Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे: हजारो शेतकऱ्यांची जमीन विमानतळामुळे अडकलेली

$
0
0

अनुराग बेंडे / मनोज बिडकर : पुणे

येथील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना २००७ च्या भू-संपादनाच्या नियमामुळे नापिक जमिनीवर शेती करावी लागत आहे. २००७ चा हा अधिनियम सरकार रद्द करून जमिनीला 'एनए' परवानगी देत नाही तोपर्यंत या शेतकऱ्यांना या जमिनीची मोबदला मिळणार नाही, त्यावर वेगळं काही करताही येणार नाही.

दहा वर्षांपूर्वी खेड तालुक्यातल्या चांदुस गावात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव होता. इथले हजारो शेतकरी त्यांच्या जमिनीची चांगली नुकसानभरपाई मिळेल या आशेने स्वप्नं पाहू लागले. नंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. खेडऐवजी विमानतळासाठी पुरंदर गाव नक्की झालं. खेडच्या शेतकऱ्यांचे स्वप्न यामुळे भंगलं. पैसे तर हाती लागले नाहीच, पण जमीन व्यापारी तत्त्वावर वापरता येणार नाही असा २००७ मधला नियम त्यांच्यावर थोपवल्याने त्यांना शेतात येतं त्या किडुकमिडुक पिकात समाधान मानावं लागत आहे.

संतोष कढे म्हणतो, 'शेती हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. पण आता मला त्यातून बाहेर पडायचे आहे. पण जोपर्यंत जमिनीला 'एनए' (नॉन अॅग्रीकल्चर कमर्शिअल) दर्जा मिळत नाही तोपर्यंत मला यात काहीच करता येणार नाही.' संतोषची १६ एकर जमीन आहे. संतोषसारखेच चांदुस, किवले, कोरेगाव बुद्रुक, भाम या गावांमधले हजारो शेतकरी याच विवंचनेत आहेत. सरकारी गॅझेटमध्ये या गावांच्या नावांचा उल्लेख असल्याने मालकांवर त्यांच्या जमिनी विकण्याच्या किंवा तिथे काही व्यवसाय सुरू करण्याच्या मर्यादा आल्या आहेत.

संतोषप्रमाणेच कोरेगावमधल्या दत्तात्रय डावरे यांना आपल्या जमिनीवर पेट्रोल पंप उभारायचा होता. २०१० पासून परवानगीसाठी ते सरकार दरबारी खेटे घालत आहेत. पुणे मिररशी बोलताना डावरे यांनी आपली व्यथा मांडली, ' माझी अनेक हेक्टर्स जमीन आहे. त्यापैकी फक्त १२.५ एकर एअरपोर्टसाठी जाणार होती. त्याचे चांगले पैसे मिळतील असे मला वाटले होते. त्यातून मला एक एकराच्या जागेत पेट्रोल पंप सुरू करायचा होता. वेगवेगळ्या परवानग्यांसाठी मी पाच लाख रुपये गुंतवले होते. पण 'एनए' न मिळाल्यामुळे मी कोणतेच बांधकाम करू शकत नाही.' डावरे यांच्या जमिनीचा मोठा भाग सिंचनाखाली असल्याने ते उस, सोयाबीन, कांदा यासारखी पिके घेऊन चांगल्यापैकी उत्पन्न मिळवतात. पण ज्यांच्याकडे जास्त जमीन नाही, त्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आला आहे.

याबाबत 'मिरर' ने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, 'राज्य सरकारने जरी पुरंदर गावी नव्या विमानतळाचा प्रस्ताव तयार केला असला तरी त्याला अद्याप अंतिम स्वरुप आलेले नाही. अजून काही सर्वेक्षणं व्हायची बाकी आहेत. एकदा या प्रस्तावाला अंतिम स्वरुप आले की अन्य गावांच्या जमिनीसंदर्भातले गॅझेट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शिक्षणमंत्री तावडेंच्या केवळ लोकप्रिय घोषणा’

$
0
0

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची टीका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे केवळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करतात. कृती मात्र शून्यच असते,’ असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी येथे केला.

संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी सुनील गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कोते-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, प्रवक्ते फजल शेख, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, आनंदा यादव या वेळी उपस्थित होते.

कोते-पाटील म्हणाले, ‘आॅनलाइन प्रवेश, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, विद्यापीठ उपकेंद्र सुरू करणे, स्पर्धा परिक्षांसाठी भरती प्रक्रियेला विलंब याबाबतीत राज्य सरकार केवळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करीत आहेत. प्रत्यक्षात कृती करीत नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्ग नाराज आहे. मराठा मोर्चाचा रेटा पाहून काही अटींवर ‘ईबीसी’ सवलतीचा निर्णय घेतला. परंतु, त्याचे श्रेय सरकारने घेण्याचा प्रयत्न करू नये. यासंदर्भात आमच्या संघटनेचीही मागणी होती.’

‘नवीन विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून राज्य सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लादू पाहत आहे,’ असा आरोप करून कोते-पाटील म्हणाले, ‘या कायद्याच्या माध्यमातून धर्मशिक्षण, कुलगुरुंना अमर्याद अधिकार, असे प्रयत्न होत आहेत. त्यासंदर्भात चर्चेचा केवळ फार्स केला. परंतु, ठराविक विचारसरणी लादण्याचा प्रयत्न होतो आहे. ही बाब योग्य नाही.’ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे दहा लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही कोते-पाटील यांनी स्पष्ट केले.

‘जाणाऱ्यांनी जावे’

‘राष्ट्रवादी काँग्रेसमधून काहीजण बाहेर पडून अन्य पक्षात प्रवेश करीत आहेत. तीन-चार नगरसेवक पक्षाच्या बैठकीलाही उपस्थित राहत नाहीत. त्यांनी अन्य पक्षात जावे. ‘जातील ते कावळे, राहतील ते मावळे’ कोणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान होणार नाही. आगामी निवडणुकीत आम्ही शंभरपेक्षा अधिक जागा जिंकून एकहाती सत्तेची हॅटट्रिक करू,’ असा दावा पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मारुती’ शोरूमच्या खोल्यांमध्ये आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
मारुती कारची विक्री करणाऱ्या ‘माय कार’ या शोरूमच्या तिसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांना शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी आग लागली. पुणे-बेंगळुरू रस्त्यावरील वाकड येथे दुपारी ही घटना घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीशी संबंधित कागदपत्रे या खोलीत ठेवण्यात आली होती. दुपारी या खोल्यांना आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे. धूर येऊ लागल्यानंतर येथे आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

अग्निशमन विभागाला आणि पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाने काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, महत्त्वाची कागदपत्रे जळल्याचे समजते. ऐन दिवाळीमध्ये ही घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला होता. शोरूममध्ये कर्मचारी आणि खरेदीला आलेल्यांची गर्दी होती. त्यातच ही घटना घडल्याने काही वेळ सर्वांचीच पळापळ झाली. परंतु, शोरूममध्ये असलेल्या प्राथमिक आग रोधक यंत्रणांमुळे ही आग अन्यत्र पसरली नाही. तसेच कर्मचाऱ्यांनी खबरदारी दाखवत सर्वांना शोरूममधून बाहेर काढले होते. अग्निशमन विभागाने काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांचे तळ्यात अन् मळ्यात

$
0
0

पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग पाचमध्ये बदलती राजकीय समीकरणे

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भोसरीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये अनेक इच्छुकांचे सध्या तळ्यात-मळ्यात सुरू आहे. शिवाय बदलत्या राजकीय समीकरणावरही येथील लढतीचे चित्र अवलंबून आहे.

बहुतांश कामगार वस्ती असलेल्या या प्रभागातील मतदारांनी राजकीय पक्षांना नेहमी आलटून पालटून संधी दिली आहे. कधी भारतीय जनता पक्षाने, कधी काँग्रेसने, तर गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. शिवाय अपक्षांनाही झुकते माप दिले आहे. त्यामुळे हा प्रभाग कोणाचा बालेकिल्ला म्हणता येणार नाही. हवेलीचे तत्कालिन आमदार ज्ञानेश्वर लांडगे, गजानन बाबर किंवा विलास लांडे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला असला, तरी विरोधक बाजीराव लांडे, राजन नायर, प्रा. रामकृष्ण मोरे यांनाही मोठ्या संख्येने मतदान केले आहे. भोसरीत भारतीय जनता पक्षाचे अंकुश लांडगे यांचे नेतृत्त्व उदयाला आल्यानंतर त्यांनाही मतदारांनी भक्कम साथ दिली आहे. या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचा ठोस शिक्का बसलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीतील चित्रही सद्यःस्थितीत अस्पष्ट आहे.

भोसरीत सध्या भारतीय जनता पक्षाचे सहयोगी आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांच्यात सत्तासंघर्ष आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून येईलच. लांडे आमदार असताना त्यांच्या पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या पॅनेलने येथून एकतर्फी विजय नोंदविला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत लोंढे, अनुराधा गोफणे, सुनीता गवळी यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. काँग्रेसचे जालिंदर शिंदे यांनीही विजय नोंदवित पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले. आता लांडगे यांच्या भाजपमधील प्रवेशाने तरुण कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. लांडगे पाठिशी राहिल्यास विजय सुकर होईल, या शक्यतेने तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागला आहे. तर, लांडे यांचे कट्टर समर्थक गव्हाणे यांनीही शह देण्याचा कसोशीने प्रयत्न चालविला आहे. विद्यमान नगरसेवक लोंढे, शिंदे, गोफणे, गवळी यांच्याबाबतीत कोणत्या पक्षातून निवडणूक लढवावी, याबाबत संभ्रमावस्था आहे. हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. परंतु, तूर्तास प्रभागात अनेक इच्छुकांनी मतदार संपर्क मोहिमेवर भर देऊन आपणही रिंगणात असल्याचा विद्यमानांना इशारा दिला आहे.

रेडझोन, रस्ते, भुयारी गटार योजना, वीज हे प्रभागातील प्रमुख प्रश्न आहेत. संरक्षण विभागाच्या प्रतिबंधामुळे विकास रखडला आहे. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जिव्हाळ्याचा बनला आहे. त्याबाबत पूर्वी अनेक पक्षांनी केवळ आश्वासने दिली आहेत. ती पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्यादृष्टीने हा कळीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्य गणिताविषयी फेरविचार सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे सामान्य गणित ठेवायचे की बंद करायचे, याचा शिक्षण खात्यामध्ये गांभीर्याने विचार आहे. सामान्य गणिताचा पर्याय असतानाही बहुसंख्य विद्यार्थी नियमित गणिताकडेच वळत असल्याने हा विचार सुरू झाला आहे. राज्य बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी या विषयी अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले.
राज्याच्या शिक्षण खात्याने एका ऑनलाइन प्रश्नावलीच्या माध्यमातून काही मुद्द्यांबाबत शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून माहिती भरून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सामान्य गणिताविषयीची मते विचारात घेतली जात आहेत. अशी माहिती भरणाऱ्या बहुतांश प्रतिनिधींनी सामान्य गणित आणि नियमित गणित हे दोन विषय ठेवण्याऐवजी गणित हा केवळ एकच विषय असावा, अशी सूचना केली आहे. शिक्षण खात्यानेही त्या अनुषंगाने इतर पर्यायांची चाचपणी आता सुरू केली आहे.
या विषयी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना विचारले असता, सामान्य गणिताबाबत फेरविचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. म्हमाणे म्हणाले, ‘सध्या इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीची प्रक्रिया बालभारतीमध्ये सुरू आहे. गणितासाठी म्हणून सध्या एकच अभ्यासमंडळ नेमण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठीही हा मुद्दा विचारात घेण्यात आला आहे. सामान्य गणित असावे की नसावे, याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.’ या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गणितामध्ये गती मिळावी यासाठी काय करता येईल, गणिताच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये काही बदल करावा लागेल का, याचाही विचार तज्ज्ञांच्या पातळीवर सुरू असल्याचेही याच निमित्ताने समोर येत आहे.

गणित आणि सामान्य गणित...
राज्यात २००८ सालापासून विद्यार्थ्यांना नियमित गणितापेक्षा तुलनेने सोपे असणारा सामान्य गणित हा विषय एक पर्याय म्हणून उपलब्ध झाला. हा विषय घेऊन बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर किंवा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे शक्य नसल्याने, या पर्यायाला तसा मर्यादित प्रतिसाद मिळाला. यंदा बोर्डाची परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास एक लाख विद्यार्थी सामान्य गणित हा विषय घेतला होता. त्याचवेळी जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांनी नियमित गणितासह दहावीची परीक्षा दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्करोगाच्या अचूक निदानासाठी प्रणाली

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्करोगाचे अचूक आणि अल्पावधीत निदान करणारी ऑप्ट्रा स्कॅन ही प्रणाली ऑप्ट्रा ग्रुप या कंपनीने विकसित केली आहे. यामुळे जागतिक स्तरावर कर्करोगाविरुद्धच्या लढाईला एक नवी दिशा मिळणार आहे. मूळचे पुण्याचे असलेले अभिजित घोलप हे या प्रणाली आणि मशिनचे निर्माते आहेत.
सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या घोलप जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधक आहेत. ऑप्ट्रा स्कॅन प्रणालीसाठी त्यांनी सतरा पेटंट मिळविले आहेत. सध्या पुण्यातच या प्रणालीची निर्मिती होत आहे. नेहमीच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये हे उपकरण बसवले, की रुग्णांच्या पेशींमध्ये कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला आहे का, याची माहिती तत्काळ मिळणार आहे. सूक्ष्मदर्शकाने पेशींच्या स्लाइड पाहण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा हे निदान अधिक जलद गतीने होणार असल्याचे घोलप यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘टेली पॅथॉलॉजी प्रकारातील हे संशोधन असून, यातून कर्करोगाचे अचूक निदान करता येईल. हे मशिन स्लाइडवरील पेशी स्कॅन करून त्याच्या मोठ्या प्रतिमा तयार करण्याचे काम करते. यातून पीडीएफ फाइलदेखील तयार होते. पेशींची प्रतिमा वीस पट जास्त करून पाहता येते. यामुळे सूक्ष्मदर्शकांची गरज भासत नाही; तसेच यातील सॉफ्टवेअर कर्करोगाच्या पेशी आणि इतर पेशींपेक्षा वेगळ्या ओळखून दाखवते.’
‘ऑप्ट्रा स्कॅनने केंद्र सरकारकडून ही निदानप्रणाली ग्रामीण भागात सर्व दूर पोहोचण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्रीयल पार्टरनशीप या योजनेअंतर्गत अल्पदरात देण्याच्या कामात ऑप्ट्रा स्कॅनचा सहभाग आहे,’ असे घोलप यांनी सांगितलेय

विकसनशील देशांना उपयोग
‘भारताबरोबरच चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेसारख्या विकसशील देशांना या तंत्रांचा उपयोग होणार आहे. अमेरिकेतील कॅन्सर मूनशूट २०२० अभियानातील प्रणेते पॅट्रिक सून-शिआँग यांनीही या प्रणालीमध्ये रस दाखविला असून, अधिक संशोधन, विस्ताराला ३५ कोटी रुपयांची मदत देण्याची तयारी दर्शविली आहे,’ असे घोलप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवीच्या विरोधात कवींची आघाडी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्ष लढत समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे व कवी प्रवीण दवणे यांच्यात मानली जात आहे. त्याचवेळी अनेक कवींनी कवीच्या विरोधात आघाडी उघडत डॉ. काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. समीक्षकांचाही पाठिंबा मिळाल्याने संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. काळे यांचे पारडे जड मानले जात आहे.
९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. काळे, दवणे यांच्यासह मदन कुळकर्णी व डॉ. जयप्रकाश घुमटकर हे उमेदवार रिंगणात आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीने वेग पकडल्याने निवडणूक रंगात येऊ लागली आहे. पाठिंबा देणे, विरोधात आघाडी उघडणे, असे शाह-काटशाहचे राजकारण साहित्य वर्तुळात रंगू लागले आहे. काळे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळू लागल्याने अध्यक्ष म्हणून त्यांचेच नाव पुढे केले जात आहे.
‘डॉ. अक्षयकुमार काळे यांनी कवितेच्या क्षेत्रात केलेले काम पाहता आम्ही कवी त्यांना पाठिंबा देत आहोत. ग्रेसपासून गालिबपर्यंत मर्ढेकरांपासून सुरेश भट यांच्यापर्यंत त्यांनी कवितेच्या समीक्षेने उघडलेली दालने मराठीसाठी फारच उपयुक्त आहे. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीतही त्यांनी उत्तम कामगिरी केली असून, मराठी भाषेचा सर्व बाजूंना अनेकांगांनी विचार केला आहे. यामुळे असा कवितेचा समीक्षक अध्यक्ष म्हणून निवडला पाहिजे, असे आमचे मत आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत,’ असे पत्र टीम फुटाणे यांच्यातर्फे काढण्यात आले असून, त्यावर ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाणे, कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, अनिल कांबळे व प्रदीप निफाडकर यांच्या स्वाक्षरी आहेत. डॉ. अक्षयकुमार काळे मित्र परिवारातर्फे काढण्यात आलेल्या पत्रात सुमारे शंभर आघाडीच्या लेखक, कवींची नावे आहेत. असा थेट पाठिंबा दवणे यांना अद्याप तरी मिळालेला नाही.

शंभरपेक्षा अधिक लेखक, कवी काळेंच्या पाठीशी
‘चार दशकांपासून मराठी काव्याच्या चिकित्सक मीमांसेचा ध्यास घेतलेले एक समर्पित व्यक्तिमत्व म्हणून डॉ. अक्षयकुमार काळे सुपरिचित आहेत. त्यांच्या विविध टीकाग्रंथामुळे मराठी काव्यसमीक्षेत मोलाची भर पडली आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असणारे डॉ. काळे यांनी वाङ्मयीन, सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. नियोजित संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ते अगदी योग्य उमेदवार आहेत, असे आम्हाला वाटते. आम्ही त्यांच्या उमेदवारीस आमचा पाठिंबा जाहीर करीत आहोत,’ असे पत्र डॉ. अक्षयकुमार काळे मित्र परिवारातर्फे काढण्यात आले आहे. यामध्ये ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके, तारा भवाळकर, विठ्ठल वाघ, फ. मुं. शिंदे, भीमराव पांचाळे, राजन गवस, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, नीरजा, डॉ. अश्विनी धोंगडे यांच्यासह सुमारे शंभर साहित्यिकांचे पाठिंब्यासाठी नाव देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘खाद्यरंगाचे प्रमाण मानदाप्रमाणेच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोणीकंद येथील विकफिल्ड्स फुड्स कंपनीत अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईप्रकरणी कंपनीने आक्षेप नोंदवला आहे. कंपनीच्या कस्टर्ड पावडरमध्ये असलेले सिंथेटीक खाद्यरंगाचे प्रमाण हे कायद्यातील तरतुदीनुसारच असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अन्न व औषध विभागाने कंपनीमध्ये छापा घालत कस्टर्ड पावडरचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीने अन्न व औषध विभागाकडे आपला खुलासा नोंदवला आहे. कस्टर्ड पावडरचे थेट सेवन केले जात नाही. त्यामध्ये साखर, दूध मिसळून त्याचे ‘पु​डिंग’ केले जाते आणि ते ‘कस्टर्ड पु​डिंग’ खाल्ले जाते. ‘कस्टर्ड पुडिंग’मध्ये असलेले सिंथेटीक खाद्यरंगाचे प्रमाण हे कायद्यानुसारच आहे, असा दावा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी मल्होत्रा यांनी केला आहे. कंपनीकडून कायद्याने प्रमाणित केलेल्याच खाद्यरंगांचा वापर केला जात असून त्याचे प्रमाणही मानदाप्रमाणेच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अन्न व औषध प्रशासानाने कंपनीच्या कारखान्यातून कस्टर्ड पावडरचे नमुन्यांची तपासणी केली होती. त्यांच्या चौकशीत सिंथेटीक खाद्यरंगाचे प्रमाण मानदापेक्षा अधिक आढळल्यानंतर कारवाई करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नादुरुस्त रोहित्र २४ तासांत बदलणार

$
0
0

नादुरुस्त रोहित्र २४ तासांत बदलणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नादुरुस्त झालेले रोहित्र शहरी भागात २४ तासांत, तर ग्रामीण भागात ४८ तासांत बदलून द्यावेत; तसेच नादुरुस्त रोहित्रामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त रोहित्र तयार ठेवावीत, असे आदेश ‘महावितरण’चे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांचा विद्युत विषयक कामांचा आढावा ताकसांडे यांनी घेतला. त्यामध्ये त्यांनी पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलातील अभियंता आणि अधिकाऱ्यांना हे आदेश दिले. नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती करून ते अतिरिक्त स्वरूपात प्रत्येक परिमंडलात ठेवण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
‘नादुरुस्त झालेले रोहित्र बदलण्यासाठी किंवा रोहित्रातील बिघाड दुरुस्तीसाठी वर्ग एक असलेल्या शहरात १८ तास, शहरी भागात २४ तास व ग्रामीण भागात ४८ तासांत कार्यवाही करण्यात यावी. नवीन रोहित्र नेण्यासाठी वाहनांची सोय महावितरणकडून उपलब्ध करून द्यावी’, असे ताकसांडे म्हणाले.
‘रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक असलेल्या भागात वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात. यापुढे अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामासंबंधी मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यानुसार कार्यवाही होणार आहे,’ असे ताकसांडे यांनी स्पष्ट केले.
नादुरुस्त झालेले रोहित्र बदलून देण्यास अधिक कालावधी लागल्यास तक्रारीसाठी नागरिकांना २४ तास सुरू असलेले ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००२००३४३५ अथवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत.

टाळाटाळ केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
दिवाळीच्या कालावधीत वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अभियंता, कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे आणि मुख्यालय सोडू नये, असे निर्देश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यास हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​बिल्डर दमदाटीप्रकरणी दोषींवर कारवाई करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लहुराज माळी यांना करण्यात आलेल्या दमदाटीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला जाईल. आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना केल्या जाणाऱ्या दमदाटीचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल,’ असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
एसआरएचे अध्यक्ष माळी यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन शहरातील एका प्रतिष्ठित आर्किटेक्टने दमदाटी केली होती, तसेच शहरातील नामंकित बिल्डरने देखील फोन करून त्यांना दम दिला होता. यामुळे माळी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गुरुवारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सरकारी कार्यालयात अशा प्रकारे बिल्डर आणि आर्किटेक्टकडून दमबाजीचा प्रकार घडल्याने एसआरए कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारनंतर काम बंद केले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बापट यांनी शुक्रवारी सकाळी एसआरए कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एसआरएचे अध्यक्ष माळी यांच्याशी चर्चा करून हा प्रकार नक्की कशामुळे घडला याची माहिती बापट यांनी घेऊन अशी दमदाटी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
‘सरकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने दमदाटी करणे हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. या घटनेची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला जाईल, याचा अहवाल मागविण्यात आला असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर हा प्रकार गेला आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई केली जाईल,’ असे पालकमंत्री बापट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सरकारी अधिकाऱ्यांना दम देणाऱ्या व्यक्ती‌ कोणत्याही राजकीय पक्षांशी संबधित असली तरी त्यावर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘विनाकारण फाइल थांबवू नये’
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी आलेल्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेऊन गतीने कामे करावीत, अशा सूचनाही पालकमंत्री बापट यांनी अधिकाऱ्यांना केल्या. नियमानुसार फाइल मान्य होत असेल तर विनाकारण त्यामध्ये त्रुटी न करता त्याला मंजुरी द्यावी. जे प्रस्ताव मान्य होणार नाहीत, त्यावर निर्णय घ्यावा. विनाकारण महिनोमहिने फाइल थांबवू नये, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​विधान परिषदेसाठी भाजपकडून येनपुरे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विधान परिषदेच्या पुणे मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. आतापर्यंत तीन जणांनी अर्ज घेतले असून, त्यामध्ये भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे यांचा समावेश असल्याने भाजपकडून येनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधान परिषदेचे सदस्य अनिल भोसले यांचा कार्यकाल संपल्याने या जागेसाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत तीन इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज नेले आहेत. त्यामध्ये येनपुरे, खेडचे अप्पासाहेब कड यांच्यासह तिघांचा समावेश आहे.

‘नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी दोन नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. एक नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी असली, तरी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत,’ असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असली, तरी एकाही राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती; तसेच नगरपालिका आणि तिन्ही कँटोन्मेंटचे सदस्य असे ७०२ मतदार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दोन नोव्हेंबर आहे. पाच नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार असून, त्यासाठी सात मतदान केंद्रे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​एसआरएची मार्गदर्शक सहाय्य समिती रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी स्थापन करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला (एसआरए) मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली ‘सहाय्य समिती’ रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणापाठोपाठ (पीएमआरडीए) ही समितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.
एसआरएची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात त्याची नियमावली निश्चित होईपर्यंत विविध गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ही समिती जानेवारी २००६ मध्ये नेमण्यात आली होती. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीमध्ये दोन्ही शहरांतील आमदार, महापालिकांचे आयुक्त आणि इतर पदाधिकारी-अधिकाऱ्यांचा समावेश होता. एसआरएच्या स्थापनेनंतर गेल्या दहा वर्षांत त्याची नियमावली निश्चित झाली. तसेच, त्यानुसार स्वतंत्रपणे एसआरएचे कामकाज सुरू झाल्याने या समितीची पूर्वीप्रमाणे गरज राहिली नसल्याचे सरकारचे मत झाले होते. त्यामुळे ही समिती रद्द करण्याचे आदेश शुक्रवारी गृहनिर्माण विभागाने काढले आहेत.
ही समिती रद्द करण्याचा निर्णय प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने घेण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी धक्का दिल्याची चर्चा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एसआरए अंतर्गत सुरू असलेल्या योजनांचे काम संथगतीने सुरू असल्याची नाराजी वेळोवेळी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे बापट यांच्या नेतृत्वाखालील ही समिती रद्द केली गेल्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने पीएमआरडीएची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला त्याचे अध्यक्षपद पालकमंत्री बापट यांच्याकडेच होते.परंतु, त्यानंतर फडणवीस यांनी पीएमआरडीएचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैतन्यमयी दिवाळी आली दारी...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तिमिराचा नाश करणारं, जगण्याचं अवघं अवकाश तेजाळून टाकणारं, कलागुणांना प्रोत्साहन देणारं, रसनेला तृप्त करणारं आणि आनंदरंगाच्या उधळणीनं तना-मनाला चैतन्य आणणारं दिवाळीचं उत्साहपर्व अखेर सुरू झालंय. दारोदारी उजळणाऱ्या ज्योती, डौलानं लहरणारे आकाशकंदील, आकाशातली आतषबाजी, उटणं आणि तेलाचा घरभर दरवळत असलेला सुगंध, जीवनाचे सगळे रंग दाखवणारी रांगोळी अन् चविष्ट फराळाची भरलेली ताटे हा सगळा माहौल एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. दिवाळी दर वर्षी येते; पण दर वेळी वेगळा आनंद आणि नवी ऊर्मी घेऊन येते.

वाईटाचं प्राबल्य कितीही असलं, तरी अंतिम विजय चांगल्याचाच होतो, हे सत्य सांगणारा आजचा नरक चतुर्दशीचा दिवस. आजच्या जगात वेगवेगळ्या रूपातले असुर आणि संकटं सातत्यानं आपल्या अवतीभवती वावरत असतात. अशा वेळी या दिवसाचा संदेश जगण्याच्या धडपडीला भक्कम आधार देतो. वर्षभर धडपड करून कष्टानं कमावलेल्या लक्ष्मीचं पूजन करताना मनात दाटून येते ती कृतार्थतेची भावना. पती-पत्नीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा पाडवा नि भावा-बहिणीच्या भावबंधनाला बळकट करणारी भाऊबीज, असे सगळेच दिवस या धावपळीच्या युगातही कुटुंबाला एकत्र आणतात अन् मनाचे कोपरे लखलखीत करून टाकतात.

शतकानुशतकं झाली, ही दिवाळी अशीच सुरू आहे... रोजच्या जगण्यात माणसाला काय लागतं? आपल्या माणसांबरोबर आनंदाचे चार क्षण घालवले, की मनाला अशी उभारी येते, की पुढचे कित्येक दिवस माणूस त्या मायेच्या ऊर्जेवर जगू शकतो. हेच तर दिवाळी करत असते, करत आलीय. गेली अनेक वर्षे, गेल्या अनेक पिढ्या दिवाळी साजरी करत आल्यात. कालौघात तिचं स्वरूप बदललं असेल, कदाचित साधेपणाची जागा छानछोकीनं घेतली असेल, पण दिवाळीतून मिळणारी ऊर्जा मात्र तशीच कायम आहे... मग ते टोलेजंग इमारतीतलं झगमगीत तोरण असो किंवा छोट्याशा झोपडीच्या दारात मंद तेवणारी पणती असो... दिवाळी ही दिवाळीच असते!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​स्वबळाची विमाने जमिनीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
परस्परांवर चिखलफेकीचा अध्याय थांबवून नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत युतीची घोषणा झाली आहे. त्याचा पुढील टप्पा म्हणून महापालिकांच्या निवडणुकीतही युती होण्याची शक्यता दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ गोटातून वर्तविण्यात आली असून युतीसाठी काही फॉर्म्युलेही चर्चेत येऊ लागले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीत युती तुटल्यानंतर राज्य सरकारमध्ये एकत्र असले, तरी भाजप आणि शिवसेनेतून गेल्या काही काळात विस्तव जात नव्हता. कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या महापालिकाही दोन्ही पक्षांनी स्वबळावरच लढल्या होत्या. आता येत्या फेब्रुवारीत पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील दहा प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकाही स्वबळावर लढविण्याची भाषा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सुरू झाली होती. त्यापाठोपाठ या नेत्यांकडून परस्परांवर आरोपांची चिखलफेकही सुरू झाली, त्यामुळे युती होणार नाही, असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र, हे सर्व बाजूला ठेवून नगरपालिकांच्या निवडणुकीत युतीची घोषणा करण्यात आली असून याचाच पुढील अध्याय महापालिकांच्या निवडणुकीतही युती होण्याचे संकेत दोन्ही पक्षांचे नेते देऊ लागले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही युती होणार, अशी चिन्हे आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपापल्या ताकदीचा अंदाज घेण्यात आला, तेव्हा स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी अनेक प्रभागांमध्ये खात्रीलायक विजय मिळवून देणाऱ्या सक्षम उमेदवारांची संख्या पुरेशी नसल्याचे लक्षात आल्यानंतर युतीची शक्यता वाढली होती.
गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षांकडून शहरातील सर्व जागा लढविण्याच्या दृष्टिने तयारी सुरू असून सर्वच प्रभागांमधून इच्छुकांची चाचपणीही सुरू झाली होती. मात्र, दोन्ही पक्षांत युतीच्या दिशेने पावले पडू लागल्याने या काळात तयार होऊ लागलेली समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. युतीसाठी काय फॉर्म्युला असावा, याबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, युती झाल्यास दोन्ही पक्षांच्या इच्छुकांपैकी काही जणांचे प्रभाग मित्रपक्षाला देण्याची वेळ येणार आहे आणि त्यामुळे अनेकांची संधी हिरावली जाणार आहे. त्यामुळे एकीकडे विजय मिळविण्याची गणिते आणि दुसरीकडे इच्छुकांना आवर घालण्याचे आव्हान, अशी कसरत नेत्यांना करावी लागणार आहे.

रस्सीखेच होणार
महापालिकेच्या निवडणुकीतील युतीच्या जागावाटपात आतापर्यंतही भाजप सेनेपेक्षा अधिक जागा लढवित असे. यंदा तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून सर्व आमदार भाजपचे आहेत. अशा काळात जागावाटपात हीच मतांची संख्या गृहित धरावी, असा भाजपचा आग्रह आहे. त्यादृष्टीने ६५ : ३५ असा फॉर्म्युला काही नेते मांडू लागले आहेत. मात्र, शिवसेना त्याला कितपत मान्यता देईल, याबाबत शंका आहे. त्यामुळे जागावाटपात रस्सीखेच होणार, अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​मेट्रो सुनावणीला आता २१ नोव्हेंबरचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडून (पीआयबी) पुणे मेट्रोला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असला, तरी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर (एनजीटी) सुरू असलेल्या याचिकेवरील निर्णय अद्याप प्रलंबितच राहिला आहे. एनजीटीसमोर गुरुवारी मेट्रोबाबत सुनावणी झाली; पण महापालिकेच्या वकिलांची तब्येत बरी नसल्याने पुन्हा पुढील तारीख देण्यात आली. आता, २१ नोव्हेंबरला मेट्रोची सुनावणी होणार आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या ‘वनाज ते रामवाडी’ या मार्गावरील खंडुजीबाबा चौक ते महापालिका भवन या नदीपात्रातून जाणाऱ्या मार्गाला आक्षेप घेत, खासदार अनु आगा यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी एनजीटीसमोर याचिका दाखल केली आहे. यापूर्वी, झालेल्या सुनावणीमध्ये महापालिकेने जैवविविधता समितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना एनजीटीने केल्या होत्या. महापालिकेने हा अहवाल एनजीटीला सादर केला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीनंतर केंद्र सरकारच्या पीआयबीने मेट्रोला मंजुरी दिली आहे. आता, केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची मोहोर उमटणे बाकी आहे. एनजीटीसमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान महापालिकेचे वकील तब्येतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे, ही सुनावणी एनजीटीने पुढे ढकलली असून, २१ नोव्हेंबरची तारीख दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​मोबाइल हॅक होतो आहे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावधान... तुमचा मोबाइल हॅक होतो आहे... मोबाइलमध्ये सुरू असलेले सर्व अॅप्लिकेशन अगदी मेल, फेसबुक, ट्विटरसुद्धा हॅक केले जात आहे... मेलमध्ये असलेल्या डाटाचा वापर करत ‘क्रेडिट, डेबिट’ कार्डची गोपनीय माहिती मिळवली जात असून त्याद्वारे लाखो रुपये काढले जात आहेत... पुण्यात अशा प्रकारचे २५ गुन्हे घडले आहेत.

मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ (मालवेअर असलेल्या) नागरिकांना पाठवल्या जात आहेत. नागरिकांना फोन करून त्या लिंक पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येते. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येत आहे. कुठलीही अनोळखी लिंक उघडू नका, असे आवाहन सायबर शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी केले आहे.

पुण्यातील एका महिला डॉक्टरला अशाच प्रकारे फसवण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या डॉक्टरला एक मेल पाठवण्यात आला होता. सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करत त्यांना फोन करण्यात आला. एक फॉर्म पाठवला असून तो तत्काळ भरून पाठवा, असे सांगणारा तो फोन होता. या डॉक्टरांनी तो मेल उघडला असता त्यात कुठलाही फॉर्म नव्हता. हा फसवणुकीचा मेल असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ सायबर शाखेशी संपर्क साधला. सायबर सेलने त्यांना मोबाईल ‘फॉरमॅट’ तर करायला लावलाच, त्याशिवाय नव्याने सॉफ्टवेअर अपलोड करायला लावले.

हॅकर्सकडे अनेक ग्राहकांच्या अकाउंटचे क्रेडिन्शिअल आहेत. नुकताच काही बँकाकडील ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा ‘डाटा’ हॅकर्सच्या हाती लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हॅकर्सने अनेक बँकाचा ‘डाटा’ मिळवल्याचा दाट संशय आहे. या क्रेडिन्शिअलचा वापर करून ऑनलाइन लूटमार करण्यासाठी हॅकर्स ग्राहकांच्या मोबाइलमध्ये मालवेअर पाठवत आहेत.

हॅकर्सच्या हाताता पडतो ‘ओटीपी’

हॅकर्सकडून शक्यतो लूटमार करण्यासाठी रात्रीची वेळ निवडण्यात येत आहेत. आतापर्यंत फसवणूक करण्यात आलेल्या तक्रार अर्जांच्या अभ्यासाअंती रात्री बारा ते पहाटे पाचच्या दरम्यान ऑनलाइन पैसे काढण्यात आले आहेत. हॅकर्सने मोबाइल हॅक केला असल्याने त्यांना पैशांचे ऑनलाइन व्यवहार करताना लागणारा ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) लगेचच मिळतो. या पासवर्डचा वापर करून ते ऑनलाइन लूटमार करतात.

काय काळजी घ्याल?

मोबाइलवर आलेल्या कुठल्याही अनोळखी मेसेजमध्ये एखादी लिंक पाठवली गेली असेल, तर ती उघडू नका. अगदी मेलमधीलसुद्धा अनोळखी लिंक उघडू नका. मेल हॅक केला, तर किमान नुकसान होऊ शकते. मात्र, मोबाइल हॅक केला तर हॅकर्सच्या हातात सगळी माहिती पडते आणि त्यांना लूटमार करण्यास संधी मिळते. फेसबुक हॅक करून त्यात छेडछाड न करण्यासाठी खंडणी मागण्याचे प्रकारही वाढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​महापालिकेला बसणार शंभर कोटींचा भुर्दंड ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठीचा महत्त्वाकांक्षी भामा-आसखेड प्रकल्प पुढील पाच महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने पुणे महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या खासदार-आमदारांनी या संपूर्ण प्रकल्पाच्या कामात ‘खो’ घातल्याने त्यासाठी निर्धारित मुदत संपत आली आहे. तरीही, प्रकल्पाचे काम ठप्प आहे.

तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) भामा-आसखेड हा तब्बल ३८० कोटी रुपयांचा प्रकल्प मान्य करण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन करणाऱ्या पूर्व भागांतील नागरिकांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पाला मान्यता देतानाच, त्याचे काम ३१ मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले होते. ही योजना ठरावीक मुदतीत पूर्ण झाली नाही, तर प्रकल्पाचा उर्वरित निधी मिळणार नाही, अशी तंबीही केंद्र सरकारने दिली होती. केंद्र सरकारने दिलेली ही मुदत संपण्यास जेमतेम पाच महिने राहिले असून, या कालावधीत भामा-आसखेड योजनेचे जेमतेम ५० टक्के कामच पूर्णत्त्वास जाऊ शकणार आहे.

या प्रकल्पासाठी भामा-आसखेड धरणामध्ये जॅकवेल उभारणे, कुरळी येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे आणि धरणापासून मोठ्या व्यासाच्या पाइपलाइनच्या माध्यमातून वितरण व्यवस्था निर्माण करणे, यासारखी अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने आत्तापर्यंत या प्रकल्पांसाठी दोन टप्प्यांतला निधी वितरित केला आहे. मात्र, काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर उर्वरित निधी महापालिकेला मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे, महापालिकेला ही योजना पूर्णत्त्वास नेण्यासाठी अनुदानावर अवलंबून राहण्याऐवजी आपल्याच बजेटमधून खर्च करावा लागणार आहे. त्याचा सुमारे शंभर कोटी रुपयांहून अधिकचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातही ‘उडत्या कंदीला’वर बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीमध्ये मोठ्या हौसेने फटाके उडवले जातात. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संख्येने ‘उडते कंदील’ आकाशात पाठवून मोठ्या प्रमाणात ‘इव्हेंट’ साजरे केले जात आहेत. पहाटेच्या वेळी सारसबागेत तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम होतात. मात्र, या वर्षी दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ‘उडत्या कंदीलां’वर पोलिसांनी बंदी घातली आहे. कंदील उडवणे सोडाच त्याची विक्री, ‘स्टॉक’ केला तरी पोलिस गुन्हा दाखल करणार आहेत.

अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी ‘उडता कंदील’ उडविण्यास प्रतिबंधक करणारा आदेश काढला आहे. या कंदिलांची विक्री, स्टॉक तसेच ते आकाशात उडवल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे या आदेशात म्हटले आहेत.

दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कायमच पुणे-मुंबई असल्याने पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. पालघर येथे मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा साठा सापडल्याने यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. दहशतवाद्यांकडून वेगवेगळ्या कुल्प्ता राबवल्या जाऊ शकतात, त्या अनुषंगाने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. विमानतळ परिसरात पॅराग्लायडिंगला बंदी घातली आहे.​ आकाशात उडते कंदील सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटीतून सर्वाधिक उत्पन्न

$
0
0

एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान पालिकेच्या तिजोरीत सातशे कोटी जमा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्थानिक संस्था करातून (एलबीटी) पहिल्या सहा महिन्यांत पुणे महापालिकेला सातशे कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एलबीटी लागू झाल्यापासून गेल्या चार वर्षांतील हे सर्वाधिक उत्पन्न असून, राज्य सरकारने अनुदानात कपात केली नाही, तर पालिकेला यंदा उच्चांकी उत्पन्न प्राप्त होण्याचा अंदाज आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये एलबीटीतून महापालिकेच्या तिजोरीत ७१४ कोटी ४१ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत अंदाजे साडेसहाशे कोटी रुपये पालिकेला मिळाले होते. त्या तुलनेत यंदा त्यामध्ये ६० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. राज्य सरकारतर्फे दर महिन्याला महापालिकेला ७७ कोटी रुपयांचे अनुदान दिले जात असल्याने एलबीटी उत्पन्नापैकी ४६७ कोटी रुपये या अनुदानातूनच पालिकेला प्राप्त झाले आहेत.

राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी दारू आणि दारूजन्य उत्पादनांवर पुन्हा एलबीटी लावण्याचे आदेश काढले होते. त्यातूनही, महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार आहे. तसेच, मुद्रांक शुल्कावर वसूल केल्या जाणाऱ्या एक टक्का अधिभाराची रक्कम दर सहा महिन्यांनी सरकारतर्फे पालिकेला दिली जाते. पहिल्या सहा महिन्यांची रक्कम नुकतीच वितरित करण्याचे आदेश सरकारने काढले होते. त्यामुळे, महापालिकेला गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक उत्पन्न प्राप्त करता आले.

राज्य सरकारने ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने महानगरपालिकांना आर्थिक नुकसान होण्याचा दावा केला जात होता. त्यांचे नुकसान भरून देण्यासाठी सरकारतर्फे दर महिन्याला सर्व महापालिकांना अनुदान दिले जाते. या अनुदानामुळे महापालिकांचा आर्थिक डोलारा अद्याप तग धरून असल्याचे स्पष्ट होत आहे.

एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासूनचे सर्वाधिक उत्पन्न यंदा प्राप्त झाले आहे. याच पद्धतीने एलबीटीचा महसूल मिळत राहिला, तर आयुक्तांनी संपूर्ण वर्षासाठी दिलेले उद्दिष्ट सहज पूर्ण करता येईल, असे महापालिकेचे एलबीटीप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.

जीएसटीनंतर काय होणार?

पुढील वर्षी १ एप्रिल २०१७ पासून संपूर्ण देशभरात वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. स्थानिक स्तरावरील सर्व कर जीएसटीमध्ये अंतर्भूत होणार आहेत. त्यामुळे, एलबीटीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे हे अखेरचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर, राज्य सरकारला जीएसटीतून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा महापालिकांच्या उत्पन्नानुसार दिला जाईल, असे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिसांचे ‘रेल सुरक्षा’ अॅप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे रेल्वे पोलिस दलाने ‘रेल सुरक्षा’ नावाचे एक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. आपतकालिन परिस्थितीत रेल्वेच्या डब्यात उपलब्ध करून दिलेल्या ‘पॅनिक बटणा’च्या सहाय्याने जवळपासच्या रेल्वे पोलिसांशी संपर्क साधता येणार आहे. देशभरातील रेल्वे पोलिसांनी अशाप्रकारे विकसित केलेले हे पहिलेच मोबाइल अॅप ठरले आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी यापूर्वी देशभरात १८२ ही हेल्पलाइन अस्तित्त्वात होती. त्याबरोबरच रेल्वेतील साखळी ओढून इंजिन चालकाला संकेत दिले जात होते किंवा त्याच्याकडे मदतीची मागणी केली जात होती. मात्र, यामध्ये विनाकारण साखळी ओढण्याचे प्रकार घडतात आणि यामध्ये काही प्रमाणात नेमकेपणाचा अभावही होता. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. पुणे-दौंड मार्गावर गेल्या काही महिन्यांत दरोड्याच्या अनेक घटना घडल्या. तसेच, प्रवाशांमध्ये मारहाणीचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे पोलिसांनी ‘रेल सुरक्षा’ अॅपची निर्मिती केली आहे.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल महिलांच्या डब्यात एक ‘पॅनिक बटण’ बसविण्याची घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाने या वर्षी मे महिन्यात केली होती. ‘रेल सुरक्षा’ अॅपची कार्यप्रणालीही याच पद्धतीची असून, त्याचे एक बटण डब्यामध्ये असणार आहे. ते बटण दाबल्यानंतर पोलिसांना अॅपद्वारे सूचित केले जाणार आहे. रेल्वे मार्गावर दरड कोसळली आहे, रेल्वे ट्रॅक नादुरुस्त आहे किंवा अन्य कोणत्या कारणास्तव वाहतूक थांबविण्यात आली आहे, अशा परिस्थितीत प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेची माहिती याद्वारे दिली जाणार आहे. या अॅपमध्ये अन्य काही सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हरवलेले प्रवाशांची नावे, रेल्वे गाड्या व पुणे-लोणावळा लोकलचे वेळापत्रक याचा समावेश आहे. तसेच, प्रवासी या अॅपद्वारे ऑनलाइन तक्रारही नोंदवू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images