Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चिकुनगुनियाचे पेशंट ऑगस्टमध्ये सर्वाधिक

$
0
0

पुणे : गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक चिकुनगुनियाचे पेशंट ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत. गेल्या आठ महिन्यांत शहरात ३९१ जणांना लागण झाली असून, त्यापैकी ११९ पेशंट ऑगस्ट महिन्यात आढळले आहेत.
वारजे, ढोले पाटील रस्ता, संगमवाडी, घोले रस्ता विश्रामबाग वाडा, कोंढवा वानवडी या भागांमध्ये चिकुनगुनियाचे सर्वाधिक पेशंट आढळले आहेत, अशी नोंद पालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने केली आहे. राज्यात एकट्या चिकुनगुनियाचे ९२ टक्के पेशंट पुणे शहर आणि जिल्ह्यात आढळत आहेत. शहरात जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात ३९१ पेशंटला लागण झाल्याची नोंद आहे. त्यापैकी सर्वाधिक पेशंट ढोले पाटील रस्ता, संगमवाडी, वारजे येथे आढळले आहेत. औंध, टिळक रस्ता, कोथरूड, बिबवेवाडी, धनकवडी आणि हडपसर या भागात चिकुनगुनियाचे पेशंट कमी आढळून आले आहेत.
जानेवारी महिन्यात सर्वाधिक म्हणजे ६८ जणांना लागण झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी ते मेपर्यंत पेशंटच्या संख्येत घट झाली. जून महिन्यात पावसाच्या आगमनाबरोबरच चिकुनगुणियाची लागण वाढण्यास सुरुवात झाली. जूनमध्ये ३९ तर, जुलैत २७ जणांना लागण झाली. ऑगस्टमध्ये ११९ तर, १७ सप्टेंबरपर्यंत ७२ जणांना लागण झाली आहे.
..
चिकुनगुनियाची शहरातील सद्यस्थिती
विभाग ............. पेशंट संख्या (१७ सप्टेंबरपर्यं)
औंध .................. ६
घोले रस्ता .................... २५
वारजे ......................... ५४
कोथरूड ...................... १०
ढोले पाटील रस्ता ............... ६७
नगर रस्ता.......................... ३१
संगमवाडी ..................... ४५
टिळक रस्ता ................ ५
भवानी पेठ..................... ३९
विश्रामबाग वाडा .................... ३७
बिबवेवाडी ................ ७
सहकारनगर ................. १४
हडपसर ..................... ७
धनकवडी .................. ३
कोंढवा वानवडी ......................... ४१
..............................................
एकूण ........................ ३९१
..
शहरातील चिकुनगुनिया आणि डेंगीच्या पेशंटच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाने जनजागृतीवर भर दिला आहे. पालिकेच्या १२ नाट्यगृहांमध्ये आता कार्यक्रम, नाटक सुरू होण्यापूर्वी जनजागृतीसंदर्भात घोषणा केली जाईल. पत्रकांचेही वाटप केले जाईल. शहरभर सोसायट्या, डॉक्टर यांची बैठक घेऊन जनजागृती करण्यात येत आहे.
डॉ. कल्पना बळिवंत, सहायक आरोग्य प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एक्स्प्रेस वे’वर घाटातील मार्ग आठपदरी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळा-खंडाळा घाटातील क्षेत्रामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी येत्या काही वर्षांत फुटणार असून, द्रुतगती मार्गाची क्षमताही वाढणार आहे. लोणावळा येथील कुसगाव ते खोपोली एक्झिट हा बारा किलोमीटरचा आठ पदरी रस्ता आणि खालापूर फूडमॉल ते खोपोली इंटरचेंज दरम्यानचा आठ पदरी उन्नतमार्ग (एलिव्हेटेड) बांधण्याचा शासन निर्णय (जीआर) राज्य सरकारने मंगळवारी जारी केला आहे. या मार्गात दोन बोगदे व दोन 'व्हाया डक्ट'चा समावेश असून, त्यासाठी ३२१५ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने २०१५ मध्ये आठ पदरीकरणाला मान्यता दिली होती. तेव्हापासून एक्स्प्रेस वेच्या आठ पदरीकरणाची चर्चा सुरू होती. ताज्या 'जीआर'मुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. बारा किमी रस्त्याच्या आठपदरी करण्याच्या कामास ३० एप्रिल २०३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील अतिरिक्त कामांसाठी ३१ जुलै २०३५ पर्यंतची मुदत आहे. एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाट, बोरघाट येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. पुण्याहून मुंबईकडे जाताना तीव्र उतार, तर मुंबईकडून येताना चढ असल्याने उतारावर अनेकदा अपघात होतात.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) या कामासाठीचा निधी उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम ईपीसी (इंजिअनरिंग प्रॉक्युरमेंट कन्ट्रक्शन) तत्त्वावर करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आंतराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा (डीपीआर) तयार करताना त्याचे 'इकॉनॉमिक बेनिफिट अॅनालिसिस' करून अहवालही पायभूत सुविधा समितीच्या मान्यतेसाठी फेरसादर केला जाणार आहे.

ताण कमी होणार

पर्यावरणविषयक बाबींमुळे कुसगाव ते खोपोली एक्झिट दरम्यानच्या रस्त्याचे काम एक्स्प्रेस वेचे बांधकाम करताना हाती घेण्यात आले नव्हते. त्यामुळे या रस्त्यात काही अंतर एक्स्प्रेस वे व जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या लेन सामायिक झाल्या होत्या. त्यामुळे या अंतरात दोन्ही रस्त्यांवरील वाहनांमुळे गर्दी होते. येत्या काळात येथील रस्ता झाल्यानंतर निश्चित वाहतुकीचा ताण कमी होईल.


या कामांना मान्यता...

- खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान दोन बोगदे
- आठपदरी रस्ता
- खालापूर फूडमॉल ते खोपोली इंटरचेंज दरम्यान आठ पदरी उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी सीमेवर जायला तयार आहे!: अण्णा हजारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'काश्मीर मधील सीमेलगत असलेल्या उरी येथे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा अत्यंत भ्याड असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. भरत सरकारने आदेश दिला तर भारतीय सैन्य लाहोरपर्यंत जाईल ती वेळ आली आहे. मी ८० वर्षांचा असलो तरीही सीमेवर जायला तयार आहे. पाकिस्तानला आता 'ईट का जवाब पत्थरसे' देण्याची गरज आहे,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला अण्णा हजारे उपस्थित होते. या कार्यक्रमात अण्णांनी केलेल्या व्याख्यानात त्यांनी उरीतील दहशतवादी हल्ल्याबाबत मत व्यक्त केले. एरव्ही कधीही हिंसेबद्दल न बोलणाऱ्या अण्णांमधील सैनिक या वेळी जागृत झालेला पहायला मिळाला. सहनशक्तीला एक मर्यादा असते, पाकिस्तानने या मर्यादेचा अनेकदा अंत पाहिला आहे. आता त्यांना त्यांच्या भाषेत उत्तरे देण्याची वेळ आली आहे, असा सूर अण्णांच्या व्याख्यानातून उमटला. बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ या वेळी उपस्थित होते. अण्णा हजारेंनी महाविद्यालयातर्फे आयोजित ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि प्रदर्शनाच्या उपक्रमाचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला भरपाईचा आदेश

$
0
0

निवृत्त लेफ्टनंट कर्नल कर्वे यांनी जिंकला जमीन मागणीचा लढा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निवासी भूखंड व शेतजमीन मिळण्यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल व्ही. एम. कर्वे यांनी दिलेला लढा यशस्वी झाला आहे. कर्वे यांना पुण्यामध्ये जमीन देतानाच याचिकेच्या खर्चापोटी ५० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे.

कोर्टाच्या या आदेशानुसार जिल्हाधिकारी सौरव राव यांनी ही रक्कम लेफ्टनंट कर्नल कर्वे यांना दिली असून, त्यांना जमीन देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विशेष कामगिरी करणाऱ्या लष्करातील अधिकाऱ्यांना निवासी भूखंड व शेतजमीन देण्यात येते. त्यानुसार ले. कर्नल कर्वे यांनी हवेली तालुक्यातील वडगाव शेरी येथे निवासी भूखंडाची मागणी केली होती.

भूखंडासाठी मागणी अर्ज आल्यानंतर महसूल प्रशासनाने असा भूखंड देता येणार नसल्याचे पत्र कर्वे यांना दिले. त्या पत्राधारे कर्वे यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. 'कर्वे यांनी निवासी भूखंड व शेतजमीन देण्यात यावी, तसेच हायकोर्टात याचिका दाखल करण्यासाठी झालेल्या खर्चापोटी ५० हजार रुपये भरपाई दिली जावी,' असा आदेश हायकोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये दिला.

या निर्णयाच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांनी सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला; मात्र तो अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आणि हायकोर्टाचा आदेश कायम ठेवला. हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने याचिकेच्या भरपाईपोटी ५० हजार रुपये, तसेच निवासी भूखंड देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. महसूल खात्याच्या नावावर असलेली चार हेक्टर जिरायत किंवा दोन हेक्टर हंगामी बागायत अथवा एक हेक्टर बागायत जमीन लष्करातील विशेष कार्याबद्दल देता येते. तसेच ३०० चौरस मीटर निवासी भूखंडही देता येतो.
............
माहिती मागवली

निवृत्त ले. कर्नल कर्वे यांना निवासी भूखंड व शेतजमीन देण्यासाठी इंदापूर, दौंड, भोर, तसेच वेल्हा तहसीलदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्र पाठवून माहिती मागवली आहे. ही माहिती आल्यावर कर्वे यांना भूखंड दिला जाणार आहे. दरम्यान, कर्वे यांना भूखंड देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या घरी जाऊन भूखंड वाटपाची नोटीस दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडाकडून पायघड्या

$
0
0

'स्टडी अँड स्टे' ही विशेष योजना सुरू

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅनडातील नोव्हा स्कोशिया प्रांताचे स्थानिक प्रशासन विद्यार्थ्यांसाठी अॅकेडिया विद्यापीठाच्या सहकार्याने 'एज्युनोव्हा'अंतर्गत 'स्टडी अँड स्टे' ही योजना सुरू करत आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कॅनडात शिक्षण घेऊन, तेथेच नोकरी करण्याबरोबरच स्थायिक होण्याची संधी मिळेल, अशी माहिती विद्यापीठाचे अधिकारी मायकेल हेनिगर यांनी बुधवारी दिली.

'आयडीपी एज्युकेशन'च्या वतीने मंगळवारी यूके, यूएसए, कॅनडा व न्यूझीलंड एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले होते. त्याध्ये अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. इंजिनीअरिंगपासून कला शाखेपर्यंतच्या विविध पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती.

'कॅनडातील नोव्हा स्कोशिया प्रांतात विकासाला लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक संसाधने मुबलक असून, लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे विकासाला अजून भरपूर वाव आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने विद्यापीठाच्या सहकार्याने 'स्टडी अँड स्टे' योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भारत, चीन आणि फिलिपाइन्स या तीन देशांमधील एकूण ५० विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागेल. विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना तेथेच नोकरी मिळण्यासाठी आणि स्थायिक होण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य केले जाणार आहे. नोव्हा स्कोशिया प्रांतात इतर देशातील नागरिकांची लोकसंख्या वाढवण्यासाठी अशा योजना आखण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजनादेखील आहेत. अधिक माहितीसाठी www.studyandstay.ca ही वेबसाइट पाहावी,' असे हेनिगर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​योजनांमध्ये मागास तालुक्यांची झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जलयुक्त शिवार योजनेसह पंतप्रधान आवास योजना आणि अन्य सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत मागे असलेल्या तालुक्यांतील अधिकाऱ्यांची झाडाझडती खुद्द मुख्यमंत्री घेणार आहेत. येत्या शुक्रवारी (२३ सप्टेंबर) विधान भवनामध्ये त्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु, अधिकाऱ्यांमधील उदासीनता, योजनांच्या कामांकडे दुर्लक्ष तसेच अंतर्गत गटबाजी यामुळे या योजना जनतेसमोर प्रभावीपणे गेलेल्या नाही. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बैठक घेणार आहेत. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी सौरव राव यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, कृषीपंप जोडणी, स्वच्छ भारत योजना, पंतप्रधान आवास योजना, अनुसूचित जाती-जमातींसाठी घरबांधणी योजना आणि पीक विमा योजना आदी योजनांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांतील २० टक्क्यांपेक्षा कमी कामे झालेल्या तालुक्यांतील अधिकाऱ्यांचा लेखाजोखा या वेळी होणार आहे. यापूर्वीच्या काळात मुख्यमंत्री फक्त जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. आता समाधानकारक काम नसलेल्या तालुकापातळीवरील तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांची झाडाझडती मुख्यमंत्री घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्ल्यात सुरू झाली नवरात्रौत्सवाची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

आगामी नवरात्रौत्सवात लोणावळ्याजवळील कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या भाविकांच्या सुरक्षेसह सुलभ व जलद दर्शनाला विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांनी आढावा बैठकीत दिली.

येत्या एक ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नवरात्रौत्सवानिमित श्री एकवीरा देवस्थानच्या आढावा बैठकीचे आयोजन मावळचे प्रांताधिकारी सुनील थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या वेळी एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे, मावळचे तहसीलदार जोगेंद्र कट्यारे, 'लोणावळा ग्रामीण'चे सहायक पोलिस निरीक्षक संदीप येडे पाटील, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बी. जे. येळेकर, वेहरगावच्या सरपंच नीलिमा येवले, उपसरपंच दत्तात्रय पडवळ, देवस्थानचे खजिनदार नवनाथ देशमुख, सचिव संजय गोविलकर, सहखजिनदार विलास कुटे, विश्वस्त काळूराम देशमुख, विजय देशमुख उपस्थित होते.

भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रांताधिकारी व तहसीलदारांनी संबंधित प्रशासकीय विभागाला दिले. सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना कळवले असताना विशेषतः मावळ पंचायत समितीच्या सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने प्रांताधिकारी व तहसीलदारांनी खंत व्यक्त केली.

उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देवीचे व महानवमीच्या होमाचे दर्शन सुलभपणे घेता यावे यासाठी एकच दर्शन रांग करण्यात येणार असल्याचे तरे यांनी सांगितले. यामुळे भाविकांना देवीच्या व होमाच्या दर्शनासाठी दोनदा रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. उत्सव काळात मंदिर रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच गडावर पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवा, सुरळीत व अखंडीत वीजपुरवठ्यासह, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

यात्रेच्या कालावधीत गड व परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणेच्या वतीने १२ अधिकाऱ्यांसह २०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती 'लोणावळा ग्रामीण'चे सहायक पोलिस निरीक्षक संदीप येडे-पाटील यांनी दिली. पावसाने कोसळलेल्या दरडीमुळे फुटलेल्या गडावरील पायऱ्या आणि इतर दुरुस्तीची कामे पावसाने उघडीप दिल्यावर तत्काळ करण्यात येणार असल्याचे आश्वासन भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी बी. जे. येळेकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघे पंच्याऐंशी वयमान

$
0
0

प्राधिकरणातील गोपाळ लेले जाणार हिमालयात ट्रेकिंगला

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

वयाच्या ८५ वर्षी हिमालयातील रूपकुंड येथे ट्रेकिंगला जाण्यासाठी गोपाळ लेले यांनी जय्यत तयारी केली आहे. विशीच्या तरुणालाही लाजवेल असा दांडगा उत्साह असलेले लेले हे प्राधिकरणातील सिंधुनगरमधील रहिवासी आहेत. येत्या एक ऑक्टोबरला गोपाळ लेले पुण्याच्या 'ट्रेकनिक' या संस्थेसह ट्रेकसाठी जाणार आहेत.

वृद्धावस्थेत काही जण नातवंडांबरोबर खेळतात किंवा काही जण देवाच्या नामस्मरणात वेळ घालवतात. गोपाळ लेले यांनी मात्र वयाच्या ८५व्या वर्षीही ट्रेकिंग आणि फिरस्तीची आवड जपली आहे. त्यांचा उत्साह अगदी विशीच्या तरुणाला लाजवेल असा दांडगा आहे. म्हणूनच 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'नेदेखील त्यांची दखल घेतली आहे.

वयाच्या ८३व्या वर्षी गोपाळ लेले यांनी हिमालयातील 'रुपीन पास' हा ट्रेक केला. त्यानंतर मित्राने त्यांचे नाव 'लिम्का बुक'ला कळवले. आजपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वीपणे ट्रेक केले आहेत. पेशाने इंजिनीअर असलेल्या लेले यांची स्वत:ची कंपनी आहे. आपल्या व्यवसायाबरोबरच त्यांनी ट्रेकिंगच्या आवडीलादेखील १९९८पासून वेळ दिला.

आजवर लेले यांनी यम्नोत्री, गंगोत्री, बद्रिनाथ, केदारनाथ, लेह, लडाख, कांचनगंगा बेस कॅम्प या ठिकाणांना भेट दिली आहे. हिमालयातही अनेकदा ट्रेकिंगची मजा लुटली आहे. भूज ते कन्याकुमारी पायी प्रवास, कांचनगंगा या ठिकाणांचे ट्रेक विशेष लक्षात राहिल्याचे ते सांगतात.

गोपाळ लेले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांना लहानपणापासून शिस्तीची सवय आहे. दररोज पहाटे पाच वाजता त्यांचा दिवस व्यायामाने सुरू होतो. 'ट्रेकिंगचे तंत्र समजले की ते करणे सोपे जाते. ट्रेकसाठी शरीराची क्षमता वाढवावी लागते. यासाठी चालणे, जवळपासच्या गडांवर ट्रेक करणे, अशी तयारी मी करतो. आठवड्यातून दोनदा घोरावडेश्वरला जातो. घरी बनवलेलाच पोषक आहार घेतो. कोणतेच व्यसन नसल्यामुळे माझे आरोग्य उत्तम राहिले आहे,' असे ते अभिमानाने सांगतात. 'या वयात ट्रेक करताना शरीरापेक्षा मनाचे स्वास्थ्य अधिक महत्त्वाचे वाटते. त्यासाठी प्राणायाम, योगासने यांचा फायदा होतो,' असे ते आवर्जून नमूद करतात.

'८२ की २८' हे पुस्तक प्रकाशित

गोपाळ लेले यांनी '८२ की २८' या नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी जीवनप्रवास आणि ट्रेकिंगचे अनुभव लिहिले आहेत. त्यांची या वयातील ऊर्जा पाहिली, की पुस्तकाचे नाव अत्यंत समर्पक असल्याचे पटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तटकरेंचे आरोप बिनबुडाचे

$
0
0

खासदार साबळे यांचे प्रत्युत्तर; वातावरण तापण्यास सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यावर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या पळवापळवीलाही आता सुरुवात झाली आहे. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शहरात येऊन आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून भाजपचे खासदार अमर साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे.

'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या प्रभागरचनेत भाजपच्या कोणत्याही स्तरावरील स्थानिक अथवा वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत,' असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले. भाजपची वाढती ताकद पाहून तटकरे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीकाही साबळे यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी सुनील तटकरे यांनी भाजपने प्रभागरचनेत हस्तक्षेप केल्याचा बिनबुडाचा आरोप केला असल्याचे साबळेंचे म्हणणे आहे.

'आमदार व भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक आजी, माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आणखी काही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एरव्ही क्वचितच पिंपरी-चिंचवडमध्ये येणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही सातत्याने पिंपरी-चिंचवडमध्ये हजेरी लावत आहेत. तरीही ते पक्षातील गळती थांबवू शकलेले नाहीत. खुद्द अजित पवार यांचीच ही अवस्था पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारीही अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातच रविवारी घेतलेल्या मेळाव्याला पक्षाच्याच नगरसेवकांनी दांडी मारल्यामुळे तटकरेंचा आत्मविश्वास कमी होऊ लागला आहे. त्यामुळेच त्यांनी प्रभागरचनेत भाजपच्या नेत्यांकडून हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला आहे. अशा बिनबुडाच्या आरोपांना शहरातील जनता भीक घालणार नाही,' असे खासदार साबळे यांनी म्हटले आहे.

...............

प्रभागरचनेत भाजप नेत्यांनी हस्तक्षेप केल्याचा सुनील तटकरे यांचा आरोप बिनबुडाचा आहे. हा आरोप भाजपला मान्य नाही आणि त्यामुळे भाजपची घोडदौड थांबणार नाही.

- अमर साबळे, भाजप खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चाच्या तयारीला वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेचा निषेध आणि इतर विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे मूक मोर्चे राज्यभर सुरू आहेत. येत्या रविवारी पुण्यात होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये बैठकांना वेग आला आहे. राज्यातील विविध भागांमधून शहरात स्थायिक झालेल्यांना या निमित्ताने साद घातली जात असून, मावळासह शहरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मोर्चात सहभागी होणार आहे.

शहरातील विविध ठिकाणांहून नागरिक मोर्चाला जाण्यासाठी एकत्र जमणार आहेत. त्या अगोदर थेरगाव, ताथवडे, वाकड, रहाटणी, काळेवाडी, तसेच चिंचवड आणि मावळ भागातील समाजबांधव रविवारी सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या डांगे चौकातील पुतळ्याजवळ जमा होऊन औंधमार्गे पुण्यात दाखल होणार आहेत. पिंपरी, खराळवाडी, निगडी, आकुर्डी आदी भागातील समाजबांधव एचए कंपनीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमा होतील आणि तेथून पुण्यात दाखल होणार असल्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.

मोर्चामध्ये सर्वांत पुढे शाळकरी मुले, त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला, त्यांच्यापाठोपाठ प्रौढ व्यक्ती, तरुण असा क्रम राखण्यात येणार असून, समाजाचे पदाधिकारी व नेतेमंडळी सर्वांत शेवटी राहणार आहेत. या मोर्चामध्ये दहा हजार स्वयंसेवक आणि २० रुग्णवाहिका असतील. मोर्चामध्ये नागरिक भगवा ध्वज आणि हाताला काळी फीत बांधून सहभागी होणार आहेत. तसेच मूक मोर्चा असल्याने हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. मोर्चात सहभागी होणारे स्वयंसेवक काळ्या रंगाचे टी शर्ट घालणार असून, त्यांच्याकडे ओळखपत्र असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची कृती जाणूनबुजून

$
0
0

'स्मार्ट सिटी'तून पिंपरीला डावलल्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून निषेध

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

स्मार्ट सिटी प्रकल्प राबवला जाणार असलेल्या शहरांच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश केला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकार ही कृती जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर आणि केवळ राजकारण डोळ्यांसमोर ठेवूनच करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात बुधवारी निदर्शने करण्यात आली.

केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी निवडल्या गेलेल्या शहरांची तिसरी यादी मंगळवारी जाहीर केली. त्यात २७ शहरांची नावे प्रसिद्ध झाली; मात्र पिंपरी-चिंचवडचे नाव त्यात नाही. 'केंद्र सरकारने मुद्दामहून पिंपरी -चिंचवड शहराला डावलले आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. येथे अनेक विकासकामे झाली आहेत. मोठमोठ्या प्रकल्पांमुळे शहराचा कायापालट झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने शहराला 'बेस्ट सिटी' म्हणून सन्मानित केले. 'स्मार्ट सिटी'च्या पहिल्या यादीच्या वेळी पुणे शहरापेक्षा जास्त गुण मिळवूनही पिंपरी-चिंचवडला डावलण्यात आले. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीतही त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. हा पिंपरी-चिंचवडकरांचा अपमान आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शहरातील नागरिक भाजपला घरी बसवतील. शहरात राष्ट्रवादीची पुन्हा एकहाती सत्ता येईल,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि मुख्य सरचिटणीस फजल शेख यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथील चापेकर चौकात निषेध सभाही झाली. या सभेत माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश सदस्या बिंदू तिवारी, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, गिरिजा कुदळे, विद्या नवले, तसेच शिवानी भाट, लता पाटील, कमला तोलनुरे, नरेंद्र बनसोडे, लक्ष्मण रूपनर, तानाजी काटे, राजेद्रसिंह वालिया, सज्जी वर्की, चिंतामणी सोंडकर, मयूर जैस्वाल, तारिक रिझवी, अॅड. क्षितिज गायकवाड, अॅड. अनिरुद्ध कांबळे, संदीपान झोंबाडे, बाळासाहेब सांळुके, सतीश भोसले, भास्कर नारखेडे, पांडुरंग जगताप, कुंदन कसबे, सिकंदर शेख, स्वामी धनगर, सुनील राऊत, चिल्लूराम दांगट, नासीर चौधरी, बाबा बनसोडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा लाखांचे पनीर, तूप चार डेअऱ्यांमधून जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भेसळीच्या संशयावरून शहरातील सोमवार पेठ आणि शुक्रवार पेठेतील डेअऱ्यांमधून पनीर, तूप, लोणी या पदार्थांचा पाच लाख ८४ हजार ५२० रुपयांचा साठा जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली.

'एफडीए'चे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षितता अधिकारी विजय उनवणे, दशरथ बांबळे, जगदीश सोनवणे, श्रीमती खेमा सोनकांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. चारही डेअऱ्यांतील पदार्थांचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून, विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

सोमवार पेठेतील लकी डेअरीतील दुकानावर छापा टाकण्यात आला. तेथून भेसळीच्या संशयावरून नऊशे किलो पनीर, १९५ किलो फॅट स्प्रेड असा तीन लाख २१ हजार ६०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सोमवार पेठेतील बालाजी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट यांच्या दुकानावर छापा टाकून गायीच्या २७० किलो तुपाचे १८ टिन, म्हशीचे दीडशे किलो तूप, तसेच गायीचे २१० किलो तूप असा दोन लाख १४ हजार २०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

शुक्रवार पेठेतील तिरुमला डेअरी प्रॉडक्ट्सच्या गोदामावर छापा टाकून एक लाख ८२ हजार ५२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच खराडीतील शिवदत्त डेअरीतून १९ हजार २०० रुपयांचे ८० किलोचे पनीर जप्त करण्यात आले, अशी माहिती 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन मिरवणुकीत डीजेसाठी घरफाेडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत 'डीजे' लावायचा असून, ती मिरवणूक लक्ष्मी रोडने न्यायची आहे. त्यासाठी खर्च येणार आहे,' असे भावनाविवश आवाहन करीत अल्पवयीन मुलाकडून त्याच्या घरातील दागिन्यांची माहिती घेऊन घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक झाली, तर दुसरा सराईत गुन्हेगार पसार आहे.

या प्रकरणी सारिका अमरसिंह पवार (वय ३२, रा. मंगळवार पेठ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पवार यांच्या घरात चोरी झाल्याची घटना गेल्या गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. ही माहिती समजताच फरासखाना पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी घेतलेल्या माहितीनंतर चोरटा ओळखीचा असण्याची शक्यता पोलिसांना वाटत होती. त्यानुसार त्यांनी घरातील अल्पवयीन मुलांकडे चौकशी केल्यानंतर या घटनेला वाचा फुटली, अशी माहिती फौजदार राजारामसिंह चौहान यांनी दिली.

या घरफोडी प्रकरणी भारत किसन पवार (वय १९, रा. शुक्रवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे, तर साळुंके नावाचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार पसार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. गाडीतळ येथे वीर हनुमान मित्र मंडळ आहे. या मंडळामध्ये पवार यांच्या घरातील अल्पवयीन मुलगा कार्यकर्ता आहे. गणपतीचे आकर्षण असलेल्या या मुलाला आपल्या मंडळाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात व्हावी, असे वाटत होते.

आरोपींना त्याच्याबाबत कल्पना आल्यानंतर त्यांनी त्याच्याकडून घरातील दागिन्यांची, ते कुठे ठेवले जातात, याची माहिती घेतली आणि दरम्यानच्या काळात घरफोडी करत दागिने चोरले. पोलिसांनी या मुलाकडे चौकशी केल्यानंतर आरोपींची माहिती मिळाली आणि पवारला अटक झाली. साळुंके पसार झाला असून, चोरीतील काही दागिने त्याच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी पवारकडील एक लाख ८४ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले असून पवारचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात मनसेचे आंदाेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभारावरील आक्षेपांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी विभागात आंदोलन केले. परीक्षा नियंत्रकांना घेराव घालत पक्षाने विभागाच्या कारभाराविरोधात आक्षेप घेतले; तसेच अशा प्रकारांना जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी कुलगुरूंकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली.
परीक्षा विभागाने एका पर्यावरणशास्त्राच्या विद्यार्थ्याला भलतीच पदवी दिल्याची तक्रार पक्षाकडे आली होती. पक्षाने त्या विषयी विभागाला लेखी निवेदन देत, योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती. विद्यापीठाने या बाबतीत चूक कबूल केली, मात्र ती सुधारण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. पदवीही बदलून दिली नाही. पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेबाबतही अनेक तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. या कारभारामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाला विद्यापीठाचा परीक्षा विभागच जबाबदार असल्याचा आरोप पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला. पुनर्मूल्यांकनादरम्यान विद्यापीठाची चूक आढळल्यास, विद्यार्थ्यांचे त्यासाठी घेतलेले शुल्क परत करा, पूनर्मूल्यांकनासाठी निश्चित कालावधी ठरवून द्या आदी मागण्याही या निमित्तानेच पक्षाने कुलगुरूंना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये केल्या आहेत. पुणे शहराध्यक्ष हेमंत संभूस, सुधीर भदे, ऋषी सुतार, आनंद बापट, चंद्रकांत गोगावले, राहुल गवळी, ज्योती कोंडे, तुषार भामरे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
..............
वृक्षतोडीविरोधात महापालिकेकडे तक्रार
विद्यापीठाच्या आवारात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या वृक्षतोडीविरोधात सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. ही वृक्षतोड करण्यासाठी विद्यापीठाने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची ओरड मंचाने केली आहे. त्यामुळेच ही वृक्षतोड अनधिकृत असून, त्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी मंचाने केली आहे. विद्यापीठात सातत्याने सुरू असलेल्या वृक्षतोडीला पालिका प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप मंचाच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. या प्रकरणी महापालिकेने कारवाई न केल्यास, या प्रकरणी मुख्यमंत्र्‍यांकडे तक्रार करण्याचा इशाराही मंचाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँन्टोन्मेंटमधील हॉस्पिटलेही फुल

$
0
0

डेंगीपेक्षा चिकुनगुनियाचे पेशंट अधिक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतही डेंगी आणि चिकुनगुनियाची साथ पसरली असून, कँन्टोन्मेंटमधील सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल सध्या पेशंटांनी हाउसफुल झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यात डेंगीचा उद्रेक सुरू आहे. राज्यातील सर्वाधिक चिकुनगुनियाचे पेशंट पुण्यात आढळून आले आहेत. शहरातील हीच परिस्थिती पुणे कँन्टोन्मेंट बोर्डातही दिसून येत आहे. 'पटेल हॉस्पिटलमध्ये लष्करात कार्यरत अनेक डेंगीग्रस्त पेशंट दाखल झाले आहेत. जून ते सप्टेंबदरम्यान डेंगीपेक्षा चिकुनगुनियाचे पेशंट अधिक असल्याचे दिसून आले आहेत. आतापर्यंत कँटोन्मेंट परिसरात चिकुनगुनियाचे ८०, तर डेंगीचे २० पेशंट आढळले आहेत. त्यामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत आहे,'अशी माहिती सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. महाजन यांनी दिली.
हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या पेशंटांमध्ये बहुतांश जण भवानी पेठेतील आहेत. त्यामुळे आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर ओपीडी विभागात बोर्डाच्या हद्दीबाहेरील पेशंटनी विचारणा करू नये, अशा स्वरुपाचे फलक लावल्याची माहितीही डॉ. महाजन यांनी दिली. वाढते पेशंट लक्षात घेता आम्ही धूरफवारणी, औषध फवारणी कऱण्यास सुरुवात केली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी टाक्यांमध्ये औषधे टाकली जात आहेत. साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची पैदास झाल्यास तेथील अंडी नष्ट कऱण्यात येत आहेत. त्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती कँन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक एस. डी. झेंडे यांनी दिली.
..
कर्मचाऱ्यांनाही चिकुनगुनिया
पटेल हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या पेशंटांबरोबरच उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचारीही चिकुनगुनियाग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात डासांची पैदास अधिक असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
..
कँटोन्मेंट परिसरातील २५ ते ३० ठिकाणी डासांच्या अंडीची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. शिवाजी मार्केट, भीमपुरा तसेच आझम कॅम्पस या भागात ही उत्पत्तीस्थाने आढळली आहेत.
एस. डी. झेंडे, आरोग्य अधीक्षक, पुणे कँन्टोन्मेंट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'मोहन भागवत हे भारताचे हिटलर'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'केंद्र सरकार मोदींचे अथवा भारतीय जनता पक्षाचे असल्याचा भ्रम आहे. वास्तविक हे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फॅसिस्ट संघटना असून, सरसंघचालक मोहन भागवत हे देशाचे हिटलर आहेत,' अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. भाई वैद्य यांनी बुधवारी केली.

विविध परिवर्तनवादी संघटनांतर्फे आयोजित 'लोकशाहीसाठी संघर्ष यात्रे'च्या उद् घाटन सभेत वैद्य बोलत होते. या वेळी दक्षिणायनचे डॉ. गणेश देवी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भालचंद्र कांगो, लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) नेते कॉ. भीमराव बनसोड, राष्ट्रसेवादलाचे सदाशिव मगदूम, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव आणि लोकायतचे नीरज जैन उपस्थित होते.

'देशावर फॅसिझमचे संकट आले आहे. संघ ही रेटून खोटे बोलणारी, हिंसेवर विश्वास असणारी संघटना आहे. त्यांचा आणि त्यांच्या सरकारचा राज्यघटनेवर विश्वास आहे, हा भ्रम आहे. त्याचा प्रतिकार करणे आवश्यक आहे. पुढील निवडणुकीत आपला पराभव होईल, असे दिसू लागल्यास ते लष्कराच्या मदतीने सत्ता बळकावतील,' असे वैद्य यांनी सांगितले. संघ ही घटना न मानणारी, दलित व आदिवासींबद्दल प्रेम नसणारी, संघटना आहे. त्यांच्या विरोधात परिवर्तनवादी संघटनांनी एकत्रित येऊन लढण्याची गरज आहे, असेही वैद्य म्हणाले.

'अर्थनीतीच्या प्रभावामुळे लोकशाही कमकुवत होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीचा बचाव करण्यासाठी असंख्य तरुण यात्रेत सहभागी होत आहेत. त्यांची संख्या महत्वाची नसून, त्यातून इतिहास घडणार आहे, हे लक्षात घ्यावे. महाराष्ट्राने दिल्लीचे नेतृत्त्व करण्याच्या विचार करण्यापेक्षा जगाला प्रगतिशील विचार देण्याची शक्ती आहे,' असे डॉ. देवी यांनी सांगितले.

'सध्याच्या परिस्थितीत सामाजिक असंतोष वाढू लागला आहे. त्याचा विस्फोट होऊ पाहात आहे. वर्चस्ववादाच्या काळात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,' असे कांगो म्हणाले. अलका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत पा​र्किंग हद्दपार करा

$
0
0

-वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक उपायुक्तांची सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तसेच, नो पार्किंगचा प्रश्न निकालात काढण्यासाठी मोफत पार्किंग ही संकल्पना इतिहासजमा करण्याची गरज आहे,'असे स्पष्ट मत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी व्यक्त केले.
रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिस कारवाई करतील; मात्र ही वाहने ठेवण्यासाठी पुरेशी जागा शहरात उपलब्ध आहेत का, असा सवालही डॉ. मुंढे यांनी उपस्थित केला. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक शंभर मीटर अंतरावर पोलिस कर्मचारी उपलब्ध होऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले. पुण्यात वाढत जाणारी वाहतुकीची समस्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांच्या मदतीने काही उपाययोजना करता येतील का, याविषयी चर्चा करण्यासाठी महापालिकेत खास सभेचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी श्री‌निवास बोनाला आदी उपस्थित होते.
शहराचा चारही दिशांना मोठा विस्तार होत असून, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट होत आहे. अनेक महत्वाच्या रस्त्यांवर तसेच चौकाचौकात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी एकत्र येऊन काम केल्यास हा प्रश्न सोडविण्यात यश येईल. शहरातील अनेक रस्त्यांवर सम-विषम तारखेनुसार पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर पोलिस कारवाई करीत नाहीत. वाहतुकीचे नियोजन करण्यापेक्षा वसुली करण्यावर पोलिसांचा भर आहे. महापालिकेकडून आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची परवानगी मिळावी, यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जांना केराची टोपली दाखविण्यात येते. फूटपाथवरील अनधिकृत पथारींच्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार सर्वपक्षीय सभासदांनी डॉ. मुंढे यांच्या समोर मांडली.
शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोफत पार्किंग असल्याने नागरिक सर्रास रस्त्यांवर वाहने उभी करतात. पार्किंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याने दिवसभर रस्त्यांवर वाहने उभा केली जातात. त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाह‌तुकीची कोंडी होते. रस्त्यांवर होणारे पार्किंग बंद करण्यासाठी मोफत पार्किंगला आळा घातला पाहिजे, असेही डॉ. मुंढे म्हणाले. 'नो पार्किंग'मध्ये वाहने उभी करणाऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कातही वाढ करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
..
डॉ. मुंढे उवाच
शहरात प्रत्येक शंभर मीटरला वाहतूक पोलिस देणे अशक्यच.
वाहतूक दिव्यांची यंत्रणा सुधारण्याची गरज.
वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी.
प्रत्येक प्रभागात जाऊन वाहतुकीचे प्रश्न सोडविणार.
सिग्नल यंत्रणा सुधारण्यासाठी पालिकेने सक्षम इंजिनीअर द्यावेत.
विकास कामांसाठीचे 'ना हरकत' प्रमाणपत्र तातडीने द्यावे.
महापालिका, वाहतूक पोलिसांनी समन्वय राखावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीच्या मूळावर रिक्त जागा?

$
0
0

राज्याच्या मागणीपेक्षा केंद्राकडून कमी निधी प्राप्त

Yogesh.Borate@timesgroup.com
...........
Tweet : @YogeshborateMT

पुणे : राज्याच्या शिक्षण खात्यातील रिक्त जागांवर अखेर केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाने बोट ठेवल्याचा मोठा फटका खात्याला बसला आहे. या रिक्त जागा भरण्याच्या लेखी हमीवर केंद्राने यंदा शिक्षक शिक्षणासाठीचा निधी राज्याकडे वळता केला आहे. रिक्त जागांच्या पार्श्वभूमीवर राज्याने जवळपास दीड अब्ज रुपयांची मागणी केली असताना, चालू आर्थिक वर्षासाठी केंद्राने त्यापैकी केवळ ३९ कोटी १५ लाख रुपयांचीच मदत केल्याचे स्पष्ट होत आहे.
केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाने विविध राज्यांच्या शिक्षण प्रशिक्षण योजनांचा नुकताच आढावा घेतला होता. मंत्रालयाच्या 'टीटिचर्स एज्युकेशन अॅप्रुव्हल बोर्डा'ने या योजनांच्या आधारे आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी राज्यांना निधी निश्चित केला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या या प्रक्रियेची माहिती मंत्रालयाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यातूनच राज्याने मोठ्या प्रमाणात मागणी केली असताना, केंद्राने तुलनेने कमी रक्कमेचा निधी राज्याला मंजूर केल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थांसारख्या (डीआयईटी) संस्थांमधील रिक्त पदे, ती भरण्याविषयी राज्य सरकारने दिलेले आश्वासन, राज्यातील शिक्षकांची वाढती गरज आदी मुद्द्यांचा त्यासाठी विचार करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
या कागदपत्रांमध्ये नमूद मुद्द्यांनुसार, राज्याच्या शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंद कुमार यांनी शिक्षक प्रशिक्षणाविषयीची राज्याची कामगिरी आणि प्रस्तावित योजनांविषयी सादरीकरण केले. सेवेत असलेल्या शिक्षकांच्या समस्यांविषयी 'युनिसेफ' आणि 'एससीईआरटी'ने एकत्रितपणे अभ्यास केला. त्यातून राज्य आणि जिल्हा पातळीवर शिक्षकांच्या पदांची संख्या वाढविणे, तसेच रिक्त पदे भरणे ही गरज समोर आल्याचे या सादरीकरणात सांगण्यात आले. 'एससीईआरटी'ला बळकटी देण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या प्रयत्नांचीही सादरीकरणात माहिती देण्यात आली. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या नियमांचा विचार करता, चालू वर्षात राज्यात ७ हजार ४१३ अपात्र शिक्षक आहेत. डीआयईटी आणि एससीईआरटीमध्ये अनुक्रमे दोनशे आणि ३३ जागा भरण्याची प्रक्रिया नुकतीच झाली. राज्यभरातील 'डीआयईटी'मध्ये उपलब्ध असलेल्या एकूण १ हजार ८७२ जागांपैकी केवळ ४० टक्के, अर्थात ७५६ जागांवर प्रवेश झाल्याचेही या सादरीकरणात राज्याकडून सांगण्यात आले. सादरीकरणानंतर राज्याने काही बाबींची हमी दिल्यावर केंद्राने संबंधित निधी राज्याला मंजूर केल्याचेही या कागदपत्रांमधून स्पष्ट होत आहे.
000
'डीआयईटी'च्या रिक्त जागा भरणार
शिक्षण खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या बाबीला दुजोरा दिला. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने ही बाब समोर येत असल्याचेही स्पष्ट केले. याच प्रकारामुळे येत्या काही दिवसात 'डीआयईटी'मधील रिक्त जागांवरील भरती पूर्ण होणार आहे. 'एससीईआरटी'मधील भरतीची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होणार असून, त्यासाठी स्वतंत्र शासकीय निर्णय लवकरच निघणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर 'मटा'ला सांगितले. या प्रक्रियेसाठी शिक्षण खात्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्याचेही या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलवसुलीचे उद्दिष्ट पूर्णत्वाच्या मार्गावर

$
0
0

एक्स्प्रेस-वेवरील टोलनाके बंद करण्याची 'सजग'ची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर टोल वसुलीचे अपेक्षित उद्दिष्ट जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या टोल आकारणीतून २०१९पर्यंत दोन हजार ८६९ कोटी रुपये जमा होणे अपेक्षित होते. मात्र, २० सप्टेंबरपर्यंत दोन हजार ८१२ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे अडीच वर्षांआधीच टोल कंपनीला पैसे मिळाले असून, उर्वरित मुदतीचे व्याज गृहीत धरल्यास संपूर्ण रक्कमच मिळाल्यासारखी आहे. त्यामुळे सरकारने आतातरी एक्स्प्रेस-वेवर टोल आकारणी बंद करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्र्यांकडे बुधवारी केली.
एक्स्प्रेस-वेवर उर्से, कुसगाव, खालापूर आणि पनवेल असे चार टोलनाके आहेत. हा रस्ता २००४पासून सुरू झाल्यापासून येथे टोलवसुली करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि टोल कंपनीत झालेल्या करारानुसार २०१९पर्यंत टोल वसुलीतून दोन हजार ८६९ कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात २० सप्टेंबरपर्यंत संबंधित कंत्राटदार कंपनीला टोल वसुलीतून दोन हजार ८१२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मुदतीआधीच या कंपनीचे टोल वसुलीचे उदिष्ट पूर्ण झाले आहे. परिणामी, एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुलीचे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. दरम्यान, कंत्राटातील अटी-शर्तीनुसार पुढील दोन वर्षे केवळ रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदार कंपनीवर ठेवावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
टोल कंपनीला आता केवळ ५७ कोटी रुपये मिळणे बाकी आहे. करारानुसार टोल कंपनीला पुढील अडीच वर्षात मिळणे अपेक्षित असणारे ७०० कोटी रुपये अगोदरच मिळाले आहेत. त्या ७०० कोटी रुपयांचे बँकेला भरावे लागणारे व्याज माफ होणार आहे. हा विचार करता टोल कंपनीला टोल वसुलीतून मिळणारी संपूर्ण रक्कम अडीच वर्षे आधीच मिळाली आहे. त्यामुळे तातडीने एक्स्प्रेस-वेवरील टोलनाके बंद करावेत. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यावर टोलनाके बंद करू, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे टोल वसुली पूर्ण झालेल्या रस्त्यांसाठी तरी टोल आकारणी बंद करावी, असे वेलणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी मुक्कामांच्या विकासासाठी ७७ कोटी

$
0
0

विभागीय आयुक्तांनी दिली दौंड तालुक्याला भेट

म. टा. वृत्तसेवा, दौंड

पंढरपूर, देहू, आळंदी तीर्थस्थळ विकास आराखडा २०१०नुसार संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील सर्व पालखी मुक्कामाच्या ठिकाणांचा आणि गोल रिंगण होणाऱ्या गावांच्या विकासासाठी ७७ कोटी रुपये खर्चण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी यवत येथे दिली.
चोक्कलिंगम यांनी बुधवारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणांची पाहणी केली. या वेळी त्यांनी दौंड तालुक्यातील यवत, वरवंड येथे भेट दिली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, देहू देवस्थानचे विश्वजित मोरे, दौंड-पुरंदरचे प्रांत संजय आसवले, दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे ,गटविकास अधिकारी संतोष हराळे, पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, यवतच्या सरपंच रजिया तांबोळी, उपसरपंच समीर दोरगे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश जाधव, यवतचे मंडलाधिकारी डी. सी. शेळकंदे, सुभाष यादव, भाऊसाहेब दोरगे, शंकरराव दोरगे यांच्यासह विद्युत, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता, आरोग्य अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
विकास आराखडा २०१०नुसार ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, तुकाराम महाराज पालखी सोहळा, संत सोपानकाका पालखी सोहळा रात्रीच्या वेळी जेथे मुक्कामाला असतो, त्या गावांचा विकास करण्यात येणार आहे. प्रत्येक मुक्कामस्थळाला दोन कोटी रुपयांचा तर, गोल रिंगण होणाऱ्या ठिकाणांना पन्नास लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये मेघडंबरी बांधणे, सार्वजनिक स्वच्छतागृह, स्नानगृह, पाणी पुरवठा टाकी बांधकाम, सभागृह बांधकाम, पालखी काळात देखरेख करण्यासाठी वॉच टॉवर उभारणी, गावात प्रवेश करणारे, गावांदरम्यान असणारे रस्तेउभारणी आदी कामे करण्यात येणार आहेत.
..
विकासकामांसाठी जमिनीची कमतरता भासत असेल, तर भूसंपादनासाठी निधीचा वापर करण्यात येणार आहे. आषाढी पालखी सोहळा मार्गावरील ३० मुक्कामाची ठिकाणे आणि नऊ रिंगण ठिकाणांसाठी ७७ कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत.
एस. चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images