Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शाळा-कॉलेज ते यूपीएससी... एक्सायटिंग

$
0
0

शाळा-कॉलेज ते यूपीएससी... एक्सायटिंग

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'यूपीएससी'च नाही, तर उच्च शिक्षणाच्या पातळीवर आल्यावर मला अभ्यासासाठी सगळंच साहित्य ब्रेलमध्ये उपलब्ध होईल अशी खात्री नव्हती. त्यामुळे टेक्नोलॉजीच्या वापराशिवाय माझ्यासमोर पर्यायच नव्हता. स्क्रीन रीडर वापरून मी अभ्यास करत गेले. उल्हासनगरमधील शाळा-कॉलेज, दिल्लीतील जेएनयूमधील एम.ए. ते पीएचडी आणि आता यूपीएससी हा सगळाच प्रवास मला खूपच एक्सायटिंग वाटला...' प्रांजल पाटील बोलत होत्या.
अंध असूनही यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) देशात ७७३ व्या आलेल्या प्रांजल यांचा पुणे आकाशवाणी केंद्राने शुक्रवारी विशेष सत्कार आयोजित केला होता. केंद्राचे उपमहानिदेशक आशिष भटनागर यांच्या हस्ते प्रांजल यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. केंद्रातर्फे या वेळी त्यांना रेडिओ संचही भेट देण्यात आला. या सत्कारानंतर आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये प्रांजल यांनी आपल्या 'यूपीएससी'पर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा चढता आलेख सर्वांसमोर मांडला. प्रांजल यांचे आई- वडील आणि पतीही या वेळी उपस्थित होते.
प्रांजल म्हणाल्या, 'राज्यशास्त्रामध्ये पदवी केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय संबंधांविषयीचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गाठले. त्यानंतर एम. फिल पूर्ण केल्यानंतर मी खऱ्या अर्थाने यूपीएससीची तयारी सुरू केली. परीक्षा दिल्यानंतर खरं तर मला पद मिळेल, असे वाटले नव्हते. मात्र, माझ्यापेक्षा माझ्या मित्र- मैत्रिणींनाच माझ्यावर जास्त विश्वास होता. त्यामुळे माझे यश त्यांनीच साजरे केले.'
यूपीएससीचा अभ्यास आणि मुलाखतीच्या तयारीविषयी प्रांजल म्हणाल्या, 'माझा एम. फिल-पीएचडीचा अभ्यास आणि यूपीएससीचा अभ्यास हा अगदी विरोधी प्रकारातील वाटला. संशोधनासाठी एकच विषय सखोल अभ्यासावा लागतो. यूपीएससीच्या बाबतीत तुम्हाला सर्वच बाबींची व्यवस्थित माहिती आणि आकलन आवश्यक असते. यूपीएससीच्या तयारीसाठी मी वृत्तपत्रांच्या नियमित वाचनाला महत्त्व दिले. एनसीईआरटीच्या सहावी ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला. यापूर्वी शिकलेल्या या पाठ्यपुस्तकांमधील सर्व गोष्टी, पुन्हा नव्याने आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यासण्यात मला एक वेगळाच आनंद मिळाला.'
यूपीएससीची तयारी म्हटली की अंगावर काटा येणाऱ्या अनेकांसाठी प्रांजल यांची ही मुलाखत प्रेरणादायी ठरल्याने, त्यांच्यासारख्याच अनेकांनीही मुलाखतीनंतर टाळ्यांच्या गजरामध्ये प्रांजल यांचे कौतुक केले.
000
कुठेही गेले, तरी भारतातच असेन ना?...
मुलाखतीदरम्यान आकाशवाणीने उपस्थितांनाही प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी प्रांजल यांना, 'तुम्हाला इतर राज्यात पोस्टिंग मिळाल्यास काय वाटेल,' असा प्रश्न विचारला गेला. त्यावेळी प्रांजल यांनी या प्रश्नाला अगदी सहजतेने उत्तर देत, 'कुठेही गेले, तरी भारतातच असेन ना,' असा प्रतिप्रश्न केला; तसेच स्थानिकांच्या नेमक्या प्रश्नांची माहिती घेत, मिळेल ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याचा निर्धारही व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तापमानात घट, उकाडा कायम

$
0
0

तापमानात घट, उकाडा कायम

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि परिसरातील तापमानात काहीशी घट झाली असली, तरी हवेतील उकाडा मात्र कायम होता. शहरात ३५.९ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तर २५.१ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत वातावरण अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी मान्सूनची आगेकूच झाली नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले.
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने या ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे. मात्र, विदर्भातील उष्णतेची लाट कायम आहे. पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा; तसेच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद नागपूर येथे (४६.६ अंश सेल्सिअस) झाली, तर वर्धा येथे ४६.१, अकोला येथे ४२.५, परभणीत ४३.८, जळगाव येथे ४२.५, सोलापूर येथे ४०.५ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले.
राज्यात पुढील दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर शहरात पुढील दोन दिवस वातावरण अंशतः ढगाळ राहील, तापमानातही फारशी वाढ होणार नाही, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

$
0
0

स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

व्यावसायिकाला गंडविण्यासाठी महिलेची क्लृप्ती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्ञानेश्वर पादुका चौकातून महिलेचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळते... गर्दीच्या ठिकाणाहून भरदुपारी महिलेचे अपहरण झाल्यामुळे पोलिस यंत्रणा कामाला लागतात... अपहरण झालेली महिला पोलिसांना आळंदी येथे मिळते... तिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर एका व्यावसायिकाला गंडविण्यासाठी तिनेच मैत्रिणीच्या मदतीने अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर येते आणि अखेर पोलिस सुटकेचा निश्वास टाकतात.

धायरी परिसरातील बनकर वस्ती येथे राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेने स्वतःच्या अपहरणाचा हा बनाव रचला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर येथे प्लॉटींगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडे ही महिला काही महिन्यांपूर्वी कामाला होती. पण तिने काही दिवसांपूर्वी हे काम सोडले. या दरम्यान व्यावसायिक आणि त्या महिलेचे सूत जुळले होते. अलीकडे दोघांच्या भेटी वाढत होत्या. त्याचा फायदा घेत महिलेने व्यावसायिकाकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचण्याचे ठरविले. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ती मैत्रिणीसह ज्ञानेश्‍वर पादुका चौकात आली. तेथून ती रिक्षाने निघून गेली. त्यानंतर महिलेच्या मैत्रिणीने शहर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून या महिलेचे ज्ञानेश्‍वर पादुका चौकातून अपहरण झाल्याचे सांगितले. गर्दीच्या ठिकाणाहून भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रकार झाल्याने पोलिस अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी माहिती काढण्याचे काम सुरू केले असता लाल रंगाच्या स्कॉर्पिओ मोटारीतून आलेल्या तिघांनी महिलेचे अपहरण केल्याचे तिच्या मैत्रिणीने सांगितले.

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. माहिती काळत असताना अपहरण झालेली महिला आळंदी येथे पोलिसांना मिळून आली. पोलिसांनी तिला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने व्यावसायिकाला गंडविण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघडकीस आले. पोलिस तिच्याकडे सखोल चौकशी करीत आहेत. तिच्या मैत्रीणीने पोलिसांना खोटी माहिती का दिली, संबंधित महिलेने अपहरणाचा बनाव का रचला इतर माहिती काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

...................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजीव गांधींमुळेच देशाचा विकास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'भारताचा स्वातंत्र्याचा लढा काँग्रेसने उभारला. भारताच्या स्वांतत्र्यानंतरचा ९० टक्के विकास हा काँग्रेसने केला आहे. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच देशाचा विकास झाला आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाची योजना आखल्यानेच सध्या देशात या क्षेत्रात क्रांती होत आहे. या क्षेत्राचा वापर करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे मोदींनी पंतप्रधान झाल्याचे श्रेय राजीव गांधींना दिले पाहिजे,' असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने राजीव गांधी यांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त 'आधुनिक भारताच्या विकासामध्ये स्व. राजीव गांधींचे योगदान' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. मुणगेकर बोलत होते. उपमहापौर मुकरी अलगुडे, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार दीप्ती चवधरी, माजी आमदार उल्हास पवार, नगरसेवक अभेय छाजेड, सदस्य गोपाल तिवारी उपस्थित होते. तत्पूर्वी राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी आणि चांगला पाऊस येण्यासाठी सर्वधर्मीय सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

डॉ. मुणगेकर म्हणाले, 'देशाचे संविधान तयार करणाऱ्या घटना समितीमध्ये ८० टक्के हे काँग्रेसचे सभासद होते. त्यामुळे देशाचे संविधान तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. वि. दा. सावरकर किंवा माधव गोळवळकर यांनी महिलांसाठी काय केले, असा प्रश्न विचारण्याची गरज आहे. त्यांनी त्यांच्या लिखाणातून महिलांना समाजापुढे नगण्य दाखविण्याचे काम केले आहे. याउलट राजीव गांधींनी महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्ष्मीकरण करण्याचे काम केले आहे. या देशातील तरुणांना मतदानाचा हक्क देण्याचे आणि त्यांच्यासाठी विविध योजना आखण्याचे काम राजीव गांधी यांनी केले आहे. त्यामुळे देशातील युवावर्ग प्रगती करीत आहे. नेहरू-गांधी घराणे हे देशातील एकमेव निधर्मी कुटुंब आहे. ते जात, धर्म, पंथ पाळत नाहीत.' पवार यांनीही मार्गदर्शन केले. बागवे यांनी प्रास्ताविक केले.

स्वामींवर टीका

'सुब्रमह्मण्यम स्वामी हा दिडदमडीचा माणूस आहे. खर तर तो एक दलाल आहे. भारतीय जनता पक्षाने त्याला नोकरीवर ठेवले आहे. त्याला कसं बोलावं हे कळत नाही. त्यामुळेच तो ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणात थेट सोनिया गांधींचे नाव घेतो. राज्यसभेत बोलल्याने कोर्टात खटला दाखल करता येत नसल्यानेच तो एवढा बोलतो,' अशी टीका डॉ. मुणगेकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांचा प्रवेश रोखणाऱ्यांना अटक

$
0
0

पुणे : पालकाच्या तक्रारीवरून शाळेतील फी संदर्भातील कागदपत्रे पाहण्यासाठी गेलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेतच प्रवेश करू दिला नसल्याचा प्रकार एनआयबीएम रोडवरील विबग्योर शाळेत घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गेटवरील दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करून यांना अटक करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक अहमद शेख (वय ३५, रा. येरवडा) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून तन्वीर अहमद शेख (वय ३५, रा. सनश्री सोसायटी, एनआयबीएम रस्ता), केवल पंकज ठक्कर (वय ३०, रा. ससाणेनगर, हडपसर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शेख हे जिल्हा परिषद येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे काही पालक तक्रार घेऊन भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या तक्रारीनुसार जाधव यांनी शेख यांना एनआयबीएम रोडवरील विबग्योर शाळेत जाऊन पालकांनी भरलेल्या शुल्काच्या पोहच पावत्या आणि विद्यार्थ्यांना स्टेशनरी देण्याबाबत काय कार्यवाही केली हे पाहण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शेख हे त्यांच्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी दुपारी या शाळेच्या गेटवर गेले. मात्र, गेटवर असलेले तन्वीर शेख व केवल ठक्कर यांनी त्यांना शाळेत प्रवेश करू दिला नाही. शेख यांनी शिक्षण विभागातील अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले. तरीही आरोपींनी त्यांना शाळेत जाण्यास प्रतिबंध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीबीएससी’चा निकाल सुधारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचा (सीबीएसई) बारावीच्या निकालात शहरातील बऱ्याच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात सरासरी गुणांचे प्रमाणही वाढल्याबद्दल सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त केले.

सायन्स, कॉमर्स आणि ह्युमॅनिटीज या तिन्ही शाखांमध्ये कॅम्पच्या आर्मी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविले आहेत. सायन्समध्ये तुषार बारनवाल याला ९८.२ टक्के, तर संकल्प सांगळे याला ९८ टक्के मिळाले. साईक्रिती सिंग हिने ९६.६ टक्क्यांसह कॉमर्समध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केले, तर अरुणिमा अगरवाल हिने ह्युमॅनिटीजमध्ये सर्वाधिक गुण मिळविले. आमच्या ६८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका बिनिता पुणेकर यांनी सांगितले.

खडकीच्या आर्मी पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये ९०च्या पुढे गुण मिळाले असले, तरी गणिताचा पेपर अवघड असल्याने सरासरी गुणांमध्ये खूप फरक पडल्याचे निरीक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका आरती शर्मा यांनी मांडले. दिल्ली पब्लिक स्कलूच्या मुख्याध्यापिका नीलम चक्रवर्ती यांनीही शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती दिली. डीएव्ही पब्लिक स्कूलच्या निकालातही यंदा वाढ झाल्याचे मुख्याध्यापिका सी. व्ही. माधवी यांनी सांगितले. शाळेच्या १० विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण असल्याचे त्यांनी नमूद केले.

विखे-पाटील शाळेचा निकालही शंभर टक्के लागला आहे. रुचा साठे हिने सायन्समध्ये, तर विनिता भटीजा हिने कॉमर्समध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात फारसा फरक नाही; पण गणितामध्ये विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत, असे शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिना चार्ल्स यांनी सांगितले.

भूगावातील संस्कृती स्कूलनेही उत्तुंग यश मिळवले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील एकाही विद्यार्थ्याला ७० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले नसल्याचा दावा शाळेच्या संचालिका देवयानी गांगुली यांनी केला. वानवडीच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलनेही उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. शाळेतील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाल्याचे मुख्याध्यापिका विनीता खळदकर आणि शाळेचे चेअरमन मौलिक दीक्षित यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील १४ केंद्रीय विद्यालयांचा निकालही शंभर टक्के लागला आहे. मात्र, केंद्रीय विद्यालयांच्या शाळाप्रमुखांनीही गणितामुळे सरासरी गुणांमध्ये खूप फरक पडल्याचे आवर्जून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकर हर्षद राव ठरला एव्हरेस्टवीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या हर्षद कमलाक्ष राव याने शनिवारी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. या वर्षी एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणारा तो पहिला पुणेकर ठरला.

सहकारनगर भागातील २७ वर्षीय हर्षदने यापूर्वी सह्याद्रीतील ढाक-बहिरी, तैलबैला, खडापार्सी, ड्यूक्स नोज, गंगोत्रीजवळील जोगीन-१ आणि ३, उत्तराखंडातील जॉन ली आदी शिखरे पार केली होती. या मोहिमा यशस्वी केल्यानंतर हर्षदला जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट (८८४८ मी.) शिखर सर करण्याचे वेध लागले होते. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. 'एव्हरेस्ट' मोहिमेला रवाना होण्यापूर्वी सरावासाठी त्याने कात्रज-सिंहगड मोहिमा केल्या होत्या. पुण्यातून २९ मार्चला हर्षद एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना झाला. १५ एप्रिलला तो बेस कॅम्पवर पोहोचला. त्यानंतर मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर सराव केला. त्यात कॅम्प-१, २ आणि ३वर टप्प्याटप्याने चढाई करून सराव केला आणि वातावरणाशी जुळवून घेतले. त्यानंतर सोळा मे रोजी त्याने आपल्या महत्त्वाकांक्षी चढाईला प्रारंभ केला. बुधवारीच तो कॅम्प-३ ला पोहोचला होता. गुरुवारी हवामान खराब होते. त्यामुळे शुक्रवारी चांगले हवामान असल्याने हर्षद 'कॅम्प-४'वर पोहोचला. त्यानंतर हर्षदने शुक्रवारी रात्री अखेरच्या टप्प्यातील चढाईला प्रारंभ केला आणि शनिवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास एव्हरेस्ट शिखरावर पाय ठेवून असामान्य कामगिरी केली. त्याने परतीचा प्रवास सुरू केला असून, सोमवारपर्यंत तो बेस कॅम्पवर येईल.

हर्षदचे शालेय शिक्षण मुक्तांगण प्रशालेत झाले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्याने बीसीएसची पदवी घेतली; तसेच त्याने उत्तरकाशीतील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग आणि दार्जिलिंगच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग या संस्थांतून गिर्यारोहणाचे उत्तम तांत्रिक शिक्षण कोर्सेसद्वारे घेतले आहे.


घरी आनंदोत्सव

हर्षदने एव्हरेस्ट सर केल्याचे वृत्त समजताच त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. हर्षदचे वडील कमलाक्ष राव म्हणाले, 'एशियन ट्रेंकिगचे व्यवस्थापक काजू संजय बराल यांनी हर्षदने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केल्याचे सांगितल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. हर्षदने खूप मेहनत घेतली होती. लहानपणापासून त्याला जगातील एव्हरेस्ट शिखर खुणावत होते. आज त्याचे स्वप्न पूर्ण झाले. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळविले. त्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

$
0
0

पुणे : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम. डी., एम. एस. पदविका व एम. एस्सी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २३ मे रोजी होणाऱ्या परीक्षा आता येत्या २५ जुलै रोजी परीक्षा होणार आहेत, तसेच मेडिकलच्या सर्व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा सहा जूनपासून घेतल्या जाणार आहेत.

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या तातडीच्या बैठकीत या संदर्भात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात आला. 'पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया २०१३साली सुप्रीम कोर्टाच्या निकालांमुळे लांबली होती. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानांकनानुसार पदव्युत्तर पदवीसाठी ३६ महिने, तर पदविकांसाठी २४ महिने एवढी अभ्यासक्रमांच्या कालावधींची पूर्तता होत नव्हती. यामुळे उशिरा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची अपात्रता होत होती. सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया त्वरीत होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती होती,' असे कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेसाठी प्रयत्न करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे,' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी केले.

पक्षाच्या शहराध्यक्षपदी खासदार चव्हाण यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने टिळकरोडवरील पक्ष कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, मोहिनी देवकर, आप्पा रेणुसे, अश्विनी कदम, शिवलाल भोसले, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, मोहनसिंग राजपाल, अशोक राठी, लक्ष्मी दुधाणे, मनाली भिलारे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने आपला वेगळा ठसा उमट‌विला आहे; तो तसाच कायम ठेवला पाहिजे. विकासाला प्राधान्य देणारा पक्ष अशी ओळख पक्षाची आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शहराच्या विकासासाठी एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे,' अशी अपेक्षा खासदार चव्हाण यांनी व्यक्त केली. चव्हाण यांनी पक्षवाढीसाठी आजपर्यंत केलेल्या कामामुळेच त्यांच्याकडेच शहराध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा देण्याचा निर्णय पक्षश्रेष्टींनी घेतल्याचे अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन पेटंट टांगणीवर

$
0
0

Chaitrali.chandorkar@timesgroup.com

पुणे : जंगलात कोठेही फिरा संशोधन करा आणि नवीन प्रजातीचा शोध लागला की वन विभाग किंवा जैवविविधता मंडळाच्या परवानगीशिवाय थेट परदेशी विद्यापीठाकडे पेटंटसाठी अर्ज पाठवा, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या संशोधकांच्या या स्वैराचाराला जैवविविधता मंडळाने लगाम लावला आहे. वनक्षेत्रात ना हरकत प्रमाणपत्राशिवाय संशोधन केल्या प्रकरणी मंडळाने पुण्यातील तीन संशोधकांचे पेंटटसाठी लागणारे पत्र स्थगित ठेवले आहे.

राज्यातील जैववैविध्याच्या दृष्टीकोनातून संवेदनशील असलेला पश्चिम घाट, तसेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये निसर्ग संपदा समृद्ध आहे. विविध विद्यापीठे, स्वयंसेवी संस्थांमधील अभ्यासक सातत्याने या क्षेत्राचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण माहिती लोकांसमोर आणत आहेत. मात्र वनौषधी आणि वन्यजीवांच्या कायद्याची अंलमबजावणी वाढल्यामुळे परदेशस्थित नामांकित कंपन्यांनी संशोधकांच्या माध्यमातून या जंगलामधील आवश्यक घटक मिळविण्यास सुरुवात केली आहे. पुण्यासह राज्यातील काही नामांकित विद्यापीठातील संशोधक सध्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी नव्हे, तर परदेशी कंपन्यांचे हेतू साध्य होण्यासाठी छुप्या पद्धतीने काम करीत आहेत. तर काही संशोधक स्थानिक लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पारंपरिक माहितीवर आधारित स्वतःच्या नावावर पेंटट घेत आहेत. हे सगळे प्रकार थांबविण्यासाठी जैवविविधता मंडळाने संशोधकांना नियमांच्या चौकटीत बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

'वनक्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी राज्य जैवविविधता मंडळाला पूर्वसूचना द्यावी लागते. तेथील घटक प्रयोगशाळेत नेण्यासाठी मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे, हे माहिती असूनही काही संशोधक त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात,' असे जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांनी सांगितले.

'आंतरराष्ट्रीय पातळीवरच निश्चित झालेल्या नियमावलीनुसार जैववैविध्याशी निगडीत कोणत्याही पेटंटसाठी नैसर्गिक घटकाचे मूळ असलेल्या राज्यातील जैवविविधता मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आम्ही पत्र दिले नाही, तर पेटंट मिळणार नसल्याची जाणवी झाल्यावर संशोधक भेटायला येतात. विनापरवाना संशोधन करून पेटंटसाठी अर्ज केलेल्या पुण्यातील तीन अभ्यासकांचे पेंटट आम्ही स्थगित ठेवले आहेत. त्यांचे नुकसान व्हावे हा उद्देश नसून राज्यातील मंडळाच्या कार्यपद्धतीची गांभीर्य लक्षात यावे हा उद्देश आहे,' असे बर्डेकर म्हणाले. (उत्तरार्ध)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइप २’ मधुमेहावर आयुर्वेदाचा उपाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
देशातील कोट्यवधींना विळखा घातलेल्या मधुमेहावर नियंत्रण राखणे बदलत्या जीवशैलीमुळे अशक्य होत असताना, त्याला रोखणाऱ्या नव्या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. सहा प्रकारच्या आयुर्वेदीक औषधींच्या मदतीने तयार केलेले 'बीजीआर-३४' हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक असल्याने मधुमेह नियंत्रित राहू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बोटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड अरोमटिक प्लँट्स (सीआयएमएपी) यांच्या सहकार्याने संशोधन करून ही औषधनिर्मिती केली आहे. पाच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची 'एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया' या कंपनीने निर्मिती केली. मधुमेहाच्या रेषेवर असणाऱ्यांना हे औषध उपयुक्त ठरू शकते. याची एक गोळी पाच रुपयांना उपलब्ध होणार आहे.

'देशात मधुमेहाचे सहा कोटींहून अधिक पेशंट आहेत. मधुमेहाला रोखणे मोठे आव्हान आहे. त्यावर अद्याप प्रभावी उपाय सापडला नाही. 'सीएसआयआर'च्या संशोधकांनी आयुर्वेदिक ग्रंथातील पाचशेहून अधिक प्राचीन वनौषधींवर संशोधन केले. त्यामध्ये दारूहळद, गुळवेळ, विजयसार, गुडमार, मजीठ आणि मेथीका यांचा समावेश आहे. त्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतर एक आयुर्वेदिक गुण असलेल्या 'ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर' (बीजीआर)-३४ या 'टाइप २' मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्यात आली,' अशी माहिती 'सीएसआयआर'च्या 'एनबीआरआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी दिली.

मधुमेहाच्या अनेक पेशंटवर या औषधाचे प्रयोग करण्यात आले. ज्या पेशंटवर औषधाचे प्रयोग करण्यात आले. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळले. त्याशिवाय त्याची तुलना इतर मधुमेहाच्या औषधांच्या प्रमाणाबरोबर केली असता अॅलोपॅथी औषधांपेक्षा या औषधांचे परिणाम थक्क करीत असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-निजामुद्दीन एसी एक्स्प्रेसला मुहूर्त

$
0
0

पुणे : रेल्वे मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४-१५च्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या पुणे-हजरत निजामुद्दीन वातानुकुलीत एक्स्प्रेस (क्रमांक ०२४९३) या साप्ताहिक रेल्वेगाडीला मुहूर्त सापडला आहे. येत्या मंगळवारी (२४ मे) ही गाडी सोडण्यात येणार आहे. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची त्यामुळे सोय होणार आहे. ही रेल्वेगाडी कोटा मार्गे धावणार असून तिला आठ ठिकाणी थांबे आहेत.

पुणे-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (क्रमांक ०२४९३) ही रेल्वेगाडी २४ मे रोजी रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता हजरत निजामुद्दीनला पोचेल. ही रेल्वेगाडी ३० जूनपर्यंत प्रत्येक गुरुवारी सुटेल. त्यानंतर ३ जुलैपासून प्रत्येक रविवारी याच वेळेत सुटेल. हजरत निजामुद्दीन-पुणे (क्रमांक ०२४९४) ही रेल्वेगाडी २३ मे रोजी दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी सुटून पुण्याला दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी पोचेल. ही रेल्वेगाडी २८ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी सुटेल. त्यानंतर १ जुलैपासून प्रत्येक शुक्रवारी याच वेळेत सुटेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांची फसवणूक थांबविण्याचे प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सरकारमध्ये मिळालेल्या पदावर कर्तव्य भावनेने काम करण्याचे संस्कार झाले असल्याने येत्या काही काळात ग्राहकांची फसवणूक थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करेल,' असे प्रतिपादन समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ग्राहक पंचायतीचे संरक्षक प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, अध्यक्ष अरुण देशपांडे, उपाध्यक्ष रवींद्र साळुंके, धनंजय गायकवाड, अधिवेशनाचे महाव्यवस्थापक सूर्यकांत पाठक, सचिव दुर्गाप्रसाद सैनी, ठकसेन पोरे या वेळी उपस्थित होते.

'ग्राहकांना त्यांचे हक्क आणि त्यांच्या सेवा योग्य वेळेत आणि रास्त दरात मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने सेवा हक्क कायदा लागू केला आहे. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्याचे काम नेहमीच केले गेले. कोणताही डामडौल न करता, आवाज न करता आजपर्यंत ग्राहक पंचायतीने काम केले. यापुढेही ग्राहकांसाठीचे त्यांचे काम चालू राहिल. परंतु, आता राज्यात आणि देशात भाजपचे सरकार असल्याने ग्राहकांच्या हक्कांचे जतन प्राधान्याने केले जाईल. ग्राहकांची फसवणूक थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करेल,' असे कांबळे यांनी सांगितले.

'शोषणमुक्त समाज आणि बहुजनहिताय, बहुजनसुखाय हे ग्राहक पंचायतीचे अंतिम उद्दिष्ट आहे. घर घेण्यापासून ते दूध आणि औषधोपचारांपर्यंत अनेक बाबतीत ग्राहकांची फसवणूक केली जाते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांच्या फसवणुकीच्या पद्धती बदलल्या आहेत. ग्राहकांच्या अशा फसवणुकीबाबत त्याला जागरूक करण्याचे काम ग्राहक पंचायतीला यापुढेही करावे लागणार आहे,' असे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत पाठक यांनी केले. सूत्रसंचालन दुर्गाप्रसाद सैनी यांनी केले. धनंजय गायकवाड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संत साहित्यातून प्रतिगाम्यांना लगाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सनातनी सत्ताधाऱ्यांनी जातीयतेच्या माध्यमातून समाज गढूळ करण्याचा प्रयत्न चालवला आहे. संतांनी लिहिलेल्या साहित्याच्या आधारे त्यांना लगाम घालणे शक्य आहे. प्रतिगामी शक्तींवर संत शिकवणीच्या आधारे विजय मिळवता येऊ शकतो,' असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित पाचव्या अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनाचे उद‍्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. खासदार रामदास आठवले, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, संमेलनाध्यक्ष हभप बद्रीनाथ तनपुरे, माजी आमदार बबनराव पाचपुते, वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी संमेलनस्थळी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यभरातून आलेले वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

'संतांनी पुरोगामी विचार दिला. काही प्रतिगामी शक्ती हा विचार नष्ट करून जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत,' याकडे विखे-पाटील यांनी लक्ष वेधले.

'राज्यातील दुष्काळ निवारणासाठी देखील विविध उपाययोजना या संमेलनाच्या माध्यामातून करण्याचा प्रयत्न करणार आहे,' असे संमेलनाध्यक्ष बद्रीनाथ तनपुरे यांनी सांगितले. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले विचार आणि वारकरी संप्रदायाचे विचार जुळतात. जातीयवादाला नष्ट करण्याची जबाबदारी वारकरी संप्रदायावर आहे,' असे मत रामदास आठवले यांनी मांडले. बबनराव पाचपुते, जयंत पाटील, डॉ. सदानंद मोरे यांनी देखील आपले विचार मांडले. पुढील तीन दिवस हे संमेलन रंगणार आहे. मीरा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजीराव मोहिते यांनी आभार मानले.

मराठवाड्यासह राज्यातील भीषण दुष्काळाची दाहकता दर्शवणाऱ्या, माधव पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. दुष्काळाची काही दाहक दृश्ये पुण्यातील काही पत्रकारांनी टिपली आहेत. संमेलन सुरू असेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवसेना-भाजप कलहामुळे योजना निष्फळ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे दुष्काळ निवारणाच्या सर्व योजना निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी देखील वेळेवर काम करत नाहीत,' अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना विखे यांनी राज्यसरकारच्या दुष्काळी धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, 'शिवसेना कधी सरकारच्या बाजूने तर कधी विरोधात आपली भूमिका मांडते. वास्तवात दुष्काळी धोरणे ठरवण्यामध्ये सेना नेत्यांचा देखील सहभाग राहिला आहे.

दोन्ही पक्षांमध्ये सुरू असणाऱ्या कलहामुळे प्रशासनाचे अधिकारी मस्तावले आहेत. शेतकऱ्यांचे कोणतेही हीत भाजपने साधलेले नाही. विरोधी पक्षाने दुष्काळ निवारणासंदर्भात वारंवार सूचना केल्या मात्र सरकारने त्या कधी ऐकल्या नाहीत. हायकोर्टाने फटकारल्यानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली मात्र तोपर्यंत परिस्थिती हातातून निघून गेली होती.'

केंद्र सरकारच्या कांदा विकत घेण्याच्या निर्णयावर बोलताना विखे म्हणाले, 'केंद्र सरकारने राज्यातील १५ हजार टन कांदा विकत घेण्याचे जाहीर केले. पण हा कांदा राज्यातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. सरकारला नेमके काय विकत घ्यायचे हेच कळेनासे झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारला या प्रकरणी जाब विचारणे गरजेचे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राज्यघटना बदलण्याचा घाट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राज्यघटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. त्यांना मनुस्मृतीवर आधारित हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. त्यांचा हा हिंदू राष्ट्रवाद सामाजिक परिवर्तनात अडथळा ठरत आहे,' असे मत विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राम पुनियानी यांनी शनिवारी व्यक्त केले.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे आयोजित चौदाव्या विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी पुनयानी बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे सय्यदभाई, संघटनेचे अध्यक्ष पार्थ पोळके, स्वागताध्यक्ष विठ्ठल सातव, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख या वेळी उपस्थित होते. भाई वैद्य व सय्यदभाई यांना 'सिंधू जन पुरस्कार' प्रदान करण्यात आला. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला कॉ. गोविंद पानसरे यांचे आणि विचारमंचाला रोहित वेमूलाचे नाव देण्यात आले होते.

'आरएसएस'ने देश घडविण्यापेक्षा कवायती करण्यालाच प्राधान्य दिले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यात त्यांनी कधीच योगदान दिले नाही. आता 'आरएसएस' आणि भाजप सरकार सर्वसामान्यांच्या मनात सांस्कृतिक गोंधळ निर्माण करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारल्याचा आव आणून जुन्या मूल्यांनाच आधुनिक पद्धतीने मांडून पुरोगामी विचार संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला विरोध करण्यासाठी दलित, विद्यार्थी, स्त्रिया आणि कामगारांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे,' असेही पुनियानी सांगितले. 'देशात गेल्या काही वर्षांमध्ये असहिष्णुतेचे वातावरण वाढले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्या त्यातून करण्यात आल्या. हिंदू राष्ट्रवाद राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदूराष्ट्र ही संकल्पना लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या विरोधी आणि सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे,' असेही पुनियानी म्हणाले.

'देशासमोर आज जमातवादाचे मोठे आव्हान आहे. सर्व संकटे पुरोगाम्यांनी लक्षता घ्यायला हवीत. 'सबका साथ, सबका विकास' हा भुलभुलैय्या आहे,' असे वैद्य यांनी सांगितले. 'आंबेडकरी, आदिवासी आणि ग्रामीण ही आमची विद्रोह्यांची फाटाफूट नाही. याउलट 'आरएसएस'च्या विरोधात कायम लढणे हेच आमचे ध्येय आहे,' असे पोकळे यांनी सांगितले.

'प्रमाण भाषा आणि भाषा शुद्धतेच्या आग्रहामुळेच मराठी भाषेचे नुकसान झाले आहे. मराठी संस्कृतपेक्षा प्राचीन भाषा असूनही तिला संस्कृतचे अपत्य मानले जाते. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात अडथळे येत आहेत,' असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. 'मराठी साहित्याची भाषा सदाशिवपेठी मराठीच राहिली आहे. या भाषेने गाव खेड्यातील, बहुजन व सर्वसामान्यांची भाषा कधीच स्वीकारली नाही. प्रस्थापितांच्या संमेलनात स्थान न मिळाल्यामुळेच दलित, आदिवासी यांसारखी संमेलने झाली,' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधींचा इतिहास पुसण्याचे काम : पतंगराव कदम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे. मात्र, त्यांचे हौतात्म्य, त्यांचा सर्व इतिहास पुसण्याचे काम सध्या सुरू आहे,' अशी खंत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी शनिवारी व्यक्त केली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृत्यर्थ प्रियंकाजी महिला उद्योग संस्थेतर्फे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना 'स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार' कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार अनंत पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, उपमहापौर मुकारी अलगुडे, नगरसेवक संजय बालगुडे, डॉ. सतिश देसाई, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, संस्थेच्या अध्यक्ष संजीवनी बालगुडे, सुरेश कुऱ्हाडे आदी या वेळी उपस्थित होते.

'राजीव गांधींच्या नावे अशाप्रकारचे कार्यक्रम करून बालगुडे परिवार तरुणांपर्यंत गांधी घराण्याचा इतिहास पोहोचवत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे,' असेही कदम यांनी स्पष्ट केले, तर 'देशाला आधुनिक चेहरा देण्याचे काम राजीव गांधी यांनी केले. वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी देशाचे पंतप्रधान होऊन त्यांनी सर्वधर्म समभावासाठी काम केले,' असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

'पुणे, मुंबईसारख्या महानगरांमध्ये थोडे काम करून, मोठे श्रेय घेण्याची वृत्ती बळावत आहे. कमी कामाचे अधिक श्रेय घेणे, ही वृत्ती चुकीची आहे. डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसामध्ये केलेल्या कामाचा आदर्श घेतला पाहिजे. सर्व जाती धर्माच्या भिंती बाजूला करून मानवता धर्म पाळणे आणि माणूस म्हणून जगणे गरजेचे आहे,' असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारेकरी सापडत नाहीत, ही खंत :डॉ.दाभोलकर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पुणे

'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्याच्या घटनेला २० मे रोजी ३३ महिने पूर्ण झाले. मात्र, त्यांचे मारेकरी प्रशासकीय यंत्रणेला सापडत नाहीत, ही दुर्दैवी घटना आहे. डॉ. दाभोलकर यांच्याप्रमाणेच एम. एम. कलबुर्गी आणि प्रा. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. मात्र, त्यांचेदेखील मारेकरी अद्याप सापडत नाहीत. ही खंत आहे,' असे मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

काव्यसंग्रह प्रकाशनाच्या एका जाहीर कार्यक्रमात डॉ. दाभोलकर बोलत होते. ते म्हणाले, 'महात्मा गांधींच्या मारेकऱ्याने समोरुन येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र, आताचे तरुण मारेकरी हे एका सत्तरीतल्या माणसावर पाठीमागून येऊन गोळ्या झाडतात. त्यामुळे त्यांच्यात धाडस नावाची गोष्ट नाही. डॉ. दाभोलकर यांचा खून कुणा एका व्यक्ती, विचारसरणीच्या किंवा पक्षाच्या व्यक्तीने केला नसून, समाजातील सद्यपरिस्थितीच्या कोंडीत अडकलेल्या व्यक्तीने केला आहे. त्यांचा खून झाल्याच्या घटनेला ३३ महिने पूर्ण झाले. मात्र, त्यांचे मारेकरी सापडत नाहीत, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.'

३५० व्यक्तींना तुरुंगाची हवा

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा देवाला आणि धर्माला विरोध नाही. मात्र, देव आणि धर्माच्या नावाखाली समाजाचे शोषण करणाऱ्या प्रवृत्ती आणि व्यक्तींना विरोध आहे. राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायद्यामुळे आतापर्यंत ३०० ते ३५० बुवाबाजीचे प्रकार करणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात जावे लागले, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिणींवर अज्ञातांचा हल्ला

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पिंपरी नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेलेल्या दोन आदिवासी बहिणींवर शनिवारी (२१ मे) तळेगाव दाभाडे जवळील सुदुंबरे गावात अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये लहान बहिणीचा मृत्यू झाला असून, मोठ्या बहिणीवर उपचार सुरू आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, संशयित हल्लेखोराचे रेखाचित्र तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी जाहीर केले आहे. पायल संतोष जगताप (वय ७, रा. हिंगणगाव, लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या मुलीचे; तर ऋतुजा काळुराम कुसुमकर (१४, रा. सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे) असे हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. जखमी मुलीचे वडील काळूराम कुसुमकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल आणि ऋतुजा या आते-मामे बहिणी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास पायल आणि ऋतुजा दोघी बहिणी घराजवळील ओढ्याकिनारी शौचासाठी गेल्या होत्या. या वेळी ओढ्याजवळ अज्ञात इसमाने त्या दोघींच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केले. त्यात त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या. ऋतुजा जखमी अवस्थेत शेजारच्या शेतात पडली असल्याचे काही वीटभट्टी कामगारांनी पाहिले. काळूराम कुसुमकर व कामगारांनी दोघींना दुचाकीवरून तातडीने तळेगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. उपचारापूर्वीच पायलचा मृत्यू झाला. पायल ही हिंगणगावातील मराठी शाळेत शिकत असून ती दुसरी इयत्तेतून तिसरीत इयत्तेत गेली होती. सुट्टी असल्याने ती आईसोबत सुदुंबरेत यात्रेसाठी आली होती. ती एकुलती एक मुलगी होती. ऋतुजा आठवी पास असून सुदुंबरेतील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत आहे. सध्यातरी ऋतुजा खूप घाबरली असून, तिने आठवेल त्या प्रमाणे सांगितलेल्या वर्णनावरून हल्लेखोराचे रेखाचित्र बनविण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी (२२ मे) आमदार डॉ. गोऱ्हे यांनी कुसुमकर, जगताप कुटुंबीयांची आणि ऋतुजाची भेट घेतली. तसेच, कुटुंबीयांचे सांत्वन करतानाच पोलिस अधिकऱ्यांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेत तपास योग्य दिशेने करून आरोपीला लवकरात लवकर अटक करा, अशा सूचना पोलिसांना केल्या आहेत. त्याच बरोबर संबंधित कुटुंबीयांना सरकारकडून मदत मिळावी यासाठी स्वतः मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचेही आमदार डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. घरात शौचालय असते तर आज या हल्ल्यातून मुली बचावल्या असता. स्वच्छता आणि आरोग्याबरोबरच सुरक्षेसाठी देखील शौचालय घरात असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरात शौचालय बांधणे गरेजेचे आहे. त्याच बरोबर गावात सार्वजनिक शौचालय बांधण्याबाबत खासदारांशी चर्चा देखील करण्यात येईल, असे आश्वासन आमदार गोऱ्हे यांनी या वेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरण करून सात लाखांची मागणी

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, पिंपरी डिलिव्हरी बॉय म्हणून हिंजवडी, वाकड परिसरात काम करणाऱ्या तरुणाचे अज्ञातांनी शनिवारी (२१ मे) रात्री उशिरा अपहरण केले. तसेच, त्याच्या वडिलांकडे सात लाख रुपयांची मागणी करत त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपहरण झालेल्या तरुणाच्या नातेवाइकाने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली असून, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेला तरुण चार महिन्यांपुर्वी गावाहून पुण्यात कामानिमित्त आला आहे. तो मित्रांसोबत भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहतो. हिंजवडी, वाकड परिसरात एका कंपनीत त्याने 'डिलव्हरी बॉय' म्हणून सुरू केले. शनिवारी रात्री तो घरी आला त्यानंतर साडेआकराच्या सुमारास डांगे चौकात काम आहे असे सांगून निघून गेला होता. त्यानंतर या तरुणाने रात्री गावाकडे त्याच्या वडिलांना फोन केला. माझ्या पाठीमागे चार-पाच तरुण लागले असून, ते माझा पाठलाग करत आहेत, असे म्हणून त्याने फोन बंद केला. त्यामुळे त्याच्या वडिलांनी तत्काळ काळेवाडी येथे राहत असलेल्या नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. नातेवाइकांनी वाकड पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा त्या तरुणाच्या वडिलांना फोन आला. मला चार-पाच लोकांनी पकडले असून ते मला बेंगळुरूच्या दिशेने घेऊन निघाले आहेत. मला सोडविण्यासाठी ते सात लाख रुपयांची मागणी करत असून, नाही दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तरुणाच्या वडिलांनी नातेवाइकांना माहिती दिल्यानंतर ते वाकड पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी पैशासाठी तरुणाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून वाकड पोलिस तपास करीत आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images