Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मराठवाडा मुक्तीनंतरही समस्या कायम : मकरंद अनासपुरे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'मराठवाडा हा १९४८ मध्ये मुक्त झाला; पण अजूनही त्याला कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळाचा सर्वात जास्त त्रास मराठवाड्याला भोगावा लागत आहे. त्यामुळे सध्या मराठवाड्यातील पाणी प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन भांडण्याची गरज आहे,' असे परखड मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भोसरीमध्ये व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांच्या वतीने एकत्र येऊन भोसरीमध्ये मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शनिवारी (१७ सप्टेंबर) अनासपुरे बोलत होते. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पश्चिम महाराष्ट्र भाजप संपर्क प्रमुख एकनाथ पवार, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी आमदार विलास लांडे, पत्रकार विलास बढे, समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी मकरंद अनासपुरे म्हणाले, 'मराठवाड्यातील माणसांमध्ये सहनशीलता आहे; पण अति सहनशीलता ही चुकीची आहे. त्यामुळे तेथील प्रश्नांना तरुण लोक प्रतिनिधींनीही वाचा फोडली पाहिजे. मागील तीन वर्षे नाही तर २०१२ पासूनच दुष्काळाच्या समस्येने मराठवाड्याला ग्रासले आहे, आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेच मराठवाड्यामध्ये नाम फाउंडेशन अंतर्गत काम करताना लोकसहभाग हा जास्त महत्वाचा आहे. तेथील बांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले की, आपण केलेल्या कामाचे समाधान वाटते,' असेही ते म्हणले.
तसेच 'शहरामध्ये मराठवाड्यामधून शिक्षणासाठी येणारे बरेच विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी बाजारपेठांची व्यवस्था केली जावी,' अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली. त्याचप्रमाणे मराठवाड्याला हुंड्याचा मोठा शाप आहे, असे सांगत हुंडा न घेण्याचेही आवाहन केले. अशा मंचावर येऊन नुसते एका दिवसापुरते साजरे करून न थांबता एकत्र येऊन विचार मंथन करावे, आणि ही चळवळ अशीच चालू ठेवावी असे आवाहनही त्यांनी केले.
सुभाष देशमुख यांनी मराठवाडा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा देत मकरंद अनासपुरे यांनी दिलेल्या संदेशाच्या अनुषंगाने काही करता येईल का या दृष्टीने विचार केला जावा. अनेकाच्या त्यागातून, बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळालेले आहे, ते टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. यावेळी मराठवाड्यातील बांधवांना आपण गरीब किंवा मागास आहेत, असे कधीही सांगू नका तर देवाने प्रत्येकाला विशिष्ट वरदान दिले आहे. मराठवाड्यातील नागरिकांनीही आपण ताकदवान आणि संघटीत आहोत,' असे म्हणले पाहिजे असे आवाहन केले. त्याचबरोबर मराठवाड्याच्या आसपासच्या परिससरातून विविध प्रकाराने नैसर्गिक देणे मराठवाड्याला लाभले आहे पण त्याची योग्य कदर न केल्यामुळे आपण मागे पडलो, पुढील काळात मराठवाड्यातील मुलांकडून मराठवाड्यात काय काय पिकते, काय काय तयार होत आहे त्याची प्रदर्शने भरवावीत, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
डॉ. श्रीपाल सबनीस हे स्वतः मराठवाड्याचे आहेत. त्यामुळे कार्यक्रमाला प्रोत्साहन देत कौतुक केले. तसेच इतक्या योग्य लोकांना एकत्रित करून तसेच १७ मंडळांनी एकत्र येऊन घेतलेला कार्यक्रम म्हणजे उल्लेखनीय गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
या वेळी वनिता मोहिते यांच्या संजीवनी महिला शाहिरी पथकाचा शाहिरी मुजरा हा कार्यक्रम झाला. तसेच यावेळी एकनाथ पवार, पत्रकार विलास बढे, सुलभा उबाळे, विलास लांडे, शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेंद्र कोरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम दंडीमे यांनी केले तर शिवहार मरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​तरुण वाचकांपर्यंत प्रकाशकांनी पोहोचावे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कन्नड भाषेत शिक्षण होऊनही मराठी ग्रंथ क्षेत्रात पांडुरंग कुमठा यांनी सचोटीने कार्य केले आहे. त्यांचा आदर्श ग्रंथ व्यवहारातील प्रत्येक घटकाने समोर ठेवला पाहिजे. नवनवीन विषय हाताळणे, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे, तरुण वाचकांपर्यंत पोहोचणे, अशा विविध आघाड्यांवर प्रकाशकांनी काम करणे आवश्यक आहे', अशा सूचना माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी केल्या.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारांचे वितरण डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. बॉम्बे बुक डेपोचे पांडुरंग कुमठा यांना जीवनगौरव; तर शकुंतला आठवले यांच्या 'भारतीय तत्त्वविचार' या कॉन्टिनेन्टल
प्रकाशनाच्या ग्रंथाला उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी अन्य पुरस्कारांचेही वितरण झाले. प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष शशिकला उपाध्ये, शरद गोगटे या वेळी उपस्थित होते.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, 'लेखक लिहीत असतात; पण त्यांचे लेखन वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम प्रकाशक, वितरक आणि ग्रंथ विक्रेते करतात. ग्रंथ व्यवहाराची ही साखळी महत्त्वाची असून ग्रंथ व्यवहार म्हणजे एक प्रकारची समाजसेवा आहे. जे प्रकाशक वाचकांची नस ओळखून वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित करतात, त्या प्रकाशकांविषयी वाचकांच्या मनात नेहमीच आदरयुक्त जिव्हाळा असतो. जनमानसात प्रयोगशील प्रकाशकांची प्रतिमा चांगली असते; कारण ते समाजापुढे पुस्तकांच्या माध्यमातून नेहमीच वैविध्यपूर्ण विषय मांडत असतात'. नितीन गोगटे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​डीपीचे भवितव्य अधांतरीच

0
0

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) राज्य सरकारला सादर होऊन आता वर्ष पूर्ण होत आले, तरीही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार डीपीच्या मान्यतेला आणखी दोन महिने लागणार आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने डीपीला मंजुरी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मंजूर केलेला डीपी रद्द करून नव्याने तयार करण्याची मागणीही पक्षातील एका गटातून होत आहे. त्यामुळे डीपीचे भवितव्यही अधांतरीच आहे.
पुणे महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला शहराचा डीपी सरकारला वेळेत सादर करता आला नाही. त्यामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये सरकारने हा डीपी महापालिकेच्या ताब्यातून काढून घेतला. या डीपीवरील पुढील निर्णय घेण्यासाठी सरकारने त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीने गेल्या वर्षी सप्टेंबरअखेरीस हा डीपी सरकारला सादर केला आहे. त्याला आता वर्ष पूर्ण होणार असले, तरीही अद्याप राज्य सरकारने त्याला मंजुरी दिलेली नाही. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने डीपीला मान्यता मिळणे गरजेचे असताना, भाजप सरकारची त्याबाबतची भूमिका संदिग्ध राहिली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांत डीपीला मान्यता देण्याचे जाहीर आश्वासन दिले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी डीपीला मान्यता देण्यात येण्याची चिन्हे आहेत.
राज्य सरकार नियुक्त त्रिसदस्यीय समितीने तब्बल ३८० आरक्षणे वगळल्याचा आरोप पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. तसेच शहरासाठी महत्त्वाची असलेली शाळा, दवाखाना, क्रीडांगणे अशा आरक्षणांमध्येही बदल झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली आहे. शहराच्या डीपीवर चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजपच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीवर विरोधी पक्षांसह राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेनेही टीकास्त्र सोडले आहे. शहराचा डीपी हा केवळ भाजपची मालमत्ता नाही. त्यामुळे सर्वच पक्षाच्या आमदारांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर डीपीचे नक्की काय होणार, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
डीपीवरून भाजपमध्येच दोन गट पडले असून, शहरातील काही ज्येष्ठ नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या मते हा आराखडा अत्यंत सदोष आहे. त्यामुळे त्यात कोणताही बदल करण्यापेक्षा तो पूर्णतः रद्द करून संपूर्ण डीपी नव्याने करणे अधिक संयुक्तिक ठरेल, असा दावा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि नाशिक या दोन शहरांचे डीपी असेच रद्द करून पुन्हा नव्याने करण्याचे आदेश दिले होते. हाच न्याय पुण्यासाठी वापरून निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण डीपीच नव्याने करण्याची गरज भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरुषोत्तम’ ‘एसपी’कडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अरे आवाज कुणाचा 'एस. पी. कॉलेज'चा... अशी आरोळी घुमली आणि तरुणांची नाट्यपंढरी असलेले भरत नाट्य मंदिर रविवारी रात्री दुमदुमून गेले. सर परशुरामभाऊ कॉलेज यंदाच्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे विजेते ठरले. त्यांच्या '३०० मिसिंग' या एकांकिकेने करंडकावर नाव कोरले.

द्वितीय क्रमांकाचा हरि विनायक करंडक कमिन्स इंजिनीअरिंग कॉलेज फॉर विमेनला 'चित्री' या एकांकिकेसाठी जाहीर झाला. याच एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा जयराम हर्डीकर करंडकही जाहीर झाला. 'पीआयसीटी'ची 'अवडंबर' ही एकांकिका तृतीय क्रमांकाच्या संजीव करंडकाची मानकरी ठरली.

एस. पी. कॉलेजचा यश रुईकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला. 'एसपी'च्याच गौरव बर्वे याला सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य आणि वाचिक अभिनयाचेही पारितोषिक जाहीर झाले. यश रुईकर याला अभिनय नैपुण्य (अभिनेता) आणि 'चित्री' या एकांकिकेसाठी 'कमिन्स'च्या शरयू घाटे हिला अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) पारितोषिक जाहीर झाले. 'कमिन्स'च्या शुभदा भागवत हिला 'चित्री'साठी, तर 'पीआयसीटी'च्या ऐश्वर्या गायकवाड हिला 'अवडंबर'साठी दिग्दर्शनाचे उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले.

'महाराष्ट्रीय कलोपासक'तर्फे आयोजित स्पर्धेचे यंदाचे बावन्नावे वर्ष होते. रविवारी रात्री झालेल्या अंतिम फेरीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. प्रतीक्षा गडम, परितोष भिडे, यशश्री ढिकळे, शाळवी पाळंदे, पूर्वा राजाज्ञा, शांभवी शेटे, पूर्वा मुंघटे, भावेश जोशी, अभिषेक रानडे आणि ऐश्वर्या गायकवाड यांना अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले.

श्रीमती काशीबाई नवले इंजिनीअरिंग कॉलेजची प्राजक्ता तिवारी हिला 'पारडं' एकांकिकेसाठी उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शिका, भिवराबाई सावंत इंजिनीअरिंग कॉलेजच्या अजित तोरसकर याला 'कुडाज्ञान'साठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक, जयवर्धन खोत याला 'पारडं'साठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक, 'चित्री'साठी स्वप्ना पुराणिक हिला उत्तेजनार्थ विद्यार्थिनी लेखिका पारितोषिक जाहीर झाले. सर्वोत्कृष्ट आयोजित संघाचे भालचंद्र मानचिन्ह कावेरी कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सला मिळाले. दिलीप जगताप, डॉ. माधवी वैद्य आणि हिमांशू स्मार्त यांनी परीक्षण केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता भरत नाट्य मंदिर येथे होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पीएमपीला ऊर्जा कधी मिळणार?

0
0

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सक्षमीकरणासाठी नव्याने १२०० बसची खरेदी करणे, प्रवाशांच्या सोयीसाठी मोबिलिटी कार्ड उपलब्ध करून देणे, बीआरटी मार्ग त्रुटीविरहीत करून नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देणे, कात्रज-हडपसर बीआरटी मार्ग रेनबो बीआरटीच्या धर्तीवर विकसित करून पुन्हा सुरू करणे, पीएमपीचे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले असे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी हे प्रश्न मार्गी लागणार की निवडणुकीनंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पीएमपीची सध्याची परिस्थिती नाजूक आहे. दिवसेंदिवस संचित तोट्यात भर पडत आहे. त्यामुळे पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी बसची संख्या वाढविणे, डेपो व वर्कशॉपचे आधुनिकीकरण करण्याची योजना तत्कालीन अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनी मांडली होती. त्यानुसार पीएमपीच्या ताफ्यात ७०० नवीन बस आणि ५०० बस कंत्राटी तत्त्वावर घेण्यास मान्यता मिळाली आहे. आता पीएमपीकडे स्व-मालकीच्या आणि भाडेकराराच्या मिळून २०५५ बस आहेत. त्यापैकी १४०० गाड्यांची मालकी पीएमपीकडे आहे. सध्या सरासरी १५०० गाड्या संचलनात आहेत. त्यापैकी ५४४ गाड्या भंगारात काढण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने नवीन बसची खरेदी करणे आवश्यक आहे.
बस खरेदीबरोबरच पीएमपीचे अनेक उपक्रम आहेत. त्यामध्ये बसने प्रवास करताना सुट्ट्या पैशांची अडचण अनेकदा जाणवते. त्यावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात अनेकदा वाद घडतात. ते दूर करून भविष्यातील सर्वच प्रवासी वाहतुकीसाठी एकच कार्ड वापरण्याचे प्रमुख उद्दिष्ट ठेवले होते. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग मशिनची यंत्रणा उभारण्यात येणार असून, सुरुवातीला पासधारकांना, तर त्यानंतर दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे 'मोबिलिटी कार्ड' वितरित केले जाणार आहे. ऑगस्टअखेरपर्यंत सर्व डेपोंमध्ये ही यंत्रणा उभारण्यात येणार होती. मात्र, अद्याप सर्व डेपोंमध्ये ती कार्यान्वित झालेली नाही. तसेच, शहरातील डेपोंची संख्या वाढविण्यासाठी पीएमपीने महापालिकेकडे उपनगरातील बंद पडलेल्या जकात नाक्यांची जागा डेपोसाठी मागितली होती. वर्कशॉपचे आधुनिकीकरण हादेखील एक प्रलंबित प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापू भेगडेंवर होणार होता हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब भेगडे यांच्यावर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र, भेगडे एका उद् घाटनाच्या कार्यक्रमाला न गेल्याने तो हल्ला होऊ शकला नाही, अशी धक्कादायक कबुली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) अटकेत असलेल्या आरोपींनी दिली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) भेगडे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा कट उधळून लावला असून, पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींच्या चौकशीत भेगडे यांच्या खुनाचा कट समोर आला. पोलिसांनी आरोपींकडून तीन पिस्तुल, चार गावठी कट्टे आणि २३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भेगडे यांच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भेगडे यांच्या भाच्यांचे तळेगाव परिसरातील काही जणांशी पटत नाही. भेगडे आपल्या भाच्यांना पाठीशी घालत असल्याने त्यांचाच 'काटा' काढण्यासाठी कट रचण्यात आला होता. या कटामधील मुख्य सूत्रधार असलेल्या शाम दाभाडे याचे भेगडे यांच्याशी पटत नव्हते. त्यामुळे दाभाडे याचा भेगडे यांच्या खुनाचा कट रचण्यात महत्त्वाचा भाग होता. भेगडे आठ सप्टेंबर रोजी एका उद् घाटनच्या कार्यक्रमाला जाणार होते. आरोपींना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हल्ल्याचा कट रचला होता. मात्र, ऐनवेळी भेगडे त्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने आरोपींचा कट फसला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम जाधव यांना आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाई झाली आणि या कटाचे भांडे फुटले, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मयूर ऊर्फ बंटी नामदेव टकले (रा. तळेगाव), जावेद ऊर्फ बाबा अब्दुल बागेवाडी (वय ३८, रा. दत्तवाडी, आकुर्डी), आदित्य गणेश भेगडे (वय २०), सचिन सुरेश गरुड (वय २७), व्यंकटेश ऊर्फ नाना केशू राठोड (वय २१), शंकर सत्यनारायण भालके (वय २२), रोहन ऊर्फ सनी चंद्रकांत गरुड (वय २७ रा. शनिवार पेठ तळेगाव), अजिंक्य महादेव सरोदे (वय २३), अविनाश ऊर्फ बुटल्या राजू भालेकर (वय २३), निखिल गुलाब घोडके (वय २६, सर्व जण रा. तळेगाव), अहमद ऊर्फ शाहिद चांद शेख (वय २१, रा. ढोरेवाडी, वडगाव मावळ), अखिलेश काळुराम गायकवाड (वय २३, रा. जांबे, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शाम राचमंद्र दाभाडे (रा. तळेगाव दाभाडे), हेमंत उर्फ सोन्या बाबूराव बडदे (रा. चिखली), बाळू पंढरीनाथ टकले (रा. टकलेवस्ती तळेगाव) यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पुणे शहराच्या मेट्रोचे ब्रीद : ‘कालचा गोंधळ बरा होता

0
0

पुणे : एखाद्या गोष्टीची ठरावीक कालावधीपर्यंत चर्चा झाली, तर त्यामध्ये अनेकांना रस असतो; पण चर्चेचे घोडे लांबतच राहिले अन् प्रत्यक्षात प्रगती काहीच होत नसेल, तर त्यापासून लांब जाणे पसंत केले जाते. शहराच्या महत्त्वाकांक्षी 'मेट्रो प्रकल्पा'चे सध्या हेच झाले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मेट्रो व्हावी, ही सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा होती. परंतु, आता मेट्रो झाली काय अन् न झाली काय, पुणेकर त्यापासून खूप लांब गेला आहे. राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांना मात्र त्यामध्ये अजूनही रस असल्याने त्यांचा 'कालचा गोंधळ' पुन्हा नव्याने सुरूच आहे.
मेट्रो प्रकल्पाचा ५० टक्के खर्च अनुदानातून उभा राहणार असला, तरी उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात उभारावी लागणार आहे. आता जागतिक स्तरावरील बँकांनी शहराच्या मेट्रो प्रकल्पासाठी हे कर्ज देऊ केले आहे. आपल्या घरासाठी कर्ज काढले, तर त्याची परतफेड आपला शेजारी करत नाही. त्याच पद्धतीने मेट्रोसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड पुणेकर म्हणून आपल्यालाच करावी लागणार आहे. अर्थात, कर्जपुरवठा आणि त्याची परतफेड यांची संगती कशी असेल, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे, तरीही नाके मुरडण्याच्या सवयीनुसार शहरातील प्रथम नागरिक म्हणवणाऱ्या महापौरांनीच त्याविरोधात नाराजी व्यक्त केली. खरेतर, महापौर हे पक्षातीत पद असल्याने त्यांनी ५० टक्के निधीचा प्रश्न सुटल्याने त्याचे स्वागत करायला हवे; पण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजकाल एका राजकीय पक्षाने 'अरे' म्हणले, की दुसऱ्याने 'का रे' असे म्हणावेच लागते. महापौरांनी मेट्रोच्या इतिहासात डोकावताना आपल्याच पक्षाने किती विलंब लावला, याचे भान राखणे गरजेचे आहे.
शहराच्या मेट्रो प्रकल्पाला खरेतर गती देण्याची आवश्यकता असताना, भारतीय जनता पक्षानेही त्याचे राजकारणच केले आहे. नाहीतर, पुण्याला डावलून नागपूरची मेट्रो सुपरफास्ट तऱ्हेने मंजूर होऊच शकली नसती. पुण्याच्या मेट्रोच्या आराखड्याच्या धर्तीवर नागपूरचा मेट्रोचा आराखडा तयार होतो अन् पुण्याच्या आराखड्यात त्रुटी निघतात अन् नागपूरचा विनासायास मंजूर होतो, हे कदापि पटणारे नाही. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते पालकमंत्री गिरीश बापट आणि शहरातील भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले आणि महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर, हे सर्व जण एका सुरात मेट्रो मंजूर करण्याची ग्वाही पुणेकरांना देत असले, तरी त्यासाठी अधिकाधिक वेळकाढूपणा करण्याची (जेणेकरून निवडणुकांपूर्वीच त्याचे भूमिपूजन करत पक्षाला फायदा घेता येईल) याचीही योग्य तसदी घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने गाठली हंगामाची सरासरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पावसाने हंगामाची सरासरी पूर्ण केली आहे. धरणक्षेत्रातही पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने दुपारी खडकवासला धरणातून चार हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात आले. रात्री उशिरा हा विसर्ग सुमारे नऊ हजारपर्यंत वाढविण्यात आला. पुढील दोन दिवसांत शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

अनंत चतुर्दशीपासून पावसाने पुनरागमन केले असून, शनिवारी दिवसभर त्याने अधून-मधून हजेरी लावली. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे पावसाच्या जोरदार सरी पडल्या. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत शहरात १६.९ मिमी पावसाची नोंद झाली. शहराची पावसाळी हंगामाची सरासरी ५४५ मिमी असून, रविवारी सकाळी पावसाने हा आकडा ओलांडला. गेल्या वर्षी, सरासरीही न गाठणाऱ्या पावसाने यंदा सप्टेंबर पूर्ण होण्यापूर्वीच सरासरी ओलांडल्याने पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. पुढील दोन दिवसांतही शहर आणि परिसरात हलका पाऊस होण्याचा अंदाज असून, त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

जोरदार पाऊस

शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. रविवारी सकाळी ८ पर्यंत टेमघर येथे ७८ मिमी, तर पानशेत येथे ७२ मिमी पाऊस झाला. वरसगाव आणि खडकवासल्यात अनुक्रमे ६६ आणि १९ मिमी पाऊस झाला. रविवारी दिवसभरही पावसाचा जोर कायम असल्याने दुपारी ४ वाजता खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. तर, रात्री हा विसर्ग ९ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​आयुक्तालयाची घोषणा बाकी

0
0

पुणे : पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा नियोजित आराखडा तयार झाला असून, तसा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या आधारे नवीन आयुक्तालयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. राज्य सरकार ही घोषणा कधी करणार असा प्रश्न, आता पिंपरी-चिंचवडकरांकडून विचारला जात आहे.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असून या ठिकाणी स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे. या स्थलांतरितांमुळे औद्योगिक नगरीची शांतता ढासळली. सराईतांच्या टोळ्या वाढत असतानाच 'स्ट्रीट क्राइम' मोठ्या प्रमाणात वाढला. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवडसाठी कुठलीही विशेष यंत्रणा उभारली गेली नाही. परिणामी येथील गुन्हेगारीला अप्रत्यक्ष खतपाणी घालण्याचेच प्रकार घडत गेले. गुन्हा घडला की त्याचे निर्दालन करणे आणि गुन्हेगारांना गजाआड करण्यात यंत्रणा धन्यता मानत गेली. मात्र, येथील सराईत जेलमधून आपल्या टोळ्या चालवत असत. त्याचा फटका 'आयटी इंडस्ट्री'लाही बसला होता.
तत्कालीन पोलिस आयुक्त डी. एन. जाधव यांनी पिंपरी-चिंचवडसाठी अप्पर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला आणि त्यानुसार 'नॉर्थ रीजन' आणि 'साउथ रीजन' अस्तित्वात आले. जाधव यांनी तयार केलेल्या प्रस्तावांनुसार नंतरच्या काळात उपायुक्त आणि अप्पर आयुक्त दर्जाच्या नवीन आठ अधिकाऱ्यांची गेल्या काही वर्षांत आयुक्तालयात नियुक्ती झाली आहे. पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरासाठी सध्या दोन उपायुक्त, एक अप्पर आयुक्त नेमणुकीस असले तरी आणखी काही अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

दीडशे कोटींचा प्रस्ताव
मुंबई पोलिस आयुक्तालयाचे टप्प्याटप्प्याने विभाजन होत ठाणे आ​णि नवी मुंबई पोलिस आयुक्तालय निर्माण झाले. त्याचप्रमाणे पुणे आयुक्तालयाचे विभाजन होऊन पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची आवश्यकता निर्माण झाली आहे. आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पिंपरीसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाला पाठवला आहे. तत्कालीन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या 'मटा सुपरफास्ट' कार्यक्रमात दीडशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती दिली होती. ही रक्कम कमी करण्यासाठी पालिका, इंडस्ट्रीजने मदतीचा हात दिला तर पिंपरीसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा मार्ग सुकर होईल, असे आवाहनही त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर पिंपरी​-चिंचवड पालिका, प्राधिकरण, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि औद्योगिकनगरीने मदतीचा हात पुढे केला आहे. आता निर्णय घेण्याची वेळ सरकारची आहे. आयुक्तालयाची घोषणा केल्यानंतरही ते प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी चार-सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’ची आज बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आज, सोमवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी पक्षाची तयारी आणि संभाव्य रणनीती यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रा-रूप प्रभागरचनेला येत्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून अंतिम मान्यता दिली जाणार आहे. तर, पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरक्षणांची सोडत काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना तयार करण्याची मोहीम सर्वच पक्षांतर्फे सुरू झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली होती. आता, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सोमवारी पुण्यात दाखल होणार असून, शहर आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांशी सविस्तर विचार-विनिमय करणार आहेत. आगामी पालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत. केंद्र आणि राज्यात मिळालेल्या यशानंतर महापालिकांमध्येही सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजपने ही पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, विविध पक्षांमधील नगरसेवक ओढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत कोणत्या विषयांना प्राधान्य द्यायचे, याचा आढावा घेण्यात येणार आहे.

'प्रलोभनांपासून दूर राहा'

महापालिकेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी पुण्यात एकहाती सत्ता मिळालेली नाही. त्यामुळे, या वेळी एकहाती सत्तेसाठी प्रयत्न करा, असा संदेश नुकताच अजित पवार यांनी दिला होता. पक्षातील नगरसेवक, कार्यकर्ते इतर पक्षांमध्ये जाऊ नये, यासाठी प्रलोभनांपासून दूर राहण्याचा सल्लाही पवार यांनी दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलन डोंबिवलीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे होणार आहे. आगरी यूथ फोरम या संस्थेला संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत झालेला निर्णय दोन दिवसांनी जाहीर करू, अशी आधुनिक काळाशी विसंगत व हटवादी भूमिका साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी घेतल्याने त्यांच्या 'एकला चलो रे' कार्यपद्धतीविषयी साहित्य महामंडळ, घटक संस्था व साहित्य वर्तुळात प्रचंड खदखद निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेतून नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाकडे गेले असले, तरी साहित्य संमेलनाच्या महत्त्वाच्या विषयावरील बैठक रविवारी साहित्य परिषदेत पार पडली. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विलास देशपांडे, इंद्रजित ओरके, सुधाकर भाले, प्रकाश पायगुडे, दादा गोरे, उज्ज्वला मेहेंदळे यांच्या समितीने स्थळ निवड अहवाल या बैठकीत मांडला. संमेलनासाठी डोंबिवली किंवा बेळगाव यापैकी एका ठिकाणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे आगामी संमेलनासाठी डोंबिवलीची निवड करण्यात आली. संमेलन स्थळानंतर आता संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी नाही

साहित्य महामंडळाच्या माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, ही मागणी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत लावून धरली. महामंडळाच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, अध्यक्षांचा हेतू काय आहे, या मुद्द्यांवरून सभा सव्वा तास लांबली. अखेर मी योग्य ती कृती करीन, असे आश्वासन देत अध्यक्षांनी वेळ मारून नेली. गेल्या बैठकीत हा विषयपत्रिकेत नसल्याचे सांगून टोलविण्यात आला होता.

तंत्रस्नेही काळात महामंडळाचा कारभार 'जुनाट'

'साहित्य महामंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती मी २० सप्टेंबर रोजी नागपूर येथे जाहीर करणार आहे. आता माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही', अशी भूमिका महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी घेतली. व्हॉट्सअॅप, फेसबुक, टि्वटर यासारख्या जलद माध्यमांच्या काळात कोणतीही माहिती लपून राहत नसताना, तंत्रस्नेही नसलेल्या महामंडळाच्या या कारभाराविषयी महामंडळाच्याच पदाधिकाऱ्यांत, तसेच घटक संस्था व साहित्य वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यभर डेंगीची आता सहाशे रुपयांत चाचणी

0
0

Mustafa.Attar@timesgroup.com
Tweet: @mustafaattarMT

पुणे : राज्यात डेंगी, चिकुनगुनियाचा उद्रेक होत असल्याने खासगी हॉस्पिटल, प्रयोगशाळांमध्ये वारेमाप पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाने सहाशे रुपयांत डेंगीची चाचणी निदान करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात येत्या दोन तीन दिवसांत राज्य सरकार अध्यादेश जारी करणार आहे.

राज्यात डेंगी, चिकुनगुनिया तसेच मलेरियाचे पेशंटची संख्या वाढत आहे. डेंगीचा राज्यात उद्रेक वाढला आहे, तर पुण्यासह नाशिक, नगरमध्ये चिकुनगुनियाचे पेशंट आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लहान मोठ्या खासगी हॉस्पिटल, तसेच खासगी प्रयोगशाळांमध्ये डेंगी निदान चाचणी करण्यासाठी डॉक्टरांकडून पेशंटना पाठविले जाते. चाचणी करण्यासाठी गेलेल्या पुण्यासह मुंबई आणि अन्य शहरांमधील पेशंटना जादा दराने शुल्क द्यावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. परंतु, गरजेमुळे पेशंटना महागडी चाचणी करून घेणे भाग पडते. या प्रकाराची आरोग्य खात्याने गंभीर दखल घेतला आहे.

'गेल्या वर्षी दिल्लीमध्ये डेंगीचा उद्रेक झाला होता. त्या वेळी केंद्र सरकारने सरसकट खासगी हॉस्पिटल, प्रयोगशाळांमधून जादा दराने पैसे न घेता सहाशे रुपयांमध्ये चाचणी करण्यात यावी असे आदेश काढले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यात डेंगीच्या चाचणीसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये २००० ते २२०० रुपये आकारले जाते. मात्र, सरकारी हॉस्पिटलमध्ये या चाचण्या मोफत केल्या जातात. नागरिकांना या चाचण्या कमी दरात मिळाव्यात यासाठी

सहाशे रुपयांत डेंगीची चाचणी करून मिळावी या संदर्भात राज्य सरकारला तसेच आरोग्य खात्याकडे प्रस्ताव पाठविला. राज्याच्या आरोग्य संचालकांनीदेखील प्रस्ताव मान्य करण्याची शिफारस सरकारकडे केली. राज्याच्या साथरोग समितीच्या बैठकीत त्या प्रस्तावावर आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे या संदर्भात लवकरच अध्यादेश जारी होण्याची अपेक्षा आहे,' अशी माहिती राज्याच्या आरोग्य सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी 'मटा'ला दिली.

खासगी हॉस्पिटल, तसेच प्रयोगशाळेमध्ये जाणाऱ्या पेशंटना चाचण्या परवडणाऱ्या असाव्यात हाच यामागे उद्देश आहे; तसेच चाचणीसाठी आवश्यक सामग्रीसाठी पैसे प्रयोगशाळेला मिळावेत, यासाठी सहाशे रुपये शुल्क योग्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'दोन दिवसांत अध्यादेश'

राज्यात डेंगीचा उद्रेक होत असल्याने सहाशे रुपयांत त्या संदर्भातील चाचणी करून देण्याबाबत प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. त्याबाबत निर्णय झाला असून, येत्या दोन-तीन दिवसांत राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यात येईल.

- डॉ. मोहन जाधव, आरोग्य संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडील रागावले म्हणून लोकांच्या गाड्या जाळल्या!

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

वडील काम करण्यासाठी तगादा लावतात म्हणून संतापलेल्या एका तरुणानं स्वत:च्या दुचाकीची तोडफोड करून रस्त्याच्या बाजूला लावलेल्या इतर लोकांच्या दुचाकी, रिक्षा आणि कार जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील जनवाडी परिसरात घडला आहे. रविवारी पहाटे ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

धीरज शंकर कटिकर (वय २२) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी धीरजचे वडील रिक्षाचालक आहेत. धीरज काहीच कामधंदा करत नसल्यानं वडील त्याच्यावर रागावत व चिडत असत. नेहमीप्रमाणे शनिवारीही त्यांनी धीरजला कामाबद्दल विचारले. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तो राग मनात धरून धीरजनं पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षा, एक दुचाकी व एका कारची तोडफोड केली. एवढ्यानंही राग शांत न झाल्यानं धीरजनं स्वत:च्या गाडीतील पेट्रोल काढलं. ते पेट्रोल दोन दुचाकी व रिक्षावर टाकून त्या पेटवून दिल्या. त्यानंतर तो तेथून पसार झाला.

गाड्यांना लागलेली आग पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला. हा प्रकार कळताच चतुश्रृंगी पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. आग लावणारा धीरज असल्याचं समजताच काही वेळातच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनं वडिलांवरील रागातून हे कृत्य केल्याचं सांगितलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्या विरोधातील खटला बंद करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर म्हणणे मांडण्यास सांगूनही त्याची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांना कोर्टाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे पाटील यांच्या कोर्टाने हा आदेश दिला आहे.
एटीएसने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या उर्फ राजूभाई (२४ रा. इचलकरंजी, कोल्हापूर) व विकास रामअवतार खंडेलवाल (२२ रा. इचलकरंजी, हातकलंगले, कोल्हापूर) यांना अटक केली होती. त्यांच्या विरोधातील खटला बंद करण्यासाठी केलेल्या अर्जावर कोर्टाने म्हणणे मांडण्याचा आदेश तपास अधिकाऱ्यांना दिला होता. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. बी. ए. आलुर यांनी सोमवारी कोर्टात अर्ज दाखल केला होता.
नागोरी आणि खंडेलवाल यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटक करून कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन एटीएस प्रमुखांनी २५ लाख रुपये घेऊन गुन्हा कबूल करण्याची ऑफर दिल्याचे सांगितले होते. आरोपींनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली होती.
बॅलेस्टिक एक्सपर्ट यांच्या तपासणी अहवालात आरोपी खंडेलवालकडून जप्त करण्यात आलेल्या ७.६५एम. एम. कॅलिबरचे पिस्तुल आणि डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल एकच आहे. हे पिस्तुल खंडेलवाल याला नागोरीने दिल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न एटीएसने केला होता. या प्रकरणात त्यानंतर माजी पोलिस आयुक्तांवर तपासासाठी 'प्लॅन्चेट' केल्याचा आरोपही झाला होता. विविध तपासपथकांकडून हजारो संशयितांची चौकशी करण्यात आली होती. लाखो कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले होते. मात्र, तपास यंत्रणेने ९० दिवसांत दोषारोपत्र दाखल केले नाही. त्यामुळे या प्रकरणात दोघांची कोर्टाने जामीनावर मुक्तता केली.
दाभोलकर यांच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला. सीबीआयने सनातनचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. या प्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
सीबीआयने केलेल्या तपासात नागोरी आणि खंडेलवालचे कोठेही नाव किंवा साधा उल्लेखही आला नाही. त्यामुळे दोघांविरोधातील खटला बंद करावा. तसेच त्यांच्या विरोधातील कारवाई थांबविण्याची मागणी अर्जाद्वारे अ‍ॅड. आलूर कोर्टात केली. सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणात म्हणणे सादर करण्याचा आदेश कोर्टाने दिला होता. मात्र, कोर्टात म्हणणे सादर न करण्यात आल्यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी अॅड. आलूर यांनी कोर्टात केली होते.
..................
आरोपपत्र सत्र न्यायालयाकडे वर्ग
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेला सनातनचा साधक डॉ. विरेंद्रसिंह तावडे याच्याविरुद्ध नऊ जुलै रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे-पाटील यांच्या कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र सोमवारी सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोसाठी सहा ऑक्टोबरला ‘पीआयबी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मान्यतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड-पीआयबी) बैठकीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली ही बैठक सहा ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. 'पीआयबी'ची मंजुरी मिळाल्यानंतर केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची औपचारिकता बाकी राहील.
शहराच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी 'पीआयबी'ची मान्यता गरजेची होती. यापूर्वी जूनमध्येच प्री-पीआयबी बैठक होऊनही 'पीआयबी'च्या मुख्य बैठकीला मुहूर्त लागत नव्हता. या दरम्यान, जागतिक बँकेने मेट्रोसाठी आवश्यक असलेला कर्जपुरवठा करण्यासही मान्यता दिली होती. 'पीआयबी'ची मान्यता नसल्याने मेट्रोचे गाडे पुढे सरकत नव्हते. अखेर, तीन महिन्यांहून अधिक प्रतीक्षा केल्यानंतर पीआयबी बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सहा ऑक्टोबरला ही बैठक घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 'पीआयबी'च्या बैठकीत मेट्रो प्रकल्पाच्या खर्चाला मान्यता देण्यात येईल. ही मान्यता मिळाल्यानंतर मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच 'पीआयबी'ची मंजुरी मिळाल्यास, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची प्रक्रियाही त्याच महिन्यात पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असल्याने 'पीआयबी'च्या मान्यतेनंतर पुढील सर्व प्रक्रिया गतीने होईल, अशी अपेक्षा आहे.
शहराचा मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून निव्वळ चर्चेत आहे. केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने मेट्रोला तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर, भाजप सरकारने मेट्रोला अंतिम मान्यता देण्याची ग्वाही दिली होती. आता, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तब्बल दोन वर्षांनंतर मेट्रो प्रकल्प मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नदीपात्रातील मेट्रो अडचणीत

0
0

पूररेषेतून जाणारा मार्ग वहनक्षमतेसाठी गैरसोयीचा; 'जैवविविधता समितीचा अहवाल
Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
..............
@chaitralicMT
पुणे : मेट्रोचा मार्ग हा मुठा नदीच्या पूररेषेतून जात असल्यामुळे नदीच्या वहनक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मेट्रोसाठी पर्यायी रस्ता शोधा, असा अहवाल महापालिकेच्या तांत्रिक समितीने जैवविविधता व्यवस्थापन समितीला सादर करीत घरचा आहेर दिला आहे. या अहवालामुळे नदीपात्रातील मेट्रोपुढे अडचणी वाढल्या आहेत.
प्रस्तावित पुणे मेट्रो लाइनबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने राज्य जैवविविधता मंडळाकडे पुणे मेट्रोच्या विकास आराखड्यासाठी जैविक विविधता समितीचे मत विचारात घेतले होते का, अशी विचारणा केली होती. त्या आदेशानुसार महापालिकेच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीने तांत्रिक समिती नेमणूक करीत नुकतेच नदीपात्राचे सर्वेक्षण केले आहे. या तांत्रिक समितीचा अहवाल 'मटा'कडे उपलब्ध झाला असून त्यामध्ये तांत्रिक समितीनेच नदी पात्रातील मेट्रोला अप्रत्यक्ष विरोध दर्शविला आहे. या अहवालामुळे नदीपात्रातील मेट्रोपुढे अडचणी वाढल्याची प्रतिक्रिया उच्चपदस्थ तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने विठ्ठलवाडी रस्त्याच्या याचिकेप्रकरणी नदीपात्रात कुठल्याही प्रकारची विकास कामे करून नयेत, असा निर्णय दिला आहे. सदर मुठा पात्रातील प्रस्तावित मेट्रो लाइन ही ब्ल्यू लाइनमध्ये असल्याने विकास कामास मनाई आहे. या मेट्रोची दोन स्टेशन नदीपात्रातच येणार असून, खांबांचे प्रमाणही वाढवावे लागणार आहेत. या बांधकामाचा नदीच्या वहनक्षमेतवर परिणाम होऊ शकतो. मेट्रोला आमचा विरोध नाही, पण पूररेषेचा विचार करून मेट्रोचा मार्ग बदलावा, असा सल्ला अभ्यासकांनी अहवालात दिला आहे.
मेट्रो लाइनमुळे या मार्गावरील जैवविविधतेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. बांधकामादरम्यान किमान साठ वृक्ष तोडावे लागणार असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक जैवविविधतेवर आहेत. बांधकाम साहित्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊन जलजीवांनाही फटका बसणार आहे. नदी, नदीपात्र आणि जैवविविधेचे नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने येथील निसर्ग साखळी अखंडित राहील, याची काळजी घेतला पाहिजे, असे पर्याय तांत्रिक समितीने अहवालात नमूद केला आहे. तांत्रिक समितीतील डॉ. सचिन पुणेकर, डॉ. अविनाश खांडेकर, शाम ससाणे, विजय तिकोणे, बाबासाहेब पाटील, जयवंत शिर्के यांनी अहवाल केला असून नुकताच तो जैवविविधता व्यवस्थापन समितीकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
.........
मुठा नदीपात्रातील जैवविविधता
मेट्रो जात असलेल्या प्रस्तावित नदीपात्रातील मार्गावर ६३ प्रकारच्या वनस्पती आढळतात. त्यातील ३० जाती या स्थानिक तर ३३ जाती या आगंतुक म्हणजेच परदेशी प्रकारातील आहेत. दुर्मिळ वनस्पती या भागात आढळत नाहीत. तसेच वीस प्रकारच्या शेवाळ्याच्या जाती बघायला मिळतात. पात्रालगतच्या मोकळ्या जागेत झुडपात पाच प्रकारचे सस्तन प्राणी, अठरा जातींचे पक्षी, बारा प्रकारची फुलपाखरे, चार प्रकारचे मासे, सात प्रकारचे सरपटणारे प्राणी, तीन उभयचरांची नोंद केली आहे. यापैकी पांढऱ्या मानेचा करकोचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर धोकाग्रस्त म्हणून जाहीर झालेला पक्षी या पात्रात आढळतो, असे अहवालात लिहिले आहे.
...
प्रस्तावित मेट्रो ही नदीत पात्रात एलिव्हेटेड असून पंधरा मीटर उंचीवरून जाणार आहे. सध्या असलेल्या पुलांपेक्षाही तिची उंची जास्त असेल. मेट्रोच्या खांबांना मर्यादित जागा लागणार आहे. नदीपात्रालगत जमिनीवरून मेट्रो गेली असती, तर जैववैविध्याचे नुकसान झाले असते. प्रस्तावित नियोजनात नैसर्गिक परिसंस्थेचे फारसे नुकसान होणार नाही. समितीच्या शिफारसीनुसार जी झाडे तोडावी लागतील त्या बदल्यात एकास तीन या प्रमाणात झाडे लावणे सहज शक्य होईल.
- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडील रागवल्याने तरुणाने वाहने जाळली

0
0

पाच वाहने जाळली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
काहीही कामधंदा करत नसलेल्या मुलास वडील रागवल्यामुळे त्याने स्वतःच्या दुचाकी तोडफोड करत त्यातील पेट्रोलकढून रोडवर उभ्या केलेली पाच वाहने जाळल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटे जनवाडी परिसरात घडला. या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटक केली. या घटनेत सामान्य नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
धीरज शंकर कटिकर (२२, रा. सुरेश मंडप शेजारी, जनवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी किसनसिंग रमेशसिंह रजपूत (२८, रा. आराधना मित्र मंडळ, जनवाडी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरजचे वडील रिक्षाचालक आहेत. धीरज काहीच कामधंदा करत नाही. त्यामुळे वडील त्याला काम करण्यास सांगत होते. तो काहीच करत नसल्याने त्याला रागवत होते. याच कारणावरून शनिवारी रात्री धीरजला वडील रागवले. त्यामुळे चिडलेल्या धीरजने रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास स्टम्पने स्वतःच्या दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर त्यातील पेट्रोल काढले. रोडवर उभ्या केलेल्या दोन रिक्षा, एक दुचाकीची आणि एका कारची तोडफोड केली. त्यानंतर दोन दुचाकी आणि एका रिक्षावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. त्यानंतर तो तेथून पसार झाला. काही वेळातच दुचाकी आणि रिक्षांनी पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी आग पाहिल्यानंतर आरडा ओरडा केला. त्यानंतर नागरिकांनी आग विझवली. चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात धीरज हा वाहने पेटवित असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळातच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर वडील रागवल्यामुळे गाड्या जाळल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांचा प्रश्न भाजपनेच सोडवला

0
0

काँग्रेसचे आरोप बेताल; माधुरी मिसाळांची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पानशेत पूरग्रस्तांचा प्रश्न हा भारतीय जनता पक्षानेच (भाजप) सोडविला आहे. आगामी महापालिका निवडणुकीतील पराभव दिसू लागल्याने काँग्रेसचे आमदार बेताल आरोप करत असल्याची टीका भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.
पानशेत पूरग्रस्तांना मालकी हक्काने घरे देण्याचा प्रश्न तत्कालीन आघाडी सरकारने सोडविला आहे. भाजप सरकारचे आमदार फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केला होता. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यानेच हा प्रश्न निकाली निघाला असून भाजपने खोटेपणाचा धंदा बंद करावा, असे आवाहन जोशी यांनी केले होते. माजी आमदार जोशी यांनी केलेल्या आरोपला उत्तर देत आमदार मिसाळ यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अभ्यासू नेत्यांना पानशेत पूरग्रस्तांचे प्रश्न कधीच समजले नाहीत. काँग्रेसने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याची टीका मिसाळ यांनी केली. भाजपचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे आणि भाजपच्या पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपमुळे हा प्रश्न मार्गी लागत असल्याचे लक्षात आल्याने नैराश्याच्या भावनेतून आमदार मोहन जोशी असे आरोप करत आहेत. काँग्रेस आघाडीच्या कारभाराला कंटाळून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुणेकरांनी शहराला काँग्रेसमुक्त केले. आगामी पालिका निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागल्याने काँग्रेसचे नेते असा आरोप करत असल्याची टीका मिसाळ यांनी केली.
००००
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अभ्यासू नेत्यांना पानशेत पूरग्रस्तांचे प्रश्न कधीच समजले नाहीत. काँग्रेसने पूरग्रस्तांना कायमच वाऱ्यावर सोडले होते. पानशेत पूरग्रस्तांचा प्रश्न भाजपनेच सोडविला आहे.
- माधुरी मिसाळ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ताम्हिणीत वृक्षतोड करणाऱ्यास नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ताम्हिणी अभयारण्य परिसरात, तसेच वनक्षेत्राला लागून असलेल्या खासगी जागांवरही विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम वन विभागाने हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यात खासगी कामासाठी तब्बल पाच एकर जागेवर वृक्षतोड करणाऱ्या जागा मालकाला नोटीस पाठवून वन विभागाने काम थांबवले.
गेल्या काही वर्षांत ताम्हिणी वन क्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. या जमिनींवर फार्म हाउस बांधण्याच्या योजनाही सातत्याने जाहीर होत आहेत. मात्र या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहेत. ठिकठिकाणी सुरक्षा भिंती, जाळ्या लावण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी झाडे आणि झुडपे तोडून चारचाकी गाड्या जातील, असे अंतर्गत रस्तेही बनविण्यात आले आहेत. मात्र या कामापूर्वी वन विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. गेल्या पाच वर्षांत शेकडो झाडांची विकासकामांसाठी तोड करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यातही आदरवाडी परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू होती. संबंधित जागा मालकांनी पाच एकरहून अधिक जागेतील मोठी झाडे तोडली. स्थानिकांनी वन विभागाकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर संबंधितांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात सुरू असलेली वृक्षतोड वनक्षेत्रामध्ये झाली नव्हती. मात्र कोणत्याही जागेवरील झाडे तोडण्यापूर्वी वन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते. जागा मालकाने विनापरवाना वृक्षतोड केली. त्यामुळे आम्ही त्यांचे काम थांबवले आहे. कोयते आणि इतर साहित्यही जप्त केले आहे. या संदर्भात त्यांना नोटीसही पाठविण्यात आली आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी पी. व्ही. कापसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थाचालकाच्या मुलीकडून गेस्ट लेक्चररला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विश्रांतवाडी येथील एका संस्थाचालकाच्या मुलीने गेस्ट लेक्चरला मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
गणेश पाटील असे मारहाण झालेल्या गेस्ट लेक्चरचे नाव आहे. संस्थाचालक अंथनी ननावरे यांची मुलगी स्वप्ना ननावरे हिने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथे विद्या विलास मंडळ नावाची संस्था आहे. या संस्थेच्या जनता हायस्कूलमध्ये गणेश पाटील हे गेस्ट लेक्चरर म्हणून शिकविण्यासाठी गेले होते. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास संस्थाचालक ननावरे यांच्यासह त्यांच्या मुलीची शिकविण्यास आल्यावरून वादावादी झाली. त्यानंतर स्वप्ना यांनी पाटील यांना चपलीने मारले. यामुळे शाळेमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. त्यानंतर गणेश पाटील याने पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले होते. या प्रकरणी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पी. एन. सुपेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images