Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गणेशरंगी रंगली उत्साही तरुणाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांच्या लाडक्या गणरायाचे सोमवारी मोठ्या थाटामाटात आणि वाजतगाजत आगमन झाले. बाप्पांच्या आगमनामुळे शहरभर चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले. बाप्पांच्या या आगमन सोहळ्यात तरुणांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. ढोल पथकांमधील वादकांपासून ते मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत, मिरवणुकीत सहभागी होऊन वादनाला टाळ्या-शिट्ट्यांनी दिलखुलास दाद देणाऱ्यांपासून ते गणेशोत्सवाचे विविध रंग आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या छाय़ाचित्रकारांपर्यंत सगळा माहोल तरुणाईने व्यापला होता.
सकाळपासूनच उपनगरांमधून शहराच्या मध्यवर्ती भागात तरुणांनी गर्दी करायला सुरूवात केली. एकीकडे ढोलपथकातील वादक तरुण-तरुणींची लगबग सुरू होती. तर, दुसरीकडे मंडळांच्या कार्यकर्ते व्यग्र होते. उत्सवीच्या रंग आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी तरुण छायाचित्रकार धावाधाव करताना दिसून येत होते. त्यामध्ये तरुणींचाही लक्षणी सहभाग असल्याचे आढळून आले. ढोलपथकांमध्येही सहभागी असणाऱ्या तरुणीही तितक्याच ताकदीने वादन करीत होत्या. या सर्वांबरोबर पोलिसांबरोबर काम करणाऱ्या पोलिस मित्रांचेही योगदान महत्वपूर्ण ठरले. मिरवणुकीदरम्यान ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये, या साठी पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे तरुण करीत होते. या शिवाय सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही सामाजिक संदेश घेऊन जनजागृती करत होते.
बाप्पांच्या आगमनाचा उत्साह सोशल माध्यमांवरहही ओसंडून वाहत होता. फेसबुक, इन्स्टाग्रामवर तरुणाई बाप्पांचे फोटो अपलोड करून लाइक मिळवत होती. त्यामुळेच सगळीकडे उत्सवावर तरुणाईची छाप असल्याचेच पाहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंपन्यांना शुल्कात सवलत?

$
0
0

खोदाईमुक्त शहरासाठी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील रस्ते खोदाईमुक्त करण्याच्या धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे विविध कंपन्यांना खोदाई शुल्कात सवलत देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खोदाईसाठी संबंधित कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या सध्याच्या शुल्कात सुमारे ५० टक्के कपात करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत.
स्थायी समितीच्या आज, मंगळवारी होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एक ऑक्टोबरपासून खोदाईमुक्त धोरणाची अंमलबजावणी करण्याचे पालिकेने निश्चित केले असल्याने तत्पूर्वी त्यासाठीचे शुल्क ठरवावे लागणार आहे. हा दर कमी असेल, तरच खोदाईमुक्त धोरणाला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पथ विभागाने रस्त्यांवर कोणत्याही स्वरूपाची खोदाई न करता केबल किंवा सेवावाहिन्या टाकणाऱ्या कंपन्यांना सवलत देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.
खोदाईमुक्त धोरणांतर्गत ठरावीक अंतरावर मोठे खड्डे (पिट्स) घेण्यात येणार असून, उर्वरित रस्त्यावर खोदाईला पूर्ण बंदी असेल. त्यामुळे, पिट्ससाठी प्रति चौरस मीटर सहा हजार रुपये आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर, विविध केबल कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, यासाठी दोन स्वरूपात खोदाई शुल्क निश्चित केले गेले आहे. शंभर मिमीपर्यंतच्या व्यासासाठी प्रतिमीटर दोनशे रुपये, तर त्यापेक्षा अधिक व्यासाच्या खोदाईसाठी सरसकट बाराशे रुपये आकारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या प्रति मीटर खोदाईचा दर तीन हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे, खोदाईमुक्त शहरासाठी शुल्कात सवलत देण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे. पालिकेच्या प्रस्तावाला कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर पुनर्डांबरीकरणासाठी पालिकेला कराव्या लागणाऱ्या खर्चामध्येही मोठी कपात होण्याची शक्यता आहे.
...................
कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद
पावसाळी हंगाम संपल्यानंतर एक ऑक्टोबरपासून शहरात पुन्हा खोदाईची परवानगी दिली जाते. नव्या हंगामात खोदाईमुक्त तंत्रज्ञानाद्वारेच परवानगी दिली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गेल्या महिन्यात जाहीर केले होते. त्यासाठी, शहरात खोदकाम करणाऱ्या विविध कंपन्यांसमोर खोदाईमुक्त तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. अनेक कंपन्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, काही ठरावीक कंपन्यांनी त्याबद्दल नोंदवलेले आक्षेप दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पथ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मलाताई सोवनी यांचे वृद्धापकाळाने निधन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पुणे

वृद्ध व्यक्तींना आधार देऊन त्यांचे अश्रू पुसणाऱ्या निवारा वृद्धाश्रमाच्या मानद सचिव आणि विश्वस्त निर्मलाताई सोवनी यांचे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
गेल्या ४० वर्षांपासून निवारा वृद्धाश्रमाची जबाबदारी सोवनी यांनी समर्थपणे पेलली. वृद्धापकाळामुळे काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निवारा वृद्धाश्रमात सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले होते. आपला आधारस्तंभ आपल्यात नाही, या भावनेने निवासी वृद्ध, रुग्ण, सेवक-सेविका व 'निवारा'शी संबंधित अनेकांना अश्रू अनावर झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागपूर येथे १६ डिसेंबर १९२९ रोजी सोवनी यांचा जन्म झाला. वडील विष्णू आणि आई इंदिरा घारपुरे यांनी त्यांचे नाव माणिक असे ठेवले होते. त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथे झाले. त्यानंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांत त्यांनी पदवी प्राप्त केली. कर्वे समाजशास्त्र संस्थेतून त्यांनी सामाजिक कार्याची पदविका मिळविली. मुकुंद सोवनी यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या निर्मला सोवनी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. १९५८पासून भारत स्काउट व गाइडची विविध पदे भूषवित या संस्थेबरोबरही त्या अखेरपर्यंत कार्यरत राहिल्या. त्यासाठी त्यांचा 'मेडल ऑफ मेरिट' या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मो. ना. नातू आणि वि. ग. माटे यांनी निर्मलाताई यांच्यावर डेव्हिड ससून अनाथ पंगू गृह व निवारा वृद्धाश्रमाची जबाबदारी सोपवली. संस्थेत दैनंदिन व्यवस्थापन, वृद्ध, रुग्णांची सेवा करण्याचे त्यांनी व्रत अंगिकारले. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच 'निवारा'मध्ये त्यांनी काळानुरुप बदल केले. कुटूंबकल्याण योजनेसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. 'आदिशक्ती', 'लक्ष्मीबाई', 'आगाशे स्मृती पुरस्कार', 'गिरिजाबाई रास्ते पुरस्कार' आणि 'इंदुमती टिळक पुरस्कार' अशा अनेक पुरस्कारांनी सोवनी यांनी सन्मानित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ड्रोन’चा अहवाल महासंचालकांकडे

$
0
0

लवकरच राज्य सरकारकडे सादर होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर वाहतुकीच्या ​नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणे कितपत उपयुक्त आहे, या बाबतचा अहवाल महामार्ग पोलिसांनी राज्याच्या अप्पर पोलिस महासंचालकांकडे सादर केला आहे. त्यानंतर तो अहवाल राज्य सरकारकडे जाण्याची शक्यता आहे.

एक्स्प्रेस-वेवर होणाऱ्या बहुतांश अपघातांचे कारण वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना आवर घालण्यासाठी २७ आणि २८ ऑगस्ट रोजी दोन ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवण्यात आली होती. लेन कटिंग करणाऱ्या, अतिवेगात चालविणाऱ्या ४१ वाहनांवर कारवाईही करण्यात आली होती. महामार्ग पोलिसांनी ड्रोनद्वारे केलेल्या पाहणीचा अहवाल नुकताच अप्पर पोलिस महासंचालकांकडे सोपविला आहे, अशी माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.

'ड्रोनच्या पाहणीदरम्यान नियम तोडणाऱ्या जड वाहनांचे व्हिडिओ शुटिंग आणि फोटो काढण्यात आले आहेत. त्यानंतर ते लोणावळा एक्झिट टोल नाका आणि उर्से टोल नाक्यावर नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना ऑनलाइन पाठवण्यात आले. त्याआधारावर संबंधित वाहनचालकाकडून दंड वसूल करण्यात आला होता,' असेही तांबे यांनी सांगितले. राज्य सरकारने एक्स्प्रेस-वेवर अपघातप्रवण भागात कायमस्वरूपी नजर ठेवण्यासाठी 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम' (आयटीएमएस) ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत व्हिडिओ सर्व्हेलन्स आणि घाट विभागात लेन कटिंग करणाऱ्यांवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवता येईल का, याची चाचपणी करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ड्रोनची चाचणी करण्यात आली.

अहवालावर भवितव्य अवलंबून
दरम्यान, ड्रोनचा वापर फायदेशीर ठरेल किंवा नाही, यावर राज्यभरात सकारात्मक व नकारात्मक चर्चा झाली. एक्स्प्रेस-वेवर २४ बाय ७ ड्रोनद्वारे नजर ठेवणे शक्य नाही. ड्रोनची क्षमता या कामी अपुरी पडेल, अशी मते अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे महामार्ग पोलिसांच्या अहवालावर आता ड्रोनचे भवितव्य ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात धावणार ई-रिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई आणि रायगड जिल्हा वगळता आता राज्यभरात ई-रिक्षा धावताना दिसतील. नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि लातूर या पाच शहरांमध्ये ई-रिक्षांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिल्यानंतर आता राज्य सरकारने उर्वरित जिल्ह्यांतही ई-रिक्षांना परवानगी दिली आहे. त्यासाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने ई-रिक्षाबाबत धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार दिल्लीत ई रिक्षाचा प्रयोग राबविण्यात आला. तो यशस्वीही झाला. त्यामुळे या रिक्षांना अन्य राज्यातही परवानगी देण्यात आली. दिल्लीप्रमाणेच राज्यात आता मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) वगळता ई-रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

गृह विभागाने ई-रिक्षाच्या परवान्यांसाठी निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार ई-रिक्षाचालकाला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांना स्थानिक परिसराची माहिती असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना व सार्वजविक वाहतूक करण्याचा परवाना (बॅज) असावा. परवानाधारकाकडे महाराष्ट्राचा पंधरा वर्षांचा वास्तव्याचा दाखला असावा. रिक्षात चालकाला आपले नाव आणि नंबरसहीत छोटा फलक लावावा लागणार आहे. ई-रिक्षांना ऑटो रिक्षाप्रमाणे शहराच्या कोणत्याही भागात प्रवास करता येणार नाही. दिलेल्या मार्गांवरच प्रवासी वाहतूक करण्याचे बंधन त्यांच्यावर राहणार आहे.

परवाने कोणाला मिळणार?

केवळ सायकल रिक्षा चालविणाऱ्या चालक व मालकांना ई-रिक्षाचे परवाने देण्यात यावेत, अशी तरतूद नियमावलीत केली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून सायकल रिक्षा हद्दपार झाल्या आहेत. पुण्यातही फार वर्षांपूर्वीच सायकल रिक्षा बंद झाल्या आहेत. त्यामुळे ई-रिक्षांचे परवाने कोणाला दिले जाणार, पुण्यात या रिक्षा धावू शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


महत्त्वाचे मुद्दे

- ई-रिक्षामध्ये चार प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.
- या रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे असेल.
- रिक्षातून ४० किलोपर्यंतच्या वजनाच्या वस्तूंची वाहतूक करता येईल.
- आरटीओकडून दरनिश्चिती केली जाणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांना ‘दम’वतोय खडू-फळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सुमारे ६१.५ टक्के प्राथमिक शिक्षक हे श्वसनाच्या विकारांनी त्रस्त आहेत. खडूची धूळ हे यामागचे महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. सुमारे ७३.३ टक्के प्राथमिक शिक्षकांना स्ट्रेसचा त्रास होत असून, सुमारे ७४.५ टक्के प्राथमिक शिक्षक हे घशाच्या विकारांनी त्रस्त आहेत.

राज्यातील शिक्षकांच्या आरोग्याविषयी सरकार दरबारी कोणतीही थेट एकत्रित माहिती उपलब्ध नसली, तरी आता शिक्षकांनीच अशी माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. असाच एक प्रयत्न सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रगतिशील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी केला आहे. त्यातून राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून १३ हजार ३७० प्राथमिक शिक्षकांची आरोग्यविषयक माहिती एकत्रितरीत्या गोळा झाली आहे. त्यातून राज्यातील शिक्षण खात्याचेच नव्हे, तर शिक्षकांचेही आरोग्य बिघडलेलेच असल्याचे स्पष्ट होत आहे. डिसले यांनी 'मटा'ला या प्रकल्पाची माहिती दिली. राज्यभरातील सर्व शिक्षकांविषयीची अशी माहिती गोळा होण्याचे महत्त्वही स्पष्ट केले.

नव्या, विशेषतः इंग्रजी प्राथमिक शाळांमध्ये व्हाइट बोर्डचा वापर वाढत असला, तरी अजूनही सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये अध्यापनासाठी 'खडू-फळा' हीच व्यवस्था अस्तित्वात आहे. याचा शिक्षकांच्या थेट आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे. 'फळा पुसताना, डस्टर झटकताना उडणारी खडूची धूळ शरीरास घातक असून, त्यामुळे फायब्रोसिस आजाराचा धोका संभवतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे,' असे डिसले यांनी नमूद केले. 'सुमारे ७३.४ टक्के शिक्षकांना रक्तदाबाचा, तर २४ टक्के शिक्षकांना मणक्याच्या विकारांचा त्रास आहे,' असेही त्यांनी सांगितले.

डिसले म्हणाले, 'वर्ष २०१५ मध्ये साधारण ३५० हून अधिक शिक्षकांचे निधन झाले. यातील बहुतांश शिक्षक हृदयविकाराने दगावले. गेल्या वर्षभरात औरंगाबाद, चंद्रपूर येथे झालेले शिक्षकांचे मृत्यू हा चर्चेचा विषय ठरला होता. शिक्षक आत्महत्या का करत आहेत, त्यामागे कामाचा ताण हे कारण आहे, की आरोग्याच्या काही इतर समस्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले. त्यातून या बाबी समोर आल्या. शालेय सुविधा पुरविताना शिक्षकांच्या समस्यांचा कोणताही विचार आपल्याकडे होत नसल्याचे या निमित्ताने दिसून आले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्याचा ‘गाडा’ विसर्जनात

$
0
0

पुणे : बाप्पांसाठी उत्सवाच्या कालावधीत आणि पुन्हा विसर्जन मिरवणुकीसाठी वेगवेगळी सजावट करणारी अनेक मंडळं पुण्यात आहेत. उत्सवाच्या दहा दिवसांत नागरिकांसाठी देखावे-रोषणाई-संगीत कारंजे अशी सजावट करणाऱ्या मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीसाठी पुन्हा स्वतंत्र रथ तयार केले जातात. या रथांची संकल्पना निश्चित करण्यापासून ते त्यांच्या सजावटीपर्यंत मंडळांना पुन्हा मोठा खर्च करावा लागत असल्यानं शहरातील अनेक छोट्या मंडळांनी त्यावर नवी युक्ती शोधून काढली आहे. उत्सव मंडपात ट्रॉलीवर अशा पद्धतीने सजावट केली जाते, की हीच सजावट मिरवणुकीमध्येही वापरता येऊ शकते. काही वर्षांपूर्वीपर्यंत ठराविक मंडळांकडून वापरला जाणारा हा ट्रेंड अलीकडे विस्तारतोय.
विसर्जन मिरवणुकीत आजकाल बहुतांश मंडळे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा वापर करतात. याच ट्रॉलीवर लाकडी फळ्या टाकून त्यावर देखावा उभारण्याची कला आजकाल वापरात आहे. मंडपामध्ये हीच ट्रॉली ठेवली जाते आणि ट्रॉलीवर देखावा उभारण्यात आला आहे, हे समजू नये, याकरिता त्याला पुढून झालर लावण्यात येते. अशा ट्रॉलीवर प्रामुख्याने स्थिर पद्धतीचा देखावा केला जातो. क्वचित प्रसंगी त्यावर वेगळ्या स्वरूपाची सजावट केली जाते. बऱ्याचदा दहा दिवसांसाठी कृत्रिम फुला-पानांची सजावट केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत त्याच जागी नैसर्गिक फुलांचे डेकोरेशन करण्याचाही ट्रेंड आहे. ट्रॉलीवर देखावा उभा केल्याने मंडप आणि सजावटीवरील खर्च वाचतो; तसंच विसर्जन मिरवणुकीसाठी स्वतंत्र देखावाही करावा लागत नाही.
गणेशोत्सवाच्या काळात मंडळ मोठं असो की छोटं, बाप्पासाठी छानशी सजावट करण्याकरिता प्रत्येक कार्यकर्ता मनापासून झटतो. अनेक मोठ्या मंडळांनी वर्गणी स्वीकारणं सध्या थांबवलं असलं, तरी शहराच्या सर्व भागांत पसरलेल्या प्रत्येक मंडळालाचं वर्गणीविना उत्सव साजरा करणं जमतंच असं नाही. सक्तीनं वर्गणी गोळा केली जाण्याचे दिवसही आता मागे पडले आहेत. त्यामुळं स्वखुशीनं भक्तांनी दिलेल्या वर्गणीवरचं गणेश-उत्सवाचा गाडा सांभाळण्याची कसरत करावी लागते. त्यामुळे उत्सव काळात आणि त्यानंतर मिरवणुकीतही एकच देखावा साकारणाऱ्या मंडळांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘श्री’कारातही ओंकार

$
0
0

- मंदार लवाटे

ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये कागदाच्या वर 'श्री'कार काढलेला आढळतो. मंगलवाचक, ऐश्वर्यसूचक पद म्हणून हा श्रीकार काढलेला असतो. श्रीकाराप्रमाणे निरनिराळ्या देवतांचे उपासक आपापल्या देवतेचे नाव पत्राच्या वर आवर्जून लिहीत. या देवतेच्या नावावरून पत्र कोणाचे आहे ते ओळखणे सोपे जाते. रामदास स्वामींच्या पत्रावर 'श्री राम समर्थ' असे लिहिलेले असे. रघुनाथराव पेशव्यांच्या पत्रावर 'श्री सांबोजयति', 'श्री शंकर', 'श्री सांब' असे लिहिलेले आढळते. पुढे पुढे 'श्री सांबपुत्रो जयति' असे रघुनाथराव लिहू लागले. नागपूरकर भोसल्यांच्या पत्रावर रामास, तर हिम्मत बहाद्दर चव्हाणांच्या पत्रावर 'केदारलिंग' अर्थात जोतीबास नमन केलेले आढळते. मस्तानीचा पुत्र समशेरबहाद्दर पत्रावर 'पांडुरंग कृपा' असे लिहित असे. इब्राहीम आदिलशहा (दुसरा) त्याच्या पत्रावर 'अज पूजा सरसोती' असे म्हणजे सरस्वतीस नमन करत असे. सरस्वती माझी आई व गणपती माझा पिता अशी त्याची भावना होती. गणपतीचे भक्त अर्थातच गणपतीचे नाव पत्रावर लिहीत. पराक्रमी व इतिहासातील प्रसिद्ध सरदार गोपाळराव पटवर्धन पत्रावर स्वतःच्या हाताने 'गणराज' असे लिहीत, तर त्यांचे वडील गोविंद हरी पत्रावर 'गणपतीर्जयती' असे लिहीत असत. परशुरामभाऊ नुसते गणपती असे लिहीत असत. गणराज असे पत्रावर लिहिणाऱ्या एकूण २१ व्यक्ती आढळतात असे ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. शं. ना. जोशी यांनी म्हटले आहे. मोरया असे लिहिणाऱ्या २३ व्यक्ती त्यांना आढळल्या. गणपती, हेरंब असे लिहिलेली पत्रही आढळतात. यशवंतराव दाभाडे यांच्या पत्रावर 'श्री मोरया' असे लिहिलेले आढळते. नारोशंकर राजेबहाद्दर, सदाशिव माणकेश्वर पत्रावर 'श्री गजानन' असे लिहीत. सर्जेराव घाटगे पत्राच्या सुरुवातीला 'श्री गणेश प्रसन्न' असे लिहीत. बापू गोखल्यांचे काका विसाजीराम 'श्री गजानन प्रसन्न' असे लिहीत असत. पटवर्धन घराण्याचा पत्रांमध्ये तर अगदी एक दोन ओळीची चिठ्ठी असली, तरी त्यावरही गणपतीचे नाव लिहिले जाई. पटवर्धन घराण्याप्रमाणे मोरया गोसावी व त्यांचे वंशज हे गणेशभक्त म्हणून विख्यात. देवांचे लाखो कागद भारत इतिहास संशोधक मंडळात असून, त्यांच्या पत्रावर 'मोरया' अथवा 'श्री गणपती' असा शिक्काच आढळतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​नैरोबीतील भारतीयांचा गणेशोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आकर्षक सजावटीमध्ये विराजमान झालेल्या गणरायाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची सुरू असलेली वर्दळ, पाहुण्यांच्या आदारातिथ्यासाठी स्वयंसेवकांची सुरू असलेली लगबग अन् हौशी कलाकारांनी जय्यत तयारीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल... हे वर्णन आहे नैरोबीतील गणेशोत्सवाचे.
केनियाची राजधानी असलेल्या नैरोबीमध्ये गणेशोत्सव म्हणजे भारतीयांबरोबरच आफ्रिकेतील नागरिकांसाठी देखील आकर्षण ठरला आहे. या दमदार गणेशोत्सवाचे श्रेय जाते नैरोबी महाराष्ट्र मंडळाला. गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ नैरोबीमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येतो आहे.
विविध कारणांमुळे नैरोबीमध्ये वास्तव्यास आलेल्या मराठी बांधवांनी सत्तर वर्षांपूर्वी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. सध्या दोनशेहून अधिक कुटुंब या भागात राहात असून दीडशेहून अधिक मंडळाचे सभासद आहेत. याशिवाय भारतातील नागरिकांची संख्याही मोठी आहे. महाराष्ट्राची ओळख असलेला गणेशोत्सव इथेही सार्वजनिक स्तरावर साजरा केला पाहिजे, असा विचार पुढे आला आणि गेल्या २८ वर्षांपासून मंडळ मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करते आहोत, अशी माहिती नैरोबी महाराष्ट्र मंडळाच्या सरचिटणीस चित्रा सणस यांनी दिली.
गणेशोत्सव आमच्यासाठी आनंदसोहळा असतो. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. दीड ते दोन महिनेआधी सभासदांच्या रंगीत तालीम सुरू होतात. अवघ्या पाच वर्षांच्या मुलांपासून पन्नास वर्षांपुढील महिला आणि पुरुष विविध कार्यक्रमात सहभागी होतात. भारतातील कलाकारांनाही आम्ही आमंत्रण देतो. मराठी बांधवांसह गुजराती, पंजाबी आणि इतर भाषिक मंडळी यात आवर्जून सहभागी होतात. मंडळाचा उत्सव पाहून काही गुजराती आणि पंजाबी बांधवांनी घरी गणपती बसविण्यास सुरुवात केली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे या वर्षीच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सर्व महिलांचा समावेश असून यंदाचे नियोजन आम्ही केले आहे. अध्यक्ष डॉ. ज्योती नेने -त्रिवेदी, खजीनदार तृप्ती पवार, सांस्कृतिक विभाग सचिव डिंपल नागझरकर, रियांका पेंढारकर, मिलान राणे आणि स्वाती जुंद्रे यांनी यांचा संयोजनात महत्त्वाचा वाटा आहे, असे सणस यांनी सांगितले.

आफ्रिकन कुटुंबाला करायची आहे आरती
सुरुवातीला काही वर्षे भारतातून गणेश मूर्ती आणावी लागत होती. आता इथे मूर्ती मिळतात. छोटेखानी मिरवणूक काढून जल्लोषात आम्ही बाप्पाला घेऊन येतो. उत्सवादरम्यान रोज सकाळी आरती आणि महाप्रसाद असतो. लोकप्रियतेमुळे दररोज सहाशे ते सातशे भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. संध्याकाळी रोज कार्यक्रम असतात. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे धमाल असते. स्थानिक नागरिकही बघायला येतात. मंडळाबद्दल असलेले कुतूहल आदर आणि विश्वासार्हतेमुळे या वर्षी आफ्रिकेतील एका कुटुंबाने देणगी देऊन उत्सवातील आरतीचा मान मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाश्रम संस्कृती संपुष्टात आणावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'ऋषिपूजनाची संस्कृती टिकवणे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. ऋषिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. आपल्याकडील वृद्धाश्रम संस्कृती संपुष्टात आणण्याची गरज आहे,' अशी अपेक्षा ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी मंगळवारी व्यक्त केली.
शारदा ज्ञानपीठम तसेच महानगरपालिका, एमआयटी, विश्वशांती गुरुकुल, सिम्बायोसिस या आणि इतर संस्थांच्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त मंगळवारी १२ ऋषितुल्य व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यंदाच्या १२ ज्ञानतपोवृद्धांपैकी ३ शतायुषी आणि ५ नव्वदी ओलांडलेले आणि ४ जण ऐंशी-नव्वदीमधील आहेत. रामचंद्रजी संतदास दंडवते, प्राचार्य वसंतराव बलवत अरगडे, शिवलिंग शिवाचार्यमहाराज, हिरोजी नारायण तोडणकर, माधव कृष्ण पारधी, मालती दत्तोबा दास्ताने, इंदिराजी पित्ती, ज्ञानदेव कोंडिबा काळेगुरुजी, पं. बबनराव हळदणकर, प्राचार्य यशवंत शंकर लेले, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांचा सत्कार महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, 'एमआयटी'चे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड व शारदा ज्ञानपीठमचे प्रमुख पं. वसंतराव गाडगीळ उपस्थित होते.
'राजकीय क्षेत्रांत कार्य करणाऱ्या आमच्या सारख्यांना यानिमित्ताने थोरामोठ्यांपुढे नतमस्तक होता येते. शारदा ज्ञानपीठम बरोबर असा कार्यक्रम घेणारी पुणे महापालिका ही एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था आहे. गेली ४१ वर्षे हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. या उपक्रमास दर वर्षी दोन लाख रुपये मिळावेत, यासाठी मी प्रयत्न करेन,' असे महापौर जगताप म्हणाले. डॉ. मुजुमदार म्हणाले, की 'गेल्या ४१ वर्षांत ४२४ ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.' 'तरुण पिढीने या दिग्गजांकडे पाहून ज्ञानोपासना, उत्तम चारित्र्यनिर्माण आणि तपस्या कशी करावी हे शिकले पाहिजे,' असे डॉ. कराड म्हणाले. श्रीवर्धन गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​वैनायकी

$
0
0

- आनंद कानिटकर
---
गुप्तकाळापासून गणपतीच्या मूर्तींच्या संख्येत वाढ झालेली आपल्याला दिसून येत असली, तरी भारतातील शिलालेखांमध्ये गणपतीचा उल्लेख आढळू लागतो, तो इसवी सनाच्या सातव्या शतकापासून. ब्रह्मोर (चंबा, हिमाचल प्रदेश) येथे मिळालेल्या इसवी सनाच्या ७व्या शतकातील ताम्रपटाची सुरुवात 'ओम गणपतये नमः' अशी केलेली दिसून येते. ब्रह्मोर येथेच सापडलेल्या एक कास्यप्रतिमेवरही (इ. स. सातवे शतक) दानलेखाची सुरुवात 'ओम नमः गणपतये' अशी केलेली आहे. गुर्गी (रेवा, मध्यप्रदेश) येथे सापडलेल्या एका शिलालेखात (इ.स. १०वे शतक) शिवमंदिर बांधल्याचा, तसेच मंदिराच्या दारापाशी गणपती आणि सरस्वती यांची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. राजस्थानमधील राजोर येथे सापडलेल्या इ. स. १०व्या शतकातील शिलालेखात लछुकेश्वराच्या मंदिरानजीक विनायकाची मूर्ती स्थापन केल्याचा उल्लेख आहे. भिवंडी तालुक्यात सापडलेल्या १०व्या शतकातील शिलाहारकालीन ताम्रपटाची सुरुवात 'ओम नमो विनायकाय' अशी विनायकाला वंदन करून केलेली आहे.
यावरून हळूहळू गणेशाला, विनायकाला कसे महत्त्व प्राप्त होत गेले, हे स्पष्ट होते. ज्या वेळेस गणपतीला स्वतंत्र देवतेचे स्वरूप आले, त्या वेळी इतर देवतांप्रमाणे त्याच्या शक्तीची कल्पना मांडण्यात आली. सप्तमातृका या पुरुष देवतांच्या शक्ती आहेत, हे त्यांच्या नावावरूनच स्पष्ट होते. त्याचप्रमाणे 'वैनायकी' या नावाने विनायकाची शक्ती कल्पिण्यात आली. हिला अनेक जण गणेशी, गणेशानी, गजानना इत्यादी नावांनीही ओळखतात. वराहमिहीराच्या बृहतसंहिता (इ. स. सहावे शतक) या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख आढळतो. विष्णुधर्मोत्तर पुराण आणि मत्स्य पुराण या ग्रंथांतही तिचे उल्लेख आढळतात.
वैनायकीच्या प्रतिमा फार आढळत नाहीत. तिचे स्वतंत्र देऊळही सापडलेले नाही. वैनायकीच्या मूर्ती मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू इत्यादी राज्यात दिसतात. दक्षिण भारतातील काही देवळाच्या स्तंभांवर तिच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. कोलार येथील ११ व्या शतकातील शिलालेखात तिचा ६४ योगिनींमध्ये समावेश केला आहे. भेडाघाट येथील ६४ योगिनीमध्ये एक योगिनी वैनायकी दाखवलेली आहे. शाक्त पंथात तिचा समावेश झालेला होता, हे आपल्याला तिच्या ६४ योगिनीमधील समावेशाने समजते.
या वैनायकीची प्रतिमा गजमुखधारी स्त्रीशरीर अशी असते. तिची मूर्ती उभी किंवा बसलेली दाखवतात. तिला चार हात असून त्यात दात, परशू, अक्षमाला, कमल, दंड, सर्प इ. दाखवावेत, असा संकेत आहे. ग्वाल्हेर येथील संग्रहालयात एक वैनायकीची सुंदर मूर्ती आहे. यात वैनायकी दोन अर्धस्तंभांच्यामध्ये उभी असलेली दाखवलेली आहे. तिला चार हात असून हातात नाग, परशू, तुटका दात आणि मोदकपात्र धरले आहे.
पुण्याजवळील यवत येथील भुलेश्वर मंदिराच्या आवारात विविध स्त्रीदेवतांच्या प्रतिमा दर्शवण्यात आलेल्या आहेत. त्यात एक वैनायकीची प्रतिमा देखील आहे. ही गजवदना वैनायकी आसनावर बसलेली असून तिच्या आसनासमोर मूषक दाखवलेला आहे. तिला चार हात दाखवलेले आहेत. त्यात दंड, अंकुश, मोदकपात्र आहेत. तिची सोंड डावीकडे वळलेली असून तिला हस्तिदंतही दाखवलेले आहेत. तिने गळ्यात हार, हातात कंकणे व पायात नुपूर घातले आहेत. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक प्रसिद्ध आहेतच. भुलेश्वर येथील ही वैनायकीदेखील वैशिष्ट्यपूर्ण म्हटली पाहिजे.
(लेखक भारतीयविद्या तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळाच्या सभापतींचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती चेतन भुजबळ यांनी महापौर शकुंतला धराडे यांच्याकडे मंगळवारी (सहा सप्टेंबर) राजीनामा सुपूर्त केला. शिक्षण मंडळाच्या नव्या सभापतीची निवड १४ सप्टेंबरला होणार आहे.
शिक्षण मंडळातील सर्वच सदस्यांना पदे भूषविण्याची संधी मिळावी, असा राजकीय समझोता महापालिकेत यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे सदस्यांना आलटून-पालटून सभापतीपदाची संधी मिळत आहे. सहा महिने का होईना पद मिळावे, यासाठी इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर निवृत्ती शिंदे आणि शिरीष जाधव यांच्यात चुरस आहे. त्यामध्ये शिंदे यांचे नाव तूर्तास तरी आघाडीवर असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.
सहा महिने सभापतिपद भूषविल्यानंतर भुजबळ यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट न पाहता महापौर धराडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. 'सहा महिन्यांच्या कारकिर्दीत भुजबळ यांनी शालेय साहित्याचे वेळेत वाटप, पहिलीपासून सेमी इंग्रजी, ई-लर्निंग, इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा, कार्यालयात सीसीटिव्ही यंत्रणा ही उल्लेखनीय कामे केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच यंदाच्या वर्षी पालिका शाळांतील पटसंख्येतही वाढ झाल्याचे नमूद केले. दरमहा सहा हजार रुपये मानधनावर दोनशे शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे,' असे त्यांनी सांगितले. व्हिजन आराखड्याची अंमलबजावणी, रुम टू रिड इंडिया, बजाज फाउंडेशनच्या सहकार्याने ८० शाळांमध्ये भौतिक सुविधा या संदर्भातही कामे मार्गी लागल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
००००
माझ्या सहा महिन्यांच्या कारकिर्दीत शालेय साहित्याचे वेळेत वाटप, पहिलीपासून सेमी इंग्रजी, ई-लर्निंग, इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा, कार्यालयात सीसीटिव्ही यंत्रणा आदी कामे पूर्ण केली आहे. कालावधी पूर्ण झाल्याने पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट न पाहता राजीनामा दिला आहे. -
- चेतन भुजबळ, माजी सभापती, शिक्षण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्हाडा’च्या दराबाबत नाराजी

$
0
0

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; प्रकल्पाच्या चौकशीची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजनेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली असून, त्याच्या दरांबाबत मात्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याविषयी पिंपरी-चिंचवडमधील नगरसेविका सीमा सावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली आहे.
म्हाडाच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी येथे बांधलेल्या ८४५ सदनिकांची योजना जाहीर करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सुमारे अडीच हजार सदनिका आणि ६७ भूखंडांची विक्री केली जाणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत पाच ऑक्टोबर आहे. मोरवाडी, म्हाळुंगे (ता. खेड), वानवडी, शिवाजीनगर, सोलापूर, दिवे (ता. पुरंदर), फलटण या ठिकाणी सदनिका आणि भूखंड उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, आणि उच्च गट या वर्गवारीनुसार अंदाजित किंमत दर्शविण्यात आली आहे. त्यावरून असंख्य नागरिकांनी उत्सुकता दर्शविली असून, ते दरांबाबत तुलनात्मक माहिती घेत आहेत.
'या सदनिकांसाठी शहराच्या उच्चभ्रू भागातील सदनिकांचा दर आकारण्यात आला आहे,' असा आरोप करीत सावळे यांनी 'म्हाडाच्या घरांसाठी अडीच एफएसआय लागू असल्यामुळे सदनिकांचा दर कमी असणे गरजेचे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राबविलेल्या या प्रकल्पाबाबत चौकशी व्हावी,' अशी मागणीही केली आहे.
या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे, म्हाडाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी, सर्व्हे क्रमांक १५०, १५२ आणि १५३ मध्ये अल्प (३६२ सदनिका), मध्यम (३२९ सदनिका) आणि उच्च उत्पन्न गटासाठी (१५४ सदनिका) एकूण ८४५ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तीनही उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांसाठी प्रति चौरस फूट आकारण्यात येणारा दर नमूद करण्यात आला आहे. मोरवाडी येथील म्हाडाची जमीन फार पूर्वीपासून म्हाडाच्याच मालकीची आहे. त्यामुळे या जागेच्या खरेदीसाठी म्हाडाला कोणतीही आर्थिक झळ बसलेली नाही. असे असताना दरांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.' सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सदनिकांचे वाटप करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मोरवाडीतील अल्प उत्पन्न गटासाठी बांधलेल्या ३६२ सदनिकांसाठी म्हाडाने प्रति चौरस फूट ६ हजार १०० रुपये दर निश्चित केला आहे. ही सदनिका ४७७ चौरस फुटाची असून, त्यासाठी २९ लाख रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. हा दर अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारा नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे. खेड तालुक्यातील म्हाळुंगेमद्येही एक हजार ४१३ सदनिका बांधल्या आहेत. तेथील अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकासाठी प्रति चौरस फूट ५ हजार २०० रुपये दर आकारण्यात येणार आहे. ग्रामीण भागात एवढ्या जादा दराची सदनिका खरेदी करण्यासाठी अल्प उत्पन्न गटातील नागरिक पुढे कसे येतील? अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. याशिवाय कार्पेट आणि बिल्टअप एरिया नमूद करताना त्यातील तफावतीकडेही लक्ष वेधले आहे. काही ठिकाणी कार्पेटवर सुमारे ५० टक्के बिल्टअप एरिया गृहीत धरला आहे.
०००
फेरविचाराची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वस्त घरकुल प्रकल्पात अवघ्या साडेसात लाख रुपयांत नागरिकांना ५०० चौरस फुटाचे घर उपलब्ध करून दिले आहे. त्यात काही त्रुटी राहिल्या. मात्र, दराची तुलना केल्यास म्हाडाने सदनिका विक्रीतून कोणाचा नफा मिळवून देण्याचे ध्येय ठेवले आहे, याकडे लक्ष वेधले आहे. म्हाडाच्या मोरवाडीतील प्रकल्पाच्या बांधकामाच्या दर्जाची तपासणी करून दरांबाबत फेरविचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारवंतांचे सिद्धांत समजून घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लाल आणि निळ्या चळवळींना एकत्र आणण्याची भाषा सध्या चळवळीतील नेत्यांकडून केली जाते. मात्र, दोन्ही संकल्पनांचा गाभा, आशय आणि गर्भीतार्थ समजून घेतला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फुले, आंबेडकर अशा विचारवंतांची लेबल लावून बोलण्यापेक्षा त्यांचे सिद्धांत सखोल रीतीने समजून घ्यावे लागतील, असे मत कॉम्रेड भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.
लोकायत संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हरिती प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित व बी. युवराज लिखित 'राजकीय असंतोषाचा कालखंड व आजची आव्हाने' या पुस्तकाचे प्रकाशन पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. कॉ. दत्ता देसाई, बी. युवराज आदी या वेळी उपस्थित होते.
पाटणकर म्हणाले, 'आंबेडकरी आणि डाव्या चळवळीने एकत्र यावे, अशी मागणी होत आहे. मात्र, या दोन्ही चळवळींच्या मागे असलेल्या विचारांचा अभ्यास किती जणांनी केला आहे, याबाबत शंका वाटते. या विचारांचा मतितार्थ समजून घेणे गरजेचे आहे. कनिष्ठ वर्ग आणि वरिष्ठ वर्गातील दरी अद्याप 'जैसे थे' आहे, हे कळल्याशिवाय जातीव्यवस्था समूळ नष्ट होणार नाही. अशा परिस्थितीत नेमकी विकासाची प्रक्रिया कोणत्या दिशेने चालली आहे, हे समजून घ्यायला हवे. विकासाच्या नावाखाली जाती व्यवस्थेची मुळे अधिकाधिक घट्ट होत आहेत.'
'आजकाल तरुणांमध्ये सैद्धांतिक चर्चा अपवादाने पाहायला मिळतात. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एकमेकांना पूरक आहेत. या विचारांची कास धरताना बदललेली समाजव्यवस्थाही समजून घ्यायला हवी. सध्याची परिस्थिती काय आहे, यावर सतत टीका करत राहण्यापेक्षा नेमक्या कोणत्या बाबीची गरज आहे, हे समजून उपाय सुचवणे संयुक्तिक ठरेल,' असेही ते म्हणाले.
कॉ. दत्ता देसाई म्हणाले, 'हिंदुत्वाच्या अजेंड्यातून अखंड भारताचे स्वप्न पाहून भारत महासत्ता बनण्याच्या विचारप्रणालीचा घाट घातला जात आहे. दुसरीकडे डाव्या चळवळींचे राजकारण चाकोरीत अडकले आहे. भ्रमनिरासातून क्रांतिकारी राजकारण घडत नाही. सकारात्मक राजकारणासाठी अनेक छोट्या-मोठ्या चळवळींनी संघटित, असंघटितपणे पर्यायी मार्ग अवलंबले. या सर्व चळवळींनी एकत्र येऊन मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. दलित वर्गाचा विकास करण्याच्या नावाखाली बाबासाहेबांच्या मंत्रिपदाशी एखाद्या घटकाची तुलना करून हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर लोकशाहीची पुर्नरचना होणे आवश्यक आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचनेबाबत उत्कंठा

$
0
0

महिन्याभराने निघणार आरक्षणांची सोडत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केल्याने आगामी महापालिका निवडणुकांचे बिगुल यापूर्वीच वाजले आहे. आज, बुधवारी प्रा-रूप प्रभागरचनेचे काम महापालिकेकडून संपणार आहे, तर आजपासून बरोबर महिन्याभराने प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे, सध्याच्या अस्तित्वातील प्रभागासह आता नव्याने जोडल्या जाणारा प्रभाग नेमका कसा असेल, याची धाकधूक पालिकेतील प्रस्थापितांच्या मनातही आहे.
निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच प्रभागरचना कोणत्या निकषांवर करावी, याचे सविस्तर निवेदन सर्व महापालिका आयुक्तांना पाठवले आहे. त्यानुसार, महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे गेल्या १५ दिवसांपासून प्रभाग रचनेच्या कामावरच लक्ष केंद्रित करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने प्रभागरचना करताना कोणत्या दिशेपासून करावी, त्यानंतर कोणत्या दिशेला जावे आणि शेवट कुठे करावा, याबाबतही स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यामुळे, २०१२ च्या निवडणुकांप्रमाणेच प्रभागांची सुरुवात शहराच्या उत्तरेकडून होणार असून, त्याचा शेवट दक्षिणेकडे होणार आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना 'झेड' पद्धतीने शहरातील भागांचा त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. आगामी पालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याने आपल्या भागाला कोणता भाग जोडला जाऊ शकतो, याची चाचपणी स्थानिक स्तरावर काही नगरसेवकांकडूनही सुरू आहे.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रभाग होणार आहेत. त्यामुळे, या प्रभागांची सरासरी लोकसंख्या सुमारे ८० हजारांच्या दरम्यान असेल, अशी शक्यता आहे. लोकसंख्येच्या निकषांवर सध्याच्या प्रभागाला साधारणतः कोणता भाग जोडला जाऊ शकतो; तसेच नैसर्गिक हद्द कायम ठेवून कोणता भाग प्रभागामध्ये समाविष्ट होऊ शकतो, याचे आडाखे बांधले जात आहेत.
महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीने होवो, अथवा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने दर वेळी साधारण ५० टक्के नगरसेवक नवीन येतात, असे चित्र दिसून येते. त्यामुळे, नव्या रचनेत प्रभागाची हद्द निश्चित झाल्यानंतर हा इतिहास यंदाच्या निवडणुकीत बदलण्यासाठी अनेक प्रस्थापितांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. मोठ्या राजकीय पक्षांनी संबंधित भागांतील आपल्या पक्षाच्या तगड्या उमेदवारासह इतर पक्षांतील संभाव्य उमेदवारांचा शोधही सुरू केला आहे. चारच्या पॅनेलमध्ये शक्यतोवर सर्व घटकांना स्थान देण्यासाठी प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता आहे. दोन प्रभाग तीन सदस्यांचे असल्याने त्यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व ठिकाणी चारपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे. तसेच, दोन जागा खुल्या प्रवर्गासाठीही राहतील. त्यानुसार, पुढील महिन्यात आरक्षण निश्चित होणार असले, तरी तोपर्यंत उमेदवारांची चाचपणीही सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कार्याध्यक्ष पदनिर्मिती पुण्यासाठी अशक्यच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पक्षाच्या कार्यकारिणीवरील नियुक्त्यांवरून ओढवलेली नाराजी दूर करण्यासाठी दोन ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना कार्याध्यक्षपदाची संधी दिली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आली. प्रदेश स्तरावर कार्याध्यक्ष हे पद नसताना केवळ पुण्यासाठी ते कसे निर्माण करणार, अशी विचारणा करून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मागणीतील हवाच काढून टाकली.
आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी लक्ष घालायचे ठरवले आहे. गेल्या महिन्यात सोशल मीडिया संदर्भात बैठक घेतानाच, त्यांनी पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारी पुन्हा त्यांनी शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पक्षातील नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने कार्याध्यक्ष नेमण्यात यावे, अशी सूचना या वेळी करण्यात आली. त्यातही, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी सभागृहनेते सुभाष जगताप किंवा मंगेश गोळे यांच्यापैकी दोन जणांची निवड केली जावी, असा आग्रह धरण्यात आला. यापूर्वी, पक्षाने दोन जणांना कार्याध्यक्षपदी नेमले होते, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रदेश पातळीवरही कार्याध्यक्ष नेमला जात नाही, तर पुण्यासाठी वेगळी भूमिका कशी घेणार, असे थेट सांगून मागणीतील हवाच काढून घेतली. त्याऐवजी, पक्षाने गेल्या दहा वर्षांत शहरात केलेली कामे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, झोपडपट्टीतील भागांकडे अधिक लक्ष द्या आणि सोशल मीडियापासून लांब राहू नका, असा सल्ला सुळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकती शोधून तीनपट दंडवसुली

$
0
0

'अभय योजने'ला अल्प प्रतिसाद; पालिकेचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मिळकतकराची नोंदणी अद्याप न केलेल्या नागरिकांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने अनोंदणीकृत मिळकती शोधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नोंदणी न झालेल्या मिळकती शोधून त्यांच्याकडून तीनपट दंड वसूल करण्याचा निर्णय मिळकतकर विभागाने घेतला आहे. यासाठी शहरातील मोठी हॉटेल्स, मॉल तसेच रेस्तराँची पाहणी केली जात असल्याचे मिळकतकर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले.
अद्याप मिळकतकराची आकारणी न झालेल्या प्रॉपर्टीसाठी मिळकतकर विभागाने अभय योजना सुरू केली आहे. योजनेची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र, योजनेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अशा मिळकती शोधून काढून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पथके तयार करण्यात आली असून, शहरातील विविध भागात भेट देऊन ही पथके मिळकतींची पाहणी करणार आहेत. तीन सहायक कर आकारणी प्रमुख, २४ विभागीय निरीक्षक, ६० पेठ निरीक्षक यांचा या पथकांमध्ये समावेश आहे. या पथकांनी गेल्या काही दिवसांमध्ये कोंढवा-वानवडी येथील पाच मजली इमारत, विश्रांतवाडी कळस येथील हॉटेल ओम साई, हॉटेल शेर ऐ पंजाब, हॉटेल यशोदा, राम कलेक्शन सेंटर, विश्वकर्मा फर्निचर, टीव्हीएस सेंच्युरी शोरूम यांच्यावर कारवाई केली. विमाननगर भागातील सहाव्या मजल्यावर सुरू असलेल्या बिअर रबारवर कारवाई करून त्यांच्याकडून ‌तीनपट प्रॉपर्टी टॅक्स वसूल केल्याचे मापारी यांनी सांगितले.
उपनगरांमध्ये अनधिकृत बांधकामांचे प्रमाण अधिक आहे, तर शहरामध्ये वापरात बदल केल्याचे आढळत आहे. याचा शोधही घेण्यात येत आहे. महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या अभय योजनेचा लाभ ३० सप्टेंबरपूर्वी घेतल्यास १० टक्के सवलत मिळणार आहे.
..
लवकरच 'इन्स्टापे'वर सोय
पालिकेच्या मिळकत कर विभागाने ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे यंदा १५५ कोटी रुपये ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून महापालिकेला मिळाले आहे. यासाठी पालिकेने ६७ बँकांबरोबर करार केला आहे. तसेच, 'इन्स्टापे'वर सुविधाही देखील लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी दिव्यांनी पुणे शहर उजळणार

$
0
0

येत्या वर्षभरात रस्त्यांवर सत्तर हजार दिवे बसविणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऊर्जा बचतीसाठी शहरातील विविध रस्त्यांवर एलइडी पथदिवे (स्ट्रीट लाइट) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेने यापूर्वीही शहरात ५० हजार एलइडी पथदिवे बसविले असून, अजून ७० हजार दिवे बसविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आगामी वर्षभरात शहर एलइडी दिव्यांनी उजळणार आहे. रस्त्यावर एलइडी पथदिवे असणारे पुणे देशातील पहिले शहर ठरण्याची शक्यता आहे.
विजेचा वापर कमी करण्यासाठी एलइडी दिव्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमात महापालिकेने पुढाकार घेतला असून, शहरातील पथदिवे एलइडीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत महापालिकेने शहरातील विविध रस्त्यांवर एक लाख २५ हजार पथदिवे बसविले आहेत. यामध्ये सोडियम व्हेपर, एलईडी, टी-४ मेटल हॅलॉइड, इंडक्शन आदी प्रकारच्या दिव्यांचा समावेश आहे. महापालिकेने वॉर्डस्तरीय निधीतून जवळपास ५० हजार एलइडी दिवे बसविले आहेत. उर्वरीत ७० हजार दिव्यांसाठी प्रशासनाने टेंडर प्रक्रिया राबविली होती.
त्यामध्ये टाटा प्रोजेक्ट या कंपनीचे टेंडर पात्र ठरल्याने हे काम त्यांना देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या कंपनीकडून फिलिप्स कंपनीचे दिवे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास ९० कोटींचा खर्च येणार आहे. मात्र, हा खर्च महापालिकेला करावा लागणार नाही. या दिव्यांची देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी या कंपनीवर राहणार असून, त्यासाठी 'एस्को' कार्यप्रणाली राबविली जाणार आहे. एलइडी दिव्यांच्या वापरामुळे पालिकेच्या वाजणाऱ्या वीजबिलातील ९८ टक्के रक्कम 'टाटा प्रोजेक्ट'ला शुल्क म्हणून द्यावी लागणार आहे. पुढील बारा वर्षे कंपनी दिव्यांची देखभाल करणार असल्याचे पालिकेच्या विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीकृष्ण चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागरचनेचा आराखडा त्रिस्तरीय समितीला देणार

$
0
0

अंतिम मान्यतेसाठी येत्या सोमवारी सोपविणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या प्रा-रूप प्रभागरचनेचा सविस्तर आराखडा आज, बुधवारी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार त्रिसदस्यीय समितीकडे सोपविला जाणार आहे. या समितीतर्फे आवश्यक दुरुस्त्या करून प्रभागरचना निवडणूक आयोगाच्या अंतिम मान्यतेसाठी येत्या सोमवारी (१२ सप्टेंबर) सादर केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार महापालिकेवर ७ सप्टेंबरपर्यंत प्रा-रूप प्रभागरचना पूर्ण करण्याचे बंधन होते. पालिकेने शहरातील ४१ प्रभागांचे प्रा-रूप तयार केले असून, ते आज निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार त्रिसदस्यीय समितीला सादर केले जाणार आहे. या समितीमध्ये महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम आणि जिल्हाधिकारी सौरव राव यांचा समावेश आहे. या समितीकडून प्रा-रूप प्रभागरचनेची छाननी केली जाणार असून, त्यात काही दुरुस्त्या गरजेच्या असल्यास त्या करून निवडणूक आयोगाला १२ सप्टेंबरला सादर केला जाणार आहे. प्रा-रूप प्रभागरचनेची तपासणी निवडणूक आयोगाकडून केली जाणार असून, २३ सप्टेंबरला मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर, सात ऑक्टोबरला आरक्षणांची सोडत काढण्यात येणार आहे, तर १० ऑक्टोबरला प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.
महापालिकेची सध्याची सदस्यसंख्या १५२ आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या बदलांनुसार ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये १६२ सदस्य असतील. आगामी महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत. त्यानुसार, चार सदस्यांचे ३९ प्रभाग, तर प्रत्येकी तीन सदस्यांचे दोन प्रभाग असतील. प्रभागरचना करताना निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानुसार, नैसर्गिक नदी-नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपूल या मर्यादा विचारात घेऊन प्रभागरचना करण्यात यावी, असे सूचित करण्यात आले होते. तसेच, भौगोलिक सलगता राखताना अनुसूचित जाती व जमातींच्या वस्त्यांचे विभाजन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात तीन घरफोड्या

$
0
0

पंधरा लाखांचा ऐवज चोरीला; पोलिसांचे अपयश उघड

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात होणाऱ्या घरफोडीच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून आले असून, गेल्या चोवीस तासांत शहरात तीन घरफोड्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये चोरट्यांनी १५ लाखांचा ऐवज चोरला आहे.
नातूबाग गणपती मंदिराजवळ गंगाधर मिठाई नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री तक्रारदार अभिजित गंगाधर (वय ३९, रा. सहकारनगर) दुकान बंद करून गेले होते. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील पाच लाख ५० हजार रुपये चोरले. तक्रारदाराने मंगळवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोरपडी पेठेतील सादीस्तान येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी बंद फ्लॅट उघडून पाच लाख रुपये रोख आणि आणि वीस ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरली. या प्रकरणी अब्दुल वाहिद अब्दुल कादर शेख (रा. घोरपडी पेठ) यांनी तक्रार दिली आहे. खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धायरी गाव येथील सहवास गृहरचना संस्थेतील बंद फ्लॅट फोडल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटातील आणि देवघरातील सोन्याचांदीचे दागिने असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..
सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांचा अभाव
घरफोडी झालेल्या सोसायट्यांना पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक नेमण्याच्या वेळोवेळी सूचना करण्यात आल्या होत्या. पण, यातील एकाही सोसायटीने सीसीटीव्ही बसविलेले नाहीत किंवा सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली नसल्याचे आढळून आले आहे. घरफोडी झालेल्या मिठाईच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. मात्र, त्यांनी तोंड झाकल्यामुळे चेहरा ओळखण्यात अडचणी येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images