Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘जलयुक्त’चे ठेकेदार हद्दपार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांची घुसखोरी झाली आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी ठेकेदारांना हद्दपार करण्याची गरज आहे,' असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. अप्पासाहेब पेंडसे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी डॉ. राजेंद्रसिंह यांना 'भगीरथ पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट, सुनील जोशी, राम डिंबळे आणि सुभाष देशपांडे उपस्थित होते. 'राज्यात सुरू झालेली जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली आणि लाभदायी आहे. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजना लागू करण्यात आली. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून यशस्वी केली. मात्र, आता या योजनेला ठेकेदारांचे ग्रहण लागले आहे. त्यांना हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी या योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्याशिवाय ठेकेदारांची घुसखोरी, भ्रष्टाचार थांबणार नाही,' असेही डॉ. राजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.
राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये मी पाहणी केली. समाजाचा सहभाग असलेल्या ठिकाणी योजना यशस्वी झाली आहे. ठेकेदारांनी घुसखोरी केलेल्या ठिकाणी ती अयशस्वी झाली आहे. ठेकेदार कधीही समाजाचा विचार करत नाहीत. ते केवळ स्वतःचा आ​णि कंपनीचाच विचार करतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले. 'ग्रामीण भागात बंधाऱ्याला दगडगोटे लावून पाणी अडविले जाते. त्याचप्रमाणे शहरातील पावसाचे वाहणारे पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर होणे गरजेचे आहे. पिण्यास अयोग्य असलेले पाणी एकत्रित करून ते शेतीला वापरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सुभाष देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. राम डिंबळे यांनी आभार मानले.
----------
'मराठवाड्यात तुरी पेरा'
मराठवाड्यामध्ये पाऊस कमी पडतो. मात्र, तेथे भूगर्भातील पाणी उपसण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुपनलिका काढण्यात आल्या आहेत. दुष्काळ असतानाही ऊसाचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. येथील परिस्थितीचा विचार करता, तुरीसारखी कमी पाण्यावर येणारी आणि वाढणारी पिके घेण्याची गरज आहे, असे डॉ. राजेंद्रसिंह यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुधातील भेसळ ओळखणारे‘क्षीर स्कॅनर’विकसित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'भारत देशातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश असला, तरी भारतात दुधात होणाऱ्या भेसळीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणूनच दुधातील भेसळ ओळखणारी 'क्षीर स्कॅनर' ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. अत्यल्प खर्चात अवघ्या ४० सेकंदात भेसळीचा अहवाल देणारी ही यंत्रणा प्रत्येक राज्याने स्वीकारावी', असे आवाहन केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केले आहे. 'सीएसआयआर'च्या पिलानी येथील सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने ही यंत्रणा विकसित केली आहे. दुधाच्या वितरण साखळीमध्ये त्यात अशुद्ध पाणी मिसळले जाते; तसेच युरिया, मीठ, डिटर्जंट, लिक्विड सोप, बोरिक अॅसिड, कॉस्टिक सोडा, सोडा आणि हायड्रोजन पॅरॉक्साइडही मिसळण्यात येते. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर क्षीर स्कॅनर या यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे. ही यंत्रणा अवघ्या काही सेकंदात दुधातील भेसळ ओळखून सिद्ध करते. यासाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च आला आहे. 'सहज कोठेही नेता येण्याजोगी ही यंत्रणा असून वापरण्यासही अगदी सोपी आहे. अवघ्या ४०-४५ सेकंदात या चाचणीचा अहवाल येतो. एका चाचणीला ५० पैशांहूनही कमी खर्च येतो. एक लिटर दुधात एक ग्रॅम युरिया, दोन ग्रॅम मीठ, दोन ग्रॅम डिटर्जंट, एक टक्का लिक्विड सोप आणि एक ग्रॅम सोडा इतक्या अल्प प्रमाणात असलेली भेसळही ही यंत्रणा अचूकरीत्या ओळखू शकते. त्यामुळेच सर्व राज्यांनी ही यंत्रणा स्वीकारून त्याचा वापर वाढवावा. तसेच नागरिकांनीही लोकचळवळ म्हणून या यंत्रणेचा वापर करावा', असे आवाहन डॉ. हर्ष वर्धन यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अघोषित पाणीकपात सुरू

$
0
0

ठरावीक वेळेतही अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने पुणेकरांना अघोषित पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड दिल्या जाणाऱ्या पाण्यामध्येही कपात करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील काही भागात ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही कमी वेळ पाणी मिळत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाणीसाठा कमी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने अशा पद्धतीने पाणीकपात करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे.
धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने गेल्या आठ महिन्यांपासून पुणेकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. शहरातील अनेक भागात चढउतार असल्याने पालिकेने ठरवून दिलेल्या वेळेतही पुरेशा प्रमाणात पाणी येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती.
पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात करावीच लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केल्याने उपलब्ध पाण्यात नियोजन करण्याचे धोरण नागरिकांनी स्वीकारले. धरणात पाण्याचा साठा कमी असूनही पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आदेशामुळे खडकवासला धरणातून एक टीएमसी पाणी दौंड, इंदापूरसाठी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखीनच कमी झाला आहे. सध्या धरणात अवघा ३.०९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी हा साठा ५.४ टीएमसी इतका होता, असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करूनही येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिलमध्ये दोनवेळा पालिकेने पाणीपुरवठा बंद केला होता.
..
करा पीएमसी केअरशी संपर्क
ज्यांना पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे, त्यांनी 'पीएमसी केअर'कडे संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन सजग नागरिक मंचाने केले आहे. महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसापासून अघो‌षित पाणीकपात सुरू केली आहे का याचा खुलासा करण्याची मागणी विवेक वेलणकर, विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटीचा वेग मंदावणार?

$
0
0

अपघातांच्या ठिकाणी तातडीने स्पीडब्रेकर लावण्यास मान्यता
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगर रोडवरील जलद बस वाहतूक योजनेतील (बीआरटी) अपघातांची मालिका थांबविण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पादचाऱ्यांना सहज रस्ता ओलांडण्याकरिता तातडीने स्पीडब्रेकर बसविण्यात येणार आहेत. त्याशिवाय बीआरटी मार्गावर बस चालविणाऱ्या सर्व चालकांना प्रशिक्षण आणि सिग्नल सिंक्रोनायझेशनचे कामही करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
गेल्या आठवड्यात बीआरटी मार्गावर अपघातांचे सत्र सुरू झाल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. त्याचाच आढावा घेत, उपायांची तातडीने अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे मंगळवारच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) वरिष्ठ अधिकारी आणि वाहतूक पोलिस; तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बीआरटी मार्गावर येणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोयीचे व्हावे, यासाठी स्पीडब्रेकरची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी वाहतूक पोलिस आणि पीएमपीकडून केली जात होती. त्यानुसार बीआरटी मार्गावर तीन ठिकाणी नव्याने स्पीडब्रेकर बसविले जातील, अशी माहिती पथ विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली.
बीआरटीमध्ये कोणत्याही स्वरूपाचे अपघात होऊ नयेत, यासाठी बसचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पीएमपीतर्फे दिले जाणार आहे. यातून अपघातांची संख्या कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याशिवाय बीआरटी मार्गावरील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन तातडीने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे चौकात इतर वाहने बीआरटी मार्गासमोर येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. बीआरटीसाठीच्या स्वतंत्र मार्गावर इतर कोणत्याही स्वरुपाच्या वाहनांची घुसखोरी होऊ नये, यासाठी जादा मनुष्यबळ तैनात करण्यास वाहतूक पोलिसांनीही संमती दिली आहे.
...
काम नक्की कोणाकडे?
नगर रोड बीआरटी मार्गाची जबाबदारी नक्की कोणाची, यावरून पालिकेतील अधिकाऱ्यांमध्येच बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. बीआरटीचे काम सुरुवातीपासून अधीक्षक अभियंता नामदेव बारापात्रे यांच्याकडे आहे. आळंदी रोडवरील बीआरटी मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर ही जबाबदारी पथ विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली होती. बीआरटीवर अपघातांची मालिका सुरू झाल्यापासून कोणीच जबाबदारी घेण्यास पुढे येत नसल्याने विभागप्रमुख या नात्याने राजेंद्र राऊत यांनाच बीआरटीच्या कामांविषयीचा खुलासा करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतःच्या अपहरणाचा बनाव

$
0
0

पुणे : आजी-आजोबांना भेटण्यासाठी गेल्यामुळे वडील रागावतील म्हणून वाकड परिसरातील एका तरुणाने स्वतःचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. खंडणीविरोधी पथकाने कौशल्याने तपास करत त्या तरुणाला पुण्यात बोलावले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा अपहरणाचा बनाव उघडकीस आला. 'डांगे चौक येथून एका अठरा वर्षांच्या तरुणाला सोमवारी चार अनोळखी व्यक्तींनी पळवून नेले आहे. अपहरणकर्त्यांनी सात लाख रुपयांची मागणी केली आहे,' असे अपहरण झालेल्या मुलाने स्वतः फोन करून वडिलांना सांगितले. रक्कम न दिल्यास जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिल्याचेही त्याने सांगितले. वडिलांनी ताबडतोब वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्ह्याचा समांतर तपास खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील आणि त्यांचे सहकारी करत होते. तरुणाच्या वडिलांना पथकाने सोबत घेऊन फोनवर बोलण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार तरुणाला पुण्यात येण्यास भाग पाडले. त्याच्याकडे तपास केला असता खरा प्रकार समोर आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-निजामुद्दीनला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

परतीच्या प्रवाशांवर 'वेटिंग'ची वेळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नव्याने सुरू करण्यात आलेल्या पुणे- निजामुद्दीन या वातानुकुलीत रेल्वे गाडीला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला. पुण्याहून परतीचा प्रवास करताना अनेक प्रवाशांना वेटिंगचा सामना करावा लागला.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर पुण्याकडे निघालेली पुणे-निजामुद्दीन रेल्वे मंगळवारी दुपारी पुण्यात दाखल झाली. दिल्लीवरून येताना गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. पुण्यातून मंगळवारी रात्री ९.२५ वाजता गाडीने पुन्हा दिल्लीकडे प्रस्थान केले. पुणे-दिल्ली मार्गावरील सर्व गाड्यांना प्रवाशांची चांगलीच गर्दी असते. अपेक्षेप्रमाणे या गाडीला पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता, ती आठवड्यात एकापेक्षा अधिक दिवस चालवावी आणि प्रवासाचा कालावधी दुरांतोच्या धर्तीवर २५ तासांऐवजी १७ तास करण्याची मागणी प्रवाशांतर्फे करण्यात आली.
सध्या पुणे- दिल्ली या मार्गासाठी दुरांतो एस्क्प्रेस ही वातानुकुलीत गाडी आहे. झेलम एक्स्प्रेसने दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता आणखी एक गाडी सुरू करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-निजामुद्दीन गाडीला प्रवाशांचा चांगलाचा प्रतिसाद लाभण्याची शक्यता आहे. प्रवाशांची संख्या पाहता या गाडीला १७ ऐवजी २४ डबे जोडावेत, त्यामुळे वेटिंगवरील प्रवाशांना आरामदायी प्रवासाची संधी मिळेल, तसेच, ही गाडी दररोज सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.
-----
पुणे-हावडा कधी?
पुण्याला रेल्वेचा १६५ वर्षांचा इतिहास असून, मुंबई पाठोपाठ पुण्यात मोठ्या संख्येने रेल्वेद्वारे प्रवासी येतात. मात्र, मुंबईच्या तुलनेत पुण्याला रेल्वे गाड्या देण्यात आलेल्या नाहीत. रेल्वेच्या २०१४-१५ च्या अर्थसंकल्पामध्ये पुणे-निजामुद्दीन गाडीसह पुणे-हावडा गाडीही मंजूर करण्यात आली होती. पुणे-निजामुद्दीन सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-हावडा गाडी कधी सुरू करणार, असा प्रश्न रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसएमएस’नेही मिळणार निकाल

$
0
0

तीन जूनपासून मिळणार छापील गुणपत्रिका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. वेबसाइटवरून हा निकाल पाहण्यासोबतच विद्यार्थ्यांना एसएमएसच्या आधारेही या निकालाची माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, यंदा एकूण १३ लाख ८८ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये ७ लाख ८२ हजार १८१ विद्यार्थी, तर ६ लाख ६ हजार २८६ विद्यार्थिनींचा समावेश होता. या सर्व विद्यार्थ्यांनी १८ फेब्रुवारी ते २८ मार्च या काळामध्ये राज्यभरातील एकूण दोन हजार ५८१ केंद्रांवरून बारावीची परीक्षा दिली होती. या सर्व विद्यार्थ्यांना आपला ऑनलाइन निकाल बुधवारी दुपारी जाणून घेता येईल. येत्या ३ जूनला विद्यार्थ्यांना आपापल्या कॉलेजांमधून छापील गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे.
..
गुणपडताळणी आणि छायाप्रतीची सुविधा लगेचच
विद्यार्थ्यांना यंदापासून ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठीचे अर्ज भरता येतील. त्यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. गुणपडताळणीसाठीचा अर्ज आणि वेबसाइटवरील निकालाची अटेस्टेड प्रत २६ मे ते ४ जूनपर्यंत योग्य ते शुल्क भरून विभागीय मंडळाकडे सादर करावा लागेल. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जूनदरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील.
..
पूनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत आवश्यक
ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचे पूनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांनी संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागविणे गरजेचे आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत पूनर्मूल्यांकनाचा अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. या विषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
...
क्लास इम्प्रुव्हमेंटसाठी दोन संधी
सर्व विषय घेऊन बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी क्लास इम्प्रुव्हमेंट योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध आहे. त्यानुसार विद्यार्थी सर्व विषयांसह जुलै २०१६ आणि फेब्रुवारी- मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षा देऊ शकतील.
..
जुलैमध्ये फेरपरीक्षा
यंदापासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही जुलैमध्ये फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. जुलै २०१६ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरावे लागणार आहेत. या विषयीची सविस्तर माहिती मंडळाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकामध्ये मंगळवारी ही माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज बारावीचाऑनलाइन निकाल

$
0
0
राज्य बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल आज, बुधवारी (२५ मे) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. www.mahresult.nic.in या वेबसाइटसह अन्य पाच वेबसाइट्सवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन जाणून घेता येईल. ३ जूनला दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेजमधून निकालाच्या छापील गुणपत्रिकांचे वाटप होणार आहे.

नदीपात्रात आढळले धडावेगळे शिर

$
0
0

पुणे : शिवाजी पुलाजवळ मुठा नदीपात्रात एका अनोळखी पुरूषाचे धडावेगळे शीर पाण्यात तरंगताना मंगळवारी दुपारी आढळून आले. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी परिसरात शरीराचा उर्वरित भाग शोधण्यासाठी पाहणी केली. पण, तो सापडला नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुठा नदीपात्रात शिवाजी पुलाजवळ ४० ते ४५ वर्षांच्या एका पुरूषाचे शिर पाण्यावर तरंगत असल्याचे एका नागरिकाला दिसले. या व्यक्तीने घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षास दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्रातील गवताला शीर अडकल्याचे दिसून आले. पोलिस निरीक्षक हिरामण शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलातील जवान, पोलिसांनी नदीपात्र तसेच सभोवतालच्या परिसर पिंजून काढला. तसेच, सापडलेल्या शीराच्या धडाचा शोध घेतला मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. चार ते पाच दिवसांपूर्वी या व्यक्तीचा खून झाला असल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येत आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नदी पात्रातील शीर पाण्याबाहेर काढून पुढील तपासणीसाठी रूग्णालयात पाठवून दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्किझोफ्रेनिया’चे पेशंट उपचाराविना

$
0
0

स्कार्फ संस्थेच्या संचालिका डॉ. आर. थारा यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्किझोफ्रेनिया'चा पेशंट असलेले कुटुंब मोठे असेल, तर कुटुंबातील व्यक्ती त्याच्या आजाराकडे दुर्लक्ष करते. आजार झाला आहे असे मान्य करीत नसल्यानेच पेशंट उपचारापासून वंचित राहतात, अशी खंत चेन्नईच्या स्किझोफ्रेनिया रिसर्च फाउंडेशनच्या संचालिका डॉ. आर. थारा यांनी व्यक्त केली. कुटुंबीयांमध्ये संवाद असायला हवा. संवाद नसेल तर असा आजार डोके वर काढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) संस्थेच्यावतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्ताने आदित्य पेंडसे यांच्या स्मृती व्याख्यानप्रसंगी 'मानसिक आजार, पेशंटची काळजी घेणे आणि सुधारणा' या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे माजी सचिव केशव देसीराजू उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अमृत कुमार बक्षी, उपाध्यक्षा नीलिमा बापट उपस्थित होत्या.

'जगात मानसिक आजार अधिक आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होते. मोठ्या कुटुंबातील व्यक्ती पेशंट असेल, तर त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. परिणामी मोठ्या कुटुंबातील असे अनेक पेशंट उपचारासाठी येत नाहीत', असे स्कार्फ संस्थेच्या संशोधनातून पुढे आले आहे. झोपडपट्टीतील गरीब पेशंट उपचारापासून वंचित राहतात, असे डॉ. आर. थारा यांनी सांगितले.

मोठ्या कुटुंबात पेशंटविषयी कलंकाची भावना नसते. हे मोठ्या कुटुंबाचे फायदे आहेत. तर आजारामुळे व्यक्तीची निर्मितीक्षमता कमी होते. उपचारासाठी ते डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे आजाराची तीव्रता वाढते असे तोटेही आहेत. अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना त्याचे किंवा तिचे लग्न करावे की नाही याबाबत संभ्रम निर्माण होतो. लग्न झालेच तर मुले होऊ द्यायची की नाही, हा प्रश्नही सतावतो, अशीही निरीक्षण डॉ. थारा यांनी या वेळी नोंदविली. कार्यक्रमाचे प्रास्तविक अभय केले यांनी, तर सूत्रसंचालन स्मिता गोडसे यांनी केले. मीरा करुणाकरन यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग

$
0
0

८७.५० लाखांच्या खर्चाला मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील पाणीकपातीच्या संकटावर मात करण्यासाठी पावसाचे पाणी साठविण्याचा निर्णय पालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या ७४ इमारतींवर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यंत्रणा उभारण्यासाठी ८७ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे पालिकेच्या मालकीच्या इमारतींच्या सहा लाख चौरसफूट छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.
शहरात गेल्या काही वर्षांपासून पाण्याची टंचाई जाणवते. पाण्याचे नियोजन होत नसल्याने पावसाचे पडणारे पाणी वाया जाते. पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग बगिचा आणि अन्य कारणांसाठी व्हावा, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याचे आवाहन महापालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले होते. दर वर्षी निर्णाण होणारा पाणीप्रश्न लक्षात घेऊन राज्य तसेच केंद्र सरकारने ही यंत्रणा बंधनकारक केली. या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये पालिकेच्या इमारतींमध्ये पुनर्भरण करणे आणि बोअरवेल घेण्यासाठी १ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने भवन रचना विभागामार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बोअरवेलच्या कामांसाठी प्रत्येकी ८७.५० लाखांच्या दोन निविदा काढण्यात आल्या होत्या. त्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.

जून अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. महापालिकेच्या इमारती आणि विविध क्षेत्रीय कार्यालय येथील एकूण ७४ ठिकाणी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. योजनेमुळे मिळकतींवरील सुमारे सहा लाख चौरस फुटावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर होणार आहे. छतावर जमा होणारे पाणी गोळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही उभारण्यात येणार आहे. पाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने एकत्रित करून स्क्रीन चेंबर्समध्ये जोडण्यात येणार आहे. साठविलेले पाणी बोअरवेलमध्ये जिरविण्याचेही विचाराधीन आहे. तसेच बोअरवेलच्या माध्यमातून हे पाणी इमारतींच्या स्वच्छतागृहांसाठी वापरण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या मुख्य इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबविण्यात आल्याचे बोडके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेस्ट लक! बारावीचा आज ऑनलाइन निकाल!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी - मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज २५ मे रोजी जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजता निकाल मंडळातर्फे जाहीर करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाइन पाहता येईल. विविध संकेतस्थळांवरही निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे.

या संकेतस्थळांवरून निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल. त्याची मूळ प्रत ३ जूनला दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना वितरीत केली जाईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.

निकाल कुठे पाहाल?

http://mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

http://maharashtra12.knowyourresult.com

www.rediff.com/exams

http://maharashtra12.jagranjosh.com


एसएमएस करा आणि निकाल जाणून घ्या!

एसएमएसद्वारेही विद्यार्थी आपला निकाल जाणून घेऊ शकतात. त्यासाठी बीएसएनएलच्या ग्राहकांनी ५७७६६ या क्रमांकावर mhhsc असा मेसेज पाठविणे गरजेचे आहे. एअरटेल ग्राहकांसाठी ५२०७०११ या क्रमांकावर, तर आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा डोकोमो आदी कंपन्यांच्या ग्राहकांनी ५८८८८१११ या क्रमांकावर MAH12 असा मेसेज पाठविल्यास, त्यांना बारावीचा निकाल जाणून घेता येईल, असे मंडळाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्रेडवर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट हे दोन्हीही घटक ५० पीपीएमपर्यंत वापरण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे या घटकांच्या वापरावर देशात अद्याप बंदी नाही. त्यामुळे राज्यातील ब्रेड संदर्भात बेकरीची तपासणी अथवा कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही,' अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट हे दोन घटक असल्याचे आढळून आले आहे. हे घटक मानवी आरोग्यासाठी घातक असून त्यामुळे कॅन्सर तसेच थायरॉइडचे विकार होण्याचीही शक्यता आहे. 'सेंटर फॉर सायन्स अँड एन्हायर्न्मेंट' या संस्थेने दिल्लीत केलेल्या एका सर्वेक्षणात ३८ ब्रँड्सची तपासणी केली. त्यामध्ये ब्रेडसह पाव, बनपाव तयार बर्गर ब्रेड आणि पिझ्झा बेस यांचा पॅकबंद करण्याआधी अभ्यास करण्यात आला.

या संदर्भात राज्याच्या 'एफडीए'चे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. 'सेंटर फॉर सायन्स अँड एन्हायर्न्मेंट'ने दिलेल्या अहवालात ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या दोन घटकांचा अंतर्भाव केल्याचे आढळून आले आहे. मात्र, ब्रेड तयार करण्यासाठी काही प्रमाणात हे दोन घटक वापरण्याची परवानगी आहे. ५० पीपीएमपेक्षा त्याचे प्रमाण अधिक नसावे, असे मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. काही देशांत हे दोन्ही घटक वापरण्यावर बंदी आहे. या दोन्ही घटकांच्या वापरावर देशात बंदी घालण्यात यावी, अशी संस्थेची मागणी आहे. या घटकाच्या वापरावर बंदी घालण्यात यावी हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे राज्यात ब्रेडसंदर्भात तपासणी अथवा कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही,'अशी माहिती डॉ. कांबळे यांनी दिली.

सेंटर फॉर सायन्स अँड एन्हायर्न्मेंट'ने दिलेल्या अहवालात ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या दोन घटकांचा अंतर्भाव केल्याचे आढळून आले आहे. मात्र, ब्रेड तयार करण्यासाठी काही प्रमाणात हे दोन घटक वापरण्याची परवानगी आहे. ५० पीपीएमपेक्षा त्याचे प्रमाण अधिक नसावे, असे मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. - डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, एफडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहाच्या नावाने तरुणीला एक लाखाला गंडा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी मॅट्रीमोनी साइटवरून ओळख झाल्यावर प्रेमाच्या जाळ्यात ओढले, नंतर विवाहाच्या आमिषाने ठाण्यावरून वाकड येथे आणून उच्चशिक्षित तरुणीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरेश जैन (३८, रा. अंधेरी, मुंबई) असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या संदर्भात ठाण्यातील एका ३१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने विवाह जुळण्यासाठी 'जीवनसाथी डॉट कॉम' या वेबसाइटवर नावनोंदणी केली होती. तरुणीने एमबीएपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तर सुरेश याचे देखील 'जीवनसाथी' नावनोंदणी केली होती. त्यानंतर दोघांची वेबसाइटवरून ओळख झाली. गेल्या दोन महिन्यांपासून दोघे एकमेकांच्या ऑनलाइन संपर्कात होते. संपर्क वाढल्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. दोघांनी लग्न करायचे ठरवले. त्यासाठी सोमवारी (२३ मे) दोघे मुंबईहून पुण्याला आले. तेथून शिर्डीला जावून लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, उशीर झाल्याने दोघेही वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये थांबले. मंगळवारी सकाळी तक्रारदार तरुणीला ब्युटी पार्लरमध्ये जायचे होते. त्यामुळे सुरेश याने तरुणीला दागिने, पैसे रुममध्येच ठेवण्यास सांगितले. सुरेश यानेही थोडेसे पैसे ठेवले. त्यानंतर दोघेही खाली गेले. सुरेश हा पोट दुखत असल्याचे सांगत परत रुममध्ये आला. रूममध्ये येऊन त्याने सगळे दागिने आणि पैसे खिशात घातले. दोघेही परत पार्लरला गेले. तिथे गर्दी असल्यामुळे त्यामुळे तरुणी प्रतीक्षेत थांबली. सुरेश याने तिच्याकडून त्याचा मोबाइल घेतला आणि कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तो तिच्यापासून बाहेर गेला. तेथून त्याने स्वत:चे एटीएम बंद झाल्याची बतावणी करत तिचा एटीएमचा नंबर घेतला. त्यातून ३१ हजार १५० रुपये काढून घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने फिर्यादी तरुणीने सुरेशला फोन केला असता त्याचा मोबाइल बंद होता. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुरेश याने सोन्याचे दागिने, चांदी, एटीएम कार्ड, ३३ हजाराची रोकड असे एक लाख १८ हजार १५० रुपयांची ऐवज घेऊन पोबारा केला. पोलिसांकडे सध्या सुरेशच्या आधार कार्डवरील फोटो आहे. मात्र, नाव वेगळेच असल्याचे पोलिसांनी सांगितले. फौजदार व्ही. बी. बढे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीतील १३ शाळांचा शतप्रतिशत निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा पिंपरी-चिंचवडचा निकाल ८९.१९ टक्के, तर मावळ तालुक्याचा ८३.५३ टक्के निकाल लागला आहे.
पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यातील १३ ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये एसएनबीपी ज्युनिअर कॉलेज (रहाटणी), क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेंट ऊर्सूला ज्युनिअर कॉलेज (आकुर्डी), हिरोजन इंग्लिश मीडिस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रामचंद्र गायकवाड विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज (दिघी), कमलनयन बजाज ज्युनिअर कॉलेज (चिंचवड), अमृता ज्युनिअर कॉलेज, शिवभूमी विद्यालय (यमुनानगर-निगडी), निर्मल बेधानी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (काळेवाडी), के. जे. गुप्ता ज्युनिअर कॉलेज (चिंचवड) यांचा, तर मावळमधील ऑल सेंट चर्च हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (लोणावळा), श्री पद्मावती ज्युनिअर कॉलेज (ऊर्से) आणि जैन ज्युनिअर कॉलेज (तळेगाव दाभाडे) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचे भीक मांगो आंदोलन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी राज्यात दुष्काळ परिस्थिती असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवक करदात्यांच्या पैशांतून थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मौजमजा करत असल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने बुधवारी (२५ मे) राष्ट्रवादीसाठी 'भीक मांगो' आंदोलन केले. दौरे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मजेसाठी नागरिकांनी भीक द्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, आमदार गौतम चाबूकस्वार, गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक धनंजय आल्हाट, संपत पवार, विमल जगताप, अश्विनी चिंचवडे, संगीता पवार, नंदकुमार सातुर्डेकर, योगेश बाबर यांनी भाग घेतला. राज्यात दुष्काळ असून, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. परंतु, पावसाळा तोंडावर आला तरी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला नाही. त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेते राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करून हळहळ व्यक्त करीत आहेत. परंतु, या शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेत्यांच्या अगदी उलट वागत असल्याचे चित्र आहे. महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम आणि त्या पक्षाचे बहुतांशी नगरसेवक करदात्यांच्या पैशांतून देश-विदेशात दौरे करीत आहेत. प्रशिक्षण किंवा अभ्यासाच्या गोंडस नावाखाली थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मजा करीत आहेत. या प्रश्नाकडे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने टिका केली होती. परंतु, त्याची पर्वा न करता पदाधिकारी आणि नगरसेवक एकापाठोपाठ एक दौरे आयोजित करीत आहेत. त्यांच्यासाठी भीक मागो आंदोलन केले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक गरीब आहेत, त्यांना खाण्याचीही भ्रांत असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यासाठी नागरिकांनी भीक द्यावे, असे आवाहन शिवसेनेने या वेळी केले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी साहित्य पोहोचणार जगभर

$
0
0





म. टा. प्रतिनिधी मराठी पुस्तकांचे क्षितिज विस्तारत असून ई-बुकच्या माध्यमातून लवकरच ती विविध देशांत सहजतेने पोहोचणार आहेत. 'बुकहंगामा डॉट कॉम' आणि ब्रिटनस्थित 'हेल्प फॉर रायटर्स' या संस्थांमध्ये तसा सहकार्य करार झाला आहे. त्यानुसार मराठी ई-बुक जगभरातील ७० वेबस्टोअर्सच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतील. मराठी आणि भारतीय भाषांतील पुस्तके जगभरात जावी, जगभरातील पुस्तके भारतात सहजतेने उपलब्ध व्हावीत, हे आता स्वप्न राहिलेले नाही. ई-बुकच्या माध्यमातून वितरणातील सहजता निर्माण झाली होती. आता त्यामध्ये हे पुढचे पाऊल पडले आहे. ई-बुकबरोबर ऑडिओ बुक, मराठी गाणी या गोष्टीही या स्टोअरच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहेत. सध्या अनावृत्त रेषा, भावशाची पत्रे, ज्ञानोबा माझा सखा, नाते तुझे नि माझे, रंगुनी रंगात साऱ्या, सकल हृदया, तुझ्याकडे येण्याच्या कविता, एक लफडं विसरता न येणारं, एक पाऊस ही ऑडिओ बुक या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहेत. ई-बुक वितरित करणाऱ्या किंडल, अॅमेझॉनबरोबर इतरही साइट्सवर ही पुस्तके उपलब्ध असणार आहेत. पुढील काळात सबटायटल देऊन मराठी व्हिडिओ साँग, लघुपट किंवा वेबसीरिजही याच माध्यमातून जगभर वितरीत करता येतील. या निमित्ताने जगभर विखुरलेल्या मराठीजनांना प्रस्थापित लेखकांबरोबर नव्या लेखकांच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेता येईल. हा सहकार्य करार असल्यामुळे हेल्प फॉर रायटर्सकडील पुस्तके ई-बुक रूपाने भारतात वितरीत करण्याचे काम बुकहंगामा करणार आहे. भारतीय संगीत जगभरात पोहोचविणाऱ्या अवर्स म्युझिक या संस्थेची हेल्प फॉर रायटर्स ही शाखा आहे. यू. के. इंडिया बिझनेस काउन्सिलच्या माध्यमातून या दोन संस्थांत हा करार झाला. जगभरात मराठी माणूस आहे. त्यांच्यापर्यंत साहित्यकृती पोहोचल्या पाहिजेत. ही सांस्कृतिक वीण घट्ट झाली पाहिजे, असे आम्हाला वाटत होते. त्या दिशेने हे पाऊल पडले आहे, असे बुकहंगामाचे संचालक विक्रम भागवत यांनी सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात साहित्याचा ’काव्यकस्तुरी’तून मागोवा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा अशा संतांनी रचलेल्या कवितांपासून ते मराठी साहित्यातील दिग्गज लेखकांच्या कविता एकाच पुस्तकात आणण्याचा एक आगळावेगळा प्रयोग 'काव्यकस्तुरी' या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. परमेश्वर उमरदंड या लातूरच्या कवीने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. नुकतेच पुण्यात झालेल्या कार्यक्रमात या पुस्तकाचे ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सुप्रिया अत्रे, उमरदंड या वेळी उपस्थित होते. संत साहित्यातील निवडक कविता तसेच मराठी साहित्यातील शिरोमणी म्हणता येतील अशा दिग्गज लेखकांच्या कविता या काव्यसंग्रहात वाचायला मिळणार असून, मराठी भाषेच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार आहे. चव्हाण म्हणाले, 'कवितासंग्रहामध्ये ज्ञानेश्वरांपासून ते आजच्या पिढीतील समाधान पाचापोळ, शाम बदलापुरे अशा कवींच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकाच्या रूपाने गेल्या सात शतकातील साहित्याचा एकत्रित मागोवा घेण्यात आला आहे.' परमेश्वर उमरदंड म्हणाले, 'सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर हे पुस्तक प्रकाशित करता आले. संतांच्या कवितांपासून ते अगदी आजच्या पिढीच्या कवीच्या कविता वेचून काढणे कठीण काम होते. त्यासाठी रात्रंदिवस महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य मिळवले. अनेक लेखकांचे साहित्य त्यांच्या घरी जावून मिळवावे लागले. समाजसेवेच्या अंगाने वाढलो असल्याने मराठी साहित्यासाठी काहीतरी करावे, असा विचार मनात आला आणि हे पुस्तक तयार झाले. यासाठी शिवाजी भोसले, शिवाजी सावंत, सुरेश भट यांच्याकडून प्रेरणा मिळाली,' असे उमरदंड यांनी नमूद केले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवीगाळ करणाऱ्या सरपंचांविरोधात गुन्हा

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, पिंपरी माजी राष्ट्रपतींची मुलगी अध्यक्ष असलेल्या शैक्षणिक संकुलाच्या जागेतील बांधकाम आणि वृक्षतोड करणाऱ्या कामगारांना शिवीगाळ करत गोंधळ घालणाऱ्या जांबे गावच्या सरपंचासह १५ जणांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शैक्षणिक संकुल ट्रस्टचे सचिव दिलीपसिंग सोलंखी (२५, रा. किर्तीनगर, सांगवी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची मुलगी ज्योती राठोड या अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र उद्यम महिला ट्रस्टला जांबे येथील २० एकर जागा सरकारने दिली आहे. गेल्या आठवड्यापासून शैक्षणिक संकुल विकसनाचे काम सुरू झाले आहे. त्यात अडथळा ठरणाऱ्या काही वृक्षांची तोड करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक परवानगी ट्रस्टने घेतली आहे. परंतु, ही वृक्षतोड बेकायदा असल्याचा आरोप करत जांबेचे सरपंच अंकुश गायकवाड पंधरा नागरिकांसह मंगळवारी (२४ मे) दुपारी एकच्या सुमारास तिथे गेले. सोलंखी यांच्यासह वृक्ष तोडणाऱ्या कामगारांना शिवीगाळ करत काम थांबविले. त्यावरून गोंधळ सुरू झाला. ट्रस्टसह इतर लोकांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार पी. पाटील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्दम्य इच्छाशक्तीचा विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'परिस्थितीमुळे अकरावीपासून तसं कॉलेजला जाता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे नाइट स्कूलला अॅडमिशन घेतलं. बारावीला ८३ टक्के मिळालेत म्हटल्यावर आता घरचेही खूष आहेत. मला पुढे बी. कॉम. करून लॉ करायची इच्छा आहे. बघूयात कसं जमतंय ते...' सुनील लक्ष्मण ढेबे सांगत होता.
पूना नाइट हायस्कूल आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या सुनीलला यंदा बारावी कॉमर्सला ८३.६९ टक्के गुण मिळाले आहेत. राज्य बोर्डाने बुधवारी जाहीर केलेल्या ऑनलाइन निकालानंतर सुनीलने या निकालाविषयीच्या आपल्या भावना पत्रकारांसमोर मांडल्या.
सुनील म्हणाला, 'मी जनता वसाहतीमध्ये राहतो. घरी दादा आणि वहिनी असतात. दहावीपर्यंतचे शिक्षण लक्ष्मीनगरमधील हिरे हायस्कूलमध्ये घेतले. त्यानंतर पुढे काम करत करत शिक्षण घेण्याचे ठरविले. त्यानुसार सध्या शुक्रवार पेठेमध्ये अॅड. एन. बी. खासनीस यांच्याकडे ऑफिसबॉय म्हणून काम करत आहे. दिवसा काम आणि रात्री कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास, असा क्रम गेली दोन वर्षे सांभाळून बारावीची तयारी केली. निकाल पाहता या मेहनतीचे चीज झाले असे वाटते.' आपल्या या यशाबद्दल तो वर्गशिक्षक अविनाश ताकवले यांचे आभार मानायला विसरत नाही. या पुढे बी. कॉम आणि त्यानंतर लॉ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्याने बुधवारी सांगितले. सुनिलच्या कॉलेजमधून तानाजी धिंडले आणि अनिकेत कदम यांनीही अनुक्रमे ७९.३८ आणि ७२.७६ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण होण्यात यश मिळविल्याची माहिती कॉलेजकडून देण्यात आली.

शेख साहिल सलीमला ७३ टक्के

दोन्ही हात नसलेल्या येरवड्यातील साहिल शेख या विद्यार्थ्यानेही यंदा बारावीच्या परीक्षेत ७३ टक्के गुण संपादित केले आहेत. त्याच्या या यशाबद्दल शिवसेनेतर्फे बुधवारी त्याचा खास सत्कार करण्यात आला. साहिल आणि त्याचे वडील सलीम शेख यांचा मिठाई आणि बुके देऊन या वेळी सन्मान करण्यात आला. शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक नितीन भुजबळ, विकास शितोळे, संजय चांधेरे, पांडुरंग देवकर आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images