Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शत्रुघ्न सिन्हा यांचा ‘क्लास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘खामोश...’ या एका शब्दाने समोरच्याची बोलती बंद करणारे प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांना अभिनयाचे बाळकडू दिले. सिन्हा यांनी प्राध्यापकाच्या भूमिकेमध्ये प्रवेश करून विद्यार्थ्यांचा ‘क्लास’ घेतला. तो चांगलाच रंगला. ‘बेस्ट के भी बेस्ट बने...अगर ना बन सके तो भी अपना अलग अस्तित्व दिखाने का प्रयास करे,’ असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
खासदार असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) आंदोलनाच्या काळात विद्यार्थ्यांशी संवाद साधणे टाळले होते. बुधवारी संस्थेत येऊन त्यांनी अभिनय अभ्यासक्रमाच्या २०१३ आणि २०१६ च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी अभिनय विभागप्रमुख टॉम आल्टर आणि कुमार शहानी उपस्थित होते.
संस्थेमधील १९६५-६७ दरम्यानचे विद्यार्थी दशेतील अनुभव...गुरूकडून मिळालेले मार्गदर्शन...अभिनेता म्हणून घडण्याची प्रक्रिया असा पट सिन्हा यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. विद्यार्थ्यांशी बोलताना ते काहीसे भूतकाळात रमले. संस्थेत शिकत असताना त्यांनी केलेल्या फिल्म्स विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. त्या पाहून तेही काहीसे भारावले. काम करतानाच्या आठवणी... त्यासाठी केलेली धडपड...अशा आठवणी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारून चित्रपट भानजागवले. सिन्हा यांनी मनमोकळेपणाने प्रश्नांना उत्तरे दिली.
---------------
मला संस्थेने खूप काही दिले. तुम्हालाही खूप काही मिळेल. फक्त शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. आंदोलनादरम्यान संस्थेमध्ये मरगळल्यासारखे वातावरण होते; पण आता उत्साही वातावरण पाहून खूप छान वाटत आहे.
- शत्रुघ्न सिन्हा, प्रख्यात अभिनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीला थंडीची नांदी

$
0
0

किमान तापमान आले १६ अंशांवर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात सध्या जाणवत असलेल्या गारव्यामुळे पुणेकरांच्या दिवाळीची सुरुवात गुलाबी थंडीने होणार आहे. सध्या शहरात सायंकाळनंतर गारवा, तर पहाटे थंडी जाणवत आहे. पहाटे काही ठिकाणी हलके धुकेही अनुभवायला मिळत आहे; मात्र बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या क्यांत चक्रीवादळामुळे पुढील काही दिवसांत हवामान ढगाळ राहून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरावर ओडिशाकडील भागात क्यांत चक्रीवादळ निर्माण झाले आहे. मान्सूनने राज्यातून माघार घेतली असली, तरी या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात वातावरणातील बाष्पाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी दोन दिवसांनंतर तापमानात काहीशी वाढ होऊन थंडीची तीव्रता कमी होईल, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी पुण्यात शिवाजीनगर येथे ३०.७ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १६.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. लोहगाव येथे ३४.८ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर २०.७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. राज्यातील सर्वांत नीचांकी तापमान नाशिक येथे, १३.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. महाबळेश्वर येथे १४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात दोन दिवसांनंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून वातावरण अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​श्रीपाल सबनीसांकडून मोदींची स्तुती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर हिंदुत्ववादी विचारांचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘प्रोडक्ट’ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदनशीलता दाखवत अब्दुल कलाम यांच्यासारख्या सेक्युलर राष्ट्रपतीसंदर्भात कमालीची संवेदनशीलता दाखवली. त्यामुळे या देशातील मुस्लिम पूर्णपणे सुरक्षित आहेत,’ असे सांगत मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदींचे गोडवे गायले.
कोथरूड व्यासपीठ आणि साहित्यवेध प्रतिष्ठानतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण या व्यक्तींच्या चरित्रावर आधारित व्यंगचित्रांचे ‘मैत्र पर्व’ हे प्रदर्शन कर्वे रस्त्यावरील अंबर हॉल येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून सबनीस बोलत होते. सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पनून काश्मीर संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय श्रुंगू, शाम देशपांडे, कैलास भिंगारे आदी उपस्थित होते.
प्रखर हिंदुत्ववादाला विरोध करणाऱ्या डॉ. सबनीसांनी नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे या हिंदुत्ववादी नेत्यांवर मुक्तपणे स्तुतिसुमने उधळली. ‘नरेंद्र मोदी हे मुस्लिम समाजाबद्दल संवेदनशील आहेत, हे दिसून आले आहे, याशिवाय महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा, कलेचा, राजकारणाचा इतिहास बाळासाहेब ठाकरे यांना वगळून लिहिताच येऊ शकत नाही. माणूस, जात, धर्म, राज्य आणि राष्ट्र अशा सर्व पातळ्यांवर निर्माण झालेल्या गढूळ वातावरणावर आणि अंतर्गत कलहांवर कला हा एकमेव उपाय आहे, सध्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण मैत्रीला, माणुसकीला हानिकारक ठरत आहे. मानवतावादी मूल्ये रुजवायची असतील आणि शांतता प्रस्थापित करायची असेल, तर व्यंगचित्रांसारख्या कलेला पर्याय नाही. व्यंगचित्रे बोलकी आणि तोफेपेक्षाही सामर्थ्यवान असतात, हे आर. के. लक्ष्मण आणि बाळासाहेबांनी आपल्या कुंचल्यातून सिद्ध केले. कला माणसांतील भेद, देशाचे नकाशे नाकारते. व्यंगचित्रे समाज हादरवून विकृतींना नेस्तनाबूत करू शकतात. समाजविघातक प्रवृत्तींवर कला हा जालीम उपाय आहे.’ याकडे सबनीस यांनी लक्ष वेधले.
‘आर. के. लक्ष्मण यांनी तयार केलेला कॉमन मॅन पुण्याला मिळालेली देणगी आहे. तुमचा देवावर विश्वास असण्यापेक्षा देवाचा तुमच्यावर विश्वास असणे जास्त महत्वाचे असते, असे आर. के. नेहमी म्हणायचे. अडचणीत असताना सहकाऱ्यांची जबाबदारी घेणारा आणि यशाचे श्रेय सहकाऱ्यांना देणारा खरा प्रमुख असतो, हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या विचारांतून आणि नेतृत्वगुणांतून सिद्ध केले,’ असे सांगत मुजुमदार यांनी लक्ष्मण आणि डॉ. कलामांच्या आठवणींना उजाळा दिला. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​रेशनचे २६ लाखांचे धान्य मुंढव्यात पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
घोरपडी गावात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत काळ्या बाजारात विक्रीसाठी रेशनचे धान्य घेऊन निघालेल्या दोन ट्रकवर कारवाई केली. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एक ट्रक, एक टेम्पो, दोनशे पोती तांदूळ व १७९ पोती गहू असा २६ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोरख किसन कुऱ्हाडे (वय २८, रा. कात्रज-कोंढवा रोड, मूळगाव डोंबलवाडी, ता. कर्जत), अनिल किसन मटकर (३२, रा. माळवाडी, हडपसर), शंकर शांताराम गायकवाड (रा. काळेपडळ, हडपसर), विलास किसन मटकर, उमेश शंकर मारकड (रा. शेलारवस्ती, देहूरोड), वैशाली काकासाहेब कांबळे (रा. शिंदे वस्ती, घोरपडी गाव), रमेश किसन मटकर, उत्तरेश्वर दत्तू बोराडे (४२, रा. खेडशिवापूर) यांच्यासह त्यांच्या दोन साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न धान्य वितरण कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अनिता वसंत शिनगारे (४६) यांनी तक्रार
दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिधापत्रिकाधाराकांना वितरीत करण्यासाठी लाखो रुपयांचे गहू व तांदूळ कल्याणी महिला बचत गटास वितरीत करण्यात आला होता. या धान्यातील गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विकण्याठी ट्रकमध्ये भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून धान्यासह ट्रक व टेम्पो, पोते शिवण्याची मशिन, रिकामी पोती असा ऐवज ताब्यात घेतला. यानंतर कल्याणी महिला बचत गटाचे दुकान सील केले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले विलास किसन मटकर आणि उमेश शंकर मरकड हे दोघेही सराईत धान्य माफिया असून, मरकड याच्यावर नुकताच खडक पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. त्याचा साथीदार गोकुळ साबळे याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहगाव विमानतळावर नऊ किलो सोने पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुबईवरून स्पाइस जेट विमानातून तस्करीसाठी आणलेले दोन कोटी ८० लाख रुपयांचे तब्बल नऊ किलो सोने कस्टमने लोहगाव विमानतळावर पकडले. विमानाच्या टॉयलेटमध्ये हे सोने लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे विमातळावर तस्करीचे सोने पकडण्याची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

दुबई ते पुणे या स्पाइस जेट कंपनीचे ‘एसजी-५२’ या विमानातून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांना मिळाली. लोहगाव विमानतळ येथे बुधवारी पहाटे चारच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहोचलेल्या विमानाची अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली. त्या वेळी त्यांना टॉयलेटच्या भांड्यात एका प्लास्टिकच्या पिशवीत सोन्याची १० बिस्किटे आढळून आली. त्याचे वजन तब्बल ९.१ किलो असून, त्याची किंमत दोन कोटी ८० लाख रूपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले. पुणे विमातळावर तस्करीचे सोने पकडण्याची ही आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे कस्टमकडून सांगण्यात आले. गेल्या महिन्यात पुणे विमानतळावर एक कोटी रूपयांचे ड्रोन कॅमेरे कस्टमने जप्त केले होते. गेल्या काही वर्षांपासून सोने तस्करीसाठी लोहगाव विमानतळाचा तस्कराकडून वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. यासाठी तस्कारांकडून वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत मामा-भाचे ठार

$
0
0

दौंड : दौंड-नगर राज्यमार्गावर भीमा नदीच्या पुलावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस मागून ठोकर दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. बुधवारी सायंकाळी पावणेचारच्या सुमारास हा अपघात घडला. अशोक बापू सांगळे (वय ४२, रा. दौंड) व संदीप मारुती सोनवणे (२५, रा. दौंड)अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. अपघातात मृत झालेले दोघे नात्याने मामा-भाचे होते.
अपघातातील मृत दोघे नगरकडून दौंडच्या दिशेने येत होते. दौंड शहरानजीक भीमानदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागून जोरात ठोकरले. या धडकेत सोनवणे व सांगळे दूर फेकले गेले. सोनवणे हे दुचाकीसह नदीपात्रात फेकले गेले; तर सांगळे दुचाकीवरून उडून पुलावर कोसळले. अपघाताची खबर मिळताच दौंड पोलिस घटनास्थळी पोहचले. भोई समाजाच्या स्थानिक मच्छिमारांनी नदीतील मृतदेह शोधण्यास मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​कॉर्पोरेट गिफ्ट्सने रंगत

$
0
0

पुणे ः सोन्या-चांदीची नाणी, पेन, मूर्ती यापासून चॉकलेट बॉक्स आणि पेनड्राइव्हपर्यंत विविध प्रकारच्या कॉर्पोरेट गिफ्टसनं दिवाळीची रंगत आणखी वाढवली आहे. फर्म किंवा कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सणाची भेट म्हणून दिली जाणारी कॉर्पोरेट गिफ्ट आता कर्मचाऱ्यांना दैनंदिन आयुष्यात कशी उपयोगी ठरतील, याचा विचार करून दिली जात असल्याने ती ‘वर्थ अ गिफ्ट’ ठरत आहेत.
एरवी सणाचे गिफ्ट या प्रकारात न मोडणाऱ्या लॅपटॉप बॅग, मोबाइल केस, ऑफिस कॅज्युअल सॅक इथपासून लंचबॉक्स पॅकेज आणि सोळा जीबी पेनड्राइव्हपर्यंत विविध प्रकारच्या भेटवस्तू आता कॉर्पोरेट गिफ्ट हे बिरूद मिरवताना दिसत आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट गिफ्ट या संकल्पनेची व्याख्या काहीशी बदलताना दिसतेय. पूर्वी मिठाई हा एकमेव पर्याय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची भेट म्हणून दिला जायचा. काळानुरूप त्यात बदल होऊ लागला आहे.
भेट ही गृहोपयोगी किंवा कर्मचाऱ्याला सातत्याने वापरता येईल, त्याला दैनंदिन कामकाजात त्याचा उपयोग होईल अशी आहेत.
कॉर्पोरेट गिफ्टस् मध्ये वेगळा ट्रेंड आणण्याचे श्रेयही सध्या आयटी कंपन्यांना जाते. कर्मचाऱ्यांना वारपता येतील आणि दीर्घ काळ ही भेट त्यांच्या लक्षात राहील, अशा पद्धतीची भेट द्यायला या कंपन्यांमध्ये सुरुवात झाली. त्याबाबत बोलताना शिवाजीनगर येथील कंपनीमध्ये काम करणारी दीपाली पाटील म्हणाली, ‘आमच्या कंपनीत यंदा दिवाळी गिफ्ट म्हणून छान मजबूत सॅक सगळ्यांना देण्यात आल्या. लॅपटॉप वापरायला तसेच एरवीही जास्तीचे सामान ठेवायला त्या अतिशय उपयुक्त आहेत. आम्हा सगळ्यांनात हे गिफ्ट आवडले.’
दिवाळीचे गिफ्ट म्हणून माझ्या कंपनीने यंदा पॉवर बँक दिली. हे गिफ्ट अतिशय उपयुक्त असे आहे. प्रवासात किंवा एरवी कुठेही ज्याचा उपयोग होऊ शकतो, अशा गिफ्टमुळे आमची दिवाळी खरोखरीच आनंदाची ठरतेय, असे प्रणव देशपांडे याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांच्या समावेशाबाबत आज निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने ३४ गावांचा समावेश करण्यासंदर्भात आज निर्णय होणार आहे. हायकोर्टाने राज्य सरकारला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज, गुरुवारी ११ वाजेपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. गावांच्या समावेशास भाजप फारसा अनुकूल नसल्याने तूर्तास हा निर्णय नकारात्मक येण्याची शक्यता आहे.

भविष्यातील राजकीय गणिते जुळविण्यासाठी ही गावे भाजपला अडचणीची ठरू शकतील, अशी भीती पुण्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये आहे, त्यामुळे ही गावे घेऊ नये अशी मागणी या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची जोरदार चर्चा आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने ३४ गावांचा समावेश करण्यासंदर्भात हायकोर्टाने राज्य सरकारला आज, गुरुवारी ११ वाजेपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये गावांचा समावेश झाल्यास त्याचा महापालिका निवडणुकीवर परिणाम होणार आहे. गावांचा समावेश केला नाही, तरी याचे परिणाम सत्ताधारी भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी भोगावे लागणार आहेत. त्यामुळे भाजप दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडलेला आहे. ही गावे समाविष्ट झाल्यास त्याचा जोरदार फटका आगामी पालिका निवडणुकीत भाजपला बसू शकतो. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतरच या गावांचा विचार करावा, यासाठी नेत्यांचा आग्रह आहे.

राज्य सरकारने कोर्टात सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली. मात्र, कोर्टाने त्याला स्पष्ट नकार देऊन गावांचा समावेश महापालिका हद्दीमध्ये करायचा असल्यास तसे लेखी कोर्टाला सादर करावे आणि समावेश करायचा नसल्यास तसे कळवावे, याबाबतचा निर्णय गुरुवारी अकरा वाजेपर्यंत घ्यावा, असे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कस्टर्ड पावडर’चा बेकायदा साठा जप्त

$
0
0

पुणे ः लोणीकंद येथील कंपनीवर छापा घालून कस्टर्ड पावडरचा चार लाख ९६ हजार ३५७ रुपयांचा साठा जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली. भेसळीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.
नगर रस्त्यावरील लोणीकंद येथील विकफिल्ड्स फुड्स कंपनीत छापा टाकून एफडीएने ही कारवाई केली. एफडीएच्या सहायक आयुक्त संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत, विकास सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कस्टर्ड पावडरचे नमुने कंपनीच्या कारखान्यातून ११ ऑगस्टला तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यावेळी सिंथेटीक खाद्यरंगाचे प्रमाण मानदापेक्षा अधिक असल्याचे प्रयोगशाळेत आढळून आले. त्यामुळे अशा प्रकारचे उत्पादन पुन्हा होऊ नये म्हणून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
कारखान्यातील उत्पादित झालेल्या कस्टर्ड पावडरचे ११ नमुने विश्लेषणासाठी घेऊन साठा जप्त करण्यात आला. अहवाल प्राप्त होताच अहवालातील निष्कर्षानुसार कारखान्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहित्र, फीडरजवळ फटाके फोडू नका

$
0
0

पुणे : दिवाळीच्या काळात सार्वजनिक वीजयंत्रणेपासून; तसेच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. रोहित्र, फीडर ​पिलरजवळ फटाके उडवू नयेत, विद्युत माळेचे वायर, दिवे आणि सॉकेट दर्जेदार असल्याची खात्री करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दिवाळीत वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महावितरणचे अभियंता आणि कर्मचारी हे सज्ज राहणार आहेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या १९१२ किंवा १८००२००३४३५ अथवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महावितरणने सूचित केले आहे.

महावितरणची वीजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. त्यामध्ये उच्च आणि लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. रोहित्र किंवा फीडर पिलरजवळ टाकलेल्या कचऱ्याजवळ फटाके फोडू नयेत किंवा तो कचरा पेटवून देण्याचे प्रकार टाळावेत. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा त्यापासून धोका होईल, असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडावावेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार नसलेल्यांना अनुदानित रॉकेल बंद ?

$
0
0

भोर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी एक नोव्हेंबरपासून आधार व भ्रमणध्वनी क्रमांक सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे केरोसीन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आधार जोडणीच्या कामाला सरकारने वारंवार मुदतवाढ देऊनही अद्याप काही लाभार्थींनी त्याकडे कानाडोळा केला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता व सुसूत्रता येण्यासाठी लाभार्थींनी आधार क्रमांक सादर करावेत, असे आवाहन सरकारने केले आहेत. लाभार्थींसाठी विहीत नमुन्यातील फॉर्म देण्यात आले होते, त्यामध्ये कुटुंबप्रमुखासह सर्व सदस्यांच्या आधार क्रमांकाची माहिती विहीत कालावधीत देणे बंधनकारक होते. तरीदेखील पुणे शहरासह तेरा तालुक्यांतील हजारो शिधापत्रिकाधारकांनी त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे अशा लाभार्थींचे अनुदानित केरोसीन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी ३० ऑक्टोबर ही अंतिम मुदत आता देण्यात आली आहे. असे असतानाही ज्या नागरिकांनी आधार क्रमांकाची पूर्तात केलेली नाही अशांचे एक नोव्हेंबरपासून अनुदानित केरोसीन बंद करण्यात येणार आहे. या लाभार्थींचे केरोसीन एक जानेवारी २०१७ पर्यंत रोखून ठेवण्यात येईल. दरम्यान, जे लाभार्थी आधार क्रमांक देतील त्यांनी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याला अनुदानित केरोसीन दिले जाईल. जे लाभार्थी वरील अटींची पूर्तता करणार नाहीत त्यांना तोपर्यंत अनुदानित केरोसीनचा लाभ मिळणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक रुग्ण बनली लुटारू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

कधी राजा, तर कधी पोलिस; एखादी भूमिका अगीच मनात भरली, तर थेट लुटारू. मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या पिंपळेसौदागर येथील एका महिलेची ही कहाणी असून, बुधवारी तिने पिस्तुलाच्या धाकाने वर्धमान ज्वेलर्स सराफपेढी लुटण्याचा प्रयत्न केला. पिंपरी बाजारपेठेत सकाळी हा थरार घडला. महिलेला ताब्यात घेतल्यावर कालांतराने पिस्तुलही खोटे आणि लुटण्याचा प्रकार खोटा हे लक्षात आल्यावर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

पिंपळे सौदागर येथील सुखवस्तू कुटुंबातील ३८ वर्षांची महिला गेल्या काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त आहे. बुधवारी सकाळी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही महिला बुरखा घालून दुकानात आली. सुरुवातीला तिने दुकानातील कर्मचाऱ्याला सोन्याची अंगठी दाखवण्यास सांगितले. त्यानंतर दहा ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट दाखवण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी तिला अंगठी आणि बिस्कीट दाखवले. तिने अंगठी आणि बिस्कीट बघण्याचे नाटक करून बुरख्यामध्ये लपवून ठेवलेली बंदूक बाहेर काढत बंदुकीचा धाक दाखवून सोने लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुकानातील कामगारांनी तिला पकडून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेला ताब्यात घेतले.

दरम्यान, पिंपरी पोलिस चौकीत आणल्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी या महिलेची झडती घेतली. तेव्हा तिने जिन्स आणि टी-शर्ट घालून त्यावर बुरखा खातला होता. जिन्समध्ये लपवून आणलेल्या बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न असावा, असा अंदाज सुरुवातीला पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी बंदूक तपासली असता त्यांना रंगीत कापडात गुंडाळलेली बंदूक आढळून आली. पोलिसांनी त्यावरील कागद काढला असता ही बंदूक लहान
मुलांना फटाके वाजवण्यासाठीची असल्याचे समजले.

या महिलेची पोलिसांनी कसून चौकशी केली असता पोलिसांना खरा प्रकार समजला. मध्य प्रदेशातील निवृत्त अप्पर पोलिस अधीक्षकांची ही मुलगी असून, तिचा पती पिंपरी-चिंचवडमधील एका बड्या कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. तसेच मानसिक आजारानेन त्रस्त असल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची औषधाची गोळी चुकली, की ती कधी राजा बनते तर कधी पोलिस. असाच काही प्रकार आज झाल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले. तरीदेखील पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेला अटक करण्यात आली नसून, चौकशीनंतर तिला अटक करण्याची तरतूद पोलिसांनी ठेवली आहे. मंगळवारी मध्यरात्री पिंपरीमधीलच एक सराफपेढी फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर बुधवारी सकाळी हा प्रकार घडल्याने पोलिसाची मोठी धावपळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणांचा विकास कळीचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू सोसायटींची जास्त संख्या आणि नव्याने विकसित झालेल्या मोशी-चऱ्होली-डुडुळगावमधील महापालिकेच्या आरक्षणांचा विकास रखडला आहे. हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

मागील निवडणुकीत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा व सात यांचा मिळून यंदा प्रभाग क्रमांक तीन बनला आहे. येथील सध्याचे नगरसेवक आणि इच्छुकांची भाऊगर्दी होणार असे दिसते. त्यातच या प्रभागात दोन जागा या सर्वसाधारण आणि दोन या ओबीसीसाठी आरक्षित असणार आहेत. या भागातील आमदार हे नुकतेच भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनीदेखील येथे मोठी फिल्डिंग लावली आहे. तर, माजी आमदार विलास लांडे हेदेखील या भागावर आपले वर्चस्व कायम ठेवून आहेत. त्यामुळे येथे चांगला धुराळा पहायला मिळेल. त्यातच येथील आरक्षणांचा अद्याप विकास झालेला नाही, त्यामुळे हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. सध्या येथे शिवसेनेचा एक नगरसेवक असून, आता त्यांना कडवे आव्हान उभे राहील, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या भागात आता राष्ट्रवादी काँग्रेसला नव्याने उमेदवार शोधावा लागेल. या ठिकाणी गावांचा परिसर अधिक असला, तरी नवीन विकसित झालेल्या सोसायट्यांची संख्या अधिक झाली आहे. गाववाल्यांपेक्षा बाहेरून आलेल्यांची संख्या अधिक झाली आहे. मध्यमवर्गीय उच्चभ्रूंचे मतदान निर्णायक ठरणार आहे. समाविष्ट गावांत अजूनही विकासाची गंगा पोहोचलेली नाही. रस्ते, शाळा, उद्याने आदी आरक्षणे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वेळी या प्रभागातून राष्ट्रवादीला तीन आणि शिवसेनेला एक जागा मिळाली होती.

ग्रामीण भागांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आरक्षणांचा रखडलेला विकास ही येथील प्रमुख समस्या आहे. इंद्रायणी नदी आणि प्रमुख रस्त्यांचा आधार घेऊन नवीन प्रभाग झाला आहे. मोशी जकात नाक्यासमोरील पुलापासून इंद्रायणी नदीने आळंदीची हद्द, देहूगाव नाका, चऱ्होली गावठाण, निरगुडी आणि पुढे लोहगाव आणि लष्करी हद्दीने पुणे-आळंदी रस्त्यापर्यंत, पुढे संत ज्ञानेश्वरनगर, दिघी, मॅगझिन हद्दीने गंधर्वनगरी, केंद्रीय विहार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची विरुद्ध बाजूने मोशी गावठाण, पुढे मोशी नाक्यापर्यंतचा भाग या भागात जोडला आहे. नकाशात भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग मोठा दिसतो. याचे प्रमुख कारण समाविष्ट गावांचा भाग अधिक असल्याने मोकळ्या जागा अधिक आहेत. नवीन प्रभागरचनेत मोशी गावाचे दोन भागांत विभाजन केले आहे. मात्र, चऱ्होली आणि डुडुळगाव या गावांचा पूर्णपणे समावेश केला आहे. मोशी आणि चऱ्होली परिसरात ओबीसी मतदारांची संख्या अधिक आहे.

मंदा आल्हाट आणि धनंजय आल्हाट या दोन्ही नगरसेवकांना प्रभाग दोन आणि तीन अशा दोन्ही ठिकाणी संधी आहे. तसेच, सर्वसाधारणसाठी दोन जागा राखीव असल्याने चऱ्होलीच्या दोन्ही नगरसेवकांना संधी आहे. तर, राष्ट्रवादीकडून विनया तापकीर, मंदा आल्हाट, चंद्रकांत तापकीर, नवनाथ तापकीर, घनश्याम घेडकर हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून धनंजय आल्हाट, किसन महाराज तापकीर, सुनील तापकीर, सुरेखा बुर्डे, शशिकांत बुर्डे हे प्रयत्न करीत आहेत. भाजपची यादी मोठी असून शैला मोळक, नीलेश काळजे, दत्तात्रेय तापकीर, संतोष आंबेकर, नितीन तापकीर, सचिन लालदास तापकीर, संतोष भाऊसाहेब तापकीर, सुनील बोराटे, राजाराम बोराटे, लक्ष्मण सस्ते यांसह अनेकांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसला उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल, असे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीसाठी भाजपचे प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप-शिवसेना युती होण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार लांडगे यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा मतदारसंघानुसार चिंचवडची जबाबदारी आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरीची जबाबदारी खासदार अमर साबळे यांच्याकडे तर भोसरीची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

पत्रकार परिषदेस भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे तसेच एकनाथ पवार, सदाशिव खाडे, माऊली थोरात, शैलजा मोळक, बाळासाहेब गव्हाणे, बाबू नायर, सांगर कामतेकर, अमोल थोरात आदी उपस्थित होते.

आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये एकहाती नेतृत्व होते. मात्र, या निर्णयामुळे आता तीन-तीन शिलेदार निवडणूक रिंगणात पक्षाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. नव्याने भाजपमध्ये आलेल्या आमदार लांडगे यांनी त्यांच्या मतदारसंघातून ४६ नगरसेवक निवडून आणण्याचे आश्वासन दिले.

शिवसेनेच्या काही नेत्यांशी भजपाच्या नेत्यांचे वितुष्ट असतानाही युती करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जगताप यांनी म्हटले की, ही युती पक्षाशी असेल व्यक्तीशी नाही. योग्य पद्धतीने तिकीट वाटप झाले तर युतीला आपला पाठिंबा असेल, असे लांडगे यांनीही स्पष्ट केले.

आगामी काळात विकासाचा भाजपचा काय अजेंडा असेल, असे पत्रकरांनी विचारले असता जगताप म्हणाले, ‘आमच्याकडे विकासाचा राष्ट्रवादीपेक्षा चांगला अजेंडा आहे. मात्र, आम्ही प्रत्येकवेळी स्वतःची पाठ थोपटून घेत नाही. तर, सत्तेत आल्यानंतर आम्ही आमचा विकास दाखवू आणि इथून पुढे पुराव्यानिशी राष्ट्रवादीचे भ्रष्टाचार जनतेसमोर आणू. आज जरी अजित पवारांचे शहरातले दौरे वाढले असले, तरी आम्ही तर शहरातच राहतो. त्यामुळे त्यांच्यापेक्षा चांगला विकास आम्ही करू. तसेच आमदारांचा प्रवेश ही महापालिकेत सत्ता आणण्याच्या शर्तीवरच झालेला आहे. त्यानुसार आम्ही महापालिकेत सत्ता आणू.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणांबाबत ८ नोव्हेंबरला सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीतील जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या गट आणि गणांबाबत २८८ हरकती आल्या असून, त्यापैकी कोल्हापूरमधील हरकतींवर मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. पुण्यातील सुनावणी आठ नोव्हेंबरला होणार आहेत.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या गट आणि गणांची रचना तयार झाली आहे. २०११ मधील जनगणनेच्या आधारे गट आणि गण तयार करण्यात आले आहेत. त्यावर २८८ हरकती घेण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्यासमोर हरकतींवर सुनावणी सुरू झाली आहे. ‘पुण्यात सर्वाधिक ९३ हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमध्ये ७७, सांगलीत ४४, साताऱ्यात ४५, सोलापूरमध्ये २९ हरकती आल्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरमधील सर्व हरकतींवर मंगळवारी सुनावणी झाली,’ असे चोक्कलिंगम यांनी सांगितले. नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या या अंतिम ठरवण्यात आल्या आहेत. मतदार यादींवर हरकती आणि सुनावणी झाली आहे. २९ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. मतदार याद्या या नगरपरिषदांची कार्यालये आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये लावण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयव्हीएफ’मुळे माता होण्याची संधी

$
0
0

पुणे : लग्नानंतर सात वर्षांपर्यंत मूल होत नव्हते. अखेर आयव्हीएफच्या माध्यमातून गर्भधारणा झाली. पण, मुदतीपूर्वच गुतांगुत निर्माण होऊन जन्माला आलेल्या बाळाला जीवदान देण्यात आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले. आयव्हीएफ या तंत्रामुळे सात वर्षानंतर महिलेला माता होण्याचा आनंद मिळाला.

लग्नानंतर सात वर्षांनी शोभा कोळी यांनी बाळाला जन्म दिला. मूल होत नसल्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले. गर्भात समस्या निर्माण होऊन त्यांना गर्भपातालाही सामोरे जावे लागत होते. अखेर त्यांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या स्त्री-रोग व वंध्यत्व निवारणतज्ज्ञ डॉ. सीमा जैन यांच्याशी संपर्क साधला. त्यांचे उपचार सुरु झाले. डॉ. जैन म्हणाल्या, ‘कोळी यांना अनेक ऑपरेशनला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे गर्भाशयांतर्गत काही गुंतागुंत निर्माण झाली होती. परिणामी ‘आयव्हीएफ’ शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. आयव्हीएफच्या प्रयोगामुळे कोळी यांना गर्भधारणा झाली. परंतु, त्यांच्या प्रकृतीत बरीच गुंतागुंत होती. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोनोग्राफी करावी लागत होती. गर्भवती असताना २९व्या आठवड्यात कोळी यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्या वेळी बाळाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात घट झाली होती. यामुळे त्यात गुंतागुंत वाढली. साहजिकच आम्ही त्यांची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला.’ उपचारांमुळे या बाळाला अखेर जीवदान मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायदळाला गरज आधुनिक रायफलींची

$
0
0

कमतरतेमुळे अडचणी; गरज तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा

Prasad.Panse@timesgroup.com

Tweet : @prasadpanseMT

पुणे : लष्करात सर्वाधिक संख्या असलेल्या आणि शत्रूशी समोरून लढणारी इन्फंट्री, अर्थात पायदळाला अत्याधुनिक रायफलींची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. अत्याधुनिक रायफलींबरोबरच हलक्या वजनाची लढाऊ हेल्मेट आणि बुलेट प्रूफ जॅकेट्सचीही कमतरता इन्फंट्रीला जाणवत आहे. लवकरात लवकर ही खरेदी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या ‘आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ने (एआरडीई) विकसित केलेली ५.५५ मिलिमीटरची इन्सास रायफल मोठ्या प्रमाणावर वापरली जाते; मात्र त्यातील त्रुटी लष्कराने वारंवार समोर आणल्या आहेत. कमांडो दल आणि अन्य काही तुकड्या परदेशी बनावटीच्या अत्याधुनिक स्वयंचलित रायफल किंवा ‘एके ४७’चा वापरही करतात. त्यावर उपाय म्हणून डीआरडीओ आणि ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डातर्फे ५.५६ बाय ४४ मिलिमीटर कॅलिबरची एक्सकॅलिबर रायफल विकसित करण्यात आली; मात्र चाचण्यांनंतर लष्कराने ही रायफलदेखील नाकारली. परिणामी, लष्कराकडून नव्या रायफलींचा शोध सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लष्कराच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत नव्या रायफलींबाबत सविस्तर चर्चा झाली. दहशतवाद्यांना किंवा शत्रुसैनिकांना कंठस्नान घालणारी ७.६२ मिमी रायफल किंवा जायबंदी करू शकणारी ५.५६ मिमी रायफल, यांपैकी नेमक्या कोणत्या रायफलींची लष्कराला अधिक गरज आहे, यावर ही चर्चा झाली. त्यानंतर सुमारे अर्ध्या किलोमीटर अंतरापर्यंत मारक क्षमता असलेल्या आणि एकाच गोळीत शत्रूला कंठस्नान घालणाऱ्या ७.६२ बाय ५१ मिमी रायफलची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अजून लष्कर ‘इन्सास’वरच अवलंबून

लष्कराने इंटरचेंजेबल बॅरल असलेल्या ५.५६ बाय ४५ मिमी रायफल व ७.६२ बाय ३९ मिमी रायफल खरेदी करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. या योजनेअंतर्गत अमेरिका, इटली, झेक प्रजासत्ताक आणि इस्रायलमधील शस्त्रास्त्र उत्पादकांकडून या रायफली खरेदी करण्यात येणार होत्या; मात्र नंतर ही योजना बारगळली. त्यामुळे लष्कर अजूनही मोठ्या प्रमाणावर इन्सास रायफलींवरच अवलंबून आहे.

पारंपरिक युद्धपद्धतीत ५.५६ मिमी रायफल योग्य असून, त्यातून सुटलेली गोळी लागल्यानंतर शत्रू जायबंदी होतो. त्यामुळे त्याला सुरक्षित ठिकाणी हलवून उपचार करण्यासाठी किमान दोन सैनिकांची गरज लागते; मात्र गेल्या काही काळात युद्धाचे स्वरूप बदलत असून, लष्कराला दहशतवादी हल्ल्यांचाही सामना करावा लागत आहे. अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना समोरील दहशतवाद्याला पहिल्याच प्रयत्नात ठार करणे आवश्यक ठरते. त्यासाठीच ७.६२ मिमी रायफलचा वापर अपरिहार्य ठरतो. जम्मू-काश्मीर, तसेच ईशान्य भारतात सैनिकांकडून ७.६२ मिमी कॅलिबर असलेल्या एके ४७ रायफलचाच वापर केला जातो.

इन्फंट्री सुसज्ज असण्याची गरज

इन्फंट्री अर्थात पायदळ कोणत्याही हवामानात, कोणत्याही परिस्थितीत काम करू शकते. सियाचेनसारख्या प्रतिकूल वातावरणातील जगातील सर्वाधिक उंचीवरच्या युद्धीभूमीवर, राजस्थानातील वाळवंट किंवा जम्मू काश्मीर किंवा ईशान्य भारतातील उंच पर्वतरांगांवरही पायदळ सदैव कार्यरत असते. म्हणूनच पायदळ लष्कराचा कणा मानले जाते. ते अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असणे आवश्यक आहे.

‘लष्कराकडे आवश्यक अशा अत्याधुनिक रायफली उपलब्ध नाहीत. इन्सास रायफल अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे ही मूळ रायफल बदलून त्या जागी नव्या रायफली येणे आवश्यक आहे; मात्र ही रायफल कोणती असावी, याचा निर्णय झालेला नाही. इस्रायली बनावटीची रायफल कदाचित या अपेक्षा पूर्ण करू शकते,’ असे निवृत्त ब्रिगेडिअर आर. आर. पळसोकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

इन्फंट्रीची गरज

- दोन लाखांहून अधिक अॅसाल्ट रायफली

- जवळून लढल्या जाणाऱ्या लढाईसाठी दीड लाखाहून अधिक कार्बाइन्स

- १६ हजारांहून अधिक ७.६२ मिमी हलक्या मशिनगन

- साडेतीन हजारांहून अधिक ७.६२ मिमी स्नायपर रायफली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंक्रोट्रॉनमध्ये भारत सहभागी

$
0
0

मयुरेश प्रभुणे, पुणे

शक्तिशाली क्ष- किरणांच्या झोताद्वारे पदार्थाच्या अतिसूक्ष्म पातळीवर अवस्थांचा अभ्यास करणाऱ्या इटली येथील इलेट्रा सिंक्रोट्रॉनचा थेट वापर करण्याची संधी आता भारतीय शास्त्रज्ञांना मिळणार आहे. भारत आणि इटलीने संयुक्तपणे तयार केलेल्या दोन बीमलाइनचे नुकतेच इटलीच्या त्रिएस्तेमधील संशोधन केंद्रात उद्घाटन करण्यात आले. भारताच्या सहभागातून तयार करण्यात आलेल्या नव्या बीमलाइनच्या निर्मितीमध्ये पुण्याच्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसचे (एनसीसीएस) संचालक डॉ. शेखर मांडे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

‘एक्स्प्रेस’ आणि ‘एक्सआरडी- २’ या नव्या बीमलाइनच्या निर्मितीसाठी भारताचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय (डीएसटी) आणि इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्तरित्या आर्थिक सहकार्य केले आहे. डीएसटीचे सचिव डॉ. आशुतोष शर्मा आणि इटलीचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री फॅब्रिझिओ निकोलेटी यांच्या उपस्थितीत इलेट्रा सिंक्रोट्रॉनच्या दोन नव्या बीमलाइनचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधील (आयआयएस्सी) प्रा. डी. डी. शर्मा, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधील (बीएआरसी) डॉ. एस. एम. शर्मा आणि पुण्यातील ‘एनसीसीएस’च्या डॉ. शेखर मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बीमलाइनची निर्मिती करण्यात आली आहे.

वर्तुळाकार चुंबकीय क्षेत्रातून अत्यंत वेगाने इलेक्ट्रॉनला फिरवून त्यापासून शक्तिशाली आणि अत्यंत सूक्ष्म अशा क्ष-किरणांच्या झोताची निर्मिती इलेट्रा सिंक्रोट्रॉनमध्ये केली जाते. प्रकाशापेक्षा क्ष-किरणांची तरंगलांबी बरीच कमी असल्यामुळे पदार्थाचे जे भाग दृश्यकिरणांनी दिसू शकत नाहीत (रेणवीय पातळीवरील), त्यांची रचना क्ष-किरण धडकवून अभ्यासता येते. इलेट्रा सिंक्रोट्रॉनमध्ये इलेक्ट्रॉनचा स्रोत अखंड सुरू राहत असून, त्याला जोडलेल्या विविध २७ बीमलाइनच्या माध्यमातून क्ष-किरणांच्या साह्याने पदार्थाचे विविध गुणधर्म अभ्यासता येतात.

याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना डॉ. मांडे म्हणाले, ‘भारताच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या एक्सप्रेस या बीमलाइनच्या माध्यमातून अतिदाबाच्या अंतर्गत पदार्थाच्या सूक्ष्म पातळीवरील अवस्थांचा एक्स रे डिफ्रॅक्शनद्वारे अभ्यास करणे शक्य होऊ शकेल. या बीम लाइनमध्ये हिऱ्याच्या साह्याने पदार्थावर वातावरणाच्या तब्बल पाच लाख पटींनी अधिक दाब दिला जातो. नवे गुणधर्म असलेले पदार्थ तयार करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होईल.’

अत्याधुनिक सुविधा

‘भारत आणि इटलीच्या संयुक्त विद्यमाने या बीमलाइनची निर्मिती करण्यात आल्यामुळे दोन्ही देशांना सामान वेळेत या बीमलाइनचा वापर करता येणार आहे. भारतातील पदार्थ विज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना अतिसूक्ष्म पातळीवरील रचना समजून घेण्यासाठी ‘एक्स्प्रेस’ आणि ‘एक्सआरडी- २’च्या रूपाने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. येत्या जानेवारीपासून भारतीय संशोधकांसाठी या बीमलाइन उपलब्ध असतील,’ डॉ. मांडे यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधनातून उलगडला ‘मोक्षपट’

$
0
0

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet : @AdityaMT

पुणे : घराघरात खेळला जाणारा ‘सापशिडी’ हा खेळ साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनीही खेळला असावा, असे दाखले मिळाले आहेत. ज्ञानदेवांच्या काळात हा खेळ ‘मोक्षपट’ या नावाने ओळखला जात होता, असे संशोधनातून समोर आले आहे. डेन्मार्क येथील प्राध्यापक जेकॉब यांच्या संशोधनातून हा ‘मोक्षपट’ उलगडला आहे.

डेन्मार्क येथील डॅनिश रॉयल सेंटरचे संचालक डॉ. एरीक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘इंडियन कल्चरल

ट्रेडिशन’ या संकल्पनेअंतर्गत संत ज्ञानेश्वरांच्या काळात खेळले जाणारे खेळ असा विषय संशोधनासाठी घेतला. त्यासाठी त्यांनी त्या काळी कोणते खेळ खेळले जात असावेत, यावर संशोधन सुरू केले. सापशिडीचा खेळ त्याही काळात खेळला जात होता, अशी माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी भारतभरातून अनेक सापशिड्यांचे पट मिळवले. पण त्यामध्ये ज्ञानदेवांचा उल्लेख कुठेच नव्हता, ज्ञानदेवांची अनेक चरित्रे वाचल्यानंतर त्यांना कुठेही

तशा प्रकारचे संदर्भ सापडले नाहीत. त्यांनी या विषयाबाबत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे विचारणा केली असता मंजुळ यांनी डेक्कन कॉलेजमध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपटा’चा उलगडा झाला. जेकॉब यांना डेक्कन कॉलेजमध्ये रा. चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले आहेत.

ओव्यांद्वारे संदेश

‘मोक्षपटा’च्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे, कोणती कवडी पडली की, काय करावे याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. केवळ गंमत म्हणून सापशिडीचा खेळ खेळणाऱ्या लहान मुलांना आता त्यांचे आई बाबा, आजी-आजोबा मोक्षपटाचा आधार घेत जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगतील. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.

असा आहे मोक्षपट

मोक्षपटाचे दोन्ही पट २० बाय २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. ‘मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच सहा कवड्यांचा वापर करावा लागतो. सहा कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षडरिपूंची नावे त्यांना देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे, तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशाप्रकारे जगावे याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावरील मैत्रिणीवर बलात्कार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

सोशल मीडियावरून ओळख झालेल्या ठाण्यातील १७ वर्षांच्या मुलीवर पुण्यातील एका तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणानं मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्याशी जवळीक साधली होती. ती गरोदर असल्याचं समजताच गर्भपात करण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता, असं पोलिसांनी सांगितलं.

पुण्यातील धायरी परिसरात संशयित तरुण राहतो. त्याचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं असून, सध्या एका खासगी कंपनीत काम करतो. यावर्षी जानेवारीत त्याची सोशल मीडियावरून पीडितेशी ओळख झाली. दोघांची मैत्री झाली. अनेकदा ते ऑनलाइन चॅट करायचे. एकदा त्यानं तिला पुण्याला बोलावून घेतलं. तिला लग्नाच्या भूलथापा देऊन कात्रज येथील एका लॉजवर घेऊन गेला. तिथं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ऑगस्टमध्ये तिनं गरोदर असल्याचं सांगितलं. त्यानं तिच्यावर दबाव टाकून गर्भपात करण्यास सांगितलं, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

पुण्यात गेल्यानंतर तो आपल्याला टाळत असल्याचं तिच्या लक्षात आलं. अखेर तिनं प्रेमसंबंधांबाबत पालक आणि नातेवाइकांना सांगितलं. त्यांनी मंगळवारी पोलीस ठाणे गाठून संबंधित तरुणाविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (POCSO) गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला अटक करू, असं पोलिसांनी सांगितलं.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images