Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वर्गणीसाठी मारहाण करणारे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुरूवार पेठेतील गवरी आळी मंडळाच्या कार्यकर्त्यानी वर्गणीसाठी एकाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी मंडळाच्या चार कार्यकर्त्यांवर खडक पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
सचिन प्रकाश मायणे (वय ३८, रा. मार्केट यार्ड) आणि बाळासाहेब जगन्नाथ मायणे (वय ५४, रा. गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, इतरांचा शोध सुरू आहे. याबाबत विशाल सुरेंद्र नवगिरे (वय ३५, रा. गवरीआळी, गुरुवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायणे आणि त्याचे साथीदार रविवारी दुपारी गुरुवार पेठेत गणेशोत्सवासाठी वर्गणी मागत होते. नवगिरे यांच्या घरापुढे बसलेल्या दोन भाजीविक्रेत्या महिलांकडे त्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये वर्गणी मागितली. त्या वेळी मध्यस्थी करत नवगिरे यांनी 'या महिला गरीब आहेत, त्यांच्याकडे इतकी कशाला वर्गणी मागता', असे विचारले. त्यावरून मायणे याच्यासह चौघांनी नवगिरे यांना जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी भाजीविक्रेत्या महिलांकडील वजनकाटे आणि भाजी रस्त्यावर फेकून दिली. या प्रकाराबाबत नवगिरे हे पोलिसांकडे तक्रार करायला निघाले असता पुन्हा त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकारानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक एस. पी. देवकर हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सॅनिटरी नॅपकिनसाठी डिस्पोजेबल मशिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील शाळा, कॉलेज, होस्टेल येथे सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी 'डिस्पोजेबल मशीन' बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विद्यार्थिनींच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक याप्रमाणे पंधरा क्षेत्रीय कार्यालयात प्रायो‌गिक तत्वावर हे मशीन बसविले जाणार असून यासाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.
शहरातील शाळा, कॉलेज याबरोबर होस्टेलमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेडिंग आणि वापरलेले नॅपकिन नष्ट करण्यासाठी डिस्पोजेबल मशिन बसविणे आवश्यक आहे. या मशिनचा खर्च स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन शीर्षकाखाली दाखविण्यात‌ आला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही अनेक महिला सभासदांनी यावर मत व्यक्त करत अशा प्रकारची मशीन बसविण्याची जोरदार मागणी केली होती. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक याप्रमाणे शहरातील १५ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हे मशिन बसविण्यात येणार आहे. 'हिल लाइफकेअर लिमिटेड' यांनी हे मशिन बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. पंधरा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हे मशिन बसविण्यासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च येणार आहे. या कंपनीवर केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे हा खर्च करण्यास मान्यता द्यावी, असे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी समितीसमोर मांडलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सहकारी बँकेवर ताशेरे

$
0
0

राज्य सहकारी बँकेवर ताशेरे

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्याची शिखर बँक म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही आर्थिक संघिय संस्था म्हणून काम करण्यात अपयशी ठरत असल्याचे ताशेरे सहकार खात्याने ओढले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मदत करणे; तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याऐवजी ही बँक स्वतःचा विचार करत असल्याचा ठपकाही या बँकेवर ठेवण्यात आला आहे.
राज्याच्या सहकार खात्याच्या कारभाराचा सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आढावा घेऊन काही निरीक्षणे नोंदवली आहेत. याबाबतचा अहवाल त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना सादर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीवर तोशेरे ओढण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही आर्थिक सं​घिय संस्था आहे. या बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मदत केली पाहिजे. मात्र, राज्य सहकारी बँक ही स्वतःचाच विचार करत आहे. स्वतःच्या ठेवी, कर्जवाटप, कर्जवसुली याकडे लक्ष देण्यात येत आहे. या बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मदत करण्याची आवश्यकता आहे, असे अहवालात स्पष्ट केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना राज्य सहकारी बँकेकडे सक्तीने ठेवी ठेवाव्या लागतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या मजबूत होण्यासाठी राज्य सहकारी बँकेने त्यांना आकर्षक व्याजदर द्यावा, असे सुचवण्यात आले आहे.
'आरबीआय', 'नाबार्ड' आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यातील दुवा म्हणून राज्य सहकारी बँकेने काम केले पाहिजे; पण प्रत्यक्षात या बँकेकडून स्वतःचाच विचार करण्यात येत आहे. सध्या या बँकेवर प्रशासकीय मंडळ असून, त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
................
विविध कार्यकारी सोसायट्या मजबूत करा
विविध कार्यकारी सोसायट्यांचे कामकाज केवळ पीक कर्जवाटपापुरते मर्यादित आहे. त्यांनी विविध व्यवसायांना सहकार्य केले पाहिजे. ग्रामीण भागात व्यवसायवृद्धीसाठी विविध कार्यकारी सोसायट्या या मजबूत करणे अत्यावश्यक आहे. या सोसायट्यांनी एक तरी व्यवसाय करावा, असा आग्रह धरण्याची सूचना करण्यात आली आहे. विविध कार्यकारी सोसायट्या या ठेवी ठेऊ शकतात; तसेच कर्जवाटप करू शकतात. सोसायट्यांकडे हा अधिकार असला, तरी त्याचा वापर करण्यात येत नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
..................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवर गोळीबार करणारा रजपूत गजांआड

$
0
0

पोलिसांवर गोळीबार करणारा रजपूत गजांआड

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बडोदा येथे पुणे पोलिसांवर गोळीबार करणारा कुख्यात गजा मारणे टोळीचा गुंड सागर रजपूत याला पुणे पोलिसांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. त्याला कोर्टात हजर केले असता तीन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या दोघांना पुण्यात आणले असून, एका कर्मचाऱ्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.
घायवळ व मारणे टोळीतील पूर्ववैमनस्य आणि टोळीच्या वर्चस्वातून २९ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी घायवळ टोळीच्या अमोल हरी बधे (४०) याचा नवी पेठेतील कलावती मंदिराजवळ धारदार हत्याराने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात टोळीचा प्रमुख गजा मारणेसह इतरांना अटक केली होती. पण सागर रजपूत फरारी होता. तो बडोदा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे एक अधिकारी रणजित भोईटे व दिलीप मोरे त्याची माहिती काढण्यासाठी गेले होते. मात्र, त्याने या दोघांवर गोळीबार केला. यामध्ये मोरे यांची यांच्या पाठीत गोळी घुसून ती पोटापर्यंत गेली; तर भोईटे यांच्या पायाला गोळी लागली होती.
या प्रकरणी रजपूतवर बडोदा येथील नवापूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्या ठिकाणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर रविवारी त्याला पुणे पोलिसांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. कोर्टाने त्याला अधिक तपासासाठी तीन सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सागर रजपूतच्या गोळीबारात जखमी झालेले कर्मचारी दिलीप मोरे यांना सोमवारी पुण्यात आणण्यात आले आहे. त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे, तर जखमी अधिकारी रण‌जित भोईटे यांना हॉ‌‌‌स्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिला प्रभाग पुन्हा लोहगाव-धानोरीतूनम

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभागरचनेची सुरुवात लोहगाव, कळस-धानोरी परिसरातून होणार असून, शेवटचा प्रभाग कात्रज भागातील असणार आहे. भौगोलिक सलगता, लोकसंख्येची आटोपशीर व्याप्ती, वस्त्यांचे योग्य विभाजन आणि नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन प्रभागांची रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
निवडणूक आयोगाने गेल्या शनिवारी आगामी पालिका निवडणुकांसाठीचे प्रभाग रचनेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले. त्यापाठोपाठ सोमवारी प्रभाग रचना निश्चित करण्यासाठीचे सविस्तर निकष निवडणूक आयोगाने घालून दिले आहेत. या निकषांनुसारच प्रभाग रचनेचे प्रा-रूप मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रभाग रचनेची सुरुवात उत्तरेकडून करण्यात यावी. उत्तरेकडून ईशान्य दिशा, त्यानंतर पूर्व दिशा, पश्चिम दिशा आणि त्याचा शेवट दक्षिण दिशेला करावा, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यानुसार, शहराचा उत्तर भाग म्हणजे लोहगाव, कळस-धानोरी आणि परिसर या भागातून प्रभाग सुरू होईल. प्रभाग रचना करताना २०११ ची जनगणना विचारात घेऊन प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित करावी. प्रभागाची लोकसंख्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी-अधिक करण्यास मुभा देण्यात आली आहे. अपवादा‍त्मक परिस्थितीत प्रभागाची लोकसंख्या या कमाल किंवा किमान मर्यादेपेक्षा कमी-अधिक झाल्यास त्याची कारणमीमांसा करावी लागणार आहे.
प्रत्येक प्रभागामध्ये चार सदस्य निवडून द्यायचे आहेत. या प्रभागांची १ अ, १ ब, १ क आणि १ ड, अशी रचना असेल. प्रभागाच्या सीमारेषा या मोठे रस्ते, गल्ल्या, नाले, डोंगर, फ्लायओव्हर या मर्यादा विचारात घेऊन करण्यात याव्यात. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, वस्तीचे, चाळीचे विभाजन दोन प्रभागात होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना आयोगाने केल्या आहेत.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतील प्रभागांची सुरुवातही उत्तरेकडून (लोहगाव) येथून झाली होती. आता उत्तरेकडून ईशान्येला म्हणजेच खराडी आणि परिसरातील प्रभाग निश्चित करण्यात आले होते. तेथून, पूर्वेकडे म्हणजे औंध-बाणेर, बालेवाडी, कोथरूड या भागांतील प्रभाग निश्चित होतील. त्यानंतर, पश्चिमेकडे (हडपसर) सरकताना शहराच्या मध्यवस्तीतील प्रभागांची निश्चिती केली जाईल. प्रभाग रचनेचा शेवट दक्षिणेला करायचा असल्याने कोंढवा आणि कात्रजच्या परिसरात सर्वांत अखेरचा प्रभाग येईल, अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गणी, निधीसाठी तात्पुरता परवाना

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
धार्मिक कार्यक्रम व सामाजिक कारणासांठी वर्गणी आणि निधी गोळा करण्यासाठी विविध संस्थांना धर्मादाय आयुक्तांकडून तात्पुरता परवाना देण्यात येतो. या परवान्यासाठी नोंदणी या वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या धर्मदाय सह आयुक्तांनी दिली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या कलम ४१ (क) अंतर्गत धार्मिक कार्यक्रम व आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात परवानगी देण्यात येते. कार्यालयातील प्रशासन गतिमान व पारदर्शक होण्यासाठी या वर्षीपासून ऑनलाइन नोंदणी पद्धतीनेही परवानगी देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
नागरिकांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या www.charity.maharashtra.gov.in या वेबसाइटवर लॉगइन करावे. त्यानंतर रजिस्टर यूजरवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. तयार झालेल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉगइन करावे. मेनूमधील रजिस्टर अॅन इव्हेंट (४१ सी) यावर क्लिक करावे व आवश्यक ती माहिती भरून सबमिट करावे. त्यानंतर अर्जदारास ऑटो जनरेटेड क्रमांक मिळेल, असे आयुक्तालयाने पत्रकाद्वारे कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेमघर गळतीमुळे पाणीसाठ्यात कपात

$
0
0

पाणीसाठा एक ते दीड अब्ज घनफूट कमी करण्याच्या निर्णयाचा नागरिकांना फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गळतीमुळे टेमघर धरणात एक ते दीड अब्ज घनफूट कमी पाणीसाठा करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून या निर्णयाची शिक्षा पुणेकरांना भोगावी लागण्याची शक्यता आहे. पाणीसाठा कमी करण्यात येणार असल्याने पाणीवापराच्या वर्षभराच्या नियोजनात येणारी तूट शहर व ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यातील कपातीने भरून काढण्याचा जलसंपदा विभागाचा प्रयत्न राहणार आहे. सरकारी दिरंगाई आणि गैरकारभाराच्या या गळतीची शिक्षा शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी का भोगावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

निकृष्ट बांधकामामुळे टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. या धरणाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच भेट दिली आणि धरण सुरक्षेसाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. तसेच या धरणाच्या धोक्याची तीव्रता व सुरक्षितता याच्या तपासण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमली. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला दिला असून त्यात धरणाला धोका असल्याचे नमूद केले आहे. तसेच धरणामध्ये एक ते दीड टीएमसी कमी पाणीसाठा करण्याची सूचना केली आहे.

या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने टेमघर धरणात कमी पाणीसाठा करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणाची पाणीसाठवण पातळी ७०३.८० मीटर आहे. त्यात आता ६९५ मीटर पातळीपर्यंत पाणी साठविले जाणार आहे. याचाच अर्थ ३.७१ टीएमसी क्षमतेपेक्षा कमी म्हणजे अडीच टीएमसीपर्यंत पाणी साठविले जाणार आहे. धरणात सद्यस्थितीत ३.२७ टीएसी पाणी आहे. उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनुसार धरणात साठविलेले पाणी सोडावे लागणार आहे.

टेमघर धरणात एक ते दीड टीएमसी कमी पाणीसाठा झाल्यावर पाणीवापराच्या वर्षभराच्या नियोजनावर परिणाम होणार आहे. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी पुणे शहराचे पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यावर गदा येण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार धरणाला लगेचच मोठा धोका नाही. त्यामुळे १५ ऑक्टोबरनंतर टेमघर धरणातील पाण्याचा प्रथम वापर करता येईल. हा पाणीवापर झाल्यावर धरण रिते होईल. त्यानंतर धरणाच्या दुरुस्तीचेही काम करता येऊ शकते. मात्र, उच्चाधिकार समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली असल्याने नाइलाजास्तव हे साठविलेले पाणी सोडावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीसाठी मतदारनोंदणी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१७ची मतदारयादी ग्राह्य धरून मतदान घेण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. पालिका निवडणुकीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत मतदारनोंदणी मोहीम राबविण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडसह राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होत आहे. बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. आता या निवडणुकीसाठी मतदारयाद्या अद्ययावत करण्यापासून मतदारनोंदणी मोहीम राबविण्यापर्यंत आयोगाने सूचना दिल्या आहेत.

मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी नुकताच विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यानुषंगाने १५ सप्टेंबर रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात यावी, अशी सूचना आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. तसेच, महापालिका निवडणुकीत सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मतदारनोंदणी मोहीम राबविण्यात यावी. या नोंदणी अर्जांवर १६ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यात यावा आणि १५ डिसेंबरला विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयादी अतिम करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी १ जानेवारी ही अर्हता दिनांक कायम करून अंतिम मतदारयादी ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात यावी, असेही आयोगाने संबंधितांना कळविले आहे. ही मतदारयादी बिनचूक करण्यात यावी. तसेच, मतदार नोंदणीसाठी व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. जनजागृती व प्रसिद्धीअभावी पात्र मतदार नोंदणी अर्ज करू शकला नाही, तर त्यासाठी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची तंबीही आयोगाने दिली आहे. प्रसिद्धी व जनजागृतीचा खर्च महापालिकांनी त्यांच्या निधीतून करावा, असे आयोगाने बजावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणपती विसर्जनासाठी पालिकेतर्फे मोफत रसायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी हौदात गणेशमूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य दिल्यावर, यंदा महापालिकेतर्फे घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मोफत रसायन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अमोनियम बायकोर्बोनेट या रसायनात शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती ४८ तासांत विरघळतात, असा दावा पालिकेने केला असून, प्रत्येक कुटुंबाला दोन किलो अमोनियम देण्यात येणार असल्याचे महापौरांनी मंगळवारी जाहीर केले.

आगामी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने नदी आणि कॅनॉलमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष मोहीम घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्या अंतर्गत पुणेकरांसाठी १० टन अमोनिअम बायकार्बोनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे. या रसायनाचा वापर करून नागरिकांना घरच्या घरी बादलीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करणे शक्य होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला दोन किलोच्या पिशवीचे मोफत वितरण पालिकेतर्फे केले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीही यामध्ये दोन दिवसांत विरघळू शकतात, असा दावा केला जात आहे. या रसायनाच्या वापराचे प्रात्यक्षिक आज, बुधवारी सकाळी दहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे दाखवण्यात येणार आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहे मोफत

गणेशोत्सवाच्या कालावधीत शहराच्या विविध भागांतील सार्वजनिक स्वच्छतागृहे नागरिकांसाठी मोफत असावीत, अशा सूचना महापौर जगताप यांनी या बैठकीत केल्या. तसेच, जास्तीत जास्त ठिकाणी मोबाइल टॉयलेट्स उभारावे आणि स्वच्छतागृहांच्या साफसफाईवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.


नैसर्गिक नदी-नाल्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्याने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा प्रायोगिक स्वरूपात ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ठराविक स्वरूपात रसायन उपलब्ध करून दिले जाणार असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर ते नागरिकांना मिळेल.

सुरेश जगताप, सह-महापालिका आयुक्त, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडीचे थर घटणार

$
0
0

कोर्टाच्या आदेशाचा परिणाम होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोर्टाच्या आदेशानुसार दहीहंडीच्या उंचीवर २० फुटांची मर्यादा घालण्यात आल्याने यंदा शहरातील दहीहंडी उत्सवात गोविंदांचे थर नेहमीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशानुसार निर्बंध सर्व राज्यभर लागू होणार असले, तरी पुण्यातील हंडी पूर्वीपासून २० ते २५ फुटांच्या मर्यादेतच असते, असा दावा केला जात आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची माहिती दहीहंडी मंडळांना देण्यात येणार आहे. कोर्टाच्या आदेशाचे पालन करणे अपेक्षित आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली.

दहीहंडी फोडण्यासाठी रचल्या जाणाऱ्या गोविंदांच्या थरांवर कोर्टाने काही बंधने लादली आहेत. त्यानुसार २० फुटांची कमाल मर्यादा पाळावी लागणार आहे. तसेच १८ वर्षांखालील लहान मुलांना दहीहंडीत सहभागी होता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. पुण्यात सुवर्णयुग तरुण मंडळ, बाबू गेनू मंडळ, जिलब्या मारुती मंडळ यांची हंडी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सुवर्णयुग तरुण मंडळाची हंडी सर्वांत उशिरा फुटते. त्यासाठी किमान सहा ते सात थर रचले जातात, असा अनुभव आहे. कोर्टाच्या आदेशामुळे यंदा हंडी फोडणाऱ्या गोविंदांचे थर कदाचित चार ते पाचपर्यंतच मर्यादित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईच्या तुलनेत पुण्यातील हंड्या तुलनेने कमी उंचीवर लावल्या जातात. सजावटीसाठी सुरुवातीला त्या उंचावर असल्या, तरी नंतर त्यांची उंची कमी केली जाते. तसेच शहरात दहीहंडी फोडताना, कोणाला अपघात झाल्याची घटनाही घडलेली नाही. तरीही कोर्टाच्या आदेशाचा मान राखूनच दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाईल, अशी माहिती संयोजकांकडून दिली जात आहे.

............

'पुण्यातील हंड्या मर्यादेतच'

सुवर्णयुग तरुण मंडळाचे मार्गदर्शक आणि नगरसेवक हेमंत रासने म्हणाले, 'पहिला थर पाच फुटांचा असला, तरी हंडी फोडण्यासाठी तो वाकल्यानंतर त्याची उंची कमी होते. त्यावरील थरांचेही असेच असते. त्यामुळे २० फुटांच्या मर्यादेत तीन किंवा चारच थर रचता येतील, असे नाही, तर कदाचित त्यापेक्षा एखादा थर जास्त असू शकतो. पुण्यातील बहुतांश मंडळांकडून २० फुटांच्या मर्यादेमध्येच हंडी उभारली जाते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडीला अभिनेत्रींची भाऊगर्दी

$
0
0

मंडळांकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

पुढील वर्षी होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी वातावरण निर्माण करण्याकरिता दहीहंडी उत्सवाची संधी साधली जात आहे. इच्छुक मंडळींकडून येरवडा आणि उपनगरांत त्या दृष्टीने जोरदार तयारी चालू आहे. दहीहंडी उत्सवात नागरिकांची अधिकाधिक गर्दी होण्यासाठी अनेक बड्या मंडळांनी यंदा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील फक्त अभिनेत्रींना लाखो रुपयांची बिदागी देऊन पाचारण केले आहे.

धानोरीतील साई प्रतिष्ठान आणि खराडीतील श्री काळभैरवनाथ मंडळाने हंडी फोडणाऱ्या पथकाला ७,७७,७७७ रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून, मानसी नाईकला पाचारण केले आहे. साई प्रतिष्ठानने बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे यांना आमंत्रित केले आहे.

येरवड्यातील श्रीकृष्ण मंडळाच्या दहीहंडीला प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर उपस्थित राहणार असून, हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला ३,३३,३३३ रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे फ्लेक्स लावून जाहिरातबाजी केली आहे. चंदननगर मित्रमंडळाने हिंदी अभिनेत्री झरीन खान आणि मृणाल दुसानीस यांना आमंत्रण दिले आहे. विद्यानगर येथील अखिल विद्यानगर मंडळासाठी अभिनेत्री स्नेहा गरुड प्रमुख पाहुणी असणार आहे.

विमाननगरमधील तक्षशिला प्रतिष्ठानने अभिनेत्री शर्वरी जमेनीस आणि काजल जैन यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. अखिल पठारे महा प्रतिष्ठानने भार्गवी चिरमुलेला बोलावले आहे, तर वडगाव शेरीतील शिवसेनेचे विभागाध्यक्ष राजाभाऊ चौधरी यांनी हंडी फोडणाऱ्या पथकाला १,११,१११ रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणवर फ्लेक्सबाजी करण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे; मात्र प्रभागरचना अंतिम न झाल्याने अनेक जण केवळ मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे चित्र निर्माण करत आहेत.

पंधरा मिनिटांचे पाच लाख

बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी मंडळांच्या ठिकाणी पंधरा मिनिटे हजेरी लावण्यासाठी पाच लाख रुपये घेतले आहे; तर मराठी अभिनेत्रींनी एक ते तीन लाखांपर्यंतची बिदागी घेतली असल्याची माहिती एका मंडळाच्या पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडीसाठी व्हिडिओची क्लृप्ती

$
0
0

तरुणांना आकर्षित करण्यासाठी मंडळांकडून सेलेब्रिटींचे व्हिडिओ व्हायरल

Aditya.Tanawade@timesgroup.com

पुणे : आपल्या मंडळाच्या दहीहंडीसाठी तुडुंब गर्दी जमावी, यासाठी सेलिब्रेटींना बोलावण्याची क्रेझ काही नवीन नाही; पण यंदा मात्र दहीहंडी मंडळांनी प्रमोशनसाठी एक अनोखी क्लृप्ती वापरली आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी मंडळांच्या दहीहंडीला भेट देणार असलेल्या सेलेब्रिटींचे व्हिडिओ तयार करण्यात आले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. या नव्या क्लृप्तीची चर्चा शहरात सगळीकडे रंगली आहे.

गेल्या आठवड्यापासून विविध मंडळांनी तयार केलेले व्हिडिओ व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर अपलोड केले जात आहेत. या व्हिडिओमुळे कोणता सेलेब्रिटी कोणत्या मंडळाला भेट देणार हे समजणे सोपे झाले असून, स्वतः सेलेब्रिटीच या व्हिडिओद्वारे आवाहन करत असल्याने तरुण मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत.

मंडळाला भेट देणारा सेलेब्रिटी या व्हिडिओद्वारे स्वतः संवाद साधतो. मंडळाचे नाव, अध्यक्षांचे नाव घेऊन दहीहंडीच्या दिवशी सर्वांच्या भेटीला येणार असल्याचे तो सांगतो आणि तरुणांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही करतो. प्रमोशनसाठी आणि चर्चेत येण्यासाठी मंडळांनी हा प्रमोशनचा नवा फंडा यंदा वापरला आहे.

शहरात सध्या बॉलिवूडपेक्षा मराठी कलाकारांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहेत. त्यातही महिला सेलेब्रिटींची संख्या जास्त आहे. त्यात श्रृती मराठे, प्राजक्ता माळी, सुरुची अडारकर या सेलेब्रिटींचे व्हिडिओ सध्या शहरात सगळीकडे व्हायरल झाले आहेत. दहीहंडीच्या दिवशी या अभिनेत्री नेमक्या कोणत्या मंडळांना भेट देणार आहेत, हे सांगितले जात आहे. याशिवाय बॉलिवूडमधील तारकांचेही काही व्हिडिओ तयार करण्यात आले असून, तरुणांना दहीहंडीकडे आकर्षित करण्यासाठी वापरलेला हा फंडा मंडळांच्या पथ्यावर पडणार, असे चित्र दिसत आहे.

.............

दहीहंडीसाठी तरुणांची अधिक गर्दी व्हावी, यासाठी मंडळांनी हा नवा पायंडा पाडला आहे. दहीहंडीचे मंडळ त्याचे ठिकाण आणि वेळ याची माहिती व्हिडिओत देण्यात आली आहे. सोशल मीडियामुळे अशा व्हिडिओचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो आणि अधिकाधिक लोकांना संबंधित मंडळाची माहिती होत आहे.

- श्रृती मराठे, अभिनेत्री

...........
मंडळांच्या होर्डिंगवर सेलेब्रिटींचे फोटो असतात; मात्र त्यामुळे सेलेब्रिटी येणार हे तेवढ्या परिसरापुरते कळते. अशा व्हिडिओमुळे मात्र आम्ही कुठे येणार, हे संपूर्ण शहराला कळत आहे. त्यामुळे मंडळांना प्रसिद्धी मिळत आहे. दहीहंडीसाठीचा हा नवा फंडा तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोगी पडत आहे.

- प्राजक्ता माळी, अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध राज्यांत होणार चित्रपट संग्रहालये

$
0
0

माहिती-प्रसारण खात्याच्या सचिवांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवर (एनएफएआय) विविध राज्यांतील प्रमुख शहरांमध्ये राज्य चित्रपट संग्रहालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे सचिव अजय मित्तल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 'चित्रपट जतनाचे काम वाढावे, तसेच त्या-त्या राज्यातील चित्रपटांचा ठेवा जतन व्हावा, या उद्देशाने राज्याराज्यांमध्ये संग्रहालये सुरू करण्यात येतील. राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेसाठी २०२१पर्यंत सहाशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत,' असे मित्तल यांनी सांगितले.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहसचिव संजय मूर्ती, अतिरिक्त सचिव सुभाष शर्मा, चित्रपट दिग्दर्शक जहानू बरूआ, राजीव मल्होत्रा, चित्रपट विभागाचे महासंचालक मुकेश शर्मा, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, मोहिमेचे कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा आदी उपस्थित होते. बैठकीनंतर मित्तल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'चित्रपटांची संख्या वाढते आहे आणि देशात एकच चित्रपट संग्रहालय आहे. त्यामुळे चित्रपट जतन करणे अवघड जात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी संग्रहालयाचे काम सुरू करणार का,' असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मित्तल म्हणाले, 'चित्रपटांची उज्ज्वल परंपरा जतन करण्याचे काम या ठिकाणी होत असून, ते वाढवण्यासाठी आगामी काळात विविध राज्यांमध्ये चित्रपट संग्रहालये सुरू करण्यात येणार आहेत. कर्नाटक व केरळ राज्य सरकारकडून यासाठी प्रस्ताव आला असून, संग्रहालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक व तांत्रिक मदत करील.'

'संग्रहालयामध्ये एक लाख ३२ हजार रिळे असून, चित्रपटाशी संबंधित हजारो वस्तू आहेत. चित्रपटांचा आवाका पाहता, हा ठेवा जतन करण्याचे काम एका ठिकाणी होणार नाही. ज्या राज्य सरकारांना इच्छा आहे, त्यांना मदत करण्यात येईल. तसेच या कामामध्ये शैक्षणिक संस्था व उद्योगजगताची मदत घेण्यात येईल,' असेही मित्तल म्हणाले.

.................

चित्रपट व चित्रपटाशी संबंधित ठेवा जतन करणे हे नव्हे, तर तो ठेवा लोकांपुढे नेणे हे चित्रपट संग्रहालयाचे अंतिम उद्दिष्ट आहे. देशात, तसेच जगात भारतीय चित्रपटांशी संबंधित वस्तू पडून आहेत. या वस्तू संग्रहालयात आणणे, त्या जतन करणे व लोकांसाठी खुल्या करणे अशा प्रकारचे काम यापुढे होत राहील. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर करार करण्यात येणार आहेत.

- अजय मित्तल, सचिव, माहिती प्रसारण मंत्रालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात सप्टेंबरमध्ये ‘लिटररी फेस्टिव्हल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांना इंग्रजी साहित्याचा आस्वाद घेता यावा, तसेच देशभरातील इंग्रजी भाषेतील नामवंत लेखकांशी संवाद साधता यावा, या उद्देशाने 'पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले असून, दोन ते चार सप्टेंबर दरम्यान यशदा येथे तो होणार आहे.

या संमेलनात इंग्रजी साहित्यप्रेमींना साहित्याचे विविध प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. दोन सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजता प्रसिद्ध उद्योजक व 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हलच्या आयोजिका डॉ. मंजिरी प्रभू यांनी केली. 'एमआयटी'च्या मिटसॉम कॉलेजचे प्राचार्य प्रा. रविकुमार चिटणीस, विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या संचालिका तृप्ती अगरवाल, सबीना संघवी, बिपिनचंद्र चौगुले, लीना प्रभू आदी या वेळी उपस्थित होते.

महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून फ्रँकफर्ट बुक फेअर, साल्सबर्ग ग्लोबल सेमिनार, युनिसेफ आणि सेव्ह द चिल्ड्रन यांचे सहकार्य फेस्टिव्हलला मिळणार लाभणार आहे. फेस्टिव्हलमध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर, लेखिका शोभा डे, राजदीप सरदेसाई, अनुपम खेर, अश्विन संघी, प्रसून जोशी, अमेरिकेच्या आर्चीज कॉमिक्सच्या सहकार्यकारी अधिकारी नॅन्सी सिल्बरक्लाइट, रवि सुब्रह्मण्यम, जावेद हबीब, आर्शिया सत्तार, अविरूक सेन, कैलाश सुरेंद्रनाथ यांसारख्या दिग्गजांची व्याख्याने ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

'देशभरात दर वर्षी सुमारे ७०हून अधिक लिटररी फेस्टिव्हल होत असतात; मात्र पुण्यात हक्काचा असा एकही फेस्टिव्हल नव्हता. पुण्यासारख्या समृद्ध शहरात असा लिटररी फेस्टिव्हल व्हावा या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलला सुरुवात करण्यात आली. प्रसिद्ध लेखकांशी पुस्तकप्रेमींचा थेट संवाद होऊन वाचनसंस्कृती समृद्ध व्हावी, असा मुख्य उद्देश त्यामागे असतो,' असे डॉ. प्रभू म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती नोंदणीची लगबग

$
0
0

'पीओपी'सोबत शाडू मातीच्या मूर्तींनाही मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणरायाच्या आगमनाला आता पंधरा दिवसांपेक्षाही कमी दिवस राहिल्याने उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी, खरेदी व ऑनलाइन खरेदी उत्साहात सुरू आहे.

गणेशोत्सव जवळ आल्याने चौकाचौकांत गणेशमूर्तींचे स्टॉल लागले आहेत. गेल्या काही वर्षांत नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत सजगता वाढली आहे. त्यामुळे शाडू मातीची मूर्ती घेण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. त्याच वेळी 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस'च्याही विविध वेशभूषेतील मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. या मूर्तींना पसंती मिळत असल्याची माहिती व्यावसायिकांनी 'मटा'ला दिली.

'जयगणेश आर्ट'चे सचिन डाखवे म्हणाले, 'गेल्या वर्षीपेक्षा यंदा १५ टक्के भाववाढ झाली आहे. पुण्यात नागपंचमीला आम्ही मूर्तींची नोंदणी सुरू करतो. आतापर्यंत तीनशेहून अधिक मूर्तींची नोंदणी झाली आहे. शाडू व पीओपी या दोन्ही प्रकारांतील मूर्तींना मागणी आहे. मोठ्या व वेगळ्या प्रकारच्या मूर्तींची खास मागणी नागरिकांकडून होत आहे. घरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 'श्रीं'ची तीन फुटांची मूर्ती घेण्याकडे लोकांचा कल आहे. यंदा तुळशीबाग गणपतीच्या मूर्तीची जोरात चर्चा असून, लालबाग, फेटावाला, गुरुजी तालीम, पेशवाई अशा विविध स्वरूपातील 'श्रीं'च्या मूर्तींना पसंती मिळत आहे.'

शाडू मातीचे व पेणच्या गणेशमूर्तींचे व्यापारी शाम वडके यांनी सांगितले, 'पाऊस चांगला झाला असला, तरी बाजारपेठेत महागाई जाणवत आहे; मात्र महागाईचा परिणाम मूर्तींच्या आगाऊ नोंदणीवर झालेला नाही. गेल्या वर्षी दोनशे रुपयांना विकलेली मूर्ती यंदा तीनशे रुपयांच्या पुढे असेल. भाववाढ असली तरी नोंदणी जोरात सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राखीव निधीकडे दुर्लक्ष

$
0
0

'ढिम्म' प्रशासन जबाबदार असल्याची टीका

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

अनुसूचित जाती, जमाती आणि भटक्या जमाती यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमध्ये वर्ग करण्यात येणारा राखीव निधी पूर्णपणे खर्च होत नसल्याची बाब आकडेवारीवरून दिसून येत आहे. या ढिम्म कारभाराला प्रशासन जबाबदार असल्याची टीका मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

या संदर्भात सभेमध्ये सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी प्रश्न विचारले होते. त्या संदर्भातील चर्चेच्या तासामध्ये प्रशासकीय कारभाराबात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी पालिकेच्या वार्षिक बजेटमध्ये किती टक्के निधी राखून ठेवणे बंधनकारक आहे? त्या अनुषंगाने किती खर्च झाला? किती शिल्लक राहिला? शिल्लक निधीचे काय केले, असे प्रश्नांचे स्वरूप होते.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार पालिकेच्या बजेटमध्ये मागासवर्गीयांसाठी पाच टक्के राखीव निधी ठेवणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट करून प्रशासनाने गेल्या दहा वर्षांतील आकडेवारी सादर केली. तसेच २०१६-१७च्या बजेटमध्ये पाच टक्केप्रमाणे ३४ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु ३४ कोटी ३१ लाख रुपयांची तरतूद केली असून, तफावतीची ६५ लाख रुपयांची तरतूद सुधारित बजेटमध्ये वाढवून देण्यात येईल, असे नमूद केले. या लेखी माहितीमुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे शेंडगे, सावळे आणि तानाजी खाडे यांनी प्रशासनावर टीका करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. 'जबाबदार अधिकाऱ्यांवर 'अॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल का करू नये,' असा प्रश्न उपस्थित केला.

मोठ्या प्रमाणावर तरतूद असताना मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर अपेक्षित प्रमाणात खर्च होत नाही. त्यामुळे आर्थिक अनुशेष मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. सदरचा शिल्लक निधी पुढील वर्षी त्याच विभागावर वर्ग होणे अपेक्षित असताना तसे घडत नाही. त्यामुळे या निधीबाबत दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात आली. तरतूद केलेली रक्कम त्याच कारणांसाठी खर्च होणे अपेक्षित आहे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

'पीएमपीएमएल'वरही टीका

प्रश्नोत्तरापूर्वी बस खरेदीच्या विविध टप्प्यांवर 'पीएमपीएमएल'ला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात यावेत, या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यामध्ये 'पीएमपीएमएल'च्या कारभाराबाबत बहुतांशी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पूर्वीप्रमाणे पीसीएमटी आणि पीएमटीचा कारभार विभक्त करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यानंतर काही सदस्यांचा विरोध नोंदवून आणि शहरासाठी 'पीएमपीएमएल'च्या अधिकाऱ्यांना शहरात स्वतंत्र अधिकारी, कार्यालय नियुक्त करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकत करवाढीस सदस्यांचा विरोध

$
0
0

घरभाड्यापेक्षा मिळकत कर अधिक असल्याचा प्रकार उघडकीस
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कँन्टोन्मेंटमधील रहिवाशांना मिळकत कर वाढविण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला बोर्डाच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला. त्यावर पूर्वीच्याच कराची रचना पुन्हा नव्याने आखण्यात यावी, तसेच कर वाढविण्यात येऊ नये अशी मागणी बोर्डाच्या सदस्यांनी केली.
पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रहिवाशांच्या मालमत्तेवर भाडेकरू, व्यावसायिक तसेच निवासी अशा तीन टप्प्यात कर आकारण्यात येतो. त्या संदर्भात बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार यांनी मिळकत कर वाढविण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला. त्या वेळी बोर्डाचे सदस्य अतुल गायकवाड, किरण मंत्री, अशोक पवार, विनोद मथुरावाला, विवेक यादव, प्रियंका यादव या सदस्यांनी तीव्र विरोध केला.
'पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागारेड्डी यांनी चुकीच्या पद्धतीने मिळकत कर आकारला होता. तो करच मुळात रहिवाशांना घराच्या भाड्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आहे. टप्प्याटप्प्याने मिळकत कर वाढविणे अपेक्षित आहे. एकदम कर वाढविण्यात येऊ नये,' असे अतुल गायकवाड म्हणाले. 'महापालिकेच्या हद्दीत घर खरेदी करताना जेवढा कर भरावा लागतो, त्यापेक्षा अधिक बोर्डाच्या हद्दीतील रहिवाशांना द्यावा लागत आहे,' याकडे विवेक यादव यांनी लक्ष वेधले. मिळकत कर पाच टक्क्यांपेक्षा अधिक वाढविला जाऊ नये. पण पूर्वीचाच कर अतिरिक्त बोजा आहे. सध्या करातून उत्पन्न चांगले मिळत असून २०२० पर्यंत मिळकत कर न वाढविण्याचा बोर्डाने निर्णय घ्यावा, अशी मागणी सदस्य अशोक पवार यांनी केली.
बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भाडेकरूच अधिक आहेत. त्यांना घरमालकाला द्याव्या लागणाऱ्या भाड्याच्या रकमेपोटी कराची रकमेचा अधिक बोजा आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणखी ओझे नको, अशी मागणी किरण मंत्री यांनी केली.
'बोर्डाच्या सदस्यांनी करवाढीस विरोध दर्शविल्याने त्यांच्या भावना आपण विचारात घेऊ. तसेच बोर्डाच्या हद्दीत किती मिळकतीमध्ये भाडेकरू तसेच घरमालक स्वतः राहतात याची शहानिशा केली जाईल. तसेच घरभाड्यापेक्षा किती प्रमाणात कर वसूल केला जातो याची खात्री केली जाईल. या सर्वांचे मूल्यांकन केल्यानंतर भाडेकरूंची संख्या अधिक असल्यास त्यांच्या संदर्भात कराचा निर्णय वेगळा घेता येईल का याबाबत विचार केली जाईल,' असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार यांनी सभेत स्पष्ट केले. 'घरमालक, भाडेकरू यांच्या कराचे मूल्यमापन केल्यानंतरच करवाढीचा निर्णय घेऊ. परंतु, भविष्यात कर वाढवावा लागेल हे निश्चित आहे,' असे बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीसाठी स्वतंत्र विद्युत विभाग

$
0
0

ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील अनियमित वीजपुरवठ्याचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या भोसरी विभागाचे विभाजन करून स्वतंत्र एमआयडीसी विद्युत विभागाची निर्मिती करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक परिसरातील वीज समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मुंबईत बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. बावनकुळे यांनी 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'च्या माध्यमातून पुण्याचे प्रभारी मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, भोसरीचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांच्याशी संवाद साधला.

बैठकीबाबत माहिती देताना आमदार लांडगे म्हणाले, 'औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात वीजसमस्या आहे. त्यामुळे उद्योजक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे; मात्र 'महावितरण'चे अधिकारी आणि कर्मचारी वीजसमस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. या परिसरातील 'महावितरण'च्या पायाभूत सुविधा जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या ओव्हरहेड वायर तुटून किंवा कमी क्षमतेच्या ट्रान्स्फॉर्मरवर जादा भार दिल्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. तसेच डीपी आणि फीडर बॉक्सची झाकणे चोरीला गेली आहेत. डीपी धोकायदायक स्थितीत उघडे आहेत. त्या संदर्भातील तक्रारींचे निराकरण वेळेत होणे आवश्यक आहे.'

उद्योजकांना थकित वीजबिल दोन किंवा तीन हप्त्यांमध्ये भरण्याची परवानगी द्यावी, 'महावितरण'च्या कर्मचाऱ्यांना वेळेत दुरुस्ती साहित्य उपलब्ध व्हावे, वीजचोरीला आळा बसावा, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

'भोसरी गाव आणि भोसरी एमआयडीसी यांचा विद्युत पुरवठा वेगळा करावा; त्याबातचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून जिल्हा विकास नियोजन आराखड्यातून निधी उपलब्ध करून द्यावा; 'बीव्हीजी' कंपनीकडून अपूर्ण राहिलेली कामे त्वरित पूर्ण करावीत; देवी इंद्रायणी उपकेंद्राचे काम त्वरित पूर्ण करावे; लघुउद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मासिक बैठक घेऊन समस्या दूर कराव्यात; मोरेवस्ती येथील अतिउच्चदाब धोकादायक टॉवरचे काम पूर्ण करावे,' अशा सूचना बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि तुटलेला हात पुन्हा काम करू लागला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

प्रेस कटर मशिनमध्ये हात गेल्याने एका व्यक्तीच्या हाताचा तळव्यापासून पुढील भाग कापला गेला होता. त्याच्यावर चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वी झाली, अशी माहिती हॉस्पिटलतर्फे पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

योगेश वारंगे (३४) दहा मार्च रोजी चिंचवडगावातील मोरया प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होते. त्या दिवशी प्रेसला सुटी असल्याने ते एकटेच प्रेसमध्ये होते. प्रेस कटर मशिनवर काम करत असताना त्यांचा हात अचानक कटरखाली आला आणि तळव्यापासून पुढील भाग कापला गेला. या घटनेची माहिती त्यांनी फोन करून सुपरवायझरला दिली आणि ते बेशुद्ध पडले. कंपनीचे मालक तिथे आले आणि त्यांनी हाताचा तुटलेला भाग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन आणि योगेश यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातानंतर ९० मिनिटांत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया आठ तास सुरू होती.

हॉस्पिटलचे डॉक्टर सुशील कुलकर्णी, डॉ. शौनक सुळे, डॉ. निखिल अगरखेडकर, डॉ. प्रवीण जाधव यांच्या टीमने केलेले हे ऑपरेशन यशस्वी झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून योगेशवर हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना हाताची पूर्ण हालचाल करता येत असून, रोजचे काम व्यवस्थित करता येते आहे, असे हॉस्पिटलने कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाना पेठेत आढळलेल्या मृतदहाचे गूढ उकलले

$
0
0

उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून खून
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नाना पेठेतील अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. हातउसने घेतलेले पैसे मागत असल्यामुळे दोन साडूंनी मिळून हा खून केल्याचे समोर आले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी समर्थ पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिासांनी दोघांना अटक केली आहे.
अशोक मोहन गुणगे (३२, रा. डोकी तालीम मागे, नाना पेठ) आणि कुमार नागेंद्रे तोरगल (३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत गणेश पांडुरंग पोटे (३७, रा. धनगरवाडा, नाना पेठ) यांचा खून झाला होता. सोमवारी सकाळी नाना पेठेतील मच्छी मार्केट येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पोटे यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. पोटे यांच्या नातेवाइकांनी मृतदेह ओळखल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील व सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समर्थ पोलिस व गुन्हे शाखा युनिट तीनकडून समांतर तपास सुरू होता. गुन्हे शाखा युनिट तीनचे कर्मचारी महेश पवार यांना गणेश पोटे यांचा खून त्यांचा साडू अशोक गुणगे आणि तोरगल यांनी केल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुणगेला ताब्यात घेऊन चौकशी केली.
गणेश पोटे याच्याकडून गुणगे याने व्यावसायासाठी चार लाख रुपये घेतले होते. तो ते पैसे परत मागत होता. त्यामुळे गुणगेने पोटे याचा खून करण्याचे ठरवले. २० ऑगस्ट रोजी गुणगेने पोटे यांच्या पत्नीला फोन केला. तसेच हातउसने घेतलेल्या रक्कमेपैकी २० हजार रुपये पोटे देतो, असे सांगितले. विद्या पोटेंनी आम्ही गावाला आलो आहोत. तेव्हा तुम्ही २० हजार रुपये पोटे यांना द्या, असे सांगितले. गुणगेने पोटे यांना अल्पना टॉकीज जवळ बोलाविले. त्यानंतर गुणगे आणि पोटे हे रात्री १० वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी फिरले, आणि त्यांनी मद्यपान केले. रात्री गुणगे, पोटे आणि तोरगल हे नाना पेठेतील नागझरी परिसरातील मासेआळी येथे आले. या वेळी गुणगे यांनी पोटे यांना मारहाण केली आणि त्यांचा गळा दाबून खून केला. रात्री उशीर झाल्याने गुणगे आणि तोरगल यांनी पोटे यांचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. ही घटना उघडकीस येईल या भीतीने २२ ऑगस्टच्या पहाटे गुणगे आणि तोरगल यांनी पोटे यांचा मृतदेह पेटवून दिला. पोटे करसल्लागार म्हणून काम करीत होते, तर आरोपी गुणगे आणि तोरगल हे इस्टेट एजंट होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, कर्मचारी अनिल भोसले, शिवाजी राहीगुडे, संदीप तळेकर, संदीप राठोड, अतुल साठे, राजू रासगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images