Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आप’ कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बालगंधर्व रंगमंदिराबाहेर रविवारी आंदोलन करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणे शहर भाजपतर्फे आयोजित महामेळाव्यानंतर हा प्रकार घडल्याने दुपारी एकच गोंधळ उडाला.

पुणे शहर काँग्रेसने या कार्यक्रमावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, सकाळपासूनच बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यानंतरही हा प्रकार घडल्याने उपस्थितांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

दुपारी एकच्या सुमाराला हा कार्यक्रम संपला. त्यावेळी बालगंधर्वच्या बाहेर जंगली महाराज रस्त्याच्या समोरच्या बाजूला आपचे कार्यकर्ते उभे राहिले होते. कार्यक्रम संपल्यानंतर शहा यांच्यासह भाजपचे सर्व उच्चपदस्थ नेते आणि पदाधिकारी बाहेर येण्याच्या सुमाराला आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी सभागृहाबाहेर आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यकर्त्यांकडे धाव घेतली. आपच्या कार्यकर्त्यांना चोहोबाजूंनी घेरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यानच्याच काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपच्या काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला.

हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, हा प्रकार थांबविला. आपच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची बाब लक्षात येताच, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात जंगली महाराज रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एक्स्प्रेस वे’वर मरण स्वस्त

$
0
0

बंडू येवले, लोणावळा

गेल्या काही दिवसांपासून 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर अपघातांच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रविवारी पहाटे पनवेलजवळ झालेला अपघात 'एक्स्प्रेस वे'वर आतापर्यंत झालेला दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी २७ मे २०१२ रोजी खालापूर टोलनाक्याजवळ धामणी गावच्या हद्दीत वऱ्हाडाच्या दोन मिनी बसला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १७ जण गंभीर जखमी झाले होते. येरवडा पुणे येथील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या एकनाथ बबन भवले यांच्या लग्नाचे वऱ्हाड घाटकोपर येथून लग्नानंतर येरवड्याला परत होते. या वेळी एक मिनी बस पंक्चर झाल्याने तिचे पंक्चर काढण्यासाठी मार्गाच्या सर्व्हिस लेन उभ्या असलेल्या मिनी बसला मुंबईहून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात भवले यांच्या २८ नातेवाइकांचा मृत्यू झाला होता, तर १७ जण गंभीर जखमी झाले होते.

तीन वर्षांत ३७० जणांचा मृत्यू

गेल्या तीन वर्षांत या रस्त्यावर १५८० अपघातात ३७० जणांचा मृत्यू झाला असून, १८१६ गंभीर जखमी झाले आहे. ८८ टक्के अपघात मानवी चुकांमुळे, तर १४ टक्के अपघात तांत्रिक कारणामुळे झाल्याचे सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. अतिवेग, फाजिल आत्मविश्वासाने ओव्हरटेक करणे, वाहन चालविताना झोप लागणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे आदी कारणांमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपुरे मनुष्यबळ

'एक्स्प्रेस वे'वर रायगड, ठाणे, पुणे या जिल्ह्यांत एकूण चार महामार्ग पोलिस ठाणी आहेत. यापैकी दोन पोलिस ठाणी 'एक्स्प्रेस वे'जवळ आहेत. या ठाण्यातील वाहने कालबाह्य झाल्याने महामार्ग पोलिसांना गस्त घालण्यासाठी तसेच अपघातस्थळी जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बहुतांश ठाण्यात अपुरे मनुष्यबळ हा चिंतेचा विषय असून, उपयुक्त कर्मचाऱ्यांवरच तिन्ही मार्गावरील सुरक्षेचे काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर ताण येतो.

चार पोलिस चौक्या

- महाराष्ट्रात महार्गावर ६३ महामार्ग पोलिस ठाणी असून, अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.
- प्रत्येक पोलिस ठाण्याचे एकच गस्त पथक महामार्गासह त्यांच्या अंकित असलेल्या मार्गावर गस्त घालत आहे.
- मुंबई पुणे 'एक्स्प्रेस वे'वेवर एकूण चार महामार्ग पोलिस चौक्या आहेत. यामध्ये बोरघाट (दस्तुरी), खंडाळा या दोन पोलिस चौक्या असून, पळस्पे व वडगाव या दोन्ही चौक्या 'एक्स्प्रेस वे'पासून, तीन ते आठ किलोमीटर लांब अंतरावर आहेत.

निवाऱ्याची सोय नाही

'एक्स्प्रेस वे'वर अवजड वाहनांच्या चालकांच्या निवाऱ्यासाठी अद्याप कोणतीही सोयी नसून, वाहनचालकांना प्रवासादरम्यान विश्रांती मिळावी यासाठी लोणावळयाजवळ कुसगाव टोल नाक्याजवळ एक प्रशस्त इमारत बांधली आहे. मात्र, वापराअभावी ती धूळखात पडलेली आहे. या ठिकाणी अनेक गैरप्रकार चालतात. या मार्गावर खालापूर, कुसगाव, उर्से हे तीन टोलनाके आहेत.

अपघातांची चौकीनिहाय आकडेवारी

पळसे पोलिस चौकी

- २०१२ मध्ये १७२ अपघात झाले असून, यामध्ये ६४ जणांचा मृत्यू झाला तर ७६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
- २०१३ मध्ये १३७ अपघात झाले असून, यामध्ये ३० जणांचा मृत्यू तर १३ गंभीर जखमी झाले आहे.
- २०१४ मध्ये १५६ अपघात झाले असून, यामध्ये ३० जणांचा मृत्यू तर ५५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
- जानेवारी ते एप्रिल २०१५ पर्यंत ५० अपघात झाले असून, यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातप्रवण क्षेत्र - भातन बोगदा (सरळ रस्ता व नंतर अचानक वळण) रेसवाडी व धामणीगाव (सरळ रस्ता व वळण)

बोरघाट (दस्तुरी) पोलिस चौकी

- २०१२ मध्ये १२१ अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून, ४५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
- २०१३ मध्ये १०४ अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला असून, ७९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
- २०१४ मध्ये ८३ अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून, १०९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
- जानेवारी ते एप्रिल २०१५ पर्यंत झालेल्या २० अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातप्रवण क्षेत्र : अमृतांजन पूल (नागमोडी वळणे व तीव्र उतार व चढ), अंडाकृती पूल (नागमोडी वळण व उतार), खोपोली एक्झिट (वळणे, उतार व चढ), फूडमॉल ढेकूगाव (तीव्र उतार, वळणे आणि चढ)

खंडाळा पोलिस चौकी

- २०१२ मध्ये ३८ अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून, १३६ जखमींमध्ये ३७ गंभीर जखमींचा समावेश आहे.
- २०१३ मध्ये १०८ अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून, ३२४ जखमींमध्ये १७६ गंभीर जखमींचा समावेश आहे.
- २०१४ मध्ये ६१ अपघातात २९ जणांचा मृत्यू झाला असून, १६६ जखमींमध्ये ८३ गंभीर जखमी झाले आहेत.
- जानेवारी ते एप्रिल २०१५ पर्यंत ७ अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून, ५९ जखमींमध्ये ९ गंभीर जखमींचा समावेश आहे.
अपघातप्रवण क्षेत्र : अमृतांजन पूल (तीव्र उतार, नागमोडी वळणे), खंडाळा एक्झिट (नागमोडी वळणे, तीव्र उतार), कुणे पूल (नागमोडी वळणे, तीव्र उतार), कुसगाव पूल (तीव्र वळण), देवले पूल (सरळ रस्ता, उतार)

वडगाव मावळ पोलिस चौकी

- २०१२ मध्ये २३९ अपघातात ५२ जणांचा मृत्यू झाला असून, १५१ जखमींमध्ये ४९ गंभीर जखमी झाले आहेत.
- २०१३ मध्ये १५२ अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून, ८१ जखमींमध्ये १६ गंभीर जखमी झाले आहे.
- २०१४ मध्ये ११० अपघातांत ३२ जणांचा मृत्यू झाला असून, ५५ जखमींमध्ये २२ गंभीर जखमी झाले आहे.
- जानेवारी ते एप्रिल २०१५ पर्यंत २२ अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून, ३१ जखमींमध्ये १९ गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातप्रवण क्षेत्र : कामशेत बोगदा (सरळ रस्ता व उतार), पवना पोलिस चौकी (सरळ रस्ता व उतार), सडवली, ओझर्डे व उर्से (सरळ रस्ता, मध्यम स्वरूपाची वळणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व पावसाची दमदार सलामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी केरळमधील परिस्थिती अनुकूल असल्याचे संकेत मिळत असतानाच मान्सूनपूर्व पावसाने राज्यात जोरदार सलामी दिली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत पुण्या-मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत पडलेल्या पावसामुळे नागरिक सुखावले, अनेक शिवारे 'जलयुक्त' झाली; मात्र त्या पावसाला वारा अन् वादळाचीही साथ असल्याने नुकसानही झाले.

शनिवारी मध्यरात्रीनंतर पुणे शहर आणि परिसरात साडेसोळा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा झाला. रविवारी रात्री पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुंबई आणि उपनगरांत रविवारी सायंकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली. कोकणातही रत्नागिरी आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला शनिवारी रात्री वादळी पावसाचा तडाखा बसला. वादळाने परिसरातील ३०हून अधिक घरांचे नुकसान झाले आणि मोठे वृक्ष, विजेचे खांब भुईसपाट झाले. परिसरातील केळीच्या बागाही भुईसपाट झाल्या आहेत. रविवारी सकाळपर्यंत सांगली जिल्ह्यात सरासरी २०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बीड जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंत सरासरी २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एका शेतकऱ्याचा आणि चार जनावरांचा मृत्यू झाला. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात रेल्वे रुळावर झाड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली.

उस्मानाबादमध्ये पावसामुळे पिकांचे आणि पॉलिहाउसचे नुकसान झाले. नगर जिल्ह्याच्या सात तालुक्यांमध्ये रविवारी पावसामुळे मोठे नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक संदर्भ महत्त्वाचे : शरद पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'इतिहासाच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो. मात्र, इतिहासातील सर्वच गोष्टी स्वीकारण्याजोग्या नसतात. भविष्यकाळातील परिणा्रमांचा आढावा घेऊन, त्यांचा गांभीर्याने विचार करूनच ऐतिहासिक संदर्भांचा स्वीकार केला पाहिजे,' असे स्पष्ट मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.

पुणे महापालिकेच्या वतीने शनिवारवाडा येथे उभारण्यात आलेल्या 'लाइट अँड साउंड शो' च्या नूतनीकरणाचे उद््घाटन तसेच 'कॉफीटेबल बुक' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, सभागृह नेते शंकर केमसे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, नगरसेवक दीपक मानकर, अभय छाजेड, सुभाष जगताप, विशाल तांबे, अप्पा रेणुसे, शिक्षणमंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे आदी या वेळी उपस्थित होते.

'पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत शहराने प्रत्येक टप्प्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. शहराचा इतिहास नवीन पिढीला समाजावा, यासाठी महापालिका करत असलेले वेगवेगळे प्रयोग कौतुकास्पद आहेत. इतिहासाचा अभिमान असला पाहिजे, हे योग्यच आहे. मात्र इतिहासामधील सर्वच गोष्टी स्वीकारण्यासारख्या नसतात. भविष्यकाळाचा विचार करुन त्यानंतर इतिहासातील गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे,' असेही पवार यांनी नमूद केले. बाजीराव-मस्तानी चित्रपटामुळे शनिवारवाड्याचा आणि बाजीरावांचा इतिहास जगभरात पोहचला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक राजधानी ‌असलेल्या आपल्या शहराचा नावलौकिक सर्वत्र पोहचावा, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून असे उपक्रम राबविले जात असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. खासदार चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले.

'साहेबां'नी दिली शाबासकी

महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांनी शहराच्या विविध भागात अनेक लोकहिताचे प्रकल्प राबविले जात आहेत. पाच वर्षांत केलेल्या कामाच्या पाऊलखुणा यातून दिसतात. याची नोंद पुणेकर नक्की घेतील, असा विश्वास वाटतो, अशा शब्दात पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांच्या कामाचे पवार यांनी कौतुक केले.

पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत शहराने प्रत्येक टप्प्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. शहराचा इतिहास नवीन पिढीला समाजावा, यासाठी महापालिका करत असलेले वेगवेगळे प्रयोग कौतुकास्पद आहेत.

- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निवडणूक पर्वा’साठी भाजपची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भ्रष्टाचाराचे सर्व आरोप मागे टाकून पुन्हा 'विकासपर्वा'चे संकेत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली असून, पुढील १५ दिवसांत २६ केंद्रीय मंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्याची सुरुवातही नुकतीच झाली असून, महापालिकेच्या निवडणुका होणाऱ्या शहरांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी पुण्यात केले.

अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर होते. जाहीर कार्यक्रमांसह विविध क्षेत्रांतील प्रमुखांशी त्यांनी या भेटीत संवाद साधला. मात्र माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले. केंद्रातील मोदी सरकारच्या दोन वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची फौज राज्याच्या विविध भागांमध्ये कार्यक्रम घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या 'विकास पर्वा'चे ऑडिट नागरिकांनी करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान, सूक्ष्म, लघू आणि मध्य उद्योगमंत्री गिरिराजसिंह यांनी नुकताच कोल्हापूरचा दौरा केला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मंत्री राज्याच्या विविध भागांमध्ये भेटी देणार आहेत.

भारत चीनच्या पुढे

'विकासदराच्या बाबतीत गेल्या दोन वर्षांमध्ये देशाने अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे,' असा दावा अमित शहा यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मजबूत हातामध्ये देश सोपविल्याने हे शक्य झाल्याचे ते म्हणाले.

पालिकांवर झेंड्यासाठी धडपड

आगामी वर्षात मुंबई-पुण्यासह ठाणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील १० प्रमुख शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. केंद्र-राज्यात सत्तांतर घडवल्यानंतर राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवरही भाजपचा झेंडा फडकवण्याची तयारी सध्या सुरू आहे. त्या दृष्टीने निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या शहरांमध्ये या केंद्रीय मंत्र्यांचा दौरा घेण्याचे नियोजन केले जात आहे.


काँग्रेसची निदर्शने

केंद्र आणि राज्यातील भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शहर काँग्रेसने रविवारी भाजपने शहा यांना काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. तसेच, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे वाढते दर, शेतकऱ्यांची कर्जमाफी यावरूनही सरकारच्या निषेधार्ह घोषणा देण्यात आल्या.

'आप' कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

या महामेळाव्यानंतर बालगंधर्व रंगमंदिराबाहेर आंदोलन करणाऱ्या 'आप'च्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याने दुपारी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, हा प्रकार थांबविला. 'आप'ने आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्याने आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सकाळपासूनच बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिंदुत्ववादाच्या प्रसाराची कारणे शोधणे आवश्यक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'धर्मनिरपेक्षता धोक्यात आली हे खरे असले तरी हिंदुत्ववादी का फोफावले याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. जे धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात त्यांनी मध्य आणि निम्न जातींचा जमातवाद पोसला. अल्पसंख्य धर्मगुरूंचे धार्जिण्य केले. हिंदुत्ववाद्यांमध्ये असे अनेक लोक आहेत की जे सनातनी, पुराणमतवादी, जमातवादी, मनुवादी आणि मुस्लिमद्वेष्टे नाहीत, पण ते पक्षपाती इहवाद विरुद्ध निष्पक्षपाती इहवाद असा लढा देत आहेत. अशा हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्व शब्दाचा त्याग करून स्वत:ला निष्पक्षपाती इहवादी म्हणवून घ्यावे,' असे मत प्रसिद्ध लेखक राजीव साने यांनी मांडले.

क्लॅरिटी फाउंडेशनतर्फे डॉ. अजय ब्रह्मनाळकर, निरंजन आगाशे आणि प्रा. संतोष शेवार यांनी साने यांची मुलाखत घेतली. मराठी भाषा, डावी चळवळ, अर्थकारण, जागतिकीकरण, हिंदुत्ववाद आणि धर्मनिरपेक्षता अशा विविध विषयांवरील प्रश्नांना साने यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.

'स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये आहेत. पण समता हे मूल्यच नाही. एकच कायदा सर्वांना म्हणजेच नियम सार्वत्रिकता हा समतेचा अर्थ आहे. कोणाकडेही तुच्छतेने पाहता कामा नये. श्रेणीव्यवस्था ही सत्ताधारित नसावी तर ती गुणवत्ताधारित असली पाहिजे. संधीचे समानीकरण करणे अशक्य आहे. खेळामध्ये हार-जीत ही असतेच. त्यामध्ये समता कोठून आणणार,' असा सवाल साने यांनी केला. 'स्वातंत्र्याचा बळी देऊन समता नको,' अशी भूमिका त्यांनी मांडली.

'उजवा याचा अर्थ हिंदुत्ववादी नव्हे, तर जो स्वातंत्र्य, स्पर्धा, गुणवत्ता मानतो आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन समता नको असे स्पष्ट पणे सांगतो तो उजवा असतो. हिंदुत्ववाद्यांना उजवा हा शब्द लावणे हे उजवा या शब्दाचे दुर्दैव आहे,' अशी टीका साने यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हान कर्जाच्या शिखराचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी २० मेच्या रात्री आम्ही ५० ते ६० जण निघालो. मात्र, चढताना माझा वेग कमी होत गेला. त्यामुळे माझ्या ग्रुपमधील सर्वजण मला ओव्हरटेक करून पुढे गेले. त्यामुळे मी शेवटी एकटाच २१ मे रोजी सकाळी ८ वाजून ८ मिनिटाने एव्हरेस्टवर पोचून भारताचा तिरंगा फडकावला अन् लहानपणापासून एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, आता एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी घेतलेले १८ लाख रुपयांचे कर्ज फेडण्याचे कसे, हाच प्रश्न भेडसावत आहे,' अशी माहिती एव्हरेस्ट शिखर सर करून पुण्यात परतलेला हर्षद राव सोमवारी सांगत होता.

सहकारनगर येथील रहिवासी असलेल्या हर्षदने संगणकशास्त्राची पदवी व गिर्यारोहणाचे तांत्रिक शिक्षण घेतले आहे. त्याने माउंट एव्हरेस्ट यशस्वी शिखर सर केल्याबद्दल सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हर्षद त्याच्या भावना सांगत होता. हर्षदचे वडील कमलाक्ष राव आणि आई हेमलता राव उपस्थित होते.

हर्षद म्हणाला, 'एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी १७ मे रोजी बेस कॅम्पपासून सुरुवात केली. त्यानंतर १९ हजार फूट उंचीवर असलेला सी वन पॉइंट, २१ हजार ३०० फूट उंचीवर असलेला सी टु पॉइंट, तर २४ हजार फूट उंचीवर असलेला सी थ्री पॉइंट आणि २६ हजार फूट उंचीवर असलेला सी फोर पॉइंट पार करीत हिलरी स्टेप्स हा अवघड टप्पा पार केला. या दरम्यान स्लिपींग बॅग ओली झाल्याने कॅमेरा आणि मोबाइल चालत नव्हता. तसेच सी थ्री पॉइंटहून सी फोर पॉइंटकडे जाताना बर्फावर स्नो पावडर साचलेली होती. त्यामुळे चालणे देखील कठीण झाले होते. मात्र, शेरपा शेरा गॅलजन यांच्या मदतीने तेथून मार्गक्रमण केले. मी आणि माझे सहकारी २० मेच्या रात्री निघालो. मात्र, माझ्याकडे असलेला ऑक्सिजन सिलिंडर लिक झाल्याने मला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नव्हता. त्यामुळे माझी दमछाक होत होती. त्यामुळे माझे सहकारी पुढे निघून गेले. त्यांनंतर काही वेळाने मी एव्हरेस्टवर पोचलो.'

हर्षद म्हणाला, 'एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी केलेल्या एकूण तयारीचा खर्च हा सुमारे २८ लाख रुपये आला आहे. वडील कॅनरा बँकेचे निवृत्त कर्मचारी असल्याने घरची आर्थिक स्थिती ही बेताची आहे. त्यामुळे वडीलांनी १८ लाख रुपयाचे कर्ज काढले होते, तर उर्वरीत खर्च हा कुटुंबीयांनी आणि सामाजिक संस्थांनी केला. त्यामुळे हे फेडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पुणे महापालिकेने ३ लाख रुपये देण्याचे मान्य केले असून ते मिळण्याची वाट पाहत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनएफएआय’मध्ये डॉल्बी

$
0
0

Chintamani.Patki
@timesgroup.com

पुणे : दुर्मिळ आणि क्लासिक चित्रपटांचे रसग्रहण करायचे असेल, तर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासारखे (एनएफएआय) दुसरे ठिकाण नाही. शंभर वर्षापूर्वीच्या चित्रपटांना लागणारी सर्वांत जुनी अशी मौल्यवान यंत्र सामुग्री या ठिकाणी कार्यान्वित आहे. त्यातच आता आजच्या डिजिटल चित्रपटांसाठी लागणारी जगातील सर्वांत आधुनिक यंत्रणा संग्रहालयात लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट संग्रहालयात पाहता येऊ शकेल तो ही डॉल्बीच्या सहाय्याने. त्यामुळे 'एनएफएआय'मध्ये चित्रपट पाहणे यापुढे मल्टिप्लेक्सचा अनुभव ठरणार आहे.

'एनएफएआय'च्या चित्रपटगृहात सध्या चित्रपट प्रदर्शनासाठी ३५ एमएम प्रोजेक्टर, तसेच 'डीएलपी प्रोजेक्टर' (डिजिटल लाइट प्रोसेसिंग) उपलब्ध आहेत. जुन्या काळच्या काही चित्रपटांसाठी प्रदर्शनासाठी लागणारे १६ एमएम आणि ८ एमएम क्षमतेचे प्रोजेक्टर देखील या ठिकाणी आहेत. त्यामाध्यमातून दुर्मिळ चित्रपटांचे प्रक्षेपण शक्य होते. मात्र नवीन चित्रपटाचे प्रक्षेपण करायचे असल्यास चित्रपटगृहाप्रमाणे ते करता येत नाही. त्यासाठी डीव्हीडीच्या माध्यमाचा आधार घ्यावा लागतो. यामाध्यमातून प्रक्षेपण केल्यास डिजिटल चित्राचा अनुभव येत नाही. डिजिटल चित्रपटांसाठी 'डिजिटल सिनेमा प्रोजेक्टर' (डीसीपी) ही यंत्रणा लागते. नवीन चित्रपटांच्या प्रक्षेपणाची, तसेच प्रदर्शनाआधीच्या विशेष खेळांची संख्या 'एनएफएआय'मध्ये वाढल्याने डीसीपी यंत्रणा लवकरच सुरू होणार आहे.

'संग्रहालयात तीन डीसीपी बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून येत्या दोन महिन्यांत काम पूर्ण होईल व त्यानंतर डिजिटल चित्रपटांचा अनुभव याठिकाणी घेता येईल. 'एनएफएआय'च्या कोथरूडमधील २०० प्रेक्षक क्षमतेच्या नवीन चित्रपटगृहातही असाच प्रोजेक्टर बसवला जाणार आहे,' अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी 'मटा'ला दिली.

'संग्रहालयाकडे चित्रपट प्रदर्शनाचे प्रत्येक माध्यम उपलब्ध असावे, या उद्देशाने डीसीपी प्रोजेक्टर घेण्यात येणार आहे. चित्रपटगृहात डॉल्बी ७.१ तंत्रज्ञान उपलब्ध झाले असले, तरी आवाजाच्या प्रक्षेपणासाठीची 'मोनो साउंड ट्रॅक' ही जुनी पद्धत देखील उपलब्ध आहे. काही जुन्या चित्रपटांसाठी हे जुने तंत्रज्ञानही लागते. या सर्व पद्धतींमुळे संग्रहालयात सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असणार आहे,' असे 'नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन'चे कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सैराट’च्या टीमचा पालिकेतर्फे सत्कार

$
0
0

'सैराट'च्या टीमचा पालिकेतर्फे सत्कार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा तुरा खोचणाऱ्या 'सैराट' चित्रपटाचे दिग्दर्शक; तसेच नवोदित कलाकार, गायक अशा संपूर्ण टीमचा सत्कार पुणे महापालिकेच्या वतीने केला जाणार आहे. या चित्रपटाच्या टीमचा मानपत्र देऊन गौरव करण्याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.
सैराट चित्रपटाने सर्वत्र वाहवा मिळवली आहे. मराठी चित्रपटाची ताकद काय असते, हे सैराटच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, नवोदित कलाकार आकाश ठोसर, अभिनेत्री रिंकु राजगुरू, गायक संगीतकार अजय अतुल यांच्यासह संपूर्ण टीमचा सत्कार पालिकेने मानपत्र देऊन करावा, असा प्रस्ताव नगरसेवक विशाल तांबे, अप्पा रेणुसे, उपमहापौर मुकारी अलगुडे, अविनाश बागवे यांनी दिला होता. त्याला मान्यता देण्यात आल्याचे महापौर जगताप यांनी सांगितले.
...........
हर्षा शहा यांचाही सत्कार
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांचा महापालिकेच्या वतीने खास सत्कार करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे शहा रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या या कामाबद्दल महापालिकेच्या वतीने त्यांचा खास सत्कार केला जाणार असल्याचे महापौर जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीआरटी’चे प्रवासी १० टक्क्यांनी वाढले

$
0
0

'बीआरटी'चे प्रवासी १० टक्क्यांनी वाढले

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगर रोड बीआरटी सुरू झाल्यापासून दररोज चर्चेत राहिली, ती या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे. या बीआरटीला एक महिना पूर्ण झाला असून, त्यावरील प्रवाशांची संख्या एका महिन्यात सुमारे १० टक्क्यांनी वाढली आहे.
'नगर रोडच्या या आठ किलोमीटर अंतराच्या मार्गावर पीएमपीच्या १३८ बस सेवेत आहेत. बीआरटी सुरू होण्यापूर्वी या मार्गावरील एका महिन्याची सरासरी प्रवासी संख्या ८५ हजार ते एक लाख इतकी होती, तर आता बीआरटी सुरू केल्यानंतरच्या संपूर्ण मे महिन्यात सरासरी प्रवासी संख्या सुमारे एक लाख पाच हजार ते एक लाख १० हजार इतकी आहे,' अशी माहिती 'बीआरटी'चे उपप्रमुख सुनील बुरसे यांनी दिली.
मे महिन्यात शाळांना सुट्या होत्या; तसेच या महिन्यात बाहेरगावी जाणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असते. आता जून महिन्यात शाळा सुरू होतील. पीएमपीने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावर बीआरटी सुरू केली, तेव्हादेखील पहिल्या महिन्यात १२ टक्क्यांनी प्रवासी वाढले होते. त्यामुळे जलद सार्वजनिक वाहतूक उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांची पसंती मिळतेच, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
'आधीच्या तुलनेत संचलनातील सातत्य, बसची वारंवारिता जास्त, प्रत्येक बस स्टॉपवर उभी राहणारी बस यामुळे प्रवाशांना पीएमपीच्या सेवेविषयी खात्री निर्माण झाली आहे. त्याची प्रवासी संख्या वाढण्यास मदत झाली,' असे बुरसे यांनी सांगितले.
--------
नगर रोड बीआरटी मार्ग - ८ किलोमीटर
मार्गावरील बस - १३८
मे महिन्यातील प्रवासी - एक लाख १० हजार
सरासरी प्रवासी संख्या - ८५ हजार ते एक लाख
--------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडागुणांनी बहरला कॉर्पोरेट कार्निव्हल

$
0
0

क्रीडागुणांनी बहरला कॉर्पोरेट कार्निव्हल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यग्र कार्यक्रमातून काहीसा विरंगुळा देणाऱ्या कॉर्पोरेट कार्निव्हलची नुकतीच सांगता झाली. फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धीबळ अशा विविध खेळांमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरणही करण्यात आले.
फुटबॉल स्पर्धेत बीएनवाय मेलन संघाने सुवर्ण, जॉन्सन कंट्रोल संघाने रौप्य व अमुरा मार्केटिंग टेक्नोलॉजीजच्या संघाने कांस्यपदक पटकावले. क्रिकेटमध्ये इडियाडाने सुवर्ण, बीएनवाय मेलनने रौप्य, तर केपीएमजीने कांस्यपदक पटकावले. बुद्धिबळात इन्फोसिसच्या अविनाश सिंग यांनी सुवर्ण, मिराल चेव्हाली यांनी रौप्य, तर बीएनवाय मेलनच्या सतीश जी यांनी कांस्यपदक पटकावले. कॅरममध्ये (पुरुष) थ्रीडीपीएलएमच्या कौस्तुभ पेंडभाजे यांनी सुवर्ण, टीजेएसबीच्या उमेश भगत यांनी रौप्य, तर फ्लुइड कंट्रोल्सच्या भूषण पाटील यांनी कांस्यपदक पटकावले. कॅरममध्ये महिला गटात टॅलेंटिका सॉफ्टवेअरच्या पलक आगरवाल यांनी सुवर्णपदक पटकावले.
बॅडमिंटन (पुरुष) थ्रीडीपीएलएमच्या शिवाशिष बेहरा यांनी सुवर्ण, सिंटेलच्या अक्रम यांनी रौप्य, तर आयबीएमच्या मंदार सावजी यांनी कांस्यपदक पटकावले. बॅडमिंटनमध्ये (महिला) इन्फोसिसच्या रश्मी यांनी सुवर्ण, सिंटेलच्या सोनिया यांनी रौप्य, तर टॅलेंटिकाच्या पलक आगरवाल यांनी कांस्यपदक पटकावले.
बॅडमिंटन पुरूष दुहेरीमध्ये कंडेन्स डिझाइन्सच्या मयूर व राजस यांनी सुवर्ण, थ्रीडीपीएलएमच्या शिवाशिष व सागर यांनी रौप्य, तर सिंटेलच्या अक्रम व संदेश यांनी कांस्यपदक पटकावले.
टेबल टेनिस पुरुष गटात बीएनवाय मेलनच्या अर्पित गुप्ता यांनी सुवर्ण, अमुरा मार्केटिंग टेक्नोलॉजीच्या देवांग गणात्रा यांनी रौप्य, तर क्रेडिट सूसच्या भूषण पुजारी यांनी कांस्यपदक पटकावले. टेबल टेनिस महिला गटात टॅलेंटिकाच्या पलक आगरवाल यांनी सुवर्ण, केपीएमजीच्या मानसी गुप्ता यांनी रौप्य, तर केपीएमजीच्या प्रियांका पाटील यांनी कांस्यपदक पटकावले. स्क्वाशमध्ये विकास यांनी सुवर्ण, सिनेक्रॉनच्या अनुराग भार्गव यांनी रौप्य तर प्रुडंटच्या समीर इफ्तेकरी यांनी कांस्यपदक पटकावले. धावण्याच्या शर्यतीत कोटमॅक इलेक्ट्रॉनिक्सच्या शाहबाझ सय्यद यांनी सुवर्ण, व्हेरिटासच्या प्रदीप रॉय यांनी रौप्य, तर क्रेडिट सूसच्या सर्वजित होस्कोटे यांनी कांस्यपदक पटकावले. गायन स्पर्धेत बीएमसीच्या तेजस्विनी नाईक यांनी सुवर्ण, क्रेस्ट प्रीमिडियाच्या रेणुका देशपांडे यांनी रौप्य, तर कोटमॅक इलेक्ट्रॉनिक्सच्या युवराज कोचले यांनी कांस्यपदक पटकावले. संयोजक भाग्येश रानडे व श्रीरंग कापर्डे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. पुढील वर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि परिसरात सलग दोन रात्र बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसात पुण्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात सोमवारी २९ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी कमी आहे. तर शहरात नोंदले गेलेले २०.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान सरासरीपेक्षा अडीच अंशांनी कमी आहे. राज्यातही अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. नाशिक येथे ३३.२, सोलापूर येथे ३०.६, उस्मानाबाद ३०.१, परभणी ३५ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले आहे.
सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत दुष्काळग्रस्त मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी शेतीच्या कामास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवस पुण्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर राज्यात कोकणचा उत्तर भाग, विदर्भात तुरळक तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
.......
रविवारी रात्रीही दमदार पाऊस
शनिवारी मध्यरात्रीनंतर जोरदार बरसलेल्या पावसाने रविवारी रात्री उशिराही शहराच्या अनेक भागात दमदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह झालेल्या या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात शहरात १४.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणदिनी ‘सिंहगड संजीवनी’

$
0
0

पर्यावरणदिनी 'सिंहगड संजीवनी'

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इतिहास, वृक्ष, पर्यावरण आणि स्वच्छता असा अनोखा उपक्रम जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिंहगडावर राबविण्यात आला. या निमित्त आयोजित 'सिंहगड संजीवनी २०१६' या गडजागराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गडाची माहिती जाणून घेण्यासाठी गडफेरीचे आयोजन करण्यात आले होते. गडावर विविध ठिकाणी चारशे चव्वेचाळीस वृक्षांचे रोपण करण्यात आले. सौरभ कर्डे यांनी 'शिवराय आणि पर्यावरण' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. गडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीसमोरील नक्षत्रवनात दीडशे झाडे लावण्यात आली. गडाच्या परिसरातील तळई उद्यानात वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, फणस अशी झाडे लावण्यात आली. प्रसाद मोरे यांनी गडाची माहिती दिली. शंभर तरुणांनी गडावर स्वच्छता मोहीम राबवली. विविध आपत्तींमध्ये वन्यजीवांचे प्राण वाचविल्याबद्दल वनपरिहार क्षेत्र अधिकारी कड यांचा सत्कार करण्यात आला. स्वरूपवर्धिनी, शिव प्रतिष्ठान, पिंपरी शिवजयंती समिती, वन विभाग आदी संस्थांचे प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी झाले. कर्डे यांच्यासह अनिरुद्ध बनसोड, भूषण राऊत, ओंकार पवार, मंदार ठोंबरे, अक्षय देशपांडे, पंकज राऊत, निशांत देडगे, संदेश पुरोहित आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईबाबत पालिकेची हातघाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेतर्फे सुरू असलेली नालेसफाईची कामे जेमतेम ५० टक्केच झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने आता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नालेसफाईची पाहणी करण्याचे फर्मान महापालिका आयुक्तांनी सोमवारी काढले आहे. त्यासाठी संबंधित १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेमतेम २४ तास देण्यात आले असून, आज मंगळवारी हा अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत. पावसाळापूर्व कामांची 'डेडलाइन' यापूर्वीच संपली असताना, आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेला नालेसफाईच्या पाहणीसाठी जाग आली आहे.

महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, पाणीपुरवठा विभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्यासह बांधकाम, पाणीपुरवठा, पथ, भवन अशा विभागांमधील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे. या सर्व अधिकाऱ्यांकडे एकेका क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या चार परिमंडळांचे उपायुक्त आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त यांच्याशी समन्वय साधून नालेसफाईची १०० टक्के पाहणी करण्याचे आदेश आयुक्त कुणालकुमार यांनी काढले आहेत. ही पाहणी करतानाच, नालेसफाईसाठीची पुरेशी यंत्रणा व यंत्रसामग्री कार्यान्वित आहे का, याचीही तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

येणाऱ्या पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता, क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्याचा आढावा घेण्याचे काम याच अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आले आहे. तसेच, मंगळवारपर्यंत त्यासंबंधीचा विस्तृत अहवाल आयुक्तांकडे सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

गेल्या महिन्याभरापासून अधिक काळ शहराच्या विविध भागांत नालेसफाईची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असले, तरी तोवर केवळ ५० टक्केच कामे झाल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीतच उघड झाली होती. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण केली जातील, असा दावा पालिका प्रशासनाने त्याच वेळी केला होता. तरीही अद्याप अनेक ठिकाणी कामे अपुरी असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. जूनची पहिली सर्वसाधारण सभा आज, मंगळवारी होणार असून, त्यात नालेसफाईच्या विषयावरून सदस्यांकडून प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आयुक्तांनी नालेसफाईचा अहवाल तातडीने सादर करण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवली असल्याची चर्चा आहे.
................
काम सांभाळून पाहणीचे आदेश

महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी काढलेल्या आदेशामध्येच स्वतःचा पदभार सांभाळून ही पाहणी करायची असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या बहुसंख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कामाचा ताण असून, आज, मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीलाही त्यातील अनेकांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे बऱ्याच अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळीच नालेसफाईची पाहणी केली असून, काही अधिकारी आज, मंगळवारी सकाळच्या टप्प्यात पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॉकेलचाही लाभ घेणाऱ्यांवर कारवाई

$
0
0

गॅसधारक असल्याची रेशनकार्डवर नोंद बंधनकारक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
घरगुती गॅस सिलिंडर असताना रेशनकार्डवर 'गॅसधारक' म्हणून नोंद न करणाऱ्यांवर आता कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे. अशा रेशनकार्डधारकांचा शोध घेऊन त्यांचा सिलिंडर पुरवठा थांबविण्याचा निर्णय शहर पुरवठा कार्यालयाने घेतला आहे. अनुदानित गॅस सिलिंडर असूनही रॉकेलचा दुहेरी लाभ घेणाऱ्यांना यामुळे मोठा दणका बसणार आहे.
शहरातील काही भाग रॉकेलमुक्त करण्याची योजना पुरवठा खात्याने हाती घेतली आहे. त्यासाठी माहितीचे संकलन केले जात असून, अनेक रेशनकार्डधारकांनी गॅस सिलिंडर असल्याची नोंद केली नसल्याचे आढळले आहे. तसेच, घरगुती सिलिंडरचा लाभ घेताना ही कुटुंबे रेशनवर रॉकेलही घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा गैरप्रकार शोधून काढण्यासाठी रेशनकार्डवर गॅसधारक अशी नोंद करण्याची मोहीम शहर पुरवठा कार्यालयाने हाती घेतली आहे. घरपोच सिलिंडर देणाऱ्या गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून रेशनकार्डवर 'गॅसधारक' अशी नोंद करण्यात येत आहे. शहरात पुढील तीन महिने ही मोहीम राहणार असल्याचे पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी सांगितले. शहरातील गॅस एजन्सीचालकांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत गॅसधारकांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला. त्यात गॅस कंपन्या आणि राज्य सरकारकडे असलेली गॅस सिलिंडरधारकांची नोंद यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले. घरगुती सिलिंडर असणाऱ्या व्यक्तींची खरी संख्या स्पष्ट व्हावी तसेच सिलेंडर असूनही रॉकेल घेणाऱ्या कार्डधारकांची माहिती मिळावी, यासाठी तातडीने मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत रेशनकार्डवर गॅसधारक असल्याची नोंद करण्याच्या सूचना सर्व गॅस एजन्सीचालकांना देण्यात आल्या आहेत. शहरात १३० गॅस एजन्सीचालक आहेत. या महिन्यात गॅस सिलिंडरधारकाने रेशनकार्ड दिले नाही तर, पुढील महिन्यापर्यंत त्यावर नोंद करून घ्यावी. मात्र, या दोन महिन्यात गॅसधारक अशी नोंद न झाल्यास संबंधितांना आणखी एक संधी देण्यात येईल. त्यानंतर मात्र संबंधितांचा सिलिंडर पुरवठा थांबविण्यात येणार असल्याचे धायगुडे यांनी सांगितले.
..
हमीपत्र दिल्यास अखंड गॅसपुरवठा
घरगुती सिलिंडर असलेल्या ग्राहकाकडे रेशनकार्ड नसले तर, त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. हे हमीपत्र दिल्यावर गॅस पुरवठ्यात कोणताही अडथळा येणार नाही. मात्र रेशनकार्ड नसलेल्यांनी गॅस एजन्सीकडे संपर्क साधावा, असे आवाहन पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक्स्प्रेस-वेवर अपघातमालिका

$
0
0

तीन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू; सहा जण जखमी
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. हे अपघात रविवारी रात्री उशिरा पावणे अकरा ते सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान झाले आहेत.
करण अजय कदम (वय २५, रा. पुणे) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर देवळे गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या करणला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री देवळे गावाच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ४७ जवळ झाला.
एक्स्प्रेस-वेवरील अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिटजवळ पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या कंटेनरचालकाचे उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर विरूध्द दिशेने तिन्ही लेनवर आडवा झाला. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दीड तास ठप्प झाली. अखेर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला केल्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली. जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावर लोणावळ्याहून पुण्याला जाणाऱ्या ट्रकचालकाने पुढे जात असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. अपघातानंतर ट्रक मार्गावरील उड्डाणपुलाच्या खांबावर जोरात आदळून अडकला. या अपघातात दोघे मोटारसायकलस्वार जखमी झाले आहे. हा अपघात लोणावळ्यातील वलवण गावच्या हद्दीतील एनएच-४ फूड फ्लाझा समोर सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला आहे. जखमींची नावे अद्याप समजली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित पवारांकडून कार्यकर्त्यांची कानउघाडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पक्षाने कोणती‌ही बैठक बोलाविली की त्यासाठी हजर राहा, कोणत्याही पत्राची तसेच बैठकीच्या दिवशी फोन येण्याची वाट न पाहता पक्षाच्या मीटिंगला उपस्थित राहा, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी दिल्या. पक्षाने घेतलेला निर्णय हा अंतिम असतो, त्यामुळे पक्ष एकसंध ठेवण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, निवडणुकीला सामोरे जाताना एकमेकांमधील हेवेदावे बाजूला ठेवून काम करा, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करायची असेल, तर शहर नेतृत्वात बदल करण्यात यावे, अशी भूमिका घेऊन पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांना या पदावरून हटवावे, अशी मागणी केली होती. मात्र पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनी खासदार चव्हाण याच शहराध्यक्षपदी कायम राहतील, असे जाहीर केल्याने पक्षातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. शहराध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार चव्हाण यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच चव्हाण यांनी बोलाविलेल्या बैठकांनाही नगरसेवक, पदाधिकारी दांडी मारत असल्याचे समोर आले आहे. पक्षामध्ये असलेला अंतर्गत वाद असाच कायम राहिल्यास पालिका निवडणुकीत त्याची मोठी ‌किंमत पक्षाला मोजावी लागणार आहे. याची दखल घेऊन अजित पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेऊन त्यांना कानपिचक्या दिल्या. घोले रोडवरील राजा रवी वर्मा‍ आर्ट गॅलरीच्या बाजूला असलेल्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, सभागृह नेते शंकर केमसे, आमदार अनिल भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्यासह अनेक प्रमुख नगरसेवक या वेळी उपस्थित होते. पक्षाच्या वतीने घेतला जाणारा निर्णय हा अंतिम असतो, त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तो निर्णय स्वीकारला पाहिजे. पालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्यासाठी एकमेकांमधील हेवेदावे बाजूला ठेवून पक्ष एकसंध ठेवण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले. पक्षाने बोलाविलेल्या बैठकीला पत्र किंवा फोन आल्यानंतरच उपस्थित राहिल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. पक्षवाढीसाठी कोणत्याही फोन तसेच निरोपाची वाट न पाहत पदाधिकाऱ्यांनी यापुढील काळात उपस्थित राहावे, अशी तंबी पवार यांनी दिली.

'जाहिरातबाजीला घाबरू नका' लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले असून सोशल मीडिया आणि जाहिरातबाजी करीत नागरिकांची दिशाभूल करण्याचा उद्योग सत्ताधारी पक्षाने सुरू केला आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. मात्र जाहिरातबाजीला न घाबरता आजपर्यंत शहराच्या विकासासाठी केलेल्या कामाची माहिती अधिक सक्षमपणे पुणेकरांसमोर मांडा. विकासाची दृष्टी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे नागरिकांच्या मनावर बिंबवा, असेही पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहने टोलमाफीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू

$
0
0

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींचा निधी वाढवू; पालकमंत्री बापट
म. टा. प्रतिनिधी, पुणे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांसमवेत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी सांगितले. पालखी मार्गावरील ग्रामपंचायती, नगर परिषदांच्या निधीत वाढ करण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बापट यांनी विधान भवनात बैठक घेतली. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, खासदार अमर साबळे, आमदार बाबूराव पाचर्णे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, दत्तात्रय भरणे, राहुल कुल तसेच विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरव राव आदी उपस्थित होते.
पालखी सोहळ्याच्या काळात पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत केली. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी केली जात आहे. त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बापट म्हणाले. या वेळी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. पालखी मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणी एकेरी वाहतूक करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पालखी मार्गावरील हॉटेल, व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी केली जाणार आहे. पालखीतळाच्या जागेवर वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राव यांनी बैठकीत सांगितले.
..
दिंड्यांना इंधनाचा पुरवठा
पालखीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना रॉकेल आणि सिलिंडरचा पुरवठा केला जाणार आहे. अनुदानित सिलिंडरसाठी दिंडी प्रमुखांनी अर्ज भरून द्यावा. त्यानंतर हा अर्ज गॅस कंपन्यांना देऊन अनुदान तत्वावरील सिलिंडरचा पुरवठा करता येईल, असेही जिल्हाधिकारी राव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग कॉलेज एका क्लिकवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजांची खात्रीशीर माहिती मिळावी, यासाठी पुण्यातील विद्यार्थी आणि काही प्राध्यापकांनी एकत्र येऊन एक वेबपोर्टल सुरू केले आहे. www.globalsuperlite.com/education या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांसाठी इंजिनीअरिंग कॉलेजांचे माजी विद्यार्थी आणि ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्सचे मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आयआयटी-खडकपूरचा माजी विद्यार्थी रोहित शहा आणि कमिन्स इंजिनीअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी शिविका अग्रवाल यांनी हे पोर्टल तयार केले आहे. पुण्यातील ख्यातनाम इंजिनीअरिंग कॉलेजांमधील ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स आणि या कॉलेजांचे माजी विद्यार्थीही या दोघांनी या वेबपोर्टलवर जोडले आहेत. या वेबपोर्टलद्वारे इंजिनीअरिंग प्रवेशांची माहिती घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्न विचारण्याची किंवा टेलिफोन कॉलद्वारे माहिती विचारण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून कॉलेजांची अधिकृत आणि अद्ययावत माहिती आकडेवारीसह विद्यार्थ्यांना दिली जात आहे. त्यामुळे 'एआयसीटीई'ची मान्यता असलेली आणि मान्यता नसलेली इंजिनीअरिंग कॉलेजेस, इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्लेसमेंटची स्थिती आदी बाबींचा अंदाज घेणे सुरुवातीच्या टप्प्यातच शक्य होत असल्याचे रोहितने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन तोडफोड; आठ अल्पवयीन ताब्यात

$
0
0


मुख्य आरोपी पसार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वारजे परिसरातील विठ्ठलनगर व म्हाडा कॉलनी परिसरात दोन गटांत झालेल्या वादावादीत वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी एका गटाच्या प्रमुखाला अटक केली आहे. तर, आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मात्र, तडीपार गुंड आणि मुख्य आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सूरज चंद्रकांत पिंपरे (वय १९, रा. चैतन्य चौक, वारजे माळवाडी), अविनाश मोरे (वय २२, रा. वारजे) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. तसेच इतर सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी व तडीपार गुंड रोहित वसंत पासलकर (वय २१, रा. म्हाडा वसाहत, वारजे) हा व त्याचे साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज पिंपरे व रोहित पासलकर यांच्या स्थानिक टोळ्या आहेत. त्यांच्यात सतत वाद होत राहतात. शनिवारी संध्याकाळी त्यांच्यात वाद झाल्यानंतर सूरज याच्या टोळीने शनिवारी रात्री आठच्या सुमारास म्हाडा वसाहत परिसरात दगडफेक केली. तसेच काही वाहनांचे नुकसान केले. ही माहिती पासलकरला मिळताच त्याने गोविंदनगर परिसरात जाऊन वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल केले आहेत. सूरज पिंपरे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच पासलकर हासुद्धा सराईत असून त्याच्या विरुद्ध दहा गुन्हे आहेत. सध्या तो तडीपार आहे. मात्र, तरीही त्याने वारजे परिसरात येऊन वाहनांची तोडफोड केली.

सूरज पिंपरे व रोहित पासलकर यांची लहानपणापासून भांडणे आहेत. ही भांडणे वाढत गेली असून त्यांची सध्या टोळी निर्माण झाली आहे. त्यांच्या या भांडणात सामान्य नागरिकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. दोन्हीकडून दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड, परिसरात गोंधळ आणि घरांवर दगडफेक यासारखे प्रकार केले जातात. यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या जास्त आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images