Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अकरावी प्रवेशामध्ये तिसरी विशेष फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात यंदा अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत विशेष फेरीचीही तिसरी फेरी होणार आहे. त्यानंतर दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी म्हणूनही एक फेरी होणार आहे. त्यामुळे केवळ तीनच ऑनलाइन फेऱ्यांमध्ये संपण्याची अपेक्षा असलेली ही प्रक्रिया आता सात फेऱ्यांवर जाणार आहे.
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीने मंगळवारी प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीमधील प्रवेश निश्चिती अंतिम केली. त्यानंतरही अद्याप दीड हजारांवर विद्यार्थी गुणवत्तेनुसार कॉलेज निश्चिती मिळण्याच्या प्रतीक्षेमध्येच असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चिती देण्यासाठी म्हणून तिसरी विशेष फेरी घेण्याचा निर्णय समितीने घेतल्याचे समितीकडून बुधवारी सायंकाळी उशिरा सांगण्यात आले.
समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, बुधवारी दुपारी २ वाजता दुसऱ्या विशेष फेरीनंतर कॉलेज पातळीवर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील जाहीर होणार आहे. त्या आधारे गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत तिसऱ्या विशेष फेरीसाठी ऑनलाइन पसंतीक्रम पुन्हा नोंदविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता तिसऱ्या विशेष फेरीची कॉलेज निश्चिती जाहीर होईल. विद्यार्थ्यांनी या फेरीसाठी कॉलेजांचे पसंतीक्रम नोंदविताना कॉलेजांचे कट्ऑफ विचारात घेऊन अर्ज भरण्याचे आवाहनही
समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​हॉटेल पार्किंगमध्ये तरुणाला लुटले

$
0
0

पुणे ः हॉटेलच्या पार्किंगमधील गाडी काढण्यासाठी आलेल्या तरुणाला दोघांनी मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व दोन मोबाइल जबरदस्तीने काढून घेतले. चांदणी चौक येथे एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत संदीप कालिदास पेठे (वय २१, रा. साईसिद्धी चौक, धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठे हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीच्या वतीने चांदणी चौकातील 'अप अँड अबाव्ह' हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टी संपल्यानंतर पेठे व त्यांचे सहकारी पार्किंगमध्ये आले. पेठे यांनी दारू प्यायलेली असल्याने त्यांना गाडी काढता येत नव्हती. त्या वेळी तेथील वॉचमनने त्यांना मदत केली. परंतु, गाडी चालवता येत नसल्याने पेठे हे तेथेच बसले. रात्री उशीर झाल्याने वॉचमन निघून गेला. काही वेळाने ते एकटेच बसलेले असताना तेथे आलेल्या दोघांनी पेठे यांना पैसे मागितले. त्यांनी त्यास नकार दिला. त्या वेळी त्यांना मारहाण करून रोख रक्कम, दोन मोबाइल असा एकूण पाच हजार १४० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. नदाफ हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्ये सीसीटीव्ही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सदस्यांच्या मागणीला मान्यता देण्यात आली. येत्या पाच ते सहा दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार यांनी
स्पष्ट केले.
पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत शाळेच्या सुरक्षा, स्वच्छतेच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्या वेळी बोर्डाच्या सदस्या किरण मंत्री यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली. तसेच शाळांमध्ये शौचालये, मैदान, परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, असेही म्हटले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी मान्य करीत पाच ते सहा दिवसांत शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, असे
स्पष्ट केले.
पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे बोर्डाच्या शालेय विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच गणवेशाच्या गुणवत्तेबाबतही, सदस्य अशोक पवार यांनी तक्रारी केली. ठेकेदाराकडून गणवेश खरेदी करताना दाखविले जाणारे गणवेश आणि प्रत्यक्षात मिळणारे गणवेश यामध्ये तफावत असल्याची कबुली बोर्डाच्या मुख्य कार्यकारी
अधिकाऱ्यांनी दिली.
बोर्डाच्या कार्यपत्रिकेत हद्दीत होणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा तसेच पाठपुरावा घेण्यासाठी स्वतंत्र देखरेख समितीचा प्रस्ताव पुढे ठेवण्यात आला. त्या प्रस्तावाला विरोध करीत सर्वच सदस्यांनी 'आमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही समिती असणार का', असा सवाल केला. त्यावर अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांनी 'गेल्या पावणेदोन वर्षात झालेल्या विकासकामांची यादी मला द्या', असा सवाल उपस्थित सदस्यांना केला. त्यावर विनोद मथुरावाला, अतुल गायकवाड, विवेक यादव यांनी कामाची माहिती दिली. बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांनी 'आम्हाला बोर्डाने अधिकार द्यावेत', अशी मागणी केली. त्यावर प्रकल्प पाठपुरावा समिती स्थापन करून त्यात बोर्डाच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचे ठरले.
बोर्डाच्या कार्यालयाकडून कॅम्प तसेच पूलगेटक़डे जाणारा छोटा पूल आहे. तो धोकादायक बनला आहे याकडे लक्ष वेधण्यात आले. तेथे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे बोर्डाच्या उजव्याबाजूनला जाणाऱा रस्ता पुन्हा खुला करावा. त्यामुळे पुलावर वाहतुकीचा ताण येणार नाही, याकडे सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर पूलाचे स्ट्रक्चरल ऑ़डीट करण्यात येईल, असे संजीवकुमार यांनी
जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मदतीऐवजी साखर कारखाने वाचवणार’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
'राज्यातील सुमारे ५० टक्के साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यांना राज्य सरकारकडून आर्थिक पॅकेज देण्याऐवजी कारखान्यांची अतिरिक्त जमीन विकणे किंवा भाडेतत्त्वावर देऊन संबंधित कारखाने वाचवले जातील.' असे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
साखर कारखान्यांनी २०१९ पर्यंत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याची सक्ती असून, या मुदतीनंतर ठिबक सिंचनावरीलच ऊस शेतकऱ्यांकडून कारखान्यांना घ्यावा लागणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
देशमुख यांनी साखर संकुल येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन साखर कारखान्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी आगामी काळात साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून पॅकेज दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, 'राज्यातील सुमारे ५० टक्के साखर कारखाने अडचणीत आहेत. आगामी गळीत हंगाम १२० दिवसांपेक्षा जास्त दिवस चालणार नाही. आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्याऐवजी संबंधित कारखान्यांच्या अतिरिक्त जमिनी विकणे, मालमत्ता भाडेतत्त्वावर देणे या माध्यमातून कारखाने वाचवता येतील.'
'साखर कारखान्यांना सातत्याने मदत करण्यापेक्षा त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. साखर कारखान्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे.' असेही ते म्हणाले.
बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगून ते म्हणाले, 'बंद अवस्थेत असलेले कारखाने त्याच ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांची ही मागणी आहे.'
'साखर कारखान्यांनी २०१९ पर्यंत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याची सक्ती करण्यात आली आहे. कारखान्यांनी या पद्धतीचा वापर करण्यासाठी त्यांना राज्य सरकारकडून सहकार्य केले जाईल. या पद्धतीचा अवलंब करण्यास थोडा अवधी द्यावा लागणार आहे. मात्र, या मुदतीनंतर ठिबक सिंचनावरीलच ऊस शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणार आहे.' असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळासाठी जेजुरी दुसरा पर्याय गैरसोयीचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी खेड तालुक्यातून विरोध झाल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील दुसरा पर्याय निवडण्यात आला होता. मात्र, भौगोलिक रचना आणि दळणवळणाची गैरसोय यामुळे हा पर्याय मागे पडल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून देण्यात आली.
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा नऊ वर्षांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर विमानतळासाठी सुयोग्य जागेचा शोध घेण्यातच इतकी वर्षे गेली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजगुरुनगरजवळ (न्यू चाकण) हे विमानतळ होणार असल्याची घोषणा ट्विटरवर केली. इतकेच नव्हे तर या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाचे पथक येणार असल्याचेही स्पष्ट केले.
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रथम चाकण येथील जागा निवडण्यात आली. मात्र, या भागाचा औद्योगिक विकास होत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध केला. त्यामुळे ही जागा बदलून कोये-पाइटजवळ जाग पाहणी करण्यात आली. या जागेलाही शेतकऱ्यांचा विरोध झाल्याने 'सेझ'सह निमगाव-दावडी व केंदूरच्या जागेला पसंती देण्यात आली. मात्र, सेझमध्ये जमीन गेलेले शेतकरी व काही राजकीय पुढाऱ्यांनी त्याला नकारघंटा वाजविली. त्यामुळे विमानतळाची जागा पुन्हा बदलून खेडमधीलच कोये-पाइट-केंदूर-पाबळ, रौंदळवाडी येथील जमिनीचा प्रस्ताव करण्यात आला.
विमानतळाच्या पर्यायी जागांनाही विरोध होत असल्याने अखेर प्रशासनाने खेडमधूनच विमानतळ हलविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शिरूरमधील शिक्रापूर आणि दौंडलगतच्या चौफुला येथील जागांची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील जेजुरीचाही पर्याय पुढे आणला गेला. खेडमध्ये विमानतळ न झाल्यास जेजुरी हा दुसरा व चांगला पर्याय निश्चित करण्यात आला. परंतु भौगोलिक रचना, दळणवळणाच्या सोयी व अन्य सुविधांमुळे हा पर्याय मागे पडला. त्याऐवजी केंदूर-पाबळ-रौंदळवाडी येथील जागेला एअरपोर्ट अॅथोरिटीने विमानतळासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. या जागेचा अहवालही करण्यात आला. मात्र, काही तांत्रिक कारणांनी एअरपोर्ट अॅथोरिटीने त्याला हिरवा कंदिल दाखविला नाही, असेही या सूत्रांनी सांगितले. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीच विमानतळाच्या जागेचा प्रश्न सोडविला असून खेडमध्येच विमानतळ उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक कार्यक्रमांनी कृष्णजन्माचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पहाटेपासूनच सुरू झालेले धार्मिक कार्यक्रम, दुपारनंतर रंगलेली भजने, कीर्तनसंध्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आलेली रंगत... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच श्रीकृष्णाचा जन्म बुधवारी मध्यरात्री पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. शहरातील प्रमुख श्रीकृष्ण मंदिरांबरोबरच इस्कॉनच्या कॅम्प आणि कात्रजमधील मंदिरामध्ये दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गुरुवार पेठेतील माहेश्वरी मुरलीधऱ मंदिर, 'इस्कॉन'चे श्री श्री राधा कुंजबिहारी मंदिर आणि कात्रजमधील श्री श्री राधा वृंदावनचंद्र मंदिर यांसह शहरातील विविध मंदिरे फुलांनी आणि रोषणाईने सजविण्यात आली होती. संध्याकाळनंतर भक्तिगीतांच्या मैफलींमुळे मंदिरातील वातावरण भारावून गेले होते. मध्यरात्री बारापर्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. श्रीकृष्णजन्म मध्यरात्री होत असल्याने मंदिरे भाविकांसाठी खुली होती. पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
दरम्यान, 'इस्कॉन'च्या कात्रज येथील मंदिरामध्ये ७२ तासांचे अखंड कीर्तन सुरू आहे. आज, गुरुवारी सकाळी ८.३० वाजता राधेश्यामदास महाराज यांचे प्रवचन होणार आहे. संध्याकाळी शहरातील पंधरा हजार भाविक कृष्णाला अभिषेक करणार आहेत. संध्याकाळी महाप्रसादाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कृष्णलीलेवर आधारित नाटिका सादर करण्यात येणार आहे. याशिवाय संस्थेचे स्वयंसेवक विविध शाळांमधील पन्नास हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करणार आहेत, अशी माहिती 'इस्कॉन'चे प्रवक्ते आनंद मुरारी दास यांनी दिली.
....
पुस्तकहंडीचा अनोखा उपक्रम
अकबर-बिरबलापासून ते हॅरी पॉटरपर्यंत विविध पुस्तकांच्या खजिन्याने भरलेली पुस्तकहंडी फोडून बालगोविंदानी बुधवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली. ढोलताशांच्या तालावर ठेका धरून मुलांनी मुक्तपणे नृत्यही केले. विविध प्रकारची पुस्तके बघण्यात मुले हरवून गेली होती. निमित्त होते, शिवसाम्राज्य वाद्य पथक आणि देशप्रेमी मंडळातर्फे शहीद मेजर ताथवडे उद्यानामध्ये आयोजित केलेल्या पुस्तक हंडीचे. या वेळी दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, अ‍ॅड. किशोर शिंदे, अनुप साठ्ये, पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे उपस्थित होते. पथकातील वादकांनी पुणेकरांकडून गोळा केलेली पुस्तके अभिजात एज्युकेशन सोसायटीला भेट दिली. उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष होते. मंदार बलकवडे, अक्षय बलकवडे यांनी उपक्रमाचे संयोजन केले. 'दहीहंडीपेक्षा पुस्तक हंडी हा अभिनव उपक्रम असून यामुळे वाचनाचा अनमोल ठेवा नव्या पिढीला मिळत आहे. सध्याच्या तरुण पिढीसमोर अनेक प्रलोभने असून, ढोल-ताशाच्या माध्यमातून सामाजिक कार्याकडे तरुणाई वळत असल्याचे चित्र आशादायी आहे. भारताला महासत्ता म्हणून घडविण्यामध्ये तरुणाईचा मोठा वाटा असणार आहे. ढोल-ताशा पथकांकडून असे सामाजिक उपक्रम झाले पाहिजेत,' असे मत बर्गे यांनी व्यक्त केले. किशोर शिंदे, पराग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारभर मंडळांचा उत्सवात सहभाग

$
0
0

शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील १०१० मंडळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरांत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहराच्या मध्य भागातील दहीहंडी उत्सवाचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार असून, सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दहीहंडी उत्सवात हंडी फोडणाऱ्या पथकात १८ वर्षांखालील गोविंदाचा समावेश नसावा, दहीहंडी वीस फुटापेक्षा अधिक उंच नसावी, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या आदेशाचे प्रत्येक मंडळाने काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना स्थानिक पोलिस ठाण्यांकडून संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. उत्सवात कशाप्रकारची खबरदारी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री दहा नंतर ध्वनिक्षेपकाला बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित मंडळावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. आर पाटील यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लहान-मोठी अशी एकूण १०१० मंडळे दहीहंडीचा उत्सव साजरा करणार आहेत. यामध्ये २९ मंडळे पारंपारीक पध्दतीने मंदिरांमध्ये उत्सव साजरा करणार आहेत. शहरातील उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. सध्या उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी केली जात असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरूड, वारजे, कात्रज, बिबवेवाडी, हडपसर, येरवडा, औंध, पाषाण, पिंपरी-चिंचवड या भागात गोपाळ भक्तांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक विभागात स्थानिक पोलिसांसह विशेष शाखेकडून अधिक बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक विभागात ५० पुरुष आणि २० महिला पोलिस कर्मचारी, ६० होमगार्ड, १५ गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनीही तैनात करण्यात आली असून, त्यांचा बंदोबस्त विभाग क्रमांक दोन आणि चारमध्ये असणार आहे.

..

नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे

दहीहंडी उत्सावामध्ये १८ वर्षांखालील गोविंदाचा समावेश नसावा, दहीहंडी वीस फुटापेक्षा अधिक उंच नसावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण अहवाल निर्मितीला मंजुरी

$
0
0

नदीपात्रातील मेट्रोचे दुष्परिणाम तपासणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नदीपात्रातून जाणाऱ्या मेट्रोमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अहवाल तयार करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अहवाल तयार करण्यासाठी कंपनीच्या नेमणुकीला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी शहरात मेट्रो प्रकल्प राबविला जाणार आहे. मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर अहवाल महापालिकेने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन (डीएमआरसी) कडून तयार करून घेतला आहे. 'डीएमआरसी'ने यापूर्वी कर्वेरोड येथील सावरकर स्मारक ते काँग्रेस भवन हा जंगली महाराज रस्त्याऐवजी नदीपात्रातून मेट्रोचा मार्ग असावा, असा नवीन बदल केला आहे. नदीपात्रातून मेट्रो मार्ग प्रस्तावित केल्याने या विरोधात शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) धाव घेऊन याचिका दाखल केली. याचिकेवर सात जुलैला सुनावणी झाली. मात्र, लवादाने स्थगिती देण्यास नकार दिला. १२ ऑगस्टला पुन्हा सुनावणी झाली मात्र, निर्णय झाला नाही. या प्रकरणामध्ये महापालिकेला कागदपत्रे सादर करण्याचे आदेश लवादाने दिलेत. त्यावर २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. नदीपात्रातून प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत 'एन्व्हायर्न्मेंट इम्पॅक्ट अॅसेसमेंट रिपोर्ट' तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
अशा प्रकारचा अहवाल वेळेत तयार करण्याचे काम नोएडा येथील डॉ. एस. के. जैन, सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट केंद्राला देण्यात आले आहे. हा नकाशा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पर्यावरणाशी संबंधित दिलेल्या माहितीवरून तयार करणे, एन्व्हायर्न्मेंट मॅनेजमेंट प्लॅन तयार करणे आणि शिफारशी सुचवणे आदी कामे कंपनीवर सोपविण्यात आली आहेत. या कामासाठी कंपनीला सेवा कराव्यतिरिक्त सव्वातीन लाख रुपये शुल्क स्वरूपात देण्यात येणार आहेत. यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे स्थायीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मीटर’साठी महागडा संकल्प

$
0
0

जनजागृतीवर पालिका कोट्यवधी खर्चणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणेकरांना पाणी वापराची योग्य सवय लावण्यासाठी 'वॉटर मीटर'च्या जाहिराती आणि जनजागृतीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. होर्डिंग आणि बॅनरसह माध्यमांमध्ये दर आठवड्याला जाहिराती आणि शाळा-कॉलेजमध्ये रोड शो, पथनाट्य, शहराच्या विविध भागांत वॉर्ड सभा अशा स्वरूपात 'वॉटर मीटर'बद्दल जनजागृती करण्याचा महागडा संकल्प सोडण्यात आला आहे.
शहरात समान पाणीपुरवठ्यासाठी (२४ बाय ७) आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती अद्याप बाकी असताना, वॉटर मीटरवर कोट्यवधींची उधळण करण्याचा घाट घातला जात आहे. शहरात सुमारे सव्वा तीन लाख मीटर बसवण्यासाठी पाचशे कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. पाण्याचा मुबलक वापर करणाऱ्या पुणेकरांमध्ये मीटरद्वारे पाणी घेण्याची सवय रुजवण्यासाठी आणि सर्व स्तरांतील नागरिकांमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. येत्या दोन ऑक्टोबरपासून योजनेला प्रारंभ केला जाणार असल्याचे संकेत मिळत असल्याने त्यानंतर योजनेचे फायदे पुणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक मोठ्या स्वरूपात प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागांत सध्या 'मीटर वापरा' अशी होर्डिंग पालिकेने लावली आहेतच. आगामी काळात शहराच्या इतर भागांमध्येही त्याचा विस्तार केला जाणार आहे. त्याशिवाय, दर आठवड्याला टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांमध्ये जाहिराती, वॉटर मीटर बसविल्या जाणाऱ्या परिसरामध्ये बॅनर्स, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम, पथनाट्य, रोड-शो आणि विविध ठिकाणी वॉर्ड सभा अशा सर्व माध्यमातून वॉटर मीटरचे फायदे सर्व पुणेकरांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. २४ बाय ७ ची अंमलबजावणीची सर्व प्रक्रिया पुढील पाच वर्षांत पूर्ण करायची असल्याने या सर्व प्रचार-प्रसिद्धीचेही पुढील पाच वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
..............
पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
वॉटर मीटरची अंमलबजावणी पाच वर्षांत करण्यासाठी महापालिकेने त्याचे ठरावीक टप्पे आखले आहेत. त्या अंतर्गत पहिल्या वर्षी सर्व व्यावसायिकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर, त्यानंतर एकूण घरगुती ग्राहकांपैकी दरवर्षी २५ टक्के ग्राहकांच्या घरी मीटर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात मीटर बसल्यानंतर पुढील दहा वर्षे देखभाल-दुरुस्तीचे कामाचेही 'आउटसोर्सिंग' करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅलिफोर्नियाच्या आजी पुण्यात हरवतात तेव्हा...

$
0
0

मॉर्निंग वॉकसाठी गेल्या अन् रस्ता हरवून बसल्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणाऱ्या आणि अनिवासी भारतीय असणाऱ्या ७६ वर्षीय आजी पुण्यातील 'फॅमिली फ्रेंड'कडे राहण्यास आल्या आणि बुधवारी सकाळी चक्क हरवल्या. त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे सगळ्यांची पाचावर धारण बसली.

सॅलिसबरी पार्कमधून मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या आजींचा रस्त्याचा गोंधळ उडाल्याने त्या कॅम्पमधील सेंटर स्ट्रीट पोलिस चौकीत पोहोचल्या. आजींनी सांगितलेल्या एका नावाच्या आधारे पोलिसांनी त्यांचा पत्ता शोधला आणि घरच्यांचा जीव भांड्यात पडला. रुक्मिणी राजगोपालन (वय ७६, रा. कॅलिफोर्निया) असे हरवलेल्या आजींचे नाव आहे. त्या प्रथमच पुण्यात आल्या होत्या. सॅलिसबरी पार्कमधील 'फॅमिली फ्रेंड'कडे त्यांचा मुक्काम होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्या बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या. चालत चालत त्या कॅम्पमध्ये पोहोचल्या. तेथे आल्यानंतर परतीचा रस्ता सापडत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांची ही अवस्था पाहून स्थानिक नागरिकाने त्यांना लष्कर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेंटर स्ट्रीट पोलिस चौकीत नेले. तेथे पोलिसांनी त्यांच्याकडे माहिती विचारली. नाव आणि अमेरिकेतील ठिकाण या पलीकडे त्यांना फारसे काही सांगता आले नाही.
त्यांनी घराबाहेर पडताना मोबाइल, पर्स यापैकी काहीच बरोबर घेतले नव्हते. तसेच, आपण नेमके कोणाकडे राहात आहोत, हेदेखील त्यांना आठवेना. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सरकारी जीपमध्ये बसवून कॅम्पमध्ये फिरवले आणि काही आठवते आहे का अशी विचारणा केली. यावेळीही त्यांना घराचा रस्ता आठवला नाही. पुन्हा पोलिस चौकीत आल्यानंतर त्यांना चहा-बिस्कीट देण्यात आले. त्यानंतर आपण तनेजा नामक परिवाराकडे उतरल्याचे त्यांनी पोलिसांना ​सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी त्वरित एसटीडी बूथ गाठून टेलिफोन डिरेक्टरी आणली. सहायक निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी त्यातील तनेजा आडनावाचा शोध घेऊन त्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यातील एक कॉल सॅलिसबरी पार्कमधील लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) डॉ. वेदप्रकाश तनेजा यांना करण्यात आला. त्यावेळी ते घरी नव्हते. आपल्याकडे उतरलेल्या श्रीमती राजगोपालन हरवल्याची तक्रार देण्यासाठी ते नेमके स्वारगेट पोलिस ठाण्यात गेले होते. तेथून घरी आले असता, लष्कर पोलिस ठाण्यातून फोन आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी वेळ न दवडता सेंटर स्ट्रीट पोलिस चौकी गाठली. तेथे आजींना पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला.
..
आजींची मायदेशी रवानगी
डॉ. तनेजा रांची मिलिटरी हॉस्पिटलमध्ये असताना राजगोपालन तेथे नर्स म्हणून कार्यरत होत्या. ही घटना साधारणतः पन्नास वर्षांपूर्वीची आहे. एके दिवशी राजगोपालन डॉक्टरांना भेटल्या. आपल्याला अमेरिकेत नोकरीसाठी जायचे असल्याने तुम्ही शिफारस करावी, अशी विनंती त्यांनी केली. डॉ. तनेजा यांनी तशी शिफारस केल्याने राजगोपालन अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांनी पीएचडी केली. त्यानंतर त्या तेथेच स्थायिक झाल्या. त्यानंतर प्रथमच त्यांनी पुण्यात पाय ठेवला होता. या घटनेनंतर डॉ. तनेजा यांनी आजींची बुधवारी सायंकाळी कॅलिफोर्नियाला रवानगी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी फेरपरीक्षेचा निकाल वाढला

$
0
0

उत्तीर्णांसाठी प्रवेशप्रक्रियेची मुदत १० सप्टेंबरपर्यंत

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा प्रथमच झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल २७.०३ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या गेल्या दोन परीक्षांच्या तुलनेत जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल अधिक असल्याचे बोर्डाच्या आकडेवारीवरून लक्षात येते. फेरपरीक्षेतील उत्तीर्णांना पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश सहज घेता यावेत, यासाठी शिक्षणमंत्र्यांनी राज्यभरातील सर्व विद्यापीठांना प्रवेश प्रक्रियेची मुदत १० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचे आदेशही दिले आहेत.
शिक्षण खात्याने गेल्या वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमधील फेरपरीक्षेचे आयोजन केले होते. त्या पाठोपाठ यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही जुलैमध्येच फेरपरीक्षा आयोजित करण्याचा निर्णय खात्याने घेतला होता. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देता, त्यांना पुढील शिक्षणासाठी वेळीच योग्य संधी उपलब्ध करून देण्याचा दृष्टिकोन ठेवून हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार यंदा बारावीच्या मार्चच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ९ जुलै ते २९ जुलै या काळात फेरपरीक्षा घेण्यात आली. त्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून एकूण एक लाख २३ हजार १७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख २१ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३२ हजार ९२१ विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्याचे मंडळाने बुधवारी जाहीर केलेल्या निकालामध्ये स्पष्ट झाले. राज्याच्या पातळीवरील निकालाची एकूण टक्केवारी २७.०३ टक्के असल्याचेही मंडळाकडून सांगण्यात आले.
मंडळाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबर-ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत राज्याचा एकूण निकाल २६.७७ टक्के इतका होता. गेल्या वर्षी, सप्टेंबर- ऑक्टोबर २०१५ च्या परीक्षेसाठी हा निकाल २१.५९ टक्के इतका लागला होता. या दोन्ही निकालांच्या तुलनेत यंदा जुलैमध्येच झालेल्या परीक्षेचा एकत्रित निकाल वाढल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या विभागांच्या निकालामध्येही अशीच वाढ अनुभवायला मिळत आहे. त्याचवेळी मुंबई, अमरावती, लातूर आणि कोकण या विभागांचा एकत्रित निकाल मात्र गेल्या दोन ऑक्टोबरच्या परीक्षांच्या तुलनेत कमी वा जवळपास त्याच निकालांएवढा लागला असल्याचेही मंडळाची आकडेवारी सांगत आहे. या निकालानंतर गुणपडताळणी करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. तसेच, फोटोकॉपीसाठी अर्ज करण्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आल्याचेही मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
000
विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण हलका करून परीक्षा देण्यासाठी लगेचच संधी दिल्यास फायदा होऊ शकतो, हे या निकालातून स्पष्ट होत आहे. फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तीस हजारांवर विद्यार्थ्यांचे वर्ष वाचणे, ही शिक्षण खात्यासाठी महत्त्वाची बाब आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश मिळावा, म्हणून राज्यभरातील सर्व विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. सर्व विद्यापीठे त्या अनुषंगाने पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देतील.
विनोद तावडे, शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचारी धोरणाला एकमताने मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तयार केलेल्या 'पादचारी सुरक्षा धोरणाला' सर्वसाधारण सभेत बुधवारी एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पालिकेने धोरणाला अंतिम मंजुरी दिली. रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षा तसेच सुविधा देण्याचे या धोरणात निश्चित करण्यात आले असून, पालिकेबरोबरच वाहतूक पोलिसांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याचा पादचाऱ्यांना फटका बसत आहे. रस्ता ओलांडताना नियमानुसार जागा ठेवण्यात न आल्याने अडचणी येतात, पुरेशा प्रमाणात फूटपाथ उपलब्ध नसल्याने रहदारीच्या रस्त्याचा सर्रास वापर चालण्यासाठी केला जातो. यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यावर मार्ग काढण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पादचारी धोरण तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. यासाठी समिती स्थापन करून त्यांच्याकडून धोरण आखण्यात आले.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त, यांच्यासह शहरातील स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी प्रशांत इनामदार, रणजित गाडगीळ, प्रांजली देशपांडे यांचा या समितीत समावेश होता. या धोरणाच्या मसुद्यावर हरकती, सूचना मागवून आवश्यक त्या गोष्टींचा समावेश करुन पालिका आयुक्तांनी धोरण मुख्य सभेसमोर मान्यतेसाठी ठेवले होते.
पादचाऱ्याला प्राधान्यक्रम देऊन त्याच्या सुरक्षिततेसाठी काय केले पाहिजे, यावर धोरणात भर देण्यात आला आहे. पालिका प्रशासनाबरोबरच वाहतूक पोलिस आणि पादचाऱ्यांची जबाबदारी यामध्ये निश्चित करण्यात आली आहे. शहर सुधारणा समितीने मान्यता दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हे धोरण सर्वसाधारण सभेत ठेवले होते. त्याला सभेत एकमताने मंजुरी देण्यात आल्याने पुढील काळात याची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
..
धोरणातील महत्त्वाचे..
- किमान वेळेत रस्ता ओलांडता यावा, असे पादचारी मार्ग तयार करावेत.
- पादचाऱ्यांना सुरक्षितपणे थांबण्यासाठी पुरेशी जागा असावी.
- फूटपाथ असलेल्या अरुंद रस्त्यावर पार्किंगला परवानगी देऊ नये.
- पादचारी उड्डाणपुलाला लिफ्ट असावी.
- अंध व्यक्तींच्या मदतीसाठी सिग्नलमध्ये मोठ्या आवाजाचे बझर लावावेत. सिग्नल हिरव्या रंगाचा असेपर्यंत बझर वाजतील.
- काही वेळासाठी सर्वच सिग्नल लाल रंगाचे व्हावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीमंतांची चांदी; सामान्यांची परवड

$
0
0

मॉलमध्ये कमी दराने, तर रेशनवर महाग तूरडाळ उपलब्ध

म. टा. प्रतिनिधी, पुणे
श्रीमंत, गरीब यांच्यातील दरी कमी करण्याऐवजी उलट राज्य सरकार त्याला खतपाणी घालत असल्याचे तूरडाळीच्या विक्रीतून समोर आले आहे. श्रीमंतांना मॉलमध्ये स्वस्त दराने आणि गरिबांना रेशनवर महागड्या दराने तूरडाळीची विक्री करण्यात येत आहे.
उत्पन्नातील घट आणि साठेबाजी यामुळे तूरडाळीचे भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गेले वर्षभर हीच स्थिती असल्याने नागरिकांना स्वस्त दरात तूरडाळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेताना सरकारने श्रीमंतांना स्वस्त आणि गरिबांना महाग दराने डाळ दिली आहे. सरकारने फ्री सेलद्वारे मॉलमध्ये ९५ रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करून दिली. परंतु, हीच तूरडाळ रेशनवर १०३ रुपये दराने विकण्यात येत आहे.
दारिद्रय रेषेखालील म्हणजे वार्षिक पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कुटुंबे आणि अंत्योदय योजनेमधील विधवा, वृद्ध, भूमीहीन, अल्पभूधारक शेतकरी, विक्रेते, हमाल, कातकरी यांच्या कुटुंबांना सरकार सवलतीच्या दराने धान्य देते. याच कुटुंबांना श्रीमंतांना दिल्या जाणाऱ्या दरापेक्षा अधिक दराने तूरडाळ रेशनवर विकली जात आहे. पुणे शहर व जिल्ह्यात १ लाख ६१ हजार २५५ दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड आहेत. तसेच, अंत्योदय योजनेमधील ६४ हजार ६२२ रेशनकार्ड आहेत. त्यांच्यासाठी २ हजार २५५ क्विंटल तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तूरडाळीचा दर हा मॉलमधील दरापेक्षा आठ रुपयांनी अधिक आहे.
मॉलपेक्षा जादा दराने रेशनवर तूरडाळ विक्री होत असल्याने रेशन दुकानांकडे कोणीही न फिरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही तूरडाळ पडून राहण्याची शक्यता असल्याचे एका रेशन दुकानदाराने सांगितले. ग्रामीण भागात मात्र मॉल नाहीत. तेथे फ्री सेलची तूरडाळ नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब ग्राहकांना नाईलाजास्तव फ्री सेलपेक्षा महागड्या दराने तूरडाळ विकत घ्यावी लागणार आहे. या दरांमध्ये राज्य सरकारने समानता आणावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
..
ग्राहक पेठेत स्वस्त तूरडाळ
राज्य सरकारने फ्री सेलच्या माध्यमातून ९५ रुपये किलो दराने तूरडाळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या डाळीच्या विक्रीसाठी सरकारने प्रतिकिलो ७० पैसे एवढे कमिशन दिले आहे. ग्राहक पेठेने आगामी गणेशोत्सवाचा सण लक्षात घेऊन ही तूरडाळ ९३ रुपये किलो दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, साठा असेपर्यंतच या दराने विक्री होणार असल्याचे ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डाळ साठेबाजांवर कायद्याचा बडगा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तूरडाळीची साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कायद्याचा बडगा उगारण्यात येणार असून धान्यमाफियांनी जनतेची लूट केल्यास यापुढे सहन करण्यात येणार नाही, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिला.
मार्केट यार्ड आणि औंध येथील रिलायन्स मॉलमध्ये खुल्या बाजारामध्ये स्वस्त दरात तूरडाळ विक्रीचा प्रारंभ बापट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी साठेबाजांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी अन्नधान्य वितरण अधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी सोनाप्पा यमगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.

'तूरडाळ सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खाण्यातील आवश्यक घटक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात ती उपलब्ध करुन दिली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा,' असे आवाहन बापट यांनी केले. राज्यात गेल्या वर्षी तूरडाळीची उपलब्धता कमी होती. मालाची आवक व मागणीनुसारच बाजारातील दर ठरले जातात. परिणामी, तूरडाळ महाग विकली जात होती. या वर्षी आवक वाढविली आहे. त्यामुळे खुल्या बाजारामध्ये ९५ रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

तूरडाळीचा बेकायदा साठा कोणीही करू नये. काही ठरावीक व्यापारी, माफिया जनतेची पिळवणूक करतात. जनतेची लूट केल्यास यापुढे सहन करण्यात येणार नाही. अशा माफियांवर कायद्याचा बडगा उगारण्यात येईल, असा इशाराही बापट यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांसाहार शिकणे होणार ऐच्छिक

$
0
0

'हॉटेल मॅनेजमेंट'च्या अभ्यासक्रमात शाकाहारी पाककलेचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेण्यासाठी मांसाहार शिकण्याची बाब ऐच्छिक करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याने घेतला आहे. त्यानुसार खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट'च्या अभ्यासक्रमात यंदापासून पूर्ण शाकाहारी पाककलेचा अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे देशभरातील बड्या हॉटेल्समधून लवकरच शाकाहारी शेफने तयार केलेला पदार्थ उपलब्ध होण्याची शक्यता आहे.


देशभरात हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेण्यासाठी यापूर्वी मांसाहारी पदार्थांच्या पाककृती शिकणे सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे शाकाहारी असणारे अनेक विद्यार्थी नाईलाजाने या पदवीचा विचार सोडून देत होते. हीच बाब लक्षात घेऊन पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या चंद्रशेखर लुणिया यांनी हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण शाकाहारी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. हा पाठपुरावा यशस्वी झाल्याची माहिती त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 'हॉटेल असोसिएशन ऑफ इंडिया'चे मानद सचिव सुरेश तलेराही या वेळी उपस्थित होते.

लुणिया म्हणाले, 'हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात मांसाहार शिकण्याची सक्ती पूर्ण शाकाहारी कुटुंबातून पुढे येणाऱ्या आणि हा अभ्यासक्रम शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत होती. त्यामुळेच केवळ शाकाहारी पाककला शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी म्हणून चार वर्षांपासून हा पाठपुरावा सुरू ठेवला होता. चेंज डॉट ऑर्गच्या माध्यमातून ऑनलाइन याचिकाही दाखल केली होती. तसेच, सर्व खासदारांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना पत्रेही पाठविली होती. त्या आधारे आता शाकाहारी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.'


राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी या विषयीचे पत्र केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्याकडे पाठविले होते. त्यानुसार शर्मा यांनी पर्यटन मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या 'सेंट्रल इन्स्टिट्यूट्स ऑफ हॉटेल मॅनेजमेंट्स'ना आपल्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण शाकाहारी पाककलेचा पर्याय देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार यंदापासून गांधीनगर, भोपाळ आणि जयपूरमध्ये हा पर्याय उपलब्ध होणार आहे. उर्वरीत १८ संस्थांमध्येही पुढील वर्षीपासून हा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे मंत्रालयाकडून कळविण्यात आल्याचे लुणिया यांनी सांगितले. राज्यातही इतर संस्थांमधून हा पर्याय उपलब्ध होण्याविषयीचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणेकरांनी अनुभवल्या श्रावणसरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाच्या जोरदार सरींमधून मध्येच डोकावणाऱ्या सूर्यकिरणांच्या कवडशाचा अनुभव पुणेकरांनी बुधवारी दिवसभर घेतला. दिवसभरात पावसाच्या मध्यम सरींनी हजेरी लावली, तर काही वेळासाठी लख्ख ऊनही पडले. सायंकाळी साडेपाचपर्यंत तीन मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. पुढील दोन दिवसांत पावसाच्या एक-दोन हलक्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्री जोरदार हजेरी लावली. रात्री दहा-साडेदहानंतर पहाटेपर्यंत शहराच्या सर्व भागांत पाऊस झाला. सकाळी साडेआठपर्यंत ६.९ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली होती. त्यानंतर, पावसाने उघडीप दिली असली, तरी ढगाळ हवा कायम होती. दुपारी थोडावेळ ऊन पडल्यानंतर पुन्हा ढग दाटून आले आणि एकच्या सुमारास पुन्हा जोरदार सरींनी हजेरी लावली. सायंकाळपर्यंत पावसाच्या काही हलक्या सरी पडल्या. पुढील दोन दिवसांत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, पावसाच्या एक-दोन हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारित्र्य पडताळणी ऑनलाइन

$
0
0

पोलिस आयुक्तालयाचा गरजूंना दिलासा; लवकरच स्वतंत्र वेबपोर्टल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोकरी असो की अवयवरोपण आदी विविध कारणांसाठी पोलिसांकडून देण्यात येणारे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आता ऑनलाइन देण्यात येणार आहे. यामुळे पोलिस आयुक्तालयात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणाऱ्या रांगा यामुळे बंद होणार आहेत. पुढील पंधरा दिवसांत ही सुविधा नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या सुविधेचा फायदा दरवर्षी किमान ७० हजार नागरिकांना होणार आहे.

सरकारी कार्यालये, महानगरपालिका, बँका, खासगी नोकरी, परिवहन विभागामार्फत विविध परवाने मिळवणे, रिक्षा चालवण्याचा बॅच, मूल दत्तक घेणे, अवयवरोपण आदी विविध कारणांसाठी नागरिकांना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात दर वर्षी ६५ ते ७० हजार नागरिक हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी पोलिस आयु्क्तालयात गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर गरजूंचा त्रास वाचावा या साठी पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी ही सुविधा ऑनलाइन करण्यासाठी पावले उचलली. या सुविधेसाठी लवकरच स्वतंत्र वेबपोर्टल उपलब्ध करण्यात येणार आहे.

या वेबपोर्टलवर नागरिकांना चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. या अर्जासोबत अर्जदाराला कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. सध्या अर्जदाराला १०० रुपयांचा 'डिमांड ड्राफ्ट' काढून विशेष शाखेत जमा करावा लागतो. या वेबपोर्टलवर ऑनलाइन पैसे भरण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे. हा अर्ज तत्काळ पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखा तसेच अर्जदाराने निवडलेल्या पोलिस ठाण्याकडे जाईल. पोलिस ठाण्याकडून तत्काळ अर्जदाराशी संपर्क साधून त्यांना पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. पोलिस ठाण्यात अर्जदाराची पडताळणी झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच तो अर्ज विशेष शाखेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल.
विशेष शाखेकडून संबंधित अर्जदारावर कुठलाही गुन्हा दाखल नाही ना याची खातरजमा केल्यानंतर लगेचच अर्जदाराला प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल. हे प्रमाणपत्र अर्जदाराला ऑनलाइन स्वरुपात मिळेल, तसेच आवश्यकता भासल्यास अर्जदार पोलिस आयुक्तालयात येऊन प्रमाणपत्राची प्रत मिळवू शकतो. या ऑनलाइन सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे, तसेच पोलिस आयुक्तालयात चकरा मारण्याची आवश्यकता उरणार नाही. अर्ज नेमका कोणाकडे प्रलंबित आहे, याची माहितीही बसल्या जागी मिळणार आहे.
..
पंधरा दिवसांत कार्यरत
ही सुविधा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या वेबपोर्टलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पोलिस आयुक्तालयाच्या अर्ज पडताळणी शाखेत कम्पुटर बसवण्याचे कामही सुरू झाले आहे. पुढील पंधरा दिवसांत ही सुविधा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बैलगाडा शर्यत सुनावणीसाठी ज्येष्ठ वकील नेमावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दर वर्षी साजऱ्या होणाऱ्या गावजत्रा आणि उत्सवांमधील बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीसाठी राज्य सरकारने ज्येष्ठ वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

'सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार देशभरात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे; मात्र केंद्र सरकारने सात जानेवारी २०१६ रोजी अधिसूचना काढून पारंपरिक गावजत्रा आणि उत्सवांमध्ये बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती. या निर्णयाला प्राणिकल्याण मंडळ आणि प्राणिमित्रांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. त्यामुळे शर्यतीच्या परवानगीला पुन्हा स्थगिती मिळाली,' असे या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीमध्ये राज्य सरकारने आपले म्हणणे मांडावे, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. त्या संदर्भात राज्य सरकारनेही आपली बाजू प्रभावीपणे मांडली आहे. आता पुन्हा ३० ऑगस्टला अंतिम सुनावणी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ज्येष्ठ वकील नियुक्त करावा, अशी मागणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचा संदर्भ देऊन आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशाल यात्रेद्वारे चापेकरांचे स्मरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

क्रांतिवीर आणि पिंपरी-चिंचवडचे भूषण असलेल्या चापेकर बंधूंच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने चिंचवड गावातून नुकतीच मशाल यात्रा काढण्यात आली.

महिला मोर्चाच्या राज्याच्या प्रभारी आणि प्रदेश सचिव उमा खापरे आणि महिला शहराध्यक्षा शैला मोळक यांच्या नेतृत्वखालील यात्रेत क्रांतिवीर चापेकर बंधूंना अभिवादन करण्यात आले. या उपक्रमाला चापेकरवाड्यापासून प्रारंभ झाला, तर क्रांतिवीर चापेकर बंधू समूहशिल्पाजवळ समारोप झाला.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेल्या क्रांतिकारकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्याकरिता देशभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सगळीकडे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत मशाल यात्रा काढण्यात आली.

या उपक्रमात महिला मोर्चाच्या सरचिटणीस आशा काळे, शोभा भराडे, सारिका पवार, छाया पाटील, जयंती गायकवाड, मंडलाध्यक्षा भारती विनोदे, वैशाली मोरे, कविता करदास, गीता महेंद्रू, डॉ. तृप्ती परदेशी, सविता कर्पे, जयश्री लहेरिया, माधवी इमानदार, दीपाली धानेरकर, आशा आगविले, कल्पना गुळवे, केतकी इमानदार, सुवर्णा काटे, ज्योती रासने, पूजा सराफ, सविता पंडित, वर्षा साबळे, गौरी बुरसे, संजना नाईक, स्वरूपा मैंदर्गी यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणावळा, खंडाळ्यातील वाहतूक समस्या सोडवा

$
0
0

सर दार बारणेंची रावल यांच्याकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'मावळ तालुक्यातील लोणावळा आणि खंडाळा या पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी, वाहतुकीची समस्या मार्गी लावावी,' अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.

राज्याचे रस्ते विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बारणे यांनी रावल यांची भेट घेतली आणि पर्यटनाला चालना मिळण्यासंदर्भात चर्चा केली. बारणे म्हणाले, 'लोणावळा आणि खंडाळा या पर्यटनस्थळांना पुण्या-मुंबईबरोबरच राज्यातील असंख्य पर्यटक भेट देत असतात. पावसाळ्यात भुशी डॅमच्या धबधब्याचे मोठे आकर्षण असते. वाढती गर्दी, त्याचबरोबर सुट्ट्यांच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडीची समस्या यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून भुशी डॅमकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. त्याचा फटका लोणावळ्यातील लहानमोठ्या स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या सद्यस्थितीच्या अनुषंगाने काही व्यावसायिकांनी भेट घेऊन 'पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटकांना विविध सुखसोयी मिळाव्यात, वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढून दिलासा द्यावा,' अशी विनंती केली आहे.'

या मागणीची दखल घेऊन बारणे यांनी लोणावळा, खंडाळा, कार्ला-भाजे, राजमाची, तुंग, तिकोना आणि लोहगड किल्ला याबाबतीत पर्यटन विकास आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, अपुरे आणि अरुंद रस्ते, पार्किंग व्यवस्था आणि इतर सोयी-सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले. लोणावळा नगरपालिकेला आर्थिक मर्यादेमुळे सोयी पुरवणे शक्य होत नाही. भुशी डॅम आणि राजमाचीकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांबाबत तोडगा काढणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे पर्यटकही नाराज आहेत. त्याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

सदर भागांतील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यासमवेत बैठकही झाली. त्यात सूचना करण्यात आल्या. परंतु त्यावर ठोस तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे राज्य सरकारने लोणावळा आणि खंडाळा भागांतील पर्यटन विकास आराखडा तयार करण्यासाठी, तसेच निसर्गसौंदर्य अबाधित राखण्यासाठी, पर्यावरणाला होणारी हानी थांबवण्यासाठी प्राधान्याने विचार करावा, असे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पर्यटनाशी संबंधित विभागीय अधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, नगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याची मागणीही खासदार बारणे यांनी या वेळी केली.
...............
सोयी-सुविधांचे आश्वासन

'या संदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाईल. तसेच लोणावळा-खंडाळा, मावळ भागातील पर्यटनाला चालना देऊन पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातील,' असे आश्वासन रावल यांनी दिले. रस्ते विकास मंत्री शिंदे यांनीही 'लोणावळा परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी दौरा केला असून, लवकरच आराखडा तयार केला जाईल,' असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>