Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बापटांमुळे पुणेकर पाण्यापासून वंचित

$
0
0

महापौर प्रशांत जगताप यांचा पालकमंत्र्यांवर हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पालकमंत्र्यांच्या दबावामुळे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने पुन्हा महापौरांचे आदेश आणि आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. पुणेकरांच्या हक्काचे पाणी धरणातून सोडले जात असताना, पुणेकरांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम गिरीश बापट करत आहेत, असा थेट आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी केला.
गेल्या महिन्यात धरणे पूर्ण क्षमतेने भरली नसल्याने पाणीकपात रद्द करण्यास पालकमंत्री बापट यांनी स्पष्ट नकार दिला होता. ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांत पुरेसा साठा झाला आहे. एवढेच नाही, तर बुधवारी आणि गुरुवारी मोठ्या प्रमाणावर धरणातून पाणी सोडण्यात आले. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली. तरीही, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाणीकपात मागे घेण्याबाबत टाळाटाळ करत असल्याची टीका जगताप यांनी केली. 'पाणीकपात रद्द करण्याचे श्रेय इतर कोणाला मिळू नये, या अहंकारापोटी पालकमंत्री पुण्याचे हक्काचे पाणी देण्यात चालढकल करत आहेत. बापट यांना श्रेय घ्यायचे असेल, तर जरूर घ्यावे. आम्ही त्यांच्या अभिनंदनाचे फलक लावू; पण पुणेकरांना त्यांच्या हक्काचे पाणी द्या', असा टोला जगताप यांनी बापट यांना लगावला.
शहरासाठी आम्ही अतिरिक्त पाण्याची मागणी करत नसून, पुण्याच्या कोट्याचे पाणी दिले जावे, अशी मागणी केली आहे. पालकमंत्र्यांच्याच कसबा मतदारसंघातून नदीतून पाणी वाहत असताना, पाचशे मीटरवर असलेल्या नागरिकांना पाणी मिळत नाही. एक खासदार, आठ आमदार पुणेकरांनी निवडून दिले आहेत. त्यामुळे, ते निश्चित याचा विचार करतील, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.
.................
धरणांत अत्यल्प साठा असतानाही, पुणेकरांच्या पाणीकपातीमध्ये एक थेंबही कपात माजी पालकमंत्र्यांनी केली नव्हती. मात्र, विद्यमान पालकमंत्री धरणांत २३ टीएमसी पाणी असूनही पुणेकरांना पाणी देत नाहीत. यावरून, कोणते पालकमंत्री चांगले हे पुणेकरांनीच ठरवावे.
प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीकपातीविरोधात आज सर्वपक्षीय आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही, पालकमंत्र्यांच्या हट्टामुळे पुणेकरांना दररोज पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्ह आज, शुक्रवारी पालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. पाणीकपात रद्द केली नाही, तर पालकमंत्र्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक साठा झाल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा मागे घेण्यात यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. भारतीय जनता पक्ष वगळता पालिकेतील सर्वच पक्षांमध्ये त्याबाबत एकमत आहे. तरीही, पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात चालढकल केली जात आहे. त्यामुळे, महापौरांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय गटनेते आणि नगरसेवक आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. तर, पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात येत नाही, तोवर जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठाण मांडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी दिला.
'शहराच्या हक्काचे पाणी देण्याची आमची मागणी आहे. आम्ही दररोज पाणी देऊ, नाहीतर एक दिवसाआड देऊ, त्याचे नियोजन करण्याचा अधिकार महापालिकेचा आहे. पाणी आमच्या मालकीचे आहे. आम्ही ठरवू, त्यानुसारच पाणी मिळेल, अशी दमदाटी केली जाणार असेल, पालकमंत्र्यांना पुण्यात फिरून देणार नाही', असा इशारा शिंदे यांनी दिला.
..
'पालकमंत्री बेफाम बोलतात'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा समाचार घेऊन त्यांनी बेफाम बोलण्याऐवजी विचारपूर्वक बोलावे, असा सल्ला दिला आहे. पालकमंत्री महानगरपालिकेचे नगरसेवक होते, पाच टर्म आमदार आहेत. त्यामुळे, पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना ते पुणेकरांची चेष्टा करत आहेत, असा आरोप मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांनी केला. आमच्या हक्काचे पाणी आम्हांला द्या; अन्यथा परिणामांना सामोरे जा, असे सूचक वक्तव्य करत मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचे संकेत किशोर शिंदे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणातील पाण्यावर शेती, उद्योगाचा हक्क

$
0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'धरणातील पाण्यावर महापालिकेचा नाही, तर राज्य सरकारचा अधिकार आहे. पाणी सोडण्याचा निर्णयही सरकारच घेऊ शकते. धरणांतील पाण्यावर शहराचा नाही, तर जिल्ह्यातील शेतीचा-उद्योगाचा हक्क आहे. त्यामुळे, सर्व घटकांचा विचार करून पुणेकरांच्या पाण्याबाबत येत्या पाच ते सात दिवसांत निर्णय घेण्यात येईल', असे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. तसेच, महापौर पाण्याचे राजकारण करत असून, नागरिकांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जुलैसह ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत असल्याने धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे, पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठरावही करण्यात आला. परंतु, पालकमंत्री बापट यांनी पालिकेच्या ठरावाची खिल्ली उडवली असून, असे ठराव करून पाणीकपात मागे घेता येत नाही, अशी टिप्पणी केली. 'धरणातील पाण्यावर महापालिकेचा हक्क नाही. पाणी राज्य सरकारच्या मालकीचे आहे. धरणांतील उपलब्ध पाण्याचे वर्षभराचे नियोजन करताना, शेती, उद्योग, महापालिका हद्दीलगतची गावे, बाष्पीभवन अशा सर्व गोष्टींचा विचार केला जातो. कालवा समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा केली जाते. ही बैठक ऑक्टोबरमध्ये होते; पण यंदा धरणे लवकर भरली असल्याने त्याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाईल,' असा खुलासा बापट यांनी केला.
..
'पाणी कमी पडणार नाही'
पुणेकरांना वर्षभर आवश्यक असलेले पाणी निश्चित दिले जाईल, असा निर्वाळा देतानाच, त्यांच्या पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, याचा पुनरूच्चार बापट यांनी केला. पुणेकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यासाठी आणखी पाच ते सात दिवसांचा कालावधी लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
..............
बापट यांचे घूमजाव
'मी पुणेकर आहे. पाण्याचे गांभीर्य मला माहीत आहे. परंतु, पालकमंत्री या नात्याने केवळ शहराचा विचार करून चालत नाही. मला जिल्ह्याचाही विचार करावा लागतो', अशी टिप्पणी करणारे बापट दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या हक्काचे पाणी जिल्ह्यासाठी पळवले जात असल्याची टीका सातत्याने करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात थांबणार कधी?

$
0
0

धरणे भरूनही उपयोग शून्य; भाजप-राष्ट्रवादीच्या भांडणात पुणेकरांना फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील पाणीकपात रद्द करण्याचे श्रेय घेण्यावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या भांडणात पुणेकर भरडले जात आहेत. मुठा नदी आणि कालव्यातून धो-धो पाणी वाहत असताना पुणेकरांना मात्र पाणीकपात रद्द होण्यासाठी पालकमंत्र्याच्या आदेशाची वाट पाहावी लागत आहे. पाणीकपात थांबविण्याचा निर्णय खडकवासला कालवा समितीच्या बैठकीत घेण्याचा पवित्रा घेण्यात आल्याने या बैठकीपर्यंत शहरातील पाणीकपात सुरूच राहणार आहे.
शहरातील पाणीकपात रद्द करून पुरेसा पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिकेने पत्र दिले आहे. खडकवासला धरण प्रकल्पामध्ये पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे. धरण क्षेत्रात पाऊसही सुरू आहे. या धरणांतील पाण्याचे नियोजन कालवा समितीमार्फत केले जाते. या नियोजनासाठी तातडीने कालवा समितीची बैठक घेण्याविषयी पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. पालकमंत्री आज, शुक्रवारी कालवा समितीची बैठक घेतील आणि त्यामध्ये कपातीबाबत निर्णय होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी 'मटा'ला सांगितले.
पुणे शहरात गेल्या अकरा महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जुलै महिन्यात धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा झाला. पाणीसाठा वाढल्याने शहरातील पाणीकपात रद्द करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, हा साठा पुरेसा नसल्याने शहरातील पाणीकपात कायम ठेवण्यात आली आहे. मागील चार दिवसांत धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला प्रकल्पाचा साठा २३ टीएमसी म्हणजे ८० टक्क्यांवर पोहोचला आहे.
खडवासला धरण शंभर टक्के भरल्याने त्यातून मुठा नदीत ४० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात झाले. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहात आहे. ग्रामीण भागासाठीही गेल्या पंधरा दिवसांपासून कालव्यात अकराशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी आणि कालव्यामध्ये धो-धो पाणी सोडले जात असताना पुणेकर अजूनही पाणीकपात सहन करीत आहेत. महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर प्रशांत जगताप यांनी पाणीकपात रद्द करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. ही कपात रद्द करण्याबाबतचे पत्र महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीकपात रद्द करण्यास होकारही दिला आहे. मात्र, ही कपात रद्द करण्याचा अधिकार कालवा समितीला असल्याचा पवित्रा अचानक घेण्यात आला आहे. पुणे शहरात यापूर्वीही पाणीकपात करण्यात आली होती. ही कपात रद्द करताना कधीही कालवा समितीपर्यंत जाण्याची वेळ आली नाही. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती कालवा समितीचे अध्यक्ष पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आली आहे. शहरातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय कालवा समितीमध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे कालवी समितीची बैठक तातडीने घेण्याबाबतही पालकमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही बैठक आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
..
'पाच-सहा दिवसांत निर्णय'
कालवा समितीची बैठक शुक्रवारी होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले असले तरी पालकमंत्री बापट यांनी मात्र पाणीकपातीवर पाच-सात दिवसांत निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुठा नदी व कालवा ओसंडून वाहत असताना पुणेकरांना पाणीकपात टळण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमा, कृष्णा खोऱ्यात ६७ टक्के पाणीसाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भीमा व कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार कोसळणारा पाऊस गुरुवारी सकाळी ओसरला. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खडकवासला धरणासह अन्य तेरा धरणांतून सुरू असलेला विसर्गही कमी झाला आहे. दरम्यान, या दोन्ही खोऱ्यांमधील प्रमुख धरणांचा पाणीसाठा २८६ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ६७ टक्क्यांवर गेला आहे.
भीमा व कृष्णा खोऱ्यातील धरणांमध्ये गेले तीन दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे तेरा धरणांचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले. गुरुवारी सकाळी मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले. पाऊस कमी झाल्याने धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासाल धरणातून बुधवारी तब्बल ४० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पाऊस कमी झाल्यानंतर हा विसर्ग ४ हजार ११० क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. या प्रकल्पातील पानशेत धरण भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणात ९.६६ टीएमसी म्हणजे ९०.७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. वरसगाव धरणात ९.८९ टीएमसी (७७.११ टक्के) पाणीसाठा झाला आहे. टेमघर धरणात २.४२ टीएमसी (६५ टक्के) जलसाठा झाला आहे.
निरा खोऱ्यातील गुंजवणी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यातून साडेचार हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. निरा-देवघर धरणातून नऊ हजार आणि वीर धरणातून ५३ हजार क्युकेसने पाणी सोडण्यात आले. कुकडी प्रकल्पातील येडगाव, वडज आणि घोड धरणांतूनही विसर्ग सुरू आहे. येडगावमधून ११ हजार, वडजमधून सात हजार आणि घोड धरणातून १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. भीमा खोरे व कुकडी प्रकल्पातील धरणांतून सोडलेले पाणी उजनी धरणात पोहोचते. या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनीचा पाणीसाठा तीन टीएमसीने वाढला आहे.
कृष्णा खोऱ्यातील धोमबलकवडी, तारळी, वारणा, कासारी व राधानगरी या धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. गुरूवारी सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी या धरणांत पाण्याचा ओघ आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून पाच हजार क्युसेक, कासारीमधून चार हजार, धोम-बलकवडी धरणामधून सव्वातीन हजार व तारळीतून दीड हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या तीन जोरदार पावसामुळे कोयना धरणाचा साठा ७० टीएमसीवर पोहोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामात विलंबामुळे कंत्राटदाराला दंड

$
0
0

वारजे-कर्वेनगर उड्डाणपुलाच्या कामाला मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे वारजे-कर्वेनगर उड्डाणपुलाचे काम करण्यास विलंब केल्यामुळे कंत्राटदाराला सहा हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे दंड आकारणी करून ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल ऑक्टोबरअखेर नागरिकांसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निवेदन केले. कमिन्स कॉलेज ते युनिव्हर्सल चौक या दरम्यान हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला रस्तारुंदी, वाहतूक पोलिसांची परवानगी, विद्युत केबल स्थलांतरीत करणे या कामांमुळे विलंब लागला. हे काम एप्रिल २०१५पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. या कामासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. संबंधित कंत्राटदाराला सहा हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. १५ जून २०१५पासून भाववाढ सूत्राचे निर्देशांक गोठवण्यात आल्याने मुदतवाढ देण्यात आली, तरी कामाच्या मूळ रकमेत वाढ होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेच्या हद्दीत १९९७मध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर विकास आराखड्यात ८०३ आरक्षणे निश्चित करण्यात आली. त्यापैकी अवघी २४ आरक्षणे विकसित करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

रस्त्यावरील खोदाईची कामे एक मेपासून बंद करण्यात आली आहेत. विविध सेवा वाहिन्यांना ऑक्टोबर महिन्यापासून खोदाईसाठी खोदाईमुक्त तंत्रज्ञान वापरावे लागणार आहे. याबाबतचे नियोजन पुणे महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यांची खोदाई टाळता येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. याबाबत आमदार तापकीर म्हणाले, 'शहरातील उपस्थित केलेल्या विविध नागरी प्रश्नांवर उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यामुळे हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे जिल्ह्यात २५ ब्रिटिशकालीन पूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे जिल्ह्यात ८१ मोठे पूल असून, त्यापैकी २५ पूल हे ब्रिटिशकालीन आहेत. विशेष म्हणजे त्यातील आठ पुलांचे आयुष्यमान हे शंभर वर्षांपेक्षा जास्त झाले आहे. या सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून, दोन पूल नागरिकांना वाहतुकीसाठी बुधवारपासून बंद केले आहेत.

महाड येथे पूल तुटून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पुलांचा आढावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात ३० मीटरपेक्षा जास्त लांबीचे ८१ मोठे पूल आहेत. त्यापैकी २५ पूल हे ब्रिटिश काळामध्ये बांधण्यात आले आहेत. ब्रिटिशकालीन पुलांपैकी आठ पूल हे शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांचे झाले आहेत.

'महाडमधील दुर्घटना घडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील दोन पूल नागरिकांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये भोर येथील एसटी स्थानकासमोरील पूल आणि देहू-येलवडी रस्त्यावरील पुलाचा समावेश आहे,' असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले. 'बंद करण्यात आलेल्या पुलांना पर्यायी पुलांची व्यवस्था असल्याने अडचण निर्माण होणार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात ८१ मोठ्या पुलांबरोबरच ७५३ लहान पूल आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. भीमा नदीवर असलेल्या पारगाव येथील पुलाचे यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राहाणे यांनी सांगितले.

शंभर वर्षांचे पूल - मावळ तालुक्यातील सदुंबरे गावाजवळील पूल - चाकण-तळेगाव रस्त्यावरील सुधा नदीवरील दोन पूल - भीमा नदीवरील कोरेगाव भीमा येथील पूल - बारामतीतील मदनवाडी ओढ्यावरील पूल - नीरा डावा कॅनॉलवरील तीन पूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडचा रेल्वे पूल धोकादायक

$
0
0

नदीपात्रातून वाळूउपशामुळे ब्रिटिशकालीन पुलाला धोका

म. टा. वृत्तसेवा, दौंड सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन रेल्वेच्या पुलाच्या टिकाऊपणाबद्दल दौंडकरांना काळजी वाटू लागली आहे. नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे.

पुणे-मुंबईसह दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा भीमा नदीवरील रेल्वेचा पूल देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ मोठे पूर आणि वादळ वाऱ्यांना तोंड देत हा पूल उभा आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूला प्रतिबंधित क्षेत्रात जेसीबी आणि ट्रकच्या सहाय्याने रात्रंदिवस वाळू उपसा होत असतो. या अनिर्बंध वाळू उपशामुळे या पुलाचा पाया खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटची मागणी पुढे येत आहे.

दौंड जंक्शनच्या पुढे अहमदनगरहून मनमाडमार्गे नागपूर, भोपाळ, झाशी, दिल्ली, जम्मू, लखनौ, वाराणसी, हावडा यासह उत्तरेतील आणि पुर्वोत्तर राज्यातील प्रमुख शहरांकडे नियमित प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या धावतात. सैन्य दलाच्या विशेष गाड्याही दक्षिणेतून उत्तरेत जातात. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा पूल महत्त्वाचा आहे. वाळू माफियांमुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, महसूल प्रशासनाने रेल्वेला पत्र पाठवून या प्रश्नी जबाबदारी झटकली आहे; तर रेल्वे सुरक्षा बल झोपेचे सोंग घेत आहे. पोलिस प्रशासनाने रेल्वे आणि महसूल विभागाकडे बोट दाखवले आहे.

वाळू माफियांचा वावर

रेल्वे, महसूल विभाग, रेल्वे पोलिस या प्रश्नाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. रेल्वे पुलाखाली वाळू माफियांचा वावर सहज होत असल्याचे नागरिकांनी पहिले आहे. त्यामुळे भीमा नादीवरील या पुलाबाबत वाटणारी काळजी सोशल मीडियावरही व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे ग्रामीण भागातील ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले आहेत. यासंदर्भातील अहवाल तातडीने देण्याची सूचनाही त्यांनी संबंधितांना केली आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि पोलिस यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, मावळ तालुक्यातील टाकवे आणि आंबी येथील पूल सुरक्षिततेच्या कारणास्तव जड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिली.

महाड येथील पूल वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व जुन्या पुलांची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मागविण्यात आली आहे. बारामती तालुक्यात ब्रिटिशकालीन १३ पूल असून त्यांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा अहवाल लवकर देण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दौंड तालुक्यातील पारगाव येथील पूल यापूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावरून एकही वाहन जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच मावळ तालुक्यातील टाकवे आणि आंबी येथील पूल जड वाहनांसाठी शुक्रवारपासून बंद ठेवण्यात आला आहे. इंदापूरमधील नीरा-नृसिंह येथील केटी बंधाऱ्यावरील पूल यापूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे मुठे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीची पाणीकपात रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

येत्या सोमवारपासून (८ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवडची पाणीकपात रद्द करून दररोज एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 'शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शुक्रवारी दुपारपर्यंत ८६.४० टक्के भरले त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्या आहे,' अशी माहिती महापौर शकुंतला धराडे व आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. शुक्रवारी पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणातून विसर्गही करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने यंदाच्या उन्हाळ्यात तळ गाठला होता. जुलै अखेरपर्यंतच्या पाणी पुरवठ्याचा विचार करता पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. काही दिवसांपूर्वीच आयुक्तांनी आठ दिवसांत पाण्याचा आढावा घेऊन पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

पाण्याची पातळी लक्षात घेता मे महिन्यांपासून महापालिकेने संपूर्ण शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. दररोजच्या पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिन्यात पाऊस न झाल्यामुळे ३० जून रोजी धरणाचा पाणीसाठा ११ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यामुळे शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, धरणाच्या पाणीसाठ्यात एका महिन्यात सहापटीने वाढ झाली. त्यामुळे नागरिक दोन दिवसाआड पाणीकपातीच्या संकटातून सुटले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत पवना धरण ८७ टक्क्यांपर्यंत भरले. शुक्रवारी दिवसभर झालेला पाऊस दुसऱ्या दिवशी असाच राहिला तर शनिवारी सकाळपर्यंत पवना धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. धरणातून शुक्रवारी दुपारी साडेतीननंतर ३१५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पवना नदीच्या पात्रात वाढ झाली होती; तसेच बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्याकडे जाणारा हॅरिस पुलाखाली सब वे बंद झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मावळात पूल वाहून गेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने लोणावळा, खंडाळा आणि संपूर्ण मावळ परिसराला झोडपून काढले. मावळातील प्रमुख धरण असलेले पवना धरण ८८ टक्के भरल्याने धरणातून ३१६० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मुसळधार पावसामुळे मावळातील सर्वच नद्या, नाल्यांना पूर आल्याने अनेक पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर, पवना धरणाच्या पश्चिमेला पवना धरणालगत असलेल्या आपटी व आतवन गावांना जोडणारा पूल वाहून गेल्याने या परिसरातील गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी अवघ्या आठ तासांत लोणावळ्यात १५५ तर पवनाधरण क्षेत्रात १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील तीन चार दिवस मावळात दमदार पाऊस कोसळत होता. मात्र, गुरुवारी पावसाने काहीशी विश्रांती घेत नागरिकांना दिलासा दिला होता. परंतु शुक्रवारी सकाळी नऊ वाजता लोणावळा, खंडाळ्यासह मावळात मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झाली. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोणावळा, खंडाळा आणि मावळातील अनेक ठिकाणी घरे, सोसायट्यामध्ये पाणी घुसले होते. तर, लोणावळ्यातील बाजारपेठेतील गुरुद्वार, निलकमल चित्रपटगृह, म्हाडा कॉलनी, नवरत्न चिक्की, गवळीवाडा परिसरातील एसटी स्थानकाकडे जाणारा मार्ग, वलवन येथील बापदेव मंदिर रोड आदी भागात पाणी साचले होते. पवना धरणाच्या पश्चिमेला असलेल्या आपटी व आतवन या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहून गेल्याने येथील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोणावळ्यात चालू वर्षी आजअखेर पर्यंत २७८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजअखेर पर्यंत २४५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी पालिकेची सभा तहकूब

$
0
0


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी तहकूब झाली. सत्ताधारी व विरोधकांच्या गोंधळानंतर महाराष्ट्राच्या विभाजनाच्या मुद्द्यावर निषेध करून राष्ट्रवादी नगरसेवकांनी सभा तहकूब करण्यास भाग पाडली. नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी विधानभवनात राज्य सरकार महाराष्ट्राच्या विभाजनाचा ठराव मांडून महाराष्ट्राचे तुकडे करू पाहात आहे. त्याच्या निषेधार्थ आजची महापालिका सभाही तहकूब करावी, असा ठराव मांडला. त्या वेळी नगरसेविका सीमा साळवे यांनी शितोळे यांना विरोध करून जो ठराव विधान भवनात मंजूर झालाच नाही. त्यासाठी सभा का तहकूब करायची, असा सवाल उपस्थित केला.

या साऱ्यावर महापौरांनीही विधानभवनात झालेल्या ठरावासाठी महापालिका सभा तहकूब का करायची? शहराचे इतर प्रश्न आहेत. या कारणासाठी सभा का तहकूब करणार नाही, ज्यांना बसायचे त्यांनी बसा ज्यांना बसायचे नाही त्यांनी बाहेर जावे, असा पवित्रा घेतला. मात्र, राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला व मंगला कदम यांनी महापौरांशी संवाद साधला त्यानंतर महापौरांनी तातडीने २० ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महाराष्ट्राचे विभाजन करणाऱ्या भाजपचा धिक्कार असो, अशा घोषणा देऊन सभागृह सोडले. या साऱ्या प्रकारानंतर महापौरांच्या कार्यालयात शिवसेना व भाजपच्या नगरसेविका व नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. मनमानी करणाऱ्या राष्ट्रवादीचा धिक्कार असो,' असे म्हणून या घटनेचा निषेध नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय स्तरावर लैंगिक शिक्षण हवे : डॉ. सरदेसाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सध्या समाजात घडणाऱ्या विनयभंग, बलात्कारासारख्या घडणाऱ्या विकृत घटनांचे उगमस्थान लैंगिक अज्ञानात आहे. अशा घटना टाळण्यासाठी शालेय स्तरावरच लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे,' असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी गुरुवारी व्यक्त केले.

क्लिनिकल सेक्‍सॉलॉजिस्ट व त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शशांक सामक लिखित 'वैद्यकीय कामशास्त्र : सेक्‍सॉलॉजी सर्वांसाठी' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. सामक, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अ. वा. संगमनेरकर, डॉ. डी. जे. पाटील उपस्थित होते.

डॉ. सरदेसाई म्हणाले, 'भारतीय विचारांनुसार अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले जातात आणि मोक्ष प्राप्ती हे मानवी जीवनाचे ध्येय असते. हे ध्येय गाठण्यासाठी मन शांत ठेवणे महत्त्वाचे असते. एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर सापडले नाही; तर मन अस्वस्थ होते आणि त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. लैंगिकता हा असा विषय आहे की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांची उत्तरे सापडल्यास आनंद मिळतो.'

भारतीय समाजामध्ये पूर्वी देवळांपासून ग्रंथांपर्यंत लैंगिकता या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असत. मात्र, दीडशे वर्षांपूर्वी आलेल्या ब्रिटिशांमुळे 'व्हिक्‍टोरियन मोरॅलिटी'तून लैंगिकतेवर बोलणे निषिद्ध मानले गेले. लैंगिकतेबाबत बोलण्यास लोक कचरत असल्यामुळे त्या विषयावर सोप्या व सर्वांना समजेल अशा पद्धतीने लिहिण्याची गरज होती, ती डॉ. सामक यांनी पूर्ण केली आहे. हे पुस्तक म्हणजे शास्त्रीय ग्रंथ आहे, असेही डॉ. सरदेसाई यांनी सांगितले. डॉ.

आगाशे म्हणाले, 'कोणत्याही व्यक्तीची लैंगिक भूक भागविण्यासाठी समाजमान्य मार्ग असावे लागतात. असे समाजमान्य मार्ग नसतील तर त्या गोष्टी चोरून केल्या जातात. अविचारातूनच गैरवर्तन घडते. त्यामुळे लैंगिकता या विषयामध्ये सुधारणा आणण्यासाठी आपल्या घरात, शाळेत, समाजात आणि मग वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण दिले पाहिजे.'डॉ. संचेती, डॉ. लुकतुके, डॉ. पाटील, डॉ. संगमनेरकर यांनी मार्दगदर्शन केले.



वैद्यकीय संशोधन प्रबंधांचा अभ्यास केल्यानंतर हे पुस्तक लिहिले आहे. 'सेक्‍सोलॉजी' या विषयाला भक्कम वैद्यकीय आधार देण्याचा उद्देश हे पुस्तक लिहिण्यामागे आहे. कोणत्याही समाजाच्या स्वास्थ्याचा पाया हे दाम्पत्य असते आणि दाम्पत्याच्या स्वास्थ्याचा पाया हे त्यांचे कामजीवन असते. - डॉ. शशांक सामक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य परिषदेचे पदाधिकारी तोंडघशी

$
0
0







म. टा. प्रतिनिधी, पुणे कोषाध्यक्षाविना खर्चाला व अंदाजपत्रकाला मान्यता देणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेवर पुन्हा अंदाजपत्रक मांडण्याची नामुष्की ओढावली आहे. यासाठी ९ ऑगस्ट रोजी विशेष सभा बोलाविण्यात आली असून या सभेत कोषाध्यक्षांच्या संमतीने खर्च व अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेची सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी पार पडली होती. सर्वसाधारण सभेपुरत्या उरलेल्या पुणे शाखेने आपल्या अजब कारभाराचा 'नमुना अंक' सादर करत कोषाध्यक्षाविना पार पडलेल्या सभेत खर्चाला मान्यता दिली तसेच अंदाजपत्रक मान्य करून घेण्यात आले. ही बैठकच घटनाबाह्य असल्याचे आक्षेप सदस्यांनी नोंदवले तरी कोषाध्यक्षाच्या अनुपस्थितीत हे विषय मंजूर होऊ शकतात, अशी भूमिका स्वीकारत पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेचे 'वगनाट्य' आटोपते घेतले होते. मध्यवर्ती शाखेने अशा प्रकारे पूर्वी मान्यता दिली होती, असे कारण देणारे पुणे शाखेचे पदाधिकारी या नामुष्कीमुळे तोंडघशी पडले आहेत. पुणे शाखेचे कोषाध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत खर्च व अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली होती. 'कोषाध्यक्षाविना होणारी सर्वसाधारण सभा घटनाबाह्य असून त्यात मंजूर होणारे आर्थिक विषय हेदेखील घटनाबाह्य व बेकायदा आहेच. खर्च, ताळेबंद, अंदाजपत्रक हे विषय कोषाध्यक्षाने मांडायचे असतात,' असे आक्षेप नोंदवत आर्थिक विषय बाजूला ठेवा, अशी मागणी सदस्यांनी केली होती.



अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेची ९ ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. कोषाध्यक्षांची तब्येत बरी नसल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. ९ तारखेला होणाऱ्या सभेत कोषाध्यक्षांच्या संमतीने खर्च व अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात येईल. -दीपक रेगे, प्रमुख कार्यवाह, नाट्य परिषद पुणे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळशेज घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, जुन्नर जुन्नरसह आंबेगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून, कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. दरम्यान, दरडीचा मलबा हटवून माळशेज घाटातील रस्ता जरी मोकळा झाला असला तरी, मुरबाडच्या महसूल प्रशासनाकडून घाटात पाऊस सुरूच असल्याने वाहतूक सुरू करण्यास प्रतिबंध केला आहे. करंजाळे येथे माळशेज घाट मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याला तडे गेल्याने रस्ता खचला आहे. वाहनचालक आणि प्रवाशांसाठी या मार्गावरून प्रवास करण्याचा धोका वाढला आहे. जवळपास सहा मीटर लांबीची भेग आणि काही इंच रुंदीची खाच या रस्त्याला पडली आहे. माणिकडोह धरण पावसाने जवळपास निम्मे भरले आहे; तर डिंबे, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी, वडज आणि येडगाव धरणातही सातत्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूशी डॅमसह पुण्यातील पर्यटनस्थळं २ दिवस बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी । पुणे

मुसळधार पावसामुळं पुणे आणि परिसरातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. वाढतं धुकं आणि अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका वाढलेला आहे. तसंच पुढील ४८ तासांत अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळं पर्यटकांच्या सुरक्षेसाठी भूशी डॅमसह लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, कार्ला लेणी, लोहगड किल्ला आणि भाजे लेणी आदी पर्यटनस्थळं पुढील दोन दिवस (शनिवार, रविवार) पर्यटनास बंद करण्यात आली आहेत.

वर्षासहलीसाठी प्रसिद्ध असलेला भूशी डॅम १०० टक्के भरला आहे. त्याच्या भींतीवरून पाणी ओसंडून वाहत आहे. पावसाबरोबरच धुकंही वाढत आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. हवामान खात्यानं पुढील २४ तासांत अतिवृष्टीची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळं भूशी डॅमसह लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, कार्ला लेणी, लोहगड किल्ला, पवना धरण आणि भाजे लेणी आदी ठिकाणांवर शनिवारी आणि रविवारी पर्यटकांनी येऊ नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्ग ४२ हजार क्युसेकने

$
0
0

विसर्ग ४२ हजार क्युसेकने

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरणातून गेल्या चार वर्षांतील उच्चांकी ४२ हजार क्युसेकने (घनफूट प्रतिसेकंद) शुक्रवारी मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे मुठा नदीला मोठा पूर आला असून, धरण क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास पुराची धोकापातळी गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पानशेत धरणही शंभर टक्के भरल्याने त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या क्षेत्रात पडणारा पाऊस गुरुवारी ओसरला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत पानशेत धरण क्षेत्रात १०५ मिलीमीटर, वरसगाव धरणत ११४ मिमी, टेमघरमध्ये ९२ मिमी व खडकवासला धरण परिसरात ५३ मिमी पाऊस पडला. या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली. खडकवासला धरण यापूर्वीच भरले असल्याने त्यातून सकाळी साडेपाच हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. पाऊस वाढू लागल्यामुळे विसर्ग वाढविण्यात आला. दुपारी हा विसर्ग २० हजार आणि सायंकाळी पाच वाजता २३ हजार ९९४ क्युसेक करण्यात आला.
खडकवासला धरणाच्या पाणलोटातील पावसाचा जोर कायम राहिल्याने सायंकाळी सात वाजता हा विसर्ग ३५ हजार १८९ क्युसेक करण्यात आला. याचदरम्यान पानशेत धरणाने ९६ टक्क्यांचा टप्पा ओलांडल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव या धरणातून सायंकाळी साडेसातच्या सुमारास ९ हजार ५०० क्युसेकने पाणी सोडण्याचा निर्णय पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले व खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी घेतला.
पानशेत धरणातून सोडलेले पाणी थेट खडकवासला धरणामध्ये पोहोचते. खडकवासला धरण शंभर टक्के भरले असल्याने त्यात येणारे सर्व पाणी नदीत सोडून देण्यात येत आहे. त्यात पानशेतच्या पाण्याची भर पडल्याने हा विसर्ग रात्री साडेआठच्या सुमारास ४२ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. गेली दोन वर्षे पावसाअभावी खडकवासला धरणातून पाणी सोडले गेले नव्हते. २०११ मध्ये खडकवासला धरणातून ६७ हजार क्युसेक आणि २०१४ मध्ये तब्बल २७ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले

$
0
0

पाण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून नदी आणि कालव्याद्वारे पाणी सोडले जात असताना गेल्या अकरा महिन्यांपासून पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असतानाही आजही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुणेकरांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत पुरेसा पाणीसाठा झालेला असतानाही नागरिकांना मात्र एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील नागरिकांना ‌नियमित पाणीपुरवठा करण्याची घोषणा महापौर जगताप यांनी यापूर्वीही केली होती. मात्र, त्या वेळी धरणात पाणीसाठा पुरेसा नसल्याचे कारण देण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून खडकवासला धरणातून गरजेनुसार लाखो लिटर पाणी कालवा आणि नदीच्या माध्यमातून सोडले जात आहे. नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करावा, असा ठराव गेल्या आठवड्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करूनही केवळ कालवा समितीची बैठक झाली नसल्याचे कारण देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी सोडण्यास नकार दिल्याने अद्यापही नागरिकांना पाणी दिले जात नाही. पाणीकपात रद्द केल्याचे श्रेय मिळावे, यासाठी पालकमंत्री बापट हट्टी भूमिका घेत असल्याची टीका सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे.
धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने शहरासाठी आवश्यक ते पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, यासाठी पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासदांनी जिल्हाधिकारी राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. महापौर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आले. या वेळी सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सुनंदा गडाळे, फारूक इनामदार, बॉबी टिंगरे, सतीश म्हस्के, महेंद्र पठारे, दिनेश धाडवे, बाळा शेडगे, रविंद्र धंगेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राव यांच्या कार्यालयात जाऊन जमिनीवर बैठक मारत नगरसेवकांनी पाणी सोडण्याची विनंती केली. पाणी सोडण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असताना विलंब का केला जात आहे, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आला अफवांचाही पूर

$
0
0

शहरात आला अफवांचाही पूर

म. टा प्रतिनिधी, पुणे
धरणातून सकाळपासून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक अफवाही शहरामध्ये दिवसभर वाहत होत्या. एस. एम. जोशी पुलावर समुद्राच्या लाटेप्रमाणे पाण्याच्या लाटा उसळल्या आहेत, असा एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाला होता. एवढेच नव्हे, तर सावित्री नदीत वाहून गेलेल्या एसटी बस सापडल्याचे फोटोही व्हायरल झाले होते.
सोशल नेटवर्किंग साइटमुळे पुणेकरांना गेल्या चार दिवसांपासून दर थोड्या वेळाने पाऊस आणि धरणातील पाण्याच्या आकडेवारीचे अपडेट मिळत आहेत. याच अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सध्या अफवा पसरविण्यासाठीही होतो आहे. राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असल्याने सगळीकडे पावसाच्या पाण्याचे व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. हे व्हिडिओ विविध ग्रुपवर फॉर्वर्ड करताना, त्यातून अफवा पसरविल्या जात आहेत.
नाशिकमधील एका पुलाचा व्हिडिओ आज पुण्यात चर्चेचा विषय बनला. हा व्हिडिओ एस. एम. जोशी पुलावरील असून लवकरच पाणी या पुलाला व्यापणार असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. याच चर्चेतून पुढे सगळे पूल पोलिसांनी बंद केले असून, आता नागरिकांना नदी ओलांडता येणार नाही, अशी अफवा पुढे आली. काही एफएम चॅनेल्सवरही याबद्दल अर्धवट माहितीआधारे विधाने करण्यात आल्याने नागरिकांमध्ये गैरसमज वाढत गेले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे नागरिकांनी दुपारनंतर एस. एम. जोशी पुलावर पाणी बघण्यासाठी गर्दी केली होती. संध्याकाळी काही वेळासाठी या रस्त्यावर वाहतुकीची कोंडीही झाली. गर्दीच्या नियंत्रणासाठी दुपारापासूनच पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. रात्री आठ वाजेपर्यंत लोकांची गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे पूल, झेड ब्रिज, टिळक पूल बंद

$
0
0

भिडे पूल, झेड ब्रिज, टिळक पूल बंद

पुणे : नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे महापालिकेजवळील जयंतराव टिळक पूल, भिडे पूल आणि झेड ब्रिज (गाडगीळ पूल) वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, तर पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सिंहगड रोड, एरंडवणा, डेक्कन, पाटील इस्टेट या परिसरात फायर ब्रिगेडचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरात १५ ठिकाणची झाडे पडली. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने सायंकाळच्या सुमारास पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. सिंहगड रोड, तसेच इतर काही परिसरात विजेचा पाठशिवणीचा खेळही सुरूच राहिला. धरण क्षेत्रात, शहर परिसरात दिवसभर पावसाचा जोर राहिला. पावसाचा जोर कायम राहिला, तर नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून फायर ब्रिगेडने सिंहगड रोडवर चरवड बंगला येथे फायर ब्रिगेडची एक गाडी तैनात ठेवली आहे. फायर ब्रिगेडकडे पंधरा बोटी असून जवानांना त्याचे पुरेपूर प्रशिक्षण दिलेले आहे.

झाड पडल्याचे पंधरा कॉल
शहरात दिवसभर झाड पडल्याचे पंधरा कॉल फायर ​ब्रिगेडला आले होते. येरवडा, कल्याणीनगर, वडगाव शेरी कोथरूड 'एमआयटी' कॉलेज रोड परिसरात झाड पडल्याचे सर्वाधिक कॉल होते. फायर ब्रिगेडच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत नागरिकांसाठी रस्ते खुले केले.

ब्रिटिशकालीन इमारत पडली
ताबूत स्ट्रीटवरील मेहेर मोहल्ला येथील ब्रिटिशकालीन इमारत बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या बाजूने एक जेष्ठ महिला चालत जात होती. इमारत कोसळत असल्याचे तिच्या वेळीच लक्षात आल्याने ती बचावली. या परिसरातील अनेक जुन्या इमारती धोकादायक बनल्या आहेत.

पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन
भिडे पुलावरून पाणी जात असल्याने तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. टिळक पुलावरून पाणी जात नसले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून तो बंद करण्यात आला आहे. झेड ब्रिजवर बघ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता त्यावरून होणारी वाहतूक बंद केली असून तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images