Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एन्काउंटरमधील तिघे पुणे स्फोटातील संशयित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात स्फोट घडविणाऱ्या ‘सिमी’संघटनेच्या तिन्ही संशयितांचा मध्य प्रदेशातील पोलिस एन्काउंटरमध्ये खात्मा झाला. तुरुंग फोडून फरारी झालेल्या आठ संशयितांमध्ये त्यांचा समावेश होता.
या पूर्वी हैदराबाद पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये फरासखाना स्फोटातील एका संशयिताला यमसदनी पाठविण्यात आले होते. अशा प्रकारे फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात स्फोट करणाऱ्या चौघा संशयितांची अखेरही पोलिसांच्या हातून झाली. शेख मेहबूब शेख इस्माईल ऊर्फ गुड्डू ऊर्फ किसन ऊर्फ मलिक ऊर्फ रमेश ऊर्फ समीर ऊर्फ आफताब (रा. गणेश तलाई, खंडवा, मध्य प्रदेश), जाकीर हुसेन बद्रुल हुसेन ऊर्फ सिद्दीक ऊर्फ आनंद ऊर्फ विकी डॉन ऊर्फ विनयकुमार (रा. खांडवा, मध्य प्रदेश), अमजदखान ऊर्फ पप्पू ऊर्फ दाऊद रमजान खान (रा. खांडवा, मध्य प्रदेश) हे तिघे फरासखाना स्फोट प्रकरणातील संशयित होते. त्यांच्यासह महंमद एजाजउद्दीन ऊर्फ अरविंद (रा. करेली, मध्य प्रदेश) याच्यावरही संशय होता. हैदराबाद पोलिसांनी या पूर्वी केलेल्या एन्काउंटरमध्ये एजाजउद्दीन मारला गेला.
सिमी संघटनेचे आठ दहशतवादी भोपाळच्या मध्यवर्ती तुरुंगातून सोमवारी पहाटे फरारी झाले. दहशतवाद्यांनी कारागृहातील सुरक्षारक्षकाला ठार करून इतरांचे हातपाय बांधून ठेवले. चादरीचा दोर करून त्यांनी कारागृहाची भिंत ओलांडली. मध्य प्रदेश सरकारने तातडीने तीन पथके तयार करून या दहशतवाद्यांचा शोध घेतला. भोपाळपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मलिखेडा गावात पोलिस आणि फरारी दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आत्मसमर्पण करण्याचा इशारा धुडकावून दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ते ठार झाले. 000
..
दोन वर्षांपूर्वी पुणे हादरले
फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरच्याकडेला सातारा येथून चोरण्यात आलेल्या दुचाकीवर बॉम्ब पेरण्यात आला होता. या बॉम्बचा १० जुलै २०१४ रोजी दुपारी २.०५ ​मिनिटांनी स्फोट झाला. स्फोटात सहा दुचाकींचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. पुणे पोलिस, दहशतवादविरोधी पथकाने उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
..
‘सीसीटीव्हीं’मध्ये दिसले दहशतवादी
दहशतवादविरोधी पथकाने फरासखाना स्फोटाप्रकरणी तपास सुरू केल्यावर शहरातील २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले होते. त्यातील २४ ठिकाणच्या कॅमेऱ्यांमध्ये आरोपी कैद झाले होते. सातारा शहरातील तीन तसेच पुणे-सातारा रोडवरील दोन टोल नाक्यांवरील फुटेज तपासण्यात आले होते. फरासखाना पोलिस ठाण्यासमोरील एका कॅमेऱ्यात स्फोटाचा प्रसंग कैद झाला होता. पोलिस ठाण्याच्या आवारात सकाळच्या सुमारास दुचाकी पार्क करणारे दोघे संशयित आणि सातारा रोडवरील टोलनाक्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेले संशयित यांची वर्णने जुळल्यानंतर आरोपींची खात्री पटली होती.
..
एन्काउंटरमध्ये दोघे ठार
हैदराबाद - विजयवाडा रस्त्यावरील सूर्यापेठ येथील हायटेक बसस्टँडवर बसमधील दोघा संशयितांना पोलिसांनी तपासणीदरम्यान चौकशीसाठी खाली उतरवले. ते दोघेही सिमीचे दहशतवादी होते. पोलिसांनी आपल्याला पकडल्याचा संशय आल्याने त्यांनी पिस्तुलातून पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. त्यात दोघे पोलिस कर्मचारी मारले गेले आणि दोघे जखमी झाले होते. ४ एप्रिल रोजी स्थानिक गावकऱ्यांना मुख्य रस्त्यांवर दोन दहशतवादी कार्बाईन गन घेऊन फिरत असल्याचे दिसले. ते समजल्यानंतर मोदकूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये एक फौजदार व त्यांचा चालक हे ठार झाले. या वेळी दहशतवादी एजाजउद्दीन आणि अस्लम ठार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य सरकारतर्फे यंदा सहकार सप्ताह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या विकासातील सहकार क्षेत्राचे योगदान नागरिकांना माहीत व्हावे, यासाठी यंदा सहकार विभागाच्यावतीने १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान, राज्य आणि जिल्हास्तरावर सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य स्तरावरील सप्ताह पुण्यात वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरकारी व्यवस्थापन संस्थेच्या सभागृहात होणार आहे.
‘शाश्वत विकासामध्ये सहकाराचे योगदान’ या संकल्पनेवर हा सप्ताह असणार आहे. सप्ताहाच्या नियोजनासाठी​ सहकार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या सूचनेनुसार राज्यभर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सहकार सप्ताह अधिक व्यापक करण्याच्यादृष्टीने राज्य आणि जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या सप्ताहाममध्ये राज्यस्तरावर राबविण्यात येणारे कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहे.
सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले की, ‘राज्य आणि जिल्हा स्तरावर राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे नागरिकांना एकाच वेळी माहिती मिळणार आहे. सहकार विभागाच्या वतीने दर वर्षी सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदा या सप्ताहाची व्याप्ती वाढण्यात आली​ आहे. या सप्ताहात सहकार विभागाशी निगडित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये नागरी बँका, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, पणन सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने, मजूर सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था, सहकारी सूतगिरण्या, हातमाग व यंत्रमाग संस्था, दुग्ध व मत्स्यव्यवसाय संस्था आदी विषयांवर ऊहापोह केला जाणार आहे.’
‘राज्यस्तरावर असणारे विषय हे जिल्हास्तरावर चर्चेसाठी घेतले जाणार आहेत. सहकार चळवळीत योगदान असलेले तज्ज्ञ, सहकारी संस्थांमधील अधिकारी आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे, ’ असेही दळवी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला मिरविण्याची हौस नाही : बापट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असल्याने कार्यक्रम आणि फलकांच्या माध्यमातून मिरविण्याची मला हौस नाही,’ असे पालकमंत्री ‌गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. मात्र, राजशिष्टाचाराचे संकेत पाळले गेलेच पाहिजेत, या शब्दांत बापट यांनी महापौर प्रशांत जगताप यांचे कान टोचले.
महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळला जात नसल्याची तक्रार बापट यांनी राज्य सरकारकडे केली होती. पालकमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कार्यक्रमाची मान्यता देऊ नये, असे आदेश सरकारने महापालिका आयुक्तांना द्यावेत, अशी मागणीही बापट यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांकडे केली.
पालकमंत्र्यांना आगामी पालिका निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ते अशी वक्तव्ये करत असल्याची टीका महापौरांनी केली होती. त्यावरुन पालकमंत्री विरुद्ध महापौर असा वाद सुरू झाला. पालकमंत्री बापट यांनी केलेल्या चुकीच्या मागणीनंतर आदेश काढल्यास राज्य सरकारला जाब विचारण्यास मागे पाहणार नसल्याचेही जगताप यांनी म्हटले होते.
जगताप यांनी केलेल्या टीकेबाबत बापट म्हणाले की, ‘शहराच्या विकासाच्या दृष्टिने भारतीय जनता पक्षाने अनेक कामे केली आहेत. भाजप सरकारने तसेच त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही केलेल्या कामाची जाण पुणेकरांना आहे. आपण गेली ३५ ते ४० वर्षे शहराच्या राजकारणात सक्रिय आहे. एवढ्या वर्षात कधीही प्रसिद्धीचा हव्यास केलेला नाही. त्यामुळे माझ्यावर कोणी काय आरोप केले, हे महत्त्वाचे नाही. शहरात विकासाची कामे झाली पाहिजेत. परंतु. ती करताना राजशिष्टाचाराकडे दुर्लक्ष होता कामा नये,’ असेही बापट म्हणाले.
गेले दोन वर्षात राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती देऊन भविष्यातील योजनांची माहितीही बापट यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोराचा पोलिसांवर गोळीबार

$
0
0

‘पीडीसीसी’वरील हल्ल्याचा सूत्रधार जखमीअवस्थेत जेरबंद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राहू येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर (पीडीसीसी) पडलेल्या दरोड्याच्या तपासासाठी चाळीसगावात (जि. जळगाव) गेलेल्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकावर दरोडेखोराने कार्बाइनमधून गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिस पथकाने केलेल्या गोळीबारात दरोडेखोर जखमी झाला. मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास चाळीसगाव येथील माधवनगरमधील पुन्सी पेट्रोल पंपाच्या मागे ही घटना घडली.
जखमी दरोडेखोराला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी दरोडेखोर आणि त्याच्या साथीदारांनी दहा सप्टेंबर रोजी रात्री बँकेवर दरोडा टाकून ६६ लाखांची रोकड लुटली होती. सचिन अप्पा इथापे (२८, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे जखमी झालेल्या दरोडेखोराचे नाव आहे. त्याच्या नावावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. इथापे, ज्ञानेश्वर लोकरे आणि त्याच्या साथीदारांनी बँकेवर दरोडा टाकला होता. त्यावेळी त्यांनी बँकेचे सुरक्षारक्षक कैलास भालेराव (२५, रा. वाळकी) आणि त्यांचे जोडीदार उत्तम मारोती वाघ (वय ६५, रा. राहू) यांचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवला. बँकेचे स्ट्राँग रूम गॅस कटरच्या मदतीने करून प्रवेश करून रोकड लुटली. दरोड्याची घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. दरोड्याचा तपास युध्दपातळीवर करून दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिले होते. या प्रकरणी यवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव आणि त्यांचे पथक करत होते. दरम्यान, बँकेवर दरोडा टाकणारे इथापे आणि लोकरे चाळीसगाव येथे रो-हाउसमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव, सहायक निरीक्षक राजेश रामघरे, उपनिरीक्षक अंकुश माने, पोलिस कर्मचारी गिरमकर, सकाटे, वाघ, कदम, कोकणी, मुजावर आणि वाघमारे यांचे पथक चाळीसगावला रवाना झाले. पोलिस पथकाने इथापेची माहिती काढली. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो चाळीसगावातील पुन्सी पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचला. इथापेला पोलिस पथकाची कुणकुण लागली. त्याने त्याच्याजवळ असलेल्या कार्बाइनमधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने गोळीबार चालूच ठेवला. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक अंकुश माने यांनी स्वरंक्षणासाठी त्याच्या दिशेने गोळीबार केले. पोलिसांची गोळी इथापेच्या पायाला लागली. जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
..
तीनदा जेलमधून पलायन
आरोपी ज्ञानेश्वर लोकरे याच्याविरुध्द ३३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने आतापर्यंत तीन वेळा जेलमधून पलायन केले आहे. २००७, २०११, आणि २०१३ मध्ये लोकरेने सावंतवाडी येथील जेलमधून दोनवेळा तर, इंदापूर येथील सबजेलमधून पलायन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची पुन्हा भोसलेंना पसंती

$
0
0

आ. जगताप समर्थकांच्या उमेवारीमुळे लढतीत रंगत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुन्हा अनिल भोसले यांना संधी देण्यात आली आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व असले, तरी आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी भरलेला अर्ज आणि आघाडीबाबतच्या अनिश्चिततेमुळे काँग्रेसची उमेदवारी यांमुळे निवडणुकीत रंग भरणार असल्याचे स्पष्ट झाले.
आज, बुधवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भोसले निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. भोसले यांची आमदारकीची मुदत संपल्याने होणाऱ्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता होती. भोसले यांच्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून माजी आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते इच्छुक होते. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या आठवड्यात विधान परिषदेसाठी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव पुढे येणार, या चर्चेला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळाला. पक्ष नेतृत्वाने अनिल भोसले यांच्यावर विश्वास कायम ठेवून त्यांना सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ग्रामीण भागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीकडे बहुमत असल्याने ही निवडणूक भोसले यांच्यासाठी सोपी असल्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भोसले आज, बुधवारी सकाळी ११ वाजता विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीकडून भोसले अर्ज भरणार असले, तरी राष्ट्रवादीचा मित्रपक्ष काँग्रेसनेही संजय जगताप यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आज, बुधवारी (२ नोव्हेंबर) असल्याने जगताप अर्ज भरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, औंध येथील उद्योजक गणेश गायकवाड यांनी मंगळवारी विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक-अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत.
..................
भाजपकडून येनपुरे आज अर्ज भरणार
राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षानेही विधान परिषद निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. भाजपकडून नगरसेवक अशोक येनपुरे बुधवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपच्या जंगली महाराज रोडजवळच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्व कार्यकर्त्यांना बुधवारी सकाळी बोलावण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत येनपुरे अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.
......................
‘मनसे’ही रिंगणात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिकेतील माजी गटनेते बाबू वागस्कर यांना विधान परिषदेसाठी तिकीट देण्यात येणार आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी मंगळवारी ही घोषणा केली. आज, बुधवारी वागस्कर अर्ज भरणार आहेत. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
..
दोन अपक्षांचे अर्ज दाखल
पुणे : विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी दोन अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये औंध येथील उद्योजक आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नातेवाइक गणेश नानासाहेब गायकवाड; तसेच चाकण नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश लक्ष्मण गोरे यांचा समावेश आहे. आतापर्यंत २४ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. आज, बुधवारी (दोन नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
गायकवाड हे भाजपचे आमदार जगताप यांचे नातेवाइक आहेत. त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती; पण त्यांना शब्द मिळालेला नाही. भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीला रंगत आली आहे. या मतदार संघासाठी महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती; तसेच पुणे, खडकी आणि देहूरोड या तीन कॅन्टोन्मेंट बोर्डातील ७०२ नगरसेवक आणि सदस्य हे मतदार आहेत. उमेदवारी अर्ज पाच नोव्हेंबरपर्यंत माघारी घेता येणार आहेत. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार असून, त्यासाठी सात मतदान केंद्रे आहेत.
...
विलास लांडे समर्थक नाराज

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा अनिल भोसले यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे माजी आमदार विलास लांडे समर्थक नाराज झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेता शहराला संधी मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे.
भोसले यांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक होते. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधून लांडे यांच्यासह माजी महापौर आझम पानसरे यांच्या नावांचा विचार होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा भोसले यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लांडे समर्थक नाराज झाले आहेत.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या माध्यमातून भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना भक्कम साथ मिळाली आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’कडून लांडे यांना उमेदवारी मिळाल्यास शहरातील कार्यकर्त्यांचे बळ वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु, पुन्हा एकदा लांडे समर्थकांच्या पदरी निराशा पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाते उघडण्यासाठी इच्छुकांची फौज सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मध्य भागातील ‘खडकमाळ आळी’ प्रभागात (प्रभाग क्र १८) सध्या काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राबल्य असले, तरी नव्या रचनेतील चार जागांवर कोणता पक्ष हक्क अबाधित राखणार, याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, या प्रभागात खाते उघडण्यासाठी इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे.
काँग्रेसचे मिलिंद काची, सुनंदा गडाळे (प्रभाग क्र ४९), भाजपचे अशोक येनपुरे, प्रतिभा ढमाले (प्रभाग क्र ५८), भाजपचे विष्णू हरिहर आणि मनसेच्या सुशीला नेटके (प्रभाग क्र ५९) आणि काँग्रेसच्या कमल व्यवहारे आणि भाजपचे बापू कांबळे (प्रभाग क्र ६५) अशा जुन्या चार प्रभागांतील थोडा-थोडा भाग ‘खडकमाळ आळी’ (प्रभाग क्र १८) या नव्या प्रभागाला जोडला गेला आहे. भाजपचे दोन आणि काँग्रेसचे एक विद्यमान नगरसेवक शेजारच्या प्रभागातून निवडणूक लढविणार असल्याने उर्वरित नगरसेवकांसह संभाव्य इच्छुकांमध्ये येथे जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत.
शिवाजी रस्त्यावरील गोटीराम भैय्या काची चौकापासून या प्रभागाची सुरुवात होते. डॉ. कोटणीस दवाखाना, महापालिका तंत्रनिकेतन, फडगेट पोलिस चौकी, पंचमुखी मारुती मंदिर, फुलवाला चौक, कस्तुरे चौक, विजय वल्लभ शाळा, महात्मा फुले पेठ, टिंबर मार्केट, महात्मा फुले स्मारक, सावित्रीबाई फुले स्मारक, मध्यवर्ती अग्निशामन केंद्र, मामलेदार कचेरी, पंचहौद मिशन, खडकमाळ आळी, घोरपडे उद्यान, मनपा कॉलनी नं ७ व ९, स्वारगेट पोलिस लाइन, पीएमपीएमएल डेपो अशी महत्त्वाची ठिकाणे या प्रभागात येतात.
काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका कमल व्यवहारे आणि नगरसेवक मिलिंद काची या प्रभागातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासह संजय बालगुडे, माजी नगरसेवक नारायण चव्हाण, अजित दरेकर, बाळासाहेब अमराळे, विकी खन्ना, राकेश नामेकर, विनय ढेरे, नीलेश बोराटे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सीमा काची, शारदा पाटोळे, सीमा राजभोज, सुवर्णा गद्रे-खान, योगिता भंडारी अशी इतर नावे काँग्रेसकडून चर्चेत आहेत. भाजपकडून विष्णू हरिहर, प्रतिभा ढमाले हे दोन्ही विद्यमान नगरसेवक याच प्रभागातून पुन्हा लढणार आहेत. तर, त्यांच्यासह नामदेव माळवदे अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सम्राट थोरात, बापू नाईक तसेच त्यांची पत्नी, वैशाली नाईक, आरती कोंढरे, संजय जना, रेश्मा सय्यद अशी इतर काही नावे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
..
मनसेचे इच्छूक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विद्यमान नगरसेविका सुशीला नेटके यांच्यासह आशिष साबळे, सागर पांगारे, वसंत खुटवड, रवी सहाणे किंवा आशा सहाणे, मिलिंद परदेशी, माई तळेकर, राजा मासोळी अशी नावे चर्चेत अग्रभागी आहेत.
..
काँग्रेसचे इच्छूक
या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अगदी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. राजाभाऊ तुंगतकर यांचा विजय अवघ्या चार मतांनी हुकला होता. तर, विजय ढेरे यांनीही चांगली लढत दिली होती. हे दोघेही पुन्हा इच्छुक असून, त्यांच्यासह गणेश परदेशी, मनीषा कांबळे, प्रशांत गांधी, अजय खेडेकर, मालन साठे अशा नावांची चर्चा सुरू आहे.
..
शिवसेनेची यादी मोठी
शिवसेनेकडेही इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. संदीप गायकवाड, अजिंक्य पांगारे, रुपेश पवार, पंकज बरिदे, मोहन परदेशी, चंदन साळुंखे, ज्योती साळुंखे, मेघा पवार, सुलभा तळेकर, ज्ञानंद कोंढरे, अनुपमा मांगडे, राजू कन्ना, गिरीश काची अशी अनेक नावे पुढे येत आहेत.
.................
प्रभाग क्र १८ खडकमाळ आळी
लोकसंख्या : ७१,३१६
आरक्षण :
अ : अनुसूचित जाती (एससी)
ब : ओबीसी महिला
क : खुला
ड : खुला
..................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच भावंडांना विषबाधा

$
0
0

तिघे भाऊ दगावले; दोन सख्ख्या बहिणी अत्यवस्थ

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

ओतूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा होऊन तिघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून, दोन सख्ख्या बहिणी अत्यवस्थ आहेत. दिवाळीच्या निमित्ताने खाल्लेल्या चिकनमधून विषबाधा झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी ही माहिती दिली. ऐन दिवाळीमध्ये गरीब कुटुंबातील तीन चिमुरड्यांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल बाळू फुलमाळी (वय १०), साईराज बाळू फुलमाळी (वय ८) आणि धनराज बाळू फुलमाळी (वय ४, सर्व रा. नंदकर वस्ती, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे ) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गौरी बाळू फुलमाळी (वय १३) आणि पूजा बाळू फुलमाळी (वय ११) या दोघी अत्यवस्थ असून, त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाळू अण्णा फुलमाळी हे पत्नी सिंधू आणि पाच मुलांसह संतवाडी (आळे, ता. जुन्नर ) येथे नंदीबैल घेऊन व्यवसायानिमित्त गेले होते. दिवाळी असल्याने ते सोमवारी मूळ गावी ओतूरला परतले होते. दिवाळीनिमित्त घरी पाहुणे आल्याने त्यांनी मांसाहाराचा बेत केला. त्यानुसार सिंधू यांनी शिजविलेले चिकन सर्वांनी खाल्ले. त्यानंतर मुले घराच्या बाहेर खेळण्यास गेली असता, काही वेळातच त्यांना उलट्या झाल्या. तेव्हा त्यांना गावातीलच खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथून त्यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तेथे प्रथमोपचार करून आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता अनिल आणि धनराज यांचा मृत्यू झाला. साईराज याला पुणे येथील ससून रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
गौरी आणि पूजा यांना पुढील उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद ओतूर पोलिस ठाण्यात झाली असून, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी मितेश गट्टे,आळेफाट्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, ओतूरचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. जी. पवार, महसूल विभागाचे मंडलाधिकारी एस. डी. फुलसुंदर यांनी फुलमाळी कुटुंबाची भेट घेऊन चौकशी तसेच, सांत्वन केले. अधिक तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र थोरात करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जुन्या भांडणाचा राग मनात धरून बेकायदा जमावाच्या मदतीने गंभीर मारहाण तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विपुल मोहिते, सोपान गायकवाड, रोहित गायकवाड, श्रीकांत गायकवाड, संपत डाडर (सर्व रा. न्यू नाना पेठ, पत्र्याची चाळ) आणि अन्य जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शोएब गोरु शेख (२८ रा. नाना पेठ, पत्र्याची चाळ) याने फिर्याद दाखल केली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच ठिकाणी राहतात. त्यांच्यामध्ये झालेल्या पूर्वीच्या भांडणावरुन आरोपींनी बेकायदा जमाव केला. फिर्यादीला ​शिविगाळ केली. त्याच्या डोक्यात, हातावर कोयत्याने वार केले, असे तक्रारीत नमूद केले आहे.
..
लक्ष्मीपूजनाचे दागिने चोरीला
पुणे : लक्ष्मीपूजनासाठी देवघरात पूजेसाठी ठेवलेले साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले. हिंगणे खुर्द येथे ओमदत्त साकार बंगल्यात सोमवारी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी अनिकेत अरविंद वाघ (वय ५१, रा. ओमकार बंगला, श्रीरंग सोसायटी, हिंगणे खुर्द) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. वाघ यांनी लक्ष्मीपूजनासाठी देवघरात सोन्याचे दागिने मांडले होते. अज्ञात चोरट्याने खिडकीतून देवघरात प्रवेश केला आणि दागिने चोरून नेले.
....................
पतसंस्थेतून रोकड चोरीला
फुरसुंगी ग्रामीण ​बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी कपाटातील २१ हजार ९८० रुपये चोरून नेले. शनिवारी रात्री (२९ ऑक्टोबर) हा प्रकार घडला. या प्रकरणी रमजान दाऊद ईनामदार (वय ४९, रा. भैरोबा चौक, फुरसुंगी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने पतसंस्थेचा दरवाजा उचकटला. त्यानंतर प्रवेश करून कपाटातील २१,९८० रुपये चोरले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
..
लिफ्ट डक्टमध्ये पडून मृत्यू
कोंढवा येथील बांधकाम साइटवर लिफ्टच्या डक्टमधून २५ फूट खाली पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गगन उन्नती बांधकाम साइटच्या ए विंग येथे हा प्रकार घडला. राहुल संजय साठे (वय २५, रा. सहकारनगर) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमधील पोलिस हवालदार जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. बांधकाम साइटचे प्रोजेक्ट मॅनेजर आणि साइट इंजिनिअर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल त्याच्या मित्राला भेटण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. बांधकाम साइटवर लिफ्टचा डक्ट उघडा ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खोट्या केसची धमकी; पन्नास हजार उकळले

$
0
0

गुन्हे शाखेच्या दोन पोलिसांविरोधात आयुक्तांकडे तक्रार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खोटी केस दाखल करण्याची धमकी देऊन गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या सहायक निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्याने सांगवीतील दुकानदाराकडून पन्नास हजार रुपये घेतल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
या बाबत दीपक अशोक अगरवाल (रा. औंध रोड, खडकी) यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला आहे. अगरवाल आणि त्यांच्या भावाचे सांगवीत शिव ट्रेडर्स हे किराणा दुकान आहे. २० ऑक्टोबर रोजी त्यांच्या दुकानसमोर कोणीतरी तीन पोती ठेवली. त्यावेळी पोलिस तेथे पोहोचले. त्यांनी अगरवाल यांना तुमचा गुटखाविक्रीचा व्यवसाय आम्हाला समजल्याचे सांगितले. त्यानंतर अगरवाल यांनी ही पोती आपली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, तरीही संबंधित पोलिसांनी त्यांना गुन्हे शाखा युनिट चारच्या कार्यालयात बोलविले. त्यानंतर तेथे पडलेली पोती घेऊन पोलिस निघून गेले. अगरवाल गुन्हे शाखेच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना अन्न आणि पुरवठा विभागाला सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यानंतर तुमची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात येईल. त्यातून सुटका करायची असेल, तर दोन लाख रुपये देण्याची मागणी संबंधितांनी केली.
अगरवाल यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आणि भावाला तीन तास ऑफिसमध्ये बसवून ठेवण्यात आले. घाबरलेल्या अगरवाल यांनी भीतीपोटी पन्नास हजार रुपये दिल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. अशा लाचखोर पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनविक्रेत्यांची पुण्यात ‘दिवाळी’

$
0
0

दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल २५ हजार वाहनांची विक्री

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या लोकसंख्येच्या एवढीच वाहने आता शहरातील रस्त्यांवर धावत असताना दररोज त्यामध्ये हजारो नवीन वाहनांची नव्याने भर पडत आहे. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल २५ हजार वाहनांची विक्री झाली असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) दर महिन्याला नोंदणी होणाऱ्या सरासरी वाहनांच्या तुलनेत वाहनविक्रीची ही संख्या दुप्पट आहे. पुण्यासारख्या महानगराला सर्वंकष, कार्यक्षम आणि स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यानेच खासगी वाहने वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरटीओच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षात शहराच्या वाहन संख्येत दर वर्षी सरासरी दोन लाख नवीन वाहनांची भर पडत आहे. दरमहा साधारणतः दहा हजार नवीन वाहनांची नोंदणी होते. ऑक्टोबरमध्ये दसरा आणि दिवाळी असल्याने त्या महिन्यात २५ हजार वाहनांची विक्री झाली. त्यांपैकी बहुतांश वाहनांची विक्री ही याच दोन दिवशी झाल्याची माहिती विविध कंपन्यांच्या डीलरकडून मिळाली. चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकींची विक्री अधिक आहे. लक्ष्मीपूजनालादेखील बाजारात उत्साहाचे वातावरण होते. गेल्या काही काळातील मंदीच्या पार्श्वभूमीवर वाहन उद्योगासाठी ही दिवाळी उत्साहवर्धक ठरल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

‘नवरात्रामध्ये १० हजार वाहनांची विक्री झाली होती. त्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी तब्बल सात हजार वाहनांची विक्री झाली होती. ही विक्री २०१५ वर्षातील दसऱ्याच्या तुलनेत दुप्पट होती. तर, दिवाळीच्या काळातही सुमारे १० ते १२ हजार वाहनांची विक्री झाली,’ असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. यामध्ये दिवाळीच्या पाडव्याला खरेदी झालेल्या अनेक वाहनांची नोंद अद्याप आरटीओकडे झालेली नाही. अनेक जण पाडव्याच्या मुहूर्तावर वाहने खरेदी करून त्याच दिवशी घरी नेण्यास प्राधान्य देतात. आरटीओची सुटी आणि एकाच वेळी अनेक वाहने नोंदणीला आल्याने होणारी गर्दी यामुळे या वाहनांची नोंदणी पुढील काही दिवसांत होते. त्यामुळे पुण्यात या दिवसांत रस्त्यावर आलेल्या वाहनांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

मटा भूमिका

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात झालेल्या या जोरदार खरेदीमुळे मंदीचे वातावरण या क्षेत्रापुरते तरी दूर होत असल्याचे उत्साहवर्धक चित्र एका बाजूला निर्माण झाले आहे. मात्र, दुसरीकडे वैयक्तिक वाहनांच्या या वाढत्या संख्येमुळे शहरातील एकूण वाहतुकीच्या स्थितीची दिशा स्पष्ट झाली आहे. शहर आणि पिंपरी परिसरात विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव हेसुद्धा या वाहनांच्या खरेदीमागील एक कारण आहे. आधीच हाताबाहेर गेलेली शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलण्याची वेळ आल्याचे हे आणखी एक द्योतक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वायत्ततेवर घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विद्या प्राधिकरणाच्या निर्मितीद्वारे राज्य सरकार ‘बालभारती’ची शैक्षणिक स्वायत्तता संपविण्याचा डाव खेळत असल्याची टीका आता संस्थांतर्गत पातळीवरूनच समोर आली आहे. अभ्यासक्रम निर्मितीचे काम सरकारी संस्थेकडे देत, शालेय विद्यार्थ्यांवर सरकारी धोरणे बिंबविण्याची सुरुवात राज्य सरकारने केल्याची ओरडही याच निमित्ताने केली जात आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एससीईआरटी) फेररचना करण्याची बाब गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारच्या विचाराधीन होती. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीमधील अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे परिषदेकडे देण्याचा विचारही त्यासाठी करण्यात येत होता. एससीईआरटीची फेररचना करत, विद्या प्राधिकरण ही नवी यंत्रणा निर्माण करताना या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार झाल्याने नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारी निर्णयातून समोर आले. 'बालभारती' ही स्वायत्त संस्था या पुढे निव्वळ छापखाना राहणार असून, अभ्यासक्रम संशोधनाचे काम हे नव्या प्राधिकरणातून होणार असल्याचे हा निर्णय स्पष्ट करत आहे. त्यामुळे 'बालभारती'मध्ये आत्तापर्यंत होत असलेले स्वतंत्र पद्धतीचे अभ्यासक्रमाचे संशोधन या पुढे प्राधिकरणातून सरकारी नियंत्रणाखाली होणार आहे. या प्रकाराची सुरुवात यापूर्वीच झाल्याची जाणीवही बालभारतीमधील अधिकारी वर्गाने या निमित्ताने करून दिली. या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर काही मुद्द्यांची उकल केली.
‘कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय शैक्षणिक अभ्यासक्रमांची निर्मिती व्हावी, यासाठी कोठारी आयोगातील शिफारसींना अनुसरून ‘बालभारती’ या स्वायत्त संस्थेची निर्मिती झाली. त्या आधारे आतापर्यंत शैक्षणिक अभ्यासक्रमांची निर्मितीची प्रक्रिया झाली. नव्या निर्णयाद्वारे, अभ्यासक्रम निर्मितीची जबाबदारी असणारा विभाग आता प्राधिकरणाच्या अखत्यारित काम करणार आहे. प्राधिकरण ही सरकारी संस्था आहे. त्यामुळे या पुढील काळात अभ्यासक्रम निर्मितीमधील स्वायत्तता संपून, सरकारी नियंत्रण येणार आहे,’ अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. या पुढील काळात अभ्यासक्रम निर्मिती ही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करायची आणि विद्या प्राधिकरणाने हा अभ्यासक्रम केवळ अधिकृत सरकारी अभ्यासक्रम म्हणून जाहीर करायचा, असेही होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.
गेल्या वर्षभराच्या काळामध्ये अभ्यासक्रम निर्मितीच्या प्रक्रियेवर सरकारचे लक्ष आणि नियंत्रण होते. विविध अभ्यासमंडळांच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये सरकारचे अराजकीय प्रतिनिधी विविध चर्चांमधून सहभाग नोंदवित होते. काही वेगळी मते समोर आल्यास, अशी मते मांडणाऱ्यांना वेळप्रसंगी समज देण्याचा प्रकारही घडल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. या पुढील काळात हेच प्रकार अधिकृतपणे घडण्याची जास्त शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘गरज पडल्यास कोर्टात जाऊ’
‘भाजप सरकारचे अधिकृत शैक्षणिक धोरण जाहीर होण्यापूर्वीच ते टप्प्याटप्प्याने राबविण्याचा हा प्रकार आहे. संस्थेची स्वायत्तता संपविणे, अभ्यासक्रम निर्मितीसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे, संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी राजकीय विचारांच्या संस्थांमध्ये पाठविणे या प्रकारांविरोधात आम्ही गरज पडल्यास जनहित याचिकेच्या माध्यमातून कायदेशीर लढा देऊ. संस्थेची शैक्षणिक स्वायत्तता कायम राहणे, हेच व्यापक जनहिताचे आहे.’
- प्रा. शरद जावडेकर, समाजवादी अध्यापक सभा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशाबाबत आल्या मोजक्याच सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विविध मागण्या आणि सूचना करणाऱ्या विविध संघटना आणि पालकांनी, प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सूचना पाठविण्याकडे बाबत मात्र दुर्लक्षच केले आहे. अशा सूचनांची वाट पाहणाऱ्या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सुधारणा सुचविणाऱ्या केवळ पाचच लेखी सूचना आल्या आहेत.
पुण्यात अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा घोळ गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने अनुभवायला मिळत आहे. यंदाही या प्रक्रियेमध्ये सरकारी पातळीवरून झालेले बदल हे ही प्रक्रिया लांबण्याचे मुख्य कारण ठरल्याचे प्रक्रियेदरम्यान स्पष्ट झाले होते. त्यामुळेच यंदा एकूण १२ ऑनलाइन फेऱ्या झाल्यानंतर खात्याने ही प्रक्रिया अधिकृतरीत्या संपविली. हा सर्व अनुभव विचारात घेत, खात्याने प्रक्रियेतील सुधारणांबाबत पालक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून सूचना मागविण्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी उपसंचालक कार्यालयाच्या आवारात एक पेटीही ठेवण्यात आली होती. या पेटीमध्ये आतापर्यंत केवळ पाच लेखी सूचना आल्याची माहिती उपसंचालक दिनकर टेमकर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. कार्यालय पुढील प्रक्रियेसाठी या सूचना वरिष्ठ पातळीवर पाठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयाला अपेक्षित असलेल्या संख्येपेक्षा अत्यल्प संख्येने या सूचना कार्यालयाकडे आल्याची बाबही त्यांनी या निमित्ताने नमूद केली.
टेमकर म्हणाले, ‘ऑनलाइन प्रक्रिया सुरू असताना रोज शेकडोंच्या संख्येने पालक या कार्यालयाकडे येत होते. कार्यालयातील अधिकाऱ्यांवर या दरम्यान प्रक्रियेत नेमक्या कोणत्या बाबींमध्ये सुधारणा अपेक्षित आहेत, या विषयीच्या सूचनांचा भडिमार होत होता. त्या अनुषंगानेच आम्हाला प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांकडून प्रक्रिया सुधारण्याविषयीच्या सूचना मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.’ आपापल्या पाल्यांना प्रवेश मिळाल्यानंतर पालकांच्या दृष्टीने प्रश्न सुटल्याने सूचनांची संख्या घटल्याची शक्यता त्यांनी वर्तविली. तसेच, पुढील वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वा त्यांच्या पालकांसाठी सध्या ही प्रक्रिया विचारातच घेतली जात नसल्याने, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळू न शकल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाइल्डफायर’ स्पर्धेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयआयटी खरगपूरमध्ये येत्या २० ते २२ जानेवारी २०१७ या कालावधीत ५८व्या ‘स्प्रिंग फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या पूर्वनोंदणीला देशभरातून मिळत असलेला प्रतिसाद विचारात घेता, संस्थेतर्फे येत्या डिसेंबर महिन्यात ‘वाइल्डफायर’ या ‘वेस्टर्न रॉक बँड स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेतर्फे याविषयी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात माहिती देण्यात आली आहे. संस्थेतर्फे दर वर्षी विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी ‘स्प्रिंग फेस्ट’ आयोजित केला जातो. त्यानिमित्त यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये नुक्कड, एसएफ आयडॉल, शेक अ लेग आणि शफल या चार प्रमुख उपक्रमांसाठी देशभरात पूर्वचाचणी आयोजित केली होती. पुण्यासह दिल्ली, चंडीगड, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि भोपाळमध्ये ही पूर्वचाचणी झाली. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून रॉक बँड स्पर्धा होणार आहेत. ‘स्प्रिंग फेस्ट’दरम्यान नऊ विविध प्रकारच्या शैलींवर आधारित नव्वदहून अधिक वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यासाठीच्या सर्वोत्तम स्पर्धकांची निवड करण्यासाठी या पूर्वचाचण्या महत्त्वाच्या ठरत असल्याचेही या पत्रकात सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनआयओ’तर्फे रविवारी व्हिजन मॅरेथॉन स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थोमॉलॉजी’ (एनआयओ) यांच्या वतीने ‘एनआयओ व्हिजन’ मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी (६ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जोडीदाराने डोळ्यांवर पट्टी बांधून धावणे अशी संकल्पना राबविली जाणार आहे. ही स्पर्धा बाणेर येथून प्रारंभ होणार असून विद्यापीठ चौकाच्या दिशेने पुन्हा बाणेर येथील मिटकॉन संस्थेपर्यंत समाप्त होणार आहे.

‘एनआयओ’ व्हिजन मॅरेथॉन स्पर्धेचे ‘रनबडीज क्लब’ या संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. अनेक जणांना अंधत्व टाळता येणे माहिती नसते. त्याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. अनेक पालक किंवा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना मोतीबिंदूसारखे आजार होऊ शकण्याची भीती असते. यापैकी अनेक व्यक्तींना गेलेली दृष्टी परत येऊ शकत नाही. त्याकरिता डोळ्यांची नियमित तपासणी केल्यने अंधत्वाचा धोका टाळता येतो,’ अशी माहिती एनआयओचे संचालक व नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी दिली. गेलेले अंधत्व पुन्हा मिळवण्यात येणारे अपयश टाळण्यासाठी जनजागृती करण्यासाटी ही स्पर्धा आयोजित केली आहे, असेही ते म्हणाले. या वेळी निखील शहा, क्लबच्या संचालिका मेघा चौधरी उपस्थित होत्या.

ही स्पर्धा ३, ५, १० आणि २१ किलोमीटर प्रकारांत होणार आहे. तसेच, दृष्टिहिनांबरोबरही एक शर्यत आयोजित केली आहे. त्यामुळे वेगळ्या प्रकारची मॅरेथॉन स्पर्धा ठरणार आहे. या स्पर्धेला बाणेर येथील ‘मिटकॉन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ येथून प्रारंभ होणार आहे. विद्यापीठ चौकाच्या दिशेने पुन्हा फिरून बाणेर येथे मिटकॉन संस्थेत परतायचे असा मार्ग राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुत्पादक कर्जांचे आव्हान

$
0
0



प्रश्न : या नव्या नेमणुकीकडे तुम्ही कसे पाहता ?

उत्तर : नव्या निकषांनुसार ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या नव्या पदावर रूजू होणारा मी पहिलाच अधिकारी आहे. माझ्या करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मधील निर्णय घेणारा सर्वोच्च कार्यकारी अधिकारी या भूमिकेतून समाजाच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याची संधी मला मिळाली आहे, असेच मी मानतो.

प्रश्न : तुमच्यापुढे कोणती आव्हाने आहेत?

उत्तर : वाढती अनुत्पादित कर्जे (एनपीए) हे सर्वच बँकांसमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. रिझर्व्ह बँकेने २०१२पासून एनपीएबाबत कडक धोरण स्वीकारले असून बँकांना त्यांचे ताळेबंद स्वच्छ करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र बँकही त्याला अपवाद नाही. त्याचवेळी बासल निकषांनुसार बँकांनी पर्याप्त भांडवल उभारणी करणेही आवश्यक बनले आहे. पर्याप्त भांडवलवृद्धी, एनपीएवर नियंत्रण आणून थकित कर्जांची वसुली करणे आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने होणाऱ्या घोटाळ्यांबरोबरच अन्य स्वरूपाच्या घोटाळ्यांवर नियंत्रण ठेवून आळा घालण्याचे आव्हान बँकेसमोर आहे. येत्या काही वर्षात बँकेतील अनेक अनुभवी कर्मचारी, तज्ज्ञ अधिकारी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी येणाऱ्या नव्या कर्मचारी वर्गाला योग्य प्रकारे प्रशिक्षित करणे हे ही एक आव्हान आहे.

प्रश्न : बँकेच्या कामकाजात कशा प्रकारे बदल अपेक्षित आहेत?

उत्तर : बँकेत निर्णय होत नाहीत, किंवा निर्णय घ्यायला वेळ लागतो, असे बोलले जात होते. परंतु, आता निर्णय घेण्यास वेळ लावू नये आणि निर्णय ताबडतोब संबंधितांना कळविण्यात यावा, असे आदेश मी दिले आहेत. बँकेच्या कामकाजातील अडचणी व अडथळे दूर करून बँकेची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर भर देणार आहे. कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना प्रोत्साहन देण्यावरही माझा भर असेल. बँकेतील कोणत्याही कर्मचाऱ्याविषयी काही तक्रार असेल, तर ग्राहकांनी माझ्याशी संपर्क साधावा.

प्रश्न :आर्थिक सर्वसमावेशकता वाढविण्यासाठी बँकेतर्फे कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत?

उत्तर : राज्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र अग्रणी (लीड) बँक असल्याने आर्थिक सर्वसमावेशकतेविषयीच्या सर्व योजना व्यापक स्तरावर राबविल्या जात आहेत. थेट अनुदान योजना, आधार क्रमांकाचे संलग्नीकरण यामुळे तळागाळातील व्यक्तीही बँकिंग वर्तुळात समाविष्ट झाल्या आहेत. काही ठिकाणी शाखा उघडणे शक्य नसल्यास बँकिंग प्रतिनिधी (बँकिंग करस्पॉँडंट्स), छोट्या शाखा, किऑस्क, एटीएमच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहेत. जनधन योजनेतूनही मोठ्या प्रमाणावर खाती उघडली गेली असून त्यातील बचतीचे प्रमाणही लक्षणीय आहे.

प्रश्न : एनपीएच्या वाढत्या प्रमाणाबाबत काय सांगाल?

उत्तर : एनपीएमधील ८० टक्के खाती ही मोठी कर्जखाती आहेत. सन २०१२-१३ च्या आसपास पायाभूत क्षेत्रांसह अन्य क्षेत्रांतील मोठ्या प्रकल्पांना मोठ्या रकमेचे कर्ज सर्वच बँकांनी दिले होते. विविध कारणांमुळे यातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे बँकांबरोबरच गुंतवणूकदारांचा पैसाही अडकून पडला आहे. हे रखडलेले प्रकल्प कार्यान्वित व्हावेत, यासाठी सरकारनेही प्रयत्न सुरू केले आहेत. मोठे प्रकल्प मार्गी लागल्यास त्यामुळे अन्य उद्योगांमधील गुंतवणुकीलाही चालना मिळेल व एनपीएचे प्रमाण कमी होईल.

प्रश्न : राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत खासगी बँकांची कामगिरी सध्या चांगली असल्याचे चित्र आहे, त्याबाबत काय सांगाल?

उत्तर : खासगी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँका यांच्या कामाच्या स्वरूपात काही फरक आहेत. त्यामुळे दोघांच्याही कामगिरीतही फरक पडतो. खासगी बँकांच्या व्यवसायात सर्वसामान्यांच्या ठेवींबरोबरच रिटेल कर्ज, ‘कासा’ खाती तसेच शेअर ब्रोकर खात्यांचे प्रमाण अधिक आहे. तर राष्ट्रीयीकृत बँका ठेवीदारांचे हित सांभाळण्याबरोबरच प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांसाठीचा पतपुरवठा, कृषी कर्ज, व अन्य सरकारी योजनाही राबवतात. त्यामुळे त्यांच्या कामगिरीतही फरक दिसून येतो.

प्रश्न : बँकांच्या विलिनीकरणाची चर्चाही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याबाबत काय सांगाल?

उत्तर : राष्ट्रीयीकृत बँकांबाबतचे धोरण सरकार निश्चित करते. त्यामुळे विलिनीकरणाविषयीही सरकारच योग्य तो निर्णय घेईल. विलिनीकरणाविषयीची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. विलिनीकरण हादेखील एक प्रयोग आहे. विलिनीकरणाचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. योग्य प्रकारे विलिनीकरण झाल्यास कार्यक्षमतेत वाढ होऊन खर्चात कपात होऊ शकते.

प्रश्न : डेबिट कार्डांबाबतचा घोटाळा नुकताच उजेडात आला. एकूणच सायबर घोटाळ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्याबाबत काय उपाययोजना करता येतील?

उत्तर : डेबिट कार्डाच्या घोटाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या एकाही खातेदाराचे नुकसान झालेले नाही. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार विशिष्ट कालावधील अन्य बँकांच्या एटीएममधून व्यवहार केलेल्या ३९ हजार ग्राहकांची कार्ड आम्ही बदलून देत आहोत. सायबर किंवा तंत्रज्ञानाच्या आधारे होणारी फसवणूक हा धोका निरंतर चालणारा आहे. एका प्रकारावर आपण नियंत्रण मिळवले तर गुन्हेगारांकडून नवे तंत्र शोधले जाते. यावर तांत्रिक क्षमता वाढविण्याबरोबरच ग्राहकांचे प्रबोधन करण्यावरही भर देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आडतीमुळे गुळाच्या व्यापाराला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने बाजार नियमन मुक्तीचा निर्णय घेतल्याने खरेदीदारांनी आडत देण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळेच ऐन दिवाळीत गुळाच्या खरेदीअभावी शेतकऱ्यांचा माल पडून राहिल्याने व्यापाराला फटका बसला आहे. परिणामी, गुळाच्या खरेदी-विक्रीची उलाढाल मंदावल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

राज्य सरकारने बाजार नियमन मुक्तीचा निर्णय घेतला. त्याचवेळी आडत शेतकऱ्यांकडून घेण्याऐवजी व्यापारी खरेदीदारांकडून घेणे अपेक्षित आहे असा निर्णय जाहीर केला. त्याचा परिणाम गूळ व्यापारावर होत आहे. पावसाळ्यानंतर गुळाची मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात मोठी आवक होण्यास सुरुवात होते. पुण्यातून राज्यासह परराज्यात विविध भागांत गूळ विक्रीसाठी जातो. त्यामुळे येथे उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना येथे गूळ विक्रीसाठी आणणे फायद्याचे ठरते.

‘पावसाळ्यानंतर गुळाची नियमित आवक सुरू झाली. परंतु, तीन टक्के आडत देण्यास खरेदीदारांनी विरोध केला आहे. परिणामी लिलाव होत नाहीत. बाजारात केवळ १० ते १५ टक्के गुळाची विक्री होत आहे. बाजारात सध्या ७ ते ८ हजार बॉक्स व ढेपांची आवक होत आहे. मागील वर्षी सुमारे २० हजार बॉक्स व ढेपांची आवक झाली होती. दिवाळीनंतर मागणी कमी झाल्याने २० टक्क्यांनी दर उतरले आहेत. खरेदीदारांकडून गुळाची खरेदी विक्री होत नाही. त्यामुळे सरकारने आडतीचा निर्णय रद्द करावा,’ अशी मागणी पुणे गूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी केली.

‘पुणे जिल्ह्यातून राहू, पिंपळगाव, केडगाव, बारामती तसेच सातारा, कराड, पाटण येथून गुळाची आवक होते. ही आवक वर्षभर सुरू असते. आडतीच्या निर्णयाने गूळ खरेदी विक्रीला फटका बसला आहे. खरेदीदार गूळ घेण्यास उत्सुक नसल्याने बाजारात ५० टक्के माल शिल्लक आहे,’ अशी माहिती गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

‘गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याच्या बाजारात ७ ते ८ क्विंटलपर्यंत गूळ आणतो. आडतीचा निर्णय होण्यापूर्वी माल विकला जात होता. आता मात्र खरेदीदारांकडून खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. माल पडून आहे. दिवाळीनंतर दर कमी मिळाले. व्यापाऱ्यांनी आडत घेण्यास आमचा विरोध नाही,’ असे राहू पिंपळगाव येथील गुऱ्हाळचालक सलीम इनामदार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसुंधरा मोडीवृत्त’तून मोडी लिपीची महती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोडी लिपीची महती सांगण्यासाठी अनेक जण मराठीतून त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. मात्र, मोडी लिपीची महती मोडी लिपीच्या वापरातूनच अधोरेखित करण्याचा प्रयत्न यंदा पुण्यातील ‘वसुंधरा भाषा, मोडी लिपी संवर्धन आणि संशोधन केंद्रा’ने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेने मोडी लिपीमध्ये लिहिलेले साहित्य वापरून ‘वसुंधरा मोडीवृत्त’ हा दिवाळी अंकच काढला आहे.

केंद्राच्या सभासदांसाठी म्हणून काढलेल्या या दिवाळी अंकाला यंदा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती केंद्राचे अध्यक्ष महेश जोशी यांनी ‘मटा’ला दिली. जोशी म्हणाले, ‘केंद्रातर्फे मोडी लिपीतील मासिक चालविले जाते. त्याचाच एक भाग म्हणून हा दिवाळी अंक काढला जातो. यंदा या अंकाचे तिसरे वर्ष आहे. या अंकामध्ये काही स्नेहीजनांनी, तसेच मोडीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. दिवाळी अंकासाठी अनेकांनी लेख पाठविले असले, तरी आठ पानांच्या मर्यादेमुळे ते वापरणे शक्य होऊ शकले नाही.’ हा प्रतिसाद विचारात घेता, पुढील वर्षी अंकाच्या पानांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या दिवाळी अंकामध्ये सोज्वल साळीलिखित ‘नरक चतुर्दशी’, अमरीश इंगळे यांनी लिहिलेला ‘दीपावली-तमसो मा ज्योतिर्गमया’, रामकृष्ण बुट्टे पाटीललिखित ‘मोडी लिपी प्रशिक्षण - काळाची गरज’ आदी लेखांचा समावेश करण्यात आला आहे. विकास कडू यांनी लिहिलेला ‘दिवाळी’, चरिता फडके यांनी लिहिलेला ‘भाऊबीज’ या लेखांसह ‘इतिहासाच्या आरशातून’ या ऐतिहासिक घटनांचा आढावा घेणाऱ्या एका सदराचाही या अंकात समावेश असल्याचे जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेरच्या दिवसांतही विद्यार्थ्यांची काळजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आजारपणामुळे ते अंथरुणाला खिळून होते... मात्र, त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याला पीएचडी मिळण्यात अडथळा होऊ नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले... विद्यार्थ्याची पीएचडीची मुलाखत पुढे न ढकलता, रेफ्री म्हणून जबाबदारी चोख पार पाडली आणि प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतरच पीएचडी देण्याबाबत सहमती दर्शविली. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांनी, अर्थात डॉ. ग. वा. करंदीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अखेरच्या दिवसांमध्येही त्यांनी केलेले हे काम, त्यांची स्वतःच्या कामावर असणारी श्रद्धा आणि कर्तव्यात चालढकल न करण्याची वृत्ती अधोरेखित करणारे ठरले.

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ग. वा. करंदीकर (वय ९२) यांचे शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) पुण्यात निधन झाले. शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या डॉ. करंदीकर यांनी अखेरच्या काळामध्येही आपल्या कार्याविषयीची बांधिलकी कायम राखली होती. गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर कोथरूडमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, कन्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सांगली येथे १९२५मध्ये जन्म झालेल्या करंदीकर यांनी मराठी विषयात बी. ए. आणि एम. ए. केले होते. त्यानंतर त्यांनी तत्कालीन ‘बीटी’ अभ्यासक्रम पूर्ण करून काही काळ पुणे आणि सातारा येथे शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते पुसद येथील फु. ना. महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ‘बालभारती’च्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पुसद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सहकार्यवाह म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी वयाच्या ७५व्या वर्षी ‘समर्थ रामदासांची आध्यात्मिक स्फूट प्रकरणे’ या विषयावर तत्कालीन पुणे विद्यापीठातून पीएचडी मिळविली होती. ‘शास्त्रीय मराठी व्याकरण कोष’ या मराठी व्याकरणविषयक ग्रंथाच्या पुरवणीचे संपादनही त्यांनी केले होते. डॉ. करंदीकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आज (३ नोव्हेंबर) गीता धर्म मंडळाच्या प्रांगणात सायंकाळी ५.३० वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळा राज्यांतील तुरुंग तुडुंब

$
0
0

shrikrishna.kolhe@timesgroup.com
TWEET : shrikrishnakMT

पुणे ः देशातील तुरुंगांची कैद्यांना ठेवण्याची क्षमता कमी पडत असून सोळा राज्यांतील तुरुंग कैद्यांनी पूर्ण भरलेले आहेत. या तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असून न्यायालयीन कैदी सर्वाधिक आहेत.

देशातील तुरुंगाची सद्यस्थिती व त्या ठिकाणी असणारे कैदी याचा लेखाजोखा मांडणारा २०१५चा अहवाल ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’ने नुकताच प्रसिद्ध केला. देशात १४०१ तुरुंग असून त्यामध्ये १३४ मध्यवर्ती तुरुंग आहेत. या सर्व तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता ही तीन लाख ६६ हजार ७८१ आहे. मात्र, सध्या देशातील या तुरुंगांत तब्बल चार लाख १९ हजार ६२३ कैदी आहेत. देशातील एकूण १६ राज्यांच्या तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. छत्तीसगड राज्यात तुरुंगांच्या क्षमतेपेक्षा २३३ टक्के कैदी जास्त आहेत. तर, मेघालयात १७७ टक्के, उत्तर प्रदेशात १६८ टक्के आणि मध्य प्रदेशात १३९ टक्के, महाराष्ट्रात ११२ टक्के अधिक कैदी आहेत. केंद्रशासित प्रदेशांमध्ये, दादरा नगर हवेलीत २७६ आणि दिल्ली येथील तुरुंगात तब्बल २२६ टक्के अधिक कैदी आहेत. देशात तुरुंगांच्या क्षमतेपेक्षा ११४ टक्के कैदी जास्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्राप्रमाणे देशातील सर्व तुरुंगांमध्ये कच्च्या कैद्यांची (न्यायालयीन कैदी) गर्दी असल्याचे दिसून आले आहे. देशातील तुरुंगांत एक लाख ३४ हजार १६८ कैदी शिक्षा झालेले (३२ टक्के) आहेत. तर, २ लाख ८२ हजार ७६ न्यायालयीन (६७.२) कैदी आहेत.

सहा हजार परदेशी कैदी

देशातील विविध तुरुंगांत तब्बल सहा हजार २०० परदेशी कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये दोन हजार ३५३ कैदी शिक्षा झालेले आहेत. यामध्ये दोन हजार १५४ पुरुष तर, १९९ महिला आहेत. तसेच, तीन हजार ७९५ कैदी न्यायालयीन कैदी असून त्यामध्ये तीन हजार २७६ पुरुष, ५१९ महिला आहेत. ३७ परदेशींना विविध गुन्ह्यात तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

फाशीची शिक्षा झालेले ३२५ कैदी

देशातील विविध तुरुंगांत फाशीची शिक्षा झालेले ३२५ कैदी आहेत. यामध्ये दहा महिलांचा समावेश आहे. तसेच, २०१५मध्ये फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी ४९ जणांची शिक्षा वरिष्ठ कोर्टाने जन्मठेपेत परावर्तित केली आहे. तसेच, देशात ७४ हजार ८२१ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
विहिरीच्या कठाड्यावर बसलेल्या महिलेला फिट आल्याने विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. मंगळवारी (२ नोव्हेंबर) दुपारी बाराच्या सुमारास चऱ्होली येथे ही घटना घडली. नीता तुकाराम पठारे (४२, रा. चऱ्होली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता यांना मेंदूचा आजार होता. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या घराच्या परिसरात एक विहीर आहे. मंगळवारी दुपारी नीता विहिरीच्या कठड्यावर बसल्या होत्या. त्या वेळी अचानक त्यांना फिट आली आणि तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या.
नागरिकांनी त्यांना त्वरित विहिरीच्या बाहेर काढले. पिंपरीतील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images