Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​बालकुमार साहित्य संस्था अडकली नव्या वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नव्याने नुकतीच सुरू करण्यात आलेली अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुन्हा एकदा वादात सापडली आहे. संस्थेच्या घटना समितीतील मिहीर थत्ते यांनी संस्थेच्या कामकाज समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता सभासदांची बैठक बोलावल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. घटनेनुसार थत्ते यांना कोणतेही अधिकार नसताना कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांच्या साथीने थत्ते यांनी हा कारभार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात बालकुमार साहित्य संस्थेच्या आजीव सभासदांच्या कामकाज समितीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. मिहीर थत्ते यांचा संस्थेच्या कामकाजाशी कोणताही संबंध नसताना त्यांना संस्थेची बैठक बोलावण्याचा अधिकार कोणी दिला, बैठकीसाठी काढलेल्या पत्रासाठी कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी लेटरहेड का दिले, असे प्रश्न या परिषदेत उपस्थित करण्यात आले. बालकुमार साहित्य संस्थेचे आजीव सभासद सुनील महाजन, माधव राजगुरू, मुकुंद तेलीचरी आदी या वेळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी अनिल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन बालकुमार साहित्य संस्था ही नव्याने उभी राहील, त्याचा आधीच्या संस्थेशी काही संबंध नसेल, असे सांगितले होते. मात्र ६ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आधीच्याच संस्थेतील आजीव सभासदांना आमंत्रणे देण्यात आली आहेत, यावरून संस्थेच्या आजीव सभासदांनी कुलकर्णी आणि थत्ते यांनी घेरले आहे.
बालकुमार साहित्य संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी घटना दुरुस्ती व्हावी, यासाठी घटना समिती नेमण्यात आली होती. त्यात मिहीर थत्ते, नंदकुमार लव्हेकर, डॉ. वि. वि. घाणेकर, माधव राजगुरू यांच्यासह अणखी काही सदस्यांचा समावेश होता. या समितीने घटना दुरुस्तीचा अहवाल देताना मिहीर थत्ते व नंदकुमार लव्हेकर हे घटना समितीच्या एकाही बैठकीला हजर राहीले नसल्याचे सांगितले. घटना दुरुस्तीच्या एकाही बैठकीला उपस्थित न राहणारा माणूस अचानक संस्थेचे पदाधिकारी अनिल कुलकर्णींच्या साथीने संस्थेची बैठक कशी बोलावतो, असा संतप्त सवाल सुनील महाजन यांनी या वेळी उपस्थित केला. संस्थेचे कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी लेटरहेड देऊन संस्थेतील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर कारभार चालवला आहे. त्यासाठी त्यांनी पंधरा दिवसांच्या आत लेखी खुलासा करावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

बालकुमार साहित्य संस्थेचे कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांच्याकडे अद्यापही संस्थेची सर्व कागदपत्रे, चेक, पैसे, इतिवृत्त इत्यादी मालमत्ता असूनही ते बालकुमार साहित्य संस्थेशी काही संबंध नसल्याचे सागंत आहेत. त्यांनी त्वरित सर्व कागदपत्रे आजीव सभासदांकडे जमा करावीत आणि मिहीर थत्ते यांचा संस्थेशी कसलाही संबंध नसताना त्यांच्या साथीने मिळून केलेल्या या अनैतिक कृत्याचा खुलासा करावा, अन्यथा ते अडचणीत येतील, असे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या कामकाज समितीने सांगितले आहे. या प्रकरणासंदर्भात मिहीर थत्ते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
घटना समितीच्या एकाही बैठकीला हजर न राहता मिहीर थत्ते यांची थेट संस्थेच्या सभासदांची बैठक बोलावण्यापर्यंत मजल जाते, म्हणजेच त्यांचा हेतू चांगला नाही. त्यांना जे काम दिले होते ते त्यांनी चोख पार पाडले नाही. शिवाय संस्थेच्या पदाधिकाऱ्याला सोबत घेऊन चुकीच्या पद्धतीने संस्थेच्या सभासदांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम कुलकर्णी आणि थत्ते या जोडगोळीकडून सुरू आहे. त्यांनी त्वरित याबाबत खुलासा करावा.
- सुनील महाजन, आजीव सभासद, अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​मूकबधीर आरोपीला बलात्कारप्रकरणी शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
एका मूकबधीर मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका मूकबधीर व्यक्तीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. नासीर सालीम यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. संबंधित तरुणीवर करण्यात आलेल्या अत्याचारानंतर ती गर्भवती राहिली होती. आरोपीने तिला भोसरी येथील एका डॉक्टरकडे नेऊन तिचा गर्भपात केला होता.
या प्रकरणी रवींद्र नारायण नलावडे (वय ३०, रा. भोसरी) या मूकबधीर व्यक्तीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले. त्यांनी या खटल्यामध्ये सात साक्षीदार तपासले.
फिर्यादी मुलगी जन्मतः कर्णबधीर आहे. तिची २०१२ मध्ये कर्णबधीरांच्या ग्रुपमध्ये रवींद्र नलावडेबरोबर ओळख झाली. त्याची पत्नी फिर्यादी मुलीच्या शाळेत कम्प्युटर शिक्षिका म्हणून सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत शिकवते. फिर्यादी आणि नलावडे यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. डिसेंबर २०१२ मध्ये नलावडे फिर्यादीच्या घरी आला. तिला बरोबर घेऊन शांतीनगर भोसरी येथे त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकाराबाबत तिने बाहेर वाच्यता करू नये, असा दम तिला दिला. त्यामुळे तिने घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही. काही दिवसांनी तिच्या पोटात दुखू लागले. तिने तिच्या आत्याला हा प्रकार सांगितला. त्यानंतरही नलावडे तिला फिरण्यासाठी आणि जेवणासाठी घेऊन जात होता. त्याने पत्नी घरी नसताना तिच्यावर बलात्कार केला. ऑगस्ट २०१३ मध्ये फिर्यादी गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला दमदाटी करून भोसरी येथील एका हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचा गर्भपात केला. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने घडलेल्या अत्याचाराबद्दल वडिलांना सांगितले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली.

मीडीएटरची मदत
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले. त्यांनी या खटल्यामध्ये सात साक्षीदार तपासले. फिर्यादी आणि आरोपी दोघे मूकबधीर असल्यामुळे कोर्टातील सुनावणीसाठी विशेष शिक्षिका गौरी लेले यांची मीडीएटर म्हणून मदत घेण्यात आली. सरकारी वकिलांनी न्यायाधीशांपुढे मांडलेले मुद्दे न्यायाधीशांकडून लेले यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते मुद्दे त्यांनी फिर्यादी आणि आरोपीला सांकेतिक भाषेत सांगून त्यांचे म्हणणे कोर्टाला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​इतिहासप्रेमी मंडळातर्फे देखावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातला थरारक अध्याय. यंदा या घटनेला साडेतीनशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या इतिहासाला उजाळा देणारी तसेच तो जाणून घेता येईल, अशा उपक्रमाची आखणी इतिहास प्रेमी मंडळातर्फे करण्यात आली आहे. आग्र्याच्या किल्ल्याची तसेच मोगल दरबाराची भव्य प्रतिकृती आणि दृकश्राव्य माध्यमातून हा प्रसंग उभा करण्यात आला आहे. येत्या रविवारपर्यंत (दि. ६) शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी चार ते नऊ या वेळेत हा देखावा सर्वांना पाहण्यासाठी खुला असणार आहे.
मुघल बादशाह औरंगजेबाच्या कैदेतून सुटून छत्रपती शिवाजी महाराज राजगडला सुखरूप पोहोचले. या पराक्रमाने तेव्हा जगभरातल्या सत्ता थक्क झाल्या. ही घटना इसवी सन १६६६ मध्ये घडली. यंदा या घटनेला साडेतीनशे वर्षे झाल्याने हा अध्याय सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखावा तयार केला आहे. भारताच्या भव्य नकाशातून उलगडणारी शौर्यकथा, अभ्यासपूर्ण निवेदन आणि दहा हजार दिवे ही या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यांच्या संस्कृतीचा मिलाफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य, संस्कृती आणि परंपरेच्या माध्यमातून दोन राज्यांमधील सांस्कृतिक नातेसंबंधांची वीण घट्ट करण्यासाठी महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांनी करार केला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील साहित्यवैभव उडिया भाषेत, तर उडिया भाषेतील साहित्य मराठीत अनुवादित होणार आहे.

विविध राज्यांमधील संवाद वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक राज्याला स्वतःचे संगीत, नृत्य आणि परंपरा लाभली आहे. या उपक्रमातून ही परंपरा इतर राज्यांतील लोकांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अंतर्गत पुढील काही दिवसांत वेगवेगळी राज्ये सांस्कृतिक बंधने स्वीकारणार आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांच्या कराराची अधिकृत घोषणा करण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि ओडिशा राज्याच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव गगन कुमार धल यांनी करारावर सह्या केल्या.

दोन्ही राज्ये भौगोलिकदृष्ट्या दूर असली, तरी आता सांस्कृतिक मार्गाने त्यांना जवळ आणण्याचे काम हा करार करणार आहे. दोन्ही राज्यांतील कला पथकांच्या माध्यमातून यापुढे सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाणघेवाण होणार आहे. दोन्ही भाषांतील प्रसिद्ध साहित्य लेखन, पुरस्कारविजेती पुस्तके, कवितासंग्रह आणि पारंपरिक लोकसंगीताचे या एकमेकांच्या भाषांमध्ये करण्यात येणार आहे. लेखक आणि कवी यांच्या आदान-प्रदानावर आधारित विशेष कार्यक्रम, पाककला महोत्सवही आयोजित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राला कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, व. पु. काळे यांसारख्या दिग्गज साहित्यिकाची परंपरा लाभली आहे, तर चंद्रशेखर रथ, शंतनूकुमार, आचार्य मोहापात्रा निलामनी साहू या दिग्गजांची नावे उडिया भाषेतील साहित्यात आदराने घेतली जातात. या करारामुळे या साहित्यिकांच्या लेखनाला अधिक व्यापक रूप मिळणार आहे.

या सांस्कृतिक सेतूमध्ये तळागाळातील लोकांना सहभागी करून घेण्यासाठी संस्था पातळीवर तसेच शालेय स्तरावर अभ्यास सहली, निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दोन्ही राज्यांतील पर्यटनाला चालना देण्यासाठीही विशेष प्रयत्न होणार आहेत. दोन्ही राज्यांमधील संवाद, वैचारिक आणि सांस्कृतिक धागा बळकट व्हावा, या उद्देशाने हा करार केला आहे. याअंतर्गत सांस्कृतिक उपक्रमांचे आदानप्रदान, महोत्सवांचे आयोजन आणि विद्यार्थ्यांसाठी उडिया भाषा शिकण्याचे वर्ग घेण्यात येतील. ओडिशातील साहित्य, त्यांची संस्कृती परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ओडिशा सरकार हेच उपक्रम त्यांच्या राज्यात राबविणार आहेत. पुढील काही दिवसांत कराराच्या अंमलबजावणीसंदर्भात नियोजन आणि निमयावली निश्चित करणार आहोत, अशी माहिती राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे उपसचिव संजय भोकरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडजवळ अपघातात दोन ठार, सहा जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत खासगी मोटार पुलाला धडकून झालेल्या अपघातात दोनजण ठार, तर सहाजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात प्रियांका रोशन चव्हाण (२५) आणि तिन्वर कुमेश राठोड (८ महिने, दोघे रा. मुंबई) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. कुमेश तुकाराम राठोड, रोशन देवीदास चव्हाण, चेतन रमेश राठोड, सुमन कुमेश राठोड, तन्मय कुमेश राठोड, राज रोशन चव्हाण हे सहाजण जखमी झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमेश तुकाराम राठोड आणि रोशन देवीदास चव्हाण हे दोघे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. सुट्टी असल्याने हे दोघे गाडीतून आपल्या कुटुंबासह पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलपूरला जात होते. मळद गावच्या हद्दीतील हॉटेल गजाननजवळ चालकाचे मोटारीवरील नियत्रंण सुटले. त्यामुळे महामार्गावरील पुलाला ही मोटार धडकली. चौघा गंभीर जखमींना उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले असून, दोघांना दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दौंड पोलिस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात आणखी काही दिवस थंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यात थंडीने आता आपले बस्तान चांगलेच बसवले आहे. पुण्यातील पारा १२.१ अंशांपर्यंत उतरला असून अहमदनगर येथे राज्यातील सर्वात नीचांकी ९.२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ऑक्टोबर हीट संपल्यानंतर आता नोव्हेंबरच्या पहिल्या काही दिवसातच पुण्यासह राज्यात कडाक्याची थंडी पसरू लागली आहे. मान्सून देशातून परतला असून बाष्पाचे प्रमाणही हळूहळू कमी होत आहे. त्याचबरोबर उत्तरेकडील राज्यांकडून थंड व कोरडे वारे महाराष्ट्राकडे वाहू लागल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. कमाल तापमान अधिक असल्याने दिवसा काहीसा उकाडा जाणवत असून सायंकाळनंतर व पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे.

गुरुवारी पुण्यात ३१.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तर १२.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. किमान तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी होते. गुरुवारी राज्यातील सर्वात नीचांकी किमान तापमान अहमदनगर येथे (९.२ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. हे किमान तापमान सरासरीपेक्षा ७.८ अंशांनी कमी होते. बीड येथे ११.१, नाशिक येथे ११.९, जळगाव येथे १३.६, उस्मानाबाद येथे १२.१, अकोला येथे १४.८, यवतमाळ येथे १४.४ तर महाबळेश्वर येथे १४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवसात उत्तरेकडील राज्यातील तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातही तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर पोलिस ठाणे विचाराधीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, आयुक्तालयात स्वातंत्र्यदिनी सुरू करण्यात आलेल्या ‘सायबर लॅब’ या सायबर पोलिस ठाण्यात रूपांतरीत करण्याचा विचार सध्या सुरू आहे. गृह मंत्रालयाकडून राज्यात सर्वत्र सायबर पोलिस ठाणी सुरू करण्यासासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये सुमारे १४१ टक्क्यांनी झालेली वाढ पाहता, सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

सायबर गुन्हेगारी मोडून काढण्याचा भाजप सरकारचा हा एक प्रमुख अजेंडा आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस ठाणे सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. राज्य सरकारने सायबर पोलिस ठाणी सुरू केली, तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, की येथील प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलिस ठाणे सुरू झाले असेल, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

राज्यातील सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षातील सायबर गुन्हेगारी ही १४१ टक्क्यांनी वाढली आहे. पहिल्या टप्प्यात सायबर पोलिस ठाणी ही पोलिस आयुक्तालय आणि परिक्षेत्र (रेंज) कार्यालयांमध्ये कार्यान्वित करण्याचा विचार आहे. सध्या केवळ मुंबई पोलिसांकडे सायबर पोलिस ठाणे सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकार दोन वर्ष पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस ठाणी सुरू करण्याबाबतचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डणवीस यांनी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) राज्यातील सर्व जिल्हे, पोलिस आयुक्तालयांमध्ये अशा ३४ सायबर लॅब सुरू केल्या होत्या. या लॅबचे रुपांतर सायबर पोलिस ठाण्यात करण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारच्या ५४ सायबर लॅब असून त्यामधील ३४ लॅब या जिल्हास्तरावर, नऊ आयक्तालये तर सात परिक्षेत्र कार्यालयांमध्ये या लॅब आहेत.

राज्यात सायबर क्राइमचा विळखा वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख शहरांना सायबर क्राइमने ग्रासले आहेच. मात्र, टू-टायर शहरांनाही सायबर क्राइमचा विळखा पडत आहे. नागरिकांच्या अकाऊंटमधून लाखो रुपयांची लूट होत आहे. तर या केसेस निकाली काढण्यासाठी, तपास करण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने सायबर पोलिस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सायबर पोलिस ठाणे सुरू झाल्यास या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असेल. सहायक आयुक्त दर्जाचा अधिकारी या पोलिस ठाण्याचा प्रमुख असेल. पुरेसे मनुष्यबळ, सॉफ्टवेअर, टेक्निकल सपोर्ट तसेच सायबर नेटवर्कमुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढेल, अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.


सायबर ठाण्यासाठी पुण्याचा फेरप्रस्ताव

पुणे शहरात सायबर गुन्ह्यांची वाढती व्याप्ती रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सायबर पोलिस ठाण्याची मागणी करणारा फेरप्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाला पाठवला आहे. पुणे पोलिसांकडून गेल्या आठ वर्षांपासून सायबर पोलिस ठाण्याची मागणी करण्यात येत आहे. उपलब्ध मनुष्यबळात सायबर पोलिस ठाण्याला मंजुरी देण्यास सरकार अनुकूल असल्याने, हे पोलिस ठाणे लवकरच सुरू होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

पुणे पोलिसांकडून २००८पासून राज्य सरकारकडे सायबर पोलिस ठाण्याची मागणी करण्यात येते आहे. राज्यात सध्या फक्त मुंबई पोलिसांकडे सायबर पोलिस ठाणे आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्यदिनी राज्यात ५४ ठिकाणी सायबर लॅब सुरू केल्या आहेत. पुणे पोलिसांकडून गेल्या काही वर्षांपासून ‘सायबर लॅब’ चालवण्यात येते. गेल्या काही वर्षांत वाढलेली सायबर गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याची गरज असल्याने ही मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकारकडून त्याला योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘पुणे सुपरफास्ट’ या कार्यक्रमात ‘मटा’ने राज्यातील, तसेच पुण्यातील सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणे आणि त्यासाठी असलेले अपुरे मनुष्यबळ याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे लक्ष वेधले होते. यासाठी सायबर पोलिस ठाण्यांची स्थापना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही ‘मटा’ने केले होते. या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दिले होते. फडणवीस यांनी आपल्या दीड वर्षांच्या कालावधीत ‘सायबर लॅब’ सुरू केल्या आहेत. तर, प्रमुख ठिकाणी सायबर पोलिस ठाणे सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे पोलिसांनी पाठवलेल्या सायबर पोलिस ठाण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस महासंचालकांनी फेटा‍ळला होता. राज्य सरकारच्या आदेशानुसार नवीन मनुष्यबळाला मंजुरी देता येत नसल्याने हा प्रस्ताव मंजूर करता येत नसल्याचे सांगण्यात आले होते. महासंचालक कार्यालयाने केलेल्या सूचनेनुसार पुणे पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळावर आधारित फेरप्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास फारशी अडचण नसल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

कसे असेल सायबर पोलिस ठाणे?

चार पोलिस निरीक्षक, त्यातील सर्वांत वरिष्ठ निरीक्षक हा पोलिस ठाण्याचा प्रमुख असेल. त्याशिवाय १६ फौजदार, सहायक निरीक्षक आणि ६० पोलिस कर्मचारी या सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असावेत, असे या प्रस्तावात म्हटले आहे. सध्या पुणे पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तीन पोलिस निरीक्षक आणि दहाहून अधिक फौजदार, सहायक निरीक्षक कार्यरत आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने गेल्या काही काळात ठोस कारवाई करून अनेक सायबर गुन्हेगार गजाआड केले आहेत.

सायबर सेल ठरतोय गुन्हेगारांचा कर्दनकाळ

सायबर गुन्ह्यांच्या तपासात इतर गुन्ह्यांच्या तुलनेने एक वेगळेपण आहे. इतर गुन्ह्यांत गुन्हा नेमका कोणी केला, हे पोलिसांना शोधावे लागते. सायबर गुन्ह्यांमध्ये गुन्हा कोणी केला हे सुरुवातीलाच माहीत असते. त्यात एखादा मोबाईल नंबर असेल, ‘आयपी अॅड्रेस’ असेल अथवा तपासाच्या दृष्टीने कुठले तरी महत्त्वाचे लीड मिळालेले असते. त्यामुळे तपासाधिकाऱ्याला आरोपीपर्यंत शोधण्याचे एकदा कौशल्य समजले की गुन्हे उघडकीस येण्यास कमी वेळ लागतो. पुणे पोलिस दलातील सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांच्या पथकाने सध्या हे कौशल्य मिळवले आहे. या पथकाने दिल्लीतून नऊ, पुण्यातून एक, मध्य प्रदेशातून दोन, मुंबईतून दोन अशा सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या गजाआड केल्या आहेत. नागरिकांच्या अकाउंटवरील पैसे हॅक करणारे दहाहून अधिक नायजेरिअन आरोपी अटक झाले आहेत. फेसबुक हॅक करणे, अश्लील प्रतिक्रिया नोंदवणे, सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून त्रास देणारे ६०हून अधिक गुन्हे उघडकीस आणले आहेत. सहा कोटींहून अधिक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना गजाआड करण्यात सायबर सेलला यश आले आहे. अशा या सायबर सेलचे आता पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांच्या रेट्याने निर्णय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘विद्या प्राधिकरणा’च्या निर्मितीचा सरकारी निर्णय काढताना सुरुवातीच्या पातळीवर त्यामध्ये ‘बालभारती’च्या विद्याशाखेशी संबंधित मुद्द्यांचा समावेश नव्हता. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या रेट्यामुळे नंतरच्या टप्प्यात संबंधित मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश झाला. अंतिम टप्प्यात समोर आलेल्या सरकारी निर्णयाविषयी शिक्षण मंत्रालयालाही तितकीशी कल्पना नव्हती, अशी ओरड आता पुढे आली आहे. त्यामुळे मुळात वादात सापडलेल्या या निर्णयाबाबत आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार स्थापन झालेल्या ‘बालभारती’ची विद्याशाखा ‘विद्या प्राधिकरण’ या नव्याने तयार झालेल्या शैक्षणिक संस्थेकडे वर्ग करण्याचा सरकारी आदेश नुकताच जाहीर झाला. त्या आधारे सरकार ‘बालभारती’ची शैक्षणिक स्वायत्तता संपविण्यासाठी धोरणे आखत असल्याची ओरड केली जात आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमांची जबाबदारी असणारा ‘बालभारती’चा शैक्षणिक विभाग एका सरकारी संस्थेकडे वर्ग करून, त्या आधारे सरकारला हवे असलेले घटक अभ्यासक्रमांमध्ये पेरण्याचे प्रयत्न सरकार करीत असल्याचे आरोप पुढे आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी समोर येत असलेली ही चर्चा केवळ सरकारच्याच नव्हे, तर अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी पातळीवरून बालभारती आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या कामामध्ये सुसूत्रता आणण्याची बाब निश्चितच विचाराधीन होती. मात्र, त्यासाठी बालभारतीची विद्याशाखा थेट परिषदेकडे देण्याचा विचार नव्हता. त्या अनुषंगानेच विद्या प्राधिकरणाच्या निर्मितीसाठीच्या सरकारी आदेशाची प्राथमिक चर्चा झाली होती. राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) धर्तीवर राज्यातही शैक्षणिक प्रशिक्षणे, अभ्यासक्रम निर्मिती आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यासाठी एकच संस्था हवी, अशी भूमिका केंद्र सरकारकडून सातत्याने पुढे केली जात आहे. तसे न झाल्यास, वेळप्रसंगी निधीची कपात करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या बाबीचा विचार करून, बालभारती आणि परिषदेच्या विद्याशाखेचे काम एकत्रित करण्याचा विचार सरकारी आदेशातून पुढे आल्याचेही याच निमित्ताने समोर आले आहे.

तर मग, हे कशासाठी ?

‘बालभारती’ची विद्याशाखा ‘विद्या प्राधिकरणा’कडे देण्याची बाब प्रस्तावित होती. त्यानंतरही गेल्या काही काळामध्ये विद्याशाखेच्या कामाचा भार वाढविण्यात येत आहे. यंदा इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमांचे कामही विद्याशाखेकडे देण्यात आले. तसेच, ‘बालभारती’च्या एकूण कामाचा व्याप विचारात घेता, संस्थेमध्ये यापूर्वी नसणारे सहसंचालक दर्जाचे पद निर्माण करून, त्यासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक करण्याची मागणीही सरकारने विचारात घेतली आहे. ‘बालभारती’ केवळ छापखानाच राहणार असेल, तर संस्थेमध्ये विद्याशाखेशी निगडीत कामे का वाढविली जात आहेत, एका छापखान्यासाठी एका संचालक आणि एक सहसंचालक हवा तरी कशासाठी, असे प्रश्न आता संस्थांतर्गत पातळीवरूनच उपस्थित केले जात आहेत. हा सर्व विरोधाभास दूर करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.


‘सरकारने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच, शास्त्रशुद्ध पद्धतीने या निर्णयाचा विचार केला आहे. त्यामध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचा कोणताही हेतू नाही. या निर्णयाद्वारे सरकार संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असल्याची ओरड पूर्णपणे चुकीची आहे.’

विनोद तावडे, शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंदी असतानाही शिक्षकांची भरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षक भरतीला बंदी असतानाही राज्यात २०१२ ते २०१६ या दरम्यानच्या काळात ३५ हजारांवर शिक्षकांना मान्यता देण्यात आल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे. त्यामुळे या दरम्यानच्या काळात शिक्षण खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर, तसेच संस्थाचालकांच्या व्यवहारावर आता थेट सवाल उपस्थित होत आहे.

राज्य सरकारने २ मे २०१२पासून शिक्षक भरती करण्यास बंदी केली होती. गरज पडल्यास, काही विशिष्ट अटींच्या आधीन राहून, शिक्षक भरतीला परवानगी देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. मात्र, नंतरच्या काळात या अटींची कोणतीही पूर्तता न करता, राज्यात शिक्षक भरती झाल्याची बाब समोर आली होती. शिक्षकांच्या भरतीसाठी सरकारची बंदी असतानाही, राज्यातील खासगी संस्थांनी भरती केलेल्या शिक्षकांना मान्यता मिळणार नसल्याचे राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नुकतेच स्पष्ट केले. तसेच, अशा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने मान्यता मिळवून दिल्याचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गरज पडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली अशा शिक्षकांची संख्या राज्याच्या शिक्षण खात्याच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे.

राज्यात २०१२ ते २०१६ या काळात शिक्षकांच्या तब्बल ३५ हजार पदांना मान्यता देण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांचे पूर्ण समायोजन झाल्याशिवाय अशा मान्यता देऊ नयेत, असे आदेश सरकारने दिले होते. त्यानंतरही काही शिक्षणाधिकाऱ्यांच्या पातळीवरून २ मे २०१२नंतर शिक्षकांच्या पदभरतीला मान्यता देण्यात आल्या. खासगी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील जवळपास २३ हजार, तर सरकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जवळपास १२ हजार शिक्षकांच्या पदांचा त्यामध्ये समावेश आहे. आयुक्त कार्यालयामार्फत विभागीय स्तरावरील शिक्षक मान्यतेची प्रकरणे या पुढील काळात तपासली जाणार असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​बालरंगभूमी सुट्ट्यांपुरती

$
0
0

पुणे : लहान मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारी बालरंगभूमी आता केवळ दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांपुरती मर्यादीत राहिल्याचे चित्र आहे. बदलत्या युगात लहान मुलांच्या बदललेल्या आवडी निवडी आणि आधुनिक गॅजेट्सच्या प्रभावामुळे या रंगभूमीला टाळे लावण्याची वेळ अनेक संस्थांवर आली आहे. मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर बालरंगभूमीचा घेतलेला हा आढावा.

काही वर्षांपूर्वी शाळांमध्ये आणि विविध संस्थांमार्फत बालनाट्याचे वर्ग आयोजित केले जात होते. त्यात मुलांचे विश्व मांडणाऱ्या सकस दर्जेदार विषयांवर एकांकिका, दोन अंकी नाटके बसवली जायची. मुलांचा व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीने बालनाट्य ही पहिली पायरी म्हटली जात होती. आता मात्र ही रंगभूमी कुठेतरी हरवलेली आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच आणखीही बऱ्याच गोष्टी बालनाट्याच्या अधोगतीला कारणीभूत आहेत. लहान मुलांना भावतील, असे सकस विषय नाटकांमधून मांडण्यात येत नाहीत, तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाची नाटके बांधली जात नाहीत. अनेक संस्थांमध्ये नाटकासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने, अशा नाटकांकडे दुर्लक्ष केले जाते. अशा सर्व कारणांमुळे बालनाट्याला सध्या चांगले दिवस नाहीत. बालरंगभूमीची नाटके चालवून त्यामधून बक्कळ पैसा कमावण्यासाठी काही निर्मात्यांनी अव्वाच्या सव्वा दराची तिकीटे लावली. परंतु नाटकाचा दर्जा मात्र खालावलेला होता. त्यामुळे या नाटकांना आता फारसा प्रेक्षकही राहिलेला नाही. बालरंगभूमीच्या या होत चाललेल्या दयनीय अवस्थेबद्दल ‘मटा’ने जाणून घेतलेली जाणकारांची मते.
चंद्र-सूर्य आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेचे आयोजक अरविंद सूर्य म्हणाले, ‘सध्या रंगभूमीसाठी दर्जेदार लेखन होत नसल्याने नाटकांचा दर्जा खालावलेला आहे. तंत्रज्ञानाचा विकास होऊनसुद्धा बालरंगभूमीसाठी तंत्रज्ञान वापरले जात नाही, ही खेदाची बाब आहे. केवळ दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांना पालक नाटकासाठी पाठवतात. त्यांना कायमस्वरूपी नाटक करण्यासाठी प्रोत्साहन पालकांनी दिले, तर बालरंगभूमी अधिक समृद्ध होईल. सध्याच्या मुलांमध्ये विलक्षण प्रतिभा आहे. आजकालची लहान मुले चांगले लेखनही करू शकतात. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असून शहरातील नाट्यसंस्थांनी तसे केल्यास पुन्हा एकदा बालरंगभूमीची चळवळ उभी राहील. राज्य सरकार ज्याप्रमाणे रंगभूमीसाठी नाटकांना अनुदान देते, तसे बालरंगभूमीलाही मिळावे.’

बालरंगभूमीची सध्याची परिस्थिती वाईट नाही; पण त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. केवळ उन्हाळी आणि हिवाळी नाट्यशिबीरे घेऊन रंगभूमीचा विकास होणार नाही, त्यासाठी कायमस्वरूपी मुलांना नाटकाशी जोडण्याची गरज आहे. नाटक हा वर्तनाचा वेध घेणारी कला आहे. त्यामुळे लहान वयातच मुलांचे वर्तन चांगले करायचे असेल, तर त्यांना नाटकांमध्ये गुंतवणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी शाळा स्तरावर ही चळवळ रुजणे अत्यंत गरजेचे आहे. शाळेमधून नाटकांसाठी योग्य मार्गदर्शन, अभ्यासक्रम आणि कृती मुलांना मिळाली. तर ही रंगभूमी पुन्हा एकदा समृद्ध होईल. केवळ शहरातच नव्हे; तर ग्रामीण भागातदेखील बालरंगभूमीचा प्रसार करणे आव्हान आहे. त्यासाठी नाट्यसंस्थांनी पुढाकार घ्यायला हवा.
- देवदत्त पाठक, बालनाट्यांचे लेखक, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम आदमी’ही रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘वन रँक वन पेन्शन’च्या (ओआरओपी) मागणीसाठी माजी सैनिकाने आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षातर्फे गुरुवारी मूक निदर्शने करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या तांबडी जोगेश्वरी येथील शहर कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली.
कोट्यवधी भारतीयांच्या सुरक्षेसाठी सीमेवर आयुष्य व्यतीत करणाऱ्या माजी सैनिकांना आत्महत्या करावी लागणे दुर्दैवी आहे. पंतप्रधान ओआरओपी लागू केल्याचा डंका वाजवत आहेत. तरीही माजी सैनिक आत्महत्या का करत आहेत. देशाच्या तीव्र भावना लक्षात आणून देण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली, असे ‘आप’च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आत्महत्या केलेले माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या परिवारास ताब्यात घेऊन मारहाण करणे आणि संविधानाच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याला पोलिसांनी ताब्यात घ्यावे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राजेश चौधरी, मुकुंद कीर्दत, डॉ अभिजित मोरे, आनंद खासनीस, सुभाष कारंडे, आनंद यादव, वहाब शेख ,उमेश व्हराडे, राज चाकणे,प्रकाश पठारे, अखिलेश यादव, अनंत कुलकर्णी, चंद्रकांत पानसे,नागेश गायकवाड, आनंद अंकुश आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’ची यादी निवडणूक निकालानंतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. निववडणुकीच्या रिंगणात इतर पक्षांमधून कोणाला संधी देणार याचा अंदाज घेऊन त्याच ताकदीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाणार आहे. पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी नोव्हेंबर महिन्याच्या अखेर जाहीर होइल, असे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी प्रा-रूप प्रभागरचना, आरक्षण याबरोबरच उमेदवारांच्या नावांचा आढावा पक्षाकडून घेतला जात आहे. याचाच एक भाग म्हणून खडकवासला मतदार संघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, अध्यक्ष, नगरसेवक यांची बैठक खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी घेतली. महापौर बंगल्यात झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी कोणते उमेदवार अधिक सक्षम ठरू शकतात, याची माहिती या बैठकीत सुळे यांनी घेतली.
राज्यात आणि केंद्रात मोदी लाटेवर सत्ता मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पालिकेत सत्ता मिळू नये, यासाठी वेगळी रणनीती आखण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. मतदारांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मिसळून गेल्या दहा वर्षांत शहरात झालेल्या विकासकामांची माहिती देऊन पक्षाचे कार्य पोहचविण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. पालिका निवडणुकीत भाजपचे आव्हान मोडीत काढण्यासाठी सर्व ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. त्यादृष्टिने शक्य त्या प्रभागांमधील उमेदवारांची नावे दोन ते अडीच महिने अगोदरच जाहीर करण्याचे नियोजन पक्षाने केल आहे. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने दोन ते अडीच महिने अगोदरच वानवडी भागातून महापौर प्रशांत जगताप, नंदा लोणकर यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे इतर पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर होइपर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याने निवडणुकीच्या निकालात त्याचा फायदा पहायला मिळाला.
हेच सूत्र आगामी येणाऱ्या पालिका निवडणुकीत वापरून काही उमेदवारांची नावे नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जाहीर केली जाणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर ​जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी सैनिक रामकिशन ग्रोवाल यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारविरुद्ध गोपाळकृष्ण गोखले चौकात (गुडलक चौक) गुरुवारी आंदोलन करण्यात आले. काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलने करण्यात येत आहेत.
या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, अखिल भारतीय काँग्रेसच्या महासमितीचे सदस्य गोपाळ तिवारी, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, पक्षनेते अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, युवकचे काँग्रेसचे अध्यक्ष विकास लांडगे, भूषण रानभरे, अजित दरेकर, मनीष आनंद, सदानंद शेट्टी, नीता रजपूत, रामभाऊ बराटे, शेखर कपोते, बाळासाहेब दाभेकर, राजू डांगी, दत्ता बहिरट, अविनाशथ बागवे, रईस सुंडके, नुरूद्दीन सोमजी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
‘मोदी सरकार हाय हाय’, ‘हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो’या घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. ग्रेवाल यांच्या आत्महत्येला मोदी सरकारच जबाबदार असल्याची टीका करण्यात आली. उल्हास पवार म्हणाले, की ‘गोखल्यांचे नाव असलेल्या या ऐतिहासिक चौकात आपण निवृत्त सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी तसेच ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा देण्यासाठी जमलो आहोत. मोदी सरकार भावनाशून्य झाले असून, ते हिटलरप्रमाणे वागत आहे. माजी सैनिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम हे सरकार करत आहे.’
मोदी सरकार सूडबुद्धीने कार्यरत असून, ग्रेवाल यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि इतर कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आला; त्यांना ताब्यात घेण्यात आले. सरकारचे हे कृत्य लोकशाहीला काळिमा फासणारे आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा किल्ला भेदणार कोण?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/येरवडा

गेल्या निवडणुकीत शहराच्या पूर्व भागांतून राष्ट्रवादीला भरघोस यश प्राप्त झाले असल्याने आगामी निवडणुकीत ‘विमाननगर-सोमनाथनगर’ (प्रभाग क्र. ३) त्याची पुनरावृत्ती करण्यावर पक्षाचा भर आहे. येथील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी इतर सर्व पक्षांनी तयारी केली असून, इच्छुकांनी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावली आहे.
अलिकडच्या काळात वेगाने विकसित झालेल्या पूर्व भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव पठारे आणि उषा कळमकर (प्रभाग क्र. ३) आणि राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरूजी आणि मीनल सरवदे (प्रभाग क्र. १७) यांच्या जुन्या प्रभागांतील भाग एकत्र करून ‘विमाननगर-सोमनाथनगर’ (क्र. ३) हा नवा प्रभाग तयार झाला आहे. गेल्या निवडणुकीत पूर्व भागाने राष्ट्रवादीला दमदार साथ दिली असल्याने या वेळी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी सर्व पक्षीय उमेदवार सज्ज आहेत.
नगर रोडवरील गुंजन टॉकीजपासून या प्रभागाची सुरुवात होते. येरवडा पोलिस स्टेशन, विक्रीकर भवन, शास्त्रीनगर कॉलनी, शांतीरक्षक सोसायटी, ईशान्य मॉल, डॉन बॉस्को हायस्कूल, त्रिदलनगर, संजय पार्क, पुरु सोसायटी, बर्माशेल झोपडपट्टी, खेसे वस्ती, लोहगाव विमानतळ, गुरुद्वारा वस्ती, खांदवेवस्ती, नऊ बीआरडी, सोमनाथनगर, सोपाननगर, विमाननगर, चंदननगर, सिम्बायोसिस कॉलेज, गंगापुरम, नगररोड क्षेत्रीय कार्यालय असा परिसर या प्रभागामध्ये समाविष्ट होतो.
या दोन्ही प्रभागात सर्व ठिकाणी राष्ट्रवादी असल्याने चारही विद्यमान नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. महादेव पठारे, उषा कळमकर, बापूराव कर्णे गुरुजी आणि मीनल सरवदे या चौघांनी आत्तापासूनच एकमेकांच्या भागात प्रचाराला सुरुवात केली आहे. चारही विद्यमानांसह आनंद सरवदे, भुजंग लवे यांची नावेही सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष या भागात कमजोर आहेत. तरीही, वडगावशेरी विधानसभेत अनपेक्षित विजय मिळविल्याने महापालिकेमध्येही चमत्कार घडेल, अशी अपेक्षा भाजपला आहे. या प्रभागातून अर्जुन जगताप, अन्वर पठाण, राहुल भंडारी, विशाल साळी, बिपीन घोरपडे, अप्पासाहेब जाधव गुरुजी आणि विजया साळी अशी इच्छुकांची मोठी यादीच आहे. त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून रमेश आढाव, अयुब शेख, सादिक शेख, भीमसेन रोकडे, दिनकर मोहिते, रमेश सकट, राहुल शिरसाठ आणि कविता शिरसाठ यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. प्रीतम खांदवे, प्रदीप ढोकले, राजू सावंत, प्रज्ञा सावंत आणि सुरेश घाडगे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. मनसेकडून मोहन शिंदे, तनुजा मोहन शिंदे, कल्पेश यादव, अच्युतराव मोळावडे, मनोज ठोकळ, श्वेता महेश गलांडे यांच्या नावांची चर्चा आहे.
............
प्रभाग क्र ३ : विमाननगर-सोमनाथनगर
लोकसंख्या : ८४,७६४
आरक्षण :
अ : अनुसूचित जाती
ब : ओबीसी (महिला)
क : महिला
ड : खुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांचा ‘बँड’ वाजवणार

$
0
0

पालिका प्रशासनाची नवी मो​हीम; पुढील वर्षीपर्यंत राबविणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचा मिळकतकर थकविणाऱ्यांच्या घरासमोर बँड वाजविण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
वर्षानुवर्षे मिळकतकराची थकबाकी चुकविणाऱ्यांकडून ती वसूल करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शहरातील अडीच लाख मिळकतींची सुमारे शंभर कोटी रुपयांची थकबाकी थकित आहे. मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने सवलतीच्या दरात भरण्याची सवलत दिली आहे. तसेच, अभय योजना राबवून दंडाच्या रक्कमेत ५० ते ७५ टक्के सवलत देण्याची योजनाही सुरू केली होती. मात्र, थकबाकी भरण्याबाबत पालिकेने पाठविलेल्या नोटिशींना अनेकांनी केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाने ‘बँड वाजविण्या’चा उपक्रम सुरू केला आहे. घरासमोर बँड वाजल्यास त्याची शेजारीपाजारी चर्चा होते, या भीतीने अनेकजण कर भरतात असा अनुभव आहे. त्यामुळे ही मोहीम तीव्र करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. घरगुती आणि व्यावसायिक वापर असलेल्या शहरात सर्वसाधारणपणे साडेसात लाख मिळकती आहेत. मात्र, त्यातील जवळपास दोन ते अडीच लाख मिळकतधारक नियमित कर भरत नाहीत. तर, अन्य काही थकबाकीदार पालिकेच्या विरोधात कोर्टात गेले आहेत. त्यामुळे महापालिकेची थकबाकी दरवर्षी वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुलीसाठी पालिकेने बँड वाजविण्यास सुरुवात केली आहे.
घरासमोर बँडवादन सुरू होताच अनेक थकबाकीदार तातडीने रोख रक्कम, धनादेश पालिकेकडे जमा करतात. त्यामुळे बँडवादनाचा उपक्रम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचे नवीन वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे.
..
‘वादनाला चांगला प्रतिसाद’
थकित मिळकतकर वसुलीसाठी पालिकेने पाच बँडपथकांची नेमणूक केली आहे. प्रत्येक पथकामध्ये तीन वादक असून, महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाला याविषयीची माहिती देण्यात आली असून, थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च येत असला तरी गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता या बँडपथकांच्या माध्यमातून जवळपास ७० ते ७५ कोटी रुपयांची वसुली झाल्याचे प्रॉपर्टी टॅक्स विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसेचा अर्ज बाद

$
0
0

चौरंगी लढत होण्याची शक्यता; मनसेच्या मतांवरून तर्कवितर्क सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार बाबू वागस्कर यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि भाजप-शिवसेना अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मनसेचा उमेदवार बाद झाल्यामुळे त्यांची च्या ३६ मते कोणाच्या पदरात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पाच नोव्हेंबरला अर्ज माघारीची अंतिम मुदत असून, त्यानंतर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अनिल भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे आणि शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली खंडागळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वागस्कर यांनी अर्ज दाखल करताना पक्षाचा एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष ठरली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. वागस्कर यांनी सरकारी मालमत्ता आणि थकबाकी याबाबत एकच प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यासाठी दोन स्वतंत्र प्रतिज्ञापत्र न दिल्यामुळे त्यांचा अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक मुख्य अधिकारी सौरभ राव यांनी बाद ठरवला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे. अन्य अपक्ष उमेदवारांमध्ये यशवंत पारखी, केदार उर्फ गणेश नानासाहेब गायकवाड, प्रकाश गोरे, बापू ढिगळे यांचा समावेश आहे. वागस्कर बाहेर पडल्याने दहा उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.
...............
‘कोर्टात दाद मागणार’
‘अर्ज बाद करण्याच्या निर्णयाविरुद्ध बाबू वागस्कर कोर्टात दाद मागणार आहेत. वागस्कर यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अ आणि ब असे दोन विभाग करून मालमत्ता आणि थकबाकीबाबत सर्व तपशील दिला होता. तरीही उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे वागस्कर कोर्टात जातील,’ असे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान दौऱ्यावर आचारसंहितेचे सावट

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांनी मागवले आयोगाचे मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्यावर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट उभे ठाकले आहे. या दौऱ्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी दिली.
येत्या १३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमास ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या शिवाय अन्य कार्यक्रमांनाही त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात राजकीय नेते आणि नोकरशहांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मोदींचा दौरा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.
मोदींच्या दौऱ्यात पक्षाचा एखादा कार्यक्रम आयोजित करावा, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विशेषतः दोन्ही महापालिकांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या उपस्थितीने आणि भाषणामुळे निवडणुकीत राजकीय लाभ होऊ शकतो, असा विश्वास पदाधिकाऱ्यांना वाटतो.
दरम्यान, पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पास केंद्राच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मान्यता मिळाली असून हा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. त्याला मान्यता मिळवून निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. मोदी यांच्या दौऱ्यातच हा कार्यक्रम बसविण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम बासनात गुंडाळावा लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अशाच कार्यक्रमातील उपस्थितीमुळे आचारसंहितेच्या नियमांचा फटका बसला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून सल्ला घेण्यात येत आहे.
.......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात नियोजित कार्यक्रमासह अन्य कार्यक्रमाचे नियोजन करता येईल का, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही, याबाबत सर्व बाजूंनी विचार करूनच वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल.
योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या नेत्यांना चढलीय सत्तेची धुंदी

$
0
0

काँग्रेसच्या अभय छाजेड यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवी मुंबई महापालिका सदस्यांनी बहुमताने मंजूर केलेला आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मुख्यमंत्र्यांनी फेटाळणे, पालकमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय कार्यक्रम न करण्याचे आदेश, तसेच महापालिकेच्या स्मार्ट‍ सिटीत होणारा हस्तक्षेप हे प्रकार म्हणजे राज्यातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना आलेल्या सत्तेच्या धुंदीचे निदर्शक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेत सभासद म्हणून काम केले आहे. पालिकेच्या कारभाराची त्यांनाही माहिती आहे. असे असतानाही नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बहुमताने मान्य केलेला आयुक्त मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळणे चुकीचे आहे. सभागृहात बहुमताने प्रस्ताव मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्र्यांनी त्यावर खुलासा मागविणे चुकीचे आहे,’ असा टोला काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी लगावला.
महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पातही राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. पालिकेच्या प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या विषयांमध्ये पालकमंत्री बापट यांनी नगरविकास खात्याला पत्र पाठविले आहे. पालकमंत्री तसेच शहरातील आमदार यांना विचारल्याशिवाय उद्घाटन कार्यक्रम घेऊ नयेत, असे आदेश राज्य सरकारने पालिका आयुक्तांना द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. पालिकेचे सर्व कार्यक्रम राजशिष्टाचारानुसार केले जात असतानाही बापट यांची ही मागणी पालिकेच्या स्वायत्ततेवर आक्रमण करण्याचा प्रकार असल्याची टीकाही छाजेड यांनी केली.
मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी पालिकेत सदस्य म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी पालिकेच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. मा‌त्र, आपल्याकडे सत्ता आहे म्हणून चुकीच्या पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पालिकेचे कामकाज करण्यासाठी महापालिकेला स्वतंत्र अधिकार असतो, याचा मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना सत्तेच्या धुंदीमुळे विसर पडला असल्याची टीकाही छाजेड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांचा आवाज फुस्स

$
0
0

सलग दुसऱ्या वर्षी ध्वनीप्रदूषणात घट; वायूप्रदूषणाचा उच्चांक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आवाक्याबाहेर गेलेल्या फटाक्यांच्या किमती तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाबाबतच्या जनजागृतीमुळे सलग दुसऱ्या वर्षी दिवाळीत फटाक्यांचा आवाज घटला आहे. लक्ष्मी रोड मात्र याला अपवाद ठरला असून, दिवाळीमध्ये राज्यातील सर्वाधिक प्रदूषण करणारा हा परिसर ठरला आहे. दिवाळीच्या चारही दिवसात लक्ष्मी रोडवर सरासरी ९३.३ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दर वर्षी दिवाळीपूर्वी बाजारातील फटाक्यांच्या आवाजाची तपासणी करण्यात येते. तसेच, दिवाळीचे चारही दिवस शहराच्या विविध भागांत सकाळी आणि रात्री ध्वनीपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. या वर्षी आवाजाच्या फटाक्यांमध्ये घट झाल्याने ध्वनी प्रदूषण घटल्याचा निष्कर्ष मंडळाने काढला आहे. ध्वनी प्रदूषण घटण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
शाळांमध्ये होत असलेली जनजागृती आणि आवाजाऐवजी रोषणाईच्या फटाक्यांकडे ग्राहक आकर्षित होत असल्याने आवाजाच्या फटाक्यांची मागणी दर वर्षी घटत आहे.
अनेक सोसायट्यांमध्ये फटाके उडविण्यास बंधने घालण्यात आली आहेत. परिणामी आवाजाच्या पातळीवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. गेल्या वर्षी कर्वे रोड येथे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ९२.७ डेसिबल इतकी सर्वाधिक आवाजाची नोंद झाली होती. राज्यातील सर्वाधिक आवाज कर्वे रोडवर नोंदविण्यात आला होता. यंदा लक्ष्मी रोडची सरासरी पातळी ९३.३ डेसिबलवर पोहोचली आहे.
हरित न्यायाधिकरणाने रात्री दहानंतर फटाके वाजविण्यावर बंदी आणल्याचा परिणाम या दिवाळीत अनुभवायला मिळाला आहे. विशेष म्हणजे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत गेल्या वर्षाच्या तुलनेत ६७.१ वरून ५८.५ डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी घसरली. पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच आवाजाच्या नोंदीत एवढी तफावत बघायला मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी फटाक्यांचे प्रमाण जास्त असल्याने या वेळेत ७२.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. एकूण आवाज घटला असला तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या आवाजमर्यादेपर्यंत पुणेकर पोहोचलेले नाहीत.
ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल सरासरी आवाजाला परवानगी आहे. मात्र, दिवाळीतील फटाक्यांमुळे या पातळीपेक्षा जास्तच आवाजाची नोंद होते आहे. या वर्षी मंडळाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत आवाजाची पातळी तपासण्यात आली. पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील १०९ ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.
...............
शाळा आणि कॉलेजस्तरावर फटाक्यांबद्दल होत असलेल्या जनजागृतीचे सकारात्मक परिणाम आता दिसत आहेत. गेल्या वर्षीबरोबरच यंदाही आवाजाचे फटाके खूप कमी वाजले. आकाशातील फटाक्यांमध्ये मात्र वैविध्य आणि वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिवाळीतील ध्वनी प्रदूषणात यंदाही वाढ होणे अपेक्षित होते.
- डॉ. महेश शिंदीकर
ध्वनी प्रदूषण अभ्यासक
....................
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या नोंदी
वेळ : सकाळी ६ ते रात्री १०पर्यंत (आवाजाची नोंद डेसिबलमध्ये)
ठिकाण २०१६ २०१५
लक्ष्मी रोड ९३. ३ ८०.५
कर्वे रोड ९१.३ ९२.७
कोथरूड ८७.१ ८१.५
पिंपरी चौक ८६.७ ८३.८
शनिवारवाडा ८४.५ ८५.३
मंडई ८४.३ ८४.२
सारसबाग ८३.० ७९.३
स्वारगेट ८२.८ ८२.९
चापेकर चौक ८१.५ ७८.७
डांगे चौक ८१.५ ८०.५
कोरेगाव पार्क ७५.७ ८३.५
सातारा रोड ७४.३ ७०.३
शिवाजीनगर ७२.४ ७२.३
येरवडा जेल ७२.४ ७२.९
...............
वेळ : रात्री १० ते पहाटे ६पर्यंत
लक्ष्मी रोड ७६.४ ७७.५
कर्वे रोड ७४.९ ७६.४
कोथरूड ७४.७ ७०.७
शनिवारवाडा ७२.७ ६८.६
मंडई ७०.० ६६.८
चापेकर चौक ६९.३ ६७.४
डांगे चौक ६९.९ ८०.७
येरवडा ६८.९ ६९.८
कोथरूड ६५.९ ६५.७
सारसबाग ६५.३ ६२.८
खडकी बाजार ५९.६ ६०.५
शिवाजी नगर ५७.६ ५६.२
सातारा रोड ५०.० ५७.९
..........................
वायू प्रदूषणाने गाठला उच्चांक

आवाजाचे फटाके कमी वाजवल्याने ध्वनी प्रदूषण घटले असले तरी, आकाशातील रोषणाईच्या फटाक्यांमुळे पुण्याने वायू प्रदूषणाचा यंदा उच्चांक गाठला. पाडव्याच्या दिवशी प्रदूषणाने उच्चांक गाठल्याने हवेच्या गुणवत्तेने ‘व्हेरी पूअर’ची पातळी ओलांडली.
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’च्या ‘सफर’ या प्रदूषणमापन यंत्रणेने दिवाळी दरम्यान हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. ‘सफर’चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग, नेहा पारखी आणि वृंदा आनंद यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हवेच्या प्रदूषणात धक्कादायक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला ‘पार्टिक्युलेट मॅटर’ २.५ (पीएम- हवेतील धुलिकणांचे प्रमाण) प्रदूषणाची पातळी १९२ मायक्रॉन प्रती घनमीटर म्हणजे मध्यम स्वरूपाच्या पातळीवर पोहोचली होती. पाडव्याला या पातळीने उच्चांक गाठला. या दिवशी हवेतील पीएम २.५चे प्रमाण ३३७ मायक्रॉन प्रती घनमीटरपर्यंत पोहोचले होते. गेल्या वर्षी याच दिवशी ही पातळी २०५ नोंदविण्यात आली. आकाशातील फटाके आणि तापमान चार अंशांनी घटल्याने हवेचे प्रदूषण वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले होते. मुख्यतः कात्रज, शिवाजीनगर आणि हडपसर येथे सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्साही पुणेकर पर्यटन मोहिमेवर

$
0
0

कोकण, गोवा, महाबळेश्वरला अधिक प्राधान्य; परराज्यांवरही भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन साजरे केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून उत्साही पुणेकर पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. येत्या रविवारपर्यंत शाळा-कॉलेजला सुट्ट्या असल्याने पुणेकरांनी कोकणातील समुद्रकिनारे, गोवा आणि महाबळेश्वर आदी थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. मोठी सुट्टी मिळालेल्या पुणेकरांनी केरळ, मध्यप्रदेश आणि राजस्थानकडे कूच केले आहे.
नोकरी, शिक्षणानिमित्त शहराकडे आलेली तरुण मंडळी आणि कुटुंबे गेल्याच आठवड्यात दिवाळीसाठी आपापल्या गावाकडे परतली. त्यानंतर आता पुणेकर पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. पर्यटकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे १४ नोव्हेंबरपर्यंत ‘महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळा’ची (एमटीडीसी) कोकणासह सर्व रिसॉर्ट फुल्ल झाली आहेत. सीझनमुळे खासगी हॉटेलनाही चांगली मागणी असून, नागरिकांनी महिनाभरापूर्वीच बुकिंग केले आहे. राज्यांतर्गत पर्यटनासाठी यंदाही कोकणाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. हॉटेल, रिसॉर्टबरोबरच होम स्टेलाही मागणी आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवसापासून कोकण किनारपट्टीवरील तारकर्ली, वेंगुर्ला, देवबाग, अलिबाग, हरिहेश्वर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, दिवेआगार, गुहागर हे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी स्थानिक पर्यटन संस्थांनी यंदा लहान-मोठे महोत्सवही आयोजित केले आहेत. त्यामुळे ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच खाद्य संस्कृतीलाही बहर येणार आहे. पाठोपाठ महाबळेश्वर, पन्हाळा, भंडारदरा, आंबोली, माथेरान कार्ला या ठिकाणीही पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी गेले आहेत.
‘एमटीडीसी’च्या सर्व रिसॉर्टना आता सर्वच ऋतूंमध्ये पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. दिवाळीमध्ये बहुतांश कंपन्यांना तीन ते चार दिवस सुट्ट्या असल्याने ही मंडळी छोट्या सहलीवर जाणे पसंत करतात. त्यामुळे दिवाळीत कोकणाला प्राधान्य देतात. या वर्षी देखील रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्गातील किनाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तारकर्ली येथील हाउस बोटला पर्यटकांची मागणी आहे, अशी माहिती मंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांनी दिली.
.....
जंगल टुरिझमची चलती
घनदाट जंगलातील गूढ शांतता आणि वन्यजीवांविषयी वाढलेल्या आकर्षणामुळे सुट्ट्यांमध्ये ताडोबा, नागझिरा, पेंच या अभयारण्यांबरोबरच देशभरातील कान्हा, रणथंबोर, बांधवगड, काझीरंगा या अभयारण्यांना पुणेकर पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. पावसाळा संपल्यावर देशभरातील अभयारण्ये पर्यटकांसाठी खुली होतात. त्यामुळे ऑक्टोबरच्या मध्यापासून पर्यटकांची गर्दी वाढत जाते.
व्याघ्र प्रकल्पांचे बुकिंग चार महिने आधी खुले होते. मात्र, मर्यादित प्रवेश असल्याने बुकिंगला चांगलाचा प्रतिसाद मिळतो. हिवाळा हा एकूणच भटकंतीसाठी सुखकर कालावधी असल्याने दिवाळीच्या सुट्ट्यांमधील जंगल भटकंती वाढली आहे. वाढत्या प्रतिसादामुळे या सुट्ट्यांसाठी आम्हाला चार महिनेआधी व्याघ्र प्रकल्पांचे नियोजन करावे लागते आहे. यंदाही जंगल पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती ‘नेचरवॉक’चे अनुज खरे यांनी दिली.
...........
राजस्थान, कर्नाटकला पसंती
अलिकडे पाल्यांच्या शाळांच्या सुट्ट्यांनुसार पालक वर्षभराच्या सुट्ट्यांचे नियोजन करतात. त्यामुळे पर्यटकांकडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच दिवाळीच्या सहलींची चौकशी करण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशांतर्गत विमान प्रवासाचा खर्च पंधरा टक्क्यांनी कमी झाला आहे. दिवाळीत पर्यटन करणाऱ्यांपैकी सुमारे ७० टक्के लोक सहा ते सात रात्रींची टूर करतात, तर उर्वरित मंडळी दहा ते बारा दिवसांची मोठी सहल करतात. यंदा राज्याबाहेरील पर्यटनासाठी केरळ, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानला पर्यटकांची पसंती मिळाली आहे. पाच दिवसांपासून ते आठ दिवसांपर्यंतची विविध पॅकेज पर्यटकांनी निवडली आहेत, अशी माहिती टुरिस्ट कंपन्यांच्या मालकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images