Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​कृषी क्षेत्र लवकरच अभ्यासात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शेतीचा इतिहास ज्ञात व्हावा, यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘देशातील कृषी क्षेत्राचा इतिहास’ या विषयाचा समावेश करण्यात येईल.’ असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.

‘साप्ताहिक विवेक’तर्फे प्रकाशित ‘कृषी आणि पशुसंवर्धन कोशा’चे प्रकाशन फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू चारुदत्त मायी, महिको सीड्सचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र बारबाले, कोशाचे संपादक डॉ. द. र. बापट, कोशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर आदी उपस्थित होते.

फुंडकर म्हणाले, ‘कृषी विद्यापीठांमध्ये ​शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील शेतीचा दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयाचा समावेश कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात येईल. विद्यापीठांच्या होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल.’

जमिनीचे आरोग्य या विषयाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष असते, असे सांगून फुंडकर म्हणाले, ‘शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी पाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.’ ‘शेतीच्या विकासामध्ये शास्त्रज्ञांचा सिंहाचा वाटा आहे. शास्त्रज्ञांकडून विविध प्रकारचे संशोधन केले जाते. त्या संशोधनाचा उपयोग करण्याऐवजी अनेकदा राजकारण आडवे येते.’ असे ते म्हणाले. पशुधन कमी झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला राजकीय पाठबळ मिळणे आवश्यक असते.’ असे मायी यांनी सांगितले. ‘कधीही शेती न करणारे हे झोळ्या घेऊन शेतकऱ्यांच्या हिताबाबत बोलत असतात.’ अशी टीका त्यांनी केली. यावेळी डॉ. बापट यांनी देशातील २०० वर्षांच्या कृषीक्षेत्राच्या इतिहासाचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​मेट्रो हवी निगडीपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्रीय स्तरावरील सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) मंजुरी दिलेला मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते निगडी असावा, अशी आग्रही मागणी पिंपरी-चिंचवडमधून होऊ लागली आहे. सिटीझन फोरमपाठोपाठ आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पहिल्या टप्प्याचा विस्तार करण्याची मागणी केली आहे.

अनेक वर्षांची प्रतीक्षा आणि चर्चेच्या फेऱ्यांनंतर पुणे मेट्रो प्रकल्पाला ‘पीआयबी’ने मंजुरी दिल्यानंतर समाधान व्यक्त करण्यात आले. पिंपरी ते स्वारगेटच्या पहिल्या टप्प्यात या शहरातील पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी भागाचा समावेश आहे. परंतु, हा मार्ग पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने अर्धवट असल्याचा दावा करून सिटीझन फोरमने स्मार्ट सिटी, रेल्वे टर्मिनलपाठोपाठ मेट्रोमध्येही केंद्र सरकारने शहरावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात सरकार दरबारी दाद मागणार असल्याचेही स्पष्ट केले होते.

फोरमनंतर आमदार लांडगे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन दाद मागितली. ते म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने ‘मेट्रो’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प पूर्वनियोजित निर्णयाप्रमाणे निगडी ते स्वारगेट असा पूर्ण करावा, अशी अपेक्षा आहे. दोन्ही शहरातील नागरिकांच्या दृष्टीने निगडी ते स्वारगेट मार्ग सोयीचा आहे. परंतु, मेट्रोच्या नियोजित आराखड्याप्रमाणे स्वारगेट ते पिंपरी पहिल्या टप्प्यात आणि त्यानंतर निगडी-पिंपरी विस्तार दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. मात्र, मेट्रोचा पहिला टप्पा करण्यासच पाच ते सात वर्षे लागणार आहेत. त्यापुढे पुन्हा आणखी काही वर्षे दुसऱ्या टप्प्यासाठी लागतील. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या दृष्टीने निगडीपर्यंत मेट्रोची मर्यादा पहिल्या टप्प्यातच वाढविण्याची गरज आहे.’

उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ट्रान्सपोर्ट हब’ म्हणून निगडीला ओळखले जाते. सध्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून निगडी-दापोडी बीआरटी मार्ग, निगडी-किवळे बीआरटी मार्ग, टर्मिनल, राज्य परिवहन थांबा आणि स्पाईन रस्त्याला जोडणारा मार्ग असे नियोजित वाहतुकीचे मार्ग अस्तित्वात आहेत. त्यामुळेच मेट्रो स्थानकाचे नियोजन सोपे होणार आहे, असे लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वीच्या अन्य योजनांप्रमाणे किमान मेट्रोच्याबाबतीत तरी शहरावर अन्याय होऊ देऊ नका, अशी विनंतीही लांडगे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचीच होती सूचना

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात मार्च २०१५ रोजी पुण्यातील मेट्रोचा पहिला टप्पा निगडीपासून सुरू करावा, अशी सूचना केली होती. मात्र, ‘पीआयबी’ने पिंपरी ते स्वारगेट अशी मंजुरी दिली आहे. वास्तविक, पिंपरीऐवजी निगडी येथून प्रकल्पाला सुरुवात केल्यास खर्चामध्ये बचत होऊन नागरिकांच्या दृष्टीने सुलभ होणार आहे. पहिल्या टप्प्यातच प्रकल्पाचा विस्तार व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्या अनुषंगाने तज्ज्ञांचा सल्ला घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकी देऊन महिलेवर बलात्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पती व मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार केल्याची घटना पिंपरीमध्ये नुकतीच घडली. पालघर मुंबई येथे याबाबत गुन्हा दाखल करून तो पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पालघर येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर, शैलेंद्र कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या एका नातेवाइक महिलेच्या लग्नात शैलेंद्र याची ओळख झाली होती. त्यानंतर तो वारंवार विविध प्रकारे त्रास देत होता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली. फिर्याद दिली होती. त्यानंतर हे वाद मिटविण्यासाठी तसेच पोलिसांकडे दाखल तक्रारी मागे घेण्याबाबत बोलणी करण्यासाठी चिंचवडमधील एका कॉमन फ्रेंडला भेटायचे आहे असे सांगून आणि धमकी देऊन शैलेंद्र याने पीडितेला पिंपरीत आणले होते. त्यानंतर मलाला आणि पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन चिंचवड स्टेशन येथील एका लॉजमध्ये बलात्कार केला. याबाबत महिलेने पालघर येथे तक्रार दिली. त्यानंतर तो गुन्हा तपासासाठी पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. फौजदार रत्ना सावंत तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटक अभिनेत्यापेक्षा मोठे – लागू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘अनेक चित्रपटांमधून आणि नाटकांमधून काम करताना आवडलेली भूमिकाच साकारली. अनेक अनुभव आले आणि प्रसिद्धीही मिळाली. त्यामुळे नाटक नेहमीच अॅक्टरपेक्षा मोठे असते,’ असे मत ज्येष्ठ कलाकार डॉ. श्रीराम लागू यांनी व्यक्त केले.

निगडी रोटरी क्लबच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित ‘गपशप वुईथ नटसम्राट’ कार्यक्रमाचे आयोजन रोटरी कम्युनिटी हॉलमध्ये करण्यात आले होते. या वेळी डॉ. लागू आणि त्यांच्या पत्नी दीपा यांची मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान रनथॉन होप २०१६-१७ अॅपचे उद्घाटन करण्यात आले. क्लबच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी कोठारी, विजय काळभोर, श्याम शिरूर, सुमन शिरूर या वेळी उपस्थित होते.

डॉ. लागू म्हणाले, ‘नटसम्राटची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. ही भूमिका माझ्यानंतर अनेकांनी साकारली. प्रत्येक कलाकारांना वाटते ते करून पहावे, म्हणून ते नटसम्राटची भूमिका करतात. परंतु, या प्रत्येक कलाकाराने आव्हानात्मक भूमिका म्हणून याकडे पहावे.’

निळू फुले आणि डॉ. लागू यांच्यातील मैत्रीचे धागे दीपा लागू यांनी उलगडून दाखविले. त्या म्हणाल्या, ‘निळू फुले हे डॉ. लागू यांचे अतिशय जवळचे मित्र होते. ते घरी यायचे तेव्हा अनेक विषयांवर चर्चा करीत. खास करून राजकारण त्यांच्या आवडीचा विषय होता. दोघांनीही महाराष्ट्रातील अनेक खेड्यांना भेटी दिल्या. त्यातून त्यांना खेड्यातील जनतेचे अनेक प्रश्न समजले. त्यानंतर दोघांनी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ गोळा करून जमा झालेला पैसा खेड्यातील नागरिकांना देण्याचे ठरवले. हे दोघे ज्या वेळी पैसे मागायला जात, त्या वेळी नागरिकांनी त्यांच्याकडील असतील तेवढे जमा केल्याची आठवण मनात कायम आहे.’ डॉ. लागू यांनी साकारलेल्या ठराविक भूमिकांची ‘व्हिडिओ क्लिप’ या वेळी दाखविण्यात आली. सोनाली येवले यांनी आभार मानले. प्रमोद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेड्याकडे चला...

0
0

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आंबी (ता. मावळ) येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील अॅग्रिकल्चर कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खेडेगावात जाऊन शेती आणि शेतीपूरक बाबींचा अभ्यास करता येतो. याद्वारे कॉलेजचे विद्यार्थी ग्रामीण संस्कृतीशी नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याविषयी कॉलेजचे प्राचार्य आणि समन्वयक प्रा. हेमंत डुंबरे यांच्याशी सुनील लांडगे यांनी संवाद साधला.

- ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम बीएस्सी (अॅग्रिकल्चर) पदवीमध्ये कधी असतो? त्याचे स्वरूप काय?

- बीएस्सी पदवीचा अभ्यासक्रम निश्चित आहे. त्यातील चौथ्या वर्षाच्या सातव्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम पूर्ण करावा लागतो. पदवीमध्ये पहिल्या सहा सेमिस्टरमध्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये लेखी आणि प्रात्यक्षिक ज्ञान घेत असतात. सातव्या सेमिस्टरमध्ये खेडेगावात जेथे शेती आहे, शेतकरी जोडधंदे करतात, तिथे जाऊन २० आठवडे प्रत्यक्ष वास्तव्य करतात. त्यामुळे गावातील बहुतांशी बाबींचा जवळून अभ्यास करणे शक्य होते.

- या उपक्रमात विद्यार्थी कोणकोणती कामे, अभ्यास करतात?

- प्रत्येक विद्यार्थ्याला खेडेगावातील एका शेतकऱ्याचा अभ्यास करण्यासाठी निवडले जाते. त्या शेतकऱ्याकडे शेती, पशुधन, सर्व प्रकारची पिके, सर्व प्रकारची शेतीची अवजारे असावीत, हा निकष आम्ही पाळतो. त्यामुळे सर्व बाबींचे निरीक्षण करणे सुलभ होते. त्यातील त्रुटी किंवा सुधारणांचा अभ्यास करता येतो. शेतकऱ्याची सर्व प्रकारची तृणधान्ये, पिके, भाजीपाला, फळपिके यांचा अभ्यास विद्यार्थी करतात. पिके लागवडीपासून ते काढणीपर्यंत; तसेच विक्रीपर्यंतच्या प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. पिकांच्या उत्पादनासाठी किती खर्च येतो आणि विक्रीपासून किती फायदा होतो, याचा सर्वांगीण अभ्यास होते. याशिवाय, शेतकऱ्याच्या पशुधनाचा; पण आर्थिक ताळेबंद मांडला जातो.

- शेतकऱ्यांच्या इतर कोणत्या बाबींचा अभ्यास होतो?

- या वास्तव्य काळात शेतकऱ्यांच्या अन्य बाबींचाही अभ्यास होतो. घरात किती माणसे आहेत, त्यापैकी शेतात किती जण काम करतात, किती जण शिक्षण घेतात, नोकरी करतात याचा लेखाजोखा मांडला जातो. त्यामुळे केवळ शेतीविषयक गोष्टीच नाही, तर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या अनुषंगाने नोंदी केल्या जातात. त्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी निश्चितच होतो. याशिवाय, विद्यार्थी एक आठवडा कृषी विज्ञान केंद्र, कृषी तांत्रिक विद्यालय याचा सखोल अभ्यास करतात. दोन आठवडे कृषिपूरक कंपन्यांमध्ये जाऊनही अभ्यास पूर्ण करतात. त्यानंतर एक हजार गुणांची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी विद्यार्थ्याला दहा विषयांचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये गावामधील उपस्थिती, विविध कार्यक्रमांतील सहभाग, शेतकऱ्यांशी संवाद, शेतामध्ये केलेली वेगवेगळी प्रात्यक्षिके, त्यांचा मांडलेला प्रबंधरूपी अहवाल आणि त्यानंतर तोंडी परीक्षा घेऊन गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

- शेतकऱ्याच्या गावचा अभ्यास केला जातो का? त्यांच्याशी कशा प्रकारे संपर्क साधला जातो?

- गावचा सामाजिक, आर्थिक आणि शेतीविषयक बाजूंनी अभ्यास केला जातो. गावातील बँका, पतपेढ्या, विविध कार्यकारी सोसायट्या, ग्रंथालये, शाळा, हायस्कूल, मंदिरे, मशीद, डोंगर, टेकड्या, रस्ते, नद्या याविषयी नकाशे काढून माहिती घेतली जाते. त्यानंतर संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत कार्यालये यांना पत्र पाठविले जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आमच्या कॉलेजचे विद्यार्थी पदवीपूर्व शिक्षण घेत आहेत. त्यासाठी आपल्या गावात काही विद्यार्थी पाच महिने वास्तव्यासाठी आहेत. या कालावधीत ते गावचा आणि गावातील निवडक शेतकऱ्यांच्या शेती, शेतीपूरक बाबींचा अभ्यास करणार आहेत. त्यांना सहकार्य करून प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती केली जाते. ती बहुतांशरीत्या मान्य केली जाते. त्यामुळे संवादप्रक्रिया सुलभ होते.

- अन्य कोणते उपक्रम राबविले जातात? त्यांची आवश्यकता आहे का?

- गावात प्रात्यक्षिके, गटचर्चा, व्याख्याने, शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चा, भेटी, जनावरांचे लसीकरण, चिकित्सा शिबिरे, आरोग्य आणि रक्तदान शिबिरे, विविध क्रीडा स्पर्धा, वृक्षारोपण, महिला मेळावा, शेतीदिन, शेतकरी मेळावा, कृषीविषयक प्रदर्शने हे उपक्रमही राबविले जातात. एक जुलैला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत कृषी दिन साजरा होतो. त्यात विद्यार्थी कृषी दिंडी काढतात. वृक्षारोपण करतात. मुलांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाते. शासनाच्या ‘आमचा गाव, आमचा विकास’ कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घेतला जातो. त्यामध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घेतात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना गावच्या प्रत्येक गोष्टीच्या अभ्यासासाठी होतो. त्यामुळे या बाबी आवश्यकच ठरतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​कँटोन्मेंटचे रस्त्यावर ‘एलईडी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंटमधील सर्व भागातील रस्त्यांवरील पथदिव्यांसाठी ‘एलईडी’ दिवे वापरल्याने दिवाळीत या भागातील रस्ते उजळून निघणार आहेत. एलईडी दिव्याचा वापर केल्याने पूर्वीच्या वीजबिलात मोठी कपात होणार असल्याने बोर्डाच्या तिजोरीवरील खर्च कमी होणार आहे.

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या वानवडी बाजार, घोरपडी बाजार, भीमपुरा, मोदी खाना, शिवाजी मार्केट रस्ता, भोपळे चौक, सोलापूर बाजार, पूलगेट, महात्मा गांधी रस्ता, ई स्ट्रीट आदी भागात हे दिवे लावले जात आहेत. ‘बोर्डाच्या विविध भागांतील पथदिव्यांसाठी वीज वापरण्यात येत होती. त्याकरिता एका महिन्याला सुमारे बारा लाख रुपये वीज बिल कँटोन्मेंट बोर्डाला भरावे लागत होते. गेल्या वर्षापासून बोर्डाने एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून विविध भागांतील रस्त्यांवर पथदिवे म्हणू एलईडी दिवे लावण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. विविध भागांत दहा हजार एलईडी दिवे लावण्यात आले आहेत,’ अशी माहिती पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी दिली.

सुमारे दहा हजार एलईडी दिव्यामुळे कँटोन्मेंट बोर्डाच्या विविध भागातील रस्ते दिव्यांनी उजळून निघणार आहे. एलईडी दिव्यांमुळे एकूण येणाऱ्या बिलात कपात होणार आहे. सुमारे साठ टक्के बिल कमी होणार आहे. त्यामुळे पूर्वी बारा लाखांचे येणारे बिल आता पाच लाख रुपयांपर्यंत येणार आहे, अशीही माहिती डॉ. यादव यांनी दिली. घोरपडी वानवडी या भागात घनकचरा प्रकल्प (एसटीपी) करण्याचे नियोजन आहे. त्या प्रकल्पासाठी जागांचा सर्व्हे सुरू आहे. त्या भागात जागा न मिळाल्यास महापालिकेशी चर्चा करण्यात येऊन सहकार्य करार करण्याचा प्रयत्न केला जाईल. कँन्टोन्मेंट बोर्ड भागातील घनकचरा प्रकल्प मार्गी लागल्यास बोर्डाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दिवाळीनंतर विद्यार्थ्यांना गणवेश

जूनमध्ये बोर्डातील शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना त्याकरिता गणवेश देण्याची योजना बोर्डाकडून राबविण्यात येते. पंधरा ऑगस्ट उलटून गेल्यानंतरही अद्याप शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात न आल्याने बोर्डाच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला होता. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘येत्या दिवाळीनंतर बोर्डाच्या शाळांतील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील किऑस्क बंद

0
0

परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा आयुक्तांचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकाच ठिकाणी नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची बिले भरता यावीत, यासाठी मोठ्या उत्साहाने सुरू केलेली किऑस्क केंद्र बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या पुढील काळात या केंद्रांच्या कराराचे नूतनीकरण करू नये, असे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. या सुविधा पुरविण्यासाठी पालिकेने वंश इन्फोटेक संस्थेबरोबर केलेल्या दहा वर्षाच्या कराराची मुदत येत्या डिसेंबरमध्ये संपत असल्याने या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स, वीज, टेलिफोन बिल भरणा, तसेच बस, रेल्वे आरक्षण या सेवा एकाच ठिकाणी पुरविण्यासाठी महापालिकेने वंश इन्फोटेक संस्थेसोबत दहा वर्षापूर्वी करार केला होता. या सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने २००६ साली शहरातील अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जागा वंश इन्फोटेक संस्थेला देऊन त्या ठिकाणी विविध सेवा पुरविणारी १५० केंद्र उभारण्याचा करार त्यांच्याबरोबर केला होता. मात्र, या १५० केंद्रांपैकी फक्त ५४ केंद्र सुरू होती. या ५४ केंद्रामध्येही केवळ मिळकत कर चेकने भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. पालिकेने केलेल्या करारानुसार ठरविलेल्या वीज, टेलिफोन बिल, बस, रेल्वे आरक्षण आदी सुविधा पुरविण्यास ठेकेदाराला अपयश आले आहे. याबाबतचे वृत्तही अनेकदा प्रसिद्ध करण्यात आले होते. या केंद्रांमध्ये सुविधा मिळत नसल्याने ही सर्व केंद्र धूळ खात पडल्याचेही समोर आले होते.

पालिकेबरोबर करार करताना वंश इन्फोटेकने १० वर्षांसाठीचा करार मध्येच रद्द करता येणार नाही अशी अट घातली होती. त्यामुळे वंश इन्फोटेकची सुविधा समाधानकारक नसली तरी त्यांच्यासोबतचा करार प्रशासनाला रद्द करता येत नव्हता. त्यामुळे ही केंद्रे पोसण्याचा वर्षाला ५० लाख रुपयांचा भुर्दंड पालिकेला सहन करावा लागत होता. हा करार डिसेंबर २०१६ मध्ये संपणार आहे. हा करार पालिकेने रद्द केला नाही, तर आपोआप त्याचे नूतनीकरण होइल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे त्या ठेकेदाराला नोटीस देऊन त्यांच्या सोबतचा करार संपुष्टात आणवा यासाठी सजग नागरिक मंचाच्या वतीने आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर हा करार रद्द करण्याची नोटीस आयुक्तांनी बजावली असल्याचे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

किऑस्कच्या जागा बँकांना द्या

नागरिकांच्या हितासाठी महापालिकेने उभालेली ही किऑस्क बंद पडलेली आहेत. याचा कोणताही फायदा पालिकेला होत नाही. ही सर्व केंद्र शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्याने पालिकेने टेंडर काढून ही जागा बँकांना एटीएम सुरू करण्यासाठी द्यावी, यामुळे पालिकेला देखील उत्पन्न मिळू शकते. टेंडर प्रक्रिया राबवून पालिकेने हे करावे, अशी मागणी वेलणकर यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लेक्स उभारणीसाठी भाजपची नियमावली

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औंध येथे इच्छुक भाजप उमेदवाराच्या फ्लेक्सवर कुख्यात गुंड बाबा बोडकेचा फोटो झळकल्यानंतर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने आता फ्लेक्स लावण्यासाठीही नियमावली जारी केली आहे. फ्लेक्सवरील मजकूर आणि फोटो संबंधित मतदारसंघाच्या अध्यक्षाला दाखवावेत आणि त्यांच्या परवानगीनंतरच ते लावावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
औंध येथील इच्छुक भाजपच्या उमेदवाराच्या फ्लेक्सवर आमदारांसह, बोडके याचे फोटो झळकले होते. याच दरम्यान बोडकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बोडकेचा फोटो फ्लेक्सवर झळकतो, तो मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतो या घटनांमुळे सत्ताधारी भाजपमध्ये झालेला गुन्हेगारीचा शिरकाव यावरून जोरदार चर्चा रंगली. या ‘फ्लेक्स वॉर’ची गंभीर दखल घेऊन भाजपने फ्लेक्स लावण्यासाठी नियमावली जारी केली आहे.
फ्लेक्स लावण्याआधी त्यावरील नावे, फोटो तसेच फ्लेक्सची प्रिंट संबंधित मतदारसंघाच्या अध्यक्षाला दाखवावी. त्यांनी परवानगी दिल्यानंतरच फ्लेक्स लावण्यात यावेत, असे आदेश दिल्याची माहिती खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. फ्लेक्स लावताना संबंधित मतदारसंघाच्या अध्यक्षाला त्याबाबत माहिती असली पाहिजे. कोणाचेही परस्पर फ्लेक्स लावायचे नाहीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंगळ संदेशाचे ग्रहण

0
0

मयुरेश प्रभुणे, खोडद

युरोपियन स्पेस एजन्सीची (इसा) अवकाश कुपी मंगळावर उतरण्याची घटना पुण्याजवळील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपने (जीएमआरटी) बुधवारी यशस्वीरीत्या टिपली. मंगळाच्या वातावरणात सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून ४२ मिनिटांपर्यंतचा अवकाश कुपीचा प्रवास ‘जीएमआरटी’च्या यंत्रणेमध्ये नोंदला गेला. मात्र, अवकाश कुपी यशस्वीरीत्या मंगळावर उतरली की नाही, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
‘इसा’चे अवकाशयान मंगळाच्या कक्षेत पोहोचले असून, त्यावरील अवकाश कुपी मंगळावर उतरवण्याचा प्रयोग बुधवारी करण्यात आला. या अवकाश कुपीकडून येणारे अत्यंत क्षीण सिग्नल पकडण्याची जबाबदारी ‘जीएमआटी’वर सोपवण्यात आली होती.
‘जीएमआरटी’च्या कंट्रोलरूममध्ये बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास कुपीकडून येणारे सिग्नल मिळू लागताच शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातारवण संचारले. त्यानंतर आठ वाजून २१ मिनिटांनी कुपीने मंगळाच्या वातारवणात प्रवेश केला. कुपीकडून शेवटचा सिग्नल आठ वाजून २७ मिनिटांनी मिळाला. ‘कुपीचा मंगळाच्या वातावरणातील प्रवासाचे सिग्नल कंट्रोल रूममधील स्क्रिनवर पाहता आले. मात्र, त्यानंतर कुपीशी संपर्क तुटला. शास्त्रज्ञांना अपेक्षित असणाऱ्या बहुतेक सर्व घटना पूर्ण झाल्या असून, कुपी सुस्थितीत मंगळावर उतरली की नाही हे हाती आलेल्या माहितीच्या विश्लेषणानंतर समजेल,’ असे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सचे (एनसीआए) अधिष्ठाता प्रा. यशवंत गुप्ता यांनी ‘मटा’ला सांगितले.
..
अतिशय क्षीण सिग्नल
‘इसा’च्या अवकाश कुपीकडून आलेला सिग्नल हे अत्यंत क्षीण होते. एखाद्या घरामध्ये लावण्यात येणाऱ्या पाच वॉटच्या दिव्याइतके क्षीण सिग्नल ‘जीएमआरटी’च्या कंट्रोल रूममध्ये नोंदले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक समायोजनाचेही तीन-तेरा

0
0

शिक्षण खात्याचा अजब कारभार; सर्व नियम धाब्यावर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिपायांना शिक्षक म्हणून काम करण्याची परवानगी देणारे पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ उपसंचालक कार्यालयाने पाठविलेल्या शिक्षकांच्या समायोजनाकडेही दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आले आहे. अशाच काही अतिरिक्त शिक्षकांवर उपसंचालक कार्यालयात क्लार्क वा शिपायांची कामे करण्याची वेळ आल्याने, राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शिपायांना शिक्षक म्हणून काम करण्याची परवानगी दिल्याची बाब ‘मटा’ने बुधवारी उघड केली. शिपायाने केलेल्या विनंतीवरून त्याला त्याच पगारात शिक्षक पदाची जबाबदारी पार पाडण्याची संधी मंडळाने दिल्याचेही समोर आले. शिपाई पदावरील उमेदवाराला बढती वा पदोन्नती म्हणून थेट शिक्षक करता येत नाही. नियमानुसार भरती प्रक्रियेमधून समोर येणाऱ्या उमेदवारांनाच सरकारी नियमांनुसार शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते. सरकारी शाळांमधून तरी किमान अशाच पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती होणे अपेक्षित असते. मंडळाने मात्र, सारेच नियम धाब्यावर बसविल्याची टीका शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या विषयी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे विचारणा केली असता, शिक्षण मंडळ समायोजनाच्या प्रक्रियेकडेही दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात आले. उपसंचालक कार्यालयाने समायोजनाच्या प्रक्रियेसाठी म्हणून मंडळाकडे असलेल्या रिक्त जागांचा विचार करून काही शिक्षकांची नावे मंडळाकडे कळविली होती. मंडळाने मात्र या शिक्षकांचे समायोजन केले नाही. त्यामुळे हे शिक्षक पुन्हा उपसंचालक कार्यालयाकडे आल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाकडून मिळाली. शिक्षकांचे समायोजन होत नसल्याने, अखेर उपसंचालक कार्यालयाने या शिक्षकांना कार्यालयातील इतर जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच हे शिक्षक सध्या क्लार्क वा शिपाई पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘द्विभाषिक’ योजना बासनात

0
0

शाळांनी निधीतून पुस्तक खरेदी केल्याचे कारण; खात्यातील गोंधळावर शिक्कामोर्तब

Aditya.Tanawade@timesgroup.com
Tweet : @AdityaTanawade

पुणे : राज्य सरकारने सुरू केलेली द्विभाषिक पुस्तक योजना पुरती बारगळली असून, शाळांना पुस्तके पोहोचण्याआधीच योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील सावळागोंधळ पुन्हा समोर आला आहे.
द्विभाषिक पुस्तक योजनेतील निधीतून बहुसंख्य शाळांनी पुस्तके खरेदी करायला सुरुवात केल्याचे कारण देऊन योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. यावरून शिक्षण विभागाचा राज्यातील शाळांवर आणि संबंधित व्यवस्थापनावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्या परिषदेच्या वेबसाइटवर निवडण्यात आलेली पुस्तके, संबंधित प्रकाशकांची यादी आणि द्विभाषिक पुस्तक योजनेची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. ही माहिती वेबसाइटवरून काढून टाकावी, अशा सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे विद्या परिषदेला देण्यात आल्याने या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
द्विभाषिक योजनेसाठी निवडण्यात आलेल्या प्रकाशकांनी १२ कोटींहून अधिक रुपयांची पुस्तके छापली आहेत. सरकारने योजनेलाच स्थगिती दिल्याने पुस्तकांचे पुढे काय होणार, याबाबत प्रकाशकही संभ्रमात पडले आहेत. १५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे निमित्त साधून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. या दिवसापर्यंत द्विभाषिक पुस्तके सर्व शाळांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते. राज्य सरकारने त्यासाठी शालेय स्तरावर निधीचे वाटप केले खरे, मात्र पुस्तकांच्या वितरणासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने वाचन प्रेरणा दिनापर्यंत पुस्तके शाळांपर्यंत पोहोचू शकली नाहीत.
दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी द्विभाषिक पुस्तक योजनेत निवड झालेल्या प्रकाशकांची शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे (विद्या परिषद) येथे तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. योजना पुन्हा सुरू झाल्यानंतर सर्व शाळांनी ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची खरेदी करावी, अशी सूचना बैठकीत देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्विभाषिक योजनेतील पुस्तके विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार नाहीत. याशिवाय महाराष्ट्रातील ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर किती केला जातो, किती शाळांमध्ये ती व्यवस्था आहे, याबाबतही शंका आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची खरेदी-विक्री करण्याची कोणतीही व्यवस्था नसताना राज्य सरकार आणि शिक्षण विभागाला हा साक्षात्कार कसा झाला, हा साक्षात्कार योजनेच्या सुरुवातीलाच का नाही झाला, असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत.
..
द्विभाषिक पुस्तक योजनेतील पुस्तके ऑनलाइन पद्धतीने शाळांनी घ्यावीत, याला प्रकाशकांचा विरोध आहे. थेट प्रकाशकांकडून ऑनलाइन पद्धतीने ही पुस्तके शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत शाळा पुस्तके कशी खरेदी करणार, याबाबत संभ्रम आहे. योजनेची निविदा प्रक्रिया सुरू करतानाच सरकारने याचा विचार करायला हवा होता. ऑनलाइन यंत्रणा उभारण्यासाठी प्रकाशकांना पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही. शिवाय ही पुस्तके शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित असणारा खर्च कोण करणार, याबाबतही संभ्रम आहे.
राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांसमोरच आईची आत्महत्या

0
0

चाकण-येलवाडी येथील धक्कादायक प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘मी आता मरणार आहे,’ असे सांगून साक्षात जन्मदात्रीने चिमुकल्यांसमोर गळफास घेऊन मरणाला कवटाळले. रात्रभर दोन्ही चिमुरडी आईच्या मृतदेहाला बिलगून रडूनरडून झोपली. सकाळी उठल्यावर मुलांच्या रडण्याचा आवाज ऐनूक शेजाऱ्यांनी दार तोडून मुलांना बाहेर काढले आणि पोलिसांना बोलावले. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना चाकण-येलवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (दि. १८) घडली.
काजल राहुल मोहिते (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल यांचे पती सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. सोमवारी (१७ ऑक्टोबर) पती रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. काजल यांच्यासह मुलगा संग्राम (५ वर्षे) आणि मुलगी लक्ष्मी (२ वर्षे) घरात होते. रात्री उशिरा काजल यांनी ‘मी आता मरणार आहे,’ असे सांगून साडीच्या मदतीने गळफास घेतला. त्यानंतर तडफडत असतानाच त्यांनी हातातील चाकूने साडी कापून गळफास सोडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
साडी कापल्याने काजल खाली पडल्या. त्यांच्या तोंडाला जखम झाली. हा सर्व प्रकार संग्राम आणि लक्ष्मी पाहत होते. ते पाहून ते घाबरले आणि रडू लागले. रडतारडताच ते झोपी गेले. सकाळी जाग आल्यावर पुन्हा त्यांनी मोठमोठ्याने रडण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी मोहिते यांच्या घराचा दरवाजा तोडला. आत पोहोचल्यानंतर काजल यांचा मृतदेह खाली पडलेला आढळून आला. त्यांच्या गळ्यात साडी आणि हातात चाकू असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
...
‘आई, असे करू नकोस’
पोलिसांनी घाबरलेल्या संग्रामला धीर देऊन घडलेल्या प्रकाराविषयी विचारले. ‘तू असे करू नकोस, असे मी आईला सांगत होतो. मात्र, तिने ऐकलेच नाही,’ असे संग्रामने पोलिसांना सांगितले. हवालदार विलास गोसावी, अमोल बोराटे यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चाकण ग्रामीण हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सहायक निरीक्षक महेश चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडली पोस्टाची न्यारी दुनिया

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशातील टपाल सेवेचा राजे-रजवाड्यांच्या काळापासूनचा इतिहास....त्यानंतर कालानुरूप होत गेलेले बदल...पोस्टाच्या तिकिटांची आणि त्यातील कथांची रंगतदार सफर...पत्रपेटीत पत्र टाकल्यानंतर इच्छित स्थळापर्यंतच्या प्रवासातील विविध टप्पे बुधवारी पुणेकरांसमोर उलगडले.
निमित्त होते... जागतिक पोस्ट दिनानिमित्त पोस्टाच्या पुणे विभागातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमाचे. पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांच्या पत्र आणि पोस्टाच्या आठवणींशी संबंधित ‘हार्दिक’ या पुस्तकाचे प्रकाशन अधिकारी आणि पोस्टमनच्या हस्ते करण्यात आले.
पोस्टाचे प्रवर अधीक्षक (पूर्व) अभिजित बनसोडे, अविनाश देशमुख (पश्चिम) या वेळी उपस्थित होते. पोस्टातर्फे घेण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेत विभागीय स्तरावर ज्ञानदा निरगुडे, दीक्षा छाजेड आणि निकिता वर्मा यांना अनुक्रमे प्रथम, द्वितिय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पोस्टाची पाकिटे, कव्हर, जगातील पहिले तिगीट, जगभरातील दुर्मिळ तिकिटे, तिकिटे गोळा करण्याचा छंद, जगभरातील प्रसिद्ध तिकिट संग्राहक, या छंदाचे फायदे अशा विविध गोष्टी टपाल तिकीट संग्राहक प्रतिसाद नेऊरगावकर यांनी सादरीकरणाद्वारे उलगडल्या. त्यानंतर स्मिता सोहनी यांनी पोस्टाचा इतिहास आणि टपालाचा प्रवास उलगडला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रा. वर्षा तोडमल यांनी दवणे यांच्याशी संवाद साधला.
‘पत्र म्हणजे कागदावर खरडणे नव्हे तर, व्यक्त होणे होय. आपण पत्र लिहितो, वाचतो तेव्हा भावना हृदयातून भावना व्यक्त होतात. ही भावना लक्षात घेऊनच मी या पुस्तकाला हार्दिक हे नाव दिले. पत्र संस्कृती हरवणे म्हणजे भावनांची संस्कृती हरवणे. सर्व गोष्टींचे शॉर्टफॉर्म वापरून आपण त्यातील मूळ गंध हरवून कृत्रिमता वाढवतो आहोत,’ असे दवणे म्हणाले. त्यांनी हे पुस्तक पोस्टमन, पोस्ट विभाग आणि लहान मुलांना अर्पण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात पाच ठिकाणी आगी; पुण्यात पाच ठार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुंबई-पुण्यासह राज्यात पाच ठिकाणी आज आग लागण्याच्या दुर्घटना घडल्या. यापैकी पुण्यातील तळेगाव-चाकण रस्त्यावर एका कंपनीच्या गोदामाला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अन्य ठिकाणच्या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.

तळेगाव-चाकण रस्त्यावरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. यात चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

> मुंबईत कांदिवली येथील कचऱ्याला लागलेली आग अग्निशमन दलानं आटोक्यात आणली आहे. लालजीपाडा येथील के. डी. कम्पाउंडमधील केबल व प्लास्टिकला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.

> औरंगाबादमधील शेंद्रा भागातील दोन कंपन्यांना मध्यरात्री भीषण आग लागली. आदित्य इंटरप्रायजेस आणि व्हिनस कंपनी अशी कंपन्यांची नावं असून या आगीत मोठी आर्थिक हानी झाली आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

> पुण्यात वारजे-माळवाडी परिसरात पीएमपीएमएलच्या बसला भीषण आग लागली. सुदैवानं या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. सीएनजीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही बस वारजेहून चिंचवडच्या दिशेनं निघाली होती. आग लागल्याचं कळताच ड्रायव्हरनं बस बाजूला घेतली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

> सांगली एमआयडीसीमधील प्लायवूडच्या कारखान्याला पहाटेच्या सुमारास आग लागली. प्लायवूडमुळं ही आग लगेचच भडकली. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेच्या स्वबळाच्या निर्णयाचे स्वागत : बापट

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महापालिका निवडणुकीतील युतीबाबत सर्व पक्षांशी चर्चा व्हायची आहे; पण चर्चा न करताच शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याचे स्वागतच आहे’, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उपरोधिक टोमणा मारला.
शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी महापालिका निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले. त्याबाबत बापट यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘महापालिका निवडणुकीतील युतीचे सर्वाधिकार भाजप नेतृत्वाने स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यामुळे, शिवसेनेसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम अशा सर्वांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर, अंतिम निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वीच, शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे.’
शिवसेनेसोबत युती करावी की नाही, याबाबत पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत, अशी कबुली देतानाच सर्व खासदार-आमदार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच त्याबाबत स्पष्टता येईल, असे त्यांनी नमूद केले. पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्येही भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी केला.

पदाधिकारी निवडणूक आयोगाकडे
विधान परिषदेची निवडणूक बुधवारीच जाहीर झाली असली, तरी ही निवडणूक पुढे नेता येईल का, या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी गुरुवारी नवी दिल्लीला निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेण्यास गेले होते, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीत कोणताही बदल झाला नाही, तर भाजपतर्फे विधान परिषदेसाठी उमेदवार उभा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपतर्फे महापालिका निवडणुकीसाठी हंगामी स्वरूपात उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन आज, शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पक्षातर्फे सुरू असलेल्या तयारीचा त्यांनी या वेळी सविस्तर आढावा घेतला. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते.

प्रवेश देताना काळजी घेऊ
भारतीय जनता पक्षातर्फे गेल्या काही दिवसांत इतर पक्षांतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना प्रवेश देण्यात आला. त्यावरून, खूप टीका झाल्यानंतर आता त्याबाबत खबरदारी घेण्याची भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी मांडली. ‘कोणालाही पक्षात प्रवेश देताना, त्याची राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीचा आढावा घेण्यात येईल. संबंधितांच्या प्रवेशाने भाजपच्या प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही, याविषयी दक्ष राहू. तसेच, प्रवेश दिलेल्या प्रत्येकालाच निवडणुकीत तिकीट मिळेल असे नाही’, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.


पुण्याच्या मेट्रोचे काम नागपूर मेट्रोला देण्यावरून सुरू असलेल्या वादाबाबत मुख्यमंत्र्‍यांशी सविस्तर चर्चा करणार आहे. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्याविषयी मत व्यक्त करता येईल.
गिरीश बापट, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थकबाकीदारांविरोधात ‘महावितरण’ची मोहीम

0
0

बिल न भरल्यास होणार वीजपुरवठा खंडित
म. टा. वृत्तसेवा, बारामती
परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील साडेपाच लाख ग्राहकांकडे वीजबिलाची ७७ कोटी ९६ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी ‘महावितरण’ने धडक मोहीम सुरू केली आहे. यात बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी त्वरित भरून कारवाई टाळावी, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
बारामती परिमंडलात येणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यांसह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज वापरासाठीची थकबाकी ७८ कोटींच्या घरात गेली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी ‘महावितरण’ने विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीदारांना थकबाकी भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीत बिल न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
बारामती मंडलातील एक लाख ३७ हजार २३० ग्राहकांकडे २७ कोटी १७ लाखांची थकबाकी आहे. सातारा मंडलातील एक लाख ७९ हजार ५२९ ग्राहकांकडे १९ कोटी ४४ लाखांची थकबाकी आहे, तर सोलापूर मंडलातील दोन लाख ३३ हजार ७३९ ग्राहकांकडे ३१ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे. परिमंडल पातळीवरून नियमितपणे या मोहिमेचा आढावा घेण्यात येणार आहे. जनमित्र, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंत्यांसह संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता अशी ‘महावितरण’ची संपूर्ण यंत्रणा या मोहिमेत सहभागी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडे आपली थकबाकी तातडीने भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

०००
घरबसल्याही भरू शकता बिल
वीजग्राहकांना आपले बिल भरण्यासाठी विविध पर्याय ‘महावितरण’ने उपलब्ध करून दिले आहेत. वीजबिल भरणा केंद्रांसोबतच ग्राहक आपली बिले घरबसल्या इंटरनेटवरून नेटबँकिंगद्वारे अथवा डेबिट/क्रेडिट कार्ड वा कॅश कार्डद्वारे भरू शकतात. तसेच, स्मार्टफोनवर महावितरण अॅपवरही बिल भरण्याची सोय आहे. यात ग्राहकांचा वेळ वाचेल आणि बिल भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.
०००००
- मंडल - ग्राहक - थकबाकी
- बारामती - १,३७,२३० - २७,१७,००,०००
- सातारा - १,७९,५२९ - १९,४४,००,०००
- सोलापूर - २,३३,७३९ - ३१,३५,००,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीरोडवर फटाके स्टॉल उभारल्यास आंदोलन

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
म्हात्रे पुलाजवळील डीपीरोडवर फटाके स्टॉल्स उभारण्यास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र, प्रशासनाने तसेच पालिकेतील लोकप्रतिनिधींनी या रोडवर स्टॉल उभारण्यास परवानगी दिल्यास आंदोलन उभारून प्रसंगी पालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी या भागातील रहिवाशांनी केली आहे.
दिवाळीत डीपीरोडवर फटाके स्टॉल्स उभारण्यास दर वर्षी पालिकेकडून परवानगी दिली जाते. मात्र, या भागात होत असलेली वाहतुकीची कोंडी तसेच सुरक्षितता लक्षात घेऊन येथे पालिकेने परवानगी देऊ नये, अशी भूमिका वाहतूक पोलिस तसेच अग्नीशमन दलाकडून घेतली जाते. या भागात होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे स्टॉल उभारण्यास मान्यता देऊ नये, अशी मागणी गेली अनेक वर्षे येथील रहिवाशी करत आहेत. गेल्या वर्षी देखील या भागातील नागरिकांनी विरोध केला होता. त्यावेळी पुढील वर्षीपासून प्रशासन स्टॉल उभारण्यास परवानगी देणार नाही, असे आश्वासन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले होते. फटाका विक्रेत्यांनी देखील पुढील वर्षी परवानगी मागणार नाही, असे हमीपत्र पालिकेला दिले होते. या भागातील नागरिकांचा फटाका स्टॉलला होत असलेला विरोध लक्षात घेता प्रशासनाने यंदाच्या वर्षी दिवाळीत या रोडवर स्टॉल उभारण्यास मज्जाव केला आहे. फटाका विक्रत्यांनी देखील वडगावशेरी भागातील एका खासगी जागेवर आपले स्टॉल उभारण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला दोन दिवसांपूर्वीच्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी विरोध केला. फटाका विक्रत्यांची‌ बाजू घेत या भागात स्टॉल उभारण्याची मान्यता द्यावी, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. पक्षनेत्यांना विश्वासात न घेता प्रशासन परस्पर निर्णय कसा घेते, अशी विचारणा करत सभासदांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पक्षनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडून त्यावर निर्णय घेतला जाइल, असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी दिले. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला आहे. या रोडवर पालिकेने फटाका स्टॉल उभारण्यास मान्यता दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. फटाके विक्रेत्यांनी वडगावशेरी येथे स्टॉल उभारलेले असताना डीपीरोडवर पुन्हा स्टॉल उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक का करत आहेत, अशी विचारणा स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या भागात वाहतुकीची कोंडी होत असल्याने फटाका स्टॉलसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिक नागरिक संजय देशपांडे यांनी केली.



डीपीरोडवर फटाके स्टॉलची परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांची आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला असतानाही त्यामध्ये बदल झाल्यास आम्ही आंदोलन करू.
- शिवा मंत्री, माजी स्थायी समिती अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना लढणार स्वबळावर

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे त्रिकुट शहराच्या विकासाच्या मार्गावरील अडथळे असून, या कारभाऱ्यांना बदलण्यासाठी महापालिकेच्या आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवेल, असे शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी गुरुवारी जाहीर केले. महापालिका जिंकण्यासाठी आम्हांला युतीची गरज नसून, बहुमत मिळविण्यासाठी शिवसेना सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत पक्षाच्या सर्व खासदार-आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत असतानाच, पुण्याच्या आगामी निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीनिशी स्वतंत्रपणे लढेल, असे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाणीपुरवठा, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, आरोग्य अशा शहराच्या अनेक मूलभूत समस्या अजून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दूर करता आल्या नाहीत. त्यांच्या निष्क्रियतेचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून, नागरिकांनाही आता बदल हवा आहे, असा दावा त्यांनी केला. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असले, तरीही एक खासदार-आठ आमदार शहराचे प्रश्न सोडवू शकलेले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

मंगळवारी परिवर्तन मोर्चा
महापालिकेची सत्ता गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर तत्पूर्वी काँग्रेसने एकहाती १५ वर्षांची सत्ता उपभोगली. या २५ वर्षांतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला पुणेकर जनता कंटाळली असून, त्यांना परिवर्तन हवे आहे. ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपकडूनही भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे, नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी येत्या मंगळवारी (२५ ऑक्टोबर) शिवसेनेतर्फे महात्मा फुले मंडईपासून महापालिकेवर ‘परिवर्तन मोर्चा’ काढण्यात येणार आहे, असे विनायक निम्हण यांनी सांगितले.

कोण संजय काकडे?
‘महापालिका निवडणुकीत शिवसेनेची युती नकोच,’ असे मत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी बुधवारी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्याचा ‘कोण हा काकडे, त्याला कोणी विचारलं?’ अशा शब्दांत समाचार घेत, शिवसेना कोणत्याही निवडणुकीसाठी सज्ज आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले. तसेच, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा की नाही हे पक्ष नेतृत्व निश्चित करेल; पण भाजपच्या उमेदवाराला मत देणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

भाजपला टोला
नवी प्रभागरचना जाहीर झाल्यापासून भाजपमधील ‘इनकमिंग’ पूर्ण थांबले असून, ही रचना शिवसेनेला अधिक अनुकूल आहे. त्यामुळे, शिवसेनेत येण्यास अनेकजण उत्सुक आहेत. भाजपमधील काही नगरसेवकही शिवसेनेच्या संपर्कात असून, केवळ स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांनाच शिवसेनेत घेतले जाईल, असा टोला निम्हण यांनी भाजपला लगावला.


पुणे हीच आमची अस्मिता असून, शहराच्या मेट्रो कंपनीला तेच नाव दिले गेले पाहिजे. त्यापेक्षा वेगळे कोणतेही नाव देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असेल.
- विनायक निम्हण
शहरप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीला महापौर कक्षात नगरसेविकांचा गोंधळ

0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘मी चोर नाही, मला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही,’ असे सांगत पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांनी गुरुवारी (२० ऑक्टोबर) स्वकियांसह सर्वांनाच फैलावर घेतले. महापौर धराडे यांना सर्वसाधारण सभेत घेरण्याचा प्रयत्न स्वकीय राष्ट्रवादी काँग्रेसने केला; तर त्यांच्या मदतीला भाजपप्रणित नगरसेविका धावून आल्या. त्यानंतर महापौर कक्षात चांगलाच शाब्दिक राडा झाला.
नळावरील भांडणांप्रमाणे नगरसेविका एकमेकींच्या अंगावर किंचाळत होत्या. कक्षाबाहेर आवाज ऐकू आल्याने महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर मोठी गर्दी झाली होती. आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना महापालिकेकडून यंदा विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती भेट देण्यात आल्या. या मूर्ती खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी सीमा सावळे यांनी केली. यावरून महापालिकेत मोठा गदारोळ झाला. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल चर्चेसाठी येताच सर्वसाधारण सभाच तहकूब करण्यात येत होती. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा हा अहवाल सादर झाला. त्यानंतर सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी या अहवाल म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा आहे, असे म्हणत सभेचे कामकाज तहकूब करावे, असा प्रस्ताव मांडला. मात्र त्यानंतर सावळे यांना महापौरांनी बोलण्यास परवानगी दिल्याने पुन्हा वाद सुरू झाले.
‘महापौर राष्ट्रवादीच्या आहेत, त्यांनी पक्षाचे ऐकले पाहिजे,’ असे सांगत गोंधळ झाला. तर काहींनी थेट महापौर भाजपला मदत करीत असल्याचा आरोप केला. तर ‘पक्षानेच मला संपविण्याचा विडा उचलला आहे,’ असे महापौरांनी असे म्हणताच गोंधळ सुरू झाला. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी सभागृह सोडल्याने सभा तहकूब झाली.
यानंतर महापौर कक्षात सर्व जमले. तेव्हा कक्षातून जोरजोरात किंचाळण्याचा आवाज येत होता. महापौर शकुंतला धराडे, नगरसेविका शमिम पठाण, सुजाता पालांडे, सीमा सावळे, आशा शेडगे या सर्व सदस्या कक्षात होत्या. येथे चांगलीच भांडणे जुंपल्याने महापालिकेत तणाव निर्माण झाला होता. ‘महापौरांनी पक्षात असून पक्षाचा निषेध केला,’ असे सांगत राष्ट्रवादीच्या महिला शहाराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी महापौरांचाच निषेध केला. तर ‘मी पक्षाचा कोणताही अवमान केलेला नाही,’ असे सांगितले.

श्रेष्ठत्व आणि पक्षनिष्ठा
लक्ष्मण जगताप भाजपमध्ये गेल्यानतंर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण त्यांच्या मागे जाणार, अशी चिन्हे होती. मात्र, पक्षांतर कायद्याच्या भीतीने सगळेच गप्प होते. आता निवडणुका तोंडावर असताना आता प्रत्येकजण एकमेकांच्या अंगावर धावून जात श्रेष्ठत्व आणि पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणुकीच्या नावाखाली लुटणाऱ्यावर गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा आणि व्याज दर मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांकडून पैसे उकळणारा साईप्रसाद प्रॉपर्टीजचा चेअरमन बाळासाहेब भापकर याच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
उत्तम मारुती थोरवे (६१, रा. आळंदी मरकळ रोड, चऱ्होली) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब भापकरसह कंपनीच्या २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब भापकर याची चिंचवड, एम्पायर इस्टेट येथे साईप्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड नावाने चिटफंट कंपनी आहे. त्याने गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा आणि व्याज दर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाने फिर्यादी थोरवे यांनी २००५ मध्ये चिटफंडमध्ये ५० लाख रुपयांचा भरणा केला. या पद्धतीने गुंतवणुकीच्या नावाखाली भापकरने शहरातील नागरिकांना चिटफंडमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले आणि त्यांची तीन कोटी ४१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images