Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तूर डाळ आता ९५ रुपये किलो

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात वाढलेले तूर डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने उचलेल्या पावलांमुळे नागरिकांना पुण्यात येत्या सोमवारपासून ९५ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे तूर डाळ मिळणार आहे. ही तूर डाळ नागरिकांना सोमवारपासून शहरात दहा ठिकाणी उपलब्ध होईल.

प्रत्येक व्यक्तीला एक किलो याप्रमाणे तूर डाळीची विक्री होणार आहे. मार्केट यार्डातील व्यापारी राजेंद्र भाटिया यांच्याकडे शुक्रवारी या दहा टन तूर डाळीची आवक झाली आहे. मध्यंतरी राज्यात तूर डाळीचे भाव किलोमागे २०० रुपयांपर्यत पोहोचले होते. हे भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, यश मिळत नव्हते. त्यामुळे सामान्य नागरिकांना चढ्या दरानेच तूर डाळ खरेदी करावी लागत होती. आता ९५ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे तूर डाळ मिळणार असल्याने नागरिकांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्मार्ट सिटी’चा भार पुन्हा पालिकेवर?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीचे बरेचसे काम सध्या पालिकेच्याच विविध विभागांमार्फत सुरू असताना, आता त्यामध्ये कदाचित आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'साठी (पीएससीडीसी) महापालिकेच्या दक्षता आणि लेखापरीक्षण विभागाचे साह्य घेणाचा प्रस्ताव कंपनीच्या आज, शनिवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटीमध्ये निवड झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. कंपनीमार्फत सर्व काम केले जाणे अपेक्षित असताना, बहुतांश कामांचा भार महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच उचलावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेतील प्रत्येक विभागप्रमुखाला देण्यात आली होती. आता तर, पालिकेच्या दक्षता आणि लेखापरीक्षण विभागाची मदत घेण्याचा रीतसर प्रस्तावच कंपनीच्या संचालक मंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

कंपनीमध्ये पालिकेचे पदाधिकारी संचालक म्हणून कार्यरत असले, तरी पालिकेच्या यंत्रणेवर त्याची कोणतीही जबाबदारी टाकली जाणार नाही, असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते. तरीही, स्मार्ट सिटीच्या कंपनीकडून सातत्याने पालिकेच्या सर्व यंत्रणांचा वापर केला जात आहे. महापालिकेचा चार हजार कोटी रुपयांचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची प्रमुख जबाबदारी लेखापरीक्षण विभागाकडे असतानाच, आता त्यांच्यावर स्मार्ट सिटीचा अतिरिक्त भार पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच, महापालिकेतील धोरणात्मक निर्णय घेताना, महापालिका आयुक्तांना योग्य माहिती देण्याचे काम दक्षता विभागामार्फत चालते. परंतु, आता स्मार्ट सिटीच्या कामात त्यांना गुंतवण्यात आले, तर पालिकेच्या दैनंदिन कारभारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने स्मार्ट सिटी योजनेचे दोन वर्षांचे अनुदान कंपनीच्या खात्यात जमा केले असल्याने, महापालिकेनेही दोन वर्षांचे शंभर कोटी रुपयांचे अनुदान तातडीने जमा करावे, असा प्रस्तावही संचालक मंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेक्कन परिसरात मध्यरात्री लूटमार

0
0

चौघा चोरट्यांनी मारहाण करून तिघांना लुटले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काम संपवून घरी निघालेल्या तीन व्यक्तींना शहरातील मध्यवर्ती भागात लुटल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेल्या चौघा चोरट्यांनी दमदाटी आणि मारहाण करून या तिघांना लुटले. बालभारती, लॉ कॉलेज रोडवरील फिल्म इन्स्टिट्यूट आणि गरवारे कॉलेजजवळ हे प्रकार घडले.

या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रसन्नजित रॉय (२१, रा. जनवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून चार व्यक्तींच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडलेल्या तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रॉय गुरुवारी रात्री काम संपवून मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. सेनापती बापट रस्त्यावरील बालभारतीजवळ दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. त्यांनी रॉय आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या जवळची रोख रक्कम आणि मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटसमोर गणेश पाटील (२२, रा. एरंडवणा) यांना अडवले. त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडील रोख अठराशे रुपये, तीन मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यांना शिवीगाळ करून हे टोळके गरवारे कॉलेजच्या दिशने गेले. एरंडवणा येथे राहणारी एक २२ वर्षीय तरुणी मैत्रिणीबरोबर जेवून गरवारे कॉलेजवळून घरी जात होती. त्यांनी या तरुणीलादेखील अडवले. तिला धमकावून तिच्याजवळील पर्स हिसकावून घेतली. या पर्समध्ये रोख रक्कम, मोबाइल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे होती.' पोलिस उपनिरीक्षक ए. एम. खरात अधिक तपास करत आहेत.

'सुरक्षित शहर' या लौकिकावर प्रश्नचिन्ह

बालभारती, फिल्म इन्स्टिट्यूट, प्रभात रोड अशा रात्रीही वर्दळ असणाऱ्या परिसरात झालेल्या लूटमारीच्या घटनांमुळे घबराट पसरली आहे. पुण्यात मध्यरात्रीही मुली दुचाकीवरून एकट्या फिरू शकतात, असा या शहराचा लौकिक सांगितला जातो; मात्र त्याला तडा जाणाऱ्या घटना गेल्या काही काळात घडल्या आहेत. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या चोरीच्या तीन घटनांपैकी एका घटनेत तरुणीला लुटल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा या लौकिकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरे तर पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येते; मात्र ती प्रभावहीन ठरत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वेळा पाणी कधीपासून?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद (क्युसेक) वेगाने पाणी सोडले जात असताना पुणेकरांना मात्र दोन वेळा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. उजनी धरणात साठ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्यावर पुणे शहराला पुरेसे पाणी देण्याच्या आश्वासनाचा विसर पालकमंत्री गिरीश बापट यांना पडला आहे.

उजनी धरणामध्ये मागील आठवड्यातच ३३.०१ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ६१.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार यंदा खडकवासला प्रकल्पातून उजनीत पाणी सोडण्याचे बंधन आता राहिलेले नाही. तसेच खडकवासला प्रकल्पातून मुठा नदीत सध्या २४४८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी थेट उजनीत जात आहे. त्यामुळे हे पाणी आता पुणेकरांना मिळाले पाहिजे अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात धरणातून सोडले जाणारे हे पाणी शहराच्या वापरातही धरले जात नाही. शहराला हे वाहून जाणारे पाणी मिळाल्यास दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. शहराला पुरेसे पाणी देण्याबाबत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पुण्यात अकरा महिने पाणीकपात केली गेली. यंदा पावसाने कृपादृष्टी दाखवल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत पुरेसा पाणीसाठा झाला; मात्र श्रेयाच्या राजकारणावरून पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय लांबवला गेला. अखेर सहा ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय घेताना शहराला प्रति दिन ११५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याची सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला केली; मात्र शहराला दररोज किमान १२५० एमएलडी पाणी देण्यात यावे अशी आग्रही मागणी महापौर व विरोधी पक्षनेत्यांनी केली.

...म्हणून मागणीला जोर

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार, खडकवासला प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आणि उजनी धरणात किमान ६० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला नाही, तर खडकवासला धरणातून उजनीत समन्यायी पाणीवाटप तत्त्वावर पाणी सोडणे बंधनकारक असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. त्यानंतर शहराला दररोज १२०० एमएलडी पाणी देण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. दोन वेळा पाणीपुरवठ्यासाठी १२५० एमएलडी पाण्याची गरज भासते; मात्र ५० एमएलडी पाणी कमी मिळाल्याने शहराला एकदाच पाणी देण्यात येत आहे. उजनीत साठ टक्के साठा झाल्याने पुण्यात दोन वेळा पाणीपुरवठा व्हावा, या मागणीला जोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयआयटी’नेही करावे मूल्यमापन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'कॉलेजांचे आणि विद्यापीठांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने होण्यासाठी 'नॅक'सोबत 'आयआयटी', 'आयआयएम'सारख्या संस्थांनी त्यांचे मूल्यमापन करून त्यांना मान्यता (अॅक्रिडिटेशन) देण्याचे काम करावे, असा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि मूल्यमापन पद्धतीतील गैरप्रकार थांबतील,' अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

जावडेकर म्हणाले, 'देशात ३८ हजार कॉलेज आणि ७०० विद्यापीठांचे असून त्यांचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी ही नॅशनल अॅसेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिलवर (नॅक) आहे. 'नॅक'ची क्षमता ही दर वर्षी सुमारे एक हजार कॉलेज आणि काही विद्यापीठांचे मूल्यमापन करण्याची असून, त्याद्वारे त्या कॉलेजांचा दर्जा ठरविला जातो. त्यामुळे 'नॅक'ला त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी सुमारे ३८ वर्षे लागतील. हा विचार लक्षात घेऊन नॅकसोबतच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सारख्या (आयआयएम) संस्थांनी मूल्यमापन करावे व त्यांचा दर्जा ठरवावा.तसेच त्यांना अॅक्रिडिटेशन देण्याचे काम करावे, असा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे.' 'याबाबत बैठक नुकतीच घेण्यात आली असून, या संस्थांना अॅक्रिडिटेशनचे काम करणाऱ्या संस्था होण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. कॉलेजांच्या आणि विद्यापीठांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठीच आयआयटी, 'आयआयएम'सारख्या केवळ सरकारी संस्थांचा विचार करण्यात येत आहे. खासगी संस्थांना अॅक्रिडिटेशनचे काम देण्यात येणार नाही,' असेही त्यांनी सांगितले.

'देशात आणि पुण्यात परदेशी विद्यार्थी शिकण्याचे प्रमाण भरपूर आहे. ते आणखी वाढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांना होणारा त्रास यावर अभ्यास करून मार्ग काढण्याच्या सूचना तज्ज्ञांना आणि विभागाला दिल्या आहेत.याबाबत येत्या काही दिवसात निर्णय किंला योजना सांगण्यात येईल,' असेही जावडेकर यांनी सांगितले.

देशातील इंजिनीअरिंग कॉलेजची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळेच या वर्षी इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या देशात सुमारे आठ लाख जागा रिक्त राहणार आहेत. आतापर्यत देशातील ६०० इंजिनीअरिंग कॉलेज बंद पडले आहेत. इंजिनीअरिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे व शाश्वत शिक्षण दिल्यास तसेच विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन केल्यास रोजगारनिर्मिती होऊ शकते, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा जनता ‘वॉश आउट’ करेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंदर्भात आणि देशात व राज्यात सुरू असलेल्या अत्याचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्पीकआउट' करून 'वर्कआउट' करावे, अन्यथा जनता त्यांना 'वॉशआउट' करेल,' असा इशारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) शनिवारी दिला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण होऊनही अजूनही मारेकऱ्यांचा तपास लागू शकलेला नाही, याच्या निषेधार्थ दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त साधून 'अंनिस'तर्फे निषेध यात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी 'अंनिस'तर्फे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी संघटनेची भूमिका मांडली. या वेळी कामगार नेते बाबा आढाव, माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे,भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, भाई वैद्य, मनीषा गुप्ता, सुभाष वारे, शमसुद्दीन तांबोळी, संजय दाभाडे, मुक्ता दाभोलकर आदी उपस्थित होते.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत जातीयवादी व्यवस्थेपासून लोकशाही स्वतंत्र करायला हवी, तसेच केवळ निवेदनांना पोच देण्याचे काम सरकारने न करता त्वरित हत्येचे मारेकरी शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दाभोलकरांची हत्या झालेल्या विठ्ठल रामजी शिंदे पूलापासून ते साने गुरूजी स्मारकापर्यंत निषेध यात्रा काढण्यात आली. बाबा आढाव यांनी या यात्रेचे नेतृत्व केले. दाभोलकरांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. सरकारला अनेकदा निवेदने दिली, निषेध केला, उपोषण केले पण सरकारची दिरंगाई सुरूच आहे. हे असेच सुरू राहिले तर सविनय कायदेभंगाचा वापर करावा लागेल, असे बाबा आढाव यांनी यात्रेतील कार्यकर्त्यांना संबोधताना सांगितले.

अशोक धिवरे म्हणाले, 'जी व्यवस्था डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करत आहे, त्या व्यवस्थेला धर्माबद्दल, विचारांबद्दल, संस्कृतीबद्दल किती अभ्यास आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. हा अभ्यास करण्याची त्यांची क्षमता असल्याचे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे समाजशिक्षणावर भर दिला गेला पाहिजे. लोकांना त्यांना कळेल अशा शब्दांमध्ये विवेकवाद शिकवावा लागेल तेव्हा कुठे अशा घटना थांबतील.'

'पुरोगामी नेत्यांच्या हत्येसंबंधी सरकार कुणाला तरी पकडेल, पण खरे आरोपी पकडणार नाही. सरकार त्यांच्या कार्यकर्त्यांना हात लावणार नाही. त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे,' असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

भाई वैद्य म्हणाले, 'धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था असली पाहिजे हे सामान्य नागरिकांनी आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ठासून सांगितले पाहिजे. संघासारख्या संघटना घटना बदलू पहात आहेत. अनेक तोंडांनी ते राज्यघटनेवर वार करत असतात. त्यांचा दाखवायचा अजेंडा वेगळा असतो. सरकारने केलेली सबका साथ सबका विकास ही घोषणा म्हणजे जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. सरकार आणि संघाच्या छुप्या अजेंड्याला पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला पाहिजे.'

विद्या बाळ म्हणाल्या, 'डॉ दाभोलकरांची हत्या ही त्यांचे कुटुंबीय किंवा अंनिसच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी राहिली नाही. तर या घटनेने सामान्य माणसाला देखील अस्वस्थ केले. आणि त्यातून चळवळीला वेग आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अंनिस अधिक जोमाने काम करत आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांचा स्मृतिदिन साजरा व्हायला हवा.'

'पुरोगामी चळवळीतील समविचारी संघटनांनी उभारलेला लढा, हा केवळ दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी नाही तर लोकशाहीचे स्वातंत्र्य टिकवण्याबरोबरच असंघटित शेतकऱ्यांचे हित मांडण्याचा लढा आहे. दुर्दैवाने नागरिकांनी लोकशाही पद्धतीने अतिशय उथळ आणि नौटंकीबाज सरकार निवडून दिले आहे. त्यामुळे हा लढा अधिक तीव्र पद्धतीने लढण्याची गरज आहे.' असे सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी सांगितले.

आरोपी माहिती असूनही कारवाईस दिरंगाई

डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती असल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले आहे. परंतु तरी देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, आरोपी हातात असूनही त्यांना कोणतीही शिक्षा होत नाही. राज्यसरकार जाणूनबुजून या खटल्यात दिरंगाई करत आहे, असा आरोप या वेळी 'अंनिस'कडून करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचना कार्यक्रम निश्चित

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून प्रभाग रचनेचा प्रस्ताव येत्या ९ सप्टेंबरपर्यंत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि २९७ पंचायत समितींची पंचवार्षिक निवडणूक मार्च २०१७ मध्ये होणार आहे. ही निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करून घेण्याची सूचनाही आयोगाने केली आहे. त्यामुळे या निवडणुकासाठी जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांची नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. या प्रभाग रचनेचे काम पूर्ण करून त्याचा प्रारूप प्रस्ताव संबंधित विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यासाठी ९ सप्टेंबरची मुदत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रभाग रचनांचा प्रारूप प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित विभागीय आयुक्तांनी २३ सप्टेंबरपर्यंत त्यास मान्यता द्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इतर मागासवर्ग, महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती यांचे आरक्षण निश्चित करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणांची सोडत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ५ ऑक्टोबर रोजी तर पंचायत समितीच्या आरक्षणांची सोडत तहसीलदार स्तरावर १० ऑक्टोबरला जाहीर करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेची अधिसूचना १० ऑक्टोबरलाच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सूचना देण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. या मुदतीत आलेल्या हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना व आरक्षणे २५ नोव्हेंबरला जाहीर केली जाणार आहेत.

हरकती मागवल्या

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इतर मागासवर्ग, महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती यांचे आरक्षण निश्चित करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणांची सोडत ५ ऑक्टोबर रोजी तर पंचायत समितीच्या आरक्षणांची सोडत तहसीलदार स्तरावर १० ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. त्यावर हरकती व सूचना देण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. या मुदतीत आलेल्या हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना व आरक्षणे २५ नोव्हेंबरला जाहीर केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदनामीच्या मुद्द्यावर गदारोळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि त्या संदर्भातील आंदोलनांमुळे पिंपरी-चिंचवडची बदनामी होत असल्याचा दावा करून, सर्वसाधारण सभेत शनिवारी गदारोळ झाला. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलेल्या खुलाशानंतर सभागृह शांत झाले.

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात महापालिकेतर्फे दिंडीप्रमुखांना वाटप करण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत आणि प्रस्तावित गॅस शवदाहिनीप्रकरणी भ्रष्टाचार होत असल्याचे मुद्दे प्रकर्षाने समोर आले. त्यावरून विरोधी पक्षांनी आंदोलनही केले. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या.

कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पालिकेची आणि लोकप्रतिनिधींची बदनामी होत आहे. त्याबाबत प्रशासनाने योग्य खुलासा करावा, अशी मागणी करून आर. एस. कुमार यांनी चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर शमीम पठाण, तानाजी खाडे, सुरेश म्हेत्रे आणि योगेश बहल यांनीही प्रशासनाकडे खुलाशाचा आग्रह धरला. निविदा प्रक्रिया प्रशासन राबवते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहक बदनाम होतो. निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय स्टंटबाजीचेही प्रकार होतात. त्याकडे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. कोणी चुकीचे वागत असल्यास योग्य कारवाई झालीच पाहिजे; मात्र नाहक बदनामी सहन करणार नाही, असा इशाराच या सदस्यांनी दिला.

स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर प्रस्ताव येण्यापूर्वी त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी असते. त्यांनी खातरजमा केल्यानंतरच स्वाक्षरी करायला हवी. भ्रष्टाचाराचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडू नये. केवळ कोणीतरी सांगितले आणि आरोप केले म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तुम्ही कोणत्या उद्देशाने येथे आला आहात, अशी शंका नारायण बहिरवाडे यांनी आयुक्तांच्या संदर्भात उपस्थित केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाच्या कारभाराला आव्हान दिले आहे, असा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या, 'कथित भ्रष्टाचार प्रकरणांबाबत आयुक्तांनी मौन सोडून बोलले पाहिजे. आरोपांबाबत चौकशी करताना संबंधितांची नार्को टेस्ट करावी. कोणाला डोळ्यासमोर ठेवून टेंडर काढत असल्यास चुकीचे आहे. प्रशासनाने योग्य खुलासा करावा.'

सीमा सावळे म्हणाल्या, 'दिल्लीमध्ये सहा गॅस शवदाहिन्या बसवण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च झाला. आपल्याकडे पाच गॅस शवदाहिन्यांसाठी दहा कोटी रुपये खर्च कशासाठी? प्रस्ताव सादर करण्यापूर्वी दरांबाबत तुलनात्मक आढावा घेणे आवश्यक होते. तसे झाले नाही. त्यामुळे दोषींवर फौजदारी दाखल होणे आवश्यक आहे.'

खुलासा करताना आयुक्त वाघमारे म्हणाले, 'या दोन्ही प्रकरणांबाबत प्रशासनाने ई-टेंडरिंग प्रक्रिया राबवली. त्यानुसार निविदा उघडण्यात आल्या. दरांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यानंतर टेंडर कमिटी, विभागप्रमुख, मुख्य लेखापाल यांच्याकडून प्रवास केल्यानंतर मंजुरीसाठी फाइल माझ्याकडे आली. त्या वेळी या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाला, अनियमितता आढळली. कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा फेरनिविदा मागवा, अशा प्रकारचा कसलाही शेरा मारलेला नाही. दिवसभरात निविदांच्या ३५ ते ४० फाइल्स माझ्याकडे येतात. त्याचा प्रत्येक कागद तपासत बसल्यास कामेच ठप्प होतील. तरीही तक्रारीनंतर चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य कार्यवाही केली जाईल. दोषींवर प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करू.' आयुक्त खुलासा करत असताना बाबासाहेब धुमाळ आणि तानाजी खाडे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. सभागृहात गोंधळ उडाला. त्यामुळे खुलासा करण्यासाठी उभे राहिलेल्या आयुक्तांना खुर्चीवर खाली बसावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नियमनमुक्तीसाठी पवारांना साकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भुसार बाजारातील नियमनमुक्तीचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना साकडे घातले आहे. त्यानुसार पवार यांनी थेट सहकारमंत्र्यांशी संपर्क साधून येत्या गुरुवारी पुण्यात व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

राज्य सरकारने नियमनमुक्तीचा अध्यादेश काढल्यामुळे बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतमाल नियमनमुक्त झाला आहे. या निर्णयाला राज्यभरातील व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. नियमनमुक्तीचा केवळ बाजार समितीच्या आवाराबाहेर न करता ती आवारातही करावी किंवा हा निर्णय रद्द करावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. भाजीपाला विभाग व भुसारमधील व्यापारी प्रश्न वेगळे आहेत. त्यासाठी एकच नियम लावून निर्णय घेणे योग्य नाही. त्यामुळे याचा फेरविचार होण्याची गरज असल्याचे व्यापाऱ्यांनी नेमलेल्या समितीसमोर म्हणणे मांडले आहे. मात्र, याबाबत सहकार मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. पूना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, राजेंद्र गुगळे व अजित सेठिया यांचा त्यामध्ये समावेश होता. 'नियमनमुक्तीचा निर्णय रद्द करावा ही व्यापाऱ्यांची मुख्य मागणी आहे. शरद पवार यांच्याकडे व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे मांडण्यात आले.

गुरुवारी बैठक

नियमनमुक्तीचा निर्णय रद्द करावा ही व्यापाऱ्यांची मुख्य मागणी आहे. शरद पवार यांच्याकडे व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे मांडण्यात आले. त्याचवेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. त्यानुसार गुरुवारी (२५ ऑगस्ट) पुण्यात बैठकीचे आयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डर, आर्किटेक्टची नोंदणी रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बालेवाडी येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी संबधित बिल्डर, आर्किटेक्ट यांच्यासह स्ट्रक्चरल इंजिनीअर यांची पालिकेकडे असलेली नोंदणी रद्द करण्यात आली आहे. या सर्वांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ‌‌दिले आहेत.

बालेवाडीतील पार्क एक्स्प्रेस या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांचा बळी गेला होता. या दुर्घटनेप्रकरणी प्राइड पर्पल प्रॉपर्टीजचे भागीदार आणि विकासक अरविंद जैन, श्रवण आगरवाल, श्यामकांत वाणी, कैलास वाणी, आर्किटेक्ट आयडीया अँड इमेजेसचे प्रदीप कोसुंबीकर आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर हंसलाल पारेख यांची महापालिकेकडे असलेली नोंदणी रद्द करण्यात आली आहे. या सर्वांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे महापालिकेने शनिवारी जाहीर केले; तसेच त्यांच्या पुढील कोणत्याही बांधकाम प्रस्तावांना महापालिका परवानगी देणार नसल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले. प्राइड पर्पल प्रॉपर्टीजच्या महापालिका हद्दीतील अन्य दोन कामांना काम थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे. बांधकाम सुरू असताना विकासक, आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईशी संपर्क साधण्यात आला आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ही संघटना त्यांचे धोरण महापालिकेला सादर करणार आहेत, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

नियमावलीसंबंधी उद्या बैठक

बालेवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकाम, बांधकाम साइटवर काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षितता याबाबत नियमावली तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी येत्या सोमवारी (२२ ऑगस्ट) नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बैठक बोलाविली आहे. या बैठकीसाठी पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

बालेवाडी स्लॅब प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस इमारतीच्या चौदाव्या मजल्याचा स्लॅब कोसळून नऊ कामगारांच्या मृत्यू झाल्याप्रकरणी आर्किटेक्चर प्रदीप जनार्दन कोसुंबकर यांनी कोर्टात दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.

याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी भावीन हर्षद शहा (वय ३४, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा), संतोष सोपान चव्हाण (३५ रा. विवेकनगर, आकुर्डी), ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण (३५, रा. नवी सांगवी), श्रीकांत किसन पवार (४४ रा. कात्रज), मीग्रांक या कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रमुख महेंद्र सदानंद कामत (४१, रा. बावधन) या पाच जणांना अटक केली आहे.

शहा हे कॉन्ट्रॅक्टर इनचार्ज आहेत, तर संतोष आणि ज्ञानेश्वर हे साइड इनचार्ज आहेत. पवार हे या ठिकाणी नोकरी करत आहेत. अरविंद प्रेमचंद जैन (४४ रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), श्रवण देवकीनंदन अगरवाल (४५, रा. पाषाण), श्यामकांत जगन्नाथ वाणी-शेंडे (रा. शिवाजीनगर) आणि कैलास बाबूलाल वाणी (रा. एरंडवणे) या बांधकाम व्यावसायिकांचा अटकपूर्व जामीन यापूर्वी कोर्टाने फेटाळला आहे. त्यानंतर कोसुंबकर यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जाला प्रमुख जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी विरोध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा परिषदा, नगर परिषदा; तसेच महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही, याचा निर्णय काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी घेतील, त्याला प्रदेश काँग्रेस पाठींबा देईल, असे विधानपरिषदेचे उपसभापती आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

उपसभापतिपदी निवड झाल्यानंतर ठाकरे पहिल्यांदाच पुण्यात आले होते. याचे औचित्य साधून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांचा सत्कार केला. उपमहापौर मुकारी अलगुडे, आमदार शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, चंद्रकांत छाजेड, मोहन जोशी, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी उपमहापौर आबा बागूल, बाळासाहेब शिवरकर या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक पातळीवरील आघाडीचा निर्णय स्थानिक नेते, पदाधिकारी घेतील, असे त्यांनी सांगितले.

वेगळ्या विदर्भाबाबत अद्यापही केंद्रीय काँग्रेस कमिटीने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे त्यावर सध्या बोलता येणार नाही. केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी राज्य विधीमंडळाचे अधिवेशन एक सप्टेंबरच्या आसपास होण्याची शक्यता आहे. जीएसटीबाबत काँग्रेसची भूमिका नक्की काय असावी, यासाठी या बैठकीपूर्वी पक्षाचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम पक्षाची भूमिका मुंबईत एका कार्यशाळेत मांडणार आहेत. त्याला खासदार, आमदार, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'उपसभापतिपद मिळाले असले, तरी विधीमंडळाच्या बाहेर काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अधिकाधिक कसे वाढेल, यावर आपला भर असेल,' असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवी पुजारी टोळीतील गुंडाला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात रवी पुजारी टोळीतील सराईत गुन्हेगार सादिक इब्राहिम बंगाली (वय ३९, रा. लोणावळा) व त्याच्या साथीदाराला मोठ्या शस्त्रसाठ्यासह स्वारगेट बसस्थानक परिसरातून शनिवारी अटक करण्यात आली. त्याच्यांकडून एक कार्बाईन, पाच पिस्तुल आणि ६९ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या शस्त्रास्त्रसाठा पुण्यात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

रिहान रफिक सय्यद (वय २३, रा. रेल्वे क्वार्टर चाळ, लोणावळा) असे साथीदाराचे नाव आहे. बंगाली सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणला होता, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली.

बंगाली साथीदारासह शस्त्रांची विक्री करण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात परिसरात येणार असल्याची माहिती स्वारगेट पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी संतोष क्षीरसागर यांना शनिवारी मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव बाबर यांच्या पथकाने स्थानकाच्या गेटवर सापळा रचला. बंगाली आणि सय्यद हे काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून बसस्थानकात प्रवेश करीत असताना पोलिसांनी त्यांना अडविले. बॅगेत सुतारकामाचे साहित्य असल्याचे सांगितले. त्यामध्ये एक कार्बाइन, पाच पिस्तुल आणि ६९ राउंड आढळले.

बंगालीने २००६ मध्ये मुंबईत जुहू परिसरात चित्रपट निर्माते महेश भट यांच्यावर गोळीबार केला होता; तसेच लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी यांच्या खुनाचा कट रचला होता. तो फरारी होता. बंगालीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे एकूण सहा आणि खंडणीचेही गुन्हे दाखल आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते शस्त्रे कोणाला विकणार होते याबाबत पोलिस तपास करीत आहेत. बंगालीविरुध्द घाटकोपर, जुहू, खार, कामशेत, कोंढवा, नेरूळ आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक देविदास चौगुले खून प्रकरणातही बंगालीवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. सहआयुक्त रामानंद यांनी पोलिस हवालदार संतोष क्षीरसागर यांचे अभिनंदन करून पथकाला बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने, सहाय्यक निरीक्षक प्रकाश मोरे, योगेश जगताप, सज्जाद शेख, सुनील कुलकर्णी, दिपक मोघे, संदीप साळवे, बिपीन सूर्यवंशी, मनोज भोकरे आणि गभाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जप्त काडतुसे खडकी फॅक्टरीतील

बंगालीकडून जप्त करण्यात आलेली बहुतांश काडतुसे खडकीच्या अॅम्युनिशन फॅक्टरीतील आहेत. यातील बरीचशी काडतुसे पोलिस, लष्कर आणि निमलष्करी दलासाठी वापरली जातात. ही नेमकी कशी बाहेर आली, याचा तपास सुरू आहे. आरोपींकडून जप्त केलेली पिस्तुले देशी बनावटीची असून, एक पिस्तुल हुबेहुब परदेशी बनावटीसारखे बनविण्यात आले आहे, अशी माहिती रामानंद यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सव मंडळांना मदत

0
0

विधायक काम करणाऱ्यांसाठी सरकारची विशेष तरतूद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गणेशोत्सवाला विधायक स्वरूप देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळांना आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, विधायक कार्य करणाऱ्या घटकांना या निधीतून मदत केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, नगरसेवक हेमंत रासने, माणिक चव्हाण, अप्पा सूर्यवंशी, अंकुश काकडे, सूर्यकांत पाठक आदी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या धनकवडी येथील आदर्श तरुण मंडळ, पुणे कॅम्प येथील हिंद तरुण मंडळ, गोखलेनगर येथील सुयोग मित्र मंडळ, साखळीपीर तालीम मंडळ व येरवडा येथील आदर्श तरुण मंडळ यांना बापट यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले.

बापट म्हणाले, 'गणेशोत्सव आणखी विधायक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाजकार्य करणाऱ्या मंडळांना यातून प्रोत्साहन मिळेल. दर वर्षीप्रमाणे यंदाचाही गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जाणार आहे. पोलिस, न्यायालय, खटले या संदर्भात कोणत्याही अडचणी उद्भवणार नाहीत. गेल्या वर्षी एकाही कार्यकर्त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव उत्साहात पार पाडावा,'असे आवाहन बापट यांनी केले.

प्रशांत जगताप म्हणाले, 'गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेत मी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणतो. यंदा गणेशोत्सवात कोणताही अडथळा येणार नाही. कार्यकर्त्यांच्या ज्या काही मागण्या असतील, त्या पूर्ण होतील.'

'गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यात यावा; तसेच विसर्जन मिरवणूकीत रात्री १२ नंतर पारंपरिक वाद्यांना वाजवण्याची परवानगी देण्यात यावी,' अशी मागणी अण्णा थोरात यांनी केली. हेमंत रासने यांनी प्रास्ताविक केले व महेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाला उत्सवाच्या दृ‌ष्टिकोनातून सर्व सूचना देण्यात आल्या असून, स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जादा पोर्टेबल स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. या शिवाय शहरातील सर्व मुख्य चौकात डॉक्टरांचे पथक आणि अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार आहे.

- प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागांच्या रचनेचे बिगुल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील नऊ महापालिकांच्या बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी येत्या सात सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभागरचना तयार करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिका आयुक्तांना केली आहे. नवीन प्रभागरचना येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात येणार असल्याने महापालिकांमधील राजकीय घडामोडी आणि वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये होणार आहेत. बृहन्मुंबई वगळता या सर्व महापालिकांची निवडणूक बहुसदस्यीय (चार सदस्यीय) प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याने त्यासंबंधीचे काम सुरू करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले होते. या प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव आरक्षणांसह तयार करण्यासाठी सात सप्टेंबरची मुदत महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना तयार करताना अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी आरक्षित प्रभागांचा समावेश करावा आणि त्याची तपासणी करून हा प्रस्ताव १२ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्याची मुदत महापालिकांना देण्यात आली आहे. या प्रारूप प्रभागरचनेला २३ सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगाकडून मान्यता दिली जाणार आहे.

प्रभागरचनेबरोबरच महापालिकेत आरक्षित असलेल्या इतर मागास वर्ग, तसेच महिलांच्या जागांसाठी सात ऑक्टोबर रोजी आरक्षित सोडत काढण्याची आयोगाची सूचना आहे. या सोडतीनंतर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप रचनेवर १० ते २५ ऑक्टोबरदरम्यान महापालिका आयुक्तांकडे हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. या हरकतींवर राज्य निवडणूक आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडून सुनावणी घेतली जाणार आहे. या अधिकाऱ्याने केलेल्या शिफारशी निवडणूक आयोगाला सादर केल्या जातील आणि त्यावर राज्य निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेणार आहे. या निर्णयानंतर महापालिकांची अंतिम प्रभागरचना आणि त्याचे नकाशे यासंबंधीची अंतिम अधिसूचना २५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. आता प्रारूप प्रभागरचना आणि त्यांची अंतिम प्रसिद्धी याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी प्रभागरचना अस्तित्वात येणार असल्याने दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात होणार आहे.

असे आहे वेळापत्रक

प्रारूप प्रभागरचना तयार करण्याची मुदत : ७ सप्टेंबर

राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्याची मुदत : १२ सप्टेंबर

प्रभागरचनेच्या प्रस्तावाला मान्यता : २३ सप्टेंबर

आरक्षण सोडत काढणे : ७ ऑक्टोबर

प्रारूप रचनेची अधिसूचना : १० ऑक्टोबर

प्रभागरचनेवर हरकती : १० ते २५ ऑक्टोबर

प्रभागरचनेची अंतिम प्रसिद्धी : २५ नोव्हेंबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील 'त्या' आईची फेसबुक पोस्ट व्हायरल

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मुलगा आजारी असूनही कामामुळे ऑफिसमध्ये यावं लागलं. शिवाय आजारी मुलाला घेऊन ऑफिसमध्ये काम करण्याची वेळ स्वाती चितळकर यांच्यावर आली. या त्रासामुळे वैतागलेल्या चितळकर यांनी आपल्या आजारी चिमुकल्यासोबत काम करतानाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आणि आपली व्यथा मांडली.

मुलगा आजारी असल्याने त्याच्या देखरेखीसाठी स्वाती यांना घरी राहणं गरजेचं होतं.
पण ऑफिसमधील कामाच्या दबवामुळे इच्छा नसूनही त्यांना कामाला जावं लागलं. आजारी मुलाला एकट्याला त्या घरी ठेवू शकत नव्हत्या म्हणून त्या मुलाला सोबत ऑफिसला घेऊन आल्या. यानंतर स्वाती यांनी फेसबुकवर एक ह्रदयस्पर्शी पोस्ट टाकली. स्वाती यांनी एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांचा आजारी मुलगा जमिनीवर पडून आहे. त्या कम्प्युटरवर काम करण्यात व्यग्र आहेत.








स्वाती चितळकर यांची फेसबुक पोस्ट

'जमिनीवर झोपलेला माझा हा मुलगा... माझं काळीज पडून आहे. त्याला ताप होता आणि तो घरी कोणाबरोबर थांबायला तयार नव्हता म्हणून मी त्याला कामावर सोबत घेऊन आले. अर्धा दिवस उलटला पण कुठलीही उसंत न घेता काम सुरूच आहे. कारण कर्जाचं काम तातडीने करायचं आहे. मुलाला सांभाळून मी कामंही केलं. मी फक्त त्या मंत्र्यांना हा संदेश देऊ इच्छिते की जे संसदेत झोपा काढतात.'

स्वाती यांची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. लोकांनी ती मोठ्या प्रमाणावर लाइक आणि शेअर केली. काहींनी तिच्या कर्मठपणाचे कैतुक केलं तर काहींनी काम करणाऱ्या आईवर व तिच्या समोरील आव्हानांवर चर्चा केली. यानंतर स्वाती यांनी दुसऱ्या फेसबुक पोस्टमधून पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाईच्या आधी आईचा आदर!: शरद पवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गाईचा आदर सर्वजण करतात. आम्ही गाईच्या आधी आईचा आदर करतो. गाईला आई म्हणत नसाल तर येथे राहायचे नाही, असे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,' असा सवाल करून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी गाईबाबत केलेल्या विधानावर सडकून टीका केली. 'सावरकरांनी गाईला आई न म्हणता उपयुक्त पशू म्हटले; तसेच काळाराम मंदिरात दलित व्यक्तीची पूजारी म्हणून नियुक्ती केली. सावरकरांची ही भूमिका न सांगता त्यांना हिंदुत्ववादी म्हणून पुढे केले जाते,' अशा शब्दांत त्यांनी सावरकरांना दोषी ठरविणाऱ्यांवरही हल्ला चढवला.

'पुण्यभूषण फाउंडेशन' (त्रिदल, पुणे) यांच्यातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष खासदार शरद यादव यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरत असलेल्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणेरी पगडीची परंपरा बाजूला ठेवून फुले पगडीने वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शंकर बुरुंगले, बाबुराव पाटील (किवळकर), यशवंत नामजोशी, बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर आणि दत्ता गांधी या स्वातंत्र्यसैनिकांना गौरविण्यात आले. या प्रसंगी महापौर प्रशांत जगताप, पुरस्कार निवड समितीचे प्रमुख आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई उपस्थित होते.

'गाईला आई म्हणत नसाल तर तुम्हाला येथे राहण्याचा अधिकार नाही,' असे वक्तव्य झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केले होते. तो संदर्भ पकडत पवार यांनी यावेळी गोरक्षकांवर हल्ला चढवला. 'जमातवादाचे आव्हान फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नसून धर्मासाठी कायदा हातात घेवून हत्या केल्या जात आहेत. गाईला आई म्हणण्याची सक्ती करणे, ही चिंताजनक परिस्थिती आहे. देशात जमातवादाचा पगडा प्रस्थापित होण्याचे हे संकेत आहेत,' अशा शब्दांत पवार यांनी देशातील परिस्थितीवर निशाणा साधला.

यादव म्हणाले,' देशाची प्रगती झाली आहे, पण हल्ली सत्य बोलण्यावर बंदी आली आहे. देशातली कट्टरता वाढली असून सत्य बोलणे कठीण झाले आहे. सत्य बोलाल तर दाभोलकर, कलबुर्गींप्रमाणे हत्या केली जाते. लोकांच्या भावना लगेचच दुखावल्या जातात. चांगली व्यक्ती घडणे, न्यायासाठी लढणे म्हणजे समाजवाद होय.'

'जगासमोर इसिसच्या रूपाने जमातवादाचे आव्हान उभे राहिले आहे. आपल्या देशातही धर्माधिष्ठित भूमिका मांडून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाच्या दृष्टीने हे राजकारण अत्यंत घातक आहे. जागतिकीकरणाचे परिणाम जाणवू लागल्याने समाजवादाची किरणे दिसू लागली आहेत,' अशी भावना वैद्य यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

0
0

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भवानी पेठेतील कासेवाडी भागात किरकोळ कारणावरून दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेत एका महिलेसह दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सात जणांना अटक करण्यात आली.

ओम तरुण मंडळाचे अध्यक्ष ऋषी कैलास परदेशी (वय ३२, रा. भवानी पेठ, कासेवाडी) याने दिलेल्या तक्रारीवरून अमरज्योत तरुण मंडळाचे अध्यक्ष गोविंद उर्फ पप्पू सुरेश जाधव (वय २९), सागर देविदास कांबळे (वय २१), तुळशीदास पारहेकर (वय ३१), विशाल प्रल्हाद कांबळे (वय २१) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अमरज्योत मंडळाचा कार्यकर्ता विशाल कांबळे (वय २९) याने दिलेल्या तक्रारीवरून ऋषी परदेशी, कविराज कैलास परदेशी, राजा राजकुमार परदेशी (सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेवाडी भागात ओम तरुण मंडळ व अमरज्योत तरुण मंडळ आहेत. दोन्ही मंडळे शेजारी आहेत. महापालिकेने तेथे स्टीलचे पाइप नुकतेच बसविले होते. पाइप काढण्याच्या कारणावरून दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. एकमेकांना बांबू व फरशीने मारहाण करण्यात आली. मारहाणीत राणी कैलास परदेशी (वय ५०) आणि कवीराज परदेशी (वय २०) किरकोळ जखमी झाले आहेत.

दुचाकी-कार अपघातात महिलेचा मृत्यू

भरधाव कारची धडक बसल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. दुचाकीस्वार पती गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लोहगाव येथील टेट्रा स्कूलजवळ शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला.

अनिता संतोष कचोरिया (वय २८, रा. मुजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, दुचाकीस्वार संतोष रवींद्र कचोरिया (वय ३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी कारचालक कैलास संभाजी काटे (वय ३७, रा. लोहगाव) याच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता आणि संतोष हे दोघे पती-पत्नी असून, शुक्रवारी सकाळी ते दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर निघाले होते. त्या वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत अनिता यांचा जागीच मृत्यू झाला.

मारहाण करून पैसे चोरले

भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात हातगाडीवर कांदे विकत असलेल्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी माप टाकून त्याच्याजवळील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माज बेग आदिल बेग (वय १७) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भीम्या निकम (रा. भवानी पेठ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेग हा हातगाडीवर कांदा विक्री करत होता. त्या वेळी निकम हा त्या ठिकाणी आला. बेगला शिविगाळ करून त्याच्याकडे शंभर रुपयांची मागणी केले. पैसे दिले नाही, तर तुला धंदा करून देणार नाही, अशी धमकीही दिली. मात्र, बेग याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे निकम याने एक किलोचे लोखंडी माप बेग याच्या डोक्यात मारून त्याच्या खिशातील रोख १९० रुपये जबरदस्तीने चोरून नेले. तसेच, परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी उपनिरीक्षक बी. व्हि. चापईतकर हे अधिक तपास करत आहेत.

महिलेचा मोबाइल हिसकावला

मोबाइलवर गेम खेळत पायी निघालेल्या महिलेच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकीवरील चोरटे पसार झाले. शिवाजीनगर येथील शिरोळे रोडवर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली.

याबाबत २५ वर्षांच्या महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरांनी १० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. उपनिरीक्षक देवकर हे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनोव्हा कारचोरीचे रॅकेट सक्र‌िय

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लाखो रुपये किंमत असलेल्या इनोव्हा कारचोरीचे रॅकेट सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये सक्र‌िय झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून किमान ३० ते ३५ इनोव्हा कार चोरीला गेल्या आहेत. एकाच पद्धतीने इनोव्हा कारची चोरी शहरात होत असताना पोलिसांना चोरांचा ठावठिकाणा शोधण्यास अद्याप यश आलेले नाही. ज्यांच्या कारचोरीला गेल्या त्यांनी व्हॉट्सअॅपला ग्रुप सुरू करून स्वतःच्या कारचा एकत्रित शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवडसह देहूरोड, चाकण, मावळातून इनोव्हा कार चोरणारी एकच टोळी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. १७ ते २२ लाख रुपये किंमत असलेली इनोव्हा कार अवघ्या सात ते आठ मिनिटांत मोठ्या शिताफिने चोरून नेल्या जात आहे. शहरातून ज्या लोकांच्या कार चोरीला गेल्या त्यातील बहुतांश जणांकडे इनोव्हा कारचोरीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यामध्ये काही हजार रुपये खर्च करून बसविण्यात आलेले सेंट्रल लॉकिंग सिस्टीम देखील चोरट्यांकडून काही सेकंदात डी-अॅक्टीव्हेट केली जात असल्याचे फुटेजवरून स्पष्ट होते. मारुती स्वीफ्ट डिझायर कारमधून येणाऱ्या चोरट्यांच्या टोळीकडून रस्त्यांवर लावण्यात आलेल्या इनोव्हा कार चोरून नेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

कार चोरीला गेल्यावर पोलिसांकडे हेलपाटे मारूनही चोरीच्या गाड्या मिळण्यात अपयश येत आहे. त्यामुळे ज्या-ज्या लोकांच्या इनोव्हा चोरीला गेल्या ते सर्वजण आता एकत्र आले आहेत. बहुतांश लोकांच्या चोरीच्या इनोव्हा परराज्यात नेऊन विकल्याचेही उघड झाले आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चोरीच्या इनोव्हांचे फोटो, सीसीटीव्ही फुटेज शेअर केले जात आहेत.

दोन दिवसांपूर्वी देहूरोड कॅँटोन्मेंटच्या नगरसेवकाची इनोव्हा कार चोरीला गेली. ही कार चोरताना देखील वरील प्रमाणेच चोरट्यांनी स्वीफ्ट डिझायर कारचाच वापर केला. शहरातील इनोव्हा कार चोरीला गेल्यावर आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सात ते आठ मिनिटांत कार चोरीचे चित्रीकरण झाले आहे. हे चित्रीकरण पोलिसांकडे देखील उपलब्ध आहे; परंतु एकट्या पिंपरी पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही चोरीच्या इनोव्हांचा शोध घेण्यात यश आलेले नाही.

भोसरीमधील एका उद्योजकाची इनोव्हा काही दिवसांपूर्वी चोरीला गेला. तीन महिने शोध घेतल्यावर हैदराबादमध्ये या उद्योजकाला आपली कार असल्याचे समजले. त्यामुळे ते पोलिसांमार्फत जाऊन कार घेऊन आले. परंतु त्या कारचे इंजिन, चासी आणि नोंदणी क्रमांक बदलला असल्याचे उघड झाले. त्यामुळे नवीन कोरी कार चोरीला गेल्यावर त्याचा वैयक्तिक पातळीवर शोध घेऊन देखील ही कार सध्या पोलिस ठाण्यात धूळ खात पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूच्या वादातून एकाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या झटापटीत एका मद्यपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. रामनगर चिंचवड येथे मंगळवारी (१६ ऑगस्ट) सकाळी हा प्रकार घडला होता.

अशोक सोमनाथ पवार (४५, रा. रामनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अशोक काळुराम मिटकर (रा. रामनगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार व मिटकर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मंगळवारी दोघे रामनगर परिसरात दारू पिण्यासाठी बसले होते. दरम्यान दारू पिण्यावरून त्यांच्यात वाद झाला.

वादाचे पर्यवसान भांडणात झाल्याने त्यांच्या मारामारी सुरू झाली. दरम्यान, मिटकरने पवारला ढकलले असता तो जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अशोकच्या घरच्यांनी त्याला पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू हेते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून मिटकरला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

चोरी करताना रंगेगाथ पकडले

घरफोडी करण्यासाठी आलेल्या दोन वयस्कर चोरट्यांना शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पिंपरी पोलिसांनी अटक केली. बुधवारी (१७ ऑगस्ट) पहाटे पिंपरी येथील नटराज हॉटेलच्यामागे हा प्रकार घडला.

दिलीप वेरुमल अबुजा (५३, रा. उल्हासनगर) आणि सनी राधेश्याम मधानिया (५४, रा. पिंपरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दिलीप पंजूमल सहिदा (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलीप सहिदा हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दरम्यान, कुलूप तोडल्याचा आवाज शेजाऱ्यांना आला.

त्यांनी पिंपरी पोलिस चौकीत संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर फौजदार विठ्ठल बढे, नागनाथ लकडे, राजेंद्र भोसले, भरत सोनावणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस मित्र निखल मुलचंदानी यांची मदत झाली. आरोपींकडून तीस हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

चौघांविरुद्ध गुन्हा

व्यवसायामध्ये भागिदारी देण्याच्या बहाण्याने तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे ते ऑगस्ट या कालावधीत हा प्रकार केशवनगर कासारवाडी येथील ऐश्वर्या सायबर कॅफे घडला.

संतोष गुरुप्रसाद लाळी (३६, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर डेव्हिस, महेंद्र, मायकल, दिनेश (संपूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्या विरुद्ध आयटी अॅक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संतोष यांना ई-मेल आणि फोनद्वारे संपर्क साधला. त्यांनी व्यवसायात भागिदारी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एक लाख ४८ हजार २४० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. व्यवसायात भागिदारी न देता आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाफेकर बंधूंचे योगदान अमूल्यः जयंत सिन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'क्रांतिवीर चाफेकर बंधू यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळे आज आपण स्वातंत्र्याचा, विकासाचा फायदा घेऊ शकत आहोत,' असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी चिंचवड येथे केले.

येथील क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या 'क्रांतितीर्थ' (चाफेकर वाडा) या स्मारकाला सिन्हा यांनी भेट दिली. क्रांतिवीर बंधू यांचे वंशज अविनाश आणि राजीव चापेकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार मीनाक्षी लेखी, खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, भाजपच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे आदी उपस्थित होते.

सिन्हा म्हणाले, 'देशासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या क्रांतिकारकांचे बलिदान आपण विसरता कामा नये. देशभक्ती आणि प्रबळ राष्ट्रवादाची भावना ठेवल्यास भारत महासत्ता बनू शकेल.'

खासदार लेखी म्हणाल्या, 'चाफेकर बंधूंच्या योगदानाविषयी मला माहिती नव्हती. खरा इतिहास हा एका कोपऱ्यात दडलेला आहे. त्यामुळेच खऱ्या क्रांतिकारकांची माहिती जनतेपर्यंत पोचत नाही.' 'क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मृतींना जतन करण्याचे मोठे काम क्रांतिवीर चापेकर समिती करीत आहे,' असे गौरवपूर्ण उद्‌गार अविनाश चाफेकर यांनी काढले.

'चाफेकर बंधू यांच्या स्मारकासाठी राष्ट्रीय स्तरावरून मदत मिळावी. तसेच, त्यांचे टपाल तिकीट काढावे,' अशी मागणी गिरीश प्रभुणे यांनी केली. 'याबाबत प्रस्ताव तयार करून पाठवून द्यावा. पुढील कार्यवाही केली जाईल,' असे आश्वासन जयंत सिन्हा यांनी दिले. अॅड. सतीश गोरडे यांनी सूत्रसंचालन केले. शकुंतला बन्सल यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images