Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वेळेचे नियोजन करा

$
0
0

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 'एमपीएससी'चे परीक्षार्थींना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात येत्या रविवारी (२५ सप्टेंबर) आयोजित मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी वेळेचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे आवाहन लोकसेवा आयोगाने केले आहे. मोर्चासोबतच उमेदवारांनी पावसाच्या संभाव्य शक्यतेचाही विचार करावा असे आयोगाकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आले.
आयोगाच्या नियोजनानुसार २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान राज्य सेवेची मुख्य परीक्षा होणार आहे. त्यासाठी पुण्यात परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठा मोर्चासाठी होणारी मोठी गर्दी, त्यासाठी पोलिसांच्या पातळीवरून सुरू असलेले नियोजन आणि मोर्चाचा मार्ग विचारात घेता, शहरात मध्यवस्तीत परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. मोरे यांनी 'मटा'ला दिली.
परीक्षार्थी उमेदवारांनी पावसाची शक्यता आणि मोर्चामुळे होणारी संभाव्य गर्दी या दोन्ही बाबींचा विचार करून, परीक्षेला येण्याचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. मोरे यांनी केले. डॉ. मोरे म्हणाले, 'आयोगाचे परीक्षेचे नियोजन ऐनवेळी बदलणे शक्य नाही. तसेच, मराठा मोर्चाचा आतापर्यंतचा प्रवास पाहता, ते शांततेने निघत असल्याने परीक्षार्थींना त्रास होण्याची शक्यता दिसत नाही. उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या ठिकाणांची पुरेशी कल्पना असल्याने, त्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी साधारण तासभर केंद्रावर पोहोचता येईल, या अंदाजाने आपले नियोजन करावे. त्यातून कोणत्याही ताणाविना त्यांना परीक्षा देणे शक्य होईल.'
000
गैरप्रकार रोखण्यासाठी पथक
कर सहायक परीक्षेतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी 'एमपीएससी'ने गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केल्याचेही डॉ. मोरे यांनी सांगितले. आयोगाच्या मुख्यालयातून पुणे, औरंगाबाद आणि नागपूरमधील परीक्षा केंद्रांवर निरीक्षक पाठविले जाणार आहेत. तसेच, स्थानिक जिल्हा प्रशासनालाही परीक्षेमधील गैरप्रकार रोखण्यासंबंधी योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे डॉ. मोरे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साठ लाखांची फसवणूक

$
0
0

ठकसेनांनी घातला हैदराबादच्या चौघा पालकांना गंडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने हैदराबाद येथील चार व्यक्तींची साठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामकृष्ण सूर्याराव ईलापोल्लू (वय ४९, रा. निजामपेठ हैदराबाद) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून रोहित उर्फ कबीर संजय शर्मा आणि सुरेश सिंग यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्ण हैदराबादमध्ये वाहन वितरक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी तिने 'नीट'ची परीक्षा दिली होती. त्यानंतर रामकृष्ण यांच्या मोबाइलवर मेसेज आला. महाराष्ट्रातील नामांकित कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून दिला जाईल, अधिक माहितीसाठी रोहितशी संपर्क साधा, असे मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. मेसेच पाठविणाऱ्याशी संपर्क केल्यानंतर भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यात येईल. चार वर्षांसाठी ६५ लाख रुपये शुल्क असून, अगोदर वीस लाख रुपये डोनेशन म्हणून द्यावे लागेल, असे रोहित नावाच्या व्यक्तीने सांगितले.
रामकृष्ण यांचे मित्र प्रसाद यांच्या मुलीलाही मेडिकलला प्रवेश हवा होता. रामकृष्ण यांनी माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांनीही मुलीसाठी प्रवेश घेण्याची तयारी दर्शवली. १४ सप्टेंबरला रामकृष्ण, त्यांची पत्नी, मुलगी पुण्यात आले. आरोपीला विमानतळ परिसरात भेटले. आरोपीने त्यांना कॉलेज दाखविले. त्यानंतर रामकृष्ण यांचे मित्र प्रसादही आले. त्यांनी भारती विद्यापीठाच्या नावाने वीस लाखांचे दोन डिमांड ड्राफ्ट काढले आणि आरोपीच्या हाती ठेवले. त्यानंतर १९ सप्टेंबरला कागदपत्रे घेऊन दोघेजण परत आले आणि आरोपीने विमानतळ परिसरात दाखविलेल्या ऑफिसमध्ये गेले. त्यावेळी तेथे ऑफिस नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच दरम्यान, हैदराबाद येथील मंडला रवी आणि एम. धर्माराजीराव यांच्याकडूनही त्यांच्या मुलांना प्रवेश देण्याच्या आमिषाने पैसे उकळल्याचे समोर आले. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..
दोन दिवसांसाठी ऑफिस भाड्याने
एमबीएसला प्रवेश देतो म्हणून हैदराबाद येथून चार व्यक्तींना आरोपीने बोलवून घेतले होते. त्यांना दाखविण्यासाठी त्याने इमिनन्स आयटी पार्क, स्काय व्हिस्टा इमारत येथील ऑ​फिस दोन दिवसांसाठी भाड्याने घेतले होते. ऑफिस भाड्याने घेताना आरोपींनी ड्रायव्हिंग लायसन्स दिले असून, त्यावर कबीर संजय शर्मा असे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्यांच्या अधिकारावर घाला

$
0
0

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
Tweet : @shrikrishnaMT

पुणे : राज्यातील अथवा केंद्रातील मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारींना बहुतांश वेळा पोलिसांकडून केराची टोपली दाखविण्यात येते. त्यावेळी सामान्यांना न्याय मिळविण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) मदतीने कोर्टात खासगी खटला दाखल करण्याची मुभा होती. मात्र, आता राज्य सरकारने 'सीआरपीसी'च्या कलम १५६(३) आणि कलम १९०मध्ये सुधारणा करून नागरिकांचा हा अधिकारच काढून घेतला आहे. त्यामुळे मंत्री आणि लोकसेवकांच्या चौकशीचे आदेश देण्यापूर्वी दंडाधिकाऱ्यांना आता सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी लागणार आहे.

मंत्रिमहोदय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पिळवणूक झाल्यास सामान्य व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याचा अधिकार देण्यात आला होता. आपल्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी आतापर्यंतचा तो सर्वोत्तम पर्याय होता. मात्र, मंत्री आणि व​रिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाने तक्रारी दाबण्यात येत होत्या. अशा वेळी सर्वसामान्य व्यक्तीसमोर 'सीआरपीसी'नुसार कोर्टात खासगी फौजदारी खटला दाखल करण्याचा एकमेव पर्याय होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी 'सीआरपीसी'च्या कलम १९०नुसार अशा तक्रारींची दखल घेऊन खटला दाखल करून घेत होते. तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास कलम १५६(३)नुसार संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात येत होते. राज्यात याच कायद्याच्या आधारे काही मंत्री, तसेच अधिकाऱ्यांविरोधात गैरवर्तणूक, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत विविध प्रकारचे खटले दाखल करण्यात आले होते. मात्र, अशाप्रकारच्या तक्रारींमुळे सरकारी कामांत अडथळा येत असल्याचे कारण दाखवून सरकारने दोन कलमांमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. या बाबतचा अध्यादेश ३० ऑगस्टला काढण्यात आला आहे. मंत्री आणि लोकसेवकांविरोधात अशापद्धतीने तक्रार दाखल झाल्यास त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यापूर्वी न्यायदंडाधिकाऱ्यांना आता संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वसंमती घ्यावी लागणार आहे. भ्रष्ट मंत्री, आमदार, नोकरशहा, इतकेच नव्हे तर नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या गैरव्यवहारांबाबत दाद मागतानाही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने त्याच्याकडे परवानगीसाठी आलेल्या अर्जांना ९० दिवसांमध्ये संमती न दिल्यास ती मिळाल्याचे समजले जाईल, असेही अध्यादेशात म्हटले आहे.

कोर्टाचे अधिकार हिरावण्याचा प्रयत्न

राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून सर्व अधिकार स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. मंत्री, नोकरशहांच्या विरोधात दाद न मिळाल्यास सामान्य व्यक्ती 'सीआरपीसी'च्या कलम १५६ आणि १९० नुसार कोर्टात दाद मागू शकत होता. मात्र, सरकारने कलमांमध्येच बदल करून कोर्टाचा अधिकारही हिरावला आहे. त्यामुळे सामान्य माणसाने कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात दाद मागावी लागेल. सर्वसामान्यांवरील अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी याच एकमेव कायद्याचा आधार होता. त्यामुळे नागरिकांनी जागृत होण्याची गरज आहे.
- विजय कुंभार, सुराज्य संघर्ष समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पितृपंधरवड्यामुळे गवार, भेंडी महाग

$
0
0

अन्य भाज्या स्वस्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पितृपंधरवड्यामुळे या वर्षी गवार, भेंडी वगळता अन्य फळभाज्यांचे भाव घसरले आहेत. आवक कमी झाल्याने गवार, भेंडीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे.
मार्केट यार्डातील फळभाज्या विभागात गेल्या दोन आठवड्यांपासून शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे बहुतांश भाज्या स्वस्त झाल्या आहेत. मेथी, कोथिंबीरची आवक अधिक प्रमाणात होत असल्याने त्याला किरकोळ भाव मिळत होता. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने अनेक दिवसांपासून कोथिंबीर, मेथी फेकून देण्याची वेळ आली. दर वर्षी पितृपंधरवड्यामुळे शेतमालाचे दर गगनाला भिडलेले दिसतात. परंतु, या वर्षी भेंडी, गवारच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. बाजारात भेंडीच्या दहा किलोला १५० ते २५० रुपये, तर गवारला ३०० ते ४०० रुपये दर मिळाला आहे. कारली ८० ते १०० रुपये, मेथी आणि कोथिंबीरचे प्रत्येकी ४०० ते ६०० रुपये दर मिळाले आहेत. भाज्यांची आवक अधिक असल्याने भाज्यांचे दर आवाक्यात आहेत, अशी माहिती विलास भुजबळ यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पालेभाज्यांना चांगला दर मिळत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बाजारात गवारची आवक घटली असून त्या तुलनेत अन्य भाज्यांची आवक चांगली झाली आहे. भेंडीच्या एका किलोसाठी किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये, गवार ७० ते ८० रुपये दर आहे. कारली ३० ते ४० रुपये, कोथिंबीरच्या एका गड्डीला ५ ते १० रुपये आणि मेथीच्या १२ ते १५ रुपये दर मिळत आहे, असे किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंदना चव्हाणांची गोगावलेंवर टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली नागरी सुधारणेची कामे सर्व जनता ओळखून असल्याने सवंग विधाने करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम थांबवावे. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षबदल करणाऱ्यांनी इतरांवर चिखलफेक करू नये,' असा टोमणा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी बुधवारी भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना लगावला.
अजित पवार पराभवाच्या भीतीने हतबल झाल्याची टीका गोगावले यांनी केली होती. त्याला उत्तर देताना, चव्हाण यांनी गोगावले यांच्यावर ते स्वार्थी असल्याचा आरोप केला. स्वतःच्या पक्षामध्ये सदैव बहिष्कृत असल्याने पक्ष सोडून बाहेर पडलेल्यांनी आधी स्वतःच्या पक्षबांधणीकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 'विरोधात असताना, एकही विधायक काम सुचविण्यात किंवा सुधारणा घडविण्यात भाजपने कधीही साथ दिलेली नाही. तरीही, भाजपचे अध्यक्ष खोटारडा प्रचार करीत असून, जबाबदार राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने अशी हीन पातळीवरील टीका करू नये,' असेही चव्हाण यांनी गोगावले यांना सुनावले. पुणेच नाही, तर पिंपरी-चिंचवड मधील विकास अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेत पुण्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला, तो राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कामाची पावतीच आहे, याचा पुनरूच्चारही चव्हाण यांनी केला.
दरम्यान, चव्हाण यांच्यासह 'दादा ग्रुप'चे जितेंद्र टकले यांनीही गोगावले यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गोगावले यांच्या पक्षविरोधी कारवाया भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना चांगल्याच माहीत असून, भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास गोगावले २०१९च्या निवडणुकीत अजितदादांचे सल्लागार असतील, असा दावा टकले यांनी केला आहे. माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनीही टकले यांनी काढलेल्या निवेदनाला पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ एजंटांची पत्रकाराला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वार्तांकनासाठी गेलेले दैनिक पुढारीचे बातमीदार लक्ष्मण खोत आणि छायाचित्रकार यश कांबळे यांना दोन आरटीओ एजंटांनी मारहाण झाल्याची घटना बुधवारी घडली. तसेच त्यांना शिवीगाळ करून, जीवे मारण्याचीही धमकी दिली.
या प्रकरणी जितू आणि एका अज्ञात एजंटाविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोत, कांबळे बुधवारी दुपारी आरटीओमध्ये वार्तांकनासाठी गेले होते. त्यावेळी कांबळे यांनी आरटीओ परिसरात फोटो काढले. ते पाहून जितू आणि त्याच्या सहकाऱ्याने खोत, कांबळे यांना फोटोविषयी विचारणा करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अन्य एजंटांनी मध्यस्थी करून प्रकार थांबविला. दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाने या घटनेचा निषेध केला असून, दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलीस स्टेशन डायरी झाली ‘ऑनलाइन’

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com
Tweet : @PrashantAherMT

पुणे : पोलिस ठाण्याची दैनंदिन हालचाल टिपणारी आणि कायद्याच्या चौकटीत पोलिस ठाण्याचे अस्तित्व अधोरेखित करणारी 'स्टेशन डायरी' आता ऑनलाइन झाली आहे. लिखित 'स्टेशन डायरी' आता हद्दपार होण्याच्या मार्गावर असून राज्यभरातील बहुतांश पोलिस ठाण्यात ऑनलाइन 'स्टेशन डायरी' सुरू झाली आहे.

देशभरात पोलिस व्यवस्थेमध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी; तसेच गुन्हेगारांचे पाळेमुळे खणून काढण्यासाठी केंद्र सरकारने 'क्राइम-क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम' (सीसीटीएनएस) हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गुन्ह्यांची नोंद (एफआयआर) ऑनलाइन घेण्याचे लक्ष्य होते. राज्यभरातील बहुतांश पोलिस ठाण्यात आता 'एफआयआर' ऑनलाइन घेतली जाते. त्यापाठोपाठ आता 'स्टेशन डायरी' ऑनलाइन झाली आहे, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजीव कुमार सिंघल यांनी दिली.

बुलढाण्याचे तत्कालीन आमदार दिलीप सानंदा यांचे वडील, खासगी सावकार गोकुळचंद सानंदा यांच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल करून घेऊ नका, असा आदेश विलासराव देशमुख यांनी पोलिसांना दिला होता. पोलिसांनी देशमुख यांच्या स्वीय सहायकांकडून आलेल्या आदेशाची नोंद 'स्टेशन डायरी'मध्ये केली होती. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने 'स्टेशन डायरी'चा आधार घेऊन देशमुख यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. लि​खित 'स्टेशन डायरी'चे महत्त्व या घटनेतून स्पष्ट होत असल्याची टिप्पणी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केली. कोर्टात पुरावा म्हणून स्टेशन डायरीचा वापर होतो. आतापर्यंत ऑनलाइन 'स्टेशन डायरी' कोर्टात सादर करायची वेळ आलेली नाही. त्यामुळे बचाव पक्षाकडून या स्टेशन डायरीतील नोंदी, त्यांच्या वेळांबाबत आक्षेप घेण्यात येतील, अशी शक्यता आहे. ऑनलाइन स्टेशन डायरी सुरू झाली तरी अजून लिखित स्टेशन डायरीही वापरली जाते. वीज प्रवाह खंडित होणे, ऑनलाइन नोंदी करताना अडचणी येणे, या कारणांमुळे लिखित डायरी पूर्णपणे बंद झालेली नाही. कोणत्याही मोठ्या घटनेत अथवा तपासात स्टेशन डायरीतील नोंदींना पुरावा म्हणून प्रचंड महत्त्व असते.

स्टेशन डायरीचे महत्त्व

पानशेत धरण फुटून पुणे शहरात पूर आला त्या वेळी बहुतांश मुख्य शहर पाण्याखाली गेले होते. डेक्कन पोलिस ठाण्याच्या छतापर्यंत पाणी होते. पोलिस ठाण्याच्या भींतीवर पूररेषेची नोंद केलेली आहे. पूर आला त्यावेळी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला ठाणे अंमलदार पोलिस ठाण्याच्या छतावर जीव वाचवण्यासाठी धावला होता. या वेळी त्याने आपल्या हातात पोलिस ठाण्यातील एकमेव गोष्ट म्हणजे 'स्टेशन डायरी' नेली होती, अशी आठवण डेक्कन पोलिसांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चाला दलित पँथरचा पाठिंबा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

कोपर्डी बलात्कार व अॅट्रॉसिटीतील बदलाच्या मागण्यांसाठी राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यांत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला दलितांच्या प्रतिमोर्चानं प्रत्युत्तर देण्याची भाषा काही दलित नेते करत असताना दलित पँथरनं मात्र पूर्ण उलटी भूमिका घेतली आहे. येत्या रविवारी पुण्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला दलित पँथरनं पाठिंबा जाहीर केला आहे.

पुण्यात येत्या २५ सप्टेंबरला मराठा क्रांती मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोर्चाच्या तयारीसाठी ठिकठिकाणी बैठकांचे सत्र सुरू आहे.
श्री शारदा-गजानन मंदिरामध्ये नुकतीच याबाबत एक बैठक झाली. मार्केट यार्डातील आडते असोसिएशन, टेम्पो संघटना, तोलणार आणि हमाल यांनीही मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. सर्व व्यापारी मोर्चात सहभागी होणार असल्यामुळं बाजारातील फळे, भाजीपाला, फुल, कांदा, बटाटा, केळी आणि पान विभाग बंद असणार आहेत. दुसरीकडे, दलित पँथरनंही मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळं पुण्यातील मोर्चा ऐतिहासिक ठरण्याची चिन्हं आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करभरणा कार्यालये वीकेंडलाही सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

थकबाकी व पहिल्या सहामाहीच्या मिळकतकराची रक्कम भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेची सर्व १६ करभरणा कार्यालये त्या दिवशीही सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. तसेच येत्या शनिवार आणि रविवारीही (२४-२५ सप्टेंबर) ही कार्यालये खुली असतील, असे महापालिकेने कळवले आहे.

एक ऑक्टोबरपासून महापालिका प्रति महिना दोन टक्के दराने शास्ती लागू करणार आहे. त्यामुळे करधारकांनी या अखेरच्या दिवसांतील संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मिळकतीची नोंद नसेल, तर विभागीय करसंकलन कार्यालयात संबंधित कागदपत्रे जमा करून ती करून घ्यावी, असेही आवाहनही महापालिकेने केले असल्याची माहिती करसंकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

.............

- पालिकेकडे नोंद असलेल्या मिळकती : चार लाख ३८ हजार १९९

- २१ सप्टेंबरपर्यंत करभरणा केलेले मिळकतधारक : दोन लाख २१ हजार २४८

- २१ सप्टेंबरपर्यंत झालेला करभरणा : २२२ कोटी ३३ लाख रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या नेत्यांची कार्यपद्धती वेगळी

$
0
0

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये नव्या वादाला तोंड

Rohit.Athavale@timesgroup.com

Tweet : @AthavaleRohitMT

पिंपरी : महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असताना भारतीय जनता पक्षामधील आयात आणि निष्ठावंतांच्या (केडर) कुरबुरी नव्याने सुरू झाल्या आहेत. सध्या सगळी सूत्रे शहर भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्यांच्या हातात आहेत. त्यामुळे नव्यांची कार्यपद्धती जुन्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाही. त्यातूनच ऐन निवडणुकांच्या तोंडावर वाद उफाळून येऊ लागले आहेत. या सगळ्याचा निकालावर परिणाम होईल अशी भीती ज्येष्ठ कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी भाजपचे प्रदेश पातळीवरील पदाधिकारी रणनीती आखत आहेत. स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजप युती करण्याचे पदाधिकारी जाहिररीत्याही सांगत आहेत; पण काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेल्यांकडून राबवण्यात येणारी कार्यपद्धती अनेकांच्या पचनी पडत नाही. त्यातूनच पदाधिकाऱ्यांच्या मनातील खदखद आता बाहेर येऊ लागली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून विधानसभा मतदारसंघानुसार बैठका होत आहेत. चिंचवड, भोसरी, पिंपरी अशा क्रमाने या बैठका झाल्या आहेत. 'नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना तिकीट दिले गेल्यास तेवढ्याच जोमाने काम करा,' असे यातील एका बैठकीत एका पदाधिकाऱ्याने उपस्थितांना सांगितले. त्यावरून या बैठकीनंतर कार्यालयाबाहेर दुसरीच बैठक झाली. 'नव्याने आलेल्यांकडून जुन्या लोकांना असे सांगितले जाणे कितपत योग्य,' यासह अनेक विषयांवर त्यात चर्चा झडली. वास्तविक या बैठकांना निवडक लोकांनाच बोलावण्यात आले होते. तसे मेसेजही करण्यात आले होते. तरीदेखील कार्यपद्धतीचा वाद सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नियोजनानुसार सध्या सर्व बैठका पार पडत आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी जगताप यांच्यासह उमा खापरे, बाबू नायर, अमोल थोरात यांच्यावर आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य लोक लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, एकनाथ पवार, सारंग कामतेकर, प्रमोद निसळ यांच्याकडे, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार अमर साबळे, सदाशिव खाडे, माऊली थोरात, संजय मंगोडेकर आदींवर आहे. या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच इच्छुक आणि निवडणूक लढवलेल्यांची बैठक घेतली. त्यात पारंपरिक 'वन बूथ टेन यूथ'चा नारा देण्यात आला. परंतु कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहत असेल, तर सत्ता कशी काबीज करणार, हा प्रश्न जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सतावत आहे.

............

कारभारीच मोडताहेत प्रोटोकॉल

शहरात पूर्वी एखादा प्रदेश पदाधिकारी-मंत्री आल्यास तो सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन चहा-जेवण घेत असे. त्यातून कार्यकर्ता-पदाधिकारी यांचे संबंध अधिक पक्के करण्याचे प्रयत्न संघटन पातळीवर केले जात. परंतु आताचे पदाधिकारी-मंत्री मात्र जे अजून पक्षात आलेले नाहीत, त्यांच्या घराला सदिच्छा भेट देऊनच शहरातील दौरा पूर्ण करत आहेत. पक्षाचे प्रोटोकॉल, कार्यपद्धती डावलून सुरू असलेल्या अशा काही दौऱ्यांबाबत थेट प्रदेश गाभा समिती आणि बड्या नेत्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. जिल्ह्याचा गाडा हाकणाऱ्यांबाबतच तक्रारी झाल्याने याबाबत प्रदेश पातळीवर मोठी चर्चा झाली. परंतु त्यात कोणताच फरक झाला नसल्याने कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

...........
भाजपची निवडणूक शॅडो कमिटी

निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांप्रमाणे (बीएलओ) भाजप स्वतःचे बीएलओ नेमणार आहे. या 'बीएलओं'ना भाजपतर्फे आयकार्ड आणि मतदारांची लिस्ट दिली जाणार आहे. हे बीएलओ प्रभागात फिरून काम करणार आहेत. प्रत्येक इच्छुक अथवा प्रभागातील प्रमुख पदाधिकाऱ्याकडून 'बीएलओं'ची नेमणूक करण्यासाठी नावे मागवण्यात आली आहेत. विधानसभा मतदारसंघानिहाय झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्मरणाचा आजार

$
0
0

मंगला जोगळेकर
.............
गेल्या काही दिवसांमध्ये आपण काय, काय विसरलो असा विचार करताना मला असे दिसले, की घरात वावरताना काढलेला चष्मा चटकन न मिळणे हा माझा मोठा प्रश्न आहे. बाहेर जाताना रिक्षाने जायचे असूनही सुट्टे पैसे न घेणे, गणपतीच्या पूजा-साहित्यात काही गोष्टी राहून जाणे, घरी पाहुणे आल्यावर कोणासाठी आठवणीने ठेवलेली वस्तू द्यायची विसरणे, बाजारात गेल्यावर मुद्दामहून लक्षात ठेवलेलीच गोष्ट नेमकी विसरणे आणि बँकेचे पुस्तक न मिळणे अशा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तुमच्या बाबतीतही अशा काही गोष्टी तुम्हाला दिसून येतील. मग प्रश्न असा, की यामध्ये काही काळजी करण्यासारखे आहे का? त्यासाठी तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारू शकता. उदा. माझ्या बाबतीत घडलेल्या विस्मरणाच्या घटना मला आठवतात का? त्या मी इतरांना सांगू शकतो का? माझे विस्मरण सातत्याने वाढते आहे का? त्यामुळे माझ्या आत्मविश्वासात कमतरता आली आहे का? माझे स्वावलंबन कमी होते आहे का? इतरांना माझ्या विस्मरणाची काळजी वाटते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील, तर तुमचे विस्मरण सर्वसाधारण आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
विस्मरण नैसर्गिक आहे. सर्वांमध्येच ते आढळते. स्मरण आणि विस्मरण दोन्हीही जरुरीचे आहे. वयापरत्वे ज्येष्ठांमध्ये विस्मरण थोडेफार वाढताना दिसले तरी गंभीर विस्मरण आणि वृद्धत्व याचा संबंध नाही. त्यामुळे वय झाले, आता विस्मरण वाढणारच असे म्हणून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये. अती वाढलेले विस्मरण नैसर्गिक नव्हे.
गंभीर विस्मरणाची लक्षणे
गंभीर विस्मरण हे एकाएकी होताना दिसत नाही. ते हळूहळू पण सातत्याने वाढताना दिसते. गंभीर विस्मरणाच्या लक्षणांमध्ये विस्मरणाच्या प्रसंगांमध्ये वाढ, भाषेतील अडचणी, काळ, वेळ, ठिकाण यामधील गोंधळ, घराजवळील रस्त्यांवर उडणारा गोंधळ, रोजची कामे करताना जाणवणाऱ्या अडचणी, नियोजनाची कामे करणे अवघड वाटणे, तात्पुरत्या स्मरणशक्तीतील त्रुटी, व्यक्तिमत्त्वात होणारा बदल अशा गोष्टींचा अंतर्भाव असतो. या सर्वांचा परिणाम अर्थातच स्वावलंबन कमी होण्यावर होतो. विस्मरणाची वाटचाल गंभीर दिशेने होते आहे का, हे समजण्यासाठी कुटुंबातील लोकांचे निरीक्षण अत्यावश्यक असते.
डिमेन्शिया आणि अल्झायमर्समधील फरक
मेंदूच्या क्षमता कमी झाल्यामुळे रोजचे जीवन स्वावलंबनाने जगणे अशक्य होण्याच्या आजाराला 'डिमेन्शिया' म्हणता येईल. 'डिमेन्शिया' हे मेंदूच्या क्षमता कमी होण्याच्या आजाराला दिलेले नाव आहे. हा आजार होण्याची कारणे विविध असली तरी त्याची लक्षणे मात्र एकसारखी असतात. डिमेन्शिया होण्याचे प्रमुख कारण अल्झायमर्स आहे. डिमेन्शियाचे जवळ जवळ ६० ते ७० टक्के रुग्ण हे अल्झायमर्सचे असतात. इतर कारणांमध्ये व्हॅसक्युलर डिमेन्शिया (अर्धांगवायूमुळे झालेला डिमेन्शिया), लुवी बॉडी डिमेन्शिया आणि फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शियाचा समावेश असतो.
विस्मरणाचा त्रास असलेली व्यक्ती आजारी दिसत नाही. तिला रोजच्या गोष्टी आठवल्या नाहीत तरी पाठीमागचे सर्व आठवत असते. तिचे जीवन थोड्या मदतीने का होईना, ठीकठाक चाललेले असते. त्यामुळे लक्षणे दिसूनही अशा व्यक्तीला वैद्यकीय मदत फार उशिराने मिळताना दिसते.
मेमरी क्लिनिकचे काम
या आजाराचे स्वरूप इतर आजारांपेक्षा भिन्न आहे. जसा आजार वाढत जातो, तशी आजारी व्यक्ती स्वतंत्रपणे जगायला असमर्थ होते. त्याच्या स्वभावात बदल होत जातात. त्याला सांभाळणे हे चोवीस तासांचे काम होऊ शकते. अशा विविध कारणांमुळे कुटुंबीयांवर आजारी व्यक्तीची मोठीच जबाबदारी पडते. या काळात त्यांना मानसिक आधाराची जरूरी असते. आजाराच्या विविध स्थितींमध्ये आजारी व्यक्तीची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शनाची आवश्यकता पडते. प्रामुख्याने विस्मृती झालेल्या व्यक्तीची योग्य काळजी कशी घ्यावी आणि काळजीवाहकाचा, कुटुंबाचा ताण कसा कमी करावा, याची माहिती देण्याच्या उद्दिष्टाने गेली सात वर्षे दीनानाथ हॉस्पिटलचे मेमरी क्लिनिक काम करीत आहे.
मेमरी क्लिनिकमध्ये डिमेन्शियाच्या आजाराची माहिती मिळते. कुटुंबीयांच्या शंकांना उत्तरे दिली जातात, स्वावलंबन टिकवून ठेवण्यासाठी मेंदूला कशी मदत करावी, रुग्णाशी संवाद कसा साधावा, काळजीवाहकाने ताणाशी सामना कसा करावा, याची उत्तरे मिळतात. मेमरी क्लिनिकमार्फत अ‍ल्झायमर्स सपोर्ट ग्रुप, काळजीवाहकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, मेमरी लॅब इत्यादी कार्यक्रम चालवले जातात. अल्झायमर्स जागृती महिन्याच्या निमित्ताने २४ सप्टेंबर रोजी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये सौद बाहवान सभागृहात दुपारी चार ते सहाच्या दरम्यान एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : मेमरी क्लिनिक, न्यूरॉलॉजी विभाग, नवीन बिल्डिंग, दीनानाथ हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे, फोन - ०२० - ४९१५३२३४, ९०११०३९३४५.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्रौत्सवाची शहरात जोरदार तयारी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लवकरच सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवासाठी शहरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील देवींच्या विविध मंदिरांमध्ये रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले आहे. उत्सव काळात होणाऱ्या गर्दीचा विचार करून त्या ठिकाणी मांडव घालण्याचेही काम सुरू झाले आहे.

एक ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे. तेव्हापासून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची तयारी सर्वत्र चालली आहे. देवींच्या मंदिरांमध्ये रंगरंगोटी करण्यात येत आहे. अनेक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. त्या मूर्ती बनवण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. आदिशक्ती दुर्गामातेची मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सिंहासनारूढ, महिषासुरमर्दिनी, महाकाली, दुर्गामाता, महालक्ष्मी, बंगाली पद्धतीच्या अशा देवीच्या विविध रूपांतील मूर्ती तयार होत आहेत. मागणीनुसार तीन फुटांपासून सोळा फुटांपर्यंतच्या आणि तीन हजार रुपयांपासून ते पंधरा-वीस हजार रुपयांपर्यंतच्या बाजारपेठेत मूर्ती उपलब्ध आहेत.

नवरात्रौत्सवात विविध मंडळांतर्फे दांडिया आणि गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी स्पर्धांचे आयोजन केले जाते. नृत्यातील नैपुण्य दाखवणाऱ्यांना पारितोषिकेही देण्यात येतात. या स्पर्धेसाठी तरुणवर्गामध्ये मोठा उत्साह आहे. त्यासाठीही तयारी सुरू झाली आहे. काही ठिकाणी दांडिया आणि गरबाच्या प्रशिक्षणाचे वर्गही सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजनांच्या मदतीने उद्योग उभारा

$
0
0

'सिडबी'च्या महाव्यवस्थापकांचे लघू-मध्यम उद्योजकांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'नवीन उद्योग सुरू करणाऱ्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांनी केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेअंतर्गत भारतीय लघू उद्योग विकास बँकेच्या (सिडबी) वतीने नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा,' असे आवाहन 'सिडबी'चे पुणे क्षेत्रीय महाव्यवस्थापक सुबोधकुमार यांनी केले.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना आणि लघुउद्योग विकास बँक (सिडबी बँक) यांच्या संयुक्त विद्यमाने लघुउद्योजकांसाठी व नवीन लघुउद्योग सुरू करणाऱ्यांसाठी बुधवारी आकुर्डी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, उपाध्यक्ष संजय जगताप, भारतीय लघुउद्योग विकास बँकेचे (सिडबी) उपमहाव्यवस्थापक पुष्कर मिश्रा, व्यवस्थापक प्रदीप झा, संघटनेचे संचालक विनोद नाणेकर, माजी अध्यक्ष नितीन बनकर, संचालक उमेश लोंढे, विनोद मित्तल, हर्षल थोरवे, विजय खळदकर, शिवाजी साखरे उपस्थित होते.

''सिडबी'ने 'सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मेक इन इंडिया सुलभ कर्ज योजना' (स्माइल) सुरू केली आहे. नवीन प्रकल्प व प्रकल्प विस्तारासाठी सुरू केलेली ही उद्योजकांच्या फायद्याची योजना आहे. या योजनेतून उद्योजकांना ७२ महिन्यांच्या परतफेडीवर २५ लाख रुपयांपेक्षा जास्त, परंतु प्रकल्प किमतीच्या ७५ टक्के कर्ज देण्यात येते. नवीन व विस्तारित उद्योग प्रकल्पांसाठी अनुदानाच्याही अनेक कर्जयोजना सादर करण्यात आल्या आहेत,' अशी माहिती सुबोध कुमार यांनी दिली.

या मेळाव्यात स्माइल स्कीम (सात वर्षांच्या एकूण कालावधीपैकी पहिली तीन वर्षे विशेष व्याजदर (९.४५-९.९५ %), ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पांतर्गत कंपन्यांना विशेष योजना, रिस्क कॅपिटल योजनेअंतर्गत लघुउद्योगांच्या विशेष गरजा भागवण्यासाठी व भविष्यकालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी मुदत कर्ज योजना याबाबत माहिती देण्यात आली. स्टँड अप इंडिया, मुद्रा योजना यांचाही उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सुबोध कुमार यांनी केले.

प्रास्ताविक करताना संघटनेचे अध्यक्ष बेलसरे म्हणाले, 'पिंपरी-चिंचवडच्या उद्योजकांना 'सिडबी'कडून कर्ज घेताना अनेक अडचणी येतात. पिंपरी-चिंचवडमधील 'सिडबी'च्या शाखेचा विस्तार केला जावा. तसेच अनेक प्रकारच्या यंत्रांचा अनुदानामध्ये समावेश सध्या नाही. तो करण्यात यावा. एक कोटी रुपये कर्ज रकमेवर १५ लाख रुपयांचे अनुदान मिळते, ते अनुदान प्रकल्प विस्तारासाठीदेखील मिळावे आणि अनुदान व कर्ज रक्कम वाढवावी.'

स्वागत संदीप बेलसरे यांनी केले. प्रदीप झा यांनी सूत्रसंचालन केले आणि जयंत कड यांनी आभार मानले.

..........

ऑनलाइन अर्जही

'सिडबी'ने www.udyamimitra.in (उद्योग मित्र) ही वेबसाइट विकसित केली आहे. या वेबसाइटवरून उद्योजक 'सिडबी'सह इतर सर्व सार्वजनिक बँकांमधून कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. महिला आणि अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांसाठी

www.standupmitra.in ही वेबसाइट विकसित करण्यात आली आहे. या वेबसाइटवरदेखील कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती सुबोधकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोणतीही परवानगी न घेता जिल्हाधिकारी कार्यालयात कांदाफेक आंदोलन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्यासह अकरा जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार परशुराम लांडगे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून जालिंदर कामठे, महिला जिल्हाध्यक्षा लोचन शिवले, गणपत महादेव कड, शांताराम बापू कटके, दिलीप वाल्हेकर, गणेश महाडिक, राहुल शेवाळे, भरत लक्ष्मण कुंजीर, माणसिंग भैया पाचुलकर, बाळासाहेब भोसले, राजेंद्र चौधरी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कांद्याच्या गोण्या जमिनीवर टाकून, घोषणाबाजी करून आंदोलन केले होते. या वेळी पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला होता. आंदोलनासाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पुन्हा घरोघरी सर्व्हेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील डेंगी, चिकुनगुनियाच्या वाढत्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा घरोघरी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय आता महापौरांसह महापालिका प्रशासनच रस्त्यावर उतरणार असून डासांची उत्पत्तीस्थाने आढळणाऱ्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.
शहरात सध्या पाऊस पडत आहे. डेंगी, चिकुनगुनियाच्या पेशंटच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात आजाराची साथ वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे महापौर प्रशांत जगताप यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह महापालिका प्रशासनची विशेष बैठक घेतली. त्या बैठकीला शहरातील विविध बड्या हॉस्पिटलचे प्रतिनिधी, संस्थांचे प्रतिनिधी, आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत तसेच प्रशासनाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. डेंगी, चिकुनगुनियाच्या साथीच्या वाढत्या प्रादुर्भावावरून महापौरांनी प्रशासनाला फैलावर घेतले.
'शहरात डेंगी, चिकुनगुनियाची साथ कायम राहणार असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शहरातील प्रत्येक भागातील घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. डेंगी, चिकुनगुनियाच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळलेल्या ठिकाणी धूर तसेच औषध फवारणी करण्यात येणार असून डासांची अंडी सापडलेले ठिकाण नष्ट करण्यात करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करा', असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला दिले.
घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणे आणि डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने अतिरिक्त तीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक वस्ती क्लिनिकपासून ते विविध भागांमध्ये जाऊन डेंगीच्या डासांचा आणि पेशंटचा शोध घेण्यात येणार आहे. डेंगी, चिकुनगुनिया रोखण्यासाठी आता महापालिकेच्या आरोग्य विभागाला रस्त्यावर उतरण्याचे आदेशही महापौरांनी दिले. शहरात विविध ठिकाणी असलेला कचरा, भंगार काढून स्वच्छता काढण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले. साथीच्या आजारासंदर्भात नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी सोमवारपासून शहरातील सर्व शाळांसह सोसायट्यांमध्ये पत्रकांचे वाटप करून विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

पेशंट नाकारू नका
शहरात साथीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटना खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नाकारू नका, असे आवाहन महापौर प्रशांत जगताप यांनी हॉस्पिटलच्या प्रतिनिधींना केले. तसेच डेंगीच्या आजाराचे निदान करण्यासाठी घेण्यात येणारे शुल्क हे सहाशे रुपयांपेक्षा अतिरिक्त घेऊ नये, अशाही सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

'भारती'चे दहा डॉक्टर मदतीला
शहरात साथ असल्याने त्याची लागण महापालिकेच्या १५ डॉक्टरांना झाली आहे. त्यामुळे उपचार देणारे तज्ज्ञच आजारी झाल्याने उपचार देण्यासाठी पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकेच्या आरोग्य विभागावर आली आहे. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटना उपचार देण्यासाठी आता भारती हॉस्पिटलने मदतीचा हात पुढे केला असून दहा डॉक्टर सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहेत. डॉक्टरांप्रमाणे शहरातील इंजिनीअर, शिक्षक, नगरसेवकांनादेखील डेंगीची लागण झाल्याने कारवाई करण्यात आता मागे राहू नका, असा आदेशही देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रारूप मतदारयादीमध्ये अनेक गंभीर चुका

$
0
0

अर्ज करूनही बदल न झाल्याच्या तक्रारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रारूप मतदारयादीमध्ये अनेक गंभीर चुका असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा अर्ज करूनही त्यामध्ये बदल न केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांची नावे या यादीतून गायब झाल्याची तक्रार पालिकेतील नगरसेवकांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केली. मतदारयादीतील या चुकांमुळे निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एक जानेवारी २०१७ला वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदान यादीत आपले नाव नोंदवता येणार आहे. जानेवारी महिन्यात अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने सध्या प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक यादीत अनेक चुका असल्याचे सर्वसाधारण सभेत समोर आले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी मतदारयादीतील चुका सभागृहात दाखवल्या. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये पाषाण-सुतारवाडी भागातील तब्बल पंचवीस ते तीस हजार मतदारांचा पत्ता एरंडवणे, पौड रोड, केळेवाडी या भागातील लागला असल्याचे या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी सांगितले.यासाठी अनेकदा निवडणूक आयोगाकडे अर्ज करूनही यादीत नाव आले नसल्याची तक्रार माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलेल्या अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाली असून, त्यांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे नगरसेवक सचिन दोडके यांनी सांगितले. मतदार नोंदणीसाठी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात गेल्यानंतर नागरिकांची नोंदणीच करून घेतली जात नसल्याची तक्रार उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी केली. गेल्या आठवड्यापासून पालिकेने मतदार नोंदणी मोहीम सुरू केलेली असतानाही आठवड्यानंतरही पालिकेच्या अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी नेमले नसल्याची तक्रार भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे यांनी केली. मतदान करताना बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाते; मात्र आता जन-धन योजनेत कोणत्याही पुराव्याशिवाय बँक खाती उघडण्यात आली आहेत. त्यामुळे या पुराव्याच्या आधारे बोगस मतदान होण्याची भीती असल्याने बँकेच्या पासबुकबरोबरच दुसरे ओळखपत्रही पाहावे, अशी मागणी अविनाश बागवे यांनी केली.नाहीमतदारांची नावे, पत्ते यामध्ये चुका झाल्या असतील, अशा मतदारांना स्वत: अर्ज करावा लागेल, त्याशिवाय त्यात दुरुस्ती होणार नाही,' असे महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. 'तीस हजार मतदारांचे अर्ज कसे करणार,' असा प्रश्न नगरसेविका चिमटे यांनी उपस्थित केला. त्यावर कुलकर्णी यांनी 'हे काम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चालते. त्यामुळे वैयक्तिक अर्ज केल्याशिवाय पर्याय नाही,' असेही स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादीला धडा शिकवू’

$
0
0

काँग्रेसच्या मनातील अजूनही नाराजीच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर असतील,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले असले, तरी काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल असलेली नाराजी अद्यापही दूर झालेली नाही. महापालिकेत आघाडी करताना राष्ट्रवादीने दिलेला शब्द पाळला नसल्याचा राग अजूनही काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींमध्ये असून, 'आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला धडा शिकवू,' असा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेमध्ये झालेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील नाराजी व्यक्त करण्यात आली. 'समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे संकेत राष्ट्रवादीकडून दिले जात असले, तरी पालिका निवडणुकीत त्यांच्याशी आघाडी करायची की नाही हे नंतर ठरवू. तत्पूर्वी येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका वरिष्ठ नेत्यांनी मांडली.

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांची मुदत संपणार आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आघाडी करायची की नाही, याचा निर्णय प्रदेश पातळीवर होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची प्राथमिक बैठकही नुकतीच झाली आहे. तरीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, असा इशाराच या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी दिला. स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. परंतु हे पद देण्यासही आयत्या वेळी नकार देण्यात आल्याची सल अजूनही शहर काँग्रेसला बोचत असल्याचे यातून स्पष्ट झाले. तसेच काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यांना विधान परिषदेची निवडणूक लढवायची असून, राष्ट्रवादीची जागा आपल्या पदरात पडावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत पाऊस वाढणार

$
0
0

दोन दिवसांत पाऊस वाढणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील पावसाचे प्रमाण येत्या दोन दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून विदर्भ वगळता उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात थांबून थांबून पावसाच्या काही सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी पुण्यात दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
बंगालच्या उपसागराचा पश्चिम मध्य भाग व आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागावर असलेल्या ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आता या क्षेत्राचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून ते मराठवाड्याकडे सरकले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गुरुवारी पुण्यात अधूनमधून पावसाच्या सरींनी हजेरी लावली. दुपारनंतर पावसाचे प्रमाण काहीसे वाढले. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागात दोन मिलिमीटर तर लोहगाव येथे तीन मिमी पावसाची नोंद झाली. तर सायंकाळी साडेपाचपर्यंत अलिबाग येथे ७५ मिलिमीटर, महाबळेश्वर येथे २५ मिमी, रत्नागिरी येथे १५, नाशिक येथे १४, वाशिम येथे १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण वाढेल. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षे झोपला होते का? : मसाप

$
0
0

साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना मसापच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकगठ्ठा मतदान होऊ नये, यासाठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी बाह्या सरसावलेल्या असताना, 'तीन वर्षे झोपले होतात का,' असा थेट सवाल साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 'साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यात असताना नागपूर येथून एका व्यक्ती जवळ एकगठ्ठा मतपत्रिका पाठवल्या जायच्या,' याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

डोंबिवली येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शी व्हावी म्हणून या वेळी पोस्टाने नाही, तर रजिस्टर्ड पोस्टाने मतदारांकडे मतपत्रिका पाठविण्यात येणार आहे. एकगठ्ठा मते जी दर वर्षी येतात. ती येऊ नयेत, यासाठी पावले उचलणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी म्हटले आहे. 'दर वर्षीचा घोळ लक्षात घेता यंदा मतपत्रिका मतदारांकडे रजिस्टर्ड पोस्टाने पाठविण्यात येणार असल्याने मतदाराला मतत्रिका मिळाली नाही, अशी तक्रार येऊ नये असा प्रयत्न करण्यात येईल,' असेही डॉ. जोशी यांनी सांगितले आहे. त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी 'तेव्हा कुठे गेला होता, राधेसुता तुझा धर्म? तीन वर्षे काय झोपा काढल्या का?' अशा शब्दांत महामंडळाच्या अध्यक्षांचे कान टोचले आहेत.

महामंडळाचे कार्यालय तीन वर्षे साहित्य परिषदेकडे होते. सहा महिन्यांपूर्वी हे कार्यालय नागपूरला विदर्भ साहित्य संघाकडे गेले. 'मसाप'कडे महामंडळाचे कार्यालय असताना झालेल्या तीन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विदर्भ साहित्य संघाकडून एकगठ्ठा मतपत्रिका आल्या होत्या. मुदत संपण्याच्या आधी एक-दोन दिवस एका व्यक्तीद्वारे १६० च्या वर मतपत्रिका एकगठ्ठा 'मसाप'कडे पोहोचवल्या जायच्या. संमेलनाध्यक्ष निवडणुकीत विदर्भ साहित्य संघाकडून पूर्वीपासून मतपत्रिका गोळा करण्यात येत आहेत. पण आता महामंडळ विदर्भ साहित्य संघाकडे आल्याने हा प्रकार रोखण्याचे सुचले आहे. आत्ताचे अध्यक्ष तेव्हा पदाधिकारी होतेच, मग तीन वर्षे काय झोपला होतात का, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महामंडळ 'मसाप'कडे असताना 'मसाप'चे असलेले काही पदाधिकारी सध्याही पदाधिकारी आहेत. त्यांनी महामंडळाच्या अध्यक्षांचा दुटप्पीपणा उघड केला आहे.

साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षे 'मसाप'कडे असताना संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा मी निर्वाचन अधिकारी होतो. तीन वर्षे निवडणूक जवळून अनुभवली आहे. विदर्भ साहित्य संघाकडून दर वर्षी एकगठ्ठा मतपत्रिका पाठवल्या जायच्या. मुदत संपण्याआधी एक-दोन दिवस एक व्यक्ती येऊन त्या मतपत्रिका देत असे. हा प्रकार रोखण्याची भाषा करणारे पदाधिकारी तेव्हा संघाचे पदाधिकारी होते. मग हे तेव्हाच का सुचले नाही?

- अॅड. प्रमोद आडकर, कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगूनवाला कॉलेजात प्रवेशापासून रोखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नीट'च्या गुणवत्ता यादीनुसार आझम कॅम्पसमधील एमए रंगूनवाला डेंटल कॉलजमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असूनही त्यांना प्रशासनाने प्रवेश न देता वेठीस धरल्याचा आरोप गुरुवारी पालकांनी केला. प्रवेश घेण्याची मुदत गुरुवारी संपल्याने ८५ विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ‍शिवाय या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजन अॅडमिशन घेता न आल्याने त्यांच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
'नीट'च्या गुणवत्ता यादीनुसार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खासगी वैद्यकीय आणि डेंटल कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये रंगूनवाला डेंटल कॉलजमध्ये ८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश जाहीर करण्यात आले. या विद्यार्थ्यांना २० ते २२ सप्टेंबर दरम्यान प्रवेश घेणे अनिवार्य होते. मात्र, कॉलेज प्रशासनाने विविध प्रकारची कारणे देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे ८५ विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही. कॉलेज प्रशासनाच्या या उर्मट वागणुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. याबाबत संचालनालयाला माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागेल अथवा प्रोव्हिजन अॅडमिशन घेता न आल्याने त्यांना प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे पालकांनी सांगितले.
..
अभिमत विद्यापीठ आणि खासगी वैद्यकीय व डेंटल कॉलेजमधील प्रवेशांबाबत अजूनही दुमत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाचा जो निर्णय येईल, तो मान्य असेल. त्यानुसार प्रवेश होतील. कॉलेजांमध्ये प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर असल्याने विद्यार्थ्यांना कालावधी वाढवून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही.
- पी. ए. इनामदार, अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images