Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सर्जनशीलतेसाठी हवे अस्वस्थ वातावरण

$
0
0

‘झिम्मा’ नंतर ‘बाई’ या पुस्तकाची संकल्पना काय आहे ?
‘बाई’ या पुस्तकाची कल्पना दिलीप माजगावकर व अंबरीश मिश्र यांची आहे. माझ्याविषयी अनेकांनी लिहून ठेवले होते. त्याचे पुस्तक करता येईल, असे त्यांना वाटले. दिग्दर्शकाचे नाटककाराशी, कलाकाराशी संबंध कसे असतात या विषयी त्या-त्या लोकांनी लिहिले आहे, अशा लेखांचे हे पुस्तक आहे. कलाकारांच्या संबंधातून कलेची निर्मिती कशी होते, हे या पुस्तकातून वाचकांना समजू शकेल. आजच्या नवशिक्या मुलांना काही संदर्भ माहिती नसतात. या क्षेत्रात येणाऱ्या मुलांना जुने संदर्भ कळू शकतील.
...
लेखन प्रक्रियेशी तुमचा संबंध कसा होता ?
खरं सांगू फारसा सबंध नव्हता. कारण माझ्याविषयी केलेल्या लिखाणाशी माझा संबंध फक्त ‘ओके’ म्हणण्यापुरता आला. पण मीही काही लोकांवर लिहिले आहे. त्यामध्ये भास्कर चंदावरकर, दामू केंकरे, श्री. पु. भागवत, भक्ती बर्वे व विजय तेंडुलकर यांच्याविषयीचे लेख आहेत. नवीन पुस्तक वाचकांना आवडेल, अशी आशा आहे.
....
पुरुष, घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर या नाटकांनी समाजमन ढवळून काढले, अशा नाटकांची निर्मिती का होत नाही?
आमची पिढी ज्या काळात काम करत होती, तो काळ देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा होता. ‘स्वतंत्र भारताचे आम्ही नागरिक आहोत,’ हे मूल्य, संस्कार आमच्यावर होते. आपल्याला, आपल्या देशाला जागतिक पातळीवर स्थान मिळवून द्यायचे आहे, हीच आमच्या कामाची ऊर्जा होती. प्रसिद्धी, पैसा हा प्रकार नव्हता. आजच्या मुलांना प्रसिद्धीची भारी हौस आहे. पण ते चांगले काम करू शकतात, असे मला वाटते. उच्च, कनिष्ठ असे काही कलेमध्ये नसते. चांगल्या कलाकृती आजही समोर येत आहेत.
...
आजच्या रंगभूमीविषयी तुमचे मत काय आहे?
आजच्या मुलांना बरेचसे संदर्भ माहिती नसतात, असे मला कार्यशाळा घेताना जाणवते. पण एक खरे आहे की विचारांची पद्धत बदलली असली तरी पाया तोच आहे. तरुणाईचे वातावरण कधीही बदलत नसते. आमच्या वेळचे तसे होते आता असे आहे, असे काही नसते. आव्हाने तीच असतात. माझा आजच्या मुलांवर विश्वास आहे. ज्ञान मिळवण्याचे त्यांना अनेक पर्याय आहेत. तरुणाई हुशार आहे. तेच मार्ग काढतात. ही मुले माझे आयुष्य आहेत. चित्रपटात खूप प्रयोग होत आहेत. त्याकडे पाहायला हवे.
००
नव्या पिढीला काय सांगाल?
पैसा आणि प्रसिद्धी याच्या आहारी न जाता सगळे काही करता येते. नाटक देखील करता येते. आम्ही ते केले आहे. प्रत्येक काळात कलाकारासमोर आव्हाने असतात. कलेचा दृष्टिकोन असेल तर वाकडेतिकडे काही होत नाही. ‘स्वत:वर खूश झालात की तुम्ही संपता,’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. स्वतःवर खूश झाले की सगळा गोंधळ होतो. ही गोष्ट कलाकारांनी लक्षात ठेवायला हवी.
...
निर्मिती प्रक्रिया कशी असते?
कलेसाठी अस्वस्थता लागते. आपण स्थिरावलो तर आपल्यातील सर्जनशीलता संपते. कलेच्या सर्जनशीलतेचे टप्पे असतात. सर्जनशीलता वर जाते, तशी ती खाली देखील येते. सर्जनशीलता ही समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. अस्वस्थता असल्याशिवाय सर्जनशील कलेचा अविष्कार घडत नाही आणि व्यवस्थेला प्रश्नही विचारता येत नाहीत. त्यामुळे अस्वस्थेतूनच आकार घेणारी ही निर्मिती असते.
....
तुमच्या नाटकांनी समाजमन ढवळून काढले. सेन्सॉरशिप हा मुद्दा होताच. आत्ताच्या काळाबद्दल सांगाल?
आव्हाने प्रत्येक काळात असतात. आव्हानांशिवाय आयुष्य नाही. चढ-उतार असणारच. या आव्हानांमुळेच अस्वस्थथा असते. कलेसाठी ती आवश्यक प्रक्रिया आहे. प्रत्येक वेळा ती राजकीय स्वरूपाची असावी, याची गरज नाही. कलाकारासाठी अंतरिक अस्वस्थता महत्त्वाची आहे. प्रत्येक काळाचे काही प्रश्न आहेत. असे वातावरण असल्याशिवाय अस्वस्थता येणार नाही. त्यातून सर्जनशील कला जन्म घेणार नाही आणि त्यातून प्रश्न देखील उपस्थित होणार नाही. ही प्रक्रिया नीट समजून घेतली तर अशा वातावरणाची गरज लक्षात येईल.
...
आताच्या वातावरणाविषयी काय वाटते?
बदल तर आपण थांबवू शकत नाही. आम्ही गांधीचे, जेपींचे चाहते होतो. पण त्या विचारातून राजकीय सत्ता मिळवणे वगैरे विचार नव्हता. आता समाजात जे काही चाललय ते बरोबर नाही. पण या प्रकारांना तोंड तर दिलेच पाहिजे. खुर्चीत बसून चालणार नाही ना? आपण व्यक्त होत राहिले पाहिजे. सतत प्रश्न विचारत राहिले पाहिजे.
...
प्रेक्षकांच्या अभिरुचीत बदल झालाय का?
कलेची समज तर हवीच. कलासाक्षरता वाढलीय का, याचा मी सामाजिक मानशास्त्राप्रमाणे काही अभ्याक किंवा संशोधन केलेले नाही. पण लोक सहभागी होतात. असा अनुभव आहे.
...
तुमच्या कामाची पद्धत सांगाल का?
माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. नवीन नाटके हल्ली लिहिली जात नाहीत. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांची नाटके मी रंगभूमीवर आणल्यानंतर पुढील काम तसेच झाले पाहिजे. हा माझा आग्रह आहे. बरेच दिवस झाले तसे नाटक माझ्याकडे आले नाही किंवा मला ते जाणवलेले नाही. ही सर्व मोठी प्रक्रिया असते. पण मला वाटले की हे नाटक मी केले पाहिजे तर पदर खोचून मी तालमीसाठी नक्की उभी राहीन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विनम्र आग्रह’ला पुणेकरांचा प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चलनातून मोठ्या नोटा रद्द करण्यात याव्यात, या अर्थक्रांती प्रस्तावातील एका कलमाची केंद्र सरकारने अंशत: पूर्तता केली आहे. मात्र, अर्थक्रांतीच्या प्रस्तावांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय आयोग स्थापन करावा, यासाठीचा विनम्र आग्रह उपक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारवाडा येथे रविवारीही हा उपक्रम सर्वांसाठी खुला असेल.
विश्वशांती दीप प्रज्वलित करून व तिरंगी फुगे आकाशात सोडून या उपक्रमाला प्रारंभ झाला. अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर यांनी विनम्र आग्रहमागील भूमिका मांडली. अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील आणि काही सहकारी यांनी या मागणीसाठी दिवसभर मौन पाळले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुण्यातील रिझर्व्ह बँकेचे कार्यालय, विभागीय आयुक्तालय येथे मोटारसायकल रॅली काढून प्रबोधन करण्यात आले.
शनिवारी अर्थक्रांतीच्या कार्यकर्त्यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समध्ये तर संध्याकाळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिले. विनम्र आग्रह म्हणून काही कार्यकर्त्यांनी मौन धारण केले होते. शनिवारवाड्याच्या प्रांगणातील अर्थक्रांती प्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. अर्थक्रांतीचा पाच कलमी प्रस्ताव अभ्यासून, उच्चस्तरीय आयोग नेमून विशिष्ट कालावधीत त्यावर निर्णय घ्यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑनलाईन पत्र पाठवण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्याचाही अनेकांनी लाभ घेतला. रविवारी सायंकाळी पाच वाजता शनिवारवाडा येथे या उपक्रमाचा समारोप होईल. या वेळी अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील पुढील भूमिका स्पष्ट करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोटा रद्द’चा त्रास सामान्यांना नको

$
0
0

माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘अधिक मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे व पैसे बँकेतच भरण्याच्या निर्णयामुळे काळा पैसा असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या योजनेद्वारे दहा टक्के काळा पैसा जरी व्यवस्थेत आला, तरी ही योजना यशस्वी ठरेल, मात्र, नागरिकांना खूप दिवस या निर्णयाचा त्रास होऊ नये,’ असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी शनिवारी व्यक्त केले.
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सतर्फे आयोजित ‘मनन २०१६’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटन थोरात यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर थोरात यांनी ‘आर्थिक धोरण, आर्थिक धोरण समिती आणि केंद्रीय बँकांचे स्वातंत्र्य’ या विषयावर विचार मांडले. या वेळी राजस परचुरे उपस्थित होते.
या वेळी उषा थोरात म्हणाल्या, ‘बनावट नोटा नष्ट करणे आणि काळा पैसा प्रवाहात आणण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. देशात सुमारे १५ लाख कोटी रूपयांचा काळा पैसा असण्याची शक्यता आहे. यापैकी किमान १० टक्के म्हणजे दीड लाख कोटी पैसा उघड झाला तरी ही योजना यशस्वी ठरली, असे म्हणता येईल. मार्चपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.’
‘सर्वसामान्यांनीही या निर्णयाचा स्वागत केले आहे. मात्र, नव्या नोटांचा पुरवठा कमी असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बँकांना नव्या नोटांचा पुरवठा लवकरात लवकर करणे आवश्यक आहे, नाही तर नागरिकांची गैरसोय होऊन अडचणी वाढण्याची शक्यता आहे,’ असेही थोरात यांनी सांगितले.
...
म्हणून दोन हजाराची नोट
‘एक हजार रुपयांच्या नोटेपेक्षा दोन हजार रुपयांच्या नोटेच्या छपाईचा खर्च कमी आहे. सध्या चलनात पाचशे रुपयांच्या नोटेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे दोन हजार रुपयांची नोट कमी वापरली जाईल. या हेतूनेच दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली असावी,’ असे थोरात यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करापोटी ६३ लाख जमा

$
0
0

‘नोटा रद्द’चा परिणाम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नोटा बंदी’च्या धक्कातंत्रामुळे करापोटी सुमारे ६३ लाख रुपयांची रक्कम पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडे एकाच दिवसात रहिवाशांकडून भरण्यात आली. बोर्डाच्या इतिहासात अशा प्रकारे एका दिवसात मोठी रक्कम करापोटी जमा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसह देशातील नागरिकांची झोपच उडाली. ज्यांच्याकडे पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी चक्क पैसे बदलून घेण्याचा प्रयत्न केला. तर अनेकांनी अनेक वर्षांपासून थकलेला कर, वीज बील, पाणी पट्टी तसेच विविध प्रकारचे कर्ज भरण्यास सुरुवात केली. त्याचाच फायदा पुणे महापालिकेसह पुणे कँटोन्मेंट बोर्डाला झाला.
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या रहिवाशांनी एका दिवसांत सुमारे ६३ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरला. त्यामुळे बोर्डाच्या तिजोरीत एकाच दिवशी मोठी रक्कम जमा झाली. कँटोन्मेंट बोर्डातील रहिवाशांना सकाळी दहा वाजल्यापासून बोर्डाच्या कार्यालयात पैसे भरण्यासाठी गर्दी केली होती. दुपारनंतरही गर्दी वाढत गेली. बोर्डातील रहिवाशांकडून कर भरण्यासाठी मिळत असलेला प्रतिसाद पाहून बोर्डाने देखील कर भरण्याची वेळ वाढविली. परिणामी, दीड तासाने वेळ अधिक मिळाल्याने नागरिकांना वेळेत पैसे भरण्यास मदत झाली.
‘सकाळी नऊ वाजल्यापासून बोर्डाच्या कार्यालयात नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली होती. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून बोर्डाने वेळ वाढविली. त्याशिवाय आणखी दोन खिडक्या खुल्या करून कर भरण्यासाठी नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध कऱण्यात आली. मोठ्या प्रमाणात कर वसूल होण्याची ही पहिलीच वेळ आहे,’ असे बोर्डाचे रोखपाल पीटर बेंजामिन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसात कोटींचा महसूल शनिवारी जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्या नागरिकांकडून हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढविल्याने शनिवारी पालिकेला साडेसात कोटी रुपयांचा महसूल मिळाला. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह नागरी सुविधा केंद्रात प्रॉपर्टी टॅक्स स्वीकारला जात होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत साडेसात कोटी रुपयांचा टॅक्स पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. रविवारी (१३ नोव्हेंबर) साप्ताहिक आणि सोमवारी (१४ नोव्हेंबर) गुरुनानक जयंतीची पालिकेला सुट्टी असली, तरी नागरिकांच्या सोयीसाठी मिळकतकर भरणा केंद्र सुरू ठेवली जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकारने आदेश काढून महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरून घेतला जात आहे. यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. शुक्रवारी याचा फायदा घेत रात्री बारा वाजेपर्यंत सुमारे ३६ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स पालिकेकडे भरण्यात आला आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुदत सोमवारपर्यंत वाढविण्यात आल्याने नागरिकांना सोमवारपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स भरता येणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.
शनिवारी सकाळपासूनच पालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामधून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पालिकेला सात कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. तीन हजार नागरिकांनी याचा फायदा घेतला असल्याचे पालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी सांगितले.
००००००००
कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
रविवार साप्ताहिक सुट्टी आणि सोमवार (गुरुनानक जयंती) ची सार्वजनिक सुट्टी असतानाही पालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता व्यवस्थापन, स्थानिक संस्था कर (एलबीटी), पाणीपुरवठा विभाग, शहर अभियंता, तसेच पथ विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. या सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी भरलेला टॅक्स कर्मचाऱ्यांनी जमा करुन घ्यावा, असे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत-चीन संयुक्त सराव पुण्यात

$
0
0

‘हँड इन हँड’ मालिकेचे १५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयाेजन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारत आणि चीनच्या लष्करादरम्यानचा सहावा ‘हँड इन हँड’ हा संयुक्त सराव १५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पुण्यात पार पडणार आहे. बंडखोरी आणि दहशतवादाविरोधात लढताना दोन्ही लष्करातर्फे वापरण्यात येणाऱ्या डावपेचांचा एकत्रित सराव करणे व नवे डावपेच विकसित करणे; तसेच दोन्ही लष्करांदरम्यान परस्पर सामंजस्य वाढविणे हा या सरावाचा हेतू आहे.
‘हँड इन हँड’ मालिकेतला पहिला संयुक्त सराव २००७ साली चीनमधील युनानन भागातील कनमिंगमधील मिलिटरी अॅकॅडमीत झाला होता. २००८ मध्ये भारतातील बेळगाव, २०१३ मध्ये चीन, २०१४ मध्ये पुणे, तर २०१५ मध्ये पुन्हा चीन येथे पार पडला होता. पुण्यात नोव्हेंबर २०१४ मध्ये झालेला सराव १२ दिवस चालला होता.
या मालिकेतील सहावा सराव १५ नोव्हेंबरपासून पुण्यात औंध मिलिटरी स्टेशन येथे सुरू होईल. लष्कराच्या तुकडी अर्थात कंपनीच्या पातळीवर होणाऱ्या या सरावाचे नियंत्रण बटालियन मुख्यालयातर्फे करण्यात येईल. दोन्ही देशांच्या लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गट या सरावाचे निरीक्षण करेल.
‘हा सराव तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात एकमेकांच्या शस्त्रास्त्र व यंत्रणांची ओळख करून घेतली जाईल. दुसऱ्या टप्प्यात युद्धसराव, व्यक्तिगत शस्त्रांमधून फायरिंग व ड्रीलचा सराव करण्यात येईल. याचवेळी गुप्त ठाण्यांची उभारणी, दहशतवाद्यांंचा शोध घेणे, दहशतवाद्यांनी आसरा घेतलेले घर दहशतवादीमुक्त करणे, याबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी करण्यात येणाऱ्या मदतकार्याचा सरावही केला जाईल. तिसऱ्या मुख्य टप्प्यात प्रत्यक्ष संयुक्त सराव पार पडेल,’ असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या सरावामुळे पुण्याचे लष्करी सरावासाठीचे केंद्र म्हणून असलेले महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे. चीनबरोबरच श्रीलंकेसोबतचा ‘मित्र शक्ती’ हा संयुक्त लष्करी सरावही पुण्यात पार पडला होता. त्याचबरोबर मार्च २०१६ मध्ये अमेरिका, चीन, रशिया, जपानसह १८ देशांचा सहभाग असलेला ‘एक्सरसाइज फोर्स १८’ हा भारतीय लष्कराच्या इतिहासातील सर्वात मोठा संयुक्त लष्करी सरावही पुण्यातच पार पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम शुल्कात सव्वाशे कोटींची घट

$
0
0

सहा महिन्यांत पा‌लिकेला ‌मिळाले अवघे ३२१ कोटी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या चालू वर्षाच्या (२०१६-१७) बजेटमध्ये बांधकाम शुल्काच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट तीनशे कोटींनी वाढले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष बांधकाम शुल्काच्या उत्पन्नात सव्वाशे कोटींची घट झाल्याचे समोर आले आहे. या शुल्कापोटी महापालिकेला गेल्या सहा महिन्यांत अवघे ३२१ कोटी रुपये मिळाले आहेत. मागील वर्षी (२०१५-१६) याच कालावधीत पालिकेला ४३८ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
राज्यात गेल्या वर्षी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अनेक क्षेत्रात मंदी निर्माण झाली होती. बांधकाम क्षेत्रावर देखील या मंदीचा परिणाम झाल्याने महापालिकेकडे बांधकामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी येण्याचे प्रमाण घटले आहे. यामुळे बांधकाम शुल्कात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांना बांधकाम करण्याची परवानगी तातडीने मिळावी, यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता निर्माण व्हावी, या उद्देशाने पालिकेच्या बांधकाम विभागाने स्वतंत्र मोबाइल अॅप देखील तयार केले आहे. मात्र, एवढ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊनही पालिकेला बांधकाम शुल्कातून केवळ ३२१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या सहा महिन्यांत बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे हे उत्पन्न घटले आहे; परंतु जानेवारी महिन्यापासून बांधकाम परवानगीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे आर्थिक वर्षातील अखेरच्या तीन महिन्यांमध्ये बांधकाम शुल्काचे उत्पन्न वाढून बजेटमध्ये ठरवून दिलेले उद्दिष्ट गाठता येईल, असा विश्वास बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये बांधकाम शुल्कातून २०१६-१७ या आर्थिक वर्षात एक हजार ४५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ३२१ कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. गेल्या वर्षी बांधकाम शुल्कातून ७५१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यांत ऑक्टोबर अखेरपर्यंत ४८८ कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले होते.
.....................
गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम क्षेत्रात काही प्रमाणात मंदीचा परिणाम जाणवत आहे. बांधकाम परवानगीच्या अर्जाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बांधकाम शुल्क घटले आहे. पुढील दोन महिन्यांत यामध्ये वाढ होईल.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पु. ल. देशपांडे माझे आदर्श

$
0
0

ख्यातनाम निवेदक अमीन सयानी यांची भावना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पु. ल. देशपांडे यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्याबरोबरच वादन, संगीत, नाटक, रेडिओवरील निवेदन या क्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांचे कार्य अतुलनीय आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची रेडिओवरील पहिली मुलाखत पु. ल. देशपांडे यांनी घेतली. त्यांनी रेडिओवर अनेक कार्यक्रम केले. ते पाहून खूप शिकायला मिळाले. ते माझे आदर्श आहेत,’ अशा भावना ख्यातनाम निवेदक अमीन सयानी यांनी शनिवारी व्यक्त केल्या.
‘पुलोत्सवा’त सयानी यांना ‘पु. ल. स्मृती सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘निवेदक म्हणून करिअरची सुरुवात केली, तेव्हा अनेक साहित्यिक या क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचे रेडिओवर सातत्याने कार्यक्रम होत होते. त्या सगळ्यांमध्ये पु. ल. देशपांडे वेगळे व्यक्तिमत्व होते. त्यांचे अनेक कार्यक्रम पाहिले. त्यातून शिकायला मिळाले; पण त्यांच्यापर्यंत कधी पोहाेचायला मिळाले नाही, ही खंत कायम आहे,’ असे सयानी यांनी सांगितले. या वेळी ‘आशय सांस्कृतिक’चे वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार उपस्थित होते.
‘रेडिओ क्षेत्रात काळानुसार खूप बदल होत गेले आहेत. रेडिओवरील निवेदनाचा वेग वाढला आहे. श्रोत्यांना निवेदक काय बोलतो, ते समजत नाही. या क्षेत्रात येण्याचा विचार करीत असलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या निवेदकांनी निवेदन करताना घाई करू नये व स्पष्ट आणि हळू आवाजात बोलावे,’ असा सल्लाही त्यांनी दिला. पूर्वीच्या काळातील गाणी मनाला स्पर्श करीत होती; तर आताची गाणी केवळ तनाला स्पर्श करतात. मात्र, आताची गाणी वाईट आहेत असे नाही. तरुण पिढीला ती गाणी भावतात. त्या गाण्यांवर त्यांचे पाय थिरकतात,’ असेही ते म्हणाले.
...
गणपतीच्या आरत्या म्हणत मोठा झालो....
कुमार वयात होतो, त्यावेळी मुंबईत वास्तव्यास आलो. प्रादेशिक भाषांची आवड निर्माण झाली. जवळपास राहणाऱ्या मराठी वर्गाबरोबर मी गणपतीच्या आरत्या म्हणायचो. सरस्वती प्रार्थनाही शिकलो आणि त्यामुळे मराठी भाषेबद्दल आस्था निर्माण झाली आणि पुढे जाऊन पु. ल. माझे आदर्श झाले. अशा शब्दांत सयानी यांनी मराठी भाषेवरचे प्रेम व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महालोकअदालतीत अनेकांना ‌मिळाला न्याय

$
0
0

प्रलं‌बित प्रकरणांवर तोडगा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अपघातात मृत्यू झालेल्या टुरिस्ट व्यावसायिकाच्या उत्पन्नाचा ठोस पुरावा नसल्याने तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकरण शनिवारी महालोकअदालतीत तडजोडीअंती निकाली काढण्यात आले. मृत व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना १४ लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात, अॅड. शाम माहेश्‍वरी आणि अॅड. जयश्री वाघचौरे यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.
नझीर हुसेन शेख (वय ३२, रा. बिबवेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी शानू (वय २८) यांनी अॅड. जी. पी. शिंदे यांच्यामार्फत आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या विरोधात मोटार अपघात न्यायाधिकरण येथे दावा दाखल केला होता.
नझीर २५ नोव्हेंबर २०१३ रोजी नगर मनमाड रस्त्याने दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी येसगावच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यावेळी झालेल्या अपघातात नझीर यांचा जागीच मृत्यू झाला. नझीर घरातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगा, ५७ वर्षीय वडील आणि ५५ वर्षांची आई असा परिवार आहे. शेख कुटुंबीयांनी २० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी असा दावा कोर्टात केला होता. नझीर यांच्या उत्पन्नासंबंधी कोणताही ठोस पुरावा शेख कुटुंबीयांकडे नव्हता. त्यामुळे हे प्रकरण लांबले होते. मात्र, शनिवारी झालेल्या लोकअदालतीत नझीर यांचे उत्पन्न दरमहा सहा हजार रुपये असल्याचे गृहित धरून तडजोड करण्यात आली. शेख कुटुंबीयांना साडेचौदा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.
..
सव्वा वर्षात दावा निकाली
बसने रिक्षाला धडक दिल्यामुळे प्रवासी व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी २१ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश देऊन दावा निकाली काढण्यात आला. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने घेतलेल्या पुढाकारामुळे हा दावा अवघ्या सव्वा वर्षात निकाली काढण्यात आला.
सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात, अॅड. शाम माहेश्‍वरी आणि अॅड. जयश्री वाघचौरे यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला. शेषनारायण देवीदास खरात (वय ४०) यांचा अपघातात मृत्यू झाला. १० जून २०१५ रोजी ही घटना घडली. शेषनारायण रिक्षातून भोसरीकडून मोशीकडे चालले होते. त्यावेळी बसने रिक्षाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाई मिळावी म्हणून कोर्टात दावा दाखल केला होता. शेषनारायण एएसएएल या कंपनीत नोकरी करत होते. त्यांना दरमहा १४ हजार रुपये पगार होता. त्यांच्या कुटुंबीयांनी ३५ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता. अॅड. कांचन धामणकर यांच्यामार्फत त्यांनी दावा दाखल केला होता. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक अमृता सिन्हा यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा दावा निकाली काढण्यात यश आले.
.........
ढिसाळ कारभार
शनिवारी झालेल्या महालोकअदालतीत ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. दिवसभर सुरू असलेल्या महालोकअदालतीत काही पॅनेलने दुपारनंतर दावे निकाली काढण्यास नकार दिल्यामुळे लोकांना त्रास झाला. सकाळी साडेदहा वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यावर प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होईल, असे एका पक्षकाराला सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्यांना दहा वाजता बोलावण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यावर प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाल्यावर ते रांगेत उभे राहिले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा नंबर आला. ते पॅनेलजवळ गेले असता त्यांना आजचे कामकाज संपले असे सांगण्यात आले. आता तडजोडीसाठी कोर्टात सोमवारी किंवा मंगळवारी या असे सांगण्यात आले. रांगेत दिवसभर उभे राहूनही त्यांना केस निकाली न होता परतावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांग वाढली, चलनवलन थांबले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोठ्या नोटा बदलण्यासाठी आणि छोट्या नोटा मिळविण्यासाठीच्या रांगा शनिवारी सुटीमुळे आणखी वाढल्या. शहर आणि परिसरातील सर्व एटीएम अद्याप सुरू झालेले नाहीत. यामुळे लोकांमधील नाराजी वाढत चालली आहे. रोख रकमेचा तुटवडा भासत असल्याने बाजारातील एकूण चलनवलनच थांबले आहे.

चलनबदलामुळे रोख रक्कम आणि सुट्या पैशांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राच्या निर्णयामुळे शनिवारी सुटीच्या दिवशी बँका सुरू होत्या. त्यामुळे लोक मोठ्या संख्येने बँकेत आले. परिणामी गेल्या तीन दिवसांपेक्षाही मोठ्या रांगा लागल्या. अनेक शाखांपुढे शेकडो नागरिक उन्हातान्हात आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करीत होता. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे प्रचंड हाल झाले. दीड-दोन तास रांगेत उभे राहावे लागल्याने लोकांचा वैताग वाढला आहे. बँकेत ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात वाद होत आहेत. दुसरीकडे बँकांमध्येही सुट्या रद्द करून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी पाचारण करण्यात आले आहे.

महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत अनेक कुटुंबांची अत्यावश्यक गरजांची बिले देण्याचा कालावधी असतो. किराणा माल, दूध, वर्तमानपत्रे यांसह अनेक बिले या काळात देण्यात येतात. मात्र, याच काळात चलन तुटवडा झाल्यामुळे अनेक कुटुंबांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. काही व्यावसायिकांनी ग्राहकांकडून धनादेश स्वीकारले आहेत, तर काहीजणांनी उधारी ठेवली आहे. मात्र, व्यावसायिकांनाही रकमांची गरज असल्याने त्यांच्या अडचणींतही भर पडली असून, चलनवलनाचे चक्रच थांबल्याचा अनुभव बाजारपेठांमध्ये येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

$
0
0

‘नोटा’बंदीमुळे भाजपची दुहेरी कोंडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे सर्वसामान्यांमध्ये उसळलेली संतापाची लाट; आणि दुसरीकडे आपल्याच पक्षाच्या सरकारच्या निर्णयाचा दबाव, यांमुळे शहरातील भाजपजनांची ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार,’ अशी स्थिती बनली आहे. येत्या निवडणुकीत पक्षाला या नाराजीचा फटका बसण्याची भीती कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे काळा पैसा कमी होईल, अशी आशा सरकारने व्यक्त केली आणि नागरिकांनीही त्याचे स्वागत केले होते. नोटा चलनातून गायब झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे. पूर्वीच्या नोटा बदलण्यासाठी आणि खर्चाला पैसे मिळविण्यासाठी त्यांना बँकेपुढे लागलेल्या रांगेत तास न तास उभे राहण्याची वेळ आली आहे. पर्यायी व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही सरकारला उघडपणे धारेवर धरू लागल्याने शहरातील भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे. नोटा रद्द करण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, तर काळा पैसा असलेल्यांनाच त्रास होणार आहे, असे भाजपकडून सांगण्यात येत होते. नोटा बँकेत-पोस्टात बदलून घेताना कोणताही‌ त्रास होणार नाही, असा दावा केंद्र सरकारकडून केला जात होता. मात्र, तो फोल ठरला असून चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिक त्रासले आहेत. आमच्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी अशा पद्धतीने सकाळपासूनच बँकेच्या बाहेर उभे राहावे लागत असेल तर ‘हेच का अच्छे दिन’ अशी विचारणा नागरिकांकडून भाजपच्या नेत्यांना केली जात असल्याने नेतेही हैराण झाले आहेत. पर्यायी व्यवस्था नसताना घाईघाईने नोटा रद्दच का केल्या, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे. ‘काळा पैसावाले खुशाल फिरत आहेत, त्रास मात्र आम्हाला,’ अशा शब्दात नागरिकांकडून राग व्यक्त होत होता. काही नागरिकांनी तर काही भाजप नेत्यांना फोन करून या मनस्तापाबद्दल नाराजी व्यक्त केली.


पाठीराखेही नाराज

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य मध्यमवर्गीय, व्यापारी अशा विविध स्तरांतून भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत याच वर्गांतून सरकारबाबत उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे नागरिकांच्या संतापाला तोंड देताना निर्णयाचे समर्थनही करता येत नाही आणि आपल्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोधही करता येत नाही, अशी भाजपजनांची दुहेरी कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनसीसी’ अभ्यासक्रमात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

देशातील युवकांना लष्करात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून राष्ट्रीय छात्र सेनेला (एनसीसी) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रममध्ये वैकल्पिक विषय म्हणून सहभागी करण्यात यावे, अशी शिफारस संरक्षण मंत्रालयाने केली आहे. सदर शिफारशीला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वीकृती दिली आहे. तसेच, विद्यापीठांना तातडीने कोर्स पॅटर्नमध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.

संरक्षण मंत्रालयाने १७ मे २०१६ रोजी एनसीसी हा वैकल्पिक विषय करण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली होती. त्यात देशातील युवकांना लष्करी सेवांमध्ये सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पातळीवर प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. सद्यस्थितीत एनसीसी ऑप्शनल आहे. त्यात संरक्षण मंत्रालयानेच निर्धारित केलेला कोर्स एनसीसीच्या कॅडेट्सला शिकवण्यात येतो. परंतु, त्याचा विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणात कोणताही अंतर्भाव नाही. केवळ गुणपत्रिकेवर एनसीसी किंवा एनएसएस अशी नोंद करण्यात येते. मात्र, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात एनसीसी हा स्वतंत्र विषय देण्यात आल्यास विद्यार्थ्यांना लष्करी सेवांमध्ये सहभागी होण्याची तयारी पुरेशा गांभीर्याने करता येईल, तसे त्यांना इतर स्पर्धा परीक्षांमध्येही त्या गुणांचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा करण्यात आली होती. त्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सदर शिफारशीला २३ ऑगस्ट २०१६ रोजी मंजुरी दिली.

दरम्यान, सहसचिव संशोधन आणि विकास यांच्यासोबतचदेखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत एनसीसीला इलेक्टिव्ह विषय म्हणून कॉलेज पातळीवर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेश आता विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांना दिला आहे.

या निर्णयाचे स्वागत करताना धरमपेठ विज्ञान कॉलेजचे प्राचार्य आणि एनसीसी अधिकारी अखिलेश पेशवे म्हणाले, ‘सैन्यात अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने कमतरता आहे. ही उणीव या निर्णयाने भरून काढण्यास काही प्रमाणात मदत मिळणार आहे. एनसीसी केवळ हौसेखातर घेणारे विद्यार्थी कमी आहेत. परंतु, पदवी कोर्समध्ये इलेक्टिव्ह विषय घेण्यात आल्यानंतर एनसीसी गांभीर्याने करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यासोबतच युवकांना प्रत्यक्ष लष्करात सहभागी होत असताना एनसीसीच्या विषयाचा लाभ मिळणार आहे.’

नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी निहाल शेख यांनीही एनसीसीला इलेक्टिव्ह विषय घेण्याचा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे म्हटले. विद्यापीठांमध्ये चॉइस बेस क्रेडिट सिस्टीम लागू झाली आहे. त्यात एनसीसी हा इलेक्टिव्ह विषय घेतल्यास विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. त्यासोबतच नैसर्गिक व राष्ट्रीय आपत्तीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित युथ पॉवर उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे विद्यापीठ पातळीवर या निर्णयाचे स्वागतच होणार असल्याचे शेख म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशा भोसले यांना राम मराठे पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारत गायन समाजाच्या वतीने पं. राम मराठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा संगीतभूषण पं. राम मराठे पुरस्कार यंदा प्रसिद्ध गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे यंदा २७ वे वर्ष असून स्मृतीचिन्ह आणि दोन लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती भारत गायन समाजाच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ गायिका शैला दातार यांनी दिली. ‘कलेप्रती समर्पित असलेल्या कलाकाराचा योग्य गौरव व्हावा या उद्देशाने पं. राम मराठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दर वर्षी भारत गायन समाजाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. या आधी भालचंद्र पेंढारकर, यशवंतबुवा जोशी, जयमाला शिलेदार, पं. उल्हास कशाळकर, उस्ताद झाकीर हुसेन, पं. सुरेश तळवलकर आदी मान्यवर कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,’ असे दातार यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण समारंभांनंतर पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर, शैला दातार यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. विशाल गंड्रतवार, चैतन्य कुंटे, डॉ. राजेंद्र दूरकर, समीर पुणतांबेकर आदी कलाकार त्यांना साथसंगत करतील. हा कार्यक्रम हा विनामूल्य असून, तो सर्वांसाठी खुला असेल. कार्यक्रमासाठी प्रवेशिका अत्यावश्यक असून, त्या भारत गायन समाजाच्या शनिपार येथील कार्यालयात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत आज, सोमवारपासून (१४ नोव्हेंबर) उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पटकथा लेखनाचे धडे

$
0
0

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा अनोखा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेच्या आग्रहाविषयी नेहमी बोलले जाते. पण विद्यापीठांमधील मराठी विभागाकडे पाहिल्यानंतर मराठी भाषेपुढील आव्हान अधिक तीव्र असल्याचे कोणालाही जाणवेल. विद्यार्थ्यांची कमतरता, विषयाचा व्यावहारिकतेशी न बसणारा मेळ व उपक्रमांची वानवा यामुळे मराठी विभाग निस्तेज झालेले दिसून येतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाने मात्र ही मरगळ झटकून टाकायचे ठरवले आहे. विभागाने विविध उपक्रम हाती घेतले असून, कला क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने पटकथा लेखन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘मराठी विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेऊनही रोजगार मिळत नसल्यामुळे कला क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने विभागाने हे पाऊल उचलले आहे. सध्या चित्रपट, मालिकांचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कलाविश्वात रोजगाराची विविध दालने सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहेत. त्यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी हा अभ्याक्रम उपयुक्त ठरणार आहे. या अभ्यासक्रमाची वाढती मागणी लक्षात घेता पुढील वर्षी या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे दोन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमात रूपांतर करण्याचा विभागाचा विचार सुरू आहे,’ असे विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे तीन वर्षांपूर्वी पटकथा लेखन, अमराठी भाषिकांसाठी मराठी, ग्रंथनिर्मिती व्यवहार आणि प्रशासकीय कामकाजातील मराठी असे चार प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, हे अभ्यासक्रम स्वयंअर्थ सहाय्यित असल्याने विद्यापीठ किंवा सरकारकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. चालू शैक्षणिक वर्षात अमराठी भाषिकांसाठी मराठी, ग्रंथनिर्मिती व्यवहार आणि प्रशासकीय कामकाजातील मराठी हे अभ्यासक्रम प्रारंभीच्या काळात उत्तम चालले. मात्र नंतर त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. यंदाही हीच परिस्थिती कायम आहे. पुरेसे विद्यार्थी नसल्याने हे तीन अभ्यासक्रम यंदा सुरू करण्यात आलेले नाहीत. मात्र त्या ऐवजी पटकथा लेखन हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, ‘पटकथा अभ्यासक्रमासाठी २० जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, या अभ्यासक्रमाला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहता कुलगुरूंच्या मंजुरीने ४० जागांपर्यंत प्रवेशाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमाचे वर्ग शुक्रवारी आणि शनिवारी घेतले जातात. अभ्यासक्रमाचे शुल्क वाढविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे शुल्क कमी करून ते १० हजार निश्चित करण्यात आले आहे. ते टप्प्या-टप्प्याने भरता येईल.’
समर नखाते, अनिल सपकाळ, संजय पवार, अंजुम राजावल्ली, अनिल झणकर, अशोक राणे, नागराज मंजुळे, सुनील सुकथनकर, किरण यज्ञोपवित, राज काझी व धर्मकीर्ती सुमंत आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यसंस्थांचे प्रमुख नावालाच

$
0
0

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet : @AdityaTanawade

पुणे : नुकताच मराठी रंगभूमी दिन शहरात आणि राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या वेळी सर्व प्रकारच्या रंगभूमीच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. अनेक कार्यक्रमांमधून रंगभूमीच्या अवस्थेबद्दल चर्चा झाल्या. नाट्यकलावंतांसाठी मध्यवर्ती संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने देखील पुण्या-मुंबईत कार्यक्रम करून मराठी रंगभूमी दिन साजरा केला. परंतु, एकीकडे हे सोहळे साजरे होत असताना दुसरीकडे मात्र नाट्यपरिषदेच्या अध्यक्षांकडून काही अनपेक्षित विधाने करण्यात आली. त्यामुळे नाट्य परिषदेकडून रंगभूमीच्या विकासासाठी सकारात्मक पाऊले उचलली जातात का, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
रंगभूमी दिनानिमित्त आयोजित केलेल्या रंगारंग सोहळ्यात अनेक दिग्गज कलावंतांना सन्मानित करण्यात आले. नवोदित कलाकारांनी त्यांची कला या वेळी सादर केली. या सोहळ्यात नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष म्हणून मत व्यक्त करताना सुरेश देशमुख यांनी पुण्याच्या रंगभूमीची अवस्था अगदी तळाला गेली असल्याचे सांगितले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांनी लक्ष घालावे, असे विनंती वजा आवाहनही त्यांनी केले. देशमुखांना अध्यक्ष होऊन तीन वर्षे उलटून गेली. मात्र, तरीही त्यांच्यावर असे म्हणण्याची वेळ का यावी, मग अध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षांपासून देशमुख आणि त्यांची कार्यकारिणी नाटकांच्या भवितव्यासाठी काय करत होते, असा प्रश्न उभा राहतो. हे झाले नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेबाबत... नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षांनी त्याच्याही पुढे एक पाऊल टाकले. व्यावसायिक नाटकांसंदर्भातील एका विषयाबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत असताना ‘अलिकडची नाटके मी फारशी पाहिलेली नाहीत, त्याबद्दल मला फारसे बोलता येणार नाही. तरीही एकूणात सध्याची परिस्थिती समाधानकारक आहे,’ अशी सरसकट प्रतिक्रिया अध्यक्ष महोदयांनी (जोशी बुवांनी) देऊन टाकली. नाट्य परिषदेचे अध्यक्षच जर का अलिकडे नाटके पाहत नसतील तर मग त्यांना रंगभूमीवर काय चालले आहे, हे कसे कळेल, त्यांनी स्वतःच त्या विषयावर फार काही बोलू शकणार नाही, असे सांगत नाटके पाहत नसल्याची कबुली दिली.
जोशीबुवांना सध्या चित्रपट आणि मालिकांच्या व्यस्त अशा शेड्युलमधून नाटकांसाठी वेळ नाही, हे मान्य आहे. अभिनेते म्हणून त्यांचे नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधले योगदान न विसरण्यासारखेच आहे. त्यांच्या सारखा जाणकार कलाकार ही मराठीसृष्टीला मिळालेली देणगी आहे. पण, म्हणून नाट्यपरिषदेचा अध्यक्ष म्हणून असलेली नैतिक जबाबदारी झटकून कसे चालेल, रंगभूमीला चांगले दिवस आणायचे असतील तर नाट्य परिषदेने नाही तर कुणी प्रयत्न करायचे? आणि जबाबदार पदसिद्ध अध्यक्ष आजकालची नाटके पाहत नसेल, तर नाट्यचळवळीचे भवितव्य कसे असेल, याबाबत संभ्रम निर्माण होतो. नाटकांच्या भवितव्यासाठी परिषदेच्या सभासदांनी नियामक मंडळाचे सदस्य म्हणून जोशीबुवांना निवडून दिले ते नाट्यसृष्टीच्या दृष्टीने काहीतरी सकारात्मक पाऊले उचलावीत म्हणूनच... त्यामुळे अध्यक्ष साहेबांनी यापुढे नाट्य परिषदेच्या कामकाजाकडे आणि एकंदरीतच नाटकांच्या वाटचालीकडे जरा जास्त लक्ष दिले तर बरे होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंजाबी संमेलनाध्यक्षांचे साहित्य मराठीत

$
0
0

सुरजितसिंग पातर यांच्या कवितांचा अनुवाद; संमेलनात होणार प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात होणारे पहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन हे आता केवळ उत्सव न राहता, साहित्य आणि भाषिक आदान-प्रदानाचे व्यासपीठ बनले आहे. त्याची सुरुवात थेट संमेलनाध्यक्ष कवी सुरजितसिंग पातर यांच्या साहित्याने होणार आहे. पंजाबीमधील ख्यातनाम कवी पातर यांच्या कवितेचा अनुवाद मराठीत झाला असून, आगामी संमेलनात त्याचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे.
पुण्यात १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणारे पहिले पंजाबी साहित्य संमेलन भाषांमधील दुवा ठरत आहे. पंजाबी भाषिकांसह मराठी भाषिकांनी या संमेलनासाठी जोरात तयारी सुरू केली आहे. विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि स्वातंत्र्योत्तर काळातील पंजाबी साहित्यातील ख्यातनाम कवी सुरजितसिंग पातर यांच्या पंजाबच्या अस्वस्थ वर्तमानावर भाष्य करणाऱ्या कवितांचे मराठीमध्ये यानिमित्ताने प्रतिबिंब उमटले आहे. पातर यांच्या कवितांचे डॉ. अनुपमा उजगरे यांनी अनुवादाच्या माध्यमातून केलेले उत्तम संकलन पुस्तकरूपातील मौलिक ठेवा ठरणार आहे. विश्व पंजाबी साहित्य संमेलनादरम्यान या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
या पुस्तकाविषयी डॉ. उजगरे म्हणाल्या, ‘लहानपणी पंजाबी लोकांच्या सान्निध्यात गेल्याने पंजाबी भाषेविषयी आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात जिव्हाळा आहे. त्यामुळे स्वत:च्या आनंदासाठी पातर यांच्या पंजाबी कवितांचा डॉ. चमनलाल यांनी केलेल्या हिंदी अनुवादावरून मराठीमध्ये अनुवाद करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचे पुस्तक करण्याचा कधी विचार केला नव्हता. पुण्यात आले असता सुरजित पातर यांना भेटण्याची संधी मिळाली. अत्यंत साधे असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या साहित्यावर चर्चा करण्याचा आनंद मिळाला. पुण्यात पंजाबी साहित्य संमेलन होत असल्याने अनुवादाचे पुस्तक करण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार संमेलनात पुस्तक प्रसिद्ध होणार असून मराठी भाषिकांना पातर यांच्या साहित्याचा आस्वाद घेता येईल.’
‘डॉ. अनुपमा उजगरे यांच्या सुरजित पातर यांची कविता या पुस्तकाचे प्रकाशन माजी संमेलनधाध्यक्ष वसंत आबाजी डहाके आणि प्रभा गणोरकर यांच्या उपस्थितीत विश्व पंजाबी साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्याच्या एक दिवस आधी होणार आहे. या तीन दिवसीय संमेलनात हे पुस्तक रसिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाईल. तसेच शीख धर्मातील मराठी संतांचे योगदान असे आणखी एक पुस्तक संमेलनात देण्यात येणार आहे,’ असे आयोजक संजय नहार यांनी सांगितले.

सुरजितसिंग पातर यांची कविता वाचली होती. घुमान संमेलनात त्यांच्या विषयी बोलले होते. तेव्हापासून अनुवाद करत होते. संमेलनानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकात पातर यांच्या १०८ कविता आहेत. पातर यांचे साहित्य पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठीत येत आहे.

-अनुपमा उजगरे

अनुवादातून एका भाषेचा दरवाजा माझ्यासाठी उघडतोय, याचा मनस्वी आनंद होत आहे. भारतात युरोपापेक्षाही अधिक भाषा बोलल्या जात असून, त्यांचे परस्परासंबंध कमालीचे जिव्हाळ्याचे आहेत. मराठी-पंजाबी भाषेचा संबंध असाच आहे. या पुस्तकामुळे तो संबंध आणखी दृढ होईल.

- सुरजितसिंग पातर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यक्तिरेखा जगण्याचा ‘छंद’ आगळा

$
0
0

सुबोध भावेच्या ‘घेई छंद’चे दिग्दर्शक, तंत्रज्ञांच्या हस्ते प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘एखादी व्यक्तिरेखा साकारताना ती प्रत्यक्ष जगणे किंवा किमान ती खरोखरीच जगत असल्याचा उत्तम आभास निर्माण करणे, ते करतानाच त्याकडे त्रयस्थपणे बघणे आणि हे बघितलेले जगणे लिहिणे हे सगळेच एकत्र खूप सुंदर जमून येते, तेव्हाच ते लेखन वाचकाला आवडते. सुबोधने अगदी नेमके हेच केले आहे,’ अशी भावना लेखक - दिग्दर्शक आणि अभिनेता अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केली. निमित्त होते, अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे लिखित ‘घेई छंद’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे...
रसिक आंतरभारती आणि ग्राफ फाइव्ह पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सुबोधने पुस्तकात ‘कट्यार ते कट्यार’ (नाटक ते सिनेमा) हा प्रवास मांडला आहे. सिनेमातील व्यक्तिरेखा रंगवतानाची प्रक्रिया, त्यामागचा विचार, प्रत्यक्ष साकारल्यावर निर्माण झालेली भावना आणि त्याला मिळालेला प्रतिसाद शब्दबद्ध करणारे हे पुस्तक आहे.
‘कट्यार’ची आठवण सांगताना संगीतकार - गायक शंकर महादेवन म्हणाले, ‘या सिनेमाचा गीतकार खरा स्वानंद किरकिरे असणार होता; पण नंतर त्याला जमले नाही. मात्र, या सिनेमाचा आत्मा शोधताना काहीतरी पवित्र, सुंदर आणि निर्मळ असे हातून घडावे, अशी इच्छा होती. आमची चर्चा सुरू असताना स्वानंदने आम्हाला सूर निरागस हो ही ओळ दिली आणि संपूर्ण सिनेमाचा प्रवासच या संकल्पनेवर घडला.’
बालगंधर्व साकारतानाची सुबोधची मेहनत, मूळ नाट्यपदं आणि कौशल इनामदार संगीतबद्ध करत असलेली नवी गाणी यांची कारमध्ये केलेली पारायणे यांसारख्या सिनेमा घडतानाच्या प्रक्रियेतील काही निवडक महत्त्वाच्या गोष्टी दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितल्या. याच सिनेमातील ‘आज म्हारे घर पावणा’ सादर करण्यापूर्वी ‘इतक्या सुंदर स्त्रीला (सुबोध) मी प्ले-बॅक देऊ शकले नाही, याची आता खंत वाटते,’ असे बेलाने सांगितले, तर ‘कट्यार’मधील ‘मनमंदिरा’ गाण्यादरम्यान ‘व्हीएफएक्स’ तंत्राने दाखवलेल्या काजव्यांविषयी व्हीएफएक्स आर्टिस्ट प्रसाद सुतार यांनी रंजक माहिती सांगितली. रंगमंच किंवा सिनेमाच्या पडद्यापलीकडे सुबोधचे नट नसणे त्याला माणूस म्हणून खूप मोठे बनवत असल्याचे कवी संदीप खरे यांनी सांगितले. ‘सूर निरागस हो’ या प्रचंड लोकप्रिय रचनेने कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ताडोबाचा प्रवास शब्दबद्ध करावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे


वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी लिहिलेल्या आणि हर्षद बर्वे यांची छायाचित्रे असलेल्या ‘ताडोबा : द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाचा प्रकाशन भगवान यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय वन्यजीव संस्थेचे सल्लागार व्ही. बी. सावरकर, राज्याचे पोलिस महासंचालक (विधी आणि तांत्रिक) प्रभात रंजन या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. काकोडकर यांनी १९९९ ते २००३ या कालावधीमध्ये ताडोबा-अंधारी येथे उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत असताना अनुभवलेल्या घटनांपैकी निवडक घटनांचा या पुस्तकात समावेश केला आहे.
भगवान म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वीपर्यंत लोकप्रिय व्याघ्र प्रकल्पांमध्ये ताडोबाला स्थान नव्हते. पण वनाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, निसर्ग अभ्यासक यांच्या सहभागातून अनेक उल्लेखनीय बदल घडवून आणले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या जंगलाला भेट दिली आणि ते जंगलाच्या प्रेमात पडले. आज ताडोबा जगाच्या नकाशावर पोहोचले असून, सर्व स्तरातून यासाठी सहकार्य मिळते आहे. काकोडकर यांनी एका ठरावीक कालावधीतील ताडोबातील अनुभव पुस्तकबद्ध केले आहेत. त्यांनी अभयारण्याचा समग्र प्रवास शब्दबद्ध करावा.’ लोक संकटात सापडतात, तेव्हा मंदिरात जातात. अभयारण्ये ही हवामान बदलांची समस्या सोडविणारी ‘आधुनिक मंदिरे’ आहेत. अभयारण्ये या देशाच्या जीवनवाहिन्या आहेत. या समृद्ध नैसर्गिक वारशाला वाचविण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे. याच वेळी वाढत्या पर्यटनाच्या व्यवस्थापनासाठी वनाधिकाऱ्यांना ठोस पावले उचलावी लागणार आहेत, असे सांगून सावरकर यांनी पुस्तकातील काही मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
काकोडकर आणि बर्वे यांनी पुस्तकाचा प्रवास मनोगातून मांडला. बर्वे यांनी लिहिलेल्या ‘बै आणि मी’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिस्त्रींच्या धोरणावर कामगारांची टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाची नितीमूल्ये जपली नाहीत. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. ते स्वत:चे नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिस्त्री यांनी चार वर्षे आपले नेतृत्व आणि धोरण कामागारांवर लादले होते. मिस्त्री यांच्या धोरणामुळे टाटा उद्योग समूह तोट्यात जात आहे,’ असा गंभीर आरोप कामगार युनियने केला आहे.

रतन टाटा यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी टाटा मोटर्स कामगार युनियनने रविवार (१३ नोव्हेंबप) पत्रकार परिषद घेतली. या वेळी टाटा मोटर्स कामगार युनियनचे अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष संजय काळे, उपसचिव सुरेश जासूद, यशवंत चव्हाण, माजी अध्यक्ष यशवंत काळे, आबिद सय्यद, राजेंद्र पाटील, विष्णू नेवाळे, नगरसेवक सुजित पाटील, सतिश ढमाले, विलास सपकाळ, नामदेव ढाके, सतीश काकडे, संतोष सपकाळ, बबन चव्हाण, प्रकाश मुगळे, विक्रम बालवडकर, उत्तम चौधरी, उत्तम पाटील, पंडित बिराजदार, संदीप आहेर, अनिल भोसले, सचिन लांडगे आदी उपस्थित होते.

युनियनचे अध्यक्ष धुमाळ म्हणाले, ‘टाटा मोटर्स कामगार युनियनचा रतन टाटा यांना पाठिंबा आहे. रतन टाटा यांची ध्येय धोरणे कामगार हिताची आहेत. रतन टाटा यांनी कामगारांच्या हिताच्या योजना आणल्या होत्या. टाटा समूहाची धुरा सायरस मिस्त्री यांच्या हाती गेल्यानंतर त्यांनी कामगारांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही.’ माजी अध्यक्ष विष्णू नेवाळे म्हणाले, ‘देशभरात टाटा समूहाचा नावलौकिक आहे. रतन टाटा समूहाचे अध्यक्ष असताना व्यवस्थापन आणि युनियनचे संबंध जिव्हाळ्याचे होते. रतन टाटा यांनी कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या होत्या. नफा कमविण्यासाठी रतन टाटांनी उद्योग समूह सुरू केला नाही. टाटा समूहाने अनेकांना मदत केली आहे. देशावर मोठे संकट आले. त्या वेळी टाटा समूह मदतीला धावून गेला आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारीचा भूकंप असो की पुणे जिल्ह्यातील माळीणची दुर्घटना असो टाटा समूहाने मदत केली आहे.’

‘कामगारांनी ६२ दिवस अन्नत्याग करून काम केले. मात्र, मिस्त्री यांनी त्याची दखल घेतली नाही. रतन टाटा यांनी कामगांराना केंद्रबिंदू मानून काम केले. कामगारांना रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. टाटा समूहाचे नेतृत्व दुसऱ्या व्यक्तीच्या हाती राहिले तर, पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग बाहेर जाऊ शकतो,’ अशी भितीही नेवाळे यांनी व्यक्त केली.

‘सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाचे दुर्लक्ष आहे. व्यवस्थापनाकडून कामगार काम करत नसल्याचा आरोप केला जातो. व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम विनाकारण कामगारांना भोगावे लागत आहेत. गेल्या १४ महिन्यांत द्विपक्षीय करारासंदर्भात १७ बैठका झाल्या. मात्र, निर्णय झाला नाही. पूर्वी करार तीन वर्षांचा होता. सध्या चार वर्षांचा करार करावा, असे व्यवस्थापन म्हणत आहे,’ असेही नेवाळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका कर्मचाऱ्यांना इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे मिळकतकर थकित असल्याचे आढळून आल्यास त्यांची वेतनवाढ आणि बोनस रोखण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. तसेच, महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेचा फायदा घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना थकित रक्कम भरण्याच्या सूचना विभागप्रमुखांनी द्यावी, असे आदेश काढले आहेत.

मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने गेल्या महिन्यात अभय योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १५ नोव्हेंबरपर्यंत एकरकमी थकबाकी भरणाऱ्यांना दंडावर ७५ टक्के सवलत मिळणार आहे. शहरातील सर्व नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे, महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी कोणाकडे पालिकेच्या मिळकतीची थकबाकी असेल, तर त्यांनीही तातडीने थकित रक्कम जमा करावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच, पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे मिळकतकर थकित असल्याचे आढळून आल्यास दर वर्षी त्यांना देण्यात येणारी वेतनवाढ/बोनस थांबविण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली जाणारी वेतनवाढ/बोनस अदा करायचा की नाही, याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिकेत कार्यरत असणाऱ्या सर्व पदांवरील सेवकांना मिळकतकर वेळेत भरण्याबाबतच्या स्पष्ट सूचना संबंधित विभागप्रमुखांना तातडीने द्यावा, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. तसेच, त्यांच्या मिळकतींवरील मिळकतभर भरण्याबाबत सूचित केले जावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरसेवकांनाही आवाहन

आगामी तीन ते चार महिन्यांत महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा रिंगणात उतरण्याची इच्छा असणाऱ्या सर्व विद्यमान नगरसेवकांना आपल्या मिळकतीवर कोणत्याही स्वरूपाची थकबाकी नसल्याचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. एखाद्या सदस्याच्या नावावर थकबाकी असल्यास त्याला निवडणूक लढविता येत नाही. हे लक्षात घेऊन सर्व सदस्यांनी मिळकतीवर थकबाकी असल्यास ती अभय योजनेचा लाभ घेऊन, तातडीने जमा करावी, असा सल्लाही आयुक्तांनी विद्यमान नगरसेवकांना दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images