Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दोन दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुढील दोन दिवस सिंहगड बंद राहणार आहे. पावसाचा जोर ओसरेपर्यंत पर्यटकांनी सिंहगडावर घाट रस्त्याने येणे टाळावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे सिंहगडाच्या पायथ्याला असलेल्या आतकरवाडीच्या रस्त्याला पाण्याने दोन दिवस व्यापले होते. ओढे ओसंडून वाहिल्यामुळे बुधवारी सिंहगडावर गेलेले पर्यटक आणि ग्रामस्थ चार तासांसाठी संपर्कही तुटला होता. त्या दिवशी दिवसभर पीएमपीची बस पाण्यामुळे गावापर्यंत पोहोचू शकली नाही. एवढेच नव्हे तर सिंहगडाच्या घाट रस्त्यावरही डोंगरावरील माती ठिकठिकाणी वाहून आली तर काही धोकादायक वळणावर दगडही कोसळले. त्यामुळे वन विभागाने गेल्या चार दिवसांपासून गड पर्यटकांसाठी बंद ठेवला होता.

'पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी शेकडो पर्यटक दर रविवारी सिंहगडावर येतात. पण सध्या धोकादायक वळणांवर दरड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आम्ही गड सध्या बंद ठेवणार आहोत,' असे सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी सांगितले.

'पावसामुळे घाट रस्त्यावर काही ठिकाणी माती तर वळणांवर दगड खाली आले आहेत. पुढील दोन दिवसात वन कर्मचारी हा रस्ता मोकळा करणार आहेत. पाऊसाचा जोर लक्षात घेऊन गड सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल,' असे वन परिक्षेत्र अधिकारी जहाँगीर शेख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यापासून पुण्यात दररोज पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने केलेली कृपा आणि सर्वपक्षीय आंदोलनांच्या रेट्यामुळे, तब्बल वर्षभर हाल सोसलेल्या पुणेकरांची पाणीकपात अखेर शनिवारी रद्द करण्यात आली. उद्या, सोमवारपासून शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी मान्यता दिली.

पावसाने ओढ दिल्याने गेल्या वर्षीच शहरात पाणीकपात लागू करण्यात आली होती; मात्र गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने धरणे ओसंडून वाहू लागली असून, कालवा आणि नदीतून प्रचंड पाणी सोडण्यात येत आहे. अशा वेळी पुणेकरांची पाणीकपात मागे घ्यावी, असा ठराव महापालिकेने केला होता; मात्र पालकमंत्री बापट यांनी त्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे श्रेयवाद आणि संघर्ष उभा राहिला आणि भाजप वगळता सर्वपक्षीयांनी निदर्शने-आंदोलने सुरू केली; तसेच सोशल मीडियातूनही हा मुद्दा चर्चेत आला आणि काही आमदारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी बैठक पार पडली. पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. बैठकीपूर्वी महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेते आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर आंदोलन केले.

शहरासाठी दररोज अकराशे दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी सोडावे, असे बापट यांचे म्हणणे होते; मात्र सर्व नेत्यांनी साडेबाराशे एमएलडी पाण्याचा आग्रह धरला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हाच मुद्दा लावून धरला. त्यानंतर बापट यांनी १२०० एमएलडी पाणी सोडण्यास मान्यता दिली.

येत्या ऑक्टोबरमध्ये धरणांतील पाण्याचा आढावा घेऊन पाणीपुरवठ्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

सर्वपक्षीय गटनेत्यांचे धरणे

अकरा महिन्यांपासून पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेली पाणीकपात रद्द करावी, यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांनी शनिवारी कौन्सिल हॉल येथे धरणे आंदोलन करत पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कालवा आणि नदीद्वारे लाखो लिटर पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, असे असतानाही पुणेकरांना मात्र पुरेसे पाणी दिले जात नव्हते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हट्टामुळे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जात नव्हता. धरणातून पाणी सोडले जात असतानाही पुणेकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांनी पालकमंत्री बापट यांनी कौन्सिल हॉल येथे बोलावलेल्या बैठकीच्या बाहेरच धरणे आंदोलन सुरू केले.

या आंदोलनात महापौर जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, सभागृह नेते शंकर केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ सहभागी झाले होते.

'पालकमंत्री पाणी द्या, शहराची पाणीकपात रद्द करा, पुणेकरांच्या संयमाची परीक्षा पाहू नका,' असे फलक दाखवित पाणी द्या, अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. समितीच्या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड यांना आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा करून बैठकीत पाण्याचा सकारात्मक निर्णय होणार असल्याची ग्वाही दिल्याने सर्व पदाधिकारी बैठकीला हजर झाले.

'द्या हो पाणी, काही होत नाही'

शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे तुडूंब भरून वाहत असली, तरी संपूर्ण वर्षाचा विचार करून शहराला पाणी द्यावे लागणार आहे. जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारानुसार पाणी द्यावे लागेल, अशी ठाम भूमिका बैठकीमध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांनी सुरुवातीपासूनच घेतली. पालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे ११०० एमएलडी पाण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शहराला अकराशे नव्हे; तर १२५० एमएलडी पाणी द्यावे, अशी मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी लावून धरली. पालकमंत्री बापट यांनी पुण्याला ११५० एमएलडी पाणी दिले जाईल, असे जाहीर केले. यावरून महापौर पालकमंत्री यांच्यात जोरदार चर्चा झाली. यातून तोडगा निघत नसल्याने त्यामध्ये हस्तक्षेप करत अजित पवार यांनी आपण पालकमंत्री असताना धरणात अवघे १५ टीएमसी पाणी शिल्लक असातानाही शहराला दररोज पाणी देत होतो, पुढील दोन महिने अजून पाऊस पडणार असल्याने पालकमंत्री तुम्ही काळजी करू नका, असे सांगत, 'द्या हो पाणी, काही होत नाही,' असे म्हणताच अखेर १२०० एमएलडी पाणी देण्याचे पालकमंत्री बापट यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मास्कची पोलिसांना डोकेदुखी

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पुणे
मास्कमुळे चेहरा सुरक्षित राहत असला; तरी पोलिसांसाठी मात्र हा मास्क डोकेदुखी ठरत आहे. गुन्हेगारांकडून या मास्कचा वापर केला जात असल्यामुळे सीसीटीव्ही असूनदेखील आरोपीचा चेहरा दिसत नसल्यामुळे त्यांना पकडणे पोलिसांना अवघड जात आहे. पुण्यात ही अनेक गुन्ह्यांत मास्कचा वापर केल्यामुळे गुन्हेगारांना शोधणे कठीण झाले आहे.
ऊन, प्रदूषण यांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक तरुण मंडळी अलीकडे मास्कचा वापर करू लागला आहे. तरुणांमध्ये तर निंजा मास्कची क्रेझ आली असून, दुचाकीवर फिरताना अनेकजण हे मास्क वापरत आहेत. पण, हेच मास्क पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. गुन्हा करताना अनेक गुन्हेगार या मास्कचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे आरोपी सीसीटीव्ही कैद झाला, तरी त्याचा चेहरा दिसत नसल्यामुळे त्यांना शोधणे कठीण होऊन बसले आहे. गुन्हेगार पूर्वी हेल्मेट, चेहऱ्याला रुमाल बांधत असत. पण, अलीकडे निंजा मास्क, माकडटोपी, प्लास्टिक मास्कचा गुन्हेगारांकडून वापर केला जात आहे. बाजारपेठेत ही मास्क कोठेही सहज उपलब्ध होत असल्यामुळे ती मिळवण्यासाठी गुन्हेगारांना काहीच अडचण येत नाही.
पुण्यासह इतर शहरात घरफोडी, सोनसाखळी चोरट्यांनी चेहऱ्याला मास्क लावून गुन्हे केल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले आहेत. पुण्यात डेक्कन परिसरात एका घरफोडीतील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांनीदेखील मास्क घातले होते. हा गुन्हा अद्याप उघडकीस आलेला नाही. तसेच, कोरेगाव पार्क परिसरात शिकवणी घेण्यासाठी जाणारा शिक्षक हा सुद्धा मास्क घालून येत होता. एकेदिवशी त्याने मुलाचे अपहरण केले होते. पोलिसांनी मुलाची सुटका केली पण, शिक्षक पळून गेला असून त्याला अद्याप अटक झालेली नाही. हा शिक्षक मास्क घालून येत असल्यामुळे त्याचा चेहरा कोणालाच माहिती नसल्यामुळे तपास करण्यास अडचणी येत आहेत. पुणे पोलिसांनी नुकतीच घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी अटक केली. त्या वेळी त्यांच्याकडे पोलिसांना तीन प्लास्टिक मास्क सापडले. त्यांची ओळख लपविण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
सीसीटीव्हीत आरोपीचा चेहरा दिसल्यास त्याचा शोध घेणे पोलिसांना सोपे जाते. मात्र, असे मास्क घातल्यानंतर चेहरा दिसत नाही. त्यामुळे पोलिसांना वेगवेगळ्या क्लृप्त्या योजून गुन्हेगारांचा शोध घ्यावा लागत आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगर बसस्थानकात बेवारस बॅगमुळे खळबळ

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवाजीनगर बसस्थानकात शनिवारी सायंकाळी बेवारस बॅग आढळून आल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कपडे आढळून आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.
शिवाजीनगर बसस्थानकातील फलाट क्रमांक सहा येथील खुर्च्याखाली एक बॅग आढळून आली. बराच वेळ ही बॅग सीट खाली पडून होती. या बॅगेजवळ कोणीही प्रवाशी नसल्यामुळे प्रवाशांना बेवारस बॅगबाबत संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिासांना याची माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस आणि बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एसटी बाजूला काढून त्या बॅगची तपासणी केली. त्यावेळी बॅगमध्ये कपडे आणि अन्य वस्तू आढळून आल्या. त्यानंतर पोलिस व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. बेवारस बॅग आढळल्यानंतर येथील बस स्थानकात येणाऱ्या एसटी थांबविण्यात आल्या होत्या. बॅगची तपासणी केल्यानंतर बसस्थानक सुरू करण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकर विभाग पाठविणार ५९ हजार पत्रे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पॅनकार्डांशिवाय मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्या ५९ हजार करदात्यांची ओळख प्राप्तिकर विभागाने पटविली असून, त्यांची पडताळणी करण्यासाठी विभागाच्या वतीने सर्वांना पत्रे पाठविण्यात येणार आहेत.
मोठ्या रकमेच्या विविध व्यवहारांसंबंधीची माहिती, प्राप्तीकर विभागाकडे आहे. यामध्ये बँकेच्या बचत खात्यामध्ये दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कमा जमा केल्याची, १० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवी वगैरेंच्या माहितीचा समावेश आहे. यापैकी बहुतांश व्यवहारांमध्ये पॅन क्रमांकाचा उल्लेख नाही. प्राप्तीकर विभागाकडे २००९-१० ते २०१६-१७ या कालावधीतील अशा प्रकारच्या सुमारे ४५ लाख व्यवहारांची माहिती आहे. विभागाने माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा पॅनरहित व्यवहारांचे वर्गीकरण केले आहे आणि तीन लाख पॅनरहित व्यवहार करणाऱ्या ५९ हजार करदात्यांची ओळख पटवली असून, त्यांची प्राप्तीकर विभागाद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे.
प्राप्तीकर विभाग अशा व्यवहारांमधील करदात्यांना पत्र पाठवून पॅन क्रमांक देण्याची विनंती करेल. ज्यांना अशी पत्रे पाठवण्यात येतील त्यांनी वर उल्लेख केलेले पॅनरहित व्यवहार प्राप्तीकर विवरण पत्रात दाखवले आहेत का हे स्पष्ट करावे लागेल. विभागाकडून पाठवण्यात येणाऱ्या पत्राबरोबर उत्तर देण्यासाठी एक नमुना पत्र जोडलेले असेल. या नमुना पत्रातील संबंधित रकाने करदात्यांनी भरायचे आहेत आणि ते पत्र पुन्हा विभागाकडे पाठवायचे आहे. त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी योग्य पॅन क्रमांक नमूद करावा तसेच संबंधित वर्षाच्या प्राप्तीकर विवरण पत्रात त्या व्यवहाराची माहिती दिली आहे की नाही हे देखील कळवावे. उत्तर पाठवणाऱ्या करदात्यांची विभागाकडून तपासणी केली जाईल. जे उत्तर देणार नाहीत त्यांच्याविरुद्ध विभाग आवश्यक ती कारवाई सुरू करेल.
ज्या लोकांना अशी पत्रे मिळतील, त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी याप्रकरणी सहकार्य करावे. ते १२९५ या विभागीय हेल्पलाइनचा वापर करून प्रश्न विचारू शकतात. नागरिकांना सल्ला देण्यात येत आहे की, अशा प्रकरणांमध्ये स्वत:ला प्राप्तीकर विभागाचा खोटा प्रतिनिधी सांगून या प्रकरणी मदतीचा प्रस्ताव देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या घटकांच्या जाळ्यात फसू नका, असे आवाहन डी. एस. सक्सेना, प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहे ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात महापालिकेच्या नाट्यगृहांची संख्या वाढत असताना, त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ आणि इतर सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. पालिकेच्या नाट्यगृहांची संख्या दोन आकडी होत असताना यातील काही मोजक्या नाट्यगृहांनाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, शहराच्या उपनगरांत होणारी नाट्यगृहे पालिकेसाठी 'पांढरा हत्ती' ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ही नाट्यगृहे पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाची ओळख मानली जात. नाट्यगृहांची संख्या वाढली असली, तरी ही ओळख अद्याप कायम आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा लौकिक व मध्यवर्ती ठिकाण यामुळे या नाट्यगृहास कलावंतांकडून कायमच मागणी असते. कोथरूडमध्ये रसिक वर्ग मोठा असल्याने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहालाही चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, पालिकेच्या इतर नाट्यगृहांना हे सांस्कृतिक सुख अनुभवता आलेले नाही. त्यातच राजकीय कार्यक्रमांसाठीदेखील हीच ठिकाणे राजकीय पक्षांना हवी असतात. यामुळे पालिकेची इतर नाट्यगृहे कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नाट्यगृहांना चांगला प्रतिसाद मिळावा व त्या-त्या भागात कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण होऊन चांगले सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पालिकेकडून कसलेही प्रयत्न झालेले नाहीत. अण्णा भाऊ साठे सभागृह आधुनिक मानले जाते. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या कलादालनालाच अडगळीत टाकण्यात आले आहे. नाट्यगृहे पडून असताना यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारात तसेच सिंहगड रोड व हडपसर येथेही नवी नाट्यगृहे होणार आहेत.

नवीन नाट्यगृहे उभारताना, त्यासाठी आवश्यक असणारे कर्मचारी पुरविण्याबाबतही पालिकेकडून चालढकल केली जाते. सुरक्षा रक्षकांपासून ते स्वच्छता आणि इतर अनुषंगिक गोष्टींसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने उद्घाटन झाल्यानंतरही अनेकदा संबंधित नाट्यगृहे प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होण्यास वेळ लागतो. या नाट्यगृहांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसला, तरी त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवरही खर्च करावा लागतो. त्यामुळे, शहराच्या उपनगरांत होणारी नाट्यगृहे पालिकेसाठी 'पांढरा हत्ती' ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘धर्मावर अवलंबून राहण्याची गरज नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सध्याचा आपला समाज हा धर्माला महत्त्व देणारा आहे. परंतु, धर्म ही मानवनिर्मित गोष्ट असून त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही,' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

समकालीन प्रकाशनातर्फे लेखिका सबा नक्की यांनी लिहिलेल्या 'सलोख्याचे प्रदेश' या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशनवेळी ते बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन नाटककार शफाअत खान यांच्या हस्ते झाले. त्या वेळी लेखिका नक्की, मराठी अनुवाद करणारे प्रमोद मुजुमदार, प्रकाशक डॉ. सुहास कुलकर्णी, शाम देशपांडे आदी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, 'समाजात आंतरधर्मियांमध्ये होणाऱ्या देवाणघेवाणीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अशा प्रकारे होणारी देवाणघेवाण इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना समाजापुढे आणले पाहिजे. देशातील मुस्लिम समाज आणि हिंदू समाज त्या-त्या प्रदेशानुसार घडत गेला आहे. त्या दोघांना विविध छटा आहेत. त्यामुळे समाजातील असलेली विषमता किंवा संघर्ष रोखण्यासाठी एकमेकांच्या धर्माबाबत आदर बाळगला पाहिजे.'

नाटककार शफाअत खान म्हणाले, 'पूर्वीच्या काळी तयार केल्या जाणाऱ्या दंतकथामुळे माणसे जोडली गेली. समाज जोडला गेला. मात्र, सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या वापराने माणसे तोडण्यासाठी दंतकथा तयार केल्या जात आहेत, ही मोठी शोकांतिका आहे. अशा दंतकथापासून आपण दूर राहिले पाहिजे. जुन्या चित्रपटांमधून जातीय सलोखा जपणाऱ्या कथा मानल्या जात होत्या. आता सध्याच्या चित्रपटांत अशा कथा मांडल्या जात नाहीत.' लेखिका सबा नक्की यांनी अनुभवकथन केले. डॉ. सुहास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धर्म, प्रदेशवाद सार्वभौमत्वाचे शत्रू’

$
0
0

पुणे : 'भाषा, धर्म आणि प्रदेश यांचा समाजात तंटे लावण्यासाठी वापर केला जातो. धर्म, प्रदेश यांवर भांडण हे देशहिताचे नाही, तर ते देशाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे शत्रू आहेत,' असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक चमनलाल यांनी रविवारी व्यक्त केले.

पुण्यामध्ये १८, १९, २० नोव्हेंबर २०१६ रोजी 'विश्व पंजाबी साहित्य संमेलन' होत आहे. त्यानिमित्त सरहद संस्थेतर्फे 'भगतसिंग आणि मातृभाषा' या विषयावर प्रा. चमनलाल यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, आर. पी. एस. सेहगल, संतसिंग मोखा, उल्हासदादा पवार, डॉ. सदानंद मोरे, रामदास फुटाणे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात संजय नहार लिखित 'सरदार भगतसिंग' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रा. चमनलाल म्हणाले, 'देशामध्ये धर्म या संकल्पनेमुळे नागरिकांमध्ये वाद निर्माण होत आहेत, ते देशासाठी घातक आहेत. भगतसिंग यांनी 'मजहब और आजादी की जंग' या लेखात हेच सांगितले होते. त्यांनी हा संदेश देऊन अनेक वर्ष लोटली. मात्र, चित्र फारसे काही बदललेले नाही. लिखाण करणारे क्रांतिकारक हे भगतसिंग यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी क्रांती का केली पाहिजे, ज्या स्वातंत्र्यासाठी आपण लढत आहोत, ते नेमके काय आहे, जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा काय संबंध आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तरुणांना दिली.'

बाबा आढाव म्हणाले, 'देशातील राष्ट्रवाद धोक्यात आला आहे. देशाचा आवाज एक नाही, हे पाहून खूप दुःख होते. देशाला एक ठेवण्यासाठी काम करण्याची गरज आहे. विश्व पंजाबी साहित्य संमेलनात भारताचा 'दिल' आणि 'दिमाख' याचं प्रतिबिंब दिसले पाहिजे. भगतसिंगांवर खूप काम केले गेले आहे; पण राजगुरू यांच्यावर फारसे काही काम झालेले नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासनाचेही मूल्यमापन हवे

$
0
0

'परिवर्तन'च्या प्रगतिपुस्तकावर नगरसेवकांचे भाष्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या पालिकेच्या कारभाराच्या दोन बाजू आहेत. फक्त नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन करून चालणार नाही. प्रशासनाचेही मूल्यमापन झाले पाहिजे. 'परिवर्तन'चे नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक स्वागतार्ह असले, तरी ते एकांगी आणि अर्धवट असून त्यांनी नगरसेवकांकडूनही माहिती घेणे अपेक्षित होते, यावर पालिकेतील सर्व गटनेत्यांचे एकमत झाले.
निमित्त होते..सजग नागरिक मंचातर्फे 'परिवर्तन'ने तयार केलेल्या नगरसेवकांच्या प्रगतिपुस्तकाविषयी आयोजित चर्चासत्राचे. भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर, कॉँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, पालिकेचे सभागृह नेते शंकर केमसे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते अॅड. किशोर शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, 'परिवर्तन'चे अध्यक्ष तन्मय कानिटकर आणि 'सजग'चे विवेक वेलणकर सहभागी झाले होते.
'नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी आहेत. ते काय काम करतात; हे समजणे हा जनतेचा अधिकार आहे. मात्र, दुर्दैवाने पालिकेत त्याची माहिती ठेवली जात नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती माहिती अधिकाराअंतर्गत मागवावी लागली. वॉर्डातील कामे करताना कशाला प्राधान्य द्यावे, हे नागरिकांशी बोलून ठरवले पाहिजे. नगरसेवकांसाठी किमान उपस्थिती, बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य असावी. कारभारात पारदर्शकपणा असावा,' असे कानिटकर यांनी सांगितले. 'हा अहवाल अधिक जबाबदारीने तयार व्हायला हवा होता. नगरसेवकांवरील बहुतांश गुन्हे राजकीय असतात. अनेकदा नव्या नगरसेवकांना संधी देण्यासाठी वरिष्ठ नेते प्रश्न विचारत नाहीत. नगरसेवक सतत नागरिकांच्या समोर असल्याने त्यांना टार्गेट केले जाते. नागरिकांकडून मागणी असल्यानेच बाकडी बसविण्यात येतात,' असे बीडकर यांनी सांगितले.
'अहवालाचे स्वागत असले तरी, हा एकांगी आहे. प्रश्नही माझेच आणि उत्तरही माझेच असा हा अहवाल आहे. कामे सुचविणे हे नगरसेवकांचे काम असून त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करायची आहे. त्यामुळे प्रशासनालाही जबाबदार धरले पाहिजे,' असे डॉ. धेंडे यांनी सांगितले. 'कोणी किती प्रश्न विचारले यापेक्षा त्यावर चर्चा काय झाली आणि त्यातून काय समोर आले, हे महत्त्वाचे आहे. नगरसेवकांवर नागरिकांचा दबावगट असला पाहिजे. मात्र, प्रत्येकाची अपेक्षा वेगळी असल्याने सर्वच गोष्टी पूर्ण होत नाहीत. दुसरी बाजू विचारात घेऊन हा अहवाल नव्याने बनवावा,' असे अॅड. शिंदे यांनी सांगितले.
'या अहवालाच्या आधारे नगरसेवकांवर टीका झाली. त्यांना मौनी, गुन्हेगार ठरविले गेले. प्रत्यक्षात तसे चित्र नाही. दुसरी बाजू समजून घेऊन नगरसेवकांनी केलेली चांगली कामेही समोर यायला हवीत. नगरसेवकांचे मतही जाणून घेतले पाहिजे,' असे शिंदे यांनी सांगितले. 'नळ, गटार आणि रस्त्याचा सेवक म्हणजे नगरसेवक. नगरसेवकांना करावी लागणारी कामे समजून घेतल्यावरच अशा अहवालाची दुसरी बाजू समोर येईल,' असे केमसे यांनी सांगितले. 'आम्ही सातत्याने नागरिकांच्या प्रश्नांसाठीच महापालिकेत भांडत असतो. नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक तयार करताना दुसरी बाजूही समजून घेणे आवश्यक आहे,' असे हरणावळ यांनी सांगितले.
..
'नाव टाकणे योग्यच'
नगरसेवक सर्वच विकासकामांवर कचऱ्याच्या डब्यांपासून ते कचऱ्याचा वाहनांपर्यंत स्वतःचे नाव टाकतात. ते कितपत योग्य आहे, असा प्रश्न वेलणकर यांनी उपस्थित केला. त्यावर नगरसेवकांनी काम केले असेल, तर नाव टाकायला काय हरकत आहे, अशी भूमिका अरविंद शिंदे यांनी मांडली. त्याला किशोर शिंदे यांनी दुजोरा दिला. मात्र, कायद्यानुसार असे नाव टाकायला बंदी असल्याचे बंडू केमसे यांनी स्पष्ट केले. मात्र, अशा कायद्याची माहिती नसल्याचे इतर नगरसेवकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पथकांना आता तीस ढोलांची मर्यादा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुण्याचा गणेशोत्सव न्यायालयाच्या नियमांचे पालन करून सर्वांनी साजरा करावा. त्यासाठी विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांनी जास्तीत जास्त ३० ढोलांसह सहभागी व्हावे, तसेच मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत जास्तीत जास्त तीन आणि इतर मोठ्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीत दोन ढोल-ताशा पथकांचा समावेश असावा. डीजे कींवा डॉल्बीचालक मालकांनीही पूर्व परवानगी घ्यावी,' अशा सूचना पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिस - ढोल ताशा महासंघ आणि डीजे, डॉल्बी चालक-मालक यांच्या संयुक्त बैठकीत दिल्या.

गणेशोत्सव आता एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद, अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये ढोल-ताशा पथक प्रमुखांनी आणि वादकांनी आपल्या समस्या मांडल्या. 'एका पथकात ४५ ते ५० ढोल वाजवण्याची परवानगी मिळावी, लक्ष्मी रस्त्यावरील शगुन, कुमठेकर, विजय टॉकीज आणि टिळक चौकात आवर्तन सादर करण्याची परवानगी मिळावी, वादनाचा सराव सायंकाळी ६ ते ९.३० या वेळेत असावा,' आदी मागण्या पथकांनी केल्या. पोलिस आयुक्त शुक्ला म्हणाल्या, 'ढोल-ताशापथकांनी नियमांचे उल्लंघन न करता उत्सव साजरा करावा. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत प्रत्येकी ३० ढोलचा समावेशी असलेली तीन आणि इतर मोठ्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीत दोन पथकांचा समावेश असेल. पथकांनी वादनाचा सराव सायंकाळी ६ ते ९ या वेळेतच करावा. सराव करताना २० ढोल वापरावेत, विसर्जन मिरवणुकीत ज्या मिरवणुकांतून ढोल वाजणार आहेत, त्यांची एक सूची पोलिसांना द्यावी, त्यामुळे मिरवणूक मार्ग पथकांना ओलांडू द्यायचा का नाही, हे ठरवणे सोपे होईल.'

सुनील रामानंद म्हणाले, 'डीजे-डॉल्बीच्या संदर्भात चालक-मालकांनी दोन प्रकारच्या परवानगी घेणे गरजेचे आहे. डीजे-डॉल्बी सिस्टीमची वार्षिक परवानगी आणि दुसरी मिरवणुकीत वाजवण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याची.'

ढोल-ताशा पथकांच्या कार्याचा एकत्रित अहवाल

पुणे ः गणेशोत्सवादरम्यान आणि त्यानंतर वर्षभर ढोल-ताशा पथके करीत असलेल्या सामाजिक कार्याची एकत्रित माहिती संकलित केली जाणार असून त्याचा विस्तृत कार्यअहवाल ढोल-ताशा महासंघाच्या वतीने तयार करण्यात येणार आहे. पुण्यातील दोनशेहून अधिक पथकांच्या विधायक कार्याची माहिती आणि विशेष उपक्रम या अहवालाच्या आधारे पुणेकरांसमोर येणार आहे.

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये गणेशोत्सवामध्ये वादन करण्याबरोबरच पुण्यातील काही पथके सामाजिक उपक्रमांमध्येदेखील सहभागी होतात. अनेक समाजसेवी संस्थांबरोबर ते तरुणांच्या साह्याने समाजोपयोगी उपक्रम करीत आहेत. त्याचा एकत्रित आढावा घेता यावा, यासाठी महासंघाने पथकांच्या कार्य अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये पथकांच्या सामाजिक उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. महासंघाने या संदर्भातील माहिती संकलनाचे काम हाती घेतले असून, सर्व पथकांकडून ही माहिती संकलित करून गणेशोत्सवापूर्वी हा अहवाल प्रकाशित करण्याचा प्रयत्न महासंघ करणार आहे.

शहरात ढोल पथकांकडून अनाथ आश्रमांना अर्थिक मदत, समाजातील वंचित घटकांसाठी विविध उपक्रम, स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत, त्याची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी अहवालाची निर्मिती करण्यात येणार आहे. ढोल-ताशा महासंघाचे सचिव संजय सातपुते म्हणाले, 'सध्या शहरातील अनेक पथकांकडून वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक उपक्रम सुरू आहेत. ते इतर पथकांना कळावेत आणि त्यांनी देखील प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागणीप्रमाणेच पुरवठा

$
0
0

प्रक्रियायुक्त पाण्याबाबत पालिकेचा दावा; बापटांनी द्याव्यात सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेने सहा टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट सातत्याने सांगत असले, तरी पाटबंधारे विभागाच्या 'मागणीप्रमाणेच पुरवठा' केला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मुंढवा जॅकवेलमधील सर्व पंप पूर्ण क्षमतेने चालविण्याची पालिकेची तयारी असली, तरी पाटबंधारे विभागाकडून हात आखडता घेतला जात असल्याने त्यांना सूचना करण्यासही पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.
महापालिका आणि पाटबंधारे विभागात झालेल्या करारानुसार साडेसहा टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचे बंधन पालिकेवर आहे. महापालिकेने मुंढव्यात उभारलेल्या जॅकवेल प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी बेबी कॅनॉलमधून शेतीसाठी सोडले जाते. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. सुरुवातीच्या टप्प्यात पाटबंधारे विभागाकडून रखडलेल्या कॅनॉलच्या दुरुस्तीमुळे हा प्रकल्प उदघाटनानंतर काही दिवस बंदच होता. शंभर कोटी रुपयांहून अधिक खर्च केलेला प्रकल्प बंद असल्याविरोधात आवाज उठवल्यानंतर अखेर पाटबंधारे विभागाने त्याद्वारे पाणी घेण्यास सुरुवात केली.
गेल्या १० महिन्यांमध्ये महापालिकेने सुमारे चार टीएमसी पाणी शेतीसाठी सोडणे अपेक्षित होते. नदीतून येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सोडण्याची पालिकेची तयारीही होती. परंतु, पाटबंधारे विभागानेच त्यामध्ये वेळोवेळी आडकाठी निर्माण केली. कालव्याच्या दुरुस्तीचे काम बाकी आहे, सध्या शेतीसाठी एवढ्या पाण्याची गरज नाही, अशी कारणे वारंवार दिली गेली. त्यामुळे, पालिकेने मुंढवा जॅकवेल येथे उभारलेले पाच पंपांचा वापर कधीही होऊ शकलेला नाही. जेमतेम एक-दोन पंपांचा वापर करून पाटबंधारे विभागाला आवश्यक असलेले पाणी कालव्यात सोडले जाते. त्यामुळे, गेल्या दहा महिन्यांत एक ते सव्वा टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात पालिकेला यश आले आहे. यामध्ये पाटबंधारे विभागाची भूमिका सदोष असून, पालकमंत्री पालिकेलाच दोषी धरत आहेत. त्यामुळे, पालकमंत्र्यांनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन पाटबंधारे विभागालाही आवश्यक त्या सूचना तातडीने द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.
..............
भामा-आसखेडकडे लक्ष द्या
शहराच्या पूर्व भागासाठी गरजेचा असलेला भामा-आसखेडचा प्रकल्पही असाच राजकीय साठमारीत अडकला आहे. शिवसेनेच्या जिल्ह्यातील दोन नेत्यांमुळे या प्रकल्पाची प्रगती पूर्ण ठप्प झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूचना करूनही भामा-आसखेड प्रकल्पाला चालना मिळू शकलेली नाही. पुणेकरांच्या पाण्याचा हिशोब ठेवणाऱ्या पालकमंत्र्यांनी हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा करावा, असा आग्रह धरला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी संघटनेतून व्हावे नेतृत्व निर्माण

$
0
0

डॉ. प्रकाश आंबेडकर यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'ओबीसी वर्गाचे नेतृत्व करणारे नेते किंवा सत्तेत असताना त्यांचे प्रश्न मांडणारे राजकीय नेतेच नाहीत. त्यामुळे या वर्गातील नागरिकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) पर्यायी संघटन उभारले पाहिजे आणि त्यातून राजकीय नेतृत्व निर्माण होण्याची आवश्यकता आहे,' असे मत भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केले.
ओबीसी हिताच्या मंडल आयोग अंमलबजावणीच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित 'मंडलयुग राष्ट्रीय विचार' परिषदेच्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकर उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे, स्वागताध्यक्ष पी. ए. इनामदार, महासभेच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. दिलीप यादव उपस्थित होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, 'देशात आणि राज्यात ओबीसी वर्गातील नागरिकांचे संघटनच नाही. त्यामुळे त्या वर्गातील नागरिकांचे प्रश्नच सोडविले जात नाहीत. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या राजकीय नेत्यांचे त्यांच्यात पक्षातच वजन नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रश्न सोडवण्यात येत नाहीत. त्यामुळे ओबीसी वर्गातील नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडविण्याचे असतील तर त्यांना आरएसएसला पर्यायी संघटन उभारण्याची आवश्यकता आहे,' असेही आंबेडकर म्हणाले.
अॅड. आंबेडकर म्हणाले, 'देशात सध्या आखाती देशांच्या आणि तेथील नागरिकांच्या एकजुटीचे उदाहरण दाखवून हिंदूंच्या एकत्रिकरणाचे काम सुरू आहे. हिंदूंचे एकत्रिकरणच देशाला वाचवू शकते, असा प्रचार काही व्यक्ती करीत आहेत. त्यामुळे या प्रचाराला रोखण्यात समाजातील नागरिकांनी महत्त्वाची भूमिका बजाविण्याची गरज आहे.' दरम्यान, नागरिकांनी धार्मिक चिकित्सा ही समाजव्यवस्थेची करावी आणि त्यासाठी संतांच्या विचारांचा आधार घ्यावा, असे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले. विजयकुमार लडकत यांनी सूत्रसंचालन केले.
............
'शिफारशींची अंमलबजावणी आवश्यक'
ओबीसी वर्गातील नागरिकांनी एकत्र येऊन आपले प्रश्न मांडले पाहिजे आणि त्यांच्या पूर्ततेसाठी झगडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठे संघटन निर्माण करण्यची गरज आहे. मंडल आयोगाच्या आणि नचिपन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सरकारने करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. देवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरांचे धाबे दणाणले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील अनधिकृत इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक व अशा बांधकामांना छत्रछाया देणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भातील नवीन धोरणामध्ये या कारवाईचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबईतील दीघा येथील ९६ बेकायदा इमारती नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय केवळ दीघामधील इमारतींसाठी नसून तो राज्यभर लागू राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो बेकायदा इमारती दंडात्मक आकारणी करून नियमित केल्या जाणार आहेत.

अनधिकृत बांधकामांसंदर्भात हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीमध्ये हायकोर्टाने अनधिकृत बांधकामांबाबत लवकर निर्णय घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानुषंगाने राज्य सरकारने राज्यातील अनधिकृत बांधकामांबातचे नवीन धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये सार्वजनिक सोयीसाठी असलेली आरक्षणे, रस्ते व अन्य विकास कामांसाठी आरक्षित जमीन तसेच १:५ उतार असलेल्या जमिनींवरील बेकायदा बांधकामे नियमित केली जाणार नाहीत. चटईक्षेत्राचे उल्लंघन, सामासिक अंतर तसेच अन्य प्रकारच्या नियमांची पायमल्ली झाली असेल तर दंडनीय आकारणी करून ती नियमित केली जाणार आहेत.

या नवीन धोरणामध्ये बेकायदा बांधकाम करणाऱ्या मूळ बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईचा समावेश करण्यात आला आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदा बांधकामे करून फ्लॅटची विक्री केली आहे. हे फ्लॅट सामान्य नोकरदार, चाकरमान्यांनी खरेदी केले आहेत. या फ्लॅटमध्ये अनेक कुटुंबे राहण्यासही आली आहेत. त्यामुळे या इमारती पाडल्यास संबंधित नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अशा बेकायदा इमारती बांधणारे बांधकाम व्यावसायिक व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या बेकायदा बांधकामांसाठी त्यांना दोषी ठरवून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज आणि उद्या ‘हेरिटेज पुणे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एच. व्ही. देसाई कॉलेजच्या इतिहास विभागातर्फे आज, सोमवारी आणि उद्या मंगळवारी (८ आणि ९ ऑगस्ट) 'हेरिटेज पुणे' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.
सोमवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत डॉ. सदानंद मोरे, मोहन शेटे, डॉ. हरी नरके, रोहित फडणीस आदी तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. तर, मंगळवारी सकाळी क्रांतिकारकांच्या स्मृतीस अभिवादन करणाऱ्या यात्रेची माहिती देण्यात येणार आहे. या निमित्ताने क्रांतीकारकांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे. या विषयी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी उमेश पोटे (९७६२०९२३३२) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगाराचा खून

$
0
0

तळजाई टेकडीवरील प्रकार; टोळी युद्धाचा पोलिसांना संशय

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तळजाई टेकडीवरील पडक्या वाड्याजवळ सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगरमधील टोळी युद्धातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सनी एकनाथ मोरे (वय २३ रा. तळजाई माता मंदिराजवळ, धनकवडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुनील यशवंत नवले (रा. तळजाईमाता मंदिराजवळ, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी हा तळजाई पठार येथे शनिवारी रात्री गेला होता. त्यानंतर तो रात्री घरी परत आला नाही. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तळजाई पठारावर झुडूपामध्ये एकाचा मृतदेह पडल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता तो मृतदेह सनी याचा असल्याचे आढळले. त्याच्या डोक्यात दगड घातला होता. तसेच, त्याच्यावर वार करण्यात आल्याचे आढळले. मृतदेहापासून काही अंतरावरच पोलिसांना चाकू मिळाला.
धनकवडी येथे २०१२मध्ये तोरण मिरवणुकीत दत्ता माने आणि वैजू नवघणे यांच्या टोळीमध्ये मारहाण झाली होती. यामध्ये नवघणेचा खून करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी मानेच्या भाच्याचाही खून करण्यात आला होता. सनीचा भाऊ स्वप्नील मोरे हा त्याचा मित्र आरिश जैन याच्या दुकानात गप्पा मारत बसला होता. त्यावेळी सनी हा देखील तेथेच होता. त्यावेळी अचानक आलेल्या टोळक्याने जैनच्या दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकून दुकानाचे शटर ओढून घेतले होते. यामध्ये सुनील आणि आरिश यांचा जळून मृत्यू झाला होता. सनीही गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणाची काही दिवसांपूर्वीच कोर्टात सुनावणी सुरू झाली होती. सनी हा त्यातील एक महत्त्वाचा साक्षीदार होता. सनीवर दोन चोरीचे गुन्हेही दाखल होते. गेल्या महिन्यात त्याच्यावर विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला होता. हा खून टोळी युद्धातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राफ्टिंग करताना महिलेचा बुडून मृत्यू

$
0
0

राफ्टिंग करताना महिलेचा बुडून मृत्यू
रायगड जिल्ह्यातील घटना

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

अॅडव्हेंचर स्पोर्टस् प्रकारातील 'राफ्टिंग'साठी पिंपळे-सौदागर येथून रायगड येथे गेलेल्या पत्रकार महालक्ष्मी हरिहरन (३३) यांचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (५ ऑगस्ट) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. हरिहन या राफ्टिंगदरम्यान नदीपात्रात वाहत गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास त्या बेशुद्धावस्थेत काही अंतरावर सापडल्या. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रायगड जिल्हातील कोलाड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी हरिहरन या रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील मानगाव भागात पती सुब्रमण्यम आणि इतर मित्र-मैंत्रिणींसह अॅडव्हेंचरसाठी गेल्या होत्या. तेथील एका रिसॉर्टतर्फे राफ्टिंगची सुविधा पुरवण्यात येत होती. राफ्टिंग करताना कुंडलिका नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने त्यांची बोट उलटली. एकूण चार बोटी होत्या चारही बोट एकदम उलटल्या. यातील इतर ६ जणांना बचाव कार्य टीमकडून वाचवण्यात आले. महालक्ष्मी यांनी रेस्क्यू टीमला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्या झाडाच्या फांदीला पकडून त्याच्या सहाय्याने थांबल्या. परिणामी काही वेळाने त्या पाण्यात वाहून गेल्या. त्यानंतर चार तासांनी रेस्क्यू टीमकडून त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्या बेशुद्ध होत्या. त्यांना दवाखान्यात तातडीने नेण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान महालक्ष्मी यांचा मृत्यू झाला. महालक्ष्मी यांनी पुण्यातील फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये ७ वर्षे, डीएनए वृत्तपत्रात ३ वर्षे रिपोर्टर म्हणून काम पाहिले होते. तसेच घटनेपूर्वी त्या पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील कॉर्पोरेट मासिकात सीनिअर रिपोर्टर म्हणून कार्यरत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस जिल्ह्यांत पावसाची शंभरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे २५ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस पडला आहे. मात्र, नंदुरबार, कोल्हापूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुमारे ५० ते ७५ टक्केच पाऊस झाला आहे.
राज्याच्या कृषी विभागाने एक जून ते दोन ऑगस्ट या कालावधीतील पावसाचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये २५ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत शंभर टक्के पाऊस झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नंदुरबार, कोल्हापूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, तर नाशिक, धुळे, सोलापूर, बीड आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस पडल्याचे या अहवालात म्हटले आहे.
राज्याचा एक जून ते दोन ऑगस्ट या कालावधीतील सरासरी पाऊस ६४५.५ मिलिमीटर झाला आहे. सरासरीच्या १०१.९ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी दोन तालुक्यांत २५ ते ५० टक्के पाऊस पडला आहे. २६ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, ९६ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के आणि २३१ तालुक्यांमध्ये शंभर आणि त्यापेक्षा अधिक टक्के पाऊस झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
.............
शंभर टक्के पाऊस झालेले जिल्हे
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, ​हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रीच्या धाग्यात बहरली तरुणाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चहाच्या टपरीपासून ते मोठ्या रेसॉर्टमधील टेबलांवर सकाळपासून रंगलेल्या गप्पांच्या मैफली, संध्याकाळी गल्लोगल्ली फ्रेंडशिप बँड घालून सेल्फी काढण्यामध्ये हरवलेली तरुणाई अन् सोशल नेटवर्किंग साइटवरून दिवसभर फिरत असलेल्या मैत्रीचे नाते उलगडणाऱ्या मेसेजचा आनंद घेऊन पुणेकरांनी रविवारी फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा केला.
शाळा-कॉलेमधील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांनी मैत्री दिनाच्या गेट टुगेदरचा आनंद लुटला. कॅम्प, फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड, कोथरूडमधील कॉलेजच्या गल्ल्यांमध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत तरुणांच्या कट्ट्यांवरील गप्पा रंगल्या होत्या. एवढेच नव्हे तर, सुट्टी असूनही दुपारी कॉलेजच्या बाहेर विद्यार्थी जमले होते. फ्रेंडशिप बँड, रिबिन आणि चॉकलेट देऊन त्यांनी फ्रेंडशिप डे साजरा केला. कॉलेज परिसरातील कॉफीशॉप, मॉलमधील स्नॅक्स सेंटरमध्ये गप्पा मारून तर, काहींनी भटकंतीला जाऊन मजा केली. सेलिब्रेशनमध्ये सेल्फी घेणे हा एक उपक्रम सगळीकडेच पाहायला मिळाला. गेटटुगेरदरचे हे फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाले होते. अनेकांची सकाळ व्हॉट्सअॅपवरील मैत्रीदिनाच्या शुभेच्छांनी झाली. गेल्या काही वर्षांपासून मैत्रीदिनाचा अविभाज्य भाग बनलेली भेटकार्डे आणि पिवळे गुलाब मात्र या वर्षी हद्दपार झालेले दिसून आले. सोशल नेटवर्किंग साइटचा वाढलेल्या वापर आणि फ्रेंडशिप बँडमधील असंख्य प्रकारांमुळे यंदा पिवळ्या गुलाबांना भाव मिळाला नाही. तरुणांनी पिवळ्या गुलाबांची मागणीच केली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली, असे मार्केट यार्डातील फुलविक्रेते सागर भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने नोंदवली रविवारीही हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अधूनमधून बरसलेल्या सरींमध्ये भिजत पुणेकरांनी उत्साहात फ्रेंडशिप डे साजरा केला. शहरात रात्री साडेआठपर्यंत ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी शहरात थांबून थांबून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रविवारी शहरात अधूनमधून पावसाने हजेरी लावली. अचानक बसरणारी सर आणि त्यानंतर पुन्हा ढगाळ हवामान असे वातावरण पुणेकरांनी अनुभवले. लोहगाव येथे सायंकाळी साडेपाचपर्यंत ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य प्रदेशचा ईशान्य भाग व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात पाऊस होत आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे (२७ मिलिमीटर) झाली. यवतमाळ येथे २७, रत्नागिरी येथे ४, चंद्रपूर येथे ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुढील दोन दिवसात राज्यात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात नागपंचमी उत्साहात साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
समृद्ध अधिवासाचे प्रतीक, शेतकऱ्यांचा मित्र आणि निसर्ग साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शहरातील महिलांनी रविवारी नागपंचमी उत्साहात साजरी केली. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नागांचे पूजन करण्यास बंदी असल्याने महिलांनी नागाच्या प्रतिमेच्या पूजनावर भर दिला.
नागपंचमी हा श्रावणातील महत्त्वाचा सण.. या दिवशी श्री शंकर आणि नागाचे पूजन करून पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे. या वेळी रविवारी नागपंचमी आल्याने महिलांनी घरातच नागाच्या प्रतिमेचे तर काहींनी टेकडीवर जाऊन वारुळाचे पूजन केले. काही वर्षापूर्वीपर्यंत नागपंचमीच्या दिवशी गारूडी सकाळी नागाला पेटाऱ्यात घेऊन गल्लोगल्ली फिरायचे. नागरिक याच नागाला दुधाचा नैवेद्य दाखवायचे. मात्र, वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार नाग बाळगण्यास तसेच जिवंत नाग पूजनावर बंदी आली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठेत नागाच्या आखीवरेखीव मूर्तीही उपलब्ध झाल्या आहेत. यंदाही महिलांना या प्रतिमांचे पूजन केले. सणानिमित्त घरोघरी पुरणाचे दिंड करून देवाला नैवेद्य दाखविण्यात आला.
दरम्यान, सापांची तस्करी आणि हत्येविषयी जनजागृती करण्यासाठी सर्पमित्रांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात फलक लावले होते. वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशनतर्फे विश्रांतवाडी येथील प्रतिकनगरमध्ये सापांची मूर्ती चौकात पूजनासाठी उपलब्ध केली होती. महिलांनी या मूर्तीची पूजा केली. तसेच, पंधरा ठिकाणी सापांविषयीचे गैरसमज दूर करणारे फलक लावले. गेल्या आठ ते दहा वर्षांत सर्पमित्रांतर्फे व्यापक स्तरावर राबविण्यात येणाऱ्या जनजागृतीपर मोहिमांमुळे शहरातील गारुड्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. वन विभागातर्फे दर नागपंचमीला कारवाई केली जात असल्याने गारुड्यांच्या संख्येवरही नियंत्रण आले आहे, असे असोसिएशनचे रवी लोहिरे यांनी सांगितले. सर्पमित्र अनिल अवचिते आणि त्यांच्या टीमनेही दिवसभरात वेगवेगळ्या भागात आढळलेले दोन तस्कर आणि तीन धामण पकडून रविवारी कात्रज येथील सर्पोद्यानामध्ये जमा केले. या वेळी भटंकतीदरम्यान कोठेही गारूडी दिसले नाहीत, ही चांगली घटना आहे, असे अवचिते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images