Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नव्या विमानतळाचे ‘टेकऑफ’ केव्हा?

0
0

गेले दशकभर घोंगडे भिजत; जागेवरच अडले घोडे

Dhananjay.Jadhav@timesgroup.com

पुणे : 'पुणे तिथे काय उणे' असे अभिमानाने म्हटले जायचे, पण आता परिस्थिती बदलत चालली आहे. 'पुणे तिथे उणेच उणे' असे म्हणण्याची वेळ आली आहे. एखाद्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर त्यावर साधकबाधक चर्चा होऊन तो तत्काळ मार्गी लागला, अशी आशा बाळगणे निव्वळ व्यर्थ आहे. शहरातील मेट्रो, रेल्वेसह रिंग रोडसारखे अनेक प्रकल्प केवळ कागदावरच असताना, गेले दशकभर चर्चेत असलेला पुण्याचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळही त्याच रांगेमध्ये आहे.

मुंबईचा नवा विमानतळ येत्या दोन वर्षांमध्ये टेकऑफ घेणार आहे. शिर्डीचा डोमेस्टिक विमानतळही तयार झाला. भविष्यात तेथून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू होईलही; पण पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काय? या विमानतळाची गरज सर्वांनाच भासते आहे. परंतु, तो उभारण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही, ही शोकांतिका आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा झाली. त्यानंतर एका उच्चस्तरीय बैठकीत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्याला हिरवा कंदील दाखविला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळाच्या उभारणीतील अडथळे दूर झाले, त्याचे काम लवकरच सुरू होणार अशी घोषणा केली. त्यामुळे हा विमानतळ लवकरच टेकऑफ घेणार अशा आशा पल्लवित झाल्या. काँग्रेस आघाडीचे सरकार गेले आणि विमानतळाची चर्चा थांबली. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकर मार्गी लावणार असे जाहीर केले. तरीही, गेली दीड वर्षे या विमानतळाचे घोडे जागा निश्चितीवरून अडले आहे.

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २००७मध्ये प्रस्ताव तयार करण्यात आला. विमानतळासाठी खेडमधील चाकण परिसराची निवड करण्यात आली. विमानतळाच्या घोषणेनंतर चाकणमधील जमिनीचे भाव गगनाला भिडले. औद्योगिक वसाहतीमुळे नावाला आलेला हा परिसर विमानतळामुळे आणखी विस्तारणार याची कल्पना स्थानिकांना आली. विमानतळ होणार यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय या भागात आले. त्यानंतर या विमानतळाच्या जागेला विरोध सुरू झाला. या भागातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे विमानतळाच्या जागेचा प्रस्ताव बदलण्यात आला. चाकणऐवजी हा विमानतळ चांदूस गावानजीक नेण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. विमानतळासाठी हालचाली सुरू झाल्यावर तेथील शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला. अर्थात त्याच्या मागे काही राजकीय व्यक्तींचा हात होता. या जागेलाही विरोध झाल्यावर खेडमधील विशेष आर्थिक क्षेत्राची (सेझ) जागा विमानतळासाठी निवडण्याचा प्रस्ताव समोर आला. खेडच्या सेझसाठी शेतकऱ्यांची जागा संपादित करण्यात आली होती. हा सेझ रद्द झाल्याने त्यावर विमानतळाचा प्रस्ताव करण्यात आला. परंतु, सेझ होणार नसले तर जागा परत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांना सेझची जागा परत करणे शक्य नसल्याने विमानतळाची ही जागा सुद्धा सोडावी लागली. विमानतळाला विरोध होण्यामागे राजकीय कारणे असल्याचे समोर आल्याने खेडमधून विमानतळ हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या. त्यासाठी जेजुरी, चौफुला तसेच शिक्रापूर येथील नव्या जागांची पाहणी करण्यात आली. मात्र, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने खेडमध्ये विमानतळ उभारण्याला पसंती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा जागेचा शोध घेऊन खेड तालुक्यातील कोये-पाईट-केंदूर, रौंदळवाडी या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला. विमानतळ प्राधिकरणाकडून या जागेची पाहणी झाली आणि त्याला पसंतीही मिळाली. काही तांत्रिक बाबींमुळे विमानतळाला अडसर येत असल्याने हा प्रस्ताव थांबला होता. परंतु, प्राधिकरणाच्या समितीने नुकतीच पुन्हा पाहणी करून विमानतळाचा तांत्रिक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे त्याचा अहवाल सादर होईल आणि विमानतळाच्या जागेवर शिक्कामोर्तब होईल.

राजकीय इच्छाशक्तीच हवी

आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्याची जागतिक कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी गरजेचे आहे. पुण्यात येणारे बहुराष्ट्रीय उद्योग, हिंजवडीचा आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर अशा प्रकल्पांचे यश हे विमानतळ पूर्ण होण्यावर अवलंबून असणार आहे. या विमानतळामुळे विकासाचा मार्ग खुला होण्याबरोबरच पुणे आणखी ग्लोबल होण्यास मदत होणार आहे. पुणे तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उणे आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. नागपूरएवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक लक्ष पुण्यावर असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. त्यांनी आता आपले हे बोलणे सत्यात उतरवून दाखवावे आणि पुण्याचा नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर टेकऑफ घेईल यादृष्टीने इच्छाशक्ती दा‍खविणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका निवडणुकीत भाजप स्वतंत्रच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये चार सदस्यांचा प्रभाग करून लढण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून सर्व प्रभागांमध्ये स्वतंत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच रविवारी तसे स्पष्ट संकेत दिले असून, शिवसेनेसोबत युतीचा विचार न करता सर्व प्रभागांमध्ये तयारी करा, असा सूचक सल्ला त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिला.

दानवे एका कार्यक्रमानिमित्त रविवारी पुणे दौऱ्यावर होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी दुपारी पक्षाच्या शहर कार्यालयाला भेट देऊन, कार्यकर्त्यांनी मनमोकळा संवाद साधला. आगामी पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती होईल की नाही, हे अखेरच्या क्षणापर्यंत निश्चित होत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते. त्यापेक्षा, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये युतीचा कोणताही विचार न करता सर्व प्रभागांमध्ये आपल्याला स्वतंत्र लढायचे आहे, या दृष्टीने तयारी करा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेपेक्षा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे. त्याच्या कार्यकर्त्यांनी फायदा करून घ्यायला हवा आणि या निवडणुका जिंकण्यासाठी तयारी सुरू करा, असेही त्यांनी नमूद केले. पालकमंत्री गिरीश बापट, संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, प्रदेश चिटणीस धीरज घाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील दहा महापालिकांमध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकत्र लढायच्या की स्वतंत्र यावरून भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये द्विधा मनस्थिती आहे. स्थानिक स्तरावर निवडणुकीत युती करायची की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल, असे सूतोवाच यापूर्वी भाजपने केले होते; तर शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते.

महिनाअखेरपूर्वी ठरणार कार्यकारिणी

दोन महिन्यांपूर्वी शहर भाजपच्या अध्यक्षपदी योगेश गोगावले यांची निवड करण्यात आली. त्यानंतर, उर्वरित कार्यकारिणीची निवडही तातडीने होईल, अशी अपेक्षा होती. ती अद्याप अपूर्ण असल्याने शहर भाजपसह आठ मंडलांची कार्यकारिणी, सात मोर्चे आणि इतर आघाड्या अशा सर्व नियुक्त्या ३० मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दानवे यांनी शहराध्यक्ष गोगावले यांना दिले. शहरातील सर्व नियुक्त्या पूर्ण झाल्यानंतर सुमारे तीन हजार कार्यकर्त्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळेल; परंतु त्यासाठी जबाबदारी पेलण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी द्या, असेही त्यांनी बजावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात वाढते आहे ‘सीबीएसई’चे ग्लॅमर

0
0

Yogesh.borate @timesgroup.com

पुणे : राज्यात गेल्या पाच वर्षांत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न शाळांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. 'सीबीएसई'च्याच अधिकृत माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये सन २०१२ मध्ये एकूण ४१८ शाळा सीबीएसई बोर्डाशी संलग्न होत्या. 'यू-डाएस'च्या यंदाच्या वर्षासाठीच्या आकडेवारीनुसार, राज्यातील सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांची संख्या ८२४वर पोहोचली आहे. त्यामध्ये ५५० माध्यमिक, तर २७४ उच्च माध्यमिक शाळा आहेत.

सन २०१२ मध्ये ४१८ शाळा 'सीबीएसई'शी संलग्न होत्या. त्यात ३२९ खासगी शाळांचा समावेश होता. सन २०१५ मध्ये 'सीबीएसई'शी संलग्न शाळांची संख्या ६०६ इतकी झाली. त्यामध्ये ४४८ खासगी शाळा होत्या. राज्यातील हा ट्रेंड पुण्यामध्येही पाहायला मिळत असून, अनेक नामांकित शाळांनी राज्य बोर्डाकडून सीबीएसई बोर्डाकडे वळण्याच्या हालचाली सुरू आहेत.

'सीबीएसई'च्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यानुसार, राज्याचा यंदाचा निकाल ९३.४७ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी हा निकाल ९१.९४ टक्के इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची वाढलेली टक्केवारी 'सीबीएसई'च्या शाळांच्या गुणवत्तेचे प्रतिबिंब असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये पालक वर्गही आपल्या पाल्यांना 'सीबीएसई'शी संलग्न शाळांमध्ये प्रवेश देण्यास पसंती देत आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या 'नीट'; तसेच 'जेईई-मेन'सारख्या परीक्षांसाठी 'सीबीएसई'चा अभ्यासक्रम असल्यानेही 'सीबीएसई' बोर्डाच्या शाळांची मागणी वाढत आहे.

राज्यातील 'सीबीएसई'च्या शाळांची आकडेवारी

वर्ष - एकूण शाळा - केंद्रीय विद्यालये - सरकारी शाळा - खासगी - जवाहर नवोदय विद्यालये

२०१५ - ६०६ - ५६ - ३३ - ४४८ - ३३

२०१४ - ५४२ - ५४ - २९ - ४२७ - ३२

२०१३ - ५०२ - ५४ - ५ - ४११ - ३२

२०१२ - ४१८ - ५३ - ४ - ३२९ - ३२

शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठीची राज्यातील शाळांची आकडेवारी

राज्यातील एकूण शाळा - १ लाख ०७ हजार ६२४

बोर्ड - सीबीएसई - राज्य बोर्ड - आयसीएसई - आयबी

माध्यमिक - ५५० - २०,३१२ - १९९ - १९

उच्च माध्यमिक - २७४ - ८,१९४ - ४३ - २६

('यू-डाएस'च्या आकडेवारीनुसार)

पालकांकडून होत असलेली मागणी, दर्जा आणि उपयुक्तता या बाबींमुळे शाळा 'सीबीएसई' बोर्डाचा विचार करू लागल्या आहेत. शहरातील काही शाळांनी गेल्या काही काळात सीबीएसई बोर्डाशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा सेवासदन संस्थेनेही त्यासाठी अर्ज केला आहे. पालकांना पर्याय उपलब्ध असल्यास, ते 'सीबीएसईची' निवड करीत आहेत.

- चिंतामणी पटवर्धन, नियामक मंडळ सदस्य, सेवासदन संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्वचेच्या विकारावर घरगुती उपचार नको’

0
0

पुणे : केसांची गळती, केसांचे तुटणे, कोणत्या प्रकारचा शॅम्पू वापरावा इथपासून ते कोड, सोरिअॅसिस, जळवातसारखे त्वचेचे आजार बरे होतात का इथपर्यंत विविध प्रश्नांची उत्तरे त्वचारोग तज्ज्ञांनी दिली. त्यावेळी त्वचेच्या आजारावर घरगुती, ऐकीव उपचार करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
'महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन'च्यावतीने 'त्वचारोग तज्ज्ञ तुमच्या भेटीला' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी डॉ. शीला घारपुरे उपस्थित होत्या. त्वचारोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. शरद मुतालिक, सचिव डॉ. धनश्री भिडे यांनी मार्गदर्शन केले. 'त्वचेच्या आजाराबाबत नागरिकांमध्ये गैरसमज आहेत. त्वचेतील रंगपेशी नष्ट झाल्याने कोडाचा आजार बळावतो. शरीरातील अॅन्टीबॉडीज त्वचेतील रंगपेशी नष्ट करतात. त्यामुळे त्वचेचा रंग नाहीसा होऊन पांढरे डाग दिसतात. त्वचेच्या आजारावर घरगुती उपचार करू नयेत. मित्रमैत्रिणी, नातेवाइकांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे प्रिस्क्रिप्शनशिवाय मलम वापरू नयेत,' असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरद मुतालिक यांनी दिला. सोरिअॅसिस हा संसर्गजन्य आजार नाही. कोडासंदर्भात परदेशात फारसे उपचार होत नाहीत, असे ते म्हणाले. डॉ. धनश्री भिडे म्हणाल्या, 'केस गळतीचे कारण शोधून काढल्याशिवाय त्यावर कोणते उपचार करावेत हे सांगता येत नाही. गळती रोखण्यासाठी आहारात बदल करावा. मेथी, गूळ, खजुरासारख्या पदार्थांचा आहारात समावेश ठेवावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांना लावलेले जॅमर चोरीला

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांना लावलेले जॅमरच उचकटून नेल्याच्या दोन घटना शहरात घडल्या. फरासखाना आणि मुंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. सुभाष वाळके या पोलिस कर्मचाऱ्याने या प्रकरणी फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. बुधवार पेठ सावजी इरजी वैद्य या दुकानासमोरीला रोडवर गस्त घालता असताना फिर्यादींना एक रिक्षा नो ​पार्किंगमध्ये पार्क केलेली आढळली. त्यांनी रिक्षेच्या पुढील चाकाला पिवळ्या रंगाचे जॅमर लावले होते. ते चोरून नेण्यात आले, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मुंढवा पोलिस स्टेशन येथे विजय शिंदे या पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी वाहतुकीचे नियमन करीत असताना रागा लॉन्ससमोरील रोडवर दोन कार वाहतुकीला अडथळा होईल, अशा प्रकारे पार्क करण्यात आल्या असल्याचे त्यांना आढळले. रविवारी या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यांनी दोन्ही कारच्या पुढच्या चाकाला जॅमर लावले होते. ते चोरून नेण्यात आले, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचे प्रवासी घटले

0
0

Harsh.Dudhe
@timesgroup.com

पुणे : ऐन सुट्टीच्या काळात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांच्या संख्येत ५.८७ टक्क्यांची घट झाली आहे. ही घट केवळ १ ते २० मे दरम्यान म्हणजेच २० दिवसाची असून, त्यामुळे सुमारे ४२ कोटी २० लाख रुपयांचे महसुली उत्पन्न घटले आहे. एसटीची प्रवासी संख्या औरंगाबाद विभागात सर्वाधिक म्हणजे सुमारे ७.१० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळाच्या तीव्र झळा नागरिकांबरोबरच आता एसटीला बसत असल्याचे चित्र आहे.
राज्यात एसटीच्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशा सहा प्रादेशिक विभागात प्रवासी संख्येत ४ ते ७ टक्क्यांची घट झाली आहे. राज्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त भाग हा औरंगाबाद विभागात आहे. त्यामुळे विभागातील औरंगाबाद, बीड, लातूर, जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतील प्रवासीसंख्या कमालीची घटली आहे. औरंगाबाद विभागात एसटीच्या प्रवासी संख्येत ७.१० टक्क्यांची अधिक घट झाल्याने महसुली उत्पन्नात ९ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत ८ टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी संख्या घटली आहे. नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत सुमारे ८ टक्के प्रवासी संख्या घटली आहे. जळगाव जिल्ह्यांत देखील प्रवासी संख्येत ८ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. नाशिक विभागात प्रवासी संख्येत सुमारे ६.९२ टक्के कमी झाल्याने ९ कोटी ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विदर्भातील अमरावती विभागात ५.८१, नागपूर विभागात ६.०५ आणि नाशिक विभागात ६.९२ टक्क्यांनी प्रवासी संख्या मंदावली आहे.

पुण्यातही संख्या रोडावली

मुंबई विभागातील मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत प्रवासी संख्या कमी होण्याचे प्रमाण इतर विभागांच्या तुलनेत कमी आहे. एकंदरीत मुंबई विभागात सुमारे साडेचार टक्क्यांनी प्रवासी संख्या कमी झाली आहे. या तुलनेत पुणे विभागात प्रवासी संख्या ५ टक्क्यांनी रोडावली आहे. मात्र, विभागात मोडणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांपेक्षा पुणे जिल्ह्यात प्रवासी संख्या कमी होण्याचे प्रमाण अधिक असून ते ६.४८ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-निजामुद्दीन एसी एक्स्प्रेस सेवेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-दिल्ली मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांची संख्या येत्या काळात वाढविण्यात येणार आहे,' असे आश्वासन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी दिले.

प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर मागणी असलेली पुणे-हजरत निजामुद्दीन वातानुकुलीत एक्स्प्रेस सोमवारी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. प्रभू यांनी मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखविला. या वेळी ते बोलत होते. येत्या काळात या गाडीला आणखी नवीन डबे लावले जाणार आहेत.

ही रेल्वेगाडी पुण्यात दाखल झाल्यानंतर आज, मंगळवारी रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे. ती दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता हजरत निजामुद्दीनला पोचेल. ३१ मेपासून या गाडीच्या नियमित फेऱ्या सुरू होणार आहेत. या रेल्वेगाडीला एक प्रथम श्रेणी, पाच द्वितीय श्रेणी, आठ तृतीय श्रेणीचे वातानुकुलीत आणि एक पॅन्ट्री कार असे एकूण १५ डबे आहेत. लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा अशा आठ ठिकाणी थांबे दिले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वीच्या रेल्वे बजेटमध्ये या गाडीची घोषणा केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. पुरी, पाटणे यांना भारदे पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार यंदा सामाजिक कार्यासाठी डॉ. सुभाष पुरी, समाज प्रबोधन कार्यासाठी डॉ. यशवंत पाटणे आणि गांधीविचार कार्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आमटे यांना सोमवारी जाहीर झाला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि राज्याच्या जलसंपदा विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ मे रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अजय भारदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

बाळासाहेब भारदे यांच्या जयंतीनिमित्त २७ मे रोजी 'महाराष्ट्र पाणीप्रश्न आणि माझी जबाबदारी' या विषयावर विजय बोराडे आणि अमरिश पटेल यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच २८ मे रोजी 'महाराष्ट्र-संयुक्त की विभक्त' या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मंत्री नाना एंबडवार, जयंत पाटील, तसेच भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे, ज्येष्ठ पत्रकार अनंत दिक्षित सहभाग घेणार आहेत. २९ मे रोजी भास्कर नागमोडे दिग्दर्शित 'मराठवाडा २०१६' हा लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. पुरस्कार सोहळा, व्याख्यान आणि परिसंवाद महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरूड येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे, असे भारदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मारहाण करणाऱ्या चार जणांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भांडण सोडवल्याचा राग धरून दहा जणांच्या टोळक्याने हॉटेलची तोडफोड करून मालकाला जबर मारहाण केल्याची घटना वडगाव शेरी येथे शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांचे साथीदार फरार आहेत.

पंकज गोपाळ गवळी (वय २२, सैनिकवाडी, वडगाव शेरी), योगेश संतोष काळे (वय २०, रा. सोमनाथ नगर, वडगाव शेरी), दिनेश दिलीप मांडेकर (वय १९, रा. वडगाव शेरी), रॉनी उर्फ अक्षय सुभाष बनकर (वय २२, रा. वडगाव शेरी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे इतर साथीदार फरार आहेत.

अमोल जाधव (वय २०, रा. तावजीनगर, वडगाव शेरी) याने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथे अमोल जाधव याचे ए. व्ही. चायनिज कॉर्नर आणि त्या शेजारी एक हॉटेल आहे. काही दिवसांपूर्वी जाधवच्या मित्राबरोबर पंकज गवळी याचे या चायनिज कॉर्नरवर भांडण झाले होते. त्यावेळी अमोलने मध्यस्थी करून भांडण सोडवले होते. त्याचा राग गवळीला होता.

पंकज गवळी आणि इतर आरोपींनी शुक्रवारी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास अमोलला पट्ट्याने मारहाण करून, त्याच्या पाठीमध्ये दगड घातला. यात अमोल जखमी झाला आहे. तसेच आरोपींनी हॉटेलचे काउंटर आणि खुर्च्यांची तोडफोड करून पाच हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ई-गव्हर्नन्स’वर केंद्राचा भर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर दिला आहे. सरकारशी संबंधित कामासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात यावे लागू नये. ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून सरकार नागरिकांना सर्व सरकारी सेवा-सुविधा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, हा त्यामागील उद्देश आहे, असे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या सचिव डॉ. अरुणा शर्मा यांनी सांगितले.

प्रत्येक वीस ते पंचवीस हजार नागरिकांमागे किमान एक डिजिटल सेवा केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रामधून नागरिकांना त्यांची सर्व सरकारी कामे ऑनलाइन पद्धतीने करता येतील. स्मार्ट सिटी, स्मार्ट पंचायत या माध्यमातून जमा होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणासाठी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम विकसित करण्यात आली आहे. त्याचा वापर करून त्याआधारे योजना अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे, असे डॉ. शर्मा म्हणाल्या.

केंद्र सरकारकडून मिळणारे सर्व प्रकारचे अनुदान व इतर लाभ थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत आहे. त्यामुळे सरकारची मोठी बचत होत असून ही रक्कम सरकारकडून राज्य सरकारांना विकास कामासाठी देण्यात येत आहे. बँक खाती आधार क्रमांकाशी संलग्न केल्याने त्यातील २६ टक्के दुबार खाती बंद करण्यात सरकारला यश आले आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. डिजिटल साक्षर असणे महत्त्वाचे आहे. सध्या मूक कोर्सेसच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण घेता येणेही शक्य आहे. त्याचबरोबर विविध विषयांचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही ऑनलाइन पद्धतीने करता येऊ शकतात. सध्याच्या काळात कौशल्य विकासालाही महत्त्व आले आहे. त्यासाठीही ऑनलाइन माध्यम पूरक ठरू शकते, असेही डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-लर्निंग स्कूलमध्ये फ्युचर क्लासरूम

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
नॅसकॉम फाउंडेशनतर्फे 'नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन'साठी (एनडीएमसी) पूरक म्हणून येरवड्यातील क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूलमध्ये हॅव्लेट पॅकार्ड कंपनीच्या सहकार्याने फ्युचर क्लासरूमची उभारणी करण्यात आली आहे. या क्लासरूमचे औपचारिक उद् घाटन केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या सचिव डॉ. अरुणा शर्मा यांच्या हस्ते झाले.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार, नॅसकॉम फाउंडेशनचे मु​ख्य ​कार्यकारी अधिकारी श्रीकांत सिन्हा, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.गणेश नटराजन, एचपीई टेक्नोलॉजी सर्व्हिसेसचे सीटीओ एम. लक्ष्मीनारायण राव आणि ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमा गणेश या वेळी उपस्थित होते.

'भविष्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिक डिजिटल साक्षर असणे आवश्यक आहे. तरच सरकारने उपलब्ध केलेल्या विविध ऑनलाइन सोयीसुविधांचा लाभ सर्वांना घेता येईल,' असे डॉ. शर्मा यांनी सांगितले. 'डिजिटल साक्षर व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने सर्व सरकारी व इतर खरेदी-विक्रीसह सर्व कामे करू शकतील,' असे कुणाल कुमार यांनी सांगितले. 'एनडीएलएम अंतर्गत हे पुण्यातील २५ वे केंद्र आहे. २०१८पर्यंत पुण्यातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती डिजिटल साक्षर असावा, यासाठी काम सुरू आहे,' असे डॉ. गणेश नटराजन यांनी सांगितले.

'एचपी'च्या एका शिपिंग कंटेनरचे या क्लासरूममध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या क्लासरूममध्ये १६ क्लाउड एनेबल्ड कम्प्युटर, विविध प्रकारचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अॅप्लिकेशन्स, एलईडी स्क्रीनचा समावेश आहे. 'एचपी'तर्फे व्हिडिओबुक, स्टुडंट इन्फर्मेशन मॅनेजमेंट सोल्यूशन, ऑनलाइन कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर अभ्यासक्रमाची जबाबदारी ग्लोबल टॅलेंट ट्रॅक कंपनीने स्वीकारली आहे. एनडीएलएम अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल माध्यमांची ओळख व वापर शिकविण्यात येईल. तर एचपी लाइफ योजनेअंतर्गत बेरोजगार परंतु, आंत्रप्रेनर बनू इच्छिणाऱ्या युवकांना विविध कौशल्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारीचा संकल्प प्लास्टिकमुक्तीचा

0
0







म. टा. प्रतिनिधी, पिंपरी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या पालखी सोहळ्यातील भाविकांना पाण्याची कमतरता भासू नये, याची खबरदारी घेऊन प्लास्टिकमुक्ती संकल्पनेला बळ मिळावे, अशी अपेक्षा देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानकडून सोमवारी (२३ मे) व्यक्त करण्यात आली. आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात बैठक झाली. अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. देहू संस्थानचे अध्यक्ष शांताराम मोरे, अशोक मोरे, सुनील मोरे, रामभाऊ मोरे तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, नगरसेविका नंदा ताकवणे, गीता मंचरकर, नीलेश पांढरकर, आशा सूर्यवंशी, शैलजा शितोळे, श्रद्धा लांडे-लांडगे, सुरेश म्हेत्रे, जावेद शेख, अरुणा भालेकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहायक पोलिस आयुक्त मोहन विधाते, आरोग्य वैद्यकीय अधिक्षक मनोज देशमुख या वेळी उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांची पालखी २७ जूनला देहूतून प्रस्थान ठेवणार असून, ती पिंपरी-चिंचवडमध्ये २८ जूनला येणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर महराजांच्या पालखीचे २८ जूनला आळंदीहून प्रस्थान ठेवणार आहे. ती २९ जूनला पिंपरी-चिंचवडमध्ये येणार असून, त्याच दिवशी पुण्यात मुक्कामाला राहणार आहे. त्या अनुषंगाने प्रस्थानपूर्व बैठकीत अनेक सूचना करण्यात आल्या. यामध्ये पालखी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, आकुर्डीत मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, महापालिकेच्या आणि खासगी शाळांमध्ये वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था व्हावी, तात्पुरती स्वच्छतागृहे निर्माण व्हावीत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मोबाईल टॉयलेटची संख्या वाढवावी, पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, या सूचनांचा समावेश आहे. 'पिंपरी-चिंचवडमध्ये वारकऱ्यांना फारशी उणीव भासत नाही. मात्र, पोलिस आणि महापालिका प्रशासन यांनी अधिक प्रमाणात सहकार्य करण्याची अपेक्षा आहे,' असे देहू संस्थानच्या विश्वस्तांनी सांगितले. यंदापासून वारकऱ्यांनी सोहळ्यात सहभागी होताना प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळ्या यांचा वापर करू नये. उघड्यावर अन्नपदार्थ टाकू नये. अन्न शिल्लक राहिल्यास जमिनीत खड्डा करून गाडून टाकावे, यासंदर्भात विशेष दक्षता घेण्यात येईल. भाविकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानने केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवण्याची संधी यापूर्वी मिळाली आहे. पुढील वर्षी अधिक मास आणि तिथीत वाढ होणार असल्यामुळे पुन्हा एकदा गोल रिंगण होण्याची शक्यता आहे. त्याची योग्य तयारी व्हावी, अशी अपेक्षा देहू संस्थानकडून बैठकीत व्यक्त करण्यात आली. पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी उद्या मंगळवारी (२४ मे) देहू ग्रामपंचायत येथेही बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी, स्वागतासाठी उपस्थित असलेले भाविक यांच्याकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर होतो. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचते. सजग नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते. त्यांच्या सूचनांचा आदर राखून आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा मान ठेवून वारकरी आणि भाविकांना यंदापासून प्लास्टिकचा वापर करू नये, अशा लेखी सूचना देहू संस्थानकडून दिंडीचालकांना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस असल्याच्या बतावणीने दोघांना लुटले

0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पोलिस असल्याची बतावणी करीत चार ते पाच जणांच्या टोळक्यांने दोघांना भरदिवसा लुबाडले. रविवारी (२२ मे) दुपारी अडीचच्या सुमारास बेंगळुरू-मुंबई महामार्गावर ही घटना घडली. तुलसी मोदी (३२, रा. वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी हे रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास वाकड येथून कामावर जात होते. ते कस्तुरी हॉटेलसमोरून जात असताना चार ते पाच जणांचे टोळके आले. 'आम्ही पोलिस आहोत,' असे म्हणत मोदी यांना आडवले. त्यांच्याकडील दोन मोबाइल, १० हजार रुपयांची रोकड, घड्याळ, बँकेचा चेक आणि सोनसाखळी असा १९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या घटनेत उज्ज्वल संतोष मैत्र हे रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास बेंगळुरू-मुंबई द्रुतगती महामार्गावरून जात होते. ते यारादी हॉटेलसमोरून जात असताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना आडवले. मारहाण करत मैत्र यांच्याकडील ९ हजार ५०० रुपयाची रोकड, एक मोबाइल फोन, घड्याळ असा १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार एस. जी. शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटी अभियंत्यावर खुनी हल्ला; दोघांना अटक

0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी आयटी अभियंत्यावर एका नगरसेविकेच्या पुतण्याने फरशी डोक्यात घालून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी (२२ मे) रात्री विशालनगर येथे ही घटना घडली. सांगवी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय पांडुरंग चौंधे, उदय जगताप या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर सचिन सुभाष रणदिवे (४०, रा. पिंपळेनिलख) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सचिन रणदिवे यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय पांडुरंग चौंधे हा एका नगरसेविका पुतण्या आहे. उदय चौंधे आणि त्यांचे मित्र व अन्य तिघेजण विशालनगर येथील गणपती विसर्जन घाटात दारू प्यायला बसले होते. त्याचवेळी सचिन रणदिवे त्याच्या एका मित्रासह गेले होते. या वेळी उदय चौंधे आणि सचिन रणदिवे यांच्यात येथून का जातो यावरून वाद झाला. ही आमची जागा आहे, तू इथे कशाला आला, असे म्हणत उदय याने सचिन याला दगड मारला. याला प्रत्युत्तरादाखल सचिन याने दगड का मारला, असा प्रश्न केला. यावरून भांडण वाढत गेले तेव्हा उदय याने सचिन याच्या डोक्यावर फरशीने वार करून त्याला जखमी केले. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकरी हे समाजातील व्यंगावरील उपाय : पतंगराव कदम

0
0







म. टा. प्रतिनिधी, पुणे 'समाजातील सध्याची परिस्थिती विदारक आहे. वाढता कौंटुबिक कलह, आर्थिक समस्या, हरवत चाललेली माणुसकी, अशा सामाजिक समस्यांपासून समाजाची सोडवणूक करण्यासाठी वारकरी संप्रदायच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. वारकरी हे समाजातील व्यंगांवरील उपाय आहे,' असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी सोमवारी व्यक्त केले. महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजिण्यात आलेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी झाला. या वेळी कदम बोलत होते. संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बद्रीनाथ महाराज तनपुरे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, पुण्याचे उपमहापौर मुकारी अलगुडे आदी उपस्थित होते. 'संतांचे विचार अंमलात आणल्याने समाजात मोठी क्रांती झाली आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मनःशांती मिळविण्यासाठी तंत्राला अध्यात्माची जोड द्यायला हवी. संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संतांचे विचार आणि तत्त्वज्ञानाला योग्य दिशेने पोहोचवण्याचे काम सुरू झाले आहे. वारकरी संपद्रायामुळे विविध जातीतील लोक एकत्र येतात आणि एकाच ठिकाणी, म्हणजे विठ्ठलचरणी लीन होतात. अनेक शतकांपासून संतांच्या शिकवणीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देखील त्यांनीच यशस्वीपणे पेलली आहे,' असे कदम यांनी सांगितले. 'दुष्काळावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे औचित्य साधून सुमारे पाच लाख झाडांची लागवड व जतन करण्याची मोहीम हाती घेतली आहे,' असे तनपुरे यांनी सांगितले. 'समाजातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याची ताकद वारकरी संप्रदायामध्ये आहे,' असेही ते म्हणाले. या वेळी प्रा. मीरा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. बापूसाहेब महाराज देहूकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंजिनीअरिंगच्या पेपरने पाहिला विद्यार्थ्यांचा कस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेला पेपर विद्यार्थ्यांचा कस पाहणारा ठरला. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवरून रविवारी मिळालेल्या प्रश्नांचा समावेश नसलेल्या प्रश्नांच्याच आधारे सोमवारचा पेपर झाल्याची माहितीही विद्यार्थ्यांकडून मिळाली.
गेल्या काही दिवसांपासून पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षेत गडबड असल्याची ओरड करण्यात येत होती. त्यातच सोमवारी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठीचा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या पेपरचे संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांना रविवारी सकाळीच मिळाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी 'मटा'ला दिली होती. याच शाखेतील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी झालेला ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टीमचा पेपरही परीक्षेपूर्वीच लिक झाल्याची चर्चा असल्याचेही विद्यार्थ्यांनी 'मटा'ला सांगितले होते. या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवरून मिळालेले प्रश्नही 'मटा'ला उपलब्ध करून देण्यासोबतच विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनाही पाठविले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या पेपरमधील प्रश्न आणि व्हॉट्सअॅपवरून आलेल्या प्रश्नांमध्ये कोणतेही साम्य आढळून आले नाही.
या विषयी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पूर्वी या परीक्षेत कधीही विचारण्यात न आलेल्या अनेक मुद्द्यांचा सोमवारच्या प्रश्नपत्रिकेमध्ये समावेश दिसून आला. त्यामध्ये काही मूलभूत संकल्पनांचाही लेखी परीक्षेसाठी विचार झाल्याचे दिसले. केवळ व्हॉट्सअॅपवरून आलेल्या प्रश्नांच्या आधारेच या पेपरची तयारी करून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर बुमरँग ठरल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी नोंदविली. या बाबत विद्यापीठाची भूमिका जाणून घेण्यासाठी परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण आणि कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेय लाटण्यासाठीच बीआरटीचे उद्घाटन

0
0

सर्वपक्षीयांकडून राष्ट्रवादीवर हल्लाबोल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
बीआरटी मार्ग सुरू केल्याचे श्रेय लाटण्यासाठीच पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने घाईघाईने या मार्गाचे उद्घाटन केले. अर्धवट सुविधा उपलब्ध असतानाही मार्गाचे उद्घाटन करण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या सर्व प्रकारांना राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचा आरोप करून काँग्रेस, शिवसेना, भाजपसह मनसेच्या नगरसेवकांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीला कोंडीत पकडले. बीआरटी मार्गावर यापुढील काळात कोणताही अपघात होणार नाही, याची जबाबदारी घेऊन राष्ट्रवादीने हा मार्ग सुरू ठेवावा, अशी भूमिका नगरसेवकांनी सभागृहात मांडली.
नगररोड बीआरटीचे उद्घाटन तीन आठवड्यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अ‌जित पवार यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आले होते. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सोमवारी पालिकेची सभा बोलाविण्यात आली होती. महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.
नगररोड बीआरटी मार्ग सुरू करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे. हा मार्ग सुरू करण्यापूर्वी‍च त्यातील त्रुटी दूर करणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी राष्ट्रवादीने श्रेय लाटण्यासाठी उद्घाटन केल्याचा आरोप सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी करून चांगलेच कोंडीत पकडले. या रोडवर यापुढील काळात होणाऱ्या अपघातांची जबाबदारी राष्ट्रवादीने घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी वगळता सर्वपक्षीय सभासदांनी केली.
श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीने बीआरटी मार्गाचे उद्घाटन केल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी केला. नागरिकांना चांगली सक्षम वाहतूक व्यवस्था देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बीआरटी मार्गावरील अपघातांना महापालिका प्रशासन, पीएमपीएमएल प्रशासन तसेच महापौर जबाबदार असल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केला. या अपघातांची जबाबदारी स्पष्ट करावी, अशी मागणी‌ त्यांनी केली. बीआरटी मार्गावर कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही, वाघोली येथे टर्मिनलचे काम अपूर्ण असतानाही उद्घाटन करण्यात आल्याचे भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी सांगितले. बीआरटीचे काम अर्धवट असल्याचे पत्र पीएमपीने दिलेले असतानाही हट्टासाठी राष्ट्रवादीने हा निर्णय घेतल्याची टीका मनसेचे गटनेते बाबू वागस्कर यांनी केली. राजकारण न करता नागरिकांसाठी चांगल्या प्रकारे बीआरटी कशी करता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा सभागृह नेते शंकर केमसे यांनी व्यक्त केली.
०००००००००००००
बीआरटी मार्गावरील अपघातांमध्ये प्रवाशांच्या अपघाताचा समावेश नाही. चुकीच्या पद्धतीने पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडल्याने अपघात झाले आहेत.
प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लेसर’ऐवजी एलईडी दिवे

0
0

चेहऱ्यावर व्रण, मुरूम असणाऱ्या पेशंटची सर्रास फसवणूक
Mustafa.Attar@timesgroup.com
पुणे : चेहऱ्यावर आलेले मुरूम, व्रण, तसेच खड्डे भरून काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेसर उपचाराच्या नावाखाली चक्क एलईडी दिव्यांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्वचेच्या आजारानुसार कोणत्या प्रकारचे लेसर वापरावे याचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्वचा जळणे, चेहरा खराब होण्याचे प्रकार घडले आहेत.
'सध्या सर्वत्र लेसरद्वारे उपचाराच्या जाहिराती पाहायला मिळतात. एकच लेसरचे तंत्र सर्व आजारावर उपयोगी ठरत नाही. मुरूम, खड्डे, जन्मखुणा, काळे डाग, गोंदण, जन्मापासून लालसर रक्ताचे डाग, चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी विविध प्रकारच्या लेसर उपचारांची गरज असते. परंतु, अनेकदा ब्युटी पार्लरमध्ये लेसर मशिनऐवजी चेहऱ्यावरील डाग, खड्डे, मुरूम काढण्यासाठी इंटेन्स पर्ल्स लाइट अर्थात आयपीएलसारख्या एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येतो,' अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरद मुतालिक यांनी 'मटा'ला दिली. लेसर उपचारासाठी महागड्या मशिनचा अवलंब करण्यात येतो. मात्र, किमतीमुळे त्या मोठ्या हॉस्पिटलशिवाय कोणालाही विकत घेणे परवडत नाही. त्यासाठी उपचारांचे स्वतंत्र पॅकेज असतात. परंतु, लेसर उपचारासाठी त्वचारोग तज्ज्ञ प्रशिक्षित असतीलच असे नाही. कंपनीकडून दिले जाणारे एका दिवसाचे प्रशिक्षण पुरेसे नसते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
'त्वचेचे कोणतेही आजार शंभर टक्के बरे होतील, असे आम्ही कधी सांगत नाही. त्वचारोगाचे ज्ञान नसलेले तसेच अननुभवी तंत्रज्ञांकडून जादा क्षमतेच्या लेसरचा वापर केला जातो. चुकीच्या निकषांच्या आधारे चुकीचे निदान करून चुकीचे उपचार त्यांच्याकडून केले जातात. त्यामुळे चेहरा जळणे, कायमस्वरूपी डाग पडणे, त्वचा जळणे असे प्रकार घडतात. त्वचेचे उपचार एका दिवसात बरे होत नाहीत. महिना अथवा दोन महिन्यातून एकदा त्वचारोग तज्ज्ञांकडे जावेच लागते. असे दहा ते बारा वेळा उपचार घ्यावे लागतात. उपचारानुसार दहा हजार ते दीड लाख रुपयापर्यंत खर्च येतो. ब्युटीपार्लर अथवा त्वचातज्ज्ञ नसलेले पण इतर पॅथीची मंडळी असे उपचार करतात. त्यामुळे पेशंटची आर्थिक फसवणूक होते. चामखीळ काढण्यासाठी इलेक्ट्रो कॉटरी नावाच्या तंत्राचा लेसरच्या नावाखाली वापर होतो,' असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील शहा यांनी सांगितले.
..
जादा क्षमतेच्या लेसरचा वापर केल्याने चेहऱ्यावरील व्रण खराब होतात. पिंपल्सचे फोड बरे व्हायच्या आधीच लेसर वापरल्याने भाजल्याचे व्रण पडतात. त्यातून अनेकांचे चेहरे खराब झाले आहेत.
डॉ. शरद मुतालिक, त्वचारोग तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते विकासासाठी ‘नियोजन’सक्तीचे

0
0

'अर्बन स्ट्रीट डिझाइन गाइडलाइन्स'च्या धर्तीवरच सुविधांची निर्मिती
Suneet.Bhave@timesgroup.com
पुणे : महापालिकेतर्फे रस्ते, पादचारी मार्ग (फूटपाथ), रस्त्यांचे सुशोभीकरण, रस्तेदुभाजक अशी विविध स्वरूपाची कामे मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालयांतर्फे स्वतंत्रपणे केली जातात. मात्र, यापुढे 'नियोजन विभागा'च्या मान्यतेनंतरच रस्ते-फूटपाथ विकसनाची कामे करता येणार आहेत.
महापालिकेने विकसित केलेल्या 'अर्बन स्ट्रीट डिझाइन गाइडलाइन्स'च्या धर्तीवरच शहरातील रस्ते-फूटपाथ आणि इतर सुविधांची निर्मिती केली जाणार असून, त्यासाठीचा स्वतंत्र 'नियोजन विभाग' लवकरच कार्यान्वित होणार आहे. शहरातील रस्त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी स्थायी तांत्रिक सल्लागार समितीने (स्टॅक) सुचविल्यानुसार पथ विभागांतर्गतच स्वतंत्र नियोजन विभाग स्थापन केला जाणार आहे. पालिकेतील अभियंत्यांसह नगर नियोजन (अर्बन प्लॅनिंग) क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासकांना नियोजन विभागात स्थान देण्यात येणार आहे. या विभागाने मान्यता दिल्यानंतरच रस्ते, फूटपाथ आणि इतर कामांची पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
सध्या शहरात पथ विभागातर्फे महत्त्वाच्या रस्त्यांची कामे केली जातात, तर क्षेत्रीय कार्यालयांतर्फे छोट्या-मोठ्या रस्त्यांची कामे केली जातात. शहरातील सर्व रस्ते एकसारखे दिसावेत, यासाठी स्ट्रीट गाइडलाइन्स तयार केल्या गेल्या असल्या, तरी त्याचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. फूटपाथ आणि रस्त्यांवरील इतर सुविधाही शहरात वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे, या सर्वांमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी सर्व कामे नियोजन विभागाच्या माध्यमातूनच पुढे नेण्याचे प्रस्तावित आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरातील कोणताही रस्ता किंवा फूटपाथ अर्बन गाइडलाइन्सशी संलग्न राहूनच विकसित केला जात असल्याचे शिक्कामोर्तब नियोजन विभागाने केल्यानंतरच संबंधित कामाचे टेंडर काढण्यात येणार आहे. नियोजन विभागाची मान्यता नसल्यास रस्ता-फूटपाथच्या रचनेच त्यांच्या सूचनेनुसार बदल करणे क्रमप्राप्त राहील. पालिकेच्या अभियंत्यांसह 'अर्बन डिझायनर'ची नियुक्ती त्यासाठी केली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नियोजन विभागात १० ते १२ जणांची टीम कार्यरत राहणार असून, आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे.
......................
'बीआरटी'चेही करणार प्लॅनिंग
रस्ते, फूटपाथ आणि इतर सुविधांसह जलद बस वाहतूक योजना (बीआरटी), सायकल मार्ग यासारख्या नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांसाठीही अत्यंत काटेकोर नियोजन या नव्या विभागामार्फतच केले जाणार आहे. नगर नियोजन क्षेत्रात कार्यारत असलेल्या विविध संस्था-संघटनांचे सहकार्यही त्यासाठी घेण्यात येणार आहे. बीआरटीची रचनाच चुकीची आहे, सायकल मार्गाच्या आराखड्यात त्रुटी आहेत, नियोजनातच कमतरता राहिल्याने अपघात होतात, यासारखी सातत्याने केली जाणारी टीका नव्या रचनेमुळे दूर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रव्यवहार डावलून ‘बीआरटी’चा घाट

0
0

त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याने अपघात वाढले; कृष्णांचा दावा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगररोड बीआरटी मार्ग उद्घाटनाच्या दोन दिवस आधी या मार्गावर अनेक त्रुटी असल्याचे पत्र पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) महापालिकेला दिले होते. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष करून पालिकेने उद्घाटन उरकल्याचा खुलासा 'पीएमपीएमएल'चे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी सोमवारी केला. या मार्गावरील त्रुटी दूर कराव्यात यासाठी पालिकेशी अनेकदा पत्रव्यवहार केल्याचेही कृष्णा यांनी सांगितले.
बीआरटी मार्गावर गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी सोमवारी महापालिकेने विशेष सभा बोलाविली होती. या वेळी कृष्णा उपस्थित होते. 'नगररोड बीआरटीच्या उद्घाटनावेळी आपण सुट्टीवर होतो. मात्र, पीएमपी प्रशासनाने बीआरटीतील त्रुटीचे पत्र महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले होते. यामध्ये पादचारी सुरक्षिततेचा अभाव, तुटलेले दुभाजक, कमी प्रमाणात असलेले बॅरिकेड, खासगी वाहनांची घुसखोरी रोखणारी अपुरी यंत्रणा आदी त्रुटींचा अंतर्भाव केला होता. या त्रुटी दूर होण्यासाठी पालिकेकडे सतत पाठपुरावाही केल्याचे कृष्णा यांनी सांगितले. नगररोड बीआरटीचे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत या रोडवर अकरा अपघात झाले आहेत. बॅरिकेडची उंची अद्याप वाढविण्यात आलेली नाही. खासगी वाहनांची होणारी घुसखोरी, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या अपुऱ्या सुविधा यामुळेच अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या मार्गावर स्पीडब्रेकर्सची आवश्यकता आहे. तसेच, वॉर्डनबरोबरच वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असेही कृष्णा यांनी स्पष्ट केले.
..
वाहतूक पोलिस नेमणार
नगररोड बीआरटी मार्ग सुरू झाल्यानंतर पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. सध्या नगररोड बीआरटीमधून दररोज १.२५ लाख नागरिक प्रवास करतात. या मार्गावर अपघात होऊ नये, तसेच खासगी वाहने बीआरटीमध्ये घुसू नयेत यासाठी ७० वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
..
बारापात्रेंवर निलंबनाची कारवाई?
नगररोड बीआरटी मार्गाच्या कामाची जबाबदारी पथ विभागाचे अधीक्षक अभियंता नामदेव बारापात्रे यांच्याकडे आहे. बीआरटीवर पालिकेच्या सभेत चर्चा होणार असतानाही बारापात्रे सोमवारी सभेला हजर नव्हते. त्यामुळे पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी त्यांच्यावतीने खुलासा केला. त्याला सदस्यांनी आक्षेप घेऊन बारापात्रेंना बोलविण्याची मागणी केली. बारापात्रे यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता रजा घेतल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले. बारापात्रे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. खुलासा मागवून त्यांच्यावर निलंबनाचीही कारवाई होऊ शकते, असेही जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images