Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘डीएसकें’च्या कारला खंडाळ्यात अपघात

$
0
0

भरधाव कंटेनर कारवर आदळला; चालकाचा जागीच मृत्यू
म. टा. प्रतिनिधी लोणावळा
भरधाव वेगातील कंटेनर लँडक्रुझरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके गंभीर जखमी झाले. अपघातात त्यांच्या कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खंडाळा एक्झिटजवळ बुधवारी (२५ मे) रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात घडला.
नीरज रामकांत सिंग (४०, रा. गणेशनगर, बोपखेल) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. कुलकर्णी (६६, पुणे) यांचे सहकारी किरण पांडुरंग काटे (वय ३२, रा. वारजे, पुणे) सुखरूप बचावले आहेत. अपघातानंतर कुलकर्णी यांना उपचारासाठी 'आयआरबी' आणि 'देवदूत' या आपत्कालीन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे रात्रभर अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
खंडाळा पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा खंडाळा परिसरात पावसाचा शिडकावा झाला होता. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाताना एक्सप्रेस वेवरील खंडाळा एक्झिट येथील तीव्र उतार आणि वळणावरील मार्गावर एक कंटेनर आडवा झाला होता. दरम्यान मागून आरआर रोडवेजचा कंटेनर (एमएच ४६ एआर०४६४) पहिल्या लेनने येत होता. कंटेनर चालकाने पुढे आडवा झालेला कंटेनर पाहून ब्रेक लावून आपत्कालीन पर्यायी मार्गाकडे कंटेनर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उतारामुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दोन्ही मार्गांमधील रस्ता दुभाजक ओलांडून विरूध्द दिशेला असणाऱ्या मुंबई-पुणे लेनवर जाऊन थेट कुलकर्णी यांच्या लँडक्रुझरवर (एमएच १२ जेएन १००१) जोरात आदळला.
या भीषण धडकेत कुलकर्णी यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. कुलकर्णी यांच्या डाव्या बाजूच्या पाठीच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, कंटेनर मागून येणारी टॅक्सी, लक्झरी बस आणि टेम्पोही एकमेकांवर आदळले. या पाच वाहनांच्या विचित्र अपघातात सुदैवाने अन्य कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर आरआर रोडवेजचा कंटेनरचालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. कुलकर्णी काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. काम आटोपून पुण्याकडे येत असताना हा अपघात झाला. कारमध्ये तिघेजण होते. कुलकर्णी मागील सीटवर बसले होते. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे पोलिस कर्मचारी अल्ताफ पठाण, फिरोज सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. 'आयआआरबी' आणि 'देवदूत' या आपत्कालीन यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी कुलकर्णी यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्ववत झाली. अपघातानंतर कंटेनरसह फरारी झालेल्या कंटेनर चालकाला पोसलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपास लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे फौजदार बालाजी गायकवाड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांच्या चौकशीला ‘सहकार’कडून सुरुवात

$
0
0

वकिलांमार्फत लावली उपस्थिती; दोन जूनला पुढील सुनावणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
बरखास्त केलेल्या सहकारी बँकांमधील संचालकांना अन्य सहकारी बँकेच्या संचालकपदी काम करण्यास दहा वर्षे प्रतिबंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे नुकताच घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर माजी उपमुखमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार दिलीप माने यांची गुरुवारी सहकार विभागाकडून सुनावणी घेण्यात आली.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या सद्यस्थितीची​ माहिती चौघांनी राज्याच्या सहकार सचिवांकडे माहितीच्या अधिकारात मागितली आहे. ही माहिती न मिळाल्याने पुढील सुनावणी दोन जून रोजी होणार आहे. सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक संतोष पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. चौघांच्यावतीने त्यांचे वकील हजर होते. पवार यांच्यावतीने अॅड. एस. बी. खुर्जेकर, मोहिते-पाटील आणि सोपल यांच्यावतीने अॅड. योगीराज शिरगावकर, तर माने यांच्यातर्फे अॅड. विजय मराठे उपस्थित होते. सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या सद्यस्थितीची​ माहिती चौघांनी राज्याच्या सहकार सचिवांकडे माहितीच्या अधिकारात मागितली होती. मात्र, ती न मिळाल्याची बाब वकिलांनी निदर्शनास आणून दिली. वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर पाटील यांनी दोन जून रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
पवार यांनी सहकार सचिव, राज्य सहकार बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे. मात्र, कोणत्याही​ विभागाकडून अद्याप माहिती मिळाली नसल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. मोहिते पाटील आणि सोपल यांनी सहकार सचिव, राज्य सहकारी बँक आणि सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेकडे, तर माने यांनी सहकार सचिव आणि सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज केला आहे. मात्र, अद्याप माहिती मिळाली नसल्याचे त्यांच्या वकिलांनी नमूद केले.
दरम्यान, बरखास्त केलेल्या सहकारी बँकांमधील संचालकांना पुन्हा कोणत्याही सहकारी बँकेचे संचालक म्हणून निवडीला दहा वर्षे प्रतिबंध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) निर्देशानुसार राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार संबंधित संचालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या अध्यादेशाची मुदत संपण्यापूर्वी राज्य सरकारने पुन्हा अध्यादेश काढला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी काही संचालकांनी कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. कोर्टाने याबाबत सुनावणी घेण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी सुनावणी झाली.
..
चौघांची पदे धोक्यात

पवार, मोहिते-पाटील आणि सोपल हे राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना बँक बरखास्त झाली होती. माने ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेचे संचालक असताना ही बँक बरखास्त झाली. पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत, तर मोहिते-पाटील, सोपल आणि माने हे सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांना सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे चौघांच्या संचालक पदांवर टांगती तलवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो नदीपात्रातून नेण्याला विरोध

$
0
0

'एनजीटी'कडे याचिका दाखल; सात जुलैला सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या नदीपात्रातील रचनेमुळे पर्यावरणाला बाधा पोहोचण्याची आणि नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करून, राज्यसभेतील खासदार अनू आगा, ज्येष्ठ संपादक दिलीप पाडगावकर, उद्योजिका आरती किर्लोस्कर आणि सारंग यादवाडकर यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाद मागितली आहे. अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली असून, सात जुलैला याचिकेवर सुनावणी होणार आहे.


'आमचा मेट्रोला विरोध नाही. वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गातील नदीपात्राच्या दरम्यान 'ब्लू लाइन'मधून जाणाऱ्या मार्गाला विरोध आहे. 'एनजीटी'ने यापूर्वी दिलेले निर्देश डावलून हा मार्ग आखण्यात आला आहे. नदीपात्रातून जाणाऱ्या मेट्रोचा मार्ग साधारण साडेतीन किलोमीटर आहे. त्याला आमचा विरोध आहे,' असे आगा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नदीपात्राच्या 'ब्लू लाइन'मध्ये कोणतेही बांधकाम करू नये असे स्पष्ट निर्देश असताना त्याचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा यादवाडकर यांनी केला. नदीचा प्रवाह मोकळाच असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

'जगभरात कोठेही नदीपात्रात मेट्रो प्रकल्पासाठी बांधकाम केलेले नाही. पुण्यात मात्र थेट नदीपात्रातूनच मेट्रो नेण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता व पर्यावरण धोक्यात येत आहे,' अशी टीका पाडगावकर यांनी केली.

'मेट्रोच्या जुन्या आराखड्यात या मार्गिकेचा समावेश नव्हता. राजकीय फायद्यासाठी नदीपात्रातून मेट्रो नेऊन तेथे स्टेशन बांधण्यात येणार आहेत. यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होणार असून, मेट्रो प्रकल्पामुळे पुण्यातील नागरिकांना व पर्यावरणाला धोका नाही, असे महापालिकेला सिद्ध करावे लागेल. अन्यथा मेट्रो प्रकल्पात मोठे बदल करावे लागतील,' असा दावा अॅड. सरोदे यांनी केला.


याचिकाकर्त्यांची भीती

नदीपात्रात कॉँक्रिटच्या खांबावर स्टेशन व मार्गिका उभारली तरी त्यामुळे मुख्य प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण होईल. धरणांची सर्वोच्च विसर्गक्षमता १,२८,८९९ क्युसेक आहे. पाण्यासाठी नदीपात्र हा एकच विसर्ग मार्ग असून, त्यात अडथळा निर्माण केल्यास ते पूरसंकटाला आमंत्रण ठरण्याची भीती अनू आगा यांच्यासह इतरांनी व्यक्त केली. चेन्नई, काश्मीर व उत्तराखंडपेक्षा गंभीर पूर परिस्थितीला पुणेकरांना तोंड द्यावे लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांचे आज सकाळी ६ वाजता पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

प्राध्यापक जाधव यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रा. जाधव यांनी समीक्षा, कविता लेखन, ललित लेखन असं विपुल लेखन केलं. औरंगाबाद येथे २००४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. रा. ग. जाधव यांना २०१५ सालचा महाराष्ट्र सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

रा. ग. जाधव यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एस.टी.) १० वर्षे नोकरी केली. त्यानंतर १० वर्षे ते प्राध्यापकी पेशात होते. मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी २० वर्षे जबाबदारी सांभाळली.

प्रकाशित पुस्तके

आनंदाचा डोह, काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे, खेळीमेळी (ललित), नववाङ्‌मयीन प्रवृती व प्रमेये, निवडक समीक्षा, 'निळी पहाट, निळी क्षितिजे, निळे पाणी', पंचवटी, प्र. के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार, माझे चिंतन, वागर्थ, वाङ्‌मयीन निबंध लेखन, वाङ्‌मयीन परिप्रेक्ष्य, वासंतिक पर्व (ललित), विचारशिल्प, संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक), समीक्षेतील अवतरणे, साठोत्तरी मराठी कविता व कवी, साहित्य व सामाजिक संदर्भ, साहित्याचे परिस्थितीविज्ञान अशी त्यांची प्रकाशित पुस्तके असून आधुनिक मराठी कवयित्रींची कविता (१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता) आणि निवडक साने गुरुजी या दोन पुस्तकांचे त्यांनी संपादन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम पिनसाठी केला जवानाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या आठवड्यात जनता वसाहत येथील वाघजाई मंदिराजवळ सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचे गूढ उकलण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले. खून झालेली व्यक्ती लष्करात लान्स नाईक म्हणून नोकरीस होती. ओळख नसताना दारू पिण्यासाठी घेऊन गेल्यानंतर पैशांसाठी दोन सराईत गुन्हेगारांनी त्यांचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

संजय लक्ष्मण लवंगे (वय ३९, रा. पोफळी, ता. मोताळा. जि. बुलडाणा) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रतीक अशोक हाके (वय २९, रा. ४४२, नाना पेठ) आणि अमित प्रफुल्ल सदनकर (वय २१, रा. रास्ता पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. २० मे रोजी जनता वसाहत येथील वाघजाई मंदिराजवळ जळालेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांच्या अहवालावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या. बाटल्यांवरील बॅच क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. या बाटल्या कोणत्या दुकानातून विकल्या गेल्या आहेत याचा शोध घेण्यात आला. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. दारू विकत घेताना आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. आरोपींपैकी प्रतीकचा पोलिसांनी शोध घेतला. तो कोंढवा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर खूनाचे गूढ उकलले. आपण आणि अमित सदनकर याने खून केल्याचे कबूल केले. आरोपी बुधवार पेठेत दारू पिण्यास बसले होते. आरोपी आणि लवंगे यांची ओळख नसतानाही त्यांनी दोघांना दारू पिण्यास बोलविले. निवांत बसून दारूचा आस्वाद घेण्यासाठी ते जनता वसाहत येथे गेले. पिताना लवंगे यांच्या खिशातून एटीएम कार्ड बाहेर पडले. आरोपींना पैशांचा मोह सुटला. त्यांनी एटीएम ताब्यात घेऊन पासवर्ड विचारला. मात्र, लवंगे यांनी तो देण्यास नकार दिला. त्यामुळे अमित आणि प्रतीकने डोक्यात बाटली मारली.

वाढदिवसासाठी घेतली होती सुट्टी

संजय लवंगे यांचा २० मे रोजी वाढदिवस होता. त्यासाठी त्यांनी १९ मे पासून नऊ दिवसांची सुट्टी घेतली होती. सुट्टीबाबत गावाकडे काही सांगितले नव्हते. गावी जाऊन पत्नीला सरप्राइज देणार होते. मात्र, दारूने त्यांचा घात केला. लवंगे हे घोरपडी पेठ येथील ईएमई येथे लान्स नाईक म्हणून नोकरीस होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वन्यप्राणी कायद्याने सर्कस थांबेल...’

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'मनोरंजन हा एकमेव हेतू न ठेवता गेल्या अनेक दशकांपासून सर्कस गावागावांत पोहचली. मात्र, कालांतराने त्याला अनेक कारणांनी उतरतीकळा लागली. वन्यप्राणी कायद्यानुसार मागील पंधरा वर्षांपासून सर्कसमधील एक-एक प्राणी हद्दपार होत असून, अशाने सर्कसच थांबेल,' असे मत रँम्बो सर्कसचे जनसंपर्क अधिकारी, लेखक प्रवीण वाळिंबे यांनी व्यक्त केले. प्राणी कल्याण मंडळाच्या वतीने पोलिस बंदोबस्तात गुरुवारी (२६ मे) नवी सांगवी येथे भरविण्यात आलेल्या रॅम्बो सर्कसमधील चार हत्ती, चार घोडे व चौदा श्वान जप्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर रॅम्बो सर्कसच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रॅम्बो सर्कसचे कायदेशीर सल्लागार अॅड. प्रदीप आगरवाल, व्यवस्थापक सुदेशकुमार यांनीही उपस्थित पत्रकारांशी संवाद साधत प्राणी कल्याण मंडळाने केलेल्या कारवाईवर खेद व्यक्त केला. तसेच, विविध कारणांनी सर्कस हद्दपार होण्याची चिंता व्यक्त केली. सेंट्रल झू ऑथोरिटीने कॅप्टीव्ह अॅनिमल फॅसिलिटीअंतर्गत सर्कशीतील हत्तींच्या खेळाची परवानगी नामंजूर केली आहे. त्याला सर्कस प्रशासनाच्या वतीने मुंबई हायकोर्टात फेरयाचिका दाखल करून आव्हान दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण न्याप्रविष्ट असतानाही बळजबळीने प्राणी ताब्यात घेतल्याचा आरोप या वेळी अॅड. अगरवाल व व्यवस्थापक सुदेशकुमार यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी वन्यप्राणी कायद्याअंतर्गत सर्कशीतून वाघ-सिंह त्यानंतर अस्वल, चिंपाझी, पानगेंडा आणि आता राहिलेले हत्ती, घोडेही ताब्यात घेतले जात आहेत. वाळिंबे म्हणाले, 'सर्कशीला लोकाश्रय असला तरी राजाश्रयामुळे ती पूर्णपणे ऱ्हासाच्या मार्गावर आहे. चॅनच्या जमान्यात १८७९ ला भारतात आलेली सर्कस महाराष्ट्रातील सांगली, तासगावातून रुजली. परंतु, आता जेमतेम २८ सर्कशी शिल्लक आहेत.' गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईसाठी ऑल इंडिया अॅनिमल वेल्फेअर बोर्डाचे सुनील हवालदार आणि डॉ. अजय देशमुख यांच्या पथकाची नियुक्त करण्यात आली होती. दरम्यान, रॅम्बो सर्कसवर कारवाई करताना सरकारी कामात अडथळा आणत पोलिसांवर दगड भिरकविल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी फिर्याद दिली आहे. रोहित अनिल शर्मा (२०, रा. झारखंड) याला अटक करून, अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक यू. एम. लोंढे तपास करीत आहेत. बावधन येथील ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये हे हत्ती महिनाभर औषधोपचारासाठी राहतील. त्यानंतर वनविभागाबरोबर कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांना हरियाणा येथील केंद्रात सोडले जाईल, असे रेसक्यु चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नेहा पंचामिया यांनी सांगितले. तर, आम्ही खासकरून सर्कशीतील हत्तींची सुटका करतो. तेथे त्यांची देखभाल नीट केली जात नाही तसेच त्यांचा सराव करून घेताना त्यांना मारपीट केली जाते. त्यामुळे एवायबी हे तपासणी करून संबंधीत सर्कशीतील प्राण्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवितो, असे वाइल्ड लाइफ एस. ओ. एस.चे रिया लोपेझ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरुळी देवाची येथे तेलाच्या गोडाउनला आग

$
0
0

उरुळी देवाची येथे तेलाच्या गोडाउनला आग

म. टा. प्रतिनिधी, पुणे फुरसुंगी जवळील उरुळी देवाची येथे वेस्टर्न वेअर हाउसिंग या तेल व परफ्युमच्या गोडाउनला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. या अागीमुळे इमारतीच्या एका बाजूची भिंत पडली. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. या अागीचे कारण कळू शकले नाही. नितीन बाफना (वय ५९, रा. शंकरशेठ रोड, स्वारगेट) यांचा तेल व परफ्यूम विक्रीचा व्यवसाय आहे. देवाची उरुळी परिसरात दीड हजार स्वेअर फुटमध्ये त्यांचे तेल व परफ्युमचे वेर्स्टन वेअर हाउसिंग नावाचे दोन मजली गोडाउन आहे. या ठिकाणी तेल व परफ्युमचा साठा केला जातो. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास बंद गोडाउनमध्ये अचानक आग लागली. गोडाउनमधून धूर येत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या तीन फायर गाड्या व चार पाण्याच्या टँकरनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अागीने रुद्ररूप धारण केले होते. अागीत इमारतीच्या एका बाजूची भिंत पडली. त्यामुळे अागीने आणखीनच रुौद्र रूप धारण केले. अागीच्या झळा बाहेर येत असल्याने जवानांना अागीवर नियत्रंण मिळवण्यास अडचणत येत होती. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किट होऊन आग लागली, असावी असा अंदाज जवानांनी व्यक्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील बागांत उमटणार साहित्याक्षरे

$
0
0






म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातल्या बागांमध्ये लवकरच साहित्याचा जागर होणार आहे. पुणे शहर हद्दीतील सर्व, म्हणजे १२७ बागांमध्ये साहित्य कट्टा सुरू होणार असून ,पहिल्या कट्ट्याचे उद्घाटन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते १ जून रोजी होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानात संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार वंदना चव्हाण तसेच महापौर प्रशांत जगताप उपस्थित राहणार आहेत. पुणे महापालिकेच्या भाषा संवर्धन समितीतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ बागांमध्ये साहित्यिक कट्टा सुरू होईल. या प्रत्येक कट्ट्यावर आठवड्यातून एकदा साधारण दीड ते दोन तासांचा एक साहित्यिक कार्यक्रम होईल. बागेमध्ये फिरायला येणारे नागरिक आणि मुलांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, तसेच साहित्यिक कार्यक्रमही अनुभवता येतील, अशा रीतीने हे कट्टे चालविण्यात येणार आहेत. कट्ट्यावरील कार्यक्रम नागरिकांसाठी निःशुल्क असतील. कविता, कथा वाचन, कादंबरीचे अभिवाचन अशा प्रकारचे साहित्यिक कार्यक्रम या कट्ट्यांवर होतील. या कट्ट्यांमुळे पुण्यातील लेखक, कवी, साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळेल. तसेच, साहित्याविषयीची अनास्था दूर होऊन सर्वसामान्य नागरिक साहित्याच्या जवळ येतील, असा आशावाद भाषा संवर्धन समितीने व्यक्त केला आहे. 'पुण्याचे साहित्यिक अवकाश विस्तारण्यास या उपक्रमामुळे हातभार लागणार आहे. सर्वसामान्य वाचक किंवा नागरिकापर्यंत उत्तम साहित्य नेणे, नागरिक आणि साहित्य यांना जोडणारा दुवा होणे, हा या कट्ट्यांचा हेतू आहे,' असे समितीचे सदस्य प्रदीप निफाडकर यांनी सांगितले. ही माहिती अश्विनी कदम, अनिल गोरे, न. म. जोशी, प्रदीप निफाडकर, रवींद्र चौधरी, श्याम भुर्के, संजय भगत, सुधीर नारखेडे, पदसिद्ध सदस्य डॉ. अविनाश सांगोलकर, मिलिंद जोशी, समितीचे सदस्य सचिव शिवाजीराव दौंडकर यांनी दिली. डॉ. सदानंद मोरे हे ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे अभ्यासक, तत्वज्ञ म्हणून ओळखले जातात. ते कवीदेखील आहेत, याची माहिती बहुतेकांना नाही. पहिल्या कट्ट्याच्या उद्घाटन प्रसंगी कवी सदानंद मोरे यांची पुणेकरांना ओळख होणार आहे. मोरे यांच्या काव्यवाचनानेच पहिल्या कट्ट्याचे उद्घाटन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महात्म्यांच्या कार्याचे सरकारला विस्मरण : डॉ. कसबे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे 'लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि न. चिं. केळकर या महात्म्यांनी जे कार्य केले आहे, त्याचा सध्याच्या सरकारला आणि समाजाला विसर पडला आहे,' अशी खंत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. मसापच्या ११० व्या वर्धापन दिनानिमित्त मसापच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावणारे न्या. म. गो. रानडे, लोकमान्य टिळक आणि न. चिं. केळकर यांच्या प्रतिमांचे आणि मळेकर वाड्याच्या प्रतिमेचे अनावरण डॉ. कसबे व मसापचे माजी अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. मसापचे कार्याध्यक्ष मिलींद जोशी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, साहित्यिक राजा दीक्षित आदी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात साहित्यसेवक म. श्री. दीक्षित यांच्या स्मृतिनिमित्त लावलेल्या 'मश्रीं'च्या पायरीचे अनावरण देखील या वेळी करण्यात आले. कसबे म्हणाले, 'समाजासाठी ज्या महापुरुषांनी योगदान दिले त्यांचे स्मरण ठेवले पाहिजेत, पण आज तसे होताना पहायला मिळत नाही. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही या घटनेपलीकडे जाऊन शालेय जीवनात टिळक शिकवलेच जात नाहीत. ज्या न्या. रानडे यांनी उदारमतवादाचा पाया देशात रचला अशा रानडेंचा सरकारला विसर पडतो ही खेदजनक बाब आहे. जयंती, पुण्यतिथी साजरी न करता सुट्टी देण्याच्या प्रथेमुळे महापुरुषांचे विस्मरण होत चालले आहे.' शेजवलकर म्हणाले, 'रावसाहेब कसबे यांच्या रूपाने मसापला एक वैचारिक नेतृत्व मिळाले आहे. सत्ताधाऱ्यांकडून जातीयतेवर आधारित विचार समाजात पसरवले जात असताना कसबे यांच्यासारख्या विचारवंतांची गरज आहे.' राजा दीक्षित म्हणाले, 'मश्रीं'ची आयुष्यभर खूप उपेक्षा झाली. त्यांच्या नावाची पायरी हेच त्यांचे यथोचित स्मारक आहे. या स्मारकामुळे त्यांच्या कार्याला न्याय मिळाला आहे.' सुनीताराजे पवार यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ववैमनस्यातून दगडाने ठेचून खून

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, हडपसर पूर्ववैमनस्यातून मुंढवा येथे दगडाने व बिअरच्या बाटलीच्या काचेने तोंडावर ठेचून एकाचा खून करण्यात आला. याबाबत दोघांना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज उर्फ बबलू विलास आटोळे (वय २२, रा. गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी सुभाष रमेश केंगार (२४, रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा) प्रकाश तुकाराम भोसले (२६, रा. सदर) यांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मृत मुलाची आई रमा विलास आटोळे (४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जानमहमंद पठाण यांनी दिलेली माहितीनुसार, मृत सूरज व आरोपी यांचे सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. गुरुवारी रात्री अकारा वाजता आरोपी सुभाष व प्रकाश हे दुचाकीवरून आले आणि काहीतरी सांगून मृत सूरजला दुचाकीवरून बसवून घेऊन गेले. सकाळी पहाटे सव्वा तीन वाजता मुंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना आरोपी दोघे संशयित पळत होते. त्यावेळेस त्यांना पकडून चौकशी व पोलिस खाक्या दाखवला असता, आरोपीने केशवनगर येथील, रेणुका माता मंदिर समोरील अंबराई येथे सूरजच्या तोंडावर व डोक्यावर दगडाने, बिअरच्या बाटलीने ठेचून खून केल्याची कबुली दिली. या माहितीनुसार मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जानमहमंद पठाण, पीएसआय प्रताप गिरी हे घटनास्थळी जाऊन मृत मुलाच्या आईला सोबत पाहणी केली असता, मृत सूरज आढळला. त्याच्या तोंडावर व डोक्यावर दगडाने व बिअरच्या बाटलीने मारल्याच्या खुणा दिसून आल्या. पुणे शहर झोनच्या उपायुक्त कल्पना बारावकर व सहायक पोलिस आयुक्त रवींद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार सदस्यांच्या प्रभागावर शिक्कामोर्तब

$
0
0

राजपत्र जारी; महापालिका निवडणुकीत समीकरणे बदलणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पुण्यासह राज्यातील अनेक महापालिकांतील मतदारांना दोनऐवजी चार मते देण्याची संधी मिळणार आहे. गेल्या काही दिवसांत चर्चेत असलेल्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचे राजपत्र नुकतेच जारी करण्यात आले आहे. यामुळे आता प्रत्येक प्रभागात खुल्या आणि राखीव गटासह महिलांनाही प्रतिनिधित्व मिळणार आहे.

स्थानिक पातळीवरील सक्षम उमेदवारांची पोकळी 'कमळ' चिन्हाने भरून काढून महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राजकीय लाभ मिळवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने हे पाऊल उचलल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे महापालिकांच्या निवडणुकीतील अनेक समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकांमध्ये यापूर्वी दोन सदस्यांचे प्रभाग होते; मात्र त्याला कोर्टात आव्हान दिल्यानंतर याबाबत बाजू मांडताना स्वतंत्र वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्याची पद्धत स्वीकारून सरकारने तसा कायदाही केला. त्यानुसार कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि नवी मुंबई या महापालिकांच्या निवडणुकाही झाल्या; परंतु लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिसून आलेला मोदी लाटेचा पॅटर्न त्यामध्ये दिसून आला नाही. स्थानिक पातळीवरील सक्षम उमेदवारांचा अभाव हे त्याचे कारण असल्याचे भाजपने केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी चार सदस्यांचा प्रभाग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सिंगल वॉर्ड पद्धतीत तगडे उमेदवार, जात-धर्म, पैसा-दहशत यांचा प्रभाव दिसून येतो आणि स्थानिक वर्चस्वाच्या बळावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारतात, असेही यामध्ये आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत राज्य मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या उपसमितीनेही चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा अहवाल सादर केला आणि १९ मे रोजी या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र महापालिका अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली असून, 'शक्य असेल तोवर चार सदस्यांचा प्रभाग आणि अन्यत्र तीनपेक्षा कमी व पाचपेक्षा अधिक सदस्यसंख्या नसेल,' असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, चार सदस्यांचा प्रभाग करण्याची मागणी सर्वप्रथम आपण केली होती आणि त्यानंतर झालेल्या या निर्णयाने महापालिकांचा कारभार सुधारेल, असे भाजपचे प्रवक्ते उज्ज्वल केसकर यांनी म्हटले आहे.
..........

कायदेशीर लढाईची शक्यता

या निर्णयास अनेक पक्षांनी विरोध केला आहे; तसेच भारिप बहुजन महासंघानेही याविरोधात कोर्टात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवर कायदेशीर लढाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

............
स्वबळाची समीकरणे बदलणार?

गेल्या काही काळात सिंगल वॉर्ड पद्धतीने झालेल्या महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर लढवल्या होत्या; मात्र बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत ही समीकरणे बदलण्याची चर्चा आहे. आता या पद्धतीत टिकून राहण्यासाठी भाजप आणि सेनेमध्ये पुन्हा युती होण्याची चर्चा आहे; तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आघाडीचा पर्याय समोर आला आहे. ही पद्धत भाजपच्या फायद्याची ठरणार असल्याने संभाव्य युतीच्या चर्चांमध्येही भाजपचे पारडे जड राहील, असे त्या पक्षाच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराजांचे गड-कोट हरवलेत, शोधणार..?

$
0
0

पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत केवळ ४८ गडांचीच नोंद

Prasad.Pawar@timesgroup.com

पुणे : शिवशाहीचा ज्वलंत इतिहास आणि स्वराज्य ज्यांच्या अंगाखांद्यावर साकारले, ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीला एक वेगळी ओळख दिली, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-कोट हरवले आहेत. पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत केवळ ४८ गडांचीच नोंद असल्याने उर्वरित गडांना कुणीही वाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवछत्रपतींच्या नावे राज्यकारभाराचा दाखला देऊन सत्तेत आलेल्या सरकारने अद्याप या गोष्टीची दखलही घेतलेली नाही. राज्य पुरातत्त्व खात्याने संरक्षित केलेल्या गडकोटांच्या यादीत केवळ ४८ गडांची नोंद आहे. राज्यभरातील गडकोटांची मालकी पुरातत्त्व खात्याकडे असणे गरजेचे असताना इतक्या वर्षांमध्ये ४८ गडांची ही यादी पुढे सरकलेली नाही. मोजके अपवाद वगळता, ज्या गडकोटांशी शिवशाहीचा इतिहास जोडलेला आहे, अशा गड-कोटांचा या यादीत समावेशच नसल्याने तिथे काय आणि कशाचे संवर्धन होणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पुरातत्त्व खात्याने केलेल्या यादीतही घोळ असून, रांगणा आणि विशाळगड हे कोल्हापूर जिल्ह्यातील गड या यादीत पुणे जिल्ह्यात दाखवले आहेत. स्वराज्याचा श्रीगणेशा ज्या गडाच्या साक्षीने झाला तो तोरणागड यादीनुसार धारूर तालुक्यात आहे. शिरगाव, तोरणा, गाळणा, अंबागड, धारूर, परांडा यांसारख्या १४ गडांवर संवर्धनाची कामे तातडीने सुरू करावीत, असा प्रस्ताव मध्यंतरी राज्य सरकारने नेमलेल्या दुर्गसंवर्धन समितीने सांस्कृतिक मंत्रालय आणि पुरातत्त्व विभाग यांना दिला होता. त्यामुळे यंदा एकूण २८ गडांवर संवर्धनाची कामे सुरू झाली आहेत; पण हरिश्चंद्रगड, धोपड, तुंग-तिकोना, वासोटा, रोहिडा, वसंतगड, हर्णै यांसारखे किल्ले पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित गडांच्या यादीतच नसल्याने हे गड संवर्धनापासून वंचित राहणार आहेत. यांपैकी काही गडांवर काही संस्था काम करत आहेत. दुर्गसंवर्धनात लोकसहभाग वाढूनही इतर गड ताब्यात घेऊन तेथील अवशेष जतन करण्याची कोणतीही प्रक्रिया सरकार किंवा पुरातत्त्व खात्याकडून झालेली नाही.

राज्यभरातील दीडशे ते दोनशे किल्ले वन विभागाकडे आहेत. २० ते २२ किल्ले खासगी मालकीचे आहेत. ज्या गडांवर कोणाचीच मालकी नाही, असे गड जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहेत. यांपैकी एकाही गडावर संवर्धनासाठी कोणीही प्रयत्नशील नसल्याने गडांवरील अवशेषांची हेळसांड आणि तोफा चोरीला जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. चाकणजवळचा भुईकोट संग्रामदुर्ग (जि. पुणे) आणि जलदुर्ग खांदेरी (जि. रायगड) हे गड संरक्षित करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे इतर गडांबाबत त्यांची मालकी, कागदोपत्री नाव, ठिकाण, सर्व्हे नंबर, सात-बारा, नकाशा आणि चतुःसीमा, सद्यस्थिती अशी माहिती जमवण्याची प्रक्रिया करण्यासाठी पुरातत्त्व खात्याला वेगाने हालचाली कराव्या लागणार आहेत. त्यासाठी पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांच्या तीव्र इच्छाशक्तीची गरज आहे.

..................

८३ गडांचे काय होणार?

अनेक गडकोटांवरील अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने पुरातत्त्व खात्याने आणखी ८३ गडकोट तातडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, यासाठी दुर्गसंवर्धन समितीच्या सदस्यांनी त्या ८३ गडांची नावे राज्य पुरातत्त्व खात्याला सुचवली होती. या गडांची नावे आणि हे गड आहेत कुठे याची माहिती पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांना आहे की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे या यादीचे पुरातत्त्व विभाग काय करणार यावर प्रश्नचिन्हच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. रा. ग. जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

$
0
0

समीक्षा पर्वाचा शेवट झाल्याची भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कलावाद, नवसमीक्षा, सौंदर्यवाद अशी विविधांगी मांडणी करून मराठी साहित्यविश्वातील समीक्षेचे दालन समृद्ध करणारे ज्येष्ठ समीक्षक, साक्षेपी संपादक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि परिवर्तनवादी चळवळीचे पुरस्कर्ते प्रा. डॉ. रा. ग. जाधव यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मृदू आणि लोभस व्यक्तिमत्त्वाच्या जाधव सरांच्या निधनाने मराठी साहित्यसमीक्षा पर्वाचा शेवट झाल्याची भावना साहित्यवर्तुळातून व्यक्त झाली. वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साहित्याला मानव्यमूल्य असते, या विचारातून कथा, कविता आणि नाटक अशा साहित्यप्रकारांचा वेध त्यांनी समीक्षेतून घेतला. सहृदयता, निखळ मैत्री, वैचारिकता या गुणांमुळे ते साहित्य क्षेत्रातील अनेक साहित्यिकांच्या आदरस्थानी होते. मराठी साहित्य प्रवाहातील दलित साहित्याला आपल्या समीक्षेतून नवा चेहरा प्राप्त करून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. औरंगाबादमध्ये २००४ साली झालेल्या ७७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्यविश्वातील विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा नुकताच गौरव झाला होता.

नेहमी हसतमुख असलेल्या आणि भावनाशील पिंड असलेल्या जाधव सरांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचा विद्यार्थीवर्ग, साहित्यिक, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. सकाळी साडेदहा वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी साधना मीडिया सेंटर आणि त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ठेवण्यात आले होते. त्या वेळी साहित्य, तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन, त्यांना आदरांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन प्रवेशांसाठी वेबपोर्टल

$
0
0

ऑनलाइन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न सुरू Yogesh.Borate@timesgroup.com पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कॉलेजांमधील ऑनलाइन प्रवेशांसाठी विद्यापीठ स्वतंत्र सॉफ्टवेअर किंवा वेबपोर्टल उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदापासून या वेबपोर्टलद्वारे घरबसल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यंदा देशभरातील सर्वच विद्यापीठे आणि कॉलेजांना आपापल्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातूनच करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुणे विद्यापीठानेही आपल्या कार्यक्षेत्रातील कॉलेजांमधून यंदापासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे परिपत्रक काढले होते. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरातील सीनिअर कॉलेजांमधील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तयारीचा 'मटा'ने आढावा घेतला. त्यानुसार शहरातील प्राचार्य प्रतिनिधींनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे स्वागत केले. यापूर्वीच अशा प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्राचार्यांनी ऑनलाइन प्रवेश कॉलेजांसाठीही उपयुक्त ठरत असल्याचा अनुभव 'मटा'कडे मांडला. त्याच वेळी काही प्राचार्यांनी यंदा विद्यापीठ केवळ विद्यापीठाच्या विभागांसाठी ऑनलाइन प्रवेश देणार असून, पुढील वर्षी सर्व संलग्न कॉलेजांमध्ये अशी प्रक्रिया राबविण्याचा विचार करत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे एकीकडे यूजीसी आणि विद्यापीठ कॉलेज पातळीवरील ऑनलाइन प्रवेशांसाठी आग्रही भूमिका मांडत असताना, दुसरीकडे काही प्राचार्य आणि कॉलेजांपर्यंत ऑनलाइन प्रक्रियेमधील बारकावे पोहोचले नसल्याचेही स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने या प्रक्रियेसाठी विचारात घेतलेल्या मुद्द्यांचाही 'मटा'ने आढावा घेतला. त्यातून विद्यापीठाचे वेबपोर्टल निर्मितीचे प्रयत्न समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी तरुणाला कोठडी

$
0
0

पुणे : बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाला दोन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बप्पी कमल सरकार (२७ रा. मोशी, ता. हवेली) याला अटक केली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. १७ मे रोजी सकाळी ही घटना घडली. फिर्यादी या एका हॉटेलमध्ये काम करत असताना तेथील कामगार आरोपी बप्पी हा त्यांच्या तीन वर्षीय मुलीला धान्य ठेवण्याच्या खोलीत घेऊन गेला. मुलगी दिसली नाही म्हणून फिर्यादी यांनी हाक मारली असता त्यांची मुलगी खोलीतून बाहेर आली. त्याच खोलीतून आरोपी बाहेर आला. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने काही उत्तर दिले नाही. आरोपीवर संबंधित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटक आरोपीकडे अधिक तपास करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील लीना पाठक यांनी कोर्टात केली. त्याला दोन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मंत्रालय मनोरुग्णालय झाले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मंत्रालय मनोरुग्णालय झाले आहे. येथील प्रत्येक जण आपल्यातच गुंतलेला आहे. यांना मते देणारे सामान्य नागरिक रांगेत उभे राहतात आणि पैसे खाणारे खुर्चीत बसतात,' अशी खंत आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दिला जाणारा 'शंभूगौरव पुरस्कार' आमदार कडू यांना छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, खासदार अॅड. वंदना चव्हाण, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे राजेभोसले, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, बाळासाहेब पासलकर, अक्षय कोंडे यासह विविध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
'मंत्रालयात अनेक महत्त्वाच्या फाइल पुढे सरकत नाहीत. गरज लक्षात घेऊन येथे काम केले जात नाही. एक फाइल पुढे सरकरण्यासाठी सहा-सहा महिन्यांचा, वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी आंदोलनाची परिभाषा बदलावी लागते,' असे कडू यावेळी म्हणाले. सध्याचे सरकार स्मारक बांधणारे सरकार म्हणून ओळखले जाईल. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना, नागरिकांना कशाची गरज आहे आणि हे सरकार काय करत आहे, असा उपरोधिक शेरा कडू यांनी मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुष्यभर राहिले समीक्षेशी एकरूप

$
0
0

दलित साहित्याला नवी ओळख देण्यात मोलाचा वाटा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी केलेल्या समीक्षेतून साहित्यातील कोणताही प्रवाह वर्ज्य राहिला नाही. प्रा. जाधव यांचे पस्तीसपेक्षा अधिक समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झाले असून, त्यात संतसाहित्यापासून मराठी कथा, कविता, कादंबरी, नाटक, निबंध ते थेट चित्रपट समीक्षा यांचा समावेश होतो. याशिवाय स्वतंत्र लेखन व कविता अशा माध्यमातून प्रा. जाधव आयुष्यभर साहित्यनिष्ठेशी एकरूप झाले. दलित साहित्याला त्यांनी वेगळा आयाम निर्माण करून दिला.
रावसाहेब गणपत जाधव तथा प्रा. रा. ग. जाधव यांचा जन्म २४ ऑगस्ट १९३२ रोजी बडोदा येथे झाला. सातारा जिल्ह्यातील काशीळ हे त्यांचे मूळ गाव. वडील गणपतराव जाधव बडोदा संस्थानात फडणीस होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 'साहित्य विशारद' या परीक्षेत ते महाराष्ट्रात पहिले आले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात स्वारगेट (पुणे), संगमनेर, नाशिक या ठिकाणी सुमारे दहा वर्षे नोकरी केली. यादरम्यान त्यांनी बहिस्थ पद्धतीने मराठी विषयात एम.ए. केले. साप्ताहिक स्वराज्यमध्ये आईवर लिहिलेली 'न बिघडणारे यंत्र' ही त्यांची पहिली कथा प्रसिध्द झाली.
विदर्भ महाविद्यालय (अमरावती), एल्फिन्स्टन महाविद्यालय (मुंबई) आणि मिलिंद महाविद्यालय (औरंगाबाद) येथे त्यांनी सुमारे दहा वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९७० ते १९९० या काळात त्यांनी वाई येथे 'मराठी विश्वकोशा' च्या मानव्य विद्या विभागाचे विभाग संपादक म्हणून काम केले. २००४मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला होता. 'मराठी विश्वकोश मंडळाचे ' अध्यक्ष आणि प्रमुख संपादक म्हणून त्यांनी २०००-२००१ दरम्यान जबाबदारी पार पाडली. 'वियोगब्रह्म', 'मावळतीच्या कविता', 'आनंदाचा डोह', 'निळी पहाट', 'निळी क्षितिजे', 'निळे पाणी', 'पंचवटी' , 'अश्वत्थाची सळसळ', 'सांस्कृतिक मूल्यवेध', 'आधुनिक मराठी कवयित्रींची कविता', 'प्र.के. अत्रे साहित्यदृष्टी व साहित्यविचार', 'आगळीवेगळी नाट्यरुपे', 'वागार्थ', 'वासंतिक पर्व', 'निवडक समीक्षा' ही त्यांची पुस्तके गाजली.
'आनंदाचा डोह' या पुस्तकातून त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांची समीक्षा केली आहे. 'निळी पहाट', 'निळी क्षितिजे' यांमधून त्यांनी दलित साहित्याचा साक्षेपी वेध घेतला. 'निळे पाणी' मध्ये वामन चोरघडे, पु. भा. भावे, अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ, पु. शि. रेगे, शंकर पाटील, बाबूराव बागूल या भिन्न प्रकृतीच्या लेखकांची समीक्षा केली. 'मराठी वाङमयाचा इतिहास' व 'निवडक साधना' या खंडांचे त्यांनी संपादन केले. प्रा. जाधव यांच्यावर 'संमेलनाध्यक्ष प्रा. रा.ग. जाधव' हा समग्र ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिक निधीची गरज

$
0
0

जेधे उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवारांची मागणी म. टा. प्रतिनिधी, पुणे 'आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांकडून विविध विकासकामे नागरिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाईल; पण पुणेकर नागरिकांच्या फायद्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा', अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेतर्फे प्रयत्न सुरू असले, तरी शहरातील ट्रॅफिक सेन्सही वाढवावा लागेल, असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले. तसेच, नगर रोडवर सुरू झालेल्या जलद बस वाहतूक योजनेतील त्रुटीही लवकरच दूर केल्या जातील, असे आश्वासन महापौरांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वारगेट येथील केशवराव जेधे उड्डाणपुलाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह महापालिकेतील आजी-माजी पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. आघाडी सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी शहराला मिळाला. त्यातून अनेक प्रकल्प मार्गी लागले असले, तरी शहर झपाट्याने वाढत असल्याने अधिक निधीची आवश्यकता आहे. त्याशिवाय शहराचा विकास होऊ शकणार नाही. म्हणून, केंद्र आणि राज्य सरकारने पुण्याच्या प्रगतीसाठी मदत करायला हवी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

मुळशीतून पाणी हवेच कोर्टाने पाण्यावर सर्वांचा हक्क असल्याचा निकाल नुकताच दिला आहे. त्यामुळे, मुळशी येथील टाटाच्या धरणातून पुणेकरांना पाणी मिळणे गरजेचे आहे. हे पाणी शहरासाठी उपलब्ध झाल्यास खडकवासला प्रकल्पातून शेतीला दिल्या जाणाऱ्या पाण्यातही वाढ करणे शक्य होईल. त्यासाठी, मुख्यमंत्र्‍यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

भाजपच्या नेत्यांची अनुपस्थिती स्वारगेट येथील जेधे पुलाच्या भूमिपूजनाच्या वेळी बरेच राजकारण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी जोरदार फ्लेक्सबाजी करत या पुलासाठी पाठपुरावा केल्याचा दावा केला होता. भाजपने तर पवार येण्यापूर्वीच पुलाचे प्रतीकात्मक स्वरूपात भूमिपूजन केले होते. मात्र, शुक्रवारी पुलाच्या उद्घाटनाला पालकमंत्र्यांपासून ते पालिकेतील गटनेत्यांपर्यंत पक्षाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.

स्वप्नपूर्तीचा आनंद स्वारगेट येथील जेधे चौकात उभारण्यात आलेल्या केशवराव जेधे उड्डाणपुलाचे उद्घाटन म्हणजे आघाडी सरकारचा आणि आपल्या स्वतःच्या स्वप्नपूर्तीचा आनंद आहे, अशा भावना माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केल्या. या चौकात उड्डाणपुलाशिवाय पर्यायच नव्हता. त्यासाठी आपण सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक उलटल्याने सिलिंडर पेटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी दोन ट्रकमध्ये धडक होऊन हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील श्रीकृष्ण मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावर पडलेल्या काही गॅस सिलिंडरनी पेट घेतला. मात्र, अग्निशमन दलाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ट्रकमधील हायड्रोजन गॅस सिलिंडर रस्त्यावर पडले. काही सिलिंडरमधील गॅसने पेट घेतला. ही घटना जवळील रिक्षाचालकांना समजल्यानंतर त्यांनी तत्परता दाखवत अग्निशामक दलाला कळवले. अग्निशामक दलाच्या ३ गाड्या वेळेत घटनास्थळी दाखल झाल्यामुळे साधारण १५ मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि पुढील अनर्थ टळला. या अपघातात चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात आडवा पडल्यामुळे भक्ती-शक्ती चौक ते निगडीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ कक्षाधिकाऱ्याची बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शालेय पोषण आहार योजनेच्या संदर्भात पुण्यात शिक्षण संचालनालय कार्यालयात सर्रास हस्तक्षेप करणाऱ्या मंत्रालयातील 'त्या' कक्षाधिकाऱ्याची शुक्रवारी बदली झाली. पोषण आहार योजनेतील गैरप्रकार समोर येण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बदलीने या अधिकाऱ्याविषयी आतापर्यंत घेण्यात आलेले आक्षेप खरेच असल्याच्या शक्यतांना पुष्टी मिळत आहे.
शालेय पोषण आहार योजनेतील गेल्या काही वर्षांमधील आर्थिक व्यवहारांवर महालेखापालांनी आपल्या लेखापरीक्षण अहवालामधून थेट आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपांच्याच संदर्भाने 'मटा'ने सुरू केलेल्या शैक्षणिक 'कु'पोषण' या मालिकेमधून राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामधील आक्षेपार्ह कारभारही उघड झाला. त्यातच राज्याच्या प्रभारी प्राथमिक शिक्षण संचालकांशी नामसाधर्म्य असलेला हा कक्षाधिकारी संचालकांना 'आदेश' देऊन, योजनेतील आक्षेपार्ह व्यवहारांवर बोट ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढत असल्याचेही उघड झाले होते. संचालक कार्यालयातून असे आदेश निघत असताना, राज्याच्या आयुक्त कार्यालयाला अंधारात ठेवून थेट मंत्रालयाशी चालणारा शिक्षण संचालनालयाचा पत्रव्यवहारही याच निमित्ताने समोर आला. 'मटा'ने हा प्रकार उघड केल्यानंतर संचालनालयातील या आक्षेपार्ह बदलीचे आदेश तातडीने रद्द करण्यात आले होते. संचालनालयातील हा कारभार गेल्या काही दिवसांमध्ये टीकेचा धनी ठरला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील त्या कक्षाधिकाऱ्याची बदली झाली आहे.
..
स्थलांतरामुळे कागदपत्रे सापडेनात ?
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या महालेखापालांच्या ऑडिटदरम्यान पोषण आहार योजनेविषयीची जवळपास दीडशेहून अधिक बिले संचालनालयात नसल्याचे समोर आले होते. महालेखापाल कार्यालयाने त्या विषयी सातत्याने विचारणा केल्यानंतरही संचालनालयाने वर्ष २०१०-११ ते वर्ष २०१४-१५ दरम्यानची ही बिले ऑडिटसाठी सादर केली नाहीत. राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे गेल्या वर्षी स्थलांतर झाल्याने ऑडिटदरम्यानच्या कालावधीत ही बिले आणि संबंधित कागदपत्रे ऑडिटसाठी सादर करण्यात अपयश आल्याची बाब राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महालेखापाल कार्यालयाला कळविली आहे. संचालनालयाने ही कागदपत्रे सादर करण्यासाठी येत्या आठ दिवसांची मुदत मागून घेतल्याचेही याच निमित्ताने उजेडात येत आहे. त्यामुळे संचालनालयाच्या व्यवहारांबाबत गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत असलेल्या शंका अधिक गंभीर होत चालल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images