Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्याला विषाणूंचा ‘ताप’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काही दिवसांपासून दुपारपर्यंत कडक ऊन आणि रात्री प्रचंड गारवा अशा संमिश्र वातावरणामुळे विषाणूंनी अक्षरशः पुण्यात उच्छाद मांडला आहे. त्यामुळे घरोघरी एक ते दोन डेंगी, चिकुनगुनिया, विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झालेले रुग्ण दिसत आहेत. आजारामुळे बेजार झालेल्या पुणेकरांसह शहराबाहेरील रुग्णांच्या प्रचंड गर्दीने बहुतेक हॉस्पिटल हाउसफुल्ल झाली आहेत.

सरकारी हॉस्पिटलमध्ये सोयी-सुविधा अपुऱ्या असल्याने रुग्णांना खासगी हॉस्पिटलशिवाय पर्याय राहत नाही; परंतु हॉस्पिटल, दवाखान्यांमध्ये झाल्याने रुग्णांना घरच्या घरीच उपचार घेण्याची वेळ येत असल्याचे समोर येत आहे. पुण्यात यंदाच्या वर्षी समाधानकारक पावसाने हजेरी लावली, पण पावसामुळे शहराच्या विविध भागात 'एडिस इजिप्ती' नावाच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली. शहराच्या मध्य वस्तीसह कर्वेनगर, सहकारनगर, पद्मावती, कात्रज, कोंढवा, संगमवाडी यासारख्या भागात डेंगी, चिकुनगुनियासह विषाणूंच्या संसर्गाने 'आजारी' रुग्णांची संख्या काही दिवसांत वाढल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

दिवसा ऊन आणि रात्री प्रचंड गारवा यामुळे सध्या विषाणूंचे संक्रमण होत आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजार, डेंगी, चिकुनगुनिया, तसेच स्वाइन फ्लूसारख्या संसर्गाच्या आजाराचे निदान करणे डॉक्टरांसाठी आव्हान ठरू लागले आहे. थंडी वाजून येणे, त्यासोबत १०० ते १०४ अंश सेल्सिअसपर्यंत येणारा ताप आणि ताप कमी झाला की सांधेदुखी सुरू होते. सांधे सुजल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे जाऊ लागले आहेत. त्या वेळी डोळे सुजणे, डोळे लाल होणे, त्यांची आग होते. त्याशिवाय काही पेशंटना उलट्या, मळमळ, घसादुखी यासारखी लक्षणेदेखील दिसू लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्ट स्टॅम्पही गणेशमय

0
0

पटवर्धन संस्थानच्या फक्त स्टॅम्पपेपरवरच गणपतीचे चित्र नव्हते, तर ते रेव्हेन्यू स्टॅम्प, कोर्ट फी स्टॅम्प यावर असल्याचे आढळते. इतकेच काय, तर सांगली संस्थानचा न्यायालयाचा शिक्का होता, त्यावरही गणपतीचे चित्र होते. हा शिक्का गोलाकार असून, त्यावर इंग्रजी व मराठीत 'न्यायाधीश कोर्ट सांगली' अशी अक्षरे होती. या संस्थानच्या कोर्ट फी स्टॅम्पवर सांगलीच्या राजेसाहेबांचे व गणपतीचे चित्र होते. हा गणपती बसलेला, चार हातांचा असल्याचे दिसते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्रजी फौजेला मदत करण्यासाठी 'सांगली वॉर गिफ्ट फंड' उभारण्यात आला होता. यासाठी कोर्ट फी स्टॅम्पबरोबर लावण्यासाठी अर्ध्या आण्याचे स्टॅम्प काढण्यात आले होते. हे स्टॅम्प रंगीत असून, यावर 'बाय धिस अॅण्ड हेल्प रॉयल एयरफोर्स' असे छापले होते. या तिकिटावर गणपती व त्यासोबत विमानाचे छायाचित्र आढळून येते. सांगली, मिरज, कुरुंदवाड, वाडी, जमखंडी यांच्या रेव्हेन्यू स्टॅम्प अर्थात पावती तिकीटावरही गणपती आढळून येतो. मिरज, कुरुंदवाड या संस्थांची धाकटी व थोरली पाती यांच्या कोर्ट फी स्टॅम्पवरही गणपतीचेच चित्र असायचे. सांगली संस्थानप्रमाणे या संस्थांनांच्या न्यायालयाच्या शिक्क्यातही गणपतीचे चित्र आढळते. या संस्थानांना पोस्टाची तिकिटे छापायची परवानगी नव्हती. परंतु, दतिया संस्थानला ही परवानगी होती व त्यांच्या पोस्टाच्या तिकिटावर गणपतीचे चित्र छापलेले आढळते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याकडे बुद्धीची देवता गणपती ही या सर्व प्रकारातून हद्दपार झालेली दिसते. आज भारताबाहेरील बऱ्याच देशांच्या पोस्टाच्या स्टॅम्पवर गणपतीचे चित्र आढळून येते. वरील सर्व स्टॅम्पपेपरचा संग्रह व अभ्यास असलेले विनायक मारुती आवटे यांनीच गणपतीचे निरनिराळ्या देशांचे स्टॅम्प दाखवले. भारताचा शेजारी नेपाळ, श्रीलंका यांनी गणपतीचे पोस्टाचे स्टॅम्प छापलेले आहेत. नेपाळच्या एका स्टॅम्पवर काठमांडू येथील सहा हाताच्या गणपतीचे चित्र छापले आहे. पूर्वेकडील थायलंड, इंडोनेशिया यांनी एकापेक्षा जास्त वेळा गणपतीचे स्टॅम्प छापलेले आढळून येतात. सेस्का रिपब्लिक, नायजर (आफ्रिका) या छोट्या देशांनीही गणपतीचे स्टॅम्प छापले आहेत. झेक प्रजासत्ताकच्या स्टॅम्पवर तर शंकराच्या मांडीवर बसलेले पार्वती व गणपती आहेत. यात शंकराच्या डोक्यावर गंगाही आहे.
- मंदार लवाटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​आनंदाचा झरा

0
0

- संदीप खरे
लहानपणापासूनच मला गणपतीविषयी कुतुहल होतं आणि मी जसा मोठा होत गेलो तसा प्रत्येक उत्सवात ही देवता मला नव्याने भावत गेली. गणपतीला अनेक प्रकारांत चितारता येते आणि तो प्रत्येक रूपात जवळचा वाटतो, हे या देवतेचे वैशिष्ट्य आहे. कलाकारांनी विविध माध्यमांतून गणरायाची असंख्य रूपं कलेच्या माध्यमातून मांडली आहेत. या प्रत्येक रूपांत गणपती आपल्याला नव्याने उलगडत जातो.
मला लहानपणी गणेशोत्सवामुळे गणरायाचे आकर्षण निर्माण झाले. गणेशोत्सव म्हणजे आमच्या घरी आनंदाचा सोहळाच असायचा. आम्ही भावंडं आणि मित्रमंडळी आवर्जून गणपतीची वाट बघत असू. पूर्वी आम्ही पुण्यात नातूवाड्यामध्ये राहत होतो. त्या वेळी घरात आणि वाड्यात दोन्हीकडे गणपती बसायचे. उत्सवाची चाहूल लागली की वाड्यातील वातावरण बदलायचे. शाळा संपली, की आम्हा मित्रांचे गणपतीच्या सजावटीचे नियोजन सुरू व्हायचे. प्रत्येक वर्षी नव्या उत्साहात जोमाने प्रत्येक जण देखाव्याच्या तयारीमध्ये मनापासून सहभागी होत असे. गणपतीच्या आगमनानंतर एकमेकांच्या घरी जाऊन केलेल्या आरत्या, मोदकाचे बेत, खिरापत, मंडळाच्या देखाव्यातील नावीन्यपूर्ण कल्पनेसाठी रंगणाऱ्या बैठकींमुळे वातावरण प्रसन्न असायचे.
प्रत्येक गणेशोत्सव माझ्यासाठी छान आठवणी घेऊन येणारा ठरला. घरच्या गणपतीएवढाच जीव आमचा मंडळाच्या गणपतीवर होता. सुरुवातीपासून आम्ही विज्ञानाधिष्ठित देखावा सादर करण्याचा निर्णय घेतला होता. घरची तयारी झाली, की रात्री मांडवाची कामे, देखावा उभारणे, निवेदनाचे लिखाण करणे अशी सगळी कामे आम्ही तळमळीने करीत होतो.
काही वर्षांपूर्वी फ्लॅटमध्ये राहायला आलो असलो, तरी उत्सवाचा आनंद कमी झालेला नाही. आता माझी बहीण परदेशात असते; पण तिची गणपतीची उत्सवातील ओढ आजही कायम आहे. उत्सवाच्या काळात तिचे मन आमच्या घरात घुटमळते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी परदेशातून स्काइपवरून ती गणपतीची पूजा आणि आरतीमध्ये सहभागी होऊन उत्सवातील ते प्रसन्न, मांगल्याचे आणि उत्साहवर्धक क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करते. गणेशोत्सव हा संस्कृतीशी बांधून ठेवणारा उत्सव आहे. आपल्या विविध नात्यांना खुलवणारा हा धागा आहे, असे मला वाटते.
करमणूक, रंजन आणि प्रबोधन या तिन्हीची सांगड घालण्याचं काम या उत्सवानं केलं आहे. परंपरेतून चालत आलेला हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र, गेल्या काही वर्षांत ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू झाला तो गाभाच हरवला आहे, असा प्रश्न पडतो.
लोकजागृती हा पाया असलेल्या या उत्सवाला ग्लॅमरस बनवले जाते आहे. मोठे मांडव, प्रशस्त देखावे, त्यासाठी होणारी जीवघेणी स्पर्धा, सेलिब्रिटींची रेलचेल, मिरवणुकांना येत असलेले बीभत्स स्वरूप पाहताना मनाला हुरहूर लागते. गणेशोत्सव हा सांस्कृतिक, वैचारिक अधिष्ठान असलेला उत्सव आहे, याची गणेश मंडळांनी जाणीव ठेवली पाहिजे. पुण्याला या उत्सवाची परंपरा आहे, त्यामुळे येथील मंडळांनीच आपण नेमके काय करतो आहोत, याचा सुज्ञपणे विचार करण्याची आता गरज आहे. शहराची ओळख असलेला पारंपरिक गणेशोत्सव आणि आजचा उत्सव यामध्ये विसंगती आहे.
केवळ मंडळेच नव्हे; तर मिरवणुकांमधील वाद्य पथकांनीही आपण किती पुढे जायचे, याचे तारतम्य बाळगण्याची वेळ आली आहे. पथकाच्या सरावांमुळे स्थानिक नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी गरज पडल्यास शहराबाहेर जाऊन सराव करावा. मिरवणूक आपण नक्की कोणासाठी आयोजित करीत आहोत, हा प्रश्न पथकातील कार्यकर्त्यांनी स्वतःला विचारावा. शहरातील सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधा लक्षात घेऊन उत्सवाच्या जल्लोषाला आता सीमारेषा घातल्या पाहिजेत.
कायद्याच्या धाकाने नव्हे, तर मंडळांनी सुज्ञपणे मार्ग काढल्यास पुण्यातील या उत्सवाची शान वाढेल, असा मला विश्वास आहे.
(शब्दांकन : चैत्राली चांदोरकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचमुखी गणेशमूर्ती

0
0

- आनंद कानिटकर
पाच मुख आणि दहा हात असलेला गणपती, त्याच्याबरोबर असलेली स्त्रीरूपातील शक्ती, हे महागणपतीचे लक्षण आहे, हे आपण कालच्या लेखात पाहिले. या महागणपतीच्या प्रतिमेशिवाय पंचमुखी गणपतीच्या इतरही मूर्ती आढळतात. भारताच्या विविध भागांत सापडणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींची ओळख आपण करून घेणार आहोत.
यक्षविनायक या नावाने प्रसिद्ध असलेली काशीची गणेशाची मूर्ती पंचमुखी आणि चार हातांची आहे. या गणपतीच्या पाचही मुखांचे कान आणि दातही वेगवेगळे दाखवलेले आहेत. या विनायकाच्या मधल्या मुखाच्या दातांवर बारीक हत्ती कोरले आहेत. गणपतीच्या चार हातांपैकी दोन हातात सर्प आणि अंकुश आहेत. दातावरचे कोरलेले हत्ती हे या मूर्तीचे वैशिष्ट्य मानले जाते. संशोधकांनी गणेशसहस्रनामातील 'दंष्ट्रालग्न द्विपघटः' (ज्याच्या दाताला द्विप म्हणजे हत्तीची घटा लागलेली आहे असा), या पदाशी लावला आहे. अर्थात, याचे स्पष्टीकरण अजून कुठल्याही कथेत मिळालेले नाही.
कोणत्या लक्षणानुसार गणेशाच्या प्रतिमेला हेरंब म्हणायचे, हे प्राचीन ग्रंथांतून नमूद केले आहे. पंचमुख, दहा हात असलेला आणि सिंहावर आरूढ असलेल्या गणेशाच्या प्रतिमेला हेरंब म्हटले जाते. काही ग्रंथांनुसार हा पंचमुखी आणि दशभुज गणेश मूषकारूढ असला, तरी त्याला हेरंब मानले जाते. चार मुखे चार दिशांना आणि पाचवे मुख त्यांच्या वर, आकाशाकडे बघताना दाखवले जाते. 'शारदातिलक तंत्र' या ग्रंथामध्ये हेरंबाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, 'सिंह ज्याचे वाहन आहे आणि ज्याच्या भाळावर चंद्र आहे, अशा पंचमुखी व त्रिनेत्री हेरंबाचे मी ध्यान करतो.'
मुन्शीगंज, ढाका (बांगलादेश) येथे एक हेरंबाची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती ललितासनात सिंहावर आरुढ झालेली आहे. या प्रतिमेला पाच मुखे असून प्रत्येक मुखाला तीन डोळे दाखवले आहेत. त्याच्या दहा हातात पाश, अंकुश, अक्षमाला, मोदकपात्र इ. दाखवले आहेत. दिल्लीतील एका खासगी संग्रहात एक लाकडी पंचमुखी गणेशाची प्रतिमा आहे. या गणपतीच्या हातात परशू, खड्ग, शंख, पाश इ. गोष्टी आहेत. हा गणपती एका द्विमुख राक्षसाच्या खांद्यावर बसलेला आहे. हा राक्षस त्याच्या हाताने गणपतीचे पाय धरून ठेवतो आहे. अर्थात, जरी हा राक्षसावर आरूढ झालेला गणेश असला, तरी काही संशोधक याला हेरंब गणपती मानतात. अशा रीतीने एकाच पंचमुखी, दशभुज गणेशाची महागणपती, यक्षविनायक, हेरंब आणि राक्षसरूढ गणेश, ही रूपे मध्ययुगीन काळात आपल्याला पाहायला मिळतात. गणेश उपासनेचा आग्नेय आशियातील प्रसार आपण पाहणार आहोत.
(लेखक भारतीयविद्या तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परांड्यातला सुंदर नृत्यगणेश

0
0

- अजय काकडे
मराठवाड्यात गिरिदुर्ग नसले, तरी इथले नळदुर्ग, औसा, उदगीर, परांडा असे एकापेक्षा एक भुईकोट आपल्या डोळ्याचे पारणे फेडतात. आज आपण परांडा किल्ल्यावरच्या दुर्लक्षित; पण अनोख्या गणेशाची ओळख करून घेऊया. मजबूत तटबंदी आणि खंदकांनी वेढलेला परांडा किल्ला प्रसिद्ध आहे तो इथल्या तोफांसाठी. शत्रूला धडकी भरावेल इतक्या प्रचंड आकाराच्या अनेक तोफा परांडाच्या बुरूजांवर आहेत. परांडा किल्ल्यात प्रवेश करताच समोर एक मशिदीची इमारत दिसते. या इमारतीला लागूनच दोन खोल्यांचे बांधकाम असलेली एक इमारत आहे. पडीक अवस्थेत असलेली ही वास्तू अनेकदा नजरेआड होते. पण याच खोल्यांमध्ये इतिहासाचा फार मोठा ठेवा एकत्र पाहायला मिळतो. इथे आहे नर्तक गणेशाची सुंदर अशी मूर्ती. सुमारे चार फुटांची ही मूर्ती एका पायावर उभी असून, एक पाय दुमडून उचललेला आहे. दोन हात नृत्य मुद्रा दर्शविणारे तर पुढील एक हात आशीर्वाद देणारा आणि एका हातात मोदक आहे. या गणेशमूर्तीचे भाव आणि तिचा नृत्यावेश पाहता ही मूर्ती कुठल्याही क्षणी नाचू लागेल असेच वाटते. या मूर्तीचा काळ निश्चित सांगता येणार नाही; पण हा गणपती नक्कीच १५ व्या शतकात जेव्हा परांडा बांधला त्यापूर्वीपासून इथे असावा. या गणेशाच्या सोबतीला शेजारी एक शेषशायी विष्णूमूर्ती, एक मुखवटा असणारा खांब, दोन वीरगळ, एक गधेगाळ आणि एक फारसी भाषेतला शिलालेख असे अवशेष जतन करून ठेवलेले आहेत. उस्मानाबाद पासून ८० किलोमीटर र परांडा हे तालुक्याचे ठिकाण आहे. शहरात मध्यवर्ती हा भुईकोट आहे. इथल्या पीराला भेट देण्यासाठी अनेक यात्री येतात; पण शेजारच्याच खोलीत असणारा हा गजानन शेकडो वर्षे भक्तांच्या प्रतीक्षेत आहे.
(लेखक वारसा अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिण आफ्रिकेत रंगला मेळा

0
0

ई-मेल, विविध ऑनलाइन न्यूज साइटवर महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या तयारीचे अपडेट दिसायला लागले, की दक्षिण आफ्रिकेतील मराठी नागरिकही त्यांच्या नियोजनाला सुरूवात करतात. गणेशाच्या अभिषेकाची नावनोंदणी सुरू होते, सामूहिक आरती कोणाच्या घरी करायची, स्नेहसंमेलन कसे करायचे, याची रूपरेषा ठरते अन् उत्सवाचे वेळापत्रक तयार होते. लाडक्या बाप्पासाठी आवर्जून सगळे वेळ काढतात आणि बघता बघता भक्तिमय, मंगलमय वातावरणात मराठी बांधव सर्वांना घेऊन उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात.
नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत राहायला आलेल्या मराठमोळ्या बांधवांचा गणेशोत्सव स्थानिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. मराठी बांधवांना एकत्र आणण्यासाठी लक्ष्मीकांत शिंपी आणि राजीव तेरवडेकर यांनी बारा वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका मराठी मंडळ सुरू केले. मंडळातर्फे वर्षभर विविध उपक्रम आणि सण साजरे केले जातात. मंडळाचा जोहान्सबर्ग येथील गणेशोत्सवही उल्लेखनीय असतो.
मंडळाच्या गणेशोत्सवाबद्दल तेरवडेकर म्हणाले, 'काही वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही भारतातून गणेश मूर्ती आणत होतो. आता येथे कार्यरत असलेल्या काही स्वयंसेवी संस्था गणपतीची मूर्ती तयार करून देतात. मुख्यतः तेलुगू कारागीर या मूर्ती बनवतात. आमचा गणेशोत्सव दोन विभागांत विभागलेला आहे. उत्सवादरम्यान राधेश्याम मंदिरामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करतो. ही मूर्ती इकोफ्रेंडली असते. मंदिराच्या निमयानुसार पंचवीस जोडप्यांना अभिषेक आणि पूजेची परवानगी दिली जाते. आम्ही फेसबुक पेजवर अभिषेक नावनोंदणीचे आवाहन केल्यावर लगेच बुकिंग 'फुल्ल' होते. मंडळाचे अध्यक्ष मयूर अकोले यांचाही यात सक्रिय सहभाग असतो.
मिरवणूक काढण्यास बंधने असल्याने पहिल्या दिवशी मंदिराच्या पटांगणात आम्ही सगळे पारंपरिक वेशभूषेत एकत्र येऊन गणपतीचे स्वागत करतो. या शहरात अनेक मराठी बांधवांच्या घरी गणपती असतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून आम्ही मंडळाचे सभासद एकत्र सगळ्यांच्या घरी जाऊन आरती करतो. कधी कधी एकेकाच्या घरी चाळीस पन्नास जण आरतीसाठी उपस्थित असतात. एकमेकांच्या घरी गेल्यामुळे मोकळेपणाने संवाद होतो. सगळे जण आवर्जून आरतीच्या निमित्ताने होणाऱ्या छोट्या गेटटुगेदरचा आनंद घेतात, असे तेरवाडकर यांनी सांगितले.
जोहान्सबर्ग शहर आणि परिसरामध्ये साधारणतः दोन हजार मराठी कुटुंबीय वास्तव्यास आहेत. याशिवाय भारतीयांची संख्याही मोठी आहे. सण, उत्सवांच्या निमित्ताने आम्ही भेटतो, तसेच मंडळातर्फे गेल्या चार वर्षांपासून घेण्यात येणारा आनंद मेळा सर्वांचे आकर्षण ठरला आहे. मे महिन्यात होणाऱ्या या
मेळ्यामध्ये दीड ते दोन हजार लोक सहभागी होतात, असे तेरवाडकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘स्वच्छ भारत... स्वच्छ मंडप’

0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत' मोहिमेचा नारा दिल्याने सध्या गावा-गावांत, शहरा-शहरांमध्ये त्यासाठीचे कार्यक्रम, उपक्रम सुरू आहेत. पुण्यामध्ये महापालिकेतर्फे विविध कार्यक्रम घेतले जात असताना, आता मानाच्या गणेश मंडळांच्या परिसरातही 'स्वच्छते'चा संदेश देण्यासाठी अहोरात्र साफसफाईची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
'स्वच्छ भारत' मोहिमेद्वारे आपले घर, परिसर, तालुका, जिल्हा, शहर, राज्य स्वच्छ करण्यासाठी झटण्याचा संदेश पंतप्रधानांनी दिला. देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याविषयीची स्पर्धाही घेतली जाते. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत' योजनेमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रानेही वाटा उचलला असून, 'सीएसआर' अंतर्गत काही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुण्यात पूनावाला ग्रुपने महापालिकेला शहर स्वच्छतेसाठी शंभर कोटी रुपयांची मदत केली आहे. त्या अंतर्गत पूनावाला ग्रुपने स्वच्छतेसाठी नवनवीन मशिन्स उपलब्ध करून दिली आहेत. गणेशोत्सवाच्या काळात पुण्याबाहेरून अनेक पर्यटक मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी येत असल्याने या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे मानाच्या गणपती मंडळांच्या बाहेर सध्या ही मशिन्स कार्यरत असून, तेथे होणारा कचरा तातडीने साफ केला जात आहे.
शहराच्या स्वच्छतेसाठी आजपर्यंत नेहमीच गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उपलब्ध मशिनच्या संख्येनुसार आता केवळ मानाच्या गणपती मंडळांच्या येथेच स्वच्छता केली जात असली, तरी इतर मंडळांनी त्यापासून बोध घेऊन आपल्या मंडपाच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. कदाचित पुढील वर्षी हीच स्वच्छतेची मोहीम इतर महत्त्वाच्या मंडळांपर्यंतही पोहोचेल. त्यातून शहर अधिक स्वच्छ राखण्यात सर्वांचाच सहभाग असेल. मंडळींनी स्वच्छतेसाठी महापालिकेच्या नगरसेवकांकडून उपलब्ध झालेल्या कचऱ्याच्या बकेट्स मंडपाबाहेर ठेवल्या, तरीही तेथे होणारी अस्वच्छता दूर होऊ शकेल. तसेच, प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून खाण्याच्या पदार्थांपर्यंत ओला-सुका कचरा एकत्र होऊ नये, यासाठी दोन वेगवेगळ्या बकेट्स ठेवण्याची गरज आहे. शहराबाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही ओला-सुका कचरा वर्गीकरणाची सवय त्यातून लागू शकते. कचरा एकत्र झाल्यास, त्यातून अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी वर्गीकरणाच्या माध्यमातून प्रयत्न करणे, सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेतून ग्रामविकासाची संकल्पना आदर्श

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'नाट्यकलेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग ग्रामविकासासाठी करणारी भोसरीची संकल्पना आदर्शवत आहे,' असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले.
गणेशोत्सवानिमित्त भोसरी कला-क्रीडा मंचाच्या वतीने कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात भोसरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दशकपूर्ती सोहळ्याच्या उद्घाटनानिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, अभिनेते सिद्धार्थ जाधव, इंद्रमन सिंग, मंचाचे अध्यक्ष नितीन लांडगे या वेळी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, 'भोसरीला नाट्य, शास्त्रीय संगीत, कुस्ती, कबड्डी आणि सामाजिक सेवेची परंपरा आहे. येथे धार्मिकतेचा प्रसार शुद्ध भावनेने केला जातो. ५०-६० वर्षांपूर्वी या गावात नाट्यकला जोपासली ती वेगळ्याच उद्देशाने. या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शाळा, मंदिरे आणि पाण्याची सोय करण्यात आली. अशाप्रकारे कलेतून मिळणाऱ्या पैशाचा विनीयोग ग्रामविकासासाठी राबविण्याची संकल्पना देशाला आदर्शवत म्हणता येईल.'
ते म्हणाले, 'नव्या पिढीला सद्भावनेच्या भूमिकेत आणायचे असेल किंवा सात्विक कर्तृत्वाची परंपरा जोपासायची असेल तर कला, क्रीडा, भक्ती, शिक्षण, समाजकार्य आणि राजकारणही आवश्यक आहे. त्यातूनच सार्वजनिक जीवनातील सर्जनशीलतेचे मूल्य लक्षात येते. या सर्वांचा संगम गावपण जपणाऱ्या भोसरीत आढळते, ही उल्लेखनीय बाब म्हणता येईल.'
आमदार लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय फुगे यांनी केले. दिगंबर ढोकले यांनी आभार मानले. वंदना इन्नानी यांनी सूत्रसंचालन केले. भरत लांडगे, किरण लांडगे, राजेंद्र सिंग, भाऊसाहेब डोळस, निवृत्ती फुगे, संदीप राक्षे, श्याम लांडगे, दत्ता फुगे यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायंकाळनंतर मध्यवस्तीतील रस्ते बंद

0
0

गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गौरी विसर्जनानंतर गणपती मंडळांकडून करण्यात आलेली आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित असल्याने मध्यवस्तीतील रस्ते सायंकाळनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
......
लक्ष्मी रोड : हमजेखान चौक ते टिळक चौक.
पर्यायी मार्ग - डुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दूधभट्टी, दारूवाला पूल खडीचे मैदान चौक डावीकडे वळून अपोलो टॉकीजपाठीमागील मारणे रस्त्यावरून सिंचनभवन येथून डावीकडे वळावे. शाहीर अमर शेख चौक, कुंभारवेस चौक, मनपा भवनाच्या पाठीमागील रस्त्याने जावे. हमजेखान चौकात डावीकडे वळून महाराणा प्रताप रोडने घोरपडी पेठ पोलिस चौकीसमोरून शंकर शेठ रोडला पोहोचावे.
....
शिवाजी रोड : काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
पर्यायी मार्ग - १) सूर्या हॉस्पिटल, पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रोड मार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी ते शंकर शेठ रोड.
२) काकासाहेब गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक, डावीकडे वळून झाशी राणी चौक, टिळक चौक, टिळक रोडने किंवा शास्त्री रोडने इच्छितस्थळी जावे.
........
बाजीराव रोड : पूरम चौक ते आप्पा बळवंत चौक
पर्यायी मार्ग - १) पूरम चौक, टिळक रोडने टिळक चौकात उजवीकडे वळून केळकर रोडने आप्पा बळवंत चौक.
पूरम चौक ते गाडगीळ पुतळा दरम्यान गर्दीची स्थिती पाहता वाहतूक दुहेरी करण्यात येणार आहे.
......
टिळक रोड : मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक
पर्यायी मार्ग - जेधे चौक, नेहरू स्टेडियम समोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा येथे उजवीकडे वळून पूरम चौक व हिराबाग
सिंहगड गॅरेज, घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण ते हिराबाग चौक
सिंहगड गॅरेज चौकातून सरळ मन्साराम नाईक रस्त्याने डॉ. कोटनीस हॉस्पिटल, शिवाजी रस्ता ओलांडून शिंदे आळीतून बाजीराव रस्ता ओलांडावा. भिकारदास चौकी चौक, खजिना विहीर चौकात वळून टिळक रोडने इच्छितस्थळी जावे.
....
​दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक
हिराबाग चौक, दिनकरराव जवळकर रस्त्याने सरळ बाजीराव रोडने डावीकडेवळून टेलिफोन भवन ते पूरम चौक, टिळक रोडने वाहन चालकांनी इच्छितस्थळी जावे.
कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ (जगदीश गॅरेज उप-रस्ता) ते टिळक रोडकडे जाण्यास बंदी लहान रस्ता असल्याने पर्यायी मार्ग दिलेला नाही. (गल्ली आहे.)
........
सणस रोड (गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक)
पर्यायी मार्ग - गोटीराम भैय्या चौक, गाडीखाना, सुभेदार तालीम, डावीकडे वळून कस्तुरे चौक, डावीकडे वळून गोविंद हलवाई चौक या रस्त्याचा वापर करावा.
पानघंटी चौक ते गंज पेठ चौकी
पानघंटी चौक, जैन मंदीर चौक, फुलवाला चौक, कस्तुरे चौक, उजवीकडे वळून गंजपेठ चौकी मार्गे आवश्यक ठिकाणी जावे. गंजपेठ चौकातुन वीर लहूजी वस्ताद तालीमकडे जाण्यास बंदी. रस्ता लहान असल्याने पर्यायी मार्ग दिलेला नाही.
​..........
गावकसाब मशिद ते सेंट्रल स्ट्रीट चौकी
गावकसाब मशिद, सेंट्रल स्ट्रीट, इंदिरा गांधी चौक, डावीकडे वळून भगवान महावीर चौक मार्गे आवश्यक ठिकाणी जावे.
कोहिनूर चौक ते बाबाजान चौक
कोहिनूर चौक, भगवान महावीर चौक, डावीकडे वळून सरबतवाला चौक, डावीकडे वळून बाबाजान चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
जेधे प्रसाद रस्ता / सुभानशहा रस्ता, पार्श्वनाथ चौक (नाईक हॉस्पिटल) ते शास्त्री चौक, सुभान-शहा दर्गा ते सोन्या मारुती चौक, पार्श्वनाथ चौक (नाईक हॉस्पिटल) डावीकडे वळून सुभेदार तालीम चौक, शिवाजी रोडने शिंदे आळीतून आवश्यक ठिकाणी जावे. पार्श्वनाथ चौक, फुलवाला चौक, कस्तुरे चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
.....
येथील वाहतूक ​नियम शिथिल
कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते मनपा कार्यशाळा चौक (नाईक रस्ता) व कोहिनूर हॉटेल ते भगवान महावीर चौक, (एमजी रोड) या मार्गावरील एकेरी वाहतुकीचे आदेश शिथिल करण्यात आले आहे.
.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगारंग कार्यक्रमांनी पुणे फेस्टिव्हलची नांदी

0
0

'कश्मीर की कली'च्या उपस्थितीने आणली रंगत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एकीकडे ढोल-ताशांचा गजर, तर दुसरीकडे कथक-ओडिसी नृत्यशैलींच्या सुरेल संगमातून सादर झालेली गणेशवंदना... तर कधी लावणीच्या नजाकतीचा अनुभव, तर कधी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीने मनात रूंजी घालणारी 'ती' कश्मीर की कली...
'पुणे फेस्टिव्हल २०१६'च्या औपचारिक उद् घाटनासाठी शुक्रवारी सायंकाळी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित रंगारंग कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणेकरांनी अनुभवलेला असा जल्लोषपूर्ण सोहळा केवळ पुणेकरच नव्हे, तर परराज्यातील आणि परदेशातील रसिकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांना यंदाच्या पुणे फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार दिग्विजयसिंग, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, पालकमंत्री गिरीश बापट आणि 'पुणे फेस्टिव्हल'चे संस्थापक अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अभिनेता शेखर सुमन, सूरज पांचोली, अभिनेत्री मल्लिका शेरावत, नेहा पेंडसेही या वेळी उपस्थित होते. या वेळी टागोर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या कार्याचा आढावा घेणारी नाट्यछटाही सादर करण्यात आली. या नाट्यछटेमुळे 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो ​मी मिळविणारच,' या घोषणेची पुन्हा एकदा आठवण झाल्याचे दिग्विजयसिंग म्हणाले. 'टिळकांनी गणेशोत्सव लोकाभिमुख केला. टिळकांनी त्या काळात सर्वधर्मियांना सोबत घेऊन इंग्रजांविरोधात लढा उभारला. मी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेताना देशातील शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राहो, अशी विनंती केली आहे.' टागोर यांच्याविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी सर्वांनीच जागरूक राहण्याचा विचार या गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
000
पुण्यात सनबर्न फेस्टिव्हल
गोव्यात वर्षाअखेरीस आयोजित 'सनबर्न फेस्टिव्हल'मुळे हजारो पर्यटक तिकडे वळतात. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने पुण्यामध्ये 'सनबर्न फेस्टिव्हल' आयोजन करण्याचा प्रस्ताव 'सनबर्न'समोर ठेवला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने, यंदापासून पुण्यात २७ ते ३० डिसेंबरदरम्यान 'सनबर्न फेस्टिव्हल' होणार असल्याची घोषणा रावल यांनी केली. पुणे फेस्टिव्हल देशी-परदेशी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून मार्केटिंग करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
000
इशारों इशारों में...
ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रत्येकानेच त्यांच्या अभिनयाविषयी गौरवोद्गार काढले. अभिनेता शेखर सुमन यांनी तर, टागोर यांना त्यांच्यावरच चित्रित झालेल्या गाण्यांच्या ओळी समर्पित केल्या. 'मेरे दिल को तुम भा गये...' म्हणत सुमन यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावला. तसेच कश्मीर की कली म्हणजे शर्मिलाजी जर इथे असतील, तर कोणत्याही परिस्थितीत काश्मीरमध्ये पाकिस्तानला हस्तक्षेप करूच देणार नसल्याची कोटीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाविरोधात भाजपचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात मोठ्या प्रमाणात डेंगी तसेच चिकुनगुनियाच्या पेशंटच्या संख्येत वाढ होत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार ढिम्मपणे सुरू असल्याची टीका करून भाजपच्यावतीने पालिकेत आंदोलन करण्यात आले. भाजपच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांना शुक्रवारी घेराव घालण्यात आला. प्रशासनाने या आजाराबाबत गांभीर्याने न पाहिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला.
कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात नगरसेवक अशोक येनपुरे, दिलीप काळोखे, धनंजय जाधव, सुहास कुलकर्णी, पुष्कर तुळजापुरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील सर्वच भागांमध्ये डेंगी, मलेरिया, चिकुनगुनियाच्या पेशंटची संख्या वाढत आहे. या आजाराने अनेक पुणेकर हैराण झालेले असताना, पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी मात्र सुस्त झाले आहेत. या आजारांची चाचणी करण्यासाठी पालिकेने तपासणी केंद्र सुरू न केल्याने नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे. खासगी हॉस्पिटलमध्य पेशंटची लूट सुरू असून त्यावर पालिका कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोपही करण्यात आला. पालिकेने या आजारांच्या चाचण्या मोफत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. तसेच हे आजार वाढू नयेत, यासाठी उघड्यावर विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांवर कारवाई करावी, तसेच शहरात औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाचण्यांत २० टक्के वाढ

0
0

डेंगी, चिकुनगुनियाच्या निदानासाठी उपयुक्त नमुन्यांची संख्या वाढली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेंगी, चिकुनगुनियाचे निदान करण्यासाठी आवश्यक रक्ताच्या चाचण्यांमध्ये यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांतच ही वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
शहरात गेल्या महिन्यांपासून पावसाळ्यातील आजारांमध्ये वाढ दिसून येत आहे. डेंगी, चिकुनगुनियाबरोबर काही दिवसांपासून हवेतील संमिश्र वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. आजाराचे निदान होत नसल्याने पूर्वी डेंगी, चिकुनगुनियाची चाचणी करण्याचा पेशंटना सल्ला दिला जात होता. आता विषाणूजन्य संसर्ग आजारांचा प्रवेश झाल्याने दररोज किमान पाच ते दहा जणांना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 'डेंगी, चिकुनगुनियासाठी आय़जीएम, एनएस १ या दोन्ही चाचणी कऱण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तापाच्या कालावधीवर चाचण्या ठरविल्या जातात. रक्ताचे प्रमाण, रक्तातील पांढऱ्या पेशी, प्लेटलेट यांचे प्रमाण तपासणाऱ्या चाचण्या सुचविण्यात येत आहेत. बहुतांश वेळा या चाचण्या निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे नव्या विषाणूचा संसर्ग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक तापाचे प्रमाण अधिक आहे. बरोबरच श्वसनाचे आजारही वाढत असून, सर्दी, खोकला, ताप असूनही चाचण्या निगेटिव्ह येत आहेत. गेल्या वर्षी जून-जुलै महिन्याच्या तुलनेत यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात प्रयोगशाळेत चाचणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या निश्चित वाढली आहे,' अशी माहिती गोळविलकर मेट्रोपोलिस लॅबच्या संचालिका डॉ. अवंती गोळविलकर-मेहेंदळे यांनी 'मटा'ला दिली.
'गेल्या वर्षी चिकुनगुनिया पॉझिटिव्ह दिसत होता. ताप आल्यानंतर आठ दिवसांनी तपासणी केल्यास चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते,' अशी शक्यता बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीव विभाग प्रमुख डॉ. रेणू भारद्वाज यांनी वर्तविली. वर्षभरात येणाऱ्या चाचण्यांच्या नमुन्यांच्या तुलनेत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नमुने तपासणीला येतात. दर वर्षी पावसाळ्यात साथीचे आजार येतात. यंदा चिकुनगुनियासह विषाणूजन्य ताप अधिक दिसून येतो. प्लेटलेट कमी झाल्यामुळे डेंगीचे नमुने तपासणीसाठी येत आहेत, अशी माहिती पॅथॉलॉजिस्ट डॉ. राम साठे यांनी दिली.
..
ससून हॉस्पिटलमध्ये पेशंटांचे डेंगी, चिकुनगुनियाच्या तपासणीसाठी नमुने पाठविले जातात. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या वाढली आहे.
डॉ. रेणू भारद्वाज, विभागप्रमुख, सूक्ष्मजीव विभाग बी. जे. मेडिकल कॉलेज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-रिक्षा फिरकू देणार नाही

0
0

डॉ. बाबा आढाव यांचा सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'बेकायदा प्रवासी वाहतूक करून ओला, उबेर कॅबने रिक्षाचालकांच्या हातातोंडचा घास पळवला आहे. आता ई-रिक्षांना परवानगी देऊन रिक्षाचालकांना उपाशी मारण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आम्ही पुण्यात ई-रिक्षांना येऊ देणार नाही. राज्य सरकारने रिक्षाचालकांना उपाशी मारण्याचे धोरण अवलंबल्यास त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा रिक्षा पंचायत आणि राज्य रिक्षा संघटना समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी दिला.
रिक्षा पंचायत व रिक्षा संघटांच्या राज्य कृती समितीतर्फे ओला, उबेर कॅबच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयोसमोर 'धिक्कार निदर्शने' करण्यात आली. या वेळी रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार उपस्थित होते. दरम्यान, जमलेल्या असंख्य रिक्षाचालकांच्या उपस्थितीत ई-रिक्षाच्या धोरणाची होळी करण्यात आली.
आढाव म्हणाले,' हवा प्रदूषण टाळणे, सायकल रिक्षाचालकांना रोजगार देणे ही उद्दिष्टे पुण्यात लागूच होत नाहीत. शहरात एकही सायकल रिक्षा नाही. हितसंबंधासाठी चाललेली ही बहाणेबाजी मंत्र्यांनी तत्काळ बंद करावी. राज्य सरकारने रिक्षाचालकांना उपाशी मारण्याचे धोरण तत्काळ मागे न घेतल्यास त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.'
पवार म्हणाले,'ऑटोरिक्षा प्रमाणेच ई-रिक्षांनाही इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्यात येणार आहेत. ऑटो रिक्षांप्रमाणेच ई-रिक्षांना कंत्राटी वाहतुकीचा परवाना असेल. त्यामुळे त्यांची अवस्था कालांतराने सहाआसनी रिक्षांप्रमाणेच होणार आहे. त्यामुळे भविष्यात या रिक्षाही नियमबाह्य टप्पा वाहतूक करतील.'
.......
विसर्जनानंतर बैठकीचे आयोजन
ई-रिक्षासह ओला, उबेर अशा बेकायदा वाहतूक करणाऱ्या खासगी कंपन्यांना शहरातून हद्दपार करणे, ही रिक्षा पंचायत आणि कृती समितीची मुख्य मागणी आहे. त्यासाठी गणपती विसर्जनानंतर राज्य कृती समितीची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत बेमुदत बंदसह तीव्र आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे रिक्षा पंचायतीतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच हजार बाप्पांचे घरच्या घरी विसर्जन

0
0

अमोनियम बायकार्बोनेटचा मोठ्या प्रमाणात वापर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी पहिल्या पाच दिवसांत सुमारे पाच ते साडेपाच हजार नागरिकांनी 'अमोनियम बायकार्बोनेट'चा वापर केला आहे. तसेच, महापालिकेनेही हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींचे विघटन व्हावे, यासाठी या रसायनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत उत्सवाच्या काळात यापुढेही संबंधित रसायन वितरित केले जाणार आहे.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) सहकार्याने नदीप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक कुटुंबाला दोन किलोची अमोनियम बायकार्बोनेटची पिशवी देण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीच्या पाच दिवसांमध्ये या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, शहरातील सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी पर्यावरणपूरक माध्यमाचा वापर केला आहे. पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधून आतापर्यंत सुमारे १० टन रसायन वापरले गेले आहे. महापालिकेने हौदातील मूर्तींचे लवकर विघटन व्हावे, यासाठीही रसायनाचा वापर केला आहे. त्याशिवाय, औंध परिसरातील हौदातील सर्व मूर्ती 'एनसीएल'च्या कॅम्पसमध्ये नेण्यात आल्या असून, तेथेही या रसायनाचा मोठा वापर करण्यात आला. पहिल्या पाच दिवसांमध्ये सुमारे ४० टन अमोनियम बायकार्बोनेटचा वापर झाल्याचा दावा घनकचरा विभागाचे सह-आयुक्त सुरेश जगताप यांनी केला.
महापालिकेतर्फे सातव्या आणि अखेरच्या दिवशीही नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयांमार्फत रसायन पुरविण्यात येणार आहे. गणपती मूर्ती पूर्ण विरघळण्यासाठी मूर्तीच्या वजनाएवढे रसायन आवश्यक आहे. त्यानुसार, नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयातून अमोनियम बायकार्बोनेट घेऊन जावे, असे आवाहन जगताप यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हँडब्रेक न लागल्याने पीएमपी बसचा अपघात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचा हँडब्रेक व्यवस्थित लावला न गेल्याने शुक्रवारी डीएसके विश्वमधील उतारावरून ही बस विनाचालक धावली. या बसमध्ये सुमारे १५ प्रवासी होते. पत्र्याच्या कम्पाउंडला जाऊन बस धडकल्याने मोठा अपघात टळला.
नरवीर तानाजी वाडी आगाराची शिवाजीनगर ते डीएसके विश्व ही बस सकाळी ११ च्या सुमारास विश्व येथे पोहोचली. त्यानंतर, बसचालकाने हँडब्रेक लावला आणि तो बसमधून खाली उतरला. बसमध्ये प्रवासी चढत असताना, अचानक हँडब्रेक सुटल्याने बस आपोआप पुढे जाऊ लागली. त्यामुळे, बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. वाहकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला; पण तो असफल ठरला. अखेर, शंभर मीटर विनाचालक धावल्यानंतर पत्र्याच्या कम्पाउंडला धडकल्याने बस थांबली. या अपघातामध्ये बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचा दावा पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी केला. सुदैवाने, ही बस थांबल्याने मोठ्या अपघातातून प्रवाशांची सुटका झाली.
चौकशी करून बस चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे नरवीर तानाजी वाडीचे डेपो मॅनेजर झेंडे यांनी सांगितले. सकृतदर्शनी हँडब्रेक पूर्ण लावला नसल्याने बस आपोआप सुरू झाल्याचे दिसून आल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. त्यामुळे, सर्व बसचालकांनी हँडब्रेक पूर्ण लावल्याची खात्री करावी, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी कात्रज येथील बस स्थानकावरूनही हँडब्रेक लावलेला असूनही पीएमपीची बस अशीच उलटी आल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा अंत झाला होता. त्यामुळे, बसची देखभाल-दुरुस्तीकडे पीएमपीने अधिक लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ हल्लेखोरांना मध्य प्रदेशातून अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

गस्तीवरील पोलिसांवर एअरगनमधून गोळीबार करून फरारी झालेल्या तिघांना चतु:श्रृंगी पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली. या दोघांकडून पाच मोबाइल जप्त करण्यात आले असून, ते चोरीचे आहेत. पाषाण टेकडीवर शनिवारी (३ सप्टेंबर) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली होती.

मनीष बाबूलाल कुशवाह (वय १९), सतीश बाबूलाल कुशवाह (वय २२) आणि दशरथ सोपगपथ कुशवाह (वय २४ सर्व रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी या विषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त वैशाली जाधव-माने, वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे, उदय शिंगाडे आदी उपस्थित होते. पाषाण टेकडीवर शनिवारी या तिघा आरोपींनी केलेल्या गोळीबारात पोलिस हवालदार बबन गुंड आणि अमर शेख जखमी झाले. शेख यांना गोळी लागली तर, गुंड यांच्या डोक्यावर पिस्तुलाची मूठ मारून त्यांना जखमी करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर आरोपी फरारी झाले.

रविवारी पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपासणी केल्यानंतर त्यांना दोन गावठी पिस्तूले आढळून आली. या घटनेपूर्वी आरोपींनी एका तरुणाला मारहाण करून लुटले होते. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा तसेच चतुःश्रृंगी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली. शिवाय परिसरातील अनेक सराईत गुन्हेगार आणि बांधकामावरील कामगारांकडे विचारपूस करण्यात आली. तेव्हा सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, संदेश केंजळे, कर्मचारी अजय गायकवाड, प्रवीण पाटील, सारस साळवी आणि पथकाला आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानंतर हे पथक मध्य प्रदेशात गेले. तेथूक आरोपींना ताब्यात घेतल्यावर अनेक बाबी उघड झाल्या. मनीष नोकरीसाठी पुण्यात आला. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांना नोकरीसाठी बोलावून घेतले. तत्पूर्वी, त्याने साथीदारांना येताना गावठी कट्टे (पिस्तूल) घेऊन या असेही बजावले.

तिघांकडे आणखी पिस्तूल असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन गुन्हे उघडकीस आले असून आणखी गंभीर गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. आरोपींचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याविषयी सविस्तर तपशील घेण्याचे कामही सुरू आहे. दरम्यान, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परिमंडळ तीनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. - शशिकांत शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ४ ठार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । लोणावळा

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर अपघातांचे सत्र सुरूच असून शनिवारी मध्यरात्री लोणावळापासून काही अंतरावर कार आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चारजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये मुंबई पोलिसचे कर्मचारी राजेंद्र विष्णु चव्हाण आणि त्यांची पत्नी वनिता चव्हाण, शंकर मारुती वेणगुळे, पूजा वेणगुळे यांचा समावेश असून हे सर्व मुंबईत राहणारे आहेत.

चव्हाण, वेणगुळे कुटुंबातील चौघे सदस्य सॅन्ट्रो कारने मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. कार भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती समोर असलेल्या ट्रेलरला मागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की सॅन्ट्रो कार कंटेनरच्या खाली घुसली. याअपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सॅन्ट्रो कार चालकाला नियंत्रण न मिळवता आल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून लोणावळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींच्या दरात घट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आवक कमी जास्त होत असल्याने मार्केट यार्डातील घाऊक बाजारात तूर डाळीसह अन्य डाळींच्या दरात गेल्या आठवड्यात घसरण झाली. निर्यात बंद झाल्याने शेंगदाण्याचे दर उतरले असून खोबऱ्याची आवक वाढल्याने दहा किलोमागे २५ रुपयांनी दर उतरले आहेत. बाजरीची नव्याने आवक सुरू झाल्याने त्याच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांची घसरण झाली आहे.

साखर, गहू, ज्वारी, तांदूळ, तेल, पोहा, रवा, आटा, मैदा, नारळ, बेसन, हळद, साबुदाणा, भगर, भाजकी डाळ, कडधान्यांचे दर स्थिर राहिले आहेत.

गेल्या आठवड्यात तूर डाळीने पुन्हा उचल खाल्ली होती. मटकी डाळीच्या दरात सर्वाधिक घसरण आठवड्यात झाली आहे. दोन हजार रुपये क्विंटलमागे दर उतरले आहेत. तर उडीद डाळ, मूग डाळ, हरभरा डाळीच्या दरात २००ते ५०० रुपयांनी घसरले आहेत.

शेंगदाण्याची निर्यात बंद झाली आहे. तसेच, नव्या शेंगदाण्याची आवक सुरू झाल्याने त्याच्या दरात २०० रुपयांची घट झाली आहे. गुळाची सध्या मागणी कमी झाली आहे. आवकही सध्या बऱ्यापैकी आहे. चार हजार बॉक्सच्या गुळाची आवक झाली आहे. दहा किलोमागे खोबऱ्याची २५ रुपयांची घसरण झाली असून सध्या खोबऱ्याला उठाव नाही.

नव्या बाजरीची जामखेड, नगर, करमाळा येथून आवक सुरू झाली आहे. त्यामुळे त्याच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांची घट झाली आहे. गणपतीमुळे नारळाला मागणी होती. आता ही मागणी घटली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिळक हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे ​जनक

0
0

'भाऊसाहेब रंगारी'चे माजी विश्वस्त उल्हास काळोखे यांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'लोकमान्य टिळक हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे,' असे खुद्द श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे पूर्वीचे विश्वस्त माजी आमदार उल्हास काळोखे यांनी रविवारी स्पष्ट केले. सार्वजनिक गणेशोत्सवास कोणी प्रारंभ केला, यावरून भाऊ रंगारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्याच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

लोकमान्य टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत, हा इतिहास आहे. मात्र, लोकमान्यांनी हा उत्सव सुरू करण्यापूर्वी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी हा उत्सव सुरू केला होता. त्यामुळे तेच गणेशोत्सवाचे संस्थापक आहेत, असा दावा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंडळाचे माजी विश्वस्त काळोखे यांनी ही भूमिका खोडून काढली. उत्सवामध्ये अशा प्रकारचा वाद निर्माण करणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 'टिळकांप्रमाणे भाऊसाहेब रंगारी यांचेही कार्य थोर आहे. मात्र, लोकमान्य टिळक हेच गणेशोत्सवाचे जनक आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे,' असे त्यांनी नमूद केले.

आपले वडील कै. नथोबा काळोखे यांची १९६८मध्ये मंडळाचे विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून उत्सवाच्या कार्याशी आमच्या कुटुंबीयांचा संबंध आला, तसेच कै. भाऊ रंगारी यांचे निवासस्थान आणि मंदिराची व्यवस्था आम्ही करीत असून, १९७०मध्ये आपली या मंडळावर विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली. काही काळाने माझा भाऊ कै. शरद काळोखे यांनीही ती जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे मंडळ आणि उत्सवाशी आमच्या कुटुंबाचा २५ वर्षांचा संबंध आहे. त्यामुळे हे वाद योग्य नाहीत, असे आपले मत आहे, असे काळोखे म्हणाले. काही दिवसांपूर्वी मंडळाने सुरू केलेल्या शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यापूर्वीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे आणि तत्कालीन महापौर शांताराम दिवेकर यांच्या उपस्थितीत भव्य उत्सव साजरा झाला होता, अशी आठवण काळोखे यांनी सांगितली.

'ऐतिहासिक विश्वासार्हता सिद्ध करा'

'आपल्या कुटुंबाचा कै. रंगारी यांची वास्तू आणि मंदिराशी २५ वर्षे संबंध असून, दोन्ही ठिकाणी आपले वास्तव्य होते. तसेच, कार्यकर्त्यांच्या बैठकाही येथेच होत असत. त्यामुळे या वास्तूंची आपल्याला खडा न खडा माहिती आहे. त्या काळात वास्तूत हंड्या- झुंबरे आणि काही जीर्ण तलवारी यांच्याव्यतिरिक्त कोणतीही जुनी शस्त्रे किंवा दारूगोळा व जुनी कागदपत्रे आढळलेली नाहीत. त्यामुळे सध्याच्या प्रदर्शनातील शस्त्रे व अन्य वस्तूंची ऐतिहासिक विश्वासार्हता तज्ज्ञांकडून तपासून घेऊन सिद्ध करावी,' असे आव्हान काळोखे यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक्स्प्रेस-वेवर राहणार अदृश्य पोलिसांची नजर

0
0

नियमभंग करणाऱ्या वाहनांचे नंबर टिपून नोटीस बजावणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महामार्ग पोलिसांनी 'एक्स्प्रेस-वे'वरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी 'गोल्डन अवर'चा प्रयोग सुरू केला असतानाच, आता नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर 'अदृश्य पोलिसांचा'चा डोळा राहणार आहे. खासगी वाहनांमध्ये बसलेले महामार्ग पोलिस नियम मोडणाऱ्या वाहनांचे नंबर लिहून घेत आहेत. त्यानंतर संबंधित वाहनचालकांना टोलनाक्यांवर लगेचच दंडाची नोटीस देण्यात येत आहे.

महामार्ग पोलिसांनी 'एक्स्प्रेस-वे'वर नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 'एक्स्प्रेस-वे'वर पोलिसांचे अस्तित्व जाणवले की तेवढ्यापुरते ​नियम पाळले जातात. पोलिस दिसेनासे झाले की सर्रास नियम मोडले जातात. या नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी 'अदृश्य पोलिसिंग'ला सुरुवात केली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिस दलाचे अप्पर पोलिस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांनी 'मटा'ला दिली.

'इनव्हिजिबल पोलिसिंग'मध्ये पोलिस वाहनचालकांना दिसणार नाहीत, यासाठी काळजी घेण्यात येईल. 'एक्स्प्रेस-वे'वर फिरण्यासाठी पोलिस कर्मचारी/अधिकारी खासगी वाहनाचा वापर करतील. प्रसंगी 'एसटी'मध्ये बसून कारवाई करतील. या वाहनांमध्ये किमान दोन कर्मचारी/ अधिकारी असतील. त्यातील एकजण ​नियम मोडणाऱ्या वाहनांचे नंबर लिहून घेईल तर, दुसरा कर्मचारी जवळच्या टोलनाक्यावर असलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'एसएमएस' पाठवेल. त्या 'एसएमएस'च्या मदतीने तत्काळ नोटीस तयार करण्यात येईल. नियम मोडलेले वाहन टोलनाक्यावर पोहोचल्यानंतर त्यांना ती नोटीस बजावण्यात येईल, असे पद्मनाभन म्हणाले. या नोटिशीनुसार संबंधित वाहनचालकाने महामार्ग पोलिसांच्या जवळील चौकीमध्ये जाऊन दंड भरणे अपेक्षित आहे. दंड न भरल्यास वाहनमालकांच्या घरी कोर्टातून समन्स पाठवण्यात येईल.

'गोल्डन अवर'साठी ​नोटिफिकेशन नाही

'एक्स्प्रेस-वे'वर गर्दीच्यावेळी मल्टिअॅक्सेल वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शुक्रवारी, शनिवारी सकाळी आणि र​विवारी दुपारनंतर ही योजना राबवण्यात येते. ही योजना 'एक्स्प्रेस-वे'वरील कोंडी टाळण्यासाठी सुरू केली आहे. त्यामुळे गर्दीच्या प्रसंगी ही योजना तत्काळ अंमलात येईल. हा काही कायमस्वरूपी बदल नसल्याने त्याला नोटिफिकेशनची आवश्यकता नसल्याचेही पद्मनाभन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images