Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

​गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असून जुन्या वापरलेल्या मोटारींचा वापर रहिवासी भागात हल्ल्यांसाठी केला जाऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी पुणे पोलिसांना इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिस सतर्क झाले असून शहरातील घरमालकांकडून भाडेकरूंची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे.

जुन्या व नवीन मोटारींची खरेदी विक्री करणारे, इस्टेट एजंट यांच्याकडेही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सर्वांना आपापली माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात लेखी स्वरूपात देण्याचे आदेश पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काढले आहेत. जे माहिती देणार नाहीत त्यांच्यावर कलाम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. १२ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीसाठी हा अलर्ट देण्यात आलेला आहे. नागरिकांनी आपल्या जवळपास बेवारस वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'मराठा समाजाच्या मोर्चांना स्पॉन्सर नाही!'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । पुणे

मराठा समाजाकडून काढण्यात येत असलेले मोर्चे कोणत्याही राजकीय पक्षाकडून 'स्पॉन्सर' केलेले नाहीत. तर ते मोर्चे कोपर्डी येथील घटनेचा निषेध, मराठा समाजावरील अन्यायाविरोधात आहेत, असे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुण्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत. आम्ही दलित समाजाविरोधात मोर्चे काढत नाहीत. काही नेते अॅट्रॉसिटीचा विषय वारंवार काढत आहेत. पण या कायद्यात सुधारणा करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असंही ते म्हणाले. राज्य सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास करून सुधारणांबाबत केंद्र सरकारला शिफारस करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने अभ्यास न केल्यास शिवसंग्राम सर्व दाखल तक्रारींचा अभ्यास करेल, असेही ते म्हणाले.

मराठा समाज दलितविरोधी नाही!'


मराठा समाज दलितविरोधी नाही. मराठा समाजाला गृहीत धरू नये, हा संदेश या मोर्चांमधून सरकारला आणि सर्व नेत्यांना दिला जाणार आहे. हे मोर्चेही दलितांच्या विरोधात नाहीत. दलित संघटनांनी आम्हाला विरोध म्हणून मोर्चे काढू नयेत. संयमाची भूमिका घ्यावी, असे आवाहनही मेटे यांनी केले.

विरोध म्हणून प्रतिमोर्चे काढू नका: प्रकाश आंबेडकर

आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्याचा हक्क राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच सर्वांना दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा हक्क असलेल्या मोर्चांना विरोध म्हणून प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दलित समाजाला केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युद्धादरम्यान फुलणार प्रेमकथा

$
0
0

एका युद्धाच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणाऱ्या प्रेमाच्या विविध छटा मांडणारं नाट्य अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 'आसक्त' संस्थेतर्फे 'मैं हूँ युसूफ और ये है मेरा भाई' या नाटकाच्या प्रयोगाचं येत्या रविवारी (दि. १८) आयोजन केलं आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथं रात्री नऊ वाजता होणाऱ्या या प्रयोगास प्रवेशमूल्य आहे.
आमिर निझार युआबी लिखित या मूळ नाटकाचं भाषांतर सलीमा रझा यांनी केलं आहे. मोहित टाकळकर यांच्या दिग्दर्शनाखाली हा प्रयोग होणार आहे. नवी दिल्लीतल्या 'महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अॅवॉर्डस' विजेत्या या नाटकाचे प्रयोग पुण्यातल्या 'विनोद दोशी फेस्टिव्हल'प्रमाणेच बिहार, कर्नाटक, मुंबईतील पृथ्वी थिएटर फेस्टिव्हल आणि बेंगळुरू इथंही झाले आहेत.
पॅलेस्टाइनमधली ब्रिटीश राजवट १९४८ मध्ये संपुष्टात येत होती. कुणी कुठल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवायचं, हे तेव्हा युनायटेड नेशन ठरवत होतं. याच दरम्यान एक प्रेमकहाणी फुलत होती. अलीला आवडणाऱ्या नादाशी लग्न करण्यास नादाच्या वडिलांचा विरोध होता. तोही अलीच्या युसूफ नावाच्या काहीशा 'वेगळ्या' भावामुळे. या दरम्यान सुरू झालेलं युद्ध आणि त्या दरम्यान फुलणाऱ्या प्रेमाचे रंग उलगडणारं हे नाटक आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सागर देशमुख, आशिष मेहता, अभिनेत्री मृण्मयी गोडबोले, इशिप्ता चक्रवर्ती आदींनी या नाटकात भूमिका केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैज्ञानिक देखाव्यांचे पेठांमध्ये आकर्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऐतिहासिक घटना व सामाजिक देखाव्यांबरोबरच वैज्ञानिक देखावे यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाणी वाचवा अशा देखाव्यांपेक्षा मंडळांनी यंदा थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाला हात घातला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणावरील सजीव देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नातूवाडा मंडळाने 'भारत-इराण' करार हा विषय निवडून आपले वेगळेपण दाखवले आहे. भारत आणि इराण या देशांतील व्यापाराच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या चाबहार बंदराची चलत प्रतिकृती मंडळाने साकारली आहे. या देखाव्यात इराण येथील चाबहार बंदर, बोट, रेल्वे, गॅस पाइपलाइन अशा प्रतिकृती पाहायला मिळत आहेत. करारामुळे भारताला तेल व गॅस मिळणार असून, ते या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहे. जयहिंद तरुण मंडळाने यंदा ई-कचऱ्याची विल्हेवाट या विषयावरील देखावा सादर केला आहे. नागरिकांना ई-कचऱ्याची समस्या आणि त्याचे परिणाम देखाव्याच्या माध्यमातून सांगितले जात आहेत. मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भारताने अवकाशात सोडलेल्या तीन उपग्रहांचा देखावा सादर केला आहे. यामध्ये पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'स्वयम' उपग्रह, चेन्नई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह ही प्रमुख आकर्षणे आहेत. नारायण पेठेतील विनायक मित्र मंडळाने 'लाल महाल' हा जिवंत देखावा सादर केला आहे.

टिळक चौकाजवळील शिवोदय मंडळाने शिवसेना भवनाचा देखावा सादर करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिली आहे. गांजवे चौकातील उत्सव मित्र मंडळाने 'डोक्याला शॉट नको' हा जिवंत देखावा सादर केला आहे. निवडणुकांवेळी होणारी घोषणांची खैरात व वास्तव यातील सत्य मांडण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. टिळक चौकातील अचानक मित्र मंडळाने 'यमराज झाले सैराट-सरकारच्या योजना घराघरात' हा जिवंत देखावा सादर करून योग दिन, स्वच्छता अभियान व पंतप्रधान योजनेचे महत्त्व पटवून दिले आहे. समाज विकास मंडळाने 'प्रेमात सैराट की राष्ट्र उभारण्यात सैराट', हा महत्त्वाचा प्रश्न देखाव्यातून उपस्थित केला आहे. नारायण पेठेतील विजय मारुती मंडळाचा वीरभद्र अवतार, भोलेनाथ मित्र मंडळाचा महल व विद्युत रोषणाई, टिळक चौकातील छत्रपती संभाजी मंडळाचा जिवंत देखावा, गणेश मित्र मंडळ, शिवराज तरुण मंडळ यांचे देखावेही आकर्षण ठरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लीलाताई परुळेकर यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पुणे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, 'सकाळ'च्या संचालक तसेच 'साप्ताहिक सकाळ'च्या प्रकाशक लीलाताई परुळेकर यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. सकाळचे संस्थापक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या लीलाताई या कन्या होत.

गेल्या काही महिन्यांपासून लीलाताई अंथरूणाला खिळून होत्या. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील कैलास स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीलाताईंचा प्राणीप्रेमी म्हणूनही नावलौकिक होता. त्यांनी रस्त्यावरील भटक्या प्राण्यांसाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या पुण्यातील साडेतीन एकरच्या मोठ्या घरात त्या तब्बल ४०० पाळीव प्राण्यासोबत एकत्र राहत होत्या. प्राणीमात्रांना जीव लावणाऱ्या लीलाताईंनी आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता कुत्री, मांजरांसह त्यांच्या घराच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक मुक्या प्राण्याला लळा लावला. लीलाताई उभे आयुष्य अविवाहित राहून जगल्या. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब म्हणजेच मुके जीव आता पोरके झाले आहेत.

'सकाळ' वृत्तपत्राचे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्यानंतर लीलाताईंनी सकाळ वृत्तपत्राच्या संचालक म्हणून काम पाहिले होते. सकाळच्या मालकी हक्कासाठी त्यांनी दिलेला प्रदीर्घ न्यायालयीन लढा चांगलाच गाजला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढव्यात देखाव्यांतून प्रबोधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

मुंढवा-केशवनगर परिसरात सार्वजनिक गणेश मंडळांनी फुलांची आरास, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, सामाजिक संदेश अशा विविध गोष्टींवर भर दिला आहे. काही मंडळांनी साधेपणाने गणरायाची स्थापना करून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचा संकल्प केला आहे.

मुंढवा परिसरातील गांधी चौक येथील जयहिंद मित्र मंडळाने साधेपणाने उत्सव साजरा केला आहे. मंडळाने भाजी मार्केटसाठी स्वतंत्र कायमस्वरूपी पाणपोई, वाचनालय सुरू केलेले आहे. मंडळातर्फे गणेश जयंती, सावता माळी पुण्यतिथी, आरोग्य शिबिर व सामाजिक कार्यावर भर दिला आहे. भाजी मार्केट येथील एकदिल मित्र मंडळाने आर्कषक सजावट केली आहे. शिवसंकेत क्रीडा केंद्र व प्रतिष्ठानने यंदा साधेपणाने उत्सव साजरा केला आहे.

गांधी चौकातील जयहिंद बाल मंडळातर्फे वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, नेत्र तपासणी शिबिर आदी उपक्रम राबविण्यात आले आहे. राममंदिर येथील नवजीवन तरुण मंडळाने पर्यावरणपूरक सजावट केली आहे. मंडळाने आजपर्यंत सामाजिक विषयांवरील देखावे सादर केले आहेत. झाडे लावणे, साफसफाई करणे, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर उपक्रम राबविले जातात.

दत्त चौक येथील न्यू फ्रेंडशिप मित्र मंडळाने आकर्षक सजावट केली आहे. लालमाडी येथील हिंदू तरुण मंडळाने यंदा आकर्षक सजावट केली आहे. दत्त चौक येथील आझाद मित्र मंडळाने यंदा अर्धवर्तुळाकार डोममध्ये आकर्षक सजावट केली आहे. मंडळ वर्षभर विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविते. भोईआळी येथील भोईराज मित्र मंडळाने आर्कषक लाकडी मंदिरात गणेशाची स्थापना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल अॅपद्वारे २४ तासांत वीज कनेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाइल अ‍ॅपच्या साह्याने २४ तासांमध्ये वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही 'महावितरण'ने सुरू केली असून, आतापर्यंत एक हजार २२८ वीजग्राहकांना कनेक्शन देण्यात आले आहे.
'महावितरण'ने निर्माण केलेल्या मोबाइल अ‍ॅपद्वारे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील ३६ मंडलांतर्गत ८८ विभागांच्या निवडक कार्यक्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत राज्यामध्ये जुलै महिन्यापासून एक हजार २२८ ग्राहकांना २४ तासांत वीज कनेक्शन देण्यात आले.
नवीन वीज कनेक्शनसाठी अतिरिक्त वीजयंत्रणा उभारण्याची गरज नसणाऱ्या भागातील १५० पेक्षा अधिक उपविभागांच्या कार्यक्षेत्रात २४ तासांत नवीन वीज कनेक्शन उपलब्ध होणार आहे. संबंधित परिमंडल, मंडल, विभाग, उपविभाग, शाखा कार्यालये यांची नावे महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
थकबाकी नसलेल्या ग्राहकांनी फर्म कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास २४ तासांत वीज कनेक्शन दिले जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पूना हॉस्पिटल करणार सहाशे रुपयांत तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेंगी तसेच चिकुनगुनियाच्या पेशंटची तपासणी सहाशे रुपयांमध्ये करण्यास पूना हॉस्पिटलने तयारी दाखविली आहे. पूना हॉस्पिटलमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत चिकुनगुनिया तसेच डेंगीची तपासणी ६०० रुपयांमध्ये केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांत शहरात डेंगी तसेच चिकुनगुनिया आजाराची पेशंटची वाढती संख्या लक्षात घेऊन खासगी हॉस्पिटलने सहाशे रुपयांमध्ये तपासणी करावी, असे आवाहन महापौर प्रशांत जगताप यांनी केले होते. महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पूना हॉस्पिटलने ही तयारी दाखविली आहे. शहरातील इतर खासगी हॉस्पिटलने याचे अनुकरण करावे, असे आवाहन महापौर जगताप यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलप्रदूषण रोखणार ‘स्वच्छ’चे सभासद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी 'स्वच्छ' संस्थेचे २५० सभासद आणि शंभर स्वयंसेवक २३ घाटांवर गुरुवारी सकाळपासून तैनात राहणार आहेत. गणेशभक्तांकडून निर्माल्य जमा करून त्याचे शास्त्रीय पद्धतीने खत तयार करण्यात येणार आहे. गणेशभक्तांनी नदीऐवजी हौदात मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
महापालिका आणि 'स्वच्छ' संस्थेतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून निर्माल्य गोळा कऱण्याची मोहीम राबविण्यात येते आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी २१३ टन निर्माल्य गोळा केले होते. या वर्षी विविध कॉलेजचे विद्यार्थी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपक्रमात सहभागी होणार आहेत. मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील २३ घाटांची निवड केली आहे. नागरिकांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी संस्थेने व्हॉट्सअॅप, फेसबुकसह अन्य सोशल नेटवर्किंग साइटवरून लोकांना आवाहन केले आहे. सहाव्या दिवशी झालेल्या गणेश विसर्जनादरम्यान कार्यकर्त्यांनी पुण्यात ३३ टन तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन घाटांवर चार हजार पाचशे किलो निर्माल्य गोळा केले. जमा निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. दरम्यान, डी. एस. कुलकर्णी फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूडच्यावतीने मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील विसर्जनहौदांवर 'निर्माल्य संकलना'चा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतरा रस्त्यांवर वाहनांना ‘नो एंट्री’

$
0
0

विसर्जनामुळे शहरातील वाहतुकीत बदल; वाहनांसाठी रिंगरोडची निर्मिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे उद्या, गुरुवारी (ता. १५) शहराच्या मध्यवर्ती भागातील सतरा प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यापैकी १० रस्त्यांवर अंशतः वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, मध्यवर्ती भागातील सर्वच रस्ते बंद राहणार असल्याने वाहनांना पेठांमधून ये-जा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी वाहतूक पोलिसांनी रिंगरोडची योजना आखली आहे.
शहरातील बंद असलेल्या १७ रस्त्यांपैकी जंगली महाराज रस्त्यावर स. गो. बर्वे चौक ते झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत वाहतूक सुरू राहणार आहे. शिवाजी रस्त्यावर स. गो. बर्वे चौकापासून काकासाहेब गाडगीळ पुतळ्यापर्यंत, नेहरू रस्त्यावर संत कबीर पोलिस (नाना पेठ) चौकीपर्यंत, सोलापूर रस्त्यावर हडपसर ते सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्त्यावर व्होल्गा चौकापर्यंत, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर दांडेकर पूल ते सेनादत्त पोलिस चौकी दरम्यान वाहतूक सुरू राहणार आहे.
----------
बंद असलेले रस्ते
रस्ता वाहतूक बंद
शिवाजी रस्ता काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
लक्ष्मी रस्ता संत कबीर चौकी (नाना पेठ) ते टिळक चौक
टिळक रस्ता जेधे चौक ते अलका टॉकिज चौक
बाजीराव रस्ता बजाज पुतळा चौक फुटका बुरूज चौक
कुमठेकर रस्ता टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
केळकर रस्ता बुधवार चौक ते टिळक चौक
प्रभात रस्ता डेक्कन पोलिस स्टेशन ते शेलारमामा चौक
जंगली महाराज रस्ता झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
शास्त्री रस्ता सेनादत्त पेठ चौकी ते अलका टॉकिज
कर्वे रस्ता नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक
गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) खंडुजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज गेट
भांडारकर रस्ता पीवायसी जिमखाना ते गोपाळ कृष्ण गोखले चौक
पुणे-सातारा रस्ता व्होल्गा चौक ते जेधे चौक
शंकरशेट रस्ता सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक
गुरूनानक रस्ता देवजीबाबा चौक ते गोविंद हलवाई चौक
बगाडे रस्ता सोन्यामारूती चौक ते फडके हौद चौक
गणेश रस्ता दारूवाला पूल ते लाल महाल
--------
पार्किंगची ठिकाणे
एस. व्ही. देसाई कॉलेज, शनिवार पेठ
पुलाची वाडी- नदी किनारी
पूरम चौक ते हॉटेल विश्व- रस्त्याच्या डाव्या बाजूला
दारूवाला पूल ते खडीचे मैदान- गणेश रस्ता
गाडगीळ पुत‍ळा ते कुंभारवेस
काँग्रेस भवन ते मनपा रस्ता
जयवंतराव टिळक पूल ते भिडे पूल- नदी पात्रातील रस्ता
हमालवाडा पार्किंग- नारायणपेठ
----------
रिंग रोड
कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक-लॉ कॉलेज रस्ता-सेनापती बापट रस्ता-गणेशखिंड रस्ता-सिमला ऑफिस चौक-संचेती हॉस्पिटल चौक-इंजिनीअरिंग कॉलेज-आंबेडकर रस्ता-शाहीर अमर शेख चौक-मालधक्का चौक-बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरू रस्त्यावरून संत कबीर पोलिस चौकी-सेव्हन लव्हज चौक-वखार महामंडळ चौक-शिवनेरी रस्त्याने गुलटेकडी मार्केट डयार्ड-सातारा रस्ता-व्होल्गा चौक-सिंहगड रस्त्याने मित्र मंडळ चौक-सावरकर चौक-लाल बहादूर शास्त्री रस्ता-सेनादत्त पेठ चौकी-अनंत कान्हेरे रस्ता-म्हात्रे पूल ते नळ स्टॉप.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा नऊ हजार पोलिसांचा बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिस सज्ज झाले आहेत. मिरवणुकीसाठी एकूण नऊ हजार पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या चार कंपन्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग आणि विसर्जन घाट या ठिकाणी ११८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या काळात एकूण १७ रस्ते बंद राहणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंडई येथील टिळक पुतळ्याहून जवळून गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीसाठी जवळपास दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जनाच्या अगोदरच्या दिवशी मंडळांच्या रांगा लागतात. त्यासाठी सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वेगळा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
१४ सप्टेंबरच्या रात्रीपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मध्य भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. शहरात लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, कर्वे रस्ता, दत्तवाडी, लष्कर, खडकी,पिंपरी अशा नऊ ठिकाणांहून विसर्जन मिरवणुका निघतील. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, ३९ सहायक आयुक्त, १७ उपायुक्त, १८४ पोलिस निरीक्षक, ६६९ सहायक, उपनिरीक्षक आणि ७,६०५ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या, पाचशे होमगार्ड असणार आहेत. तसेच, एक हजार वाहतूक पोलिसही विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहेत. या शिवाय काही पोलिस राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिली. या वेळी सहआयुक्त सुनील रामानंद, उपायुक्त प्रवीण मुंढे, दीपक साकोरे, पी. आर. पाटील, गणेश शिंदे उपस्थित होते.
गुप्तचर यंत्रणांकडून पोलिसांना कोणत्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने १३ श्वानपथकांमार्फत तपास करण्यात येत आहे, असे शिंदे म्हणाले.
--------------------
टिळक चौक ते बेलबाग चौक रस्ता बंद
टिळक चौकातून लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकाकडे जाण्यासाठी नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. टिळक चौकाजवळच फूटपाथवर उलट्या दिशेने जाणाऱ्या नागिरकांना दोरी लावून अडविण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दी रोखण्यास मदत होणार आहे.
-------------
टिळक रस्त्यासाठी दोन उपायुक्त
टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक दर वर्षी एक ते दोन तास उशिरापर्यंत रेंगाळते. हे लक्षात घेऊन दोन पोलिस उपायुक्तांची टिळक रस्त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत या रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी येथील मंडळांशी चर्चा करण्यात आली आहे. मंडळांकडून हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे, असे श्रीमती शुक्ला यांनी सांगितले.
--------------
'ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करणार'
विसर्जन मिरवणुकीत यंत्राद्वारे आवाज मोजण्यात येणार आहे. मर्यादेपेक्षा अधिक आवाज असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. वाद्यपथकांकडूनही ढोलविषयक नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.
--------------
पुणे पोलिसांकडन गणेश उत्सवादरम्यान दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, ३३ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच, महिला व तरुणींची छेडछाड काढणाऱ्या ४२३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पी. आर. पाटील, पोलिस उपायुक्त
--------------------
मिरवणूक बंदोबस्त एका दृष्टिक्षेपात..
घाट आणि मुख्य मार्गावर ११८ सीसीटीव्ही कॅमेरे
मिरवणुकीत तेरा ठिकाणी वॉच टॉवर
आठ ठिकाणी पोलिस मदत केंद्र
मिरवणूक पुढे नेण्यासाठी पाच विशेष पथके
पाच ठिकाणी अॅम्ब्युलन्स
१७ रस्ते वाहतुकीसाठी बंदसीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ११८ ठिकाणी वॉच राहणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश विसर्जनाची पालिकेची तयारी पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आवश्यक तयारी महापालिका प्रशासनाने पूर्ण केली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी घाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी दिवे, बॅरिकेड्स, जीवरक्षक आणि सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.
शहरात १७ विसर्जन घाट उभारण्यात आले असून, क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक ती तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या काळात क्षेत्रीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता, प्रभाग अधिकारी, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सफाईसेवक तसेच विद्युत विभागाकडील कर्मचारी, अभियंता यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत टप्प्याटप्प्याने अधिकारी, कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
या शिवाय अग्निशमन दलाचे जवान, जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत जीवरक्षक आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्र, तलाव, विहिरी नसलेल्या भागात हौद आणि लोखंड्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. या शिवाय, मंडळांच्या स्वागतासाठी टिळक रस्ता, नारायण पेठ, महाराष्ट्र साहित्य परिषद येथे मंडप उभारले आहेत. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली आहे. फिरती स्वच्छतागृहेही उपलब्ध करण्यात आली आहेत. निर्माल्य जमा करण्यासाठी जागोजागी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.
..
विसर्जन घाटही सज्ज
संगम घाट, वृद्धेश्वर घाट, अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ), बापू घाट, विठ्ठल मं‌दिर (अलका चौक), ठोसरपागा घाट, राजारामपूल घाट, चिमा उद्यान (येरवडा), वारजे कर्वेनगर, नेने/आपटे घाट, ओंकारेश्वर, पुलाची वाडी, गरवारे कॉलेजची मागची बाजू, दत्तवाडी घाट, बंडगार्डन पूल, औंध पूल येथे विसर्जन घाटांची उभारणी करण्यात आली आहे.
...
शहराच्या मध्यवस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी वाहने केळकर, लक्ष्मी, कुमठेकर, टिळक, बाजीराव, शिवाजी या रस्त्यांवर तसेच, त्यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांवर आणू नयेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहनांना प्रवेश बंद असेल.
- नदीपात्रातील रस्त्याचा वापर करून गाडगीळ पुत‍ळा चौकात येऊन इच्छितस्थळी जाण्यासाठी या रस्त्याचा वापर मध्यवस्तीतील नागरिकांना करावा.
...........
रस्त्याचे नाव रस्ता बंद करण्यात आलेली ठिकाणे
लक्ष्मी रस्ता २४
शिवाजी रस्ता १८
बाजीराव रस्ता १९
केळकर रस्ता १२
टिळक रस्ता १७
कुमठेकर रस्ता ०७
शास्त्री रस्ता ०६
जंगली महाराज रस्ता १३
कर्वे रस्ता ०५
गणेश रस्ता ०६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणपूरक विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरच्या घरी बाप्पाचे विसर्जन करता यावे, यासाठी महापालिका प्रशासनाने ४० टन अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे वाटप केले आहे.
नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी महापालिका व राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांच्या वतीने 'पर्यावरणपूरक विसर्जन' उपक्रम राबविण्यात येत आहे. घरच्या घरी बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रत्येकी दोन किलो अमोनियम बायकार्बोनेट मोफत देण्यात येत आहे. यासाठी पालिकेने शंभर टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदी केले आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही पावडर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, महापालिकेने विसर्जनासाठी उभारलेले हौद व लोखंडी टाक्यांमध्येही ही पावडर टाकण्यात येत आहे, असे महापालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीसेवक परीक्षेच्या निकालात गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकाच उमेदवाराने दोन ठिकाणी दिलेली परीक्षा आणि दोन्ही ठिकाणी झालेली निवड... दोन सख्ख्या भावांना मिळालेले समान गुण आ‌णि अंतिम निकालात विशिष्ट आडनावाच्या उमेदवारांची दिसणारी लक्षणीय संख्या...

कृषी विभागाच्या कृषीसेवक परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात असे अनेक आक्षेपार्ह प्रकार समोर आले आहेत. परीक्षार्थी उमेदवारांनी अशा नानाविध मुद्द्यांवर आक्षेप घेत परीक्षेच्या माध्यमातून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.

कृषी विभागामधील कृषीसेवक पदाच्या रिक्त जागांसाठी राज्यभरात सहा ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सहा सप्टेंबरला जाहीर झाला. या निकालात अनेक आक्षेपार्ह बाबी आढळल्याने त्या विरोधात कृषी आयुक्तालयाकडे तक्रार दिल्याचे परीक्षार्थी उमेदवारांकडून सांगण्यात आले. त्यानंतरही या प्रकाराविरोधात कोणतीही हालचाल होत नसल्याने या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे या उमेदवारांकडून सांगण्यात आले.

उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहीर झालेल्या निकालात एकाच उमेदवाराची औरंगाबाद आणि ठाणे या दोन्ही विभागांमधून निवड झाल्याचे दिसत आहे. या उमेदवाराने दोन्ही विभागांमधून दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून परीक्षा देत दोन्ही विभागांमध्ये निवड होण्यात यश मिळविले आहे. त्याला दोन्ही ठिकाणी परीक्षेला मिळालेले गुण मात्र सारखेच आहेत. या परीक्षेमध्ये दोन सख्ख्या भावांना समान गुण मिळाल्याचे परीक्षेचा निकाल सांगत आहे. निकाल जाहीर करताना कृषी विभागाने जाहिरातीनुसार जाहीर केलेल्या पूर्ण जागा भरलेल्या नाहीत. परीक्षेनंतरही जवळपास शंभर जागा रिक्तच ठेवल्या आहेत. काही मोजक्याच उमेदवारांना १७९ ते १८६ या दरम्यान गुण मिळाले आहेत. त्यामध्येही काही विशिष्ट आडनाव असलेल्या आणि राज्याच्या विशिष्ट जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांचीच संख्या अधिक आहे. परीक्षेची काठीण्यपातळी विचारात घेत, ही कामगिरी नोंदविणे अवघड होते. तरीही काही विशिष्ट उमेदवार सर्वच विभागांमध्ये अशी कामगिरी नोंदवित असल्याचे हा निकाल सांगत आहे. अशा सर्व उमेदवारांना गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वीच्या टप्प्यावर यादीमध्ये सामावून घेण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.

राजकीय हस्तक्षेपांना सुरुवात

या प्रकरणी आयुक्तालयाकडून दाद मिळत नसल्याने उमेदवारांनी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या मदतीने कृषी आयुक्तांपुढे आपले गाऱ्हाणे मांडले. या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे; तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही या प्रकाराविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकारातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय 'मनविसे'ने व्यक्त केला असून, या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

एका जेष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या तीन चोरांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकींसह ९ तोळ्याचे ब्रेसलेट असा सव्वा दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अमित बालाजी सोनवणे (वय २१ रा . पांडवदंड, फुरसुंगी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यासोबतच दोन मुलांनाही हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना सुधारगृहात दाखल केले आहे. भाऊसाहेब जगन्नाथ झेंडे (वय ५५ रा. पांडवदंड, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली होती.

फुरसुंगी रोडवर जेष्ठ नागरिक झेंडे एकटे आपल्या घरी दुचाकीवरून जात होते. त्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी झेंडे यांना रस्त्यात भुसा भरलेले पोते आडवे टाकून गाडी थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर चोरांनी दम देऊन झेंडे यांच्या हातातील ९ तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट व १ ,६८,०००० हजार रुपये रोख चोरून पळून गेले होते. याबाबत त्यांनी तक्रार दिली होती. याबात हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे पोलिस निरीक्षक अंजुमन बागवान, तपास विभागाचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, हेमंत पाटील यांनी चोरांना पकडले.

हातभट्टी अड्ड्यावर कारवाई

हडपसर : माळवाडीमधील साधना कन्या विद्यालयाच्या मागील बाजूस हातभट्टीची दारू विकणाऱ्या गुत्त्यावर हडपसर पोलिसांनी कारवाई केली आहे. साडेतीनशे लिटर गावठी हातभट्टी पोलिसांनी जप्त करून गुत्ता चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. परिसरात इतर ठिकणी सुरू असलेल्या इतर बेकायदा उद्योगांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मीरा उत्तम साळवे (वय ३५ रा. भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर) असे बेकायदा व्यवसाय करणाऱ्या महिलेचे नाव आहे. हडपसर पोलिसांना माळवाडी परिसरात हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे व सतीश उमरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह मंगळवारी रात्री साडेआठ वाजता कारवाई केली. त्या वेळी मीरा साळवे यांच्या घरात हातभट्टीने भरलेले १० कॅन आढळले. माळवाडी परिसरात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या इतर ठिकाणीही कारवाई केली. मात्र, हातभट्टी दारू मिळाली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली.

विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा

राजगुरुनगर : घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अमोल महादेव देशमुख (रा. राजगुरुनगर) असे या तरुणाचे नाव असून तो पीडित महिलेच्या घराशेजारी राहतो. महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. आरोपीला मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी देशमुख घरात घुसला आणि तिचा विनयभंग केला. या घटनेचा तपास खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के करीत आहेत. आरोपी अमोल महादेव देशमुख हा भाजपचे खेड तालुका अध्यक्ष व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतुल महादेव देशमुख यांचा भाऊ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरूरसाठी २४ कोटी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, शिरूर

शिरूर ग्रामीण व तर्डोबाची वाडी या दोन ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या दोन्ही पाणीपुरवठा योजनांची निविदास्तर कामे सुरू आहेत. एका महिन्याच्या आत निविदा पूर्ण होऊन या योजनांच्या कामाचे भूमिपूजन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करणार असल्याची माहिती शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली आहे.

पाचर्णे म्हणाले, 'शिरूर ग्रामीण व तर्डोबाची वाडी ही गावे शिरूर नगरपालिकेच्या हद्दीलगत असून औद्योगिक वसाहतीमुळे येथील लोकसंख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. जागतिक बँकेकडून अर्थसाह्य मिळालेल्या जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन कार्यक्रमांतर्गत राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये मुख्य भौतिक गुंतवणूक केली जात आहे. ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधांचे नियोजन व अंमलबजावणी सनियंत्रण हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन कार्यक्रमांतर्गत राज्यातून शिरूर ग्रामीण व तर्डोबाची वाडी या दोन ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना प्रायोगिक तत्त्वावर मंजूर करण्यात आल्या आहेत. शिरूर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी सोळा कोटी पन्नास लाख, तर तर्डोबाची वाडी पाणीपुरवठा योजनेसाठी सात कोटी पंचवीस लाख रुपये राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत मंजूर करण्यात आले आहेत.'

'या दोन्ही योजना सरकारच्या जीवन प्राधिकरण विभागामार्फत राबवण्यात येणार आहेत. शिरूर ग्रामीण व तर्डोबाची वाडी येथील २०३१ची लोकसंख्या गृहीत धरून माणशी ७० लिटर पाणी देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. शिरूर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी घोडनदीवर शिरूर नगरपालिकेच्या बंधाऱ्यापासून ५०० मीटर पश्चिमेला ६५ लाख रुपये खर्च करून नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. तर्डोबाची वाडी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी चिंचणी येथील घोडधरणाच्या फुगाऱ्याचे पाणी उचलण्यात येणार आहे. या दोन्ही योजना मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत,' असे पाचर्णे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पॅनिश पत्नीपासून पतीला घटस्फोट

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, पुणे

परदेशी तरुणीबरोबर विवाह केलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरचा घटस्फोटाचा अर्ज बुधवारी कोर्टाने मंजूर केला. पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने २९ वर्षांच्या स्पॅनिश तरुणीबरोबर विवाह केला होता. ती त्यांच्या मुलीला कोणतेही कारण न देता परत मायदेशी निघून गेली होती. त्याने वारंवार संपर्क साधूनही तिने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने कोर्टात घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. कोर्टाने त्याचा अर्ज मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या कोर्टात हा दावा दाखल करण्यात आला होता.

या दाम्पत्याचे लग्न पाच नोव्हेंबर २०११ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोंदणी पद्धतीने आणि विशेष विवाह कायद्यानुसार झाले होते. त्यांचा प्रेमविवाह होता. लग्नानंतर हे दोघे भोसरी येथे राहत होते. गर्भवती राहिल्यानंतर जून २०१२ मध्ये ती त्याला सोडून दुसरीकडे राहायला गेली होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये तिला मुलगी झाली. तिने त्याला फोन करून मुलगी झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो तिला आपण परत एकत्र राहू म्हणून सांगत होता. मात्र, तिने त्याचे ऐकले नाही.

त्यानंतर जुलै २०१४ मध्ये त्याने तिच्याकडे परत संपर्क साधला होता. तिने मुलीला घेऊन स्पेनला स्थायिक झाल्याचे त्याला सांगितले. तसेच त्याच्याबरोबर परत राहण्याची इच्छा नसल्याचे दर्शविले. त्याने वारंवार संपर्क करूनही तिने त्याला उत्तर दिले नाही. वर्षभर वाट पाहिल्यानंतर त्याने कोर्टात अखेर घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. त्याच्या पत्नीला वारंवार नोटीस पाठवूनही ती कोर्टासमोर हजर झाली नाही. जून २०१२ पासून त्याला सोडून ती राहत होती. कोर्टापुढे ही बाब मांडण्यात आली असून अर्जदार पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करण्यात येत असल्याचे कोर्टाने निकालात नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावाचा सूक्ष्म आराखडा

$
0
0

पुणे ः महाडमधील सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याची दुर्घटना आणि आंबेगाव तालुक्यातील माळीणमधील भूस्खलनाच्यावेळी आलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आता प्रत्येक गावाचा सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा मोबाइल अॅपवरही उपलब्ध करून दिला जाणार असून आपत्तीप्रसंगी मदतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना ही माहिती देण्यासाठी ऍसेट मॉपिंग अॅप या मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपद्वारे गावातील शाळा, आरोग्य केंद्र, दवाखाने, मोकळ्या जागा, पूल आदींची माहिती अक्षांश-रेखांशासह अॅपद्वारे अपलोड केली जाणार आहे. गावांच्या सूक्ष्म नियोजनाबरोबर पोलिस, पाटबंधारे, आरोग्य, बांधकाम, वैद्यकीय, महावीज, कृषी अशा चौदा शासकीय विभागांचाही स्वतंत्र आराखडा केला जाणार आहे.

माळीणमध्ये भूस्खलनाची दुर्घटना घडल्यानंतर गावची लोकसंख्या; तसेच या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला याची प्राथमिक माहिती वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्याचबरोबर या ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी रस्ते, मोबाइल कनेक्टिव्हीटी अशा समस्या समोर आल्या होत्या.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरसाठी उतरण्यासाठी मोकळी जागा कोठे आहे याची माहिती या दलाला हवी होती. त्यांना या जागेचा अक्षांश आंणि रेखांशाची माहिती हवी होती. ही माहिती तत्काळ उपलब्ध होत नव्हती. या परिस्थितीचा अभ्यास करून राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा अधिक अद्ययावत केला जात आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने मोबाइल अॅपची निर्मिती केली आहे. संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावाचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे परिसरातील पॉप्युलरनगर येथे विसर्जन मिरवणुकीच्या फलकासाठी लाकडी पहाड बांधताना विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात कामगाराच्या सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी मांडवाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आजारी असलेल्या आईला मुलाच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर धक्क्याने मृत्यू झाला.

भारत सखाराम कदम (वय ३०, रा. गोसावी वस्ती, वारजे) असे वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ठेकेदार दिलीप मारुती हनमघर (वय ३५, रा. दत्त नगर सोसायटी, वारजे) असे गुन्हा दाखल झालेल्या मांडव ठेकेदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉप्युलरनगर भागात एका मंडळाने विसर्जन मिरवणुकीची माहिती देणारा फलक लावण्याचे काम मांडव ठेकेदार हनमघर याला दिले होते. त्याकडे भारत कदम हा कामगार म्हणून कामास होता. गणपती विसर्जनासाठी गणेशभक्तांचे स्वागत करणाऱ्या फलकासाठी मुठा नदीपात्राकडे जाणाऱ्या रोडवर लाकडी पहाड बांधण्याचे काम सुरू होते. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कदम हा लाकडी पहात बांधत असताना त्याचा जवळच असलेल्या विजेच्या तारेला हात लागला. विजेचा धक्का लागल्याने कमद हा खाली कोसळला. बेशुद्धवस्थेत त्याला तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तो उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वारजे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपास केल्यानंतर मांडवाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फलक लावण्यासाठी गणेशमंडळाने परवानगी घेतली होती की नाही याचा तपास सुरू आहे. दरम्यान, भारत कदमच्या मृत्यूची बातमी समजताच काही दिवसांपासून आजारी असणारी त्याची आई कमल सखाराम कदम (वय ६२) यांना जबरदस्त धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला. कदमच्या मागे पत्नी, दोन मुले, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.

९० हजारांच्या चोरीप्रकरणी गुन्हा

नवी पेठेतील श्रीराम सिटी युनिअन फायनान्स लिमिटेड कंपनीचे कार्यालय बनावट चावीने उघडून त्यातील ९० हजार रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनोजकुमार नारायणदास शहा (वय ३५, रा. प्रियदर्शननगर, जुनी सांगवी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहा श्रीराम सिटी फायनान्समध्ये डिव्हिजनल मॅनेजर आहेत. त्यांचे कार्यालय सोमवारी सायंकाळी बंद करण्यात आले होते. चोराने बनावट चावीने त्यांच्या कार्यालयाच दरवाजा उघडला तसेच तिजोरीचा दरवाजा उचकटून आतील ८९ हजार ९०० रुपये चोरले. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास उघडकीस आली. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गर्दीत गंठण चोरले

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या वारजे येथील महिलेच्या गळ्यातील ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे येथील अनिता भालेराव (वय ४६) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भालेराव या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आल्या असताना चोरट्याने गर्दीची संधी साधून त्यांच्या गळ्यातील ६२ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरले. तसेच, हडपसर येखील भोसले गार्डनसमोरून पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावल्याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. हडपसर येथील ४० वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला ही पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसरीत गणरायाला निरोप

$
0
0


भाविकांच्या अपूर्व उत्साहात रंगली विसर्जन मिरवणूक

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे भोसरीत विसर्जन मिरवणूकीत चांगलीच रंगत आली होती. ढोल-ताशांचा साथीने भोसरीत गणेशाचे बुधवारी (१४ सप्टेंबर) विसर्जन करण्यात आले. दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

रात्री नऊपर्यंत १५ सार्वजनिक मंडळांसह सुमारे ८०० घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. भोसरीतील सार्वजनिक गणेश मंडळांची अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत बुधवारी गणेशाचे विर्सजन करण्यात आले.

कै. अंकुशराव लांडगे प्रेक्षागृहाशेजारील हौदात आणि विहीरीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. काही मंडळांनी मोशी येथे इंद्रायणी नदीत विसर्जन केले. महापालिकेच्या वतीने भोसरीतील विहीरीजवळ, तसेच मोशी येथे विसर्जन घाटावर अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच महापालिकेने भोसरीतील पीएमटी चौकात मिरवणूक काढलेल्या गणेश मंडळांच्या स्वागतासाठी कक्ष उभारला होता. महापालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या हस्ते सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दुपारी तीन वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सायंकाळी सहानंतर गणेश मंडळांच्या मिरवणुका विसर्जन मार्गावर येऊ लागल्या. त्यामुळे रस्ते गर्दीने फुलून गेले. भोसरीतील मानाचा गणपती असणाऱ्या लांडगे लिंबाची तालीम मंडळाने 'त्रिशूळ रथ' साकारला होता. मंडळाचा गणपती आकर्षक पुष्परथात विराजमान झाला होता. तसेच एलईडी स्क्रीनव्दारे मंडळाची माहिती आणि सामाजिक संदेशही देण्यात आला. लांडेवाडीतील नव महाराष्ट्र तरुण मंडळाने 'मयूर रथ' साकारला होता. आकर्षक अशी फुलांची सजावट केली होती. त्याच्यावर विद्युत रोषणाई केली होती. संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाने भंडाऱ्याची मनसोक्त उधळण करत मिरवणूक काढली.

आझाद मित्र मंडळाने 'विठ्ठलरथ' साकारला होता. छत्रपती शिवाजी मित्र मंडळाने ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाची मूर्ती आकर्षक होती. मिरवणुकीत शिवमुद्रा ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. फुगे-माने तालीम मंडळानेही आकर्षक 'मयूर रथ' साकारला होता. श्रीराम मित्र मंडळाचा 'मल्हार रथ' सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. समस्त मधले फुगे तालीम मंडळाने 'सिंहरथ' साकारला होता. समस्त गव्हाणे तालीम मंडळाने शिस्तबध्द मिरवणूक काढली. लोंढे तालीम मित्र मंडळाने 'शिषमहल' साकारला होता. लांडगे ब्रदर्स अँड फ्रेंड सर्कल मित्र मंडळाने ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. नयनरम्य विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. महापालिकेच्या वतीने भोसरीतील विहिरीजवळ, तसेच मोशी येथे विसर्जन घाटावर जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. काही मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. आवाजाची पातळी तपासून पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images