Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फेसबुकवर ओळख झाल्यावर फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर एका व्यक्तीने पुण्यातील महिलेशी गोड बोलून पाच तोळे सोने घेऊन पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने साताऱ्यात अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे.

महेश सुभाष कुलकर्णी (वय ३५, रा. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी २४ वर्षीय महिलेच्या पतीने वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली महिला गृ‌हिणी असून तिचे पती खासगी कंपनीत नोकरी करतात. फेसबुकवरून आरोपी महेश कुलकर्णी याच्यासोबत महिलेची ओळख झाली होती. कुलकर्णीने महिलेला तो बिझनेसमॅन असल्याचे सांगितले. काही कालावधीनंतर ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. कुलकर्णीने महिलेला नातेवाईक आजारी असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. त्यावेळी महिलेने त्याला घरी बोलावून पाच तोळे सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर कुलकर्णीने महिलेला दागिने परत देण्यास टाळाटाळ केली. महिलेच्या पतीने तिच्याकडे दागिन्यांबाबत विचारणा केली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्याने आरोपी कुलकर्णीला फोन करून दागिने परत देण्यास सांगितले. त्यावेळी त्याने देतो, असे म्हणून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. मात्र, दागिने परत दिले नाहीत. त्यानंतर महिलेच्या पतीने वारजे पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर वारजे पोलिसांनी त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेट्रोच्या श्रेयवादाला सुरुवात

0
0

मेट्रोच्या श्रेयवादाला सुरुवात

विलंबाला खासदार शिरोळे कारणीभूत; खासदार वंदना चव्हाण यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘शहरात मेट्रो प्रकल्पाला विलंब होण्यास खासदार अनिल शिरोळे हेच जबाबदार असून मेट्रोला कर्ज मंजूर झाल्याने आता भाजपमधील नेत्यांमध्येच श्रेयवाद सुरू झाला आहे. हे अत्यंत हास्यास्पद आहे,’ अशा शब्दात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी शिरोळे यांच्यावर टीका केली. शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम व्हावी, यासाठी आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेच मेट्रोचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शिरोळे यांनी विनाकारण काही आक्षेप घेतल्याने हा प्रकल्प रखडला असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने अडीच वर्षापूर्वी केंद्र सरकारकडे पाठविला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रस्ताव मान्य केला जाइल, असे आश्वासन दिले जात होते. मात्र त्यानंतरही अनेकदा पाठपुरावा करुनही हा प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही. शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्यासह काही स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी शहरातून धावणारी मेट्रो ही भुयारी असावी, असा आक्षेप घेतल्याने हा प्रकल्प रखडला होता. शिरोळे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली होती. पुणे आणि नागपूर या दोन्ही शहरांमध्ये मेट्रो करण्याचा प्रस्ताव बरोबर गेलेले असतानाही पुणे शहराला डावलून नागपूर येथे मेट्रो करण्याचा प्रस्ताव मान्य झाल्याने भाजपच्या नेत्यांवरही टीका सुरू होती.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मान्यतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड) पीआयबीची बैठक १४ ऑक्टोबरला होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. यानंतर मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कसे प्रयत्नशील आहोत, यासाठी खासदार शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. मेट्रोसाठीच्या खर्चाच्या प्रस्तावावर अर्थसचिवांनी सही केली असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले, तर अर्थमंत्रालयातील सचिव अशोक लवासा यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार पीआयबीच्या बैठकीची तारीख निश्‍चित झाल्याचे भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले होते. भाजप नेत्यांमध्ये मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी सुरू झालेल्या या प्रकारावर खासदार चव्हाण यांनी कडक शब्दात टीका केली. पुणे मेट्रोला उशीर होण्यास शिरोळे हेच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
...............
‘चार एफएसआय’च्या पुनर्विचाराची मागणी
मेट्रो मार्गाच्या अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत चार एफएसआय बांधकामाला सुचविल्याने शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण येणार आहे. त्यामुळे शासनाने चार एफएसआयचा पुनर्विचार करावा, तसेच मेट्रोच्या समितीने शहराच्या मध्यवर्ती भागात रस्तारुंदी सुचविली आहे. यामुळे लाखो लोकांच्या राहात्या घरावर आणि व्यापाऱ्यांवर कुऱ्हाड पडणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुधारायची असेल, तर अजून रस्ता रुंदीकरणाची गरज नाही. त्यामुळे ही रस्तारुंदी ही रद्द करावी, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्रात राहतो तो मराठा

0
0

साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कोणत्याही व्यक्तीची जात, धर्म कुठलाही असो; परंतु जी व्यक्ती महाराष्ट्रात राहते ती मराठा,’ असे स्पष्ट मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. आतापर्यंत लिखाण करताना आपण महाराष्ट्र, मराठी आणि मराठा ही त्रिकुटी जपली आहे, असेही ते म्हणाले.

स्नेहल प्रकाशनतर्फे दिला जाणारा ‘स्नेहांजली’ पुरस्कार डॉ. मोरे यांना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते पुरस्काराला उत्तर देताना सद्यस्थितीवर भाष्य करीत होते. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी डॉ. गो. बं. देगलूरकर लिखित ‘कोप्पेश्वर मंदिर’ आणि अनिल बळेल लिखित ‘बाबूजी’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘अफगाणी लोकांनी खूप पूर्वी भारतावर आक्रमण केले असते. मराठ्यांमुळेच देशावर लवकर येणारी गुलामगिरी काही काळ पुढे गेली. अठरावे शतक हे मराठ्यांचे असूनही त्यांचा जयजयकार झाला नाही. देशाच्या विविध भागात मराठा पसरले होते. बालभारतीच्या पाठ्यपुस्तक निर्मिती समितीवर असलेल्या अमराठी लोकांनीच मराठ्यांचा इतिहास पुढे आणला नाही. भविष्यात मराठ्यांचा इतिहास अधिक विस्तृत स्वरुपात यावा या दृष्टीने आता विनय सहस्त्रबुद्धे यांनी प्रयत्न करावेत,’ अशी अपेक्षा डॉ. मोरे यांनी व्यक्त केली.

‘मूर्ती व देवाची सविस्तर माहिती लोकापर्यंत पोहोचल्यावरच लोक मंदिर आणि मूर्तीचे संरक्षण करतील. देवाची मूर्ती इतिहास, समाजमन सांगते. चौदाव्या शतकात मूर्तीशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. मूर्ती हा समाज परिवर्तन व समाज मनाचा आरसा असते,’ असे संशोधक गो.बं. देगलूरकर म्हणाले.

विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘वैचारीक अस्पृश्यता अमेरिकेत आढळते. पण त्याचे पहिले कॉलेज देशात आहे असे वाटते. इतिहासातील चुका, त्याच्या पुर्नलिखाणाबद्दल बरेच बोलले जाते. पण सर्वांनी इतिहासाचे उद्दात्तीकरण होऊ देता कामा नये; तसेच त्याचे विद्रुपीकरण खपवून घेतले जाणार नाही. महाराष्ट्रात सध्या विशिष्ट वैचा‌रीक बाजारशक्ती निर्माण झाली आहे. जे खपते तेच विकले जाते. त्यानुसार अन्य विचारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते. वैचारिक अस्पृश्यतेमुळे अन्य विचारांची बूज राखली जात नाही. इतिहासाची मांडणी करताना वस्तुनिष्ठ दृष्टीकोन न ठेवल्यास आणि वैचारिक लोकशाहीचे भान न ठेवल्यास देश पुन्हा अंध:काराकडे जाईल.’ लेखक बळेल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांनी प्रास्ता‌विक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाच्या जागेचा ‌निर्णय गुरुवारी

0
0

विमानतळाच्या जागेचा ‌निर्णय गुरुवारी

मंत्रालयात बैठक; उभारणीच्या ठिकाणावर हाेणार शिक्कामोर्तब

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या जमिनीबाबत येत्या गुरुवारी (६ ऑक्टोबर) मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत विमानतळ उभारणीच्या ठिकाणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील प्रस्तावित आंतररराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची घोषणा २००७ मध्ये झाली. हे विमानतळ खेड तालुक्यात करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले; परंतु शेतकरी व स्थानिक पुढाऱ्यांच्या विरोधामुळे गेली दहा वर्षे विमानतळ कागदावरच राहिले आहे. या विरोधामुळे अखेर विमानतळाची जागा बदलण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाला पुरंदर तालुक्यातील वाघापूर व राजेवाडीसह लगतच्या गावांतील जागा दाखविण्यात आली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुरंदर तालुक्यातील जागेला पसंती दिली असून, त्या संबंधीचा तांत्रिक अहवाल तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे; तसेच या कामासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने ग्राउंड लेव्हल सर्वेक्षण करण्यास निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. प्राधिकरणाची तांत्रिक समिती हे काम करणार असून, यामध्ये जीपीएस मॅपिंग, सॅटेलाइट मॅपिंग आणि प्रत्येक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या दोन हजार हेक्टर जमिनीची यात प्रत्यक्ष पाहणी होणार आहे.
प्रस्तावित विमानतळ पुरंदरला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. काही ठरावीक शेतकरी व राजकारणी यांच्यामुळे खेड तालुका विकासाला वंचित होणार असल्याने त्या विरोधात आवाज उठू लागला आहे. हे विमानतळ पुरंदरऐवजी खेडमध्ये करावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. विमानतळाला गेली दहा वर्षे विरोध करणारे राजकारणीही आता खेड तालुक्यात विमानतळ करण्यासाठी आग्रह धरू लागले आहेत.
................
... तरच पुरंदरमध्ये विमानतळ
विमानतळाच्या उभारणीसंदर्भात येत्या गुरुवारी मंत्रालयात सचिव पातळीवरील बैठक होणार आहे. या बैठकीत विमानतळाची उभारणी पुरंदर की खेडमध्ये करावी, याविषयी चर्चा होणार असल्याचे समजते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने खर्च, दळणवळण; तसेच जागेची उपलब्धता यामुळे पुरंदरला पसंती दिली आहे. प्राधिकरणाची हीच भूमिका कायम राहिल्यास पुरंदरमध्ये विमानतळाचे ‘टेक ऑफ’ होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाकिस्तानची भूल अद्याप उतरली नाही’

0
0

पुणेः ‘उरी हल्ल्यानंतर सर्वच भारतीयांच्या मनात तीव्र संताप होता. आपण थेट कारवाई करीत नाही, असा न्यूनगंड जनतेच्या मनात निर्माण झाला होता. हा न्यूनगंड दूर करण्यासाठीच अत्यंत नियोजनपूर्वक सर्जिकल स्ट्राइक करण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. तसेच, या सर्जरीमुळे पाकिस्तानला चढलेली भूल अजून उतरलेली नाही, असेही ते म्हणाले. शहरातील एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

पर्रीकर म्हणाले, ‘सर्जिकल स्ट्राइक’मुळे पाकिस्तानची अवस्था भूल दिलेल्या पेशंटसारखी झाली आहे. याबाबत आठ दिवसांपासून आखणी सुरू होती. त्याबाबतची चर्चा फक्त मी, पंतप्रधान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि लष्करप्रमुख यांच्यामध्येच होत होती. हे एअर ऑपरेशन नसल्याने यात अधिक धोका होता.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अं‌निसवर प्रशासक नेमण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अं‌निस) ट्रस्टचा कारभार पाहता त्यावर प्रशासक नेमावा, ट्रस्टचे विशेष लेखा परीक्षण करावे, ट्रस्टवरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे पुन्हा फेरचौकशी करावी, असे अनेक ताशेरे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवालात ओढले आहेत. त्यामुळे अं‌निसवर तत्काळ प्रशासक नेमावा आणि दाभोलकरांच्या खुनाशी त्यांच्या ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहेत का याची कसून चौकशी करावी, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष बापूमहाराज रावकर, सुनील चिंचोलकर, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट आदी उपस्थित होते. वर्तक म्हणाले, ‘अं‌निसच्या ट्रस्टमधील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करण्यासंदर्भात डोंबिवली येथील आरटीआय कार्यकर्ते सुधांशू जोशी व इतरांनी विविध शासकीय खात्यांमध्ये तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणी सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरिक्षकांचा चौकशी अहवाल माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाला आहे. यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत.’

हिशेबपत्रके विलंबाने दाखल केल्याने त्याबद्दल धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टला दंड ठोठावला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संचलित वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प या नावाने संस्थेने उपक्रम राबविला असल्याचे आढळले आहे. या प्रकल्पाद्वारे शाळांमधून स्वयंअध्ययन परीक्षांद्वारे लाखो रुपयांची संपत्ती जमा झाल्याचे न्यासाच्या कीर्द व खतावणीवरून आढळून येते. न्यासाने ठेवी ठेवताना कलम ३५ चे उल्लंघन केल्याचे दिसून येते. काही रकमा रयत सेवक सह. बँक, शामराव विठ्ठल को-ऑप बँक अशा अनेक बँकांत ठेवण्यात आल्या आहेत. हिशेब तपासणीने हिशेब पत्रकासोबत परदेशी देणग्यांबाबतचा सविस्तर अहवाल सादर केलेला नाही. न्यासाने परदेशातून मोठ्या प्रमाणात अनुदाने मिळवली असून विविध स्वरुपाचे निधी सरकारकडून आणि शाळांमधून जमा केले असल्याचे अहवालातून आढळले आहे, असे वर्तक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य दलात उत्साह;'राफेल' वेळेआधीच येणार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

पठाणकोट, उरी दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत-पाक संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सकडून भारताला मिळणारी राफेल ही अत्याधुनिक मोठ्या क्षमतेची लढाऊ विमाने वेळेआधीच भारताला मिळणार आहेत अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज पुण्यात दिली. पर्रीकर यांच्या या माहितीनंतर भारताशी छुपे युद्ध पुकारलेल्या पाकिस्तानशी लढणाऱ्या भारतीय सैन्य दलांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

राफेल या अत्याधुनिक विमानांबाबत फ्रान्सशी शुक्रवारी केलेल्या करारानुसार ही विमाने भारताला ३६ महिने अर्थात तीन वर्षांत मिळणार होती, मात्र ती लवकरच भारताला मिळणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे.

फायटर जेटसाठी 'युरो ७.८७-बिलियन' या करारावर भारत आणि फ्रान्स या उभय देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराद्वारे मिळणाऱ्या लढाऊ विमानांमुळे पाकिस्तानवर मात करण्याच्या मोहिमेत भारतीय हवाई दलाला मोठी मदत मिळणार आहे.

फ्रान्सकडून मिळणाऱ्या या शक्तीशाली जेट फाटरमुळे भारताला दृष्टीच्या टप्प्यापलीकडे मारा करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. या लढाऊ विमानांद्वारे हवेतल्या हवेत वेगवान मारा करणाऱ्या मिसाईलमध्ये १५० किमीची अधिकची क्षमता असणार आहे.

याचाच अर्थ असा, की आता भारतीय वायूसेनेला भारताच्या हद्दीत राहून पाकिस्तान आणि भारताच्या उत्तर तसेच पूर्वेकडील सीमेपलीकडे मारा करणे सहज शक्य होणार आहे.

पाकिस्तानकडे सध्या ८० किमीपर्यंतच्या टप्प्यावर मारा करू शकतील अशी मिसाईल आहेत.

भारताच्या राफेल जेटद्वारे 'स्काल्प' नावाचे मिसाईल डागण्याची मूभा मिळाली असून या मिसाईलमध्ये हवेतून जमीनीवर ३०० किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला असला, तरी प्रत्यक्षात पावसाला हंगामी सरासरी गाठताना कसरत करावी लागली आहे. शहरात ३० सप्टेंबरपर्यंत ५७१.३ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. हा पाऊस सरासरीपेक्षा फक्त पाच मिलिमीटरने अधिक आहे. तर उपविभागांचा विचार करता कोकण व मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली आहे.

देशाच्या अनेक भागांतून मान्सून पूर्णपणे माघारी फिरलेला नाही. उलट राज्यात अजूनही मान्सून सक्रिय आहे. परंतु, हवामानशास्त्रीय नोंदींच्या निकषांप्रमाणे एक जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा हंगाम मानला जातो. त्यानुसार हवामानशास्त्र विभागाने एक जून ते ३० सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाची आकडेवारी जाहीर केली असून त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

पुणे शहरात जून महिन्यात सरासरी १३७ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जून अखेरीस पुण्यात केवळ ५९ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली होती. त्यानंतर जुलैच्या पहिल्या तीन दिवसात अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन पुण्यासह राज्यात दमदार पाऊस झाला. या तीन दिवसांच्या कालावधीत पुण्यात सुमारे १२५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला. परिणामी तोपर्यंत हंगामी सरासरीपेक्षा मागे पडलेला पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला. त्यानंतर मात्र, पश्चिम पूर्वेकडे असणारा मान्सून ट्रफ हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने दक्षिण भारतातील पावसाचे प्रमाण कमी होऊन उत्तर भारतातील पावसाचे प्रमाण वाढले होते. जुलै महिन्याच्या अखेरीस पुण्यात २८२.३ मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस हंगामी सरासरीपेक्षा ३९.४ मिलिमीटरने कमी होता. त्यानंतर ऑगस्टमध्येही पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. अनुकूल परिस्थिती कायम राहिल्याने ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कायम राहून २३० मिमी पाऊस झाला. परिणामी, ऑगस्टच्या सरासरीच्या तुलनेत शहरात शंभर मिमी अधिक पाऊस झाला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या. सप्टेंबरमध्ये ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी, एक जून ते ३० सप्टेंबर या पर्जन्यकाळात पुणे शहरात या सरासरीपेक्षा (५६६ मिमी) पाच मिलिमीटर अधिक म्हणजेच ५७१.३ मिमी पाऊस नोंदला गेला.

हवामान विभागातर्फे राज्याचे कोकण व गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हे चार उपविभाग करण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामात या उपविभागांपैकी कोकण व मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार सरासरीपेक्षा १९ टक्के अधिक किंवा कमी पाऊस हा सर्वसाधारण मानला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतेसाठी सर्वांची साथ हवी

0
0

अजित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘स्वच्छतेच्या प्रयत्नांमध्ये चांगले उपक्रम घेतले जात असले, तरी त्याला सर्वांची साथ हवी. नागरिकांचा पुढाकार आणि राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीच्या जोरावर शहराला स्वच्छतेमध्ये कायम अग्रभागी ठेवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायला हवे,’ अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पुणेकरांना रविवारी स्वच्छतेचा कानमंत्र दिला. ‘शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये स्वच्छतेचा दृष्टिकोन निर्माण केला, तर मानसिकता बदलण्यास मदत होऊ शकेल,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुणे महापालिकेतर्फे ‘स्वच्छ पुरस्कार’ वितरण सोहळ्यासह नव्या वेबसाइट, विविध अॅप्सचे लोकार्पण आणि फक्त महिलांसाठीच्या मोबाइल टॉयलेट बसचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेते बंडू केमसे, वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशनचे संस्थापक जॅक सिम, ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सी-डॅकचे संचालक हेमंत दरबारी, ज्येष्ठ समाजसेविका डॉ. विद्या बाळ, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या वेळी उपस्थित होते.

राज्याच्या विविध भागांत निघणाऱ्या मराठा मोर्चांनतर होणाऱ्या स्वच्छतेकडे लक्ष वेधून अजित पवार म्हणाले, ‘सकारात्मक भूमिका ठेवून सर्वांनी प्रयत्न केले, तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात. एवढ्या मोठ्या संख्येने समाज एकत्र येऊनही स्वच्छता आणि टापटीप राखली जाते, याचाच अर्थ घर आणि परिसर स्वच्छ राखण्याची इच्छाशक्ती आहे. त्यामध्ये सातत्य राखण्याची गरज आहे.’

जॅक सिम यांनी महापालिकेच्या उपक्रमाची प्रशंसा करून रंगीबेरंगी स्वच्छतागृहे, शौचालयांची निर्मिती करणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल, असे जाहीर केले. तर, विद्या बाळ यांनी महापालिकेने महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांसाठी सुरू केलेल्या विविध उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. डॉ. विजय भटकर यांनीही विचार व्यक्त केले. आयुक्त कुमार यांनी महापालिकेने रविवारी प्रारंभ केलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. महापौर प्रशांत जगताप यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. तर, प्रेरणा देशभ्रतार यांनी आभार मानले.

इतर शहरांची अवस्था काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेचा नुकताच स्वच्छतेमध्ये सर्वोत्तम काम केल्याबद्दल गौरव केला गेला. त्याचा संदर्भ देत, ‘पुण्याला प्रथम पुरस्कार मिळत असेल, तर इतर शहरांची काय अवस्था असेल?’ अशी मार्मिक टिप्पणी अजित पवार यांनी केली. त्याचवेळी, शहरात वेळोवेळी फिरत असताना, स्वच्छतेविषयी आपण सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देतो, कामांचा दर्जा चांगला राखण्याबाबत मार्गदर्शन करतो, असे त्यांनी नमूद केले.

महापालिकेचे उपक्रम...

- महापालिकेतील ४० प्रभाग हागणदारीमुक्त घोषित
- महिलांसाठी स्वतंत्र मोबाइल टॉयलेट बस कार्यान्वित
- www.punecorporation.org या नव्या वेबसाइटचे लोकार्पण
- महापालिकेच्या डिजिटल लॉकर सुविधेचे उद्घाटन
- ओपन डेटा पोर्टलची सुविधा सर्वांसाठी खुली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-दौंड लोकल १०५ किमी प्रतितास

0
0

रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची यशस्वी तपासणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-दौंड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची यशस्वी तपासणी रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या विशेष पथकाने नुकतीच केली. या तपासणीत विद्युतीकरणातील तांत्रिक गोष्टींची पाहणी आणि रेल्वगाडीची ‘स्पीड ट्रायल’ची चाचणी यशस्वी झाली आहे. पुणे-दौंड विशेष नऊ डब्यांच्या रेल्वेगाडीची ‘स्पीड ट्रायल’ ही १०५ किलोमीटर प्रतितास वेगाने पार पडली. त्यामुळे पुणे-दौंड जलद लोकल सुसाट वेगाने धावण्याला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.

पुणे-दौंड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची तपासणी गुरुवारी सकाळपासून दौंड रेल्वेस्थानकाहून सुरू झाली. गुरुवारी सकाळी साडेनऊ ते साडेतीनपर्यंत दौंड रेल्वेस्थानकातील व परिसरातील कामाची तपासणी केल्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांनी हे पथक विशेष रेल्वेगाडीसह पुण्याकडे रवाना झाले. त्यानंतर पाटस व कडेठाण या रेल्वेस्थानकांची तपासणी करून साडे सहाच्या सुमारास केडगाव स्थानकात ही तपासणी थांबविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही चाचणी पूर्ण केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

गुरुवारी झालेल्या तपासणीत विद्युतीकरणातील तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुणे-दौंड रेल्वेमार्गावर स्पीड ट्रायल म्हणजेच रेल्वेगाडी धावू शकणाऱ्या वेगाची तपासणी १०५ किलोमीटर प्रतितास या वेगाने झाली. शुक्रवारी दुपारी पुणे-दौंड ही विशेष नऊ डब्यांची रेल्वेगाडी पुणे रेल्वेस्थानकातून दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी निघून ४ वाजून १५ मिनिटांनी दौंड रेल्वेस्थानकानर पोहोचली. त्यानंतर परतीच्या प्रवासात दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी दौंड रेल्वेस्थानकाहून निघून सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी पुणे रेल्वेस्थानकावर पोहोचली. दोन दिवसांत विद्युतीकरणातील तांत्रिक गोष्टींची तपासणी आणि रेल्वगाडीची ‘स्पीड ट्रायल’ झाल्याचे वाणिज्य विभागाचे व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी सांगितले.

या रेल्वेमार्गावर काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रिक लोकोची यशस्वी चाचणी पार पडली होती. त्यानंतर या कामाच्या पूर्णत्वासाठी, तसेच लोकल सुरू होण्याच्या कामाच्या मंजुरीसाठी रेल्वे प्रशासनाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यानुसार रेल्वे सुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन दिवसांत विद्युतीकरणाची कामाची तपासणी केली. या वेळी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय, अतिरिक्त व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्यासह रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी, अभियंते आणि रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे विकास देशपांडे उपस्थित होते.

प्रवासाचा वेळ घटणार

पुणे-दौड आणि दौंड-पुणे या रेल्वेमार्गावर एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना ये-जा करायला साधारण प्रत्येकी ७५ मिनिटे लागतात. मात्र, या एक्स्प्रेस रेल्वेगाड्या विद्युतीकरणावर धावयाला सुरुवात झाल्यानंतर त्यांना ये-जा करण्यासाठी लागणारा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे या प्रवासासाठी प्रत्येकी ५७ ते ५९ मिनिटे लागतील. तसेच, पॅसेंजर गाड्यांना या रेल्वेमार्गावर ये-जा करण्यासाठी सध्या ११० मिनिटे लागतात. मात्र, विद्युतीकरणामुळे या कालावधीत घट होऊन प्रत्येकी ८० ते ८२ मिनिटे लागणार असल्याचे रेल्वेच्या तज्ज्ञांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला असला, तरी प्रत्यक्षात पावसाला हंगामी सरासरी गाठताना कसरत करावी लागली आहे. शहरात ३० सप्टेंबरपर्यंत ५७१.३ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. हा पाऊस सरासरीपेक्षा फक्त पाच मिलिमीटरने अधिक आहे. तर उपविभागांचा विचार करता कोकण व मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली आहे.

देशाच्या अनेक भागांतून मान्सून पूर्णपणे माघारी फिरलेला नाही. उलट राज्यात अजूनही मान्सून सक्रिय आहे. परंतु, हवामानशास्त्रीय नोंदींच्या निकषांप्रमाणे एक जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा हंगाम मानला जातो. त्यानुसार हवामानशास्त्र विभागाने एक जून ते ३० सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाची आकडेवारी जाहीर केली असून त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

पुणे शहरात जून महिन्यात सरासरी १३७ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जून अखेरीस पुण्यात केवळ ५९ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली होती. त्यानंतर जुलैच्या पहिल्या तीन दिवसात अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन पुण्यासह राज्यात दमदार पाऊस झाला. या तीन दिवसांच्या कालावधीत पुण्यात सुमारे १२५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला. परिणामी तोपर्यंत हंगामी सरासरीपेक्षा मागे पडलेला पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला. त्यानंतर मात्र, पश्चिम पूर्वेकडे असणारा मान्सून ट्रफ हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने दक्षिण भारतातील पावसाचे प्रमाण कमी होऊन उत्तर भारतातील पावसाचे प्रमाण वाढले होते. जुलै महिन्याच्या अखेरीस पुण्यात २८२.३ मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस हंगामी सरासरीपेक्षा ३९.४ मिलिमीटरने कमी होता. त्यानंतर ऑगस्टमध्येही पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. अनुकूल परिस्थिती कायम राहिल्याने ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कायम राहून २३० मिमी पाऊस झाला. परिणामी, ऑगस्टच्या सरासरीच्या तुलनेत शहरात शंभर मिमी अधिक पाऊस झाला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या. सप्टेंबरमध्ये ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी, एक जून ते ३० सप्टेंबर या पर्जन्यकाळात पुणे शहरात या सरासरीपेक्षा (५६६ मिमी) पाच मिलिमीटर अधिक म्हणजेच ५७१.३ मिमी पाऊस नोंदला गेला.

हवामान विभागातर्फे राज्याचे कोकण व गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हे चार उपविभाग करण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामात या उपविभागांपैकी कोकण व मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार सरासरीपेक्षा १९ टक्के अधिक किंवा कमी पाऊस हा सर्वसाधारण मानला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायकी नसणाऱ्यांना महत्त्व नको: नाना पाटेकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशापुढे आमची किंमत शून्य असून देशाच्या तुलनेत कलाकार खटमल एवढे आहेत. जवान हेच खरे देशाचे हीरो आहेत. सर्वात प्रथम देश महत्वाचा असून त्यानंतर आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी सलमान खानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. 'सलमानने पाकिस्तानी कलाकारांना व्हीसा दिलेला नाही,' असा टोलाही त्यांनी लगावला.

उरी हल्ल्यानंतर अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत ‘ते कलाकार आहेत दहशतवादी नाहीत’ असे वक्तव्य केल्यामुळे अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नंतर नाना पाटेकर यांनी सलमानवर टीकास्त्र सोडले. एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

'जवानांप्रति कोणाला आदर नसेल तर त्यांचा आपण आदर करू नये. ज्यांची लायकी नाही अशांना महत्वही देवू नये,' अशा शब्दांत नाना यांनी सलमानला फटकारले. 'सीमेवर युद्ध नसते तेव्हा तेथे एकमेकात बंधुभाव असतो. युद्ध असल्यावर एकमेकांना गोळ्या माराव्या लागतात. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आत्ता काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यावर त्यांना पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय सरकारचा असेल,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'मला आजवर कोणी कधीही जात विचारली नाही आणि जात सांगण्याची माझ्यावर कधी वेळ आली नाही. कलावंत आणि भारतीय एवढीच माझी जात आहे. माझ्या कामावर जनतेने लायकीनुसार प्रेम केले आहे. मला कधीही कोणतीही गोष्ट मागावीशी वाटली नाही. कोणत्या समाजाने काय करावे, यावर माझे काही म्हणणे नाही,' असे सूचक वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंजाबी साहित्य संमेलनासाठी सरकार, महापालिका सज्ज’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पुण्यात होणाऱ्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाची तसेच यासाठी जगभरातून येणाऱ्या पंजाबी बांधवांची व्यवस्था करण्यात महाराष्ट्र सरकार व पुणे महापालिका कुठेही कमी पडणार नाही’, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. ‘मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ या संमेलनाच्या आयोजनासाठी सकारात्मक आहेत’, असे त्यांनी सांगितले.
गुरू गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त ‘सरहद’तर्फे पुण्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, शैलेश पगारिया, भारत देसडला, संतसिंग मोखा, सुरेंद्रसिंग वधवा, चरणसिंग सहानी, ‘सरहद’चे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर या वेळी उपस्थित होते.
महापौर जगताप म्हणाले, ‘पुण्यात प्रथमच होणाऱ्या या संमेलनासाठी महापालिका सर्वतोपरी साह्य करेल’.
दरम्यान या वेळी पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या पंजाबी व्यक्तींचा गौरव करण्यात आला. माजी महापौर मोहनसिंग राजपाल, गीता अरोरा, डॉ. वीणा मनचंदा, आश्वीम मल्होत्रा, हरमिंदर घई, पंजाबी कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष सतीशकुमार चढ्ढा, एम. एच. डल्ला, अवतारसिंग सोखी, बाहरी मल्होत्रा आदींना बापट यांच्या हस्ते पंजाबी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ‘एक शाम पंजाबियत के नाम’ हा सांस्कृतिक कार्यक्रम गोपाळ कांबळे यांनी सादर केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील पंजाबी कलावंतांच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चित्रकलेला उचित सन्मान मिळाला नाही’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘भारतीय चित्रकला ही अतिशय प्राचीन असून, त्यामध्ये संस्कृतीचे वर्णन केले आहे. गायन, काव्य याप्रमाणे शिल्पकला, चित्रकलेला पूर्वी सन्मान असायचा. ब्रिटिशांच्या राजवटीत या कला थोड्याशा बाजूला पडत गेल्या. परिणामी, स्वातंत्र्योत्तर काळात चित्रकलेला उचित सन्मान मिळाला नाही’, अशी खंत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केली.
विश्‍वशांती केंद्र व माईर्स् एमआयटीच्या वतीने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रघुनाथ सासवडकर व भास्करराव शिंदे यांना ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ रवी परांजपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘एमआयटी’चे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, विश्‍वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, ‘एमआयटी’चे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, डॉ. मिलिंद पांडे, प्रा. अतुल कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
परांजपे म्हणाले, ‘अनादि काळापासून आपल्याकडे चित्रकलेला फार महत्त्व आहे. प्राचीन भारतीय चित्रकलेचा इतिहास योग्यरीत्या मांडला गेला नाही. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात चित्रकलेला म्हणावा, तसा सन्मान मिळाला नाही. चित्रकलेतील सौंदर्यदृष्टीला प्रोत्साहन मिळायला हवे. चीन, रशिया या देशांमध्ये डिझाइनला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे कला आणि कारागिरीलाही दाद मिळते. आपल्याकडे तशा प्रकारे दृश्यकला घडविण्याची आवश्यकता आहे’.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘कलेची भाषा ही वैश्‍विक असते. त्या चित्रांतून, कलेतून प्रादेशिक ओळख प्रतीत होत असते. अजिंठा-वेरूळसारखी कलाकुसर आजच्या नव्या पिढीमध्येही आहे. त्यांच्यातील कलावंताची कदर व्हावी. एम. एफ. हुसेनसारख्या चित्रकारांचा आदर्श नवचित्रकारांनी घेतला पाहिजे. त्यांची चित्रे रेखाटण्यावेळीच विकली जात असत. त्यांच्या चित्रांतील ताकद घाशीराम कोतवाल नाटकावर त्यांनी रेखाटलेल्या चित्रांवेळी अनुभवायला मिळाली’.
गेल्या ४० वर्षांपासून पिंपळाच्या पानावर रेखाटलेल्या या चित्रांचे शाळांमध्ये प्रदर्शन लावून त्यातून मिळणारा निधी वंचितांसाठी खर्च व्हावा, अशी भावना रघुनाथ सासवडकर यांनी व्यक्त केली. डॉ. संजय उपाध्ये, डॉ. एस. एन. पठाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के क्षीरसागर यांनी आभार मानले. रघुनाथ सासवडकर आणि भास्करराव शिंदे या दोन्ही कलावंतांच्या कलेचे प्रदर्शन माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात ३ ऑक्टोबरपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांचे प्रयत्न चांगल्या ‘पोस्टिंग’साठी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आयपीएस अधिकाऱ्यांच्या धर्म, जाती आणि भूभागाच्या आधारावर लॉब्या तयार करून स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि करिअरसाठी काम सुरू आहे. या अधिकाऱ्यांचे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा मुंबईचे किंवा पुण्याचे ‘सीपी’पद कसे मिळेल अथवा चांगल्या जागेसाठी पोस्टिंग कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू असतात. अशी परिस्थिती असतानाच सत्ताधारी सोयीस्कर भूमिकेतून वरवर काम करतात. त्यामुळे प्रशासनात आणि सत्तेत आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे’, असे मत माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘मॅजेस्टिक बुक गॅलरी’तर्फे आयोजित ‘मॅजेस्टिक गप्पा’ या चार दिवसीय कार्यक्रमाला खोपडे यांच्या प्रकट मुलाखतीने सुरुवात झाली. या वेळी खोपडे बोलत होते. नाट्यसमीक्षक राज काझी यांनी ही मुलाखत घेतली. ‘मॅजेस्टिक’चे प्रमुख अशोक कोठावळे उपस्थित होते.
खोपडे म्हणाले, ‘काळ बदलला तरी देशात असणारी पोलिस व्यवस्था ब्रिटिश व्यवस्थेनुसारच कार्यरत आहे. नागरिकांचे प्रश्न व समस्या नव्या आहेत. मात्र, पोलिस व्यवस्था जुनी असल्यानेच त्यांना जुनी उत्तरे मिळतात. पोलिस शिपाई व अधिकाऱ्यांना आत्मसन्मान मिळत नाही. त्यांना काम करण्याची इच्छा असली, तरी प्रशासकीय व्यवस्था व सत्ताधारी यंत्रणा काम करू देत नाही. आयपीएस अधिकाऱ्यांसारखे वरिष्ठ अधिकारी त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कोणत्याच प्रकारचे काम करत नाहीत किंवा कोणत्या योजना आखत नाही. पोलिय यंत्रणेकडून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून कामच होत नाही. आयपीएस अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा लॉब्या तयार करून स्वतःच्या अस्तित्वासाठी काम सुरू केले आहे. ही परिस्थिती बदलायची असल्यास प्रशासनाच्या आणि सत्तेच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे’.
खोपडे म्हणाले, ‘पोलिसांचे मनोबल उंचवण्यासाठी ‘मोहल्ला कमिटी’सारख्या योजना सरकारने स्वीकारल्या पाहिजेत. या योजनेत नागरिकांची भूमिकादेखील महत्त्वाची असल्याने सरकारने त्यावर विचार केला पाहिजे. ही योजना सरकारने स्वीकारल्यास गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल. कारण हे सिद्ध झाले आहे’. दरम्यान, यूपीएसीमार्फत पोलिस सेवेत आयपीएस म्हणून दाखल होण्याची इच्छा फार कमी जणांची असते. त्यांना प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी म्हणून रुजू होता येत नसल्याने नाइलाजाने पोलिस सेवेत आयपीएस म्हणून यावे लागते. त्यामुळे ते प्रभावी काम करीत नसल्याते खोपडे यांनी सांगितले.

‘मदत अजूनही मिळालेली नाही’
‘पनवेल येथे कार्यरत असताना दरोडेखोरांसोबत झालेल्या झटापटीत मी आणि माझे सहकारी पोलिस निरीक्षक गंभीर जखमी झालो होतो. त्या वेळी सुमारे पाच महिने रूग्णालयात उपचार घेत होतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आर्थिक मदत मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र, त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुन्या एका गोष्टीचा वचपा काढण्यासाठी मला के‍वळ १५० रुपये; तर सहकाऱ्याला ७५ रुपयांची मदत देण्यासाठी सरकारकडे शिफारस केली. यातही दुर्दैव असे की, ३० वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला परंतु मला ते पैसे अद्याप मिळालेले नाहीत’, असे खोपडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणूक आरक्षण दोन टर्म हवे

0
0

गोखले इन्स्टिट्यूटची निवडणूक आयोगाला सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी जागा आरक्षित करण्याची पद्धत लॉटरी सिस्टिमने ठरविण्याची किंवा एकदा लागू झालेले आरक्षण किमान दोन निवडणुकांसाठी लागू ठेवण्याची सूचना गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. राज्यात निव्वळ महिला आरक्षण आहे म्हणून निवडणूक लढविणाऱ्या महिलांचे प्रमाण ८६ टक्के असले, तरी प्रत्यक्षात केवळ ५ टक्के महिलाच खऱ्या अर्थाने स्वबळावर निवडणुकांमध्ये सहभागी होत असल्याचेही संस्थेच्या पाहणीतून समोर आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संस्थेने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अभ्यास नुकताच पूर्ण केला. संस्थेने त्यावर आधारित अहवाल आणि सूचना आयोगाकडे नुकत्याच पाठविल्या. या अहवालाविषयी संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे आणि प्रमुख संशोधक मानसी फडके यांनी शुक्रवारी पत्रकारांना माहिती दिली. त्यामध्ये या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

फडके म्हणाल्या, ‘आयोगाच्या सूचनेनुसार आम्ही हे राज्यस्तरीय सर्वेक्षण केले. त्यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागातील एका जिल्ह्यात प्रत्येकी दोन तालुक्यांमध्ये सर्वेक्षण झाले. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना जिंकण्याची शाश्वती २५ टक्के अधिक आहे, तर पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याने जिंकण्याची शक्यता ३५ टक्के वाढते, असे हे सर्वेक्षण सांगत आहे. पक्षाशी प्रमाणिक राहणाऱ्या उमेदवारांची जिंकण्याची शक्यता २६ टक्क्यांनी वाढत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले. त्यामुळे या निवडणुकांमध्ये उमेदवारांची राजकीय घराणेशाही, पक्षाचे तिकिट, पक्षाशी असणारी बांधिलकी आणि खर्च करण्याची कुवत या बाबी निवडणूक जिंकण्याची शक्यता वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे अधोरेखित होत आहे.’

याच अहवालात संस्थेने आयोगाला केलेल्या सूचनांमध्ये निवडणुकांदरम्यानच्या खर्चासाठी निवडणुकीपूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांकडे निधी सुपूर्द करा, निवडणुकीसाठी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरेसा मोबदला द्या, निवडून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना सक्तीचे प्रशिक्षण पुरवा, महिलांसाठी आरक्षित नसलेल्या मतदारसंघांमधून महिलांसाठी म्हणून सर्व राजकीय पक्षांनी तिकीट वाटपासाठी किमान ५ टक्के आरक्षण ठेवावे आदी बाबींचाही समावेश करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.

- सर्वेक्षणासाठी निवडलेले जिल्हे : ६ (रायगड, पुणे, नंदुरबार, औरंगाबाद, वाशिम, चंद्रपूर)
- सहभागी तालुके : १२
- सहभागी उमेदवार : १६१
- सहभागी अधिकारी, पत्रकार व इतर जाणकार : ८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बजाज’च्या कामगारांचे उपोषण

0
0

कंपनीसमोर मांडल्या विविध प्रलंबित मागण्या

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
बजाज ऑटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी विश्वकल्याण कामगार संघटनेच्या माध्यमातून आकुर्डी येथील कंपनीसमोर लाक्षणिक उपोषण केले. या वेळी विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष प्रदीपकुमार खाडे, सहसचिव बाळासाहेब थोरवे, रामचंद्र गडसिंग, खजिनदार शिवदास कदम, सर्जेराव पाटील, चाकण ग्रिव्हन्स कमिटी आणि दोन्ही प्रकल्पातील हजारो कामगारांनी सहभाग नोंदवला.

कामगारांनी या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या कंपनी प्रशासनापुढे मांडल्या. कंपनीमधील तीन वर्षाचे वेतनकराराचे २०१३साली नूतनीकरण करणे महत्त्वाचे असूनही कंपनी प्रशासनाकडून ते २०१४ साली करण्यात आले. यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान झाले. २०१४मध्ये किरकोळ कारणांवरून ८ कामगारांना बडतर्फ करण्यात आले. या दरम्यान कामगारांनी २८ हजाराची वेतनवाढ करून द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु, चर्चेदरम्यान ती मागणी कामगारांनी १४ हजारपर्यंत कमी केली. तरीही कंपनी प्रशासनाकडून १० हजार ५०० पर्यंतची वेतनवाढ करण्यात येईल, असे सांगण्यात आले. ही वेतनवाढ कामगारांना मान्य नाही.

त्यामुळे या आंदोलनातून बडतर्फ कामगारांना पुन्हा रुजू करून घ्यावे, कामगारांना वेतनकरारामध्ये वेतनवाढ करून द्यावी आणि या वर्षी करावा लागणारा वेतन करार हा योग्य वेळेत केला जावा, अशा मागण्या कामगारांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीचा डंख बनला ‘गंभीर’

0
0

हृदय, यकृताला संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील हॉस्पिटल ‘हाउसफुल’ झाले असले, तरी आता डासांच्या डंखामुळे अनेकांना विपरित परिणामांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांच्या हृदय, मेंदू, यकृतासह मूत्रपिंडांना डासांमुळे संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली असून अशा पेशंटवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

शहरात डेंगीचे अनेक पेशंट आढळून येऊ लागले आहेत. डेंगीसह चिकुनगुनियाची लक्षणे सारखी असून त्यांचा विषाणू देखील एकसारखाच आहे. त्यामुळे त्याचा चावा झाल्यानंतर ताप येणे, सर्दी, खोकला, अंगदुखी, सांधेदुखी यासारखी विविध लक्षणे दिसून येतात. यामुळे हॉस्पिटल हाउसफुल झाली आहेत. त्यामुळे गरजू पेशंटना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. परंतु, ज्यांना डेंगीची लागण झाली आहे त्यांना विपरित परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदविले.

‘डेंगीमुळे शरिराच्या विविध अवयवावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत. डेंगीच्या पेशंटची प्रकृती गंभीर झाल्यास हृदयाच्या स्नांयूना सूज येते. हृदयाचे ठोके कमी होतात. पेशंटला दम लागतो. त्या प्रकाराला ‘मायोकार्डायटिस’ असे म्हटले जाते. त्यानंतर डेंगीचा ताप जादा प्रमाणात आल्यास रक्तदाब कमी होतो. पेशंटच्या रक्तवाहिन्यांमधून प्रोटीन्स बाहेर पडतात. त्यामुळे फुफ्फुसासह पोटात पाणी साठते. त्या प्रकारालाच ‘शॉक सिंड्रोम’ असे म्हटले जाते. अशाप्रकारच्या आजार झालेले काही पेशंट सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. शिशिर जोशी यांनी दिली.

डेंगीच्या डासाच्या डंखामुळे पित्ताशयाला देखील सूज येते. एका प्रकारची कावीळ होते. तसेच डेंगीचा ताप वाढल्यास लघवी किंवा शौचातून रक्त जाते. त्यावेळी प्लेटलेट कमी झाल्याने रक्तस्त्राव होऊन गुंतागुंत होऊ शकते, असेही डॉ. जोशी म्हणाले.

डेंगीची लागण झाल्यानंतर तापामुळे, तसेच विषाणूंच्या संसर्गामुळे शरिराचे विविध अवयव निकामी होण्याचा धोका असतो, याकडे रुबी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे यांनी लक्ष वेधले. ‘डेंगीच्या संसर्गामुळे यकृत, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका अधिक असतो. तसेच मेंदूवर देखील परिणाम होऊ शकतो. डेंगीची लागण झालेल्यांमध्ये जादा प्रमाणात ताप येणे अथवा शरिरातील पाणी कमी होणे यामुळे पाच ते सहा टक्के पेशंटची प्रकृती चिंताजनक होते. त्यांच्या विविध अवयव निकामी होण्याचा धोका असतो. मूत्रपिंड, यकृतावर परिणाम होऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचे तीन ते चार तरुण पेशंट आढळले आहेत. त्यांना डायलेसिस अथवा व्हेंटिलेटरवर ठेवण्यापर्यंतची वेळ येते. अशा प्रकारचे पेशंट उपचारासाठी उशिरा येत असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होते,’ असे निरीक्षण डॉ. साठे यांनी नोंदविले.

पेशंटनी घाबरून जाऊ नये

डेंगीची लागण झाली अथवा लक्षणे दिसून येताच पेशंटमध्ये घबराट निर्माण सुरू झाली आहे. त्यामुळे पेशंट डॉक्टरांकडून जाऊन उपचार घेतात. प्लेटलेट तपासण्याचा सल्ला देतात. त्यावेळी अनेकदा पेशंट स्वतःहून पॅनिक होऊन चाचणी करून घेतात. चाचणी केल्याने त्याचा खर्च अधिक वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी व्यक्त केले. त्यामुळे विनाकारण डेंगीच्या आजाराची लागण होताच पॅनिक होऊ नका, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतनीकरण रखडल्यास परवाने कायमस्वरूपी रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुदत संपलेल्या रिक्षा परवान्यांचे ३१ ऑक्टोबर २०१४ पूर्वी नूतनीकरण केले नसल्यास, हे परवाने आता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. १ नोव्हेंबर २०१४ पासून आतापर्यंत परवाना संपूनही त्याचे नूतनीकरण न केलेल्या रिक्षा परवान्यांचे विलंब शुल्क आकारून नूतनीकरण केले जाणार आहे.
गेल्या वर्षभरापासून रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता. परवान्याची मुदत संपल्यापासून सहा महिन्याच्या आत नूतनीकरण न केलेल्या रिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण डिसेंबर २०१५पासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली होती. त्यामुळे शहरातील विविध रिक्षा संघटनांनी परवाने नूतनीकरण करावेत, अशी मागणी केली. मात्र, यावर निर्णय घेताना परिवहन आयुक्तालयाने केवळ एक नोव्हेंबर २०१४ नंतरच्या काळात मुदत संपलेल्या परवान्यांना अभय देण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे एक नोव्हेंबर २०१४ नंतर परवान्याची मुदत संपलेल्या रिक्षाचालकांनी परवाना नूतनीकरण शुल्क, विलंब शुल्क भरून नूतनीकरण करून घ्यावे. आणि त्यासाठी वाहनाची आवश्यक सर्व कागदपत्रे विविध कर भरल्याच्या पावत्या, योग्यता प्रमाणपत्र, विमा, पीयूसी सादर करावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले. या विषयासाठी रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार, पुणे शहर ऑटो फेडरेशनचे सरचिटणीस प्रदीप भालेराव व खजिनदार बापू भावे यांनी सरकारी पातळीवर पत्रव्यवहार केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी शिक्षणाची ७५ विद्यार्थ्यांना संधी

0
0

अनुसूचित जातीच्या विद्यार्थीसंख्येत वाढ करण्याचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनुसूचित जातीच्या ‍विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनेचा लाभ आता अधिक विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. यापूर्वी राज्यातील निवडक ५० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळत होता. यापुढे ७५ विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेऊ शकणार आहेत.
अनुसूचित जातीच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी किंवा ‘पीएचडी’चे शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. त्यामध्ये राज्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या स्कॉलरशिपचा लाभ देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला आहे. तसेच, या योजनेअंतर्गत परदेशात शिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतल्यानंतर अभ्यासक्रम किंवा विद्यापीठ बदलता येत नव्हते. त्यामध्येही बदल करून अभ्यासक्रम किंवा विद्यापीठ बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आता चालू शैक्षणिक वर्षापासून ७५ विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत पदव्युत्तर पदवीसाठी ४६ आणि पीएचडीसाठी २९ विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. पीएचडीच्या गटात कला, शास्त्र आणि वाणिज्य या शाखांच्या अनुक्रमे १०, पाच आणि आठ विद्यार्थी आणि इंजिनीअरिंगच्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर, पदव्युत्तर पदवीसाठी व्यवस्थापन, इंजिनीअरिंग व वैद्यकीयच्या अनुक्रमे १३, २० आणि १३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
......
निवडीचे आयुक्तांना अधिकार
पूर्वीच्या नियमाप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी ४९ विद्यार्थ्यांची निवड या स्कॉलरशिपसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे स्कॉलरशिपसाठी आलेल्या अर्जांमधून आता उर्वरित विद्यार्थ्यांची निवड करण्याचे अधिकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images