Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुख्यमंत्री नळावरच्या बायकांसारखे भांडतात:सुळे

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड तापट स्वभावाचे आहेत. त्यांची मला भीतीच वाटते. नळावरील बायकांप्रमाणे ते भांडतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

या मुख्यमंत्र्यांचा पारा नेहमी चढलेलाच असतो. नळावरच्या बायकांसारखे भांडतात. आतापर्यंत मी इतके मुख्यमंत्री पाहिले आहेत, पण असा चिडका बिब्बा अजून पाहिला नाही. ते काही आमच्यापेक्षा लहान नाहीत. पण मुख्यमंत्रीपद खूप मोठे आहे. त्यांनी आपल्या पदाचा तरी मान राखावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांची मला खूप भीती वाटते. त्यांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जावं की काय? कधी चिडले तर काहीही फेकून मारतील, अशी खिल्लीही सुळे यांनी उडवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजितदादांचा पुण्यात तळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीसाठी अन्य पक्षांमधील नेत्यांना आपल्याकडे ओढण्याची चढाओढ सुरू झाली असतानाच दुसरीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही पुण्यात तळ ठोकून बसू लागले आहेत. कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांच्या निमित्ताने आठही मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दादांचा हात पडू लागला आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील कौलाचा (अँटी इन्कम्बन्सी इफेक्ट) टाळण्यासाठी नव्या चेहऱ्यांचा शोध पक्षाकडून सुरू झाला आहे.

अजित पवार हे सत्तेच्या काळात कामाच्या व्यापामुळे शहरातील पक्ष संघटनेच्या कामापासून काहीसे दुरावल्याचे चित्र होते. मंत्रिपदाचा कारभार, ‘पीए’, वेगवेगळे अधिकारी, कार्यकर्त्यांचा गराडा, विविध प्रश्नांबाबतच्या बैठका, धोरणात्मक निर्णय आणि राज्याचे राजकारणात अडकलेली राष्ट्रवादीतील नेते मंड‍ळी सध्या तुलनेने निवांत आहेत. या निवांतपणाचा फायदा पक्ष संघटना बळकट करण्यासाठी होऊ लागला आहे. मला कोणाही कधीही भेटायला येऊ शकते, असे जाहीरपणे अजित पवार सांगत आहेत. अगदी ‘सेल्फी’ काढण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यालाही ‘दादां’चा सध्या हाच अनुभव मिळत आहे. सत्तेच्या काळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून दुरावलेले अजित पवार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्याचे नियोजन आहेत. त्यातील सहा ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे आणि उर्वरित दोन ठिकाणी शिबिर घेण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने चारचा प्रभाग करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा व्यूहरचना केली आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यास राष्ट्रवादीने सुरुवात केली आहे. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून महापालिका निवडणुका लढवण्याचा मानस अजित पवार जाहीरपणे सांगत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या २००७ च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम सत्तेवर आली. या वेळी अनेक नवे चेहरे महापालिकेत आले होते. दत्तात्रय धनवकवडे, विशाल तांबे, सुनील बिबवे, चेतन तुपे, प्रशांत जगताप, आप्पा रेणुसे यासारखी अनेक मंडळी महापालिकेच्या राजकारणात सक्रिय झाली काही गेल्या दहा वर्षांत स्थिरावली. या चेहऱ्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेल्या दहावर्षांत फारसे काही नवीन चेहरे आले नाही. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी अजित पवारांनी चाचपणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाऊ आणण्यासाठी गेलेल्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
घराजवळ असलेल्या दुकानातून खाऊ आणण्यासाठी गेलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचा टेम्पोच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी (२७ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास ताथवडे येथील ओम शिव कॉलनी येथे हा अपघात झाला. पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरती संतोष राठोड (अडीच वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दिगंबर तुळशीराम शिंदे (रा. भुमकर चाळ, ताथवडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष राठोड
(२३, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती ही घराजवळ असलेल्या कोरडे यांच्या टपरीवर खाऊ आणण्यासाठी पायी जात होती. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोची धडक तिला बसली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डॉक्टरांच्या तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.

 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किर्लोस्कर कंपनीतील तिढा अखेर सुटला

0
0


म. टा. वृत्तसेवा, सासवड
सासवड (ता.पुरंदर) येथील किर्लोस्कर कंपनीचा गेल्या १४ महिन्यांपासून सुरू असलेला तिढा अखेर बुधवारी संपुष्टात आला. सुमारे २८ वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना समाधानकारक पगारवाढ, बोनस, ग्रॅच्युइटी आणि अन्य सुविधा देण्यावर कंपनी प्रशासन आणि कामगारांत एकमत झाले. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याप्रश्नी पुढाकार घेऊन कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या दालनात हा समन्वय घडवून आणला.
तोडगा काढण्यासाठी झालेल्या या बैठकीला मंत्री व राज्यमंत्र्यांसह कंपनी व्यवस्थापक गणेश चौधरी, दत्तात्रय शिवतारे, संजय महिपतराव जगताप, बापू चव्हाण, महादेव कामथे, अशोक कामथे यांच्यासह कामगारांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
सासवडच्या किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीत गेल्या १४ महिन्यांपासून विविध प्रश्नांवर कामगार आणि कंपनी प्रशासनात धुसफूस होती. मध्यंतरीच्या काळात तणाव आणखीन वाढला. अखेरीस कामगारांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे धाव घेत आपल्या समस्या शिवतारे यांच्या कानावर घातल्या. कंपनी प्रशासनाशी समन्वय साधत शिवतारे यांनी दोन्ही बाजूंचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. चर्चेच्या जवळपास ८ ते १० फेऱ्या झडल्या. अखेरीस दोन्ही बाजूंमध्ये मागण्यांबाबत एकमत घडवत या प्रश्नावर शिवतारे यांनी समाधानकारक तोडगा काढला.
कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत करारनामा करण्याचे ठरले. त्यानुसार निलंगेकर पाटील यांच्या दालनात ही बैठक झाली. करारनाम्यात कामगारांना पगारवाढ, बोनस, ग्रॅच्युइटी, पगारी रजा व अन्य बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या वर्षापासून कामगारांना १६ टक्के बोनस दिला जाईल, १ महिन्याची ग्रॅच्युइटी, पगारी रजांमध्ये वाढ अशा सुविधा त्यामुळे कामगारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामगारांच्या निवृत्तीनंतर किंवा त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनी सेवेत घेणार असल्याचा निर्णय झाल्याचे या वेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांनी शिवतारे यांचे आभार मानले.

 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दांडीबहाद्दरांना उठा-बशांची शिक्षा

0
0


म. टा. वृत्तसेवा, जुन्नर
कॉलेजच्या नावाखाली वर्गाला दांडी मारून हिरोगीरी करत फिरणाऱ्यांवर जुन्नर पोलिसांची नजर आहे. अशा दांडीबहाद्दर शोधून त्यांना उठा-बशा मारायला लावण्याच्या शिक्षेचा धसका या रिकामटेकड्यांनी घेतला आहे.
जुन्नर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथक प्रमुख एस. पी. चव्हाण आणि पोलिस अधिकारी रोशन कांबळे यांनी
सध्या रोडरोमीओंवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. कॉलेजच्या तासांना दांड्या मारून चौकात बसणाऱ्यांच्या ठिकाणांना अचानक भेटी देऊन ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. हिरोगीरी करूत चकाट्या मारणारे मात्र १०० उठा-बशा काढताना काकुळतीला येत आहेत. काहींना तर या शिक्षेनंतर चालताही येत नसल्याचे चित्र आहे. पुढच्या वेळेला कॉलेजमध्ये दांडी मारून फिरताना दिसले, तर २०० बैठका माराव्या लागतील, असा इशाराही या तरुणांना दिला जात आहे.
जुन्नरमध्ये अनेकदा विद्यार्थी कॉलेजच्या तासांना दांड्या मारून बाहेर फिरताना दिसतात. प्राध्यापक मंडळी त्यांच्या मागे लागून शिक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात. कॉलेजचे शिपाई देखील विद्यार्थ्यांना पकडून आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसते. मात्र, हे प्रकार थांबत नव्हते. आता पोलिसांच्या कारवाईचा वापर प्रभावी ठरताना दिसत आहे.

नॅमने पॅटर्नची आठवण
जुन्नरमध्ये काही वर्षांपूर्वी भांडणे, मारामाऱ्यांचे प्रकार घडले होते. रिकामटेकड्यांची भांडणे आणि पेठापेठांमधील कुरबुरी यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी नॅमने नावाच्या फौजदाराची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी गावातील शांतता बिघडवणाऱ्यांची शोधून धुलाई केली होती. या पॅटर्नच्या बोलबाल्यामुळे चांगलीच शिस्त निर्माण झाली होती. अशा कारवाईमुळे शांतता राहण्यास मदत होईल, अशी भावना नागरिक व्यक्त करतात. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्ट सर्किटमुळे टेम्पो जळून खाक

0
0


म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
मुंबई- पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर खंडाळा (बोरघाट) घाटातील दस्तुरी गावच्या हद्दीत स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, कपडे व इलेक्ट्रिकल साहित्य घेऊन जाणारा टेम्पो शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक झाला. या घटनेमुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजता घडली.
दस्तुरी (बोरघाट ) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे विविध साहित्य घेऊन जाणाऱ्या टेम्पोला (एचआर- ६१/ बी- १२४३) शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. टेम्पोमध्ये स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, कपडे व इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक साहित्य असल्याने आग आणखी भडकली होती. आगीची माहिती कळताच देवदूत आपत्कालीन यंत्रणेच्या मदत पथकासह दस्तुरी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देवदूतच्या पथकाने व आयआरबीच्या अग्नीशमन बंबाने आग विझविली. तत्पूर्वी आगीत संपूर्ण टेम्पोसह टेम्पोतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते.
आयरबीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने मार्गावरील टेम्पो बाजूला करत मार्गावर पसरलेला जळालेला माल बाजूला करून मार्ग स्वच्छ केला. त्यानंतर साडेनऊ वाजता पुण्याकडे जाणारी एक लेन वाहतुकीसाठी खुली केली. त्यानंतर अकरा वाजता पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात महामार्ग पोलिसांना यश आले.




 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचवडला टोळक्याचा राडा; पाचजण अटकेत

0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
चिंचवडमधील मोहननगरमध्ये एका टोळक्याने घरात घसून घरातील लोकांना तलावारीने आणि कोयत्याने मारहाण केली. तसेच, दहशत माजणवण्याच्या उद्देशाने परिसरातील घरांची आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आरोपींना पिंपरी कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. बुधवारी (२८ सप्टेंबर) रात्री हा प्रकार घडला.
सागर नलावडे, पवन लष्करे, बजरंग पवार, दत्ता देवकर, विशाल लष्करे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अनिल पवार, अक्षय साळे, अनिल जाधव पसार झाले आहेत. सुनीता लाला महिते (३६, रा. रामनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता मोहिते राहत असलेल्या घरासमोर टोळके आरडाओरडा करत होते. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांच्या ओळखीचे सागर नलावडे, पवन लष्करे, बजरंग पवार, अनिल पवार, अनिल जाधव, दत्ता देवकर, विशाल लष्करे आणि अक्षय साळे हे गोंधळ घालून शिवीगाळ करत होते. या वेळी सागर नलावडे याच्या हातामध्ये तलवार होती; तर पवनच्या हातामध्ये कोयता होता. सुनीता यांनी गोंधळ का घालता, अशी विचारणा केली असता सगर आणि पवन हे त्यांच्या अंगावर धावून गेले.
घाबरलेल्या अवस्थेत सुनीता या घरात पळून गेल्या असता टोळक्याने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच, सुनीता यांच्या पतीवर तलवारीने वार केले; तर मुलाला लाकडी दांडक्याने आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना देखील या टोळक्याने मारहाण केली. तसेच, त्यांच्या घरातील कपाटात असलेलेल सहा हजार रुपयांची रोकड टोळक्याने चोरून नेली.
यानंतर टोळक्याने परिसरातील नागरिकांच्या घराची आणि दुचाकींची तोडफोड केली. या घटनेत पोलिसांनी आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली. यातील इतर तीन जण पळून गेले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पिंपरी पोलिस तपास करीत आहेत. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचे आदेश आमदारांमार्फत आयुक्तांकडे

0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कामांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी (२९ सप्टेंबर) आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिले. दरम्यान, या संदर्भातील चौकशीच्या अनुषंगाने ५ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या सुनावणीला आमदार जगताप यांना उपस्थित राहण्याची विनंती आयुक्तांनी केली आहे. या आंदोलन नाट्याने भाजप-राष्ट्रवादी सध्या आमने-समाने आहेत.
महापालिकेने सांगवीतील स्मशानभूमीत पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविली आहे. स्मशानभूमीत आजतागायत सीएनजीची गॅस जोडणी किंवा पुरवठा झालेला नसतानाही ठेकेदाराला एक कोटी ३६ लाख ८० रुपये दिले. तसेच, शवदाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदाराला महिन्याला तब्बल तीन लाख रुपये महापालिका मोजते. आता त्याच ठेकेदाराने शहरातील दोन अन्य स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी बसविल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महिन्याला एक लाख २५ हजार रुपयांचा खर्च सादर केल्याचे सांगत हा भ्रष्टाचार असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
याशिवाय भोसरीतील शीतलबाग येथे पादचारी पुलासाठी सुरुवातीला ७१ लाख ५ हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु, बांधकाम साहित्यात वाढ झाल्याचे कारण पुढे करीत सुरुवातीला हा खर्च अडीच कोटींवर नेण्यात आला. त्यानंतर या पुलाच्या खर्चात तब्बल आठपट वाढ करून तो साडेपाच कोटींवर नेण्यात आला. पुढे जाऊन हा आकडा आणखी दोन कोटी रुपयांनी वाढला. त्यामुळे या उड्डाणपुलाचा खर्च ७१ लाखांवरून थेट साडेसात कोटी रुपयांवर पोचला. नाशिक फाटा येथे पुणे-मुंबई महामार्ग ओलांडण्यासाठी तब्बल साडेदहा कोटी रुपये खर्च येणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नाशिक फाटा येथे १०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या मूळ आराखड्यातच पादचारी पुलाचा समावेश होता.
त्यामुळे आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाशिक फाटा आणि भोसरी, शीतलबाग येथील पादचारी पुलाच्या कामाचीही चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरविकास विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर नगरविकास विभागाने याबाबत महापालिकेकडून माहिती मागविली. परंतु, महापालिका आयुक्त वाघमारे यांनी अशा प्रकारचे कोणतेही आदेश आपणाला प्राप्त झाले नसल्याचे म्हटले होते. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी महापालिकेत येऊन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाची प्रतच आयुक्तांच्या हातात दिली. या वेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि प्रमोद निसळ उपस्थित होते.

‘आदेश प्राप्त झाले नाहीत’
गेल्या काही दिवसांपासून भाजप कार्यकर्ते विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सांगत आंदोलन करीत आहे. तसेच, त्यानंतर याबाबतच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे भाजपकडूनच जाहीर करण्यात आले. परंतु, आयुक्त वाघमारे यांनी असे आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्याचे आदेश आमदारांमार्फत आयुक्तांना दिल्यावर तीनपैकी दोन आदेश यापूर्वीच प्राप्त झाल्याचे आयुक्त वाघमारे यांनी ‘मटा’ शी बोलताना सांगितले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यातील प्रवेश ‘गेट’नेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘राज्यातील खासगी व शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये पुढच्या वर्षी मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (एमई) आणि मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (एमटेक) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ ‘गेट’चीच गुणवत्ता ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे खासगी शैक्षणिक संस्थांना इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये एमई आणि एमटेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संस्था किंवा कॉलेज स्तरावर प्रवेश परीक्षा घेण्याची मुभा राहणार नाही,’ अशी माहिती तंत्र शिक्षण संचालनालयाचे (डीटीई) सहसंचालक डी. एस. मेश्राम यांनी ‘मटा’ला दिली.

राज्यात एमई आणि एमटेक दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांची एकूण प्रवेश क्षमता सुमारे २० हजार १६३ जागांची आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी तंत्र शिक्षण खात्याने ‘ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग’च्या (गेट) गुणवत्तेचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीही या प्रवेशांसाठी गेटची परीक्षा घेण्यात आली होती. शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्रवेश गेटच्या प्रवेश परीक्षेनेच होतात. मात्र, गेल्या वर्षी राज्यातील काही भागात खासगी संस्था किंवा कॉलेज स्तराहून एमई व एमटेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आणि रिक्त जागा भरण्यासाठी प्रवेश परीक्षमार्फत प्रयत्न झाले. डीटीईने या प्रवेशांसाठी ‘गेट’ची परीक्षा ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला असताना परीक्षा घेण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले.

‘एमई आणि एमटेकच्या प्रवेशांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे मेश्राम यांनी सांगितले. त्यानुसार डीटीईने वेबसाइटवर प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. २०१४-१५ वर्षापर्यंतचे प्रवेश हे डीटीईच्या प्रवेश परीक्षेद्वारे (सीईटी) आणि प्रवेश संस्था व कॉलेज स्तरावरील परीक्षेद्वारे झाले. संस्था व कॉलेज स्तरावरील परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या अर्जापासून ते प्रवेश घेण्यापर्यत मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तसेच प्रवेश परीक्षेमध्ये पारदर्शकतेचे प्रमाण कमी होते. प्रत्यक्षात कॉलेजांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना जादा शुल्क द्यावे लागत होते किंवा आर्थिक व्यवहार करून प्रवेश निश्चित करावा लागत होता, असे तज्ज्ञांनी सांगितले. डीटीईच्या या निर्णयामुळे प्रवेशासाठी होणाऱ्या आर्थिक व्यवहाराला ‘खो’ मिळाला असून ही प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅट्रॉसिटीची व्याप्ती आणखी वाढवा’

0
0

पुणे : ‘अॅट्रोसिटी कायद्याची अंमलबजावणी आणि गैरवापर होत असल्याबाबत येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी; तसेच आदिवासी, भटक्या आणि विमुक्त जमातींनादेखील या कायद्याचे संरक्षण द्यावे,’ अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली.

खैरलांजी दलित हत्याकांडाला दहा वर्षे झाल्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. या आंदोलनात नारी समता मंचाच्या अध्यक्षा विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल,​ पुणे महापालिकेतील आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, डॉ. संजय दाभाडे, म. ना. कांबळे, एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाउंडेशनचे सुभाष वारे, राजश्री आदिवासी पारधी समाज विकास परिषदेच्या राजश्री काळे, मारुती वायाळ, रिपलिब्कन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, ‘निर्माण’ संस्थेच्या अध्यक्षा वैशाली भांडवलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख आदी सहभागी झाले होते.

खैरलांजी दलित हत्याकांडाचा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यानंतरही जातीय अत्याचारांच्या घटना घडत आहेत. अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपायोग होत असल्याच्या तक्रारी आहेत. कोणत्याही कायद्याबाबत लोकांच्या तक्रारी असू शकतात; पण कायदे रद्द किंवा बदलता येत नाही, अशी भूमिका या वेळी संघटनांनी मांडली. खैरलांजी खटला निकाली काढून संबंधित कुटुंबीयांना न्याय द्यावा, अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत श्वेत पत्रिका काढावी आणि आदिवासी, विमुक्त आणि भटक्या जमातींना या कायद्यांतर्गत संरक्षण द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

‘प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघा. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यास त्याचा विचार केला पाहिजे; पण कायदा नको असे म्हणता येणार नाही.’ असे विद्या बाळ म्हणाल्या. ‘खैरलांजी प्रकरणातील पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.’ असे रजिया पटेल यांनी नमूद केले. ‘अॅट्रॉसिटी कायद्याचा वापरच झाला नसल्याने गैरवापर होणार कसा?’ असा सवाल डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बारा जानेवारीपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चित्रपटप्रेमी व रसिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. रसिकांसाठी पर्वणी असलेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) १२ ते १९ जानेवारी २०१७ मध्ये रंगणार आहे. या आठ दिवसांच्या कालावधीत जगातील सुमारे दोनशे अभिजात चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. पुणे फिल्म फाउंडेशनने वेबसाइटद्वारे ‘पिफ’च्या तारखा जाहीर केल्या आहेत.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने आयोजित ‘पिफ’चे यंदाचे १५ वे वर्ष आहे. हा महोत्सव राज्य सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव समजला जातो. १४ वा महोत्सव १४ ते २१ जानेवारी २०१६ या कालावधीत रंगला होता. ‘पिफ’मधील जागतिक चित्रपट पाहण्यासाठी तरुण प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतो. पुण्यातील चित्रपट रसिक ‘पिफ’ची आवर्जून वाट पाहत असतो. जागतिक चित्रपट विभागात प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर तर मराठी चित्रपट विभागात अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. www.piffindia.com या वेबसाइटवर अर्ज व अधिक माहिती उपलब्ध आहे.

युरोपियन चित्रपट महोत्सव सुरू
चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या पुणे फिल्म फाउंडेशन आयोजित ‘युरोपियन चित्रपट महोत्सवास’ प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात गुरुवारी सुरुवात झाली. बेल्जियमच्या ‘फिफा’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कार्यकारी संचालक आंद्रे स्युत्रिक हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, दीपक आपटे या वेळी उपस्थित होते. ‘टोउस लेस चॅटस साँट ग्रीस’ हा बेल्जियम चित्रपट दाखविण्यात आला. निवडक २० चित्रपटांचा आस्वाद या महोत्सवात घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​इतिहास अभ्यासकांसाठी‘सभासद बखरी’चे पुनर्मुद्रण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट मांडणारी तसेच इतिहास अभ्यासात समकालीन संदर्भ म्हणून ग्राह्य धरली जाणारी कृष्णाजी अनंत सभासद विरचित ‘आद्य छत्रपती शिवाजीराजे यांची बखर’ हा संदर्भग्रंथ अभ्यासकांसाठी उपलब्ध झाला आहे. वरदा प्रकाशनने या बखरीचे पुनर्मुद्रण केले आहे.
शिवछत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात सभासद बखर लिहिण्यात आली. छत्रपती राजाराम महाराज कर्नाटकात जिंजीला जाताना त्यांच्यासोबत जी माणसे होती त्यात कृष्णाजी अनंत सभासद होते. ते कर्नाटकचे माहीतगारही होते. त्यांनी ही बखर लिहिली आहे. या बखरीमध्ये ‘पूर्वजवृत्त आणि शिवाजी महाराजांचा कार्यारंभ’, ‘शिवाजी महाराज आणि अफजलखान’, ‘प्रतापगडावर देवीची स्थापना आणि कारभारव्यवस्था’, ‘शास्ताखान आणि राजा जयसिंग यांची स्वारी’, ‘आग्रा जाण्याविषयी करार’, ‘आग्र्यास जाणें आणि येणे’, ‘आदिलशाहीशी युद्ध’, ‘मोगलांशी तह आणि बिघाड’, ‘आदिल व मोगलशाहीशी युद्ध’, ‘राज्याभिषेक’, ‘उभयता छत्रपती भेट’, ‘चंदी, व्यंकोजी आणि संभाजी’, ‘राज्याची मोजदाद’ आणि ‘राजियांचे देहावसान’ अशा चौदा प्रकरणांमध्ये छत्रपतींचा जीवनपट मांडण्यात आला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक शंकर नारायण जोशी यांनी या बखरीचे संपादन केले आहे.
त्याविषयी बोलताना ज्येष्ठ इतिहास आणि दुर्गअभ्यासक महेश तेंडुलकर म्हणाले, ‘शिवकालावार प्रकाश टाकणाऱ्या साधनांमध्ये सर्वाधिक विश्वसनीय म्हणून सभासद बखरीकडे पाहिले जाते. याचे कारण या बखरीत इतर बखरींप्रमाणे दैवी चमत्कार वैगेरे गोष्टी नाहीत. सभासदाने छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी जिंजीला असताना ही बखर लिहिली आहे. सभासदाला त्यावेळी जिंजीत दफ्तर तसेच कागदपत्रे व इतर गोष्टींची उपलब्धता नसल्याने स्मृतींवर भर देऊन हे लिखाण करावे लागल्याचे जाणवते. त्यामुळे काही ठिकाणी प्रसंगांची उलटापालट झालेली दिसते. इतिहासात अभ्यासात अस्सल पत्रांखालोखाल या बखरीला स्थान दिले जाते. या बखरीचे वैशिष्ट्य म्हणजे सभासदाने महाराजांकडे असलेल्या, वसवलेल्या तसेच कर्नाटकातील गडांची नावे दिली आहेत. सभासद म्हणजे राजाला सल्ले देणारा अधिकारी असल्याने तो राजमंडळाच्या जवळचा होता. त्यामुळे दुय्यम दर्जाचे साधन असले तरीही त्याला विश्वसनीयता आहे.’
अनेक दिवस हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपलब्ध नसल्याने बखरीचे पुनर्मुद्रण केले आहे. शिवपूर्वकाल, शिवकाल आणि पेशवेकालीन महाराष्ट्राविषयीची पुस्तकेही वरदा प्रकाशनने इतिहास अभ्यासकांसाठी उपलब्ध केली आहेत, असे केदार केळकर यांनी सांगितले.  

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपोतदार करंडकावर ‘फर्ग्युसन’ची मोहोर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विश्वासराव तथा बाळासाहेब सरपोतदार यांच्या स्मरणार्थ बीएमसीसी महाविद्यालयातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सरपोतदार करंडक आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धे’त फर्ग्युसन महाविद्यालयाने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला; तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास सांघिक द्वितीय क्रमांक मिळाला.
स्पर्धेचे यंदाचे हे १६ वे वर्ष होते. महाविद्यालयाच्या पित्ती हॉलमध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेत २४ संघ सहभागी झाले होते. प्रसंगनाट्य स्पर्धेत विद्यार्थ्यांचे प्रसंगावधान, उत्स्फूर्तता, झटपट घेतलेले निर्णय सुयोग्य पद्धतीने अंमलात आणायची क्षमता इ. गुणांचा विकास व्हावा, हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे उपप्राचार्य डॉ. ए. एन. पुराणिक यांनी सांगितले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसाद वनारसे व अंजली धारू यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या आयोजनात सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सरोज गांगुर्डे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा प्रमुख म्हणून सोनाली सावंत व आदित्य पवार यांनी काम पाहिले. सविस्तर निकाल : सांघिक प्रथम - फर्ग्युसन महाविद्यालय, सांघिक द्वितीय - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, दिग्दर्शन प्रथम - चिन्मय पटवर्धन (स. प. महाविद्यालय), दिग्दर्शन द्वितीय - संकेत पारखे (फर्ग्युसन महाविद्यालय), पुरुष अभिनय प्रथम - प्रतीक कार्यकर्ते (पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय), पुरुष अभिनय द्वितीय - अभिजित आहेर (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय), स्त्री अभिनय प्रथम - अनया देव (फर्ग्युसन महाविद्यालय), स्त्री अभिनय द्वितीय - सई ताम्हणकर (आयएलएस विधी महाविद्यालय). 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयातांवर मेहेरनजर

0
0

भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढती अस्वस्थता

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमधून भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या आयारामांवरून पक्षातच कुजबुज सुरू झाली आहे. पक्ष वाढविण्यासाठी, बळकट करण्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ‘बाहेरच्यां’ना अधिक महत्त्व दिले जात असल्याच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी पक्षाच्या बैठकीतच खरमरीत शब्दांत टीका केली.
भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत इतर पक्षांमधून प्रवेश देण्यात आलेल्यांविषयीची नाराजी व्यक्त केली गेली. पक्षासाठी सातत्याने झगडण्याचे, पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याकडे सध्या दुर्लक्ष केले जात असून, पक्षप्रवेश करणाऱ्यांनाच तिकिटे देण्यात येण्याची भीती आणि अस्वस्थता भाजप कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे. त्याचे पडसाद या बैठकीत उमटले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि मनसेमधील आजी-माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला. त्यापाठोपाठ, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील महिन्यात आरक्षणे आणि प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर कदाचित हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरातील कमकुवत प्रभागांमध्ये भाजपमधून चार उमेदवार देणे शक्य नसल्यास, इतर पक्षांमधील कार्यकर्त्यांची चाचपणी करून त्यांना प्रवेश दिला जात असल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. मात्र, इतर पक्षांमधून येणारे बहुसंख्य कार्यकर्ते उमेदवारीच्या आमिषानेच येत असल्याने त्या भागांत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेरून येणाऱ्यांचे कामही करावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कर्जवाटपप्रकरणी १६ जणांवर आरोपपत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी पदाचा गैरवापर करून बनावट कादपत्रांच्या आधारे लाखो रुपयांचे कर्ज वाटप केल्याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकासह १६ जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचचुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.
शाखा व्यवस्थापक तानाजी श्रीरंग बोरकर (६१, रा. मोहननगर, चिंचवड), मुंगीप्पा स्टील कॉर्पोरेशनचा अकाउंटंट राहुल दामोदर घुले (३३, रा. आंबेठाण रोड, चाकण), मुंगीप्पा स्टील कार्पोरेशनचा सुपरवायझर कुणाल मोहनराज दास (२५, उद्यमनगर, पिंपरी), अनिल बलराम यादव (२५, इंद्रायणीनगर, भोसरी), धीरज धनश्याम चचलानी (रा. डायमंड पार्क स्ट्रीट, वाकड), मुंगीप्पा स्टील कार्पोरेशनचा मालक राजेश शामजी पनघळ (३५, पिंपरी), सोनुल एकनाथ भालेकर (२०, रूपीनगर, तळवडे), अमन नझीरअहमद नदाफ (२२, रसरंग चौक, पिंपरी), सिध्देश्वर प्रकाश भांगे (२८, रा. जाधववाडी, चिखली), आशा महादेव सानप (३३, रा. पी. के. चौक, पिंपळे सौदागर), निगडी येथील हॉटेल गोकुळचा मालक हिमांशू हरनंदन शेखर (४२, भागलपूर, बिहार), रिअल इस्टेट एजंट राहुल बाबुराव आहेर (३०, रा. जाधववाडी, चिखली), चंदन घनश्याम चचलानी (४१, पिंपळे निलख, पिंपरी), एम. के. असोसिएट्सचा भागीदार मनोज कैलास गायकवाड (४२, काशीनाथ पाटीलनगर, धनकवडी), पिंपरी येथील जय भारत हॅन्डलूम हाऊसचा मालक कन्हैयालाल जेठानंद नाथानी (४५, पिंपरी) आणि अदित्य वॉटर सप्लायर्सचा अदित्य दत्तात्रय हगवणे (७५, शिवाजी चौक, कोंढवा बुद्रुक गावठाण) अशा १६ जणांविरूध्द हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
बँकेचा शाखा व्यवस्थापक बोरकर याने इतर साथीदारांच्या मदतीने कट रचला. त्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे ७९ लाख ६९ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करून त्याचा वापर, तसेच तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ जानेवारी २०१५ ते २९ जून २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणाचा तपास करून सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक यू. के. मोरे यांनी आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सीबीआचे सरकारी वकील म्हणून मनोज चलाडन आणि विजयकुमार ढाकणे काम पाहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नदीसुधार योजनेसाठी २१ कोटींचे अनुदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद सरकारच्या नदीसुधार योजनेच्या अंतर्गत शहरात केल्या जाणाऱ्या कामांसाठी आणखी २१ कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला मिळाले आहे. सुमारे ९०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, यासाठी महापालिकेने तेरा टेंडर तयार केली आहेत. त्यासाठी केंद्र सरकार म‌हिनाभरात सल्लागार नेमणार आहे. सल्लागाराच्या मान्यतेनंतर मुळा-मुठा नदी सुधारणा प्रकल्पाची कामे सुरू होतील, असा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकारच्या नदीसुधार योजनेच्या माध्यमातून शहरातील मुळा आणि मुठा नदी काठावर अकरा ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारली जाणार आहेत. या ठिकाणी सुमारे चारशे एमएलडी पाण्यावर दररोज प्रक्रिया करून नदीत सोडले जाणार आहे. यासाठी बाणेर परिसरात ४३ किलोमीटरची ड्रेनेज लाइनची तसेच या केंद्रांना जोडणाऱ्या शंभर किलोमीटरच्या ट्रंकलाइनची कामे केली जाणार आहेत. तसेच प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीआयएस सिस्टिम विकसित केली जाणार असून, काही ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी जायका या कंपनीने केंद्र शासनाला सुमारे ८१० कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. केंद्र सरकार अनुदानाच्या माध्यमातून पुणे महापालिकेला हा निधी देणार आहे. त्यापैकी ५ कोटी रुपये यापूर्वीच महापालिकेला मिळाले असून, आणखी २१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.
नदीसुधार योजनेला केंद्र शासनाकडून अनुदान मिळणार असल्याने यावर केंद्र शासनाचे नियंत्रण राहाणार आहे. केंद्र शासन यासाठी सल्लागार नेमत असून येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पुर्ण होईल. महापालिकेच्या माध्यमातून नदी सुधार योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या १३ कामांची स्वतंत्र टेंडर्स तयार केली आहेत. केंद्रीय सल्लागाराच्या मान्यतेनंतर ही टेंडर प्रक्रिया राबविण्यात येईल. पुढील महिन्या दीड महिन्यात नदी सुधार योजनेच्या कामाला सुरुवात होईल, असे पालिका आयुक्त कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपी बसचा रंग बदलणार

0
0

रंगाची निवड करण्यासाठी पुणेकरांना आवाहन; मते जाणून घेणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) सेवेकडे अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पीएमपी बसचा रंग बदलण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘पीएमपीएमएल’च्या वतीने खरेदी करण्यात येणाऱ्या सुमारे १५०० बस नव्या रंगात रंगणार आहेत. बसचा रंग निवडण्यासाठी पुणेकरांची मते जाणून घेतली जाणार आहेत. नवीन बसची तीन डिझाइन पालिकेने तयार केली असून, ते अंतिम करण्यासाठी ५ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. याचा भाग म्हणून पीएमपीच्या वतीने खरेदी केल्या जाणाऱ्या दीड हजार बसना नवीन रंग देण्यात येणार आहे. बीआरटी मार्गातून धावणाऱ्या बस आणि उर्वरित रस्त्यावरून धावणाऱ्या बससाठी वेगवेगळे रंग असणार आहेत. त्यासाठी आकर्षक रंगसंगती निवडून डिझाइन करून घेतले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या असलेल्या बसचा रंग हा लाल आणि पिवळा आहे. या बस अधिक चांगल्या दिसाव्यात आणि त्यांच्याकडे नागरिकांचे लक्ष जावे, यासाठी हिरवट आणि त्यावर विविध रंगछटा असलेल्या गुलमोहोर आणि गुलमोहाराच्या पानांचे डिझाइन, पक्षांची चित्रे रेखाटली आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या तीनही बसची छायाचित्रे प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांकडून मते मागविली जाणार आहेत. यातील कोणते डिझाइन स्वीकारायचे यासाठी नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. ५ ते १२ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांना ७८८७८१०००३ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन मत नोंदविता येणार आहे.
..
‘बसच्या आत जाहिरात शक्य‘
पीएमपीच्या बसवर केल्या जाणाऱ्या जाहिरातीमधून प्रशासनाला तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यामुळे बसची बाह्यरंगसंगती बदलताना त्यावर कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्याची परवानगी‌ दिली जाणार नाही. बसच्या आतील बाजूला असलेल्या सीटच्या मागे तसेच बसमध्ये डिजिटल बोर्ड लावून जाहिरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नव्याने घेण्यात आलेल्या बसचा रंग बदलल्यानंतर जुन्या बसचा रंग देखील टप्प्याटप्प्याने बदलण्याचा विचार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
..
‘बायो सीएनजीवर बस चालविणार’
महापालिकेच्यावतीने ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प तळेगाव येथे बीओटी तत्वावर उभारण्यात आला आहे. या ठिकाणी तयार झालेल्या बायो सीएनजी गॅसवर बस धावू शकतात, हे संशोधनातून समोर आले आहे. ‘एआरएआय’ आणि ‘डीआरडीई’ने देखील याला मान्यता दिली आहे. या प्रकल्पात तयार होणारा सीएनजी गॅस पिंपरी येथील पीएमपीएमएल डेपोतील सीएनजी केंद्रात आणला जाईल. पीएमपीएमएलच्या सीएनजीवर धावणाऱ्या ४० ते ४५ बस कचऱ्यापासून तयार होणाऱ्या या बायो सीएनजीवर धावू शकतील. अशा प्रकारे सीएनजीवर सार्वजनिक बसेस चालविण्याचा हा देशातील पहिला एकमेव उपक्रम असेल, असे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुक्कासेवन हृदयासाठी घातक

0
0

कॉलेजवयीन तरुणांमध्ये फ्लेवर्ड हुक्क्याचे वाढते आकर्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिगारेटचे सेवन धोकादायक असल्याचे मा​हीत असूनही कॉलेजच्या तरुणांमध्ये हुक्का पिण्याची ‘क्रेझ’ वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चेरी, मिंट, चॉकलेट आदी फ्लेवरच्या हुक्कासेवनामुळे २० ते ३० या वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.
‘सिगरेटच्या तुलनेत हुक्का पिणे प्रतिष्ठेचे समजले जाते. कॉलेजमध्ये जाणाऱ्या विशेषतः उच्चभ्रू वर्गातील तरुण सर्रास हुक्का पितात. त्यांना हुक्का पार्लरकडे आकर्षित करण्यासाठी त्यामध्ये चेरी, मिंट, चॉकलेटसारखे फ्लेवर्स एकत्रित केले जातात. हुक्क्यातील फ्लेवर्ड तंबाखूमध्ये मोठ्या प्रमाणात शिसे असते. त्यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. शहरातील २० ते ३० या वयोगटातील तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांचे प्रमाण वाढले आहे,’ अशी माहिती कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश दानेज यांनी दिली.
सातत्याने करण्यात येणाऱ्या धूम्रपानामुळे पोटात वेदना होतात. छातीत जळजळ वाढल्याने गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्टला दाखविण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, जळजळ वाढल्याने हृदयरोगाची समस्या असल्याचे दिसून आले आहे. संबंधितांच्या हृदयाची तपासणी केल्यानंतर सिगारेट ओढण्याऐवजी हुक्का पिण्याची सवय वाढल्याचे दिसून आले आहे, असेही डॉ. दानेज म्हणाले. ‘हुक्क्यातील तंबाखूमध्ये निकोटिन, कार्बन मोनॉक्साइड आणि अनेक जडधातूंसारखे विषारी पदार्थ असतात. कोणत्याही स्वरूपात होणाऱ्या तंबाखू सेवनाचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. शिसेसेवन सिगारेट सेवनाइतकेच घातक आहे. हुक्का ओढल्याने फुफ्फुसे आणि हृदयाला कमी नुकसान होते, असा गैरसमज आहे. दीर्घकाळ हुक्का सेवन केल्याने कॅन्सर होण्यासाठी आवश्यक गुणधर्म फुफ्फुसांमध्ये जमा होतात. हुक्क्याच्या धुरामध्ये सिगारेटच्या तुलनेत ३६ पट जास्त टार आणि १५ पट अधिक कार्बन मोनॉक्साइडची असते,’ अशी माहिती डॉ. मनोहर साखरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीची चाचणी सहाशे रुपयांत

0
0

राज्य सरकारचे खासगी हॉस्पिटल, प्रयोगशाळांना आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेंगी, चिकुनगुनियाचा उद्रेक झाल्याने राज्यातील खासगी हॉस्पिटल, प्रयोगशाळा पेशंट आणि त्यांच्या नातेवाइकांकडून ८०० ते १५०० रुपये उकळत आहेत. या वसुलीला लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने सर्व खासगी हॉस्पिटल, प्रयोगशाळांना सहाशे रुपयांतच डेंगीची एलायझा, एनएस१ आणि मॅक एलायझा आदी चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत.
या ​शिवाय डेंगीच्या आजाराचे निदान करण्यासाठी खासगी प्रयोगशाळांसह हॉस्पिटलने रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट कीट वापरू नये, अशीही ताकीद दिली आहे. सामान्य नागरिकांच्या होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला लगाम लावण्यासाठी सरकारने अध्यादेश जारी केला होता. या संदर्भात ‘मटा’ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. डेंगीच्या आजाराचा राज्यात उद्रेक सुरू आहे. पुण्यासह महाराष्ट्रात डेंगी, चिकुनगुनियाचे पेशंट आढळत आहेत. पेशंटना डेंगीच्या विविध चाचण्या करण्यासाठी खासगी प्रयोगशाळा, हॉस्पिटलांकडे जावे लागते. या चाचण्यांसाठी दोन हजार रुपयांपर्यंत शुल्क वसूल करण्यात येते. या पार्श्वभूमीवर राज्यातील पेशंटना दिलासा देण्यासाठी खासगी हॉस्पिटलांमध्ये ही चाचणी सहाशे रुपयांत करून देण्यासाठी आणि हॉस्पिटलांच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य खात्याच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी आरोग्य खात्याकडे प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावासंदर्भात राज्याचे आरोग्य संचालक डॉ. मोहन जाधव यांनी सरकारकडे अध्यादेश जारी करण्याची शिफारस केली होती. या संदर्भात साथरोग नियंत्रण समितीच्या बैटकीत या प्रस्तावावर आऱोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी चर्चाही झाली.
त्यानुसार राज्य सरकारने अध्यादेश जारी केला. त्यामध्ये सहाशे रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारणी करू नये, तसेच कोणत्याही परिस्थितीत आजाराच्या निश्चित निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट कीटचा वापर करू नये असे सरकारने म्हटले आहे. या आदेशामुळे आता राज्यातील सर्व खासगी हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांना जादा शुल्क आकारता येणार नाही. याबाबत सहसंचालक डॉ. जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडीक नव्हे ‘सोनेरी’ दर्जा द्या

0
0

गवताळ प्रदेशांच्या संरक्षणाची ‘ओवीतला लांडगा’त शिफारस

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मानवी हस्तक्षेपामुळे अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या लांडगा, काळवीट, चिंकारा, माळढोक या प्राण्यांना वाचवायचे असेल तर, गवताळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र धोरण करण्याची गरज आहे. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या गवताळ प्रदेशाला पडीक जमीन म्हणून नव्हे तर, सोनेरी जमीन या नावाचा दर्जा द्यावा, अशी शिफारस ‘ओवीतला लांडगा’ या अहवालातून करण्यात आली आहे.
वन विभाग, वन्यजीव अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांनी राबविलेल्या ‘ओवीतला लांडगा’ या प्रकल्पाच्या अहवालाचे प्रकाशन ‘ख्वाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. वन्यजीव संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, नितीन काकोडकर, जित सिंह, उपवनसरंक्षक सत्यजीत गुजर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रकल्प समन्वयक विद्या अत्रेय यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. ‘इसापनीतीच्या गोष्टींमुळे प्रसिद्ध झालेल्या लबाड लांडग्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. अभ्यासकांनी पुण्यासह अहमदनगर, सातारा, सांगली कोल्हापूर, बुलढाणा अशा सात जिल्ह्यांमध्ये दोन वर्षे फिरून गवताळ प्रदेशातील मानवी हस्तक्षेप, अतिक्रमणांमुळे नष्ट होत असलेला लांडग्यांचा अधिवास, गावकऱ्यांबरोबर आणि धनगर समाजाशी पिढ्यानपिढ्या असलेले नाते याचा अभ्यास केला,’ अशी माहिती अत्रेय यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात सासवड, जेजुरी, सुपे, करबनवाडी या परिसरात लांडगा आढळतो. नष्ट होत असलेल्या गवताळ प्रदेशांमुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेळ्या-मेंढ्यांना घेऊन सतत स्थलांतर करणाऱ्या धनगरांचा लांडगा हा शत्रू आहे, असा समज असला तरी प्रत्यक्षात धनगरांच्या ओव्यांमध्ये लांडग्यांकडे आदराने बघितले जाते. लांडगे पशुधनावर हल्ला करतात, हे वास्तव खूप आधीपासूनच स्वीकरले आहे, त्यामुळे धनगर लांडग्याला दोष देण्याऐवजी जनावरांची काळजी घेण्यावर भर देतात. नुकसान भरपाई दिल्याने त्यांचा वन्यजीवांबद्दलचा राग कमी होतो, असे लिमये यांनी सांगितले.
‘लांडग्यासह अनेक प्राणी गवताळ प्रदेशावर अवलंबून आहेत. त्यांचा अधिवास नष्ट केल्यास हे सर्व प्राणी धोक्यात येणार आहेत. गवताळ प्रदेशांचे संरक्षण आणि त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्यस्तरीय स्वतंत्र धोरण असले पाहिले. गवताळ प्रदेश, त्यावरील जैवविविधता, पशूपालन आणि त्यांचे परस्परावलंबित्व यावर पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून संशोधन होण्याची गरज आहे. यामुळे वन्यजीवांच्या अधिवासात सुधारणा आणि नैसर्गिक संसाधनांच्या वापरावरून होणारा मनुष्य आणि वन्यप्राणी संघर्ष कमी होईल,’ असेही अत्रेय यांनी सांगितले.
सायली पलांडे– दातार यांनीही धनगर आणि लांडगा यांच्यातील पारंपरिक नाते उलगडले. अनुज खरे यांनी वन्यजीव सप्ताहाच्या उपक्रमांची माहिती दिली.
...........
अहवालातील निष्कर्ष
- भारतील संरक्षित वनप्रदेशापैकी १७ टक्के भागात शुष्क गवताळ प्रदेश आहेत.
- भारतीय लांडगा, काळवीट आणि माळढोक या संकटग्रस्त प्रजाती गवताळ प्रदेशात सापडतात.
- गवताळ प्रदेश मानव आणि इतर वन्यजीव यांच्या सहअस्तित्वाचे उत्तम उदाहरण आहे.
- गवताळ प्रदेशाला पडीक जमिनीऐवजी सोनेरी जमीन असे नाव हवे.
- गवताळ प्रदेश वाचविण्यासाठी धनगरांचे पारंपरिक ज्ञान आणि शास्त्र यांचा एकत्रित विचार करून धोरण निश्चित करावे.
- चारा आणि वैरणीसाठी उपयुक्त अशा गवत आणि इतर वनस्पतींची लागवड करावी.
.............
धनगरांना लांडग्यांचा त्रास कधीच झाला नाही. लांडगे त्यांच्या जगण्याचाच एक भाग आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात चराई कुरणांचे प्रमाण वेगाने घटत असून, धनगरांनी जपलेल्या पारंपरिक शेळी-मेंढी पालनावर बंधने आली आहेत. नष्ट होत असलेले गवताळ प्रदेश ही चिंतेची बाब आहे.
भाऊराव कऱ्हाडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images