Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टँकर उलटल्याने एक्स्प्रेसवे ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट येथे रविवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास सिमेंटचा टँकर उलटून अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. वाहनांच्या सुमारे पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातामुळे लोणावळ्यात जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी एक महिन्यातील हा दहावा अपघात आहे.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंमेटच्या टँकरच्या (एमएच ४६ एएफ ३४००) चालकाचे येथील तीव्र उतार व वळणावर नियंत्रण सुटल्याने टँकर दोन्ही मार्गाच्या मधोमध आडवा झाला. सुदैवाने हा टँकर समोरून येणाऱ्या वाहनावर आदळला नाही. या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. अपघाताची माहिती कळताच खंडाळा महामार्ग व खंडाळा आउट पोस्ट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त टँकर बाजूला काढण्यासाठी आयआरबीच्या क्रेनला प्राचारण केले. मात्र उच्च क्षमतेची क्रेन उपलब्ध न झाल्याने कमी क्षमतेच्या दोन क्रेनच्या सहाय्याने हा टँकर बाजूला करण्यात आला. त्यानंतर सव्वासातला मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली. तर साडेसातला पुण्याकडे जाणारी एक लेन सुरू करण्यात आली.

अपघाताचा परिणाम जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर झाल्याने लोणवळ्यात वाहतूक कोंडी झाली. उच्च क्षमतेच्या क्रेनअभावी टँकर एक्स्प्रेस वे वरील दोन्ही लेनवर रात्री उशिरापर्यंत तसाच राहिल्याने पुण्याकडे जाणाऱ्या एका लेनवर वाहतुकीचा ताण पडला. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक रात्री उशिरापर्यंत संथ गतीने सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झोनबदलाला हिरवा कंदील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
हवेली तालुक्यातील पेरणे गावामधील ३६ एकर आणि शिरूरमधील २५ एकर जमीन 'शेती' व 'शेती ना विकास' झोनमधून 'रहिवास' झोनमध्ये बदलण्यात येणार आहे. या झोन बदलाच्या प्रस्तावाला छाननी समितीने हिरवा कंदील दाखविला असून त्यावर नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. या झोन बदलासाठी संबंधितांकडून ३० टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे.

प्रादेशिक आराखड्यातील शेती, शेती व ना विकास, वनिकरण, खणीकर्म, हरित विभागामधील जमीन रहिवास, तसेच वाणिज्य वापरासाठी मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा झोन बदलण्याच्या कार्यपद्धतीमध्येही बदल करण्यात आला आहे. हे प्रस्ताव पूर्वी सरसकट नगर विकास विभागाकडे पाठविले जात होते. त्याऐवजी १० ते २५ हेक्टरपर्यंतच्या जमिनीच्या झोन बदलाचे प्रस्ताव स्थानिक पातळीवरच मंजूर करण्यात येत आहेत.

प्रादेशिक योजनेतील वेगवेगळ्या झोन बदलांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मंजूर प्रादेशिक योजनेतील प्रस्ताव थेट राज्य सरकारकडे मंजुरीसाठी न पाठवता ते विभागीय स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या 'छाननी समिती'कडे दाखल करावे लागणार आहेत. ही समिती शेती तथा ना विकास झोन व सार्वजनिक-निम सार्वजनिक झोनचे रहिवासी झोनमध्ये; तसेच रहिवास झोनच्या जमिनीचे औद्योगिक, शेती झोनचे वाणिज्य तसेच वनीकरण, डोंगरमाथा व डोंगर उतार, प्रादेशिक उद्यान, खनिकर्म, पर्यटन व अन्य कोणत्याही विभागातून शेती झोनमध्ये बदल करण्याचे निर्णय घेणार आहे.

त्यानुसार हवेली तालुक्यातील पेरणे येथील गट नंबर ९०५ पैकी, ९१९/१, ९१९/२, ९२१, ९२३, ९२४, ९२५, ९२६ व ९२७ या वरील १४.१८ हेक्टर (३६ एकर) जमीन शेती व ना विकास झोनमध्ये आहे. हा झोन बदलून तो रहिवास झोनमध्ये रूपांतरीत करण्याचा प्रस्ताव छाननी समितीकडे आला होता. या प्रस्तावाच्या छाननीअंती समितीने या झोन बदलास हिरवा कंदिल दाखविला आहे. तसेच शिरूरमधील गट नं. १३००/१, १३००/२, १३००/३ व १३१६/१, १३१६/२ ही जमीन शेती झोनमधील आहे. ही जमीनही रहिवास झोनमध्ये बदलण्यास समितीने संमती दर्शविली आहे. या दोन्ही प्रस्तावांवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. तीस दिवसांत या प्रस्तावावर नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगला कदम यांनी धमकी दिल्याचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
संभाजीनगरमधील 'साई उद्यान' येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा करण्यास गेलेले माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. मोहन अडसूळ यांना सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी अप्रत्यक्षरित्या जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची लेखी तक्रार अॅड. अडसूळ यांनी पोलिस उपायुक्त डाॅ.बसवराज तेली यांच्याकडे केली आहे.

अॅड. अडसूळ हे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत संत तुकारामनगर येथील वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पाठपुरावा करत आहेत. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अडसूळ हे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे संभाजीनगर येथील 'साई उद्यान'मध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. महेश लोंढे यांनी सुरुवातीला चर्चा केल्यानंतर अडसूळ हे चर्चा करत होते.

त्यावेळी मंगला कदम तेथे आल्या, अनधिकृत बांधकाम हे कदम यांच्या वॉर्डातील असल्याने त्यांनी सुरवातीला या विषयाच्या चर्चेत सहभाग घेतला. चर्चा सुरू असताना कदम यांनी, 'तुम्हाला तुकाराम चव्हाण यांचे काय झाले हे माहिती आहे ना?' असे उद्देशून अडसूळ यांना अप्रत्यक्ष जिवे मारण्याची धमकी दोन ते चार वेळा दिल्याचे अडसूळ यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. 'मी वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पाठपुरावा करत असल्याने, माझ्या जिवीतास धोका आहे,' असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कदम यांनी महापालिका आयुक्त वाघमारे, सहआयुक्त दिलीप गावडे, राजू भालेराव व महेश लोंढे यांच्या समोर अप्रत्यक्षरित्या जीवे मारण्याची धमकी दिल्याचे अडसूळ यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मी असे बोललेले नाही आणि बोलूच शकत नाही. हे आरोप हे बिनबुडाचे आहेत. मी महिला असल्याने कोणालाही दम देण्याचा प्रश्नच येत नाही. आजतागायत कोणालाही दम दिलेला नाही, असे मंगला कदम कदम यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहने फोडणारे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पूर्ववैमन्यातून दहशत निर्माण करीत खडकीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यातील नऊ जणांना पोलिसांनी रविवारी अटक केली. या सर्वांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तर थेरगाव येथील वाहन तोडफोड प्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन्ही घटनांमधील अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. शनिवारी (११ जून) या दोन्ही घटना घडल्या होत्या. जाळपोळ, तोडफोडीचे लोण पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये पसरत चालले आहे.

खडकी प्रकरणी सोन्या उर्फ बिलाड उर्फ अश्विन बळीराम साठे (२३), दयानंद श्रीमंत गर्जे (२६), अनिकेत संजय कड (२१), शहीत शौकत सैय्यद (२०), सोमनाथ विजय साठे (२३), अजिंक्य राजेंद्र रनवरे (२५), रोहित यादगिरी शेगुरे (२१), कुणाल बाळासाहेब पवार (२३), नरेश कृष्णा उपलवंत (२३), अल्लाउद्दीन इस्त्राईल शेख (१९), तंबी, लाला उर्फ योगेश मरडे (सर्व रा. खडकी व दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर थेरगाव प्रकरणी सचिन वसंत खलसे (२३), ईश्वर किसन गायकवाड (२५, दोघे रा. थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी पवन खलसे (२३, रा. कैलासनगर, थेरगाव) याने फिर्याद दिली आहे.

खडकीमध्ये दीड महिन्यांपासून दोन गटांत वाद सुरू आहे. त्यातून शनिवारी टोळक्याने दुचाकीवरून घिरट्या मारत दहशत निर्माण केली. मोलोदिना रोडवर टोळक्याने वाहनांची तोडफोड सुरू केली. तसचे येथील एका घरात घुसून महिलेला कुऱ्हाडीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घटनास्थळी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी महिलांनी चौकीसमोर ठिय्या मांडला. पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र विभांडिक तपास करीत आहेत.

पोलिसांच्या बदल्यांचा फटका

शहरात पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्यांचा फटका बसल्याचे कालच्या घटनेवरून दिसून आले. खडकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. येथील अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांची नावे समजल्यानंतरही त्यांना पकडण्यासाठी नक्की कोठे जायचे हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला. अखेर मध्यरात्री खडकीतून वाकडला बदली झालेल्या एपीआय लोंढे यांना बोलवण्यात आले आणि त्यांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आले.

सीसीटीव्ही बंद

खडकी कँटोन्मेंट बोर्डाने परिसरात २५ सीसीटिव्ही कॅमेरे बसवले. त्यापैकी १६ कॅमेऱ्यांचे कनेक्शन खडकी बाजार चौकीमध्ये दिले. शनिवारी ज्या भागात घटना घडली तेथील दहा कॅमेरे बंद असल्याचे उघड झाले आहे.

शंभर नंबर अर्धा तास बिझी

खडकीमधील घटना घडल्यावर पोलिसांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क केला. परंतु तो व्यस्त होता. अखेर काही जणांनी चौकीत धाव घेतली, तर काही जणांनी थेट पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी वायरलेसवरून ही माहिती अधिकाऱ्यांना कळविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवणींनी उजळली ‘पुलकित’ सायंकाळ

$
0
0

मान्यवरांनी उलगडले पुलंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पुलंनी विनोदाला प्रतिष्ठा मिळवून दिली. विडंबन करायला सर्व परंपरांची आधी माहिती असावी लागते. ती पुलंकडे होती. त्यांचा विनोद कमरेखालचा नव्हता. स्वत: मोठे लेखक असताना नवोदित लेखकांचे कौतुक करणारे कमी असतात. पुलं हे स्वत: मोठे असताना दुसऱ्या लेखकाच्या पाठीवर थाप मारणारे सर्वांत मोठे लेखक होते,' या शब्दांत पुलंच्या आठवणींना उजाळा मिळाला. पुलं म्हणजे 'या सम हा' अशी खूण प्रत्येकाच्या भावनेतून उमटल्याने रविवारची सायंकाळ रसिकांसाठी 'पुलकित' झाली.
'आशय सांस्कृतिक'तर्फे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, आनंदयात्री पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित 'या सम हा' या कार्यक्रमांतर्गत 'पुलं चे देणे' ही आठवणींची मैफल रंगली. पुलंच्या आठवणी, त्यांचे किस्से, त्यांचा विनोद, माणूस म्हणून असलेले मोठेपण, निरागसता, सहजता अशा बहुआयामी व्यक्तित्त्वाच्या देण्यातून रसिकांची ओंजळ वाहती झाली. ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, नाट्यसमीक्षक डॉ. वि.भा. देशपांडे, समीक्षक रेखा इनामदार-साने, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि 'मुक्तांगण'च्या प्रमुख डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी पुलंच्या आठवणींना उजाळा दिला. लेखिका मंगला गोडबोले यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत सर्वांशी संवाद साधला. पुलंच्या चाहत्यांच्या गर्दीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे सभागृह पुलंच्या विनोदाप्रमाणेच ओसंडून वाहत होते.
'भाईंसारखा माणूस चित्रपटासारख्या व्यावसायिक क्षेत्रात व्हाउचरच्या व्यवहारात टिकू शकत नाहीत; त्यामुळे पुलं या क्षेत्रात रमले नाहीत. पुलं हे स्वत: मोठे असताना दुसऱ्या लेखकाच्या पाठीवर थाप मारणारे सर्वांत मोठे लेखक होते,' याकडे फुटाणे यांनी लक्ष वेधले. 'पुलंमध्ये आनंद देण्याची वृत्ती होती. त्यांच्या लिखाणातही संगीत आहे,' असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 'पुलं बहुरूपी खेळिया होते,' असे वर्णन डॉ. देशपांडे यांनी केले.
'पुलं संवाद साधत सादरीकरण करायचे. त्यांच्यात ती सहजता होती,' अशी आठवण गाडगीळ यांनी जागवली. 'मुक्तांगण हे पुलंच्या प्रेरणेने सुरू झाले. ते लवकरात लवकर बंद व्हावे, अशी त्यांची इच्छा होती,' अशी भावना डॉ. पुणतांबेकर यांनी व्यक्त केली. सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी स्वागत केले.
----------------------------
पुलंनी विनोदाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे लेखन वाचताना लेखकाचा आपल्याशी संवाद सुरू असल्याचे वाटते. त्यांचे लिखाण जिवंत, चैतन्यपूर्ण आहे. आज विनोद संपलेला असताना पुलंचा विनोद महत्त्वाचा ठरतो. निरागसता, प्रसन्नता आणि सकारात्मकता आहे तोपर्यंत पुलंच्या विनोदाला मरण नाही.

रेखा इनामदार-साने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज शहरात मोठ्या पावसाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि परिसरातील तापमानात किंचित घट झाली आहे. परिणामी शहरात काहीसा गारवा पसरला असून, पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात कोकणच्या दक्षिण व उत्तर भागात बहुतांश ठिकाणी तर, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रविवारी राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. महाबळेश्वर येथे ११ मिलिमीटर, रत्नागिरी येथे तीन तर, विदर्भात ब्रह्मपुरी येथे एक मिमी पावसाची नोंद झाली. पुण्यात पावसाने हजेरी लावलेली नसली, तरी तापमानात घट झाली आहे. पुण्यात रविवारी ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तर, २५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सोमवारी शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर त्यानंतरचे दोन दिवस शहरात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गोव्याजवळील कारवारपर्यंत धडक मारलेल्या मान्सूनची अरबी समुद्रावरील वाटचाल थंडावल्याने राज्यात मान्सूनची प्रगती होऊ शकलेली नाही. पुढील चार दिवसात या भागात मान्सूनची प्रगती होण्यास परिस्थिती अनुकूलही नाही. या उलट बंगालच्या उपसागरावर मान्सूनची आगेकूच सुरूच आहे. मान्सून दोन ते तीन दिवसात बंगालच्या उपसागरात मध्य व उत्तरेकडील आणखी काही भागात तर ईशान्येकडील राज्यात व उपहिमालयाच्या व पश्चिम बंगाल व सिक्कीमच्या काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुळशी ते कोलाड मार्गही अडकलाय अपघाती फेऱ्यात

$
0
0

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
पुणे : 'सातारा, नाशिक, मुंबई अगदी सोलापूर महामार्गावर सुरू असलेल्या कामांची माहिती सातत्याने ऐकायला मिळते. पण, आमच्या पौडवरून कोकणात उतरणाऱ्या कोलाड महामार्गाकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. दर आठवड्याला या 'तथाकथित' महामार्गावर अपघात होतात, मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही,' हे गाऱ्हाणे आहे मुळशी ते कोलाड मार्गालगत राहणाऱ्या गावकऱ्यांचे...
महामार्ग म्हणून आवश्यक असलेल्या कोणत्याही सुविधा या रस्त्यावर बघायला मिळत नाहीत. चांदणी चौकापासून ते कोलाड हे ९० किलोमीटर अंतर आहे. पौड गावापर्यंत हा महामार्ग इतर सर्वसामान्य रस्त्यांसारखाच वाटतो. रस्त्याच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे, आठवडा बाजारांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, चौकाचौकातील खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे हा पल्ला ओलांडण्यासाठी तासभर लागतो. पुढे भूगाव आणि परिसरात एमआयडीसी आणि हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्ये जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. मुळशी आणि ताम्हिणी मार्गावरील वळणे धोकादायक ठरतात. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावर काहीही बदल झाला नसून दरवर्षी अपघाताची संख्या वाढते आहे. मुळशी भागातील ग्रामस्थांच्या माहितीनुसार या महामार्गावर दर आठवड्याला किमान एक अपघात होतो आणि महिन्यात दोन ते तीन लोकांचा बळी जातो.
पौडपासून पुढे कोलाडपर्यंत वाहनांच्या वर्दळीच्या तुलनेत रस्ता अरुंद आहे. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोठेही साइड पट्ट्या लावलेल्या नाहीत. मुळशी, डोंगरवाडी, ताम्हिणी भागात अनेक वेडीवाकडी वळणे आहेत. या धोकादायक वळणांवर कठडे नसल्याने वाहनचालकाचा अंदाज चुकल्यास गाडी थेट दरीमध्ये जाते. गाडी घसरल्याने दुचाकींचे सातत्याने अपघात होतात. एखादा ट्रक उलटला तर रस्ताच बंद करण्याची वेळ येते. रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या पट्ट्या, दिशा फलक, रिफ्लेक्टर देखील प्रशासनाने बसविलेले नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यावर आलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडण्याबद्दल गावकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार विनंती केली. अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. गेल्या काही वर्षांत कोलाड भागात विस्तारालेल्या औद्योगिक वसाहतीमुळे या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक वाढली आहे. पावसाळा आणि हिवाळ्यातील पर्यटनासाठी ताम्हिणी तसेच कोकणात अलिबाग, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर यांसह रायगड भागात फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत काही पटीने वाढ झाली आहे. मात्र या महामार्गावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.
..
कोलाड महामार्ग अपघाताचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे महामार्गाचे पूर्ण दुर्लक्ष आहे. दर आठवड्याला या रस्त्यावर अपघात होतो, गावकरी तत्परतेने पुढे येतात. पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करतात. ट्रक उलटल्यास वाहतुकीच्या कोंडीचे नियोजनही स्थानिक कार्यकर्तेच करतात. प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेते आहे.
- अंकुश मोरे, माजी सरपंच, निवे गाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या महामार्गालाही वाहतूककोंडीचा विळखा

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com
पिंपरी : पुणे-मुंबईला जोडणारा जुना महामार्ग दोन मोठ्या शहरांसह अनेक गावांमधून जातो. पुण्यातील वाकडेवाडी ते लोणावळा या दरम्यान दररोज सरासरी एक प्राणांतिक अपघात घडतो. किरकोळ अपघातांचा आकडा पन्नासच्या घरात आहे. पुणे ते पिंपरी-चिंचवड या पट्ट्यात रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. मात्र, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी-चिंचवडच्या पुढे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणारा निमुळता रस्ता, तळेगाव ते लोणावळा या पट्ट्यात सर्व्हिस रोड आणि मुख्य मार्गावर बेदरकारपणे जाणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
वाकडेवाडीपासून खडकीपर्यंतचा रस्ता मोठा आहे. तर, खडकी-बोपोडी येथील रुंदीकरणाच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे येथे कायम वाहतूक कोंडी होते. दापोडी ते निगडी दरम्यान बांधण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटरमध्ये अतिवेगामुळे दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रेडसेपरेटरमधून जाणाऱ्या एसटी आणि खासगी बस प्रवाशांना उतरविण्यासाठी मध्येच थांबतात. बसमधून उतरलेले प्रवासी मग धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात झाले आहेत. या ग्रेडसेपरेटरची उंची कमी असल्याने अवजड आणि उंच वाहने येथे अडकून बसल्याने सातत्याने कोंडी होते. या ग्रेडसेपरटच्या इन-आउटमध्ये वारंवार बदल करण्यात येत असल्याने कोंडीत आणखीनच भर पडते. त्यातच हे इन-आउट प्रस्तावित बीआरटी मार्गात येत असल्याने भविष्यात येथील अपघातांचा धोका कायम आहे.
याचबरोबर दापोडी ते निगडी सर्व्हिस रोडवर झालेले अतिक्रमण, बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, चिंचवड स्टेशन येथील पुणे-मुंबई अवैध प्रवासी वाहतूक कोंडी आणि अपघाताला निमंत्रण देत आहेत. निगडी चौकातील उड्डाणपुलावर काही वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर येथे तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती. कालांतराने ती मोडकळीस आली आहे. त्यामुळे येथे पुन्हा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. निगडी जुन्या जकात नाक्यावर आणि रस्त्यावर अवजड वाहने थांबलेली असतात. त्यामुळे अंदाज न आल्याने थांबलेल्या वाहनांवर आदळून अपघात झाले आहेत. आठ पदरी रस्ता निगडी येथून पुढे देहूरोडकडे जाताना निमुळता होऊन दुपदरी होतो. त्यामुळे देहूरोड ते सोमाटणे फाटा दरम्यान दररोज अपघात होतात. या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. सैन्यदलाच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता असल्याने काम रखडल्याचे बोलले जाते. ही समस्या खडकी येथेही कायम आहे. सेंट्रल चौकाकडून तळेगावदाभाडेकडे जाताना रस्ता पुन्हा चौपदरी आहे. याच चौकात मुंबई-बेंगळुरू रस्ता जोडला जातो. त्यामुळे येथे ही अपघात घडतात. सोमाटणे फाटा येथून द्रुतगती मार्गाकडे जाणारा रस्ता आहे. तेथे कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. सेंट्रल चौक ते लोणावळा रस्त्याच्या दुतर्फा अनेक ढाबे-हॉटेल्स आहेत. त्यामुळे अचानक मुख्य रस्त्यावर येणारी वाहने अपघाताला निमंत्रण देतात. तळेगावदाभाडे ते कामशेतपर्यंत मुख्य चौपदरी रस्त्याला सेवा रस्ता आहे. अनेक ठिकाणी दुभाजक चुकीच्या पद्धतीने उभारले आणि तोडलेले आहेत. तसेच द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या उर्से टोलनाका येथे तळेगाव-चाकण रस्ता जोडलेला आहे. जड वाहनांची रहदारी जास्त असल्याने अनेकदा अपघात झाले आहेत.
..
महामार्ग पोलिसांची संख्या वाढवा
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या या रस्त्यावर पोलिसांची संख्या वाढविणे गरजेची आहे. तसेच देहूरोड ते लोणावळा या पट्ट्यात अनेक गाव असल्याने रस्त्यावर लाइट लावणे देखील शक्य आहे. त्यामुळे येथील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी लाइट लावणे, अनावश्यक दुभाजक बांधणे, गावातून थेट मुख्य रस्त्यावर वाहने न येऊ देणे आदी उपाययोजनांची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघाती मृत्यूंमध्ये ‘वरचा’ क्रमांक

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
पुणे : पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्गांवर होणारे अपघात आणि त्या अपघातांमधील मृतांच्या संख्येत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पहिल्या क्रमांकावर आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर गेल्या सहा महिन्यात झालेल्या अपघातांच्या तुलनेत सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातांची संख्या पाचपट तर, मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तिप्पट असल्याचे आढळून आले आहे.
पुणे-सोलापूर हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील सर्वांत मोठा महामार्ग आहे. हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यातून हा महामार्ग जातो. या रस्त्यावर वाळू वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. तसेच, दक्षिण भारताला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने मालवाहतुकीचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे तुलनेने या मार्गावर जड वाहनांचे प्रमाण अधिक आहे. त्यातच महामार्गालगतची गावे विकसित झाल्याने स्थानिक वाहतुकीचे प्रमाणही अधिक आहे. या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे ते एक महत्त्वाचे कारण आहे. या महामार्गावर जानेवारी ते मे २०१६ या पाच महिन्यांच्या कालावधीत १५५ अपघात झाले. त्यापैकी ६३ प्राणांतिक अपघातांमध्ये ६६ जणांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये ९५ जण गंभीर तर, चार किरकोळ जखमी असून, ३० अपघात विनादुखापतीचे आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्याचे चौपदरीकरण होण्यापूर्वीची आणि चौपदरीकरण झाल्यानंतरची परिस्थिती यात जमीनअस्मानाचा फरक आहे. पूर्वीच्या तुलनेत या रस्त्यावरील वाहनांच्या सरासरी वेगात वाढ मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच, या रस्त्यावरील वाहनांची संख्याही दुपटीने वाढल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहनांची वाढलेली संख्या आणि वेग यामुळे अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. या रस्त्यावर भिगवण ते टेंभुर्णी परिसरात सर्वाधिक अपघात होत होते. मात्र, आता लोणी काळभोर ते यवत हा पट्टा, कुरकुंभ, इंदापूर बायपास या ठिकाणी गेल्या काही वर्षांत सातत्याने अपघात होत आहेत. लोणी काळभोर ते यवत दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांचे आणि दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
-----
हडपसरमध्ये उपाययोजनांची गरज
पुण्याचे कोंडलेले प्रवेशद्वार अशी हडपसरची पर्यायाने सोलापूर रस्त्याची एक ओळख बनली आहे. सोलापूर रस्ता पूलगेटपासून सुरू होत असला, तरीही खऱ्या अर्थाने महामार्ग लोणीपासून सुरू होतो. हडपसर परिसरात गेल्या काही वर्षात प्रचंड शहरीकरण झाले आहे. तसेच, या रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण पाहता पूलगेट ते हडपसरपर्यंतचा रस्ता धोकादायक म्हणूनच ओळखला जातो. या रस्त्यावरून प्रवास करताना एकही सिग्नल चुकत नाही. ही ओळख पुसण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. अन्यथा भविष्यात येथील परिस्थिती आणखी भीषण रूप धारण करेल, यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघात टाळण्यासाठी सर्व्हिस रोडची​ गरज

$
0
0

मॉल, औद्योगिक विकासामुळे रस्त्यावर वाहनांची भाऊगर्दी
Aditya.Tanawade@timesgroup.com
पुणे : नव्याने राष्ट्रीय महामार्ग होऊ घातलेल्या पुणे-नगर रस्त्यावर सतत होणारी अतिक्रमणे, मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरणारे बाजार, याच रस्त्यावर पुणे शहरालगत असणारे मॉल, औद्योगिक क्षेत्राचा विकास झाल्यामुळे वाढलेली जड वाहनांची वाहतूक आदी कारणांमुळे या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय सर्व्हिस रस्त्यांचा अभाव हा देखील अपघातांना निमंत्रण देणारा मोठा घटक बनला आहे.
केंद्र सरकारच्या 'भारतमाला' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पुणे- नगर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. मात्र, रस्त्यासंदर्भातील अनेक त्रुटी अद्याप दूर झालेल्या नाहीत. तासनतास खोळंबणारी वाहतूक ही या रस्त्यावरील प्रमुख समस्या बनली आहे. नगर रस्त्याला येरवडा भागात जिथे सुरुवात होते, त्या ठिकाणी दोन मोठे मॉल आहेत. दररोज संध्याकाळच्या वेळी मॉलमध्ये प्रचंड गर्दी होते. मॉलमध्य़े जाणारे पुणेकर रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग करतात. परिणामी वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. कित्येकदा ही वाहतूक कोंडी आवरणे पोलिसांनाही जिकीरीचे होऊन बसते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नगर रस्त्यावर वाघोलीच्या रूपाने नवे उपनगर उदयाला येत आहे. या ठिकाणी रस्त्यावरच बाजार भरवला जातो. आठवडे बाजाराच्या दिवशी या ठिकाणी वेगळी व्यवस्था असते. मात्र, अन्य दिवशी अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा बोऱ्या वाजतो. काही वेळेला जड वाहने अडकून दीड ते दोन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुढे चंदननगर, खांदवेनगर, भीमा-कोरेगाव, शिक्रापूरचौकापर्यंत वाहतुकीची समस्या प्रकर्षाने जाणवते. या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणेही झाली आहेत. त्यामध्ये पुण्याहून औरंगाबाद, नागपूरकडे जाणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. भीमा- कोरेगावच्या पुढे शिरूर बायपासपर्यंत वाहतूक मात्र, सुरळित सुरू असते.
गेल्या काही वर्षांत नगर रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील काही भागामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र, पूर्वीच्या रस्त्यावरील गतिरोधक अजूनही तसेच आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. नगर रस्त्यावर बहुतांश ठिकाणी सर्व्हिस रोडचा अभाव आहे. गावांमधून येणारे रस्ते थेट मुख्य रस्त्याला जोडण्यात आले असल्याने दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच, रामवाडीलगत काही धोकादायक वळणे आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळेला जड वाहने आणि बसचा अंदाज चुकून अपघात होण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. अपघात घडल्यानंतर तातडीने पोलिस यंत्रणा अपघाताच्या ठिकाणी पोहोचते आणि पुढील कारवाई करते ही बाब समाधानकारक आहे. दररोज या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी देखील याला दुजोरा दिला आहे. नगर रस्त्याचे महामार्गामध्ये रूपांतर होण्यासाठी वाहतुकीचा प्रश्न सुटण्याची नितांत आवश्यकता आहे.
..
रस्त्यावर स्वतंत्र व्यवस्था हवी
पुणे-नगर रस्त्यालगत असलेल्या शिक्रापूर, रांजणगाव या एमआयडीसी आणि चाकण, तळेगाव एमआयडीसीला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर सध्या माल वाहतुकीसाठी केला जातो. हा रस्ता पुढे मुंबईला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होते. मात्र, या रस्त्यावर होणारे अपघात आणि रस्त्याच्या इतर समस्यांची दखल घेण्यासाठी वेगळी यंत्रणा असणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस या रस्त्याच्या समस्या वाढत असून त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायाभूत सोयींअभावी अपघातांना निमंत्रण

$
0
0

Harsh.Dudhe@timesgroup.com
पुणे : रस्ते दुभाजकालाच ठिकठिकाणी फोडलेले फाटे...रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे तात्पुरत्या उभारलेल्या रस्त्यावरून सुसाट आणि बेशिस्त वाहतुकीचे ओंगळवाणे प्रदर्शन, सर्व्हिस रोडचे रखडलेले काम...रस्त्याच्या धोकादायक ठिकाणी लोखंडी रेलिंगची कमतरता.. दिशादर्शक फलकांचा अभाव, अशा धोकादायक परिस्थितीतही पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे, या महामार्गावरील अपघातांची मालिका नव्या वर्षातही सुरू आहे.
शिंदेवाडी आणि खेडशिवापूर या दोन गावांमध्ये ही परिस्थिती अतिशय भयावह असून, वेळीच सुधारणा न केल्यास या ठिकाणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गाद्वारे बेंगळुरू, बेळगाव, कोल्हापूर, सांगली आणि सातारा ही महत्त्वाची शहरे पुणे शहराला जोडण्यात आली आहेत. असे असूनही या महामार्गाची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम खासगी कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, हे काम कूर्मगतीने सुरू असल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्याच महिन्यात या महामार्गाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची तंबी दिली आहे.
या महामार्गावर देशातील दोन मोठे बोगदे आहेत. मात्र, या बोगद्यांमधील बहुतांश लाइट व्यवस्था बंद आहे. या दोन बोगद्यांना आतून जोडणाऱ्या तीन रस्त्यांमध्ये अजिबातच लाइट नाही. याशिवाय रस्त्यांची माहिती देणारे दिशादर्शक फलकही नाहीत. त्यामुळे अडचणीच्या वाहनचालकांची अडचण होते. बोगदा संपल्यानंतर शिंदेवाडी गावापासून पुढे महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या आजूबाजूला राडारोडा पसरला आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडचे कामही धीम्यागतीने सुरू आहे. काही ठिकाणी तयार केलेला सर्व्हिस रोड व्यावसायिकांनी स्वार्थासाठी खोलेला आहे. नागरिकांनी एका मार्गिकेहून दुसऱ्या मार्गिकेवर जाण्यासाठी डिव्हायडरलाच ठिकठिकाणी फाटे फोडले आहेत. काही ठिकाणी डिव्हायडरच गायब आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो.
सहापदरीकरणाच्या कामामुळे मूळ रस्ता हा काही ठिकाणी बंद केला आहे, तर काही ठिकाणी खोदला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता रस्ता उभारला आहे. अशाच प्रकारची परिस्थिती खेड-शिवापूर गावात आहे. महामार्गावर अपघात होऊन वाहने अन्यत्र घसरू नयेत, म्ह‍णून दुतर्फा धोकादायक ठिकाणी लोखंडी रेलिंग उभारण्याची आवश्यकता आहे. मात्र, केवळ एक-दोन ठिकाणीच रेलिंगची व्यवस्था आहे. नसरापूर फाट्याजवळ उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून, तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गाचे काम धीम्यागतीने सुरू असून, दिशादर्शक फलक नसल्याने शिरवळपर्यत अशीच धोकादायक परिस्थिती आहे. एकंदरीतच महामार्गाची दुर्दशा झाली असताना एखादा अपघात घडल्यास मदतकार्य करण्यासाठी महामार्ग पोलिसांची पुणे ते शिरवळ दरम्यान केवळ एक चौकी आहे.
.........
अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती
कात्रज घाटातून जुना पुणे - बेंगळुरू महामार्ग गेला आहे. या घाटातील रस्त्याच्या दुतर्फा खडी पसरली आहे. त्यातच काही ठिकाणी धोकदायक दरडी आहेत. रस्त्याच्या एका बाजूला बांधकामाचा राडारोडा आणि कचरा सर्रासपणे टाकण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्य़ास एखादी अनुचित घटना घडू शकते. जुन्या बोगद्यात लाइट नसल्याने आणि वाहनांचा धूर साठत असल्याने अपघात होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील शहरीकरण देतेय अपघाताला निमंत्रण

$
0
0

मोशी, चाकण, खेड, मंचरची गर्दी हटविण्यासाठी प्रयत्न हवेत
Prashant.Aher@timesgroup.com
पुणे : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग चौपदरी होत असला तरी, पुणे जिल्ह्यातील शहरीकरणामुळे अपघातांचे सत्र थांबण्याची मुळीच शक्यता नाही. मोशी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा या ठिकाणी होणारी गर्दी पार करणे वाहनचालकांसाठी मोठी कसरतच ठरत आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (यूपीए-दोन) कार्यकाळात राष्ट्रीय महामार्ग पन्नासच्या (पुणे-नाशिक) चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांमध्ये निधीच्या विनियोगावरून मतभेद होते. परिणामी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा निर्णय पूर्णत्वास गेला नाही. दरम्यान, पाच वर्षांच्या काळात मोशी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा येथे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले. रस्त्यासाठी जमीन संपादित झाली असली, तरी आपल्या व्यवसायाचाच विचार करीत स्थानिकांनी व्यवसाय थाटले. त्याचा थेट परिणाम चौपदीकरण झाले तरी वाहतुकीवर तसाच राहण्याची शक्यता आहे. पुणे-नाशिक महामार्गावर जड वाहनांच्या तुलनेत छोटी वाहने आणि दुचाकींची संख्या अधिक आहे. 'सिंगल लेन' असल्याने येथील अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे बळी जाण्याचे प्रमाण मोठे आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-नाशिक रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. यापूर्वी पुणे ते खेड या दरम्यान चौपदरीकरण झाले आहे. पुण्यातून भोसरी पार करण्यासाठी किमान अर्ध्या तासाचा कालावधी लागतो. त्यापुढे भोसरी ते खेड हे अंतर पाऊण तासांत कापता येते. खेड ते सिन्नर हा रस्ता पुणे आणि नाशिककरांसाठी सर्वाधिक कंटाळवाणा बनला आहे. खेड तसेच अवसरी घाटात वाहतूक कोंडी ही नित्याची बाब ब​नली आहे. मंचर ओलांडल्यानंतर कळंब गावातून जाण्या-येण्यासाठी वाहन चालकांना कसरत करावी लागते. नारायणगाव येथे वाहतूक कोंडीत मोठी भर पडते. एसटी स्टँडजवळून, गावातून येणारा रस्ता महामार्गाला मिळतो आणि कोंडीला तोंड फुटते. आणि महाहामार्गाच्या दोन्ही बाजूने किलोमीटरभर पुढे सरकते. आळेफाटा चौकात सर्कलला होणारी कोंडी फोडली की नाशिकला जाणारे चालक नगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करतात.
..
टोलनाक्यांवर वेळेची सक्ती का नाही ?
जिल्हाधिकाऱ्यांनी टोलनाक्याच्या कंत्राटदारांना तीन मिनिटांत वाहने 'पास' करण्याची सक्ती केली आहे. मात्र, या सक्तीतून मोशी आणि खेड येथील टोलनाके अद्याप मुक्त आहेत. त्यामुळे खेड टोल नाक्यावर सायंकाळी पुण्याच्या दिशेने येण्यासाठी इंद्रायणी नदीवरील पुलावर रांगा लागलेल्या असतात. किमान अर्धा तास या ठिकाणी वाहन चालकांना थांबावे लागते. जिल्हाधिकाऱ्यांनी या टोलनाक्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
..
चौपदरीकरण अपघाताला कारणीभूत
खेड घाट ते आळेफाटा या दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. जमीन संपादित होईल तसे काम करण्यात येत असल्याने कधी चौपदरी तर, कधी दुपदरी अशी कसरत वाहनचालकांना करावी लागते. यामध्ये दुचाकी आणि पादचाऱ्यांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात अपघात होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मगर हॉस्पिटलची दुरवस्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

मगरपट्टा हॉस्पिटलमधील दुरवस्था जैसे थे असून पावसाळा तोंडावर आला तरी दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याने हे हॉस्पिटल पुन्हा भरण्याचा धोका आहे. या हॉस्पिटलमधील टीबी लॅब रूमची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात या रूममध्ये पाणी गळते. कै. मगर हॉस्पिटलमधील प्रसूतीगृह अडीच वर्षांपासून बंद पडले आहे. चेंबर तुंबलेले आहेत. या समस्या सोडवण्याऐवजी महापालिका अधिकारी आणि डॉक्टर एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात हॉस्पिटलमध्ये पाणी साचते. टीबी रुग्णांच्या थुंकीची तपासणी होणाऱ्या प्रयोगशाळेचीही दुरवस्था झाली आहे. येथे प्रत्येक महिन्याला ५० ते ५५ टीबीचे रुग्ण तपासणीसाठी येतात. या लॅबमध्ये पावसाळ्यात छतातून पाणी गळते. येथील भिंतीचे पापुद्रे निघत आहेत, अशी माहिती हॉस्पिटल टीबी सेंटर प्रमुख सारंग शिंदे यांनी दिली. हॉस्पिटलमधील ड्रेनेजलाइन व चेंबर भरलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी ड्रेनेजलाइन स्वच्छ करून घेतो, असे सहायक आयुक्त संजय गावडे यांनी सांगितले होते. मात्र, पालिकेने हे काम केलेले नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. सोमनाथ परदेशी यांना हॉस्पिटलमधील दुरवस्थेबाबत विचारले असता ते म्हणाले, 'आम्ही सुधारणा करण्यासाठी महापालिका भवन कार्यालय व क्षेत्रीय कार्यालय प्रमुखांना वारंवार पत्राने कळवले आहे. मात्र, ते लक्ष देत नाहीत. त्याला आम्ही काय करणार.' तर, 'सध्या बजेट नसल्यामुळे आम्ही काम करू शकत नाही,' असे सहायक आयुक्तांनी म्हटले आहे. दरम्यान, महापालिका आरोग्य प्रमुख आणि वॉर्ड क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुढील आठवड्यात हॉस्पिटलची पाहणी करणार आहे. त्यानंतर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देणार आहे, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकिट संग्रहाची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टपाल तिकिटे संग्रहाचा छंद अनेकांना असतो; पण चित्रपटांच्या वेडापायी एका तरुणाने चित्रपटांवर निघालेल्या टपाल तिकिटांचा अनोखा संग्रह केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून हा संग्रह करण्यात आला आहे. या संग्रहाची इंडिया बुक रेकॉर्डसमध्ये नुकतीच नोंद झाली आहे.

संदीप बोयत असे या तरुणाचे नाव आहे. देहू रोड परिसरात राहणाऱ्या संदीपकडे सुमारे २०० ते २५० चित्रपटविषयक टपाल तिकिटांचा संग्रह आहे. संदीप याने चित्रपटाच्या प्रेमातून हिंदी, मराठी, दाक्षिणात्य कलाकारांची टपाल तिकिटे जमवली आहेत. तसेच गायक, दिग्दर्शक, निर्माते यांच्या तिकिटांचा देखील त्यामध्ये समावेश आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत संदीप याने विविध प्रदर्शनातून हा संग्रह जोपासला आहे.

'जुन्या कलाकारांना लोकांच्या मनात कसे जिवंत ठेवता येईल, हा विचार मी करत असतो. या विचारातून मागील चार वर्षांपासून मी हा छंद जोपासला आहे,' अशी भावना संदीप याने 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.

संदीपच्या संग्रहात बलराज साहनी, चेतन आनंद, कमाल अमरोही, पृथ्वीराज चौहान, राजेश खन्ना, संजीव कुमार, देवआनंद, अशोक कुमार, शम्मी कपूर, बी. आर. चोपडा, राजेंद्र कुमार, मेहमूद, आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन, गीता दत्त, सुरैया, उत्पल दत्त, यश चोप्रा, दुर्गा खोटे, भालजी पेंढारकर, स्मिता पाटील अशा मातब्बर कलाकारांची तिकिटे आहेत. संदीप याचे वडील रमेश बोयत यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संदीप सहाय्यक कॅमेरामन असून यापुढे हा संग्रह वाढवणार असल्याचा निश्चय तो बोलून दाखवतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेपाचशे नागरिकांनी केल्या घरबसल्या तक्रारी

$
0
0

वाहनचोरीविषयक अॅपला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पोलिस महासंचालकांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'वाहनचोरी तक्रार'विषयक अॅपला राज्यातील नाग​रिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अल्पावधीतच राज्यातील ५५० नागरिकांनी वाहनचोरीच्या तक्रारी घरबसल्या केल्या आहेत. चोरीला गेलेली वाहने मिळविण्यासाठी या अॅपचा उपयोग होत असून, आतापर्यंत दहा वाहने परत मिळाली आहेत.

पोलिसदलात नवनवीन आणि स्मार्ट प्रणालीचा वापर सुरू करण्यावर पोलिस महासंचालकांनी भर दिला आहे. तसेच, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसांच्या कामात सुस्पष्टता आणण्यात येत आहे. किरकोळ कामांसाठी नागरिकांना पोलिस ठाण्यापर्यंत यावे लागू नये, या साठी अत्यंत सोप्या पद्धतीने वाहनचोरीची तक्रार घरबसल्या करता येणारे अॅप पोलिसांनी विकसित केले आहे. नागरिकांनी अॅपचा उपयोग करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत सुमारे साडेपाचशे जणांनी तक्रार नोंदवली आहे. तक्रार नोंदविणाऱ्यांमध्ये ३७ पुणेकरांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण तक्रारींपैकी चोरीला गेलेल्या दहा गाड्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अॅपचा अधिकाधिक नागरिकांनी वापर करण्याचे आवाहन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले आहे.

अॅपशिवाय व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांनी कायम पोलिसांच्या संपर्कात राहावे, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले.

अशी करा तक्रार

अॅपवर जाऊन 'पब्लिक' हा पर्याय निवडा. तेथे मोबाइल क्रमांक, नाव, ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाका. त्यानंतर तुमच्या ई-मेलवर किंवा मोबाइल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल. त्यानंतर दुसऱ्या फॉर्ममध्ये गाडीचा क्रमांक, गाडी कोणाच्या नावावर आहे, चेसी क्रमांक आणि गाडी चोरीला गेलेले ठिकाण आदी माहिती भरा. या अॅपमध्ये आरटीओची लिंकही असणार आहे. त्यामुळे राज्यातील गाड्यांची माहिती मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यातील धरणांमधला पाणीसाठा २.१५ टीएमसीवर

$
0
0

महापौरांनी बोलाविली तातडीची बैठक; पाणीकपातीची शक्यता नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात मान्सून सक्रिय होण्यास आणखी आठवड्याभराची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे असल्याने उपलब्ध पाण्याच्या नियोजनासाठी येत्या दोन दिवसांत महापौरांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या २.१५ टीएमसी पाणी उपलब्ध असून, आजमितीस तरी तातडीने पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही, असा दावा करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे शहरात सप्टेंबर २०१५पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.. यंदाचा मान्सून वेळेत दाखल होईल आणि समाधानकारक असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यामुळे, जूनमध्ये पाणीटंचाईची समस्या दूर होईल अशी आशा होती. दुर्दैवाने, जूनचा पंधरवडा संपत आला, तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. किंबहुना, राज्यात पाऊस सक्रिय होण्यास पुढील आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावे लागण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे, पाणीसाठ्यात वाढ होण्यास जूनअखेर उजाडण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाने आणखी ओढ दिल्यास, पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे, पाणीवापराच्या नियोजनासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी पुढाकार घेतला असून, येत्या दोन दिवसांत त्याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या धरणांत उपलब्ध असलेला पाणीसाठा शहराला दीड ते दोन महिन्यांपर्यंत वापरता येईल. याच कालावधीत पालख्यांचे आगमन होणार असल्याने त्यासाठी काही प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे, या सर्व परिस्थितीचा आढावा महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह पाटबंधारे खात्याचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये केवळ पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून, पाणीकपात वाढविण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असा दावा केला जात आहे. दोन महिन्यांपूर्वी दौंड, इंदापूरसह ग्रामीण भागांत पाणी सोडण्याचा निर्णय घेताना, पालकमंत्री गिरीश बापट यांनी गरजेपेक्षा जास्त पाणी सोडल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. तसेच, पावसाळा लांबला, तर पुणेकरांच्या पाणीकपातीत वाढ झाल्यास त्याला सर्वस्वी बापटच कारणीभूत असतील, असे टीकास्त्र सोडण्यात आले होते.

गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत रविवारी उपलब्ध असलेला पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.६० टीएमसीने कमी आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत धरणात २.७५ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा, तो त्यापेक्षाही कमी असून, जेमतेम २.१५ टीएमसी पाणीच शिल्लक राहिले आहे. टेमघरमधील सर्व पाणीसाठा आटला असून, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या तीनच धरणांत उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडे-अकोलकरला उभारायची होती फौज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्रसिंह तावडे आणि गोवा बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग अकोलकर यांना हिंदुराष्ट्रासाठी १५ हजार सैनिकांची फौज उभारायची होती; तसेच शस्त्रांचा कारखाना काढायचा होता. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली होती, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या तपासात उघडकीस आली आहे.

सीबीआयला तावडे आणि अकोलकर यांच्यात झालेले ई-मेल संभाषण मिळाले आहे. अकोलकर याने एका बैठकीचा इतिवृतान्त या मेलद्वारे तावडे याला कळविला होता. या संभाषणात हिंदूराष्ट्रासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. तावडे हा २००८ ते २०१३ या काळात पुणे ते कोल्हापूर दरम्यान शस्त्रांची माहिती मिळवत होतो, तसेच अनेकांकडे त्याने शस्त्रांबाबत विचारणा केली असल्याचे प्रत्यक्षदर्शी तपासादरम्यान मिळाले असल्याचा दावा, काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केला आहे.

'सीबीआय'ने तावडे याला शुक्रवारी रात्री चौकशीनंतर तावडे याला दाभोलकर हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली. त्याला शनिवारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले असून सध्या त्याच्याकडे पोलिस कोठडीत तपास सुरू आहे. 'सीबीआय'ने तपासादरम्यान ई-मेल संभाषणातील अनेक गोष्टींबाबत तावडेकडे तपास करण्यात येत आहे.

अकोलकर याने तावडेला पाठवलेल्या ई-मेलमध्ये गावठी साहित्याचा उल्लेख केला आहे. तपासादरम्यान तावडे याने गावठी साहित्य म्हणजे गावठी पिस्तुलचा उल्लेख असल्याचे सांगितले आहे. अकोलकर आसाममधून परदेशी बनावटीचे शस्त्रे आणण्याचा प्रयत्नात असल्याचे ई-मेलमधून समजले आहे. हिंदुराष्ट्राच्या निर्मितीसाठी पैशांची आवश्यकता भासल्यास प्रसंगी चोरी अथवा सात्त्विक मार्गाने लूटमार करण्याबाबत बोलत होते. संघटनेचा बॅनर न वापरता मोठ्या प्रमाणात भरती करून फौज उभारण्याबाबत तपासात उघडकीस आल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले.

दाभोलकर, पानसरेंशी वाद

कोल्हापूर येथे २००४ मध्ये एका समाजाच्या मेळाव्यात दाभोलकर आले होते. या वेळी तावडे तेथे निमंत्रण नसतानाही घुसला आणि त्यांच्याशी वाद घातला. तसेच डाव्यांनी कोल्हापूर येथे काढलेल्या एका मोर्चामध्येही तावडे घुसला होता. तेथे त्याने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याशी प्रतिवाद करीत जाहीर 'राडा' केला होता. या अनुषंगानेही तपास करण्यात आला आहे.

तावडे हा मार्गदर्शक

तावडे हा अकोलकरचा मार्गदर्शक असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी अकोलकर तावडेशी चर्चा करत असल्याचे उघड झाले आहे. 'सीबीआय'ने अकोलकरच्या घरी छापा घातला त्यावेळी तेथून मोठ्या प्रमाणात साहित्य मिळाले. या साहित्यात मेल संदर्भात माहिती मिळाल्यानंतर तपासाला वेग आला आणि त्यातून तावडेची अटक सुकर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेच्या पैशातून चांदीचा डिनरसेट

$
0
0

Prasad.Panse@timesgroup.com

पुणे : 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष म्हणून दोन घरे वापरून त्यांच्या नूतनीकरणावर मोठी रक्कम खर्च करणारे सुशील मुनहोत आता आणखी अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र बँकेत रजू होण्यापूर्वीच चांदीच्या डिनरसेटपासून सोफ्यापर्यंतच्या गोष्टी खरेदी करून ती बिले त्यांनी महाराष्ट्र बँकेकडून वसूल केल्याची माहिती पुढे आली आहे. या सगळ्यामुळे आधीच स्थान डळमळीत झालेल्या मुनहोत यांना नव्या चौकशीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

केंद्रीय माहिती आयुक्तांच्या आदेशानंतर बँकेचे समभागधारक सुहास वैद्य यांना बँकेने माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या अधिकृत कागदपत्रांतूनच ही बाब उघड झाली आहे. मुनहोत वापरत असलेल्या पुण्यातील बंगला व मुंबईतील सदनिका या दोन्हीबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली होती. मात्र, पहिल्या अपिलानंतरही या पैकी बरीचशी माहिती देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी केंद्रीय माहिती आयुक्तांकडे अपील केले. या अपिलाची सुनावणी झाल्यानंतर माहिती आयुक्तांनी बँकेला याबाबतची सर्व माहिती बिलांसह देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला दोन महिने उलटल्यानंतर अखेर बँकेने वैद्य यांना ही माहिती दिली आहे.

सुशील मुनहोत हे नोव्हेंबर २०१३ मध्ये 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले. तत्पूर्वी ते स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष (सिडबी) म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी ही खरेदी केली आहे. या खरेदीपोटी जोडण्यात आलेल्या २०११, १२ व १३ या वर्षांमधील बिलावर सुशील मुनहोत, सिडबी किंवा फक्त सिडबी असा स्पष्ट उल्लेख आहे. मुनहोत यांनी साडेतीन लाखांचा चांदीचा डिनरसेट, एक लाख दहा हजारांचे फर्निचर व अन्य गोष्टींची खरेदी केल्याचे या बिलांमधून स्पष्ट होते. ही बिले सिडबीने भरली असल्याचीही शक्यता आहे. मात्र, ही सर्व बिले महाराष्ट्र बँकेने भरली असून शिक्क्यासहित वैद्य यांना माहिती अधिकाराअंतर्गत पाठवली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सनातन संस्थेचे साधक निष्पाप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सनातन'चे साधक निष्पाप असून, सरकार आणि माध्यमे त्यांना निष्कारण हत्येच्या आरोपांखाली गोवत असल्याचा आरोप 'सनातन'ने रविवारी पुण्यात आयोजित जनसंवाद सभेमध्ये केला. हिंदुत्ववादी संघटनांची नेमकी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी संघटना प्रयत्नशील असली, तरी मुख्यमंत्री वेळच देत नसल्याची ओरडही संघटनेने सभेच्या निमित्ताने केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) 'सनातन'चा साधक वीरेंद्र तावडे याला अटक केली. त्या पार्श्वभूमीवर सनातनने ही सभा आयोजित केली होती. संघटनेचे प्रवक्ते अभय वर्तक, राज्य संघटक सुनील घनवट आणि हभप श्यामजी महाराज राठोड यांनी या वेळी उपस्थितांसमोर संघटनेची भूमिका मांडली. 'सनातन'च्या कार्याविषयी माध्यमांमधून सातत्याने अपप्रचार केला जात असून, हिंदू राष्ट्र निर्मितीसाठीचे संघटनेचे प्रयत्न पुरोगाम्यांना त्रासदायक वाटत असल्यानेच, संघटनेवर आरोप होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

डॉ. दाभोलकर यांच्यावरील विविध आरोपांबाबत सीबीआयकडे पुरावे दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचवेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मात्र त्यांच्या खुनाच्या आरोपाखाली कोणत्याही पुराव्याशिवाय ताब्यात घेण्यात आले. सरकार अशा कार्यकर्त्यांविरोधातील खटले चालवत नसल्याने, त्यांचे निर्दोषत्त्व अद्याप समाजासमोर आलेले नाही.

खटले चालल्यास ते नक्कीच समोर येईल. संघटना हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी कटिबद्ध असून, २०२३पर्यंत देश नक्कीच हिंदू राष्ट्र होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. 'सनातन'वर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या मुक्ता दाभोलकर यांचा निषेध करताना, संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करण्याचा दाभोलकर यांना नैतिक अधिकार नसल्याचा दावाही या वेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजजोड द्या; अन्यथा कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नवीन वीजजोड देण्यास विलंब झाल्यास महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिला. संजीव कुमार म्हणाले, 'नवीन वीजजोड मिळण्यास विलंब होतो. अधिकाऱ्यांकडून वीजजोड देण्यास टाळाटाळ केली जाते, आदी कारणांमुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो, अशा तक्रारी नव्याने वीजजोड घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांकडून केल्या जातात. ग्राहकांना तत्पर सेवा देणे हे महावितरणचे कर्तव्य आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सर्व तक्रारींचे त्वरित निवारण केले पाहिजे. नवीन वीजजोड त्वरित उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.' दरम्यान, पावसाला लवकरच सुरुवात होणार असल्याने वीज यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामांसाठी, तसेच पावसानंतर विजेचे खांब पडणे, तारा तुटणे, रोहित्रांमध्ये बिघाड होणे अशा विविध कामांसाठी कमीत कमी वेळ वीजपुरवठा खंडित राहील, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images