Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​मुलांच्या भावना उमटल्या भिंतीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुलांनी आपल्या भावविश्वाप्रमाणे विविध चित्रे रेखाटली आणि त्यातून तयार झाली १२३ मीटर लांबीची भिंत. या भिंतीमधून मुलांचा कलाआविष्कार प्रकट झाला. निमित्त होते, पुणे महानगरपालिका आणि पुणे बिनाले फाउंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘स्पीकिंग वॉल्स ऑफ पुणे’ या उपक्रमाचे.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांचा सांभाळ एकलव्य न्यासातर्फे करण्यात येतो. त्यातील ३० मुलांनी ही भिंत कल्पनाविश्वातून सुंदरपणे रेखाटत सर्वांनाच अचंबित केले. ही भिंत रेखाटण्यापूर्वी मुलांना एक चौकोनी कागद देण्यात आला. ‘पुण्यात काय असायला पाहिजे असे तुम्हाला वाटते, त्याप्रमाणे चित्र काढा’, असे मुलांना सांगण्यात आले.
मुलांनी आपल्या निरागसतेचा दाखला देऊन उपस्थितांना अवाक केले. सध्या पुण्यात डासांच्या प्रादुर्भावातून डेंगीसारखा आजार बळावला आहे. ते सतत कानावर पडल्यामुळे चक्क एक डास आणि त्यावर फुली असे चित्र एका मुलाने काढले, तर वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी झाडे लावणे हाच पर्याय असल्यामुळे एका मुलाने झाडाचे चित्र रेखाटून भावनांचे प्रकटीकरण केले. हीच चित्रे भिंतीवर काढा असे मुलांना सांगण्यात आले आणि शुक्रवार पेठेतील अप्पासाहेब जेधे आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाच्या बाहेरची १२३ मीटर लांबीची भिंत मुलांनी विविध चित्रांमधून रंगवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यातील तापमान १२ अंश सेल्सिअसवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील थंडीचा कडाका आणखी वाढला असून रविवारी १२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान गेल्या सात वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सर्वांत नीचांकी तापमान आहे. पुढील दोन दिवस किमान तापमान १२ अंशांच्या आसपासच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
देशभरातून नैर्ऋत्य मोसमी वारे आता माघारी फिरले आहेत. त्यामुळे वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी झाले असून, उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्राकडे थंड व कोरडे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात गारवा जाणवत आहे.
शनिवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात ३०.१ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १२.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. त्यापाठोपाठ रविवारी कमाल तापमान तेच राहिले, तरी किमान तापमानात किंचित घट झाली. रविवारी १२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. यापूर्वी २००८ साली २५ ऑक्टोबर रोजी पुण्यात ११.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले होते. तर पुण्यात २९ ऑक्टोबर १९६८ रोजी नोंदले गेलेले ९.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमानात ऑक्टोबर महिन्यातील सर्वांत नीचांकी किमान तापमान आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसही शहरात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. या दोन दिवसात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालभारती’ बनणार छापखाना

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला विद्या प्राधिकरण म्हणून नवी ओळख दिली जाणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाकडे अभ्यासक्रम संशोधनाची जबाबदारीही सोपविली जाणार आहे. पर्यायाने या अगोदर ही जबाबदारी पार पाडत असलेली ‘बालभारती’ ही संस्था या पुढे एक छापाखाना म्हणूनच ओळखली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’ ही संस्था केवळ पाठ्यपुस्तकांची छपाई आणि वितरणापुरतीच मर्यादीत करण्याबाबत शिक्षण खात्यामध्ये गेल्या वर्षभरापासून विचार सुरू होता. ‘मटा’ने १६ सप्टेंबर, २०१५ रोजी एका विशेष वृत्ताद्वारे खात्यामध्ये सुरू असलेल्या या हालचाली प्रकाशात आणल्या होत्या. राज्य सरकारने विद्या प्राधिकरणाच्या निर्मितीविषयी नुकत्याच काढलेल्या अधिकृत सरकारी निर्णयातून हीच बाब अधोरेखित झाल्याने, या पुढील काळात ‘बालभारती’ हा केवळ छापखाना म्हणूनच ओळखला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विद्या प्राधिकरणाच्या निर्मितीविषयी सरकारने काढलेल्या निर्णयानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) या पुढे विद्या प्राधिकरण म्हणून ओळखली जाईल. प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अभ्यासक्रम निर्मिती ही एक महत्त्वाची जबाबदारी असेल. सध्या ‘बालभारती’च्या विद्याशाखेमध्ये कार्यरत सर्व लोक विद्या प्राधिकरणामध्ये योग्य पदांवर पदस्थापित केले जातील. हे लोक सेवानिवृत्त होईपर्यंत विद्या प्राधिकरणामध्ये कार्य करतील. त्यांचे वेतन व भत्ते ‘बालभारती’मधूनच दिले जातील. हे लोक सेवानिवृत्त होईपर्यंत ज्या पदांवर कार्य करतील, ती पदे विद्या प्राधिकरणामार्फत इतर मार्गांनी भरली जाणार नाहीत, असेही या निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलनासाठी एक कोटी नाहीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या साहित्य महामंडळाला राज्य सरकारने कात्रजचा घाट दाखवला आहे. सद्यस्थितीत सरकारला इतके पैसे देता येणे शक्य नसल्याचे पत्राद्वारे कळवून सरकारने महामंडळाची ही मागणी धुडकावली आहे. महामंडळ आणि सरकारच्या पत्रव्यवहारामुळे दसऱ्याच्या दरम्यान जमा होणारा २५ लाख रुपयांचा निधीही रखडला आहे.

साहित्य संमेलन २५ लाख रुपयांमध्ये होणे शक्य नाही. वीस वर्षांतील २५ लाख रुपयांची भरपाई ही सरकारने दिलीच पाहिजे, कारण शेवटी हा जनतेचाच पैसा आहे, अशी भूमिका घेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सरकारकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. सरकारतर्फे दरवर्षी संमेलनासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिला जातो.

‘दर वर्षी साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपये दसऱ्यादिवशी साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा होतील. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत,’ असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले होते. याप्रमाणे गेल्यावर्षी निधी जमा झाला; मात्र यंदा निधी रखडला आहे. पिंपरी-चिंचवडच्या संमेलन निधीबाबतचा संभ्रम निर्माण झाल्यामुळे हा निधी रखडून ठेवण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

‘पिंपरी-चिंचवडमधील संमेलनासाठी सरकारने दिलेले २५ लाख रुपये संमेलनातच खर्च झाले. तो निधी आम्ही देणगी म्हणून स्वीकारला. त्याची त्यांना पावतीही दिली. त्याचा हिशेबही साहित्य संस्कृती मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला,’ असे महामंडळाचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनिक आहेत, म्हणूनच आपली दिवाळी

0
0

Prasad.Pawar@timesgroup.com
Tweet : @prasadpawarMT

पुणे : ‘आम्ही पहाटे अभ्यंगस्नानाची तयारी करताना आमचा मुलगा त्याच वेळी जम्मू-काश्मीरला देशाच्या सीमेवर बंदूक हातात घेऊन अन् डोळ्यांत तेल घालून दक्ष असतो, सुनेच्या डोळ्यांत त्याच्या परतण्याची आस दिसत असते, आपले वडील थेट विमानाने घरी यावे अशी अपेक्षा नातवंडे बाळगून असतात, रांगोळ्या-पणत्या, अंगणात आकाशदिवा सगळे काही असते; पण त्याच्या आठवणीतच आमची दिवाळी साजरी होतेय… आमच्याच नाही तर प्रत्येक सैनिकाच्या घरची दिवाळी अशाच आठवणी आणि आस या हिंदोळ्यावर झुलत दिवाळी साजरी होते…’ कॅप्टन (निवृत्त) जयराम चिकणे सांगत असतात. त्याच वेळी घरात जमलेल्या आप्तांच्या डोळ्यांत सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक आप्तेष्टांचा अभिमान काठोकाठ दाटून आलेला दिसतो.

दिघीच्या सैनिक कॉलनीतल्या कॅप्टन चिकणेंच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आलेली त्यांची लेक भारती खरोसे, एका नामांकित कंपनीत कामाला असणारा मोठा मुलगा सचिन चिकणे आणि नातवंडे जमलेले असतात. सीमेवर लढणारे हवालदार संदीप चिकणे या सर्वांशी संपर्कात असतात ते केवळ फोनवर. हेच चित्र सैनिक कॉलनीत राहणाऱ्या प्रत्येक घरातले. श्रीनगरला कर्तव्य बजावणारे हवालदार रामा भोंडवे यांच्या पत्नी सुनीता भोंडवेही, ‘दिवाळीसाठी ‘ते’ नाहीत; पण त्यांच्यासारख्या सैनिकांमुळेच इथे जल्लोषात सण साजरे होतात,’ हे अभिमानाने सांगतात.

संदीप चिकणे यांच्या पत्नी अश्विनी या मात्र पतीच्या आठवणीने डोळ्यांत तरळलेले पाणी चेहऱ्यावर हास्य आणून इतरांच्या नजरेस पडू नये याची काळजी घेतात. ‘ते सतत फोनवर मुलांचीच चौकशी करत असतात,’ असे सांगताना वर्षांत केवळ चार वेळा (दर तीन महिन्यांनी सुट्टी मिळाली तर) पती भेटतात तेव्हा कुटुंबाचे वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटल्याची भावनाही त्यांच्या भरलेल्या आवाजात काहीशी दबून जाते. दारी रांगोळी रेखताना, आवडीचे फराळाचे पदार्थ करताना प्रत्येक क्षणाला आठवणींची आणि पुढल्या भेटीची आस प्रत्येक सैनिकाच्या पत्नीला लागलेली असते, हे सांगायला त्या विसरत नाहीत.

‘संदेसे आते हैं, हमे तडपाते हैं’ अशी जवानांची भावना असली तरीही सैनिकांच्या घरी मात्र ‘के तुम बिन ये घर सुना सुना है,’ अशीच भावना सणाच्या आनंदातही वारंवार समोर येत राहतेच.


उरी हल्ल्याने चुकवला ठोका

दहशतवाद्यांनी उरी इथल्या लष्करी तळावर हल्ला केला तेव्हा हवालदार संदीप चिकणे, रामा भोंडवे त्याच परिसरात तैनात होते. महिनाभर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा काळजाचा ठोका चुकल्याचे चिकणे आणि भोंडवे परिवारातले सदस्य सांगतात. ‘जमेल तेव्हा दिवसातून एकदा तरी त्यांचा फोन येतो; मात्र तिथले काहीच न सांगता ही मंडळी केवळ कौटुंबिक चर्चाच आमच्याशी करतात. स्वतःविषयी किंवा तिथल्या परिस्थितीविषयी काही बोलत नाहीत त्यामुळे काळजी वाढते; पण देशासाठी ते गरजेचे असल्याने त्यांचा अभिमान वाटतो,’ हे सांगताना कॅप्टन चिकणे लष्कराची शिस्त सर्वांत अधिक महत्त्वाची हे ही नमूद करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिसांचे ‘रेल सुरक्षा’ अॅप

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे रेल्वे पोलिस दलाने ‘रेल सुरक्षा’ नावाचे एक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. आपतकालिन परिस्थितीत रेल्वेच्या डब्यात उपलब्ध करून दिलेल्या ‘पॅनिक बटणा’च्या सहाय्याने जवळपासच्या रेल्वे पोलिसांशी संपर्क साधता येणार आहे. देशभरातील रेल्वे पोलिसांनी अशाप्रकारे विकसित केलेले हे पहिलेच मोबाइल अॅप ठरले आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी यापूर्वी देशभरात १८२ ही हेल्पलाइन अस्तित्त्वात होती. त्याबरोबरच रेल्वेतील साखळी ओढून इंजिन चालकाला संकेत दिले जात होते किंवा त्याच्याकडे मदतीची मागणी केली जात होती. मात्र, यामध्ये विनाकारण साखळी ओढण्याचे प्रकार घडतात आणि यामध्ये काही प्रमाणात नेमकेपणाचा अभावही होता. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. पुणे-दौंड मार्गावर गेल्या काही महिन्यांत दरोड्याच्या अनेक घटना घडल्या. तसेच, प्रवाशांमध्ये मारहाणीचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे पोलिसांनी ‘रेल सुरक्षा’ अॅपची निर्मिती केली आहे.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल महिलांच्या डब्यात एक ‘पॅनिक बटण’ बसविण्याची घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाने या वर्षी मे महिन्यात केली होती. ‘रेल सुरक्षा’ अॅपची कार्यप्रणालीही याच पद्धतीची असून, त्याचे एक बटण डब्यामध्ये असणार आहे. ते बटण दाबल्यानंतर पोलिसांना अॅपद्वारे सूचित केले जाणार आहे. रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे, रेल्वे ट्रॅक नादुरुस्त आहे किंवा अन्य कोणत्या कारणास्तव वाहतूक थांबविण्यात आली आहे, अशा परिस्थितीत प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेची माहिती याद्वारे दिली जाणार आहे. या अॅपमध्ये अन्य काही सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हरवलेले प्रवाशांची नावे, रेल्वे गाड्या व पुणे-लोणावळा लोकलचे वेळापत्रक याचा समावेश आहे. तसेच, प्रवासी या अॅपद्वारे ऑनलाइन तक्रारही नोंदवू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या पुरस्कारांसाठी मंत्र्यांकडून लॉबिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या शिक्षण खात्याने 'आयसीटी राष्ट्रीय पुरस्कार २०१६'साठी शिक्षक निवडण्यासाठी घेतलेल्या मुलाखतींची प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हे आहेत. प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या काही शिक्षकांना सुरुवातीच्या टप्प्यात मुलाखतीचे सांगावे न येणे, मुलाखतीसाठी गैरहजर शिक्षकांच्या नावांची शिफारसीसाठी चर्चा होणे, विशिष्ट मंत्र्यांकडून प्रक्रियेसाठी 'लॉबिंग' होणे आदी मुद्द्यांमुळे ही प्रक्रिया सध्या राज्यभरातील शिक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्यात गेल्या काही काळात मोठ्या संख्येने तंत्रस्नेही शिक्षक तयार झाले आहेत. या शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन तयार केलेले विविध शैक्षणिक उपक्रमही कौतुकाचे विषय ठरले आहेत. केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून राष्ट्रीय पातळीवरून आयसीटी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यंदा राज्यातून त्यासाठी शिक्षकांच्या नावांची शिफारस करण्यासाठी म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमध्ये (एससीईआरटी) नुकतीच राज्यस्तरीय मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षण खात्यातील उच्चपदस्थ अधिकारीही या प्रक्रियेदरम्यान उपस्थित होते. या प्रक्रियेपूर्वी आणि दरम्यानच्या काळातही अनेक आक्षेपार्ह बाबी घडल्याचे या निमित्ताने समोर आले.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेसाठी राज्यभरातून निवडक तंत्रस्नेही शिक्षकांचा मुलाखतीसाठी विचार करण्यात आला होता. त्यासाठी तयार यादीतून संबंधित शिक्षकांना या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे सांगावे अधिकृतपणे देण्यात आले होते. या यादीमध्ये नाव असूनही, काही शिक्षकांना या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे सांगावे गेले नाहीत. त्यामुळे अखेर या शिक्षकांनी आपल्या जिल्ह्यातील राज्य मंत्र्यांच्या मदतीने खात्यातील उच्चपदस्थांसोबत संवाद साधला. मंत्री महोदयांच्या या हस्तक्षेपामुळे नंतरच्या टप्प्यात संबंधित शिक्षकांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे सांगावे गेले. प्रक्रियेसाठी राज्य पातळीवर या पूर्वीच चर्चेत आलेली अनेक नावे विचारात घेण्यात आली होती. मात्र, त्यापैकी काही शिक्षकांनी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मुलाखत प्रक्रियेकडे ऐनवेळी पाठ फिरविली. त्यानंतरही या शिक्षकांच्या नावांची चर्चा खात्यातील उच्चपदस्थांमध्ये होती. प्रक्रियेसाठी अनुपस्थित असलेल्या शिक्षकांची अशी चर्चा कशी काय होऊ शकते, या विषयीही राज्यभरातील शिक्षकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

राज्य पुरस्कारही

या प्रकाराविषयी खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, बोलण्यास नकार देण्यात आला. त्याचवेळी या राष्ट्रीय पुरस्काराच्या धर्तीवर या पुढे राज्य सरकार शिक्षकांना राज्य पुरस्कार देणार असल्याचेही सांगण्यात आले. या प्रक्रियेसाठी विचारात घेण्यात आलेल्या शिक्षकांची नावे, राज्य पुरस्कारासाठी विचारात घेतली जाणार असल्याचेही या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगलेला स्वराविष्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीची शेवटची पहाट. संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत, पाश्चात्य, पारंपरिक, अशा सर्व संगीत प्रकारांचा झालेला मिलाफ आणि त्यातून तयार झालेला ‘स्वरयज्ञ’ रसिकांनी याचि देही अनुभवला. आर्या आंबेकर, तौफिक कुरेशी, महेश काळे, अमर ओक, पं. विजय घाटे, नीलेश परब आदींनी सादर केलेल्या स्वराविष्कारामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.

शिवाजीराव भोसले प्रतिष्ठान आणि ‘मटा कल्चर क्लब’ आयोजित भोसले एन्क्लेव्ह, भोसलेनगर येथे होत असलेल्या ‘सूर प्रभात’ महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या मैफलीने सुवर्णकळस गाठला. रसिकांना एकाच रंगमंचावर अनेक दिग्गजांचे सादरीकरण अनुभवता आले. ‘सा-रे-ग-म-प’ फेम आर्या आंबेकर हिच्या गायनाने सुरू झालेली स्वरसाधना शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या गायनापर्यंत येऊन थांबली. बासरीवादक अमर ओक, ढोलकीवर संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे नीलेश परब, जागतिक दर्जाचे पर्कशनिस्ट उस्ताद तौफिक कुरेशी, पं. विजय घाटे यांनी रसिकांवर अक्षरश: स्वरमोहिनी घातली. आमदार अनिल भोसले यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. नगरसेविका रश्मी भोसले, माजी नगरसेवक नीलेश निकम, उदय महाले, विनोद सातव आदी या वेळी उपस्थित होते.

महेश काळे यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. महेश काळे यांच्या गायनाला पं. विजय घाटे, उस्ताद तौफिक कुरेशी, अमर ओक, नीलेश परब यांनी साथसंगत केली. शास्त्रीय गायनासाठी झालेल्या ढोलकी आणि आफ्रिकन झेंबेच्या साथीने संगीत पारंपरिक सीमांच्या पलीकडे गेले. ‘सूर निरागस’ या गाण्यापासून महेश काळे यांनी गायनाला सुरुवात केली. ‘अवघे गरजे पंढरपूर’, गाऊन त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीचा जागर केला. या मैफलीनंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात दिलेली दाद सर्व काही सांगून गेली.

आर्या आंबेकर हिच्या गायनाने आणि अमर ओक यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अमर ओक यांनी बासरी वादनाने रसिकांना तृप्त केले, त्यानंतर आर्या आंबेकर हिने कशाला उद्याची बात, केव्हा तरी पहाटे, अशी गाणी सादर केली. तिने कबीराचे भजन सादर केल्यानंतर रसिक भक्तिरसात तल्लीन झाले. अमर ओक यांनी संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या विराण्यांची एक बहारदार मैफल बासरीवर सादर केली. चित्रपटसृष्टीमध्ये बासरीवर गाजलेल्या काही ट्यून्स त्यांनी रसिकांना ऐकवल्या आणि भरभरून दाद मिळवली. त्यापाठोपाठ ढोलकीवादक नीलेश परब यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर तौफिक कुरेशी यांनी आफ्रिकन झेंबेवर तीन ताल वाजवून रसिकांची मने जिंकली. धावती आगगाडी, त्यांच्या बाजूने जाणारी दुसरी गाडी, गतिवान मध्येच वेग मंदावणारी आगगाडी असे, आवाज वादनातून सादर करून त्यांनी मैफलीत रंग भरले. या सर्व कलाकारांना तन्मय देवचक्के (संवादिनी) अभिजित बधे (ऑक्टोपॅड) अनय गाडगीळ (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जवानांना भाऊबीजेचे औक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणपतीचा दहा दिवसांता उत्सव असो, की दसरा दिवाळी. एकही सण कुटुंबाबरोबर साजरा न करता, पुणेकरांच्या सेवेत, त्यांच्या संरक्षणासाठी कायम कार्यरत राहणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवानांची सामूहिक भाऊबीज मंगळवारी उत्साहात झाली. असंख्य महिलांनी व तरुणींनी जवानांना औक्षण केले. आम्ही या दिवसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत असतो, अशी भावना जवानांनी व्यक्त केली.

भोई प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशामक दलाच्या जवानांसाठी भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, अभिनेत्री व लेखिका प्रतिभा शाहू मोडक, अभिनेत्री जयमाला इनामदार, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, अॅड. प्रताप परदेशी, नगरसेविका रूपाली चाकणकर, इक्बाल दरबार, मोहन दुधाने, मुश्ताक पटेल आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई आदी या वेळी उपस्थित होते. वैष्णवी काळे या बालिकेने नाट्यछटा सादर केली.

दैठणकर म्हणाले, ‘दररोज परिस्थितीशी लढाई करणाऱ्या जवानांसाठी भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि सातत्याने २०, २१ वर्षे तो सुरू ठेवणे ही कौतुकाची बाब आहे. या उपक्रमात समस्त पुणेकरांनी एकत्र आले पाहिजे.’ ‘अग्निशामक दलाची कामगिरी चांगली आहे. जवानांच्या वेतनासह अनेक प्रश्न आणि कुटुंबाची जबाबदारी याचा कामावर परिणाम न होता, ते काम करतात,’ असे गौरवोद्गार जगताप यांनी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुहिणीत रानपाखरांची दिवाळी

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

दररोज दोन-दोन तास पायपीट करून कुणी शाळा गाठते तर कुणी डोंगरदऱ्यातले घर सोडून केवळ शिकण्यासाठी नातलगांकडे राहते, शाळा हेच एकमेव ठिकाण, जिथे त्यांना त्यांच्या वयाचे सवगंडी मिळतात, भरपूर खेळता येते, अभ्यास होतो. अन्यथा गुरे राखणे, घरची कामे करणे, यातच त्यांचा दिवस मोडतो. अशा रानपाखरांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम पुण्याच्या ट्रेकर्सने राबविला.

गुरुवार पेठेतील अवचित मारुती ट्रेकिंग ग्रुपतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा भोर तालुक्यातल्या गुहिणी या दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजही दिवसातून एकदाच या गावात एसटी जाते. राजगड-तोरण्याच्या दुर्गम परिसरातले निसर्गरम्य गाव म्हणून गुहिणी ओळखले जाते. शाळेतील पहिली ते सातवीच्या ७१ विद्यार्थ्यांना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा, या सणाची त्यांना माहिती व्हावी या हेतूने श्री. जाधव आणि श्री. जिरेकर या शिक्षकांच्या सहकार्याने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना नवे कपडे, शैक्षणिक आणि दिवाळी साहित्य तसेच फराळाचे वाटप करण्यात आले; तर शाळेला फळा, कम्प्युटर या गोष्टी देण्यात आल्या.

पुण्यातले मनोज राणावत यांनी मुलांसाठी नवे कपडे, तर जुनेद शेख यांनी दप्तरांची व्यवस्था केली होती. मिलिंद अंबिके, प्रशांत जमदाडे, संजय कोंडे, सुमित चव्हाण, समीर जागडे, कुणाल शेटे, अमित उणेचा आणि सुरेश ओसवाल यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. गुहिणीची शाळा दिवाळीपूर्वीच्या रविवारीही भरली आणि मुलांनी दिवाळीचा सण शाळेच्या आवारात उत्साहात साजरा केला. सह्याद्रीत भटकताना दुर्गम गावातल्या मंडळींचे खूप सहकार्य होते. या गावांमध्ये माणुसकी अनुभवायला मिळते. त्यांच्याप्रती कर्तव्य म्हणून दर वर्षी आम्ही ट्रेकर्स एकत्र येऊन एक दुर्गम गाव निवडतो आणि तिथे हा उपक्रम राबवितो, अशी माहिती अमोल उणेचा, महेश शिंदे, कपिल निर्मल, चंदन भोईटे, राजू गिरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘लढाईबाबत जागृती हवी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आजची लढाई ही देशाच्या सीमेवर नाही, तर देशामध्ये विविध ठिकाणी होत आहे. नागरिकांमध्ये याबाबत जागृती होत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सैनिकांप्रमाणेच सामान्य नागरिकांचीदेखील आहे,’ असे मत ब्रिगेडियर (निवृत्त) आर. आर. पळसोकर यांनी व्यक्त केले.

विधायक पुणे, रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाउन, सैनिक मित्र परिवार आणि नारद मंदिर संस्थेतर्फे देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नींसमवेत भाऊबीज साजरी करण्यात आली. रोटरीचे मुकुंद कमलाकर, सुनील चाणेकर, किशोर सरपोतदार, अशोक मेहेंदळे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी १९६२च्या युद्धात बेपत्ता झालेल्या दोन सैनिकांच्या वीरपत्नी सहभागी झाल्या होत्या. पुण्यातील २५ गणेशोत्सव मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांचा यात सहभाग होता. विष्णू ठाकूर, राजू पाटसकर, पराग ठाकूर, कुमार रेणुसे, सारंग सराफ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

पळसोकर म्हणाले, ‘सैनिक आणि शौर्य या दोन वेगळ्या गोष्टी नसून एकच आहेत. महाराष्ट्रात सैनिकी परंपरा आहे. आपल्या महिला शूर नसत्या, तर पुरुष कधीही शूर झाले नसते. सैनिकांमागे या महिला खंबीरपणे उभ्या असल्याने देशाच्या सीमांचे रक्षण करणे त्यांना शक्य होते. देशातील प्रत्येक नागरिक हा सैनिकांच्या पाठीशी असून त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी नागरिकांची आहे. सामाजिक संस्था ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडत आहेत.’

देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नी त्यांच्या मागे प्रपंचाची दुसरी लढाई लढत आहेत. त्यामुळे सैनिक मित्र परिवारसह इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून आम्ही गेल्या सोळा वर्षांपासून त्यांच्यासोबत आहोत, असे सराफ यांनी सांगितले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन आणि किशोर आदमणे यांनी आभार मानले.

छत्रपती शिवरायांना मानवंदना

पुणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अवघ्या काही वेळात आठ हजार पणत्यांचा प्रकाश सर्वदूर पसरला. तुतारीची ललकारी आणि सनई-चौघड्याच्या मंगलमय सुरावटींनी वातावरणात चैतन्याचे सूर मिसळले अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसरात आनंदोत्सवाचे रंग भरले. भारावलेल्या वातावरणात शिवाजी महाराज, सरदार कान्होजी जेधे, नरवीर तानाजी मालुसरे आणि सरलष्कर संताजी घोरपडे यांना मानवंदना करण्यात आली.

निमित्त होते शिवजयंती महोत्सव समितीतर्फे ‘एसएसपीएमएस’ शाळेत आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सवाचे. कार्यक्रमाला महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, कर्नल अजय पाठक, अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यक्रमाचे संकल्पक व समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड उपस्थित होते.

जगताप म्हणाले, ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला भव्य अश्वारूढ पुतळा पुण्यामध्ये आहे, याचा मला अभिमान आहे. महाराजांनी स्वराज्याचा नांगर ज्या भूमीमध्ये फिरविला तेथे अपेक्षित असलेले सुराज्य आम्ही निश्चितच स्थापन करणार आहोत.’ गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. दीपक घुले, रवींद्र कंक, नीलेश जेधे, सचिन पायगुडे, महेश मालुसरे, रणजित शिंदे आदींनी त्यासाठी विशेष प्रयत्न घेतले. नीलेश जगताप, कल्याणी सांळुखे, शिवाजी तावडे आदींनी पणत्यांची रचना केली.

शवागारातील कर्मचाऱ्यांचा सन्मान

सण-उत्सव बाजूला ठेऊन कर्तव्य बजावणाऱ्या शवागारातील कर्मचाऱ्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी ‘लायन्स क्लब ऑफ पुणे प्रभात’तर्फे कृतज्ञता सन्मान कार्यक्रम घेण्यात आला.

‘लायन्स क्लब ऑफ पुणे प्रभात’तर्फे ससून शवागारातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. बिपिन पाटोळे, सचिव विकास कोलते, खजिनदार दिलीप शिंगवी, प्रशांत झरकर, मुकुंद खैर आदी उपस्थित होते. पाटोळे म्हणाले, ‘ससून येथील शवागारात शहरातील अनेक ठिकाणांहून मृतदेह येतात. अनेक वेळा ते विदारक अवस्थेत असतात. मृतांचे नातेवाईकदेखील त्याच्या जवळ जात नाहीत. अशा परिस्थितीत हे कर्मचारी मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणे, त्यांच्या अस्थी जपून ठेवणे यांसारखी कामे करतात. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देणे, हा उपक्रमाचा उद्देश होता.’


अनाथाश्रमात दिवाळी साहित्य

‘संघर्ष सोशल फाउंडेशन’तर्फे सोफोश संस्था संचालित श्रीवत्स अनाथाश्रमात दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी श्रीवत्स संस्थेच्या व्यवस्थापिका शर्मिला सय्यद, फाउंडेशनचे अध्यक्ष चैतन्य पुरंदरे, उपाध्यक्ष प्रणव ढवळे, प्रसाद केळकर, अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते. फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिवाळीत विविध अनाथाश्रमात अशा उपक्रमाचे आयोजन केले जाते.

‘अमर जवान’ स्मारकाची रांगोळी

‘आनंदनगर पार्क मित्र मंडळा’तर्फे या वर्षीही फटाके न उडविता पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष असून प्रत्येक वेळी विविध विषय निवडून त्यावर आधारित रांगोळ्यांचे गालिचे आणि पणत्यांचे डेकोरेशन करण्यात येते.

या वर्षी भारतीय जवानांना वंदन करण्याची संकल्पना निश्चित करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी ‘अमर जवान’ स्मारकाची रांगोळी काढली होती. तसेच, आपल्या तिन्ही दलाची शक्ती दाखवण्यासाठी रणगाडा, अग्नी आणि ब्राह्मोस ही क्षेपणास्त्रे, सुखोई ३० हे लढाऊ विमान आणि आयएनएस विक्रमादित्य या नौदलाच्या जहाजाचे चित्र काढून त्यावर दोन हजारांहून अधिक पणत्या लावण्यात आल्या. या वेळी आनंदनगरमधील लहान मुले आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चतु:शृंगी मंदिर तेजोमय

विविध रंगांची उधळण करून रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली वामन अवतार आणि बळीराजाच्या कथा आणि पाच हजार दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने संपूर्ण चतु:शृंगी मंदिर तेजोमय झाले. दीपोत्सव बघण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गर्दीने फुलला होता.

निमित्त होते, राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळ्या आणि दीपोत्सवाचे. या वेळी सारसबाग देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, निनाद पुणेचे उदय जोशी, आमदार विजय काळे, संजय मयेकर, अकादमीचे मंदार रांजेकर, चतु:शृंगी देवस्थानचे गंगाधर अनगळ आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा पंधरावे वर्ष होते. बलिप्रतिपदेला भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा करतात. या कथेचे वर्णन आम्ही रांगोळीच्या माध्यमातून केले, असे रांजेकर यांनी सांगितले.

वीरमाता भोसले यांचा सन्मान

भारत माता की जय... शहीद जवान अमर रहे...च्या जयघोषात आणि सनई-चौघड्यांच्या निनादात कसबा गणपती मंदिराच्या परिसरात शहीद दत्तात्रय कृष्णा भोसले यांच्या कुटुंबीयांना आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली. ज्येष्ठांसह चिमुकल्यांनी केलेल्या अभिवादनामुळे वीरमातेलादेखील अश्रू अनावर झाले.

‘सैनिक मित्र परिवारा’तर्फे भाऊबीजेनिमित्त जवानाच्या वीरमाता मालन भोसले यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी विवेक मठकरी, कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त संगीता ठकार, अशोक मेहेंदळे, भोसले यांचे वडील कृष्णा भोसले, पत्नी सुनंदा, अ‍ॅड. बिपिन पाटोळे, शाम मानकर, आदी उपस्थित होते. पुण्यातील वीस गणेशोत्सव मंडळे आणि संस्था यात सहभागी झाल्या होत्या. अनिल पगारे, प्रा. संगीता मावळे, गिरीजा पोटफोडे, उमेश सकपाळ आदींनी संयोजन केले. भोसले म्हणाले, ‘सैनिक आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी कसे काम करावे, हे पुण्यातील सामाजिक संस्थांनी दाखवून दिले आहे. यांच्या प्रेमातूनच सैनिकांच्या कुटुंबांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होत असते.’ मठकरी आणि सराफ यांनी मनोगत व्यक्त केले.

आदिवासी कातकरींना फराळाचे वाटप

ज्ञानदायिनी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे पूना मर्चंट चेंबर आणि बुधानी वेफर्स यांच्या सहकार्याने वेल्हे येथील आदिवासी कातकरींना फराळ वाटून दिवाळी साजरी करण्यात आली. तसेच, पुण्यातील अप्पर इंदिरानगर येथील गरीब मुलांनाही खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे यशवंत मानखेडकर, कादवे गावाचे सरपंच बापू नयन वाईरकर, गायक हर्शीद अभिराज, संतोष काटकर, संस्थेच्या समन्वयक मीरा मानखेडकर आदी या वेळी उपस्थित होते. ज्ञानदायिनी संस्थेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून झोपडपट्टी आणि आदिवासी भागातील मुलांना मोफत शिकविण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटगीसाठी तिची लबाडी

0
0

पोटगीसाठी तिची लबाडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लग्नानंतर काही महिन्यांतच ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले... सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्यामुळे तिला चांगल्या पगाराची नोकरी होती; मात्र, आपण कमावते असल्याची बाब लपवून ठेवून तिने कोर्टातून त्याच्याकडून दरमहा दोन हजारांची पोटगी मिळवली... तरीही घटस्फोट मिळावा म्हणून दाखल केलेल्या दाव्याच्या सुनावणीत तिची लबाडी उघडकीस आलीच. कोर्टाने तिचा घटस्फोटाचा दावा फेटाळला अन् पतीकडून घेतलेली पोटगीची २८ हजार रुपयांची रक्कम परत करण्याचा आदेशही दिला. पुण्यातील फॅमिली कोर्टातील न्यायाधीश लक्ष्मण मगदूम यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
संबंधित सॉफ्टवेअर इंजिनीअर पत्नीने कोर्टात पतीपासून घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. तिच्या पतीने कोर्टात तिने परत नांदायला यावे अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. कोर्टात या दोघांच्या दाव्यावर सुनावणी झाली. संबंधित अर्जदार पती-पत्नीचे २१ मार्च २००० रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर काही दिवसांनी पत्नीने पतीकडून पोटगी मिळावी म्हणून पिंपरी कोर्टात दावा दाखल केला. कोर्टाने तिला दरमहा दोन हजार रुपये पोटगी देण्यात यावी, असा आदेश दिला होता. ती कमावती असल्याची बाब तिने कोर्टात लपवली होती. जानेवारी २००४ मध्ये झालेल्या अपघातात पतीला अपंगत्व आले.
दरम्यानच्या काळात पत्नीने पतीपासून घटस्फोट मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्याने परत नांदायला यावे म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांच्या दाव्याची कोर्टात सुनावणी सुरू झाली. पतीपासून वेगळे राहत असताना तिला चांगल्या पगाराची नोकरी होती, याबद्दलचे पुरावे आणि कागदपत्रे कोर्टात तिच्या पतीने सादर केले. कोर्टात उलटतपासणीदरम्यान तिने आपण पोटगी मिळावी म्हणून दावा दाखल केला तेव्हा कमावत होतो, ही बाब मान्य केली.
अशाप्रकारे लबाडी करून तिने कोर्टाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. लबाडी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोर्टाने तिचा घटस्फोटाचा दावा रद्द केला; तसेच तिने परत नांदायला जावे असा आदेश दिला. पतीकडून २००२ ते २००३ या कालावधीत वसूल केलेली अंतरिम पोटगीची २८ हजार रुपये रक्कम त्याला परत देण्यात यावी, असा आदेश कोर्टाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी धरणातील वाळूचा लिलाव महिनाअखेरीस?

0
0

उजनी धरणातील वाळूचा लिलाव महिनाअखेरीस?

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्रीय पर्यावरण समितीची मान्यता मिळाल्यानंतर उजनी धरणातील वाळूचा लिलाव या महिन्याअखेरीस केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवली जाणार असल्याने या धरणातील बेकायदा वाळू उपसा कायमचा रोखला जाणार आहे.
वाळूचा उपसा करण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम परवानगी अत्यावश्यक असते. उजनी धरणातून पहिल्यांदाच वाळू उपसा करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने केंद्रीय पर्यावरण समितीसमोर सादर केला आहे. त्यास मंजुरी मिळून या महिनाअखेरीस टेंडर प्रक्रिया राबवली​ जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय पर्यावरण समितीच्या मान्यतेनंतर राबवण्यात येणाऱ्या टेंडर प्रक्रियेद्वारे कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
धरणाचा मूळ हेतू आणि तटबंदी यांना धोका पोहोचणार नाही, अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून उजनी धरणातून अनधिकृतपणे वाळू उपसा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने त्यावर पायाबंद घालण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला यश आलेले दिसत नाही. अनेकदा संबंधितांच्या धरणातील बोटी प्रशासनाने उद्ध्वस्त केल्या आहेत. ही कारवाई केल्यानंतर काही दिवस बेकायदा वाळू उपसा थांबवण्यात येतो. त्यानंतर पुन्हा उपसा केला जातो. त्यावर उपाय म्हणून या धरणातील वाळू उपसा करण्यासाठी ऑनलाइन टेंडर प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेकायदा वाळू उपसा होण्यास प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वरदहस्त राहिला आहे. काही अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास त्यांच्यावर जीवघेणे हल्लेही झाले आहेत. मात्र, आता वाळू माफियांवर कायमचा प्रतिबंध घातला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलबाजारात गाळे ३०० चौरस फुटांचे

0
0

फुलबाजारात गाळे ३०० चौरस फुटांचे

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मार्केट यार्डात नव्याने झालेल्या फुलबाजारात परवानाधारक विक्रेत्यांना ३०० चौरस फुटांपर्यंत गाळा देण्याची तयारी असून, गाळ्यासाठी रेडीरेकनरनुसार दर आकारण्याचा ‌निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. याबाबत अंतिम निर्णय नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने फुलबाजार उभारण्यात येत आहे. त्याचे भू‌मिपूजन आठ महिन्यांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर फूल विक्रेत्यांच्या सूचना आणि हरकती मागवाव्यात, याची आठवण बाजार समितीला झाली. या फुलबाजाराबाबत अनेक विक्रेत्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे व्यापाऱ्यांशी बाजार समितीने मंगळवारी बैटक घेतली. त्या बैठकीत फुलबाजारांच्या सूचना व हरकतींसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी फुलबाजारातील विक्रेते, तसेच बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भूषण तुपे, सचिव पी. एल. खंडागळे आदी उपस्थित होते.
‘फुलबाजारातील विक्रेत्यांकडून १३२ व्यापाऱ्यांना प्राधान्य हवे. मूळ जागेपेक्षा अतिरिक्त जागा हवी आहे; तसेच परवडणारे दर हवेत,’ अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार नव्या फुलबाजारात १३२ विक्रेत्यांना प्राधान्य दिले जाईल. त्याशिवाय गरजेनुसार ३०० चाैरस फूट जागेचा गाळा देण्यात येणार आहे; परंतु रेडीरेकनरनुसार दर आकारले जातील, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भात पणन संचालकांशी चर्चा करून नोव्हेंबरमध्ये बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. व्यापाऱ्यांनी दर कमी करण्याची विनंती केली आहे. त्यावर नोव्हेंबरमधील बैठक चर्चा केली जाईल. बाजाराच्या आराखड्यात व्यापाऱ्यांच्या सूचनेनुसार बदल करण्यात येत आहेत,’ अशी माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागणी असलेल्याच व्यवसायांचे प्रशिक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कमी मागणी असणाऱ्या व्यवसायांसाठी कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षण या पुढील काळात बंद होणार आहे. त्याचवेळी नवीन आणि मागणी असलेले व्यवसाय व त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने कौशल्य व उद्योजकता विभागासमोर ठेवले आहे. कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपक्रमही योजले जाणार आहेत.

राज्य सरकारने कौशल्य विकास व उद्योजकता विभागासमोर शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी म्हणून १२ उद्दिष्टे ठेवली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी कालमर्यादाही आखून दिली आहे. या विषयी सविस्तर माहिती असणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार, विभागामधील अधिकाऱ्यांना या उद्दिष्टपूर्तीसाठी केलेल्या कामाचा तपशील प्रत्येक महिन्यांच्या ५ तारखेपर्यंत प्रगती अहवालाच्या माध्यमातून सरकारकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या निर्णयानुसार, विभागाने इतर विभागांच्या समन्वय व सहभागाने वर्षाखेरीस दोन लाख मनुष्यबळाला रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत किमान २० हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, maharojgar.gov.in पोर्टल अद्ययावत करणे, या पोर्टलच्या सेवा सर्व इच्छुक बेरोजगार उमेदवारांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे आदी बाबींची येत्या वर्षभरात पूर्तता करणे राज्य सरकारला अपेक्षित आहे.

नोंदणीकृत कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या ७०० वरून दीड हजारांवर नेणे, प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत एक लाखांपेक्षा अधिक युवकांचे कौशल्य विकसित करणे, खासगी उद्योगांसोबतच्या करारांतर्गत विविध आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्तावृद्धी करणे, सर्व आयटीआयमध्ये संस्था व्यवस्थापन समित्या स्थापन करून कार्यान्वित करणे, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा कृती आराखडा तयार करणे, किमान १० औद्योगिक संस्थांशी सहकार्य करून प्रशिक्षण सुविधांमध्ये दर्जावाढ करणे अशी उद्दिष्टेही राज्य सरकारने विभागासमोर ठेवली आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रिक्षाचालकांचे प्रबोधन करणार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षाचालक भाडे नाकारतात, ज्येष्ठ नागरिक व महिलांची त्यामुळे गैरसोय होते. तसेच, रिक्षा चालकांची वागणूकही चांगली नसते. पुणे नागरी प्रवासी संघाने अशा तक्रारी थेट रिक्षा पंचायतीसह सर्व प्रमुख रिक्षा संघटनांना करून, आता तुम्हीच यावर उपाययोजना करावी, असे आवाहनही केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व रिक्षा संघटनांची लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्याबरोबरच ओला, उबर या कंपन्यांचा सामना कसा करायचा, यावर चर्चा केली जाणार आहे.

शहरातील अनेक रिक्षाचालक सर्रासपणे भाडे नाकारतात. भाडे नाकारणाऱ्या या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिस, आरटीओ यांच्याकडे तक्रारी करूनही त्यांची वर्तणूक सुधारत नाही. प्रवाशांशी उद्धट वर्तन, जादा पैसे घेणे, अशा विविध कारणांमुळे शहरातील रिक्षाचालकांवर नेहमीच टीका केली जाते. त्यामुळे पुणे नागरी प्रवासी संघाने रिक्षा पंचायतीचे डॉ. बाबा आढाव, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे बाबा शिंदे यांना पत्र पाठविले होते. सर्वसामान्य जनतेला इच्छित प्रवास सुकर, सुलभ, शासन निर्गमित प्रवासी दरानुसार कराता यावा यासाठी आपण लक्ष घालावे, असेही संघाने पत्रात म्हटले आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रिक्षाचालकांची बैठक घेतल्याची चर्चा आहे. त्या बैठकीत पत्रात नमूद केलेल्या समस्यांबद्दल चर्चा झाली.

या पार्श्वभूमीवर लवकरच सर्व रिक्षा संघटनांच्या प्रतिनधींची बैठक आयोजित केली जाणार आहे. भाडे नाकारणे, प्रवाशांशी वर्तणूक आदींबाबत रिक्षाचालकांचे प्रबोधन कसे करावे, यावर चर्चा केली जाईल. शहरातील महत्त्वाच्या प्रत्येक रिक्षा स्टँडवर रिक्षा संघटनांचा प्रतिनिधी थांबवून रिक्षा चालकांचे प्रबोधन करण्यासंदर्भातही या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त तूर डाळ फेब्रुवारीमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या वर्षी तूर डाळीचा तुटवडा पाहता यंदा मोठ्या प्रमाणात राज्यासह परराज्यात उत्पादन घेण्यात आले आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या तूर डाळीचा मागणीपेक्षा पुरवठा अधिक होणार असल्याने दर उतरण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत ७० ते ८० रुपयांपर्यंत दर खाली येतील, अशी शक्यता डाळ उत्पादक, तसेच व्यापारी व्यक्त करीत आहेत.

गेल्या वर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तूर डाळीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. जून महिन्यापासून तूर डाळीचा खऱ्या अर्थाने तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. राज्य सरकारने वेळीच केंद्राकडे आयातीसाठी नोंदणी केली नव्हती. त्याचा फटका ऐन दिवाळीत नागरिकांना बसला. त्या वेळी तूरडाळीने पावणेदोनशे ते दोनशे रुपयांचा टप्पा गाठला. ग्राहकांच्या स्वयंपाकघरातून अखेर तूर डाळ हद्दपार होण्याच्या मार्गावर होती. त्या वेळी सरकारच्या धोरणावर टीकाही करण्यात आली. व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. डाळ जप्त करण्यात आली. पण, जप्त केलेली डाळ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास त्यांना दिवाळीनंतरचा काळ उजाडला. पुण्यासारख्या शहरात एका दिवसात तीस टन एवढी डाळ विक्री करण्यात आली होती. परंतु, सरकारने वितरीत केलेली डाळ ही शिजण्यास उपयुक्त नसल्याने त्याकडेदेखील ग्राहकांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी करण्यास सुरुवात केली. यंदा महाराष्ट्रात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले आहे.

महाराष्ट्रात बार्शी, अकोला, लातूर, परभणी, खामगाव या भागातून मोठ्या प्रमाणात तूर डाळ बाजारात येते. त्याशिवाय कर्नाटकातूनही तूर डाळ आयात केली जाते. पण, त्याचे प्रमाण कमी आहे. तसेच, हरभरा डाळ मध्य प्रदेशाबरोबर लातूर, अकोला, बार्शी येथून मोठ्या प्रमाणात येते. गेल्या वर्षी तूर डाळीचा तुटवडा होता. आता या दिवाळीदरम्यान हरभरा डाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हरभरा डाळीचे दर दुपटीने वाढले आहेत.

‘गेल्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान तूर डाळीचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे डाळीचे दर दोनशे रुपयापर्यंत पोहोचले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तूर डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. समाधानकारक पावसामुळे ४० लाख टनांपेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर हे पीक हातात येईल. डिसेंबरपासून बाजारात तूर डाळ उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. परंतु, डिसेंबरमध्ये तूर डाळ उपलब्ध झाल्यानंतरही त्याचे दर खाली येणार नाहीत. आवक मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाल्यावर गेल्या वर्षीच्या दराच्या तुलनेत यंदाच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत तूर डाळीचे दर निम्म्याने खाली येतील,’ अशी शक्यता डाळ उत्पादक अमित बंडेवार यांनी व्यक्त केली.

सध्या हरभरा डाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामधून हरभरा डाळीची आयात करण्यात आली. पण, त्या ठिकाणीच तुटवडा निर्माण झाल्याने आयात कमी झाली. त्यात देशातंर्गत हरभरा डाळीचे उत्पादन कमी होते. त्यामुळे तुटवडा कमी निर्माण झाला. तसेच, देशांतर्गत उत्पादन आणि मागणी यात तफावत असल्याने सध्या हरभरा डाळीचे दर वाढत आहेत. पण, त्याचे पीक देखील नोव्हेंबरमध्ये येण्यास सुरुवात झाल्यास दर आवाक्यात येतील, असेही बंडेवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ ओवाळणीवर भर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औक्षणाच्या ताटात स्मार्ट भेटवस्तूची ओवाळणी घालून भावाने लाडक्या बहि‍णीला आश्चर्याचा धक्का दिला अन् आपल्या भावाला उदंड आयुष्याची प्रार्थना करून बहि‍णीनेही भावाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भावंडांमधील नाजूक नात्याची वीण घट्ट करणारी ही भाऊबीज घराघरात उत्साहात झाली. कुणी घरी बनविलेल्या पंचपक्वान्नावर ताव मारला, तर कुणी हॉटेलमध्ये सहकुटुंब जाऊन पारंपरिक थाळीवर ताव मारला. बहि‍णी मात्र स्नेहभोजनाऐवजी ओवाळणीत मिळालेल्या भेटवस्तूंवरच खूश होत्या.

दिवाळीतील प्रमुख तीन दिवसांच्या आनंदोत्सवाचा समारोप यमद्वितीया अर्थात भाऊबी‍जेने मंगळवारी झाला. या वर्षीदेखील स्मार्टफोनसह दागिने आणि चॉकलेटच्या असंख्य प्रकारांना ओवाळणीसाठी सर्वाधिक पसंती मिळाली. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहि‍णीचा सत्कार करतात, अशी आख्यायिका आहे. दिवाळीत बहि‍णीने भावाला जेवायला बोलावून ओवाळावे, अशी प्रथा आहे.

भाऊबी‍जेनिमित्त मंगळवारी घरोघरी फराळाव्यतिरिक्त पंचपक्वान्नाचे बेत ठरले होते. सरकारी कार्यालयांबरोबरच बहुतांश खासगी कंपन्यांना सुट्टी असल्याने पारंपरिक वेषभूषा करून भावांनी दुपारी बहिणीच्या घरी जेवणाला हजेरी लावली. अनेकांनी फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला म्हणून हॉटेल, डायनिंग हॉलकडे मोर्चा वळविला. त्यामुळे दुपारी हॉटेलमध्ये सहकुटुंब आलेल्या ग्राहकांची रेलचेल बघायला मिळाली. ओवाळणीसाठी या वर्षी चॉकलेट, कुकीज, मिठाई, मोबाइल, टॅब, साडी, ड्रेस, दागिने, पुस्तके यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

पाडवा उत्साहात साजरा

दानशूर बळीराजाची पूजा करून पुणेकरांनी सोमवारी दिवाळी पाडवा उत्साहात साजरा केला. नागरिकांनी संध्याकाळी पाटावर तांदळाची बळीची प्रतिमा काढून त्याचे पूजन केले. पाडव्यानिमित्त शहराच्या विविध भागात, मंदिरांमध्ये पहाटेचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांनी अभ्यंगस्नान करून सूर्योदयापूर्वीच कार्यक्रमांना हजेरी लावली, तर मोठ्या संख्येने नागरिक सारसेबागेसह शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी गेले होते. दुपारी मात्र शहरातील रस्ते शांत होते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे, म्हणजे दोघांचेही आयुष्य वाढते, अशा आख्यायिकेमुळे घराघरात संध्याकाळी ओवाळणीचा कार्यक्रम झाला. ओवाळणीच्या खरेदीसाठी सायंकाळी बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीला रंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीच्या चैतन्यमयी वातावरणात राजकीय प्रचाराच्या रंगाबरोबरच साहित्य संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीलाही रंग चढला आहे. दिवाळीचे निमित्त साधून उमेदवारांनी शुभेच्छापत्रे, एसएमएसद्वारे आणि फराळाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटीगाठीतून प्रचाराचा कार्यक्रम सध्या आखला आहे.

दिवाळीचे वातावरण असल्याने मतदारांनाही मोकळा वेळ मिळतो. ते निमित्त साधून उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठी आणि शुभेच्छापत्रांचे प्रमाण वाढवले आहे. या शर्यतीतील आघाडीचे उमेदवार अक्षयकुमार काळे मात्र याला अपवाद ठरले आहेत. निवडणुकीचा प्रचार हा प्रचार असतो, त्यासाठी भावनिक आव्हाने कशाला करायची, असे त्यांचे मत आहे. ज्या उद्दिष्टांसाठी अध्यक्षपदाचा अर्ज भरला आहे. त्या दृष्टीने प्रचार सुरू आहे. त्यासाठी दिवाळीचे वेगळे असे निमित्त साधण्याची गरज नाही, अशी भूमिका काळे यांनी घेतली आहे. दुसरे आघाडीचे उमेदवार प्रवीण दवणे यांनी भेटीगाठींचे सत्र चालवले आहे. शक्य तितक्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. दिवाळीनिमित्त त्यांनीदेखील शुभेच्छांचे संदेश मतदारांपर्यंत पोहोचवले आहेत. मदन कुळकर्णी आणि घुमटकर यांनीही प्रचाराला जोर लावला आहे. प्रत्येक मतदाराला प्रत्यक्ष जाऊन भेटता येत नसले, तरी पत्रांच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. काही उमेदवारांनी दौऱ्यांचे वेळापत्रक तयार केले असून त्याप्रमाणे भेटीगाठी सुरू आहेत.

संमेलनाध्यक्षांच्या मतदान प्रक्रियेला आता कमी कालावधी उरला असल्याने कमी वेळात शक्य तितक्या जास्त मतदारांपर्यंत कोणत्याही प्रकारे पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे. मतदारांकडूनही उमेदवारांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहेत. उमेदवारांना पाठवलेल्या पत्रांना मतदारांची उस्फूर्त अशी शुभेच्छांची पत्रे मिळत आहेत. काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा जाहीर करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीलाही चुरशीचा रंग प्राप्त झाला आहे.


निवडणुकीचा प्रचार हा कोणताही सण किंवा निमित्त पुढे ठेवून केला जात नाही. मतदारांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया आहे. ती पूर्ण केलीच पाहिजे. त्यासाठी निमित्त कशाला हवे? मतदारांना कुठल्याही प्रकारचे भावनिक आवाहन न करता त्यांना माझ्या संमेलनाध्यक्षपदाच्या उद्दिष्टांबद्दल सांगितले आहे. महाराष्ट्रातील मतदार बुद्धिवंत आहेत. संमेलनाध्यक्षपदी साहित्य व्यवहाराबद्दल गंभीर विचार असणाऱ्या उमेदवाराची ते निश्चितपणे निवड करतील. राज्यातील प्रतिथयश साहित्यिकांनी पाठिंबा दिला असल्याने उत्साह द्विगुणित झाला आहे.

अक्षयकुमार काळे

दिवाळी चैतन्यदायी उत्साह घेऊन आली आहे. त्याच उत्साहात प्रचाराचे काम सुरू आहे. ज्येष्ठांना भेटून त्यांच्याकडून आशीर्वाद घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. मतदार स्वतःहून प्रचाराची जबाबदारी स्वीकारत आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. दिवाळीनिमित्त साहित्यिकांचे प्रेम असलेला फराळ खायला मिळत आहे.

प्रवीण दवणे

अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी आवाहन करणारी पत्रे मतदारांपर्यंत जावीत, या हेतूने काम सुरू आहे. त्याची पहिली फेरी पूर्ण झाली असून मतदारांकडून शुभेच्छा आणि पाठिंबा प्राप्त होत आहे. सर्वांपर्यंत प्रत्यक्ष जाणे शक्य नाही. तरी, साहित्य व्यवहारातील कार्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचलो असल्याची खात्री वाटते, महाराष्ट्राबाहेरूनही चांगला पाठिंबा मिळत आहे.

मदन कुळकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायसन्सच्या परीक्षेत पुरुष अधिक नापास

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाहन चालविण्याऱ्या ‘लर्निंग लायसन्स’साठी या वर्षभरात परीक्षा दिलेल्या एकूण अर्जदारांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे नापास होण्याचे प्रमाण दुप्पट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार एक जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल तीन हजार २६२ अर्जदार लर्निंग लायसन्सच्या परीक्षेत नापास झाले. त्यामध्ये दोन हजार १८२ पुरुषांचा आणि एक हजार ८० महिलांचा समावेश आहे.

वाहन चालविण्याचे लर्निंग लायसन्स देताना, संबंधितांना वाहतुकीच्या नियमांची किमान माहिती असणे अपेक्षित असते. त्यासाठी आरटीओकडून परीक्षा घेतली जाते. सिग्नलवर कोणत्या रंगाचा दिवा लागल्यावर थांबावे, कोणत्या रंगाचा दिवा लागल्यावर गाडी पुढे न्यावी, झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह कोणते, एकेरी वाहतूक, नो एंट्री, जड वाहनांना प्रवेश बंद अशा प्रकारच्या चिन्हांची माहिती प्रश्न स्वरूपात विचारली जाते. या प्रश्नांचीही उत्तरे अनेकांना माहिती नसल्याचे समोर आले.

एक जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०१६ या दहा महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्याला नापासांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येते. या दहा महिन्यांमध्ये ६० हजार ७०१ अर्जदारांनी दुचाकी व चार चाकीसाठी लर्निंग लायसन्सची परीक्षा दिली. यामध्ये ४० हजार १०४ पुरुष उमेदवारांचा आणि २० हजार ५९७ महिला उमेदवारांचा समावेश होता. पुरुष अर्जदारांपैकी दोन हजार १८२ आणि महिलांपैकी एक हजार ८० महिला या परीक्षेत नापास झाल्या. त्यांना वाहतुकीच्या नियमांची पुरेशी माहिती नसल्याचे दिसून आले. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये एकूण सहा हजार २४४ अर्जदारांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी १४७ जण नापास झाले. तर, ऑक्टोबर महिन्यात पाच हजार २९५ जणांनी ही परिक्षा दिली. त्यापैकी ४२५ जण नापास झाले.

परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नासंबंधी सर्व माहिती आरटीओच्या परीक्षा हॉलबाहेर लावलेली आहे. तसेच, आरटीओच्या वेबसाइटवरही ती सर्व माहिती उपलब्ध आहे. मात्र, अनेक जण वाहतुकीच्या नियमांची माहिती न घेता परीक्षेला सामोरे जातात. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे, असे आरटीओ अधिकाऱ्यांचे मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images