Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पासपोर्ट अदालत २३ नोव्हेंबरला

$
0
0

पुणे : विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुणे पासपोर्ट कार्यालयातर्फे येत्या २३ नोव्हेंबरला पासपोर्ट अदालत आयोजित करण्यात आली आहे. सेनापती बापट रोडवरील पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयामध्ये दुपारी १० ते १ या वेळेत ही अदालत होणार आहे.

अपुरी कागदपत्रे, अर्जामध्ये दिलेली माहिती आणि पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये फरक आढळून आल्याने अशा विविध कारणांमुळे १५ सप्टेंबर २०१६पर्यंत प्रलंबित राहिलेल्या पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अदालत आयोजित करण्यात आली आहे. मात्र यात सहभागी होण्यासाठी अपॉइंटमेंट असणे बंधनकारक आहे.

यामध्ये पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील अर्जदारांना सहभागी होता येणार आहे. अर्जदारांनी passportadalat@gmail.com या ई-मेलवर संपूर्ण नाव, अर्ज क्रमांक, संपर्क क्रमांक लिहून पाठविणे अपेक्षित आहे. ज्यांना ईमेल शक्य नाही, त्यांनी पासपोर्ट कार्यालयाला अर्ज पाठवावा. ई-मेल अथवा पत्र पोहोचण्यासाठी २१ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे, अशी माहिती पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांची कामगिरी ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची माहिती केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक संकलना’च्या (एनएडी) माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठाकडील, तसेच राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडील (राज्य बोर्ड) माहितीही ‘एनएडी’वर अपलोड केली जाणार आहे. विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि मनुष्यबळाच्या शोधात असलेल्या कंपन्यांमध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून अत्यंत विश्वासार्ह आणि सुरक्षित पद्धतीने ही ऑनलाइन यंत्रणा काम करणार आहे.

संकलनाच्या निर्मितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. येत्या तीन महिन्यांच्या काळात ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची अपेक्षा केंद्राने व्यक्त केली आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये या यंत्रणेच्या आधारे देशभरातील विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांकडे असलेली शैक्षणिक प्रमाणपत्रे, पदव्या, संस्थांकडून दिले जाणारे विविध सन्मान एकाच व्यासपीठावरून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सिक्युरिटी डिपॉझिटरीच्या धर्तीवर सुरू होणाऱ्या या यंत्रणेवर अपलोड केल्या जाणाऱ्या माहितीच्या विश्वासार्हतेची पूर्ण जबाबदारी केंद्राने संबंधित शैक्षणिक संस्थांकडे सोपविली आहे. तर, माहितीची सुरक्षितता आणि गुप्ततेची पूर्ण जबाबदारी ‘एनएडी’कडे सोपविण्यात येणार आहे. ‘एनएडी’मध्ये देशभरातील शैक्षणिक संस्था, परीक्षा मंडळे, पात्रतांचे मूल्यमापन करणाऱ्या संस्था, विद्यार्थी, बँका, नोकरदार कंपन्या, सरकारी संस्था यांची नोंदणीही होणार आहे. त्या आधारे संबंधितांना प्रमाणपत्रांची ऑनलाइन पडताळणी अगदी जागच्या जागी करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. मनुष्यबळाच्या शोधात असलेल्या कंपन्यांना ही माहिती विद्यार्थ्यांच्या पूर्वानुमतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या विषयी पुणे विद्यापीठाकडे विचारणा केली असता, विद्यापीठाने त्यासाठीचे काम गेल्या चार महिन्यांपासूनच सुरू केल्याची माहिती कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली. डॉ. गाडे म्हणाले, ‘एनएडी’च्या उभारणीसाठी काम करणाऱ्या यंत्रणेसोबत विद्यापीठाने या पूर्वीच आपले काम सुरू केले आहे. केंद्राच्या मनुष्यबळविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार विद्यापीठ आता एनएडीकडे आपल्याकडील प्रमाणपत्रांची माहिती देणार आहे.’

राज्य बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, ‘मंडळाने गेल्या काही काळामध्ये १९८८पासून आपल्याकडे असणाऱ्या प्रमाणपत्रांची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. त्या आधारे मंडळाच्या वेबसाइटवर ऑनलाइन व्हेरिफिकेशनची सुविधाही उपलब्ध झाली आहे. डिजिटल लॉकरच्या धर्तीवर सुरू होत असलेल्या या उपक्रमामध्ये सहभागी होण्याबाबत अद्याप तशा सूचना नाहीत. मात्र सरकारच्या सूचनांनुसार, या पुढील टप्प्यात मंडळाकडील माहिती उपलब्ध करून दिली जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
बेकायदा गॅस सिलिंडर रिफलिंग करताना स्फोट होऊन उडालेला एक सिलिंडर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेला दुचाकीस्वार महापालिकेतील कर्मचारी असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत येथील एक भिंत कोसळली असून, शेजारी स्वीट होमला आग लागली. रविवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास चिखली येथील शिवाजी चौकात ही घटना घडली.

भगवान दत्तात्रय हिंगे (वय ४५, रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर, संतोष साने (रा. चिखली) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान हिंगे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरक्षारक्षक म्हणून नियुक्तीस होते. शिवाजी चौकातील भांड्याच्या दुकानात गॅस सिलिंडर बेकायदा रिफिलिंग करण्याचे काम सुरू असताना स्फोट झाला. त्या वेळी एक सिलिंडर हवेत उडाला. याच दरम्यान, हिंगे तेथून दुचाकीवरून जात होते. उडालेला सिलिंडर त्यांच्या डोक्यात लागला. त्यात गंभीर जखमी होऊन हिंगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर संतोष साने यांच्या पोटाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. साने यांच्यावर थेरगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

एका सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर त्याच्या आगीमुळे येथील तीन ते चार सिलिंडरचा स्फोट झाला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीची झळ शेजारील विष्णू स्वीट होमला बसली. यात स्वीटहोम पूर्णत: जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली, तसेच येथील अन्य सिलिंडर बाजूला करून, त्यावर सतत पाण्याचा मारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादातून उलगडला विजयाबाईंचा प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘रसिक व कलाकार असे नाते कुठेच नसते. नाट्य ही कला अशी आहे जी प्रेक्षकांशिवाय उभीच राहू शकत नाही. साहित्य, चित्र हे तयार स्वरूपात रसिकांसमोर येते. त्याने कलेची निर्मितीप्रक्रिया रसिकांना समजत नाही. नाटकाची प्रक्रिया रसिकांच्या साक्षीने होते. रंगमंचाची ही मजा आहे. इथल्या पोकळीत खूप काही सामावलेलं आहे. मला रंगभूमीवरच्या त्या पोकळीची चटक लागलीयं. व्यसन लागलयं...’ रंगभूमीवरील हेडमास्तरीण ‘बाई’ त्याच रंगभूमीच्या साक्षीने बोलत होत्या. या बाई म्हणजे दस्तरखुद्द ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता.

आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित पुलोत्सवात मेहता यांच्यावरील ‘बाई - एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, नयनीश देशपांडे, वीरेंद्र चित्राव, मयूर वैद्य या वेळी उपस्थित होते. यानिमित्त अजित भुरे यांनी विजयाबाईंशी संवाद साधला.

‘मी सतत गुरुच्या शोधात असायचे. मी दिग्दर्शिका असले तरी आतून अभिनेत्री आहे. मी कोणालाही हे वाक्य इथे येऊन असे म्हण, असे कधी सांगितले नाही. ते प्रत्येकाने शोधायचे असते. एकमेकांच्या बरोबर वावरण्यातून बंध तयार होतो. त्यातून हे सूचत जाते. स्नेह, जिव्हाळा हे आमच्या कामाचे सूत्र होते...’ विजयाबाई आपला प्रवास उलगडत होत्या.

‘हाती असलेल्या कामाला वेळ नसेल ते करू नये. वेळेच्या नियोजनाने ते जमू शकते. तो आदर आणि आस्था दाखविण्याचा भाग असतो. स्वत:चा किंवा दुसऱ्याचा वेळ घालवणे हे गुन्ह्यासारखे असते. तुमचा आणि इतरांच्या वेळेचा मान ठेवा. प्रसिद्धी, पैशासाठी काम करतोय हे काढून टाका. रंगभूमीवरील आत्मा, बाज मिळण्यासाठी काम करा,’ अशा कानपिचक्या विजयाबाईंनी दिल्या. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.

मनामध्ये विजयाबाईंच्या कर्तृत्वाबद्दल खूप काही आहे. साठ वर्षे एकच ध्यास, स्वप्न उराशी बाळगून त्या चालत आहेत. पण बाईंचे नाट्यक्षेत्र विशिष्ट वर्गापुरते किंवा बुद्धिवाद्यांसाठी वाटते. विचार सर्वसामान्यांपर्यत पोहोचण्यासाठी नाटक असते. सामान्य माणसाकडे मन आणि ज्ञान असते. नाटक, कला आणि विचार पोहोचवून त्यांनी आम्हाला उपकृत करावे, असे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त या वेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांच्या पैशांवर कर नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि काळ्या धनाच्या विरोधात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बँकांमध्ये भरल्यावर शेतकऱ्यांच्या पैशांवर कर लावण्यात येणार असल्याचा अफवा पसरवण्यात येत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या रकमेवर कर लावणार नाही.’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले. ‘देश तुमचा आहे. बँका तुमच्या आहेत. मी तुमचा आहे. एका पैशालाही धक्का लागणार नाही. फक्त ३० डिसेंबरपर्यंत साथ द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद् घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

‘हा निर्णय घेणारा मी पहिलाच पंतप्रधान नाही. १९७८ मध्ये मोरारजी देसाई यांनी असा निर्णय घेतला होता. आघाडी सरकारनेही २५ पैसे चलनातून बाद केले होते. आता घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सुमारे १४ लाख कोटी रुपयांचे चलन बाद झाले.’ असेही ते म्हणाले.
मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी मुक्तकंठाने प्रशंसा केली. सार्वजनिक जीवनात पवारांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते.

मोदी म्हणाले, ‘राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून पवार ओळखले जातात. त्यांच्या संसदीय कारकिर्दीला फेब्रुवारी महिन्यात ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांनी बोट धरून मला राजकारणात चालायला शिकवले. सार्वजनिक जीवनात ही गोष्ट स्वीकारण्यात मला अभिमान वाटतो. ५० वर्षे अखंडपणे निवडून येण्यासाठी किती श्रम करावे लागतात याची कल्पना निवडणूक लढवणाऱ्यांना असू शकते.’

कार्यक्रमाला पंतप्रधान आणि पवारांसह राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरधर पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.

‘शेतकऱ्यांनी बँकेत पैसे भरल्यावर त्यावर कर लावण्यात येईल, असा भ्रम पसरवण्यात येत आहे; पण शेतकऱ्यांच्या रकमेवर कर लावला जाणार नाही. नोटा रद्द केल्याने होणाऱ्या त्रासाची कल्पना होती. पर्यायी चलनाची व्यवस्था करण्यात आली असती, तर देशाचे शत्रू आणि भ्रष्टाचारी लोक सावध झाले असते. नोटा बंद करण्याचा निर्णय काही लोकांना आवडणार नाही. ते लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. देशवासीयांनी ३० डिसेंबरपर्यंत साथ द्यावी,’ असे आवाहन मोदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार, नव्हे ‘रांग’वार

$
0
0

सुट्टीमुळे एटीएम, बँकांबाहेर लोकांची मोठी गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बंद असलेली एटीएम, रविवारची सुटी आणि सोमवारी गुरुनानक जयंतीमुळे बँकांना असणारी सुटी यामुळे नागरिकांनी बँकांबाहेर प्रचंड मोठ्या रांगा लावल्याचे चित्र रविवारी शहरात दिसून आले. कुठे एक तास, तर कुठे तीन तास रांगेत थांबून नागरिकांनी पैसे पदरात पाडून घेतले. शहरात सुरू असलेल्या मोजक्याच एटीएम केंद्रांबाहेरही मोठ्या रांगा दिसून आल्या. मंगळवारपासून या रांगा कमी होण्याची शक्यता आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. बँकांतून व एटीएममधून पैसे काढण्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यातच आतापर्यंत मोजकीच एटीएम सुरू झाली आहेत, तर बँकांनाही योग्य प्रमाणात नोटांचा पुरवठा होत नसल्याने बँकांकडील रोकड संपत आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले असून, दररोज बँकांबाहेर लागणाऱ्या रांगा वाढत चालल्या आहेत.

रविवारी बँकांना रोकड उशिरा मिळाल्याने अनेक बँकांच्या शाखांचे कामकाज उशिरा सुरू झाले. त्यापूर्वीच बँकांबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बँकांकडील रोकड दुपारी बारा-साडेबारापर्यंतच संपली होती. काही काळाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा पैसे देण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एका व्यक्तीला चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम बदलून दिली जात होती. रोकड कमी असलेल्या सहकारी बँकांमध्ये काही ठिकाणी एक हजार, तर काही ठिकाणी दोन हजार रुपये दिले जात होते. त्यामुळे, रांगेत उभे राहूनही पुरेसे पैसे न मिळाल्याने संतापलेले नागरिक आणि बँक अधिकारी-कर्मचारी यांच्यात खटके उडत होते.

दरम्यान, नव्या नोटांसाठी एटीएम मशिनमध्ये तांत्रिक बदल करणे आवश्यक आहे. हे काम मोजक्याच एटीएम केंद्रांमध्ये पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील जवळपास ९० टक्के एटीएम अजूनही बंद आहेत. मोजकीच एटीएम केंद्रे सुरू आहेत; मात्र ती सुरू असल्याचे समजताच तिथे भल्यामोठ्या रांगा लागत असून, काही वेळातच तेथील रोकडही संपते. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे.

बँकांकडे शंभरच्या नोटांचा तुटवडा

अनेक बँकांना गेल्या दोन दिवसांत शंभर रुपयांच्या नोटांचा पुरवठाच झालेला नाही. पन्नास, दहा आणि वीस रुपयांच्या नोटांची मोजकीच बंडल बँकांकडे असली, तरी त्यातील निम्म्या नोटा वापरायोग्य नाहीत. त्यामुळे खातेदारांना देण्यासाठी फक्त दोन हजार रुपयांची नोट हाच पर्याय बँकांकडे उपलब्ध आहे. काही बँकांकडे सुटी नाणी उपलब्ध आहेत; मात्र खातेदारांकडून दोन हजारांची नोट किंवा नाणी या दोन्ही पर्यायांना नकार मिळत असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांचे सर्व्हरही डाउन

$
0
0

कार्डांचा वापर वाढल्याने नवी समस्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोटांच्या टंचाईमुळे दैनंदिन व्यवहारांत डेबिट, क्रेडिट कार्डांचा वापर वाढल्यामुळे बँकांचे सर्व्हर डाउन होत आहेत. परिणामी नागरिकांना व्यवहार पूर्ण करता येत नसल्याने त्यांच्या मनस्तापात भरच पडत आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत ऑनलाइन व्यवहार करण्याबरोबरच डेबिट किंवा क्रेडिट कार्डांचा वापर करण्याचे आवाहन सर्वच यंत्रणांकडून नागरिकांना केले जात आहे; मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून या कार्डांचा वापर वाढल्याने बँकांचे सर्व्हर डाउन होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. परिणामी, हे व्यवहार पूर्ण होत नसल्याने ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्य गोष्टींची खरेदी करता येत नसून, व्यावसायिकांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

‘मी एका दुकानात खरेदीसाठी गेलो होतो. खरेदी झाल्यानंतर बिल देण्यासाठी मी कार्ड पुढे केले; मात्र बँकांचे सर्व्हर डाउन असल्याने व्यवहार होऊ शकला नाही. दोन सरकारी बँकांची कार्डे, एका सहकारी बँकेचे कार्ड आणि एक खासगी बँकेचे कार्ड असे चार पर्याय वापरले. एकही कार्ड चालू शकले नाही. त्यामुळे वस्तू खरेदी करता आल्याच नाहीत, वर मनस्तापही झाला,’ असे विनायक दबडे यांनी सांगितले.

‘आम्ही एका सुपरस्टोअरमधून किराणा व भाजीपाला खरेदी केला. त्यानंतर क्रेडिट कार्डाद्वारे पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. दोन-तीन वेळा प्रयत्न करूनही सर्व्हरच्या समस्येमुळे हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. आमच्यासह रांगेतील तीन-चार नागरिकांना हीच समस्या भेडसावली. परिणामी आम्हाला खरेदी न करताच परतावे लागले,’ असे सचिन व सविता जोशी यांनी सांगितले.

‘स्कूल बसचालकांकडून या नोटा स्वीकाराव्यात’

स्कूल बस, रिक्षा, टॅक्सी चालकांकडून पेट्रोल पंपावर पाचशे व एक हजाराच्या नोटा स्वीकाराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हध्यक्ष एकनाथ ढोले यांनी केली. ‘स्कूल बस, रिक्षा, टॅक्सी या अत्यावश्यक वाहतूक सेवा आहेत. त्यामुळे त्यांची अडवणूक झाल्यास अप्रत्यक्षरीत्या नागरिकांचीच अडवणूक होत आहे. सुट्या पैशांअभावी सध्या या वाहतूकदारांना अनेक अडणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी,’ असे ढोले यांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, पाचशे, हजार रुपयांच्या नोटांवर बंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील स्कूल बसचालकांनी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. या संपामध्ये महाराष्ट्र वाहतूक सेना सहभागी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


आरटीओ आज सुरू

पुणे : आज, सोमवारी गुरुनानक जयंतीची सुटी असतानाही प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज सुरू राहणार आहे. तसेच कामकाजात पाचशे व हजार रुपयांच्या नोटाही स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी सोमवारी राज्यातील सर्व आरटीओ सुरू ठेवण्याचा आदेश परिवहन आयुक्त प्रवीण गोडाम यांनी दिला आहे. गेल्या आठवडाभरात सुट्या पैशांच्या अभावामुळे लायसन्स काढणे, डुप्लिकेट लायसन्स काढणे, ‘आरसी’ बुक, वाहन योग्यता प्रमणापत्र, विविध कर भरणे ही नागरिकांची कामे रखडली आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

बँक ऑफ इंडिया अधिक वेळ सुरू

चलन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, ‘बँक ऑफ इंडिया’च्या सर्व शाखा नेहमीपेक्षा अडीच तास अधिक कार्यरत राहणार आहेत. या शाखा दैनंदिन कामकाजाच्या एक तास आधी सुरू होऊन नियमित वेळेनंतर दीड तासाने बंद होतील. १५ ते १९ नोव्हेंबरपर्यंत हा निर्णय लागू राहील, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे बँकेतर्फे कळविण्यात आले आहे.

ग्राहक पेठ सभासदांना देणार उधारी

बँकेतील दैनंदिन व्यवहारांवर निर्बंध आल्याने नागरिकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहक पेठेने आपल्या सभासदांना जीवनावश्यक वस्तू व औषधे उधारीवर (क्रेडिट) देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘२२ नोव्हेंबरपर्यंत सभासद व ठेवीदारांना शेअर्सच्या प्रमाणात २००० रुपयांपर्यंत किराणा खरेदी करता येईल. देव मेडिकलमधून जीवनावश्यक औषधेही घेता येतील,’ अशी माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली.

‘पुणे पीपल्स’ आज सुरू

सोमवारी गुरुनानक जयंतीची सुटी न घेता पुणे पीपल्स सहकारी बँकेच्या सर्व शाखा पूर्ण वेळ कार्यरत असतील. नागरिकांची गैरसोय कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या खातेदारांबरोबरच इतर नागरिकांनाही नोटा बदलून देण्यात येतील, अशी माहिती बँकेचे सरव्यवस्थापक सदानंद दीक्षित यांनी दिली.

‘रोकड पुरविण्यात दुजाभाव नको’

रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांना रोख रकमेचा पुरवठा करताना दुजाभाव करण्यात येत आहे. अन्य नागरी सहकारी बँका नोटांच्या प्रतीक्षेत असताना एका मोठ्या नागरी सहकारी बँकेला मात्र या नोटा मिळाल्या. या दुजाभावाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन बँक कर्मचारी संघाने केले आहे. तसेच गेले काही दिवस सर्व बँक कर्मचारी झपाटून देश व जनसेवेसाठी कार्यरत आहेत, त्यांचे अभिनंदनही संघाचे अध्यक्ष गिरीश मेंगे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीनंतर चोरट्यांनी घेतली ‘विश्रांती’

$
0
0

चार दिवसांत घरफोडी नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरफोडीच्या गुन्ह्यांमुळे त्रस्त असलेल्या पुण्यातील पोलिसांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णयाने खूपच दिलासा मिळाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या चोरट्यांनी विश्रांती घेतल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार दिवसांत घरफोडी झाल्याची एकही नोंद पुणे पोलिसांकडे झालेली नाही. त्याबरोबरच चोरीच्या इतर गुन्ह्यांतही घट झाल्याचे दिसून आले आहे.

काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी रात्रीपासून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर काळा पैसा जमा केलेल्यांचे धाबे दणाणले. या पैशाचे करायचे काय, या नोटा कोठे चलनात आणायच्या असा प्रश्न निर्माण झाला. पुणे पोलिस दलातील काही मातब्बर पोलिस अधिकाऱ्यांचीही अशीच अवस्था झाली होती. काहींनी काळा पैसा पांढरा करून घेतला. नागरिकदेखील त्यांच्याकडे असलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी सकाळपासूनच बँकेसमोर रांगा लावून उभे आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दिवसाला किमान दोन ते तीन घरफोड्या घडतात. अलीकडे घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिसांकडून घरफोड्यांतील आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. मंगळवार रात्रीपासून पुण्यात एकही घरफोडीची घटना घडल्याची पोलिसांकडे तक्रार आलेली नाही. तसेच, चोरीच्या इतर घटना घडल्या नसल्याचेही आढळून आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मार्केट यार्डात उलाढाल मंदावली

$
0
0

शेतकरी, व्यापाऱ्यांची अडचण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोटाबंदीचा परिणाम रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील व्यवहारांवर दिसून आला. फळभाज्या, फळे, फुले, तसेच गणेश पेठेतील मासळी बाजारातील उलाढाल निम्म्यावर आल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचा माल खरेदीअभावी पडून राहिल्याने आडत्यांकडे उधारी वाढू लागली आहे. बहुतांश जणांनी उधारीवर विक्री केली असून, काहींनी चेकचा पर्याय स्वीकारला आहे.

जुन्या नोटा बँकांमध्ये भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. मार्केट यार्डातील विक्रेते विविध बँकांचे बडे खातेदार आहेत. तरीही त्यांना पुरेशा प्रमाणात नोटा बदलून मिळत नसल्याने त्यांच्या व्यवहारांवर परिणाम होऊ लागल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. ‘केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून मार्केट यार्डातील फळ विभागातील उलाढालीवर परिणाम झाला. तेथील अनेक शेतकरी, विक्रेत्यांमध्ये नोटा घेण्यावरून वादविवाद सुरू झाले. त्याचा परिणाम रविवारी दिसून आला. बाजारातील अनेक बड्या विक्रेत्यांनी दूरवरून फळांचा माल मागविण्याचे धाडस केले नाही. दूरवरून येणाऱ्या ट्रक, टेम्पोचालकांना रोखीने भाडे द्यावे लागते. त्यामुळे भाडे देण्यासाठी शंभर, पन्नास रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे गेल्या चार दिवसांत फळबाजारात ५० टक्केच विक्री झाली,’ असे निरीक्षण काही फळविक्रेत्यांनी नोंदविले.

‘पालेभाज्या, फळभाज्या विभागातदेखील वेगळी परिस्थिती नाही. पालेभाज्या विभागातील घाऊक बाजारात पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. परंतु शेतकरी, खरेदीदार त्या स्वीकारत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. अनेक खरेदीदार, शेतकऱ्यांनी खरेदी-विक्रीचे उधारीवर व्यवहार केले आहेत. नोटांअभावी फळभाज्यांची गेल्या आठवड्यात झालेली १८० ट्रकची आवक रविवारी १४० ट्रकपर्यंत खाली आली. ग्राहकांची संख्याही रोडावली. पालेभाज्या विभागात गेल्या चार दिवसांमध्ये उधारीचे व्यवहार वाढले,’ असे निरीक्षण पालेभाज्यांचे विक्रेते निखिल भुजबळ यांनी नोंदविले.

............

संडे सामिष नाही

मासळी, मटण मार्केटही डाउन झाले आहे. रविवार असल्याने सकाळपासूनच मटण, चिकनच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी असते. परंतु त्याला हा रविवार अपवाद ठरला. अनेकांनी मटण, मासळीच्या चिकनच्या दुकानाकडे पाठ फिरवून, त्याऐवजी नव्या नोटा मिळवण्यासाठी एटीएम, बँकांमध्ये रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुरेशा चलनाअभावी मासळीच्या बाजारात आणि फुलांच्या बाजारात व्यवहार ठप्प झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्तातील लसनिर्मिती सुरू ठेवा

$
0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सिरम’ला सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भारतासह जगातील लाखो, कोट्यवधी बालकांना जीवदान देणाऱ्या स्वस्त किमतीतील लसनिर्मितीची प्रक्रिया पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने सुरूच ठेवावी,’ अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

मोदी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्या कार्यक्रमानंतर त्यांनी हडपसर येथील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्या भेटीत मोदींनी ‘सिरम’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला, संचालक आणि त्यांचे चिरंजीव आदर पूनावाला, तसेच कुटुंबीयांशी संवाद साधला.

या वेळी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट आदी उपस्थित होते. पुण्यात डॉ. पूनावाला यांनी विकसित केलेली लसनिर्मितीची कंपनी पाहण्यासाठी वेळ द्यावी, अशी विनंती पवार यांनी मोदींना विनंती केली होती. त्यानुसार ही भेट दहा मिनिटांसाठी ठरली होती. त्या भेटीत मोदी यांनी आदर आणि सायरस पूनावाला यांच्याशी गुजराती भाषेत संवाद साधला.

‘देशातील सर्व बालकांना वाचविण्यासाठी आपण ज्या स्वस्त दरातील लशींची निर्मिती करत आहात, तो प्रकल्प देशासाठी सर्वांत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे लहान बालकांसाठीच्या स्वस्त दरातील लसनिर्मितीची प्रक्रिया सिरम इन्स्टिट्यूटने सुरूच ठेवावी,’ अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या संदर्भात कधीही अडचण आल्यास त्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आदर पूनावाला यांना सांगितले.

स्वच्छ भारत मिशन प्रकल्पांतर्गत ‘पूनावाला क्लीन सिटी’ हा प्रकल्प शंभर कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत आहे. त्या प्रकल्पाचे मोदी यांनी कौतुक केले. हा प्रकल्प म्हणजे देशाच्या एका प्रमुख मोहिमेचा भाग असून, या प्रकल्पाचे देशातील इतर शहरांनी जरूर अनुकरण करावे, असेही कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऊस उत्पादनासह इथेनॉलवर भर द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशाचे सर्वाधिक चलन इंधन आयातीसाठी खर्च होत आहे. त्यामुळे खाडी​ का तेल ऐवजी झाडी का तेलला प्रोत्साहन मिळावे, यासाठी साखर कारखान्यांनी उसाच्या उत्पादनाबरोबरच इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे रविवारी आयोजित ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५’ या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री आणि ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे-पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरधर पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

‘केंद्र सरकार इथेनॉलच्या निर्मितीवर भर देत आहे. त्याचा फायदा साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. गेल्या दोन वर्षांत इथेनॉलचे उत्पादन आणि विक्रीत वाढ झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथेनॉलवर चालू शकते. यामुळे खनिज तेलाच्या आयातीसाठी लागणाऱ्या परकीय चलनाची बचत होऊ शकते,’ असेही मोदी म्हणाले. ‘परदेशांमध्ये कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आहे. त्या तुलनेत आपल्या देशात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा तितकासा वापर होत नाही. हा वापर वाढण्यासाठी व्हीएसआयसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. शेतीसमोर दुष्काळ, पावसाची अनियमितता, घटत जाणारी जमीन धारणा आदी आव्हाने आहेत. या आव्हानावर मात करून उत्पादकता वाढवली पाहिजे,’ असे त्यांनी नमूद केले.

‘केंद्र सरकारने वेळोवेळी दिलेल्या पॅकेजमुळे गेल्या दोन वर्षांत दुष्काळी स्थितीला साखर उद्योगाने तोंड दिले आहे,’ असे फडणवीस म्हणाले. ‘देशात पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी साखर उद्योगावर अवलंबून आहेत. या उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे ८०० अब्ज रुपयांची आहे. वारंवार येणारे दुष्काळ आणि क्षारपड जमिनींचा वाढता प्रश्न पाहता पाण्याच्या परिणामकारक वापरावर भर द्यावा लागेल.’ असे पवार म्हणाले.

.....................................................

डाळी आणि बांबूचे उत्पादन घ्यावे

‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पर्यायी उत्पादन म्हणून उसामध्ये डाळींचे उत्पादन घ्यावे; तसेच ऊस आणि बांबू यांच्यात साम्य आहे. बांबूला जागतिक स्तरावर चांगली मागणी आहे. त्यामुळे बांबूचे उत्पादनही घ्यावे. त्याद्वारे शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.’ असे मोदी यांनी सांगितले.

.....................

‘मोदींना हे कसे काय जमते?’

मोदी आणि पवार यांनी एकमेकांचे गुणगान गायले. मोदी म्हणाले, ‘राजकारणात एकदाही खंड न पडता निवडून येणे हे अवघड आहे. पवार यांनी हे कर्तृत्त्व केले आहे. त्यांनी शेती आणि राजकारणात काही बाबी मला बोट धरून शिकविल्या,’ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीला २५ वर्षे होत असल्याचेही मोदी यांनी कौतुक केले. त्यानंतर पवार यांनीही मोदींच्या कारभाराचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘मोदी काल जपानमधे होते. तेथून रात्री आल्यानंतर आज सकाळी गोव्यात, दुपारी बेळगावात आणि संध्याकाळी पुण्यात आले. मोदींना हे कसे काय जमते?’

.....................

इथेनॉलचे दर कमी होत आहेत...

साखर उद्योगांनी इथेनॉलच्या उत्पादनावर भर देण्याचे आवाहन मोदी यांनी केले. त्यांचे भाषण झाल्यावर पवार हे पुन्हा उभे राहिले. त्यांनी इथेनॉलच्या दराकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘इथेनॉलचे दर कमी होत आहेत. मोदी यांनी त्याकडे लक्ष द्यावे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’कडून चहा-पाणी

$
0
0

रांगेतील नागरिकांसाठी राबवला उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, कात्रज

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे शहरातील बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. बँकेमध्ये रांगांत तासनतास उभ्या राहणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन खासदार वदंना चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना केले आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस प्रशांत गांधी यांनी रांगेतील नागरिकांसाठी पाणी, चहा, तसेच काही गरजूंना बिस्किटांचे वाटप केले. परिसरातील बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना चक्कर येण्याचे प्रकार घडले. त्यामुळे प्रमुख बँकांच्या आवारात चहा-पाणी देण्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस माऊली दारवटकर यांनी ‘बँक आँफ महाराष्ट्र’च्या धनकवडी येथील शाखेमध्ये रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्या नागरिकांना पाणीवाटप केले. ‘केंद्र सरकारने तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या निर्णयानंतर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून पर्यायी उपाययोजना राबवण्यात सरकार कमी पडले आहे,’ अशी टीका दारवटकर यांनी केली. या वेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे रांगेतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यतेलांना दरवाढीची‘उकळी’

$
0
0

बेसनाचे दर १५० रुपयांनी घटले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोटाबंदीच्या आदेशामुळे सामान्य माणसाबरोबर बाजारपेठेवरही परिणाम झाल्याचे शनिवारी दिसून आले. बहुतांश घाऊक भुसार व्यापार ठप्प झाला आहे. खाद्यतेलांचे दर तेजीत असून, बेसनाचे दर १५० रुपयांनी घटले आहेत.

मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात रवा, आटा, मैदा, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळी, कडधान्ये, नारळ, गोटा खोबरे, साबुदाणा, शेंगदाणा, साखर, गूळ, भगर, हळद या वस्तूंचे दर स्थिर राहिले आहेत.

मार्केट यार्डात नोटाबंदीमुळे प्रामुख्याने आवकेवर परिणाम होऊ लागला आहे. मोटारभाडे रोखीने द्यावे लागत असून, चालकाकडून शंभर रुपयांच्या नोटांची मागणी केली जात आहे. पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. खेळते भांडवलच हातात असून नसल्यासारखे झाल्याने व्यापारावर परिणाम झाला आहे. बाहेरून धान्याची मागणी करता येत नाही आणि चलन नसल्याने ग्राहकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे एकूणच व्यापार ठप्प झाल्याची स्थिती आहे.

‘मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना पैसे असून देता येत नाहीत. ग्राहकांकडून पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा घेतल्या, तरी त्या बँकेत स्वीकारल्या जात नाहीत. पैसे उपलब्ध नसल्याचे बँकेत सांगितले जात आहे. त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे,’ असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, शेंगदाण्याच्या १५ किलोच्या डब्यामागे ५० रुपये, रिफाइंड तेलामागे ५० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन, सरकीच्या दरात प्रत्येकी १० रुपयांची वाढ झाली आहे. खोबरेल तेलाचे दर स्थिर आहेत. खाद्यतेले मागील आठवड्याप्रमाणे तेजीत आहेत. दिवाळीनंतर मंदीची स्थिती असल्यासारखे चित्र आहे. गुजरात लचकारी, कोलम तांदळाची आवक सुरू झाली आहे. त्याचा दर्जा उत्कृष्ट असल्याने दर सामान्यांना परवडणारे आहेत. पुढील आठवड्यात मध्य प्रदेशातील कोलमची आवक सुरू होईल.

..................

खाद्यतेले (१५ किलोचे दर रुपयांत)

शेंगदाणा तेल : १६५० ते १७००

रिफाइंड : १४७५ ते २१००

सोयाबीन : १११० ते ११८०

सरकी : १०४० ते ११८०

बेसन : ३०५० ते ३३०० (५० किलो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळभाज्यांची आवक थंडावली; दर स्थिर

$
0
0

नोटाबंदीचा मार्केट यार्डातील व्यवहारांवर परिणाम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी थंडीमुळे फळभाज्यांची आवक घटली; तरीही मागणी फारशी नसल्याने फळभाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. तसेच नोटाबंदीमुळे मार्केट यार्डातील खरेदी-विक्रीवर सुमारे ५० टक्के परिणाम झाला आहे.

सातारी आल्यासह कैरीचे दर उतरले आहेत, तर हिरव्या मिरचीच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. पालेभाज्या मात्र स्थिर आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक थंडावली. रविवारी १४० ते १५० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरातमधून तीन ट्रक कोबीची आवक झाली. कर्नाटक, मध्य प्रदेशातून हिरव्या मिरचीचे आठ ते दहा टेम्पो आले. तमिळनाडू, आंध्र प्रदेशातून शेवग्याच्या चार ते पाच टेम्पोंची आवक झाली.

साताऱ्यातून आल्याच्या बावीसशे पोत्यांची, तर टोमॅटोच्या साडेचार ते पाच हजार क्रेटची आवक झाली. १२ ते १४ टेम्पो कोबी, १५ ते १८ टेम्पो फ्लॉवर, १० ते १२ टेम्पो ढोबळी मिरच्या, सहा ते आठ टेम्पो हिरव्या मिरच्या, पाच-सहा टेम्पो गाजरे, दोन-तीन टेम्पो शेवग्याच्या शेंगा, तर एक टेम्पो मटारची आवक झाली. सहा टेम्पो तांबडा भोपळा, चार टेम्पो भावनागरी हिरव्या मिरच्या, तर पाच ते सहा टेम्पो वालवरची आवक झाली.

दिल्लीतून गाजराची आवक सुरू झाली असून, ४०० पिशव्या गाजरे दाखल झाली आहेत. ही आवक तीन महिने सुरू राहील. कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू येथून १०० पेट्या तोतापुरी कैऱ्यांची आवक झाली आहे. गावरान कैरीला दहा किलोला २५० ते ३०० रुपये, तर तोतापुरी कैऱ्यांना ३५० ते ४०० रुपये दर मिळाला आहे.

प्रत्येकी ५० ते ६० ट्रक नव्या आणि जुन्या कांद्याची आणि बटाट्याची आवक झाली आहे. मध्य प्रदेशातून चार हजार गोण्या लसूण बाजारात दाखल झाली आहे. कोथिंबीर आणि मेथीच्या प्रत्येकी सुमारे सव्वा लाख जुड्या, तर शेपूच्या दहा हजार गड्ड्यांची आवक झाली आहे.

.................

मासळीची आवक घटली

नोटाबंदीमुळे गणेश पेठेतील मासळी बाजारावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. बंदरातून होणारी आवक रविवारी घटली. सुमारे ३० टक्के व्यवसायावर परिणाम झाल्याचे मासळीचे व्यापारी सांगतात. खाडीच्या मासळीची १०० ते २०० किलो एवढी आवक झाली. मटणाचे दर स्थिर आहेत, तर चिकनच्या दरात दहा रुपयांनी घट झाली आहे. चिकनला रविवारी मागणी कमी होती.

..............

फूलबाजारात व्यवहार ठप्प

फूलबाजारात मध्यम स्वरूपाची आवक झाली. आर्थिक उलाढाल ठप्प झाली असून, रोखीने व्यवहार करणाऱ्यांना अडचण येऊ लागली आहे. त्यामुळे फुलांच्या बाजारात उधारी, तसेच चेकने व्यवहारावर भर दिला गेला.

............

फळबाजारालाही फटका

नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांनी काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून फळांची खरेदी थांबवली. बाहेरील राज्यांतून मागवल्या जाणाऱ्या सफरचंदासह संत्री-मोसंबीच्या फळांच्या खरेदीबाबत हात आखडता घेण्यात आला. स्थानिक भागातील फळांच्या आवकेवरच व्यवहार करण्यास व्यापाऱ्यांनी पसंती दिली. परिणामी फळांची आवकही घटली.

हिरव्या लिंबांची आवक सर्वाधिक असून, लोणचे उत्पादकांनी केवळ पिवळ्या रंगाच्या लिंबांना पसंती दिली. लिंबाच्या आठ हजार गोण्यांची आवक झाली. डाळिंबाची ४० ते ५० टन आवक झाली असून, त्याच्या दरात २० टक्क्यांनी घट झाली आहे. संत्र्याच्या ८०० पेट्या आणि २५ टन मोसंबीची आवक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती-आघाडीचे चित्र स्पष्ट नसल्याने इच्छुकांची पंचाईत

$
0
0

एकच उमेदवारी अर्ज दाखल

म. टा. वृत्तसेवा, सासवड

सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत राजकीय पक्षांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याने इच्छुकांची पंचाईत होऊ लागल्याचे जाणवत आहे. विद्यमान सत्ताधारी शहर जनमत विकास आघाडीचे प्रभागातील सर्व इच्छुक आपला उमेदवारी अजेंड्याची छापील परिचयपत्रके घेऊन प्रचार करत आहेत; मात्र विरोधकांच्या आघाडी-युतीत अजून सन्नाटा आहे आणि केंद्र सरकारने पाचशे-हजारच्या नोटांवर बंदी आणल्याने मतदारराजाही शांत आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे चित्र अद्यापही गुलदस्त्यात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभागांमध्ये स्थानिक आग्रह विचारात घेऊन सत्ताधारी जनमत आघाडीविरोधात योग्य पर्यायी मित्रपक्षांची चाचपणी अजित पवार यांच्या सूचनेनुसार सुरू केली आहे. या पालिकेत भाजपला अद्याप खाते उघडायचे असून, युती झाल्यास निम्म्या जागांचा आग्रह धरण्याची शक्यता विचारात घेता शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भूमिका स्पष्ट न झाल्याने उमेदवार संभ्रमात आहेत. कदाचित सोमवारी आजी-माजी मंत्र्यांची बैठक होऊन हा मार्ग सुकर होण्याची शक्यता दोनही पक्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

माजी मंत्री दादा जाधवराव-अजित पवार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यातून समान निवडणूक चिन्हाचा विचार करून मार्ग काढतील, अशी चिन्हे दिसत आहेत. एकंदरीत सत्ताधारी आघाडीविरोधात महायुती-आघाडीचे स्वरूप प्रभागांमध्ये राहील, तर नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या एकाच नावावर शिक्कामोर्तब झाले तर काँग्रेसप्रणित जनमत विकास आघाडी आणि विरोधक अशी सरळ लढत होऊ शकते.

पेशाने डॉक्टर असलेले राजेश विजय दळवी यांनी घरोघरी जाऊन भेटण्यात सध्या तरी आघाडी घेतली आहे. जनमत आघाडीचे अनेक इच्छुक असून, अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार शोधायचा आहे. प्रभागरचना गुंतागुंतीची आणि किचकट असल्याने उमेदवारच गोंधळात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठ तासांत दोन स्फोट

$
0
0

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना

म. टा. प्रतिनिधी, दौंड

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अल्कली अमाइन्स कारखान्यात स्फोट होऊन दोन कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, दोघांनाही उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात आले आहे. कारगिल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगार होरपळल्याच्या घटनेनंतर आठच तासांना औद्योगिक वसाहतीत हा दुसरा स्फोट झाला.

स्फोटाच्या आवाजाने जवळपासच्या परिसरात एकच घबराट झाली. कंपनीजवळच्या मुकादम वस्तीवरील नागरिक स्फोटाच्या आवाजाने घराबाहेर आले. हा आवाज दीड-दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. सूरज भारत आव्हाड असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून, हरी अप्पू नायर किरकोळ जखमी झाला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. कंपनीकडून याबाबत कोणतीही माहीती देण्यास नकार देण्यात आला. पोलिसांनादेखील गेटवरच थांबवण्यात आले होते.

या भागात तीन महिन्यांत आगीच्या आणि स्फोटाच्या चार दुर्घटना घडल्या असून, आधीच वायू आणि जलप्रदूषणाने त्रस्त असलेल्या परिसराला आता मोठ्या स्फोटांच्या भीतीने ग्रासले आहे. १९ सप्टेंबरला कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस कंपनीत स्फोट झाला होता. या स्फोटात दोन जण जखमी, तर दोन जण जागीच ठार झाले होते. त्यानंतर ११ ऑक्टोबरला पटनी फोम या कंपनीला भीषण आग लागली होती. अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी दीड तासात आठ फेऱ्या केल्यानंतर ही आग आटोक्यात आली होती. त्यामुळे या दुर्घटनांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची, काळजी घेण्याची आणि सुरक्षिततेचे उपाय राबवण्याची मागणी विविध पातळ्यांवरून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या सल्लागारांमुळे नोटांचा गोंधळ

$
0
0

‘अर्थक्रांती’चे अनिल बोकील यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले प्रयत्न अत्यंत प्रमाणिक आहेत; मात्र एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याबाबतची ‘अर्थक्रांती’ची सूचना मोदी सरकारने अर्धवट अंमलात आणली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाला पंतप्रधान मोदींचे सल्लागारच जबाबदार आहेत,’ अशी टीका ‘अर्थक्रांती प्रतिष्ठान’चे अनिल बोकील यांनी रविवारी केली.

प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाड्याच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून आयोजित ‘विनम्र आवाहन’ या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी बोकील बोलत होते. केंद्र सरकारच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ‘अर्थक्रांती’च्या वाटचालीच्या पुढील टप्प्यांविषयी बोकील यांनी या वेळी भाष्य केले. प्रतिष्ठानने यापूर्वीच्या काळात मोठ्या किमतीच्या नोटा बंद करण्याबाबत केलेल्या सूचनांचा सरकारने केलेला स्वीकार ही सुरुवात आहे. पुढील काळात प्रतिष्ठानचे अर्थक्रांतीविषयक कार्य केवळ देशापुरते मर्यादित न ठेवता, ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या धर्तीवर जगभरात पसरविण्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले.

बोकील म्हणाले, ‘मोठ्या किमतीच्या नोटा बंद करण्याच्या जोडीने ‘अर्थक्रांती’ने इतर काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या. या सूचनांची एकाच वेळी अंमलबजावणी होणे गरजेचे होते. एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक जणांनी आपण प्रमाणिक असतानाही आपल्याला निष्कारण त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड सुरू केली आहे. ‘अर्थक्रांती’ने सुचवलेल्या मार्गावर चालताना ‘नो एन्ट्री’तून घुसण्याचा मार्ग सरकारने निवडला आहे. त्यामुळे हा गोंधळ सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निरागस असून, त्यांचे अश्रू हे प्रामाणिक आणि तितकेच खरे आहेत; मात्र त्यांच्या सल्लागारांनी घाई केल्याने, हा गोंधळ निर्माण झाला आहे.’ प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर, अभिजित धर्माधिकारी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.

..................

‘दाऊदही अपराधी नाही...’

‘कोणालाही शिक्षा करा, अशी सूचना ‘अर्थक्रांती’ने केलेली नाही. आमच्या लेखी दाऊदही अपराधी नाही. त्या वेळच्या परिस्थितीमुळे तो तसा बनला. त्यामुळेच देशातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी मानसिकता नव्हे, तर परिस्थिती बदलणे गरजेचे आहे,’ असे मत बोकील यांनी या वेळी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्टार एमआयडीसी’चा स्टार दर्जा हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

नियोजित औद्योगिक प्रदर्शन केंद्राला चालना मिळावी, शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारावा, पिंपरी-चिंचवडला ‘स्टार एमआयडीसी’चा दर्जा मिळावा, मध्यवर्ती औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा, एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व्हावी या मागण्या पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अॅन्ड अॅग्रिकल्चरच्या प्रतिनिधींनी केल्या आहेत. याशिवाय, स्वतंत्र औद्योगिक टाउनशिपचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसह विविध घटकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘मटा जाहीरनामा’ या व्यासपीठावर या प्रतिनिधींनी शहराविषयीचा अजेंडा मांडला. शहरात उद्योजकांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष होते. एमआयडीसीअंतर्गत सुविधांकडे पुरेसे लक्ष नसते. प्रशासन आणि उद्योजकांमध्ये समन्वय नसल्यामुळे तक्रारींचे निराकरण होत नाही. औद्योगिक क्षेत्रातील चोऱ्यांवर नियंत्रण नाही, या तक्रारींचा पाढाच प्रतिनिधींनी वाचला.

पिंपरी-चिंचवडला औद्योगिक नगरीचा दर्जा आहे. देशात अतिशय वेगाने विकसित होणारे शहर म्हणून लौकीक आहे. त्या तुलनेत उद्योजक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद होत नाही, ही खेदाची बाब म्हणता येईल. या दोघांमधील दरी वाढत आहे. नियोजन करताना समन्वय असायला हवा. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. महापालिकेच्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न औद्योगिक क्षेत्रातून मिळते. त्या तुलनेत सुविधांवर मात्र केवळ दहा टक्केच खर्च होतो, असा आमचा दावा आहे. वास्तविक, उद्योग क्षेत्रातील नागरी सुविधांसाठी पुरेशा प्रमाणात खर्च होणे आवश्यक आहे. त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, औद्योगिक क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पाणीपुरवठा होतो. पालिकेकडून नाही. तरीही महापालिका प्रशासनामार्फत मिळकतकर वसुली करताना पाणीपुरवठा लाभ कर वसूल केला जातो. यासंदर्भात पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी आहे. शहरातील ‘एमआयडीसी’ला स्टार दर्जा मिळाल्यास पुरेशा सुविधा मिळण्यातील अडथळा दूर होईल, असे वाटते.
अॅड. अप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अॅन्ड अॅग्रीकल्चर)

औद्योगिक सांडपाण्याची विल्हेवाट ही प्रमुख समस्या आहे. औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे ते नदी आणि नाल्यांमध्ये मिसळले जाते. त्यातून जलप्रदूषणाची समस्या तयार होते. यावर उपाय म्हणून महापालिका, एमआयडीसी आणि उद्योजक यांच्यावतीने शहरात संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महापालिका स्तरावर चर्चा झाली. निधी संकलनाचे प्रयत्न झाले. मात्र, अद्यापही प्रकल्प मार्गी लागलेला नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी आहे. याशिवाय, औद्योगिक परिसरात पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. सार्वजनिक पथदिवे व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. अनेक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यावर वेळीच उपाययोजना राबविण्याची गरज आहे. औद्योगिक क्षेत्रात पोलिस स्टेशन असूनही चोरट्यांवर जरब नाही. चोऱ्यांचे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महापालिकेचे आयुक्त काय किंवा महापौर काय आमचे वाटतच नाही. ही दरी कमी होण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी दुवा होणे आवश्यक आहे. शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा एकही पुतळा नाही. तो उभारण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यायला हवा.
विनोद बन्सल (संचालक, पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अॅन्ड अॅग्रीकल्चर)



औद्योगिक क्षेत्र म्हणजे पालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने दुभती गाय आहे. परंतु, या घटकाकडे म्हणावे तितके पालिकेचे लक्ष नाही. स्वतंत्र औद्योगिक नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वंकष विकास शक्य होता. त्या दृष्टिने प्रस्तावही तयार आहे. परंतु, ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. शहरातील प्रमुख रस्ते प्रशस्त आणि सुस्थितीत आहेत. मात्र, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक आहे. परंतु, प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होते. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या खर्चात वाढच होते. त्यावर नियंत्रण असायला हवे. उद्योग क्षेत्रातून पालिकेला वारंवार सूचना केल्या जातात. परंतु, त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आम्हीही सूचना करण्याचे सोडून दिले आहे. अंतर्गत बससेवेच्या सुविधेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उद्योजक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवाद निर्माण होण्याच्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रशासकीय पातळीवर आयुक्त दर्जाचे दोन अधिकारी असायला हवेत. त्यामुळे कामात सुधारणा होईल, असे वाटते. प्राधिकरण, एमआयडीसी आणि पालिका या तीन यंत्रणांमध्ये सुसंवाद असायला हवा. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. याशिवाय बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कृतीशील प्रयत्न होणे गरजेचे आहे.
पी. के. सावंत (संचालक, पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अॅन्ड अॅग्रीकल्चर)



सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णतः सक्षम नसल्यामुळे बऱ्याचदा रिक्षा वाहतुकीवर अवंलबून रहावे लागते. परंतु, अनेक रिक्षाचालक गैरफायदा घेतात. येथे रिक्षामीटर सक्ती नसल्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांची लुबाडणूक होते. त्याकडे प्रशासकीय पातळीवर आवश्यक दखल घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहरात रस्तेविषयक विकासकामे चांगल्या पद्धतीने झाली आहेत. ही बाब इतर शहरांच्या तुलनेत लगेच दृष्टीस पडते. स्वतंत्र टाउनशिपची निर्मिती झाल्यास महापालिकेवरील बोजा कमी होईल, अशी अपेक्षा आहे. शहरातील चौकांच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेण्यास अनेक उद्योजक तयार आहेत. त्यासाठी पालिका स्तरावर दखल घेणारा अधिकारी हवा आहे. एमआयडीसीच्या आरक्षित जागांवर उद्याने विकसित व्हायला हवीत. औद्योगिक भूखंड वाटप प्रक्रिया सातत्याने आणि सुलभ व्हावी.
एस. पी. भागवत (अधिकारी)


वीजपुरवठा ही एमआयडीसीच्या दृष्टिने महत्त्वाची बाब आहे. यासंदर्भातील जबाबदारी महापालिकेची नसली, तरी महावितरण कंपनीशी समन्वयक म्हणून लोकप्रतिनिधींनी काम करायला हवे. वीज आयोग रद्द करण्यासाठी राज्य शासनावर दबाव निर्माण करायला हवा. लोकप्रतिनिधींनी उद्योग क्षेत्रातील प्रमुख मागणी म्हणून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या योजना जाहीर व्हायला हव्यात. त्यांना स्थानिक करामध्ये सवलत द्यायला हवी. उद्योग टिकला, तर कामगार टिकतील, ही भावना बाळगून कामे करायला हवीत. लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी छोटे गाळे निर्माण करून द्यायला हवेत. हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्रात उद्योग सुरू करताना ‘फायर एनओसी’साठी हिंजवडीला जावे लागते. त्याचे कार्यालय पिंपरी-चिंचवडमध्ये असावे.
सागर शिंगाडे (अधिकारी)


काय करायला हवे?

- नियोजित औद्योगिक प्रदर्शन केंद्राला चालना मिळावी.

- शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारावा.

- पिंपरी-चिंचवडला ‘स्टार एमआयडीसी’चा दर्जा मिळावा.

- मध्यवर्ती औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा.

- एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व्हावी.

- औद्योगिक क्षेत्रातील भुरट्या चोरट्यांवर पोलिसांची वचक असावा.

- एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असल्यामुळे पालिकेकडून वसूल होणारा पाणीपुरवठा लाभ कर रद्द व्हावा.

- पालिका प्रतिनिधी आणि उद्योजक यांच्या सुसंवाद असावा.

- एमआयडीसीच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणे हटवावीत.

- औद्योगिक पुनर्वसन प्रकल्पांतर्गत गाळ्यांचे वाटप तातडीने व्हावे.

- शहरात कुटीर उद्योगाला चालना मिळण्यासाठी योजना असाव्यात.

- माथाडी कामगारांच्या जाचातून सुटका होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.



शहरातील उपलब्ध सुविधांबाबत

प्रतिनिधींनी दिलेले रेटिंग

पाणीपुरवठा - ८/ १०

सांडपाणी व्यवस्थापन - २/ १०

सार्वजनिक वाहतूक - ३/ १०

सार्वजनिक आरोग्य - ४/ १०

उद्याने, करमणूक - ६/ १०

महापालिका शाळा - ५/ १०

कर आकारणी - ४/ १०

पार्किंग - ३/ १०

रस्ते-फूटपाथ - ७/ १०

बेस्ट सिटी - ८/ १०

शब्दांकन : सुनील लांडगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर स्फोटप्रकरणी दुकानदारावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बेकायदा घरगुती वापराच्या मोठ्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून दुसऱ्या लहान सिलिंडरमध्ये भरताना स्फोट होऊन दुचाकीस्वाराच्या झालेल्या मृत्युप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (१३ नोव्हेंबर) चिखली येथे ही दुर्घटना घडली.

विष्णू मोरे यांच्यासह एजन्सीतील इतर कामगारांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निगडी ठाण्याचे सहायक निरीक्षक देवेंद्र विष्णू चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. भगवान दत्तात्रय हिंगे (४५, रा. काळभोरनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर, संतोष शिवाजी साने (रा. मोरेवस्ती, चिखली) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मोरे यांची चिखली येथे ‘शेषनाग’ या नावाने गॅस एजन्सी आहे. रविवारी एजन्सीतील कामगार धोकादायक रीतीने मोठ्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरत होते. त्या वेळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे गॅसची टाकी उडाली आणि दुचाकीवरून जाणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गॅस एजन्सी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

शॉक लागून तरुणाचा मृत्यू

घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना मोटारीच्या उघड्या विद्युत तारेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी अकराच्या सुमारास देहूरोड येथील मुकाई चौकात घडली. रमेश कुमार चौधरी (२०, रा. मुकाई चौक, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश हा मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. तो देहूरोड येथील एका स्वीट होमच्या दुकानात काम करीत होता. त्याच्या मालकाच्या घराचे काम सुरू आहे.

सोमवारी सकाळी तो बांधकामावर पाणी मारत होता. त्या वेळी मोटारीच्या उघड्या विद्युत तारेचा त्याला शॉक लागल्याने तो खाली कोसळला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

कर्जमंजुरीच्या बहाण्याने फसवणूक

बड्या फायनान्स कंपनीतीलचे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एकाने प्रौढाची एक लाख ११ हजार ३०० रुपयांची फसवणूक केली. एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१५ या दरम्यान चिंचवड येथे हा प्रकार घडला आहे.

नारायण दास (पूर्ण नाव पत्ता उपलब्ध नाही) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक कुंडलिक कुंभार (५१, रा. थेरगाव, चिंचवड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण दास याने अशोक कुंभार यांच्या मोबाइलवर फोन केला. त्यांना नामांकित कंपनीतील फायनान्सचे कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. कर्ज मंजूर करण्यासाठी अशोक कुंभार यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांना २६ एप्रिल २०१५ ते ११ नोव्हेंबर २०१५ दरम्यान वेळोवेळी नारायण दास या नावाने असलेल्या बँक खात्यावर एक लाख ११ हजार ३०० रुपये भरण्यास सांगितले.

पैसे भरूनही कर्ज मिळाले नसल्यामुळे अशोक कुंभार यांनी नारायण दास यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो टाळाटाळ करू लागला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. वाकड पोलिस ठाण्याचे फौजदार केंद्रे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथदिंडी बाबा आमटेंना समर्पित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात होणाऱ्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी थोर समाजसेवक बाबा आमटे यांना समर्पित करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. डॉ. विकास आमटे यांनी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीवर केलेल्या टिप्पणीनंतर संयोजकांनी ही ग्रंथदिंडी बाबा आमटे व त्यांच्या ‘भारत जोडो’ या विचाराला समर्पित करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ही ग्रंथदिंडी आनंदवन येथे जाणार आहे.

‘ग्रंथदिंडी काढायला ‘आनंदवन’ने सुरुवात केली. त्यानंतर त्याची ‘कॉपी’ अनेकांनी करून ग्रंथदिंडी काढली. आजही विविध साहित्य संमेलनांमध्येही ग्रंथदिंडी काढली जाते. मात्र, ही ग्रंथदिंडी काढताना आनंदवनचे साधे स्मरणही केले जात नाही,’ अशी टीका डॉ. विकास आमटे यांनी मध्यंतरी पुण्यात एका कार्यक्रमात केली होती. १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पंजाबी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या ग्रंथदिंडीला १० नोव्हेंबर रोजी पंजाबमधून सुरुवात झाली आहे. २२ भाषांचे ग्रंथ त्यामध्ये ठेवण्यात आले आहेत. भाषा अनेक; देश एक ही संकल्पना मांडण्यात आली आहे. ‘ग्रंथदिंडी बाबा आमटे व त्यांच्या ‘भारत जोडो’ या विचाराला समर्पित करण्याचे ठरवले आहे,’ असे संमेलनाचे संयोजक संजय नहार यांनी ‘मटा’ला सांगितले.

दरम्यान, ही ग्रंथदिंडी आज (मंगळवार) सकाळी वरोरा येथील आनंदवन प्रकल्पात पोहचेल. एका कार्यक्रमानंतर ही ग्रंथदिंडी पुढे नांदेडला जाणार आहे. १८ तारखेला सकाळी गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी ग्रंथदिंडीचे स्वागत डॉ. विकास आमटे करणार आहेत.

शीख धर्माची स्थापना झाली, ते अनंतपूर साहेब ठिकाण तसेच अमृतसर, जालिंदर, जयपूर, अजमेर येथील दर्गा, उज्जैन असा प्रवास आत्तापर्यंत झाला आहे. शीख धर्मीयांसह सर्व पंजाबी भाषिक व सर्व जाती, धर्मातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. ठिकठिकाणी ग्रंथदिंडीचे स्वागत होत आहे. महाराष्ट्राविषयी असणारे कुतूहल ठिकठिकाणी जाणवत आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने अडचण येत आहे. पण, दिंडीची माहिती मिळाल्यानंतर लोक स्वत:हून मदत करीत आहेत. दिंडीत एकूण तीन वाहने असून १८ लोक प्रवास करत आहेत.

- वैभव वाघ व सचिन जामगे, दिंडीचे संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>