Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सतरा अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यांतील शेकडो धार्मिक स्थळांनी केलेले अतिक्रमण नियमान्वित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हवेली तालुक्यातील १७ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील पोलिसांचा कायदा-सुव्यवस्थेबाबतचा अहवाल आल्यानंतर येत्या काही दिवसांत ही कारवाई करण्यात येणार आहे.

धार्मिक स्थळांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील अनधिकृत; तसेच सरकारी जागांवर अतिक्रमण केलेल्या धार्मिकस्थळांची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये हवेली तालुक्यात ५७८ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अतिक्रमणे सरसकट हटविणे शक्य नसल्याने ती नियमान्वित करता येतील का, या दृष्टीने चाचपणी करण्यात आली आहे.

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये अतिक्रमण झालेली; परंतु नियमित होऊ शकतील अशा धार्मिक स्थळांची यादी करण्यात आली. या धार्मिक स्थळांची अतिक्रमणे नियमित करण्यासंबंधी प्रशासनाकडून चाचपणी केली जात असून, त्यासंबंधी पोलिस व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. मात्र, सतरा अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न भविष्यात उद्भवू शकतो का, यादृष्टीनेही अभिप्राय घेण्यात येत आहे. या अभिप्रायानंतर प्रत्यक्ष कारवाई केली जाणार आहे. हवेली तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील अन्य बारा तालुक्यांमधीलही धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांची माहिती संकलित करण्यात येत आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर त्यावरही कारवाई केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चॉकलेट सुन्या’सह दोघे गजांआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गेली दीड वर्ष पसार असलेला चॉकलेट सुन्या उर्फ सुनील किशोर डोकेफोडे या सराईतासह दोघांना गजाआड केले. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, एक सिंगल बोअर रायफल तसेच, तलवार जप्त करण्यात आली आहे. उपनगरांतील व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्यांकडून खंडणी उकळण्याचे गुन्हे चॉकलेट सुन्याकडून करण्यात येत होते.

सिंहगड, उत्तमनगर, हिंजवडी, दत्तवाडी, भारती विद्यापीठ परिसरातील व्यापाऱ्यांना धमकावून त्यांना व्यवसाय बंद करण्यास भाग पाडणे, त्यांच्याकडून खंडणी गोळा करणे, यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दोघा सराईतांकडून सुरू होते, अशी माहिती सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे आणि सहायक आयुक्त सतीश पाटील यांनी दिली.

सुनील उर्फ चॉकलेट सुन्या किशोर डोकेफोडे (वय २९, रा. कांदेआळी, जनता वसाहत, पर्वतीपायथा) व प्रकाश उर्फ पप्पू अरूण गायकवाड (वय २८, रा. गायकवाड वस्ती, बहुली, ता. हवेली) असे अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. या आरोपींनी व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरवण्यासाठी खुनी हल्ले केल्याच्या घटना केल्या आहेत. या दहशतीच्या वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. पोलिसांकडून गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचा माग काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.

चॉकलेट सुन्या रेकार्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर हिंजवडी, भारती विद्यापीठ, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व शस्त्रास्त्रे बाळगणे असे चार गुन्हे दाखल आहेत. पप्पू भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये पसार होता. खंडणीविरोधी पथकाचे हवालदार राजनारायण देशमुख व संजय काळोखे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा बुहली रोड, खडकवाडी येथे येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपींकडून दोन पिस्तुल, तीन काडतुसे आणि सिंगल बोअर रायफल जप्त करण्यात आली आहे. खंडणीविरोधी पथकाचे निरीक्षक पाटील, सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार, कर्मचारी राजनारायण देशमुख, संजय काळोखे, प्रमोद मगर, प्रशांत पवार, गणेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

वराती, उत्सवांमधून आरोपींचा माग

दोघेही आरोपी पोलिसांना वारंवार चकवा देत होते. दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांनी वेशांतराचा पर्याय शोधला. त्यांचा प्रभाव असलेल्या परिसरांमधील उत्सव, वरातींमध्ये पोलिस कर्मचारी देशमुख आणि काळोखे सहभागी होत होते. अशा प्रकारे तीन महिन्यांच्या प्रयत्नांनतर दोघांच्या हालचाली समजत गेल्या आणि आरोपी गजाआड झाले.

चार महिन्यांत ३९ पिस्तुले जप्त

पुणे पोलिसांनी गेल्या चार महिन्यांत सराईत गुन्हेगारांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात पिस्तुले जप्त केली आहेत. गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांनी मिळून ४० पिस्तुले आणि ९० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये गुन्हे शाखेने २४ पिस्तुले जप्त केली आहेत. या गुन्ह्यांत ४१ आरोपींना अटक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांचे विलीनीकरण

$
0
0

पटसंख्या घटत असल्याने महापालिकेचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापा‌लिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत असल्याने मराठी माध्यमाच्या २१ तर उर्दू माध्यमाची १ अशा २२ शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने शाळांचे विलीनीकरण करण्याच्या ठेवलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सकाळ आणि दुपारच्या सत्रात चालणाऱ्या या शाळा एकाच सत्रात सुरू होणार आहे.
महापालिकेच्या शिक्षणमंडळातील शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचे समोर आले आहे. दर वर्षी विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने कमी पटसंख्या झालेल्या शाळांमधील वर्गांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेतला जातो. यंदाच्या वर्षी मराठी माध्यमाच्या २१ आणि उर्दू माध्यमाची एक अशा २२ शाळांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्याला समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिका शिक्षण मंडळाच्या अनेक शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात चालतात. शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक मान्य होतात, त्याचबरोबर पटसंख्या दोनशेपेक्षा कमी असल्यास शिक्षणमंडळाला अशा शाळांसाठी स्वंतत्रपणे मुख्याध्यापक देता येत नाही.
महापालिकेच्या काही शाळांमध्ये पटसंख्या कमी असली, तरी वर्गाला शिक्षक द्यावा लागतो. काही शिक्षक पटसंख्या कमी असलेल्या शाळेत कार्यरत असल्याने पटसंख्या असलेल्या शाळांना त्याचा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे पटसंख्या घटलेल्या मराठी माध्यमाच्या २१ शाळा आणि उर्दू माध्यमाची एक अशा २२ शाळांचे विलिनीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्येतेसाठी ठेवला होता. ज्या शाळा दुपारच्या सत्रात चालू आहेत. त्या शाळा त्याच इमारतीमधील सक़ाळच्या सत्रात विलीनीकरण होणार आहेत. तर सकाळाच्या सत्रातील शाळा दुपारच्या सत्रातील शाळांमध्ये त्यांचे विलिनीकरण करून या शाळांचे वेळापत्रक नव्याने तयार केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कान’मध्ये झळकले मराठी चित्रपट

$
0
0

प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
म. टा. प्रतिनिधी, पुणे
चित्रपट सृष्टीसाठी आकर्षण ठरणाऱ्या फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सध्या मराठी चित्रपट झळकत आहेत. महोत्सवात सोमवारी झालेल्या या चित्रपटांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर या परिसंवादामध्ये चित्रपट अभ्यासकांनी महत्त्वपूर्ण मते नोंदविली.
अलीकडील काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीने उल्लेखनीय प्रगती केली आहे. नावीन्यपूर्ण विषय, दमदार अभिनय आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ताकदीने मांडून प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या या मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याच धर्तीवर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने या वर्षी पहिल्यांदाच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपट पाठविण्यात आले आहेत. यामध्ये रिंगण, हलाल आणि वक्रतुंड महाकाय या तीन चित्रपटांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात या चित्रपटांचे दिग्दर्शक सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर फ्रान्समध्ये रवाना झाले. कान महोत्सवाच्या वेळापत्रकात या मराठी चित्रपटांची नावे प्रसिद्ध झाली असून, सोमवारी दोन चित्रपटांचे शो प्रदर्शित झाले. पुढील दोन दिवसात उर्वरित चार शो होणार आहे.
'दर्जेदार मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठीच सरकारने हे पाऊल उचलले आहे. याची सुरुवात म्हणून पणजीमध्ये नुकत्याच झालेल्या ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्य विभागाने नऊ चित्रपट पाठविले होते. तिथे मिळालेल्या यशानंतर आता कानसाठी तीन चित्रपटांची निवड केली. चित्रपटांच्या सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे,' अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे मिलिंद लेले यांनी सांगितले.
'महोत्सवात मंगळवारी सकाळी मराठी चित्रपट जागतिक स्तरावरील वाटचाल या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रिंगण चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, वक्रतुंड महाकाय चित्रपटाचे पुनर्वसु नाईक, प्रितम कांगडे, संजय पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते. या वेळी या क्षेत्रातील मान्यवर दिर्ग्दर्शक, मार्गदर्शक आणि तंत्रज्ञांनीही मार्गदर्शन केले. पुढील दोन दिवसात अजून आपल्या चित्रपटांचे चार खेळ होणार आहेत,' असे लेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॉडेल वॉर्डा’ला निधी

$
0
0

वाल्हेकरवाडीतील एका रस्त्यासाठी दीड कोटी मंजूर
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर या मॉडेल वॉर्डातील एका रस्त्याच्या आधुनिकीकरण, काँक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी मंगळवारी (१७ मे) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे अडीच ते तीन कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली गेली. या बरोबरच वाल्हेकर वाडीतील एका रस्त्याच्या विकासासाठी दीड कोटींचा खर्च मंजूर झालेला आहे. त्यामुळे केवळ रस्त्यांच्या कामासाठी तब्बल पाच कोटी स्थायी समितीने मंजूर केले आहेत.
स्थायी समिती अध्यक्ष हिरानंद आसवानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत स्थायी समितीच्या विषय पत्रकावर स्थापत्य विभागाचे सुमारे १३ विषय मांडण्यात आले होते. त्यापैकी चार विषय तहकूब करून इतर सर्व विषय मंजूर करण्यात आले आहेत. त्यातच संभाजीनगर मॉडेल वॉर्डात काँक्रिट रस्ते विकसित करून सुशोभिकरण केले जात आहे. या रस्त्यासाठी तब्बल ३ कोटी ४९ लाख ८७ हजार ६३९ रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. तर दुसरा रस्ता वाल्हेकरवाडी येथील शिंदेवस्ती बीआरटी रस्ता ते रेल्वेलाइनपर्यंत रस्ता विकसित केला जाणार आहे. या रस्त्याच्या कामाची एक कोटी ८६ लाख ७२ हजार ९९९ रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
निवडणुका जवळ येत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्थायी समितीमध्ये ऐनवेळी किंवा विषय पत्रकावर कोट्यावधींचे प्रकल्प मंजूर केले जात आहेत. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये सुमारे ६ कोटींचा खर्च मंजूर केला आहे.
...
अनुपस्थित अधिकाऱ्यांना नोटीस
गेल्या काही दिवसांपासून स्थायी समितीच्या बैठकांना अधिकारी दांडी मारत आहेत. महापालिका इमारतीत अथवा शहरात असून देखील बैठकांना हजर न राहण्याचे प्रकार अधिकाऱ्यांकडून केले जात आहेत. त्याचा राग आज एकत्रितपणे निघाला. आयुक्तांसह कोणताही अधिकारी मंगळवारी (१७ मे) झालेल्या बैठकांना उपस्थित नव्हते. त्यामुळे जे अधिकारी इमारतीत अथवा शहरात आहेत तरी देखील ते अनुपस्थित राहिले अशांना अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष हरिनंद आसवानी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांमध्ये साहित्यिक कट्टा

$
0
0

महापालिकेचा १५ बागांमध्ये उपक्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील कवी, लेखक, यांच्यासह प्रसिद्ध साहित्यिकांचे विचार सर्वसामान्य पुणेकरांना ऐकायला मिळावेत, या उद्देशाने महापालिकेच्या १५ उद्यानांमध्ये 'साहित्यिक कट्टा' सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढील काही दिवसांमध्येच हा कट्टा कार्यान्वित केला जाणार आहे.
पुणे महापालिका आणि मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. सुरुवातीच्या काळात शहरातील पंधरा उद्यानांमध्ये हा कट्टा सुरू केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने इतर उद्यानांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने केला जाणार आहे. मराठी भाषा संवर्धन समितीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली. महापौर प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे सभागृह नेते शंकर केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, विरोधी पक्षतेने अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, समितीचे सदस्य अनिल गोरे, श्याम भुर्के, संजय भगत, न. म. जोशी, प्रदीप निफाडकर यांच्यासह अन्य सदस्य या वेळी उपस्थित होते.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात अनेक नामवंत साहित्यिक, कवी, लेखक राहतात. या मंडळींचे विचार सर्वसामान्य नागरिकांना ऐकता यावे, यासाठी सांस्कृतिक कट्टा उपक्रम सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महापालिकेने मराठी भाषा संवर्धन समितीची स्थापना केली आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे काम चालते. ग्रंथप्रदर्शन, साहित्यसंमेलन याबरोबरच नवीन लेखकांना, कवींना प्रोत्साहन देण्यासाठी समितीच्या माध्यमातून उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून हा सांस्कृतिक कट्टा सुरु केला जाणार आहे. महापालिकेच्या उद्यानांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसण्याची सोय सुविधा उपलब्ध आहे. अशा पंधरा उद्यानांमध्ये सुरुवातीला हा कट्टा कार्यान्वित केला जाणार आहे.
ज्या उद्यानामध्ये सांस्कृतिक कट्टा सुरू केला जाणार आहे, अशा उद्यानाच्या आजुबाजूच्या परिसरात राहत असलेले ज्येष्ठ कवी, लेखक, साहित्यिक यांची यादी तयार केली जाणार आहे. ही यादी तयार केल्यानंतर पालिकेच्या वतीने त्यांच्याशी संवाद साधण्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. मराठी भाषा संवर्धनासाठी महापालिकेच्या चालू वर्षाच्या बजेटमध्ये साहित्यिक कट्टा, ग्रंथप्रदर्शन यासाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मान्यवरांना ठराविक मानधन देखील देण्याचा विचार महापालिका करत आहे. पालिकेच्या वतीने घेतला जाणारा हा सांस्कृतिक कट्टा नागरिकांसाठी मात्र मोफत असणार आहे.
०००००००००००००००
मराठीच्या प्रचारासाठी कट्टा
मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महापालिकेने मराठी भाषा संवर्धन समितीची स्थापना केली आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे काम चालते. ग्रंथप्रदर्शन, साहित्यसंमेलन याबरोबरच नवीन लेखकांना, कवींना प्रोत्साहन देण्यासाठी समितीच्या माध्यमातून उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून हा सांस्कृतिक कट्टा सुरु केला जाणार आहे. महापालिकेच्या उद्यानांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसण्याची सोय सुविधा उपलब्ध आहे. अशा पंधरा उद्यानांमध्ये हा कट्टा कार्यान्वित केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तारांगणा’साठी दीड वर्षांची प्रतीक्षा

$
0
0

सुमारे १५ कोटींचा खर्च अपेक्षित
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
मुंबईतील नेहरू तारांगणाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये सायन्स पार्कमध्ये तारांगण उभारण्यात येणार आहे. या तारांगणासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, येत्या दीड वर्षांत हे तारांगण नागरिकांसाठी खुले करण्यात येईल.
तारांगणाकरिता सुसज्ज असा १५ मीटरचा डोम (घुमट) असणार आहे. यात १५० जणांची बैठक व्यवस्था असेल. हे तारांगण उभारणीसाठी खास कमिटी नेमण्यात आली आहे. या कमिटीमध्ये खगोलवैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर, खगोलशास्त्रज्ञ प्रकाश तुपे, नेहरू सायन्स सेंटरचे प्रकाश खेनद, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचा समावेश आहे.
...
तारांगण प्रोजेक्टचे काम स्थापत्य विभागाच्या वतीने सुरू झाले आहे. त्यातील ८० टक्के कामाची पूर्तता झाली आहे. प्रस्तावित तारांगणात डिजीटल आणि ऑप्टोमॅकेनिकल या दोन्ही तंत्राचा मेळ साधणार आहे.
- प्रवीण तुपे, सहशहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनभवनाचाही ‘निसर्ग कट्टा’

$
0
0

जैवविविधता दिनी उपक्रमाला सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
वन्यजीवन आणि निसर्गाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुणे वन विभागातर्फे आता दर महिन्याला 'वन भवन निसर्ग कट्टा' आयोजित करण्यात येणार आहे. येत्या २२ मेला जागतिक जैवविविधता दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.
'सध्या पर्यावरण, हवा, पाणी, वातावरण बदल, जैवविविधता हे विषय अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत. काळाची गरज, विषयाची व्याप्ती पाहता हे विषय सर्वांपर्यंत शास्त्रीय पद्धतीने आणि सोप्या भाषेत पोहचविण्याची गरज आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन पुणे वन विभागाने निसर्ग कट्ट्याचे नियोजन केले आहे. हा कट्टा दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळत पत्रकारनगर जवळील वनभवनामध्ये भरणार आहे,' अशी माहिती पुणे वन विभागाचे (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दिली.
'निसर्ग कट्ट्याची सुरुवात जागतिक जैवविविधता दिनाचे औचित्य साधून येत्या रविवार(२२ मे) वनभवनामध्ये होणार आहे. पहिल्या कट्ट्यावर डॉ. सचिन पुणेकर यांचे 'महाराष्ट्रातील जैवविविधता' या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच वनविभागाकडून जैवविविधता विषयक लघुपट देखील दाखविण्यात येणार आहे. या कट्ट्यावर निसर्ग अभ्यासक, छायाचित्रकार, संशोधक, पत्रकार, अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मार्गदर्शनासाठी सहभागी होणार आहेत. हा कट्टा सर्वांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे,' असे लिमये यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्थायी’त पुनश्च राष्ट्रवादी एकाकी

$
0
0

पुणे : स्थायी समितीमधील सदस्यांचे जुने हिशेब पूर्ण न झाल्याने नाराज झालेल्या काँग्रेस, मनसेसह भाजप, शिवसेनेच्या सदस्यांनी एकत्र येऊन मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी राष्ट्रवादीला पुन्हा एकाकी पाडले. राष्ट्रवादीचे समितीमधील सदस्य वगळता अन्य कोणत्याही सभासदाचा वर्गीकरणाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही.

स्थायी समितीमधील सभासदांना मिळणाऱ्या टक्केवारीचा वाद गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आला आहे. समितीच्या माजी अध्यक्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण विषयांचे हिशेब अद्याप मिटलेले नाहीत. हे हिशेब पूर्ण होइपर्यंत राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा निर्णय सर्वच पक्षांच्या सभासदांनी एकत्र येऊन घेतला आहे. गेल्या आठवड्यातही समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सभासदांचे विषय अमान्य करून अन्य पक्षांच्या सभासदांचे विषय मतदानाद्वारे मान्य करण्याचा प्रकार करण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या बैठकीत या सर्व पक्षीय सभासदांनी समितीतील राष्ट्रवादीच्या सदस्यांचे वर्गीकरणाचे प्रस्ताव मान्य केले. हे प्रस्ताव मान्य करण्यात येऊ नयेत, पुढे ढकलावेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या सभासदांनी विषय मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थरूर यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जावयाचे 'जावई' असलेल्या तेहसीन पूनावाला यांच्याविरोधात काँग्रेसभवनामध्ये खासदार शशी थरूर यांच्या उपस्थितीत कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. पूनावाला यांचे पोस्टर फाडण्याबरोबरच विश्वजित कदम यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करून कॉँग्रेसजनांनी आपला राग व्यक्त केला. थरूर यांनी हात जोडून विनंती केल्यानंतरही हा गोंधळ थांबला नसल्याने उगवत्या कॉँग्रेस नेतृत्वामधील संघर्ष थरूर यांच्यासह उपस्थितांना अनुभवायला मिळाला. त्यामुळे थरूर यांना दहा मिनिटातच व्याख्यान आटोपते घ्यावे लागले.

खासदार शशी थरूर यांचे कॉँग्रेस भवन येथे 'सोशल मिडिया' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास थरूर यांचा ताफा कॉँग्रेस भवनात येताच जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. गेले दोन दिवस या कार्यक्रमावरून कॉँग्रेस भवनात घमासान सुरू होते. वद्रा यांच्याशी नातेसंबंध जोडल्यानंतर लगेचच पूनावाला यांनी स्थानिक कॉँग्रेस नेत्यांना बाजूला सारून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते.

व्याख्यान होणाऱ्या हॉलमध्येही कार्यकर्त्यांनी खुर्च्यांवर तसेच एकावर एक ठेवलेल्या गाद्या व तक्क्यांवर उभे राहात घोषणा दिल्या. थरूर हॉलमध्ये आल्यावर घोषणाबाजीला आणखी ऊत आला. तेहसीन व शहजाद पूनावालांना कार्यकर्त्यांनी बोलूच दिले नाही. शहराध्यक्ष बागवे व अन्य पदाधिकाऱ्यांनी वारंवार केलेली विनंतीही कार्यकर्त्यांनी धुडकावून लावली.

'मी तुम्हाला सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन करायला आलो आहे. हा विषय महत्त्वाचा आहे, कृपया तुम्ही तो समजून घ्या. तुम्हाला विषय मान्य नसेल, तर तुम्ही इथून गेलात, तरी कोणी नाराज होणार नाही,' असे खुद्द थरूर यांनी समजावूनही घोषणाबाजी थांबली नाही. 'कॉँग्रेसबरोबरच युवक कॉँग्रेस, एनएसयूआयचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार एकत्र आल्याने कार्यकर्त्यांना उत्साह वाढला. त्यामुळे त्यांनी नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. हे जीवंतपणाचेच लक्षण आहे,' असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. 'कॉँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी भावना व्यक्त केल्या. मी पुण्यात नाही, हे थरूर यांना सांगितले होते. उद्या मी त्यांची भेट घेणार आहे,' असे विश्वजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांचा संताप

कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांचे नातेवाइक असलेल्या तेहसीन पूनावाला आणि प्रदेश कॉँग्रेसचे चिटणीस असलेल्या शहजाद पूनावाला यांनी थरूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. मात्र, त्यासाठी स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेतल्याने तसेच कॉँग्रेस भवनमध्ये बाउन्सरही आणल्याने सर्वच कार्यकर्त्यांचा संताप झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीआयएस’ने शोधणार मिळकती

$
0
0

कर आकारणी न झालेल्या मिळकतींसाठी निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील कर आकारणी न झालेल्या मिळकती (प्रॉपर्टी) शोधून काढण्यासाठी 'जिऑग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम'चा (जीआयएस यंत्रणा) वापर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कर आकारणी झालेल्या आणि कर आकारणी न झालेल्या सर्व मिळकती समोर येणार आहेत. आयटी रिसोर्सेस या आयटी कंपनीकडून हे काम करवून घेतले जाणार असून, त्यासाठी २२ कोटी ९० लाख रुपये खर्च येणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. महापालिका हद्दीत मिळकतकर आकारणी झालेल्या सुमारे आठ लाख २० हजार मिळकती आहेत. शहरात अनेक मिळकतींची कर आकारणी होत नसल्याने पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सांगितले जाते. महापालिका प्रशासनाने मिळकतकर न भरणाऱ्या मिळकती शोधून काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही वारंवार पालिकेच्या सर्वपक्षीय सभासदांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच मिळकतींचे जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. या कामासाठी पालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाने टेंडर प्रक्रिया राबविली होती. याला सुरुवातीच्या काळात कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती.
या कामासाठी आयटी रिसोर्सेस या कंपनीचा प्रस्ताव आल्याने त्यांच्याबरोबर करार करण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. या कामासाठी सुमारे २२ कोटी ९० लाख रुपये खर्च केला जाणार असून, हा खर्च करण्यास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सर्वे‍क्षण कामामुळे शहरात नक्की किती मिळकती आहेत. त्यातील किती मिळकतींचा प्रॉपर्टी टॅक्स वसूल होतो. प्रॉपर्टी टॅक्स न भरणाऱ्या ‌मिळकतींची संख्या समोर येण्यास मदत होणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
................
उत्पन्न वाढण्यास मदत
शहरात आतापर्यंत बेकायदा आणि पालिकेची मान्यता घेऊन, न घेता वाढीव बांधकाम केलेल्या मिळकतींचे या अंतर्गत सर्वेक्षण होणार आहे. मिळकतींची पूर्वीची मापे तपासणे, मिळकतधारकाचा ई-मेल क्रमांक, मोबाइल क्रमांक, मिळकतीचा फोटो, अक्षांश-रेखांशही घेण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणामुळे कर आकारणी न झालेल्या मिळकतींची मोठी माहितीदेखील समोर येण्यास मदत होणार आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्याप प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही, अशा मिळकतींकडून पालिकेला टॅक्स वसूल करता येणार असल्याने पालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याचे कमाल तापमान पोहोचले ४१ अंशांपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरातील उन्हाच्या तीव्र झळांमध्ये मंगळवारी वाढच झाली. कमाल तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचले आहे. किमान तापमानही २५ अंशांच्या दरम्यान कायम असल्याने पुणेकरांची असह्य उकाड्याने घालमेल होत आहे. पुढील दोन दिवसांत उन्हाची तीव्रता अंशतः कमी होण्याचा अंदाज असून, काही भागांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता आहे.

शहरात गेल्या आठवड्यापासून उष्मा वाढला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कमाल तापमान ४० अंशांच्या वरच आहे. मंगळवारी तर त्यात आणखी वाढ झाली आणि पारा ४०.९ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे उन्हात बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव येत आहे. सायंकाळनंतर उन्हाची तीव्रता कमी होत असली, तरी किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक असल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. पुढील दोन दिवसांत कमाल तापमान ४० अंशांच्या दरम्यान राहण्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत; तसेच शहराच्या काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शहरासह राज्यातही सर्वच भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला असून, विदर्भात तर बहुतेक ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. राज्यातील उच्चांकी ४६.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद मंगळवारी अकोल्यात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशासाठी तीनच ऑनलाइन फेऱ्या

$
0
0

उर्वरित तीन फेऱ्यांचे कटऑफ ग्राह्य नाहीत; समितीचे हात वर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी गेल्या वर्षी सहा फेऱ्या झाल्या असल्या, तरी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने त्यापैकी पहिल्या तीन फेऱ्यांचेच कट्ऑफ यंदाच्या प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले आहेत. त्यामुळे उर्वरीत तीन फेऱ्यांमध्ये कॉलेजांचे कट्ऑफ खाली गेले असले, तरी त्याची कोणतीही माहिती समिती विद्यार्थ्यांना देत नसल्याचे मंगळवारी उघड झाले.

समितीने मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक आणि समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या परिषदेमध्ये पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमधून ही बाब स्पष्ट झाली. तसेच, यंदाच्या प्रक्रियेसाठी राज्य सरकारने काढलेल्या नव्या सरकारी आदेशातील विविध मुद्द्यांचे अर्थ लावण्याविषयी समितीमध्येच एकमत नसल्याचे या परिषदेत दिसून आले. त्यामुळे आता सुरू झालेली ही प्रक्रिया लवकरच वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

अकरावी प्रवेशांसाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार यंदा तीनच ऑनलाइन फेऱ्या राबविण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. मात्र, प्रक्रियेबाहेर राहणाऱ्या आणि ऐनवेळी प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांमुळे चौथी फेरी होण्याच्या शक्यतांना या वेळी दुजोरा मिळाला. जुलैमध्ये होणाऱ्या फेरपरीक्षेमधून उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संचालकांच्या मार्गदर्शनाखाली त्या वेळी योग्य तो निर्णय घेण्याचा पवित्रा समितीने या वेळी घेतला. तसेच, इनहाउस कोट्यातून २० टक्के जागांवर प्रवेश देताना नेमकेपणाने कोणाला आणि कसे प्रवेश द्यायचे, याची कोणतीही स्पष्टता समितीला करता आली नाही.

कारवाईविषयी उदासिनताच

गेल्या वर्षीच्या ऑनलाइन प्रक्रियेतून चुकीच्या पद्धतीने प्रवेश देणाऱ्या एकूण पाच कॉलेजांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी दिले होते. त्यानुसार या कॉलेजांकडून प्रत्येकी एक लाख रुपये दंड वसूल केला जाणार होता. मात्र, समितीने वा उपसंचालक कार्यालयाने अद्याप अशा एकाही कॉलेजकडून दंड वसूल केला नसल्याची कबुली जाधव यांनी या वेळी दिली. त्यामुळे कोणतेही गैरप्रकार करा आणि नंतर विसरून जा, अशाच पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. यंदाच्या प्रक्रियेमध्येही चुकीच्या पद्धतीने प्रवेश देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा उपसंचालक जाधव यांनी दिला असला, तरी त्या विषयी नेमकी कशा पद्धतीने कारवाई होणार याची कोणतीही स्पष्टता या वेळी केली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गैरप्रकार करणाऱ्या कॉलेजांना अभय मिळणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेगाव बुद्रुक परिसरात तरुणाचा जाळून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आंबेगाव बुद्रुक परिसरातील अभिनव कॉलेजजवळ एका तरुणाला जाळल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिस नाईक राजाराम कोलते यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव कॉलेजपासून काही अंतरावर मुलांचे वसतीगृह आहे. वसतीगृहाच्या बाहेरच्या बाजूला नागरिकांना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांनी घटनेची माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत व्यक्तीचा चेहरा भाजला असून, शर्ट व छातीचा भागही जळाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त मिलींद मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब सुर्वे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अमोल काळे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४३ कोटींची टोलवसुली

$
0
0

द्रुतगती मार्गावरील एप्रिलची कामगिरी; १७ वाहने धावली
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलच्या वसुलीवरून मोठा वादंग निर्माण झाला असतानाच टोल वसुलीची कोटीच्या कोटी उड्डाणे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्यामध्ये द्रुतगती मार्गावरून १७ लाख ६७ हजार वाहनांनी प्रवास केला असून, त्यातून ४३.८४ कोटी रुपये टोलआकारणी झाली आहे. याच कालावधीत जुन्या महामार्गावरून (एनएच-४) १७.४३ कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला आहे. या दोन्ही महामार्गांवरून एकूण ६१.२७ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणारी टोलवसुली, त्यासाठी कंत्राटदाराशी करण्यात आलेला करार, या मार्गावरून जाणारी प्रत्यक्ष वाहने आणि कागदोपत्री दाखविली जाणारी वाहने यांमध्ये मोठी तफावत असल्याचे आरोप मध्यंतरी करण्यात आले होते. त्यावेळी कंत्राटदाराशी झालेला करार उघड करण्याची मागणी करण्यात आली होती. या करारातील काही मुद्दे अडचणीचे ठरणारे असल्याने तो कोणाच्या हाती पडू नये, याची दक्षताही घेण्यात आली होती. एका राजकीय पक्षाने तर द्रुतगती मार्गावरून किती वाहने जातात आणि प्रत्यक्ष किती टोलवसुली होते हे पाहण्यासाठी कार्यकर्तेच नेमले होते. हा वाद विकोपाला गेल्यानंतर द्रुतगती मार्गावर होणाऱ्या टोलवसुलीचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून १७,६७,६४९ वाहने गेली. त्यांच्याकडून टोलच्या माध्यमातून ४३ कोटी ८४ लाख ८६ हजार रुपये वसूल झाले. द्रुतगती मार्गावरील खालापूरच्या टोलनाक्यावर ८ लाख ५४ हजार २०७ वाहने नोंदविली गेली. त्यांच्याकडून २२ कोटी ३९ लाख ६० हजार रुपये टोल वसूल करण्यात आला. तळेगावच्या टोलनाक्यावर ६ लाख ८५ हजार ३७९ वाहनांची नोंद होऊन १८ कोटी ९४ लाख ७२ हजार रुपयांचा टोल मिळाला.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (एनएच-४) एप्रिलमध्ये १० लाख ५७ हजार ३१२ वाहनांची नोंद झाली. शिळफाटा, शेडुंग, कुसगाव आणि देडूरोड या चार टोलनाक्यांवर १७ कोटी ४२ लाख २६ हजार रुपयांचा टोल मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. द्रुतगती मार्ग व जुन्या महामार्गावर मिळून एप्रिलमध्ये कंत्राटदाराच्या पदरात ६१ कोटी २७ लाख १२ हजार रुपयांचे उत्पन्न पडले.
गेल्या चार महिन्यांत द्रुतगती मार्गावरून गेलेल्या वाहनांची संख्या पाहता या वर्षअखेर ही वसुली पूर्ण होऊ शकते, असा काही स्वयंसेवी संस्थांचा दावा आहे. त्यामुळे ही वसुली झाल्यावर द्रुतगती मार्गावरील कंत्राटदाराकडून होणारी टोलवसुली बंद करण्यात यावी. हा द्रुतगती मार्ग राज्य सरकारने ताब्यात घ्यावा आणि द्रुतगतीच्या मार्गाच्या देखभाली पुरतीच आकारणी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
..
आतापर्यंत २,५०० कोटींची वसुली
दरम्यान, द्रुतगती मार्गावर २००५पासून आतापर्यंत जवळपास २,५०० कोटी रुपयांची टोल वसुली झाली आहे. कंत्राटदाराशी झालेल्या करारानुसार २०१९ पर्यंत २ हजार ८६९ कोटी रुपयांची टोलवसुली अपेक्षित आहे. गतवर्षी टोलची वसुली २५८ कोटी रुपये अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४३३ कोटी रुपये वसुली झाली. द्रुतगती मार्गासाठी आलेला खर्च, त्यावरील व्याज व अन्य बाबी पाहता सुमारे ४१५ कोटी रुपयांची टोलवसुली बाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेचा विनयभंग; डॉक्टरला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , हडपसर

एकवीस वर्षांच्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉक्टराविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी डॉक्टरला गजाआड केले आहे. कोर्टाने आरोपीस २१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनवली आहे.

डॉ. बाळासाहेब हरपळे (वय ४०, रा. भेकाराईनगर, हडपसर ) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. हरपळे हे भारतीय जनता पक्षाचे वैद्यकीय विकास आघाडीचे जिल्हाप्रमुख; तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल सदस्य आणि रेल्वे सल्लागार समिती, पुणेचे सदस्य अशा विविध पदांवर आहेत. कोंढवा येथील तक्रारदार महिलेने पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार केल्यानंतर हडपसर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या वडिलांना दारूचे व्यसन आहे. वडिलांनी त्यांच्या मालकीची २० गुठ्यांच्या जागेची इसार पावती डॉक्टरला करून दिली आहे. परंतु, वडिलांची फसवणूक करून त्याने ६८ गुंठ्यांची इसार पावती करून घेतली. याबाबत महिलेने डॉक्टरकडे विचारणा केली असता तुझ्या वडिलांना मुलगा नसल्याने सर्व जमीन मला देऊन टाका, असे सांगितले. इसार पावतीपोटी महिलेच्या वडिलांना केवळ ७ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. न्यायालयात या प्रकरणी दावा सुरू आहे.

६ डिसेंबर २०१५ रोजी फुरसुंगी गावात म्हसोबाची यात्रा होती. पतीसोबत महिला यात्रेला गेली होती. त्या वेळी महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन डॉक्टरने केले. महिलेने याबाबत वडिलांना घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. मात्र, वडिलांनी डॉक्टरला घाबरून शांत राहण्याचा सल्ला दिला. महिलेने नंतर डॉक्टरांच्या पत्नीला ही गोष्ट सांगितली. त्या वेळी तिने डॉक्टरांनी चेष्टा केल्याचे सांगितले. महिलेने त्यानंतर पोलिसांना काही सांगितले नाही.

त्यानंतर जानेवारी २०१६मध्ये महिलेने जमिनीच्या व्यवहारांची इसार पावतीची झेरॉक्स दाखवा, असे डॉक्टरला सांगितले. या वेळी माझ्याजवळ पावती नसून फार्म हाउसवर येण्यास महिलेला सांगितले. या वेळी महिला पतीसोबत फार्म हाउसवर गेली. या वेळी एक काम सांगून डॉक्टरने पतीला बाहेर पाठविले. दरम्यान, मुलगी रडत असल्याने डॉक्टरांच्या गाडीत महिला मुलीला घेऊन बसली. त्या वेळी डॉक्टरने महिलेचा विनयभंग केला.

त्यानंतर कोंढवा येथील एका लग्नसमारंभास उपस्थित राहिलेल्या डॉक्टरला संबंधित महिलेच्या पतीने गाठले आणि त्यास असभ्य वर्तनाबाबत विचारणा केली. या वेळी डॉक्टरांनी त्यालाच धमकावून शिविगाळ केली. त्रस्त महिलेने अखेर पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी कारवाई करून डॉक्टरला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात मुलाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हडपसर

उन्हाळी सुटीतील क्लाससाठी दुचाकीवरून आईसोबत शाळेत जात असताना दुचाकीला वाळूच्या ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात मुलगा मृत्युमुखी पडला, तर त्याच्या गरोदर आईला पायाच्या तळव्याला मार लागला आहे. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आकाशवाणी पेट्रोल पंपासमोर ही घटना झाली. याबाबत हडपसर पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे.

केशव प्रीतम पवार (वय ८, रा. पंधरा नंबर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून वंदना प्रीतम पवार (वय ३५) असे जखमी झालेल्या त्याच्या आईचे नाव आहे. ट्रकचालक तानाजी शंकर सूर्यवंशी (वय २७ )याला पोलिसांनी अटक केली आहे. आकाशवाणी येथील 'ग्रीनवूड स्कूल'मध्ये तिसरीच्या वर्गात केशव शिकत होता. उन्हाळी सुटीतील क्लाससाठी दुचाकीवरून आईसोबत तो शाळेत जात होता. या वेळी टेकेवडे पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडताना मागून आलेल्या ट्रकची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली. ते मागच्या चाकाखाली आल्याने त्याच्या कंबरेच्या खालील भागावरून ट्रकचे चाक गेले. तर, आईच्या एका पायाच्या तळव्यावरून चाक गेले. मुलाला व आईला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला होता. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. आईच्या एका पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आई व पोटातील बाळ सुखरूप आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास हडपसर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक उमरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील धरणांत तेरा टक्के पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील सुमारे अडीच हजार मोठ्या, मध्यम व लघु धरण प्रकल्पांमध्ये आता फक्त १३ टक्के म्हणजे १८० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाणीसाठ्याची गेल्या तीन-चार वर्षांतील ही सर्वांत कठीण परिस्थिती असून धरणांतील हे पाणी पुढील किमान दीड महिने पुरविण्याची कसरत राज्य सरकारला करावी लागणार आहे.

कोकण व नागपूर विभाग वगळता अन्य चार विभागांमध्ये पाणीसाठ्यांची स्थिती चिंताग्रस्त करणारी आहे. विशेषतः मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त दीड ते पावणेदोन टक्के (पाच टीएमसी) पाणी शिल्लक राहिले आहे. मराठवाड्यातील पाण्याच्या दुष्काळाचे संकट सोडविण्यासाठी रेल्वेने पाणी पुरविण्यात येत आहे. मात्र, हे पाणी पुरेसे ठरत नसल्याने मराठवाड्यातून स्थलांतर होत आहे. त्याचा बोजा पुण्या-मुंबईसारक्या शहरांवर पडला आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी, पूर्ण येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, मनार, सिना-कोळेगाव ही धरणे कोरडी झाली आहेत. उर्ध्व पेनगंगा धरणात केवळ सहा टक्के पाणीसाठा उरला आहे. मराठवाडा सलग चौथ्या वर्षी कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करीत आहे.

नागपूर विभागातील धरणांत २१ टक्के पाणीसाठा आहे. नांद, बाघ शिरपूर, बाघ कालिसरार, दिना व पोथरा या धरणांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. तोतलाडोह धरणात १२ टक्के, कामठी खैरी धरणात ६५ टक्के, पेंच रामटेकमध्ये १४ टक्के, निम्न वेणा धरणात ८ टक्के, इटियाडोह धरणात १५ टक्के तर गोसिखुर्द धरणात ८२ टक्के साठा आहे.

अमरावतील विभागातील पूस, अरुणावती, काटेपूर्ऩा, नळगंगा ही धरणे तळाला गेली आहेत. पेनटाकळी व खडकपूर्णा या धरणांचा उपयुक्तसाठा शून्य झाला आहे. नाशिकमधील दारणा धरणात ३ टक्के, कडवामध्ये २ टक्के, भावली ५ टक्के, पालखेड १० टक्के, करंजावणे ५ टक्के, वाघाड ७ टक्के, भंडारदरा ६ टक्के, निळवंडे १४ टक्के व मुळा धरणात ७ टक्के पाणीसाठा आहे. मुकणे, ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव व गिरणा ही धरणे पूर्णपणे आटली आहेत.

पुणे विभागातील धरणांमध्ये १२ टक्के म्हणजे ५६ टीएमसी पाणीसाठा आहे. पुण्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, डिंभे, घोड या धरणांनी तळ गाठला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव धरणात ५ टक्के, टेमघर ४ टक्के, पानशेत १८ टक्के व खडकवासला धरणात ६४ टक्के पाणीसाठा आहे. साताऱ्यातील कण्हेर धरणात २१ टक्के, धोममध्ये १२ टक्के, उरमोडीत ४१ टक्के व तारळीमध्ये ३९ टक्के साठा आहे. शंभर टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणामध्ये आता फक्त १६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

....

पाणीसाठा

कोकण : ३८ टक्के

मराठवाडा : १.७५ टक्के

नागपूर : २१ टक्के

अमरावती : १४ टक्के

नाशिक : १३ टक्के

पुणे : १२ टक्के

इतर धरणे : १८ टक्के

....

एकूण : १३ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळाच्या ओढीने दोघांचा संसार सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुलाच्या जन्मानंतर अडीच वर्षांपर्यंत आई मुलाला भेटू शकली नाही. सासरची मंडळी मुलाला घेऊन गेली आणि नवऱ्याने तिला नांदवण्यास नकार दिला. तिने अखेर घटस्फोटासाठी अर्ज केला. पण, आई-बाबांना असलेल्या बाळाच्या ओढीने दोघांचा तुटण्याच्या वाटेवर असलेला संसार पुन्हा जुळला.

पुणे जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश आर. एच. महंमद यांच्या प्रयत्नांमुळे हा खटला निकाली काढण्यात यश आले. अनिता (वय २८) आणि प्रकाश (वय २९, दोघांची नावे बदलली आहेत.) यांचे जून २०१२मध्ये पुण्यात लग्न झाले. अनिताच्या माहेरच्या लोकांनी त्यांच्या लग्नाचा सर्व खर्च केला. प्रकाशला कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही, असे लग्नापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, त्याला दारूचे व्यसन असल्याचे लग्नानंतर तिला कळाले. सुरुवातीचे काही दिवस त्यांचा संसार चांगला सुरू होता. मात्र, काही दिवसांनी किरकोळ कारणावरून त्यांच्यात खटके उडू लागले. प्रकाश आणि तिच्या घरच्या लोकांकडून तिचा छळ सुरू झाला. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो तिला रात्री बेरात्री मारहाण करायचा. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. ती गर्भवती असतानाही तिला त्रास देण्यात आला होता. त्यामुळे तिचे वजन कमी झाले होते.

बाळंतपणानंतर त्यांचा मुलगा आठ दिवसांचा असताना सासरचे लोक त्याला घेऊन निघून गेले. तिला बरोबर नेले नाही. पतीकडून अशी वागणूक मिळाल्यामुळे आणि बाळापासून दूर ठेवल्यामुळे तिने घटस्फोट​ मिळावा, म्हणून कोर्टात दावा दाखल केला. जिल्हा न्यायाधीश आर. एच. महंमद यांनी त्यांच्या खटल्यामध्ये त्यांचे समुपदेशन केले. तिला तिच्या बाळाबरोबर एक दिवस तुमच्या घरी राहण्यासाठी घेऊन जा, असे सांगितले. बाळाला भेटल्यानंतर तिच्या मनातील घटस्फोटाचा विचार कमी झाला. न्यायाधीशांनी त्यांना मुलाचे भविष्य, त्यांचा संसार तुटला, तर काय परिणाम होतील याबद्दल सांगितले. त्या दोघांचे सहा बैठकांमध्ये समुपदेशन करण्यात आले. तर, शेवटच्या दोन समुपदेशन सत्रांना त्या दोघांचेही आई-वडील हजर होते. समुपदेशनाचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होऊन त्या दोघांनी घटस्फोटाऐवजी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्यास पसंती दिली.



कोर्टामुळे संसार पुन्हा सुरू

संसार नव्याने सुरू होण्याची आशा निर्माण झाली. कोर्टामध्ये फक्त घटस्फोट होतात, ही बाब चुकीची ठरली. कोर्टाच्या व्यवस्थेमुळे नव्याने संसाराला सुरुवात झाली, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. तर, माझ्या मुलाला आई आणि मला माझी पत्नी परत मिळाली. हे केवळ न्यायाधीशांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवाई मंदिरा’ला शिवकाळाचा साज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

किल्ले शिवनेरीची गडदेवता असलेल्या शिवाई देवीच्या मंदिराच्या संवर्धनाला वेग आला आहे. झीज झालेली मंदिरातील लाकडी कलाकुसर बदलण्यासाठी चंद्रपूरवरून खास सागवानी लाकूड आणले असून जुन्या नक्षीकामासारखे नक्षीकाम साकारण्यासाठी कारागीर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पूर्ण खराब झालेले कलाकुसरीचे भाग बदलण्यात येत असल्याची माहिती पुरातत्व खात्याचे सर्वेक्षक सहाय्यक बाबासाहेब जंगले यांनी 'मटा'ला दिली.

शिवरायांच्या जन्मापासूनचे संदर्भ असलेल्या या मंदिराची उभारणी शिवाजी महाराजांच्या पूर्व कालखंडात झालेली आहे. मंदिराचा गाभारा खडक कोरून केलेल्या लेणीमध्ये आहे. तर, सभामंडप बाहेरील बाजूला लाकडी कलाकुसरीने बनविलेला आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार १९२४मध्ये करण्यात आल्याची नोंद मंदिरात आहे. त्यानंतर ९२ वर्षांनी मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी पुरातत्व खात्याकडून ७० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या ठिकाणी आवश्यक असलेले सागवानी लाकूड मिळण्यासाठी पुरातत्व खात्याने तीन वेळा टेंडर काढले. परंतु त्यासाठी मोठ्या ओंडक्याच्या आकाराच्या लाकडाची गरज असल्याने त्याचा पुरवठा करण्यासाठी देशभरातून एकही व्यापारी पुढे आला नव्हता. दरम्यान, त्याच प्रकारचे लाकूड मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे प्रयत्न सुरू होते.

किल्ले शिवनेरीचा कायापालट करण्यासाठी सन २०००मध्ये जुन्नरमध्ये वनविभागाचे उपवनसंरक्षक असलेल्या अशोक खडसे यांनी विशेष भर दिला होता. त्यांच्या प्रयत्नांतून शिवनेरीला उर्जितावस्था मिळण्यासाठी निधी मिळाला होता. शिवनेरीच्या संवर्धनाचे काम करण्यासाठी प्रयत्न केलेल्या खडसे यांची बदली सध्या चंद्रपूर येथील बल्लारशा या सागवानी लाकडाचा सर्वांत चांगला साठा असलेल्या वनविभागात असल्याने, जीर्णोद्धारासाठी उपलब्ध होत नसलेल्या लाकडासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू झाला. शिवाई देवी मंदिरासाठी ही लाकडे हवी असल्याने त्यांनी यामध्ये विशेष लक्ष घातले. त्यामुळे उशिरा का होईना, संवर्धनासाठी योग्य सागवानी लाकूड उपलब्ध झाले. त्यासाठी आवश्यक त्या आकारातील ओंडके थेट चंद्रपूरवरून आणून कलाकुसर करण्याचे काम सध्या शिवनेरी गडावर सुरू आहे. बहुतांश काम प्रगतिपथावर असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी लाकडी सभामंडपाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जंगले यांनी दिली.

गर्भगृह, प्रभावळीचा रंग काढला

गेल्या काही वर्षांत मंदिरात असलेल्या दगडी कलाकुसरीच्या गर्भगृह आणि प्रभावळीवर ऑइल पेंटचा रंग दिला गेला होता. मात्र, मंदिराचे पुरातत्वीय महत्त्व लक्षात घेता, खास प्रक्रिया करून हा रंग काढण्यात आला आहे. त्यामुळे दगडी नक्षीकामाचे मूळ सौंदर्य खुले झाले आहे. मंदिराच्या मूळ स्वरूपाला छेद न देता प्राचीन कालखंडात त्याचे स्वरूप होते, त्याचप्रमाणे किंबहुना तसेच संवर्धन पुरातत्वीय खात्याकडून केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images