Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अरेरावी करणाऱ्या एजंटला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोन आठवड्यांपूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयात वार्तांकनासाठी गेलेल्या एका बातमीदाराला मारहाण करणाऱ्या एजंटने मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला अरेरावी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्या एंजटला अटक करण्यात आली आहे.

जितेंद्र ऊर्फ जितू लक्ष्मण जाधव (वय ४८, रा. नाना पेठ) असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जाधव याने पाटील यांच्या कार्यालयात प्रवेश करून एका महिलेच्या लायसन्स संबंधातील काम नियमबाह्य पद्धतीने करण्यास सांगितले. त्यास पाटील यांनी नकार दिला आणि प्रक्रियेनुसार त्यांना अपॉइंटमेंट घेण्यास सांगितले. त्यावर जाधवने चिडून पाटील यांना अर्वाच्य भाषा वापरली. तसेच, त्यांच्या कार्यालयात आरडाओरडा करून त्यांना अरेरावी केली. त्यानंतर त्याने पाटील यांना धमकीही दिली, असे पाटील यांनी सांगितले. त्यानुसार एजंट जितेंद्र जाधवला ताब्यात घेतले असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

उपद्रवी एजंट हद्दपार करणार

आरटीओ कार्यालयात एजंटांकडून सामान्यांना धमकाविण्याचा व मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका एजंटने दारूच्या नशेत खटला विभागातील वरिष्ठ लिपिक नितीन कुलकर्णी यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे यापुढे एजंटकडून घडणाऱ्या अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परदेश अभ्यास दौरा वादात?

0
0

शिक्षण खात्यातर्फे नियोजनाची धुरा विशिष्ट एजंकडेच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या शिक्षण खात्याने शिक्षकांच्या परदेशी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांसाठी आखलेली योजना वादात सापडण्याची चिन्हे आहेत. स्वखर्चाने होणाऱ्या या दौऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांना खात्यामार्फत विशिष्ट एजंटच दौऱ्याचे नियोजन करून देणार असल्याचे समोर आले आहे. शिक्षण खाते अशा विशिष्ट एजंटचीच पाठराखण जाहीरपणे कसे करू शकते असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार योजनेची माहिती देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमध्ये (एससीईआरटी) नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. योजनेमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्या शिक्षक प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलविण्यात आले होते. बैठकीसाठी संबंधित एजंटही उपस्थित होता. शिक्षण सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पाच दिवसांच्या सिंगापूर दौऱ्याच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. दौऱ्यामध्ये सिंगापूरमधील स्थानिक शाळांना भेटी, तेथील शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी वार्तालाप आणि शैक्षणिक चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याची संधी शिक्षकांना मिळणार आहे. अडीच दिवसांच्या या नियोजनासोबत अडीच दिवसाच्या सिंगापूर दर्शनाचा आस्वादही शिक्षकांना घेता येईल. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी शिक्षण खाते शिक्षकांना पगारी रजा देण्यासही तयार आहे.
या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी खात्याला हे एकमेव एजंटच उपलब्ध झाल्याची माहितीही बैठकीमध्ये देण्यात आली. दौऱ्यासाठी सत्तर हजार रुपये खर्च करण्याची तयारी असलेल्या शिक्षकांना टप्प्याटप्प्याने पाठविले जाणार आहे. ज्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा नाही अशा शिक्षकांना तो मिळवून देण्याची सुविधाही संबंधित एजंट उपलब्ध करून देणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. योजनेला शिक्षण खात्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याने, त्यामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे आर्थिक नियोजन आणि अशी मोठी संख्या विचारात घेता, त्यातून संबंधित एजंटलाही लाभ होण्याचीही शक्यता आहे. असे असताना, खात्याने विशिष्ट एजंटलाच पुढे करण्यापेक्षा, या योजनेसाठी जाहीरपणे निविदा मागवून, त्यातून एजंटची निवड करण्याचा मार्ग अवलंबिणे अधिक विश्वासार्ह ठरले असते. मात्र, खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने, ही प्रक्रिया पारदर्शी होण्याऐवजी प्रश्नचिन्हे उपस्थित होत असल्याचे खात्यामधील वरिष्ठ कबूल करीत आहेत.
000
शिक्षकांसाठीची ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. योजनेसाठी शिक्षण खाते कोणताही खर्च करणार नसून, शिक्षक स्वखर्चाने दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांना सिंगापूरमध्ये गेल्यानंतर तेथील शिक्षणपद्धतीची व्यवस्थित माहिती देणारा एक प्रतिनिधी म्हणून खात्याने त्या एजंटचा विचार केला आहे. त्यासाठी त्याच व्यक्तीच्या मदतीने तिकडे जावे, अशी कोणतीही सक्ती शिक्षकांवर नसेल.
विनोद तावडे, शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबदल्याचे तीन पर्याय

0
0

अभ्यास करून अहवाल देण्यासाठी पथकाची निर्मिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी तीन पर्याय (मॉडेल) पुढे आले आहेत. या पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पथक तयार केले असून, पथकाचा अहवाल आल्यानंतर मोबदल्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
विमानतळासाठी भूसंपादनाचे चांगले मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न आहे. हे मॉडेल केल्यावर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. शेतकऱ्यांचा विमानतळाला माहितीअभावी विरोध होत आहे. चर्चा झाल्यावर त्यांचा विरोध राहणार नाही, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव, राजेवाडी, वाघापूर, आंबळे, खानवडी मेमाणे आणि मुंजवाडी या गावांतील जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या ग्रामस्थांनीही त्यास विरोध केला आहे. ‘ग्रामस्थांचा विरोध माहितीअभावी आहे. विमानतळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांचे हित जपले जाईल याची खबरदारी घेण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमधील अमरावती, नवी मुंबई आणि कोची ठिकाणी विमानतळासाठी भूसंपादन करता कोणते मॉडेल वापरण्यात आले याचा अभ्यास करण्यात येत आहे,’ असे राव यांनी सांगितले.
अमरावतीमध्ये वापरलेल्या मॉडेलच्या पाहणीसाठी सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सदस्य भूसंपादनासाठी कोणते मॉडेल वापरण्यात आले आहे याचा अभ्यास करून अहवाल देणार आहेत. नवी मुंबईचे मॉडेलही आमच्यासमोर आहे. तसेच कोची मॉडेलच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या अधिकाऱ्यांसह आपण त्रिवेंद्रमला भेट देणार आहोत. या तीनही मॉडेलचा अभ्यास करून त्यातून सर्वांत चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांना अधिक फायदा कसा होईल, याचा विचारही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम येत्या २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हे काम ५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. या सर्वेक्षणानंतर नेमकी कोणती आणि किती जमीन विमानतळासाठी संपादित करावी लागणार आहे हे कळणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
…..
अभिलेख अद्ययावत करणार
जिल्ह्यातील यापूर्वीच्या भूसंपादनाचा अनुभव लक्षात घेता विमानतळासाठी जमीन संपादित करण्यापूर्वी पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावातील महसूल अभिलेख अद्ययावत करण्यात येणार आहेत. हे अभिलेख अद्ययावत केल्यामुळे जमीन संपादनाचा नेमका मोबदला कोणाला यायचा हा प्रश्न उदभवणार नाही. योग्य व्यक्तीला योग्य मोबदला देणे त्यामुळे शक्य होणार असल्याचेही राव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत वाहने महागणार

0
0

रस्तासुरक्षा अधिभार सामान्य नागरिकांच्या माथी बसणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरात रस्तासुरक्षाविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या खर्चाचा भार नागरिकांवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नवीन तसेच स्थलांतरीत वाहनाची नोंद करताना नागरिकांना आता रस्तासुरक्षा अधिभार द्यावा लागणार आहे. या अधिभाराचा वाहनाच्या एकूण किमतीवर परिणाम होणार असून, ऐन दिवाळीत गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
या अधिभारातून ‘रस्ता सुरक्षा निधी’ची तरतूद केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २४ ऑक्टोबरपासून होणार आहे. राज्य सरकाने नुकताच या विषयीचा आदेश काढला. दरम्यान, अधिभार लावल्यानंतर वाहन मालकांना किती कर द्यावा लागेल, याची तपशीलवार माहिती ‘आरटीओ’कडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.
सरकारच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे एकरकमी आणि ठरावीक वर्षांनी अशाप्रकारे दोनदा कर भरला जातो. खासगी संवर्गातील दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी एकरकमी देय कराच्या दोन टक्के, हलक्या मालवाहू वाहनांसाठी एकरकमी देयकराच्या चार टक्के अधिभार भरावा लागेल. तसेच, वार्षिक कर भरणाऱ्या मध्यम आणि अवजड मालवाहू वाहनांसाठी वार्षिक देय कराच्या १० टक्के, एकरकमी कर भरणाऱ्या मध्यम आणि अवजड वाहनांसाठी एकरकमी देय कराच्या दोन टक्के अधिभार असेल. वार्षिक कर भरणाऱ्या सात आसनी व आठ आसनी गाड्यांसाठी वार्षिक कराच्या पाच टक्के, प्रवासी वाहनांसाठी वार्षिक कराच्या ०.५ टक्के, खासगी वाहनांसाठी वार्षिक कराच्या पाच टक्के आणि उर्वरीत सर्व वाहनांसाठी वार्षिक कराच्या पाच टक्के अधिभार लावण्यात येणार आहे. एकरकमी कर भरणाऱ्या सात आसनी गाड्यांसाठी वार्षिक कराच्या पाच टक्के अधिभार लावण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपांवर आज १५ मिनिटे विक्रीबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पेट्रोलियम कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनने (एआयपीडीएस) आज, बुधवारी सायंकाळी सात ते सव्वासात या कालावधीत शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंपावरील ऐन गर्दीच्या वेळेला पंप बंद ठेवले जाणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.
पेट्रोल पंप चालक-मालकांच्या कमिशनमध्ये वाढ करणे, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याबाबतच्या समस्या, पेट्रोल वाहतुकीतील समस्या, स्वच्छतागृहांची समस्या आदी मागण्यांसाठी ‘एआयपीडीएस’ संघटनेने देशभर टप्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात बुधवारपासून होणार आहे. त्यामुळे सायंकाळी १५ मिनिटे वाहन चालकांना पेट्रोलची विक्री केली जाणार नाही.
पेट्रोल पंप चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरला पुन्हा १५ मिनिटांचा ‘ब्लॅक आउट’ पाळला जाणार आहे. त्यानंतरही मागण्यांबाबत विचार न झाल्यास तीन नोव्हेंबरला ऑइल कंपन्यांकडून पेट्रोलची खरेदी केली जाणार नाही. तर, तिसऱ्या टप्प्यात १५ नोव्हेंबरला खरेदी व विक्री दोन्ही बंद ठेवले जाणार आहे, असे निवेदन संघटनेचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी प्रसिद्ध केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नौदलाचे प्रशिक्षण केंद्र लोणावळ्यात उभारणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नौदलाच्या तांत्रिक विभागाचे आघाडीचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या लोणावळा येथील ‘आयएनएस शिवाजी’वर नवे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. ‘विक्रमादित्य’ नामक या प्रशिक्षण केंद्रात ‘आयएनएस विक्रमादित्य’शी संबंधित आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण नौदलाचे अधिकारी आणि सैनिकांना मिळू शकणार आहे.
नौदलाच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल ए. आर. कर्वे यांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे भूमीपूजन झाले. आपल्या दोन दिवसीय भेटीदरम्यान कर्वे यांनी येथील प्रशिक्षण सुविधा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. या वेळी वरिष्ठ नौसैनिकांच्या निवासस्थानाचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी नौदल अधिकारी व सैनिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याबरोबरच नौदल अभियांत्रिकी आणि आण्विक, जैविक, रासायनिक हल्ल्यांसंबंधीच्या प्रशिक्षणातील नवे प्रवाह आत्मसात करण्याविषयी मार्गदर्शन केले.
विक्रमादित्य प्रशिक्षण केंद्रामध्ये १०० टन प्रतितास क्षमतेच्या बॉयलरसह अत्याधुनिक यंत्रणांचा समावेश असेल. त्यामुळे नौदलाच्या अधिकारी, सैनिकांना आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवरील मुख्य प्रपोल्शन प्लांटचे काम व देखभाल याची माहिती व प्रशिक्षण मिळेल. तसेच युद्धनौकांसह अन्य नौकांवर असलेल्या मुख्य यंत्रणा आणि कंट्रोल सिस्टिमसाठी लागणाऱ्या तांत्रिक क्षमतेचे प्रशिक्षणही या केंद्रावर देण्यात येईल.
‘आयएनएस विक्रमादित्य’ ही भारताची प्रमुख विमानवाहू युद्धनौका आहे. रशियन बनावटीची मूळची गोर्शकाव्ह ही विमानवाहू युद्धनौका प्रदीर्घ कालावधीच्या नूतनीकरणानंतर नोव्हेंबर २०१३मध्ये नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. सुमारे ४५ हजार टन वजनाच्या या महाकाय युद्धनौकेवर मिग २९ के, कामोव्ह या विमानांसह, ध्रुव आणि चेतक हेलिकॉप्टर्ससह एकूण ३० विमाने राहू शकतात. एकावेळी १६०० नौसैनिकही या नौकेवर राहू शकतात. अत्याधुनिक रडार, सोनार व विमानभेदी क्षेपणास्त्र यंत्रणांनी ही युद्धनौका सुसज्ज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठिबक सिंचनासाठी नवी योजना

0
0

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार टक्के दराने कर्जपुरवठा होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उसामुळे ​पाण्याचा अतिरिक्त वापर होत असल्याने राज्य सरकारने उसाचे क्षेत्रफळ ठिबक ​सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करणारी नवी योजना आखली आहे. नव्या योजनेमुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना ठिबक संच घेण्यासाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आले आहे.
नवीन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे तीन लाख हेक्टर उसाखालील क्षेत्रफळ ठिबक सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार ६०० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. नवीन योजनेनुसार राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेकडून (नाबार्ड) जिल्हा बँकांना कर्जपुरवठा केला जाणार असून, त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘नाबार्ड’कडून ८.९० टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असून, त्यापैकी ३.४० टक्के राज्य सरकार आणि १.५० टक्के साखर कारखान्यांनी, तर उर्वरित चार टक्के व्याज शेतकऱ्यांना फेडावे लागणार आहे.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची हमी साखर कारखान्यांवर असणार आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून कर्जफेड केली जाणार आहे. नवीन योजनेच्या अंमलबजावणीसाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये कृषी विभागाचे प्रधान सचिव; तसेच सहकार, साखर आणि कृषी आयुक्त असणार आहेत. सदस्य सचिव म्हणून फलोत्पादन संचालक काम पाहणार आहेत.
या समितीने सध्या सुस्थितीत असणारे सुमारे ६० कारखाने, नाबार्ड, जिल्हा सहकारी बँका यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करावी. त्यानंतर या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी त्यांना सूक्ष्म सिंचन संच बसवण्यासाठी अनुदान देण्यात येते. हे अनुदान आता बंद करण्यात येणार आहे.
..
पाच वर्षांत कर्जपरतफेड
शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यासाठी सहकारी साखर कारखाने, वित्तीय संस्था आणि शेतकरी यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जाची व्याजासह परतफेड करावी लागणार आहे. त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जांभूळवाडी गावठाण अहवालाला विलंब

0
0

जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘पीएमआरडीए’ला स्मरणपत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रजलगतच्या जांभूळवाडी आणि कोळेवाडी या गावांना गावठाणांचा दर्जा देण्यासंदर्भात पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘पीएमआरडीए’ला नुकतेच स्मरणपत्र दिले आहे. हा अहवाल तातडीने पाठविण्याची सूचनाही पत्राद्वारे ‘पीएमआरडीए’ला करण्यात आली आहे.
जांभुळवाडी आणि कोळेवाडी ही गावे साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी वसली आहेत. या दोन्ही गावांना महसुली गावांचा दर्जा मिळाला आहे. परंतु, त्यांचे गावठाण जाहीर झाले नसल्याने त्यासंबंधी कोणतेही फायदे या गावांना मिळत नाहीत. त्यामुळे जांभूळवाडी व कोळेवाडी या गावांना गावठणाचा दर्जा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. त्यासंबंधी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या ग्रुप ग्रामपंचायती असलेल्या गावांना गावठाण दर्जा देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरव राव यांनी हवेली तहसीलदारांकडून अहवाल घेतला आहे. हवेली तहसीलदारांच्या अहवालावर आता ‘पीएमआरडीए’चा अहवाल येणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राधिकरणाला ऑगस्ट महिन्यात पत्र देण्यात आले आहे. हे पत्र देऊन दोन महिने होत आले तरी ‘पीएमआरडीए’ने अहवाल सादर केला नाही. त्यामुळे त्यांना अहवाल देण्यासंबंधी स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनीही ‘पीएमआरडीए’चे आयुक्त महेश झगडे यांना यासंबंधी पत्र दिले आहे. तथापि, हा अहवाल करण्याच्या दृष्टीने फारशा हालचाली झालेल्या नाहीत.
..
विधिमंडळातही प्रश्न उपस्थित
जांभुळवाडी-कोळेवाडीला गावठाण दर्जा देण्यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा या गावांना गावठाण दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता होणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘पीएमआरडीए’कडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, त्याला फारशी दाद दिली जात नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारामतीमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बजरंग ढेरे असे विद्यार्थ्याचे नाव असून तो कृषी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे. हॉस्टेलमधील खोलीत बजरंग ढेरेने आत्महत्या करीत आपले जीवन संपवल्यानं महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.

आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. बजरंग ढेरे याने आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अद्याप तरी आत्महत्या केल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, बजरंग ढेरेच्या आत्महत्येने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: चिमुकल्यांसमोरच आईनं घेतला गळफास

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'मी आता मरणार', असे सांगून चिमुकल्यांसमोरच आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्रभर दोन्ही मुलं आईच्या मृतदेहाजवळ रडत-रडत झोपून गेली. सकाळी उठल्यावर पुन्हा मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून लोकांनी दार तोडून मुलांना बाजूला घेतलं. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. खेड तालुक्यातील चाकण-येलवाडी येथे ही घटना घडली.

काजल राहुल मोहिते (२५) असं आत्महत्या केलेल्या मातेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल यांचा पती सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सोमवारी (१७ ऑक्टोबर) तो रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. तर काजल यांचा मुलगा संग्राम (५ वर्षे) आणि मुलगी लक्ष्मी (२ वर्षे) हे घरात होते. रात्री उशिरा काजल हिने मुलाला 'मी आता मरणार', असे सांगून साडीच्या साह्याने गळफास घेतला. त्यानंतर तिनं हातातील चाकूने साडी कापून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नही केला. साडी कापल्याने काजल खाली पडल्या. त्यांच्या तोंडाला जखमाही झाल्या. हा सर्व प्रकार संग्राम आणि लक्ष्मी पाहत होते. ते पाहून दोन्ही मुलं रडू लागली. रडत-रडतच दोन्ही मुलं झोपली. सकाळी जाग आल्यावर ते दोघे जोरजोरात रडत होती. मुलांचा बऱ्याच वेळ रडण्याचा आवाज ऐकून आणि घरातून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने शेजारच्यांनी दरवाजा तोडला. त्यांना काजल यांचा मृतदेह खाली पडलेला दिसला. त्यांच्या गळ्यात साडी गुंडाळलेली होती आणि हातात चाकू होता. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

नेमका काय प्रकार घडला हे संग्राम सर्वांना सांगत होता. पोलिसांनीही त्याच्याकडे चौकशी केली. ''आई तु मरू नको, असे मी सांगत होतो पण आईने ऐकले नाही'' असे संग्रामने पोलिसांना सांगितले. हवालदार विलास गोसावी, अमोल बोराटे यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती
बारामतीच्या शारदानगर येथील पशुचिकित्सा महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये मित्रांचे देणे पालकांनी द्यावे, असे म्हटले आहे. मित्रांनी पैशासाठी तगादा लावल्यानेमुळे आत्महत्या केली असावी, असा आरोप तरुणाच्या पालकांनी केला.
बजरंग ज्ञानदेव डेरे (२१, मूळ रा. रेलवडी, ता. पारनेर, जि. नगर) या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आकाश कैलास गव्हाणे (रा. खोमणे बिल्डिंग, शारदानगर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग हा बारामती येथे पशुचिकित्सा महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता. अन्य विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी महाविद्यालयात गेले होते. त्या वेळी बजरंग याने छताच्या हुकाला दोरी लावून गळफास घेतला. अन्य विद्यार्थी प्रॅक्टिकल संपवून पुन्हा खोलीवर आल्यानंतर त्यांनी कडी वाजवली. परंतु आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे ही बाब विद्यार्थ्यांनी घरमालकांना सांगितली. अखेर मागील बाजूच्या गॅलरीतून वर जाऊन मागील दरवाजा उघडून विद्यार्थ्यांनी आत प्रवेश केला. त्या वेळी बजरंगने आत्महत्या केल्याचे उघड झाले.
आत्महत्येपूर्वी बजरंगने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. इंग्रजीतून लिहिलेल्या या चिठ्ठीत त्याने ‘मी आजवर खोटे बोलून आई-वडिलांची फसवणूक करत आलो आहे. मित्रांचे पैसे मला द्यायचे आहेत. माझ्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी ही रक्कम त्यांना देऊन टाकावी,’ असे लिहिले आहे. चिठ्ठीमध्ये कोणाचे किती रुपये देणे आहे, हे देखिल त्याने नमूद केले आहे. व्हॉटस अॅपवरही त्याने ही यादी टाकली असून माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात म्हटले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी तसेच मोबाइल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक राहुल यादव व हवालदार तानाजी गावडे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बसचालकांना विशेष प्रशिक्षण

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग अॅँड ट्रेनिंग रिसर्चतर्फे (आयडीटीआर) स्कूल बसचालकांना दर शनिवार आणि रविवारी विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भोसरी येथील ‘आयडीटीआर’च्या कार्यालयात ही प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे.

विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांची जास्त संख्या आणि दोन आठवड्यांपूर्वी पटवर्धन बाग परिसरात विद्यार्थी वाहतूक करीत असताना पेट घेतलेली स्कूल बस, या घटनेनंतर शालेय वाहतूक धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच, शालेय शिक्षण विभाग व आरटीओकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा मुद्दा ‘मटा’ने उपस्थित केला होता. तसेच, दोन्ही विभागांनी कठोर कारवाई करावी, असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून आरटीओने पाऊल उचलून स्कूल बसचालकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले.

कार्यशाळेमध्ये स्कूलबसच्या नियमावलीबाबत माहिती दिली जाणार आहे. सुरक्षित ड्रायव्हिंग या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आपत्कालिन परिस्थितीत प्रथमोपचार कसा करावा, इंधन बचत कशी करावी, आदी प्रकारची माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

शहरातील अनेक स्कूल बसचालकांकडून शालेय वाहतूक धोरणातील तरतुदींचे पालन केले जात नाही. तसेच, त्यांना या गोष्टींचे महत्त्व लक्षात येत नाही; मात्र काही दुर्घटना घडल्यानंतरच त्यांचे डोळे उघडतात. त्यामुळे ही कार्यशाळा त्यांच्या प्रबोधनासाठी उपयुक्त ठरेल.

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्कूल बसचालकास ‘आयडीटीआर’मार्फत दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी मानधन म्हणून अठराशे रुपये दिले जाणार आहे. तसेच, सहभागी चालकांना ट्रेनिंग किट व प्रशस्तीपत्र देखील दिले जाणार आहे. त्यामुळे कार्यशाळेत जास्तीत जास्त स्कूल बसचालकांनी व वाहतूकदरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्कूल बसचालकांनी आरटीओ कार्यालयाकडे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑनलाइन’ औषधविक्रीला परवानगी?

0
0

लवकरच औषध महानियंत्रकांना अहवाल सादर
Mustafa.Attar@timesgroup.com
............
@MustafaattarMT
पुणे : ‘ऑनलाइन’द्वारे औषध विक्री करणे योग्य की अयोग्य या संदर्भात स्थापलेल्या समितीचा अहवाल महिन्याअखेरीस केंद्रीय औषध महानियंत्रकांना (डीसीजीआय) सादर होणार असून अहवालात समितीकडून ‘ऑनलाइन’ औषधविक्रीला परवानगी देण्याची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. ऑनलाइन औषध विक्रीला परवानगी मिळाल्यास पुन्हा ऑनलाइन कंपन्यांचे पेव फुटणार असून, औषधांचा दुरुपयोग होण्याची भीती देखील व्यक्त होत आहे.
काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यात ऑनलाइन औषध विक्री सर्रासपणे सुरू आहे. लैंगिक समस्या, गर्भपात नशेची औषधे, स्टिरॉइड्ससारखी औषध देखील विना प्रिस्क्रिप्शन उपलब्ध केली जात आहेत. या औषधांचे दूरगामी परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे केंद्रीय औषध महानियंत्रकांच्या निदर्शनास यापूर्वीच आणून देण्यात आले. विना प्रिस्क्रिप्शनद्वारे ऑनलाइन औषध मागविणे सोपे असल्याने नशेसह लैंगिक समस्या दूर करण्यासाठीची औषधे मागविण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे मानवी आरोग्यास धोका पोहोचू शकतो याकडे ‘डीसीजीआय’ने एफडीएचे लक्ष वेधले.
ऑनलाइनद्वारे औषध विक्री करणे योग्य आहे की नाही यासंदर्भात ‘डीसीजीआय’ने राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची समिती स्थापन केली होती. त्या समितीला आता वर्ष होत आहे. दरम्यान, ‘डीसीजीआय’च्या आदेशानुसार गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध ऑनलाइन कंपन्यांवर औषध विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
‘ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या समितीची नुकतीच ३० सप्टेंबरला बैठक झाली. समितीचा अहवाल तयार झाला आहे. परंतु, हा अहवाल केंद्र सरकार अद्याप सादर करण्यात आला नाही. ऑनलाइन औषध विक्रीला परवानगी देताना सकारात्मक विचार करावा लागेल. सध्याच्या औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यात ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात कोणतेही नियम अस्तित्वात नाही. ऑनलाइन विक्रीला परवानगी द्यायची असल्यास त्यासंदर्भात नियम तयार करावे लागतील,’ असे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.
....
ऑनलाइन औषध विक्रीचे धोरण तयार करण्यासाठीचा अंतिम अहवाल तयार ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी तयार होईल. आमचा अहवाल ‘डीसीजीआय’कडे पाठविला जाणार आहे. त्यांच्या तांत्रिक समितीकडून हा अहवाल तपासून तो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे गेल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. आमची समिती ऑनलाइन औषध विक्री धोरण करावे की करू नये, हे सांगण्यासाठी नेमलेली आहे.
- डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, एफडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्वसन खात्यात कुंपणच खाते शेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘बाई मी धरण धरण बांधते, मरण मरण कांडते...’ या कवितेचा प्रत्यक्ष अनुभव हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना येत असताना पुनर्वसन खात्याच्या कामाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देण्याच्या फाइलच गहाळ होत असल्याच्या तक्रारी येत असून या खात्यातील काही कर्मचारीच चिरीमिरीच्या अपेक्षेने गडबड करीत असल्याचे समोर येत आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या फाइल्स गायब झाल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यासंबंधी तक्रार करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ‘फाइलच्या शोधात आहोत’ असे उत्तर देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे वैतागलेल्या प्रकल्पग्रस्तांनी या प्रकाराची थेट पुनर्वसन मंत्र्यांकडे तसेच पोलिसांकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे.
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, धरणग्रस्तांचे दाखले, पर्यायी जमीन, जमीन वाटपाचे दाखले, धरणग्रस्त संचिका आणि आनुषंगिक सर्व सरकारी अभिलेख जिल्हा पुनर्वसन कार्यालयात आहे. प्रकल्पग्रस्तांनी पर्यायी जमिनीची रक्कम भरल्यानंतर त्यांना लाभक्षेत्रात जमीन देण्यात येते. पुणे जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव, चासकमान, भामा आसखेड, डिंभे, गुंजवणी, निरादेवघर अशा अनेक प्रकल्पांतील धरणग्रस्तांच्या पर्यायी जमीन वाटपाच्या फाइल्स पुनर्वसन खात्यात आहेत. पर्यायी जमीन वाटपासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांना नाहक त्रास देण्यात येतो. जमीन वाटपासंबंधीच्या अहवालांपासून फाइलवर कार्यवाही होण्यापर्यंत प्रकल्पग्रस्तांना पाठपुरावा करावा लागतो. हा पाठपुरावा केल्यानंतरही दहा-बारा वर्षे पर्यायी जमिनीसाठी प्रकल्पग्रस्तांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
पर्यायी जमीन मिळविण्यासाठी पुनर्वसन खात्याचे उंबरे झिजवल्यानंतर जमीन वाटपाचे आदेश होतात. पुण्यातील एका धरणाच्या काही धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. मात्र, त्यातील काही फाइल्स गेल्या दोन महिन्यांपासून गहाळ झाल्या आहेत. जमीन वाटपाचा आदेश मिळाल्यानंतर आता जमीन मिळेल अशी अपेक्षा असलेल्या प्रकल्पग्रस्तांना आपली फाइल गहाळ झाल्याचे कळाल्यानंतर त्यांचे अवसान गळाले आहे. यासंबंधी त्यांनी पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर फाइल शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या फाइल अद्याप मिळालेल्या नाहीत. या फाइल गहाळ होण्यामागे पुनर्वसन खात्यातीलच काही कर्मचारी असल्याचे बोलले जात आहेत. या फाइल न सापडल्यास थेट पोलिस तक्रार करण्याची तयारी या प्रकल्पग्रस्तांनी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस स्टेशनच्या जवळच चोरट्यांचा सुळसुळाट

0
0

म. टा. प्रतिनिधी , हडपसर
हडपसर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गाडीतळ उड्डाणपुलाखाली असणाऱ्या बसथांब्यावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी वारंवार चोऱ्या होत असल्याची तक्रार प्रवाशांनी वारंवार करूनही पोलिसांनी या ठिकाणी चोरट्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
हडपसर गाडीतळ परिसरात उड्डाणपुलाखाली असणाऱ्या बस स्थानकावर सकाळी व सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन बॅग, पाकीट, मोबाइल आदी गोष्टींची चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरीच्या घटनेत महागडा मोबाइल, मोठी रक्कम चोरीला गेली तरच तक्रार नोंदविण्यात येते. कमी रकमेच्या चोरीबाबत तक्रार नोंदवणे टाळले जाते.
याबाबत पीएमपी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. बसथांब्यावर काही संशयित वारंवार उभे असल्याचे आढळून आले आहे. त्यांना कुठे जायचे आहे असे विचारल्यावर ते एखाद्या ठिकाणाचे नाव सांगतात. मात्र त्या ठिकाणी जाणारी बस आली तरी ते बसमध्ये जात नाहीत. त्यानंतर तेथे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करतात. याबाबत पोलिसांना सांगूनही फरक पडलेला नाही.’
बुधवारी (१९ ऑक्टोबर) गाडीतळ उड्डाणपुलाखालील बस स्थानकावर प्रियांका गायकवाड स्वारगेट येथे जाणाऱ्या बसची वाट पाहत होत्या. त्या वेळी बसस्थानकावर भांडण सुरू झाले. त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी जमली. या गर्दीचा फायदा घेऊन गायकवाड यांच्या पर्समधील दहा हजार रुपये चोरट्याने लंपास केले. गायकवाड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या वेळी गायकवाड यांची प्रॉपर्टी मिसिंगची तक्रार नोंदवून घेण्यात आली. जितेंद्र कांबळे पत्नीसह दिवाळीच्या खरेदीसाठी गाडीतळ येथे बसने स्वारगेटला जात होते. बसमध्ये असणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या पर्समधील २२ हजार रुपये चोरून नेले. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, पोलिसांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ नागरिकांची चार कोटींची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वृद्धाश्रमात आजीवन राहण्यासाठी सर्व सुख-सोयी देण्याचे आमिष दाखवून, पैसे घेऊन तीस ज्येष्ठ नागरिकांची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शांती चॅरिटेबल ट्रस्टच्या शांतीनिकेतन वृद्धाश्रममधील ट्रस्टी व मॅनेजरवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वसंत पुरुषोत्तम सातपुते (वय ९०, रा. सहकार कॉलनी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अजय गोविंद भुते, हिमांशू जळूकर व मौजे गऊडदारा येथील शांती चॅरिटेबल ट्रस्टचा शांतीनिकेतन वृद्धाश्रम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व इतर २५ ते ३० ज्येष्ठ नागरिकांना आरोपींनी मौजे गऊडदारा येथील शांती चॅरिटेबल ट्रस्टच्या शांतीनिकेतन वृद्धाश्रमात आजीवन राहण्यासाठी सर्व सुख-सोयी देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. यासाठी सदाशिव पेठेतील बिझीलँड इमारतीतील कार्यालयात करार केला. पण, नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना कराराप्रमाणे सोयीसुविधा दिल्या नाहीत. तसेच, त्याच्याकडून घेतलेली रक्कम परत केली नाही. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅरीकॉम’ला ‘सी-डॅक’ची मदत

0
0

कॅरेबियन कम्युनिटी देशांना तंत्रज्ञान विकसनात मदत
Harsh.Dudhe@timesgroup.com
.............
@HarshDudheMT
पुणे : देशात माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि सुपरकम्प्युटिंगच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध सुविधा निर्माण करणारे व देशातील समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनात अग्रेसर असणारे सी-डॅक सातासमुद्रापार काम करणार आहे. सी-डॅक कॅरेबियन बेट्स अशी ओळख असणाऱ्या ‘कॅरेबियन कम्युनिटी’ (कॅरीकॉम) देशांमध्ये ‘आयटी’साठी लागणाऱ्या विविध सुविधा, वेबसाइट्स आणि पोर्टलची करणार असून त्या दृष्टीने काम सुरू झाले आहे.
भारत आणि कॅरीकॉम देशांमध्ये एक करार करण्यात आला आहे. त्यानुसार कॅरीकॉम देशांची आर्थिक प्रगती होण्यासाठी भारत मदत करणार आहे. या कॅरीकॉम देशांमध्ये अॅन्टिगुआ व बार्बुडा, बाहामास, बार्बाडोस, बेलिझ, डोमिनिका, ग्रेनडा, गयाना, हैती, जमैका, मॉनसेर्रट, सेंट किट्स अँड नेव्हिस, सेंट लुसिया, सेंट विन्संट अॅँड द ग्रेनेडाइन्स, सरीनेम, त्रिनिदाद अॅँड टोबॅगो या पंधरा देशांचा समावेश आहे. या करारानुसार प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) या कॅरीकॉम देशांमध्ये आयटीसाठी लागणाऱ्या विविध सुविधांची निर्मिती करणार आहे.
‘या ‘आयटी’ सुविधांमध्ये देशांतर्गत व्हिडियो कॉन्फरन्सिंग, विविध प्रकारचे सर्व्हर्स, क्लायन्ट सिस्टीम्स, नेटवर्क स्विचेस प्रणाली अशा सुविधांचा समावेश आहे. या सर्व सुविधा येत्या एक ते दीड वर्षात उभारण्यात येणार आहेत. तसेच, वेब बेस्ड् डिजिटल, कटेन्ट, कॉन्टॅक्ट अशा तीन व्यवस्थापन प्रणालींची निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘सी-डॅक’चे महासंचालक प्रा. रजत मूना यांनी खास ‘मटा’ला दिली.
मूना म्हणाले, ‘या सुविधांसोबत सी-डॅक कॅरीकॉम देशांमधील ‘आयटी’ विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच, तेथील आयटीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती केल्यानंतर कॅरीकॉम देशांच्या सेक्रेटरीयन कार्यालयात सी-डॅककडून दोन ‘आयटी’ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. या सुविधांमुळे कॅरीकॉम देशांमध्ये आयटीचे उत्तम नेटवर्क उभे राहील आणि याचा फायदा भविष्यात व्यापार करण्यासाठी भारताला होईल.’
..........
वेबसाइट करणार अद्ययावत
सी-डॅक कॅरीकॉम देशांमध्ये आयटीच्या पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच या देशाची वेबसाइट अद्यावत स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे. तसेच, एक कॅरीकॉम पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. या पोर्टलद्वारे कॅरीकॉम देशांच्या वेबसाटवर असणारी माहिती एका क्लिकवर पाहालया मिळणार आहे. याचा फायदा देशांतर्गत ‘आयटी’ची कनेक्टीव्हीटी वाढविण्यासाठी होईल. सी-डॅकचे नुकतेच एक पथक गयाना येथे करार करून तसेच कॅरीकॉम देशांची पाहणी करून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेट बँकेकडून सहा लाख डेबिट कार्ड ब्लॉक

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सहा लाख खातेदारांची डेबिट कार्ड ब्लॉक केली आहेत. मालवेअरच्या (एखादी सिस्टिम डॅमेज करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर) माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम कार्डांची क्लोनिंग होत असल्याचे उघड झाल्याने बँकेने हा सावधगिरीचा उपाय योजला आहे. मात्र, दिवाळीच्या तोंडावरच ही कार्ड ब्लॉक झाल्याने खातेधारक धास्तावले आहेत.
‘मालवेअर’ हा एक व्हायरसचा प्रकार आहे. यात जेव्हा एटीएममध्ये कार्डचा वापर केला जातो, तेव्हा कार्डाला संसर्ग होऊन एटीएम मशीन बंद पडते किंवा कार्डातील डेटा अन्य ठिकाणी जाण्याची शक्यता असते. अन्य ठिकाणी गेलेल्या या माहितीच्या आधारे नंतर खातेधारकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आम्ही कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्टेट बॅँक ऑफ इंडियाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) शिवकुमार भासिन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना स्पष्ट केले.
‘मालवेअर’चा फटका केवळ आमच्याच नव्हे; इतर बॅँकांनाही आता व याआधीही बसलेला आहे. शिवाय, काही एटीएमच्या बाबतीतच हे झाले असल्याने स्टेट बँकेच्या खातेधारकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असेही भासिन यांनी स्पष्ट केले.
अनेक खातेधारकांना एटीएममध्ये गेल्यानंतर कार्ड ब्लॉक झाल्याचे समजले. काही ग्राहकांना बॅँकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून बॅँक खातेदार बॅँकेच्या शाखेत जाऊ शकतात, फोन बॅंकिंग किंवा रेकॉर्डिंगसाठी इंटरनेटचा वापर करू शकतात. पिन नंबरचा वापर करून ते त्यांच्या घरातील इंटरनेट बॅँकिंगचा वापर करू शकतात, असेही भासिन यांनी सांगितले.
दरम्यान, बँकेतर्फे संबंधित खातेदारांना बँकेच्या शाखेत जाऊन नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर सात दिवसांत त्यांना नवे कार्ड दिले जाईल, असे सांगण्यात आल्याची माहिती काही खातेदारांनी दिली.
रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जुलै २०१६ पर्यंत एसबीआयचे २०.२७ कोटी डेबिट कार्डधारक आहेत. एसबीआयशी सलग्न बॅँकांच्या डेबिट कार्डची संख्या ४.७५ कोटी इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माननीयांना डीपी रोडवरच हवेत फटाक्याचे स्टॉल्स

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
म्हात्रे पुलाजवळील डीपी रोडवर फटाक्याचे स्टॉल उभारण्यास परवानगी न देण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला बुधवारी सर्वसाधारण सभेत विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. या रोडवर असलेल्या हॉटेल तसेच मंगल कार्यालयांमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते, त्यावेळी कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही, मग फटाका स्टॉल्सला बंदी कशाला, असा प्रश्न उपस्थित करून स्टॉलसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सभासदांनी केली.
डीपीरोडवर गेल्या पंधरा वर्षांपासून फटाका स्टॉल्स उभारण्यासाठी महापालिका प्रशासन परवानगी देत आहे. या भागात फटाका स्टॉल्समुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केल्याने यंदाच्या वर्षीपासून येथे फटाका स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी न देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतला आहे. डीपीरोडवरील स्टॉल्स वडगावशेरी येथील एका खासगी जागेत उभारले जाणार आहेत. डीपीरोडवरील जागा नागरिकांच्या तसेच व्यावसायिकांच्या सोयीची असल्याने येथे स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी द्यावी, अशी भूमिका सर्वसाधारण सभेत अनेक सभासदांनी घेतली. या रोडवर स्टॉल्स उभारण्यास परवानगी देणार नाही, असा निर्णय प्रशासनाने पक्षनेत्यांना कल्पना न घेता घेण्यात आल्याचा आरोप आबा बागूल यांनी केला. नागरिकांसाठी ही जागा सोयीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या रोडच्या दोन्ही बाजूला हॉटेल आणि मंगल कार्यालये आहेत, त्यामुळे गर्दी होते. हॉटेलसमोर बेकायदा पद्धतीने पार्किंग होत असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, केवळ फटाका विक्रेत्यांवर गर्दीचे खापर का फोडले जाते, असा प्रश्न नगरसेवक दीपक मानकर यांनी उपस्थित केला. डीपी रोडवर फटाके स्टॉलला परवानगी देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत ठेवावा. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांचा निषेध

0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
मेट्रो प्रकल्पाचे काम नागपूर मेट्रोला देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या मदतीने हा निषेधाचा प्रस्ताव मान्य करून सर्वसाधारण सभा तहकुब करण्यात आली.
शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी शहरात मेट्रो प्रकल्प राबविला जाणार आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) बैठकीत मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याने या प्रकल्पाला वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोला देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे जोरदार पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा कडक शब्दात समाचार घेत भाजप वगळता सर्वच पक्षांनी या वक्तव्यावर टीकेची झोड उठविली. ज्या शहरात मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, तेथील संपूर्ण काम त्या शहराच्या नावाने असलेल्या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनीकडे देण्यात आलेले आहेत. मग, पुणे मेट्रोसाठी दुजाभाव कशाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
अखंड महाराष्ट्र ही शिवसेनेची भूमिका असून, पुणे मेट्रोचे काम नागपूरला देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. पुण्याचा स्वाभिमान जपला पाहिजे, अशी भूमिका सेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी मांडली. पुणे मेट्रोचे काम नागपूरकडे देताय, आता नागपूर अंतर्गत पुणे महानगरपालिका असे नाव देणार का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते अरविंद ‌शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शहराचे खासदार, आठ आमदार तसेच पालिकेतील भाजपचे नगरसेवक गप्प का बसलेत. पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोला देण्यास या सर्वांचा पाठिंबा आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. नागपूरपेक्षा पुणे सर्व बाबतीत श्रेष्ठ असताना, प्रत्येकवेळी पुण्यावर अन्याय केला जातो. पुण्याबाबत राज्य सरकार असा भेदभाव करणार असेल तर येणाऱ्या निवडणुकीत पुणेकर वेगळा निर्णय घेतील, असे सभागृह नेते शंकर केमसे यांनी स्पष्ट केले. पुणेकरांच्या मागणीवरून नागपूर मेट्रोला काम देण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते. अशी मागणी करणाऱ्या पुणेकरांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली. रवींद्र धंगेकर, संजय बालगुडे यांनीही यावरून प्रशासनावर टीकास्र सोडले.

शिवसेनेच्या मदतीने प्रस्ताव
‘मेट्रोबाबत प्रस्ताव तयार करताना पुण्याच्या नावानेच करावा. त्याच प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. अन्य कोणत्याही नावाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार नाही,’ असे महापौरांनी सांगितले. नागपूर मेट्रोला काम देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा निषेध करून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. शिवसेनेच्या मदतीने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेने एकत्र येऊन हा प्रस्ताव मतदानाने मान्य केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images