Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विमानतळ पुरंदरला शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यात पाहणी केलेल्या दोन जागांपैकी एका जागेला एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (एएआय) पथकाने प्राधान्य दिले आहे. येत्या आठवड्याभरात त्या जागेबाबतचा तांत्रिक अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. पुरंदर तालुक्यात पथकाने पाहणी केलेली जागा पडीक आहे. तसेच तेथे डोंगरदऱ्यांचा अडथळा नाही. महत्त्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणारी दोन हजार हेक्टर सलग जमीन एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

'एएआय'च्या पथकाने रविवारी पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर, आंबडी, पिसर्वे, राजुरी, जेजुरी, सासवड या परिसरातील दोन जागांची अंतिम पाहणी केली. त्यापैकी एका जागेला या पथकाने पसंती दर्शविली आहे. 'एएआय'चे सात तज्ज्ञ, राज्याचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव या वेळी उपस्थित होते. राजगुरुनगर येथे पाहणी केलेल्या दोन ठिकाणी बाराशे हेक्टरपर्यंत जागा मिळविता आली आहे. त्यापेक्षा अधिक जागा मिळणे अशक्य असल्याचे जिल्हा प्रशासनाने पथकाला स्पष्ट केले होते. त्यानंतर 'एएआय'च्या पथकाने पुरंदरमधील राजेवाडी व वाघापूर येथील प्रस्तावित विमानतळाची जागा पाहिल्यानंतर या पथकाने त्यास पसंती दर्शविली होती. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित होईल, असे सांगण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर पथकाने आज, रविवारी सकाळी पुन्हा पुरंदर तालुक्यातील जागांची अंतिम पाहणी केली. येत्या आठवड्याभरात या जागेसंदर्भातील तांत्रिक अहवाल ही समिती राज्य सरकारला सादर करणार आहे. त्यांनतर राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक्स्प्रेस-वेची वेगमर्यादा नेमकी किती?

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
Tweet : @kuldeepjadhavMT

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी खुला होऊन चौदा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्यापही एक्स्प्रेस वेवरील वाहनांची कमाल वेगमर्यादा किती असावी, याबाबत अधिकृत नोटिफिकेशन काढण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अतिवेग आणि लेन कटिंगमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या तुलनेने अधिक आहे. जे. पी. रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने केलेल्या पाहणीत गेल्या वर्षात एक्स्प्रेस वेवर झालेल्या एकूण अपघातांमध्ये ३१ टक्के अपघात वाहनांच्या अतिवेगामुळे झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच, एक्स्प्रेस वेवरील आवश्यक सुधारणांसाठी अभ्यास करणारे तन्मय पेंडसे यांनी गेल्या दोन दिवसांत मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या एक लेनवर केलेल्या पाहणीत ९९ टक्के वाहनांचा वेग हा ताशी ८० किलोमीटरपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले होते. मात्र, प्रशासनाने एक्स्प्रेस वेवर कमाल वेगमर्यादा निश्चित केलेली नाही. आता ही कमाल वेगमर्यादा ताशी ८० किमी निश्चित करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत.

गेल्या १६ वर्षांत एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातांमुळे 'सुसाट' वाहनांची चर्चा सातत्याने झाली. या वाहनांना अटकाव करण्यासाठी वेळोवेळी कारवाई करण्यात आली. ताशी कमाल १०० किमीच्या वेगाने वाहने धावू शकतील, या क्षमतेने एक्स्प्रेस वेची बांधणी करण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच कमाल ८० किमी वेगमर्यादेचे पालन करावे, अशा सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने दिल्या होत्या. त्याचे फलकही लावण्यात आले होते. आता वाहनांचा वेग कमालीचा वाढला असून, त्यांना अटकाव करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे ताशी ८० किमी वेगमर्यादा निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव आहे, अशी माहिती 'एमएसआरडीसी'चे सहव्यवस्थापकीय संचालक पी. एस. मंडपे यांनी 'मटा'ला दिली.

अधिकार पोलिसांना द्यावेत

नोटिफिकेशनचे अधिकार महामार्ग पोलिसांना नाहीत. कोणत्याही रस्त्याची कमाल वेगमर्यादा ठरविण्याचे अधिकार तो रस्ता ज्या हद्दीतून जातो तेथील पोलिसांना आहेत. महामार्ग पोलिस ही स्वतंत्र यंत्रणा आहे. एक्स्प्रेस वे हा पुणे, रायगड व नवी मुंबई या तीन जिल्ह्यांच्या हद्दीतून जातो. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर कमाल वेगमर्यादा निश्चित करताना या तिन्ही जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणांना स्वतंत्र नोटिफिकेशन काढावे लागेल. किंवा मग राज्य सरकारने अशा प्रकारचे नोटिफिकेशन काढण्याचे अधिकार महामार्ग पोलिसांना द्यावे, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

आतापर्यंतच्या कारवाईचे काय?

एक्स्प्रेस वेवर अतिवेगात जाणाऱ्या वाहनांना अटकाव करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी यापूर्वी अनेक योजना राबविल्या. त्यामध्ये दोन टोल नाक्यातील अंतर पार करण्यासाठी लागलेला कालावधी पाहून कारवाई करण्यात आली. तर, कधी 'स्पीडगन'चा वापर करून कारवाई करण्यात आली. मात्र, कमाल वेगमर्यादा निश्चित नसताना पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्रान्समधील गणेशोत्सवाची दशकपूर्ती

$
0
0

विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचे जसे सर्व भारतीयांना वेध लागतात; तसेच परदेशात राहणाऱ्या आम्हा भारतीयांनादेखील गणेशोत्सवाचे वेध लागतात. घरच्या आठवणींबरोबरच भारतात अनुभवलेले गणेशोत्सवाचे दिवस आठवतात. अशा वेळी महाराष्ट्र मंडळ, फ्रान्सच्या कुटुंबाबरोबर आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो. भारताबाहेर अमेरिका, इंग्लड येथे गणेशोत्सव धामधुमीत साजरा केला जातो. फ्रान्समध्ये मराठी बांधवांची संख्या खूप नव्हती; पण गेल्या काही वर्षांत फ्रान्समधील मराठी बांधवांची संख्या वाढते आहे आणि त्याबरोबरच सण-समारंभ साजरे करण्याचा उत्साहसुद्धा तेवढाच वाढतो आहे.

पॅरिसमध्ये दक्षिण भारतीय धाटणीचे ३० वर्षे जुने गणेश मंदिर आहे. ला शापेल या भागात पंचमुखी गणपतीचे हे मंदिर स्थापिलेले आहे. गेल्या २५ वर्षांपासून गणेश चतुर्थीला या मंदिरापासून मोठी रथयात्रा निघते. मंदिराच्या जवळच्या परिसरातून प्रदक्षिणा घालून यात्रेचा समारोप होतो. या यात्रेत भारतीयांबरोबरच परदेशी नागरिकांची संख्या लक्षणीय असते. आतापर्यंतच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात या मंदिरात सर्वांनी एकत्रित जाऊन गणेशपूजा केली जायची आणि त्यानंतर प्रसाद असे. त्यानंतर भारतीय रेस्टॉरंटमध्ये जाऊन सहभोजन असे.

यंदा महाराष्ट्र मंडळ, फ्रान्स दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. सभासदांची संख्या सत्तरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या वर्षीसुद्धा गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह गेल्या काही वर्षांएवढाच, किंबहुना अधिकच होता. आठवड्याची अखेर साधून, शनिवारी १० सप्टेंबरला महाराष्ट्र मंडळ, फ्रान्सचा गणेशोत्सव साजरा झाला. मंदिरातील जागा सर्व उपस्थितांना सामावून घ्यायला अपुरी पडत असल्याने संगीत नावाच्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून पूजा आणि आरती केली गेली. कार्यक्रमासाठी अकरा बाल मित्र-मैत्रिणींसहित एकूण साठ जणांची उपस्थिती होती. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष शशी धर्माधिकारी, सचिव आशा राजगुरू आणि चंद्रशेखर राजगुरू यांच्या हस्ते गणेशाची पूजा आणि आरती झाली. बँक ऑफ इंडियाचे अधिकारी नितीन देशपांडे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकुटुंब उपस्थित होते. त्या नंतर मंडळातील बालचमूंचे श्लोक आणि स्तोत्रपठण झाले. अथर्वशीर्षपठण झाले. सर्वांना प्रसादाचे वाटप झाले आणि त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये सर्वांनी भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला.

उन्हाळाच्या सुट्टीनंतर गणेशोत्सव हे सर्व मराठी बांधवाना एकत्र येण्याचे एक मोठे निमित्त असते. फ्रान्समध्ये सप्टेंबर हा शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचा महिना असल्याने; तसेच गणेशोत्सव मराठी माणसांसाठी मोठा सण असल्याने महाराष्ट्र मंडळात अनेक नवीन सदस्यांची भर पडते. नवीन मित्रमंडळींची ओळख होण्यासाठी गणेशोत्सवाचा कार्यक्रम पर्वणी ठरतो.

- डॉ. प्रियांका देवी-मारुलकर, पॅरिस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिट्सबर्गचा आगळा गणेशोत्सव

$
0
0

आजकाल घरटी एक मराठी माणूस परदेशात असतो, असे म्हणतात आणि ते खरंही आहे. आणि मराठी माणूस म्हटला, की गणेशोत्सव हा आलाच. मग तुम्ही महाराष्ट्रात असा, मायदेशात असा किंवा अगदी देशाबाहेर. खरं तर मराठी माणसासाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण म्हणजे गणेशोत्सव असतो. अमेरिकेतील सगळ्याच मराठी मंडळांमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो आणि मग त्यात पिट्सबर्गचे मराठी मंडळ कसे बरे मागे असेल? गेली तीसहून अधिक वर्षे येथे उत्साहात गणपती स्थापिला जातो. महाराष्ट्रात गणपती यायच्या काही दिवस आधी जसे एक वातावरण तयार होते ना, अगदी तसेच इथेही असते. बाप्पा यायच्या आधीची सगळ्यांची लगबग, तयारी अगदी सगळे तसेच!

खरे तर गेल्या वर्षीपर्यंत इथे एक दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जात असे; पण या वर्षीपासून केवळ मराठीच नव्हे, तर सगळेच भारतीय मिळून मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करतील, या हेतुने इथे सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पिट्सबर्ग मराठी मंडळ आणि हिंदू-जैन मंदिर एकत्र येऊन व्यवस्थापन पाहत आहेत. लोक एकत्र यावे, या अतिशय उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी कित्येक वर्षांपूर्वी सुरू केलेला गणेशोत्सव आजही अगदी साता-समुद्रापार भारतीय लोकांना एकत्र यायला उद्युक्त करतो आहे, याहून गणेशोत्सवाचे मोठे यश ते कोणते?

सकाळी ढोल-लेझीम, झांजा, जमलेल्या सर्व गणेशभक्तांचा पुरेपूर उत्साह आणि गणरायाचा गजर अशा भारलेल्या वातावरणात गणरायाचे आगमन झाले आहे. पारंपरिक पोशाखातील लहान-थोर या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. दर वर्षी येथील मराठी मंडळी वेशभूषेचा एक प्रकार ठरवतात. कधी पैठण्या, तर कधी पुरुषांसाठी बाराबंदी. या वर्षी कांजीवरमचा थाट होता. श्री गणेशाची लेझीम-ढोलाच्या गजरात स्थापना, मग महाप्रसाद आणि त्यानंतर रोज सकाळ-संध्याकाळ सात दिवस आरती आणि महाप्रसाद असा कार्यक्रम आहे.

गणेशोत्सव म्हटले, की आपल्याला आठवतात ते अभिरुचीपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम. मनोहर दाम्पत्याच्या दिग्दर्शनाखाली यंदा पिट्सबर्ग महाराष्ट्र मंडळाच्या स्थानिक कलावंतांनी बसवलेला आगळा वेगळा संगीतसंध्येचा - भावगीते आणि भक्तीगीतांचा कार्यक्रमदेखील होणार आहे. त्याबद्दल येथे सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यानंतर 'पुनरागमनायच' म्हणत बाप्पाचे विसर्जन.

खरे तर गणपती उत्सवाचे हे दिवस परदेशातील लोकांना आपल्या मायेच्या माणसांची, आपल्या बालपणाची आठवण करून देतात. गणपतीचे दहा दिवस अक्षरशः आपण महाराष्ट्रात तर नाही ना, असे वाटते; कारण रोज कोणा ना कोणाकडे आरती, मोदक आणि बाप्पाचा गजर. आपल्या घरापासून हजारो मैलांवर राहूनदेखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा बाप्पा आम्हाला मनापासून आनंद देऊन जातो.

गणपती बाप्पा मोरया!


- श्वेता चक्रदेव-डोंगरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवड्यात देखाव्यांतून सामाजिक संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

वडगाव शेरी आणि चंदननगर भागात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी यंदाच्या वर्षी साधेपणाने उत्सव साजरा केला आहे. काही मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा संकल्प केला आहे.

वडगाव शेरीतील वीरचक्र तरुण मंडळाने यंदाच्या वर्षी आकर्षक पाण्यावरचा थ्री डी लेझर शो देखावा सादर केला आहे. संगीताच्या तालावर थिरकणारा लेझर शो डोळ्यांचे पारणे फेडत आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ असा संदेशही मंडळाने दिला आहे. मंडळाचे यंदा ३० वे वर्ष आहे.

वडगांव शेरी गावठाणातील भैरवनाथ तरुण मंडळाने विद्युत रोषणाई सादर केली आहे. मंडळाकडून रक्तदान शिबिर, भजन, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सोमनाथ नगर येथील एकता मित्र मंडळाने यंदा गावाकडील संस्कृती आणि जीवनमान याचे दर्शन घडविणारा देखावा सादर केला आहे. दर वर्षी बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुवर्ण भारत मित्र मंडळ ट्रस्टने यंदा शंकराच्या अवतारातील आठ फूट उंचीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे

चंदननगर मित्र मंडळ ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपूनत यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात वर्गणीतून जमा झालेली रक्कम बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. नाम फाउंडेशनला ही रक्कम देण्यात येईल. अंदाजे पाच ते सहा लाख रुपये देण्याचा मंडळाचा संकल्प आहे. चंदननगर येथील हनुमान व्यायाम शाळा मंडळाची हनुमानाची भव्य मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रीमंत शिवराज तरुण मंडळाने या वर्षी पाण्याचे कारंजे देखावा सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वानवडी, कोंढव्यात भाविकांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

वानवडी येथील गणेश मंडळांनी धार्मिक व सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सादर केले आहेत. कोंढव्यातील गणेश मंडळाने सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे देखाव्यातून मांडले आहेत. कोंढव्यात देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वानवडीतील होले मळा येथील हनुमान मित्र मंडळाने कचऱ्यापासून होणारे दुष्परिणाम देखाव्यातून मांडले आहेत.

फातिमानगर येथील नवयुग मित्र मंडळाने संगीताच्या तालावर कारंज्याचा देखावा सादर केला आहे. वानवडीतील जगताप चौक येथील मोरया मित्र मंडळाने 'कृष्णलीला' हा जिवंत देखावा केला आहे. जगताप चौक येथील जयहिंद मित्र मंडळाने गणेश महलाचा देखावा सादर केला आहे. वानवडी गाव येथील राजे संभाजी चौक येथील शिवसंघ मित्र मंडळाने फुलांची आरस केली आहे. मंडळ दर वर्षी विविध सामाजिक उपक्रम करीत असते. कोंढव्यातील श्रीमंत साईनाथ मित्र मंडळाने सामाजिक प्रबोधन करणारा 'सोशल मीडिया शाप की वरदान' हा जिवंत देखावा सादर केला आहे. नवशक्ती तरुण मंडळाने भारतीय संस्कृतीचे दर्शन देखाव्यातून सादर केले आहे. संयुक्त एकात्मता पांडुरंग सेवा मित्र मंडळाने गणेश महालाचा देखावा केला आहे. भैरवनाथ तरुण मंडळाने गोल्डन गणेश महल सादर केला आहे. उंड्री येथील युवक मित्र मंडळाने फुलांची आरस केली असून, मंडळाने विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूरमध्ये पौराणिक देखाव्यांवर भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिरूर

शिरूर आणि परिसरात अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी धार्मिक आणि पौराणिक देखावे सादर केले आहेत. देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. कापड बाजार गणेश मित्र मंडळाने यंदाचा वर्षी अमरनाथ येथील शिवलिंग देखावा सादर केला आहे. या देखाव्यातील शंकराची भव्य मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरली आहे. मंडळाने महाप्रसादाचे आयोजन केले होते.

हलवाई चौक गणेश मित्र मंडळ दरवर्षी साईबाबांच्या जीवनावर आधारित देखावा सादर करते. यंदाच्या वर्षी मंडळाने द्वारकामाई येथे धुनी जवळ बसलेले साईबाबा हा देखावा सादर केला आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साईबाबांची भव्य मूर्ती बनविली आहे. मंडळ यंदाचा वर्षी साध्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढणार असून यातून वाचलेल्या पैशातून हलवाई चौक परिसरात सीसीटीव्ही बसविणार आहेत. याखेरीज परिसरातील सुमारे २५० महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप करणार आहेत.

आडत बाजार गणेश मित्र मंडळ यांनी यंदाचा वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग ४० हलत्या मूर्तींच्या साह्याने सादर केले आहेत. हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची घेतलेली प्रतिज्ञा, शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका, शिवराज्यभिषेक आदी प्रसंग देखावात सादर करण्यात आले आहेत.

पौराणिक आणि भव्य हलते देखावे सादर करण्याची पंरपरा असणाऱ्या विठ्ठल मंदिर गणेश मंडळाने त्रीपीटीका राक्षसाचा वध हा देखावा सादर केला आहे. मंडळाचा कार्यकर्त्यानी स्वतः हा देखावा तयार केला आहे. हनुमान मित्र मंडळ मारुती आळी यांनी कानिफनाथांचा जन्म हा देखावा सादर केला आहे. सरदार पेठ गणेश मित्र मंडळाने सामाजिक आणि पाणी बचतीचा संदेश देणारा 'पाणी आडवा पाणी जिरवा' हा देखावा सादर केला आहे. देखावातील निवेदन व त्याद्वारे देण्यात आलेला संदेश प्रभावी झाला आहे.

त्रिमूर्ती गणेश मंडळ रेव्हेन्यू कॉलनी मंडळाने नरसिंह अवतार हा पौराणिक देखावा सादर केला आहे. गोपाल तालीम गणेश मित्र मंडळ गोपाल वस्ती यांनी वटसिद्धनाथांचा जन्म हा देखावा सादर केला आहे.

शहरातील आझाद हिंद गणेश मंडळ सुभाष चौक, आझाद क्लब लाटे आळी, मुंजोबा गणेश मित्र मंडळ भाजी बाजार, छत्रपती शिवाजी गणेश मंडळ, राम आळी गणेश मित्र मंडळ यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्टेट बँक कॉलनी गणेश मित्र मंडळाची गणेश मूर्ती भव्य व सुबक असून मंडळाने प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांच्या व्याख्यानासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैज्ञानिक देखाव्यांना दौंडमध्ये प्रतिसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

दौंड शहरात ५४ सार्वजनिक मंडळे सार्वत्रिक गणेश उत्सव साजरा करीत आहेत. कुरकुंभ मोरीजवळील रेल्वे वसाहतीतील झुंज मित्र मंडळाने आर्ची, परशा आणि त्यांचे मित्र दौंड शहरात फेरफटका मारत आहेत आणि दौंड शहरातील समस्यांवर भाष्य करीत आहेत, असा देखावा सादर केला आहे. दौंड शहरातील शिवाजी चौकातील बाल विजय गजानन मंडळाची वैज्ञानिक देखाव्यांची परंपरा या वर्षीही कायम आहे. विविध प्रकारच्या प्रदुषणामुळे ओझोनच्या थराला पडलेले छिद्र आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम दृकश्राव्य माध्यमातून मांडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा रस्त्यावर देखाव्यांतून प्रबोधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महिलांवर वाढत चाललेले अत्याचार, स्त्री शक्तीचा जागर, बेटी बचाओ बेटी पढाओ, वाहतूक कोंडीतून सुटका असे सामाजिक विषयांवरील विविध देखावे पुण्याच्या दक्षिण भागात असलेल्या पर्वती, सहकारनगर, तळजाई, पद्मावती या भागाचे प्रमुख आकर्षण आहेत. याशिवाय विद्युत रोषणाई आणि राजमहालाचे देखावेही आकर्षक आहेत. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने साकारलेल्या जेजुरी गडावर शारदा गजाननाची विलोभनीय मूर्ती पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

अरण्येश्वर गवळीवाडा येथील अरण्येश्वर मित्र मंडळाने 'करू या जागर आदिमाया शक्तीचा' हा जिवंत देखावा साकारला आहे. देखाव्यातून स्त्रीवर वेगवेगळ्या पद्धतीने होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्यात आली आहे. 'स्त्रीशक्ती अभेद्य आहे. तिचा उद्रेक झाला तर, ती पुरुषांविरोधात समर्थपणे उभी ठाकते,' असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. शिवदर्शन येथील दर्शन मित्र मंडळाने बेटी बचाओ, बेटी पढाओ हा जिवंत देखावा उभारला आहे.

मुलगी शिकली तरच देशाचे कल्याण होईल, असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचे दाखले देऊन मुलींच्या शिक्षणासंदर्भात जागृती करण्याचा प्रयत्न मंडळातर्फे करण्यात आला आहे. अखिल लक्ष्मीनगर शाहू वसाहत मंडळातर्फे वाहतूककोंडीबाबत जनजागृती करणारा देखावा साकारला आहे. मंडळाच्या परिसरात ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहेत.

वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे; तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असा संदेश देणारी बोलकी व्यंगचित्रे लक्ष्मीनगर परिसरात आकर्षण ठरत आहेत. तळजाई वसाहतमधील महात्मा गांधी तरुण मित्र मंडळाने विद्युत रोषणाईचा देखावा साकारला आहे. याशिवाय अखिल तावरे कॉलनी मित्र मंडळाने साकारलेले काल्पनिक मंदिर, विनायक मंडळाने साकारलेला राजमहाल डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​मित्रानेच पळविली वीस लाखांची रक्कम

$
0
0

मित्रानेच पळविली वीस लाखांची रक्कम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवाजीनगर परिसरात कारमधून मित्रानेच वीस लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विजय मधुकर माने (वय ३४, रा. कराड, जि. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रोहिदास थोरात (रा. उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने यांचा कराड येथे टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांची रोहिदास थोरात याच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर थोरात याने वैद्यकीय उपचारासाठी मानेंकडून काही पैसे उसने घेतले. माने यांना व्यवसायासाठी पैसे हवे होते, त्या वेळी त्यांनी थोरातकडे उसने दिलेल्या पैशांची मागणी केली. त्यासाठी माने हे थोरातच्या गावी गेले होते. पण, थोरातने मानेंना पुण्यात गेल्यानंतर पैसे देतो, असे सांगितले. शिवाजीनगर बस स्थानक येथे आल्यानंतर थोरातने माने यांना कार पार्किंगमध्ये लावण्यास सांगितली. पैसे आणण्यासाठी म्हणून थोरात निघून गेला. त्या वेळी माने यांच्या कारमध्ये वीस लाख रुपयांची रोकड असलेली बॅग थोरात नजर चुकवून घेऊन गेला. पैसे आणण्यासाठी गेलेला थोरात एका तासानंतरही परत येत नसल्याने माने यांनी त्याला फोन लावला. मात्र, त्याचा फोन लागला नाही. माने यांना शंका आली म्हणून कारमधील थोरातची बॅग पाहिली. त्यावेळी त्यांना स्वतःची पैशांची बॅगही नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पाच प्रभागांच्या रचनेत बदल

$
0
0

पाच प्रभागांच्या रचनेत बदल
विभागीय आयुक्तांच्या समितीकडून सरकारला प्रारूप सादर
म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेने निवडणुकीसाठी तयार केलेल्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने पाच प्रभागांच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांसह समितीने प्रभाग रचनेचे प्रारूप राज्य सरकारला सोमवारी सादर केले.
महापालिकेची फेब्रुवारी २०१७ मध्ये होणारी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी महापालिकेला प्रभाग रचना तयार करून विभागीय आयुक्तांच्या समितीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महापालिकेने ही प्रभाग रचना करून विभागीय आयुक्तांच्या त्रिसदस्यीय समितीकडे ७ सप्टेंबरला सादर केली. या प्रभाग रचनेची छाननी करून १२ सप्टेंबरला त्याचे प्रारूप राज्य सरकारला सादर करण्याची मुदत विभागीय आयुक्तांच्या समितीला देण्यात आली होती.
या प्रभाग रचनेची छाननी करताना विभागीय आयुक्तांच्या समितीला काही शंकास्पद त्रुटी आढळून आल्या. विशेषत्वाने पाच प्रभागांमध्ये या त्रुटी दिसल्या. त्यात गृहनिर्माण सोसायट्या व वस्त्यांचे अव्यवहार्य विभाजन, ब्लॉक व गावठाणाची फोड, भौगोलिक सलगता आणि नैसर्गिक सीमांच्या निकषांना तिलांजली असे खटकणारे बदल आयुक्तांच्या समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यात आयुक्तांनी बदल करून प्रभाग रचनेचे प्रारूप राज्य सरकारला सादर केले.
या निवडणुकीसाठी महापालिकेची लोकसंख्या ३१ लाख ३२ हजार ४१३ इतकी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्याआधारे साधारणतः ७६ हजार ४०० लोकसंख्या (दहा टक्के कमी-अधिक) गृहित धरून ४१ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. या ४१ मधील ३९ प्रभाग हे चार सदस्यीय असणार आहेत आणि दोन प्रभाग हे तीन सदस्यीय असणार आहेत. याचाच अर्थ महापालिकेची सदस्य संख्या १६२ इतकी असणार आहे. प्रभागांची रचना उत्तरेपासून उत्तरपूर्व बाजू, पश्चिम बाजू व शेवटी दक्षिण बाजू या निकषांवर करण्यात आली आहे. त्याची सुरुवात धानोरी-कळस येथून झाली असून शेवट कोंढवा-येवलेवाडीला करण्यात आला आहे. तीन सदस्यीय प्रभाग हे शेवटच्या दोन प्रभागांमधील आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये ११ प्रभागांच्या रचनेत बदल
पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेमध्येही विभागीय आयुक्तांच्या त्रिसदस्यीय समितीने बदल केले आहेत. या प्रभागांची छाननी करताना ११ प्रभागांच्या रचनेमध्ये अव्यवहार्यता आढळून आली. त्यामुळे या प्रभागांच्या रचनेत आयुक्तांच्या समितीने बदल करून त्याचे प्रारूप राज्य सरकारला सादर केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची २०११ ची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे. त्याआधारे ३४ प्रभाग करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​डीजे व्हॅन पोलिसांकडून जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
टेम्पोला 'मॉडिफाय' करून तयार केलेल्या दोन 'डीजे व्हॅन'वर पोलिसांनी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी ध्वनी प्रदूषणांच्या कारवाईला सुरुवात केली असून दोन व्हॅन जप्त केल्या आहेत. या व्हॅन बेकायदा 'मॉडिफाय' करण्यात आल्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागालाही सूचना करण्यात येणार आहे. दरम्यान, परिवहन विभागाने आपणहून अशा प्रकारच्या व्हॅनवर कारवाई करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी अशा प्रकारच्या दोन व्हॅन जप्त केल्या आहेत. ग्रामीण भागात या व्हॅनची क्रेझ असून 'एसी' बसवलेल्या या व्हॅनवर 'हॅगिंग सिस्टिम' बसवण्यात आल्या आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी रविवारी त्रिमूर्ती चौकात कारवाई करून दोन व्हॅन जप्त केल्या आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत 'डीजे'चा आवाज वाढल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. ध्वनी प्रदूषणाबाबत पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याने 'डीजे' मालकांचे धाबे दणाणले आहेत.
हाय कोर्टाने पोलिसांना ध्वनी प्रदूषणाच्या कारवाया करण्यासाठी आदेश दिले असून आढावा घेण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी शहरातील प्रत्येत पोलिस ठाण्यात या कारवायांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. आवाजाचे नमुने घेऊन कारवाई करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन व्हॅन जप्त केल्या असून त्या मॉडिफाय केल्याने त्यांची तक्रार परिवहन विभागालाही करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी डीजे सिस्टिमही जप्त केल्या आहेत.

मॉडिफाइड व्हॅनवर कारवाई कधी?
कुठल्याही वाहनामध्ये फेरबदल करायचे असल्यास त्याला परिवहन विभागाची परवानगी आवश्यक असते. या डीजे व्हॅन शहरात वापरण्यात येत असताना वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतो. परिवहन विभागाला या व्हॅन राजरोस दिसत असतानाही त्यांच्यावर कारवाई का नाही, असा प्रश्न उच्चपदस्थ अ​धिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीसाठी रिंगरोड

$
0
0

विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीसाठी रिंगरोड
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहराच्या मध्यवस्तीतील प्रमुख रस्ते बंद केले जात असल्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणे कठीण होते. काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये गैरसोयदेखील होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी यंदा सुरळीत वाहतुकीसाठी शहराच्या मध्यवस्ती बाहेरून रिंग रोडची योजना आखली आहे.
गणेश विजर्सन मिरवणुकीमुळे दीड दिवस लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता हे प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जातात. त्यामुळे शहराच्या उपनगरातून मध्यवस्तीत येणे किंवा मध्यवस्तीतून अन्य ठिकाणी जावयाचे झाल्यास गैरसोय होते. तसेच, जे रस्ते वाहतुकीसाठी खुले असतात, तेथे कोंडीसदृश परिस्थिती असते. त्यामुळे सुरळीत वाहतुकीसाठी वाहतूक पोलिसांनी हा रिंगरोड तयार केला आहे. शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्ह्ज चौक, गुलटेकडी, सातारा रस्ता, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), म्हात्रे पूल, पौड रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ चौक, शिवाजीनगर, सीओईपी चौक, आरटीओ, बंडगार्डन असा हा रिंग रोड असणार आहे. या रस्त्यामुळे शहराचा मध्यभाग टाळून नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात जाता येणार आहे, अशी माहिती वाहूतक शाखेचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
शहरातील १७ रस्ते विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंद राहणार आहेत. जंगली महाराज रस्ता स. गो. बर्वे चौक ते झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत सुरू राहणार आहे. तर, शिवाजी रस्ता स. गो. बर्वे चौकापासून काकासाहेब गाडगीळ पुतळ्यापर्यंत, नेहरू रस्ता संत कबीर पोलिस (नाना पेठ) चौकीपर्यंत, सोलापूर रस्ता हडपसर ते सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्ता व्होल्गा चौकापर्यंत, लालबहादूर शास्त्री रस्ता दांडेकर पूल ते सेनादत्त पोलिस चौकी वाहतूक सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​विद्यार्थ्यांच्या उत्साहात रंगली ‘स्पीक फॉर इंडिया’

$
0
0

विद्यार्थ्यांच्या उत्साहात रंगली 'स्पीक फॉर इंडिया'
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अधिक श्रीमंतीचा हव्यास म्हणजे भ्रष्टाचाराकडे वाटचाल...प्रत्येकाला आरोग्याच्या सुविधांचा अधिकार पाहिजे...घरगुती हिंसाचारात वाढ...ऑनलाइन शिक्षण हे वर्गातील शिक्षणाप्रमाणेच...शैक्षणिक संकुलामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असलेच पाहिजेत...अशा असंख्य चर्चेतील विषयांवर पुणे जिल्ह्यातील कॉलेजवयीन विद्यार्थ्यांनी सोमवारी मनमोकळी आणि उत्स्फूर्त मते मांडली. या विषयांवर विद्यार्थ्यांनी मुद्देसूद आणि लक्षवेधक मते मांडल्याने स्पर्धेत रंगत आली होती.
निमित्त होते, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीने आयोजित 'स्पीक फॉर इंडिया' या वादविवाद स्पर्धेच्या दुसऱ्या प्राथमिक फेरीचे. फेडरल बँकेच्या सहकार्याने या वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'नेव्हिल वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च'च्या सभागृहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत पुणे जिल्ह्यातील कॉलेजांमधून आलेल्या एकूण ७४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी स्पर्धकाने ऐन वेळी निवडलेल्या विषयावर विचारपूर्वक मते मांडली. त्यामुळे ही फेरी अतिशय उत्साहात पार पडली.
'क्रेडिट कार्ड की डेबिट कार्ड, यापैकी चांगले काय', 'भारताला यूएन सिक्युरिटी कौन्सिलच्या सदस्यत्वाची कायम मान्यता मिळण्याबाबत', 'हॅकिंग-बुद्धिमत्तेचा आजार की वृत्ती' आदी अनेकविध विषयांवर विद्यार्थ्यांनी परखड भाष्य केले. या फेरीतून निवडण्यात आलेल्या २० स्पर्धकांनी चारच्या गटांत पुढच्या वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. या फेरीत प्रत्येक गटातील दोन विद्यार्थी निवडलेल्या विषयासाठी 'फॉर द मोशन'; तर दोन विद्यार्थी 'अगेन्स्ट द मोशन' मत व्यक्त करीत होते. या फेरीसाठी चर्चेत असणाऱ्या 'ऑलिंपिक खेळ- पदकाचा शोध की नुसता गाजावाजा', 'उत्तेजक द्रव्यांचा खेळात वापर : खेळाडूवर बंदी का नाही', 'कम्प्युटर आणि मोबाइलवर अवलंबून राहणे विद्यार्थ्याच्या विकासासाठी योग्य?', 'केरळ सरकारचा फॅट टॅक्स स्वीकारण्याबाबतचा प्रस्ताव - सुदृढ समाजाची निर्मिती', 'सौंदर्य प्रसाधने - युवा वर्गात आत्मविश्वासाबाबतचे मुद्दे निर्माण करतात', अशा विषयावंर विद्यार्थी जीव ओतून बोलत होते.
या फेरीतून चार विद्यार्थ्यांची निवड ही विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राथमिक फेरीतूनही चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता एकूण आठ विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच, संबंधित कॉलेजला पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

पुण्यातून कबीर, मान्या, फिल्झा आणि स्वप्नील
'स्पीक फॉर इंडिया' स्पर्धेच्या पुणे जिल्ह्याच्या दुसऱ्या प्राथमिक फेरीतून पिंपरी-चिंचवड इंजिनीअरिंग कॉलेजचा कबीर सुखानी, माइर्स आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजची मान्या सिंह, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजची फिल्झा इक्बाल, आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटरचा स्वप्नील चौधरी या चार विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. परीक्षक म्हणून फेडरल बँकेचे सहायक व्यवस्थापक सुमीत लाल, प्रा. विकास डोळे या तज्ज्ञांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएमए’ करणार रेडिओलॉजिस्टना मदत

$
0
0

'पीसीपीएनडीटी सेल' कार्यरत होणार; कोर्टाचे दरवाजे ठोठावणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यातील जाचक कायद्यांचा रेडिओलॉजिस्टना त्रास होत असल्याने, सोनोग्राफी तज्ज्ञांच्या मदतीला 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ची (आयएमए) प्रदेश शाखा धावून आली आहे. प्रदेश शाखा आता 'पीसीपीएनडीटी सेल' कार्यरत करणार असून, या माध्यमातून हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले जातील.
'इंडियन रेडिओलॉजिकल अॅन्ड इमेजिंग असोसिएशन'च्या (आयआरईए) माजी अध्यक्षांसह दोन डॉक्टरांना वर्षभराच्या साध्या कारावसाची शिक्षा नुकतीच ठोठावण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरातील आरोग्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे. सोनोग्राफी करणे सोडून देण्याचा निर्णय डॉक्टर घेऊ लागले आहेत. राज्य शाखेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली. त्या वेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयेश लेले, संघटनेचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, खजिनदार डॉ. शिवकुमार उत्तुरे, तसेच रेडिओलॉजिस्ट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
'राज्यातील सर्व रेडिओलॉजिस्टना कायद्यातील चुकीच्या तरतुदीचा त्रास होत आहे. एफ फॉर्म भरणे, स्वाक्षरी नसणे किंवा अन्य तांत्रिक चुकांमुळे डॉक्टरांना शिक्षा होत आहे. यामुळे कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. किरकोळ कारणांसाठी कायद्याचा दुरुपयोग होत आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व सोनोग्राफी तज्ज्ञांसह स्त्रीरोगतज्ज्ञांना आम्ही एकत्र आणणार आहोत. आता मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर येथे बैठक घेण्यात येणार आहे. राज्यासह देशातील विविध खटल्यांचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर हायकोर्टासह सुप्रीम कोर्टापर्यंत यासंदर्भात याचिका दाखल करण्यात येईल,' अशी माहिती राज्य 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विसर्जनाची तयारी युद्धपातळीवर सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आवश्यक तयारीसाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. बाप्पाचे विसर्जन करणे सोयीचे व्हावे, यासाठी शहरातील १७ घाटांसह शाळा आणि विविध ठिकाणी विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य मिरवणूक मार्गासह अन्य मार्गांवरील रस्त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता करण्यात आली आहे.
बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी पालिका प्रशासनाने घेतली आहे. नदीपात्रालगतच्या घाटांवर महापालिकेचे कर्मचारी, जीवरक्षक, सफाई कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. तसेच, २४ तास विद्युत व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या स्वागतासाठी टिळक चौकासह विविध भागात स्वागत कक्ष उभारण्यात येत आहेत. येथे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
..
सोन्याचे ब्रेसलेट दिले परत
बाप्पांच्या मूर्तीसह हौदामध्ये विसर्जित झालेले सोन्याचे ब्रेसलेट पालिकेच्या अधिकाऱ्यांनी परत केले. रविवारी सायंकाळी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या पटवर्धन हौद येथे हा प्रकार घडला. कसबा, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत विसर्जनासाठी पालिकेने हौद बांधला आहे. भोसगे नामक गृहस्थ घरच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी रविवारी संध्याकाळी आले होते. विसर्जन करून घरी गेल्यानंतर मूर्तीबरोबर सोन्याचे ब्रेसलेट देखील विसर्जित झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ड्युटीवर हजर असलेले आरोग्य निरीक्षक कृष्णा अवघडे, नंदकुमार म्हांगरे, मुकादम यशवंत उमंदे यांनी हौदाची तपासणी करून ब्रेसलेट परत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रबोधनासह सजावटीवर भर

$
0
0

एरंडवणे, लोकमान्यनगर भागात आकर्षक देखावे

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांपासून ते गाण्यांवर थिरकणाऱ्या रोषणाईपर्यंतचे वैविध्यपूर्ण देखावे एरंडवणे, राजेंद्रनगर, पानमळा भागातील गणेश मंडळांनी सादर केले आहेत. अखिल आंबील ओढा मंडळाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे विदारक वास्तव मांडले आहे. साने गुरुजी तरुण मित्र मंडळाने ५१ फूट उंचीची स्वामी समर्थांची भव्य मूर्ती साकारली आहे. कर्वे रोडवरील श्रीकृष्ण मंडळाने अकरा मारुती दर्शन हा आकर्षक देखावा साकारला आहे.
एरंडवणे, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर भागात रहिवासी क्षेत्र अधिक असल्याने मंडळांची संख्या मर्यादित आहे. सजावटीमध्ये मात्र ही गणेश मंडळे कुठेही कमी नाहीत. यंदाही रोषणाई, आकर्षक सजावट, जिवंत देखावा, हलता देखावा असे अनेक प्रकार या भागात बघायला मिळत आहेत. म्हात्रे पुलावरून पानमळ्याकडे जाणाऱ्या चौकात अखिल राजेंद्रनगर मित्र मंडळाने यंदा सजावटीचा देखावा साकारला आहे. अखिल दत्तवाडी नागरिक संघ मंडळाने दर वर्षीप्रमाणे रोषणाईच्या देखाव्याची पंरपरा कायम राखली आहे. अखिल भारतीय दत्तवाडी उत्सव समिती संयुक्त लायन्स क्लबतर्फे संभाजी महाराजांची कारकीर्द हलत्या देखाव्यातून साकारण्यात आली आहे. या भागातील सर्वांत मोठा देखावा या मंडळाचा आहे. गुरुदत्त मंडळ, अखिल राजेंद्रनगर मित्र मंडळाने सजावटीवर भर दिला आहे. याच भागातील वीर सावरकर मित्र मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, त्यांनी गणेश महाल साकारला आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्सवादरम्यान नेहमी मराठी भक्तिगीते लावली जातात.
लोकमान्यनगर, दांडेकर पुलाजवळील मंडळांच्या देखाव्यांमध्ये वैविध्य आहे. अखिल आंबील ओढा मंडळाने हलत्या देखाव्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे विदारक चित्र मांडले आहे. याच रस्त्यावर पुढे नवनाथ मित्र मंडळ आणि सेनादत्त पोलिस चौकीजवळील संयुक्त जवान मंडळ, स्वातंत्र्य मित्र मंडळ, विजय बाल तरुण मंडळाने सजावटीचा देखावा केला आहे. शिवशंकर मित्र मंडळाने आकर्षक रोषणाईचा देखावा साकारला आहे. कर्वे रोडवर आयुर्वेद रसशाळेजवळील एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने 'उत्सव गणेशाचा; आदर स्त्रीशक्तीचा' हा महिलांच्या यशोगाथेवरील देखावा सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई येथील अंध डॉ. कल्पना खराडे यांच्या जीवनकार्यावर आधारित जिवंत देखावा साकारण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​डेंगी, चिकुनगुनिया : मोफत उपचाराच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत असलेल्या डेंगी, चिकुनगुनिया पेशंटची संख्या पाहता महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी शहरातील हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पाहणी केली. या आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने औषध फवारणी करून डेंगी तसेच चिकुनगुनियाच्या पेशंटवर मोफत उपचार करावेत, अशा सूचना महापौर जगताप यांनी दिले. दिल्ली सरकारने सहाशे रुपयांमध्ये आजाराची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच धर्तीवर राज्य सरकारने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

शहरात डेंगी तसेच चिकुनगुनियाच्या पेशंटच्या संख्येत वाढ होत आहे. घरात साठविले जाणारे पाणी यामुळे या पेशंटची संख्या वाढत आहे. शहरातील विविध ‌भागांत जाऊन तपासणी करण्यासाठी पालिकेने पथकांची स्थापना केली असून याद्वारे घरोघरी जाऊन पाहणी केली जात असल्याचे महापौर जगताप यांनी सांगितले. या आजाराच्या पेशंटची संख्या पाहता, पालिकेच्या कमला नेहरु, नायडू याबरोबरच राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दिल्ली येथील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने या आजाराची तपासणी केवळ सहाशे रुपयांमध्ये करून देण्याचे आदेश काढले आहेत. अनेक खासगी हॉस्पिटल चालकांकडून या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क घेतले जात असल्याने राज्य सरकारनेदेखील सहाशे रुपयांमध्ये ही सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे महापौर जगताप यांनी सांगितले.

रुग्णसंख्या दररोज आठशेवर

गेल्या महिन्यात पालिकेच्या कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये दररोज सर्वसाधारण दीडशे ते दोनशे पेशंट येत होते. मात्र गेल्या काही दिवसात हा आकडा सातशे ते आठशेवर पोहोचला आहे. सध्या वातावरणात होत असलेला बदल पाहता पुढील महिनाभर तरी ही साथ तशीच राहण्याची शक्यता आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकर व्यावसायिकाला राजस्थानमध्ये लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेक्कन परिसरातील व्यावसायिकाला कच्चा माल घेण्याच्या बहाण्याने राजस्थानात बोलवून पिस्तुलाच्या धाकाने लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिनाभरापूर्वी अशाच प्रकारे अन्य एका व्यावसायिकाला २८ लाखांना लुटले होते. हा दुसरा प्रकार समोर आल्यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे.

या बाबत सव्वीस वर्षीय व्यावसायिकाने डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रमोद बलकवडे (रा. कोथरूड), समीर जोशी (रा. बावधन), चौधरी आणि संजू शर्मा यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा प्लास्टिकपासून वस्तू बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांना कच्चा माल हवा होता. याची माहिती त्यांनी जोशी यांना दिली. जोशीने आपला मित्र बलकवडे याच्याकडे माल मिळेल असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार आणि बलकवडे यांची भेट झाली. त्या वेळी बलकवडे याने राजस्थानात कच्चा माल असून, त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील असे सांगितले. मात्र, तक्रारदार यांनी माल पाहिल्याशिवाय पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने माल पाहण्यासाठी राजस्थानात जावे लागेल, असे सांगून दोघेही पुण्याहून दिल्ली येथे गेले. तेथून राजस्थानमधील भिवाडी येथे गेले. त्या ठिकाणी आरोपींनी त्यांना एका फार्म हाउसवर डांबून ठेवले.

गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून, मारहाण करून त्याच्या जवळची सोन्याची साखळी, अंगठी काढून घेतली. त्यानंतर त्यांच्याकडील एटीएम कार्डचा पासवर्ड जबरदस्तीने घेऊन खात्यातील दोन लाख ६६ हजार रुपये लांबवले. त्यानंतर व्यावसायिकाला अज्ञातस्थळी सोडून देण्यात आले. तक्रादारांनी पुण्यात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापाच्या विषाणूबाबत ‘एनआयव्ही’ उदासीन?

$
0
0

नेमक्या उपचाराबाबत डॉक्टरांत संभ्रम; 'एनआयव्ही'कडून अभ्यासाची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विषाणूजन्य तापाचा कहर पुण्यात जाणवत असताना या विषाणूंचा अभ्यास करण्याबाबत शहरातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) उदासीन असल्याचे चित्र आहे. डेंगी, चिकुनगुनिया यांसह विषाणूजन्य तापाची साथ पुण्यात आहे. या विविध आजारांतील विषाणूंमध्ये फरक असल्याने त्यांबाबत नेमके उपचार करणे डॉक्टरांना अवघड जात असल्याने विषाणूंचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

ताप, अंगदुखी आदींनी हैराण असलेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची डेंगी आणि चिकुनगुनिया यांबाबत घेतलेली चाचणी नकारात्मक येत असल्याने या आजारातील विषाणू कोणता याबाबत डॉक्टरांमध्ये संभ्रम आहे. हा विषाणू नक्की कोणता आहे आणि डेंगी वा चिकुनगुनियापेक्षा कसा वेगळा आहे याची कल्पना नसल्याने नेमका उपचार करणे अवघड असल्याचे मत डॉक्टर व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर या विषाणूचा 'एनआयव्ही'कडून अभ्यास झाल्यास ते उपयुक्त ठरू शकणार आहे. मात्र, याबाबत उदासीनता दिसून येत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

पुण्यात तापाची साथ असून, सांधेदुखी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. डेंगी, चिकुनगुनियाची चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर रुग्णांना देत आहेत. लक्षणे असून सुद्धा चाचणी 'निगेटिव्ह' येण्याचे प्रमाण अधिक असल्याने नेमके कोणत्या आजाराचे उपचार करायचे याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले. याबाबत स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पुणे महापालिकेने नायडू हॉस्पिटलमध्ये आलेल्या डेंगी, चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या रक्ताचे पाच नमुने 'एनआयव्ही'कडे स्वतःहून तपासणीकरिता दोन दिवसांपूर्वी पाठविले आहेत. त्या तपासणीचा अहवाल येण्यास आठवडा लागेल, असे सांगण्यात आले.


'एनआयव्ही'चे अधिकारी व्यग्र?

'एनआयव्ही'कडून विविध विषाणूंच्या आजाराचे निदान केले जाते. शहरात डेंगी, चिकुनगुनियासह विषाणूजन्य संसर्गातील विषाणूंचे प्रकार, विषाणूंचे बदलते स्वरूप; तसेच नव्या विषाणूंचा काही उगम झाला किंवा कसे याबाबत 'एनआयव्ही'ने तपास करून त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे. यासंदर्भात वारंवार संपर्क साधूनही 'एनआयव्ही'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. 'एनआयव्ही'चे संचालक डॉ. डी. टी. मौर्य यांना संपर्क साधला असता ते 'बिझी' असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून वारंवार सांगितले जात आहे. त्याशिवाय यासंदर्भात अन्य अधिकाऱ्यांना देखील वेळ नसल्याचे उत्तर देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images