Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फेसबुकवरील ओळखीतून प्राध्यापिकेची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीने दुबईवरून पाठविलेले गिफ्ट सोडवून घेण्याचा बहाणा करून एका प्राध्यापक महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अजयकुमार, रंजनकुमार (दिल्ली) व सुरेंद्र कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ जुलै ते १ सप्टेंबर २०१५ दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या प्राध्यापिका आहेत. त्या एनआयबीएम रोड परिसरात राहतात. त्यांची अजयकुमार नावाच्या व्यक्तींसोबत फेसबुकवरून ओळख झाली. आरोपीने तो दुबईला असल्याचे सांगत संवाद वाढविला, त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्या वेळी आरोपीने बोलण्यासाठी महिलेकडे व्हॉट्स अॅप नंबरची मागणी केली. महिलेने त्याला व्हॉट्स अॅप नंबर दिला. त्यानंतर व्हॉट्स अॅपद्वारे त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. या दरम्यान अजयकुमारने महिलेचा विश्वास संपादन केला. दुबईवरून कुरिअरने गिफ्ट पाठविले असून त्यामध्ये २५ हजार पौंड व मौल्यवान वस्तू असल्याचे अजयकुमार याने संबंधित महिलेला सांगितले. हे गिफ्ट दिल्ली येथील कुरिअर कंपनीकडे रखडले असल्याचे त्याने सांगितले. गिफ्ट मिळविण्यासाठी महिलेला वेगवेगळ्या बँकांच्या खात्यावर सुमारे एक लाख ७ हजार भरण्यास अजयकुमारने सांगितले. पैसे भरूनही गिफ्ट अथवा भरलेले पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. या प्रकरणी महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत उपनिरीक्षक वर्षाराणी पाटील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नियमावलीचे उल्लंघन करून शहरभर होर्डिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहराच्या अनेक भागांमध्ये जाहिरात फलक नियमावलीचे उल्लंघन करून होर्डिंग लावण्यात आले असून, पोलिसांच्या 'ना हरकत प्रमाणपत्रा'लाही महापालिकेने केराची टोपली दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये इमारतींच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमध्येही होर्डिंग उभारण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. चौकातील सिग्नल किंवा 'स्टॉप लाइन'पासून ५० मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे फलक असता कामा नयेत, या पोलिसांच्या सूचनेलाच महापालिकेने हरताळ फासला आहे. शहरातील महत्त्वाच्या टिळक चौकासह इतरही अनेक चौकांमध्ये हीच परिस्थिती असून, महापालिका सदस्यांनाही चुकीची माहिती देत असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला. त्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून होर्डिंगविषयी विचारलेल्या प्रश्नावर प्रशासनाला कोणताही समाधानकारक खुलासा करता आला नाही. कायदेशीर नियमांना बगल देत, केवळ पैशांच्या जोरावर होर्डिंगला परवानगी दिली जाते, असा थेट आरोप त्यांनी अधिकाऱ्यांवर केला. इमारतींच्या फ्रंट व साइड मार्जिनमध्ये कोणत्याही स्वरुपाचा फलक उभारण्यास कायदेशीर मान्यता नाही. तरीही त्याकडे कानाडोळा करत अनेक ठिकाणी अशा फलकांना मंजुरी दिल्याची टीका बागवे यांनी केली.

थकबाकी वसुली नाहीच परवाना व आकाशचिन्ह विभागाने २०१३-१४ या वर्षात जाहिरातदारांकडून १२५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करणे अपेक्षित होते; परंतु त्यापैकी जेमतेम २५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यातच महापालिकेला यश आले आहे. उर्वरित शंभर कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महापालिका सर्वसामान्य करदात्यांवर पाणीपट्टी वाढ लादत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बोलार्डच्या दरांची चौकशी करणार शहरात ठिकठिकाणी उभारण्यात येणाऱ्या बोलार्डच्या दरांमध्ये प्रचंड तफावत असून, त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप बागवे यांनी केला होता. बुधवारच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी बोलार्डचे दर बाजारभावाशी सुसंगत आहेत का, याची चौकशी केली जाईल, असे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम मोडणाऱ्यांना दाखवला ‘रस्ता’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील मध्य भागात अससेल्या प्रमुख सात रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या 'पेट्रोलिंग स्कॉड'ने वाहन चालकांना 'सरळ' केल्याने वाहतूक सुरळीत झाल्याचा अनुभव बुधवारी आला. गर्दीच्यावेळी रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीचा 'फ्लो' अडवणाऱ्यांना 'रस्ता' दाखवण्यात आल्याने वाहतूक सुरळीत सुरू राहिली. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना दिला गेलेला हा सुखद अनुभव कायमस्वरूपी मिळणार का? पोलिसांच्या अनुपस्थितीत वाहतूक कोंडीची परिस्थिती पुन्हा उद्‍भवणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाहतूक पोलिसांनी अभिनव प्रयोग राबवत बुधवारी गर्दीच्या वेळी शहरातील प्रमुख सात रस्त्यांवर वाहतूक नियमन आणि कारवाईचा धडाका लावला आहे. शिवाजी रोड, टिळक रोडवर वाहतूक पोलिसांनी केलेल्या वाहतूक नियमनामुळे बुधवारी वाहतूक कोंडी टळली. गर्दीच्या समजल्या जाणाऱ्या समाधान चौकातही तुलनेने शांतता होती. हीच स्थिती जेधे चौकात (स्वारगेट) पाहावयास मिळाली. टिळक रोडला जोडणाऱ्या छोट्या गल्ल्यांमधून येणारी वाहने तसेच रस्त्यांवर वाहने उभी करून कोंडी होणार नाही, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. बाजीराव रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, शिवाजी रोड, फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड आणि टिळक रोडवर 'पेट्रोलिंग स्कॉड' नेमण्यात आले होते. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या स्कॉडने वाहतूक सुरळीत केली. पोलिसांकडून रस्त्यांवर वाहने उभी करून रस्ता अडवणाऱ्यांना हाकलण्यात येत होते. पोलिस पायी पेट्रोलिंग करत असल्याने उलट्या दिशेने रस्ता ओलांडण्याच्या घटना कमी घडत होत्या. वाहतूक उपायुक्तांकडून हा प्रायोगिक उपक्रम सुरुवातीला पाच रस्त्यांवर राबवण्यात आला आहे. त्यानंतर बुधवारी टिळक आणि जंगली महाराज रोडवरही वाहतूक पोलिसांची फौज तैनात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गीकरणाचे संतप्त पडसाद

$
0
0

राष्ट्रवादीच्या नगरसेविकांचा सभात्याग; अश्विनी कदम यांचा ठिय्या म. टा. प्रतिनिधी, पुणे महापालिकेच्या इतिहासात केवळ तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी लाभल्याने अवघ्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळणाऱ्यांनीच त्यांची फसवणूक केली, असा आरोप करीत राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेविकांनी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांना पाठिंबा देत सभात्याग केला. कदम यांच्या प्रभागातील निधीचे वर्गीकरण केल्याचे संतप्त पडसाद बुधवारी पालिकेत उमटले. कदम यांनी सर्वसाधारण सभेत महापौरांसमोर ठिय्या मारून सभागृहनेत्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला, शिवाय पदाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभागृहातच कापूर पेटवला. महापालिकेचे या वर्षाचे बजेट तयार करताना माजी अध्यक्षा कदम यांनी स्वत:च्या प्रभागासाठी शंभर कोटींहून अधिक निधीची तरतूद केली होती. त्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबविण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कदम यांना अंधारात ठेवत राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या सभासदांनी एकत्र येत कदम यांच्या प्रभागातील ६३ कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे प्रस्ताव आयत्या वेळेस दाखल करून मान्य करण्यात आले. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या घटनेचे पडसाद उमटले. सभेला सुरुवात होताच, कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद, पदाधिकारी आणि विरोधकांनी माझी फसवणूक केली असून, वर्गीकरणाबाबत मला अंधारात ठेवल्याचा आरोप केला. सभागृहनेते शंकर केमसे यांनी जाणीवपूर्वक हे वर्गीकरण करून फसवणूक केल्याची आक्रमक भूमिका घेतली. कदम यांच्या भूमिकेला पाठिंबा देत माजी महापौर चंचला कोद्रे, वैशाली बनकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व महिला सभासदांनी महापौर प्रशांत जगताप यांच्या आसनासमोर ठिय्या मारला. महापौर, सभागृह नेते यांच्या धिक्काराच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. महिला सभासदांच्या निधीचे वर्गीकरण परस्पर करण्याचा उद्योग केला जात असेल, तर विकासकामे करायची कशी असा प्रश्न महिला सभासदांनी उपस्थित केला. 'कदम यांच्या प्रभागातील निधीचे वर्गीकरण करून हा निधी आम्हाला द्यावा, अशी कोणतीही मागणी आम्ही केली नव्हती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च हा विषय आणून मान्य करून घेतला आहे. मात्र, यामुळे आमचे नाव खराब झाले,' अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, मनसेचे राजेंद्र वागस्कर यांनी महापौरांचा निषेध केला.

कार्याध्यक्षांच्या घरासमोर आंदोलन पक्षाचे निरोप मिळत नसल्याची खोटी तक्रार अजित पवार यांच्याकडे केल्याच्या निषेधार्थ पक्षाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या घरासमोर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. या वेळी पाटील यांच्या धिक्काराच्या घोषणा देत त्यांचा निषेध करण्यात आला. कार्याध्यक्ष पक्षातील महिलांबद्दल अपशब्द काढत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्यासह पालिकेतील पक्षाच्या नगरसेविका, शहर पदाधिकारी यात सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेताळ टेकडीवरून तरुणाची खाणीत उडी

$
0
0

वेताळ टेकडीवरून तरुणाची खाणीत उडी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोथरूड परिसरातील वेताळ टेकडीवरून एका तरुणाने येथील ५० ते ६० फूट खोल खाणीत उडी मारल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.संतोष अशोक धानवडे (वय २५, रा. नीलज्योती) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा गतिमंद असून तो काहीही काम करत नाही. जनवाडी येथे त्याची बहीण असून तिच्याकडे तो राहण्यास आला आहे. बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वेताळ टेकडीवर आला. त्याने ५० ते ६०फूट खोल खाणीत उडी मारली. त्या वेळी या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांनी संतोषला पाहिले. त्यांनी तत्काळ पोलिसांना व अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमनक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागरिकांनी त्याला बाहेर काढले होते. अग्निशमन दलाने त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. संतोष गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने उडी का मारली, तसेच तो टेकडीवर कोणासोबत आला होता, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. त्याच्या नातेवाइकांना याची माहिती देण्यात आली असून ते आल्यानंतर अधिक माहिती मिळू शकेल, असे कोथरूड पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचशे स्कूलबसवर कारवाई

$
0
0

खासगी वाहनांतून सर्रास धोकादायक वाहतूक
Kuldeep.Jadhav@timesgroup.com
पुणे : स्कूलबस चालकांना आणि मालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची फिकीरच नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने बंधनकारक केलेल्या नियमावलीकडे चालकांनी पाठ फिरवली आहे. वर्षभरात एकूण ५०२ स्कूलबसवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसची आरटीओकडून तपासणी करून घेण्याच्या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत नसून, त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्य नसल्यासे दिसून आले. या बाबतचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर, शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीचे पालन काटेकोरपणे केले जाते का, याचा आढावा 'मटा'ने घेतला. मात्र, दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षीदेखील सर्रास नियमांचे उल्लंघन केल्याचे 'आरटीओ'च्या कारवाईतून स्पष्ट झाले.
'आरटीओ'ने गेल्या वर्षात एकूण सातशे स्कूलबसची तपासणी केली. त्यामध्ये १४४ स्कूलबस चालकांनी शालेय वाहतूक नियमावलीची पूर्तता केली नव्हती. स्कूलबस व्यतिरिक्त तपासलेल्या वाहनांमध्ये ३४४ खासगी वाहनांतून विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. स्कूलबसमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणेचा अभाव, अटेंडंट नसणे, वाहन योग्यता प्रमाणपत्राचा अभाव, चालकाकडे वाहन परवाना नसणे, विद्यार्थी वाहतुकीचा विशेष परवाना नसणे आदी बाबी उघडकीस आल्या. अनेक खासगी गाड्यांतून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते, स्कूल बसच्या कोणत्याच सुविधा दिल्या जात नसल्याचे दिसून आले, असे 'आरटीओ'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------
परिवहन समित्यांविषयीही उदासीनता
पुणे, पिंपरी चिंचवडमधील काही शाळांमध्ये अद्याप परिवहन समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सहा हजार ४१४ परिवहन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शाळांची संख्या सात हजार १६५ इतकी आहे. त्यामुळे उर्वरित शाळांकडून समित्यांच्या स्थापना कधी होणार, अशी विचारणा करण्यात येत आहे.
---------
पुणे
स्कूल बस २८५८
वेगनियंत्रक असणाऱ्या बस २८४०
शालेय परिवहन समित्या ३२४५
---
पिंपरी चिंचवड
स्कूल बस १५६४
वेगनियंत्रक असणाऱ्या बस १४४६
शालेय परिवहन समित्या २८५०
---
आरटीओने केलेली कारवाई
स्कूल बस १६२
अवैध विद्यार्थी वाहतूक ३४४
जप्त केलेल्या बस १४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैशालीच्या शिक्षणाला शहर भाजपचा हातभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सहा वर्षीय वैशाली यादवची 'मन की बात' ऐकून तिच्या आर्जवांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने दखल घेतल्यानंतर शहर भाजपानेदेखील तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिच्या कुटुंबीयांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली तसेच, तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्चही करण्याची तयारी दर्शवली.
हडपसर येथे राहणाऱ्या च्या वैशालीला जन्मजात हृदयरोग जडला आहे. त्यामुळे ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता. उपचारांचा खर्च परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर तिने नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कैफियत मांडली होती. त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयातील सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी तत्काळ जिल्हाधिकारी सौरव राव यांना पत्र पाठवून वैद्यकीय मदतीच्या सूचना दिल्या. त्यानंतर सूत्रे हलली. ऑपरेशन झाल्यानंतर मंगळवारी तिला रुबी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, माजी नगरसेवक उदय जोशी आदींनी तिच्या घरी भेट दिली.
'वैशाली यादवला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वैद्यकीय मदत मिळाली. या संदर्भात मटाने दिलेले वृत्त वाचून आम्ही वैशालीच्या घरी गेलो. तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी पक्ष घेणार आहे. इंजिनीअर होण्याचे तिचे स्वप्न आहे. तिचे वडील आणि काका बेरोजगार आहेत. शिक्षण कमी असल्याने कौशल्य विकसनातून त्यांच्या रोजगाराची हमी घेतली जाईल' अशी माहिती गोगावले यांनी दिली. यादव कुटुंबीयांना भाजपतर्फे पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठ्यस्तके वेळेवर मिळण्यात अडचणी

$
0
0

'बालभारती'कडून सापत्न वागणूक; विक्रेत्यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या अर्थात 'बालभारती'च्या पुणे डेपोमधून पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना वेळेत पुस्तके मिळत नसल्याची ओरड करण्यात येत आहे.
संस्थेमधील यंत्रणा अद्ययावत असली, तरी वेगवान कार्यशैली संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये विकसित न झाल्याने अशा अडचणी येत असल्याची नोंदही विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश विक्रेत्यांना 'बालभारती'च्या पुणे डेपोमधून पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. त्यासाठी यापूर्वी पारंपरिक पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदवली जात होती. मात्र, गेल्या वर्षीपासून 'बालभारती'मध्ये पाठ्यपुस्तकांच्या वितरणासाठी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत होणारे पाठ्यपुस्तकांचे वितरणही वेळेत होऊ लागले. या पार्श्वभूमीवर शहर आणि आजूबाजूच्या भागात खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना मात्र पुस्तके मिळण्यात यंदा अडचणी येत आहेत.

पुणे पुस्तक विक्रेते संघाचे सचिव हरीश काकडे म्हणाले, 'बालभारतीने पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा उभारली, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यामुळे आम्ही आमच्या नोंदविलेल्या मागणीसाठीचे पैसे भरून थेट पुस्तके उचलण्यासाठीच बालभारतीमध्ये जात आहोत. मात्र, लाखो रुपये भरल्यानंतरही आम्हाला वेळेत पुस्तके मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचण्यात विलंब होत आहे. कधी कम्प्युटर बंद तर कधी लिफ्ट बंद, तर कधी कर्मचारी नाहीत अशी कारणे देऊन आम्हाला परत पाठविले जाते. बालभारतीसारख्या संस्थेकडून आम्हाला अशी अपेक्षा नाही.' विक्रेत्यांबाबत अशी परिस्थिती असताना, सर्व शिक्षा अभियानाची पुस्तके मात्र वेळेत वितरीत होत आहेत. सरकारी यंत्रणेच्या भीतीमुळे अशी स्थिती असल्याने, या बाबतीत विक्रेत्यांना सापत्न वागणुकीचा अनुभव घ्यावा लागत असल्याचे निरीक्षणही काकडे यांनी नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासकीय घोटाळ्याच्या फेरचौकशीचे आदेश

$
0
0

विभागीय सहकार निबंधकांची नियुक्ती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकीय काळात झालेल्या गैरव्यवहारांची फेरचौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. चौकशीसाठी विभागीय सहकार निबंधक संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी बाजार समितीकडे गैरव्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रशासकांच्या कार्यकालात जमीन अभिहस्तांतरण, पार्किंग तसेच खुल्या जागेवर फूलबाजार उभारणीसाठी आर्किटेक्टला लाखो रुपयांचे शुल्क दिल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणाची यापूर्वी चौकशी करण्यात आली होती. मात्र, या चौकशी अहवालातील अनेक बाबींवर सरकारने आक्षेप घेतला होता.
बाजार समितीच्या आवारात फूलबाजार बांधण्याच्या प्रकरणामध्ये तत्कालीन प्रशासकांना अहवालात दोषी धरण्यात आले होते. फूलबाजार बाजार समितीच्या मागील जागेमध्ये बांधण्याचा प्रस्ताव होता. या जागेवर मोकळ्या जागेचे आरक्षण असताना या प्रस्तावासाठी आर्किटेक्टला सोळा लाख रुपये शुल्क देण्यात आले. त्यावरही अहवालात आक्षेप घेण्यात आला.
आडते असोसिएशनला बाजार समितीची मोकळी जागा पार्किंगसाठी देण्यात आली होती. त्यापोटी ठरलेल्या रकमेत पाच लाख रुपयांची सवलत देण्यात आली. पार्किंग तोट्यात असल्याने ही माफी ग्राह्य धरण्यात आली. परंतु, आडते संघटनेची नोंदणी १९९८मध्येच रद्द झाली. ही बाब चौकशीदरम्यान लपवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे फेरचौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बाजार समितीच्या आवारालगतची पाच एकर जमीन मार्केट यार्ड कामगार संघटनेला देण्यात आली. त्यासाठी राज्य सरकारची कोणतीही परवानगी घेतली गेली नाही. प्रशासकांनी स्वतःच्या अधिकारात हा निर्णय घेतल्याने याचीही फेरचौकशी केली जाणार आहे.
..
फेरचौकशीचा अहवाल लवकरच
दरम्यान, बाजार समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची फेरचौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार चौकशीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, बाजार समितीकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याचे सहनिबंधक संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यांच्या अनुषंगाने लवकरच फेरचौकशी करून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटस्फोट घेताना नाकारली पोटगी

$
0
0

पतीच्या संपत्तीवरील सोडला हक्क; दुर्मीळ घटनेची नोंद

Vandana.Ghodekar@timesgroup.com

पुणे : तिचा घटस्फोट झाला..मुलीला पित्याचे प्रेम मिळावे म्हणून तिने दुसरे लग्न केले..त्याच्याही पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला.. त्याला एक मुलगा..एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार करून दोघांनीही लग्नाचा निर्णय घेततला. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात दुरावा आला..तिच्या मुलीला नातेच मान्य नसल्यामुळे नाईलाजामुळे त्यांना घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला..घटस्फोट घेताना पतीकडून मिळणारी पोटगी मात्र​ तिने नाकारली आहे. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात नुकतीच ही केस दाखल करण्यात आली.

कायद्याने पतीकडून पोटगी घेण्याचा अधिकार महिलांना देण्यात आला आहे. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे असतील, पती सांभाळ करत नसेल किंवा कोर्टात घटस्फोटासाठी दावा दाखल करण्यात आला असेल तर संबंधित म​हिलेला पतीकडून पोटगी घेण्याचा कायद्याने अ​धिकार दिला आहे. मात्र, फॅमिली कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या केसमध्ये संबंधित महिलेने परस्परसंमतीने घटस्फोट घेताना पतीकडून पोटगी किंवा कोणताही खर्च नाकारला आहे. शिवाय पतीच्या संपत्तीवर कोणताही अधिकार सांगणार नाही​ अथवा कोणताही त्रास देणार नाही, असेही घटस्फोटाच्या अर्जात नमूद केले आहे. अर्जदार महिलेतर्फे अॅड. प्रितेश देशपांडे यांनी दावा दाखल केला आहे.

अरुणा (वय ४६) आणि प्रदीप (५१, दोघांची नावे बदलली आहेत) या दोघांनी २०११ मध्ये दुसरे लग्न केले. अरुणाचा पहिला घटस्फोट झाला असून, तिला एक मुलगी आहे. प्रदीपच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला असून, त्याला मुलगा आहे. अरुणा आणि अशोक लग्नानंतर एकत्र राहू लागले. त्यांचे एकमेकांबरोबर चांगले पटत होते. मात्र, तिच्या मुलीला त्यांचे हे नाते मान्य नव्हते. तिचा त्यांना विरोध होता. तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र​ तिने त्यांचे ऐकले नाही. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांना वेगळे राहावे लागले. मुलीवरच्या प्रेमापोटी तिने शेवटी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. चांगल्या पगाराची नोकरी असल्यामुळे तिने पतीला कोणताही त्रास न देता घटस्फोट घेण्याचे ठरविले. शेवटी त्यांनी कोर्टात परस्परसंमतीने घटस्फोट मिळावा यासाठी दावा दाखल केला. परस्परसंमतीने दावा दाखल करताना पती-पत्नी घटस्फोट घेताना मान्य झालेल्या अटींची माहिती कोर्टात देतात. घटस्फोट घेताना पोटगीची रक्कम नको अशी मागणी करणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे अॅड. देशपांडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून अखेर केरळमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा भरपूर पाऊस पडण्याच्या अंदाजानंतर सर्वांचीच नजर लागून राहिलेला मान्सून अखेर बुधवारी केरळमध्ये डेरेदाखल झाला. केरळसह तमिळनाडूचा बहुतांश भाग व कर्नाटकच्या काही भागातही मान्सून दाखल झाला. येत्या चार दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मान्सून बुधवारी केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. येत्या ४८ तासांत मान्सून अरबी समुद्राचा मध्य भाग, कर्नाटकाचा किनारी भाग, केरळ व तमिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

एखाद्या राज्यातील किमान ६० टक्के हवामान केंद्रांवर सलगच्या २४ तासांत अडीच मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास तेथे मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले जाते. मान्सून दर वर्षी साधारणतः एक जून रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होतो. यंदा मात्र दोन आठवड्यांपूर्वी निर्माण झालेल्या रोणू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात खंड पडला होता. ही शक्यता गृहीत धरून भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा मान्सून सात जून रोजी (दोन दिवस पुढे-मागे) केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज पूर्वीच वर्तवला होता. गेले काही दिवस केरळमध्ये चांगला पाऊसही होत होता. मात्र, मान्सून दाखल झाला, असे जाहीर करण्यासाठी आवश्यक घटकांपैकी काही घटकच अनुकूल असल्याने मान्सून दाखल होण्याची अधिकृत घोषणा काहीशी लांबली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताम्हिणीत पर्यटकांना पुन्हा प्रवेश शुल्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धबधब्यांची मजा लुटण्यासाठी ताम्हिणीमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी वन विभागातर्फे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. अभयारण्यातील पर्यटनाला चालना आणि गावकऱ्यांना रोजगार देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. धबधबे सुरू झाल्यानंतर या प्रवेश शुल्क आकारणीस सुरुवात होईल. दुचाकी वाहनांना दहा रुपये, तर चारचाकी वाहनांना वीस रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

जुलै ते ऑक्टोबरपर्यंत हजारो पर्यटक ता‌िम्हणीत धबधब्यांची मजा लुटण्यासाठी जातात. मात्र बहुतांश धबधबे वनक्षेत्रात असल्याने या उपद्रवी पर्यटकांचा फटका जंगलाला बसतो आहे. या काळात दर वर्षी जंगलात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा फेकला जातो. काही पर्यटक दारूच्या बाटल्याही जंगलात फेकतात.

बेशिस्त पर्यटकांला वैतागलेल्या गावकऱ्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत वन विभागाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या जुलै आणि ऑगस्टमध्ये पर्यटकांकडून समितीने एक लाख रुपये शुल्क गोळा केले. त्यानंतर पाऊसच आला नाही. त्यामुळे शुल्क थांबविण्यात आले होते. या वर्षी धबधबे सुरू झाल्यावर आम्ही प्रवेश शुल्क आकारणार आहोत, अशी माहिती अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एस. एम. खलाटे यांनी दिली.

प्रवेश शुल्काच्या रकमेतून समितीतर्फे गावातील तरुण कार्यकर्त्यांची सुरक्षारक्षकांची नेमणूक करणार आहोत. गाड्यांची तपासणी करणे, प्लास्टिक कचरा फेकणाऱ्या पर्यटकांवर कारवाई, वाहतूक नियोजन अशी सगळी कामे समितीमार्फत विभागण्यात येणार आहेत. पर्यटकांच्या सोयासाठी अभयारण्याच्या रोडवर एक मोठे स्वच्छतागृह उभारले असून अजून दोन ठिकाणी काम सुरू आहे. याशिवाय पर्यटकांना बसण्यासाठी पॅगोडाही तयार केला आहे. ताम्हिणी घाटात कोठेही पार्किंगची व्यवस्था नाही. समितीच्या माध्यमातून आम्ही घाटाच्या अलीकडे दोन किलोमीटर अंतरावर एक मोठे पार्किंग करणार आहोत. यामुळे रस्त्यावरील वर्दळ नियंत्रणात येईल, असे खलाटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून एक्स्प्रेस ४८ तासांत कोकण, गोव्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केरळसह कर्नाटकाच्या काही भागात काल दाखल झालेली मान्सून एक्स्प्रेस सुसाट वेगाने पुढील प्रवास करत आहे. बुधवारी केरळ मुक्कामी असलेला मान्सून गुरुवारी आणखी काही भागात डेरेदाखल झाला आहे. तर पुढील दोन दिवसात मान्सून गोव्यासह कोकणच्या दक्षिण भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे.

दरवर्षी सर्वसाधारणपणे मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पाच जूनला गोवा व कोकणच्या काही भागात दाखल होतो. त्यानंतर दहा जूनपर्यंत मान्सून राज्यभरात दाखल होतो. यंदा मान्सूनचे केरळमधील आगमन आठ जूनपर्यंत लांबले असले, तरी त्याचा पुढील प्रवास मात्र, वेगाने होत आहे. त्यामुळे लवकरच मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मान्सून बुधवारी ( ८ जून) केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर हवामान अनुकूल असल्याने गुरूवारीही मान्सूनची आगेकूच सुरू राहिली. गुरुवारी मान्सून केरळ व तामिळनाडूच्या उर्वरित भागात, कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांश भागात, कर्नाटकचा दक्षिण भाग, बंगालच्या उपसागराच्या मध्याकडील आणखी काही भाग, रायलसीमा व आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीकडील काही भागात दाखल झाला, असे आयएमडीतर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट करण्यात आले.

सध्याची परिस्थिती मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे मान्सूनची आगेकूच वेगाने होईल. येत्या ४८ तासात मान्सून कोकण व गोव्याचा दक्षिणेकडील भाग, कर्नाटकचा उत्तरेकडील अंतर्गत भाग, कर्नाटकचा किनारपट्टी व दक्षिणेकडील उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, आंध्रप्रदेश किनारपट्टीचा काही भाग व बंगालच्या उपसागराच्या मध्याकडील आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे, असे आयएमडीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांपासून कोकणच्या दक्षिण किनारपट्टीसह गोव्यात जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही नोंद झाली आहे. ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल मानली जात आहे. पुढील दोन दिवसात दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यात होणाऱ्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक राज्य बोर्डाने गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार, यंदा ९ जुलै ते १६ जुलैदरम्यान तोंडी परीक्षा, तर १८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्य बोर्डाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची व आयसीटीची परीक्षा लेखी परीक्षेच्या कालावधीमध्येच घेतली जाणार आहे. पूर्व व्यावसायिक परीक्षा, अंध व अपंगांसाठी कार्यानुभव, तंत्र व पूर्ण व्यावसायिक प्रात्यक्षिक परीक्षा ९ ते १६ जुलैदरम्यान होणार आहे. अंध- अपंग विद्यार्थ्यांसाठी शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १६ जुलै रोजी होतील, तर 'आउट ऑफ टर्न'च्या परीक्षा ५ ऑगस्टला घेण्यात येतील.

या विषयीचे सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही सुविधा फक्त माहितीसाठी असून, विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेपूर्वी शाळांकडे आलेल्या छापील वेळापत्रकातून परीक्षेची दिनांक आणि वेळेची माहिती करून घ्यावी. मंडळाने अधिकृतपणे छापलेल्या वेळापत्रकावरील माहिती ही अंतिम असेल. त्या व्यतिरिक्त अन्य यंत्रणेने छापलेल्या वेळापत्रकातील माहिती विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये, असे आवाहनही मंडळाने गुरुवारी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना देणार व्यसनमुक्तीचे ‘डोस’

$
0
0













Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता हा काळजीचा विषय ठरला असून, विद्यार्थ्यांच्या व्यसनाधीनतेवर पायबंद घालण्यासाठी संचालक भूपेंद्र कँथोला यांनी मोहीम उघडली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून व्यसनमुक्ती केंद्रांचे व्यसनमुक्तीचे 'डोस' येथील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एफटीआयआयमधील व्यसनाधीनता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला असताना कँथोला यांनी संस्थेचा परिसर अंमली पदार्थमुक्त करण्याचा चंग बांधला आहे. एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान व इतर सदस्यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप पुकारला होता. विद्यार्थ्यांच्या व्यसनाधीनतेवर नवीन सदस्यांनी टीका केल्याने सदस्य व विद्यार्थी यांच्यामधील वाद विकोपाला गेला होता. एफटीआयआय ही शैक्षणिक संस्था असूनही संस्थेच्या परिसरातच सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थ सहजतेने मिळतात. तसेच, संस्थेत अनेकजण धूम्रपान करताना दिसतात. त्याबरोबरच संस्थेत मागे असणाऱ्या झाडीत दारूच्या बाटल्याही सापडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला त्या दिवशी रात्री संस्थेत 'ओली पार्टी' होऊन 'राडा' झाल्याचीही तक्रार आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे संस्थेत 'ओली पार्टी' होते, यावर शिक्कामोर्तब झाले होते. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनतेला पायबंद घालण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत. 'एफटीआयआयमध्ये मुले-मुली एकत्र राहतात; तसेच अनेक भयानक प्रकार तेथे चालतात. तेथे सर्व प्रकारचे अमली पदार्थ मिळत असून, अफू आणि गांजाची शेती पिकवली जाते,' असे गंभीर आरोप एफटीआयआय सोसायटीच्या सदस्य अनघा घैसास यांच्यासह काहींनी केले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या वाढत्या व्यसनाधीनतेविषयी नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष सईद मिर्झा यांनी चिंता व्यक्त केली होती. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेची गंभीर दखल घेत तीन वर्षांपूर्वी नियामक मंडळाने समुपदेशनासाठी दोन मानसोपचारतज्ज्ञांची नेमणूक केली होती. एफटीआयआय ही एक शैक्षणिक संस्था असून कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या आवारात सिगारेट, दारू, अंमली पदार्थ यावर निर्बंध असतात. मात्र, एफटीआयआयचा विचार केला तर तीन वर्षांनंतरही यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. एफटीआयआयमध्ये अंमली पदार्थांचा वापर होतो, असे माझ्या कानावर आले आहे. काही तक्रारी आल्या आहेत. संस्थेमध्ये अशा पदार्थांवर बंदी आहे. व्यसनाधीनता वाढली असेल तर पायबंद घालवे लागतील, असे संचालक, एफटीआयआय भूपेंद्र कँथोला यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मुलगी वाचवा’साठी डॉक्टरांचा पुढाकार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, शिरूर
शिरूरमधील माऊली हॉस्पिटलचे डॉ. सतीश आंधळे आणि त्यांच्या पत्नी अर्चना आंधळे हे 'स्त्रीभ्रूणहत्या आणि 'मुलगी वाचवा' चा अभियानात आपले काहीतरी योगदान असावे, या जाणीवेतून अभिनव उपक्रम सुरू करणार आहेत. त्याचे उद्घाटन येत्या रविवारी, १२ जून रोजी करण्यात येणार आहे. मुलगी जन्माला आल्यास बाळतंपणाचा सर्व खर्च डॉ. आंधळे पती-पत्नी करणार असल्याचे डॉ. सतीश यांनी सांगितले. डिलिव्हरी नॉर्मल अथवा सीझर झाले तरी बील घेण्यात येणार नाही. तसेच, स्त्रीजन्माचे स्वागत हॉस्पिटलच्या वतीने करण्यात येईल. हा सर्व कार्यक्रम हॉस्पिटल स्वखर्चाने राबविणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. आंधळे म्हणाले, 'हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या मुलीचे वय एकवर्ष होईपर्यंत कोणतीही तपासणी फी आकारण्यात येणार नाही. मुलगी बाळाच्या जन्माच्या दवाखान्याचा खर्च माफ केल्यामुळे कुटुंबाला जो काही आर्थिक फायदा होणार आहे. त्याचा उपयोग मुलीचे शिक्षण व पोषणासाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माऊली हॉस्पिटलचा या अभियानाद्वारे समाजात स्त्री जन्माचे स्वागत व्हावे, मुलींना शिक्षण, आहार आणि पोषण यात समान अधिकार निर्माण व्हावा. स्त्रीभ्रूणहत्येचा नायनाट व्हावा, या साठीचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानचे उद्घाटन शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते रविवार, १२ जून रोजी सकाळी ११ वाजता शिरूर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारीच्या तयारीला वेग

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे विठ्ठल नामाचा गजर करत आळंदी, देहूतून पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वैष्णवांचा समुदाय दर वर्षीप्रमाणे यंदाही वारीच्या तयारीला लागला आहे. आळंदी आणि देहूत देखील वारी सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. यंदाची वारी ही स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक निर्मल व्हावी, तसेच वारी दरम्यान वारकऱ्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत या दृष्टीने आळंदी व देहू या दोन्ही संस्थानांच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत. या वर्षी २७ जून रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान होणार आहे; तर २८ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आळंदीतून होणार आहे. पालखी सोहळ्याला अवघ्या वीस दिवसांचा कालावधी राहिला असल्याने आळंदी आणि देहू या दोन्ही ठिकाणी संस्थान आणि प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतीच वारी संदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, नगरपालिका इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. त्यामध्ये वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आदी विषयांवर चर्चा होऊन वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठीच्या उपाययोजना त्वरीत करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता आणि पर्यावरण या विषयी विशेष काळजी घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय संस्थानाकडून देखील विविध पातळ्यांवर यंदाचा पालखी सोहळा यशस्वी करण्य़ासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. देहू गावामध्ये मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल झाल्यानंतर स्वच्छतेच्या दृष्टीने यंदा संस्थानच्या वतीने 'स्वच्छ सुंदर वारी' असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्याच्या सेवा सहयोग संस्थेला संस्थानच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. वारी दरम्यान होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी देखील संस्थान प्रयत्नशील राहणार आहे. वारकऱ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी प्रशासन आणि संस्थानाच्या वतीने वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. आळंदी संस्थानने देखील आळंदीतील स्वच्छतेसंदर्भात खबरदारी घेतली आहे. उप्लब्ध असलेल्या जागेमध्ये जास्तीत जास्त मोबाइल स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. प्रशासन आणि आळंदी नगरपालिका यांच्याकडून देखील स्वच्छतेसंदर्भात खबरदारी घेतली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आळंदीमध्ये ठिकठिकाणी सीसीटी‍‍व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. गर्दी होऊन चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पोलिसांच्या मदतीने वाहतूकीचे नियंत्रण करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यंदाची वारी निर्मल करण्याचा अधिक प्रयत्न संस्थानच्या वतीने केला जात आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासनाच्या मदतीने पूर्ण करण्य़ात येणार आहेत. देहूमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक दिंडीकरांना स्वच्छ वारी सुंदर वारी उपक्रमाअंतर्गत सहभागी करून घेणार आहोत. वारकऱ्यांनी पाण्याचा आणि प्लास्टिकचा अपव्यय टाळावा यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे, असे देहूतील संत तुकराम महाराज संस्थानचे अध्यक्ष शांताराम मोरे यांनी सांगितले. पर्यावरणाचा सतत होत चाललेला ऱ्हास आणि समाजातील वाढत चाललेली व्यसनाधीनता या विषयांवर वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे. यंदाच्या वारीमध्ये साहित्य परिषदेच्या दोन दिंड्या सहभागी होणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी 'झाडे लावा आणि जगवा' असे संदेश देत तसेच सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा अशा प्रकारे जागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्धापनाचे कार्यक्रम रद्द

$
0
0

'राष्ट्रवादी'तील लाथाळ्या, धूसफूस कारणीभूत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत वादामुळे वर्धापनदिनाचे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे. निवडणुकीची चाहूल लागलेली असतानाच हे वाद विकोपाला गेल्यामुळे अखेर पक्षाचे कारभारी अजित पवार यांना मध्ये पडावे लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज, (शुक्रवारी) १७ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अध्यक्षपदावरून निर्माण झालेली गटबाजी कायम असतानाच नाराज पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला पाठ फिरवली आणि त्यांनी बोलाविलेल्या बैठकीलाही दांडी मारली. याबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्याने गेल्या आठवड्यात त्यांनी सर्व नेत्यांची कानउघाडणी केली. दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीत माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांना अंधारात ठेवून त्यांच्या वॉर्डातील निधीचे परस्पर वर्गीकरण केले. त्याविरोधात सर्व महिलांनी मुख्य सभेत गोंधळ घालून महापौरांना घेराव घातला. तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या घरासमोरही चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करण्यात आली.
या सर्व प्रकारामुळे राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली असून काही पदाधिकाऱ्यांनी तर यापुढील काळात पक्षाच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरविण्याचे ठरविल्याची चर्चा आहे. या वादांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'नदी स्वच्छता अभियान' आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे एसएमएस गुरुवारी दुपारनंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले.
..
पक्षात सुरू झालेले वाद मी समजावून घेईन. आमच्या पक्षात महिलांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली जाते आणि यापुढेही सन्मानाचीच वागणूक दिली जाईल. पुण्यातील बैठकीत मला पाटील दिसले नाहीत. त्यामुळे त्यांना फोन करण्यास सांगितले. त्यावर पाटील यांनी बैठकीचा निरोप न मिळाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात गर्दी असल्यामुळे पाटील सभागृहाबाहेर बसले होते. चव्हाण यांना वाईट वाटल्याने त्यांनी पाटील यांच्या घरासमोर आंदोलन केले. निवडणुका आल्या आहेत; तरी चेष्टामस्करी करू नका.
अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री
.....
गेले दोन दिवस सुरू असलेल्या प्रकारांबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा सतत सुरू होती. त्यामुळे या कार्यक्रमांचे नियोजन करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे वर्धापनदिनाचे काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र, झेंडावंदनाचा कार्यक्रम पूर्वनियोजनानुसार होणार आहे.
वंदना चव्हाण, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या फ्लॅटच्या निर्मितीला चालना

$
0
0

झोनबदल करताना २५ टक्के राखीव क्षेत्राचे बंधन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका आणि प्रादेशिक विकास आराखड्यातील औद्योगिक झोनमधील जमीन रहिवासी झोनमध्ये रुपांतरीत करण्याच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. हा झोन बदलताना छोट्या आकाराच्या सदनिकांसाठी पंचवीस टक्के क्षेत्र राखीव ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या झोन बदलासाठी वीस टक्के अधिमूल्य आकारण्यात येणार आहे.
नोकरदार व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी छोट्या आकाराच्या सदनिकांची निर्मिती करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुषंगाने औद्योगिक झोनमधील जमीन रहिवास झोनमध्ये (आय टू आर) बदलताना छोट्या सदनिकांची निर्मितीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या आकाराच्या सदनिकांच्या निर्मितीला चालना मिळणार आहे.
शहर परिसर आणि ग्रामीण भागामध्ये उद्योगांची उभारणी होण्यासाठी महापालिका आणि प्रादेशिक विकास आराखड्यात (आरपी) औद्योगिक झोन दर्शविण्यात आले आहेत. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे उद्योग उभारणे अडचणीचे ठरत आहे. तसेच नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने या जमिनी पडून राहत होत्या. या जमिनीचा वापर व्हावा यासाठी औद्योगिक झोन बदलून निवासी झोन करण्यास मान्यता दिली जात होती. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.
हा झोन बदलण्यासाठी जमिनीच्या एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्के अॅमेनिटी स्पेस किंवा पाच टक्के क्षेत्रफळावर बांधकाम करून ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे बंधन होते. तसेच वीस टक्के जमिनीवर छोट्या आकाराच्या सदनिकांसाठी जागा राखीव ठेवल्यानंतर झोन बदल करण्यास मंजुरी दिली जात होती. या धोरणात आता बदल करण्यात आला आहे. नव्या बदललेल्या धोरणात, औद्योगिक झोन बदलण्यासाठी जमिनीच्या रेडी रेकनरमधील दराच्या वीस टक्के रक्कम अधिमूल्य म्हणून आकारली जाणार आहे. तसेच, वीस टक्क्यांऐवजी २५ टक्के राखीव जागेवर छोट्या आकाराच्या सदनिका बांधण्याचा बदल करण्यात आला आहे.
..
नागरिकांकडून मागवल्या हरकती
'आय टू आर'मध्ये यापूर्वी कोणत्याही व्यापारी स्वरूपाचे बांधकाम करण्यास परवानगी नव्हती. त्यात बदल करून जागेच्या २५ टक्के क्षेत्रफळावर व्यावसायिक बांधकाम करण्यास मुभा देण्यात आली आहे. अॅमेनिटी स्पेस किंवा पाच टक्के बांधकाम देण्याच्या अटीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 'आरपी'मधील औद्यागिक झोनचे निवासी झोनमध्ये रूपांतर करताना जागेच्या दहा टक्के प्रीमिअम शुल्क आकारण्यात येणार आहे. या बदलांसाठी नागरिकांकडून हरकती-सूचनाही मागविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजतेय नकारात्मकतेची ‘घंटा’

$
0
0

कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष, अनिश्चित वेळांचा म​हिला वाहकांवर ताण
Harsh.Dudhe@timesgroup.com
पुणे : कामाच्या अनिश्चित वेळा, येणारा प्रचंड ताण, त्यामुळे कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष, सातत्याने प्रियजनांपासून दूर राहण्याची ओढवणारी वेळ, वेळी-अवेळी खाण्यामुळे बिघडणारे आरोग्य आदी अनेक समस्यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) महिला वाहकांना (कंडक्टर्स) ग्रासले आहे. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये आणि खासगी जीवनामध्ये नकारात्मकता येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे एका संशोधनाद्वारे आढळले.
'एनबीएन सिंहगड स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज'च्या प्रा. रेश्मा काबुगडे यांनी 'अ स्टडी ऑफ द वर्क लाइफ बॅलन्स ऑफ लेडी बस कंडक्टर्स इन एमएसआरटीसी विथ स्पेशल रेफरन्स टु वेस्टर्न महाराष्ट्र' या विषयामध्ये संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. या संशोधनासाठी काबुगडे यांनी ३२३ महिला वाहकांशी दोन वर्षांत संवाद साधला. या संवादातून त्यांनी महिला वाहकांच्या समस्या जाणून घेतल्या.
महिला वाहकांना करावे लागणारे जादा काम, उशिरा संपणाऱ्या ड्युटीच्या वेळा, तसेच, कामाच्या नियोजनाअभावी वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये समस्या निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. या वादांचे प्रतिकूल परिणाम त्यांच्या कामांमध्ये दिसून येत आहेत. कामाच्या दोन शिफ्टमध्ये ९ तासांचा फरक अपेक्षित आहे. मात्र, तसे घडत नाही. महिला वाहक काम करून रात्री १० वाजता घरी पोचतात आणि सकाळी पुन्हा ६ वाजता कामावर येतात. त्यामुळे कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. पश्चिम महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास पुणे आणि सोलापूर आगार वगळता राज्यातील बस आगारांमध्ये महिला वाहकांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृहाची सुविधा नाही. तसेच बहुतांश बस आगारांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. हीच परिस्थिती राज्यातील इतर बस आगारांमध्ये असण्याची शक्यता आहे.
..
सुट्ट्या मिळण्यात अनंत अडचणी
एसटीच्या प्रशासनाने महिला वाहकांना वार्षिक ४० सुट्ट्या देऊ केल्या आहेत. मात्र, त्या मिळण्यात प्रचंड अडचणी येतात. महिला वाहकांना त्यांच्या बसस्थानकापासून लांब ठिकाणी जाणाऱ्या बसमध्ये जबाबदारी देण्यात येते. त्यामुळे त्यांचे काम जादा होऊन, आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये आणि जीवनामध्ये नकारात्मकता येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे संशोधनात आढळले आहे.
...........
सर्वाधिक वाहक पुणे विभागात
एसटीमध्ये कार्यरत असणाऱ्या एकूण महिला वाहकांची संख्या ४३५४ आहे. त्यापैकी सर्वाधिक महिला वाहक पुणे विभागात (२९५) आहेत. सर्वांत कमी महिला वाहक जालना विभागात असून त्यांची संख्या ५८ आहे. मात्र, त्यांच्यासाठी बस आगारांमध्ये पायाभूत सोयी नसल्याचे या संशोधनातून आढळून आले.
..............
संशोधनात सुचविलेले उपाय
- महिला वाहकांसाठी फॅमिली फ्रेंडली उपाययोजना करा.
- स्वतंत्र विश्रांतीगृहाची उभारणी करावी.
- कामाच्या शिफ्टमध्ये ९ तासांपेक्षा अधिक फरक असावा.
- कुटुंबासाठी फॅमिली अवेअरनेस तर वाहकांसाठी समुपदेशन कार्यशाळा घेणे.
- आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे.
-वाहकांचा छळ होणार नाही, यासाठी उपाययोजना करणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images