Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिसांमुळे जुळले पुन्हा बंध

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंतरजातीय विवाह केल्याचा राग मुलीच्या घरच्यांनी मनात ठेवून तिला आठ दिवस घरामध्ये डांबून ठेवले. पण, पतीने वकिलामार्फत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मुलीला आठ दिवसांनंतर पतीच्या घरी तिच्या घरच्यांनी सोडले. सिंहगड रोड पोलिसांकडे नुकतेच हे प्रकरण आले होते.

प्रियांका आणि राजेश (दोघांची नावे बदललेली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. राजेश नोकरी करतो. धायरी येथील एका कॉलेजमध्ये तीन वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचे ठरविले. त्यांनी त्याबद्दल आपल्या घरच्या लोकांना कल्पना दिली. मात्र, जात वेगळी असल्यामुळे तिच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता. वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मुलीचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या दोघांनी २०१५मध्ये लग्न केले. प्रियांकाच्या जिवाला तिच्या घरच्या लोकांकडून जिवाला असलेला धोका मात्र संपला नव्हता. लग्न झाल्यानंतरही तिने घरच्या लोकांना समजाविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता.

काही दिवसांपूर्वी वडिलांच्या घरी आठ दिवस जाऊन येते, म्हणून ती गेली. मात्र, ठरल्यानुसार ती परत आली नाही. पतीने फोन करून तिच्याशी संवाद साधला. तिने आपल्याला घरात डांबून ठेवल्याचे सांगितले. तसेच, येथून आपल्याला घेऊन जाण्याची विनंती केली.

'कायद्याने आपण पती-पत्नी असून सज्ञान आहोत. आपल्या पत्नीला डांबून ठेवण्यात आले असून तिची सुटका करण्यात यावी,' असा अर्ज पतीने अॅड. हेमंत झंजाड आणि अॅड. नितीन झंजाड यांच्यामार्फत दाखल केला. पोलिसांनी त्यांचा अर्ज आल्यानंतर तिच्या घरच्या लोकांना चौकशीसाठी बोलविले. संबं​धित जोडपे सज्ञान असून त्यांना एकत्र राहू द्या. तिला त्रास दिल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते, याची कल्पना त्यांना देण्यात आली. त्यानंतर ते तिला परत पाठविण्यास तयार झाले, अशी माहिती अॅड. झंजाड यांनी दिली. सध्या ते दोघे एकत्र राहत असून त्यांचा संसार सुरू झाला आहे.

मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या एका घटनेत पोलिसांच्या दिरंगाईमुळे एका किशोरवयीन मुलाला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पोलिसांनी उचललेल्या तातडीच्या पावलामुळे डांबून ठेवलेल्या विवाहितेची सुटका झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मुलांसाठी असावे पोषक वातावरण’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पाल्यांची इच्छा नसतानाही पालक त्यांच्यामागे विविध गोष्टी करण्याचा तगादा लावतात. पालकांचा कल त्यांनी केवळ उत्तम गुण मिळवावे, याकडे असतो. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे,' असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी रविवारी पालकांना केले.
'डीपर' आणि 'सर फाउंडेशन' यांच्यावतीने देण्यात येणारा 'महापालक पुरस्कार' डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते जाती निर्मूलनासाठी आयुष्य वेचणाऱ्या लातूर येथील दिलीप आणि सुनीता अरळीकर या दाम्पत्याला देण्यात आला. या वेळी डॉ. अवचट बोलत होते. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोल्हे, फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले, उपाध्यक्ष डॉ. रोहिणी बुटले आदी यह वेळी उपस्थित होते. मान्यवरांनी 'तुम्ही-आम्ही पालक' या मासिकाच्या चौथ्या वर्षीच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन केले.
डॉ. अवचट म्हणाले,'पालकांनी पाल्यांवर अभ्यासाचे, परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचे आणि चांगली नोकरी करण्याचे दडपण टाकले आहे. पाल्यांच्या आवडीनिवडी कोणीच पाहत नाही, केवळ त्यांच्यावर विविध गोष्टी करण्याचा तगादा लावला जातो. पालकांनी पाल्यांना वाढवण्याऐवजी त्याच्याबरोबरीने वाढायलाही शिकले पाहिजे.' डॉ.सप्तर्षी म्हणाले, 'दिलीप आणि सुनीता अरळीकर यांनी विवाह करून दलित आणि ब्राह्मणांमधील वैचालिक अंतर कापले आहे. अशा घटना आणि चांगले काम समाजात सकारात्मक बदल घडवत असतात.' डॉ.बुटले यांनी प्रास्ताविक केले.
..........
'वडिलांनी जिवंतपणीच पुरले'
जन्म झाल्यानंतर पंधरा दिवसातच आई वारली. मुलगी असल्याने सोळाव्या दिवशीच मला वडिलांनी जमिनीत पुरले. मात्र, आजोबांनी मला बाहेर काढले. त्यांनी मला त्यांचे नाव दिले आणि शिक्षणासाठी पाठबळ दिले. त्यानंतर नोकरी करताना दिलीप यांच्याशी ओळख झाली आणि नंतर त्यांनी घरच्यांचा आणि कुटुंबीयायांचा विरोध पत्करून माझ्यासारख्या दलित मुलीशी विवाह केला. डॉ. कुमार सप्तर्षी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शनामुळे जातीनिर्मूलनाच्या चळवळीला सुरुवात केली. आजोबा आणि कार्यात सोबत असणाऱ्या सर्वांचा हा पुरस्कार असल्याची भावना सुनीता अरळीकर यांनी व्यक्त केली. मला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असल्याने खूप आनंद झाला आहे. सुनिताने मला आयुष्यात जगण्याची एक उर्मी दिल्याचे दिलीप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर तक्रारींमध्ये मोठी वाढ

0
0

सहा महिन्यात दुप्पट तक्रारी दाखल; आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
पुणे : पुण्यात सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींचा ओघ वाढतच असून, गेल्या वर्षी एवढ्या तक्रारी सहा महिन्यातच आल्या आहेत. त्यामध्ये नायजेरियन फ्रॉड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड फ्रॉड, मॅट्रिमोनी साइटवर ओळख झाल्यानंतर फसवणूक, सोशल मीडियावरून बदनामी, बनावट प्रोफाइल अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. सायबर गुन्हे वाढल्यामुळे नागरिकांना आर्थिक फसवणुकीबरोबच नाहक बदनामी सहन करावी लागत आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र सायबर सेल आहे. नागरिक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी थेट सेलकडे करतात. बऱ्याच वेळा नागरिक स्थानिक पोलिस ठाण्याकडे गेल्यानंतर त्यांना सायबर सेलकडे पाठविले जाते. गेल्या वर्षभरात पुणे सायबर सेलकडे ७०० तक्रार अर्ज आले होते. या वर्षी १५ जुलैपर्यंत सायबर सेलकडे तब्बल ८४७ तक्रार अर्ज आले आहेत. सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारीच्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नाही. सायबर सेलकडून तक्रार आल्यानंतर तक्रारीचा तपास करून ती संबधित पोलिस ठाण्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविली जाते. किचकट, तीन लाखांपेक्षा जास्त फसवणूक, महिला संदर्भातील गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडून केला जाते. इतर गुन्हे पोलिस ठाण्याकडे तपासासाठी पाठविले जातात.
सायबर सेलकडे आलेल्या तक्रारीमध्ये डेबिट, क्रेडिट फ्रॉड, बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून गोपनीय माहिती मिळवून ऑनलाइन पैसे काढणे, कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक, लॉटरीच्या आमिषाने गंडा, मॅट्रिमोनी साइटवरून ओळख झाल्यानंतर महिलेची फसवणूक, सोशल मीडियावरून महिला, तरुणींची बदनामी, नोकरीच्या आमिषाने फसवणूक अशा स्वरुपाचे अर्ज आहेत, अशी माहिती सायबर सेलकडून देण्यात आली.
..
स्थानिक पोलिस ठाणी उदासीन
सायबर गुन्ह्यासंदर्भात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यांकडे गेल्यानंतर अद्याप नागरिकांना सायबर सेलकडे पाठविण्यात येते. सायबर सेलकडे तक्रार आल्यानंतर त्याचा तपास करून त्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याकडे पाठविली जाते. मात्र, स्थानिक पोलिस ठाण्यांकडून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते. सायबर सेलकडून दोनशे पेक्षा जास्त गुन्ह्यांचा तपास करून त्यामध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यांकडे पाठविले आहेत. मात्र, त्यामध्ये आतापर्यंत ७० प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. एकीकडे सायबर गुन्ह्याच्या तक्रारी वाढत असताना पोलिस ठाणी या गुन्ह्यांबाबत मात्र, उदासीन असल्याचे दिसून आले आहे.
..
ही काळजी घ्या..
- सोशल मीडियाचा वापर करताना तरुणींनी फोटो, पर्सनल माहिती शेअर करू नये.
-मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी पैसे भरताना खात्री करावी. कंपनीची माहिती वेबसाइटवर पहावी.
- मॅट्रिमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटा आणि मगच विश्वास ठेवा.
-बँक कधीही खातेदारांकडे त्यांच्या खात्याची माहिती मागवत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या येणाऱ्या फोनवर बँकेची माहिती देऊ नका. त्याची पोलिसांकडे तक्रार करा.
-मोबाइलवर येणारा ओटीपी क्रमांक आणि गोपनीय माहिती कोणाला देऊ नका.
-स्वस्त दरात कर्ज घेताना खात्री करूनच पैसे भरा. कारण अशा फसवणुकीच्या घटना वाढत आहेत.
- लॉटरीचे मेसेज आणि ई-मेलला बळी पडू नका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयएस’ घडविणार हल्ले

0
0

मुंबईही दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; सिराजची 'एनआयए'कडे कबुली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'इस्लामिक स्टेट' या दहशतवादी संघटनेकडून (आयएस) मुंबईसह देशभरात हल्ले घडवून आणण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती महंमद सिराज उर्फ महंमद सिराजउद्दीन उर्फ सिराज (वय ३३) या संशयित दहशतवाद्याने उघड केली आहे. मूळचा कर्नाटकचा असणारा सिराज जयपूर येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये असिस्टंट इंजिनीअर होता. राष्ट्रीय तपास यंत्रनेने (एनआयए) त्याला 'आयएस'शी संपर्कात असल्याच्या संशयावरून अटक केली आहे.
'एनआयने' सिराजकडे तपास केल्यानंतर त्याच्याविरोधात जयपूर येथील विशेष कोर्टात दोषारापपत्र दाखल केले. त्यामध्ये 'आयएस'कडून मुंबईसह देशभरात मोठे हल्ले घडवून आणण्यात येणार असल्याचा खुलासा सिराजने केला आहे. सिराज आणि त्याच्या केनियन मैत्रिणीच्या चॅटिंगमधून ही माहिती उघड झाली आहे. मुंबईमध्ये 'आयएस'चे दहशतवादी असल्याचे सिराजला माहिती होती, असेही या चॅटमधून स्पष्ट झाल्याने तपास यंत्रणांनी आपले लक्ष मुंबईवर केंद्रीत केले होते, अशी टिप्पणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केली.
केनियन महिला दहशतवादी उम्म कनिता मिन्ना हिच्याशी सिराज संपर्कात होता. तो तिच्या प्रेमात पडला होता. 'मुजाहिदा उर्फ मिन्नाशी लग्न म्हणजे जन्नतचे तिकीट आहे, 'मुजाहिदाशी लग्न करणे हे एक स्वप्न आहे,'असे सिराजने आपल्या मित्राला सांगितले होते. सिराज आणि त्याच्या मित्रामधील चॅटिंग 'एनआयए'ला मिळाले असून, त्याचा स्पष्ट उल्लेख दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. 'आयएस'कडून भारतात मोठा हल्ला घडवून आणण्यात येणार असल्याचा सिराजच्या चॅटमध्ये उल्लेख होता, असेसी त्यात 'एनआयए'ने म्हटले आहे. सिराजच्या ग्रुपमध्ये दीडशेहून अधिक जण होते. त्यामध्ये पुण्यातील एका युवतीचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या युवतीकडे तपास केला असून, तिचा जबाबही नोंदवला आहे. सिराजने केलेल्या खुलाशानंतर देशभरात विविध ठिकाणी 'आयएस'शी संबंधित​ विविध 'ई-मुजाहिद्दीन'च्या हस्तकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
..
बगदादी 'टाइम पर्सन ऑफ दी इयर'
सिराज याच्या डोक्यात 'आयएस'च्या प्रमुखपदी अबू बक्र अल बगदादी याला 'टाइम पर्सन ऑफ दी इयर' बनवण्याची इच्छा होती. त्यासाठी 'टाइम'ची वेबसाइट हॅक करून त्यावर मतदान करावे, असे आवाहन त्याने त्याच्या ग्रुपमधील 'आयएस' समर्थकांना केले होते. अमेरिका, फिलिपिन्स, श्रीलंका, इंडो​नेशिया, मॉरिशस, केनिया, ब्रिटन येथील अनेक जण सिराजच्या संपर्कात होते. इराकमधील रमादी या शहरात आपण एकत्र जमू, असे आवाहनही ते एकमेकांना करत होते. रमादीवर 'आयएस'ने ताबा मिळवल्याने येथे भेटण्याचे मनसुबे रचण्यात येत असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्रामगृहाचे उघडेना दार

0
0

चार वर्षांत कोट्यवधींचा खुर्दा; 'एमटीडीसी'तील राजकारण कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सिंहगडाच्या विकासासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) चार वर्षांत कोट्यवधी रुपये खर्चण्यात आले आहेत. मात्र, सध्या धूळ खात पडून असलेल्या विश्रामगृहाबाबत मंडळाने मौन बाळगले आहे. मंडळातील अंतर्गत राजकारणामुळे बारा वर्षांपासून सिंहगडावरील प्रशस्त विश्रामगृह कुलूपबंद अवस्थेत आहे.
वन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुरातत्त्व विभाग आणि महापालिकेतर्फे सिंहगडाचा पर्यटन आराखडा तयार करण्यात आला. त्या अंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून अनेक विकासकामे सुरू आहेत. तटबंदीच्या डागडुजीबरोबरच गडावर ध्यानकेंद्र, खुला रंगमंच अशी उल्लेखनीय कामांनी वेग घेतला आहे. अर्थातच गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. मात्र गडावर राहण्यासाठी अद्याप प्रशासनाने व्यवस्था केलेली नाही. येथे खासगी मालकीच्या अनेक जागा असून, तेथेच पर्यटक राहतात. वन विभागाने दोन वर्षांपूर्वी विश्रामगृहाचे नूतनीकरण केले. किरकोळ कामांमुळे सहा महिन्यांपासून त्याचे उदघाटन रखडले आहे. पर्यटन विकास मंडळाने दहा वर्षांपूर्वीच पर्यटकांच्या राहण्यासाठी गडाच्या टोकाला प्रशस्त विश्रामगृह बांधले. मात्र, ते अद्याप सुरू झालेले नाही. मंडळातील अंतर्गत वाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे अद्याप त्याला मुहूर्त लागलेले नाही. सहा वर्षांपूर्वी नूतनीकरणासाठी ७५ लाख रुपयांचा निधी प्रशासनाने मंजूर केला होता. पण, प्रत्यक्षात काही हालचाली झाल्या नाहीत.
विश्रामगृहाचे प्रवेशद्वार ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे बांधल्यामुळे पर्यटक आवर्जून तेथे चौकशीसाठी जातात. प्रवेशद्वाराच्या आतील पडका वाडा पाहिल्यावर मात्र, त्यांची निराशा होते. विश्रामगृहाचे आतील चित्र विदारक आहे. बांधकामावर शेवाळे चढले असून, दरवाजे, खिडक्या तुटल्या आहेत. छत गळत असल्याने पावसाचे पाणी वारंवार पडून, आतील खोल्या निसरड्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे मंडळाचे पदाधिकारी या भागातील लोकप्रतिनिधी वारंवार गडावरील कामांची पाहणी करायला येतात. मंडळाचे ध्यानधारणा केंद्र आणि खुला रंगमच विश्रागृहापासून अवघ्या पाच मिनिटांवर आहे. पण, त्याबद्दल सोयीस्कर मौन बाळगण्यात येते. या संदर्भात अधिक माहितीसाठी पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक वैशाली चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.
.............
दरडीचा धोका कायम
पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणामुळे सिंहगडावर सुट्ट्यांच्या दिवशी दहा हजारांहून अधिक पर्यटक जातात. मात्र, घाट रस्त्यातील खड्डे आणि ठिकठिकाणी पडलेल्या दरडींमुळे गैरसोय होत आहे. गडमार्गावर दोन वर्षांपूर्वी मोठी दरड पडली होती. तसेच गेल्या वर्षीही या मार्गावर काही ठिकाणी लहान स्वरूपात दरड कोसळल्या. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरात दरडप्रवण क्षेत्रात कोणतेही सुरक्षेचे उपाय राबविले नाहीत. काही धोकादायक वळणांवर पावसाळ्यापूर्वी जाळ्या बसविणार असल्याचे बांधकाम विभागाने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात काहीच काम झालेले नाही. गेल्या महिनाभरातही धोकादायक वळणांवर दगड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकवरील मैत्री तरुणीला महागात

0
0

'सोशल' मित्राने दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोन वर्षांपूर्वी पुण्यातील युवतीची केरळच्या तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली.. त्यांच्या या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले..लग्नासाठी बोलणी झाल्यानंतर तरुणाने युवतीसाठी परदेशातील नोकरी सोडून पुण्यात येण्याचे ठरवले. दरम्यान, युवतीची दुसऱ्या तरुणासोबत मैत्री झाली आणि तिने त्याच्याशी विवाहाचा निर्णय घेतला..त्यामुळे चिडलेल्या तरुणाने तिला रस्त्यात अडवून बराच वेळ थांबवले. त्यानंतर तिला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळायला लागल्या. डेक्कन पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर संबंधित तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या.

अॅन्टो कॅरल लिज्यु (वय २५, रा. केरळ, सध्या-भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या बाबत २३ वर्षीय युवतीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी अॅन्टोसोबत युवतीची फेसबुकवरून ओळख झाली. अॅन्टो उच्चशिक्षित असून कतारमध्ये कंपनीत असिस्टंट एचआर म्हणून नोकरीला होता. युवतीशी फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील संभाषण वाढले. त्यातून त्यांचे प्रेम फुलले. अॅन्टोचा भाऊ पुण्यात असतो. त्यामुळे दोघांमध्ये विवाह संदर्भात बोलणी झाली. युवतीसाठी तो कतार येथील नोकरी सोडून दोन महिन्यांपूर्वी पुण्यात आला. पण, आपल्या भावी वधूची दुसऱ्याच तरुणासोबत मैत्री झाल्याचे त्याला समजले. तसेच, तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यामुळे अॅन्टो वैतागला होता.

डेक्कन परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात युवती शिकते. त्या ठिकाणी आरोपी तिला भेटण्यासाठी गेला. तेथे त्याने बोलणे बंद केल्याबाबत विचारणा केली. पण, युवतीने आपले दुसऱ्याबरोबर विवाह जमल्याचे सांगितले. ती कॉलेजमधून घरी जाण्यासाठी निघाली. चिडलेल्या अॅन्टोने तिचा पाठलाग करून रस्त्यात अडविले. तिचा मोबाइल हिसकावून घेतला. दोन तासांनंतर युवतीने मोबाइल परत घेऊन मित्रमैत्रिणींना बोलवून घेतले. त्यानंतर पुन्हा त्याने लग्नाची मागणी घातली. तिला रिक्षा थांबवून खाली उतरविले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यापासून कशीबशी सुटका करून ती घरी पोहचली. घडलेला प्रकार तिने कुटुंबीयांच्या कानावर घातला. त्यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली. डेक्कन पोलिसांच्या पथकाने आरोपीला काही तासांतच अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता रेल्वेचाही प्रवासी विमा

0
0

दहा रुपयांमध्ये दहा लाखांचे संरक्षण; ऑगस्टपासून अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी १० लाख रुपये विम्याची योजना लागू केल्यानंतर, आता रेल्वेनेही प्रवाशांसाठी ऐच्छिक विमा योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत १० रुपयांपेक्षा कमी दरात १० लाख रुपयांचा विमा दिला जाणार आहे. ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून ऑनलाइन तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. ऑगस्टपासून ही योजना लागू होण्याची चिन्हे आहेत.

रेल्वे प्रवासादरम्यान, स्टेशनच्या वेटिंग हॉलमध्ये आणि तिकीट आरक्षण केंद्र किंवा बुकिंग ऑफिसजवळ एखादी दुर्घटना घडून त्यात प्रवाशाचा मृत्यू किंवा गंभीररीत्या जखमी झाल्यास त्याची नुकसान भरपाई या विम्याअंतर्गत दिली जाणार आहे. शिवाय सरकारी नियमानुसार रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी आर्थिक मदतही दिली जाणार आहे. याबरोबरच प्रवाशांची बॅग चोरीला गेल्यावरही भरपाई मिळणार आहे. मात्र, त्यासाठी प्रवाशांना विमा उतरविणे आवश्यक असेल. हा विमा प्रवाशांसाठी बंधनकारक असणार नाही. 'आयआरसीटीसी'च्या वेबसाइटवरून ऑनलाइन तिकीट बुक करताना संबंधितांना या विम्याविषयी विचारणा केली जाणार आहे. तसेच, विमा काढणाऱ्या प्रवाशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. विम्यासाठी १० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क प्रवासाचे अंतर आणि कालावधी यावर निश्चित केले जाणार आहे.

रेल्वे अपघातात विमा काढलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास रेल्वेकडून प्रवाशाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. प्रवाशाला कायम स्वरूपाचे अपंगत्व आल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास साडेसात लाख रुपयांपर्यंत मदत दिला जाईल. सद्यस्थितीत रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास सुमारे लाख चार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गंभीर जखमी झाल्यास दोन लाखांपर्यंतची मदत दिली जाते. भविष्यात सर्व प्रकारच्या प्रवाशांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून राबविण्यात येणारी ही विमा योजना चांगली आहे. मात्र, महाराष्ट्रात एसटी महामंडळ प्रवाशांकडून एक रुपयाच्या बदल्यात १० लाख रुपयांचा विमा देते. त्या तुलनेत रेल्वेच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विम्यासाठी १० रुपयांपर्यंत तिकीट आकारण्याची आवश्यकता नाही. तसेच, फक्त ऑनलाइन तिकीट आरक्षित करणाऱ्यांसाठीच ही योजना का, सुरुवातीच्या टप्प्यातही सर्व प्रवाशांसाठी ही योजना लागू करणे शक्य आहे, असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी व्यक्त केले.

नवीन विमा योजनेचे फायदे

- १० रुपयात १० लाख रुपयांचा विमा - मृतांच्या नातेवाइकांना १० लाख व अपंगत्व आल्यास साडेसात लाख रुपये - सामान हरवल्यासही मिळणार नुकसान भरपाई

सरकारी नियमानुसार सध्या रेल्वेकडून दिली जाणारी मदत

मृतांच्या नातेवाइकांना- चार लाख रुपये गंभीर जखमींना- दोन लाख रुपयांपर्यंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाध्यक्षाचे पद केवळ मि​रवण्यासाठीच

0
0

माजी संमेलनाध्यक्षांवर डॉ. सबनीस यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आतापर्यंतच्या साहित्य संमेलनाध्यक्षांनी अध्यक्षीय भाषणात सर्व घटकांना सामावून घेणारी तसेच त्यांच्या साहित्य, संस्कृतीचे संचित पेलणारी भूमिका मांडली नाही. मुस्लिम, भटके, दलित या घटकांविषयी दोन ओळी देखील कोणाच्या भाषणात नव्हत्या. केवळ मेहुण म्हणून मिरवण्यासाठी संमेलनाध्यक्षाचे पद वापरण्यात आले,' अशी घणाघाती टीका संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी केली.

अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे 'वादे संवादे' या कार्यक्रमात डॉ. सबनीस यांची मुलाखत लेखक राजन खान यांनी घेतली. या वेळी बोलताना डॉ. सबनीस यांनी माजी संमेलनाध्यक्षांच्या दांभिकतेवर टीकास्त्र सोडले. 'अक्षरधारा'चे रमेश आणि रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.

'साहित्य प्रांतात काही लेखक तकलादू भूमिका मांडून लोकशाहीमुळे अध्यक्ष होत असतील, तर मी का नको,' असा सवाल डॉ. सबनीस यांनी उपस्थित केला. 'राज्यातून मते मिळाली; पण पुण्याने दगा दिला,' असा आरोपही त्यांनी केला. 'लोकांच्या मनात अभ्यासक-विचारवंत ही माझी ओळख आहे. कोण हे सबनीस, असा सवाल करणारे लेखक खलनायक आहेत. सबनीस हे ब्राह्मण असूनही ते बहुजन विरोधी नाहीत, हे सिद्ध न करता आल्याने अनेक लेखकांनी माझ्याविरोधात आघाडी उघडली होती. हे माझ्या विरोधातील राजकारण होते,' असा आरोप डॉ. सबनीस यांनी केला. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

'जातीवादात मानवतेची दमछाक'

'मी रूढ अर्थाने डावा, पुरोगामी आहे. पण, सत्य फक्त पुरोगामी-प्रतिगामी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर या टोकांत बंदिस्त करता येत नाही. डाव्या प्रवाहातील विकृती दृष्टिआड करता येणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त हिंदुत्ववाद्यांचे किंवा भाजपचे कसे राहतात, अंदमानच्या कारागृहातील ओळी काढल्याचे स्वागत काँग्रेस कशी करू शकते,' असे सडेतोड सवाल डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. 'सर्व जातींमध्ये ब्राह्मण्य असून ब्राह्मण-ब्राह्मणेतर या वादांत महाराष्ट्राची, मानवतेची आणि सत्याची दमछाक झाली आहे,' अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेपत्ता विमानात निगडीचे बारपट्टे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरला जाताना शुक्रवारी सकाळी बंगालच्या उपसागरावरून बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानातील २९ जणांमध्ये निगडीचा फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे या तरुण हवाई दल अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

अंदमान-निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी अंतोनोव्ह ३२ हे हवाई दलाचे विमान २३ प्रवासी, तसेच सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास चेन्नई हवाई तळावरून झेपावले. बंगालच्या उपसागरावरून जात असताना या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर स्वत: या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. ४८ तासांनंतरही बेपत्ता विमानाचा तपास लागू शकलेला नाही.

फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे (वय २८) हे या विमानात नेव्हिगेटर म्हणून कार्यरत होते. निगडी प्राधिकरणातील सिंधुनगर एलआयजी कॉलनीमधील रहिवासी आहेत. राजेंद्र आणि विद्या बारपट्टे यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांना एक धाकटा भाऊ आहे. कुणाल यांच्या लग्नासाठी गेले काही महिने प्रयत्न सुरू होते. सहा जुलैलाच ते निगडीला घरी येऊन गेले होते.

विमान बेपत्ता झाल्याची माहिती समजल्यावर बारपट्टे परिवाराला मोठा धक्का बसला. कुणाल यांचे मामा दिनेश पाटील यांनी हवाई दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत. या घटनेबाबत संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटवर दिनेश पाटील यांनी ट्विट करून कुणाल यांच्याविषयी विचारणा केली. त्यानंतर मात्र हवाई दलाचे अधिकारी सातत्याने बारपट्टे परिवाराच्या संपर्कात आहेत. कुणाल यांच्या सुरक्षिततेसाठी नातेवाइक, शेजारी, मित्र परिवार प्रार्थना करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन प्रवेशांवर आक्षेप

0
0

तातडीने उपाय शोधण्याची भारतीय शिक्षण मंडळाची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावीच्या यंदाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींवर भारतीय शिक्षण मंडळाने आक्षेप घेतले आहेत. ही प्रक्रिया गतिमान आणि कमीत कमी दिवसात पूर्ण होण्यासाठी सरकारने तातडीने उपाय शोधावेत, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह धनंजय कुलकर्णी यांनी याबाबत संघटनेची भूमिका स्पष्ट केली. कुलकर्णी म्हणाले, 'अकरावीची ऑनलाइन प्रक्रिया केवळ मोजक्याच विद्यार्थी आणि पालकांना समाधानी ठेऊ शकत असेल, तर ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होते आहे, अशी संघटनेची धारणा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीतून हवे ते कॉलेज मिळालेले विद्यार्थीच समाधानी झाले आहेत. इतर सर्व विद्यार्थी आणि पालक अद्यापही प्रक्रियेमधून चांगले कॉलेज मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ही बाब चुकीची आहे.'
'प्रक्रियेच्या कालावधीबाबतही संघटनेने आक्षेप घेतला आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ ही प्रक्रिया सुरू राहणार असेल, तर त्याचा थेट अकरावीच्या शिकविण्यावर परिणाम होतो. अकरावीचे वर्ग पुरेसे होत नसल्यास, या काळात विद्यार्थ्यांच्या वाया जाणारा वेळ आणि त्यामुळे होणारे शैक्षणिक नुकसान याची जबाबदारी शिक्षण खाते घेणार आहे का,' असा सवालही कुलकर्णी यांनी उपस्थित केला. मुंबई आणि पुण्याची भौगोलिक परिस्थिती आणि वाहतुकीच्या सुविधा पूर्णपणे वेगळ्या असल्याने या दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीची प्रक्रिया यशस्वी होईल, असा अट्टहास करणेही चुकीचे असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.
...
खर्चाची जबाबदारी कोण घेणार?
प्रक्रियेतील त्रुटींमुळे यंदा फेऱ्याही वाढल्या आहेत. ऑनलाइन यंत्रणा राबविण्यासाठी 'एमकेसीएल'सोबत झालेल्या करारानुसार, प्रत्येक फेरी आणि प्रत्येक विद्यार्थ्यामागे शिक्षण खाते 'एमकेसीएल'ला काही विशिष्ट सेवाशुल्क देणे निश्चित आहे. फेऱ्या वाढल्याने सेवाशुल्काचा हा खर्चही वाढणार असल्याने, त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवालही कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्याची गरज

0
0

पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांची अपेक्षा म. टा. प्रतिनिधी, पुणे वैद्यकीय उपचार महागडे होत असल्याने मध्यमवर्गीय पेशंटना उपचारासाठी 'दारिद्रय रेषेखाली' असल्याचा दाखला द्यावा लागत आहे. त्या करिता सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्याची गरज असून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पुणे विभागाचे आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केली. जॉन हॉफकिन्स विद्यापीठ, सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ एज्युकेशन आणि ससून हॉस्पिटल यांच्या दरम्यान संयुक्त संशोधन प्रकल्प सुरू आहे. त्या प्रकल्पांतर्गत टीबीच्या (क्षयरोग) पेशंटचा शोध घेऊन त्यांचे निदान करण्यासाठी संशोधन केले जाणार आहे. त्याकरिता राज आणि भारती शहा यांनी ६६ लाख रुपये किमतीची अद्ययावत प्रयोगशाळा असलेली मोबाइल क्लिनिक व्हॅन ससूनला देणगी म्हणून दिली. त्या व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, उपअधिष्ठाता डॉ. समीर जोशी, पालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी, शिविना कुमारी, डॉ. विद्या मावे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय तावरे उपस्थित होते. ही व्हॅन पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील टीबी पेशंटचा शोध घेऊन त्यांचे निदान करणार आहे. ही निदान चाचणी मोफत असणार आहे. 'सध्या वैद्यकीय उपचार परवडणारे राहिले नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना दारिद्रय रेषेखाली यावे लागत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आरोग्याच्या सुविधा महाग असल्याने सार्वजिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे,' असे पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम म्हणाले. 'संशोधनामधील लॉबिंग बंद व्हायला हवे. तसेच संशोधन हे संसर्गजन्य आजारांच्या पलिकडे जाणे गरजेचे आहे,' असे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. डॉ. एस.टी. परदेशी म्हणाले, 'सध्या शहरात डेंगीनंतर सर्वाधिक पेशंट असणारा आजार क्षयरोग आहे. आजही हा आजार दुर्लक्षित आहे. ससूनमध्ये कंपन्यांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्याप्रमाणे पुणे महापालिकादेखील सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असा प्रयत्न करेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोहरी आळी ‘सीझनल मार्केट’

0
0

बोहरी आळी 'सीझनल मार्केट'

Harsh.Dudhe@timesgroup.com
पुणे : सुमारे दीडशे वर्षांपासून जमा-खर्च आणि खतावणी वह्यांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या रविवार पेठेतील बोहरी आळीची ओळख आता 'सीझनल मार्केट' म्हणून होत आहे. सर्वधर्मीय सण, उत्सव आणि लग्न-वाढदिवसासाठी लागणारे साहित्य, घरगुती शोभेच्या वस्तूंचे विविध प्रकार आणि डेकोरेशनचे आकर्षक व लक्ष वेधून घेणारे साहित्य मिळण्याचे ते ठिकाण झाले आहे. त्यामुळे पुणे-पिंपरी चिंचवड परिसरासोबतच पुणे जिल्ह्यातील नागरिक या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे.
काही वर्षांपूर्वी बोहरी आळीत जमा-खर्च, रोजमेळ, खतावणी आणि विविध प्रकारच्या हिशेबाच्या वह्या घेण्यासाठी केवळ व्यापारी वर्ग, दुकानदार व विविध प्रकारचे व्यावसायिक यांचीच गर्दी असायची. दरवर्षी येणाऱ्या दसरा, दिवाळी, पाडवा यांसारख्या मुहूर्तांना बोहरी आळीत या वह्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत असे. मात्र, कालांतराने दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, ईद, ख्रिसमस यांसारख्या सणांसाठी लागणारे विविध प्रकारचे प्लास्टिक, थर्मोकोल, शोभेच्या कागदापासून तयार करण्यात येणारे डेकोरेशनचे आकर्षक साहित्य मिळायला सुरुवात झाली. यात झुंबर, माळा, चक्र, फुलांचे विविध प्रकार, बॉल्स, भिंतीला लावण्यात येणारे स्टिकर्स व पुठ्ठे यांचा समावेश आहे. काही दिवसांनी राखी पौर्णिमेचा सण येत असल्याने राख्यांची दुकाने सजायला सुरुवात झाली आहे.
गौरी-गणपती उत्सवासाठी लागणारे सजावटीचे आकर्षक साहित्यही इथेच मिळते. या उत्सवांसाठी मोत्यांच्या लहान-मोठ्या माळा, प्लास्टिकची फुले व माळा, जिलेटीन, विद्युत रोषणाईचे साहित्य, विविध प्रकारचे लाईट्स, आकर्षक मखर, रुखवत, दागिने, झुंबर, थर्मोकोल व कागदापासून तयार होणाऱ्या सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. लालबहादूर शास्त्री चौक ते सोन्यामारुती चौकापर्यंत दुतर्फा अशा प्रकारचे साहित्य मिळणाऱ्या दुकानांची गर्दी दिसेल. रांगोळी व त्याचे साहित्य मिळण्याची दुकाने येथे आहेत. ख्रिसमससाठी लागणारे ख्रिसमस ट्री, विद्युत रोषणाईचे साहित्य मिळण्याची दुकाने येथे आहेत. विविध प्रकारच्या औचित्यांना गिफ्ट देण्यासाठी लागणाऱ्या असंख्य वस्तूंची दुकाने नव्यानेच सुरू झाली आहे.
..................
शालेय साहित्याची दुकानेही
लग्न आणि वाढदिवस सजावटीतून थाटात व उत्साहात साजरे करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात लहान-मोठी दुकाने आहेत. वाढदिवस साजरे करण्यासाठी हॅप्पी बर्थ डे लिहिलेले मोठे स्टीकर्स, जिलेटीनच्या माळा व टोप्या, कागदी झुंबर, सजावटीसाठी लागणारे विविध साहित्य, आकर्षक मेणबत्त्या, शोभेच्या वस्तू या आळीत आता सहज मिळतात. लग्नासाठीच्या मुंडावळ्या, रुखवताचे विविध प्रकार, बाशिंग, मुंडावळी, इमिटेशन ज्वेलरी, लग्नाच्या मांडवाला सजावटीसाठी लागणारे हलके-फुलके साहित्य, लग्नात उडवण्यात येणारे स्प्रे, नवरी-नवरदेवाच्या मेकअपचे साहित्य अशा नानाविध प्रकारच्या वस्तू दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान, टिकल्या, झुमके, बांगड्या, अमेरिकी ज्वेलरी, लहान पर्स अशा वस्तूंची दुकानेही आहेत; तसेच खेळण्यांची आणि शालेय साहित्याची दुकाने सुरू झाली आहेत.
.....................
डेकोरेशनचे आकर्षक साहित्य
बोहरी आळीची मुख्य ओळख ही जमा-खर्च आणि खतावणी वह्यांच्या विक्रीसाठी फार पूर्वीपासून आहे. ही ओळख आजही कायम आहे. त्यामुळेच व्यापाऱ्यांची गर्दी या भागात असते. त्यात आता सण, उत्सव, लग्न-वाढदिवसासाठी लागणारे साहित्य, घरगुती शोभेच्या वस्तूचे विविध प्रकार आणि डेकोरेशनचे आकर्षक व लक्ष वेधून घेणारे साहित्य मिळण्याच्या एक सिझनल मार्केटने भर पडली आहे, अशी माहिती एम. आर. घोडनदीवाला या दालनाच्या मालकांनी दिली.
..................



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेब मोकाशी यांचा शिवसेनेत प्रवेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे कोंढवे-धावडेचे माजी सरपंच बाळासाहेब मोकाशी आणि ग्रामपंचायत सदस्य शंतनू मोकाशी यांनी खडकवासला, उत्तमनगर, वारजे, सिंहगड रोड भागांतील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे, माजी हवेली तालुका प्रमुख महेश मते, उपतालुका प्रमुख श्याम मोरे या वेळी उपस्थित होते. खडकवासला विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटना बांधणी करून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मोकाशी यांनी यावेळी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सैराट सिनेमा ही चूक ठरली काय?’

0
0

पुणे : 'सैराट सिनेमा करून मी चुकलो की काय, असा प्रश्न पडतो. सिनेमाला सुळावर चढवा; मात्र माझा पिच्छा सोडा,' अशा शब्दांत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी शनिवारी खंत व्यक्त केली. सिनेमातून दिलेला संदेश बाजूलाच राहिला आणि नको त्याच गोष्टींशी सिनेमाला जोडण्यात आले, असेही ते म्हणाले.

कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीविरूद्ध लढणाऱ्या छाया तमायचेकर आणि 'खतना' या दाऊदी बोहरा समाजातील प्रथेविरूद्ध जगभरात लढा उभारणाऱ्या सहियो गटाच्या इन्सिया दरीवाला यांना नारी समता मंचातर्फे 'कन्या महाराष्ट्राची' पुरस्काराने गौरविण्यात आले. नागराज मंजुळे यांच्या हस्ते या दोघींना हा पुरस्कार देण्यात आला. आयएलएस लॉ कॉलेजच्या प्रा. पंडित सभागृहात हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ अध्यक्षस्थानी होत्या. मंचाच्या अध्यक्षा शुभांगी देशपांडे, प्रीती करमरकर, शुंभांगी देशपांडे, साधना दधिच आदी या वेळी उपस्थित होत्या.

'सैराट सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी समाजात सगळे चांगले होते. मात्र, सिनेमानंतर सगळे बिघडले, असे चित्र निर्माण केले जातेय. सिनेमातून जे म्हणायचे आहे, त्याची चर्चा कोणीच केली नाही. हे प्रकार पाहून स्पर्धेत उतरायचीही आता भीती वाटू लागली आहे,' असेही मंजुळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासक्रम सहा वर्षांचाच

0
0

अभ्यासक्रम सहा वर्षांचाच

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) या वर्षापासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ठरावीक मुदतीत आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. तीन वर्षांचा अभ्यासक्रम जास्तीत जास्त सहा वर्षांत पूर्ण करावा लागेल, अन्यथा प्रवेश रद्द होईल. श्रेयांक व सेमिस्टर पद्धतीनुसार हा नियम लागू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
'एफटीआयआय'मध्ये या शैक्षणिक वर्षापासून श्रेयांक व सेमिस्टर पद्धत लागू होत आहे. यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सहामाहीनुसार होणार आहे. पूर्वी हे मूल्यांकन वार्षिक पद्धतीने होत होते. देशातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांप्रमाणे श्रेयांक व सेमिस्टर पद्धत संस्थेमध्ये लागू करण्यात आली आहे. 'एफटीआयआय'चे संचालक भूपेंद्र कँथोला व तज्ज्ञांच्या उपस्थितीत सोमवारी पत्रकार परिषदेत या शैक्षणिक बदलाचे सादरीकरण करण्यात आले. 'विद्यार्थ्यांची नवीन तुकडी एक ऑगस्टपासून दाखल होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना यापुढे ठरावीक मुदतीत आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल,' असे कँथोला यांनी सांगितले.
कँथोला म्हणाले, 'तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला अर्थात सहा सेमिस्टरसाठी प्रत्येकी एक संधी असेल. यानुसार सहा वर्षांत हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. वैद्यकीय कारणामुळे हजेरी कमी असणे; तसेच परीक्षा देता आली नसलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल. सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना श्रेयांक व सेमिस्टर पद्धत लागू नसल्याने त्यांचा अभ्यासक्रम चालू पद्धतीनुसारच पूर्ण होईल. नवीन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन फक्त लेखी परीक्षेतून न करता श्रेयांक पद्धतीनुसार अधिक प्रात्यक्षिकांच्या आधारे करण्यात येईल; तसेच शिक्षकांचेही मूल्यमापन होणार आहे.'


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिचरांचे उद्या आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा येरवडा मनोरुग्णालयातील विविध पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने पुरुष आणि महिला परिचारकांवर (नर्स) कामाचा ताण पडू लागला आहे. रुग्ण सेवेव्यतिरिक्त इतर प्रशासकीय आणि किरकोळ कामांमध्ये परिचरांना गुंतवून ठेवल्यामुळे रुग्णांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. वारंवार विनंत्या करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने परिचरांकडून बुधवारी (२७ जुलै) अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये सुमारे अठराशेहून अधिक पुरुष आणि महिला मनोरुग्ण उपचार घेतात. मनोरुग्णांना रोजच्या रोज अंघोळ घालणे, नाष्टा, जेवण, गोळ्या, औषधे वेळेवर देणे, कपड्यांची स्वच्छता राखण्यासाठी महिला आणि पुरुष परिचर काम करतात. साधारण दोन हजार क्षमतेच्या मेंटल हॉस्पिटलच्या रुग्णांच्या सेवेसाठी एकूण साडेचारशे परिचर आहेत; पण अनेक वर्षापासून मंजूर जागांपैकी शेकडो परिचरांच्या जागा रिक्त असल्याने सद्यस्थितीतील परिचरांवर कामाचा ताण पडत आहे. पुरुष मनोरुग्णांच्या देखभालीसाठी एकूण २८० मंजूर पदे असून सद्यस्थितीत २१९ परिचर काम करतात, तर ६१ पदे रिक्त आहेत. तसेच परिचरांवर लक्ष ठेवणाऱ्या हवालदारांची १२ पदे रिक्त आहेत. आधीच पुरुष आणि महिला परिचारकांची संख्या कमी असताना प्रशासनाकडून त्यांना विविध कामांत गुंतवून ठेवण्यात आले आहे, तर काही ठिकाणी तंत्रज्ञ नसतानाही त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रुग्णांच्या देखभाल व्यतिरिक्त परिचारकांना हॉस्पिटलचा पाणीपुरवठा करणे, रुग्णांचे मशिनमध्ये कपडे धुणे, धान्य दळणे, स्वयंपाक गृहात धान्याची मोजमाप करणे आणि इलेक्ट्रिकचे कुठलेही ज्ञान नसताना वीज पुरवठा सुरळीत करण्याची कामे नेमून देण्यात आली आहेत. याशिवाय अत्यवस्थ रुग्णांना ससून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यास तो पळून जाऊ नये, म्हणून तीन पाळ्यांमध्ये तीन परिचर नेमणे, तसेच वसाहतीचा पाणीपुरवठा करण्यासाठी सहा परिचर नियुक्त केले आहेत. याशिवाय प्रशासकीय इमारतीतील दैनंदिन कामे करण्यासाठी दहा परिचर दिमतीला ठेवल्याने रुग्णांच्या देखभाल आणि स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होऊ लागली आहे. मनोविकारतज्ज्ञ परिचारिकेला गेल्या सात महिन्यांपासून हॉस्पिटलचे काम काढून घेत त्यांच्याकडे सुपरवायझर पद सोपविण्यात आले आहे. कामाचा कुठलाही गंध नसताना केवळ प्रशासनाच्या आदेशामुळे परिचारकांना विविध कामे करावी लागत असल्याची माहिती परिचारकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांकडून शपथपत्र

0
0

विद्यार्थ्यांकडून शपथपत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेत (एफटीआयआय) नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग सुरू होण्याआधीपासूनच शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्याकडून शपथपत्र भरून घेतले जात आहे. संस्थेतील सध्याच्या विद्यार्थ्यांचे वर्तन पाहता नवीन विद्यार्थ्यांकडून त्रास होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली असून, यामुळे प्रशासन व विद्यार्थी यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
'एफटीआयआय'मध्ये सध्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. संस्थेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संप, आंदोलने; तसेच वर्तनामुळे संस्था गेली वर्षभर चर्चेत आहे. मद्यपान, धिंगाणा यावरूनही संस्था टीकेची धनी ठरली आहे. विद्यार्थ्यांमधील नैतिकता जागवण्यासाठी शपथपत्र भरून घेतले जात आहे.
शंभर रुपयांच्या मुद्रांकावर विद्यार्थ्यांनी हे शपथपत्र भरून द्यायचे आहे. 'संस्थेतील नियमांचा भंग झाल्यास माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार संस्थेस असेल. नियमभंगासाठी केव्हाही दंड ठोठावला गेल्यास मी तो भरीन. ध्वनी प्रदूषणाविषयीच्या नियमांचे पालन करणे मला मान्य असून त्याबाबत कायदेशीर कारवाई झाल्यास मी जबाबदार राहीन. शिक्षक, कर्मचारी व वडिलधाऱ्यांचा अपमान करणार नाही. बाहेरील व्यक्तींना मी वसतिगृहात राहण्यास देणार नाही व तशी गरज भासल्यास पूर्वपरवानगी घेईन. सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करीन. संस्थेचे संपूर्ण शुल्क मी आगाऊ भरीन व शुल्कातून सूट मिळावी यासाठी कोणत्याही प्रकारचा बाह्य वा भावनिक दबाव मी संस्थेवर आणणार नाही,' असे मुद्दे त्यात आहेत.
'रॅगिंगविरोधी तरतूद सोडली, तर शपथपत्र नवीन आहे. कसे वागायचे हे माहीत नसायला आम्ही लहान मुले नाहीत. असुरक्षिततेच्या भावनेतून अशी पत्रे घेतली जात आहेत,' अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी या पार्श्वभूमीवर व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांना काही विद्यार्थ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांनी अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामाच दिला व संस्थेने प्रचंड प्रयत्न केल्यानंतर ते राजीनामा मागे घेण्यास तयार झाले. असे प्रकार संस्थेत वारंवार घडत असून त्यास रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे
सूत्रांनी सांगितले.
.....................
हे हमीपत्र नवीन नाही, ते २०१४ पासून भरून घेतले जात आहे. त्या वेळी संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सईद अख्तर मिर्झा होते, तर संस्थेचे संचालक डी. जे. नारायण होते. असे नियम सर्व शिक्षणसंस्थांमध्ये असून अशी हमीपत्रे घेतली जातात.

- भूपेंद्र कॅंथोला, संचालक, एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरशब्दप्रभू पुरस्कार काकतकर यांना जाहीर

0
0

स्वरशब्दप्रभू पुरस्कार काकतकर यांना जाहीर

पुणे : संगीत, शब्द, जाहिरात आणि शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणारे बासरीवादक अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार दृक-श्राव्य माध्यमाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिलेले दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते अरुण काकतकर यांना जाहीर झाला आहे. ११ हजार रुपये, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भरत नाट्य मंदिर येथे पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सोमण यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन युवा विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थी आणि तबलावादक श्रीपाद शिरवळकर यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. कार्यक्रमानंतर काकतकर यांच्या योगदानाचा मागोवा घेणारा 'नक्षत्रांचे दिवस' हा कार्यक्रम होणार असून, प्रसिद्ध निवेदक अरुण नूलकर संवाद साधणार आहेत, असे गुणवर्धन सोमण आणि भाग्यश्री गढवाल यांनी कळविले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढील वर्ष ठरणार संस्कृत शिक्षणाचे

0
0

Yogesh.Borate @timesgroup.com

पुणे : संस्कृत शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वर्ष २०१७-१८ हे 'संस्कृत शिक्षा वर्षम्' म्हणून साजरे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. संस्कृतमधून बोलता यावे यासाठी 'स्पोकन इंग्लिश क्लासेस'च्या धर्तीवर वर्ग आयोजित होऊ शकतात. संस्कृत भाषेच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचविणाऱ्या समितीने त्याविषयी सूचना केल्या आहेत. तसे झाल्यास पुढील वर्षी केवळ वर्गातच नव्हे, तर वर्गाबाहेरील उपक्रमांमधूनही देशभरात संस्कृतचे धडे गिरविले जाणार आहेत.

देशभरात संस्कृत भाषेचा दैनंदिन जीवनामधील वापर वाढावा आणि संस्कृत शिक्षणाचे सध्याचे स्वरूपही अधिक व्यापक व्हावे, यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार करण्यासाठी केंद्राच्या मनुष्यबळविकास मंत्रालयाने एक समिती नेमली होती. तिरुपतीच्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू एन. गोपालस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्यासह देशभरातील इतर अकरा शिक्षणतज्ज्ञांचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल नुकताच केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाला सादर केला आहे. संस्कृतच्या विकासासाठी पुढील दहा वर्षांमध्ये आवश्यक धोरणांचा विचार या अहवालामध्ये करण्यात आला आहे. त्यामध्ये वर्ष २०१७-१८ हे 'संस्कृत शिक्षा वर्षम्' म्हणून साजरे व्हावे, या सूचनेचा समावेश आहे.

संस्कृत शिक्षण, संस्कृतचे अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती, नवे उपक्रम, शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण आदी बाबींचा या अहवालामध्ये विचार करण्यात आला आहे. त्याचवेळी संस्कृतविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्येही जागृती निर्माण व्हावी, यासाठी 'संस्कृत शिक्षा वर्षम्'चा विचार या समितीने केला आहे. या वर्षभरात संस्कृत शिक्षकांनी केवळ वर्गामध्येच नाही, तर वर्गाच्या बाहेरही संस्कृतच्या प्रसारासाठी प्रयत्न करावेत, स्पोकन संस्कृतचे वर्ग घ्यावेत, संस्कृतच्या प्रचारासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, वेगवेगळी प्रकाशने आदी उपक्रम करावेत आदी सूचना याच संदर्भाने करण्यात आल्या आहेत. वर्ष २०००-०१ मध्ये संस्कृत वर्ष म्हणून केंद्र सरकारने विशेष उपक्रम योजले होते. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा आर्थिक तरतूदही उपलब्ध करून दिली होती. त्याचप्रमाणे 'संस्कृत शिक्षा वर्षम्' साठीही विशेष आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही या अहवालात करण्यात आल्या आहेत.

'ऐच्छिक शिक्षण'

संस्कृत शिक्षणाचे सध्याचे स्वरूप बदलण्यासाठी आवश्यक बाबी या अहवालात विचारात घेण्यात आल्या आहेत. संस्कृत शिक्षकांची शिकविण्याची पद्धत बदलण्याच्या सूचनांचाही त्यात समावेश आहे. संस्कृत शिक्षणाची सगळ्यांना सक्ती करण्यापेक्षा, ऐच्छिक शिक्षणाच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा विचारही या अहवालात मांडण्यात आला आहे. या सूचनांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, एआयसीटीई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट प्रकल्पांची चौकशी करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेले प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणारे आहेत. उद्घाटनापूर्वी अवघ्या दोनच कामांची मान्यता देण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. इतक्या कमी वेळेत पालिका प्रशासनाने हे कसे साध्य केले. स्मार्ट सिटीत प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्प हे फसवणूक करणारे असून, याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी सोमवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रकल्प न उभारतान केवळ 'चमकोगिरी' कशी करता येईल, अशा प्रकल्पांना यात प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. स्मार्ट सिटीच्या कामासाठी अधिकाऱ्यांना गुंतवले जात असल्याने शहरातील इतर कामांकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड यावेळी करण्या‌त आली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच औचित्याचा मुद्दा म्हणून नगरसेवक संजय बालगुडे यांनी महापालिका प्रशासनाने २३ जूनला 'लाइट हाऊस' प्रकल्पाच्या कामाची वर्क ऑर्डर दिलेली असताना अवघ्या दोन दिवसात २५ जूनला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन कसे करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेकडे (एसआरए) प्रस्ताव नसतानाही औंध येथील आंबेडकर वसाहतीमध्ये एसआरए योजना राबविण्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आल्याचा आरोप बालगुडे यांनी केला. स्मार्ट सिटीच्या बैठकीसाठी शहरात आलेले केंद्र सरकारचे अधिकारी कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले, त्यांनी किती बैठका घेतल्या, त्यासाठी किती खर्च आला, हा खर्च नक्की कोणी केला, याची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील विविध भागात दहा हजार बेवारस मुले महापालिकेला सापडली असून सध्या स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी पालिकेने निवडलेल्या बाणेर, बालेवाडी, औंध या भागात सर्वात अधिक ही मुले आढळल्याचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. या मुलांसाठी स्मार्ट सिटीत काय उपाययोजना केल्या असा प्रश्न त्यांनी विचारला. 'मुंगेरीलाल के हसीन सपने' अशी अवस्था स्मार्ट सिटी प्रकल्पाची असून यामुळे महापालिकेला काहीही फायदा होणार नसल्याचे मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांनी सांगितले. तर या प्रकल्पामुळे महापालिका कर्जबाजारी होणार असल्याचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भाजपने हुकुमशाही सुरु केल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ प्रसिद्धी मिळावी, यासाठी विरोधकांकडून स्मार्ट सिटीवर आरोप केले जात असल्याचे भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी सांगितले. स्मार्ट सिटी अत्यंत चांगली योजना असून यामुळे शहराचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वांची मान्यता घेऊनच सर्व प्रकल्प राबविले असल्याचा खुलासा पा‌लिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केला. पुढील आठ दिवसात लाइट हाउस प्रकल्पाची माहिती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images