Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पंचवीस लाख कोणाचे ?

$
0
0

निधीवरून मसाप व महामंडळामध्ये रस्सीखेच
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या साहित्य संमेलनातील शासनाच्या २५ लाखाच्या निधीवरून पुन्हा सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. पैसे सरकारचे की स्वागताध्यक्षांचे, यावरून साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेत सध्या जोरात रस्सीखेच सुरू आहे. त्यातच 'निधीचा हिशेब द्या,' असे स्मरणपत्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने साहित्य महामंडळाला पाठवले आहे. त्यावर 'कागदपत्र नसल्याने हिशेब देण्यास आम्ही असमर्थ आहोत,' अशी भूमिका साहित्य महामंडळाने घेतली आहे. पिंपरी येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सरकारने २५ लाख रुपयांचा निधी दिला होता. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने निधी जमा झाला होता. महामंडळाच्या वतीने हा निधी धनादेशाच्या स्वरूपात स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडे देण्यात आला. स्वागताध्यक्षांनी साहित्य संमेलनाच्या खात्यात हा निधी जमा केला, व संमेलनाची सांगता होताना पुन्हा महामंडळाला नवीन धनादेश दिला. यामुळे 'हा निधी वापरला नसल्याने तो सरकारचा आहे. निधीचा संमेलनासाठी विनियोग झाला नसल्याने तो सरकारला परत करण्यात यावा,' अशी आग्रही भूमिका साहित्य वर्तुळातून मांडली जात होती. साहित्य महामंडळाचे कार्यालय तेव्हा साहित्य परिषदेकडे असताना महामंडळाचे पदाधिकारी मात्र 'स्वागताध्यक्षांनी निधी स्वीकारला असून, त्यांनी परत केलेली रक्कम ही महामंडळाला दिलेली देणगी आहे,' अशी भूमिका मांडत होते.
साहित्य संस्कृती मंडळाला तपशील देण्यासाठी याच दरम्यान महामंडळाने स्वागताध्यक्षांकडे खर्चाचा अहवाल मागितला होता. स्वागताध्यक्षांनी तसा अहवाल महामंडळाकडे दिला. मात्र, अद्यापही तो साहित्य संस्कृती मंडळाला मिळालेला नसल्याने मंडळाने याबाबत स्मरणपत्र पाठवूनही पाच महिन्यानंतर सरकारच्या पैशाबाबत गौडबंगाल कायम राहिले आहे. स्वागताध्यक्षांकडे सरकारच्या २५ लाखांचा हिशेब मागणाऱ्या महामंडळाच्या माजी पदाधिकाऱ्यासह साहित्य परिषदेने आता 'स्वागताध्यक्षांनी परत केलेला निधी सरकारचाच आहे, हा निधी सरकारने ज्या कारणासाठी दिला त्या कारणासाठी खर्च झाला नाही. त्यामुळे तो परत करावा,' अशी विसंगत भूमिका घेतली आहे. साहित्य महामंडळाचे नूतन अध्यक्ष सरकारचा निधी खर्च झाला आहे, यावर ठाम असल्याने परिषद व महामंडळ यांच्यामध्ये निधीवरून रस्सीखेच सुरू आहे.
------------------------------------------
निधी परत करा
'सरकारने ज्या कारणासाठी निधी दिला त्या कारणासाठी तो खर्च झाला नाही. त्यामुळे तो निधी शासनाला परत करावा, अशी स्पष्ट भूमिका आम्ही मांडली आहे. न वापरलेला निधी परत करण्यात यावा, असा सरकारचा नियम आहे,' असे साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी सांगितले.
------------------------------------
संमेलनादरम्यान निधी जमा झाला तेव्हाच हा मुद्दा संपला आहे. स्वागताध्यक्षांनी दिलेली रक्कम ही महामंडळाला मिळालेली देणगी आहे. साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यात असताना त्यांनी याबाबत निर्णय घेतलेला आहे. आमच्याकडे सर्व कागदपत्रे आल्यानंतर साहित्य-संस्कृती मंडळाला जो अहवाल अपेक्षित आहे, त्याबाबत विचार केला जाईल.
-डॉ. श्रीपाद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुर्ग चित्र प्रदर्शनाला राजकीय अडसर

$
0
0

राजकीय कार्यक्रमासाठी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा मंत्र्यांचा आग्रह
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कलांसाठी हक्काचे व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आता रोज एक नवा राजकीय अंक रंगू लागला आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी बालगंधर्व रंगमंदिर कलादालनातील गडकोट-किल्ल्यांचे प्रदर्शन दोन दिवसात आटपा,' असा दबाव चित्रकार हरेश पैठणकर यांच्यावर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांकडून टाकला जात आहे. हे चित्र प्रदर्शन १६ तारखेपासून सुरू झाले असले तरी दोन दिवसांत प्रदर्शन गुंडाळा असे संबंधित नेत्याने सांगितले आहे. त्यामु‍ळे राजकीय कार्यक्रमांसाठी बालगंधर्वमधील सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द करण्यासाठी आग्रह धरण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दुर्गसंवर्धनासाठी कोट्यवधी रुपये जाहीर केलेले असताना, त्यांच्या कार्यक्रमासाठी गडकोट किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनाचा बळी दिला जात असल्याने कारभारातील विसंगती समोर आली आहे. ही सेन्सॉरशिप कधी थांबणार, असा सवाल कलावंतांकडून केला जात आहे.
बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रसिकांची मिळणारी दाद ध्यानात घेता येथे नाट्यप्रयोग व्हावा, प्रदर्शन भरवता यावे यासाठी कलाकार आणि नाट्यनिर्माते धडपडत असतात. महापालिकेतर्फे चौमाही वाटपानुसार तारखांचे व्यवस्थापन केले जाते. चित्रकार पैठणकर यांच्या 'रंग सह्याद्रीचे' या चित्रप्रदर्शनाला बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात गुरुवारपासून सुरुवात झाली. प्रदर्शनासाठी १६ ते १८ जून या तीन दिवसांची नोंदणी पैठणकर यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. आता १८ तारखेला प्रदर्शन सुरू ठेवता येणार नाही, असा दबाव पैठणकर यांच्यावर मंत्री व रंगमंदिर व्यवस्थापनाकडून आणला जात आहे.
१८ व १९ जून रोजी भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होणार आहे. १८ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सुरक्षेचे कारण पुढे करून कलादालनातील प्रदर्शनावर टाच आणली जात आहे. वास्तविक कलादालन बाजूला असल्याने या प्रदर्शनाचा कसलाही अडसर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला होणार नाही. लोकांची वर्दळ व सुरक्षा हे मुद्दे विचारात घेऊन ठराविक लोकांनाच बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात प्रवेश दिला तरी हे प्रदर्शन भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार यांना पाहता येऊ शकते. तरीही असे न करता थेट कलादालनाला ताळे ठोकण्याची तयारी केली जात आहे.
------------------------------
या आधी रद्द करण्यात आलेले कार्यक्रम
० बालगंधर्व रंगमंदिरात कन्हैया कुमारच्या सभेसाठी 'सुरेल सभा' या संस्थेतर्फे आयोजित पं. संजीव अभ्यंकर यांची शास्त्रीय गायनाची मैफल रद्द करण्यात आली होती.
० कलादालनात अडीच हजार किलोचा केक बनविण्यात आल्याचा फटका नागपूर येथून आलेल्या छायाचित्रकार कलावंतांना बसला होता. त्यांना आपले प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलावे लागले होते.
० राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त एका नाटकाची तारीख काढून घेण्यात आली. प्रत्यक्षात कार्यक्रम आणि नाटक यापैकी काहीही झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी टाळण्यासाठी हवी दक्षता

$
0
0

सोसायट्यांमध्ये स्वच्छता राखण्याची गरज
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाने दडी मारली असली, तरी पावसाळा मात्र सुरू झाला आहे. पावसाळा हा अनेक आजारांना आमंत्रण देणारा ठरतो. त्यापैकीच एक डेंगी. गेल्या वर्षीही पावसाळ्यात शहरात डेंगीने थैमान घातले होते. अनेकांना डेंगीमुळे प्राणही गमवावे लागले. पालिकेने केलेल्या पाहणीत अनेक सोसायट्यांमध्येच डेंगीच्या डासांची उत्पत्तिस्थाने आढळली होती. या सोसायट्यांवर कारवाईही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सोसायट्यांनी पावसाळ्यापूर्वीच योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे.
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरात डेंगीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले होते. डेंगीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालिकेने डेंगीच्या डासांच्या (एडिस इजिप्ती) उत्पत्तिस्थानांची पाहणी केली होती. यामध्ये बहुतांश ठिकाणी संबंधित सोसायटीमध्येच डेंगीच्या डासांची उत्पत्तिस्थाने आढळून आली. या सोसायट्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाईही केली होती.
पावसामुळे घर, सोसायट्यांपासून ते रस्त्यापर्यंत आणि घराभोवतीच्या बागांपासून ते कचरा, भंगार साहित्याच्या ठिकाणापर्यंत पाणी साचल्यास डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक आहे. डेंगीचे डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात. त्यामुळे सोसायट्यांमध्ये साठलेल्या पाण्यातच या डासांची पैदास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सोसायट्यांनी अधिक दक्ष असणे आवश्यक आहे.
गतवर्षी औंध, बाणेर, पाषाण, शिवाजीनगर, घोले रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी सारख्या शहरातील महत्त्वाच्या भागातील सोसायट्यांमध्येच सर्वाधिक डेंगीचे पेशंट आढळून आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीतून दिसून आले.
उत्पत्तिस्थाने
घरातील फ्रीज व वॉशिंग मशिनचा खालील ट्रे, ड्रेनेजची झाकणे, खड्डे, नारळाची करवंटी, जुने टायर्स, कुंड्या, पाणी साठून राहिल अशी कोणतीही अन्य जागा, भंगार साहित्य, रिकामी खोकी इत्यादी...
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बंदी नको
डेंगीच्या उत्पत्तिस्थानांची पाहणी करण्यास गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेशच करू देण्यात आला नाही. तर फवारणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हाकलून लावण्यापर्यंत सोसायट्यातील पदाधिकाऱ्यांची मजल गेली. मात्र, ते तुमच्या आरोग्यासाठीच तेथे येत असल्याने त्यांना मज्जाव केला जाऊ नये, असे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अटकाव केल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो, असा इशाराही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पेशंट वेठीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेडिओलॉजिस्टवर अन्याय होत असल्याची ओरड करून करण्यात आलेल्या संपामध्ये शहरातील ३४ हॉस्पिटलनी उडी घेतली आहे. या हॉस्पिटलमध्ये बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) उपचारांसाठी येणाऱ्या पेशंटना सोनोग्राफी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पेशंटची यामुळे गैरसोय होणार असून सोनोग्राफी नाकारणाऱ्या रेडिओलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांनी केली.
'इंडियन रेडिओलॉजिस्ट अॅन्ड इमेजिंग असोसिएशन'च्या पुणे शाखेने दोन दिवसांपासून शहरात बंद पुकारला आहे. या बंदमुळे पेशंटची गैरसोय होण्यास सुरुवात झाली. 'हॉस्पिटल असोसिएशन' पुणे शाखेचे अध्यक्ष आणि रुबी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ''गर्भलिंग प्रसवपूर्व व लिंगनिदान' (पीसीपीएनडीटी) कायद्यातील किरकोळ चुकांच्या कारणास्तव सोनोग्राफी मशिन सील केली जाते. फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. यातून कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे. शहरातील ३४ हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी बैठक घेऊन रेडिओलॉजिस्टच्या संपाला पाठिंबा दिला आहे. परंतु, हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या इमर्जन्सी पेशंटना सोनोग्राफीची सेवा दिली जाईल.'
'इंडियन रेडिओलॉजिस्ट अॅन्ड इमेजिंग असोसिएशन'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लच्छान म्हणाले, 'महापौर प्रशांत जगताप यांच्याशी आम्ही चर्चा केली असून त्यांनी येत्या दोन दिवसांत या प्रकरणासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. पेशंटचे हाल होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.' सोनोग्राफी नाकारणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी पीसीपीएनडीटीच्या राज्य सल्लागार समितीच्या सदस्या किरण मोघे आणि पीसीपीएनडीटीच्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली आहे. मोघे म्हणाल्या, ''पीसीपीएनडीटी' कायद्याच्या दुरुस्तीसाठी डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. परंतु, हा कायदा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. संपामुळे विनाकारण पेशंट, सामान्य नागरिक, महापालिकेसह राज्य सरकारला वेठीस धरण्यात येत आहे. या दोन्ही स्तरावर मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत. एका विशिष्ट डॉक्टरावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण ३० मे रोजी कोर्टात दाखल झाले असून न्यायप्रविष्ट आहे. प्रशासन त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच, त्यासंदर्भात जाहीर चर्चा करून न्यायालयीन प्रक्रियेवर दबाव आणण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे.'
रेडिओलॉजिस्टच्या संपाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर महापौर, आयुक्त तसेच संबंधित आरोग्य अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांबरोबर संयुक्त बैटक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन शिरोळे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसांत पुण्यात पाऊस!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. त्याचबरोबर १९ व २० जून रोजी राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यात १९ जून रोजी अधूनमधून पावसाच्या सरींची, तर २० जून रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील काही भागाबरोबरच छत्तीसगडचा काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, रायलसीमा व आंध्रच्या किनारपट्टीचा आणखी काही भाग या परिसरात मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीसमोरील भागावर वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. पुढील दोन दिवसांत त्याची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. हे चक्र राज्याकडे सरकण्याची शक्यता असल्याने राज्यात पावसाचे प्रमाणही वाढेल.
सर्वसाधारणपणे पाच ते सात जूनदरम्यान मान्सून गोवा व कोकणच्या काही भागांत दाखल झाल्यानंतर दहा जूनपर्यंत बहुतांश राज्य तर १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात दाखल होतो. यंदा मात्र अजूनही मान्सून राज्यात दाखल झालेला नाही. राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वांचेच लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागून राहिले आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसांनंतर राज्यातील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता 'आयएमडी'ने वर्तविली आहे. पुढील दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात मात्र उष्णतेची लाट राहील. १९ व २० जून रोजी कोकणात आणि राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात पुढील दोन दिवस हलक्या सरींची शक्यता आहे. तर १९ जून रोजी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा रोडवरील बीआरटीला ‘संजीवनी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) आणि नगर रोडवरील जलद बस वाहतुकीला (बीआरटी) प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील पथदर्शी स्वारगेट-कात्रज दरम्यानच्या बीआरटीचा कायापालट करण्यात येणार आहे. संपूर्ण सातारा रोडची पुनर्रचना करण्याचे नियोजन महापालिकेतर्फे केले जाणार असून, त्याअंतर्गतच बीआरटीला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सातारा रोडवर सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामामुळे या मार्गावरील बीआरटी खंडित स्वरूपात सुरू होती. या दरम्यान गेल्या वर्षी आळंदी रोडवर, तर दोन महिन्यांपूर्वी नगर रोडवर बीआरटी सेवा कार्यान्वित करण्यात आली. बीआरटीच्या दोन्ही मार्गांवर उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून, प्रवाशांच्या संख्येत आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) उत्पन्नातही वाढ झाली आहे. त्यापासून बोध घेऊन आता महापालिकेने स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या बीआरटी मार्गाला पुन्हा चालना देण्याचे निश्चित केले आहे. या मार्गावरील धनकवडी/बालाजीनगर आणि जेधे चौक येथील उड्डाणपुलांची कामे पूर्ण झाली आहेत. या दोन्ही उड्डाणपुलांच्या मधोमध बीआरटी स्वतंत्र मार्गिका तयार झाली आहे. त्यामुळे, त्याचा वापर करून घेत, इतर पूरक सुविधा निर्माण करून हा पथदर्शी प्रकल्प पुन्हा रूळावर आणण्याचा महापालिकेचा मानस आहे. बीआरटी मार्गाचे पुनरुज्जीवन करतानाच, संपूर्ण सातारा रस्त्याचाही कायापालट करण्यात येणार आहे.

कात्रज-हडपसर पथदर्शी बीआरटी मार्गाची उभारणी करताना, रस्त्याच्या मधोमध बस थांबे उभारण्यात आले होते. या थांब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे, अपघात होऊन बीआरटीवर सर्व स्तरांतून टीका झाली. सातारा रोडवरील सध्याच्या बस थांब्यांची जागा बदलून ती आळंदी-नगररोडनुसार बीआरटी मार्गिकेच्या मधोमध नेण्यात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच हजारांत प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नागरी विमान धोरणातील तरतुदीनुसार पुण्यावरून विमानाने अहमदाबाद, हैदराबाद, नागपूर, गोवा, मुंबई, तिरूपती आणि बेंगळुरू या ठिकाणी जाण्यासाठी एक तासापर्यंतचा कालावधी लागतो. त्यामुळे पुणेकरांना हा प्रवास अडीच हजार रुपयांत करणे शक्य होणार आहे.
नव्या नागरी विमान धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार तासाभराच्या विमान प्रवासासाठी कंपन्यांना अडीच हजार रुपयांपेक्षा अधिक तिकीट आकारता येणार नाही; तसेच अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी कमाल तिकीट १२०० रुपये असेल. या धोरणानुसार पुण्याहून चालणाऱ्या देशाअंर्तगत विमान सेवेचा आढावा 'मटा'ने घेतला. पुण्यातून देशात सात ठिकाणी विमान प्रवासाला एक तासापर्यंतचा कालावधी लागत असल्याचे या वेळी निदर्शनास आले.
सद्य परिस्थितीत अहमदाबाद, हैदराबाद, नागपूर, गोवा, मुंबई, तिरूपती आणि बेंगळुरूला विमानाने जाण्यासाठी शनिवारी, रविवारी व अन्य सुटीच्या दिवशी चार हजार रुपयांपेक्षा अधिक दर आकारला जातो. तर, अन्य दिवशी तो दर दोन ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान असतो. त्यामुळे पुणेकरांना देशांतर्गत विमान प्रवासात सुमारे एक ते दीड हजार रुपयांचा फायदा होणार आहे. तसेच, सणासुदीच्या काळात किंवा ऐन वेळी तिकीट बुक करताना अवास्तव दर आकारले जातात. त्यालादेखील आळा बसणार आहे. दरम्यान, शिर्डीचे विमानतळ येत्या काही दिवसांत प्रवासी वाहतुकीसाठी खुले होईल. या काळात पुण्यावरून थेट शिर्डीसाठी विमान सेवा सुरू झाल्यास प्रवासाचा कालावधी केवळ अर्ध्या तासाचा असेल. त्यामुळे पुणे-शिर्डी प्रवास १२०० रुपयांत करणे शक्य होईल.

केंद्र सरकारने नवीन नागरी धोरण जाहीर केले, पण त्यामध्ये स्पष्टता नसल्याचे मत वरूणराज ट्रॅव्हल्सचे सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, 'सरकारने प्रवासाचा कालावधी निकष लावण्याऐवजी प्रवासाच्या अंतरानुसार योजना आखली पाहिजे होती. तसेच, २५०० किंवा १२०० रुपये हा दर 'बेस रेट' असणार आहे की, सर्व प्रकारच्या करांसह असणार आहे. हा दर 'ऑफ सीझन' किंवा 'ऑन सीझन' असा दोन्हीसाठी असणार आहे का, याबाबत त्यामध्ये स्पष्टता करण्याची गरज आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडेच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातनचा साधक वीरेंद्र तावडे याच्या पनवेल येथील घरातून काही व्यक्तींच्या नावाची यादी मिळाली आहे. 'सनातन'च्या नजरेत हिंदूविरोधी असलेल्या लोकांची ही यादी असून यादीतील मंडळींना दानव व राक्षस अशी उपमा देण्यात आली आहे.

तावडेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे गुरुवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्या पोलिस कोठडीत २० जूनपर्यंत वाढ करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे पाटील यांनी हा आदेश दिला. त्यावेळी सीबीआयचे वकील बी. पी. राजू यांनी न्यायालयाला या प्रकरणाच्या तपासाची नवी माहिती दिली. तावडेच्या घराची झडती घेतली त्यात यादी मिळाली आहे. यादीत हिंदूद्वेष्ट्या लोकांची नावे आढळली आहेत. या मंडळींना दानव, राक्षस अशी उपमा देण्यात आली आहे. शिवाय अकोलकर आणि तावडे यांच्यातील ई-मेलमध्ये सांकेतिक भाषा वापरण्यात आली आहे. काडतुसांना चॉकलेट म्हटले आहे. याशिवाय अन्य सांकेतिक शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येसाठी एकाच प्रकारच्या शस्त्राचा वापर करण्यात आल्याचे बॅलेस्टिक अहवालात दिसून आले आहे. तावडे यानं ही शस्त्रात्रे कोठून खरेदी केली. त्यासाठी पैसा कोणी पुरविला. गोवा बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्यांचा या प्रकरणात सहभाग होता का याचाही तपास करायचा आहे, असा युक्तिवाद 'सीबीआय'च्या वकिलांनी केला.

तावडे तपासात सहकार्य करीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. आपले डोके दुखत असल्याची बतावणी तावडे करतो. १४, १५ जून रोजी त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. त्यामुळे त्याच्याकडे विचारपूस करता आली नाही. आजपावेतो करण्यात आलेल्या तपासात सहाजणांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध घ्यायचा आहे. साक्षीदारांपैकी एकाने दिलेल्या वर्णनावरून काढलेल्या रेखाचित्रातील दोघांपैकी एक व्यक्ती सारंग अकोलकर असल्याचे ओळखले आहे. मात्र, दोघांपैकी नेमका कोण, हे अद्याप अस्पष्ट आहे. हत्येपूर्वी तीन महिने वीरेंद्रसिंह तावडेला दाभोलकरांवर लक्ष केंद्रीत करा, असे ई-मेलद्वारे बजावण्यात आले होते. या ई-मेलला उत्तर न देताच तावडे याने अंमलबजावणी केल्याचा दावा 'सीबीआय'नं न्यायालयात केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमेरिकन ट्रेजरी देणार आर्थिक मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) योजना राबविण्यासाठी निधी कसा उभारता येईल, कर्ज काढल्यास परतफेड करताना पालिकेवर किमान बोजा कसा पडेल, आदी गोष्टींविषयी सविस्तर मार्गदर्शन महापालिकेला मिळणार आहे. पाणीपुरवठ्यासह मेट्रो, नदीसुधारणा अशा प्रकल्पांनाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेने अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ ट्रेजरीबरोबर नुकताच करार केला. हा करार एक वर्षासाठी असून, या कालावधीत आर्थिक बाबींविषयी ट्रेजरीतर्फे महापालिकेला सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. कर्जरोखे (बाँड) उभारून जादा निधी उभारता येईल, की कर्जाच्या माध्यमातून अधिकचा निधी प्राप्त होईल, या विषयीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पुढील १५ दिवसांमध्ये त्याबाबतचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या निधीतून सध्या समान पाणीपुरवठा प्रकल्पाची काही कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, हा संपूर्ण प्रकल्प २८०० कोटी रुपयांचा असल्याने त्यासाठी मोठा आर्थिक निधी उभारावा लागणार आहे. पाणीपुरवठ्यासारख्या नागरिकांच्या हिताच्या प्रकल्पासाठी 'करमुक्त रोखे' काढण्याबाबतही विचार होऊ शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत. पाण्यासह मेट्रो आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी ट्रेजरीतर्फे सहकार्य केले जाणार आहे.
..................
क्रेडिट रेटिंगचाही फायदा
महापालिकेने काही महिन्यांपूर्वी 'क्रेडिट रेटिंग' करून घेतले आहे. त्यामध्ये, AA+ असा शेरा महापालिकेला प्राप्त झाला आहे. बाजारातून निधी उभारण्यासाठी पालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा हा पुरावा समजला जात असल्याने अमेरिकेच्या ट्रेजरीने महापालिकेला सहकार्य करण्यास पुढाकार घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकन ट्रेजरीशी स्मार्टसिटी​चा करार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्टसिटी प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महापालिकेने अमेरिकेच्या 'डिपार्टमेंट ऑफ ट्रेजरी'बरोबर करार केला आहे. या कराराचा उपयोग शहरात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी होणार असून, पालिकेचा आर्थिक फायदा होईल, असा विश्वास महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी व्यक्त केला.
स्मार्टसिटीसह शहरात आगामी पाच वर्षांत उभ्या राहणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, यासाठी महापालिकेने 'पुणे स्मार्ट सिटी नॉलेज एक्स्चेंज रोड शो' या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळे‌त अनेक देशातील तज्ज्ञ मंडळी सहभागी झाली होती. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुमार यांनी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ ट्रेजरीबरोबर केलेल्या कराराची माहिती दिली. या वेळी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रेरणा देशभ्रतार, प्रकल्पाचे समन्वयक अनिल पवार आदी उपस्थित होते.
'शहराची आर्थिकस्थिती, आर्थिक पत, भांडवलाची सद्यस्थिती, याचबरोबर शहराच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अनेक गोष्टींचा अभ्यास अमेरिकन ट्रेजरी करणार आहे. त्यासाठी पालिकेला खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही,' असेही कुमार यांनी स्पष्ट केले. दोन दिवसीय स्मार्ट सिटी रोड शोमध्ये सुमारे ३५ देशांतील दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कार्यशाळेत विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये झालेल्या चर्चेचा फायदा भविष्यात शहरात प्रकल्प राबविताना होणार आहे. प्रत्येक चार ते सहा महिन्यांनी अशा पद्धतीच्या कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. स्मार्टसिटी अंतर्गत पालिकेच्या माध्यमातून प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविण्याच्या दृष्टीने वर्किंग ग्रुप आणि वॉररूम रूम तयार करण्यात आल्याचेही कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकांच्या प्रशिक्षणाची गरज

$
0
0

अपघात टाळण्यासाठी कठोर कारवाई, पायाभूत सुविधा आवश्यक; तज्ज्ञांचे मत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महामार्गांवर सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी चालकांचे योग्य पद्धतीने प्रशिक्षण, कठोर दंडात्मक कारवाई आणि पायाभूत सुविधांचा विकास या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत वाहतूक क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी गुरुवारी व्यक्त केले.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे प्रमाणेच जिल्ह्याच्या हद्दीतील अन्य चार महामार्गांवरील परिस्थितीदेखील भयानक असल्याचे 'मटा'ने घेतलेल्या आढाव्यात स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर महामार्गांवरील वाहतुकीची परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना' या विषयावरील 'राउंड टेबल' परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे (आयडीटीआर) प्रमुख के. माधवराज, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, महामार्ग पोलिस दलाचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद भोईर आणि सजग नागरी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर परिषदेत सहभागी झाले होते.
'लोकांना जीवनाचे मूल्य राहिलेले नाही. त्यामुळेच ते महामार्गांवर सुसाट वेगाने वाहने चालवतात. मुळातच लोकांना वाहन कसे चालवावे याची तांत्रिक माहिती नाही. या शिवाय भरधाव वेगात चालविल्या जाणाऱ्या वाहनाच्या तांत्रिक बाबींची माहिती त्यांना नसते. खासगी वाहन चालकांबरोबरच अवजड वाहनांच्या चालकांना महामार्गावर वाहन कसे चालवायचे, महामार्गांवरील दिशादर्शक फलकांची माहिती नसते, ब्रेक कधी आणि कसा लावायचा याचे प्रशिक्षण नसते, कधी स्पीड कमी करायचा आणि कधी तो वाढवायचा याची देखील माहिती नसल्याने अपघात घडतात. हे थांबविण्यासाठी शास्त्रशुद्ध वाहनचालक तयार करणे गरजेचे आहे,' असे मत के. माधवराज यांनी व्यक्त केले.
रस्त्यांची बांधणी चुकीची असल्याने अनेक ठिकाणी अपघात होतात. त्यामुळे रोड सेफ्टी ऑडिट करण्याची गरज आहे. सातारा रस्त्यावर कात्रजचा बोगदा ओलांडून बाहेर पडल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रकाश थेट डोळ्यावर पडत असल्यामुळे समोरील काहीच दिसत नाही. या ठिकाणची दिवसाची व रात्रीची परिस्थिती वेगळी असते, हे लक्षात घेऊन सर्वंकष ऑडिट केले पाहिजे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
अपघात रोखण्यासाठी बेशिस्त चालकांना चाप लावण्यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख महामार्गांवर सीसीटीव्ही लावण्याची आणि वाहतुकीचे नियम मोडल्यावर ई-चलन पद्धतीने दंड आकारण्याची आवश्यकता आहे. तसेच दंडाच्या रकमेत वाढ आणि चालकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे, असे भोईर यांनी सांगितले.
..
'यंत्रणा सक्षम होण्याची गरज'
महामार्ग पोलिस, आरटीओ यांच्याकडून महामार्गावरील वाहतूक नियमनासाठी पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाही. यांच्याकडून कायमच पुरेसे मनुष्यबळ नसल्याचा दावा केला जातो. या यंत्रणा सक्षम झाल्या पाहिजेत. तसेच, राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग प्राधिकरण किंवा रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांची यंत्रणा तोकडी आहे. त्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, असे वेलणकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काटेकोरपणे राबवावी जलपुनर्भरण योजना

$
0
0

राज्य सरकारची सर्व महापालिका, नगरपरिषदांना सूचना
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाने ओढ दिल्याने किंवा अपुऱ्या पावसामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने महापालिका हद्दीमध्ये 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची अर्थात जलपुनर्भरणाची अंमलबजावणी काटेकोर स्वरूपात केली जावी, अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. या पाण्याचा उपयोग पिण्याव्यतिरिक्त इतर सर्व कारणांसाठी करता येईल, याचीही आठवण करून देण्यात आली आहे.
महापालिका हद्दीत उभ्या राहणाऱ्या मोठमोठ्या इमारती आणि सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले असले, तरी त्याकडे अनेक महापालिका, नगरपरिषदांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, भूगर्भातील पाण्याची पातळीही कमी होत असून, पिण्याच्या पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपुऱ्या पावसामुळे ही बाब पुन्हा अधोरेखित झाली असल्याने आता 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'बाबत केलेल्या तरतुदी योग्य तऱ्हेने अंमलात आणल्या जाव्या, असे सरकारने सुचविले आहे.
महापालिका हद्दीमध्ये गावठाण परिसर वगळता ३०० चौरस मीटरपेक्षा (३ हजार २०० चौरस फूट) अधिक क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या सर्व इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबविण्यात यावा, अशी तरतूद विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीसी रूल्स) केली गेली आहे. त्यानुसार, शहरातील बहुतेक सर्व इमारतींमध्ये ही यंत्रणा अस्तित्वात असणे गरजेचे आहे. दुर्दैवाने, सरकारने डीसी रूल्समध्ये केलेल्या या तरतुदीकडे अनेक बांधकाम व्यावसायिकांनी काणाडोळा केला आहे. तर, महापालिकेनेही त्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
...................
पालिकेने करावी तपासणी
महापालिकेतर्फे रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबविणाऱ्या मिळकतींना मिळकतकरात पाच टक्के सूट दिली जाते. डीसी रूल्समध्ये ही तरतूद समाविष्ट झाल्यापासून गेल्या आठ-नऊ वर्षांमध्ये शहरात उभ्या राहिलेल्या इमारतींच्या तुलनेत 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची सवलत घेणाऱ्या मिळकतींची संख्या अतिशय तुटपुंजी आहे. त्यामुळे, किमान यापुढे तरी कोणत्याही नव्या बांधकामाला परवानगी देताना, रेनवॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा कार्यान्वित आहे का, याची तपासणी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.
........................
महापालिकेतर्फे बहुतेक प्रकल्पांना मान्यता देताना, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बंधन घालण्यात येते. बहुतेक प्रकल्पांनी त्याची अंमलबजावणी केली आहे; पण संबंधित सोसायट्या पुढे येत नसल्याने सवलत घेणाऱ्या प्रकल्पांची संख्या कमी आहे.
प्रशांत वाघमारे,
शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गदिमांचे स्मारक दृष्टिक्षेपात

$
0
0

जन्मशताब्दीपूर्वी उभारण्याचा पालिकेचा संकल्प
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारक उभारणीच्या हालचालींना वेग आला असून, २०१८-१९ या गदिमांच्या जन्मशताब्दीपूर्वी स्मारक उभारण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे.
गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांच्या निवासस्थानी उपमहापौर मुकारी अलगुडे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात गुरुवारी अनौपचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन वर्षांत स्मारकाची उभारणी करण्याचे आश्वासन उपमहापौरांनी दिले. या वेळी उपायुक्त सतीश कुलकर्णी, माजी आमदार उल्हास पवार, गदिमांचे नातू सौमित्र माडगूळकर आणि 'संवाद'चे सुनील महाजन उपस्थित होते.
या स्मारकासाठी वाकडेवाडी येथे मुठा नदीच्या पात्रातील जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हा प्रकल्प मार्गी लावावा, असे निवेदन उपमहापौरांनी दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. 'वाकडेवाडीतील जागा नदीपात्राच्या निळ्या किंवा लाल पूरनियंत्रण रेषेमध्ये येते का, याची पाहणी करण्यात येणार आहे. जागा पूरनियंत्रण रेषेमध्ये येत असल्यास पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल,' अशी माहिती अलगुडे यांनी दिली.
..
सोसायट्यांचा जागेला विरोध
दरम्यान, महापालिकेने निवडलेल्या जागेला वाकडेवाडीतील सोसायट्यांनी विरोध केला आहे. पालिकेने निवडलेली माधवराव शिंदे उद्यान परिसरातील जागा अत्यंत चुकीची असून, इतक्या कमी जागेत स्मारक शक्य नाही; त्यामुळे अन्य जागांचा विचार करावा, अशी मागणी या सोसायट्यांमधील रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्वे संस्थेतील मुलींची फसवणूक

$
0
0

टूरकंपनीविरोधात गुन्हा दाखल; मालक अटकेत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील मुलींना जर्मनीला स्टडी टूरला नेण्याच्या बहाण्याने २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार हॉलिडे वंडरेजचे मयूर अशोक पाटील (रा. नीलाकुंज अपार्टमेंट, प्रभात रोड) यांना अटक करण्यात आली आहे.
संस्थेच्या को-ऑर्डिनेटर मेघना जोशी (वय ४३, रा. ईशान नगरी, वारजे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जर्मनी येथील 'हॅनओव्हर' विद्यापीठाने संस्थेतील २० मुली आणि दोन शिक्षकांना २० ते २२ जूनपर्यंत चालणाऱ्या 'उका कल्चरल प्रोग्रॅम'साठी निमंत्रण दिले होते. संस्थेने टेंडर काढून टूर ऑपरेटर कंपन्यांकडून कोटेशन घेतले. त्यामध्ये सर्वाधिक कमी कोटेशन पाटील यांच्या कंपनीने भरले होते. त्यानुसार दोन टप्प्यांमध्ये पाटील यांना २५ लाख रुपये देण्यात आले होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या मुलींची आणि दोन शिक्षकांची बर्लिन प्रवासाची तारीख १८ जून रोजी ठरली होती. त्यासाठी ते सर्व १७ तारखेला मुंबईला जाणार होते. परंतु, पाटील याने व्हिसा प्रक्रिया उशिरा सुरू केली. ही प्रक्रिया ८ जून पर्यंत चालली. दरम्यान, जर्मन वकिलातीकडून जोशी यांना १४ जून रोजी फोन आला आणि त्यात व्हिसा नाकारत असल्याचे सांगितले. व्हिसाच्या कागदपत्रांबरोबर कन्फर्म तिकिटे न जोडता रद्द केलेली तिकिटे जोडण्यात आल्याचे सांगितले. व्हिसा मंजुरीसाठी तत्काळ मुंबई येथे येऊन कन्फर्म तिकिटे द्या, असेही सांगण्यात आले.
पाटील याने ​स्टडीटूरसाठी दिलेले पैसे इतरत्र खर्च करून मुलींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने यांनी ​सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान २५ जूनला पुणे दौऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा निश्चित झाला असून, येत्या २५ जूनला त्यांचे आगमन होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्मार्टसिटी प्रकल्प घोषणेच्या वर्षेपूर्तीनिमित्त देशभर राबविण्यात येणाऱ्या योजनांचे उद घाटन मोदी यांच्या हस्ते पुण्यातून केले जाणार आहे.
स्मार्टसिटी मिशनचे प्रमुख संचालक समीर शर्मा यांनी २५ जूनला पुण्यातील मोदी यांच्या कार्यक्रमाविषयी बद्दल कळविले आहे. या कार्यक्रमासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी २५ जूनला स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर दोन टप्प्यांत स्पर्धा घेऊन २० शहरांची निवड करण्यात आली. योजनेत निवड झालेल्या शहरांना यापूर्वीच निधी देण्यात आला असून, जून महिन्यात कामाला सुरुवात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
स्मार्ट सिटी योजना घोषणेच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदी यांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम पुण्यातच घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय नगरविकास विभागाने कार्यक्रमाची तयारी करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने तयारी आरंभली आहे. मोदी यांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम नक्की कोठे घ्यावा, यासाठी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये शहरातील विविध जागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी देखील करण्यात आली. म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गिरीश बापट यांची सायबर सेलकडे तक्रार

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

भाजपच्या मंत्र्यांची एका मागोमाग एक प्रकरणे चव्हाट्यावर येत असतानाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा एका कार्यक्रमातील महिला सरपंचांबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोसंदर्भात बापट यांनी पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रार केली असून, असे फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्यांचा तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून बापट उप​स्थित होते. या कार्यक्रमात भाजपच्या एका महिला सरपंचाला मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढायचा होता. त्यासाठी त्या महिला सरपंचांनी बापट यांना विनंती केली. तेव्हा बापट यांनी महिला सरपंचाचा फोटो काढण्यासाठी हात धरला असल्याचे सोशल मीडियावर फिरत आहे. आणखीही एका महिलेचा हात धरल्याचे फोटो सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून आहेत. या प्रकरणी सरपंच पूनम चौधरी यांनीही लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने बापट यांचा निषेध करण्यासाठी गुरुवारी त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात सं‌तोष डोख, अच्युत लांडगे, विनोद काळोखे आदी सहभागी झाले होते.

बापट हे पित्याप्रमाणे

बापट हे पित्याप्रमाणे आहेत. मी आजही त्यांना काका म्हणते. मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढण्यासाठी मी त्यांना विचारत होते. त्यांनी इथेच थांब म्हणून सांगत असताना कोणी तरी फोटो काढला आहे. तसेच, माझी बदनामी केली जात आहे, असे महिला सरपंचाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी नियोजनविषयक अभ्यासक्रम हवा

$
0
0

'यूजीसी'चे देशातील विद्यापीठांना आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशभरातील विद्यापीठांना स्मार्टसिटीच्या उभारणीसाठी पूरक ठरतील असे नागरी नियोजनविषयक पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. या अभ्यासक्रमांच्या आधारे स्मार्टसिटीच्या वाढत्या विस्तारामध्ये आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
आयोगाने देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्राद्वारे आदेश दिले आहेत. देशात सध्या राबविल्या जात असलेल्या स्मार्टसिटी मिशनच्या माध्यमातून देशभरात पाचशे स्मार्टसिटी विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठी पूरक यंत्रणांचीही या पुढील काळात टप्प्याटप्प्याने उभारणी केली जाणार आहे. भविष्यात आर्थिक उलाढालीची प्रमुख केंद्रे ठरू पाहणाऱ्या या शहरांसाठी नागरी प्रशासन आणि नागरी नियोजन हा महत्त्वाचा भाग ठरणार आहेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची निर्मिती करू शकणारे अभ्यासक्रम देशभरातील विद्यापीठे आणि कॉलेजांनी सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी कॉलेज आणि विद्यापीठांमधून नागरी नियोजनाविषयीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठांनी, कॉलेजांनी नागरी नियोजनाचा एक विषय वा अभ्यासक्रम सुरू करावा. विद्यापीठांनीही त्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी आयोगाच्या या कृतीचे स्वागत केले. डॉ. कश्यप म्हणाले, 'देशभरात उच्चशिक्षित शहर रचनकार आणि डिझायनर्सची मोठी कमतरता आहे. स्मार्टसिटी प्रकल्पाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ही कमतरता दूर होणे गरजेचे होते. या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने ही सुरुवात झाली आहे, असे म्हणता येईल.' या पुढील टप्प्यांमध्ये असे अभ्यासक्रम शिकलेले आणि उच्चशिक्षित शहररचनाकार, अर्बन डिझायनर्स धोरणात्मक पातळीवर सहभागी करून घेण्यासाठीही सरकारने धोरणे आखली पाहिजेत. त्यानंतरच अशा अभ्यासक्रमांचा खऱ्या अर्थाने व्यापक फायदा होईल, असे मतही त्यांनी या निमित्ताने मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्ग्युसन कॉलेज स्वायत्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) फर्ग्युसन कॉलेजला यंदापासून सहा वर्षांसाठी शैक्षणिक स्वायत्तता जाहीर केली आहे. त्यामुळे बीए, बीएस्सी, एमए आणि एमएस्सी या पदवी आणि पदव्युत्तर वर्गांसाठी कॉलेज स्वतःचे विशेष अभ्यासक्रम सुरू करणार आहे. कॉलेज मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सलग तीन वेळा सर्वोच्च मूल्यांकन मिळविणाऱ्या संस्थांना स्वायत्त होण्याची संधीविद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच मिळवून दिली आहे. याच संधीचा फायदा घेऊन, फर्ग्युसनने स्वायत्तता मिळविल्याची माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांनी गुरुवारी सांगितले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणारी पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच असली, तरी त्यामध्ये कॉलेजच्या स्वायत्ततेचा
विशेष उल्लेख होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

'या स्वायत्ततेच्या आधारे कॉलेजमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर विशेष अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. त्यासाठी संस्थेने यापूर्वीपासूनच आपली प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे यंदापासूनच या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल. तसेच, कॉलेज पातळीवर या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र परीक्षापद्धती लागू केली जाईल,' असे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले. अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धती निश्चित करण्यासाठी कॉलेजमध्ये विविध विषयांसाठीची स्वतंत्र अभ्यासक्रम मंडळे, विद्या परिषद, परीक्षा मंडळ आदी यंत्रणांची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विषयतज्ज्ञांमध्ये विद्यापीठ, उच्चशिक्षण विभाग यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींचाही समावेश केला जाणार असल्याचेही प्राचार्यांनी सांगितले. पुणे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे, सोसायटीचे सचिव आनंद भिडे, किरण शाळीग्राम यांच्यासह संस्थेचे आदी या वेळी उपस्थित होते.

प्रवेश अर्जांमध्ये वाढ

कॉलेजने पेनस्टेट युनिव्हर्सिटी, अॅरिझोना युनिव्हर्सिटी, सदर्न युनिव्हर्सिटी आदी परदेशी विद्यापीठांसोबतच शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. या पुढील काळात कॉलेजमधील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना या कराराचे लाभ मिळणार आहेत. यंदा बीएसाठी जवळपास तीन हजार, तर बीएस्सीसाठी जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्ज सादर केले आहेत. दर वर्षी कॉलेजकडे एकूण प्रवेशसंख्येच्या तुलनेत जवळपास पाच पट अर्ज येतात. यंदा कॉलेजला स्वायत्तता मिळण्याच्या पार्श्वभूमीवर या अर्जांमध्येही लक्षणीय वाढ झाल्याची माहिती विकास काकतकर यांनी दिली.

स्वागतार्ह पाऊल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संलग्न असलेल्या महाविद्यालयांची आणि संस्थांची संख्या दिवसागणिक वाढत असून, त्यांच्या ओझ्याखाली विद्यापीठ दबले जात आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी महाविद्यालयांच्या स्वायत्ततेचा पर्याय उपलब्ध होऊन दोन दशके लोटली असली, तरी अनेक कारणांनी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता फर्ग्युसन कॉलेजने स्वायत्तता मिळवून पुढचे पाऊल टाकले आहे. दीर्घ परंपरा असलेल्या पुण्यातील अन्य महाविद्यालयांनीही स्वायत्ततेचा मार्ग स्वीकारल्यास विद्यापीठांवरील ओझे काही प्रमाणात का होईना कमी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वयम्’ २२ जूनला झेपावणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी विकसित केलेला 'स्वयम्' हा उपग्रह येत्या २२ जूनला अवकाशात झेपावणार आहे. या कॉलेजने दुसरा उपग्रह विकसित करण्याचा प्रकल्पही हाती घेतला असून, त्याला भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) हिरवा कंदील दिला आहे.

सीओईपीच्या विद्यार्थ्यांच्या 'स्वयं' या पहिल्या उपग्रहाचे येत्या २२ जूनला सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून 'पीएसएलव्ही सी- ३४' या ध्रुवीय प्रक्षेपकामार्फत अन्य वीस उपग्रहांसोबत हे प्रक्षेपण होणार असल्याची माहिती कॉलेजचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांनी गुरुवारी दिली. त्या वेळी कॉलेजने या पुढील टप्प्यात दुसरा उपग्रह विकसित करण्यासाठीची पावले उचलल्याची माहितीही समोर आली.

''स्वयम्'साठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांमुळे उपग्रहांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा कॉलेजकडे तयार झाली आहे. कॉलेजच्या पहिल्या उपग्रहासाठी जवळपास आठ वर्षांचा कालावधी गेला. मात्र, या पुढील टप्प्यात हा कालावधी तीन ते चार वर्षांपर्यंत कमी होणार आहे. त्यानुसार कॉलेजने आपल्या दुसऱ्या उपग्रहाचा प्रस्ताव 'इस्रो'कडे सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे,' असे डॉ. आहुजा यांनी दिली.


असा असेल दुसरा उपग्रह

'सीओईपी'च्या दुसऱ्या उपग्रहामध्ये पतंग उडण्यासाठी वापरले जाणारे तत्त्व वापरले जाणार आहे. 'पतंगाच्या दोन टोकांमध्ये निर्माण होणाऱ्या ताणामुळे पतंग हळूहळू वर सरकू शकतो. त्याचप्रमाणे तापमानातील हा फरक आलटून पालटून दोन टोकांमध्ये तयार करून, हा उपग्रह अवकाशामध्ये हळूहळू वर सरकू आहे. या उपग्रहाच्या मदतीने अवकाशातील 'आयन्स'ची माहिती पृथ्वीवर पाठविण्यासाठी कॉलेज प्रयत्नशील आहे,' अशी माहिती कॉलेजचे प्रा. डॉ. एम. वाय. खळदकर यांनी दिली. भूपृष्ठावर एक हजार किलोमीटर अंतरावर हा उपग्रह प्रक्षेपित केल्यास हा उपग्रह वर्षभरात साधारण आणखी एक हजार किलोमीटर वर जाईल. दिवसाला साधारण पाच ते सहा किलोमीटर या गतीने वर सरकत हा उपग्रह आपल्याकडील माहिती पृथ्वीवर पाठविणार असल्याचेही डॉ. खळदकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकी देणाऱ्या आरोपीला ओडिशातून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महिलेचा अश्लील फोटो तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या ओडिशातील तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक ओडिशातील जजपूर येथे गेले होते. पुणे पोलिसांनी ३८०० किलोमीटरचा प्रवास करून केवळ मोबाइलच्या 'टॉवर लोकेशन'च्या आधारे आरोपीला गजाआड केले.

कुमार श्रीनिबास नायक (२३, रा. केहोंजर, जजपूर, ओडिशा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फौजदार आर. बी. बांबळे, पोलिस नाईक आर. आर. केदारी यांच्या पथकाने ही कारवाई केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट यांनी दिली.

नायक हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी करत होता. नायकने 'ओएलक्स'वरून संबंधित महिलेचा नंबर मिळवला होता. त्याने अशा प्रकारे अन्य राज्यांतील महिलांना त्रास दिला असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अश्लील फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने महिलेला दिली होती. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात 'आयटी अॅक्ट'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास फौजदार बांबळे यांच्याकडे देण्यात आला होता. आरोपीच्या मोबाइलचे टॉवर लोकेशन ओडिशा येथील आले होते. त्यानुसार बांबळे आणि केदारी यांनी ओडिशाला जाण्याचा निर्णय घेतला. खासगी गाडीने ते ओडिशा येथे गेले. त्यासाठी त्यांनी १९०० किलोमीटरचा प्रवास केला. आरोपीचा मोबाइल क्रमांक रजिस्टर असलेल्या पत्त्यावर ते पोहोचले. तो पत्ता चुकीचा असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी 'लोकेशन'च्या आधारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

त्याच्या मोबाइलचे टॉवर लोकेशन हे कहोंजर (ओडिशा) येथील येत होते. पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या कार्यालयातील पोलिस ​कर्मचारी इनामदार मोबाइल संबंधीचे काम करत होते आणि मिळालेली माहिती बांबळे यांना ओडिशात देत होते. बांबळे यांनी नायकशी संपर्कात असलेल्या 'कॉमन कॉलर'च्या माध्यमातून नायकला गाठले. त्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली आणि त्याला गजाआड केले. त्याला अटक करून पुण्यात पोहोचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images