नि.) आणि लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) यांनी मार्गदर्शन केले. विवेक कुलकर्णी यांनी आभार मानले.
‘पाकिस्तान कितीही नाकारत असला, तरी पाकिस्तानच दहशतवादाचे मध्यवर्ती केंद्र आहे. पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना आर्थिक मदतीबरोबरच प्रशिक्षण, आश्रय देण्याबरोबरच त्यांना हरप्रकारे मदत करत आला आहे. सन १९७१ च्या युद्धात मिळालेल्या धड्यामुळे भारताशी थेट युद्ध न करता दहशतवाद्यांच्या माध्यमातून कुरापती काढण्याचे कारस्थान पाक करत आहे. ही बाब आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर थेट मांडली आहे. पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्यासाठी आपण सर्व पर्यायांचा वापर केला पाहिजे,’ असेही सभरवाल यांनी सांगितले.
‘लष्कराने केलेले सर्जिकल स्ट्राइक हे अतिशय समर्पक पाऊल होते. पूर्वी झालेल्या कारवायांपेक्षा सर्जिकल स्ट्राइकचे स्वरूप अतिशय वेगळे होते. पूर्वीच्या कारवाया या स्थानिक पातळीवर स्थानिक अधिकाऱ्यांच्या आदेशाने झाल्या होत्या. सर्जिकल स्ट्राइक योग्य पूर्वतयारी व समन्वयासह आपल्याला हव्या त्यावेळी व ठिकाणी करण्यात आली. यानंतर त्याची माहिती पाकिस्तानलाही देण्यात आल्याने शिष्टाचाराचेही पालन झाले,’ असेही सभरवाल यांनी सांगितले. फक्त देशप्रेमाच्या भावनेतून कोणत्याही परिस्थितीत जवान सेवा बजावतात. देशासाठी बलिदान करण्याचीही त्यांची तयारी असते, निवृत्तीनंतर आपण त्यांना योग्य सन्मान देतो का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर संक्रांत?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द झालेल्या चलनी नोटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना स्वीकारण्यास मनाई केल्याने या बँकांमध्ये असलेल्या लाखो शेतकऱ्यांची कर्जखाती थकीत व बुडीत कर्जात (एनपीए) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यास अडचण निर्माण झाल्याने रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, सांगली, लातूर, बुलडाणा, परभणी आणि सिंधुदुर्ग येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सहकार आयुक्तांशी पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे ‘एनपीए’ होण्याची ​स्थिती आहे. आगामी काळात या शेतीतील पतपुरवठ्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.
राज्यातील बहुतांश ग्रामीण भागातील नागरिकांचा आर्थिक व्यवहार हा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत चालतो. राज्य व केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या आर्थिक मदतीच्या योजना या जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत ग्रामीण भागाला पुरवला जातो. सध्या कर्ज वसुलीचा हंगाम असून, जिल्हा बँकांना पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास निर्बंध टाकण्यात आले आहे. त्याचा कर्जवसुलीवर विपरित परिणाम होऊन बहुतांश कर्जाची खाती ‘एनपीए’मध्ये जाण्याची भीती आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
शेती कर्ज वाटप करताना सरासरी पिकनिहाय प्रती एकर ४० हजार रुपयांची कर्जमर्यादा आहे. हे कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर त्यांना प्रती आठवडा २४ हजार रुपये काढण्याचे बंधन आहे. या नियमामुळे जिल्हा बँकांमध्ये व्यवहार करणे अवघड झाले आहे; तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमजुरी, खते, औषधे यासाठीचा खर्च करणे जिकिरीचे झाले असल्याची माहिती सहकार आयुक्तांना देण्यात आली आहे.
शेकडो कोटी पडून

जिल्हा बँकांमध्ये १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान भरणा झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांचा मोठा साठा पडून आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ‘करन्सी चेस्ट’ असणाऱ्या बँका या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे बँकांचा ‘सीसीआर रेशो’ हा मर्यादेपेक्षा जादा झाला आहे. त्यामुळे सरकारी बँकांना दररोज सरासरी १० लाख रुपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागत आहे. खातेदाराला फक्त पैसे काढण्याची परवानगी आहे; परंतु त्यासाठीसुद्धा करन्सी चेस्टमधून पुरवठा केला नसल्याने बँकिंग व्यवहार थंडावले आहेत. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पतसंस्था, नागरी सहकारी संस्था, शेतकरी यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये खाती असून, हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांवरील बंधनांचा फटका ग्रामीण भागाला बसत आहे. जिल्हा बँक ‘केवायसी’ची पूर्तता करतात. जवळपास सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे कोअर बँकिंगची सोय उपलब्ध आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाख रुपये केले परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे परिसरात एक महिला अडीच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग बुधवारी दुपारी रिक्षात विसरली. पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी महिला पोलिस ठाण्यात पोहोचेपर्यंत रिक्षाचालक ती बॅग पोलिसांकडे घेऊन आला. या प्रमाणिक रिक्षाचालकाचे पोलिसांनी कौतुक केले. बॅगेत पाचशे रुपयांच्या पाचशे नोटा होत्या.

मारुती एकनाथ मोरे (वय ६२, रा. गोकुळनगर, वारजे) असे प्रमाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. तुलशी दिलीप गुप्ता (वय ५४, रा. पद्मावती) या अहमदाबाद येथून पुण्यात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आल्या. त्या बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील सिमला फाउंडेशन येथे उतरल्या. या ठिकाणाहून त्या मोरे यांच्या रिक्षात बसल्या. मोरे यांनी त्यांना वारजे चौकापर्यंत सोडतो, असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी गुप्ता यांना वारजे चौकात सोडले. गुप्ता यांच्याकडून पैसे घेऊन मोरे पुढे निघून गेले. त्या वेळी गुप्ता यांना त्यांची पैशाच्या रोकडची बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. त्यांना काय करावे ते सुचेना. त्यामुळे त्यांनी वारजे पोलिसांकडे धाव घेतली.

वारजे पोलिस ठाण्यात गेल्या. घटनेची माहिती पोलिसांना देत होत्या. तोपर्यंत मोरे रिक्षात विसरलेली पैशाची बॅग घेऊन वारजे पोलिस ठाण्यात आले. त्यांनी ती बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली. वारजे पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अनुजा देशमाने यांनी मोरे यांच्या प्रमाणिकपणाचे कौतुक केले. गुप्ता यांनीदेखील मोरे यांचे आभार मानले. गुप्ता यांनी बॅग उघडून पाहिल्यानंतर बॅगेत पाचशे रुपयांच्या नोटांचे अडीच लाख जसेच्या तसे असल्याचे दिसले. ही रक्कम मालमत्तेतून आलेली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सवाई’त यंदा युवाबहार

$
0
0

मोठ्या संख्येने तरुण कलाकारांचे सादरीकरण; सात डिसेंबरपासून महोत्सव रंगणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अभिजात शास्त्रीय संगीताची पर्वणी असलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा अधिकच श्रवणीय अनुभूती देणार आहे. यंदा हा महोत्सव पाच दिवस तर रंगणार असून, युवा कलाकारांचा आविष्कार हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६४ वा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ ७ ते ११ डिसेंबर या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या मैदानावर रंगणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरणही या वेळी झाले. महोत्सवामध्ये २१ कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्यापैकी १४ कलाकार प्रथमच कलेचे सादरीकरण करतील. त्यामध्ये दहापेक्षा अधिक तरुण कलावंत असून वडील-मुलगा, गुरु-शिष्य, भाऊ-बहीण आदी कलाकारांच्या जोड्या यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण आहे. महोत्सवाची वेळ दुपारी ४ ते रात्री १० अशी असेल. अतिरिक्त वेळेची परवानगी मिळाल्यास १० डिसेंबरचे सत्र रात्री १२ पर्यंत चालेल, असे जोशी यांनी नमूद केले.
गेल्या वर्षी डॉ. प्रभा अत्रे यांना कमी वेळ मिळाल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जोशी म्हणाले, 'आधीच्या कलाकारांमुळे डॉ. प्रभा अत्रे यांना कमी वेळ मिळतो. त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी इतर कलाकारांनी वेळेत आपले सादरीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. डॉ. अत्रे यांचा सन्मान ठेवला जाईल.'
..
यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव एका दृष्टिक्षेपात

७ डिसेंबर

महोत्सवाची सुरुवात उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनाने होईल. बिस्मिल्ला खान यांची यंदा जन्मशताब्दी असून, पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात येईल. गौरी पाठारे यांचे गायन होईल. इमदादखानी घराण्याचे उस्ताद इमरत खान यांचे चिरंजीव आणि शिष्य उस्ताद इर्शाद खान यांचे ‘सूरबहार’ या सतारीशी मिळत्या-जुळत्या वाद्याचे सादरीकरण होईल. पं. गणपती भट यांच्या गायनाने

सांगता होईल.

८ डिसेंबर

रसिकांना रितेश व रजनीश मिश्रा यांचे गायन ऐकण्याची संधी मिळेल. रितेश व रजनीश हे ज्येष्ठ गानबंधू पं. राजन-साजन मिश्रा यांचे चिरंजीव आणि शिष्य आहेत. पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता या भगिनी आपल्या बासरी वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. मंजिरी असनारे-केळकर यांचे गायन होईल. संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या गायनाने सांगता होईल.

९ डिसेंबर

ब्रजेश्वर मुखर्जी यांचे गायन. डॉ. म्हैसूर मंजुनाथ व म्हैसूर नागराज हे बंधू कर्नाटकी अंगाच्या व्हायोलिनची जुगलबंदी सादर करतील. यानंतर हैदराबादच्या भरतनाट्यम पारंगत पूर्वाधनश्री यांचे नृत्य होईल. पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने सांगता होईल.

१० डिसेंबर

धनाश्री घैसास प्रथमच आपले गायन सादर करणार आहेत. त्यानंतर श्रीनिवास जोशी यांचे गायन होईल. लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता या बंधूचे सतार आणि सरोदवादन रसिकांना अनुभवता येईल. पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनानंतर सत्राची सांगता ख्यातनाम व्हायोलिन वादक डॉ. एल. सुब्रमण्यम आणि त्यांचे पुत्र अंबी यांच्या सहवादनाने होईल.

११ डिसेंबर

पं. शिवकुमार शर्मा यांचे जपानी शिष्य ताकाहीरो अराई यांचे संतूर वादन या दिवसाचे वैशिष्ट्य असेल. त्यानंतर पं. कैवल्यकुमार यांचे गायन होईल. ख्यातनाम सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांचे आपले शिष्य आणि सुपुत्र अमान अली बंगश आणि अयान अली बंगश यांच्याबरोबर सहवादन रंगणार आहे. परंपरेप्रमाणे महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या

गायनाने होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्या पटवर्धन यांना अत्रे पुरस्कार जाहीर

$
0
0

पुणे : रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा ‘गुरूवर्य आबासाहेब व इंदिरा अत्रे’ पुरस्कार विद्या पटवर्धन, कृ. पं. देशपांडे यांना जाहीर करण्यात आला आहे. बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता द रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
किराणा घराणाच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्याकडून आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा अक्षरनंदन शाळेच्या संस्थापक सदस्या आणि मानद सचिव विद्या पटवर्धन यांना ‘आबासाहेब अत्रे पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ शिक्षक व साहित्यिक डॉ. कृ. प. देशपांडे यांना ‘इंदिरा अत्रे पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदा पाचवे वर्ष आहे. दहा हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दोन्ही पुरस्कार ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळंदीक्षेत्री २४ ला रंगणार ‘इंद्रायणी काठी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंद्रायणीकाठचे भावपूर्ण वातावरण, वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या आळंदीचा भक्तिमय माहोल अशा वातावरणात शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत तसेच अभंग आणि कीर्तनाची मेजवानी असा योग रसिकांना कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला अनुभवता येणार आहे.
येत्या २४ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता आळंदी येथे ‘इंद्रायणी काठी’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक महेश काळे प्रथमच वारकऱ्यांसाठी गाणार असून, अजरामर रचनांचे सादरीकरण या वेळी होणार आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लब या उपक्रमाचा कल्चरल पार्टनर आहे. आळंदी आणि इंद्रायणीचे महत्त्व या निमित्ताने सर्वांसमोर यावे, कार्तिकी एकादशीचे महत्त्व वारकऱ्यांप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांना कळावे आणि त्यांनीही या पावन परिसरात येऊन येथील भक्तिमय वातावरणाची अनुभूती घ्यावी, या विचारातून राहुल बगे, प्राची बगे-वर्तक, अॅड. शैलेंद्र थत्ते आणि राजश्री विश्वासराव यांनी एकत्र येऊन या उपक्रमाची आखणी केली आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच संस्कृतीचे जतन करून पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा जावा, हा हेतू त्यामागे आहे.
माध्यम एंटरटेन्मेंट आणि एमआयटी कॉलेज पुणे यांच्यातर्फे संयुक्तरित्या ही मैफल होत आहे. कार्तिकी एकादशीला आळंदीला वारकऱ्यांचा महापूर लोटतो. यंदा कार्तिकी एकादशी २५ नोव्हेंबरला आहे. एकादशीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या मैफलीच्या माध्यमातून माध्यमातून महाराष्ट्रातल्या भाविकांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांना पुन्हा एकदा या तीर्थस्थळी आणायचे आहे, असे माध्यम एंटरटेन्मेंटचे राहुल बगे आणि प्राची बगे-वर्तक यांनी सांगितले. एकेकाळी भाविकांनी गजबजलेली आळंदी आणि इंद्रायणीला पुन्हा एकदा पूर्वीचा लौकिक मिळावा तसेच वारकऱ्यांसह समस्त भाविकांचे श्रद्धास्थान असणारी आळंदीकडे पर्यटकांचीही पावले वळावीत ही आयोजनामागची भूमिका असल्याचे राजश्री विश्वासराव यांनी सांगितले.
आळंदीत अशी भव्य मैफल आयोजित करण्याचा अनुभव आनंददायी असल्याची भावना अॅड. शैलेंद्र थत्ते यांनी व्यक्त केली. वारकरी आणि रसिकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असल्याचे स्वाती कराड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images