Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्याचे तापमान पुन्हा ४० अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विदर्भात उष्णतेची लाट असून संपूर्ण राज्यातही तापमानात वाढ झाली आहे. पुण्यातही कमाल आणि किमान दोन्ही तापमानात वाढ झाली आहे. शहरात शनिवारी ४० अंश सेल्सिअस इतके कमाल, तर २५.२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहून गडगडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शहरात शनिवारपासूनच उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लोहगाव येथे ४१ अंश सेल्सिअस, कमाल व २६.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा एकदा वळवाचा पाऊस जोरदार बरसण्याची अपेक्षा आहे. मात्र, पुढील दोन दिवस केवळ गडगडाटी ढग निर्माण होतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट असून तेथे सर्वत्र कमाल तापमान ४४ अंशांच्या पुढेच आहे. शनिवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील ब्रह्मपुरी येथे (४६ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. नागपुरात हंगामातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही उष्णतेची लाट आणखी दोन दिवस टिकण्याची शक्यता आहे. विदर्भाबरोबरच राज्यात अन्य ठिकाणीही तापमानात वाढ झाली आहे. परभणी येथे ४५ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे ४२, सोलापूर येथे ४२.५ तर सांताक्रूझ येथे ३४.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले. रविवारी कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीर्ण इमारती नोटिशीच्या हवाली

$
0
0

जीवावर उदार होऊन राहण्याची नागरिकांवर वेळ

Chaitanya.Machale@timesgroup.com

पुणे : शहरातील धोकादायक वाडे आणि इमारतींबाबत महापालिका प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने हजारो नागरिकांना जीवावर उदार होऊन धोकादायक घरांमध्ये राहावे लागत आहे.

पावसाळा सुरू झाला, की शहरातील धोकादायक इमारतींना आणि वाड्यांना नोटिसा बजाविण्याचे काम पालिका प्रशासन करते. मात्र, या नोटिशींपलीकडे येथील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पालिकेतर्फे घेतली जात नसल्याने त्यांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. यामध्ये महापालिकेच्या मालकीच्या वसाहतींचा देखील समावेश आहे.

शहराचा मध्यवर्ती भाग अशी ओळख असलेल्या बुधवार, रविवार, सदाशिव यासह शनिवार, नारायण, शुक्रवार या पेठांमध्ये अनेक जुने वाडे आणि इमारती आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली, की दर वर्षी धोकादायक वाड्यांचा प्रश्न समोर येतो. शहरात दर वर्षी वाड्याची भिंत, वाडा तसेच धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याच्या एक ते दोन घटना घडतात. अशा दुर्घटना घडल्यानंतर खडबडून जागे होत महापालिका प्रशासन कामाला लागते. वाडामालक, भाडेकरू यांना नोटीस बजावून कारवाई करण्याचे आदेश दिले जातात. मात्र, शहरातील धोकादायक इमारती आणि वाडे पूर्णपणे रिकामे करण्यात अद्याप पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात वाडा पडून काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये शहरात ९०० हून इमारती, वाडे धोकादायक असल्याची माहिती समोर आली होती.

धोकादायक झालेले वाडे खासगी मालकीचे आहेत. या वाड्यांमध्ये जुने भाडेकरू राहतात. ते घर खाली करायला तयार नसतात. खोली रिकामी केली तर, आपला हक्क जाईल, या भीतीने भाडेकरू धोकादायक इमारतींमध्ये राहात असल्याचे समोर आले आहे. वाडा रिकामा करायचा झाल्यास जुन्या भाडेकरूंना मोबदला द्यावा लागेल, या भीतीने वाडामालक संकटाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पालिकेनेच धोकादायक झालेले वाडे रिकामे करावेत, अशी अपेक्षा ठेवतात. घरमालक आणि भाडेकरू यांच्यात असलेल्या वादामुळे वाडे रिकामे करण्यास मर्यादा येतात. त्यातच धोकादायक वाड्यांवर, इमारतींवर कारवाई करताना पालिकेने तेथील नागरिकांची सोय इतर ठिकाणी करावी, अशा सूचना कोर्टाने दिलेल्या असतानाही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो.
महापालिकेचे कर्मचारी राहत असलेल्या पालिकेच्या वसाहती देखील राहण्यासाठी अत्यंत धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींमध्ये पालिकेचे हजारो लोक राहात असून या इमारतींचा पुनर्विकास करायचा झाल्यास त्यामध्येही अडचणी येत असल्याने हा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित पडला आहे. पालिकेच्या मालकीच्या सात ते आठ वसाहती राहण्यासाठी धोकादायक झाल्या आहेत. महापालिका प्रशासन स्वतःच्याच वसाहतींकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष करत असेल तर, सामान्य पुणेकरांनी महापालिकेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

दर व‍‍‍‍‍‍र्षी पावसाळ्या‌त दुर्घटना घडल्यानंतर जागे होत धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे आश्वासन देणाऱ्या पालिका प्रशासनाने यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मी रोडवर वॉकिंग प्लाझा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा/पुणे

लक्ष्मी रोडवर वाहनांना बंदी घालत वॉकिंग प्लाझा करण्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले. लक्ष्मी रोडप्रमाणे औंध येथील डीपी रोडवरही वॉकिंग प्लाझा करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

येरवड्यातील ब्रिटिशकालीन जुन्या बंडगार्डन पुलावर पालिकेने उभारलेल्या शहरातील पहिल्या 'आर्ट प्लाझा'चे उद‍्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी, लक्ष्मी रोडवरही वॉकिंग प्लाझा करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. 'लक्ष्मी रोड, तसेच डीपी रोडवर वॉकिंग प्लाझा करण्यासाठी व्यापाऱ्यांचा विरोध डावलून नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल,' अशा स्पष्ट शब्दांत पवार यांनी महापालिकेच्या योजनेला पाठिंबा दिला.

लक्ष्मी रोडप्रमाणेच औंधच्या डीपी रोडवरही वाहनांना बंदी घालून दीड किलोमीटर लांबीचा वॉकिंग प्लाझा करण्याचा विचार आहे. 'लक्ष्मी रोड आणि औंधच्या डीपी रोडवर वॉकिंग प्लाझाचे नियोजन प्रशासनाने केले आहे. महापालिकेने त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद केली आहे. या आधीचा अनुभव लक्षात घेऊन दोन्ही रस्त्यावर ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न असेल', असे महापौर प्रशांत जगताप यांनी नमूद केले.

आर्ट प्लाझाच्या उद‍्घाटनास पवार आणि जगताप यांच्यासह उपमहापौर मुकारी अलगुडे, पालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाबू वागसकर, स्थानिक नगरसेवक सतीश म्हस्के उपस्थित होते.

लक्ष्मी रोडवर ग्राहकांना सुरक्षितपणे खरेदीचा आनंद लुटता यावा, यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी वॉकिंग प्लाझा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्थानिकांचा विरोध, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे त्यावेळी योजनेला कडाडून विरोध करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विमानतळ विस्तारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १५.८४ एकर जागा भाडेतत्त्वावर देण्यास हवाई दलाने मान्यता दिली असल्याचा पुनरुच्चार करून, हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरणादरम्यान करार होण्यापूर्वी विस्तारीकरणाचे कामही सुरू करता येईल, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी दिली.

पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, त्यांनी विमानतळ विस्तारीकरणासंदर्भातील सर्व अडथळे दूर झाल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक व आमदार योगेश टिळेकर या वेळी उपस्थित होते.

'विमानतळ प्राधिकरणाला दिल्या जाणाऱ्या जागेतून हवाई दलाची डेटा केबल जाते. डेटा केबल हवाई दल स्वतःच दुसरीकडे हलविणार आहे; तसेच प्रत्यक्ष काम सुरू करताना सुरक्षेसाठी संरक्षक भिंत टाकावी लागणार आहे. त्या जागेतील एक रस्ताही दुसरीकडे वळवला जाणार आहे. ही दोन्ही कामे विमानतळ प्राधिकरणाकडून केली जाणार आहेत', असे पर्रीकर यांनी सांगितले. विमानतळ विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी जागा देण्याबाबतचा निर्णय दोन महिन्यांत घेतला जाईल, असेही त्यांनी सूचित केले.

पर्यायी रस्ता देणार

पुण्यातून विमानतळाकडे येण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याव्यतिरिक्त, आणखी एक पर्यायी रस्ता करण्यास हवाई दलाची जागा देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसेच, सध्याच्या रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक त्या बाबींची पूर्तता करावी, अशा सूचनाही सर्व संबंधितांना देण्यात आल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

'आणखी वेळ नाही'

लोहगावच्या हवाई विमानतळावरून प्रवासी विमान वाहतुकीसाठी शक्य तेवढा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापुढे, हवाई दलाला आणखी वेळ देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी पुण्यात मांडली. त्यामुळे, लोहगावच्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असली, तरी विमान संचलनाच्या कालावधीत आणखी वाढ होणे, शक्य नसल्याचेही संकेत मिळत आहेत. पर्यायाने, पुण्यासाठी नव्या विमानतळाबाबत त्वरेने निर्णय होणे अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरविंद शिंदेंची राज्यसभेत एंट्री?

$
0
0

सोशल मीडियावरील उपस्थिती पथ्यावर पडणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे आणि योजनांमधील फोलपणा सातत्याने मांडणाऱ्या, सोशल मीडियावरून नव्या पिढीशी संवाद साधणाऱ्या काँग्रेसमधील काही नेत्यांना थेट राज्यसभेवर जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीमने महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांची 'संभाव्य यादी'त निवड केली असून, येत्या काही दिवसांत त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकांमधील धक्कादायक पराभवानंतर काँग्रेसने पुढील निवडणुकांसाठी नव्याने पुनर्बांधणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्यसभेवर शक्यतो पक्षातील ज्येष्ठ सदस्यांना संधी दिली जाते. मात्र, राज्यसभेत अल्पमतात असलेल्या मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी, त्यांच्या ध्येय-धोरणांवर टीका करण्यासाठी आणि जनमानसातील काँग्रेसची पत परत मिळविण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा राहुल गांधी यांचा आग्रह आहे. त्यादृष्टीने, गांधी यांच्या टीमने गेल्या काही महिन्यांपासून विविध राज्यांतून सोशल मीडियावर 'अॅक्टिव्ह' असलेल्या पक्षातील नेत्यांचा शोध घेतला आहे. त्यात प्रामुख्याने केंद्र-राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचा तीव्र शब्दांत निषेध करणाऱ्या, त्याविषयी जनजागृती करणाऱ्या आणि स्थानिक भाषांमध्ये काँग्रेस पक्षाची धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या कार्यकर्त्यांची 'शॉर्ट लिस्ट' करण्यात आली आहे. त्यामध्ये, पुण्यातून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे.
महापालिकेत एका बाजूला काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीसोबत सत्तेत भागीदार असला तरी, पुणेकरांच्या हिताच्या प्रश्नांवर काँग्रेसने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणीपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावावर काँग्रेसने जोरदार आंदोलन केले होते. यासह, इतरही अनेक प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका ठोसपणे मांडण्याचे काम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. त्यामुळेच, पक्षाने त्यांची निवड केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
..
थरूर करणारअहवाल सादर
देशभरातून अशा नव्या कार्यकर्त्यांची यादी करण्यात आल्यावर, आता पुढच्या टप्प्यात प्रत्येकाकडून त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स, त्यांनी केलेली आंदोलने, स्थानिक भाषेसह इंग्रजीवरील प्रभुत्व, याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर पुण्यात येणार आहेत. शिंदे यांच्यासह राज्यातील इतरही काही कार्यकर्त्यांशी संवाद साधून, चर्चा करून त्याचा सविस्तर अहवाल थरूर यांच्यातर्फे पक्ष नेतृत्वाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर, राज्यसभेवरील संभाव्य नव्या चेहऱ्यांबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय इच्छेअभावी ‘स्मार्ट’ हुकले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी 'राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीमध्ये येऊ शकले नाही. स्मार्ट सिटीच्या यादीतून जर एखादे शहर बाहेर पडले तर पिंपरी-चिंचवड शहराच्या नावाचा स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच केंद्र सरकारला पाठवणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे स्मार्ट सिटीमध्ये नाव यापूर्वीच यायला पाहिज होते; पण दुर्देवाने तसे झाले नाही,' असे मत पिंपरी-चिंचवडचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (१४ मे) चिंचवडमधील सायन्स पार्क येथे स्वयंसेवी संस्थांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, या वेळी राजीव भावसार, कर्नल शशिकांत दळवी, विराज गुपचुप आदी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे म्हणाले, 'पिंपरी-चिंचवड शहरातील मूलभूत सुविधा चांगल्या आहेत. इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडचा विकासदर मोठ्या प्रमाणात आहे.' 'पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीसाठी अनुकूल आहे आणि स्मार्ट सिटीबद्दल अंतरभाव करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली आहे. स्मार्ट सिटी यादीतून जर एखादे शहर बाहेर पडले तर पिंपरी-चिंचवड शहराच्या नावाचा स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच केंद्र सरकारला पाठवणार आहे. पुणे शहराला पिंपरी-चिंचवड जोडले गेलेले आहे, म्हणून पिंपरी-चिंचवडचे नाव स्मार्ट सिटीमध्ये येऊ शकले नाही,' असेही ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अजून वाढवायचा असेल तर इथल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देणे महत्त्वाचे आहे. पीएमपीएमएलचे उत्पन्नही वाढले आहे. पण, मला खंत या गोष्टीची वाटते की इथले बीआरटी मार्ग रिकामे दिसत आहेत. जे जे बीआरटी मार्ग रिकामे आहेत, त्यांना कार्यान्वित करावेत. बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात. शहरासाठी ५०० एसी बसेस प्रस्तावित आहेत. ज्यामध्ये ३०० बसेस पुणे महापालिकेसाठी आणि २०० बसेस पिंपरी महापालिकेसाठी असणार आहेत. तसेच, पीएमपीएमएलला सॉफ्ट लोन मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. 'राज्यातील दुष्काळी परिस्थिती पिंपरी-चिंचवड शहराने जाणून घेतली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. या वर्षी धरणामध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा आहे. पण, गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ४० टक्के ए‍वढा होता. पुढे भविष्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. इंद्रायणी नदी, मुळा-मुठा आणि पवना नदीमध्ये मलशुद्धीकरण प्रक्रियेची सुविधा असून ती आणखी प्रभावी होण्याची गरज आहे. नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत आहे, त्याचा वेगळा मार्ग बनविणे (चॅनेलायझिंग) गरजेचे आहे,' असेही वाघमारे यांनी सांगितले. या वेळी पिंपरी-चिंचवड शहरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २२ स्वयंसेवी संस्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच, या वेळी दळवी यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल मार्गदर्शन केले; तर विराज गुपचूप यांनी पाण्याच्या पुनर्वापराची माहिती दिली. अमोल देशपांडे यांनी पीसीसीएफच्या कार्याचा आढावा घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील मागील वर्षीचा आढावा घेतला व त्याचे सादरीकरण केले. बिल्वा देव आणि लक्ष्मीकांत भावसार यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉ. डोळे यांचे कार्य उत्तम’

$
0
0

बाबासाहेबांच्या हस्ते 'नयनमनोहर'चे प्रकाशन म. टा. प्रतिनिधी, पुणे 'लोकांच्या विविध प्रकारच्या आवडी-निवडी असतात. त्याप्रमाणेच मला देखील विविध प्रकारच्या दागिन्यांची आवड आहे. मात्र, या सर्वांत मला आवडणारा दागिना हा डोळे आहे. त्यामुळेच डोळे नसणे ही कल्पनाच मी करू शकत नाही,' असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी व्यक्त केले. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये केलेले कार्य उत्तम आणि उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे यांच्या जीवनकार्यावरील उत्कर्ष प्रकाशनाच्या 'नयनमनोहर' या पुस्तकाचे प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते झाले. प्रकाशनानंतर पुरंदरे बोलत होते. या वेळी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. डोळे, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, पुस्तकाच्या लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे, डॉ. संजीव डोळे, डॉ. आनंद दीक्षित, डॉ. स्वाती दीक्षित, डॉ. शैलेश गुजर, प्रकाशनाचे सु. वा. जोशी आदी उपस्थित होते. डॉ. मुजुमदार म्हणाले, 'डॉ. मनोहर डोळे यांच्या जीवनकार्यावर लिहिण्यात आलेल्या नयनमनोहर या पुस्तकाद्वारे डॉ. डोळेंच्या कर्तृत्वाला वंदन केले आहे. या पुस्तकाद्वारे डॉ. डोळे यांनी केलेली नेत्ररुग्णांची सेवा अधिकाधिक लोकांना समजणार आहे.' माझे रुग्ण, हितचिंतक आणि कुटुंबीय यांच्यामुळेच जीवनात आतापर्यंत रुग्णांची सेवा करता आली. मात्र, नेत्रसेवेचे खूप मोठे काम अद्याप बाकी आहे. त्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे डॉ. मनोहर डोळे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. पुरंदरे यांनी पुस्तक निर्मितीच्या प्रवासाची माहिती दिली. डॉ. संदीप डोळे यांनी प्रास्ताविक केले. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. ................. बाबासाहेबांनी काढले चिमटे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ते लहान असताना त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या एका अंध वयस्क महिलेच्या जीवनाची गोष्ट सांगत होते. ते म्हणाले, 'मी सांगत असलेली गोष्ट ही खूप जुनी म्हणजे १९३०-३१ या सालादरम्यानची आहे. कारण माझा जन्म हा १९२२ सालचा आहे. नशीब आतापर्यंत माझ्या जन्मतारखेहून अद्याप वाद सुरू झालेला नाही.' त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांद्वारे घेतले कर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे जनता सहकारी बँकेला बनावट कागदपत्रे सादर करत २१ लाखांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँकेतील अधिकारी धनंजय चिपळणकर (वय ५५, रा. श्रीपायस सोसायटी, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार टोनी सोलेमन (रा. टिंगरेनगर), तेजस परमार (रा. देवडा कॉर्नर, वडगाव शेरी) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलेमन व परमार या दोघांनी कर्जासाठी अंशुल मोटार्स या बनावट कंपनीच्या नावाने अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींची खोटी कागदपत्रे तयार करून घेतली. ही कागदपत्रे मार्केटयार्ड येथील पुणे जनता सहकारी बँकेच्या शाखेमध्ये सादर केली. त्यावर विश्वास ठेवून अधिकाऱ्यांनी आरोपींना तब्बल २१ लाख रूपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर बँकेने या कागदपत्रांची तपासणी केली असता, अशी कंपनी व व्यक्ती अस्तित्वात नसल्याचे समोर आले. त्यामुळे बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस तपास करत आहेत. नोकरीच्या बहाण्याने फसवणूक रेल्वे तिकीट बुकींगसाठी आयआरसीटीसीचा अधिकृत एजंट नेमण्याचे आमिष दाखवून एकाची ३८ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन अगरवाल (वय ३९, रा. येरवडा गावठाण) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून शेखर ओमप्रकाश पोतदार (रा. नागपूर) व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोतदार याने अगरवाल यांना फोन केला. नागपूर विभागातील रेल्वेचे तत्काळ बुकिंग कार्यालयाचा प्रमुख असल्याचे सांगितले. तुम्हाला आयआरसीटीसीचे अधिकृत एजंट म्हणून नेमले जाईल, त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोकरीसाठी वेगवेगळे शुल्क भरावे लागेल असे सांगून एका बँकेच्या खात्यामध्ये ३८ हजार ५० रूपये भरण्यास सांगितले. अगरवाल यांनी त्यानुसार पैसे भरले. पण अनेक महिने झाले तरी नोकरीबाबत पुन्हा फोन किंवा काहीच माहिती नाही. त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो न झाल्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवीगाळ करणाऱ्या पोलिसावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे बीट मार्शलच्या ड्युटीवर असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना विनाकारण शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा दुसऱ्या एका पोलिसावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले असता तो पळून गेला आहे. विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या या या पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत पोलिस शिपाई अनिल मंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून वसंत वाघमारे (रा. स्वारगेट पोलिस वसाहत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाघमारे हा कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तर, तक्रारदार मंदे व त्यांचे सहकारी वाघमोडे हे शनिवारी रात्री बीटमार्शलच्या ड्युटीवर जात होते. त्या वेळी वाघमारे याने या दोघांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच, तुझी वाट लावून टाकतो, अशी धमकी दिली. मंदे व वाघमोडे यांनी आरोपी वाघमारे याला पकडून पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवित असताना तो पोलिस ठाण्याच्या पाठीमागील दारातून फरार झाला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक डी. एम. लगड हे अधिक तपास करत आहेत. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील या कर्मचाऱ्याच्या विरोधात या पूर्वीही अनेक तक्रारी आल्या आहेत. तसेच, अनेक गोष्टीमुळे हा कर्मचारी चर्चेत आहे. हातचलाखीने सोनसाखळी चोरली पुणे : पूजेसाठी सोन्याची साखळी घेऊन हातचलाखीने ती चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवार पेठेतील स्टार वॉश लॉन्ड्री येथे शनिवारी सकाळी घडला. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजया गुजराथी (वय ६०, रा. शुक्रवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजराथी यांचे शुक्रवार पेठेत स्टार वॉश लॉन्ड्रीचे दुकान आहे. गुजराथी या शनिवारी सकाळी दुकानाची साफ-सफाई करत होत्या. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती दुकानात आली. तिने गुजराथी यांच्याकडे एक हजार रुपयांचे सुट्टे मागितले. त्या व्यक्तींनी गुजराथी यांना बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्याकडून पैशाचे नाणे घेतले. त्यानंतर गुजराथी यांच्याकडून १५ हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी घेतली. नाणे व सोन्याच्या साखळीची पूजा केल्यानंतर साखळी रुमालात बांधल्याचे दाखविले. पण, हातचलाखी करून त्या व्यक्तीने सोन्याची साखळी चोरून नेली. या प्रकरणी एम. आर. घुगे हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्ती कामांची ‘अंधारयात्रा’

$
0
0

पावसाळापूर्ण कामांचा बोजवारा; कामे कूर्मगतीनेच सुरू
Sujit.Tambade@timesgroup.com
पुणे : पावसाला सुरुवात झाली की, पुणेकरांना कायम अंधारात नेणारे 'महावितरण' नागरिकांना सेवा देण्यासाठी वेगवेगळी पावले उचलत आहे; पण प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत अद्याप बदल झाला नसल्याने पावसाळापूर्व कामांचा बोजवारा उडाला आहे. दुरुस्तीची कामे धीम्या गतीने सुरू असून, नवीन कामे अजूनही कूर्मगतीने करण्यात येत असल्याने या पावसाळ्यात वीजपुरवठ्याबाबतीत नागरिकांना 'रात्रीस खेळ चाले' असा अनुभव घ्यावा लागणार आहे.
पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून 'महावितरण'कडून विविध कामे करण्यात येत आहेत. त्यामध्ये जुन्या लाइनची दुरुस्ती, विजेच्या खांबांवरील तारांचे गुंते सोडवणे, विजेच्या तारांना अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती यांसारखी कामे आहेत. सध्या पुणे महापालिकेकडून रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी असलेल्या विजेच्या लाइन बदलून घेण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. मात्र, हे काम करण्यात महावितरणकडून अनेकदा विलंब होत असल्याने रस्त्यांच्या कामांच्या वेगावरही त्याचा परिणाम झाला आहे. पुणे महापालिकेने एक मेपासून नव्याने रस्ते खोदण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आता रस्ते खोदण्यात येत नाहीत. मात्र, खोदलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी नवीन भूमिगत विजेची लाइन टाकणे, हे काम करण्यात 'महावितरण'कडून चालढकल करण्यात येत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत.
शहराच्या आसपास नागरी वस्ती वाढत असल्याने या भागांमध्ये वीजसेवा देण्यासाठी नवीन लाइन टाकण्याची कामे महावितरणकडून हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांचा वेग अतिशय मंद आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचे विजेचे बिल थकल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्याची तत्परता दाखवणाऱ्या 'महावितरण'ला तेवढ्याच तत्परतेने वीजसेवा देण्यात अनेकदा अपयश येते. प्रत्यक्ष घटनास्थळी किंवा आपापल्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे ही नामुष्कीची वेळ येत आहे. घटनास्थळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता ही पूर्वीप्रमाणे मनमानी पद्धतीची आहे. पूर्वी काम किती वेळात पूर्ण करायचे, यासाठी कोणतीही बंधने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नव्हती. आता बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे दिलेल्या वेळेतच काम पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागते; पण या वेळेचे बंधन तोडून आपल्याच मनाप्रमाणे काम करण्याची सवय लागलेले कर्मचारी अद्याप बदलायला तयार नाहीत. त्याचा फटका पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना बसत असतो. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत होण्यास विलंब लागतो.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत होण्यासाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी 'महावितरण'ने काही उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक विलंब केल्याचे आढळल्यास त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. 'महावितरण'ने घेतलेला हा निर्णय आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारा ठरणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्यानिमित्ताने 'महावितरण'ने केली. पावसामुळे विश्रांतवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित विभागातील सहायक अभियंत्याने जाणीवपूर्वक कामात कसूर केला. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आता कर्मचाऱ्यांवर वचक राहणार आहे, ही नागरिकांच्यादृष्टीने जमेची बाजू आहे. 'महावितरण'च्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रात नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारीचे दिलेल्या मुदतीत निराकरण करण्याचीदेखील अट अधिकाऱ्यांना घातलेली आहे.
..
तंत्रज्ञान बदलले; मानसिकता जुनीच
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तत्पर वीजसेवा देण्याचा 'महावितरण'चा प्रयत्न आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलली नाही, तर पावसाळ्याच्या तोंडावर 'महावितरण'कडून पुणेकरांना अंधार दाखवला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती निवारण दल असणे आवश्यकच

$
0
0

'एनडीआरएफ'वर अवलंबून राहणे चुकीचे
Rohit.Athavale@timesgroup.com
पिंपरी : आपत्ती व्यवस्थापन करताना 'राष्ट्रीय आपत्ती निवारण दला'वर (एनडीआरएफ) अवलंबून न राहता प्रत्येक राज्याने स्वतंत्ररित्या राज्य आपत्ती निवारण दलाची (एसडीआरएफ) स्थापना करणे आवश्यक आहे. आपत्ती नियोजन कायदा २००५ नुसार 'एसडीआरएफ'ची स्थापना करणे गरजेचे असताना महाराष्ट्र-गोवा तसेच अन्य अनेक राज्यांनी अद्याप त्यांची स्थापना केलेली नाही. तळेगाव दाभाडे येथील 'एनडीआरएफ'च्या खांद्यावर सध्या संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातील आपत्ती निवारणाची जबाबदारी आहे.
मान्सूनपूर्व तयारी म्हणून 'एनडीआरएफ'कडून उपलब्ध साधनसामुग्रीची चाचणी घेण्यात येते. तसेच जवानांना ट्रेनिंग देखील देण्यास येते. त्यासाठी स्वतंत्र कॅम्प देखील आयोजित करण्यात येतो. परंतु, तळेगाव दाभाडे येथील 'एनडीआरएफ'चे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यासह गोवा असल्याने अनेकदा गरजेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर होतो. आपत्कालीन परिस्थितीचे स्वरूप पाहून 'एनडीआरएफ'च्या तुकड्यांना पाचारण करण्यात येते. तसेच, शहरापासून घटनास्थळाचे अंतर लक्षात घेता गरजेनुसार या तुकड्यांना हेलिकॉप्टर किंवा विमान उपलब्ध करून दिले जाते.
सध्या ८० वाहनांच्या मदतीने 'एनडीआरएफ'ची तुकडी दोन्ही राज्यांमध्ये जाऊन मदतकार्य करते. आपत्कालीन परिस्थितीचे खास वर्गीकरण करण्यात येते. त्यानुसार शक्यतो 'लेव्हल ३' अत्यंत गंभीर अशा वेळेस एनडीआरएफला संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाचारण करण्यात येते. भिंत-बिल्डिंग कोसळणे, भूस्खलन, पूर अशा घटनांच्या वेळी 'एनडीआरएफ' धावून जाते. एक ते तीन टन वजनी साधनसामुग्री घेऊन जाण्याची क्षमता असणारी वाहने या तुकड्यांना पुरविण्यात येतात. आपत्ती नियोजन कायदा २००५ नुसार जर राज्य आपत्ती नियोजन तुकडीची स्थापना झाल्यास स्थानिक पातळीवर तत्काळ मदत मिळू शकते. जिल्हापातळीवर असलेल्या आपत्कालीन यंत्रणांना 'एसडीआरएफ'ची मदत लवकर उपलब्ध होऊ शकते. मात्र, प्रशासकीय तसेच राजकीय अनास्थेमुळे नवा कायदा होऊनही गेल्या अकरा वर्षांत अशी टीम अस्तित्वात आलेली नाही.

'वास्तविक सुरुवातीचा एक तास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे या वेळात स्थानिक यंत्रणा कशा प्रकारे परिस्थितीला सामोऱ्या जातात, यावर अनेक बाबी अवलंबून असतात. त्याच बरोबर स्थानिक मदत लवकर उपलब्ध होण्यासाठी 'एनडीआरएफ'कडून दर पंधरा दिवसांनी एका जिल्ह्यात जाऊन नागरिकांसह प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना देखील वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते,' अशी माहिती डेप्युटी कमाडंट सच्चिदानंद गोडसे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
..
मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक
राज्यातील मान्सूनपूर्व तयारी म्हणून येत्या गुरुवारी (१९ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक बोलाविली आहे. सर्व जिल्ह्यातील पूर नियंत्रणासह आपत्कालीन यंत्रणांची काय तयारी आहे तसेच कोणत्या भागात अतिरिक्त साधनसामुग्री हवी आहे याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. 'एनडीआरएफ'चे कमाडंट, डेप्युटी कमांडंटदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 'एनडीआरएफ'कडून देखील राज्यातील आपत्कालीन व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना या बैठकीत करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! पुढे खड्डे आहेत...

$
0
0

Suneet.Bhave@timesgroup.com
पुणे : पावसाळ्याचा हंगाम सुरू होण्यास जेमतेम १५ दिवस राहिले असताना, शहरात मोठ्या प्रमाणात खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी अद्याप पूर्ण झालेली नाही. शहरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत म्हणून पालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून वारंवार सूचना दिल्या जात असूनही स्थितीत फारसा फरक पडल्याचे जाणवत नाही. तसेच, डांबराच्या रस्त्यांवर दुरुस्तीसाठी सिमेंट आणि सिमेंटच्या रस्त्यावरील उर्वरित पॅचवर्कसाठी पेव्हिंग ब्लॉक्सचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे, येणाऱ्या पावसाळ्यात कोणते आणि किती रस्ते नक्की सुस्थितीत असतील, हे सांगता येणे आतातरी अवघडच आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागांसह महावितरण, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल), भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि खासगी केबल कंपन्यांकडून शहरात गेल्या सहा महिन्यांत खूप मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात आली. या खोदाईप्रमाणेच शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी खोदण्यात आले होते. गेल्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत तर रस्ता खोदला नाही, असा एकही भाग शहरात उरला नव्हता. परिणामी, नागरिकांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. साधारणतः दहा वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने काँग्रेसला सत्तेपासून दूर व्हावे लागले होते. त्यामुळे, राष्ट्रवादीने तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीची, डागडुजीची कामे करा, असे फर्मान प्रशासनाला सोडले आहे. दुर्दैवाने, त्याकडे लक्ष न देता, रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत.
फूटपथाच्या कडेने केबलसाठी खोदाई केलेल्या रस्त्यांवर योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याऐवजी थेट सिमेंटचा थर टाकून दुरुस्ती उरकरण्याचा प्रकार महापालिकेने अनेक ठिकाणी केला आहे. तर, ड्रेनेजची खोदाई केलेल्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीने करण्याची गरज असताना, केवळ मलमपट्टी स्वरूपात डांबराचा पॅचवर्क मारण्यात आल्याची उदाहरणे दिसून येत आहेत. यंदा पावसाळा वेळेवर सुरू होण्याची शक्यता असल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीची सर्व कामे खरेतर ३१ मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, पालिकेचा रस्ते दुरुस्तीचा सध्याचा वेग पाहता, पुणेकरांना जूनमध्येच खड्ड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
.................
पावसाळ्यात सत्वपरीक्षा
शहरातील अनेक रस्ते काँक्रिटचे करण्यासाठी पालिकेतील माननीयांचा आग्रह होता. त्यामुळे, सुस्थितीत असलेले डांबरी रस्ते खोदून तेथे काँक्रिटचे रस्ते झाले आहेत. डांबरी रस्त्यांच्या तुलनेत अनेक ठिकाणी काँक्रिटच्या रस्त्यांची लेव्हल वर-खाली झाली असून, येणाऱ्या पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साठून राहणार, की रस्त्यांची उंची वाढल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरणार, याची परीक्षा होणार आहे. रस्त्यांवरून वाहणारे पाणी नागरिकांच्या घरांत-सोसायट्यांमध्ये शिरल्यास, त्याचा आणखी फटका पालिकेला सहन करावा लागणार आहे. तसेच, काँक्रिटच्या रस्त्यांच्या मधोमध अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक्स बसविण्यात आले असून, काही रस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक अधिक असल्याने हे ब्लॉक्स आत्ताच उखडले गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परेड ग्राउंडची जागा बालनाट्यगृहासाठी?

$
0
0

महापालिकेच्या स्थायी समितीसमोर प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, पुणे धनकवडी परिसरात लहान मुलांसाठी बालभवन अथवा बालनाट्यगृह उभारण्यासाठी सर्व्हे क्र. ३२ येथील पोलिस परेड ग्राउंडसाठी राखीव असलेली ३० गुंठे जागा सरकारकडून ताब्यात घ्यावी, असा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक अप्पा रेणुसे आणि विशाल तांबे यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास दक्षिण पुण्यात धनकवडीतील मध्यवर्ती भागात लहान मुलांसाठी बालभवन व बालनाट्यगृह उभारता येणार आहे. धनकवडीतील ही जागा पोलिस परेड ग्राउंडसाठी आरक्षित आहे. यापैकी काही जागा रस्ता रुंदीकरणात गेली असून, काही प्रमाणात अतिक्रमणही झाले आहे. धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव आणि कात्रज परिसरात लहानमुलांसाठी एकही संस्कार केंद्र, बालभवन अथवा बालनाट्यगृह नाही. त्यामुळे, महापालिकेने ही जागा ताब्यात घेऊन या जागेवर बालभवन व बालनाट्यगृह उभारावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही जागा पालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार येथील ११ गुंठे जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली. त्या ठिकाणी बहुमजली भाजी मंडई, पोलिस स्टेशन व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे तांबे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांमुळे झाली नद्यानाल्यांची घुसमट

$
0
0

ठोस उपाययोजना करण्यात यंत्रणा अपयशी
Dhananjay.Jadhav@timesgroup.com
पुणे : मुंबईमध्ये २५ जुलै २००५ रोजी मिठी नदीला महापूर आला आणि संपूर्ण शहर जलमय झाले. मिठीच्या पुराचे पाणी आणि समुद्राला आलेली भरती यांच्या कचाट्यात मुंबईकर सापडले. या पुरामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. पावसाळा जवळ आला की ही घटना अगदी डोळ्यासमोरच उभी राहते. पुण्यातही थोड्याबहुत प्रमाणात काही अशीच परिस्थिती दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होत असून, राम नदीच्या आक्रसलेल्या पात्रामुळे थोड्या विसर्गातही पुराची भीती दाटते.
पुण्याच्या मध्यवस्तीतून मुठा नदी वाहते तर, पश्चिमेकडे राम नदीचे पात्र आहे. पावसाळ्यात खडकवासला प्रकल्पातील धरणांत पाणी भरल्यानंतर मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू होतो. धरणातून पाणी सोडले की सिंहगड रस्ता आणि डेक्कन परिसरातील रहिवाशांनाच धडकीच भरते. सिंहगड परिसरामध्ये मुठा नदीचे पात्र उथळ आहे. या पात्रालगत महापालिकेने बांधकामांना परवानगी दिली असून, अनेक मध्यमवर्गींयांनी प्लॉट घेऊन बांधकाम केले आहे. पावसाळ्यामध्ये धरणातून पाणी सोडल्यावर या भागात हमखास पाणी शिरते. सिंहगड रस्त्यावरील काही सोसायट्यांमध्ये दरवर्षी हा 'खेळ' सुरू असतो आणि महापालिका मात्र ढिम्मपणेच काम करते. हिंगणे परिसरातील सनसिटी रोडवरील सोसायट्या दरवर्षी जलमय होतात आणि त्यावर वर्षानुवर्षे कोणतीही ठोस उपाययोजना न होणे, हेच पालिकेच्या यंत्रणेचे अपयश आहे.
शहराच्या पश्चिमेकडील बावधनमधून वाहणारी राम नदी पाषाण-बाणेरमधून मुख्य नदीला मिळते. राम नदीचा नाला झाला आहे. मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणे आणि बांधकामांनी राम नदीचे स्वतंत्र अस्तित्व कधीच संपुष्टात आणले आहे. या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये याचिका दाखल झाली आहे. त्यावर न्यायाधिकरणाने राम नदीतील अतिक्रमणांचा अहवाल, पूररेषा यासंबंधीचे आदेश दिले. त्यानंतर काही प्रमाणात महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा हलली. अतिक्रमणांवर हातोडा पडला. पण, अजून पूररेषा निश्चित नसल्याने अद्याप राम नदी मोकळा श्वास घेऊ शकलेली नाही. राम नदीमध्ये अनेक सोसायट्या, खासगी इमारती, धनदांडग्यांच्या बंगल्यांनी शिरकाव केला आहे. पण, त्याला हात लावायलाही कोणी धजावत नाही ही शोकांतिका आहे. या राम नदीची मगर'मिठी' झाल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का, अशी विचारणा होत आहे.
शहरातील नाल्यांबाबत न बोललेलेच बरे.. शहरातील एकही नाला आणि नैसर्गिक ओढा अतिक्रमणांनी वेढला गेलेला नाही अशी परिस्थिती नाही. काही ठिकाणी नाल्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्यात आले आहे. बड्या बिल्डर्सने नाले मनाला येतील तसे वळविले आहेत. नैसर्गिक ओढेही 'गायब' करण्यात आले आहेत. परिणामी, हे पाणी सोसायट्या आणि घरांमध्ये शिरून नुकसान होते. सुदैवाने, यात अद्याप कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही. पण, महापालिका आणि जलसंपदा विभागांनी पुराच्या परिस्थितीकडे गांभीर्यपूर्वक पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. नद्या, नाले आणि ओढ्यांवरील अतिक्रमणे, बांधकामे तोडून त्यांची आक्रसलेली पात्र मोठी करणे गरजेचे आहे. या कामामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप झाल्यास तो मोडून ही कारवाई होणे ही गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी जुजबी कामे करायची, पावसाळ्यात पूर आल्यावर तात्पुरती उपाययोजना करायची आणि त्यानंतर वर्षभर पुन्हा दुर्लक्ष करायचे ही वृत्ती बंद झाली पाहिजे.
....
नदीपात्राच्या आड पर्यावरणवादी
नदीपात्रामध्ये आता कोणतेही काम करायचे असेल, तर पर्यावरणवाद्यांचा पहिला विरोध असतो. नदीपात्रातील पाणी वाहून जाण्यासाटी महापालिकेने चॅनेलचे काम केले. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी नदीपात्रालगत रस्ता करण्याचे काम केले. पावसाळ्याचे तीन-चार महिने गेल्यावर हा रस्ता उपयोगात येऊ शकतो. जगातील अनेक देशांमध्ये असे रस्ते करण्यात आले. परंतु, पुण्यात मात्र असा रस्ता चालत नाही. नदीमध्ये कोणतेही काम करायचे झाल्यास विरोध होतो. किमान जीविताची हानी होऊ नये यासाठी तरी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-गोरखपूर नवी रेल्वेगाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-गोरखपूर-पुणे अशी विशेष रेल्वेगाडी १९ मे ते ११ जूनपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे -गोरखपूर (क्रमांक ०१४५३) ही रेल्वेगाडी प्रत्येक गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता गोरखपूरला पोहोचेल. गोरखपूर-पुणे (क्रमांक ०१४५४) ही रेल्वेगाडी प्रत्येक शनिवारी सकाळी आठ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. या दोन्ही रेल्वेगाड्यांना १७ अनारक्षित साधारण आणि २ आरक्षित स्लीपर असे एकूण १९ डबे असतील, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरीच्या बहाण्याने ३० लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे राष्ट्रपती भवनात नोकरी लावण्याच्या बहाण्याने ३० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फैजल खान (वय ३०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अमित अप्पासाहेब वस्त्रद (३२, आंबेगाव) आणि संतोष वसंत सिदीड (४८, रा. साईसेवा नर्सिंग होम, कॅम्प) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलक एज्युकेशन सोसायटीसाठी फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (एफसीआरएस व सीबीडीटी) फंड सर्टिफिकेट तसेच संस्थेसाठी वनविभागाची जागा मिळवून देणे तसेच राष्ट्रपती भवन येथे नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींकडून राष्ट्रपती भवन येथे नोकरी लावली असल्याचे सरकारी पत्र तक्रारदार फैजल यांना पाठविण्यात आले आहे. फैजल यांना मेलवर पाठवण्यात आलेली बनावट कागदपत्रे तपासासाठी पोलिसांच्या हवाली करण्यात आली आहेत. लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. आर. महाजन या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

तरुणावर वार केशवनगर, मुंढवा येथे किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली, तर एकाचा शोध सुरू आहे. आशिष चौबे (वय २७, रा. संभाजी चौक, केशवनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी विशाल विनायक भंडारी (२३, रा. कामगार मैदान, मुंढवा) आणि गणेश रंगनाथ भंडारी (२५, रा. संभाजी चौक, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चौबे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. चौबे हे मंगळवारी रात्री रस्त्याने पायी चालले होते. या वेळी आरोपींनी त्यांना थांबण्यास सांगितले होते. चौबे हे न थांबता गेल्याने आरोपींना राग आला. त्यांनी चौबेला थांबवून त्याच्यावर सत्तुरने वार केले. फौजदार आर. एन. बालगुडे तपास करत आहेत.

हॉटेलमध्ये तोडफोड हडपसर येथील नवीन डीपी रोडवरील हॉटेल सिद्धेश्वर येथे खुर्च्या लावण्यावरून झालेल्या वादातून हॉटेलची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी युसूफ काराडन (५०, रा. साडेसतरानळी, हडपसर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार अमर घाडगे, बादशहा आटोळे, मंडपवाला (सर्व रा. गोसावी वस्ती, हडपसर) आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे मंगळवारी दुपारी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. या वेळी टेबल लावण्यावरून त्यांच्यात आणि हॉटेलच्या वेटरमध्ये बाचाबाची झाली. या वेळी आरोपींनी वेटर विनोद याला मारहाण केली; तर हॉटेलमध्ये तोडफोड केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असुरक्षिततेचा ‘एक्स्प्रेस-वे’

$
0
0

जाळ्या बसविण्याचे काम अपूर्णच; रिफ्लेक्टर्सही नाहीत
Kuldeep.Jadhav@timesgroup.com
पुणे : गेल्या वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळून झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर धोकादायक ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप धबधब्यातून एक्स्प्रेस वेवर येणारे पाणी जिरवण्याची ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही, घाटातील वळणांमध्ये रिफ्लेक्टर्स बसविण्यात आलेले नाहीत, अशी गतवेळची परिस्थिती 'जैसे थे'च आहे. त्यामुळे, आगामी पावसाळ्यात एक्स्प्रेस-वेवरून निर्धोकपणे प्रवास करता येईल, याची खात्री नाही.
गेल्या वर्षी पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दरडी कोसळून प्राणघातक अपघात झाले. त्यामध्ये काहींना जीव गमवावा लागला. त्यामुळे दरडींचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला. त्यानंतर एक्स्प्रेस वेवर तज्ज्ञांनी धोकादायक ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी 'रॉक बोल्टिंग' करून जाळ्याही बसविण्यात आल्या आहेत. मात्र, लोणावळा परिसरातील अमृतांजन पुलाजवळील परिसरात अद्याप काही ठिकाणी जुन्याच जाळ्या आहेत. सध्या तिथे नव्याने जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे. ते काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, आडोशी बोगदा परिसरात झालेले काम प्रथमदर्शनी चांगल्या दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आले आहे.
गेल्या वर्षी लोणावळा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आले होते. साधारण दोन फुटांपर्यंत पाणी होते. त्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. या ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे अनेक मानवनिर्मित धबधबे तयार झाले आहेत. तेथून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी येते. हे पाणी ओसरण्याची कोणतीच व्यवस्था नाही. बायफ्रेन रोप बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ज्या ठिकाणी गाड्या रोपला धडकलेल्या आहेत. तेथे रोपची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पावसामुळे एक्स्प्रेस वेवर होणारे अपघात टाळण्यासाठी जाळ्या बसविण्याबरोबरच अन्य उपाययोजनांची गरज आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर एक्स्प्रेस वेवर केलेल्या उपाययोजनांची परीक्षा होणार आहे.
--------
दर वर्षी दरडसंकट गहिरे
एक्स्प्रेस वे प्रमाणे कात्रजचा नवीन बोगदा, कात्रजचा घाट, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट या मार्गांवरही दरडींचे संकट असते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-सातारा रस्त्यावर पाहणी करून दरडींचा धोका असलेली ठिकाणे निश्चित केली होती. त्यांनी कात्रजच्या नवीन बोगद्यासह आठ ठिकाणी संरक्षित जाळ्या बसविण्याची सूचना केली होती. मात्र, अद्याप सर्व ठिकाणी जाळ्या बसविण्यात आलेल्या नाहीत. तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात शिंदेवाडी येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत मायलेकींना प्राण गमवावा लागला होता. या भागातील अतिक्रमणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या भागातील सर्व अतिक्रमणे दूर केली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा तेथे अतिक्रमणे झाल्याचे दिसून येते. पावसाळी गटारे काही ठिकाणी नाहिशी झालेली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार हजार जागांना कात्री

$
0
0

इंजिनीअरिंगच्या रिक्त जागांचा फुगवटा टप्प्याटप्प्याने घटणार



म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेली काही वर्षे नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजांवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) सुरू केलेली कारवाई जवळपास अटळच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नियमभंग करणाऱ्या कॉलेजांमधील चार हजार जागांना यंदा कात्री लागणार, असा अंदाज आहे. 'एआयसीटीई'च्या विविध निकषांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्यभरातील इंजिनीअरिंग १०९ कॉलेजांना 'डीटीई'ने नोटिसा बजावल्याची बाब 'मटा'ने नुकतीच प्रकाशात आणली होती. एकूण ५४ इंजिनीअरिंग कॉलेजांवर कारवाईचा, तर १३० कॉलेजांची प्रवेशक्षमता कमी करण्याचा निर्णय 'एआयसीटीई'ने घेतला होता. या कारवाईविरोधात कॉलेजे कोर्टात जायची तयारी करत असली, तरी कारवाई अटळ असल्याचेच स्पष्ट होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एआयसीटीई' आणि 'डीटीई'ने केलेल्या तपासणीमध्ये इंजिनीअरिंगचे पदव्युत्तर आणि दोन शिफ्टमध्ये अभ्यासक्रम चालविणाऱ्या कॉलेजांमध्ये अनेक बाबींमध्ये अनियमितता आढळून आली. दोन शिफ्टमध्ये चालणारे अभ्यासक्रम हे केवळ कागदोपत्रीच चालतात. प्रत्यक्षात अनेक कॉलेजांमधून ते एकाच शिफ्टमध्ये चालवून, दोन शिफ्टसाठीचे अनुदान लाटले जाते, असे तपासणीमधून समोर आले. एमटेक करणारे विद्यार्थीच अनेक ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करत असल्याचेही त्यातून उघड झाले.
अशा आक्षेपार्ह प्रकारांमुळे एकीकडे इंजिनीअरिंग शिक्षणाची गुणवत्ता खालावत चालली असतानाच, दुसरीकडे इंजिनीअरिंगच्या जागा मात्र दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. इंजिनीअरिंग शिक्षणाचा फोफावणारा बाजार नियंत्रणाखाली आणण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी अधोरेखित केले. राज्य पातळीवर कुलगुरूंच्या संयुक्त बैठकांमधूनही (जेबीव्हीसी) अशा कारवायांना पाठिंबा देण्याविषयी एकमत झाल्याचे समजते.

काही इंजिनीअरिंग कॉलेजांनी स्वतःहूनच आपल्या काही जागा कमी करण्यासाठी अर्ज केले होते, तर पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टचे वर्ग एकाच शिफ्टमध्ये चालत असूनही दोन शिफ्ट दाखविणाऱ्या कॉलेजांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गेल्या वर्षी सुमारे पाच हजार जागा अशा प्रकारे कमी झाल्या होत्या. यंदाही सुमारे चार हजार कमी होतील, असा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेला रिक्त जागांचा फुगवटा यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे- डॉ. एस. के. महाजन, तंत्रशिक्षण संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ हजार विद्यार्थ्यांना शून्य गुण

$
0
0

३५ हजार विद्यार्थ्यांना शून्य गुण

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : देशभरातील विविध 'आयटीआय'मधून स्किल एज्युकेशनचे धडे गिरवणाऱ्या ३५ हजारांवर विद्यार्थ्यांना सेशनल परीक्षांमध्ये शून्य गुण मिळाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या निकालांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'एनसीव्हीटी -एमआयएस' पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने हा प्रकार झाल्याची ओरड केली जात आहे. स्किल एज्युकेशनचा पाठपुरावा करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारचे या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्षच होत असल्याचे या निमित्तानेच स्पष्ट झाले आहे.
या विषयी शहरातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभराच्या निकालांबाबत हा प्रकार अनुभवायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थांतर्गत पातळीवर दिलेल्या सेशनल परीक्षांचा निकाल संस्थेमार्फत या पोर्टलवर अपलोड केला जातो आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा संबंधित सत्राचा अंतिम निकाल जाहीर केला जातो. संस्थांतर्गत पातळीवरील 'सेशनल'चे गुण या पोर्टलवर अपलोड केल्यानंतरही शहरातील अनेकांना 'सेशनल'मध्ये शून्य गुण मिळाल्याचे अंतिम निकालामधून जाहीर होत आहे.
या प्रकारामुळे अनेकांना सेशनल परीक्षा पुन्हा देण्याची सक्ती आयटीआय पातळीवरून केली जात असल्याची ओरड विद्यार्थ्यांनी केली. तिसऱ्या सत्रानंतर अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अॅप्रेंटिसशिप मिळण्यात अडचणी येत आहेत. कंपन्यांकडे त्यासाठी विचारणा करणाऱ्यांना परीपूर्ण निकाल हाती आल्यानंतरच कंपनीकडे येण्याचा सल्ला दिला जात आहे. आपला निकाल लवकरात लवकर जाहीर करावा, पुन्हा परीक्षा देण्याची सक्ती केली जाऊ नये, त्यासाठी परीक्षा शुल्कही भरावे लागू नये, आदी मागण्या या विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत.
...............
प्राचार्यांवर दंडात्मक कारवाई?
एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे केंद्राच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने याच संदर्भाने नुकतेच एक पत्र प्रसिद्धीस दिल्याचेही उघड झाले आहे. सर्व राज्यांच्या व्यवसाय शिक्षण विभागांच्या सचिवांना लिहिलेल्या या पत्रानुसार, या ऑनलाइन पोर्टलवर विद्यार्थ्यांचे सेशनल परीक्षांचे गुण न भरणाऱ्या सरकारी आणि खासगी संस्थांच्या प्राचार्य, संचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकाराची जबाबदारी थेट संबंधित प्राचार्यांवरच निश्चित करण्यात आल्याचेही याच पत्रातून उघड झाले आहे.
...............
सर्वच संस्थांमध्ये अडचणी
या विषयी औंध आयटीआयचे प्राचार्य रमेश परिहार यांच्याशी संपर्क साधला असता, केवळ आपल्याच संस्थेमध्ये नाहीत, तर देशभरातील अनेक संस्थांमध्ये या अडचणी येत असल्याची माहिती परिहार यांनी 'मटा'ला दिली. परिहार म्हणाले, 'शैक्षणिक वर्ष २०१३ पासून पहिल्या सत्राला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना या अडचणी आलेल्या नाहीत. मात्र, शैक्षणिक वर्ष २०१४ आणि २०१५ मध्ये पहिल्या सत्राला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या अडचणी येत आहेत. या विषयी संस्थांकडूनही उच्चपदस्थांकडे पाठपुरावा सुरू आहे.'
.................
तांत्रिक अडचणींचा सामना
वेबपोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक प्राचार्यांना एमआयएस पोर्टलवरून प्रिंटआउटही काढता येईना. काही विद्यार्थ्यांचे सेशनल गुण दिसत असले, तरी अनेकांचे दिसत नसल्याने या बाबतीत नेमके काय करावे, असा प्रश्न आयटीआयच्या पातळीवर पडल्याचेही शहरातील काही प्राचार्यांनी सांगितले.
...............
वेबपोर्टल वाऱ्यावर?
या विषयी 'मटा'ने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, हे वेबपोर्टल चालविणाऱ्या खासगी कंपनीसोबतचा करार संपल्याने या तांत्रिक अडचणी उद् भवल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर देण्यात आली. दिल्लीमध्ये या विषयी झालेल्या बैठकांमधूनही हा विषय चर्चेला आला होता. मात्र त्यानंतरही या वेबपोर्टलची अवस्था अद्यापही तशीच असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची कबुलीही या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विमानतळावरून मालवाहतूक वाढणार

$
0
0

पुणे विमानतळावरून मालवाहतूक वाढणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे विमानतळ प्राधिकरणाने लोहगाव विमानतळावरून केली जाणारी मालवाहतूक दुपटीने वाढविण्याचे ध्येय ठेवले आहे. सध्या पुण्यातून दिवसाला सरासरी ७० ते ८० टन माल वाहतूक होते. ती येत्या काळात १५० टनांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाकडून विमानतळ प्राधिकरणाला १५.८४ एकर जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या जागेत विमानतळ प्राधिकरणाकडून केल्या जाणाऱ्या कामाचा आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. त्यात चार विमानांचे पार्किंग, नवीन टर्मिनल इमारत आणि उर्वरित जागा माल वाहतुकीसाठी राखीव ठेवण्याचे प्रस्तावित आहे. सध्या जागेअभावी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मालवाहतुकीवर निर्बंध येत आहेत. आता विस्तारीकणात अधिक व हक्काची जागा उपलब्ध होणार असल्याने मालवाहतुकीसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध होणार हे निश्चित आहे.
विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार या विमानतळावरून २०१४-१५ या आर्थिक वर्षात २७ हजार ३९० टन मालवाहतूक करण्यात आली, तर २०१५-१६ या आर्थिक वर्षात ३१ हजार ७६५ टन वाहतूक झाली. त्यामध्ये १६ टक्के वाढ झाली आहे. त्या तुलनेत देशभरातील मालवाहतुकीत सरासरी सात टक्क्यांनी वाढ झाली. पुण्यातून परदेशात २०१५-१६ या वर्षात एक टन मालवाहतूक करण्यात आली. देशातील सर्व विमानतळांवरील माल वाहतुकीत झालेल्या वाढीत लोहगाव विमानतळाचा विसावा क्रमांक आहे.
-------
अशी आहे मालवाहतूक
२०१४-१५ या आर्थिक वर्षात २७ हजार ३९० टन मालवाहतूक
२०१५-१६ या आर्थिक वर्षात ३१ हजार ७६५ टन मालवाहतूक
परदेशात २०१४-१५ या वर्षात मालवाहतूक नाही.
२०१५-१६ या वर्षात केवळ एक टन वाहतूक.
-------
पुणे शहराचे वाढते औद्योगिक महत्त्व लक्षात घेता विमानतळावरील सध्याच्या मालवाहतूक क्षमतेत वाढ होणे आवश्यक आहे. विस्तारीकरणामुळे उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त जागेमुळे त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न होतील.

अनिल शिरोळे, खासदार व अध्यक्ष, विमानतळ सल्लागार समिती
-------
लोहगाव विमानतळावर कार्गो हब झाल्यास आयात-निर्यातीसाठी त्याचा फायदा होईल. मात्र, पुण्यातून होणाऱ्या थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे जोपर्यंत आंतराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढत नाही, तोपर्यंत या सेवेचा म्हणावा तसा उपयोग करून घेता येणार नाही.

सतीश मगर, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images