Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालिकेचे रोजंदारीवरील २४५ कामगार कायम

$
0
0

 म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या विविध विभागात रोजंदारीवर काम करणाऱ्या २४५ कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

महापालिका प्रशासन आणि महापालिका कामगार युनियन यांच्यामध्ये १९९६मध्ये करार झाला होता. यामध्ये रोजंदारीतील अकुशल कामगारांच्या पाच वर्षांत नेमलेल्या सेवकांची यादी तयार करून त्यावरून वार्षिक सरासरी सेवकांना ज्येष्ठतेप्रमाणे कायमस्वरूपी नेमले जावे, असा करार करण्यात आला होता. मात्र शासन निर्णय बदलल्याने याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नाही. कराराची अंमलबजावणी न झाल्याने कामगारांनी औद्योगिक न्यायालयामध्ये धाव घेत दावा दाखल केला होता. यामध्ये काही रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिले आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना काही अटींवर पालिकेच्या सेवेत काम करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

अतिक्रमण विभागातील सेवकांना कायम करण्याबाबत महापालिका कामगार युनियनने महापालिकेविरुद्ध केलेले दावे हायकोर्टातून मागे घ्यावेत, महापालिका मुद्रणालय आणि इतर २७७ रोजंदारी सेवकांना कायम करण्याबाबत औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध महापालिकेने उच्च न्यायालयात केलेले दोन्ही दावे मागे घ्यावेत, अशा अटी यामध्ये टाकण्यात आल्या आहेत. या रोजंदारी सेवकांना राज्य सरकारच्या मंजुरीच्या दिनांकापासून कायम करावे, तसेच या सेवकांना कायम करायचे झाल्यास त्यांना निवृत्तीवेतनाऐवजी पारिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करावी या अटींचा समावेश आहे. या अटींसह हा विषय स्थायीत मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहन नोंदणीसाठी बनावट कागदपत्र देणारा अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
नवीन वाहन नोंदणीसाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. १४ ते १८ जुलै दरम्यान हा प्रकार घडला आहे. गणेश दगडू मोरे (३६, रा. रूपीनगर, तळवडे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुरेश उमाकांत तुरकणे (४०, रा. पिंपरी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरकणे हे चिखली येथील पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. मोरे याने नवीन वाहन नोंदणीसाठी बनावट कागदपत्रे परिवहन कार्यालयाकडे सादर केली होती. निरीक्षक तुरकणे यांनी या कागदपत्रांची पडताळणी केली असता कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आले. मोरे यांनी राज्य सरकारची फसवणूक केल्यामुळे तुरकणे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे तपास करीत आहेत. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मिती स्टॅम्पिंग्ज कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
कामगारांच्या पगारातून दरमहा कपात करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधी (पीएफ)ची रक्कम कामगारांच्या खात्यामध्ये न भरता त्यांची फसवणूक करण्यात आली. एप्रिल २०१३ ते ऑगस्ट २०१६ दरम्यान निर्मिती स्टॅम्पिंग्ज प्रा. लि. एमआयडीसी भोसरी येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनी चालकासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीचे संचालक हरेश बाळकृष्ण नाईक व इतर एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी सतीश घाटपांडे (४८, रा. कोथरूड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीमध्ये असलेल्या निर्मिती स्टॅम्पिंग्ज प्रा. लि. या कंपनीतील कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्यात येत होती. हा निधी कामगारांच्या भविष्य निर्वाह खात्यामध्ये जमा करणे आवश्यक होते. परंतु हरेश नाईक आणि त्याच्या साथीदाराने ही रक्कम कामगारांच्या खात्यात न भरता त्यांची फसवणूक केली. या दोघांनी तीन वर्षामध्ये ५ लाख ५९ हजार ८७२ रुपयांचा अपहार केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळफास घेऊन मुलीची आत्महत्या

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
अल्पवयीन मुलीने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी पिंपरीतील गांधीनगर परिसरात ही घटना घडली. नगमा मिराज शेख (१५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगमा हिने मंगळवारी पावणेसहाच्या सुमारास घरात कोणी नसताना घरातील लाकडी वाशाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.
तेव्हा ओढणी तुटल्याने ती खाली कोसळली. हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी नगमाला बेशुद्ध अवस्थेत महापालिकेच्या (वायसीएम) हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. फौजदार घुगे तपास करीत आहेत.
 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव खर्चाविरोधात पिंपरी पालिकेत आंदोलन

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
वाढीव खर्चाच्या नावाखाली ठेकेदार आणि पुरवठादारांवर १३५ कोटी रुपये उधळण्यात आल्याचा आरोप करीत पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ‘वाढीव खर्चाचे प्रस्ताव रद्द करावेत,’ अशी मागणी या वेळी करण्यात आली.
महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपये वाढीव खर्च ठेकेदारांना देण्यात आले. त्यासाठी त्या पक्षाच्या नेत्यांना टक्केवारी मिळाली, असा आरोप करून वाढीव खर्चाचे सदस्य प्रस्ताव ऐनवेळी मंजूर करू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याशिवाय गेल्या सात महिन्यांत ऐनवेळच्या प्रस्तावाद्वारे २०४ कोटी २६ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामध्ये तब्बल १३५ कोटी ८३ लाख रुपयांच्या वाढीव खर्चाचा समावेश आहे, या बाबींचा पुनरुच्चार करण्यात आला. याविषयी निषेध व्यक्त करीत महापालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले.
करदात्यांचे पैसे लुटणे थांबवावे, विकासकामांच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घरे भरून घेऊ नयेत, अशी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, चंद्रकांता सोनकांबळे, शीतल शिंदे, प्रमोद ताम्हणकर, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, शरद बोऱ्हाडे, भाई सोनवणे, दत्ता गायकवाड, अमृत पऱ्हाड, भीमा बोबडे, मोरेश्वर शेडगे, चेतन घुले यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेची अनधिकृत बांधकामे पाडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शहरातील गोरगरिबांची अनधिकृत बांधकामे पाडण्यापूर्वी महापालिकेने स्वतःची अनधिकृत बांधकामे आधी पाडावीत, असे आव्हान देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बुधवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनावर शरसंधान केले. त्यामुळे प्रशासनाची पुरती कोंडी झाली.
सर्वसाधारण सभेत दत्ता साने, शीतल शिंदे, आर. एस. कुमार आणि तानाजी खाडे यांनी प्रश्न विचारले होते. त्यामध्ये सुरक्षा विभागाचा भोंगळ कारभार, उद्यानांतील अनधिकृत बांधकामे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पालिकेकडे हस्तांतरित केलेल्या भूखंडांवरील अतिक्रमणे यांचा समावेश होता.
सुरक्षा विभागातील ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केलेल्या रखवालदारांची वर्तणूक, त्यांची कामाची पद्धत, त्यांना मिळणारे वेतन, गैरहजेरीचे प्रमाण, रजा, पार्ट्या याविषयी साने यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अनेक गंभीर आरोपही केले. प्रशासन आणि ठेकेदारांच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे कुंपणच शेत खाऊ लागल्याची भावना व्यक्त केली. त्याची दखल घेत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यासंदर्भात चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर योग्य कारवाईचे आश्वासन दिले. परंतु, त्यानंतरही सदस्यांचे समाधान झाले नाही.
सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील प्रश्नानंतर ‘एमआयडीसी’ने हस्तांतरित केलेल्या भूखंडांवरील अनधिकृत बांधकामांसंदर्भात कुमार आणि शिंदे यांनी प्रशासनावर टिकेचा भडिमार केला. संभाजीनगर येथील साई उद्यानातील बांधकामावरून प्रशासनाला लक्ष्य केले. नियम डावलून आणि राज्य सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत सदस्यांनी प्रशासनावर आगपाखड केली. हायकोर्टाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते. त्यामुळे गोरगरिब जनता मेटाकुटीस आली आहे. मात्र, दुसरीकडे पालिकाच अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत असेल तर हे पाप आहे. अधिकारीदेखील वेगवेगळ्या प्रकारची लेखी उत्तरे देऊन सदस्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याची बाब कुमार यांनी निदर्शनास आणून दिली. याविषयीची चर्चा गंभीरतेकडे जात असतानाच सुलभा उबाळे यांनीही मुद्दा उचलून धरला. अनियमितता असताना उद्यानातील बांधकामाकडे दुर्लक्ष होत असेल तर या प्रकरणात आर्थिक व्यवहार होत असल्याची शंका उपस्थित केली. त्यानंतर खुलाशाच्या मुद्यावरून सभा तहकुबीचा निर्णय महापौरांनी घेतला. त्यामुळे चर्चा अर्धवटच राहिली.

व्यंगचित्राचा निषेध
मराठा मूकमोर्चासंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल निषेध व्यक्त करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा दहा मिनिटे तहकूब करण्यात आली. याबाबतची सूचना योगेश बहल यांनी मांडली. त्यास उल्हास शेट्टी यांनी अनुमोदन दिले. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि सामनाचा काडीमात्र संबंध नाही, असे नमूद करून शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी ‘सामना’मधील व्यंगचित्राचे समर्थन करणार नसल्याचे सांगितले. तसेच या मुद्याचे कोणी भांडवल करू नये असे स्पष्ट करीत निषेध व्यक्त करणाऱ्यांचा निषेध केला.

तहकुबीवरून गोंधळ
‘प्रश्नोत्तराचा तास संपत असताना सभागृहात पुरेसे संख्याबळ नाही,’ असे निदर्शनास आणून देत ‘सभा तहकूब करावी,’ अशी मागणी सुलभा उबाळे यांनी केली. ‘मात्र, आम्हाला बोलू द्यावे,’ अशी आग्रही मागणी पक्षनेत्या मंगला कदम, शमीम पठाण यांनी केली. त्यामुळे महापौर शकुंतला धराडे काही काळ संभ्रमात पडल्या. यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सभा तहकूब करण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला. त्यामुळे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेच्या विश्वस्ताने लाटला पीएफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
विश्रांतवाडी येथील जनता शाळेमधील कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची तीस लाखांची रक्कम सरकारकडे जमा न करता परस्पर अपहार केल्याप्रकरणी शाळेच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेचे विश्वस्त अँथोनी जॉन रणनवरे (रा. कस्तुरबा सोसायटी, विश्रांतवाडी) यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी भविष्यनिर्वाह निधीच्या प्रवर्तन अधिकारी रुबी उज्ज्वल घोष (वय ४२, रा. गोळीबार मैदान) यांनी विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
जनता शाळा ही विद्या विकास संस्थेच्या अंतर्गत असून आरोपी अंथोनी रणनवरे हे विश्वस्त आहेत. सदर शाळेची भविष्य निर्वाह निधी कार्यालयात नोंद झालेली आहे. मार्च २००० ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पीएफची २९ लाख ९७ हजार ७३६ रुपयांची रक्कम भरली गेली नसल्याने कार्यालयाकडून चौकशी चालू होती.
भविष्य निर्वाह निधीचे विभागीय आयुक्त हनुमान प्रसाद यांनी नुकतीच शाळेच्या निधीची चौकशी पूर्ण केली. त्यात शाळेच्या विश्वस्तांनी तीस लाखांचा निधी कार्यालयात जमा न केल्याचे निष्पन्न झाल्याने रणनवरे यांना तीस लाख रुपये भरावेत, अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी निधीची रक्कम कार्यालयात भरणे आवश्यक होते. मात्र, रणनवरे यांनी सदर रक्कम भरली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीवरही मारहाणीचा गुन्हा
काही दिवसांपूर्वीच संस्थेचे संस्थाचालक, विश्वस्त अँथोनी रणनवरे यांची मुलगी स्वप्ना हिने गेस्ट लेक्चरर आणि महाराष्ट्र शिक्षक शिक्षकेतर सेनेचे पुणे शहर सचिव गणेश पाटील यांना चपलेने मारहाण केली होती. त्यामुळे विश्रांतवाडी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ताजी असतानाच मुलीपाठोपाठ वडील अँथोनी रणनवरे यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात शाळेची जोरदार चर्चा चालू आहे. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​मुलीच्या विनयभंगामुळे गावकऱ्यांनी पाळला बंद

$
0
0

दौंड : यवत येथे अल्पवयीन मुलीचा तिघा तरुणांनी विनयभंग केल्यामुळे गावकऱ्यांनी एकीचे दर्शन घडवत उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. या बंदमुळे गावातील सर्व व्यवहार काही काळ ठप्प झाले. दुपारपर्यंत स्थिती पूर्वपदावर आली. या घटनेतील तीन आरोपींपैकी दोन आरोपींना यवत पोलिसांनी अटक केली असून मुख्य अरोपी या घटनेनंतर फरारी झाला आहे.
छेडछाडीची घटना गेल्या सोमवारी (दि. २६) दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी अल्पवयीन मुलीस रस्त्यात अडवून, शिवीगाळ करून छेडछाड केली. त्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले. त्या मुलीने घडलेली घटना पालकांना सांगितली. मंगळवारी या तीन तरुणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. या घटनेची माहिती यवत गावात समजल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त झाला. या प्रकरणी यवत पोलिसांनी अरोपी शाहरुख महंमद शेख, ओंकार सोमनाथ सावंत (वय १८), अक्षय धोंडीबा पवार (वय १९, रा. यवत, ता. दौंड) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार सावंत व अक्षय पवार या दोघांना यवत पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी शाहरुख शेख फरारी झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार अप्पासाहेब मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​स्टेशनवर लागणार प्राण्यांची चित्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या काही वर्षांत पुण्याची ‘आयटी हब’ अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र, त्याबरोबरच पुण्यात जैववैविध्यही असून, पुण्याची ही ओळखदेखील लोकांना कळावी यासाठी पुणे स्टेशनवर विविध प्राणीमात्रांची चित्रे साकारली जाणार आहेत. रेल्वेचा पुणे विभाग व वनविभागाच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे काम सुरू होणार आहे.
पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक व सहा या ठिकाणी चित्ता, बिबट्या, काळवीट, वाघ, शेकरू आदी प्राण्यांची चित्रे साकारली जाणार आहेत. वनविभागाचे कलाकार व काही खासगी संस्थांच्या मदतीने ही चित्रे काढली जातील. वनविभागाकडून या उपक्रमासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापकीय संचालक बी. के. दादाभॉय व मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी रेल्वे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राजस्थानातील सवाई माधवपूर व भरतपूर रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पुणे रेल्वे स्टेशनवर हा उपक्रम करण्याचा निर्णय घेतला. पुणे वनविभागात मयुरेश्वर अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य, रेहकुरी व नान्नज अभयारण्याचा समावेश आहे. या अभयारण्यातील वन्यजीवांचे माहितीफलक साकारले जाणार आहेत. पुणे स्टेशनवर दररोज एक लाखाच्या सुमारास प्रवासी ये-जा करतात. त्या प्रवाशांना स्टेशनवर दाखल होताच पुण्याच्या जैवविविधतेची माहिती याद्वारे मिळेल, असे लिमये यांनी सांगितले. येथील जैवविविधतेविषयी प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी पुणे रेल्वे विभाग यापुढे सतत उपक्रम घेणार आहे. नोव्हेंबरपर्यंत ही चित्र काढून होतील. दरम्यानच्या काळात स्टेशनवरील सर्व पुलांच्या पायऱ्यांवरदेखील चित्रे काढण्यात येतील का, याचाही विचार केला जाणार आहे. तसेच, हा प्रकल्प पूर्ण झाला की स्टेशनवर वाइल्ड लाइफविषयी चित्रप्रदर्शनही भरविण्यात येणार असल्याचे दादाभॉय यांनी सांगितले.

माहितीफलक लावणार
प्रवासी पुणे स्टेशनवर दाखल झाल्यानंतर शहरातील विविध ठिकाणांची माहिती देण्यासाठी फलक लावण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. त्याद्वारे स्टेशनवरून इच्छितस्थळी जाण्याबाबतचे मार्गदर्शन नवीन प्रवाशांना मिळेल, असे बी. के. दादाभॉय यांनी सांगितले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेब्रुवारीमध्ये ‘गेट’ परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या देशातील नामांकित कॉलेजांमध्ये विज्ञान आणि इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर, पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्तीर्ण करणे आवश्यक असणारी ‘ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग’ परीक्षा (गेट) ४, ५, ११ आणि १२ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी येत्या ४ ऑक्टोबरपर्यत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे.
आयआयटी रुरकीच्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. इंजिनीअरिंग, बी-टेक व आर्किटेक्चरची पदवी असणारे विद्यार्थी, विज्ञान विषयात चार आणि पाच वर्षीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी, पाच वर्षीय बीएससी-एमएससी असा एकात्मिक अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पात्र ठरणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी www.gate.iitr.ernet.in या वेबसाइटद्वारे ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरायचा आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल तीन वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थिनींसाठी आणि एससी, एसटी, अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७५० रुपये शुल्क तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १,५०० रुपये शुल्क आणि कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहेत. ४, ५, ११ आणि १२ फेब्रुवारी २०१७ रोजी देशात आणि आशियातील ठरावीक देशांमध्ये विविध केंद्रांवर होणार परीक्षा होणार आहे. दरम्यान, देशातील मोठ्या केंद्रीय सरकारी संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी गेटच्या गुणवत्तेनुसार भरण्यात येतात. त्यामुळे या परीक्षेला विशेष महत्त्व आहे.
...........
भारताबाहेरही परीक्षा केंद्रे
‘गेट’ परीक्षेसाठी आशिया खंडातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे ‘गेट’च्या प्रशासनाद्वारे बांगलादेश, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती (युएई), श्रीलंका, नेपाळ आणि सिंगापूर या देशातही परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय राऊत यांच्या हकालपट्टीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील आक्षेपार्ह व्यंगचित्राबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पुण्यात बैठक घेऊन तीव्र नाराजी नोंदविली आणि ‘सामना’चे संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे विश्वसनीय गोटातून सांगण्यात आले.
कोपर्डी येथील अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभरात मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रत्येक शहरांत प्रचंड मोर्चे काढण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्याने नवे वादळ निर्माण झाले आहे. याबाबत बुधवारी पुण्यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते त्याला उपस्थित होते. ‘सामना’मधील व्यंगचित्राबाबतची मांडण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची चर्चा बैठकीत झाली.
आक्षेपार्ह व्यंगचित्रामुळे निर्माण झालेल्या नाराजीचा सामना शिवसेनेला करावा लागू शकेल, अशी भीती व्यक्त करून हे टाळण्यासाठी राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यासाठी ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतरही कारवाई न झाल्यास पुन्हा बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, अशीही चर्चा या वेळी झाली. या बैठकीत अनेक ज्येष्ठ नेत्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. ‘मराठा समाजाच्या मूक मोर्चांमध्ये भगव्या झेंड्याचेच सबलीकरण होत आहे आणि अनेक वर्षे भगव्या झेंड्याचा सन्मान करणाऱ्या शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र, असा फायदा होऊ नये, यासाठीच जाणीवपूर्वक खेळी करण्यात आली,’ असा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यामागे आहेत काय, अशीही शंका यावेळी व्यक्त झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट’ चव्हाण यांचा पालिकेतर्फे सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सर्वाधिक कल्पना देणाऱ्या गणेश चव्हाण या तरुणाचा महापौर प्रशांत जगताप यांनी बुधवारी सत्कार केला. महापालिकेने तयार केलेले ‘कॉफी टेबल’ बुक त्याचा सत्कार करण्यात आला. महापौरांचा सत्कार स्वीकारला असला तरी, पालिकेचे बक्षीस स्वीकारणार नसल्याचे चव्हाण म्हणाले.
स्मार्ट प्रकल्पांतर्गत महापालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांकडून कल्पना मागविल्या होत्या. यामध्ये चव्हाण यांनी सर्वाधिक कल्पना सुचविल्या होत्या. मात्र, अनेक महिने उलटूनही प्रशासनाने चव्हाण यांना बक्षीस देण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांनी चव्हाण यांना बोलावून कडक शब्दात सुनावून बक्षीस देण्याची तयारी केली होती. परंतु, चव्हाण यांनी बक्षीस नाकारले. या पार्श्वभूमीवर महापौरांनी चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. स्मार्ट सिटीसाठी सर्वाधिक कल्पना देणाऱ्या तरुणाला ब‌क्षीस न देता पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या वागणुकीचा शहरातील स्वयंसेवी संस्थांनी निषेध केला. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे, पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठी, नागरी चेतना मंचाचे डॉ. अनुपम सराफ, नागरी हक्क समितीचे काका कुलकर्णी, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, याबरोबरच ‘परिसर’चे सुजीत पटवर्धन, पादचारी प्रथमचे प्रशांत इनामदार यांनी प्रशासनाचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी दर्जा नाही

$
0
0

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची स्पष्टोक्ती

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणे शक्य नाही,’ असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी (२८ सप्टेंबर) स्पष्ट केले. तसेच, संघटनांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी कामगारांना केले. या वेळी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर, सीआयआरटी प्रमुख आशिष मिश्रा, एसटीच्या मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्राचे उपमहाव्यस्थापक बी. एम. जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, आयडीटीआरचे प्रमुख के. माधवराज आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दर्जा मिळून त्यांनाही सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळ आणि कामगार संघटनांमध्ये बोलणी सुरू होती. त्याला पूर्णविराम देऊन रावते यांनी हे शक्य नसल्याची घोषणा केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना यासाठी प्रयत्न करीत होते. रावते यांनी थेट हे शक्य नसल्याचे सांगितल्याने कामगारांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. यातून संघटना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विविध कारणांनी सध्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या १७ हजार कामगारांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून झालेल्या चुकांसाठी पाच पगारवाढ कापून त्यांना सेवेत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसच्या सुरक्षेबाबत परिवहन मंडल दक्षता घेत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असल्याने याबाबत शिक्षणखात्याने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचेही रावते यांनी सांगितले.

एसटीचे कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा का नाही, आम्हीही राज्य सरकारच्या अन्य विभागांप्रमाणेच काम करतो. ज्या विभागांकडून सरकारला काहीही उत्पन्न मिळत नाही; त्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आहे. मात्र, आम्ही सरकारला महसूल देतो तरीही आम्हाला दर्जा मिळत नाही.
संदीप शिंदे, एसटी कामगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागातही एसी एसटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

सर्वसामान्यांनाही वातानुकूलित बसमधून (एसी) फिरण्याचा आनंद घेता यावा तसेच शेतमालाची वाहतूक करता यावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) आगामी काळात ५०० वातानुकूलित बसची खरेदी करणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी (२८ सप्टेंबर) यांनी केली. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भोसरी येथील आयआरटी केंद्रात राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एसटी चालकांचे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्‌घाटन रावते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘एसटी महामंडळ कधीही बंद पडणार नाही; उलट ते काळानुसार बदलत आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे महामंडळ आगामी काळात ५०० वातानुकूलित बस खरेदी करणार आहे. या बस शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही धावतील,’ अशी घोषणा त्यांनी केली. या एसी बसच्या निविदांचे काम येत्या चार-पाच दिवसात पूर्ण होईल असेही ते म्हणाले.
‘एसटी चालकांसाठी लवकरच नाशिक, पालघर, गडचिरोली, पांढरकवडा या ठिकाणी अद्ययावत मोफत प्रशिक्षण केंद्र उभे केले जाणार आहेत. प्रत्येक केंद्रातून ५ हजार चालकांना प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच लवकरच ऑटोमोबाइल अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे महाविद्यालयही उभारण्याचा मानस आहे. ज्यामध्ये एसटी कर्मच्याऱ्यांच्या मुलांना २५ टक्के जागा राखीव असतील,’ असेही रावते यांनी नमूद केले.
..
कर्मचाऱ्यांसाठी अद्यायावत हॉस्पिटल
एसटी कर्मच्याऱ्यांसाठी सर्वसोयींनी युक्त हॉस्पिटल पुण्यात उभारणार असल्याचीही घोषणा रावते यांनी केली. तसेच, कर्मचाऱ्यांना येणारा ताण हा अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्यतेमुळे असल्याची टीकाही त्यांनी केली.
-----------
सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही एसी बसचा फायदा होणार असून, शेतीमाल वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. या बसमधून प्रवास करण्यासाठी तिकिटांचा दर सामान्यांना परवडेल असाच हील.
दिवाकर रावते, परिवहनमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ कारखान्यांकडे १७७ कोटी थकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यात राज्यातील बहुतांश साखर कारखान्याना यश आले आहे. मात्र, अद्याप ४२ कारखान्यांकडे सुमारे १७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
या गळीत हंगामातील ‘एफआरपी’ची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून सतत पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे बहुतांश कारखान्यांनी ‘एफआरपी’ दिली आहे. सुमारे १६ हजार ४७१ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देय होती. त्यापैकी १६ हजार ३२४ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देण्यात आली असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. ‘एफआरपी’ न देणाऱ्यांमध्ये ४२ कारखाने आहेत. त्यांच्याकडे सुमारे १७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम येत्या १५ दिवसांत देण्याचे आदेश साखर आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले आहेत. आगामी कारवाई टाळण्यासाठी साखर कारखान्यांनी ही रक्कम देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, सरकारने ‘एफआरपी’चा ८० : २०चा फॉर्म्युला ठरवला आहे. त्यानुसार ‘एफआरपी’ देणे आवश्यक असतानाही, अनेक कारखान्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे साखर आयुक्तांनी कारवाईही केली होती. काही कारखान्यांविरूद्ध परवाने रद्द करण्याची कारवाई झाली. त्यामध्ये भोरमधील राजगड सहकारी साखर कारखाना, परभणीतील महाराष्ट्र शेतकरी कारखाना आणि यवतमाळमधील वसंत पुसद कारखाना यांचा समावेश होता. दोन कारखान्यांचे परवाने निलंबित केले होते. त्यामध्ये कोल्हापूरमधील गुरुदत्त शुगर्स आणि सोलापूरमधील सीताराम महाराज साखर कारखाना हे कारखाने होते.
सोलापूरमधील श्री शंकर सहकारी साखर कारखाना, औरंगाबादमधील सिद्धेश्वर साखर कारखाना, सांगलीतील यशवंत खानापूर कारखाना आणि माणगंगा सहकारी साखर कारखाना यांच्याविरूद्ध जप्तीची कारवाई केली होती. त्यामुळे यावर्षी ‘एफआरपी’ची थकबाकी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आडत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

$
0
0

पुणे : मार्केट यार्डाच्या आवारात दरवर्षी रस्ता, वाहतूक कोंडी, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग यासारख्या सेवा समाधानकारक मिळत नाहीत. सेसच्या रूपाने बाजार समिती पैसेही घेते. तरीही आम्हाला काहीच सुविधा मिळत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारींचा पाढा शेतकरी, आडतदार, व्यापारी, तसेच कामगारांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुढे वाचला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध घटकांनी प्रश्न उपस्थित केले. समितीचा कारभार पारदर्शी असून, लवकरच सर्व प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी दिले. सभेत गेल्या वर्षातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला. या वेळी उपसभापती भूषण तुपे, सचिव पी. एल. खंडागळे उपस्थित होते.
किराणा भुसार मालाच्या बाजारातील रस्ते, स्वच्छता, सुरक्षितता या प्रश्नांकडे वेळोवेळी प्रशासनाचे लध वेधण्यात आले. तरीही कार्यवाही केली जात नाही, अशी खंत पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी व्यक्त केली. बाजार आवारात स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांनी बाजार आवारातील गाळ्यांचा पुर्नविकास करण्यापूर्वी आडत्यांना विश्वासात घ्या, अशी मागणी केली. रस्त्यातील खड्ड्यांसंदर्भात सांगितले तर अधिकारी वेगळाच सल्ला देत असल्याचे टेम्पो पंचायतीचे संतोष नांगरे म्हणाले. प्रत्येक टेम्पो चालकाकडून १५०० रुपये शुल्क बाजार समिती घेते. परंतु, पार्किंगची सुविधा, स्वच्छतागृहांची अपुरी संख्या आहेत, अशी तक्रार त्यांनी केली.
‘व्यापारी सेस रूपाने पैसे देतो, पण त्याला समितीकडून काहीच मिळत नाही. पिंपरी येथे रस्त्यावरील फूल बाजारातील व्यापाऱ्यांकडून सेस वसूल केला जातो,’ असे माजी खासदार गजानन बाबर म्हणाले. बाजारात असलेल्या अनधिकृत संघटनांची चौकशी करून बोगस परवाने रद्द करावेत, अशी मागणी अप्पा गायकवाड यांनी केली. फूल बाजारातील अनधिकृत व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी एम. चौधरी यांनी केली. विलास भुजबळ, राजेंद्र चोरघे, विनायक वाघोले, दादा तुपे यांनीही विविध मुद्दे मांडले.
..
बाजार समितीचा खर्च वाढला
वार्षिक सर्वसाधारण सभेत २०१५-१६ या वर्षाचा आर्थिक ताळेबंद मांडण्यात आला. गेल्या वर्षी ५६ कोटी १२ लाख ९२ हजार ९९० रुपयांचे उत्पन्न समितीला मिळाले. विविध कारणांसाठी ३२ कोटी २२हजार ३६२ रुपयांचा खर्च झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सहा कोटी १० लाख ८७ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाच लाखांचा दंड अधिकाऱ्यांनी भरावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील गोयल गंगा ग्रुपकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) या प्रकरणी पालिकेला केलेला पाच लाख रुपयांचा दंड संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीने केली आहे.
मंजूर परवानगीपेक्षा अधिक बांधकाम केल्याचा ठपका ठेवून ‘एनजीटी’ने गोयल गंगा ग्रुपला १०५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बांधकामाला परवानगी देताना महापालिकेतील अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने महापालिकेला दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे ही रक्कम पालिकेच्या किंवा इतर सार्वजनिक प्राधिकरणाच्या निधीतून न देता संबधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, महापालिकेतील अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील संबंध उघड करणारे आहे. पुणे परिसरात १५०पेक्षा जास्त बांधकामे पर्यावरण विषयक नियमांची पायमल्ली करून सुरू आहेत. पालिकेतील अधिकारी या बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर तातडीने आणि गंभीर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी समितीचे विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतमाल हमीभावाबाबत शरद पवार गप्प का?’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,पुणे

‘शेतमालाला हमीभाव देण्याच्या प्रश्नासंदर्भात शरद पवार गप्प का आहेत,’ असा सवाल राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केला आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारकडे वारंवार मागणी करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस याची साधी दखलही घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

‘शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा आणि कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी येत्या दोन ऑक्टोबरपासून सात दिवसांचे उपोषण कऱण्यात येणार आहे. मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उषोपण करण्यात येणार आहे. राज्यातील हमाल मापाडी मंडळाच्या वीस केंद्रांवरही एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे,’ असे डॉ. आढाव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या वेळी नितीन पवार, संतोष नांगरे उपस्थित होते.

‘शेतकऱ्यांची हतबलता दूर करावी, फळभाज्या नियमनमुक्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढीचा धोका आहे. कांद्याला पाच पैसे दर मिळत असल्याचे प्रसारमाध्यमे प्रसिद्ध करतात; पण यामुळे साध्य काय होते? शेतकऱ्यांना घरी परत जायलाही पैसे उरत नाहीत. बाजार समिती तसेच आडते देखील काही देत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने बाजार समितीच्या माध्यमातून हमीफंडाची तरतूद करावी,’ अशी मागणीही डॉ. आढाव यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या उपोषण आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी तसेच शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनीही पाठिंबा दिला आहे. उपोषणस्थळी ते भेट देणार आहेत. आंदोलनाची दखल घेऊन सात दिवसांत सरकारने प्रश्न सोडविला तर ठीक; अन्यथा उपोषण आणखी कडक करण्याचा इशाराही डॉ. आढाव यांनी दिला.

‘पवार-फडणवीसांकडून दिशाभूल’

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्याला शरद पवार पाठिंबा देत आहेत. परंतु, आरक्षणाच्या मुद्याने प्रश्न सुटणार की वाढणार या विषयी ते दिशाभूल करीत आहेत. मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मुद्यावर फडणवीसही बोलतात. मात्र, त्याचवेळी शेतमालाला हमीभावाबद्दल ते साधा उल्लेखही ते करीत नाहीत, असेही डॉ. आढाव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरच्या जमिनींची चांदी

$
0
0

भाव वधारण्यास सुरुवात; विमानतळामुळे पायाभूत सुविधाही विस्तारणार

Mustafa.Attar@timesgroup.com
Tweet: mustafaattarMT

पुणे : वर्षानुवर्षे दुष्काळामुळे फारसे आर्थिक उत्पन्न नसलेल्या पुरंदर तालुक्यातील भागातील जमिनींना आता ‘भाव’ फुटायला सुरुवात झाली आहे. विमानतळाच्या प्रस्तावामुळे या भागात रस्ते, वीज, दळणवळणाची साधने, पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळणार आहे.
काही वर्षांपूर्वी चाकण, खेड येथे विमानतळ होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्या संदर्भात विविध जागांची चाचपणी करण्यात आली होती. काही ठिकाणांना एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (एआयआय) पथकाने पसंतीही दर्शविली होती. त्यामुळे बड्या कंपन्यांनी येथे उद्योगधंदे उभारले. कंपन्या स्थिरावल्याने रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाची साधने उपलब्ध झाली आणि जागांचा भाव गगनाला भिडला. जागांचे भाव वाढले तरी, विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे ‘एआयआय’च्या पथकाने पुरंदरकडे मोर्चा वळविला. तालुक्यातील वाघापूर, राजेवाडी, पारगाव मेमाणे या भागातील जमिनींची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरमध्ये विमानतळ होणार असल्याचे जाहीर करून टाकल्याने शेतकऱ्यांसह नागरिकामध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
‘पुरंदर तालुका दुष्काळी पट्टा समजला जातो. तालुक्यात गायरान जमिनीचे प्रमाण अधिक आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून फळबागा जगविल्या आहेत. परंतु, दुष्काळामुळे जमीन असूनही उत्पादन नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत नाही. विमानतळ होणार असल्याने तालुक्यातील जमीन देण्यास शेतकऱ्यांची तयारी आहे. जमिनीच्या बदल्यात आर्थिक मोबादला मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. या आशेने जमिनीला भाव फुटायला सुरुवात झाली आहे,’ अशी माहिती तालुक्यातील जाणकारांनी दिली.
‘आमच्या जमिनी नापीक, माळरान स्वरूपाच्या आहेत. त्यात काहीच पिकत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेता येत नाही. त्यामुळे जमीन मोकळीच पडून असते. विमानतळ होणार असल्याने आमच्यासारख्या जमिनीतून शेतकऱ्यांना पैसे मिळतील. त्यामुळे तालुक्यात विमानतळ व्हायला हवा,’ अशी अपेक्षा मालन कुंजीर या स्थानिक महिलेने व्यक्त केली.
..
रेल्वे वाहतुकीचीही संधी
पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याने त्याचा फायदा नजीकच्या तालुक्यातील प्रवाशांना होण्याची शक्यता आहे. बारामती, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कोकणातील प्रवाशांना हे विमानतळ सोयीचे ठरणार आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही. शिवाय कोल्हापूरहून थेट पुण्याकडे रेल्वेची सुविधा आहे. राजेवाडी येथे रेल्वेचे स्टेशन आहे. राजेवाडी येथे रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यामुळे पश्चिम महाराष्ट्राशी ‘कनेक्टिव्हिटी₨ वाढणार असल्याने त्यामुळे पूरक व्यवसायांच्या वाढीला संधी मिळणार आहे, अशी आशा ग्रामस्थांना आहे.
..
‘मेडिकल' टुरिझम’ वाढणार?
पुण्यात लोहगाव येथे विमानतळ आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या कमी असल्याने परदेशी पेशंटना पुण्यात येण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक जण दिल्ली, चेन्नई, कोलकाता तसेच मुंबईच्या हॉस्पिटलकडे रवाना होतात. पुण्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा आहेत. पुरंदर तालुका हा पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असल्याने त्यामुळे मेडिकल टुरिझम वाढण्यास फायदा होऊ शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते‍.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे मार्गावर ट्रक पेटला; वाहतूक मंदावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । पुणे

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्यानजीक अमृतांजन पुलाजवळ आज सकाळी एका ट्रकने पेट घेतला. यामुळं मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. दरम्यान, ट्रकला लागलेली आग विझवण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्यानजीक अमृतांजन पुलाजवळ ट्रकला भीषण आग लागली. याबाबत माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस आणि आयआरबीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या अपघातामुळं मार्गावरील वाहतूक मंदगतीनं सुरू आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images