Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘तीन मिनिटांत टोल घ्या’

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; 'आयआरबी'च्या अधिकाऱ्यांना सुनावले

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर टोल आकारणीसाठी होणाऱ्या विलंबामुळे टोल नाक्यांवर वाहनांच्या लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी, खेडशिवापूर येथील टोल नाक्यावर राबविण्यात आलेली 'तीन मिनिटांत टोल'ची योजना येथेही राबवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) व आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच, तुम्हाला शक्य नसेल, तर मला सांगा. मी तिथे येऊन चांगली उपाययोजना करतो,' असेही बजावण्यास राव विसरले नाहीत.

राव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची शुक्रवारी बैठक झाली. बैठकीस वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, अजित शिंदे, अनिल वळीव, लोहमार्ग पोलिस, एमएसआरडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एक्स्प्रेस-वेवरील टोल नाक्यावर जास्त वेळ वाट पाहावी लागते, अशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. 'एक्स्प्रेस-वेवरील टोल नाक्यावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ प्रवाशांना थांबावे लागू नये, अशी यंत्रणा विकसित करा. अन्यथा, जिल्हा प्रशासनाला या मार्गावरील टोलनाक्यांबाबत खेडशिवापूर येथील टोल नाक्याप्रमाणे यंत्रणा विकसित करावी लागेल,' अशी तंबी राव यांनी दिली.

यंत्रणांचा ढिसाळ कारभार !

एक्स्प्रेस-वेवर अलिकडे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अपघात होण्यास मानवी चुकांबरोबरच पायाभूत सुविधांचा अभाव कारणीभूत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी जाळ्या तुटल्या आहेत. त्यामुळे मार्गावर जनावरे येतात. अचानक समोर आलेल्या जनावरांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत, असे सांगून राव यांनी संबंधित यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावरही बोट ठेवले. त्याचबरोबर अलिकडे या मार्गावर दुचाकीस्वारही प्रवास करीत असतात. त्यामुळेही अपघात होतात. वास्तविक, या मार्गावर येणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्के लायसन्स हवंय?... पुढच्या वर्षी या!

$
0
0

३१ डिसेंबरपर्यंतच्या ऑनलाइन अपॉइंटमेंटची नोंदणी पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चारचाकी वाहन चालविण्याचे पक्के परवाने काढण्याच्या तयारीत असलेल्यांना आता थेट पुढच्या वर्षीच प्रादेशिक परिवहन कार्यालयाची अर्थात 'आरटीओ'ची पायरी चढावी लागणार आहे. पक्क्या परवान्याच्या ऑनलाइन अपॉइंटमेंटचे ३१ डिसेंबरपर्यंतच्या वेळा नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच, त्यापुढील अपॉइंटमेंटचे स्लॉट अद्याप खुले केलेले नसल्याने अर्जदारांना अपॉइंटमेंटच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. शिकाऊ किंवा पक्क्या परवान्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक आहे. शिकाऊ परवाना काढल्यानंतर एका महिन्यानंतर पक्क्या परवान्याकरीता अपॉइंटमेंट घेता येते. तसेच, शिकाऊ परवान्याची सहा महिन्यांची मुदत संपण्याअगोदर पक्क्या परवान्याची परीक्षा देणे बंधनकारक आहे. मात्र, आता चारचाकी वाहनांसाठी डिसेंबरपर्यंतच्या अपॉइंटमेंटच्या सर्व वेळा नोंदविण्यात आल्या आहेत. शिकाऊ परवान्याची मुदत संपल्यानंतरच्या तारखेची अपॉइंटमेंट पक्क्या परवान्यासाठी मिळाल्यास, अशा अर्जदारांची पक्क्या परवान्यासाठीची चाचणी शिकाऊ परवान्याची मुदत संपण्याच्या अगोदरच्या आठवड्यात घेतली जाते. मात्र, सध्या एक जानेवारीपासून पुढील वेळा खुल्या नसल्याने अपॉइंटमेंट मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे. अशावेळेस शिकाऊ परवाने काढणाऱ्यांना पक्का परवाना काढण्यासाठी पुन्हा एकदा शिकाऊ परवान्याचे नूतनीकरण करावे लागण्याची शक्यता आहे.

शिकाऊ परवाना काढणाऱ्यांवर पुन्हा नूतनीकरणाची वेळ येऊ नये यासाठी आरटीओने तातडीने एक जानेवारी २०१७ पासूनचे स्लॉट खुले करावेत, अशी मागणी महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे आणि महासचिव यशवंत कुंभार यांनी केली.

आळंदी रोड कार्यालय ठप्प!

संगम पूल येथील आरटीओ कार्यालय आणि आळंदी रोड येथील कार्यालयाला तांत्रिकदृष्ट्या जोडणाऱ्या 'लीज लाइन'मध्ये बिघाड झाल्याने एक जूनपासून आळंदी रोड कार्यालयातील कामकाज ठप्प आहे. वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था (आयडीटीआर) येथे परीक्षा देणारे चारचाकीचालक आणि आळंदी रोड कार्यालयात दुचाकीची परीक्षा देणाऱ्यांचे परवाने आळंदी रोड कार्यालयात तयार होतात. त्यामुळे सुमारे चार हजार परवाने प्रलंबित असण्याची शक्यता आहे. दरम्यान, येथील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकील नियुक्तीची दाभोलकरांची मागणी

$
0
0

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 'सीबीआय'च्या (केंद्रीय अन्वेषण विभाग) वकिलांना सहाय्य करण्यासाठी आमच्याकडून वकील नियुक्त करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा अर्ज हमीद दाभोलकर यांनी कोर्टात केला आहे. या अर्जावर सीबीआय आणि आरोपीच्या वकिलांना कोर्टाने बाजू मांडण्यास सांगितले आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपात वीरेंद्रसिंह तावडेला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सीबीआयचे वकील बाजू मांडत आहेत. त्यांच्या मदतीसाठी आमच्यातर्फे वकील नियुक्त करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा अर्ज हमीद दाभोलकर यांनी कोर्टात केला आहे. या प्रकरणात दाभोलकर यांचे वकील कोर्टात हजर राहून सीबीआयच्या वकिलांना मदत करतील असा अर्ज त्यांचे वकील अॅड. अभय निवगी यांनी केला आहे. यावर सीबीआय आणि आरोपीच्या वकिलांना बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमचे प्राधान्य पुण्याला’ : अजित पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवसेना, मनसेला मुंबईचे प्रेम, मुख्यमंत्र्यांचे नागपूरकडे लक्ष, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे नांदेडला झुकते माप आहे; पण आम्ही कायमच पुण्याला प्राधान्य दिले आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला. तसेच, निवडणुकीत पुणेकरांनी नाकारले असले, तरी पुणेकरांवरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही, अशा शब्दांत पुण्याच्या विकासासाठी यापुढेही काम करत राहणार, असा संदेश त्यांनी दिला. तसेच, सध्याचे केंद्र-राज्य सरकार मेट्रोवरून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि मोहिनी देवकर यांच्या विकास निधीतून श्री शंकर महाराज उड्डाणपुलावर केलेल्या एलईडी इफेक्टचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेते बंडू केमसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 'केंद्र-राज्यात सत्ता असूनही या सरकारने पुण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असून, मेट्रो, भामा-आसखेड असे शहराचे महत्त्वाचे प्रकल्प अजूनही प्रलंबित आहेत,' अशी टीका पवार यांनी केली. 'पश्चिम महाराष्ट्राकडेही सरकारचे लक्ष नाही,' असा आरोप त्यांनी केला.

आगामी आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोबाबत घोषणा होण्याची शक्यता असल्याचा धागा पकडून पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 'शहरातील अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केल्यानंतर ते वेळेत पूर्ण करून त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीने केले. परंतु, सध्याचे सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ भूमिपूजनाचा घाट घालत आहे,' अशी टीकाही पवार यांनी केली. विद्यार्थ्यांच्या कलचाचणीच्या अहवालावरही प्रसिद्धीसाठी छायाचित्र छापणे, हेच अच्छे दिनाचे वास्तव आहे, असा टोमणा त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव न घेता लगावला.

पाण्याच्या मुद्द्यावरून टीका

धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन शहर आणि ग्रामीण भागासाठी पुरेशा पाण्याचे नियोजन आमच्या काळात ऑक्टोबरमध्येच पूर्ण व्हायचे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी मात्र त्यातही वेळकाढू भूमिका घेतली. त्यामुळे, मध्यंतरी ग्रामीण भागात पाणी सोडण्यावरून संघर्ष निर्माण झाला, असा टोला अजित पवार यांनी हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एज्युफेस्ट’ला भरघोस प्रतिसाद

$
0
0

'एज्युफेस्ट'ला भरघोस प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या करिअरमार्गांची माहिती एकाच व्यासपीठावर आणि एकाच छताखाली मिळावी, या उद्देशाने 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या 'एज्युफेस्ट' या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात आणि बहुसंख्येने आलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शनिवारी झाले. प्रगत संगणन विकास केंद्राचे (सी-डॅक) महासंचालक प्रा. रजत मूना यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विविध करिअरमार्गांची माहिती घेतली.
या प्रदर्शनात राज्यात आणि देशपातळीवर नाव मिळवलेल्या शैक्षणिक संस्था, कॉलेज, स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षा कोचिंग क्लास सहभागी झाले आहेत. त्यामुळे या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची आणि करिअरमार्गांची माहिती संस्था, कॉलेज, क्लासच्या प्रतिनिधींकडून मिळत आहे. प्रदर्शनातील शैक्षणिक सेमिनारमधून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने ऐकता येतील. या प्रदर्शनात माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शनिवारी गर्दी केली होती. प्रा. मूना यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.
या प्रदर्शनात माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स, सिंहगड इन्स्टिट्युट्स, एएसएम इन्स्टिट्युट्स, सूर्यदत्ता इन्स्टिट्युट्स, इंदिरा इन्स्टिट्युट्स, डीएसके इंटरनॅशनल कॅम्पस, टाटा इन्स्टिट्युट्स ऑफ सोशल सायन्स, सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, डिझाइन मीडिया अॅन्ड एज्युटेन्मेंट स्कूल, एमइएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड करिअर कोर्सेस अशा नामवंत शैक्षणिक संस्था व कॉलेजांचे स्टॉल्स आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये असलेल्या इंजिनीअरींग, एमबीए, फार्मसी, वैद्यकीय, डिझाइन, फोटोग्राफी, पत्रकारिता, फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन, एमसीए, सोशल सायन्स अशा विविध अभ्यासक्रमांची आणि त्यातून करिअरमार्ग निवडण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनात युनिक अॅकॅडमीसारखे नामवंत स्पर्धापरीक्षा अभ्यास केंद्राचे दालन खास विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आहे; तसेच जेईई मेन्स, अॅडव्हान्स आणि नीट प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेल्या प्राइम अॅकॅडमीचेदेखील स्टॉल आहे. डिझाइन क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम आणि करिअरबद्दलची माहिती होण्यासाठी क्रिएटीव्ह अॅकॅडमी या संस्थेचादेखील स्टॉल आहे. हे प्रदर्शन आज रविवारी १९ जूनलादेखील सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स‍र्वांसाठी खुले राहणार आहे.
.................
आज होणारे सेमिनार्स

यूपीएससी परीक्षांची तयारी, सकाळी ११ ते १२ तुकाराम जाधव (संचालक, द युनिक अॅकॅडमी)
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, दुपारी १२ ते १, ललित कुमार (अध्यक्ष, प्राइम अॅकॅडमी)
पॉलिटिक्समधील करिअरसंधींवर मार्गदर्शन, दुपारी ३ ते ३.३०, आशिष लॉयल लाल (प्रवेश विभागप्रमुख, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट)
चित्रपट आणि प्रसारमाध्यमांतील संधींवर मार्गदर्शन, दुपारी ३.३० ते ४, सुतनु गुप्ता (प्राध्यापक, एमआयटी एसएफटी)
डिझायनिंगमधील करिअरसंधी, दुपारी ४ ते ५, संतोष रासकर (संचालक, सृजन कॉलेज ऑफ डिझाइन)
दहावीनंतरच्या करिअरसंधी, सायंकाळी ५ ते ६, एन. ए. शेख (संचालक, क्रिएटिव्ह अॅकॅडमी)
................
प्रदर्शन कोठे
स्थळ : गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट
अधिक माहितीसाठी संपर्क : अमरज्योती शर्मा (९९६०५७०७५१) किंवा नंदिता माथूर (९८२२६६३३४१)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग दिनानिमित्त विशेष कार्यशाळा

$
0
0

योग दिनानिमित्त विशेष कार्यशाळा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सुदृढ जीवनशैली जगायची असेल, तर व्यायामाला पर्याय नाही आणि त्यातल्या त्यात मानसिक आरोग्यही कमवायचे असल्यास योगासनांचीही सांगड घालायला हवी, हे आता सगळ्याच वयोगटातील आणि व्यवसाय-नोकरीतील लोकांना पटू लागले आहे. जागतिक योग दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' आणि 'इन्स्टिट्यूट ऑफ योग' यांच्यातर्फे तीन जुलैपर्यंत विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ योगा, स्वीकार हॉटेल गल्ली, नळस्टॉप चौक, कर्वे रोड, एरंडवणे इथे दररोज सकाळी ७ ते ८.३० या वेळेत या कार्यशाळा होणार आहेत. १३ जूनपासून सुरू झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या कार्यशाळेला सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता 'योगोपचाराने मात लठ्ठपणावर' (२० ते २६ जून) या कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. जंक फूडमुळे सर्व वयोगटातील लोकांची प्रमुख अडचण म्हणजे वजन वाढणे, म्हणूनच सोपी योगासने, सूक्ष्म व्यायाम, श्वसनाचे प्रकार, प्राणायाम आदींचा समावेश या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. त्यानंतर 'योगोपचाराने ताणतणावपासून मुक्ती' (२७ जून ते ३ जुलै) ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही. तज्ज्ञ योग शिक्षक या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, वैद्यकीय तपासणी, आहार मार्गदर्शन आणि वर्षभर योग मार्गदर्शन असे फायदे या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना मिळणार आहेत.
सुदृढ शरीरासह, निरोगी राहण्यासाठी एकदम वजन न घटवता हळूहळू वजन कमी करणाऱ्या योगोपचारांचा कार्यशाळेत समावेश आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यशाळांसाठी प्रवेश मर्यादित आहे. कार्यशाळांसाठी महिला प्रशिक्षकही उपलब्ध आहेत.
............
सोमवारसाठी नावनोंदणी सुरू
'योगोपचाराने मात लठ्ठपणावर' (२० ते २६ जून) या कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. जंक फूड, चुकीची आहारपद्धत, बदलती जीवनशैली यामुळे वजन वाढण्याची समस्या सगळ्या वयोगटामध्ये आहे. म्हणूनच सोपी योगासनं, सूक्ष्म व्यायाम, श्वसनाचे प्रकार, प्राणायाम आदींवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
.................
नावनोंदणीसाठी...
कार्यशाळा सगळ्यांसाठी खुल्या असून, त्यासाठी प्रवेशमूल्य आहे. कार्यशाळेत 'मटा' कल्चर क्लब सदस्यांना; तसेच नव्याने कल्चर क्लबचे सभासद होणाऱ्यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. संपर्क : (०२०) - ६५२९११८३, ९८५०२२९७५९, ९०४९२९६५३९.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसरला पुन्हा पाइपलाइन फुटली

$
0
0

हडपसरला पुन्हा पाइपलाइन फुटली

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
हडपसर गाडीतळ परिसरातील संजीवनी हॉस्पिटलशेजारी पिण्याच्या पाइपलाइनमधून झालेल्या गळतीमुळे शनिवारी हजारो लिटर पाणी वाया गेले. धरणात पाणी कमी असल्याने महापालिकेने एक दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचे दिसत आहे.
वारंवार पाणी गळती होण्याच्या ठिकाणी दुरुस्ती पूर्ण होत नसल्याने वारंवार गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे परिपूर्ण प्लंबर व अधिकाऱ्याच्या अभ्यासाद्वारे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळी संजीवनी हॉस्पिटलशेजारी ही पाइपलाइन फुटली. येथे शुक्रवारी संध्याकाळी पाणी गळती होत असल्याने पाणीपुरवठा विभागाकडून गळती रोखण्यासाठी दुरस्ती करण्यात आली होती. काम पूर्ण झाले असे सांगून प्लंबर निघून गेले. मात्र, शनिवारी सकाळी पाणी सोडल्यानंतर पाइपमधून मोठी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शेजारील हॉस्पिटलचा तळमजला पाण्याने पूर्ण भरला होता; तसेच डीपी रोडला पाण्याचा पाट वाहत होता. असाच प्रकार मागील आठवड्यात मगरपट्टा चौकातही घडला होता.
...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटके विमुक्त महिला परिषदेचे उद्‌घाटन

$
0
0

भटके विमुक्त महिला परिषदेचे उद्‌घाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'समाजात आजही महिलांना दुय्यम वागणूक मिळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यांना अद्याप व्यवहारात स्थान मिळत नाही. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण आणखी वाढत आहे. समाजातील ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी सरकार आणि समाज यांमध्ये संवाद असणे गरजेचे आहे,' असे मत सरकारच्या राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकूजी इदाते यांनी व्यक्त केले.
निर्माण संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय भटके विमुक्त महिला परिषदेचे उद्‌घाटन इदाते यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. आयोगाचे सदस्य श्रवणसिंग राठोड, वैशाली भांडवलकर उपस्थित होते. परिषदेत भटक्‍या विमुक्त महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
इदाते म्हणाले, 'देशाच्या इतिहासात डोकावून पाहिले, तर पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशातील महान पुरुषांची यादी होते; पण त्यामध्ये स्त्रियांना स्थान मिळण्याची गरज आहे. जिजाऊ मॉंसाहेब, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, अशा कित्येक महिलांनी समाजात क्रांती घडवली. मात्र, दुर्दैवाने त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण रहात नाही. या सर्व पराक्रमी महिलांच्या कार्याची जाण समाजाने ठेवायला हवी.'
भांडवलकर म्हणाल्या, 'भटक्‍या विमुक्त जातीतील लोकांना आजही समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या समाजातील महिलांचे आजही मोठ्या प्रमाणावर शोषण होत आहे. ते थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्याशिवाय शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा या समाजाला देणे अत्यंत गरजेचे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोकणाला टाळून मान्सून विदर्भात

$
0
0

उद्यापर्यंत राज्याच्या अन्य भागांत प्रवेशास अनुकूल स्थिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोकणाऐवजी मान्सूनने विदर्भाच्या सीमेकडून राज्यात शनिवारी प्रवेश केला. उद्या, सोमवारपर्यंत तो कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामानाशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले. पुढील दोन दिवस पुण्यातही पावसाच्या सरींची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे. शनिवारी मान्सून विदर्भातील गडचिरोली व लगतच्या काही भागात दाखल झाला. सोमवारपर्यंत मान्सून कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भाच्या बहुतांश भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे, असे 'आयएमडी'तर्फे सांगण्यात आले. तसेच शनिवारी तो आंध्र प्रदेशाची किनारपट्टी, ओडिशा, पश्चिम बंगालच्या उर्वरित भागात आणि उत्तर कर्नाटकचा आणखी काही भाग, छत्तीसगड व तेलंगणचा काही भाग, झारखंड व बिहारच्या काही भागांत दाखल झाला आहे.

शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सांगलीत कवठे महांकाळ येथे तब्बल ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुण्यात शहराच्या काही भागांत पावसाच्या अगदी हलक्या सरींनी हजेरी लावली होती. शनिवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद विदर्भातील अमरावती येथे (१२ मिलिमीटर) झाली. महाबळेश्वर येथे चार मिमी पाऊस नोंदला गेला.
.........
आजपासून पाऊस वाढणार

पुढील दोन दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवसांत कोकण, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसतील, असे 'आयएमडी'तर्फे सांगण्यात आले.

................
विदर्भातून प्रवेश दुर्मिळ नाही

विदर्भातून मान्सूनने राज्यात दाखल होण्याची घटना दुर्मिळ नसल्याचे 'आयएमडी'तर्फे सांगण्यात आले. २००७मध्ये मान्सून पश्चिम आणि पूर्वेकडून एकाच दिवशी राज्यात दाखल झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचवीपर्यंत मातृभाषेतूनच शिकवा

$
0
0

बोर्ड परीक्षेत ग्रेस गुण बंद करण्याची, गुणांऐवजी पर्सेंटाइल पद्धत सुरू करण्याची शिफारस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून देण्याबरोबरच शिक्षणात त्रिभाषा सूत्र कायम ठेवण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्यासाठीच्या समितीने केली आहे. पाठांतरावर भर देणारी परीक्षा पद्धत बदलून नवी पद्धत विकसित करतानाच बोर्ड परीक्षांमध्ये सध्या प्रचलित असलेली 'ग्रेस' गुण देण्याची पद्धत बंद करण्याची शिफारसही या समितीने केली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांत गुण वा श्रेणी देण्याऐवजी पर्सेंटाइल देण्याची पद्धत तपासून पाहण्याची सूचना या समितीने केली आहे. छोट्या शाळांचे मोठ्या शाळांत विलीनीकरण करण्याची कल्पनाही समितीने मांडली आहे.

समितीचे अध्यक्ष टी. एस. आर. सुब्रह्मण्यन यांनी आपला अहवाल काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना सादर केला होता; मात्र त्याचा तपशील सरकारने जाहीर केला नव्हता. हा अहवाल राज्यांना दिल्यानंतरच तपशील सर्वांसाठी खुला करणार असल्याचे इराणी यांनी सांगितले होते; मात्र २३० पानांचा हा अहवाल खासगीरीत्या जाहीर करण्यात आला असून, शिक्षण क्षेत्रात त्याबाबत चर्चा सुरू आहे. अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, भाषाशिक्षण, खासगी कोचिंग क्लास, शिक्षक भरती आदी अनेक विषयांबाबतची निरीक्षणे नोंदवतानाच या समितीने शिफारशी केल्या आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटलेले असतानाच्या सध्याच्या काळात मातृभाषेतून वा प्रादेशिक भाषेतून शिक्षण देण्याची सूचना सुब्रह्मण्यन समितीने केली आहे. पाचवीपर्यंत माध्यमाची भाषा मातृभाषा किंवा त्या प्रांताची भाषा असायला हवी, असे नमूद करण्यात आले आहे; मात्र याची अंमलबजावणी कशी करावी, त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मातृभाषा/प्रादेशिक भाषा, हिंदी आणि इंग्रजी हे त्रिभाषा सूत्र कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर संस्कृत भाषेवरही भर देण्याचा उल्लेख आहे. संस्कृतला 'अभिजात भाषा' असे न मानता स्वतंत्र विषय म्हणून ती शिकवायला हवी, अशी शिफारस करण्यात आली आहे.
..........

सुब्रह्मण्यन समितीच्या शिफारशी

परीक्षा

- दहावीची बोर्ड परीक्षा दोन स्तरांवर हवी.
- गणित आणि विज्ञानात गती नसणाऱ्यांसाठी कनिष्ठ स्तरावरील परीक्षा.
- बोर्ड परीक्षांतील ग्रेस गुणांची पद्धत बंद करायला हवी.
- गुणांऐवजी पर्सेंटाइल पद्धत स्वीकारली जावी.
- विद्यार्थ्यांनी मागणी केली, की बोर्ड परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन सुविधा हवी.
- बारावीनंतर पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर पात्रता परीक्षा हवी.
- आठवीपर्यंत नव्हे, तर पाचवीपर्यंतच नापास न करण्याची पद्धत हवी.

......
शाळा आणि शिक्षक

- गरजेनुसार छोट्या शाळांचे मोठ्या शाळांत विलीनीकरण व्हायला हवे.
- शिक्षक भरतीसाठी राष्ट्रीय स्तरावर सेवा सुरू केली जावी.
- सरकारी आणि खासगी शाळांतील शिक्षकांना दर दहा वर्षांनंतर प्रमाणपत्र घेणे बंधनकारक.
- शहरी भागांतील शाळांत क्रीडांगण नसल्याने योगविद्येचे शिक्षण उपयुक्त

.........
विद्यापीठ

- संलग्न कॉलेजांची संख्या शंभरपेक्षा जास्त नको.
- कॉलेज शिक्षकांसाठी पीएचडीचे बंधन नको.
- यूजीसी कायद्याऐवजी उच्च शिक्षण कायदा हवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिस परीक्षेत बनावट विद्यार्थी

$
0
0

पुणे : रेल्वे पोलिस विभागच्या भरतीमध्ये लेखी परीक्षेत एका उमेदवाराच्या जागेवर दुसऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, संबंधित विद्यार्थी परीक्षेत पास होऊन नोकरीसही लागला होता. मात्र, एका महिलेने फोन करून माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

बळीराम उत्तम राठोड (वय २३, रा. पैठण. जि. औरंगाबाद), अविनाश नारायण घुले (रा. कोरेगाव. ता. केज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, कतारसिंग कवाडे आणि गणेश जारवाड हे फरार आहेत. त्यांच्यावर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिस दलात भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी बळीराम यांने अर्ज केला होता. त्याचा ७४५ चेस्ट क्रमांक होता. तो शरीरिक चाचणी पात्र झाला होता. त्यानंतर १९ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होती. मात्र, बळीरामने त्याचा मित्र कतारसिंग याला आपल्या जागेवर बसवले. निकाल लागल्यानंतर बळीराम त्यात पास झाला. त्यालाही नोकरीवर घेण्यात आले. रेल्वे पोलिसांनी शारीरिक परीक्षेचे, लेखी परीक्षेचे चित्रीकरण केले होते. मात्र, त्यानंतर एका महिलेने रेल्वे कंट्रोलवर फोन करून राठोड याने गैरप्रकार केल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिओलॉजिस्टचा आता राज्यव्यापी संप

$
0
0

पुणे : अन्यायकारक कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेडिओलॉजिस्टने पुकारलेल्या संपाला आता पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील रेडिओलॉजिस्टचा पाठिंबा मिळाला. या संपामुळे ग्रामीण भागातील पेशंटना सोनोग्राफीसाठी फिरावे लागणार आहे. तर पुण्याच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारपासून राज्यव्यापी संप पुकारून संपाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

त्याशिवाय येत्या बुधवारी देशव्यापी संप पुकारण्याबाबत इंडियन रेडिओलॉजिस्ट अँड इमेजिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची चाचपणी सुरू आहे. संपाचा तिढा अद्यापही कायम आहे. पुण्यातील सोनोग्राफी एक्स रे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यात शहरातील खासगी हॉस्पिटलने सहभाग नोंदविला. पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारपासून संप पुकारण्यात आला. त्यामुळे पेशंटना यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलकडे धाव घेण्याशिवाय पर्याय नाही. 'मागण्यांसंदर्भात सरकारकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. त्यामुळे सोमवारपासून राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. त्या संपात सोनोग्राफी, एक्स रे सेवा बंद राहणार आहे. तसेच देशव्यापी संप पुकारण्याबाबत राज्यस्तरीय संघटनेचे पदाधिकारी चर्चा करीत आहेत,' अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लच्छन यांनी दिली.

संपाची व्याप्ती वाढत असल्याने आता सरकारविरुद्ध रेडिओलॉजिस्ट अशी स्थिती निर्माण होणार आहे. या संपामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ओपीडीमध्ये उपचार घेणाऱ्या पेशंटला तातडीने सोनोग्राफीचा सल्ला दिला, तरी त्याला सेवा नाकारली जात आहे. त्यामुळे पेशंटना सरकारी हॉस्पिटलकडे जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. दरम्यान, स्वयंसेवी संस्थांनी देखील संबंधित डॉक्टरांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वर्क फ्रॉम होम’द्वारे फसवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वर्क फ्रॉम होम' नावाच्या योजनेत ऑनलाइन पैसे गुंतविण्यास सांगत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीचा पर्दाफाश सायबर सेलने केले आहे. या टोळीने पुण्यातील ५६ नागरिकांची ८२ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

रामप्रकाश शिवराम गुप्ता (वय ३३), धनंजय अजय शर्मा (वय २५, दोघेही रा. उज्जैन, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, अमोल इनामदार नावाचा आरोपी फरार आहे. उज्जैन येथील 'मस्ती अॅडव्हरटायझिंग प्रा. लि.' कंपनीतून विशाल जाधव (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांना फोन आला. त्यांना 'वर्क फ्रॉम होम' नावाच्या स्कीमची माहिती देऊन त्यामध्ये १५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना काही लिंक पाठवून त्या उघडून पाहण्यास सांगितले. पहिल्या महिन्यात त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर २४ टक्के परतावा दिला. त्यांचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी पुन्हा कंपनीत ५० हजार रुपये गुंतविले. पण, त्यांना पुन्हा परतावा व पैसे मिळाले नाहीत. उपनिरीक्षक प्रवीण स्वामी यांना मिळालेल्या माहितीनुसार उज्जैन येथून दोघांना अटक करण्यात आली असून दोन मोबाइल, डेबिट-क्रेडिट कार्डे, दोन पॅनकार्ड जप्त केल्याची माहिती सायबर सेलचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.

अमोल इमानदार व इतर आरोपींनी मिळून ही कंपनी स्थापन केली. ते नागरिकांना फोन करून कंपनीच्या स्कीमची माहिती देत होते. नागरिकांनी पैसे गुंतविल्यास त्यांना सुरुवातीला परतावा देऊन नंतर पैसे न देता फसवणूक करत होते. या आरोपींनी पुण्यातील ५६ नागरिकांची ८२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही कंपनी बंद झाल्यानंतर आरोपींनी पुन्हा 'शॉपिंग सेन्स मार्केटिंग' नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या मार्फतही मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले आहे. या कंपनीचे जाळे जम्मू काश्मिर, दिल्ली, हरियाणा व दक्षिण भारतात पसरल्याचे निष्पन्न झाले आहे. ऑनलाइन अॅडव्हरटायझिंगच्या नावाखाली ही टोळी नागरिकांची फसवणूक करत आहे. यातील अमोल इमानदार याला उज्जैन येथील एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर तो फरार झाला आहे. पोलिस निरीक्षक सुनील ताकवले, दीपक लगड, सहायक निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, कर्मचारी राजू भिसे, अजित कुऱ्हे, अस्लम आत्तार, दीपक माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनैतिक संबंधातून पतीच्या खुनाचा कट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजेच्या शिंदे पुल येथे दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्यामुळे पत्नीच्या सांगण्यावरून तिच्या प्रियकराने हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी पत्नी व इतर चौघांना अटक केली आहे. त्यांना कोर्टाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

आशिष रोहिदास नलावडे (वय २८, रा. शिवणे), बाळू किसन पाकीरे (वय ३४, रा. रायकर मळा, धायरी), नितीन बबन येडे (वय २४, रा. मोरे वस्ती, पद्मावती), सविता दत्तात्रय काळे (वय ३२, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर) आणि सुवर्णा बजरंग भरम (वय ३४, रा. शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वारजे येथील शिंदे पुलाजवळ ११ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बजरंग सीताराम भरम (वय ३८, रा. देशमुखवाडी, शिवणे) याचा खून झाला होता. भरम हे कर्वेनगर येथून भिशीचे दोन लाख ८० हजार रुपये घेऊन घरी जात असताना ही घटना घडली होती. पोलिसांना त्यांच्याकडील दुचाकीच्या डिक्कीमध्ये ही रक्कम मिळाली होती. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा खून झाला नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. वादातून हा खून झाला का याचा ही तपास सुरू केला. त्यावेळी भरम यांचे कोणासोबत भांडण नसल्याचे आढळले.

वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने व त्यांच्या पथकाने खुनाचा माग काढण्यासाठी भरम यांच्या जवळील व्यक्तींची माहिती काढली. त्यानुसार भरम यांच्या पत्नी सुवर्णाच्या हलचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुवर्णा हिने आशिषसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले.

जानेवारी २०१६मध्ये या संबंधाची माहिती भरम यांना झाली. तेव्हापासून भरम हे तिला शिवीगाळ व मारहाण करत होते. त्यास कंटाळून आशिष आणि सुवर्णा यांनी भरम यांच्या खुनाचा कट रचला. घटनेच्या दिवशी सुवर्णा ही आशिष याच्या संपर्कात होती. भरम यांचा खून केल्यानंतर सुवर्णाने तिची मैत्रिण सविता हिला तिचा कामाच्या ठिकाणचा मोबाइल आशिषकडे नेऊन द्यायचे ठरले होते. आशिष याने साथीदारांच्या मदतीने शिंदे पुलाजवळ भरम यांच्यावर वार करून खून केला. या गुन्ह्यात तपास करण्यात पोलिस महिला पोलिस मित्राची खूप मदत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचाऱ्यांसाठी ‘बॅरिकेडिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे स्वारगेट येथील जेधे चौकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे वाहतुकीवरील ताण कमी झाला आहे. मात्र, रस्त्यावरून अस्ताव्यस्तपणे चालणाऱ्या पादचाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा होतो; या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिस शाखेने पादचाऱ्यांसाठी 'बॅरिकेडिंग' योजना अवलंबली आहे.

पीएमपी बस डेपो आणि एसटीचे आगार यामुळे स्वारगेट परिसरात प्रवाशांची आणि पर्यायाने पादचाऱ्यांची संख्या खूप असते; तसेच शहरातील महत्त्वाच्या चौकांपैकी एक असलेल्या जेधे चौकातून कात्रज, कोंढवा, हडपसर या उपनगरांत जाणारी वाहने जातात. त्यामुळे येथे वाहनांची कायमच वर्दळ असते. हा चौक गजबजलेलाही असतो. एसटी स्टँडच्या परिसरातील रिक्षा, रस्त्याच्या कडेला व फुटपाथवरील अतिक्रमणे आणि त्यामुळे रस्त्यावरून चालणारे पादचारी असे चित्र पाहायला मिळते. या पादचाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्यांनादेखील जीव मुठीत घेऊन चालावे लागते. या सगळ्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिस शाखेने पादचाऱ्यांसाठी चौकाच्या चारही बाजूला बॅरिकेडिंग केले आहे. याद्वारे पादचारी केवळ झेब्रा क्रॉसिंगवरून रोड ओलांडू शकतात, अशी रचना करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

या उपाययोजनेदरम्यान जेधे चौकातील अतिक्रमणेही हटविण्यात आली आहेत. पादचाऱ्यांसाठी आता पुरेशी व सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्यांनी रस्त्यावरून अस्ताव्यस्त न चालता बॅरिकेड्सच्या आतूनच चालावे, असे आवाहनही डॉ. मुंढे यांनी केले.

बहुतांश नागरिक रस्त्यावरूनच चालताना दिसतात. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी विशेष योजना राबविण्यात आल्याचे फलक या ठिकाणी बसविले जाणार आहेत, असेही डॉ. मुंढे यांनी सांगितले. पादचाऱ्यांसाठी 'बॅरिकेडिंग' करण्याची योजना वाहतूक पोलिसांनी सर्वप्रथम शनिपार चौकात राबविली होती. तुळशीबाग व महात्मा फुले मंडई यामुळे शनिपार चौकात पादचाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. या योजनेनंतर बॅरिकेडिंगच्या लेनमधून पादचारी जाऊ लागल्याने वाहतुकीला होणारा अडथळा कमी झाला होता. स्वारगेट चौकातही याचे प्रमाण अधिक आहे. आता उड्डाणपुलामुळे चौकाने मोकळा श्वास घेतला असला, तरीही शंकरशेठ रोड व शिवाजी रोडने येणाऱ्या वाहनांना सिग्नलला थांबावे लागते. त्यामुळे या दोन्ही बाजूला अद्यापही पूर्वी सारखीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र, रस्त्यावरून चालणाऱ्या अस्ताव्यस्त पादचाऱ्यांना शिस्त लावल्यानंतर वाहतुकीला फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा रोडवर पाच तास कोंडी

$
0
0

पुणे : सातारा रोडवर नसरापूर फाट्याजवळ ट्रेलरला अपघात होऊन त्यामधील अवजड लोखंडी रिंग रोडवरच पडल्याने सुमारे साडेपाच तासाहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती. रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाहतूक कोंडी सुटली नव्हती.

नसरापूर फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी सिंगल लेन रोड तयार करून वाहतूक वळविण्यात आली आहे. या ठिकाणी लोंखडी रिंग घेऊन चाललेला एक ट्रेलर सिंगल लेन रोडवरून मुख्य रोडवर येताना एका बाजूला कलंडल्यामुळे त्या रिंग रोडवर पडल्या. ही घटना सायंकाळी पाच वाजता घडली. तेव्हापासून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देशभक्तांची चरित्रे अभ्यासक्रमात हवीत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशभक्तांच्या चरित्रातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या चरित्रांचा समावेश करण्यात यावा,' असे मत केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी शनिवारी व्यक्त केले. दरम्यान, याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळकांच्या 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' या घोषणेच्या शताब्दी वर्षांनिमित्त 'लोकमान्यांची सिंहगर्जना' या पुस्तकाचे प्रकाशन नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, नगरसेविका मुक्ता टिळक आदी या वेळी उपस्थित होते.

'लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, मदन मोहन मालवीय, सरदार वल्लभभाई पटेल या देशभक्तांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे देशभक्तांच्या चरित्राचा अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा,' असे नायडू या वेळी म्हणाले. नुसत्या घोषणांनी शहरे स्मार्ट होत नाहीत, तर लोकांनीही स्मार्ट झाले पाहिजे,' असेही त्यांनी सांगितले.

'देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणार' या त्यांच्या घोषणेने प्रेरित होऊन देशभरातील तरुणांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहूती दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा उभारायला हवा,' असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिका व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीमध्ये मित्रपक्ष शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे संकेत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत शनिवारी देण्यात आले. या निवडणुकांमध्ये शक्यतो युती करावी लागणार नाही एवढी जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

भाजप प्रदेश कार्यसमितीच्या दोन दिवसीय बैठकीला शनिवारी पुण्यात सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कार्यसमितीचे उद्घाटन झाले. दुपारच्या सत्रामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतीविषयक आणि राजकीय ठराव मांडण्यात आले.

शेतीविषयक ठरावामध्ये केंद्र व राज्य सरकारने शेती विकासासाठी केलेल्या कामाची प्रशंसा करण्यात आली. पंतप्रधान पीक विमा योजना, जलयुक्त शिवार, ऑनलाइन कृषी बाजार यासाठी सरकारने उचलेली पावले आणि काँग्रेसकडून होणारे दुष्काळाचे राजकारण यावर ठरावात टीका करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी पक्षाच्या कामाचा आढावा आणि आगामी नियोजनाची माहिती त्यांनी बैठकीत दिली.

प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत राजकीय ठराव चर्चेला आला. त्यावर बोलताना, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असे स्पष्ट केले. तसेच या निवडणुकीसाठी युती करावी लागणार एवढी जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

'राज्यातील भाजप सरकार धडाक्याने विकास कामे करीत असल्यामुळे राजकीय दुष्काळ सहन करत असलेल्या विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कामात अडथळे आणण्याचा केविलवाना प्रयत्न चालू केला आहे. परंतु, महाराष्ट्राची जनता या अपप्रचाराला बळी पडत नाही हेच गेल्या दोन-तीन महिन्यांत ग्रामपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, महापानगरपालिका तसेच नगरपालिका निवडणुकीच्या कामाकरीता भाजपच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,' असे आवाहन ठरावाद्वारे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरची भांडणे बाहेर नकोत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'एखाद्या कुटुंबात वाद-भांडणे होतात, तसेच शिवसेनेसोबत एकत्र काम करताना काही अडचणी असल्या, तरी त्या एकत्र मिळून, आपापसांत सोडविण्याचा प्रयत्न करा. घरातील वाद चव्हाट्यावर आणू नका,' असा सल्ला केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी शनिवारी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. तसेच, शिवसेना हा भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष असून, त्यांच्यासह यापुढेही काम करायचे आहे, हे लक्षात ठेवा, असा संदेशही त्यांनी दिला.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकाचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र असूनही भाजप-सेनेमध्ये सातत्याने होणाऱ्या वादांच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी स्वपक्षीयांसह शिवसेनेच्या नेत्यांनीही थोडे सबुरीने घ्यावे, असे सुचविले. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत, ही जुनी युती यापुढेही एकत्र राहिली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'घरातील भांडणे घरातच राहिली तर बरे असते; ती बाहेर आली, तर इतरांना त्यावर चर्चा करायला वेळ मिळतो. त्यामुळे, शक्यतोवर परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न करा,' असा आग्रह त्यांनी धरला.

'विरोधी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कधी आक्रमक, तर कधी संयत भूमिका घेऊन जनतेपर्यंत जायला हवे. शहर-तालुका-गावातील प्रत्येक घरा-घरांपर्यंत पोहोचण्याची गरज असून, नागरिकांना मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कामाची माहिती द्यायला हवी,' अशी सूचना नायडू यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली. 'केवळ महानगरे आणि मोठ्या शहरांचा नाही, तर देशातील छोट्या गावाचाही विकास करण्याचे ध्येय बाळगा आणि त्यासाठी झटून काम करा,' अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

सरकारमधील विविध मंत्र्यांवर सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची पाठराखण केली. भ्रष्टाचाऱ्यांनी आम्हांला शिष्टाचार शिकवू नये, असा थेट हल्ला विरोधी पक्षांवर करताना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार खणून काढा, त्यांचा बुरखा फाडा, असा मंत्रच मुख्यमंत्र्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. तर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'पार्लमेंट ते पंचायत'पर्यंत भाजपचा विस्तार करण्याची खूणगाठ बांधून आगामी पालिका-जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी करा, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी मोकळ्या मैदानात खेळताना टेम्पोखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू झाला. पिंपरी लिंक रस्त्यावरील रमाबाईनगर येथे शुक्रवारी (१७ जून) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी नागरिकांनी टेम्पो चालकाला पोलिसांच्या हवाली केले आहे.

अलफिजा हमीद शेख (वय दीड वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. तर, टेम्पोचालक सुखदेव हरिमोम अग्रवाल (३२, रा. गुरूकुल कॉलनी, रहाटणी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलफिजा ही इतर मुलांबरोबर रमाबाईनगर येथील मोकळ्या मैदानात खेळत होती. तेथे टेम्पो पार्क केला होता. दुकानामध्ये माल देऊन चालक टेम्पोमध्ये विरुद्ध दिशेने घुसला. त्यामुळे टेम्पोजवळ थांबलेली अलफिजा ही चालकाला दिसली नाही. त्याने टेम्पो मागे घेतला. त्यामुळे मागील चाकाखाली सापडून अलफिजा गंभीर जखमी झाली.

तिला उचलून तातडीने पिंपरीतील वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शेख यांचे मूळगाव बीड आहे. मात्र, कामाधंदा शोधण्यासाठी ते शहरात गेल्या दीड वर्षापासून स्थायिक झाले. ते बिल्डिंग साइटवर काम करतात. त्यांना ही एकुलती एक मुलगी होती. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images