Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​इंजिनीअर भरतीला आचारसंहितेचा खो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेत इंजिनीअरची भरती करण्यासाठी पालिका प्रशासनाने सर्वाधिक जलद प्रक्रिया राबवून परीक्षा घेतली. मात्र त्यानंतरची निवड यादी, पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यास उशीर झाल्याने या भरती प्रक्रियेला आचारसंहितेचा फटका बसला आहे. ही भरती आचारसंहितेमध्ये येत असल्याबाबत स्पष्ट माहिती प्रशासनाकडे नसल्याने प्रत्यक्ष नियुक्ती पत्रे मिळण्यास उमेदवारांना निवडणूक संपण्याची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेत इंजिनीअरची भरती करण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य सरकारच्या ‘महाऑनलाइन’ बरोबर करार करून परीक्षा घेतली. अत्यंत वेगाने आयुक्तांनी ही प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेऊन स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी या तीन विभागांसाठी ही भरती केली. या तीनही विभागांतील २१८ जागांसाठी पालिकेकडे २१ हजार अर्ज आले होते. पुण्यासह इतर शहरांमध्ये एकाच दिवशी ऑनलाइन परीक्षा घेऊन तीन तासांमध्ये त्याचा निकालदेखील जाहीर करण्यात आला होता. पालिका आयुक्त कुमार यांनी केलेल्या या नियोजनामुळे त्यांचे विशेष कौतुकदेखील करण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आल्याने तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. यामुळे या परीक्षा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करण्याची संधी उपलब्ध झाली नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पालिकेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल तातडीने कळत असल्यामुळे उमेदवारांनाही काय झाले ते समजत होते. या तीनही विभागांसाठीच्या प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा ठेवली होती. पालिकेने घेतलेल्या परीक्षेची गुणांच्या प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले होते. मात्र याच दरम्यान, महापालिकेच्या निवडणूक आचारसंहितेची घोषणा झाली. त्यामुळे हे कामच ठप्प झाले आहे. परीक्षेला बसलेल्यांपैकी एकूण किती उमेदवारांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले याचीदेखील एकत्रित माहिती अद्याप प्रशासनाकडे तयार नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळण्यास निवडणूक निकालाची वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​अखेरच्या दिवशी हरकतींचा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रा-रूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचना नोंदविण्याच्या अखेरच्या दिवशी नागरिकांनी हरकतींचा पाऊस पाडला. गेल्या १४ दिवसांत पालिकेकडे अवघ्या चारशे हरकती आल्या होत्या. मात्र, अखेरच्या दिवशी तब्बल ७०० हरकती आणि सूचना पालिकेकडे नोंदविण्यात आल्या. यामुळे पालिकेकडे नोंदविण्यात आलेल्या हरकतींची संख्या ११०० वर जाऊन पोहोचली आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रा-रूप प्रभागरचना महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाने ७ ऑक्टोबरला ही रचना जाहीर केली असून त्यावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी २५ ऑक्टोबरची मुदत दिली होती. १० ते २४ ऑक्टोबर या दरम्यान पालिकेकडे ४०० हरकती नोंदविण्यात आल्या. तर अखेरच्या दिवशी ७०० हून अधिक हरकती आणि सूचना पालिकेकडे दाखल करण्यात आल्या. यामध्ये सर्वात अधिक हरकती या प्रभागाच्या हद्दी तुटल्याबाबत आहेत. तर उर्वरित सूचना प्रभागाचे आरक्षण तसेच प्रभागाची नावे याबाबत आहेत.
महापालिका प्रशासनाकडे नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींवर येत्या ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी होणार आहे. नागरिकांनी घेतलेल्या हरकतींमध्ये प्रशासनाला तथ्य आढळून आल्यास त्यावरील अभिप्रायांसह ही हरकत निवडणूक आयोगाकडे पाठविली जाणार आहे. नागरिकाने घेतलेल्या हरकतीबाबत प्रशासन सहमत नसल्यास तसा अभिप्रायदेखील नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभागरचनेमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार असल्याचे पालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​मौजमजेसाठी दुचाकीचोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मैत्रिणींना फिरवण्यासाठी आणि मौजमजेसाठी विविध कंपन्यांच्या महागड्या दुचाकी चोरणाऱ्या तिघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ड्यूक केटीएम, बुलेट व इतर अशा दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
प्रथमेश गवळी (वय १९, रा. भवानी पेठ), प्रीतम गांजवे (१९, रा. नवी पेठ), रोहन विधाते (१९, रा. जोशीवाडा, नवी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दुचाकी चोरण्यासाठी त्यांनी ‘ड्यूक’ नावाची गँग तयार केली होती. चोरलेल्या दुचाकी त्यांनी कमी किमतीमध्ये नातेवाइकांना विकल्याचे समोर आले आहे. जप्त केलेल्या दुचाकीमध्ये चार केटीएम, तीन बुलेट, एक अॅक्टिव्हा, एक सीबीझेड अशा दहा लाखांच्या दुचाकींचा समावेश आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे उपस्थित होत्या.
फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी महेश साळुंखे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, चोरलेल्या महागड्या दुचाकी विक्री करण्यासाठी मंगळवार पेठेमध्ये तिघेजण येणार आहेत. त्यानुसार फरासखाना पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक महेंद्र जाधव यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. मौजमजा करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी पार्किंग केलेल्या व नवीन केटीएम, बुलेट अशा दुचाकी बनावट चावीने चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपींचा साथीदार संतोष उर्फ अंशूल जाधव (२३, रा. मोहन नगर, धनकवडी) यालाही ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
अटक केलेले आरोपी हे दहावी व बारावीमध्ये शिकलेले आहेत. मुलांच्या या कारनाम्याबाबत त्यांच्या आई-वडिलांना कसलीही माहिती नव्हती. त्यामुळे आई-वडिलांनी आपला मुलगा कोणासोबत फिरतो आणि कोठे जातो याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन हिरेमठ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​रावांची शिकवण मोदी विसरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सत्तेत आल्यावर लगेच भरीव कामगिरी केली, तर आपण जनतेच्या चिरकाल स्मरणात राहतो. ही पी. व्ही. नरसिंह राव यांची शिकवण अटलबिहारी वाजपेयींनी पाळून अणुचाचण्या केल्या. मात्र, नरेंद्र मोदी यांना ही शिकवण समजली नाही. आपल्या पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कोणतीही भरीव कामगिरी केली नाही,’ असे निरीक्षण ज्येष्ठ पत्रकार, लेखक व राजकीय विश्लेषक डॉ. संजय बारू यांनी नोंदवले.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. बारू यांच्या ‘१९९१ - हाऊ पी. व्ही. नरसिंह राव मेड हिस्ट्री’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर ज्येष्ठ संपादक डॉ. दिलीप पाडगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सत्तेत आल्यानंतर तातडीने भरीव कामगिरी केली नाही, तर विरोधकांना बोलायची संधी मिळते, ही नरसिंह राव यांची शिकवण वाजपेयींनी पाळली. परंतु, मोदींना ते जमले नाही.’

डॉ. बारू म्हणाले, ‘आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात राव यांनी अनेक महत्त्वाचे दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले. मात्र, अशा या पंतप्रधानांना त्यांच्या कॉँग्रेस पक्षासह सर्वच जण विसरले. त्यांचे योगदान सर्वांसमोर यावे, यासाठी मी हे पुस्तक लिहिले. पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राव यांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली होती. परराष्ट्रमंत्री म्हणून पूर्वी काम केलेल्या राव यांना जागतिक परिस्थिती आणि संदर्भांचे ज्ञान होते. आर्थिक सुधारणांचा निर्णय त्यांनी जागतिक दबावाखाली येऊन नव्हे, तर जगाच्या आकलनातून आणि तत्कालिन वित्तीय परिस्थितीविषयी असलेल्या भानातून घेतला. जो पुढे योग्य ठरला.’ भारतीय राजकारणात १९८०पर्यंत घराणेशाही नव्हती. इंदिरा गांधी यांनी १९८०मध्ये संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधींना पुढे आणून घराणेशाही सुरू केली, असेही डॉ. बारू म्हणाले.

ममताच कॉँग्रेसच्या तारणहार

कॉँग्रेसचे भवितव्य काय असेल, असे विचारले असता, डॉ. बारू म्हणाले, ‘सध्याच्या कॉँग्रेसमध्ये भविष्यात पंतप्रधान बनेल, असा एकही नेता मला दिसत नाही. कॉँग्रेसला खरेच पुन्हा उभारी घ्यायची असेल, तर सोनिया गांधी यांनी सर्व माजी कॉँग्रेसजनांना मूळ पक्षात एकत्र आणावे आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. सध्या देशात मूळ कॉँग्रेसवासी असलेल्या ममता याच एकमेव लोकनेत्या आहेत.’

राव यांच्यावरील आरोप चुकीचा

डॉ. बारू म्हणाले, ‘बाबरी मशिद पाडण्यात आली, त्या परिस्थितीत उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करणे, शक्य नव्हते. अशा वेळी राज्य सरकारवर नरसिंह राव यांनी विश्वास ठेवला होता. त्यामुळे रावही या कटात सामील होते, असे म्हणणे चुकीचे आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा-सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांचे ‘वन टू वन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांची ‘वन टू वन’ चर्चा करणार असून पुणे परिक्षेत्रातील संवाद कोल्हापुरात होणार आहे. राज्यातील सहा परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांशी ते संवाद साधणार आहेत. चर्चेच्या या कार्यक्रमाची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही.

कायदा-सुव्यवस्था, सद्यस्थितीसह पोलिस दलातील अडीअडचणी, सुधारणा यावरही ते चर्चा करणार आहेत. ​मराठा मोर्चे, त्यामुळे सुरू झालेले इतर मोर्चे; तसेच कोपर्डी घटनेच्या पार्श्वभूमीवर ते अधिकाऱ्यांशी काय संवाद साधणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कोल्हापूर, कोकण, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नांदेड या सहा परिक्षेत्रांतील अधिकाऱ्यांशी फडणवीस हे थेट संवाद साधणार आहेत. फडणवीस यांचा ‘वन टू वन’ हा कार्यक्रम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठरला होता. मात्र, आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम तूर्त पुढे ढकलल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी फडणवीस यांच्या भेटीची जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या कायदा-सुव्यस्थेचा अहवाल त्यांनी मागवला आहे. बेकायदा धंद्यावरही जोरदार कारवाई सुरू केली आहे.

गृहमंत्री हे परिक्षेत्रांतील पोलिस निरीक्षक आणि त्यावरील अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार असून त्यांना येणाऱ्या अडचणी तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत चर्चा करणार आहेत. गुन्ह्यांचे प्रमाण, गुन्ह्यांचे स्वरूप आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत विशेष करून चर्चा होणार असल्याची माहिती, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची; तसेच विधानपरिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने फडणवीस यांनी नियोजित दौरा पुढे ढकलला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाकडूनही मुख्यमंत्री यांना विशेष अहवाल दिला जाणार असून पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांना त्या-त्या ठिकाणची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त डाळ आता दिवाळीनंतरच

$
0
0


Mustafa.Attar

@timesgroup.com

Tweet : @mustafaattarMT

पुणे : तूर डाळीपाठोपाठ हरभरा डाळीचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड राज्यभर होत असून, राज्य सरकारला त्याबाबत उशिरा जाग आली आहे. ऐन दिवाळीत स्वस्त हरभरा डाळ उपलब्ध करण्याऐवजी सरकारने डाळ वितरणाचे काम एका खासगी वितरकाला दिले आहे. ही डाळ दिवाळीनंतरच मिळणार असल्याने फराळ करण्यासाठी तोपर्यंत थांबून राहिल्यास तो दिवाळी संपल्यानंतरच करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. सरकारच्या या ढिलाईबद्दल संताप व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच तूर डाळीचे दर दोनशे रुपयांपर्यंत पोहोचले होते. अगदी तशीच परिस्थिती यंदा हरभरा डाळीबाबत झाली आहे. राज्यात हरभरा डाळीचा तुटवडा निर्माण झाल्याने एका वर्षात या डाळीचे भाव दुप्पट झाले. ही डाळ घाऊक बाजारात प्रति किलो १२० रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो १४० ते १५० रुपये दराने विकण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर, ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडून डाळीच्या आयातीच्या धोरणाबाबत टीका करण्यात येत आहे. सरकारने व्यापाऱ्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. अखेर दिवाळीत डाळीचे दर वाढलेले असल्याने उशिरा जागे झालेल्या सरकारने स्वस्तात डाळ देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एका खासगी कंपनीकडे डाळ वितरणाचे कंत्राट देण्यात आले आहे.

सरकारच्या वतीने खासगी कंपनीकडून दिली जाणारी हरभरा डाळ प्रति किलो ७० रुपये दराने मिळणार आहे. विक्री करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना प्रति किलो ७० पैसे नफा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून हरभऱ्याची खरेदी करण्यात येणार आहे. त्या हरभऱ्याची भरडाई, त्यापासून तयार होणाऱ्या हरभरा डाळीचे एक किलोचे पॅकिंग करणे, तसेच विविध ठिकाणच्या छोट्या वितरकांपर्यंत ती डाळ पोहोचवणे ही जबाबदारी संबंधित एका कंपनीवर सोपवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऐ दिल’वरची ‘मुश्कील’ कायमच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘ए दिल हे मुश्कील’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून एक पडदा चित्रपटगृह संघटना संभ्रमात आहे. पुणे भाजप, मुख्यमंत्री, मुंबईत असलेली मध्यवर्ती संघटना यांपैकी नेमके कोणाचे ऐकायचे, अशी ‘मुश्कील’ पुण्यातील एक पडदा चित्रपटगृह संघटनेसमोर ओढवली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरुवातीला पुणे भाजपचे नेते संदीप खर्डेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक पडदा चित्रपटगृह संघटनेला चित्रपट न दाखवण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन संघटनेने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या सर्व घडामोडींना मुख्यमंत्र्यांनीच खो दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि निर्मात्यांमध्ये चर्चा करून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनाच बुचकळ्यात पाडले. या वादावर पडदा पडून चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा, अशी चर्चा रंगलेली असतानाच आता एक पडदा संघटनाच्या मुंबई येथील मध्यवर्ती संघटनेने चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नेमके करावे काय, असा प्रश्न पुण्यातील संघटनेसमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, मल्टिप्लेक्स थिएटरच्या संघटनेनेही अद्याप चित्रपटासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. परंतु, विरोध शमल्याने त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिवाळीत चित्रपटगृहे भरलेली असतात. त्यामुळे व्यवसाय तेजीत येतो. अशा वेळी चित्रपट प्रदर्शितच केला नाही, तर होणारा तोटा मोठा असेल, असे संघटनेला वाटत आहे. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. आता मध्यवर्ती संघटना त्यांची भूमिका बदलते का, याकडे लक्ष लागले आहे.

चित्रपट प्रदर्शित करावा, की करू नये, यासंदर्भात संघटना संभ्रमात आहे. दिवाळीचे दिवस असल्याने व्यवसाय चांगला होईल; पण काही राजकीय शक्ती देशद्रोही ठरवतील, याची भीती वाटते.

- दिलीप निकम, मालक, विजय थिएटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साक्ष नोंदवण्याची पुन्हा गरज नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नयना पुजारी खून खटल्यामध्ये २७ जणांची साक्ष नोंदवण्याच्या मागणीसंदर्भात सरकारी पक्षाने मंगळवारी आपले म्हणणे मांडले. २७पैकी काही जणांची साक्ष यापूर्वी सविस्तररीत्या मांडली गेली असून पुन्हा त्यांची साक्ष घेण्याची गरज नाही, असे सरकारी पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

नयना पुजारीचे शवविच्छेदन केलेले डॉक्टर, पोलिस कर्मचारी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सिनिक्रॉन कंपनीचे सुरक्षा मॅनेजर, बँकेचे मॅनेजर यांची साक्ष नोंदविणे गरजेचे नाही, असे सरकारी पक्षातर्फे नमूद करण्यात आले आहे.

नयना पुजारी खून खटल्याची सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. बचाव पक्षातर्फे २७ जणांची साक्ष नोंदविण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सरकारी पक्षाला म्हणणे सादर करण्याचा आदेश कोर्टाने दिला होता. विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी या अर्जावर म्हणणे कोर्टाला सादर केला. सरकारी पक्षातर्फे अॅड. निंबाळकर यांनी कोर्टात सादर केले. त्यात म्हटले, ‘२७पैकी काही साक्षीदारांची बचाव पक्षातर्फे कोर्टात सविस्तर साक्ष घेण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा त्यांची साक्ष नोंदविणे अनावश्यक आहे. नयना पुजारीचे शवविच्छेदन केलेले डॉ. सोरटे यांची साक्ष नोंदविणे आवश्यक नाही. न्यायदंडाधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, भारतीय पुरावा कायदा कलम ८०नुसार त्यांची साक्ष नोंदविणे अनावश्यक आहे. गुन्हे शाखेचे युनिट तीनचे के. जी. हंडोरे आणि सय्यद यांची साक्ष नोंदविणे आवश्यक नाही. सिनिक्रॉन कंपनीचे सुरक्षा मॅनेजर, आयसीआयसीआय बँकेचे कल्याणीनगर आणि खडकी शाखेचे मॅनेजर यांची परत तपासणी घेण्याची गरज नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​वेश्या व्यवसाय करणाऱ्या मॉडेलला पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅम्प परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी आलेल्या ‘हायप्रोफाइल’ मॉडेलला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. तिला महंमदवाडी येथील रेस्क्यू होममध्ये ठेवल्यानंतर त्या ठिकाणाहून ती पळून गेली आहे. वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका एजंटला पोलिसांनी अटक केली आहे.

विपुल पवनबहाद्दर दहाल (वय २८, रा. आनंदपार्क, वडगावशेरी, मूळचा आसाम) असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. तर, रोहन (मुंबई), कृष्णा कफाले (रा. विमाननगर) हे फरारी आहेत. या ठिकाणांहून १६ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. एक मॉडेल दोन दिवसांपासून पुण्यात असून ती एजंट विपुलच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने कॅम्प परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. हॉटेलवर सोमवारी मध्यरात्री बनावट गिऱ्हाइकाच्या माध्यमातून पोलिसांनी छापा टाकला आणि मॉडेल व एजंटला ताब्यात घेतले. सुटका केलेल्या मॉडेलची रवानगी महंमदवाडी येथील रेस्क्यू होममध्ये करण्यात आली.

ही मॉडेल मूळची भोपाळ येथील राहणारी आहे. गेल्या काही वर्षांपासून ती मीरा भाइंदरमध्ये राहत आहे. ती मॉडेलिंग, जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात काम करते. विशेष म्हणजे ती स्वतःला पाकिस्तानी क्रिकेटरची प्रेयसी म्हणवत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मॉडेलचे पलायन

पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करताना पकडलेल्या मॉडेलला पोलिसांनी महंमदवाडी येथील रेस्क्यू होममध्ये ठेवले होते. परंतु, येथील महिला व कर्मचाऱ्यांना मंगळवारी पहाटे मारहाण करून ही मॉडेल पसार झाली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाच्या गुणांकनात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत प्रवासी असमाधानी होते. मात्र, विमानतळावर गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे विमानतळाच्या गुणांकनात वाढ झाली आहे. ‘एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल’ (एसीआय) व ‘एअरपोर्ट सर्व्हिस क्लालिटी’ (एएसक्यू) या संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये लोहगाव विमानतळ ४०व्या क्रमांकावरून ३८व्या क्रमांकावर पुढे सरकले आहे.

‘एसीआय’ आणि ‘एएसक्यू’ या संस्थाकडून देशभरातील विमानतळांचा सर्व्हे केला जाते. विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि ग्राहकांचे समाधान या दोन निकषांवर जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या चार टप्प्यात हा सर्व्हे होतो. जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत केलेल्या सर्व्हेमध्ये लोहगाव विमानतळ क्रमवारीमध्ये ४.६२ गुणांसह ४० व्या क्रमांकावर होते. तर, एप्रिल ते जून २०१६ या टप्प्यात झालेल्या सर्व्हेत गुणांमध्ये ०.३ ने वाढ होऊन लोहगाव विमानतळ ४.६५ गुणांसह ३८ स्थानी पोहोचले आहे.

पार्किंग सुविधा, चेक इन वेटिंग, चेक इन स्टाफची कार्यक्षमता, फ्लाइट माहिती फलक, रेस्टॉरन्ट, बँक, एटीएमची उपलब्धता, खरेदीची सुविधा, इंटरनेट वाय-फाय सुविधा, एक्झिक्युटीव्ह लाउंज, स्वच्छतागृहांची उपलब्धता व स्वच्छता, टर्मिनलमधील स्वच्छता, टर्मिनलमधील पायी जाण्याचे अंतर, पासपोर्ट इन्स्पेक्शन, बॅगेज डिलिव्हरी स्पीड आदी निकषांच्या गुणांकनात वाढ झाली आहे. दरम्यान, २०१५मध्ये झालेल्या सर्व्हेत २०१४च्या तुलनेत गुणांकनात घट झाली होती. त्यामुळे यंदा गुणांकनात वाढून सुधारलेल्या क्रमवारीने विमानतळ प्रशासनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मदत करण्याचे प्रमाण कमी

लोहगाव विमानतळावरून इच्छितस्थळी कसे जावे, याबाबत दिशादर्शक फलकासह पुरेशी माहिती उपलब्ध नाही. जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत झालेल्या सर्व्हेत ४.६७ गुण मिळाले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्व्हेत ४.६२ गुणांपर्यत घसरण झाली आहे. तसेच, विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित सौजन्य आणि मदत करण्याचे प्रमाण कमी आहे, असे सर्व्हेतून स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय अभ्यासक्रमात शौर्यकथांचा विसर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्यकथांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा, यासाठी खुद्द संरक्षणमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली असली, तरी मनुष्यबळविकास खात्याकडून त्यावर गेले वर्षभर म्हणावे तसे काम झालेले नाही. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य नंदकिशोर एकबोटे यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

विद्यार्थ्यांना भारतीय सैनिकांनी सीमांवर गाजवलेल्या शौर्याची माहिती व्हावी, देशाप्रती त्यांच्या मनामध्ये आस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने गेल्या वर्षी मे महिन्यात एकबोटे यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहिले. युद्धवीरांच्या कथांचा पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात समावेश करावा, असे त्यांनी पत्रामधून सुचवले होते. विशेष म्हणजे, या पत्राची संरक्षणमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली आणि तत्कालीन मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणी यांना ते पत्र पाठवले आणि योग्य ती कृती करण्याचे निर्देश दिले. या पत्रातून सुचवलेल्या प्रस्तावाची पर्रीकर यांनी प्रशंसा केली. त्यांनी पत्रात म्हटले आहे, ‘युद्धवीरांच्या आणि शौर्यपदकप्राप्त सैनिकांच्या कथांचा शाळेच्या पुस्तकांतून समावेश केला, तर विद्यार्थ्यांना सैनिकांचा त्याग कळेल. एवढेच नव्हे, तर संरक्षणदलामध्ये काम करण्याची तरुणांची इच्छा होईल.’

संरक्षणमंत्र्यांनी दखल घेतली असली, तरी मनुष्यबळविकास खात्याकडून या प्रस्तावावर अद्याप पुढे पाऊल उचलले गेले नाही. स्मृती इराणी यांच्याकडून प्रकाश जावडेकर यांच्याकडे हे खाते आले. खातेबदल झाल्यानंतर जावडेकर यांच्याशीही एकबोटे यांनी पत्रव्यवहार केला आहे. पण, अद्याप त्याला लेखी उत्तर आलेले नाही.

काय आहे प्रस्ताव?

- भारतीय जवानांची युद्धकाळात आणि शांततेच्या काळात भरीव कामगिरी.

- जागतिक स्तरावर भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची दखल.

- अनेक सैनिकांना परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र या शौर्यपदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

- सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत शौर्य कथांचा समावेश नाही.

- या कथांचा समावेश केल्यास देशप्रेमाची भावना शालेय पातळीवर निर्माण होण्याची आशा.


शाळांमध्ये जवानांच्या शौर्यकथांच्या समावेशाबाबत संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण, या प्रस्तावाला मनुष्यबळविकास खात्याकडून मंजुरी मिळण्याची गरज आहे.

नंदकिशोर एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधनातून उलगडला ‘मोक्षपट’

$
0
0

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet : @AdityaMT

पुणे : घराघरात खेळला जाणारा ‘सापशिडी’ हा खेळ साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनीही खेळला असावा, असे दाखले मिळाले आहेत. ज्ञानदेवांच्या काळात हा खेळ ‘मोक्षपट’ या नावाने ओळखला जात होता, असे संशोधनातून समोर आले आहे. डेन्मार्क येथील प्राध्यापक जेकॉब यांच्या संशोधनातून हा ‘मोक्षपट’ उलगडला आहे.

डेन्मार्क येथील डॅनिश रॉयल सेंटरचे संचालक डॉ. एरीक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘इंडियन कल्चरल ट्रेडिशन’ या संकल्पनेअंतर्गत संत ज्ञानेश्वरांच्या काळात खेळले जाणारे खेळ असा विषय संशोधनासाठी घेतला. त्यासाठी त्यांनी त्या काळी कोणते खेळ खेळले जात असावेत, यावर संशोधन सुरू केले. सापशिडीचा खेळ त्याही काळात खेळला जात होता, अशी माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी भारतभरातून अनेक सापशिड्यांचे पट मिळवले. पण त्यामध्ये ज्ञानदेवांचा उल्लेख कुठेच नव्हता, ज्ञानदेवांची अनेक चरित्रे वाचल्यानंतर त्यांना कुठेही तशा प्रकारचे संदर्भ सापडले नाहीत. त्यांनी या विषयाबाबत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे विचारणा केली असता मंजुळ यांनी डेक्कन कॉलेजमध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपटा’चा उलगडा झाला. जेकॉब यांना डेक्कन कॉलेजमध्ये रा. चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले आहेत.

असा आहे ‘मोक्षपट’

मोक्षपटाचे दोन्ही पट २० बाय २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. ‘मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच सहा कवड्यांचा वापर करावा लागतो. सहा कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा षड‍‍रिपूंची नावे त्यांना देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे, तिला सत्संग, दया, सद्‍‍बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशाप्रकारे जगावे याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.

ओव्यांद्वारे संदेश

‘मोक्षपटा’च्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे, कोणती कवडी पडली की, काय करावे याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. केवळ गंमत म्हणून सापशिडीचा खेळ खेळणाऱ्या लहान मुलांना आता त्यांचे आई बाबा, आजी-आजोबा मोक्षपटाचा आधार घेत जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगतील. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.
...
प्राध्यापक जेकॉब यांनी घेतलेला विषय अत्यंत छोटा असला तरी भारतीय संस्कृतीतील जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा आहे. ज्ञानदेवांच्या काळात ‘मोक्षपट’ नावाने खेळली जाणारी सापशिडी आयुष्य कसे जगावे, याबद्दल मार्गदर्शन करते. भारतीय खेळांचे हे सौंदर्य असून ते टिपण्यासाठी जगभरातील संशोधक भारतात दाखल होत आहेत, ही समाधानकारक बाब आहे.
- वा. ल. मंजुळ, ज्येष्ठ संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप कार्यकर्ते उपेक्षितच

$
0
0

महामंडळांसह विविध सरकारी पदांच्या नियुक्त्या रखडल्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘केंद्रात सरकार आले, राज्यातही आले, नेते आमदार-खासदार मंत्री झाले; पण आम्ही अजूनही या ‘अच्छे दिन’ची वाट पाहत आहोत...पूर्वीच्या सरकारप्रमाणेच महामंडळांवरील पदे किंवा साध्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्याही नियुक्ती अजून झालेल्या नाहीत... इतकेच नव्हे, तर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने येणारी संधीही आयारामांनाच देण्यात येत आहे...!’

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना शहरातील पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते आता खुलेपणाने आपल्या व्यथा मांडू लागले आहेत. या दोन वर्षांत नेतेमंडळींना पदे, मानमरातब मिळाला, पण सर्वसामान्य कार्यकर्ता उपेक्षितच राहिला आहे. महामंडळांवरील नियुक्त्या सोडाच साधी विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्तीही दोन वर्षांच्या काळात केल्या गेल्या नाहीत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आयारामां’चेच महत्त्व अबाधित राहिल्याने पक्षातील मूळ कार्यकर्त्याला कोणी वाली आहे का, अशी तक्रारही कार्यकर्ते करत आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मुसंडी मारली. महापालिका निवडणुकीमध्येही भाजपची घोडदौड कायम राहणार असल्याची पक्षात हवा आहे. पण या यशामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्त्याच्या हाताला मात्र काहीही मिळालेले नाही. सत्ता आल्यावर काहीजणांना महामंडळे, वेगवेगळ्या कमिट्यांवर स्थान मिळते, तर इतरांना विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे (एसईओ) पद मिळते. मात्र, यंदा कार्यकर्त्यांना ही पदेही मिळालेली नाहीत. स्थानिक पक्षनेतृत्वाने केलेल्या सूचनेनुसार त्यासाठी कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास बाराशे कार्यकर्त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. यातील बहुतांश कार्यकर्त्यांची पोलिस पडताळणीही करण्यात आली; मात्र, अद्यापतरी त्यांची नेमणूक झाल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही.

राज्य सरकारने बहुतांश महामंडळांवरील नेमणुका केलेल्या नाहीत. पुण्यातील ‘म्हाडा’वर नियुक्तीसाठी जोरदार लॉबिंग वारंवार करण्यात आली. मात्र, येथेही नियुक्ती झालेली नाही. पक्षातील मूळ कार्यकर्त्यांची येथे वर्णी लागावी म्हणून जोरदार मागणी आहे. दुसऱ्या पक्षातील एखादा नेता भाजपमध्ये दाखल होऊन हे महामंडळ ताब्यात घेईल, अशी भीती कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. पूर्वीच्या सरकारनेही पाच वर्षांत अनेक महामंडळांवरील जागा रिक्त ठेवल्या होत्या. आमचे सरकारही हीच परंपरा सुरू ठेवत आहे, अशी टीका करण्यात आली.

आयारामांसाठी त्याग नको

भाजपमध्ये त्यागाची परंपरा असली तरी आता आयारामांसाठी त्याग करायला लागू नये, ही भावनाही वाढीस लागली आहे. भाजपमध्ये सुरू आयारामांची वाढणारी संख्या मूळ कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आणणारी आहे. महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी पक्षांकडून दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना पायघड्या घातल्या जात असल्याची टीकाही वाढू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाज घटला; मात्र धूर वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिवाळीतील फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिस खात्यातर्फे घेण्यात आलेल्या फटाक्यांच्या चाचणी दरम्यान ध्वनी प्रदूषणात घट, तर वायू प्रदूषण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

मंडळातर्फे दरवर्षी दिवाळीपूर्वी फटाक्यांची चाचणी घेतली जाते. मुंबईपाठोपाठ पुण्यातही नुकतीच ही चाचणी घेण्यात आली. यंदा २६ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी करण्यात आली. या फटाक्यांनी पर्यावरण कायद्यानुसार घालून दिलेली १२५ डेसिबल्सची पातळी ओलांडली नाही. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत चाचणीतील फटाक्यांच्या तुलनेत हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले.

चाचणी दरम्यान सुतळी बॉम्बमुळे सुमारे ९९ डेसिबल्स इतकी आवाजाची पातळी निर्माण झाली. माळ लावल्यावर ११६ डेसिबल्स आवाज निर्माण झाला होता. या आधी बॉम्बचा आवाज १३० डेसिबल्सपर्यंत पोहोचायचा. गेल्या दहा वर्षांच्या सातत्याने सुरू असलेल्या जागृतीमुळे हा सकारात्मक बदल यंदा पाहायला मिळाला. मात्र एकीकडे आवाजाची पातळी कमी होत असली तरी मंडळाने निश्चित करून दिलेल्या ८५ डेसिब्लसच्या पुढे हा आवाज असल्याने ध्वनिप्रदूषणाला नागरिकांना सामोरे जावेच लागणार आहे. या चाचणीत निवडलेले बहुतांश फटाके अधिक धूर निर्माण करणारे होते. त्यामुळे त्यांचा अनियंत्रित वापर झाल्यास वायू प्रदूषणात मोठी वाढ होणार आहे. मंडळातर्फे दिवाळीमध्ये राज्यभरातील ८१ केंद्रांवर वायू प्रदूषण आणि १५८ ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची चाचणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा फटाक्यांचा आवाज कमी

$
0
0

शोभेच्या फटाक्यांनी दिसणार आकाशातील नजारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शाळा कॉलेजने विद्यार्थ्यांमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाविषयी केलेली जनजागृती, हरित न्यायाधिकरणाने फटाकांच्या वेळांवर घातलेली बंधने आणि सोसायट्यांतील फटाक्यांसंदर्भातील कडक नियमांमुळे आवाजाच्या फटाक्यांची क्रेझ कमी झाली आहे. या वर्षी दिवाळीतील फटाक्यांचा आवाज कमी होणार असून शोभेच्या फटाक्यांनी आकाशातील रोषणाईचा नजारा पुणेकरांना दिसणार आहे.

दिवाळी म्हणजे फटाके, असे समीकरण आता बदलायला सुरुवात झाली आहे. आवाजाच्या फटक्यांची आवड गेल्या दोन वर्षांपासून कमी होत असून शोभेच्या फटाक्यांची मागणी दरवर्षी वाढते आहे. या वर्षी देखील शोभेच्या फटक्यांना मागणी मिळणार असल्याचे विक्रेत्यांनी मत आहे. महापालिकेने यंदा म्हात्रे पुलाजवळील फटाक्यांच्या स्टॉलला बंदी घातली असली, तरी उपनगरांमध्ये ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉल सजण्यास सुरुवात झाली आहे. शाळेला सुट्ट्या लागल्याने बच्चेकंपनीही फटाक्यांच्या स्टॉलमध्ये घुटमळाताना दिसते आहे.

गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास फटाक्यांच्या विक्रीत दरवर्षी घट होते आहे. शंभर माळ, लड, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब अशा मोठ्या आवाजांच्या फटाक्यांची खरेदी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. लहान मुले आणि व्यापारी विक्रेत्यांचे फटाक्यांचे मुख्य ग्राहक असतात. मात्र बहुतांश शाळांमधील मुले फटाके न उडविण्याची शपथ घेत आहेत, तसेच पालकांकडूनही पाठिंबा मिळत असल्याने मुलांनी फटाक्यांच्या मोहाला आवर घातली आहे. व्यापारी वर्गाकडून आवाजाच्या फटाक्यांऐवजी शोभेच्या फटाक्यांची मागणी वाढली आहे.

याच वेळी हरित न्यायाधिकरणाने वर्षभरापूर्वी एका याचिके दरम्यान रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके उडविण्यावर बंदी घातली आहे. फटाक्यांमुळे होणारा कचरा, अपघात आणि प्रदूषणाचा मुद्दा घेऊन सोसायट्यांनी फटाक्यांसाठी नियमावली तयार केली आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यकर्ते देखील दिवाळी दरम्यान ध्वनी प्रदूषणाची तपासणी करणार आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा फटाक्यांचा आवाज घटणार आहे. मात्र, अनार, फ्लॉवर पॉट, बाण, वायर, दिलखूष अशा शोभेच्या फटाक्यांची मागणी वाढेल, असा अंदाज फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात दुसऱ्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बी. जे. मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर पुण्यात औंध येथे दुसरे सरकारी मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात हे मेडिकल कॉलेज सुरू झाल्यास ससून रुग्णालयावरील ताण कमी होऊ शकणार आहे.

शहरातील लोकसंख्या वाढत चालली असताना, बी. जे. मेडिकल कॉलेज हे एकच सरकारी मेडिकल कॉलेज आहे. मुंबई, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये दोन सरकारी मेडिकल कॉलेज आहेत. मात्र, पुण्यात एकच असल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन आणखी एक मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

औंध जिल्हा रुग्णालयाचा आवार मोठा आहे. त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत. डॉक्टर, इमारतींसाठी जागा या गोष्टी सहजपणे उपलब्ध होणार असल्याने या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारणे शक्य असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

सध्या ससून रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्याकडून रुग्णांवर उपचार करण्यात येतात. मात्र, त्यांची संख्या कमी असल्याने औंध जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारण्याचे सूचवण्यात आले आहे.

मेडिकल कॉलेजसाठी डॉक्टर आणि जागा यांची उपलब्धता विचारात घ्यावी लागते. या दोन्ही बाबी औंधमध्ये आहेत. या ठिकाणी मेडिकल कॉलेज झाल्यास शहराच्या पश्चिमेकडील नागरिकांना ससूनच्या धर्तीवर आरोग्य सेवा मिळू शकणार आहेत.

औंध जिल्हा रुग्णालयात सध्या ग्रामीण भागातील रुग्ण जास्त असतात. या ठिकाणी अल्ट्रा सोनोग्राफी विभाग, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभाग, क्षयरोग विभाग, दंतरोग विभाग, मानसोपचार विभाग, नेत्ररोग विभाग, कान, नाक, घसा विभाग, बालरोग विभाग, लसीकरण विभाग, शस्त्रक्रिया विभाग आदी विभाग आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इटलीच्या सिंक्रोट्रॉनमध्ये भारताचा सहभाग

$
0
0

पदार्थ आणि प्रथिनांचा वेध घेण्यासाठी दोन नव्या बीमलाइन

मयुरेश प्रभुणे, पुणे
शक्तिशाली क्ष- किरणांच्या झोताद्वारे पदार्थाच्या अतिसूक्ष्म पातळीवर अवस्थांचा अभ्यास करणाऱ्या इटली येथील इलेट्रा सिंक्रोट्रॉनचा थेट वापर करण्याची संधी आता भारतीय शास्त्रज्ञांना मिळणार आहे. भारत आणि इटलीने संयुक्तपणे तयार केलेल्या दोन बीमलाइनचे नुकतेच इटलीच्या त्रिएस्तेमधील संशोधन केंद्रात उद्‍‍घाटन करण्यात आले. भारताच्या सहभागातून तयार करण्यात आलेल्या नव्या बीमलाइनच्या निर्मितीमध्ये पुण्याच्या नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसचे (एनसीसीएस) संचालक डॉ. शेखर मांडे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

‘एक्स्प्रेस’ आणि ‘एक्सआरडी- २’ या नव्या बीमलाइनच्या निर्मितीसाठी भारताचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय (डीएसटी) आणि इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्तरित्या आर्थिक सहकार्य केले आहे. डीएसटीचे सचिव डॉ. आशुतोष शर्मा आणि इटलीचे विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री फॅब्रिझिओ निकोलेटी यांच्या उपस्थितीत इलेट्रा सिंक्रोट्रॉनच्या दोन नव्या बीमलाइनचे नुकतेच उद्‍‍घाटन करण्यात आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधील (आयआयएस्सी) प्रा. डी. डी. शर्मा, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधील (बीएआरसी) डॉ. एस. एम. शर्मा आणि पुण्यातील ‘एनसीसीएस’च्या डॉ. शेखर मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बीमलाइनची निर्मिती करण्यात आली आहे.

वर्तुळाकार चुंबकीय क्षेत्रातून अत्यंत वेगाने इलेक्ट्रॉनला फिरवून त्यापासून शक्तिशाली आणि अत्यंत सूक्ष्म अशा क्ष-किरणांच्या झोताची निर्मिती इलेट्रा सिंक्रोट्रॉनमध्ये केली जाते. प्रकाशापेक्षा क्ष-किरणांची तरंगलांबी बरीच कमी असल्यामुळे पदार्थाचे जे भाग दृश्यकिरणांनी दिसू शकत नाहीत (रेणवीय पातळीवरील), त्यांची रचना क्ष-किरण धडकवून अभ्यासता येते. इलेट्रा सिंक्रोट्रॉनमध्ये इलेक्ट्रॉनचा स्रोत अखंड सुरू राहत असून, त्याला जोडलेल्या विविध २७ बीमलाइनच्या माध्यमातून क्ष-किरणांच्या साह्याने पदार्थाचे विविध गुणधर्म अभ्यासता येतात.

याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना डॉ. मांडे म्हणाले, ‘भारताच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या एक्सप्रेस या बीमलाइनच्या माध्यमातून अतिदाबाच्या अंतर्गत पदार्थाच्या सूक्ष्म पातळीवरील अवस्थांचा एक्स रे डिफ्रॅक्शनद्वारे अभ्यास करणे शक्य होऊ शकेल. या बीम लाइनमध्ये हिऱ्याच्या साह्याने पदार्थावर वातावरणाच्या तब्बल पाच लाख पटींनी अधिक दाब दिला जातो. नवे गुणधर्म असलेले पदार्थ तयार करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होईल.’

‘एक्सआरडी- २ या बीमलाइनमधून मायक्रोमॉलीक्युलर क्रिस्टेलोग्राफीच्या साह्याने प्रथिनांची त्रिमितीय रचना समजणे शक्य होणार आहे. प्रथिने किंवा पेशींची त्रिमितीय स्वरूपात रचना समजल्यामुळे विविध रोगांचे स्वरूप समजून घेण्यास, तसेच औषधांचा रेणवीय पातळीवर होणारा परिणाम अभ्यासण्यास या बीमलाइनचा उपयोग होऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.

अत्याधुनिक सुविधा

‘भारत आणि इटलीच्या संयुक्त विद्यमाने या बीमलाइनची निर्मिती करण्यात आल्यामुळे दोन्ही देशांना सामान वेळेत या बीमलाइनचा वापर करता येणार आहे. भारतातील पदार्थ विज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना अतिसूक्ष्म पातळीवरील रचना समजून घेण्यासाठी ‘एक्स्प्रेस’ आणि ‘एक्सआरडी- २’च्या रूपाने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. येत्या जानेवारीपासून भारतीय संशोधकांसाठी या बीमलाइन उपलब्ध असतील,’ डॉ. मांडे यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई; ३५ हजारांचा दंड वसूल

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, येरवडा
फुलेनगर, विश्रांतवाडी आणि धानोरी परिसरात ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. या वेळी सुमारे पस्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या विश्रांतवाडी आणि धानोरी परिसरात अनेक ठिकाणी दुकानदार आणि पथारीवाले कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यास बंदी असताना त्याचा साठा करणारे दुकानदार आणि पथारीवाल्यांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. यातून तब्बल ४५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. बारा व्यावसायिकांकडून सुमारे पस्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ढोले पाटील विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल डमाळे, संजय धावटे, संदीप पवार, मयूर मांढरे, प्रमोद उकिर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी असल्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांनी त्याचा वापर टाळून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. धेंडे यांनी पुणेकरांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत शिरूरला चारचाकींना बंदी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, शिरूर
दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठेत दिवाळीतील चार दिवसांत चारचाकी वाहनांना सकाळी ११ ते सायंकाळी ६च्या दरम्यान प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी केले आहे
यासंदर्भात व्यापारी वर्गाची बैठक घेण्यात आली. या वेळी बोलताना गावडे म्हणाले, ‘मुळातच शहरातील कापड बाजार, हलवाई चौक, सरदार पेठ या परिसर अत्यंत वर्दीळाचा आहे. त्यातच दिवाळीच्या काळात या परिसरात नेहमीपेक्षा अधिक गर्दी होत असते. नागरिक आपली वाहने रस्त्यावर लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गर्दीतून चालत जाणेही अ‍वघड होते. ही कोंडी सोडविण्यासाठी राम आळी कापड बाजार ते डंबेनाला परिसर, मारुती आळी सरदार पेठ हलवाई चौक ते डंबेनाला या भागातील रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनाना प्रवेशबंदी असावी, अशी सूचना गावडे यांनी या वेळी केली.
परंतु या सूचनेला उपस्थित अनेक व्यापाऱ्यांनी चारचाकी वाहनाना प्रवेशबंदी असावी, ही सूचना मान्य केली; परंतु दुचाकी वाहनांना प्रवेशबंदीतून वगळावे अशी मागणी लावून धरल्यावर दुचाकी वाहनांना प्रवेश बंदीतून वगळ्यात आले. व्यापारी वर्गाने दुकानाच्या बाहेरील बाजूच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असेही गावडे म्हणाले. चारचाकी वाहनचालकांनी आपली वाहने विद्याधामसमोर लावावीत अशी सूचनाही त्यांनी केली.
या वेळी सराफ असोसिएशनचे नेमिचंद फुलफगर, व्यापारी महासंघाचे सुरेश बोरा, किराणा व्यापारी संघटनेचे विनय संघवी, धरमचंद फुलफगर, चंद्रकांत बोरा, शरद परदेशी, रमणलाल बोरा यांनी विविध सूचना मांडल्या. नगरसेवक विजय दुगड, संपत लोखंडे, सुनील धाडिवाल, अमोल काळे या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​उत्सवी पहाट होऊ दे सूरमय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मंगलमय दीपोत्सवाची आनंदमयी सुरुवात रसिकांना ‘सूर प्रभात’ या संगीत महोत्सवातून करता येणार आहे. मंगलमय दिवाळीत चार दिवस अभिजात स्वरांची पर्वणी रसिकांना या महोत्सवातून अनुभवता येईल. ‘सूर प्रभात’ या महोत्सवाने रसिकांसाठी दिवाळी स्वरमयी ठरणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या मैफलींचा मीडिया पार्टनर आहे
‘आमदार शिवाजीराव भोसले प्रतिष्ठानतर्फे ‘सूर प्रभात’ ही दिवाळी पहाट मैफल आयोजित करण्यात आली आहे. २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या दिवाळीच्या चार दिवसांत मंगलमयी स्वर मैफलीतून अनुभवता येतील. भोसले नगर येथील भोसले इलाइट सोसायटी शेजारील मैदानावर दिवाळी पहाट रंगणार आहे. पहाटे ५.३० वाजता मैफलीला सुरुवात होईल,’ अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनिल भोसले व नगरसेविका रेश्मा भोसले यांनी दिली.
२९ ऑक्टोबर रोजी ‘बियाँड बॉलिवूड’ या मैफलीत पं. विजय घाटे, अतुल राणिंगा, अनय गाडगीळ, अभिजित भदे, रितेश ओहोळ यांचे वादन, तर शीतल कोलवालकर यांचे कथक नृत्य व सुरंजन खंडाळकर यांचे गायन अनुभवता येईल. मिलिंद कुलकर्णी यांचे निवेदन असेल.
३० ऑक्टोबर रोजी ‘सूरताल’ या मैफलीत ख्यातनाम बासरीवादक हरिप्रसाद चौरासिया यांच्याबरोबर पं. विजय घाटे (तबला) व पं. भवानी शंकर (पखवाज) यांची जुगलबंदी अनुभवता येईल. ३१ ऑक्टोबर रोजी गायक आघाडीचे गायक आनंद भाटे, मंजूषा पाटील व रघुनंदन पणशीकर यांची ‘अभंग आणि नाट्य संगीत’ मैफल रंगणार आहे. १ नोव्हेंबर रोजी ‘सूर निरागस हो’ या प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या सदाबहार मैफलीने ‘सूर प्रभात’ या दिवाळी पहाट मैफलीचा समारोप होईल. हा महोत्सव सर्व रसिकांसाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images