Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भोरमध्ये आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, भोर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतीवर्षाच्या निमित्ताने भोर येथे २६ व २७ नोव्हेंबर रोजी दुसरे ‘फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार’ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी ही माहिती दिली. या वेळी डॉ. प्रदीप पाटील, ज्ञानोबा घोणे, डॉ. रोहिदास जाधव व सदस्य उपस्थित होते. भोर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व संशोधन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भोर, अनंतराव थोपटे विद्यालय व समविचारी संस्था, संघटना यांच्या विद्यमाने त्याचे आयोजन केले जाणार आहे. श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणांत हे संमेलन होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संविधान रॅली, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार राही भिडे यांच्या हस्ते होणार आहे. सायं. ७ वाजता कविसंमेलन होणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आंबेडकरी जलसा झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. भालचंद्र मुणगेकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, डॉ. विजय खरे, स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारातील सामाजिक क्रांती या परिसंवादामध्ये डॉ. दत्ता भगत, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. चंद्रकांत वाघमारे, डॉ. अनिल सपकाळ, डॉ. दत्ता पाटील, डॉ. विजय धिवार, डॉ.राजाभाऊ भैलुमे, विजय लडकत सहभागी होणार आहेत. सामाजिक अत्याचार आणि जातीअंताची लढाई या परिसंवादामध्ये पत्रकार अनंत दीक्षित, अशोक धिवरे, डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. विश्वंभर चौधरी, डॉ. नितीश नवसागरे, डॉ. शमसुद्दीन तांबोळी, उद्धव कांबळे, समीरण वाळवेकर सहभागी होणार आहेत. शिक्षणतज्ज्ञ पी. ए. इनामदार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव राज्य; तर तालुकास्तरीय पुरस्काराने अर्जून शेलार यांना गौरविण्यात येणार आहे. संविधान कन्या मनश्री आंबेतकर हिची प्रकट मुलाखत अयोजित केली आहे. समारोप पत्रकार उत्तम कांबळे, अतुल गोतसुर्वे, मिलिंद जोशी उपस्थितीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोंढव्यात विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढवा खुर्द परिसरात घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिस टाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुबीना अश्रफ शेख (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अलीम गुलाम कादर मुल्ला (वय ४९, रा. नवाजीश पार्क, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती अश्रफ हमीद शेख, हमीद शेख आणि फरजाना हमीद शेख (सर्व रा. मोमीनपुरा, घोरपडे पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीम यांची मुलगी मुबीना आणि अश्रफ यांचे लग्न झाले होते. अश्रफ आणि त्याच्या घरच्यांनी मुबीनाला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळूनच मुबीना हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दुचाकी चालविणारा ताब्यात

मोटारीला बनावट नंबरप्लेट लावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी गजानन रामचंद्र गानबोटे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून विजय चंद्रकांत आंधेकर (वय ३४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंधेकर याने पांढऱ्या रंगाची दुचाकीची खरी नंबरप्लेट काढून बनावट नंबर टाकून तिचा वापर करत होता. याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या दुचाकीवरील नंबरप्लेट बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी सक्तमजुरी

परराज्यातील मुलींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका दलालास तीन वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

या प्रकरणी दीपक हिरा वराली (वय २० रा. सोनवणेवस्ती, चिखलीगाव) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. येरवडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मधुकर थोरात यांनी फिर्याद दाखल केली होती. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील वामन कोळी यांनी पाहिले. दहा जून २०१६ रोजी ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी थोरात हे त्यांच्या स्टाफसह त्यांच्या कार्यालयात असताना त्यांना आरोपी वरालीबद्दल माहिती मिळाली. परराज्यातील मुलींना कंत्राट पद्धतीने बोलावून त्यांच्याकडे नगररोड येथे त्यांच्याकडून तो वेश्या व्यवसाय करून घेत आहे. नगररोड येथील एका लॉजमध्ये दोन महिलांसह आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली होती.

आरोपी वराली याला कोर्टाने शिक्षा सुनावली. घटनास्थळी असलेल्या एका महिलेकडून २० हजार रुपये जप्त करण्यात आले होते. ते तिला परत करण्याचा आदेश कोर्टाने दिला. तर, दुसऱ्या महिलेकडून १४,५०० रुपये जप्त करण्यात आले होते. तिला अपिलाची मुदत संपल्यावर ही रक्कम परत करण्याचा आदेश कोर्टाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परकीय भाषांची गरजच काय ? : रंगनाथ पठारे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मातृभाषेत हजारो वर्षांच्या ज्ञानाचे संचित आहे. ज्ञानाच्या या बहुविध संकल्पना मातृभाषेतच अधिक चांगल्या रितीने समजू शकतात. त्यासाठी परकीय भाषांची गरज काय,’ असा प्रश्न उपस्थित करून शालेय शिक्षण मातृभाषेतच असावे, अशी भूमिका ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी मांडली.
मनोविकास प्रकाशन तर्फे प्रकाशित व अच्युत गोडबोले व दीपा देशमुख लिखित ‘जग बदलणारे १२ भारतीय जीनियस’ या पुस्तकाचे प्रकाशन पठारे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.
‘प्रश्नांना अधिक मोकळे केले की उत्तरे मिळतात व माणूस अधिक नम्र होतो. नम्रता ही ज्ञानी माणसांची खरी ओळख आहे. अच्युत गोडबोले मातृभाषेच्या प्रेमामुळे मराठीत लिहतात. यातून मिळणारा आनंद व मानसिक समाधन महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांनाही अशाप्रकारचे समाधान मिळावे, यासाठी त्यांना मातृभाषेत शिक्षण देणे गरजेचे आहे. जग कितीही बदलले, विकास घडला तरी मातृभाषेचे महत्व कमी करून चालणार नाही’ याकडे पठारे यांनी लक्ष वेधले.
‘वाचकांच्या प्रतिसादामुळे लिहिण्यास अधिक बळ येते. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून लिहिणे महत्त्वाचे आहे. शिक्षक, पालक, व आजची शिक्षणपद्धती मुलांमधील कुतूहल मारून टाकत आहे. त्यामुळे तरुण पिढी घर, नोकरी, भौतिक सुख यामागे धावत आहे. मला जे समजले, ते इतरांना सांगण्याच्या उत्सुकतेमुळे मी शिकत गेलो आणि लिहीत गेलो.’ असे मत अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
दीपा देशमुख म्हणाल्या, ‘माणसे, पुस्तक व कल्पना या तीन गोष्टींमुळे जग बदलते. प्रत्येक शास्त्रज्ञामध्ये एक कलाकार असतो. महात्मा गांधींच्या एका शब्दावर भारतीय नागरिकत्व स्वीकारणारा लॉरी बेकर मला खूप काही शिकवून जातो. या शास्त्रज्ञामुळे माझे आयुष्य अधिक समुद्ध झाले आहे. अशाच काहीशा ध्येयवेड्या माणसांची दखल या पुस्तकातून घेण्यात आली आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या नोंदींवरून बुलेट चोरांना मुसक्या

$
0
0

Rohit.Athavale

@timesgroup.com

Tweet - @AthavaleRohitMT

पिंपरी : लाखो रुपये किमतीच्या बुलेटचे तकलादू हँडलॉक आणि चोरल्यानंतर सहज विक्री होत असल्याने त्या चौकडीने एक-दोन नव्हे, तर तब्बल १९ बुलेट चोरल्या होत्या. काही दिवसांच्या अंतराने वाकड आणि परिसरातून बुलेट चोरी वाढल्याने पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरविण्यास सुरुवात केली. त्यातच पोलिसांकडे गुन्हेगारांच्या असलेल्या जुन्या नोंदी आणि खबऱ्यांमुळे वाकड पोलिसांनी बुलेटचोरांच्या मुसक्या आवळल्या आणि चोरीच्या बुलेट व पल्सर अशा एकूण २५ लाखांच्या दुचाकी जप्त केल्या.

युवकांमध्ये बुलेटची मोठी क्रेज आहे. सहज विक्री होत असल्याने आणि चोरी करण्यास सोपी असल्याने पाथर्डी येथील एक टोळी पिंपरी-चिंचवड, पुणे आणि परिसरात बुलेट चोरी करीत होती. एकट्या वाकड परिसरातून या टोळीने पाच बुलेट चोरल्या होत्या. तसेच, तीन पल्सर दुचाकींचीही चोरी झाली होती.

साडे २२ लाखांची लूटमार आणि किमान किंमत सव्वा लाख रुपये असलेल्या बुलेटची चोरी वाढल्याने वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी तपास पथकाला चांगलेच फैलावर घेतले होते. दोन दिवसांत या टोळीची माहिती मिळवा, असे फर्मान त्यांनी सोडले आणि खबऱ्यांचे जाळे विणण्यास सुरुवात केली. त्यातूनच बुलेट चोरी आणि त्यांचा वापर करणाऱ्यांची माहिती मिळण्यास सुरुवात झाली. साडे बावीस लाखांची लूटमार करणाऱ्यांनी वापरलेली दुचाकी आणि परिसरातील दुचाकींची चोरी या दृष्टिकोनातून वाकड पोलिसांचा तपास सुरू होता. या दरम्यान, वाकड पोलिस ठाण्यातील कर्मचारी शाम बाबा यांना एका तरुणाकडे याबाबत माहिती असल्याचे समजले. खबऱ्याकडून पाथर्डी येथील एकजण वाकड येथून चोरलेली बुलेट वापरत असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेतल्यावर हा तरुण केवळ चोरीची दुचाकी वापरणारा नाही, तर बुलेट चोरी करणाऱ्या टोळीतील एक असल्याचे उघड झाले. त्यानंतर सहाय्यक निरीक्षक बालाजी पांढरे, शाम बाबा, अशोक दुधावणे, भैरोबा यादव, बापू धुमाळ यांच्यासह तपास पथक पाथर्डी येथे रवाना झाले.

तेथे जाण्यापूर्वी या पथकाने पोलिसांच्या जुन्या नोंदी तपासल्या होत्या. त्यातील एक रेकॉर्डवरील चोर हा पाथर्डी येथे राहणारा असून, बुलेट चोरी होताना तो वाकड परिसरातच असल्याचे समजले होते. तांत्रिक मदतीने हा चोर किती वेळा वाकड परिसरात येऊन गेला आणि सध्या पाथर्डी येते कुठे आहे, हे तपासले गेले. तो ज्या लोकांना भेटतो, संपर्क करतो त्यातील काही जण पाथर्डी, तर काही जण वाकड येथे असल्याचे उघड झाले. दोन पथके तयार करण्यात आली. त्यातील एक पथक पाथर्डी येथे जाऊन वाकड येथील पथकाच्या संपर्कात होते.

या वेळी खबऱ्याला पोलिसांनी पाथर्डी येथे सोबत नेले होते. बिर्याणी खाल्ल्याशिवाय माहिती सांगणार नाही, असे त्या खबऱ्याने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे माहिती सांगण्यापूर्वी त्याला जेवण; तसेच पोलिसांबरोबर जाताना दोन वेळा बिर्याणीदेखील त्याला पोलिसांनी खाऊ घातली होती. त्यानंतर त्याच्या माहिती देण्यात झालेली वाढ पोलिसांच्या तपासात रंजकता निर्माण करीत होती. त्यानंतर पाथर्डी येथे ठरलेल्या दिवशी सापळा रचण्यात आला. तेव्हा केवळ वाकड, पुणे नाही, तर मुंबई, अमहदनगर, बीड या ठिकाणांहूनदेखील या टोळीने चोरी केल्याचे तपासात समोर आले.

तिघा चोरांना पकडल्यावर बुलेट कुठून चोरल्या, त्यातील काही बुलेट या राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींनी खरेदी केल्याचेही तपासात उघड झाले आहे. मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत आणि नवीन कोरी बुलेट मिळत असल्याने, त्या खरेदी करणाऱ्यांनी अन्य कागदपत्रांची पूर्ण तपासणीदेखील केली नव्हती. त्यामुळे अनेक दिवस हा प्रकार बिनबोभाट सुरू होता. या चोऱ्यांचा फटका पुणे ग्रामीण पोलिस दलात नियुक्तीस असणाऱ्या एका सहायक निरीक्षकालादेखील बसला आहे. पण, तो राहत असलेल्या परिसरात शासनाने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासात मदतनीस ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्य प्रदेशातून पिस्तुल तस्करी

$
0
0

Shrikrishna.kolhe

@timesgroup.com

@ShrikrishnakMT

पुणे : पुण्यात बेकायदा शस्त्रांचा सुळसुळाट सुरू असून या ठिकाणी येणारी बहुतांश बेकायदा पिस्तुले ही मध्य प्रदेशातून आणली जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बेकायदा पिस्तुल बाळगताना पकडल्यानंतर ती मध्य प्रदेशातील बडवानी व आजूबाजूच्या परिसरातून आणल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. पुण्याबरोबर राज्यातील अनेक शहरांत पकडलेली बेकायदा पिस्तुलेही मध्य प्रदेशातून आणली असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या दहा महिन्यांत पुण्यात १४२ पिस्तुले व ३६१ काडतुसे पकडण्यात आली आहेत. या प्रकरणी १०२ गुन्हे दाखल करण्यात आले असून १३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडे तपास केल्यानंतर पुण्यात येणारी सर्वाधिक बेकायदा पिस्तुले ही मध्य प्रदेशातून येत असल्याचे समोर आले. त्यानंतर उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार येथून बेकायदा शस्त्रे येतात. पण, मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील उमरटी येथून आलेली सर्वाधिक पिस्तुले पुणे पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच, भिंड, देहती, धार या ठिकाणी तयार करण्यात आलेली पिस्तुले राज्यात येत असल्याचे आढळून आले आहे. खडक व भारती विद्यापीठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करून काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात जाऊन पिस्तुले तयार करणाऱ्या व्यक्तीला पकडले होते. त्याच्याकडून अकरा पिस्तुले जप्त करण्यात आली होती. तसेच, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये बेकायदा पिस्तुले बाळगणाऱ्यास अटक केल्यानंतर त्यांच्याकडील पिस्तुलेदेखील मध्य प्रदेशातून आणली असल्याचे तपासात समोर आले आहे.

मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील बहुतांश गावांत पिस्तुल बनविण्याचा व्यवसाय आहे. उमरटी या गावात बहुतांश जण हाच व्यवसाय करतात. या गावांतील अनेकांना बेकायदा शस्त्र विक्री केल्याच्या आरोपाखाली अटकदेखील झाली आहे. पण, तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा हाच व्यवसाय करतात. तीन ते चार पिस्तुले लपविणे सोपे असल्यामुळे ती सहज आणली जातात. अलिकडे पिस्तुलाच्या तस्करीसाठी महिलांचादेखील वापर करण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले, की दहा हजार रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत पिस्तुलांची विक्री केली जाते. पिस्तुलाची विक्री करण्याचे काम काही एजंटमार्फत केले जाते. हे एजंट महाराष्ट्रात व पुणे परिसरात येऊन विक्री करतात.

मध्य प्रदेशातील शस्त्र बनविणारी ठिकाणे

मध्य प्रदेशातील नवलपुरा, सतीपुरा, गारी, सिरवेल, काजलपुरा, अंबा, सिगनूर, बडवानी जिल्ह्यातील उमरटी, ओझर, शाहपुरा, रामगढी, खुरमाबाद, उंडीखोदर, अंजड, ओसवाडा, दावलबेडी येथे पिस्तुले बनविण्याचा व्यवसाय आहे. या समाजाचा शस्त्र बनविणे हा पारंपारिक व्यवसाय होता. त्यांनी बनविलेल्या पिस्तुलाचे फिनिशिंग खूप चांगले असते. हे पिस्तुल बनविण्यासाठी येणारा खर्च खूप कमी असतो. त्यामुळे त्यांना कमी किमतीमध्ये पिस्तुलांची विक्री करणे परवडते. या पिस्तुलांचे चांगले फिनिशिंग पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन येथील कारखान्यावर धाड टाकूत आरोपीला अटक केली आहे. मध्य प्रदेशातील या व्यावसायिकांवर कारवाई होण्याचे प्रमाण कमी आहे.

पिस्तुलाची वाढतेय क्रेझ

बेकायदा पिस्तुल बाळल्याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये सर्वाधिक तरुणच असल्याचे आढळून आले आहे. भाईगिरी करण्यासाठी या पिस्तुलांचा वापर होतो, अशी चर्चा आहे. गावठी कट्टे, पिस्तुले वीस हजारांपासून मिळत असल्याने त्यांची खरेदी करणे सोपे जाते, अशी माहिती सूत्रांनी सांगितली.

राजकीय मान्यवरांकडेही पिस्तुल

औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुण्यामधील परवानाधारक पिस्तुल बागळणाऱ्यांमध्ये सर्व पक्षातील नगरसेवक, राजकीय पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे. परवाना असल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत अनेकजण कमरेला पिस्तुल अडकावून सभागृहातही येतात. लोकप्रतिनिधीच नव्हे, तर विविध पदांवर काम करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांकडेही पिस्तुले आहेत.

पोलिसांचा वॉच

बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी स्थानिक व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे. आरोपींकडून जप्त झालेली पिस्तुले परराज्यांतून आणली जातात. त्यामुळे अशा बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. तसेच, सराईत गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण बँकांचा संप पुढे ढकलला

$
0
0

पुणे : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत देशातील ग्रामीण बँकांनी आपला प्रस्तावित संप मागे घेतला आहे. चाळीस वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत अर्थ मंत्रालयाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑल इंडिया ग्रामीण बँक वर्कर्स ऑर्गनायझेशन आणि ऑल इंडिया ग्रामीण बँक ऑफिसर्स ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळाने सामाजिक अर्थतज्ज्ञ मदन दिवाण यांच्या पुढाकारातून
दिल्लीत अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव गिरीश चंद्र मुरमू यांची भेट घेतली. ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष दीपक भालेराव, सरचिटणीस आर. के. गौतम, वर्कर्स ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस सरोज प्रधान आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. दोन्ही संघटनांनी २१ नोव्हेंबर रोजी देशव्यापी धरणे आंदोलन, तर १३ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती. ‘देशभरात २८ राज्यांमध्ये ५६ ग्रामीण बँकांच्या २६ हजारहून अधिक शाखा असून त्यात ८८ हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत,’ असे भालेराव आणि गौतम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवसांत पालिकेकडे ७१ कोटी जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय महापालिकेच्या फायद्याचा ठरला आहे. गेल्या चार दिवसांत ७१ कोटींपेक्षा अधिक रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली असून सोमवारी १५ कोटी ३२ लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला प्रॉपर्टी टॅक्समधून मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणत्याही व्यवहार करताना जुन्या नोटा चालत नाहीत. मात्र पेट्रोल पंप, टोल नाके, हॉस्पिटल याबरोबरच पालिकेचा टॅक्स भरण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा स्वीकारण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. पालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स, तसेच पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना या नोटा देता येतील, असा निर्णय पालिका प्रशासनाने शुक्रवारी घेतला होता.

या निर्णयाचा फायदा घेऊन हजारो नागरिकांनी जुन्या नोटा खपविण्यासाठी महापालिकेचे मिळकत कर भरणा केंद्र, तसेच नागरी सुविधा केंद्रात गेले चार दिवस लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. या योजनेचा फायदा घेत शुक्रवारी पहिल्याच दिवशी ३६ कोटी ९५ लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले. दुसऱ्या दिवशी शनिवारी (१२ नोव्हेंबर) ७ कोटी ४४ आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी सुमारे ८ कोटी ३९ रुपयांची वसुली झाली. सोमवारी दिवसभरात १५ कोटी ३२ लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाल्याचे करसंकलन प्रमुख, उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांच्या एकूण उत्पन्नाचा आकडा ७१ कोटी ४४ लाख इतका झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी‌ घेतलेल्या निर्णयामुळे पालिकेला ‘अच्छे दिन’ आल्याचे पाहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केवायसी’ नसल्याने जिल्हा बँकांना बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बहुतांश जिल्हा सहकारी बँकांमध्ये कोअर बँकिंगची सुविधा नाही. त्याचबरोबर सर्वच जिल्हा बँकेतील बहुतांश खात्यांची ‘नो युवर कस्टमर’ अर्थात केवायसी प्रक्रियाच झालेली नाही. परिणामी खातेनिहाय बँकेत भरल्या गेलेल्या रकमेची माहिती तातडीने सरकारी यंत्रणांपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांना खातेदारांकडून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास किंवा त्या बदलून देण्यास बंदी घातली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यादिवशीच रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशात जिल्हा सहकारी बँकांना ही परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, अशी परवानगी नाकारणे बँकांवर तसेच खातेदारांवर अन्याय करणारे असून रिझर्व्ह बँकेने त्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी जिल्हा सहकारी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे केली होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने ही मागणी फेटाळून लावली आहे.

‘पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात बँकांमध्ये जमा होणाऱ्या रकमेवर प्राप्तिकर विभागाचे लक्ष आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार बँकांना विशिष्ट सॉफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. त्या माध्यमातून रोज सायंकाळी कामकाज संपल्यानंतर प्रत्येक खात्यात कोणत्या पुराव्यांआधारे किती रक्कम जमा झाली, याची माहिती प्राप्तीकर विभागाला व रिझर्व्ह बँकेला पुरविण्यात येते. ही माहिती अपलोड न झाल्यास दुसऱ्या दिवशी कामकाज सुरू होऊ शकत नाही,’ असे सूत्रांनी सांगितले. या बँकांमध्ये बेनामी खाती असण्याची शक्यता आहे. परिणामी, या खात्यांमध्ये काळा पैसा भरण्यात येऊ नये, यासाठीही ही बंदी घालण्यात आली असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

२४ हजारांची मर्यादा

जिल्हा सहकारी बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून दर आठवड्याला जास्तीत जास्त २४ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. हा नियम २४ नोव्हेंबरपर्यंत लागू असेल, असे रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपुरवठ्यासाठी कर्जरोखे उभारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला. कर्जाच्या तुलनेत कर्जरोख्यांचे व्याजदर कमी असल्याने ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करता यावा, यासाठी महापालिकने समान पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील ३० ते ३५ वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा करण्यासाठी ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. योजनेसाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाणी साठवून ठेवण्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारल्या जाणार आहेत. शहरातील विविध भागात या टाक्या उभारण्याचे काम सुरू आहे. टाक्या उभारण्यासाठी २४५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात शहरातील जुन्या पाइपलाइन बदलण्यात येणार आहेत. योजनेची अंमलबजावणी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. तीन ते चार महिन्यांपासून ती प्रक्रिया सुरू होती. मात्र, अधिक व्याजदराअभावी प्रक्रिया थंडावली होती. प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाचा व्याजदर परवडत नसल्याने कर्जाऐवजी कर्जरोखे उभारण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे. त्यासाठी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणताही निधी मिळणार नाही. हा खर्च महापालिकेच्या पातळीवर करण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने कर्ज घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, उच्च व्याजदराअभावी कर्जरोखे उभाण्यात येणार असल्याचे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विजय कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका शाळांना सार्वजनिक सुट्टीचे वावडे

$
0
0

गुरूनानक जयंतीदिनी विद्यार्थ्यांनी गिरवले धडे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील कार्यालये, शाळा, बँका आदींना गुरूनानक जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. मात्र, पुणे महापालिकेच्या शाळा यंदा अपवाद ठरल्या आहेत. सोमवारी जयंतीची सुट्टी असली तरी, पालिकेच्या शाळा सोमवारी सकाळी आणि दुपारच्या सत्रात सुरूच होत्या. विशेष म्हणजे, सोमवारी महापालिका आणि शिक्षण मंडळाने मात्र दांडी मारली. त्यामुळे त्यांनी एकीकडे सुट्टी उपभोगायची आणि दुसरीकडे मात्र, शाळा सुरू का ठेवायच्या असा सवाल कर्मचारी आणि शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
गुरूनानक जयंतीनिमित्त शहरातील सरकारी कार्यालये, बँका, अनुदानित आणि खासगी शाळा, कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदींना सुट्टी होती. मात्र, पुणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा दोन्ही सत्रात सुरू होत्या.यंदा नेमका बालदिन आणि गुरूनानक जयंती एकाच दिवशी आल्याने महापालिकेच्या शाळांना सुट्टी मिळेल, अशी अपेक्षा कर्मचारी व शिक्षकांना होती. मात्र, त्यांचा हिरमोड झाला. महापालिकेच्या शाळा पालिका शिक्षण मंडळाद्वारे चालविण्यात येतात. मात्र, सोमवारी महापालिका आणि शिक्षण मंडळाला सुट्टी होती. त्यामुळे शाळांना सुट्टी देता येणे शक्य असतानाही शिक्षण मंडळाने शाळा चालूच ठेवण्याचा अट्टहास नेमका कशासाठी केला, असा सवाल महापालिकेच्या कर्मचारी आणि शिक्षकांनी विचारला आहे. महापालिकेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि शाळेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिका आणि शिक्षण मंडळाने अट्टाहास केला तर बरे होईल, असे काही कर्मचाऱ्यांनी सुनावले. विशेष म्हणजे, राज्य सरकारने गुरुनानक जयंतीच्या सुट्टीचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. त्याप्रमाणे विविध सरकारी विभागांबरोबरच महापालिकेला सूचना देण्यात आल्या होत्या. महापालिकेने सूचनेचे पालन केले मात्र, शिक्षण मंडळाने काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे शाळा सुरू होत्या.

शिक्षण मंडळाच्या नियमावलीत गुरूनानक जयंतीची सुट्टी शाळांना दिलीच नाही. त्यामुळे सोमवारी शाळा सुरू ठेवण्यात आले होते.
- वासंती काकडे, अध्यक्ष, शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेमुक्त खोदाईला प्राधान्य

$
0
0

मोठी खोदाई करणाऱ्या कंपन्यांना ठेवले दूरच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात खड्डेमुक्त खोदाईला प्राधान्य देणाऱ्या कंपन्यांनाच परवानगी देण्याचा पवित्रा महापालिकेने घेतला असून, मोठी खोदाई करणाऱ्या कंपन्यांना सध्या दूरच ठेवण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी आणि सरकारी कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या रस्ते खोदाईच्या बऱ्याच परवानग्या रखडल्या आहेत.
शहरात एक ऑक्टोबरपासून खड्डेमुक्त खोदाईच्या (ट्रेंचलेस पॉलिसी) धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. गेल्या महिन्यात पाऊस सुरू असल्याने नव्याने कोणत्याही खोदाईला मान्यता देण्यात आली नव्हती. नोव्हेंबच्या सुरुवातीपासूनच पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी खोदाईच्या मान्यतेसाठी विविध कंपन्यांचा पालिकेच्या पथ विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. खड्डेमुक्त पद्धतीने खोदाई करण्यास तयार असणाऱ्या कंपन्यांनाच परवानगी देण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे, संपूर्ण रस्त्यावर खोदाई करण्याऐवजी ठराविक ठिकाणी काही ‘पिट्स’ घेऊन काम करणाऱ्या कंपन्यांना पालिकेने परवानगी दिली आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मान्यता दिलेली काही कामे अद्याप अपुरी असल्याने त्यांनाही उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी नव्या पद्धतीचा वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार, काही खासगी कंपन्यांनी कामास सुरुवात केली आहे.
शहरातील रस्ते सुस्थितीत राहण्यासाठी पालिकेने आखलेल्या या धोरणाला काही ठरावीक कंपन्यांकडून विरोध केला जात आहे. पूर्वीप्रमाणेच खोदाई करण्याचा हट्ट काही मोजक्या कंपन्यांनी धरला असून, त्यांची खोदाईची परवानगीच पालिकेने रोखून धरली आहे. त्यामुळे, त्यांचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. विधान परिषदेची आचारसंहिता उठल्यानंतर खड्डेमुक्त खोदाईसाठीच्या शुल्करचनेला स्थायी समितीकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या शुल्कापेक्षा नवीन शुल्क कमी असल्याने त्यानंतर खोदाईसाठी परवानग्या वाढण्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्मीर प्रश्न सुटेल; पाक सुधारणार नाही

$
0
0

माजी लष्करी अधिकारी पाटणकर यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पाकिस्तान १९७१च्या युद्धात झालेल्या परभावाच्या जखमा अजून विसरलेला नाही. त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानकडून प्रॉक्झी वॉर सुरू आहे. पाकिस्तानची मुजोरी चीनच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे काश्मीर प्रश्न सुटला तरी किंवा पाकिस्तानात लष्कर तसेच राजकीय पक्षाचे सरकार आले तरी त्यांच्या कुरघोड्या थांबणार नाहीत,’ असे मत लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) यांनी सोमवारी व्यक्त केले.
शब्दसखी वाचन भिशीतर्फे आयोजित कार्यक्रमात पाटणकर ‘काश्मीर प्रश्न समज आणि गैरसमज’ या विषयावर बोलत होते. मंचाच्या अंजली जोशी, नीता आगाशे आणि सदस्य या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटणकर म्हणाले,‘पाकिस्तान धर्माच्या नावाखाली तयार झालेला देश आहे. काश्मीरमधील बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम असल्याने पाकिस्तान धर्माच्या आधारावर त्यांना एकत्रित आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच पाकिस्तानने अद्याप काश्मीरचे भारतातील विलीनीकरण मान्य केलेले नाही. त्यामुळे त्यांचे सतत आपल्यावर हल्ले सुरू असतात. पाकिस्तान काश्मीरच्या कारभारात ढवळाढवळ करून भारताला त्रास देण्याचे एकमेव धोरण राबवित आहे. अशी एकंदरीत परिस्थिती असताना बहुसंख्य काश्मिरी जनतेला भारतीय असल्याचा अभिमान आहे. त्यांच्या देशप्रेमावर शंका घेण्याचे कारण नाही.’
स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानची मुजोरी अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या भरवशावर सुरू होती. त्यानंतर उत्तर कोरियाने त्यांना क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान दिले. आता चीन पाकिस्तानाला शस्त्रांची आणि आर्थिक मदत करत आहे. त्यामुळे चीनच्या कुबड्या घेऊन पाकिस्तानच्या कुरघोड्या आणि हल्ले भारतावर सुरूच राहणार असल्याचेही पाटणकर म्हणाले. जोशी यांनी प्रास्ताविक केले.

‘रोजगाराच्या संधी द्या’
काश्मीरमधील युवकांना शिक्षण आणि रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते दहशतवादी संघटनांकडे नाइलाजाने ओढले जातात. बहुतांश युवकांना दहशतवादी जबरदस्तीने देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी करून घेतात. त्या तरुणांचे देशावर प्रेमच आहे. त्यामुळे दहशतवादी म्हटलेले त्यांना आवडत नाही. काश्मिरी युवक अतिशय हुशार असून, ते व्यवसायात पारंगत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे पाटणकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा अध्यक्षांकडे छत्तीस समित्या

$
0
0

जिल्हावार जात पडताळणी समित्या २१ नोव्हेंबरपासून होणार कार्यान्वित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हावार जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा आदेश काढला आहे. येत्या २१ नोव्हेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक समिती अस्तित्त्वात येणार आहे. मात्र, या समित्यांची रचना करताना प्रत्येक समितीसाठी स्वतंत्र अधिकारी न नेमता ११ अध्यक्षांकडे ३६ समित्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या समित्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राज्य सरकारने नुकताच जिल्हावार जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांसंबंधीचा निर्णय जारी केला. त्यामध्ये ३६ जिल्ह्यांतील समित्यांचे अध्यक्ष, सदस्य आणि सदस्य सचिवांची नावे, त्यांच्या नियुक्तीची ठिकाणे नमूद केली आहेत. मात्र, ही पदनिश्चिती करताना सरकारला सर्व ३६ समित्यांना स्वतंत्र कार्यभार असलेले अध्यक्ष नेमणे शक्य झाले नाही. केवळ नाशिक जिल्हा जात पडताळणी समितीला स्वतंत्र अध्यक्ष देण्यात आला आहे.
सामाजिक न्याय भवनाचे बांधकाम पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा जातपडताळणी समिती’चे कार्यालय सुरू केले जाणार आहे. तर, अन्य ठिकाणी ते काम पूर्ण होईपर्यंत सहायक समाजकल्याण आयुक्तांच्या कार्यालयात, तेथे जागा उपलब्ध नसल्यास भाड्याने जागा निश्चित करून कार्यालय सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तसेच, नवीन स्थापन झालेल्या समित्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेवर (बार्टी) सोपविण्यात आली आहे.
.........
दक्षता समिती जुनीच
जिल्हावर जात पडताळणी समित्यांना स्वतंत्र दक्षता पथक नेमण्याची तरतूद आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक पदे गृह विभागाकडून उपलब्ध झालेली नाहीत. ती पदे उपलब्ध होईपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या पंधरा समित्यांकडील दक्षता पथकातील अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा स्तरावरील समित्यांवर वर्ग होऊन तेथे कार्यरत राहणार आहेत.
..........
अधिकाऱ्यांची अनुपलब्धता
जात पडताळणी समित्यांमध्ये अध्यक्ष, सदस्य आणि सदस्य सचिव या पदांचा समावेश आहे. अध्यक्षांप्रमाणेच सदस्य पदासाठीही कमी अधिकारी उपलब्ध आहेत. दहा अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दोन समित्यांचा आणि एका अधिकाऱ्याकडे तीन समित्यांचा कार्यभार सोपविला आहे. तर, सदस्य सचिवपदासाठी दोन अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दोन समित्यांचा कार्यभार दिला आहे.
..........
निवडणुकीचा कसोटीचा काळ
येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्याबरोबरच जिल्हा परिषद, नगर परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुलही वाजले आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेण्याचे प्रमाण एकाएकी वाढणार आहे. त्यामुळे जात पडताळणी समित्यांचे काम प्रचंड वाढणार आहे. जात पडताळणी समित्यांच्या अधिकाऱ्यांची वानवा पाहता, या समित्यांची कसोटी लागणार हे मात्र निश्चित.
............
नवनियुक्त अध्यक्ष आणि त्यांना सोपविलेला कार्यभार
अध्यक्ष नियमित व अतिरिक्त कार्यभार सोपविलेल्या जिल्हा समित्या
बी. के. घेवारे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर
दिलीप हळदे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
टी. एम. बागूल धुळे, नंदुरबार, जळगाव,
विश्वजीत माने पुणे, सोलापूर, सातारा
पी. एच. कदम सांगली, कोल्हापूर
के. व्ही. जाधव लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी
आर. एस. ठाकरे नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा
आय. एम. तिटकारे जालना,हिंगोली, अकोला, बुलढाणा, वाशिम
एम. एम. सूर्यवंशी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
प्रकाश पाटोळे नाशिक
पी. टी. वायचळ नगर, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्टीमुळे ‘एटीएम’पुढे रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुरुनानक जयंतीनिमित्त बँकांना असलेल्या सुट्टीमुळे सुरू असलेल्या मोजक्याच एटीएमचा शोध घेत नागरिकांना फिरावे लागले. शहरात अगदी मोजकीच एटीएम काही काळ सुरू होती. या एटीएमपुढे प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे एटीएममधील रोकडही लगेचच संपत होती.

चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय गेल्या मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर बुधवारी सर्व बँका व बुधवार, गुरुवारी सर्व एटीएम बंद राहिली. त्यानंतर गुरुवारपासून रविवारपर्यंत सलग बँका सुरू होत्या. असे असले, तरी शहरातील अगदी मोजकीच एटीएम सुरू करण्यात बँकांना यश आले आहे. परिणामी या काळात बँकांबाहेर मोठ्या रांगा लावत नागरिकांनी पैसे बदलून घेतले किंवा जुन्या नोटांचा भरणा केला. मात्र, त्यानंतर सोमवारी बँकांना गुरू नानक जयंतीची सुटी होती. त्यामुळे नागरिकांना सुरू असलेल्या एटीएमचा शोध घेत फिरावे लागले.

बँक ऑफ महाराष्ट्रचे बाजीराव रोड शाखेतील एटीएम सुरू होते. या ठिकाणी एकावेळी सुमारे ७० नागरिक रांगेत उभे होते, तर स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्वे रोड आणि पौड रोडवरील काही एटीएम सुरू होती. त्या बाहेरही प्रचंड मोठी रांग होती. एका वेळी एटीएमचा वापर करणाऱ्या खातेदारांनी किमान दोन कार्डांचा वापर करत असल्याने येथील रक्कम लवकर संपत होती. रोकड संपेल, या भीतीने रांगेत उभे राहणाऱ्यांमध्ये काही वेळा खटकेही उडत होते.

‘आज बँकांना सुटी असल्याचे माहीत नव्हते. बँकेत पोहोचल्यावर ते लक्षात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी फिरल्यानंतर शेवटी स्टेट बँकेचे एटीएम सुरू दिसले. शेवटी दीड तास रांगेत थांबल्यानंतर दोन हजार रुपयांच्या शंभराच्या नोटा हाती पडल्या,’ असे शुभम जाधवने सांगितले.

‘परिवारातील सदस्य दवाखान्यात असल्याने आम्हाला पैशांची गरज होती. मात्र, सर्वच एटीएम बंद होती. शेवटी बाजीराव रोडवरील एटीएम सुरू होते. तिथे पाऊण तास रांगेत थांबल्यावर पैसे काढता आले,’ असे सविता शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदूक हिसकावून सुरक्षारक्षकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कंपनीच्या गोडाउनमध्ये चोरट्यांनी घुसून सुरक्षारक्षकाची बंदूक हिसकावून त्याच्यावर गोळीबार करून खून केला. शेजारचा सुरक्षारक्षक धावत आल्यामुळे चोरटे सुरक्षारक्षकाची बंदूक घेऊन पसार झाले. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाघोली येथील टीसीआय कंपनीमध्ये रविवारी मध्यरात्री घडली.
शिवाजी सदाशिव काजळे (वय ३०, रा. साईसत्यम पार्क, वाघोली) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजळे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. ते वाघोली येथील टीसीआय कंपनीच्या गोडाउनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्‍ती कंपनीत आल्या. आपण ट्रकचालक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी एकाने आपल्याला मुलगा झाल्याची बतावणी करीत सुरक्षारक्षकांना पेढे दिले. त्यानंतर ते तेथून निघून गेले. पेढे खाल्ल्यामुळे सुरक्षारक्षकांना गुंगी आली. त्यानंतर रविवारी मध्यरात्री चार चोरटे पुन्हा गोडाउनमध्ये आले. त्यांनी तेथील सीसीटीव्हीच्या वायर तोडल्या. काजळे यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न असता, त्यांनी काजळे यांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडली. तसेच, चाकूने वारही केले. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या काजळे यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळील इतर सुरक्षारक्षक धावून आले. त्यामुळे चोरटे पळून गेले. जाताना चोरट्यांनी काजळे यांची बंदूकही पळवली. छातीला गोळी लागल्यामुळे काजळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी लोणीकंद पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घड्याळाचे काटे की नवी समीकरणे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन विद्यमान नगरसेवक असल्याने ‘धनकवडी-आंबेगाव पठार’ (प्रभाग क्र. ३९) या परिसरात पुन्हा घड्याळाचे काटे फिरणार की नव्या समीकरणांची नांदी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रभागात एकही झोपडपट्टी नसल्याने बैठी घरे, इमारती, सोसायटी आणि बंगल्यांत राहणाऱ्या नागरिकांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
भाजपच्या वर्षा तापकीर आणि राष्ट्रवादीचे शिवलाल भोसले (प्रभाग क्र. ६९), राष्ट्रवादीचे विशाल तांबे आणि मोहिनी देवकर (प्रभाग क्र. ७४) या जुन्या प्रभागांचा बहुसंख्य भाग आणि काँग्रेसचे अभिजित कदम आणि शिवसेनेच्या कल्पना थोरवे (प्रभाग क्र. ७५) यांच्या प्रभागाचा काही भाग नव्या ‘धनकवडी-आंबेगाव पठार’मध्ये (प्रभाग क्र ३९) एकत्र झाला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या प्रभागावर वर्चस्व राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच मुख्य लढत होण्याचा अंदाज आहे.
पाचगाव-पर्वतीच्या पूर्वेकडील हद्दीपासून या प्रभागाची सुरुवात होते. मॉडर्न सोसायटी, विणकर सोसायटी, प्रियदर्शनी शाळा, धनकवडी गावठाण, राऊतबाग, नित्यानंद सोसायटी, दौलतनगर, धनकवडी टेलिफोन एक्सेंज, गुलाबनगर, रक्षालेखा सोसायटी, कलानगर, चैतन्यनगर, श्रीराम सोसायटी, कमलविहार सोसायटी, संभाजीनगर, आंबेगाव पठार आदी परिसर या प्रभागामध्ये समाविष्ट झाला आहे. राष्ट्रवादीच्या तीन विद्यमान नगरसेवकांपैकी शिवलाल भोसलेंच्या जुन्या प्रभागाचा काही भाग सहकारनगर-पद्मावती (प्रभाग क्र. ३५) या भागाला जोडला गेला आहे. त्यामुळे, त्या भागातूनच निवडणूक लढविण्यास ते इच्छुक आहेत. तर, विशाल तांबे आणि मोहिनी देवकर हे दोन्ही सदस्य या प्रभागातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासह बाळासाहेब धनकवडे, सुनील खेडेकर, माजी नगरसेवक संतोष फरांदे, किरण परदेशी, गौरी जाधव, प्रीती फरांदे, जयश्री पाटील, निकिती पवार आणि वासंती गोरे अशी इच्छुकांची मोठी यादीच राष्ट्रवादीकडे तयार आहे.
भाजपकडून विद्यमान नगरसेविका वर्षा तापकीर पुन्हा निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्यासह गणेश भिंताडे, भूपेंद्र गोसावी, विश्वास आहेर, निहाल बोडके अशी काही नावे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काँग्रेसकडून श्रीरंग आहेर, सुधीर राजमाने, प्रशांत जाधव, कल्पना उनवणे, नरसिंग आंदोले अशा नावांची चर्चा सुरू आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या दोनशे मतांनी पराभव स्वीकाराव्या लागलेल्या मधु खेडेकर यांचे नावही पुढे येऊ शकते. इतर काही पर्यायांची चाचपणी काँग्रेसकडून सुरू आहे.
शिवसेनेकडून अनिल बटाणे, सचिन धुमाळ, प्रल्हाद कदम, योगेश पवार, प्रा. किसन बोराटे, विजय क्षीरसादर, सायली जगताप, अनिता धुमाळ, स्नेहा कुलकर्णी, मालनताई गवळी, प्रिया बोराटे, शुभदा मुडवीकर, मंगल सोकाडे, वैशाली गोगावले अशी इच्छुकांची मोठीच्या मोठी फौज आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चंद्रकांत गोगावले, ज्योती कोंडे, ऋषी सुतार, सागर भागवत व त्यांची पत्नी अश्विनी भागवत यांच्या नावांची चर्चा आहे.
.................
प्रभाग क्र ३९ : धनकवडी-आंबेगाव पठार
लोकसंख्याः ७२,६६९
आरक्षणः-
अः ओबीसी
बः ओबीसी (महिला)
कः महिला
डः खुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इथेनॉल खरेदीसाठी मोदी घेणार बैठक

$
0
0

हिवाळी अधिवेशनानंतर आयोजनाची शरद पवारांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर कारखान्यांकडून इथेनॉल खरेदीसाठी धोरण ठरवण्याबाबत बैठक घेण्याची तयारी दर्शवली आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनानंतर ही बैठक घेण्यात येईल,’ असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी सांगितले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) आयोजित ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ शुगर’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘साखर बाजारातील जागतिक घडामोडी आणि भारतीय साखर उद्योगाची वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सरकारमंत्री सुभाष देशमुख, आंतराष्ट्रीय साखर संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष जोसे ओरिवे, माजी केंद्रीय कृषी सचिव टी. नंदा कुमार, केंद्रीय साखर सहसचिव शुभाशिष पांडा, भारतीय साखर कारखानदार संघाचे अध्यक्ष तरुण सावनी, राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदार संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.

साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी रविवारी झालेल्या परिषदेच्या उद्घाटन समारंभात केले होते. त्यानंतर पवार यांनी मोदी यांच्या भाषणानंतर इथेनॉलचे दर कमी होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. याबाबत पवार म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या इथेनॉलबाबतच्या धोरणात सातत्य नाही. ही बाब मोदी यांच्या कानावर घातली आहे. संसदेच्या अधिवेशानंतर या विषयावर स्वतंत्र बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.’ ‘साखर कारखान्यांच्या कर्जांचे पनर्गठन करण्याबाबत मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल,’ असे आश्वासनही पवार यांनी दिले. ‘नागपूर आणि जालना परिसरातील पाणी असलेली जमीन उपलब्ध करून दिल्यास त्यातून विदर्भ आणि मराठवाड्यासाठी चांगल्या दर्जाच्या उसाच्या बेण्याचा पुरवठा करता येईल. याबाबत व्हीएसआयने तयारी दर्शवली आहे,’ असे पवार म्हणाले.

जोसे ओरिवे म्हणाले, ‘भविष्यात जगभर साखरेच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल, सहवीज, पशुखाद्य, जैवप्लास्टिक, जैवरसायने आणि उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे. इथेनॉलची मागणी सुमारे १०० अब्ज लिटर्सवरून सुमारे १२८ अब्ज लिटरवर जाण्याची शक्यता असून, नजीकच्या भविष्यात ही एक सुवर्णसंधी असणार आहे.’

ऊस उत्पादकांसाठी नवी योजना
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी योजना राबवण्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते म्हणाले, ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के कर्ज देऊन त्यावरील व्याज राज्य सरकारने भरण्याची योजना राबवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.’ साखरेचे दर वाढून कारखाने सुधारण्याची अपेक्षा फोल असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याऐवजी कारखान्यांनी उपपदार्थांकडे वळण्याची सूचना त्यांनी केली. साखरेचे दर वाढून कारखाने सुधारतील हे स्वप्नासारखे आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना उपपदार्थांकडे वळावे लागणार आहे. साखर उद्योगातील धोरण हे दीर्घकालीन असले पाहिजे. ते धोरण शेतकरी आणि कारखान्यांना पूरक असणे आवश्यक आहे. या धोरणासाठी मी मदत करीन, असे गडकरी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महानगरपालिकांना ‘बोनस’

$
0
0

सर्व महापालिका मिळून तब्बल ५५० कोटी रुपये जमा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयामुळे सर्व महापालिकांना फायदा झाला आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये मिळून तब्बल ५५० कोटी रुपये सोमवारी सायंकाळपर्यंत जमा झाले होते. मध्यरात्रीपर्यंत पैसे स्वीकारले गेल्याने हा आकडा सहाशे कोटींचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता आहे.

केंद्र सरकारने मोठ्या मूल्यांच्या नोटावर बंदी घातल्याने पालिकेत कर भरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय व्हायला लागली. त्यामुळे, मालमत्ता कर, वीज बिल आणि इतर सरकारी शुल्क भरण्यास जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मुदत सोमवारी मध्यरात्रीपर्यंत असल्याने गेल्या चार दिवसांत सर्वच महापालिकांमध्ये अनेक नागरिकांनी थकित कर भरण्यास प्राधान्य दिले. गेल्या शुक्रवारी सर्वाधिक कर भरणा झाला. त्यानंतर, शनिवार-रविवारी त्यात थोडी घट झाली असली, तरी सोमवारी पुन्हा मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी केली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोमवारी सायंकाळी सहापर्यंत साडेपाचशे कोटी रुपये करांच्या माध्यमातून प्राप्त झाल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली. बृहन्मुंबई महापालिकेला सर्वाधिक ११७ कोटी रुपये मिळाले, तर त्यापाठोपाठ पुण्याने ७१ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. राज्यातील छोट्या पालिकांनाही या योजनेचा फायदा झाल्याचे दिसून येते. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत रक्कम स्वीकारली गेल्याने हा आकडा सहाशे कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात पहिले स्वादुपिंड प्रत्यारोपण

$
0
0

मधुमेही तरुणाला १६ वर्षांच्या ब्रेनडेड युवकाने दिले जीवदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मधुमेहामुळे स्वादुपिंडातील ‘ इन्सुलिन’ तयार करण्याची प्रक्रिया नष्ट होण्याबरोबर मूत्रपिंड निकामी झालेल्या २८ वर्षांच्या तरुणावर महाराष्ट्रातील पहिले स्वादुपिंड प्रत्यारोपण पुण्यात यशस्वी झाले. स्वादुपिंड प्रत्यारोपणामुळे मधुमेह कायमचाच बरा झाल्याने त्याला संजीवनीच मिळाली.

स्वादुपिंड व मूत्रपिंडाच्या रोपणामुळे पेशंटची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. तरुणाची दृष्टी, रक्तवाहिन्या, तसेच शरिरातील इतर अवयवांमध्ये आलेले दोष हळहूळ दूर होण्यास सुरुवात झाली आहे. स्वादुपिंड प्रत्यारोपणामुळे नवे आयुष्य लाभल्याचा आनंद तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना झाला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. वृषाली पाटील, डॉ. निनाद देशमुख यांच्यासह ट्रान्सप्लांट इन्टेंनव्हिस्ट डॉ. प्रसाद अकोले, ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. सचिन पळणीटकर यांच्या पथकाने हे पहिले ट्रान्सप्लांट यशस्वी करून दाखविले.

‘पुण्यातील एका कंपनीत नोकरी करणाऱ्या २८ वर्षांच्या तरुणाला ‘टाइप १’ मधुमेहाचा आजार जडला होता. वयाच्या विशीपासून त्याला त्रास सुरू होऊन अवयव निकामी होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून इन्सुलिन घेण्याबरोबर मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलिसिस करावे लागत होते. काही अंतरावर चालणे अशक्य होणे, डोळ्यांची दृष्टी कमी होणे याशिवाय अन्य परिणाम दिसून येत होते. परिणामी, नोकरीच्या तीनदा चालून आलेल्या संधीबरोबर सध्याची नोकरीही त्याला सोडावी लागली होती. अखेर त्यावर स्वादुपिंड प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. अपघातामुळे ‘ब्रेनडेड’ झालेल्या १६ वर्षांच्या युवकाचे स्वादुपिंड मिळाले. स्वादुपिंड तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात यश आले. प्रत्यारोपणामुळे मधुमेहाच्या विपरित परिणामाने खचलेल्या तरुणाचा मधुमेह कायमचा बरा झाला. त्याशिवाय त्याला नवे जीवनही मिळाले,’ अशी माहिती हॉस्पिटलच्या ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. वृषाली पाटील यांनी दिली.

‘स्वादुपिंडासोबत मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची ही महाराष्ट्रातील, तसेच पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही पहिलीच घटना. स्वादुपिंड प्रत्यारोपणासाठी दात्यासह अवयव स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा रक्तगट जुळणे आवश्यक असते. त्याशिवाय त्याचे परिणामही तपासावे लागतात. एकाच वेळी दात्याच्या शरिरातील मूत्रपिंडासह स्वादुपिंड काढून २८ वर्षांच्या तरुणाच्या शरिरात त्याचे रोपण करण्यात आले. सुमारे आठ तास चाललेल्या या ऑपरेशन प्रक्रियेनंतर काही दिवसांत त्या तरुणावर मधुमेहामुळे झालेले विपरित परिणाम कमी झाल्याचे दिसून आले,’ असे निरीक्षण डॉ. निनाद देशमुख यांनी नोंदविले.

भारतात आतापर्यंत दहापेक्षा कमी व्यक्तींवर स्वादुपिंड प्रत्यारोपण झाले असून हे महाराष्ट्रातील पहिलेच ठरले आहे. दात्या युवकामुळे यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे करता आले, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले.

प्रत्यारोपणाचे फायदे

- मधुमेह कायमचा बरा होण्याची शक्यता वाढणार
- मधुमेही मूत्रपिंड खराब झालेल्या पेशंटनी स्वादुपिंड मूत्रपिंड प्रत्यारोपण केल्यास ८० टक्के पेशंट वाचण्याची शक्यता
- स्वादुपिंड प्रत्यारोपणानंतर ६५ ते ७० टक्के पेशंट स्वतःचे आनंदी जीवन जगू शकतात.
- मूत्रपिंडाचा आजार कायमचा दूर होऊ शकतो.
- हृदयाच्या आजारापासून दिलासा मिळणे शक्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचाऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांना द्या : मकरंद अनासपुरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आजच्या साहेबी व्यवस्थेमुळे आणि या व्यवस्थेतील चुकांमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसाच राहत नाही. त्यामुळे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचा काळा पैसा शेतकऱ्यांना द्या,’ अशी मागणी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी रविवारी केली.
नाम फाउंडेशनने शेतकऱ्यांसाठी केलेल्या सामाजिक कार्यासाठी फाउंडेशनला आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन मीडियातर्फे पुलोत्सवात सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी अनासपुरे बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, विरेंद्र चित्राव, मयुरेश वैद्य, नैनिश देशपांडे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांनी मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेतली.
अनासपुरे म्हणाले, ‘भरपूर पाऊस झाला म्हणून आता शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असे होणार नाही. चुकीची धोरणे आणि त्याची चुकीची अंमलबजावणी यामुळे वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे. साहेबी संस्कृतीमुळे व्यवस्था शेतकऱ्यांपासून लांब गेली. या साहेबी संस्कृतीनेच शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. सध्या शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचा काळा पैसा शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे.’
‘शेतकऱ्यांच्या समस्या तत्कालीक नाहीत त्यामुळे त्याच्यावर केवळ मलमपट्टी करणारे उपाय करून चालणार नाहीत, त्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजे. नामच्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न करित आहोत. हे काम करताना आम्ही साहेबी संस्कृती लांब ठेवली. आम्हाला आमच्या या कामाचे क्रेडीट नको, आम्ही इतरांसारखेच सर्वसामान्य आहोत, आम्हाला कोणीही देवदूत समजू नये,’ असे अनासपुरे यांनी सांगितले.


भरपूर पाऊस झाला म्हणून आता शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या, असे होणार नाही. सरकारची चुकीची धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी अद्यापही करणे सुरू आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट अवस्था झाली आहे. साहेबी संस्कृतीमुळे व्यवस्था शेतकऱ्यांपासून अधिक लांब गेली. या साहेबी संस्कृतीनेच शेतकऱ्यांची अवस्था अतिशय हलाखीची झाली आहे.
- मकरंद अनासपुरे, अभिनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images