Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संमेलनाध्यक्षपदासाठी प्रवीण दवणे रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डोंबिवली येथे होणाऱ्या नव्वदाव्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कवी प्रवीण दवणे यांचे नाव सुचविणारा अर्ज शुक्रवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत दाखल झाला. दवणे यांनी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला.
दवणे यांच्या अर्जावर सूचक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांची स्वाक्षरी आहे तर, अनुमोदक म्हणून प्रा. प्र. ल. गावडे, माधव राजगुरू, बाळासाहेब कारले, वर्षा तोडमल आणि देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यापूर्वी नागपूर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांचे नाव सुचविणारा अर्ज दाखल झाला आहे. तसेच डॉ. मदन कुळकर्णी, डॉ. रवींद्र शोभणे व साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या नावाची चर्चा आहे. डॉ. कसबे यांनी निवडणूक लढवायला नकार दिला आहे.
साहित्य महामंडळाचे कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे गेल्याने विदर्भातील साहित्यिकाला अध्यक्षपदाचा मान मिळतो की संमेलन डोंबिवलीत होणार असल्याने अध्यक्षपदावर पुण्या-मुंबईचेच वर्चस्व राहणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. संमेलन डोंबिवलीत असल्याने दवणे यांना फायदा होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
-----------------
टिळा लागावा किंवा मुकूट म्हणून मला अध्यक्षपद नको आहे. हे कार्याचे पद आहे. अध्यक्षपद हे वाड्.मयीन चळवळीचे केंद्र झाले पाहिजे. मी मधल्या पिढीचा असल्याने ज्येष्ठ आणि तरुण पिढीशी संवाद साधू शकतो. ग्रामीण भागातील तरुण संधीसाठी तसेच लेखक, समीक्षक, प्रकाशक यांच्या संवादाअभावी कोमेजून जात आहेत. मराठी भाषा विरत असेल तर माझ्यासारख्यांनी उभे राहणे गरजेचे आहे. निवडणुकीत श्रेष्ठ साहित्यिक उभे राहिले तर, माझी माघार घ्यायची तयारी आहे.
-प्रवीण दवणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रपट साक्षरता झाली महाग

$
0
0

‘एफटीआयआय’च्या कोर्सची फी पंचवीस हजार
Chintamani.Patki@timesgroup.com
.............
@chintamanipMT
चित्रपट साक्षरता निर्माण करण्यासाठी ‘एफटीआयआय’ वीस दिवसांचे कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करत आहे. विशेष म्हणजे ‘एफटीआयआय’ने या अभ्यासक्रमांचे शुल्क वीस हजार रुपये निश्चित केले आहे. यानुसार चित्रपट साक्षरता निर्माण करायची असल्यास चित्रपट प्रेमींना एका दिवसाला हजार रुपयापेक्षाही जास्त पैसे मोजावे लागतील. ‘एफटीआयआय’चे अभ्यासक्रम पुण्याबाहेर घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चित्रपटाकडे पाहण्याची दृष्टी विकसित करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आता विविध राज्यांत छोट्या अभ्यासक्रमांची सुरुवात करत आहे. आसाममधून ही सुरुवात होत आहे. कमी संधी असलेल्या राज्यांमध्ये चित्रपट साक्षरता निर्माण करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमातून केला जाणार असल्याचा संस्थेचा दावा आहे. संस्थेने गुवाहाटी येथे तीन मर्यादित काळाचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. १३ ऑक्टोबरपासून या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होणार आहेत. आसाम हे ईशान्य भारताचे प्रवेशद्वार आहे. ईशान्य भागातील राज्यांसाठी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, आगामी काळात देशातील विविध छोट्या शहारांमध्ये हे अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत.
‘सिनेमॅटोग्राफी, स्क्रीन प्ले व अभिनय असे हे प्राथमिक अभ्यासक्रम असून प्रत्येकी २० विद्यार्थ्यांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. २० दिवस हे अभ्यासक्रम घेण्यात येतील. जूनमध्ये झालेल्या शैक्षणिक परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्याने गुवाहाटी येथे आसाम सरकारच्या सहकार्याने अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे,' अशी माहिती ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी ‘मटा’ला दिली.
‘एफटीआयआयमध्ये तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा असतात आणि तितकेच प्रवेश दिले जातात. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना प्रवेश मिळत नाही, तसेच चित्रपटांच्या बाबतीतले कुतूहल अनेकांना असते. या कलेविषयी साक्षरता व्हावी या हेतूने एफटीआयआय आता लोकांपर्यंत जाणार आहे. यातून अनेकजण चित्रपटांकडे वळतील अशी आशा आहे. देशात चित्रपटांचे लोकशाहीकरण होणे आवश्यक आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
-----------------
‘एफटीआयआय’तर्फे अभ्यासक्रमांसाठी पुणे-मुंबई येथून तज्ज्ञ पाठविण्यात येणार आहेत. यासाठी जी तांत्रिक सामग्री लागेल ती संस्थेला विकत घ्यावी लागेल. त्यासाठी लागणारी सामग्री विकत घ्यावी लागेल. त्यामुळे शुल्क जास्त वाटत असले, तरी आर्थिक बाजू सक्षम नसलेल्या विविध संस्थांच्या सहकार्यातून हे अभ्यासक्रम कमी शुल्कामध्ये देण्याचा प्रयत्न करू.
- भूपेंद्र कँथोला, संचालक एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राग-द्वेष टाळून इतिहासलिहायला हवा : ‌शिवदे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘इतिहास किंवा कलाशाखेकडे मुले जात नाहीत. रागद्वेष टाळून इतिहास लिहायला हवा, आज तसे होते का? इतिहास लेखनासाठी हा कठीण काळ आहे,’ असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुरस्कार’ प्रा. डॉ. आनंद दामले यांना ‘कसबा बीड - एक ऐतिहासिक नगर’ या ग्रंथासाठी देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, इतिहास अभ्यासक महेश तेंडुलकर या वेळी उपस्थित होते.
‘अनेक गावांचा इतिहास लिहिणे गरजेचे आहे. गावातील अनेक गोष्टी लुप्त होत आहेत. सणउत्सव दिसत नाहीत. माणसे एकमेकांपासून दुरावत आहेत. पूर्वजांचा इतिहास आपण लिहिला तर आजसुद्धा प्रेम, जिव्हाळा, आनंद निर्माण करता येईल. प्रत्येक गावचा इतिहास ‘गॅझेटिअर’ होणे गरजेचे आहे,’ अशी अपेक्षा डॉ. शिवदे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘१२ व्या शतकात काश्मीरच्या राजाच्या एका सरदाराचा मुलगा ‘कल्हण’ याने काश्मीरचा इतिहास ‘राजतरंगिणी’ या नावाने लिहिला. त्या पूर्वीपासून तेथे इतिहास लेखनाची परंपरा आहे. डॉ. दामले यांनी केलेले संशोधन आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल.’ प्रा. जोशी म्हणाले, ‘दत्तो वामन पोतदार हे चालता बोलता ज्ञानकोश होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर सात दशके त्यांचा विलक्षण प्रभाव होता. अखंड ज्ञानसाधना करताना त्यांनी दुसरीकडे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक संस्थांमधील कार्यकर्तेपणही तितक्याच दिमाखात कसोशीने पार पाडले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेत पोतदारांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी साहित्य परिषदेच्या इतिहासाबरोबरच संमेलनाचाही इतिहास लिहिला.’
‘कोल्हापूर जिल्ह्यातील ‘कसबा बीड’ गावात १०० ते १५० वीरगळ (वीरांच्या स्मृतिशिळा) आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या हे गाव महत्त्वाचे आहे. हे ओळखून पुस्तक लिहिले,’ अशी भावना डॉ. दामले यांनी व्यक्त केली. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषद निवडणूक लांबणीवर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी ही निवडणूकच लांबणीवर टाकण्याची खेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून खेळली जात असल्याची चर्चा आहे. येत्या डिसेंबर महिन्यात अपेक्षित असलेली ही निवडणूक महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल भोसले यांची मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. या मुदतीपूर्वी पंचेचाळीस दिवस अगोदर विधान परिषदेची निवडणूक जाहीर होणे आवश्यक आहे. परंतु राज्यातील अन्य निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक फारच गाजली होती. विधान परिषदेच्या या जागेसाठी राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने चंद्रशेखर भोसले यांना उमेदवारी दिली होती. परंतु, ऐन वेळी भाजपचे उमेदवार भोसले यांनी निवडणुकीतून माघार घेतली. भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकत नसल्याने ही माघार घेतल्याचे स्पष्टीकरण तक्कालिन प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. मात्र, ही माघार जिव्हारी लागल्याने भाजपचे तत्कालिन शहराध्यक्ष गिरीश बापट यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
विधान परिषदेची ही जागा अगदी अलगदपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसले यांना मिळाल्याची बोच अद्याप शहर भाजपमध्ये आहे. त्याचा वचपा काढण्याची संधी आता चालून आली असल्याने त्यासाठी भाजपकडून खेळी खेळली जात आहे. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जागेसाठी महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य मतदान करतात. सद्यस्थितीत या स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. विधान परिषदेच्या या जागेसाठी लगेच निवडणूक झाल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होऊ शकतो.
आगामी चार महिन्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला त्यांचे संख्याबळ मोठ्या संख्येने वाढण्याचा विश्वास आहे. हे संख्याबळ वाढल्यानंतर राष्ट्रवादीकडून ही जागा खेचून आणणे शक्य असल्याचा नेते मंडळींचा दावा आहे. त्यामुळेच विधान परिषदेची ही निवडणूक काही काळ लांबविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
...
अजित पवार यांचा आरोप
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक भाजप लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात पवार यांनी हा आरोप केला. महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यावर ही विधान परिषदेची निवडणूक घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारीबाबत निर्णय नाही

$
0
0

सोशल इंजिनीअरिंगच्या अभ्यासानंतरच तिकीट; अजित पवारांची स्पष्टोक्ती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्यानेच शहराचा विकास झाला आहे. दोन दिवसापूर्वी आगामी महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली असली तरी उमेदवारी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पालिकेत पुन्हा पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी सामाजिक तसेच सोशल इंजिनीअरिंगचा अभ्यास सुरू असून, त्यानुसारच तिकिटाचे वाटप केले जाणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. पक्षाच्या या पदाधिकाऱ्यांना इतकी तिकिटे देण्याचे फिक्स झाले, अशा पद्धतीच्या कोणत्याही अफवांसर विश्वास न ठेवता कामाला लागा, अशा सूचनाही पवार यांनी केल्या.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी’च्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्या वतीने कार्यशाळा घेतल्या जात आहे. कर्वेनगर येथील दुधाणे लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. पक्षाची शहर कार्यकारिणी‌, विधानसभा अध्यक्ष, सेल अध्यक्ष यांच्यासाठी ‘विचारमंथन आणि कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
‘सर्वसामान्यांच्या मनात काय भावना आहे, यावर निवडणुकीचा निर्णय अवलंबून असतो. आगामी पालिका निवडणुकीत पालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे,’ असे पवार यांनी सांगितले. ‘गेल्या दहा वर्षात ‘राष्ट्रवादी’ने पालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी केलेल्या कामाची पाहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर मांडली पाहिजे. यासाठी अधिकाधिक सोशल मिडियाचा वापर करण्याची गरज आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पक्षाने ठराविक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्याच्या अफवा सध्या उठत असल्याचे सांगत, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केली.
तिकीट वाटपाचा निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेतला जाणार आहे. पक्षातील प्रत्येक घटकाला विभागाला विश्वासात घेऊन उमेदवारीसाठी तिकीटे दिली जाणार आहेत. ज्या उमेदवाराचे काम चांगले असेल, त्याचा जनसंपर्क दांडगा असेल, अशांना तिकिटांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. पक्षातील सामाजिक स्थिती, सोशल इंजिनीअरिंग याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंताच तिकीट वाटपाचा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, दिलीप बराटे यांच्यासह वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
...
ज्यांचा जनसंपर्क दांडगा असेल, अशा उमेदवारांना तिकीटवाटपात प्राधान्य देण्यात येईल. जाणार आहे. पक्षातील सामाजिक स्थिती, सोशल इंजिनीअरिंग याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंताच तिकीट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच याबाबतचा निर्णय वरिष्ठांशी चर्चा करूनच घेतला जाणार आहे.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी पासधारकांना ओळखपत्र बंधनकारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) योजनेतील सवलतीच्या पासची प्रवाशांकडून पुनर्विक्री होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आता या पाससाठी प्रवाशांना ओळखपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अमंलबजावणी केली जाणार आहे.
आळंदी रोड बीआरटीच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘पीएमपी’ने १४ ऑगस्टपासून सवलतीत पास देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पास योजनेला मुदतवाढ देण्यात आली. मात्र, अनेक प्रवासी प्रवास झाल्यानंतर हा पास विकत असून, त्यांचा पुनर्वापर होत असल्याचे निर्दशनात आले होते. त्यामुळे हे गैरप्रकार रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथके तयार करण्यात आली. मात्र, अद्यापही ते प्रकार सुरूच असल्याने ‘पीएमपी’ने हा निर्णय घेतला.
पास केंद्र व बसमध्ये ओळखपत्र पाहून पास देण्यात येणार आहे. त्यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखत्र, वाहन परवाना, पासपोर्ट, सरकारी नोकरी असलेला क्रमांक यापैकी एक ओळखत्र गरजेचे आहे. संबंधित ओळखपत्रातील शेवटचे तीन क्रमांक पासवर टाइप अथवा पंचिंग पद्धतीने नोंदविण्यात येईल, असे ‘पीएमपी’ने प्रशासनाने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षप्रवेशावरून वाद

$
0
0

गिरीश बापट आणि काकडेंमधील वाद मिटवण्यास मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय जनता पक्षात सुरू झालेल्या ‘इन्कमिंग’च्या चढाओढीतून पक्षाच्या नेत्यांमधील वाद उफाळून आले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला, तेव्हाच प्रकरण शांत झाल्याचे समजते. पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्यात हे वाद झाल्याची चर्चा शहरभर झाली आहे.
महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी पक्षाच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षाला यश मिळण्याची शक्यता कमी असलेल्या प्रभागांत इतर पक्षातील वजनदार उमेदवार आणून त्यांना लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार संजय काकडे यांच्या पुढाकारातून इतर पक्षातील नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केले. पालिकेतील गटनेते गणेश बीडकर हेही या प्रवेशाच्या कार्यक्रमांना उपस्थित होते. मात्र, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालकमंत्री गिरीश बापट तसेच खासदार अनिल शिरोळे त्या वेळी गैरहजर असल्याने जोरदार चर्चा सुरू होती. यापैकी अनेकांना निवडणुकीत उमेदवारीचे शब्द देण्यात आल्याचेही कर्णोपकर्णी झाल्याने अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. त्यानंतर बापट यांच्या पुढाकारानेही काहींचा दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश झाला. त्याच दिवशी सायंकाळी काकडे यांच्या पुढाकाराने काँग्रेसच्या नगरसेविका सुनंदा गडाळे, मनसेचे नगरसेवक प्रकाश ढोरे यांचा प्रवेश होणार होता. पक्षात प्रवेश देताना पालकमंत्री आणि अन्य पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार या वेळी केली. यावरून बापट आणि काकडे यांच्यात वाद झाला. अखेर फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद मिटला. या वादामुळे प्रवेशाचा कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत लांबला होता. वाद वाढू नये यासाठी फडणवीस यांनी बापट यांना आवर्जून थांबविले होते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. महापालिकेत सत्ता येणारच, यावर भाजपच्या नेत्यांना शिक्कामोर्तब केले असून निवडणुकीनंतर शहरात कोणाचा वरचष्मा राहणार, यावरून ही चढाओढ आणि स्पर्धा सुरू झाल्याचे एका नेत्याने सांगितले. मात्र, निवडणुकीत आपापल्या समर्थकांना आणि बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी मिळवून देताना जोरदार रस्सीखेच आणि वादंग होणार, याचीच चुणूक यातून मिळाल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारीतील रोकड पळविणाऱ्याटोळीचा शहरात धुमाकूळ

$
0
0

- आरोपींना पकडण्यात पोलिस अपयशी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अंगावर घाण पडल्याचे सांगून आणि पार्किंग केलेल्या मोटारीतील ऐवज लुटणाऱ्या टोळ्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्याभरात या टोळ्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला तरी त्यांना पडकण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. गेल्या चोवीस तासात शहरात अशा स्वरूपाच्या चार घटना घडल्या असून, त्यामध्ये दहा लाखांच्या जवळ मुद्देमाल चोरीला गेला आहे.
गेल्या चोवीस तासात शहरात चंदननगर, विश्रांतवाडी, समर्थ आणि कोथरूड परिसरात या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कोहकडे (२६, रा. कोरेगाव, शिरूर) यांचा कार भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांना कार विकत घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी बँकेतून सहा लाख रुपये काढले होते. पैसे काढून ते शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास खराडी परिसरात आले. त्यांनी रक्षक सोसायटी येथे कार पार्क केली. कारमध्ये सहा लाखांची रोकड, चेकबुक, कागदपत्रे चालकाच्या समोरील भागात कॅरिबॅगमध्ये ठेवले व कार लॉक करून गेले. परत आल्यानंतर त्यांना पैसे असणारी बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत विनायक कांबळे (२६, रा. विश्रांतवाडी) यांनी तक्रार दिली आहे. कांबळे खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. किराणा माल खरेदी करण्यासाठी ते आळंदी रोडरील मुकेश जनरल स्टोअर्समध्ये रात्री आले. त्यांनी त्यांची कार दुकानाबाहेर पार्क केली. कारमध्ये लॅपटॉप व इतर साहित्य असा दोन लाखांचा माल असलेली बॅग ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी कारमधील दोन लाखाचा ऐवज असलेली बॅग चोरली. ते परत आले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोथरूड परिसरात तिसरी घडली असून, यात दुचाकीच्या डिक्कीमधून एक लाखाची रोकड लंपास करण्यात आली आहे. या प्रकरणी अमित म्हस्के यांनी तक्रार दिली आहे. अमित पौड रोडवरील न्यू मोबाइल केअर भारतीनगर येथे ज्यूस पिण्यासाठी थांबले होते. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये त्यांनी एक लाखांची रोकड पेपरमध्ये गुंडाळून ठेवली होती. ते ज्यूस पिण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांने गाडीच्या डिक्कीमधून एक लाखाची रोकड लंपास केली. या प्रकरणी कोथरुड पोलिस अधिक तपास करत आहेत.
नाना पेठेत आकाश ससाणे (१८, रा. मंगळवार पेठ) यांना अंगावर घाण पडल्याचे सांगून त्यांच्या जवळील तीस हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाकिस्तानात न जाण्याचा मोदींचा निर्णय चुकीचा

$
0
0

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटनेची (सार्क) यंदाच्या वर्षीची पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेला न जाण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय चुकीचा आहे. कोणतेही संकट आले तरी चर्चा होणे हा एकच मार्ग असतो. त्यामुळे पाकिस्तानबरोबर चर्चा कायम ठेवणे गरजेचे आहे,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी शनिवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कुटे उपस्थित होते.
‘गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानामध्ये जाऊन दहशतवाद विरोधात भूमिका घेतली पाहिजे असे ठाम भाषण करून आले. मात्र, पंतप्रधान मोंदीनी सार्कला न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले,’ असे अग्निवेश म्हणाले. ‘लष्काराने केलेले सर्जिकल स्ट्राइकचा सर्वांना अभिमान आहे. त्याचे श्रेय एक विशिष्ट पक्ष घेतो आहे. शहिदांच्या बलिदानाचा राजकारणासाठी असा वापर करणे चुकीचे आहे. पाकिस्तान सरकार, सेना यांना बाजूला ठेवून पाकिस्तानी कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना भारतात मोकळेपणाने येऊ जाऊ दिले पाहिजे. पाकिस्तानच्या सीमारेषेवर भिंत उभारण्याचा निर्णय दुर्दैवी आहे,’ असे अग्निवेश म्हणाले.
.....
चिदंबरम यांच्या चौकशीची मागणी
‘यूपीएच्या काळात नक्षलग्रस्त आठ राज्यांचे प्रमुख म्हणून पी. चिदंबरम कार्यरत होते. त्यांनी माओवाद्यांशी चर्चा करण्यासाठी शांतिदूत पाठविले होते. त्यानंतर दंडकारण्यात जाऊन मी माओवाद्यांशी चर्चा केली. त्या वेळी माओवाद्यांचा प्रवक्ता राजकुमार आझाद सरकारशी चर्चा करण्यासाठी तयार झाला होता. तो चर्चेसाठी नागपूर येथ आला असतानाच बनावट चकमकीत त्याला मारले गेले. या प्रकरणी चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे,’ असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनंदा गडाळे यांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘तीन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका सुनंदा गडाळे यांना काँग्रेसच्या गटनेत्यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार सहा वर्षे तुम्हाला निवडणूक लढविण्यास बंदीची कारवाई का करू नये, याचा खुलासा करावा,’ असे या नोटिशीमध्ये म्हटले आहे.
प्रभाग क्रमांक ४९ मधून (सिटी पोस्ट, कोटणीस दवाखाना) काँग्रेसकडून प्रतिनिधीत्व करणाऱ्या नगरसेविका गडाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाच्या बातम्या तसेच फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद ‌शिंदे यांनी गडाळे यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवन येथे गडाळे यांना बोलावून ही नोटीस बजाविली.
काँग्रेसमध्ये असतानाही भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने त्याबाबत खुलासा करावा, अन्यथा तुमच्यावर पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे या नोटिशीमध्ये म्हटले आहे. या नोटिशीचा खुलासा न केल्यास तुमच्यावर सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी का घालण्यात येऊ नये, असेही यामध्ये नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनिया होणार लष्करी अधिकारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सनदी अधिकारी बनण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी अभ्यासाचा भाग म्हणून ती ईशान्य भारतात गेली. तिथे काही महिला लष्करी अधिकाऱ्यांशी तिची भेट झाली, आणि तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. लष्करी अधिकारी बनण्याचे नवे स्वप्न तिने अवघ्या तीन वर्षात साकारलेही... वैष्णव गुजराती समाजातून लष्करात दाखल होणारी ती बहुदा पहिलीच मुलगी आहे.
पुण्याच्या सोनिया नेवासकर हिची ही यशोगाथा. सोनियाच्या वडिलांचा व्यवसाय असून आई नॅचरोपथीची डॉक्टर आहे. बहीण अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्रात बी. ए. केलेल्या सोनियाची कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम या परीक्षेद्वारे लष्करी सेवेसाठी निवड झाली आहे. ती रविवारीच चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी रवाना होईल.
‘बीए करतानाच मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. त्या दरम्यान चाणक्य मंडलातर्फे तीन वर्षांपूर्वी ईशान्य भारताचा अभ्यास दौरा करत असताना तिथे काही महिला लष्करी अधिकाऱ्यांशी भेट झाली. तेथील अशांत परिस्थितीतही काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांमुळे मला प्रेरणा मिळाली. त्यातच मला असलेल्या ट्रेकिंग, माउंटेनीअरिंगच्या आणि नेतृत्व गुणांच्या आवडीमुळे माझ्यासाठी लष्करी सेवा योग्य ठरेल, याची खात्री पटली. त्यामुळे मी सीडीएसई देण्याचा निर्णय घेतला,’ असे सोनिया म्हणाली.
‘पहिल्या सीडीएसई परीक्षेत मी यशस्वी झाले. परंतु, एसएसबी मुलाखतीच्या दुसऱ्या टप्प्यात माझी निवड होऊ शकली नाही. यंदाही मी ही परीक्षा दिली. त्यात मी परीक्षा आणि मुलाखतीतही यशस्वी झाले. संपूर्ण भारतातून ४६ मुलींची निवड झाली असताना फक्त ११ जागाच उपलब्ध होत्या. त्यात माझा क्रमांक १५ वा होता. यादीमधील पहिल्या काही मुलींनी नकार कळविल्याने ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीतून शुक्रवारीच मला विचारणा झाली, आणि मी तत्काळ होकार दिला.’
‘माझी निवड झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. त्यासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार होतेच. परंतु, ही सुरुवात आहे. अजून एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण बाकी आहे. त्यानंतर मी लष्करात अधिकारी बनेन,’ असेही सोनियाने आवर्जून नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विद्यापीठात ओपन फोरमचा शुभारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर, घटनेवर अथवा विविध प्रकारच्या लिखाणांवर त्यांचे विचार मुक्तपणे व्यासपीठावर मांडण्याची आणि चर्चा करण्याची संधी मिळतेच असे नाही. त्यामुळे त्यांना भविष्यात ‘स्टेज डेअरिंग’चा किंवा रोखठोक मत मांडण्यासाठी सामना करावा लागतो. या सर्वांवर उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाने पुढाकार घेऊन शनिवारी ‘ओपन फोरम’चा (मुक्त व्यासपीठ) शुभारंभ केला.
या ओपन फोरमद्वारे विभागतील विद्यार्थ्यांना चालू घडामोडी, वृत्तपत्रांतील लेख व बातम्या, कथा व कविता, विषय किंवा घटनांवर मुक्तपणे विचार मांडता आणि चर्चा करता येणार आहेत. या व्यासपीठावर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यांना वाटत असणाऱ्या भावनिक विषयांवर व्यापक स्वरुपात चर्चा होणार आहे. विभागप्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांच्या पुढाकाराने हे मुक्त व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. या व्यासपीठात विभागातील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी असणारे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
हे मुक्त व्यासपीठ विभागाच्या इमारतीत दर शनिवारी दुपारी उपलब्ध होणार आहे. व्यासपीठावर विचार मांडण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची पूर्वकल्पना विभागाला द्यावी लागणार आहे. या व्यासपीठाचा शुभारंभ डॉ. सोनवणे, डॉ. गीता शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. या व्यासपीठावर शहीद जवानांना श्रद्धांजली, शिक्षण व आतंकवाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान व विचार आणि कविता यावर विद्यार्थ्यांनी मुक्तपणे विचार मांडले. ‘कॅनडा येथील कॉनकॉर्डिया विद्यापीठात अशा प्रकारची मुक्त चर्चा मुक्त व्यासपीठावर होताना पाहिली. आपल्या विभागात अशा प्रकारचे व्यासपीठ सुरू करण्याचा विचार आला, आणि त्यानुसार हे व्यासपीठ सुरू केले,’ असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारला धडकून चौदा वर्षाच्यामुलाचा मृत्यू, दोन जखमी

$
0
0

- धायरी परिसरातील घटना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
धायरी परिसरातील मानस सोसायटी समोरील तीव्र उतारावर सायकलवरील नियंत्रण सुटल्यामुळे कारला समोरून धडक बसून झालेल्या अपघातात चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर, पाठीमागे बसलेले दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भंयकर होता की सायकल धडकल्यानंतर तिघेही उडून कारच्या पलीकडे जाऊन पडले. अनिकेत विष्णू शिरसाट (१४, रा. बडदे चाळ, धायरी,) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. सुजीत काळे (१३) व पवन चव्हाण (१२) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनिकेत व जखमी एकमेकांचे मित्र आहेत. ते सहावी व सातवीमध्ये शिकत असून, एकाच परिसरात राहण्यास आहे. धायरी परिसरातील मानस सोसायटी रोडवरून येताना तीव्र उतार आहे. या उतारावरून अनिकेत व त्याचे मित्र सायकलवरून ट्रीपल सीट येत होते. त्या वेळी अनिकेत सायकल चालवत होता. तीव्र उतार असल्याने सायकलचे ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे अनिकेतला सायकलवर नियंत्रण ठेवता आले नाही. उतारावर वेगात सायकल खाली येऊन समोरून आलेल्या कारवर जाऊन आदळली. यात अनिकेत सायकलवरून उडून कारच्या पलीकडील बाजूला जाऊन पडला. तर, दोघे जण रोडवर पडले. यात अनिकेतला गंभीर मार लागला. नागरिकांनी त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अनिकेतच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. उर्वरित दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक जे. सी. गडकरी या तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाषाण’वर कोणाचे नाव ?

$
0
0

राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपमध्ये चुरस
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या निवडणुकीसाठी बदललेल्या रचनेमध्ये ‘बाणेर-बालेवाडी-पाषाण’ या चार सदस्यीय प्रभागात चुरशीच्या लढतीचे चित्र राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तीन प्रमुख राजकीय पक्षांमधील लढतीत ‘पाषाण’वर कोणाचे नाव कोरले जाणार हा उत्सुकतेचा विषय आहे.
महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे. त्यासाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. या रचनेत शहराच्या पश्चिमकडील भागात बाणेर-बालेवाडी-पाषाण असा प्रभाग करण्यात आला आहे. बाणारे-बालेवाडी हा उच्चशिक्षित सोसायट्यांचा भाग तसेच पाषाणमधील उच्चभ्रू सोसायट्यांबरोबरच झोपडपट्टीच्या भागाचा समावेश या प्रभागात आहे.
बालेवाडी गावठाण ते बाणेर गाव, विधाते वस्ती, मुरकुटे वस्ती, ग्रीन पार्क, सोमेश्वर वाडी, एआरडीई, पाषाण तळे, सुतारवाडी, एचइएमआरएल, संजय गांधी झोडपडपट्टी, लमाणतांडा तसेच बावधान व सूस गावच्या हद्दीपर्यंत हा प्रभाग पसरला आहे. मागील निवडणुकीत या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
नव्याने तयार झालेल्या या प्रभागातील पाषाणमधून यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुषमा प्रमोद निम्हण व रोहिणी चिमटे या निवडून आल्या होत्या. बाणेर-बालेवाडीमधून बाबुराव चांदेरे व रंजना मुरकुटे विजयी झाले होते. नव्या प्रभागात या सदस्यांचा बहुतांश भाग आला आहे. काँग्रेसचे नगरसेवक व सध्या शिवसेनेशी नाळ जुळविलेल्या सनी निम्हण यांचाही भाग नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे.
बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभागात ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला व दोन खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुल्या प्रवर्गात माजी नगरसेवक प्रमोद निम्हण व बाबूराव चांदेरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गात पक्षाचे पदाधिकारी लहू बालवडकर यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच विद्यमान नगरसेविका रंजना मुरकुटेही तेथून लढण्यास उत्सुक आहेत. चिमटे यांचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने त्यांना अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेनेकडून नगरसेवक सनी निम्हण हे खुल्या गटातून येण्याची शक्यता आहे. तसेच संजय निम्हण, सागर बालवडकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. महिला गटात सुवर्णा निम्हण यांचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो. सनी निम्हण यांचा हा जुना वॉर्ड असल्याने राष्ट्रवादीसमोर त्यांचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपनेही या प्रभागातून जोरदार तयारी केली आहे. भाजपचे अमोल बालवडकर, राहुल कोकाटे तसेच आबा सुतार हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सुतार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खुल्या गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत या भागातील काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. गतवेळी सनी निम्हण यांच्यासमवेत ज्ञानेश्वर तापकीर, दिलिप मुरकुटे यांनी काँग्रेसचा किल्ला लढविला होता. परंतु आता निम्हण हे शिवसेनेचा भगवा हाती धरणार असल्याने काँग्रेसला उमेदवार शोधण्यापासून काम करावे लागणार आहे. मनसेने गतनिवडणुकीत चमत्कार घडविला होता. परंतु या भागातून मनसेचा उमेदवार विजयी झाला नाही. तथापि सुहास निम्हण, प्रवीण शिंदे तसेच अनिकेत मुरकुटे हे मनसेचे इंजिन चालविण्याची शक्यता आहे.
...
काँग्रेस आणि मनसे दुबळी
या प्रभागात काँग्रेस व मनसेची अवस्था दुबळी आहे. लोकसभा व विधानसभेतील विजयामुळे भाजपच्या दंडावरच्या बेडक्या फुगल्या आहेत. शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण हे आपला मुलगा सनी याच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी ताकद लावेल. त्यामुळे या प्रभागातील लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी पुन्हा उगवणारच: राज ठाकरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘काही जण म्हणतात राज ठाकरे मावळलाय; पण मावळलेला पुन्हा उगवतोच ना… विझला म्हणाले असते तर विचार केला असता,’ असे सांगत ‘राजकारणाच्या विश्वात मी पुन्हा उगवणारच,’ असे सूतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले.

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी त्यांची पुण्यात भेट घेतली. त्या वेळी ठाकरे, परांजपे आणि मित्रमंडळींच्या गप्पांचा फड रंगला हाेता. राजकारणापासून ते व्यंगचित्राच्या शैलीपर्यंत ठाकरे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘सामना’तील व्यंगचित्राचा वाद, मुंबई शहराची झालेली अनास्था अशा अनेक विषयांवर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या भाष्य करत शिवसेनेची फिरकी घेतली.

ठाकरे म्हणाले, ‘राजकीय व्यंगचित्र करताना सर्वज्ञान व उपजत सेन्स हवा. राजकीय व्यंगचित्रकाराने स्पष्ट भूमिका घ्यायला हवी. अंगाला काही लावून घ्यायचं नाही, असं असेल तर काही नाही होऊ शकत. दोन द्यायची व घ्यायची तयारी हवी. तरच व्यंगचित्रातून मार्मिक टिप्पणी करता येऊ शकते. व्यंगचित्र पाहून अनेकजण रुसतात. त्याला मी काय करू? ती एक प्रतिमा असते. काही जण चिडतात, तर काही जण आनंदाने घेतात. रोज मला अनेक कल्पना सुचतात, पण ते तोंडावाटे बाहेर येतं आणि मग लोक नाराज होतात. मुंबईत साडेतीन हजार कोट रुपये खर्च करून चांगले रस्ते होत नाहीत. शहरात लोकांच्या गरजा काय आहेत? हे नगरसेवकांना कळतच नाही. सीएसआर फंडातून अनेक विकासकामे होऊ शकतात. मात्र, पैसे खायला मिळत नाही म्हणून कोणीच पुढाकार घेत नाही. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा एक कोटी खर्च केले. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग नव्हता. त्यामुळे हा किल्ला होऊ शकला. राजकारण हे जगण्याचे साधन असू शकत नाही, राजकारण्याचे मन संवेदनशील हवे, गेंड्याची कातडी असून चालत नाही.’

नारायण राणेंवर ‘सर्जिकल स्ट्राइक’

राज ठाकरे यांनी रवी परांजपे यांच्या भेटीत कुंचला आणि कॅनव्हास ओघाओघाने आलाच. राज ठाकरे यांना व्यंगचित्र काढण्याची विनंती केल्यानंतर ‘चला सर्जिकल स्ट्राइक करू,’ असे म्हणत त्यांनी नारायण राणे यांचे व्यंगचित्र काढले आणि तिथे उपस्थित असलेल्यांना मनमुराद हसण्याचा मोह आवरता आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महानिर्मिती’तील ‘पदवापसी’मुळे खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना ‘महानिर्मिती’च्या ज्या अधिकाऱ्यावर गैरप्रकारांचे गंभीर आरोप करून आंदोलनाचे इशारे दिले, त्याच अधिकाऱ्याला पक्षाने सत्तेवर आल्यानंतर चौकशीऐवजी फेरनियुक्तीचे बक्षीस दिले आहे. राज्याच्या अतिवरिष्ठ पातळीवर करण्यात आलेल्या या ‘पदवापसी’मुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील प्रमुख कंपनी असलेल्या ‘महानिर्मिती’मध्ये सी. एस. थोटवे या संचालकांच्या फेरनियुक्तीवरून वादळ निर्माण झाले आहे. २००९ पासून थोटवे संचालक आहेत. भाजपच्या प्रदेश शाखेचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी मार्च २०१३मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये राज्यातील काही वीजप्रकल्पांच्या उभारणीबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. सुमारे साडेचार हजार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांच्या खर्चात साडेआठ हजार कोटी रुपयांची वाढ झाल्याचा आरोप भांडारी यांनी केला होता; तसेच या प्रकल्पांच्या उभारणीत होत असलेल्या विलंबाविषयीही प्रश्नचिन्ह उभे केले होते. ‘महानिर्मिती’चे संचालक थोटवे यांची पात्रता नसताना नियुक्ती करण्यात आल्याचाही आरोप भांडारी यांनी केला होता आणि भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

‘थोटवे हे स्टोअरकीपर म्हणून रुजू झाले असून, वीजप्रकल्प उभारण्याचे ज्ञान त्यांच्याकडे नाही, तरीही त्यांच्याकडे या प्रकल्पांची जबाबदारी कशी सोपविली,’ असा आरोप भांडारी यांनी केला होता. वीज प्रकल्पांच्या उभारणीतील विलंबाविषयी राज्य आणि केंद्राच्या ऊर्जा विभागाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा दावा त्यांनी केला होता.

भाजपचे सरकार दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर या प्रकरणी आरोपांची चौकशी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तशी कोणतीही चौकशी झाली नाही. ज्या थोटवे यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांची पुन्हा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांची चौकशी हासुद्धा निवडणुकीतील ‘जुमला’ ठरल्याची टीका करण्यात येत आहे. सरकारच्या अतिवरिष्ठ गोटातून हा
निर्णय घेण्यात आल्याने ऊर्जा विभागाचे प्रमुखही बुचकळ्यात पडल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकेरी रस्त्यास औंधकरांचा विरोध

$
0
0

व्यापारी संघटनेचा रास्ता रोकोचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे/औंध
ब्रेमन चौक ते परिहार चौक हा रस्ता कायमस्वरूपी एकेरी करण्यास औंधकरांचा विरोध कायम असून नवीन डीपीमध्ये हा रस्ता ३० मीटर दर्शवला आहे. नवीन डीपीनुसार या रस्त्याची रुंदी सहा मीटरने वाढत असून त्या जागेवर वॉकिंग प्लाझा, तसेच सायकल ट्रॅक करण्यात यावे, अशी सूचना स्थानिकांकडून पुढे येत आहे. दरम्यान, व्यापारी संघटनेने सोमवारी सायंकाळी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

औंध येथील हॉटेल राधिकाच्या आवारात रविवारी सकाळी स्थानिक नागरिकांकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी आमदार विजय काळे, स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, प्रभाग समिती सदस्य बाळासाहेब रानवडे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाना वाळके, औंध व्यापारी संघटनेचे राजीव ओसवाल, मधुकर मुसळे, गोकुळ गायकवाड, गणेश कलापुरे, सचिन वाडेकर, राजेंद्र मुरकुटे आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटीतील प्रकल्पांना किंवा विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही. मात्र, दुहेरी रस्ता एकेरी करून त्याठिकाणी वॉकिंग प्लाझा आणि सायकल ट्रॅक बनवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही नागरिकांकडून लोक प्रतिनिधींना विचारण्यात आला. प्रशासनाने वॉकिंग प्लाझा नक्की सुरू करावा मात्र, रस्ते बंद करून नाही. या योजनेला नागरिकांचा पाठिंबा नसताना प्रशासन आपली भूमिका रेटत असून ते योग्य नाही, अशी तक्रारही या वेळी करण्यात आली.

ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा रस्ता नवीन डीपीमध्ये ३० मीटर दाखवण्यात आला आहे. सध्या या रस्त्याची रुंदी ही २४ मीटर आहे. नवीन डीपीनुसार हा रस्ता तयार करावा आणि वाढलेल्या सहा मीटर जागेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वॉकिंग प्लाझा, सायकल ट्रॅक सुरू करावेत, अशी सूचना स्थानिक नगरसेवक निम्हण यांनी केली. काळे यांनी दुहेरी वाहतूक ठेवण्यात यावी अशी भूमिका मांडत नागरिकांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी औंध कृती समिती तयार करावी आणि एकेरी रस्त्याला विरोध करावा, असे सूचवले. औंधगाव व्यापारी मंडळ, औंधगाव विकास मंडळांचे सदस्य, मोहल्ला कमिटीचे सदस्य यांनी रस्ता एकेरी करण्यास विरोध दर्शवला आहे.

वॉकिंग प्लाझावर गर्दी

नागरिकांनी शनिवारी सायंकाळी या ठिकाणी वॉकिंग प्लाझावर गर्दी केली होती. या रस्त्यावर बेंच टाकले होते. स्थानिकांनी स्पीकरवर गाणी लावली होती. या गाण्याच्या ठेक्यावर नागरिकांनी ताल धरला होता. सायकल ट्रॅकवर सायकल चालवण्याचा आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या १५ हजार जागा रिक्त

$
0
0

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यासाठी तब्बल साडेतीन महिन्यांपासून सुरू असणारी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पाच नियमित फेऱ्या आणि सहा विशेष अशा एकूण अकरा जंबो फेऱ्या पार पडल्या. या फेऱ्यांमधून २४५ कॉलेजांमध्ये ६४ हजार २३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. मात्र, तरिही कॉलेजांमध्ये १५ हजार ६४२ जागा रिक्त राहिल्या आहेत

अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ज्युनियर कॉलेजमध्ये असलेल्या ७९ हजार ६६५ जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जून महिन्यात सुरू झाली. ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत एकूण अकरा फेऱ्या पार पडल्या. मात्र, तरी देखील कॉलेजामंध्ये १५ हजार ६४२ जागा रिक्त आहेत. या जागामंध्ये सर्वाधिक म्हणजेच ६ हजार २९६ जागा विज्ञान (इंग्रजी) शाखेत रिक्त आहेत. वाणिज्य (मराठी) शाखेत सर्वांत कमी जागा १ हजार १०६ जागा रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती समितीने दिली.

या सर्व रिक्त जागा नव्यानेच सुरु झालेल्या कॉलेजांमघ्ये आणि तुकड्यांमध्ये आहेत. या कॉलेजांमध्ये प्रवेश क्षमतेच्या केवळ २० ते ३० टक्केच जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. याउलट प्रतिष्ठीत कॉलेजांमध्ये बोटावर मोजक्या जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील वर्षी ही प्रवेश प्रक्रिया कमी कालावधीत पारदर्शक आणि तक्रारमुक्त पद्धतीने पार पडावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाने मागवल्या सूचना

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात ज्युनियर कॉलेजांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०१७-१८ वर्षासाठी अकरावीला प्रवेश घेण्यासाठी या वर्षीप्रमाणेच अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत अधिक सुलभता येण्यासाठी आणि प्रक्रिया अधिक चांगली होण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, माजी प्राचार्य व शिक्षक, विविध विद्यार्थी व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, पालक व विद्यार्थी आदींकडून सूचना मागविल्या आहे. इच्छुकांनी या सूचना लेखी स्वरूपात शिक्षण उपसंचालक कार्यालयात किंवा 11thonlineadmissiondypune@gmail.com या ई-मेलवर पाठवायच्या आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाठीभेटींचा ‘राउंड’ पूर्ण

$
0
0

नगरसेवकांकडून प्रभागात मतदारांशी संपर्क मोहीम सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रभागरचना दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाली असली, तरी काही माननीयांची नव्या प्रभागातील ‘पहिला राउंड’ येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. प्रभागाची नवी हद्द कशी असेल, याची कुणकुण काहींना प्रा-रूप रचना जाहीर होण्यापूर्वीच लागल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करून गाठी-भेटी घेण्यासही अनेकांनी सुरुवात केली होती. सध्याच्या प्रभागातील सर्व भाग आत्ताच पिंजून काढत, यापुढील टप्प्यात नव्याने समाविष्ट झालेल्या भागांतील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीची प्रभागरचना गेल्या शुक्रवारी जाहीर झाली. या रचनेतून प्रभागाच्या नव्या हद्दी स्पष्ट झाल्या असल्या, तरी काही ‘माननीयां’ना त्यांच्या प्रभागाची माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. २०१२च्या निवडणुकीतील महत्त्वाचा भाग नव्या रचनेमध्येही कायम राहिल्याचे संकेत मिळाल्याने जुन्या-जाणत्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्या गाठी-भेटी घेण्यासाठी सुरुवातही केली गेली. शहराच्या उपनगरांसह मध्यवस्तीतील काही नगरसेवकांच्या प्रभागात मोठे फेरबदल झालेले नाहीत. त्यामुळे, गेल्या ८-१० दिवसांपासून कधी सकाळी, तर कधी सायंकाळी तास-दोन तास मतदारांशी संपर्क साधला जात आहे. सणा-सुदीचे औचित्य साधून विविध कार्यक्रम-उपक्रमांद्वारेही मतदारांची भेट घेण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. काहींची संपर्क मोहीम बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याने येत्या एक-दोन दिवसांत अनेकांचा ‘पहिला राउंड’ पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नव्या प्रभागरचनेनुसार सरासरी लोकसंख्या ७५ ते ८० हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे, सध्याच्या भागातील लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट पूर्ण करतानाच, नव्याने जोडल्या गेलेल्या भागातील विद्यमान नगरसेवकांनाही सोबत घेतले जात आहे. तसेच, प्रभागातील नागरिकांनाही नव्या भागाची माहिती व्हावी, यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ‘कनेक्ट’ करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक या माध्यमातून प्रभागाचा नवा नकाशा आणि नव्याने जोडला गेलेला भाग याची माहितीही मतदारांपर्यंत खुबीने पोहोचविण्यात आली आहे.

१६ प्रभाग ८० हजारांच्या पुढे

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेत ४१ प्रभाग असून, या प्रभागांची सरासरी लोकसंख्या ७० ते ८५ हजारांदरम्यान असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या प्रभागांची संपूर्ण माहिती पुढे आल्यानंतर एकूण प्रभागांपैकी सुमारे ४० टक्के म्हणजेच १६ प्रभागांची लोकसंख्या ८० हजारांहून अधिक आहे. त्यातही, तब्बल ११ प्रभागांची लोकसंख्या ८४ हजारांच्या पुढेच आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचताना सर्वच पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. प्रभाग क्र. ९ (बाणेर-बालेवाडी-पाषाण) हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठा (८५ हजार ०२६) प्रभाग ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे पारडे बनले जड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या मध्यवस्तीतील नवी पेठ-पर्वती (प्रभाग क्र. २९) यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नगरसेवकांचे जुने प्रभाग एकत्र झाले असले, तरी नवी रचना पाहता हा प्रभाग आजमितीस तरी भाजपसाठी अधिक पोषक असल्याचे चित्र आहे. भाजपमध्येच इच्छुकांची मोठी संख्या असून, इतर पक्षांकडून सध्या तरी तुल्यबळ उमेदवारांचा शोध सुरू आहे.

पुणे महापालिकेची आगामी निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. दोन सदस्यांचा प्रभाग चार सदस्यांचा करताना, जुन्या स. प. महाविद्यालय (क्र. ५१) प्रभागाला त्याच्या आसपासचा परिसर जोडण्यात आला आहे. त्यामुळे, नव्या रचनेत हा प्रभाग टिळक चौकापासून ते पुणे-सातारा रस्त्यापर्यंत पसरला आहे. जेधे चौकापासून टिळक चौकापर्यंत टिळक रस्त्याच्या डावीकडील संपूर्ण भाग या प्रभागात समाविष्ट होतो. त्याशिवाय, नवी पेठ, लोकमान्यनगर, राजेंद्रनगर, पत्रकार भवन, दत्तवाडी, दांडेकर पूल झोपडपट्टी, आंबिल ओढा झोपडपट्टी, नीलायम टॉकीजचा परिसर, सारसबाग, पर्वती गावठाण, लक्ष्मीनगर, मित्रमंडळ कॉलनी, पर्वतीदर्शन असा परिसर यात येतो. गेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक/नगरसेविकांनी या प्रभागाचे प्रतिनिधित्त्व केले आहे.

भाजपच्या मनीषा घाटे, धनंजय जाधव, स्मिता वस्ते यांच्यासह राष्ट्रवादीचे विनायक हणमघर, मनीषा बोडके आणि शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ या भागातून निवडून आले होते. नव्या रचनेमध्ये अनुसूचित जाती (महिला), इतर मागासवर्गीय (सर्वसाधारण) आणि खुला (महिला) व खुला, असे आरक्षण या प्रभागात पडले आहे. एससी (महिला) या आरक्षणामुळे प्रत्येक पक्षालाच उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

भाजपकडून धीरज घाटे, मनीषा घाटे, महेश लडकत, रघु गौडा, विनोद वस्ते यांच्यासह धनंजय जाधव यांची पत्नी, रमेश काळे यांची पत्नी आणि माजी नगरसेविका सरस्वती शेंडगे अशी इच्छुकांची भली मोठी फौज आहे. त्यापैकी, चार जणांनाच प्रत्यक्षात तिकीट देता येणार असल्याने भाजपमध्येच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून गटनेते अशोक हरणावळ पुन्हा निवडणूक लढवणार असून, पर्वतीतून सचिन तावरे यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. शिवसेनेकडून महिला उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे. विनायक हणमघर आणि मनीषा बोडके या विद्यमान नगरसेवकांना राष्ट्रवादीकडून पुन्हा संधी दिली जाऊ शकते. त्यांच्यासह इतर जागांवर लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेण्यात येत आहे.

यापूर्वी, या भागाचे प्रतिनिधित्त्व केलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक श्याम मानकर यंदा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासह पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांचे नावही चर्चेत आघाडीवर आहे. पर्वतीच्या भागातून विकास लांडगे यांचे नाव चर्चेत आहे. त्याशिवाय, किरण गायकवाड, सचिन आडेकर, सुधीर कुरुमकर आणि लक्ष्मी पवार यांच्याही नावांचा विचार केला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून सध्यातरी जयराज लांडगे आणि जयश्री पाथरकर यांच्या नावांची चर्चा आहे.

प्रभाग क्र. २९ : नवी पेठ, पर्वती
लोकसंख्या : ७० हजार ८४६

आरक्षण
अ : अनुसूचित जाती (महिला)
ब : ओबीसी (सर्वसाधारण)
क : सर्वसाधारण (महिला)
ड : सर्वसाधारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images