Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आरटीओच्या लायसन्स विभागात साचले पाणी

$
0
0

आरटीओच्या लायसन्स विभागात साचले पाणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लर्निंग लायसन्स विभागात शुक्रवारी एक ते दीड फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे या विभागातील कामकाज पूर्णपणे ठप्प होते. पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करावे लागले. दर पावसाळ्यात लर्निंग लायसन्स विभाग व आटीओच्या परिसरात पाणी साचते. गेल्या वर्षीही लर्निंग लायसन्स विभागात पाणी साचून चिखल झाला होता. या प्रकारामुळे शुक्रवारी सर्व नागरिकांना परत जावे लागले. आरटीओकडून राज्य सरकारला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, त्यानंतरही या विभागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे.

मुख्यमंत्र्यांकडे दाद
काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याची पाणीकपात तातडीने रद्द करण्याची मागणी केली. या प्रश्नावर पुण्यात सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरल्याच्या पार्श्वभूमीवर गाडगीळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच दाद मागत, या विषयी राजकारण न करण्याचे आवाहनही केले. 'धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही बापट यांनी पुण्याची पाणीकपात सुरूच ठेवण्याची भूमिका का घेतली, हे समजू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनीच या समस्येवर मार्ग काढावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी या विषयी सकारात्मक संकेत दिले,' अशी माहिती गाडगीळ यांनी दिली.

'मनसे'चे आंदोलन
पुणेकरांना नियमित पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही पालकमंत्री बापट यांच्या घरासमोर उपोषण करण्यास सुरुवात केली होती. मात्र, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये उपोषण सुरू केले. आंदोलनकर्त्यांना संध्याकाळी समज देऊन सोडण्यात आले. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विदर्भ अनुशेषाला सरकारे कारणीभूत

$
0
0

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्र​तिपादन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वेगळ्या विदर्भाची मागणी ही मंत्री होण्याची इच्छा असणाऱ्यांची आणि भांडवलदारांची आहे; विदर्भातील श्रमिक, आदिवासी आणि शेतकऱ्यांची नाही. विदर्भाचा अनुशेष राहण्यास आजपर्यंतची राज्य सरकारे जबाबदार असून, तो भरून काढण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसण्यास तयार आहे,' असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने 'संयुक्त महाराष्ट्र' या विषयावर सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे, कॉम्रेड अजित अभ्यंकर, टेक्सास गायकवाड आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबुराव कानडे उपस्थित होते.
'भाजपचा छोटी राज्य निर्माण करण्याचा उघड अजेंडा आहे. हा अजेंडा घटनाविरोधी आहे. स्वतंत्र विदर्भ करण्याऐवजी विदर्भाचा अनुशेष भरून काढावा. विदर्भाचा अनुशेष राहण्यास आतापर्यंतची राज्य सरकारे जबाबदार आहेत. आता विकासामध्ये विदर्भाला झुकते माप देण्याची भूमिका घेतली पाहिजे. या मागणीसाठी उपोषणाला बसण्यास तयार आहे,' असेही ते म्हणाले. अखंड महाराष्ट्रासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करावी, अशी सूचनाही त्यांनी मांडली.

'संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे, हे विसरून चालणार नाही. त्याचबरोबर विदर्भातील लोकांच्या वेदना लक्षात घेतल्या पाहिजेत. वेदनामुक्त अखंड महाराष्ट्र होण्याची गरज आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले. 'विदर्भातील लोक आळशी आहेत,' अशी टीका काकडे यांनी केली. ते म्हणाले, 'पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केल्याची ओरड केली जाते. मात्र, विदर्भातील लोकांनीही फारसे काही केले नाही. विदर्भात सहकार चळवळ वाढली नाही. विदर्भाचा निधी हा पश्चिम महाराष्ट्राने कधीही घेतला नाही.'
'विदर्भात जोडधंदे कमी आहेत. याचा विचार झाला पहिजे.' असे देशपांडे यांनी नमूद केले. स्वतंत्र विदर्भ केल्यास महसूल कोठून येणार, असा सवाल अभ्यंकर यांनी केला. ते म्हणाले, 'खनिज संपत्तीवर राज्य चालवणे, हा भ्रम आहे.' गायकवाड आणि कानडे यांनीही वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध दर्शवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोसाठी रेल्वेची लवकरच ‘एनओसी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्य रेल्वेच्या जागेवरून जाणाऱ्या पुणे मेट्रोसाठी रेल्वे मंत्रालयाकडून तातडीने 'एनओसी' दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. ही 'एनओसी' मिळाल्यावर मेट्रोच्या अंतिम मान्यतेसाठीचा एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला जाणार आहे.
पुणे मेट्रोच्या विकास आराखड्याबद्दल २३ जून रोजी 'प्री पीआयबी' बैठकीत रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या जागेवरून जाणाऱ्या मेट्रो मार्गासाठी एनओसी आवश्यक असल्याचे नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर ही 'एनओसी' तातडीने मिळविण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी दिल्लीत प्रभू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी प्रभू यांनी 'एनओसी'बाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.
'प्री पीआयबी' बैठकीनंतर या 'एनओसी'साठी महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी व मध्य रेल्वेचे पुणे कार्यालय यांची ३० जून रोजी बैठक झाली होती. प्रस्तावित 'एनओसी'मुळे पुणे मेट्रोच्या विकास आराखड्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची अधिकृत भूमिका मांडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असे शिरो‍ळे यांनी नमूद केले. दरम्यान, शिरोळे यांनी प्रभू यांची भेट घेतली तेव्हाच प्रभू यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांना दूरध्वनीवरून पुढील प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचना केल्याचे शिरोळे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंत्याचे राजस्थानात अपहरण

$
0
0

तीस लाखांची खंडणी वसूल करूनच सुटका; गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
व्यवसायानिमित्त राजस्थानमध्ये बोलावून पुण्यातील इंजिनीअरचे अपहरण केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. २९ लाख रुपयांची खंडणी घेतल्यानंतर इंजिनीअर आणि त्याच्या सहकाऱ्याची सुटका करण्यात आली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक संजू आगाशे (वय ३०, रा. संतोष कुटी, ७८२ डेक्कन) आणि बाळकृष्ण कल्याण पांडुळे अशी सुटका झालेल्या दोघांनी नावे आहेत. आगाशे यांचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या कच्च्या मालाचा व्यवसाय आहे. पांडुळे त्यांच्याकडे काम करतात. आगाशे यांनी कच्चा माल विकत घेण्यासंदर्भात एका वेबसाइटवर माहिती दिली होती. ती पाहून मोहित शर्मा (राजस्थान) नावाच्या व्यक्तीने त्यांना मोबाइलवर संपर्क साधला. आमच्याकडे कच्चा माल उपलब्ध असून, तत्काळ पेमेंट केल्यास माल देण्यात येईल, असे सांगितले. मात्र, आगाशे यांनी ओळख नसल्याने त्याला नकार देऊन स्वतः राजस्थानात येऊन माल पाहून खरेदी करणार असल्याचे सांगितले. १७ जुलै रोजी अभिषेक आणि पांडुळे भरतपूरला गेले. त्यावेळी मोहितने त्यांना घेण्यासाठी कार पाठविली होती. कारमध्ये चालक आणि अन्य एक जण होता. दोघेही कारमध्ये बसल्यानंतर कार कच्च्या रोडने निघाली. काही अंतरावर दुचाकीवरून अन्य एक जण आला आणि त्यांनी या दोघांना मोटारसायकलवर बसविले.
त्यावेळी आगाशे यांनी ट्रिपल सीट जाण्याविषयी शंका व्यक्त केली. त्यावर आम्हीच पोलिस चौकी चालवितो, असे मोटारसायकलस्वाराने त्यांना सांगितले. समोरून येणाऱ्या एका
मोटारसायकलस्वाराने तिघांना अडवले. त्याच्या हातात गावठी कट्टे होते. त्यांनी आगाशेंकडील मोबाइल, लॅपटॉप, घड्याळ आणि २५ हजार रुपये असा ऐवज काढून घेतला. त्यानंतर दोघांना झोपडीत नेऊन छातीवर गावठी कट्टा ठेवून ३० लाखांच्या खंडणीची मागणी केली. पैसे हवालामार्फत तात्काळ मागविण्यास सांगितले. त्यावर आगाशे यांनी पुण्यात वडिलांना फोन करून तीस लाख रुपये आरटीजीएसने बँक खात्यात टाकण्यास सांगितले.
त्यानुसार वडिलांनी पैसे जमा केले. त्यानंतर आरोपींनी या दोघांना नदीपात्रातून दुसऱ्या बाजूला नेऊन हवेत गोळीबार केला. आरोपींनी अभिषेक आणि पांडुळे यांना परिसरातील एका रेल्वे रूळावर सोडून पोबारा केला. आगाशे आणि पांडुळे २० जुलै रोजी पुण्यात परतले. त्यांनी ४ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचव्या फेरीत मिळाले साडेनऊ हजार प्रवेश

$
0
0

सुमारे २३०० विद्यार्थी प्रक्रियेच्या बाहेर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पाचव्या फेरीतून अॅलॉटमेंट मिळालेल्या ११ हजार ८९४ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी आपला पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित केला. मात्र, त्याच वेळी २ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी अॅलॉटमेंट मिळूनही प्रवेश न घेतल्याने ते प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडल्याचे केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्यावतीने शुक्रवारी सांगण्यात आले.
प्रवेश प्रक्रियेविषयी विविध तक्रारी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी फेरी घेण्यात आली. समितीने अकरावीच्या २६ हजार ३४८ जागांसाठी प्रवेश प्रक्रियेच्या पाचव्या फेरीची अॅलॉटमेंट बुधवारी रात्री जाहीर केली. त्यामध्ये ११ हजार ८९४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. या फेरीमध्ये १६ हजार १८९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र, त्यापैकी १४ हजार ४२७ विद्यार्थ्यांनीच नव्याने पसंतीक्रमाचे अर्ज भरले होते.
अॅलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी आणि शुक्रवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घ्यायचा होता. या अंतर्गत गुरुवारी शुक्रवारी पाच वाजेपर्यंत ९ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. प्रक्रियेत २ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी अॅलॉटमेंट मिळूनही प्रवेश न घेतल्याने ते प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडले. समितीमार्फत सहा विद्यार्थ्यांचा पसंतीक्रमाचा अर्ज नाकारण्यात आला आहे; तर २७ विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले आहेत.
पाचव्या फेरीतून प्रवेश न मिळालेल्या दोन हजार ५३३ विद्यार्थ्यांचा समावेश हा या फेरीच्या 'ब' भागात करण्यात येणार होता. मात्र, त्यांचा समावेश करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा समावेश विशेष फेरी एकमध्ये करण्यात येणार आहे, असे समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. दरम्यान, पाचव्या फेरीच्या 'ब' भागात अकरावी प्रवेशासाठी पहिल्यांदा अर्ज करणारे आणि अपूर्ण अर्ज भरणाऱ्या दोन हजार ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 'ब' भागात १४ हजार ४५४ रिक्त जागांसाठी १ हजार ५९० विद्यार्थ्यांची अॅलॉटमेंट शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी ८ ऑगस्ट सकाळी अकरा ते पाच तर मंगळवारी ९ ऑगस्टला सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत प्रवेश घ्यायचा आहे. तसेच, फेरीच्या 'ब' भागातून प्रवेश न मिळालेल्या ४२१ विद्यार्थ्यांचा विशेष फेरीत समावेश करण्यात येईल.
.....
विशेष फेरीचा तपशील बुधवारी
प्रवेश प्रक्रियेविषयी आतापर्यंत विविध तक्रारी असणाऱ्या, पाचव्या फेरीत व फेरीच्या 'ब' भागातून प्रवेश न मिळालेल्या, प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज न केलेल्या किंवा अर्धवट अर्ज भरलेल्या अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा समावेश विशेष फेरीमध्ये करण्यात येईल. या फेरीसाठी कॉलेजच्या रिक्त जागांचा तपशील येत्या बुधवारी (१० ऑगस्ट) सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना १० आणि ११ ऑगस्टला वेबसाइटवरून पसंतीक्रमाचा अर्ज भरायचा आहे. गुणवत्ता यादी १२ ऑगस्टला जाहीर होईल. यादीतील अॅलॉटमेंटनुसार विद्यार्थ्यांना १२ आणि ११ ऑगस्टला प्रवेश घ्यायचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘द साँग’ला ‘मिशेलिन स्टार’

$
0
0

ठरले आशिया खंडातील पहिले रेस्तराँ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंगापूर येथील आधुनिक भारतीय रेस्तराँ म्हणून प्रसिद्ध झालेल्या 'द साँग ऑफ इंडिया'ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे 'मिशेलिन स्टार' नामांकन मिळाले आहे. हे नामांकन मिळवणारे आशिया खंडातील ते एकमेव भारतीय रेस्तराँ ठरले आहे.
पुण्याचे मिलिंद सोवनी यांनी २००६मध्ये हे रेस्तराँ सुरू केले. त्याआधी ते 'रंग महल' या रेस्तराँमध्ये कॉर्पोरेट शेफ म्हणून प्रसिद्ध होते. भारतीय खाद्य पदार्थ म्हणजे दाक्षिणात्य किंवा पंजाबी हा समज दूर करण्यासाठी सोवनी यांनी 'द साँग ऑफ इंडिया'ची सुरुवात केली. गेल्या दहा वर्षांत या रेस्तराँचा लौकिक वाढला असून, 'मिशेलिन स्टार' या नामांकनामुळे शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
'नावावरून रेस्तराँ वाटू नये आणि उत्सुकता ताणली जावी या उद्देशाने अनोखे नाव निवडले. आधुनिक भारतीय खाद्य पदार्थांची त्याठिकाणी ओळख करून देणे आवश्यक होते. भारतीय खाद्य पदार्थ म्हणजे दाक्षिणात्य किंवा पंजाबी हा समज दृढ होता. आम्ही आमच्या देशातील खाद्य संस्कृतीचे कौतुक करत आहोत, असा संदेश देणे आवश्यक वाटल्याने नावापासून सर्वच गोष्टी प्रयोगशील कशा होतील, याची काळजी घेतली. मिशेलिन स्टार यांच्या वतीने २००९ मध्ये झालेल्या पाहणीत सिंगापूर येथील चार रेस्तराँची खाद्य संस्कृती जपत असल्याबद्दल निवड केली होती. त्यामध्ये द साँग ऑफ इंडियाचा समावेश होता; पण तेव्हा मिशेलिन स्टार नामांकन मिळाले नव्हते. यंदाच्या वर्षी झालेल्या पाहणीत हा बहुमान मिळाला आहे. सिंगापूर येथील २२ रेस्तराँला हे नामांकन मिळाले असून त्यामध्ये द साँग ऑफ इंडियाचा समावेश आहे. आशिया खंडात यंदा असा बहुमान मिळविणारे हे एकमेव भारतीय रेस्तराँ आहे,' अशी माहिती सोवनी यांनी 'मटा'ला दिली.
.
'कलाप्रकार म्हणून मिळावी ओळख'
खाद्यपदार्थ हा कलाप्रकार म्हणून ओळखला जावा यासाठी तो बनविण्यापासून ते सादर करण्यापर्यंत कलात्मक शैली वापरली जाते. 'द साँग ऑफ इंडिया'मधील कोथिंबिरीच्या वड्या खूपच प्रसिद्ध आहेत. पुण्यातील 'एप्रिल रेन' या रेस्तराँने देखील अशीच वेगळी ओळख जपली आहे. एप्रिलमधील कडक उन्हात पाऊस आल्यानंतर वाटणारा आल्हादायक गारवा येथे अनुभवता येतो, असेही मिलिंद सोवनी यांनी आवर्जून नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोमांस विक्रीप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

$
0
0

बारामती येथील प्रकार; साडेसहा लाखांचा ऐवज जप्त

म. टा. वृत्तसेवा, बारामती
शहरातील गुणवडी रस्त्याजवळ कऱ्हा नदीच्या पात्रालगत गोहत्या करून मांस विक्रीस नेणाऱ्या पाच जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी मांसासह, कत्तलीसाठी आणलेली जनावरे, वाहतुकीसाठी वापरात येणारी पिकअप जीप असा सुमारे साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत पोलिस उपनिरीक्षक राहील औदुंबर यादव यांनी फिर्याद दाखल केली. जावेद हरुण कुरेशी (वय २६, रा. अबूबक्र इमारत, देवळे इस्टेट, बारामती), ख्वाजा सैफन शेख (वय २६, रा. गुणवडी रोड, बारामती), शकील खलील सय्यद (वय ४०, रा. मळद, ता. बारामती), शब्बीर महंमद सय्यद (वय २३, रा. कसबा) आणि जीपचालक दीपक शिवाजी साळवे (वय ३०, रा. वाघा, ता. जामखेड, जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
शहरातील गुणवडी रस्त्यालगत गावडे हॉस्पिटलजवळील अबूबक्र इमारतीमध्ये गाई, बैलांची बेकायदा कत्तल करून मांस विक्री केली जात आहे, तसेच कत्तलीसाठी गाई, बैल आणले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. आरोपींकडे जनावरे कापण्याचा परवाना आहे का, याची विचारणा पोलिसांनी केली. आरोपींकडे परवाना नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून तयार मांस तसेच कत्तलीसाठी आणलेले गाई, बैल आणि वाहतुकीसाठी वापरात येणारी जीप (एमएच ४२ एम ८०८५) असा सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या गोमांसापैकी काही गोमांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, उर्वरित मांस नष्ट करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक गणेश क्षीरसागर तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजबंद मेसेजसाठी मोबाइल नोंदणी हवी

$
0
0

तांत्रिक बिघाड, दुरुस्तीची माहिती ग्राहकांना देणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महावितरणतर्फे वीज बंदच्या कालावधीची माहिती 'एसएमएस'वर पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
सध्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज बिलाबाबत 'एसएमएस' पाठवण्यात येतात. आता वीजबंद असल्याच्या कालावधीची माहिती मिळण्यासाठीही ग्राहकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल आणि दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना 'एसएमएस'द्वारे कळवण्यात येणार आहे. महावितरणने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या 'कर्मचारी मित्र' या मोबाइल अ‍ॅपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीजवाहिनीची नोंद घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित वीजवाहिनीवरील वीजग्राहकांच्या मोबाइलवर वीजबंदबाबतच्या कालावधीची माहिती 'एसएमएस'द्वारे कळवण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वीजग्राहकांच्या मोबाइलवर प्रायोगिक तत्वावर मासिक वीजबिलाची माहिती 'एसएमएस'द्वारे पाठवण्यात येत आहे. ही सुविधा लवकरच ग्रामीण भागात सुरू होणार आहे. बिलाची मागणी नोंदवणाऱ्या ग्राहकांना ई-मेल पाठवण्यात येत आहे.
आतापर्यंत पुणे परिमंडलातील सात लाख ३९ हजार ६६९ वीजग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे; तसेच दोन लाख तीन हजार ७५ ग्राहकांनी ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे.
महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये ९२२५५९२२५५ या क्रमांकावर 'एसएमएस'द्वारे वीजग्राहकांना स्वतःचा ई-मेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. या क्रमांकावर १२ अंकी ग्राहक क्रमांक आणि वीजग्राहकाचा ई-मेल अशी माहिती टाइप करून 'एसएमएस' केल्यास ई-मेल आयडीची नोंदणी होईल. नोंदणी करायच्या मोबाइल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर बारा अंकी ग्राहक क्रमांक टाइप करून 'एसएमएस' केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंदणी होणार आहे.
..
टोल फ्री क्रमांकही उपलब्ध
महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रात ग्राहकांना मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची व्यवस्था आहे. या शिवाय कॉल सेंटरचे १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून, कोणत्याही कंपनीच्या मोबाइल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीजपुरवठ्यातही दुजाभाव

$
0
0

महावितरणकडे देखभाल दुरुस्तीसाठी साधनेच नाहीत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाणीपुरवठ्याबाबत राज्य सरकारकडून पुणेकरांवर अन्याय होत असल्याची भावना तीव्र होत असतानाच वीजपुरवठा यंत्रणांबाबतही सरकारकडून पुण्याबाबत असाच दुजाभाव सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
शहर आणि परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी महावितरणच्या पुणे विभागाने पावसाळ्यापूर्वी मागविलेले साहित्य निम्मा पावसाळा सरल्यानंतरही अजून मिळालेले नाही. या साधनांच्या अभावी देखभाल दुरुस्तीची कामे होणे अवघड असल्यानेच शहर आणि परिसरात वीजपुरवठ्याचा यंदाच्या पावसाळ्यात वारंवार बोजवारा उडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार केलेल्या अर्जावर खुद्द महावितरणनेच ही माहिती दिली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या काळात वीजपुरवठा यंत्रणेत बिघाड होतात आणि वीजपुरवठा खंडित होतो. त्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वतीने शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी देखभालदुरुस्तीची कामे करण्यात येतात. त्यामध्ये झाडे किंवा झाड्यांच्या फांद्या तोडण्यासह अनेक ठिकाणी केबल, ट्रान्सफॉर्मर्स, कंडक्टर बदलणे, ट्रान्सफॉर्मरचे ऑइल बदलणे अशा कामांचा समावेश आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणात उच्चदाब आणि लघूदाब केबल्स, इन्सुलेटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, ऑइल, कंडक्टर, विजेचे खांब, स्विच, फ्यूज अशी अनेक साधने आणि सुट्या भागांची गरज भासते. यापैकी किती साधने मिळाली, याबाबतची माहिती वेलणकर यांनी मागविली होती. त्यावर उत्तर देताना २७ मे रोजी महावितरणच्या पुणे परिमंडळाने मुख्य कार्यालयाकडे साधने व सुट्या भागांची मागणी केली होती. मात्र, निम्मा पावसाळा सरत आला, तरी यापैकी एकही उपकरण आणि सुटे भाग मिळाले आहेत, असे महावितरणने म्हटले आहे.
देखभाल दुरुस्तीसाठी साधने आतापर्यंत उपलब्ध न झाल्यामुळे देखभाल दुरूस्तीची कामे कशा प्रकारे झाली असतील, याची कल्पना न केलेलेच बरे, असे वेलणकर यांनी म्हटले आहे. यंदाच्या पावसाळ्यात बाणेर-बालेवाडी परिसरात जवळपास ५० तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याबरोबरच अनेक भागांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. खरे तर पुणे शहर आणि परिसरात सर्वाधिक वीजग्राहक असून येथून महावितरणला सर्वाधिक उत्पन्न मिळते.
..
'पुण्यातूनच मिळते सर्वाधिक उत्पन्न'
बिलांच्या वसुलीचे प्रमाणही राज्यात सर्वाधिक आहे. अशा परिसराकडे महावितरणचे कायमच दुर्लक्ष होत असल्यानेच नागरिकांचे हाल होत असल्याची टीका सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर केली आहे. यापूर्वीही पुणे परिमंडळाने केलेल्या मागणीपैकी २५ ते ३० टक्के इतकीच साधने उपलब्ध होत असत. यंदा मात्र, शून्य टक्के साधने उपलब्ध झाल्याने यावर कळस झाला, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महामंडळाच्या घटनेत होणार दुरुस्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या घटना दुरुस्ती समितीने सुचवलेल्या तरतुदींना महामंडळाच्या संचालकांनी मान्यता दिली असून, ३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत तरतुदी मांडण्यात येणार आहेत. त्यानंतर घटनेत दुरुस्ती करण्यात येणार आहे.

नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घटना दुरुस्तीतील तरतुदींना मान्यता देण्यात आली. त्यामध्ये ब वर्ग सभासदत्वाचा कालावधी ३ वर्षांवरून २ वर्षे करण्यात आला असून, दोन वर्षांनंतर त्वरित सभासदांना अ वर्ग सभासद होता येणार आहे. त्यामुळे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळणार आहे. याशिवाय महामंडळाचे संचालक मंडळ १७ जणांचे असावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार संचालक मंडळात एका निर्मात्याची, एका दिग्दर्शकाची वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. नृत्य आणि संगीत मिळून एक संचालक मंडळात असायचा; आता मात्र दोन्ही विभाग वेगळे करण्यात आले असून, नृत्यासाठी स्वतंत्र संचालक असावा, अशी तरतूद घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आली आहे. तसेच, संचालक मंडळात तीन स्वीकृत सदस्य असावेत, अशी शिफारस देखील करण्यात आली आहे. घटना दुरुस्तीच्या तरतुदींमध्ये आजीव सभासदांसंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, चित्रपट क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती गाजवणाऱ्या कलाकारांना महामंडळाकडून विनामूल्य आजीव सभासद करून घेतले जाणार आहे. चित्रपटांचे निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ, कामगार, सेवा व सामग्री पुरवठादार या सर्वाना करारपत्र करणे बंधनकारक करण्याची तरतूद करण्यात आली असून, घटना दुरुस्तीला मान्यता मिळाल्यानंतर सर्व घटकांना करारपत्र करणे बंधनकारक राहणार आहे.

महाराष्ट्रभर चित्रपट महामंडळ पोहोचावे आणि त्याचा स्थानिक कलाकारांना उपयोग व्हावा, यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात संपर्क कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये समिती नेमण्यात आली आहे - मेघराजराजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ



घटना दुरुस्तीने सुचवलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे

१. ब वर्ग सभासदत्वाचा कालावधी ३ वर्षांवरून २ वर्षे.

२. वय वर्ष ६० पूर्ण किंवा चित्रसृष्टीत २५ वर्षे काम केलेल्या कलाकारांना महामंडळाचे आजीव सभासद.

३. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळविणाऱ्या कलावंत, तंत्रज्ञ यांना विनाशुल्क विशेष आजीव सभासदत्व.

४. निर्माते आणि कलाकार, तंत्रज्ञ, कामगार, सेवा व सामग्री पुरवठादारांना करारपत्र करणे बंधनकारक.

५. मराठी चित्रपट व्यवसायात उपयुक्त ठरेल असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस सन्माननीय आजीव सभासदत्व.

६. महामंडळाचे संचालक १४ वरून १७ असावेत, अशी शिफारस.

७. किमान ३ स्वीकृत सदस्य करण्यासाठी शिफारस केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गगनाला पंख नवे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मटा हेल्पलाइन' या उपक्रमांतर्गत मदत मिळालेल्या १५ विद्यार्थ्यांना आज, रविवारी (७ ऑगस्ट) चेक प्रदान करण्याचा कार्यक्रम होत आहे. त्या निमित्ताने, याआधी या उपक्रमांतर्गत मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या भावनांचे हे प्रातिनिधिक शब्दरूप...
.........
'मटा हेल्पलाइन' या उपक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण केवळ आर्थिक समस्यांमुळे अडू नये, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत पुण्यामध्ये गेल्या पाच वर्षांत ३६ गुणवंत विद्यार्थ्यांना भरघोस मदत मिळाली. यंदा 'मटा हेल्पलाइन'द्वारे १५ विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ दिले जात आहे. केवळ वाचकांच्या प्रतिसादावर चालणारा हा एक अनोखा उपक्रम. आर्थिक अडचणींवर जिद्दीने मात करून दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पैशांअभावी अडू नये, याकरिता 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे हा उपक्रम सुरू झाला. प्रतिकूलतेच्या पाषाणावर पाय रोवून उमललेली जिद्दीची रोपे आणि त्याला सलाम करत, आणखी बहरण्यासाठी बळ देणारे दानतीचे अनेक अनाम हात, हेच चित्र गेली पाच वर्षे अनुभवास येते आहे. यंदाही अशाच अनेक अनाम हातांनी 'मटा हेल्पलाइन'च्या १५ शिलेदारांना उत्स्फूर्तपणे मदत देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
एकीकडे 'समाजात संवेदनशीलता राहिली आहे का,' असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशा काही घटना घडतात, हे वास्तव आहेच; पण चांगल्या कामासाठी भरभरून पाठिंबा देण्याची वृत्तीही समाजात आहे, याची खात्रीच या उपक्रमाच्या निमित्ताने पटते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कर्तृत्ववान विद्यार्थ्यांची यशोगाथा 'मटा'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मदतीचा ओघ सुरू होतो, तो अगदी या मुलांना चेक प्रदान करण्याच्या कार्यक्रमापर्यंत कायम राहतो, असा गेल्या पाच वर्षांतील अनुभव आहे. यंदाचा अनुभवही असाच होता. दहा रुपयांपासून काही हजार रुपयांपर्यंत मदत करणारे वाचक आहेत; पण यामध्ये किती पैसे दिले यापेक्षाही चांगल्या कामाला मनापासून मदत करण्याची वाचकांची तळमळ महत्त्वाची आहे. कधी लहान मुले येऊन आपल्याला मिळालेले खाऊचे पैसे 'हेल्पलाइन'साठी देतात, तर कधी कोणी आजी-आजोबा मिळालेल्या पेन्शनचा वाटा या कामासाठी देऊ करतात. आणि हे सर्व करणे असतेही एकदम निरपेक्ष. खऱ्या अर्थाने ही कर्तृत्वाला मिळणारी दातृत्वाची साथ असते.
'शिक्षणाची आस आहे, गुणवत्तेची कास आहे आणि सर्वोत्तमाचा ध्यास आहे,' अशी भावना असलेले अनेक विद्यार्थी समाजात आहेत. अशा गुणवंतांचे शिक्षण केवळ आर्थिक समस्येमुळे अडू नये, यासाठी 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून, 'बळ हवे पंखांना' अशी साद घातली जाते आणि त्याला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
गेल्या पाच वर्षांत ही मदत मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्येही आपल्याला मिळालेल्या मदतीबाबत कृतज्ञ भाव आहे, हेही महत्त्वाचेच. आपल्याला मिळालेली मदत आपल्या शिक्षणासाठी आहे, याचे भान थोडेही सुटू न देणे, हे या मुलांचे वय पाहता, खरोखरच कौतुकास्पद आहे. आपल्यावर असलेल्या जबाबदारीची त्यांना उत्तम जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत ज्या विद्यार्थ्यांना 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून मदत मिळाली आहे, ते पुढील शिक्षणातही उत्तम कामगिरी करत आहेत. रिझल्ट लागल्यावर तो सांगण्यासाठी त्यांचे पाय आपोआपच 'मटा'च्या कार्यालयाकडे वळतात, हे आश्वासक आहे. त्यांचे ध्येय गाठण्यासाठी तर ते प्रयत्न करतच आहेत; पण देणाऱ्याचे 'हात' घेण्याची शपथही त्यांनी घेतली आहे, हे त्याहूनही महत्त्वाचे आहे...
---
'सीए होण्याचे स्वप्न पूर्ण करणार'
...
(अनुजा नांदे : २०१४ )
..
उराशी सीए होण्याचे स्वप्न बाळगलेल्या अनुजाला दोन वर्षांपूर्वी आपल्याला शिक्षणासाठी कुठून पैसा मिळणार याची काळजी होती. मात्र, 'मटा हेल्पलाइन'मुळे भक्कम आधार मिळाला. अनुजा आणि तिचे कुटुंबीय हडपसर येथील एका चाळीत छोट्या घरात राहतात. तिचे वडील रिक्षा चालविण्याचे काम करतात. चाळीतल्या गोंधळातही तिने चांगला अभ्यास करून उत्तम मार्क मिळविले. 'पुढील शिक्षणाची चिंता होती; पण 'मटा हेल्पलाइन'द्वारे मिळालेल्या रकमेतून तिच्या पुढील शिक्षणाची सर्व काळजी मिटली,' अशी प्रतिक्रिया अनुजाच्या आईने दिली. अनुजाला बारावी कॉमर्सला ८५ टक्के मार्क मिळाले आहेत. तिने 'सीपीटी'ची परीक्षाही दिली असून, त्यात तिला १६५ मार्क मिळाले आहेत. अनुजाला सीए व्हायचे असून, तिने त्यासाठी आवश्यक क्लास लावले आहेत.
---
'ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू'
..
(सुप्रिया आगम : २०१२)
..
'मटा हेल्पलाइन'ची मदत नसती, तर आयुष्य खूप वेगळे असू शकले असते; पण स्वप्नांना बळ मिळाले आणि आज मी ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करते आहे. असा पाठिंबा मिळायला नशीब असावे लागते. म्हणूनच खूप अभ्यास करा आणि यशस्वी व्हा, असेच मी यंदा 'मटा हेल्पलाइन'ची मदत मिळालेल्या शिलेदारांना सांगेन...' हे शब्द आहेत सुप्रिया आगमचे. मुंढव्यातल्या छोट्याश्या खोलीतले वास्तव्य, भाजीच्या गाडीवर चालणारे घर अशा परिस्थितीतही अभ्यास आणि स्वप्नांचा पाठपुरावा करण्यात तिने कुठलीही कसर ठेवली नाही. तिच्या या स्वप्नांना तिचे पालक आणि 'मटा हेल्पलाइन'चा भक्कम आधार मिळाला. आज सुप्रिया कमिन्स कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकते आहे. सन २०१२ मध्ये दहावीला तिने ९२.७३ टक्के गुण मिळवले होते. तिला इंजिनीअरिंगच्या सगळ्या सेमिस्टरना डिस्टिंक्शन मिळाले आहे. 'घरी मला अभ्यासाशिवाय कोणतेही काम सांगितले जात नाही. मी क्लास न लावता माझ्या पद्धतीने अभ्यास करते आहे. वडील आता घोरपडीत पूना सिक्युरिटीमध्ये काम करताहेत. बहीण तन्वीनेही दहावीला ९२ टक्के मार्क मिळवले. ती बीएमसीसीत शिकते आहे आणि तिला सीए करायचे आहे,' असे सुप्रिया सांगते.
---
'इंजिनीअर बनण्याच्या दिशेने मार्गस्थ'
..
(अंकिता ठोंबरे : २०१३)
..
घरची परिस्थिती बेताची असतानाही अहोरात्र अभ्यास करून अंकिता ठोंबरे या विद्यार्थिनीने दहावीत ९६.३६ टक्के गुण मिळवले. लहानपणापासून पहिल्या नंबरात येणारी अंकिता आज इंजिनीअर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तिने इंजिनीअरच्या प्रथम वर्षातही ९६ टक्के गुण मिळविले आहेत. कोथरूड येथील जयभवानीनगर येथे लहानशा घरात राहणाऱ्या अंकिताने रात्रंदिवस अभ्यास करून ९६.३६ टक्के गुण मिळविले. परिस्थितीमुळे आपण पुढील शिक्षण कसे घेणार, याची तिला सतत चिंता वाटायची. त्यामुळे ९६ टक्के गुण मिळवूनही तिने कॉमर्सला जाण्याचा निर्णय घेतला होता; परंतु 'मटा'ने दिलेल्या मदतीमुळे आज ती तिचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. अंकिताने गरवारे कॉलेजमधून सायन्समधून अकरावी-बारावी पूर्ण केले. बारावीला तिने ८० टक्के गुण मिळविले. सध्या ती काशीबाई नवले इंजिनीअर कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असून, तिच्या यशाची घौडदोड सुरू तितक्याच वेगाने सुरू आहे. तिने प्रथम वर्षातही ९६ टक्के गुण मिळवले.
---
'स्वप्न वास्तवात येणार आहे'
...
(रेवती जगताप : २०१४)
...
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतही रेवती जगताप या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१.४० टक्के गुण मिळवले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपले शिक्षण घेण्याचे स्वप्न अर्धवट राहील की काय, याची तिला कायम भीती होती. ती भीती 'मटा'च्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे दूर झाली आहे. रेवतीचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. रेवती आज हडपसरला जेएसपीएम संस्थेच्या की स्टोन कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात गेली आहे. बारावीत तिने ७५ टक्के गुण मिळविले. रेवतीच्या आईच्या कमाईवर तिचे घर अवलंबून आहे. ऐन दहावीच्या परीक्षेत रेवतीच्या आर्इचा अपघात झाला. त्यात आर्इचा पाय फ्रॅक्चर झाला. अशा वेळी रेवतीने घर सांभाळून अभ्यास केला होता.
---
'बारावीतही चांगले मार्क मिळवेनच'
..
(अंजली हिवरे : २०१५)
..
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही दहावीत ९१.२० टक्के गुण मिळवून इंजिनीअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेली अंजली हिवरे ही त्या दिशेने पावले टाकत आहे. 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून पुणेकरांनी केलेल्या मदतीमुळे तिची वाटचाल सुकर होत आहे. औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या अंजलीची चिंता तिला 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे दूर झाली. आता ती मराठवाडा मित्रमंडळाच्या कॉलेज ऑफ सायन्समध्ये बारावीत शिकत असून, तिने अकरावीत ८१ टक्के गुण मिळवले आहेत. बारावीत चांगले मार्क मिळण्यासाठी ती कॉलेज सांभाळून दिवसातून चार-पाच तास अभ्यास करीत आहे. हा अभ्यास करतानाच तिने 'सीईटी' आणि 'जेईई'चा अभ्यास करण्याचे नियोजन केले आहे.
---
'आहे आयआयटीचा ध्यास'
..
(निकिता रेणुसे : २०१५)
..
आंबेगाव पठार येथील चाळीतील दोन खोल्यांच्या घरात दाटीवाटीने राहणाऱ्या कुटुंबातील निकिता रेणुसे या विद्यार्थिनीने सन २०१५ मध्ये दहावीला ९७.२० टक्के मिळवले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकणाऱ्या निकीताला 'मटा हेल्पलाइन'ची साथ मिळाली आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. दहावीनंतर तिने सायन्सला प्रवेश घेतला. सध्या ती 'आयआयटी'ची तयारी करीत आहे. अकरावीला गणितात तिला ९७ गुण मिळाले, तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये अनुक्रमे ८० आणि ८९ गुण मिळाले आहेत. 'मटा हेल्पलाइन'मध्ये मिळालेल्या मदतीनंतर निकिताच्या शिक्षणाची चिंता मिटली आहे. 'महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे आम्ही निकिताला उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत,' असे तिचे वडील भीमसेन रेणुसे सांगतात.
---
'सुरू आहे बीफार्मचा प्रवास'
..
(अपूर्वा जाधव : २०१४)
..
बिकट परिस्थितीशी दोन हात करून दहावीला तब्बल ९७.२० टक्के मिळवणाऱ्या अपूर्वा जाधवचं आयुष्य 'मटा हेल्पलाइन' या उपक्रमाने पूर्णपणे बदलून गेलं. अपूर्वाचे वडील एका खासगी कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. अपूर्वा नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली आणि तिला ७९ टक्के मार्क मिळाले आहेत. अपूर्वाला बीफार्मला प्रवेश घ्यायचा आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून तिने दहावीला उत्तम गुण मिळवले. अपूर्वाने जिद्दीने मिळवलेल्या यशाला 'मटा हेल्पलाइन'चे बळ मिळाले आणि तिने भरारी घेतली. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या या उपक्रमाचा लाभ तिला मिळाला आणि तिच्या मनातील करिअरच्या दिशेने तिची वाटचाल सुरू झाली आहे. 'मटा'च्या वाचकांनी दाखविलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन, असे अपूर्वा म्हणते.
---
'आयटी इंजिनीअर होणार आहे'
..
(चैतन्य तापसे : २०१५)
घरच्या प्रतिकूल परिस्थितीतही दहावीत ९४.४० टक्के गुण मिळवून आयटी इंजिनीअर बनण्याचे स्वप्न पाहिलेला चैतन्य राजेश तापसे आता आणखी जिद्दीने वाटचाल करतो आहे. पुणेकरांनी त्याची गुणवत्ता ओळखून त्याला दिलेल्या 'लक्ष्मीचैतन्या'ची जाणीव ठेवून तो स्वतःचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जोमाने अभ्यास करतो आहे. 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून पुणेकरांनी केलेल्या मदतीमुळे त्याची आर्थिक गरज पूर्ण झाली. चैतन्यने 'नूमवि'त अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन कम्प्युटर सायन्सचे विषय घेतले. अकरावीत त्याला ८२ टक्के गुण मिळाले असून, आता त्याने बारावीच्या तयारीला सुरुवात केली आहे. दिवसभराचे कॉलेज, क्लासचे वेळापत्रक सांभाळून तो दर दिवशी किमान दोन तास स्वतः अभ्यास करतो. डिसेंबरपर्यंत बारावीचा अभ्यास पूर्ण करून, नंतर 'सीईटी'चा अभ्यास करण्याचे नियोजन त्याने केले आहे. त्यामुळे बारावीतही चांगले यश मिळण्याचा विश्वास त्याला वाटतो आहे.
---
'विश्वास सार्थ ठरवेन'
...
(पूजा जगताप : २०१५)
..
आंबेगाव पठार येथील स्वामीनगर भागातील भाड्याच्या छोट्याशा दोन खोल्या, वडील पेट्रोल पंपावर कामाला, नोकरीतून घरात येणारे अत्यंत तुटपुंजे उत्पन्न, त्यामुळे होणारी ओढाताण अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडून पूजा शिवाजी जगताप हिने दहावीला ९०.६० टक्के गुण मिळविले होते. 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून मिळालेल्या मदतीतून आर्थिक परिस्थितीचा अडथळा दूर होऊन तिच्या कम्प्युटर इंजिनीअर होण्याच्या ध्येयाकडे तिची वाटचाल सुकर झाली आहे. ती सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे येथे इंजिनीअरिंग डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. पहिल्या सेमिस्टरमध्ये ७९ टक्के आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये ७० टक्के गुण तिने मिळविले आहेत. दहावीच्या वेळेला असलेली अभ्यासाची जिद्द कायम असून, 'मटा हेल्पलाइन'मुळे आता तिच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. आई-वडिलांचा; तसेच आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या-ज्या दात्यांनी मदतीचे हात पुढे केले, त्या सर्वांचा आणि विशेषतः 'मटा'चा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी ती खूप मेहनत घेत आहे.
......
'यशस्वी होणारच...!'
...
सायली साळवी (२०१५)
..
सायली साळवीने दहावीला ९२ टक्के मार्क होते. पुढे शिकायचे होतेच. तिला इंजिनीअरिंगला जायचे होते. ती हुशार होती, शिकायची तीव्र इच्छा होती. पण आर्थिक बळ कमी होते. अर्थात आर्थिक गोष्टींसाठी सायलीचे शिक्षण अडू द्यायचे नाही, असा पक्का निर्णय तिच्या आईवडिलांनी केला होता. त्यानंतर सायलीला 'मटा' हेल्पलाइनचे भक्कम पाठबळ मिळाले. सायलीने गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला आहे. जनता वसाहतीतल्या गडबड गोंधळातही तिने जिद्दीने अभ्यास करून पहिल्या वर्षी ८७ टक्के मार्क मिळवले आहेत.
..

डॉक्टर होणारच
...
ऐश्वर्या वीर (२०१५)
...
ऐश्वर्या वीरला अकरावीत ८५ टक्के मार्क मिळाले आहेत. सध्या ती एसएनडीटीमध्ये बारावी सायन्सला आहे. ऐश्वर्याला डॉक्टर व्हायचे आहे. ऐश्वर्याचे शालेय शिक्षण निगडीत महापालिकेच्या शाळेत झाले आहे. तिची आई धुणीभांडी करून चरितार्थ चालवते. झोपडपट्टीमधील एका खोलीत तिने अभ्यास करून यश मिळवले होते. त्यात तिच्या शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे ती आवर्जून नमूद करते. 'मटा हेल्पलाइन'चे पाठबळ मिळाल्याने अभ्यासाला अधिक हुरूप आला आहे. त्यामुळे बारावीत अधिक अभ्यास करून उत्तम मार्क मिळवणार असा निश्चय ती बोलून दाखवते. सध्या तिने एका विषयाचा क्लास लावला आहे. बाकीच्या विषयांसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घेत असल्याचेही तिने सांगितले.
...
ध्येय यशस्वी होण्याचे
...
अश्विनी आव्हाड (२०१५)
...
अश्विनी आव्हाडचे वडील गेल्यानंतर तिची आई मोलमजुरी करून प्रपंच चालवत आहे. दहावीत उत्तम मार्क मिळाले तरी पुढे शिक्षण कसे होणार हा प्रश्न होता. पण हा प्रश्न 'मटा'च्या हेल्पलाइनमुळे सुटला आहे. अश्विनी सध्या बारावीच्या अभ्यासात व्यग्र आहे. 'गेट'ची तयारीही तिने सुरू केली आहे. अधिकाधिक अभ्यास करून 'गेट'मध्ये उत्तम मार्क मिळवणारच असा निश्चय ती बोलून दाखवते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यांची सेवा पावसातही

$
0
0

त्यांची सेवा पावसातही

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वच्छ संस्थेच्या २६०० कचरावेचक महिलांना अद्यापही पुणे महापालिकेकडून रेनकोट पुरविण्यात आलेले नाहीत; त्यामुळे रस्त्यांवर आणि कचराकुंड्यांकडे टाकण्यात आलेला कचरा गोळा करण्यासाठी त्यांना भरपावसात हिंडावे लागत आहे. पावसात भिजून काम करावे लागत असल्यामुळे सर्दी, तापासारख्या असंख्य आजारांना तोंड द्यावे लागतेच; मात्र घरात एकट्याच कमावत्या असल्याने कचरा गोळा करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायही नाही.
भरपावसात कचरा गोळा करावा लागत असल्यामुळे कचरावेचक महिलांना रेनकोट, अॅप्रन, चप्पल देण्यात याव्यात, अशी मागणी वारंवार करण्यात येत असूनही महापालिका प्रशासनाकडून अद्याप त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. पुणे शहर परिसरातील विविध भागातील कचरा गोळा करण्यासाठी 'स्वच्छ' या संस्थेच्या २६०० कचरावेचक महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन, सोसायट्यांमधील, रस्त्यावर साचलेला आणि कचराकुंड्यांमध्ये टाकण्यात आलेला कचरा या महिलांकडून गोळा केला जातो. मात्र, स्वच्छतेच्या दूत असलेल्या या महिलांना आवश्यक असलेली पुरेशी सुविधा आणि संरक्षणही पालिकेकडून अद्याप पुरविण्यात आलेले नाही.
'गेल्या काही दिवसांत पुण्यात जोरदार पाऊस पडतो आहे. अशा परिस्थितीतही या महिलांना कचरा गोळा करावा लागतो. अनेक महिला त्यामुळे आजारी पडल्या असून, त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. काही म​हिला घरातील एकमेव कमावत्या असल्यामुळे त्यांना आजारी असतानाही कामावर यावे लागते आहे. या महिलांना २५ जूनपर्यंत रेनकोट मिळणार होते. मात्र, अद्याप आपली ही मागणी पूर्ण झालेली नाही,' असे सुसरला यांनी सांगितले.
स्वच्छ या संस्थेतर्फे २६ जून रोजी पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाला पुन्हा पत्र पाठविण्यात आले होते. कचरावेचक महिलांना रेनकोट आणि उर्वरित मानधन त्वरित मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. पावसात काम करताना त्यांना सोयीचे व्हावे, या दृष्टीने त्वरित रेनकोट देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही याबाबत काही पावले उचलण्यात आलेली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारणे टोळीतील गुंडाला अटक

$
0
0

मारणे टोळीतील गुंडाला अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे
कुख्यात गणेश मारणे टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
निखिल संजय खोमणे (वय २८, रा. शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीविरूद्ध कोथरूड, विश्रामबाग आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात जबरी चोरी, मारामारी, खंडणी असे एकूण २४ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
गुन्हे शाखेच्या पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक डी. पी. पेडगावकर, पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या पथकाने कोथरूड परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी केली. आरोपी खोमणे याच्या घरी पोहोचल्यावर त्याची झडती घेताना त्याच्या कमरेला पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली, त्या वेळी आणखी एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांना मिळाली. त्याच्याविरूद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी गणेश मारणे टोळीशी संबंधित असून, त्याला कुख्यात शरद मोहोळ टोळीच्या गुंडाकडून धोका होता. त्यामुळे तो त्याच्याजवळ पिस्तुले आणि जिवंत काडतुसे बाळगत होता. त्याने हे पिस्तुल वाराणसी येथून आणल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांची थेट मंत्र्यांकडे धाव

$
0
0

पालकांची थेट मंत्र्यांकडे धाव

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंजिनीअरिंगच्या प्रवेशांमध्ये संस्था पातळीवरील जागांचा 'बाजार' सुरू झाल्याने, अखेर पालकांनी शुक्रवारी मंत्र्यांकडे धाव घेत, हा बाजार थांबविण्याची मागणी केली. ऑनलाइन प्रक्रियेनंतर कॉलेज पातळीवर रिक्त राहिलेल्या जागांवरही ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेश देण्याची मागणी पालकांनी केली.
इंजिनीअरिंगच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील चौथ्या ऑनलाइन फेरीची प्रवेश निश्चिती नुकतीच जाहीर झाली. हे प्रवेश झाल्यानंतरही अनेक कॉलेजांमधून मोठ्या संख्येने जागा रिक्त आहेत. या जागांवर संस्था पातळीवरील प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेच्या निकषांनुसारच राबविण्याचे निर्देश राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने कॉलेजांना दिले आहेत. त्यासाठी कॉलेजांनी आपल्याकडील रिक्त जागांची माहिती जाहीर करण्याचे निर्देशही संचालनालयाने दिले आहेत. त्यानंतरही अनेक कॉलेजांनी अशी माहिती जाहीर न करता, रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याऐवजी व्यवस्थापन कोट्यातील प्रक्रियेने प्रवेश सुरू केले आहेत. पुण्यातील काही ख्यातनाम कॉलेजांनी तर त्यासाठी थेट बाजारच मांडल्याची बाब 'मटा'ने नुकतीच उघड केली. त्या पार्श्वभूमीवर पालकांनीही एकत्र येत शुक्रवारी तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय कार्यालय, मुंबईमधील मुख्य कार्यालय, केंद्रीय प्रवेश परीक्षा कक्ष आणि अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यालयाला भेट दिली.
'विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयातून आम्हाला मुंबईला जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार मुंबईला संचालनालयाचे मुख्य कार्यालय, तसेच केंद्रीय प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रमुखांनाही आम्ही भेटलो. या विषयी अंतिम निर्णय राज्य सरकारच घेऊ शकत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार आम्ही शिक्षणमंत्री तावडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तावडे यांची भेट घेणे शक्य न झाल्याने आम्ही त्यांच्या स्वीय सहायकांकडे आमच्या मागणीचे निवेदन दिले,' अशी माहिती या पालक प्रतिनिधींनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवास मंगेशकर कुटुंबाचा

$
0
0

प्रवास मंगेशकर कुटुंबाचा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आपल्या गाण्याने भारतीय संगीतावर मंगेशकर कुटुंबाने एक वेगळीच छाप निर्माण केली. शास्त्रीय संगीत, भावसंगीत, नाट्यसंगीत, पार्श्वगायन या प्रकारांमध्ये लता मंगेशकर, आशा भोसले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आपले नाव कोरले. त्यांच्या या प्रवासाचा मागोवा घेणारा 'लताशा' हा कार्यक्रम 'मटा कल्चर क्लब'तर्फे आयोजित करण्यात आला असून, आजची आघाडीची युवा गायिका सावनी रवींद्र ही मंगेशकर कुटुंबाचा संपू्र्ण प्रवास आपल्या गायकीतून उलगडणार आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शुक्रवारी (१२ ऑगस्ट) रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम रंगणार असून, 'मटा कल्चर क्लब'च्या सभासदांना सावनी रवींद्र यांचे गायन अनुभवण्याची संधी प्राप्त होणार आहे. 'मटा कल्चर क्लब'च्या सभासदांसाठी कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
१९४७ नंतर मराठी, हिंदी, सिनेमांच्या दुनियेत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी आपल्या अमृत स्वरांनी एक नवे पर्व सुरू केले. संत रचना, भावसंगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत, अशा अनेक संगीत प्रकारांत त्यांच्या स्वरांनी अत्युच्च शिखर गाठले. त्यांच्या याच कारकिर्दीचा आढावा सावनी आपल्या गायनातून घेणार आहेत. मास्टर दीनानाथ, पं. कुमार गंधर्व यांचा वारसा जपणाऱ्या लता मंगेशकर, आशा भोसले आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सावनीला सहवास लाभला आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाची संकल्पना सुचली असून, प्रवीण जोशी यांनी या संकल्पनेवर संहिता लिहिली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणेकरांना 'लताशा' या संगीतविश्वाचा सुरेल प्रवास घडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंडलयुग राष्ट्रीय विचार परिषदेला पुण्यात प्रारंभ

$
0
0

मंडलयुग राष्ट्रीय विचार परिषदेला पुण्यात प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संपूर्ण देशाच्या सामाजिक राजकीय प्रवाहास नवे वळण लावणाऱ्या मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीने आयोजित मंडलयुग राष्ट्रीय विचार परिषदेस शनिवारी प्रारंभ झाला.
आझम कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेस विविध सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, परिषदेचे स्वागताध्यक्ष पी. ए. इनामदार, महासभेच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. दिलीप यादव, माळी महासंघाचे नेते शंकरराव लिंगे, निमंत्रक किशोर ढमाले आदी या परिषदेत सहभागी
झाले होते. सावंत म्हणाले, 'समाजाची प्रगती साधायची असेल, तर मागासांना न्याय देण्याची गती वाढवावी लागेल. दुही होऊ नये म्हणून मागास समूहांनी एकत्रित विचार केला पाहिजे.' इनामदार म्हणाले, 'आरक्षणाच्या धोरणामुळे देशात विधायक बदल घडून आलेला आहे. तरीही अजून बराच बदल होणे बाकी आहे. तंत्रज्ञान आणि शिक्षणातील वेगवान बदलांमुळे 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गातील दरी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मागास समूहांनी शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगतीचा वेग वाढविला पाहिजे.'
आरक्षणामुळे कोणत्या क्षेत्रात किती प्रगती झाली, याचा आढावा घेऊन पुढील वाटचाल या परिषदेत निश्चित करण्यात येणार असून, या परिषदेतून सत्यशोधक बुद्धिजीवी निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे, असे प्रा. परदेशी यांनी प्रास्ताविकात नमूद केले. प्राचार्य संजय घोडेकर यांनी सूत्रसंचालन केले. आज (रविवारी) या परिषदेचा समारोप होणार असून, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अध्यापक प्रा. सुहास पळशीकर यामध्ये विचार मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी मागणी, टोकाचे निर्णय नकोत

$
0
0

पालकमंत्री बापटांनी आंदोलनकर्त्यांना सुनावले
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पालकमंत्री म्हणून पाण्याबाबत कधीही राजकारण केले नाही, आणि करणार देखील नाही. पाण्याबाबत केवळ शहरालाच नव्हे तर प्रत्येक वेळी जिल्ह्याला देखील न्याय दिला असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पुणेकरांना नियमित पाणी मिळावे, अशी माझीही इच्छा आहे. मात्र, केवळ धरणात मुबलक पाणीसाठा झाला म्हणून लगेच भावनेचा विचार करून पाणी सोडण्याचा निर्णय घेणे बरोबर नाही,' असे बापट यांनी स्पष्ट केले. एकतर्फी मागणी करून टोकाच्या भूमिका घ्यायच्या नसतात, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना सुनावले.
पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कौन्सिल हॉल येथे कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीत दिवसाआड पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना नियमित पाणी मिळावे, यासाठी १२०० एमएलडी पाणी सोडण्याचा निर्णय बापट यांनी या बैठकीत जाहीर केला. या बैठकीनंतर पाणीकपात रद्द करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना पालकमंत्री म्हणून कधीही पाण्याचे राजकारण केले नाही आणि करणार देखील नाही, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणून काम करताना शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही विचार करावा लागतो. उपलब्ध पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी उद्योगासाठी द्यावे लागत असल्याने त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसापासून धरणात पाणीसाठा वाढला म्हणून पाणीकपात रद्द करण्याची मागणी करुन राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवरही बापट यांनी कडक शब्दात टीका केली.
पाणीकपातीचा निर्णय हा भावनेचा नाही तर व्यवहारिक आहे. महापालिका ही ग्राहक आहे, राज्य सरकारची त्यामुळे किती पाणी द्यायचे हा निर्णय सरकारचा आहे. अधिवेशन सुरू असल्याने पाणीकपातीची बैठक घेण्यास उशीर झाला. मात्र, त्यासाठी एवढा बाऊ करण्याची गरज नव्हती, अशा शब्दात त्यांनी आंदोलनकर्त्यांना सुनावले.
...
गळती रोखण्यास हवेत प्रयत्न
महापालिका प्रशासनाने कायद्यानुसार सहा टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी सोडले पाहिजे. सध्या महापालिका जेमतेम एक टीएमसी पाण्यावरच प्रक्रिया करते. शहरात ३० टक्के पाण्याची गळती होत आहे. ही गळती कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. महापौरांनी राजकारण करण्यापेक्षा या दोन समस्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला पालकमंत्री बापट यांनी महापौर प्रशांत जगताप यांना दिला.
00

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या परीक्षांचेवेळापत्रक बदलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
येत्या मंगळवारपासून (९ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या इंजिनीअरिंगच्या सर्व शाखांच्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या 'इनसेम' (इन सेमिस्टर) परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अचानक पुढे ढकलल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळ परीक्षांचे वेळापत्रक आखताना विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागाचा नियोजनशून्य कारभार पुढे आला आहे. आता या परीक्षा २२ ऑगस्टपासून सुरू होणार असून सविस्तर वेळापत्रक उद्या (सोमवारी) जाहीर करण्यात येईल.
विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागाने इंजिनीअरिंग कॉलेजांमधील इन सेमिस्टर परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर १४ जुलैला जाहीर केले. त्यानुसार इन सेमिस्टर परीक्षा या मंगळवार ९ ऑगस्टपासून सुरू होणार होत्या. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली होती. इंजिनीअरिंग शाखेतील संबंधित विषयाच्या इन-सेमिस्टर परीक्षा ३० गुणांच्या तर मुख्य सेमिस्टरच्या परीक्षा ७० गुणांच्या असतात.या दोन्ही परीक्षांच्या गुणांद्वारे संबंधित विषयाचा अंतिम निकाल लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षांचा अभ्यास सारखाच करावा लागतो.
विद्यापीठाने तृतीय आणि अंतिम वर्षाच्या इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांच्या इन सेमिस्टर परीक्षांचे वेळापत्रक गेल्या महिन्यातच जाहीर झाल्याने विद्यार्थी अभ्यासाला लागले होते.दोन्ही वर्षे ही महत्वाची असल्याने काही विद्यार्थी हे परीक्षा जवळ येत असल्याने कॉलेजला दांडी मारून घरी आणि ग्रंथालयात अभ्यासात मग्न झाले होते. विद्यार्थी इन सेमिस्टर परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी ही थेट पुढच्या पुढच्या वर्षीच्या इन सेमिस्टर परीक्षेत मिळते. विशेष म्हणजे विद्यापीठाने कोणतेही कारण न देता अचानक शनिवारी परीक्षा पुढे ढकलल्याने समजल्यावर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागाचा नियोजनशून्य कारभार पुढे आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
.........
कारण अस्पष्ट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या इन सेमिस्टर परीक्षा २२ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बदलाची इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राचार्यांना ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. मात्र, परीक्षा पुढे कोणत्या कारणाने पुढे ढकलण्यात आल्या याची माहिती नसल्याचे, विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेचे अधिष्ठाता डॉ. योगेश नेरकर यांनी सांगितले. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भामा-आसखेड’च्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भामा-आसखेड धरणातून पुणे शहराला पाणी देण्याची रखडलेली योजना मार्गी लावण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मध्यस्थी केली जाणार आहे. त्यासाठी येत्या १५ ऑगस्टनंतर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे.

पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांनी विधान भवनात बैठक घेतली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप तसेच शहर व ग्रामीण भागातील आमदार उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीला पुणे शहराचा मंजूर पाणीकोटा व प्रत्यक्ष पाणीवापर याची मांडणी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी केली. तसेच पुणे शहराचा सध्याचा पाणीकोटा वाढविताना जलसंपत्ती प्राधिकरणाच्या समन्यायी पाणीवाटपाच्या आदेशाला अनुसरून गांभीर्यपूर्वक निर्णय घेण्यात यावा, असेही त्यांनी सुचविले.

त्यावर अजित पवार यांनी शहराचा पाणीकोटा वाढवून मिळणार नसेल, तर भामा-आसखेड धरणातून पुण्याला अडीच टीएमसी पाणी देण्यात यावे. भामा-आसखेडमधील हे पाणी मिळाले तर खडकवासला प्रकल्पातून पाणी मागण्याचा प्रश्नच येणार नाही, असे सांगितले. भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यांच्या जमिनी धरणात गेल्या आणि त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने पैसे द्यावेत, असे राज्यमंत्री शिवतारे यांनी स्पष्ट केले.

या पाणी योजनेला खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे यातून मार्ग काढता येईल. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अशी सूचना पवार यांनी केली.

भरपाईसाठी प्रस्ताव

भामा-आसखेडच्या शेतकऱ्यांना १३७ कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. हा निधी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका व राज्य सरकारने द्यावा असा प्रस्ताव तयार केल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी बैठकीत दिली. त्यानंतर ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत १५ ते २० ऑगस्ट दरम्यान बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज कौतुकसोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बिकट परिस्थितीशी झुंज देऊन दहावीच्या परीक्षेत यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या पंधरा गुणवंतांना 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांनी भरभरून कोटीमोलाची मदत केली असून, ती त्यांना आज, रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कर्तृत्व आणि दातृत्व यांचा मिलाफ असलेला 'मटा हेल्पलाइन'चा हा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता स. प. महाविद्यालयाच्या देवी रमाबाई सभागृहात होणार असून, त्यासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे. माजी सनदी अधिकारी आणि 'चाणक्य मंडल'चे संचालक अविनाश धर्माधिकारी या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

प्रतिकूलतेवर मात करून यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न साकारण्यासाठी समाजाकडून मदत मिळवण्यासाठी 'मटा हेल्पलाइन'चा उपक्रम राबवण्यात येतो. यंदा या उपक्रमासाठी पंधरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्या सर्वांना 'मटा'च्या वाचकांनी अतिशय चांगली मदत केली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठीचा त्यांचा मार्ग सुकर होणार आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड, जिल्हा आणि सोलापूर, सातारा अशा अनेक ठिकाणांहून वाचकांनी आवर्जून मदतीचे चेक 'मटा'कडे पाठवले. खाऊचे पैसे, पहिल्या कमाईतील वाटा आणि पेन्शनच्या रकमेतील आशीर्वाद या गुणवंतांना देऊन 'हेल्पलाइन'ला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हे सर्व चेक आज अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

आर्थिक अडचण, शैक्षणिक साधने किंवा महागड्या क्लासेसमधील मार्गदर्शनाचा अभाव अशा परिस्थितीत जिद्दीने दिवसरात्र मेहनत करणाऱ्या या विद्यार्थ्यांची यशोगाथा खुद्द त्यांच्याच तोंडून ऐकणे, हाही हृदयस्पर्शी अनुभव असतो. त्यामुळेच या सोहळ्याला नेहमीच भावनेची किनार लाभते. त्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये प्रिय ठरलेल्या धर्माधिकारी यांच्या प्रेरणादायी संवादाचीही मेजवानी या निमित्ताने उपस्थितांना मिळणार आहे. यापूर्वी या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचाही आढावा या वेळी घेण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वांना 'मटा'चे आग्रहपूर्वक निमंत्रण.

आजचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला

स्थळ : देवी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय

प्रमुख पाहुणे : माजी सनदी अधिकारी आणि 'चाणक्य मंडल'चे संचालक अविनाश धर्माधिकारी

वेळ : सकाळी १०.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images