Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लायकी नसणाऱ्यांना महत्त्व नको

$
0
0

नाना पाटेकरांचा सलमानवर अप्रत्यक्षपणे हल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘देशापुढे आमची किंमत शून्य असून, कलाकार देशाच्या तुलनेत काहीच नाहीत. जवान हेच या देशाचे खरे हीरो आहेत. सर्वप्रथम देश असून, त्यानंतर कलाकार येतात. त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका,’ या शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी सलमान खानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. ‘पाकिस्तानी कलाकारांना सलमानने व्हिसा दिलेला नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
उरी हल्ल्यानंतर अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते. ‘पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नाहीत,’ असे वक्तव्य केल्यामुळे सलमानने अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर पाटेकर यांनी सलमानवर टीकास्त्र सोडले. एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
‘जवानांबद्दल कोणाला आदर वाटत नसेल, तर जनतेनेही त्यांचा आदर राखण्याची गरज नाही. ज्यांची लायकी नाही त्यांना आजिबात महत्त्व देऊ नये,’ या शब्दांत नाना यांनी सलमानला फटकारले. ‘सीमेवर युद्ध नसते; तेव्हा तेथे एकमेकांत बंधुभाव असतो. युद्ध सुरू झाल्यावर प्रतिस्पर्ध्यांना गोळ्या माराव्या लागतात. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आता काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यावर त्यांना पुन्हा काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय सर्वस्वी सरकारचा असेल,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
..
‘कलावंत, भारतीय हीच जात’

‘मला आजवर कोणी कधीही जात विचारली नाही आणि जात सांगण्याची माझ्यावर कधी वेळ आली नाही. कलावंत आणि भारतीय एवढीच माझी जात आहे. माझ्या कामावर जनतेने लायकीनुसार प्रेम केले आहे. म्हणून मला कधीही कोणतीही गोष्ट मागावीशी वाटली नाही. कोणत्या समाजाने काय करावे, यावर माझे काही म्हणणे नाही,’ असे सूचक वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सतत संचयाची पुढाऱ्यांची​ वृत्ती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘खेड्यांमध्ये शहरासारख्या सुविधा उभारल्या जात नाहीत, कारण राजकारण्यांना शहरांमध्ये मतदारसंघांची बांधणी करायची असते. सतत संचय करत राहणे ही या राजकारण्यांची वृत्ती आहे. आपण कधीतरी मरणार आहोत; हे त्यांना कधीच का समजत नाही’ असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी केला.
हॅबिटॅट फोरम (इनहॅप) या संस्थेने पुणे महापालिकेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘संघर्ष आणि सामर्थ्य : शहरातील श्रमजीवींच्या कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, इनहॅप संघटनेचे अध्यक्ष कीर्ती शहा, पालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, जाणीव संघटनेचे अध्यक्ष विलास चाफेकर, अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार, सुरेखा गाडे, संजय संख्ये, नवनाथ बिनवडे यावेळी उपस्थित होते.
‘मी टांझानियात गेलो होतो. आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती असूनही तेथील लोक सतत हसतमुख असतात. तेथील रस्त्यांवर खड्डे आणि कचरा नाही. आपल्याकडे चांगले रस्ते बनविणारा एकही कॉन्ट्रॅक्टर नाही, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील एकदा म्हणाले होते. त्यामुळे आपल्याकडे चांगले रस्ते बनविण्यासाठी टांझानियातून कॉन्ट्रॅक्टर आणला जावा, असा विचार त्यावेळी माझ्या मनात आला होता,’ असाही टोला नानांनी लगावला.
-------------------
नानांनी केला आर्त सवाल
‘सिग्नलजवळ भीक मागणाऱ्या मुलांना मी मोटारीत घेतो. दुसरा सिग्नल येईपर्यंत त्यांच्या या अवस्थेमागील कारण समजावून घेतो. आपण कुणाला नको आहोत, ही जाणीव अतिशय न्यूनगंड निर्माण करणारी असते. उच्चभ्रू वृत्तीला छेद देणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नसतो का, आपण आपली दारं कधी उघडणार आहोत,’ असा आर्त सवाल नाना पाटेकर यांनी केला. ‘शहरांमध्ये जगण्यासाठी येणाऱ्या श्रमिकांना दर्प घाणीचा नसतो, तो श्रमांचा असतो,’ असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परिसर स्वच्छतेमुळे मोहीम यशस्वी होईल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘स्वच्छता हा आचरणाचा विषय असून, प्रत्येकाने आपले घर आणि परिसर स्वच्छ राखला तर एका वर्षात स्वच्छता मोहीम यशस्वी होऊ शकते,’ असे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी व्यक्त केले.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डातर्फे आयोजित स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यक्रमासाठी पर्रीकर उपस्थित होते. खासदार अनिल शिरोळे, पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डाचे सीईओ डॉ. डी. एन. यादव, उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, सर्व सदस्य, कॅन्टोंन्मेंट बोर्डाचे संचालक गीता पेर्ती, ए. भास्कर रेड्डी व डिफेन्स इस्टेटचे संचालक केजेएस चौहान, खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डाचे सीईओ अमोल जगताप आणि देहूरोड बोर्डाचे सीईओ अभिजित सानप आदी उपस्थित होते.
त्यानंतर पर्रीकर यांनी पुणे बोर्डातर्फे उभारण्यात येत असलेल्या २० दक्षलक्ष घनमीटर आकाराच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. त्याचबरोबर हडपसर येथील कचरा डेपोलाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली.
------
‘बोहरी समाजाचा आदर्श उपक्रम’
पुण्यातील दाऊदी बोहरी समाजातर्फे गेल्या काही वर्षांपासून नजाफत म्हणजेच स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. पर्रीकर यांनी या उपक्रमाची पाहणी केली. जोहर हर्नेसवाला, फक्रुद्दिन साबुवाला आदी उपस्थित होते. समाजातील तरुण मुलांना समाजातीलच प्रत्येकी दहा कुटुंबांची जबाबदारी दिली जाते. ही मुले दररोज या कुटुंबांना भेट देऊन स्वच्छतेची पाहणी करून आवश्यक बदल घडवून आणतात. हे आदर्श उदाहरण असून इतरांनीही त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन पर्रीकर यांनी केले. धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दिन यांच्या आदेशाने आणि अब्देअली भाईसाहेब नुरुद्दीन यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबविण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणाला सुरुवात

$
0
0

शेतीमाल हमीभावासाठी डॉ. आढाव यांचे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रविवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, ‘आप’चे विजय पांढरे, लक्ष्मण पासलकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या वेळी संतोष नांगरे, नवनाथ बिनवडे आदी उपस्थित होते. डॉ. आढाव म्हणाले, ‘शेतमालाला हमीभाव मिळावा आणि कर्जमाफी व्हावी या मागण्यांसाठी आपले उपोषण आहे. शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न जनतेत आणि सरकारपुढे आला पाहिजे. सरकारने शेतीमालासंदर्भात फळभाज्या नियमनमुक्तीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आडत्यांना बाजूला केले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी माल विकायचा कुठे, त्यांना योग्य अशी बाजारपेठ नाही. त्यामुळे अनागोंदी निर्माण झाली आहे. सरकार हमीभावाची अंमलबजावणी करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांची दैना होणार आहे.’
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील म्हणाले, ‘डॉ. बाबा आढाव यांचे उपोषण लवकर सुटावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे आंदोलन व्यापक करण्याचा संघटनेचा विचार आहे. कामगार आणि शेतकरी प्रथमच एकत्र आले आहेत. हे आंदोलन हमाल मापाड्यांपुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशक झाले पाहिजे.’
शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिले आणि कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी उपोषण सुरू केले आहे. डॉ. आढाव यांच्या समर्थनार्थ राज्य हमाली मापाडी महामंडळाच्या वीस केंद्रांवर एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींची आत्महत्या; दोघे जण अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कासेवाडी येथील दोन मुलींच्या आत्महत्येप्रकरणी खडक पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली. तरुणांनी या मुलींना लग्नासाठी नकार दिल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली. कासेवाडी येथील आणखी एक मुलगी बेपत्ता असून, तिचा शोध घेण्यात येत आहे.
कासेवाडी येथील तीन मुलींनी मित्रांनी लग्नास नकार दिल्यामुळे नैराश्यातून दोन मुलींनी कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खडक पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. त्यांना कोर्टाने ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, बेपत्ता असलेल्या तिसऱ्या मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही.
राहुल विनोद गोफणे (वय १८, रा. कासेवाडी, भवानी पेठ) आणि सोहेल मुस्तफा शेख (वय २१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कासेवाडी येथील तिन्हीही मुली २९ सप्टेंबर रोजी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर दोघींचे मृतदेह वानवडी आणि हडपसर परिसरातील कॅनॉलमध्ये सापडले. अटक केलेल्या दोघांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील विद्या बनसोडे यांनी दोघांना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. आत्महत्या केलेल्या मुलींना आरोपींनी लग्नाचे वचन दिले होते. पण, नंतर त्यांना लग्नास नकार दिला. मुलींनी त्यांना मेसेज पाठवून कॅनॉलजवळ उभ्या असून, आत्महत्या करत असल्याचे सांगितले. यातील एक मुलगी बेपत्ता असून तिचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राला १०१ कोटींचा निधी ‘सरेंडर’

$
0
0

वेळेत निधी वापरण्यात शिक्षण खात्याला अपयश

Yogesh.Borate@timesgroup.com

Tweet : @yogeshborateMT

पुणे : केंद्र सरकारने राज्याच्या शिक्षण खात्याला माध्यमिक शिक्षणाच्या विकासासाठी म्हणून दिलेले जवळपास १०१ कोटी रुपये राज्याने केंद्राला ‘सरेंडर’ केल्याची धक्कादायक बाब आता उघड झाली आहे. या निधीचा योग्य त्या कारणासाठी वेळेत वापर करण्यात खात्याला अपयश आल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचेही याच निमित्ताने समोर आले आहे.

राज्यातील माध्यमिक शाळांचे सबलीकरण, मुलींच्या वसतिगृहांची उभारणी, व्यावसायिक शिक्षणासाठी पायाभूत सुविधांचा विकास आदी कामांसाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याने वेळोवेळी राज्य सरकारला हा निधी मंजूर करून दिला होता. त्यानुसार काही बाबतीत राज्यात कामांना सुरुवातही झाली होती; मात्र ही कामे पुढे सुरू ठेवण्यात, पूर्ण करण्यात राज्याचे शिक्षण खाते मागे पडले. त्यामुळेच त्यासाठीचा उपलब्ध निधी, पुन्हा केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षण खात्याच्या अधिकृत कागदपत्रांमधूनच या बाबी स्पष्ट होत आहेत. पायाभूत सुविधांचा विकास करण्यामध्ये शिक्षण खात्याच्या संथ कारभाराबाबत केंद्राने स्पष्ट शब्दांमध्ये ताशेरे ओढले असून, अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर लक्ष देण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

निधी वापरण्यात राज्याला अपयश

राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी वसतिगृहांची सुविधा उभारण्यासाठी केंद्राकडून मिळालेला निधी वापरण्यात राज्य सरकार अखेर अपयशीच ठरले. त्यामुळेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत राज्यात ४३ वसतिगृहे उभारण्यासाठी आलेला निधी पुन्हा केंद्र सरकारला परत करावा लागला आहे.

या योजनेच्या आधारे राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी वसतिगृहांची उभारणी केली जाणार होती. पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने किंवा घरापासून लांबच्या शाळांमुळे मुलींच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, यासाठी ‘आरएमएसए’च्या माध्यमातून ही वसतिगृहे उभारली जाणार होती. देशभरात उभारल्या जाणाऱ्या अशा साडेतीन हजार वसतिगृहांपैकी पहिल्या टप्प्यात राज्यात ४३ वसतिगृहे उभारली जाणार होती. त्यासाठी २०१२-१३ पासून हालचालीही सुरू झाल्या होता.

सुरुवातीच्या टप्प्यात राज्यात या वसतिगृहांसाठी जागा मिळविण्यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, त्यानंतरही पुढे काहीच होऊ शकले नसल्याचे आता शिक्षण खात्याच्या अधिकृत कागदपत्रांनीच दाखवून दिले आहे. या कागदपत्रांमधील नोंदींनुसार, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान योजनेच्या (आरएमएसए) माध्यमातून राज्यात मुलींसाठी एकूण ४३ वसतिगृहे उभारली जाणार होती. त्यापैकी केवळ सात वसतिगृहांचे काम सुरू झाले होते. मात्र, या योजनेतील एकही वसतिगृह अद्याप पूर्ण झालेले नाही. या संथ कारभारावर केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने आक्षेप घेतला. या योजनेतील उर्वरीत ३६ वसतिगृहांसाठीचा जवळपास ४६ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी राज्याने केंद्राला परत केला आहे; तसेच राज्यात २००९-१० आणि २०१०-११ मध्ये एकूण ३८७ माध्यमिक शाळांच्या सबलीकरणासाठी विकासकामे सुरू होणार होती. त्यासाठी जवळपास ५४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हे काम सुरूच न झाल्याने, हा निधी पुन्हा केंद्र सरकारकडे दिला जाणार आहे. सन २००९-१० आणि २०१०-११ मध्ये अशाच पद्धतीने २७५ शाळांमधून विकासाचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यासाठीचे बांधकामही सुरू झाले होते. अशा शाळांचा ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी परत करण्याचा प्रस्तावही राज्याने केंद्रापुढे ठेवला होता. मात्र, ही कामे सुरू झाल्याने केंद्राने हा प्रस्ताव नाकारला. आता राज्य सरकारने स्वतःच्या खर्चातून हे काम पूर्ण करण्याचे आदेशही केंद्राने राज्याला दिल्याचे ही कागदपत्रे सांगत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ समर्थकांच्या मोर्चाविरुद्ध तक्रार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाविरोधात पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात छावा संघटनेनी तक्रार दिली आहे. या मोर्चामुळे न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव (रा. धानोरी) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. नाशिक येथे समाजाच्या नावाने मोर्चा काढण्यात आला होता. पण त्यामध्ये तुरूंगात असलेल्या भुजबळांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चामुळे न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. हा मोर्चा समाजाच्या फायद्यासाठी असता तर त्यास विरोध केला नसता, पण हा मोर्चा गैरकृत्याच्या समर्थनार्थ आहे. त्यामुळे मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यंग सीनिअर्स’नी केले बहारदार सादरीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हौशी ज्येष्ठ नागरिकांनी सादर केलेली उडत्या चालीची गाणी, मेरा जूता है जपानी.. लागा चुनरी पे दाग, दर्यावरी चाले माझी होडी.. अशा गाण्यांवर थिरकणारी त्यांची पावले....तरुण कलाकारांना लाजवेल असा उत्साह, एकांकिकेतून ज्येष्ठांनी साकारलेल्या विविध भूमिका त्यातून दिलेला सामाजिक संदेश.....उतरत्या वयातही मनमुराद आनंद घेता येतो, याचा प्रत्यय अशा वातावरणामुळे नुकताच आला.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पुण्यातील अथश्री फाउंडेशन व ‘असोसिएशन ऑफ सीनिअर सिटिझन्स ऑर्गनायझेशन’तर्फे आयोजित केलेल्या ‘रंगतरंग’ या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध गुणदर्शन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ज्येष्ठांनी विविध कलांचे प्रदर्शन करून रसिकांना भारावून टाकले. याच कार्यक्रमात संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर व अभिनेत्री सुहास जोशी यांना विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अथश्री फाउंडेशनचे संस्थापक शशांक परांजपे, सुदेश खटावकर, श्रीकांत परांजपे आदी या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा, त्यांना व्यक्त होण्यासाठी माध्यम मिळावे या उद्देशाने अथश्री फाउंडेशनच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने ‘रंगतरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्येष्ठांच्या स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थितांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले.

............

पं. मंगेशकर, जोशी यांना जीवनगौरव

विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणाले, ‘कला हे माणसासाठी अभिव्यक्त होण्याचे साधन आहे. भारतीय संस्कृतीने मानवी जीवनाचे प्रत्येक दालन समृद्ध केले आहे. कला हा या संस्कृतीचा मुख्य घटक आहे. कला वेदना विसरायला लावते. त्यामुळे ज्येष्ठांनी कलेचे साधक बनून राहिले पाहिजे. जीवनसाधना गौरव पुरस्कार प्राप्त झालेले पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सुहास जोशी यांचे कार्य मोठे आहे. हा पुरस्कार म्हणजे या कलाकारांचा सन्मान नसून, त्या पुरस्काराचा सन्मान आहे. मंगेशकर कुटुंब म्हणजे महाराष्ट्राच्या कलेला मिळालेली देणगी आहे. सुहास जोशी यांच्या रूपाने मराठी सृष्टीला सालस आणि सात्विक अभिनेत्री मिळाली,’ असे गौरवोद्गार विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यशासाठी हवे कठोर परिश्रमांत सातत्य

$
0
0

खासदार अनिल शिरोळे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘शिक्षणात मिळालेल्या यशामुळे एकदम हुरळून जाऊ नका. आयुष्य हे खूप मोठे आणि खडतर आहे. त्यातही काही दिवसांच्या कामामुळे अथवा प्रयत्नांमुळे येणाऱ्या यश-अपयशावर थांबू नका. आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल, कठोर परिश्रमांत सातत्य राखा,’ असा सल्ला खासदार अनिल शिरोळे यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना दिला.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान समारंभ शनिवारी विद्यापीठाच्या लवळे येथील शैक्षणिक संकुलात पार पडला. त्या वेळी शिरोळे बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे, जेन नाइट, सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, परीक्षा नियंत्रक श्रद्धा चितळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. एस. शेजुल या वेळी उपस्थित होते. शिक्षण व साहित्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. गावडे आणि डॉ. नाइट यांना डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते मानद डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार उत्कृष्ट परदेशी विद्यार्थी पुरस्कार यासीर सले अहमद या विद्यार्थ्याला देण्यात आला. स्मृतिचिन्ह व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शिरोळे म्हणाले, ‘आधुनिक जगात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षणामुळे आपण अनेक समस्या सोडवू शकतो; मात्र आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी,आत्मविश्वास, मेहनत, सातत्य अशा गोष्टींचा आधार घेण्याची आ‍वश्यकता आहे. यशस्वी होण्यासाठी काही दिवसांच्या कामामुळे अथवा प्रयत्नांमुळे येणाऱ्या यश-अपयशावर जास्त काळ थांबू नका. यशस्वी होण्यासाठी काही वर्षांच्या परिश्रमांत सातत्य राखण्याची आवश्यकता आहे.’

डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘देशाच्या विकासात विद्यापीठ आणि कॉलेजांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनी ती चोख बाजवण्याची गरज आहे. देशातील आणि परदेशातील विद्यापीठांची तुलना करून चालणार नाही. कारण दोन्ही ठिकाणी शैक्षणिक पद्धती वेगळी आहे. त्यामुळे आपल्या देशासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने भारतीय विद्यापीठांचे एक शैक्षणिक मॉडेल तयार करावे लागेल. त्यासाठी सिम्बायोसिस विद्यापीठ पुढाकार घ्यायला तयार आहे.’

‘सिम्बायोसिस विद्यापीठाची मानाची डी. लिट. पदवी मिळाल्याने आनंद होत आहे. विद्यापीठाने डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत उत्तम वाटचाल केली आहे. यापुढेही देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची आवश्यकता आहे,’ असे डॉ. गावडे म्हणाले.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना तातडीने इस्रायला जावे लागल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांचा संदेश चित्रफितीद्वारे दिला. डॉ. नाइट यांनीही डी. लिट. पदवी मिळाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. गुप्ते यांनी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले. डॉ. येरवडेकर यांनी आभार मानले.

......

आठ जणांना सुवर्णपदक

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या तेराव्या पदवीप्रदान समारंभात विविध अभ्यासक्रमांच्या तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदव्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच २२ विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’चे प्रमाणपत्र, तर आठ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या सरकारी शाळा मुख्याध्यापकांविना

$
0
0

जागा वर्षभरात भरण्याचे केंद्राचे राज्याला निर्देश

Yogesh.Borate@timesgroup.com
Tweet : @YogeshborateMT

पुणे : राज्यातील निम्म्याहून अधिक सरकारी माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांविनाच सुरू आहेत. विशेष म्हणजे याची राज्य सरकारलाही कल्पना आहे; मात्र ही पदे भरण्यासाठी केंद्र सरकारने फटकारल्यानंतर पावले उचलली जाणार आहेत. या जागा येत्या वर्षभरात भरण्याचे स्पष्ट निर्देशच केंद्राने राज्याला दिले आहेत.

केंद्र सरकारने राज्याच्या माध्यमिक शिक्षणाच्या विकासासाठी म्हणून गेल्या काही काळामध्ये दिलेले जवळपास १०१ कोटी रुपये राज्य सरकारने केंद्राला परत पाठवले आहेत. शिक्षण खात्याला त्या त्या वेळी हा निधी योग्य कामांसाठी वापरता न आल्याने, तो केंद्राकडे परत गेल्याचेही ‘मटा’ने उघड केले. शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याचे निर्देश केंद्राने राज्याला दिले आहेत. त्याच वेळी केंद्राने राज्यात माध्यमिक शाळांमधून उपलब्ध असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाविषयीही स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी नोंदवली आहे. मुख्याध्यापकांसोबतच विषय शिक्षकांच्या संख्येबाबतही केंद्राने आक्षेप घेतला आहे.

शिक्षण खात्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात एकूण २२ हजार ९४४ माध्यमिक शाळा आहेत. त्यामध्ये सरकारी माध्यमिक शाळांमधून मुख्याध्यापकांची एकूण एक हजार ६१०, तर सरकारी मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून एकूण १४ हजार ६७२ मान्यताप्राप्त पदे आहेत. सरकारी माध्यमिक शाळांमध्ये ७६५ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. सरकारी मान्यताप्राप्त शाळांमध्ये हीच संख्या ११ हजार ६५९ इतकी आहे. सरकारी मान्यताप्राप्त शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या रिक्त जागांचे प्रमाण तुलनेने २०.५३ टक्के इतके आहे. सरकारी शाळांमध्ये हेच प्रमाण ५२.४८ टक्के इतके आहे. सरकारच्या स्वतःच्या अशा शाळांमधील या दुरवस्थेबाबत केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ही पदे येत्या वर्षभरात भरण्याचे निर्देशही केंद्राने राज्याला दिल्याचे, अधिकृत कागदपत्रांमधून स्पष्ट होत आहे.
.............
शिक्षकांची पदे वेळोवेळी भरण्याचे निर्देश

राज्यात माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदेही वेळोवेळी भरण्याचे निर्देश केंद्राने राज्य सरकारला दिल्याचे स्पष्ट होत आहे. विज्ञान, गणितासारख्या विषयांसाठी उच्च शिक्षण संस्थांमधील तज्ज्ञांच्या मदतीने विशेष उपक्रमांचे आयोजन करण्याचा सल्लाही केंद्राने राज्याच्या शिक्षण खात्याला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी रिपब्लिकन परिषदेचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेबाबत (सेट) विविध तक्रारी करण्यासाठी लागणारे शुल्क माफ करावे, विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती व फ्री-शिप मिळावी, जयकर ग्रंथालयाचे शुल्क ५०० रुपये करावे, अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी आंदोलन केले. या मागण्या येत्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिषदेने दिला.

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी विद्यापीठातील मुख्य इमारतीबाहेर आंदोलन करण्यात आले. परिषदेचे राजेंद्र नेमाणे, प्रज्ञानंद जोंधळे, संतोष खरे, अरुण सोनकांबळे, नीलेश भास्कर, सागर सोनकांबळे आणि विद्यार्थी आंदोलनात सहभागी होते.

‘सेट परीक्षेबद्दल विविध तक्रारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यात येते. काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्याने त्यांना हे शुल्क परवडत नाही. त्यामुळे हे शुल्क माफ करण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्री-शिप मिळालेली नसल्याने त्यांना ती तत्काळ देण्यात यावी. जयकर ग्रंथालयाचे शुल्क हजार रुपयांवरून ५०० रुपये करावे,’ अशा प्रमुख मागण्या परिषदेने केल्या.

विद्यापीठामध्ये गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाले पाहिजे. तसेच पदव्युत्तर पदविकेसाठी ‘शिका व कमवा’ योजना तत्काळ लागू करावी, या मागण्याही करण्यात आल्या. या मागण्यांवर येत्या आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिषदेने दिला.

कॉलेज व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, सेट परीक्षेचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस व विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी मागण्यांची माहिती घेऊन त्या सोडवण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या शैक्षणिक धोरणावर सहा ऑक्टोबरला बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एज्युकेशनल प्रमोशन सोसायटी ऑफ इंडिया (ईपीएसआय) या संस्थेच्या वतीने शालेय आणि उच्च शिक्षणाच्या नवीन शैक्षणिक धोरणावर सहा ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत चर्चा केली आहे. त्यावर या बैठकीमध्ये विचारनिमियम होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, डॉ. जी. विश्वनाथन आणि डॉ. एच. चतुर्वेदी यांनी सांगितले.

‘ही बैठक सहा ऑक्टोबर रोजी हॉटेल ल मेरिडियन येथे होणार आहे. त्यामध्ये देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणसंस्था चालक सहभागी होणार आहेत. यापूर्वी कोइमतूर येथे १४ सप्टेंबर रोजी अशा प्रकारची बैठक झाली आहे. दुसरी बैठक पुण्यात होत आहे. त्यानंतर कोलकाता येथे याच महिन्यात बैठक घेतली जाणार आहे. या बैठकांमधून नवीन शैक्षणिक धोरणावर विचारविनिमय होणार असून, सूचना केल्या जाणार आहेत,’ असे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

‘‘ईपीएसआय’च्या प्रतिनिधींनी ३० ऑगस्ट रोजी​ जावडेकर यांची भेट घेतली. त्या वेळी नवीन शैक्षणिक धोरणाबाबतच्या आराखड्यावर चर्चा झाली आहे. संस्थेच्या बैठका झाल्यानंतर दिल्ली येथे या विषयावर राष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. त्या परिषदेला जावडेकर उपस्थित राहणार आहेत,’ असे डॉ. कराड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्ही नूमवीय’ आता अॅपवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नव्यानेच विकसित करण्यात आलेल्या ‘आम्ही नूमवीय’ या मोबाइल अॅपमुळे आता नूतन मराठी विद्यालयाच्या (नूमवि) माजी विद्यार्थ्यांचा संपर्क होणे आणि त्यातून जुन्या आठवणींना उजाळा देणे व माहितीची देवाण-घेवाण करणे सोपे होणार आहे. या मोबाइल अॅपचे उद्घाटन विद्यालयाच्या १९७०च्या बॅचचे माजी विद्यार्थी डॉ. चंद्रशेखर चितळे यांच्या हस्ते नुकतेच एका कार्यक्रमात झाले.

विद्यालयाचे १९८५ सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि ‘माइंड नर्व्हज टेक्नॉलॉजी’चे प्रमुख हरेश गुजराथी यांनी या अॅपची निर्मिती केली आहे. या वेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. पराग माणकीकर यांनी शिक्षणामध्ये सोशल गेमिंग व सहसंवेदनात्मक भावनेवर आधारित सुरू असलेल्या जागतिक घडामोडींची माहिती दिली. डॉ. चितळे यांनी विद्यालयाच्या विविध कार्यक्रमांविषयी समाधान व्यक्त करून मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला १९६६च्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि ‘शिक्षण प्रसारक मंडळी’चे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, ‘आम्ही नूमवीय’ संस्थेचे अध्यक्ष अजित रावेतकर, सचिव मिलिंद शालगर, सहसचिव सचिन हळदुले, मुख्याध्यापिका आशा रावत आदी मान्यवर उपस्थित होते. रावत यांनी मार्गदर्शन केले. ‘नूमवि’च्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा येत्या आठ जानेवारीला होणार आहे. या महामेळाव्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन रावेतकर व शालगर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिम्बायोसिस काॅलेजला बोर्ड आकारणार दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी
खडकी कँटोन्मेंट बोर्ड हद्दीतील रेंजहिल्स येथील सिम्बायोसिस काॅलेज मोठ्या प्रमाणात घाण पाणी रस्त्यावर सोडत असल्याचा आरोप वाॅर्डाच्या सदस्या वैशाली पहिलवान यांनी केला आहे. ‘बोर्डाने पाठवलेल्या नोटीसला कॉलेज प्रतिसाद देत नाही, सध्या बोर्डाने त्यांना नोटिस बजावली असून त्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर दररोज पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे,’ अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी बोर्डाच्या बैठकीमध्ये दिली.
खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या रेंजहिल्स येथील जागेमध्ये सिम्बायोसिस काॅलेज आहे. या काॅलेजमध्ये त्यांचे होस्टेलही आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात घाण पाणी आणि मैलापाणी कोणतीही प्रक्रिया केल्याशिवाय तेथील एका नाल्यामध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे, असा आरोप सदस्या पहिलवान यांनी केला. तेथील घाण पाणी एका हांडीमध्ये घालून त्यांनी बोर्डाच्या बैठकीमध्ये आणले होते.
बैठक सुरू होताच पहिलवान यांनी जमीनीवर बसून बोर्डाचे लक्ष वेधून घेतले. ‘गेल्या दोन वर्षांपासून मी हा प्रश्न मांडत आहे. रेंजहिल्सच्या नागरिकांचा हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही. प्रत्येक बैठकीत खाली जमीनीवरच बसेल,’ असा इशारा त्यांनी दिला. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धीरज मोहन यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी सीईओ जगताप यांनी या वेळी केली.
कर्नल व्ही. भटनागर आणि बोर्डाच्या सदस्य, तसेच रेंजहिल्सचे सदस्य यांनी सिंम्बायोसिस प्रशासनाची भेट घ्यावी. त्यानंतरही त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही तर, मात्र, बोर्डामार्फत कडक कारवाई करू, तोपर्यंत रोज पाचशे रुपयांच्या दंडाची कारवाई सुरू राहील, असे आदेश ब्रिगेडिअर मोहन यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​प्रभाग रचनेमध्ये भाजपचा हस्तक्षेप?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग आराखडा तयार करताना भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप झाला असून, ही रचनाच सदोष असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी केला. याबाबत शहानिशा करून आराखड्यात योग्य बदल करावेत, अशी मागणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, प्रवक्ते योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारींबाबत पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘प्रभाग रचना आराखडा तयार करताना राज्य निवडणूक आयोग गुगल मॅपिंगच्या सहाय्याने नदी, लोहमार्ग, नाले, मोठे रस्ते आणि सलगता या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून प्रभाग रचना तयार करते. परंतु, शहरातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हस्तक्षेप झाल्यासारखी वर्तणूक करीत आहेत. हा प्रभाग असा केला, हा प्रभाग असा तोडला...आता सत्ता आमची आहे... आयुक्त आमचे आहेत... जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारसुद्धा आमचे आहे. कोणाची कशी वाट लावायची, हे आम्ही ठरवू असे जाहिररीत्या सांगत आहेत. ही खेदाची बाब आहे. याबाबतचे पुरावे आमच्याकडे असून, भाजपचे पदाधिकारी उघडपणे काही बाबी सांगत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग स्तरावर शहानिशा करून खातरजमा व्हावी’.
नवीन प्रभाग रचनेनुसार भाजपचे कार्यकर्ते प्रचार करू लागले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नवीन भागांतील गणपती मंडळांच्या वर्गणीच्या पावत्यादेखील फाडल्या आहेत. चिंचवडच्या विद्यमान आमदारांनी त्यांच्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना तयार केली आहे. त्यावरून प्रभाग रचना अव्यवहार्य आणि वस्तुनिष्ठ वाटत नाही. सदरची नवीन प्रभाग रचना दबावाखाली करण्यात आली, हे उघड गुपित आहे, असाही आक्षेप या पदाधिकाऱ्यांनी नोंदविला.
या महापालिकेने पूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाचा अवलंब करून बनविलेले सर्व नकाशे बाजूला ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये प्रभाग प्रारूप आराखड्याच्या सॉफ्ट कॉपीवर स्वाक्षरी घेतली आहे, असाही गंभीर आरोप या वेळी करण्यात आला. प्रारूप आराखड्यात भरपूर त्रुटी असून, सदोष प्रभाग रचना करण्यात आली आहे. याबाबतची शहानिशा करून आवश्यक बदल करावेत, अन्यथा कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांच्याकडेही लेखी तक्रार करण्यात आली आहे.

प्रशासन-भाजप संगनमत?
शहराच्या प्रारूप प्रभाग रचनेत भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ सप्टेंबर, १६ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. त्यानंतर गोपनीय आराखडा फुटलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका प्रशासन आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात संगनमत झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रारूप आराखड्याला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वीच तो फुटल्याचा प्रकार महापालिकेच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच घडल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

‘गुगल काय? भूगोलचीच वाट!’
प्रारूप प्रभाग आराखडा तयार करताना गुगल मॅपिंगचा आधार घ्यावा, असे निर्देश देण्यात आले होते. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये गुगलच काय तर संपूर्ण भूगोलाचीच वाट लावली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. पालिकेच्या निवडणूक विभागातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने भाजला सोयीचे ठरेल, अशा पद्धतीने प्रारूप आराखडा तयार केला असून त्यासाठी माहिती अधिकारामध्ये माहिती घेऊन कायम त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीची मदत घेण्यात आली आहे, असेही या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरी ​महापालिकेचे छायाचित्रकार कशाळीकर राज्यात प्रथम

$
0
0

महापालिकेचे छायाचित्रकार कशाळीकर स्पर्धेत प्रथम
म. टा. प्रतिनिधी पिंपरी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ या छायाचित्र स्पर्धेतील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकृत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी काढलेल्या छायाचित्रास प्रथम क्रमांक मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे नुकताच पार पडला. या वेळी माहिती महासंचालक ब्रिजेश सिंह, छायाचित्रकार सुधाकर ओलवे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये ३८०० छायाचित्रांमधून कशाळीकर यांच्या छायाचित्रास प्रथम पारितोषिक, तर विद्याधर राणे (मुंबई) यांना द्वितीय, दिनेश भडसाळे (मुंबई) यांना तृतीय, क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. पाच उत्तेजनार्थ बक्षीसे सचिन मोहिते (नांदेड), अशोक पाटील (धुळे), चंद्रकांत पाटील (अकोला), शरद पाटील (कोल्हापूर) आणि सतीश काळे (नाशिक) यांना देण्यात आली.
प्रदर्शनातील छायाचित्रांमधून मेक इन महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, स्मार्ट सिटी अशा विविध शासकीय योजनांच्या यशाचे प्रतिबिंब उमटले आहे. त्याचबरोबर गड किल्ले, कला, संस्कृती, वन्यजीवनाचे दर्शन होत आहे.
कशाळीकर यांनी कोल्हापूरजवळच्या खिद्रापूर येथील प्राचीन शिवमंदिराच्या पार्श्वभूमीवर हे छायाचित्र टिपले आहे. सहाव्या शतकातील चालुक्य राजवटीतील दुसऱ्या पुलकेशी राजाने हे मंदिर बांधले आहे. या मंदिराशेजारी एक उर्दू शाळा आणि एका बाजूला मराठी शाळा आहे. पर्यटन व राष्ट्रीय एकात्मतेच्या या छायाचित्रात मुस्लिम घरातील एक विद्यार्थी शालेय कार्यक्रमासाठी शिवाजी महाराजांचा पोशाख करून आईचे बोट धरून जात असताना या छायाचित्रात दिसतो.
राज्यभरातून आलेल्या छायाचित्रांमधून पारितोषिक विजेत्यांची निवड ज्येष्ठ छायाचित्रकार सुधाकर ओलवे, गॅझेटियर विभागातील कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर, पीआयबीचे मुख्य फोटो अधिकारी अख्तर सईद, माध्यम तज्ज्ञ आशुतोष पाटील यांच्या समितीने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या कन्येची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी
वाकड येथील आरीस्टी या इमारतीतील फ्लॅट वेगवेगळ्या लोकांना विकून त्यांची फसवणूक करणाऱ्यास खडकी पोलिसांनी अटक केली आहे. धीरज घनःश्याम चंचलाणी (रा. वाकड) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. खडकी कोर्टाने त्याला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील दुसरा आरोपी बांधकाम व्यावसायिक शैलेंद्र आनंदस्वरूप गोयल (रा. आकुर्डी) हा पसार झाला आहे. या प्रकरणी मोनिका प्रताप तोडकर (वय ३४, रा. रस्टन काॅलनी) यांनी तक्रार केली होती. मोनिका या अभिनेते सयाजी शिंदे यांच्या कन्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंचलानी यांनी बांधकाम व्यावसायिक गोयल यांच्या वर्धमान असोसिएटकडून वाकड येथील आरीस्टी या इमारतीमध्ये ९२७ चौरसफुटांचा फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट चंचलानी यांनी प्रथम मुरगुंद नावाच्या व्यक्तीला विकला. त्यानंतरही हा फ्लॅट स्वतःचाच असल्याचे भासवून तोडकर यांना पुन्हा विकला. या व्यवहारात २५ लाख रूपये रोख, २५ लाख रूपये हात उसने आणि दोन लाख १३ हजार पाचशे रुपये अन्य खर्चासाठी असे एकूण ५२ लाख १३ हजार पाचशे रूपयांची फसवणूक केली होती. हा व्यवहार जुलै २०१२ मध्ये झाला होता.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तोडकर यांनी खडकी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्याआधारे खडकी पोलिसांनी आरोपी चंचलाणी यास २९ सप्टेंबरला मुंबईतून अटक केली होती. त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनवली.
या प्रकरणातील दुसरा आरोपी बांधकाम व्यावसायिक शैलेंद्र आनंदुस्वरूप गोयल (रा. आकुर्डी) हा अद्याप पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. तपासामध्ये गोयल याने हा फ्लॅट चंचलाणी यांना विकण्यापूर्वी शेडबाळे नावाच्या व्यक्तीला विकल्याचेही समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षातील प्रवाशांना लुटणारी टोळी उघड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुन्हे शाखेच्या सायबर सेलने उत्तर प्रदेशातील एका टोळीला गजाआड केले असून, या टोळीने रिक्षा चालवण्याच्या बहाण्यातून प्रवाशांना लुटल्याचे ५० गुन्हे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांमधील एका प्रवाशाच्या क्रेडिट कार्डवरून हजारो रुपये काढण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पुणे शहरात लुटमार करणारी परप्रांतीय टोळी उघड झाली आहे.
या प्रकरणी इंतजार अहमद इफ्तिखार अंसारी (वय ३२, रा. भगतसिंग नगर, मुंबई) याला अटक करण्यात आली आहे तर, फुरकान अन्सारी, आरीफ अन्सारी, आशिक अन्सारी, सोहेल अन्सारी आणि नईम तेली (सर्व रा. उत्तर प्रदेश) हे अद्याप पसार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी पी. पुरनानंदम (रा. तमिळनाडू) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
या टोळीतील दोघे जण काही महिन्यांपूर्वी कोंढव्यात वास्तव्यास आले आहेत. ते भाड्याने रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. या चोरट्यांकडून रात्रीच्यावेळी रेल्वे स्टेशनवरून उपनगरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्यात येत होते, असे पवार म्हणाले.

अशी केली जायची लुटमार
रेल्वे स्टेशनवरून उपनगरांमध्ये जाण्यासाठी पहाटेच्यावेळी एखादा प्रवासी बसला की रिक्षाचालक आपल्या साथीदारांना मोबाइलवर संपर्क साधत असे. चालू असलेला मोबाइल तसाच शर्टच्या खिशात ठेवून तो प्रवाशाशी बोलत असे. त्यांच्यातील संवाद हा त्यांच्यापासून काही अंतरावर असलेले आणि एसयूव्ही कारमध्ये बसलेले इतर आरोपी ऐकत असत. रिक्षाचालक प्रवाशाला कोठे जायचे आहे, कोठून आलात, काय करतात असे वेगवेगळे प्रश्न विचारत असे. त्या वेळी दूर असणारे त्याचे साथीदार त्यांच्यातील संभाषण ऐकत असत. रिक्षा काही अंतर गेल्यानंतर रिक्षाचालक हा रिक्षातील गॅस संपल्याचा बहाणा करत असे. त्या प्रवाशाला जाण्यासाठी दुसरे कुठलेही साधन नसल्याने तो रिक्षाबरोबर रस्त्यावर उभा राहत असे. त्याचवेळी पाठीमागून आलेली एसयूव्ही त्या प्रवाशाला लिफ्ट देत असे. आरोपी जाणुनबुजून प्रवाशाला ड्रायव्हर शेजारील सीटवर बसवत आणि त्याच्याकडील लगेज पाठीमागे ठेवत असत. बाकी आरोपी मधल्या सीटवर बसलेले असत. ते प्रवाशाच्या लगेचमधील ऐवज चोरत. त्यानंतर काही ना काही बहाणा करून त्या प्रवाशाला पुन्हा रस्त्यावर सोडून पसार होत असत. काही प्रसंगी या चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

असा झाला आरोपींचा शोध
पुरनानंदम यांनाही अशाच प्रकारे लुटण्यात आले होते. त्यांच्या बॅगमधील डेबिट कार्ड, क्रेडिट काढून घेऊन चोरट्यांनी त्यांच्या अकाउंटमधील हजारो रुपये काढले होते. त्याचा तपास सायबर सेलचे निरीक्षक पवार, सहायक निरीक्षक विजयमाला पवार आणि फौजदार प्रवीण स्वामी हे करीत होते. या कार्डवरील व्यवहारांच्या तपासानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर लुटमारीच्या घटनाच उघडकीस आल्या.

शहरात ५० हून लुटमारीच्या घटना
शहरात अशा प्रकारे त्यांनी ५० हून अधिक लुटमारीच्या घटना केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, काही ठिकाणी गुन्हे दाखल नाहीत. पुणे शहरात दाखल असलेले ५० गुन्हे त्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी लुटलेला ऐवज उत्तर प्रदेश येथे नेऊन विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशमधील आरोपी अगदी सराईतपणे पुण्यात लुटमार करत असल्याचे उघडकीस आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएमए’चा‘डास’मुक्तीचा संदेश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्रासह दिल्लीसारख्या राज्याला डेंगी, चिकुनगुनियाच्या आजाराने हैराण केले असताना आता घरापासून घराचा परिसरच ‘डास’मुक्त करण्याचा संदेश राष्ट्रीय इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) नागरिकांसह डॉक्टरांना दिला आहे. आजाराचा उद्रेक झाला तर तेवढ्यापुरते मर्यादित प्रयत्न न करता कायमस्वरुपी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
राज्यात जूनपासून डेंगी, चिकुनगुनियाचे पेशंट आढळले तसेच दिल्ली, हरियाणात देखील या आजाराचा उद्रेक झाला. त्यामुळे डेंगी, चिकुनगुनियाच्या आजाराबाबत भीती निर्माण झाली होती. पेशंटच्या वाढत्या संख्येमुळे सर्वत्र हॉस्पिटल ‘हाउसफुल’ झाल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आयएमएच्या राष्ट्रीय शाखेचे सचिव डॉ. के. के. अग्रवाल यांनी देशातील सर्व राज्यांना डासमुक्तीचा संदेश दिला आहे. श्रीलंका देश डासमुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयएमएच्या या मोहिमेला विशेष महत्त्व आहे.
‘राज्यात एका ठिकाणी डेंगी, चिकुनगुनियाचा पेशंट आढळला तर त्यासंदर्भात आरोग्य यंत्रणेने संपूर्ण राज्यात त्याची माहिती सर्व खासदार, आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, डॉक्टरांना पोहोचविणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांनी देखील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्याबाबत जनजागृती केली पाहिजे. डासांच्या निर्मुलनात नागरिकांनी शंभर टक्के सहभाग नोंदविला तर संपूर्ण गाव, शहर डासमुक्त होऊ शकेल. त्यासाठी आता घरापासून ते शहरापर्यंत डासमुक्त करण्यासाठी झटले पाहिजे,’ असे आवाहन आयएमएच्या राष्ट्रीय शाखेचे सचिव डॉ. के. के. अग्रवाल यांनी केले.
पावसाळा आला की सरकारी आरोग्य यंत्रणा जागी होते. जनजागृती आणि सामूहिक मोहीम हाती घेतली जाते. नुकत्याच आलेल्या कॅगच्या अहवालात डेंगीचा आजार हे समाजापुढे संकट असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे डास, एडिस इजिप्त, क्युलेस, अॅनेलिस या डासींच्या प्रजातींविरोधात आता आपल्याला लढायला हवे. एडिस इजिप्ती या मादी डासांमुळे चिकुनगुनिया, डेंगी, झिका यासारखे आजार होतात. कायद्यानुसार डेंगीसह चिकुनगुनियाचे पेशंटची नोंद करणे गरजेचे आहे. एडिस हा डास सात दिवसांत २१ जणांना चावतो. एकाच प्रकारच्या चाचण्यांवर विश्वास ठेवावा लागत असल्याने निदान होण्यास विलंब लागतो. त्यामुळे डेंगी नियंत्रणात अपयशी ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. घरात, घराबाहेर, दिवस रात्र डासांची अंडी, अळ्या, डासांना नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


डेंगी, चिकुनगुनियासंदर्भात आयएमएच्या राष्ट्रीय शाखेने संदेश दिला आहे. डेंगी नियंत्रणासाठी स्वच्छतेवर भर दिला पाहिजे. डासांची निर्मिती थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ डेंगी, चिकुनगुनियाच्या उद्रेकाच्या काळात नव्हे तर वर्षभर डास होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. डासांपासून विविध आजार होण्याचा धोका असतो.
डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, आयएमए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साथीच्या आजाराबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंगी आणि चिकुनगुनियाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, घरटी एकतरी व्यक्ती या आजाराने त्रस्त आहे. या रोगांवरील उपचारांसाठी नागरिकांचे हजारो रुपये खर्च होत असून, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी नुकतीच केली.
शहराच्या विकास आराखड्यासंदर्भात (डीपी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खासदार आणि विधान परिषदेतील आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर शहरातील आरोग्याची परिस्थिती अत्यंत खालावली असून, डेंगी आणि चिकुनगुनियाच्या साथीमुळे पुणेकरांचे आरोग्य बिघडले आहे, ही बाब गाडगीळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. घरटी एक पेशंट या दोन्हीपैकी एका आजाराने ग्रस्त असून, तपासण्या आणि औषधोपचारांवर होणारा खर्चही अनेकांना करता येत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पेशंटवर उपचार करणारे अनेक डॉक्टरही या रोगांच्या विळख्यात सापडले असून, या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाव्या, अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images