Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मान्सून वेळेआधीच येण्याची वर्दी

$
0
0

२३ मेच्या आसपास केरळमध्ये आगमन; 'आयआयटीएम'चा अंदाज

मयुरेश प्रभुणे, पुणे

पावसाकडे चातकासारखी नजर लावून बसलेल्या देशवासीयांसाठी खूशखबर असून, मान्सून २३ मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या प्रभावामुळे मान्सून सर्वसाधारण तारखेच्या आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर एक जूनपर्यंत दक्षिण भारत आणि सबंध पश्चिम किनारपट्टीवर चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यातील इंडियन 'इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी'च्या (आयआयटीएम) 'क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम मॉडेल व्हर्जन टू'च्या (सीएफएस व्ही २) आगामी २० दिवसांच्या अंदाजामधून मान्सूनच्या केरळमधील आगमनाचे शुभसंकेत देण्यात आले आहेत. मान्सून १७ मेच्या आसपास अंदमानमध्ये दाखल होण्याचा अंदाज 'आयआयटीएम'ने आधी वर्तवला होता. त्या अंदाजावर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी शिक्कामोर्तब केले आणि पुढील तीन दिवसांत मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल होणार असल्याचे सांगितले. 'आयआयटीएम'च्या नव्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून, ते तमिळनाडूकडे सरकणार आहे. चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात १७ मेपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असताना २३ मेपासून केरळ आणि कर्नाटकवरून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सुरळीत होणार असून, त्यांच्यासोबत दक्षिण भारतात मान्सूनचे आगमन होईल.

उच्चपदस्थ सूत्रांकडून महाराष्ट्र टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता असून, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे चक्रीवादळ भारताकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा न होता, उलट त्याची वाटचाल वेगाने होईल. मान्सूनचा केरळनंतरचा प्रवासही त्याच्या सर्वसाधारण वेळेआधीच होण्याची शक्यता 'आयआयटीएम'च्या मॉडेलमधून दिसून येत आहे. त्यामुळे दुष्काळाशी लढणाऱ्या महाराष्ट्रामध्येही मान्सून वेळेआधीच दाखल होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
............
पुढील तीन दिवसांत अंदमानमध्ये

हिंदी महासागरात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत असून, पुढील तीन दिवसांत मान्सून निकोबारमध्ये आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी जाहीर केला. श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, पुढील दोन दिवसांत तिची तीव्रता वाढत जाऊन अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असून, पुढील तीन दिवसांत मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात आणि निकोबार बेटांवर दाखल होईल, असे 'आयएमडी'ने अंदाजात म्हटले आहे.

................
केरळमध्ये लवकर, मुंबईत उशिरा

नवी दिल्ली : केरळात २८ ते ३० मेच्या दरम्यान, म्हणजेच नेहमीपेक्षा दोन ते तीन दिवस आधीच मान्सूनचे आगमन होणार असल्याचे भाकीत 'स्कायमेट' या वेधशाळेने वर्तवले आहे. तिथून पुढे सरकत मुंबईत हा मान्सून पोहोचण्यास मात्र १२ जूनची तारीख उजाडणार आहे, असे 'स्कायमेट'ने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीएम आले अन् गेले

$
0
0

पुण्याच्या प्रश्नांवर आश्वासनांचेच गाजर; ठोस निर्णय नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिवसभर घेतलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर पुण्याच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा असताना पुणेकरांच्या पदरी निव्वळ आश्वासनांची जंत्रीच पडली आहे. मेट्रोपासून पाणीपुरवठ्यापर्यंत आणि रिंगरोडपासून घनकचऱ्यापर्यंत अनेक समस्यांवर 'लवकरच करू' अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.

शहराच्या मेट्रो प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने जूनमध्ये केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळासमोर (पीआयबी) मेट्रोचे सादरीकरण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. 'पीआयबी'ची मान्यता मिळताच पुणे मेट्रोसाठी टेंडर आणि इतर प्रक्रिया त्वरेने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवालही जुलैपर्यंत प्राप्त होणार असून, त्यालाही सरकारतर्फे तातडीने मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शहरात सर्वत्र समान अहोरात्र पाणीपुरवठा (२४ बाय ७) करण्याचा महापालिकेच्या प्रस्तावात काही सुधारणा गरजेच्या असल्याने त्यानुसार प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. घनकचरा प्रकल्पासाठी जागा देण्यास सरकारने यापूर्वीच मान्यता दिली असून, महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून देताच अंतिम मान्यता देण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

महापालिकेचा जायका प्रकल्प, नदीसंवर्धन, 'पीएमआरडीए'अंतर्गत येणारा रिंगरोड, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण व नव्या विमानतळाची जागा, पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सवलती यांसारख्या अनेक विषयांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. शुक्रवारच्या बैठकीत झालेल्या सर्व विषयांचे इतिवृत्त तातडीने तयार करून त्यानुसार पाठपुरावा करण्याच्या सूचना नगरविकास विभागाच्या सचिवांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, उपमहापौर मुकारी अलगुडे यांच्यासह शहरातील सर्व खासदार, आमदार, पिंपरी-चिंचवडचे खासदार-आमदार आणि राज्य सरकार, महापालिका व इतर संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

...................
मेट्रोबाबत निव्वळ बैठकाच

शहराच्या महत्त्वाकांक्षी पुणे मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी आतापर्यंत केंद्र-राज्यातील विविध मंत्र्यांनी किमान दहा बैठका घेतल्या आहेत. तरीही प्रत्येक वेळी पुणेकरांची केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात आहे. तत्कालीन यूपीए सरकारचे माजी नगरविकासमंत्री कमलनाथ, विद्यमान नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मेट्रोबाबत यापूर्वी बैठका घेतल्या आहेत. दुर्दैवाने, 'मेट्रोला मंजुरी देऊ,' या एका आश्वासनाशिवाय प्रत्यक्षात पुण्याची मेट्रो अजूनही कागदावरच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करा!: भिडे गुरुजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'दोन वर्षांत काहीच घडले नाही. दोन वर्षांची माती झाली; पण माणूस चांगला आहे, निष्कलंक आहे. स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया या त्यांच्या योजना चांगल्या आहेत, त्यास उशीर झाला तरी चालेल; पण आधी देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करा, अशी विनंती मी मोदींना करणार आहे,' असे सडेतोड प्रतिपादन संभाजीराव भिडे यांनी शुक्रवारी केले.

सृजन कॉलेज ऑफ डिझाइन व कलादत्त प्रकाशनातर्फे काढण्यात आलेल्या 'शिवतेज संभाजी' या थ्रीडी पुस्तकाचे प्रकाशन भिडे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. सदाशिव शिवदे, पांडुरंग बलकवडे, माजी खासदार प्रदीप रावत, अभय कुलकर्णी, महेश लडकत, पुस्तकाचे संपादक संतोष रासकर, सुरेश नाशिककर या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर अध्यक्षस्थानी होते.

'पाणी, दूध, गाळून प्यावे तसे आपण शिवाजी व संभाजी महाराजांना सोयीने स्वीकारले आहे. राष्ट्रातील शत्रूबीज संपवण्याचा विचार त्यांच्या चरित्रांतून दिला आहे. आपल्या जीवनात शिवाजी-संभाजी मार्ग ठसवले पाहिजेत. समाज शिवाजी व संभाजी या रक्तगटाचा बनला पाहिजे,' अशी अपेक्षा भिडे यांनी व्यक्त केली. 'शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात करण्याचा काही संबंध नाही. स्मारक करायचे असल्यास ते प्रतापगडाच्या पायथ्याशी करा. अन्यथा आम्ही ते करून दाखवू,' असा इशारा त्यांनी दिला.

'रोप-वे'मुळं रायगडाची दुर्दशा

'स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आली, तरी एकाही आमदाराने औरंगाबादचे नाव बदलण्याची हिंमत दाखवलेली नाही. लोकांना 'भारत माता की जय' म्हणण्याची लाज वाटते. काय लायकीचा समाज निर्माण झाला आहे?', अशा शब्दांत संभाजीराव भिडे यांनी टीकास्त्र सोडले. 'रायगडावर रोप वे करून त्याची दुर्दशा केली. त्या ठिकाणी आता लग्न लावली जातात. यापुढे त्या ठिकाणी स्मार्ट सिटी झाली नाही म्हणजे मिळवले,' असा टोला त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष मुख्यमंत्री?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर, पिंपरी-चिंचवड आणि परिसराच्या विकासाला वेग देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अध्यक्षपदाची जबाबदारी नजीकच्या भविष्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच नेतृत्व आल्यानंतर 'पीएमआरडीए'च्या कामकाजाला अधिक गती येण्याची आशा राज्य सरकारमधील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.

राज्यात सर्वाधिक वेगाने नागरीकरण सुरू असलेल्या भागांमध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसराचा समावेश होतो. औद्योगिकरण आणि शिक्षणाच्या संधीमुळे शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने येथील लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, या वाढत्या लोकसंख्येला पुरेशा नागरी सुविधा पुरविण्यास दोन्ही महापालिकांची क्षमता अपुरी ठरत असल्याने मुंबईच्या धर्तीवर (एमएमआरडीए) पुण्यातही पीएमआरडीएची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र त्याचे अध्यक्षपद मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री यांच्यापैकी कोणाकडे असावे, या वादात पूर्वीच्या सरकारमध्ये 'पीएमआरडीए'ची स्थापना रखडली होती. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नव्या सरकारच्या काळात त्याची स्थापना करण्यात आली आणि पालकमंत्री गिरीश बापट यांची त्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, अशा प्राधिकरणांचे काम गतिमान पद्धतीने चालावे, येथे तातडीने निर्णय घेण्यात यावेत आणि लालफितीचा अडसर न येता त्या निर्णयांची वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडेच त्याचे अध्यक्षपद असावे, असे धोरण खुद्द फडणवीस यांनी पूर्वीच जाहीर केले होते; तसेच 'पीएमआरडीए'च्या कामकाजाशी निगडित असलेल्या नगरविकास खात्याची जबाबदारीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळेच अध्यक्ष या नात्याने पीएमआरडीएच्या कामकाजावर नियंत्रण राहील, असे मत वरिष्ठ गोटातून व्यक्त झाल्यानंतर 'पीएमआरडीए'च्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवर सुरू झाल्याचे सांगण्यात आले. पुण्याच्या विकासासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेली बैठक हा त्याचाच एक भाग असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या बैठकीतही वरिष्ठांशी चर्चा करताना फडणवीस यांनी या पद्धतीचे काही सूतोवाच केल्याचे सांगण्यात येत आहे. हा निर्णय झाल्यानंतर पालकमंत्री बापट यांच्याकडे सहअध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्यात येईल, असे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे.

प्रकल्पासाठी अडचणी

गेल्या काही काळात 'पीएमआरडीए'ने नियोजन प्राधिकरण म्हणून कामकाजास सुरुवात केली असून, या परिसराचा विकास आराखडा तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे. मात्र, मोठे आणि प्रचंड गुंतवणूक असलेले प्रकल्प सुरू करण्यात काही अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडे नेतृत्व आल्यास त्यांनाही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणात भ्रष्टाचार

$
0
0

भाजपचा आरोप; अजित पवारांविरोधात घोषणाबाजी
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
चिंचवड-संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत शनिवारी (१४ मे) घोषणाबाजी केली तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या. परंतु, पवार यांनी चर्चा करून समजूत घातल्यानंतर आंदोलन करणारे कार्यकर्ते शांतपणे निघून गेले.
पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम, आयुक्त दिनेश वाघमारे या वेळी उपस्थित होते. सुमारे पंधरा कोटी रुपये खर्चून संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. त्यापूर्वी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यामध्ये पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, राजू दुर्गे, सारंग कामतेकर, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अनुप मोरे, अजय पाताडे यांचा समावेश होता.
डोक्याला काळे फडके आणि हातात विरोधाचे फलक घेतलेले कार्यकर्ते विरोधी घोषणा देत असल्याचे पाहून पवार त्यांच्यापाशी गेले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले, 'राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. लोकशाही मार्गाने निवडून आल्यानंतर त्या-त्या पक्षाला कारभार करण्याचा अधिकार आहे. १९९० पासून पिंपरी-चिंचवडमध्ये मी काम करीत आहे. चुकीची कामे करीत नाहीत. त्यामुळे तुम्ही विरोध का करता?'
यावर एकनाथ पवार आणि दुर्गे म्हणाले, 'तुम्ही कित्येक वेळा या शहरात आले आहात, येतही आहात. प्रत्येक वेळी आमचा विरोध नाही. परंतु, उद्यानासाठी आरक्षित जागेवर बांधकामे होत आहेत. आयुक्तांनी स्थगिती दिली असतानाही अट्टाहासाने भूमिपूजन केले जात आहे. ही बाब योग्य नाही.' त्यावर 'योग्य चौकशी करून निर्णय घेतला जाईल. उद्यानाच्या आरक्षित जागेवर अन्य प्रकारची बांधकामे होऊ देणार नाही,' असे आश्वासन पवार यांनी दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले आणि विरोधाच्या घोषणाही बंद झाल्या.
....
तर निघून जाईन....
भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामाला आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थगिती दिली असतानाही भूमिपूजनाचा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्न आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. त्यावर स्थगिती दिलेली नाही, आयुक्तांनी केवळ निवेदन स्वीकारले, ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. अखेरीस पवार म्हणाले, 'आयुक्तांनी जर स्थगिती दिली असेल तर मी भूमिपूजन न करताच निघून जाईल. तुमच्या आरोपांची चौकशी केली जाईल. चुकीची कामे करणार नाही.' त्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरझंकार संस्थेतर्फेशहरात ‘स्वरमैफल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'स्वरझंकार' या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी शहराच्या विविध भागात स्वरमैफल या उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ येत्या २२ मे रोजी होणार असून, सविता सुपनेकर या व्हायोलीन वादनातून, तर मोहन दरेकर हे गायनातून स्वरमैफल पहिले स्वरपुष्प गुंफणार आहेत.
'स्वरझंकारतर्फे शास्त्रीय संगीताचा राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रसार करण्यासाठी आणि तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून संस्थेने स्वरमैफल ही मालिका आयोजित केली आहे. गानरसिकांना प्रातःकालीन, दुपारचे, सायंकालीन तसेच रात्रीच्या रागांचा खजिना ऋतुचक्रानुसार अनुभवायला मिळावा, या उद्देशाने वर्षभर विविध वेळांमध्ये आम्ही या मैफलींचे नियोजन केले आहे,' अशी माहिती स्वरझंकारचे प्रमुख आणि ज्येष्ठ व्हायोलीन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी दिली.
शुभारंभाची मैफल येत्या २२ मे रोजी सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे होणार आहे. या मैफलीला सर्वांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. पहिल्या सत्रात सविता सुपनेकर व्हायोलीन वादन करतील, त्यानंतर मोहन दरेकर यांचे गायन होईल, असे उपाध्ये सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामांवरीलशास्तीकर माफीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
अनधिकृत बांधकामाचा प्रश्न राज्य सरकारने लवकर मार्गी लावावा आणि या बांधकामावरील शास्ती कर रद्द करावा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. 'सर्वसामान्यांसाठी शास्ती कर अन्यायकारक असल्याचा दावा करून केवळ पिंपरी-चिंचवडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शास्ती कर माफ करण्याबाबत लवकरच निर्णय घ्यावा,' अशी मागणी बारणे यांनी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
'सिडको'च्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आरक्षणे विकसित करावीत, प्राधिकरण महापालिकेत विलिन करावे, १९८४ पूर्वी संपादित केलेल्या जमिनींच्या मालकांना साडेबारा टक्के परतावा जमीन द्यावी, पवना धरण प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या मुलांना महापालिकेत पाच टक्के कोट्यात नोकरीसाठी प्राधान्य द्यावे, या मागण्याही बारणे यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी टुरिस्ट कंपनीकडे बुकिंग करताना सावधान

$
0
0

बुकिंगनंतर फसवणूक झाल्याची नागरिकांच्या तक्रारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाळी सुट्टीत परदेशात जाण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी कमी किंमतीमध्ये परेदशी टुरिस्ट कंपनीकडे ऑनलाइन बुकिंग करत असाल तर थांबा! कारण, परदेशी टुरिस्ट कंपन्याकडे ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर पुण्यातील काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परदेशी टुरिस्ट कंपनीकडे बुकिंग करताना काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यानंतर पुण्यातील अनेक नागरिक परदेशी फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. परदेशी फिरण्यासाठी जाताना अनेक नागरिक बुकिंगसाठी परदेशी टुरिस्ट कंपनीची निवडक करतात. परदेशी कंपन्याही अनेक सवलतीच्या जाहिराती देऊन भारतीय नागरिकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. भारतीय टुरिस्ट कंपन्यांना जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळे भारतीय नागरिक परदेशी टुरिस्ट कंपनीकडे कमी किंमतीमध्ये बुकिंग करतात. पण, गेल्या काही दिवसांमध्ये परदेशी टुरिस्ट कंपनीकडे बुकिंग केल्यानंतर त्या कंपन्या अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले आहे.

पुण्यातील एका नागरिकाने सिंगापूरला जाण्यासाठी परदेशी 'टुरिस्ट डॉट कॉम' या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग केले होते. त्यासाठी त्याने अडीच लाख रुपये ऑनलाइन भरले. सुरुवातील कंपनीकडून त्या व्यक्तीला व्यवस्थित प्रतिसाद देण्यात आला. परदेशी जाण्याची तारीख जवळ आली, तरी कंपनीकडून कोणतीच कागदपत्रे व माहिती आली नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने कंपनीच्या क्रमांकावर फोन केला. पण, तो फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. दुसऱ्या एका व्यक्तीला उन्हाळी सुट्टीत कुटुंबासह दुबईला जायचे होते. त्यासाठी त्याने ऑनलाइन बुकिंग केले आणि कंपनीच्या अकाउंटमध्ये ऑनलाइन बँकिंगद्वारे ७५ हजार रुपये भरले. पण, त्या व्यक्तीला असाच अनुभव आला.

याबाबत सायबर शाखेचे सहायक पोलिस आयुक्त किशोर नाईक म्हणाले, 'उन्हाळी सुट्टीत फिरायला जाण्यासाठी परदेशी टुरिस्ट कंपन्यांकडे ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर फसवणूक झाल्याच्या तक्रारी पुणे सायबर सेलकडे आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन बुकिंग करताना काळजी घ्यावी.

'गोपनीय माहिती शेअर करू नका'

बँक अधिकारी असल्याचे सांगून बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून फसवणूक केल्याच्या तक्रारी वारंवार सायबर सेलकडे येत आहेत. आरोपींकडून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नये. तसेच, कोणतीही बँक तुमच्या बँक खात्याची माहिती विचारत नाही. खात्याची माहिती विचारणारा फोन आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन सायबर सेलचे सहायक पोलिस आयुक्त किशोर नाईक यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘प्रबोधन चळवळीत महाराष्ट्राचे योगदान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
धार्मिक, सामाजिक, राजकीय, प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्राने दिलेले योगदान देशपातळीवर महत्त्वपूर्ण आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी पुणे येथे केले.
चिंचवड येथील गांधीपेठ तालीम मंडळाने आयोजित केलेल्या जिजाऊ व्याख्यानमालेचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. त्या वेळी 'महाराष्ट्रातील प्रबोधनाची परंपरा' विषयावर ते बोलत होते. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त अभय टिळक अध्यक्षस्थानी होते. मिलिंद एकबोटे, मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, भाऊसाहेब भोईर, गजानन चिंचवडे, सुहास पोफळे, किसन महाराज चौधरी या वेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, 'प्रबोधनाचे नाते आधुनिकतेशी आहे. युरोपात प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांना त्रास झाला. मात्र, त्यांनी माणसाला प्रतिष्ठेची जाणीव करून दिली. महाराष्ट्रात संतांनी धार्मिक प्रबोधन केले. छत्रपती शिवरायांनी राजकीय, सांस्कृतिक प्रबोधन केले. ब्रिटीश काळात पुन्हा प्रबोधनाची गरज निर्माण झाली. देशात राजा राममोहन रॉय यांनी त्याचे बीज रोवले. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या माध्यमातून प्रबोधन प्रक्रिया सुरू केली.' ते म्हणाले, 'महाराष्ट्राचे प्रबोधनासंदर्भातील योगदान राष्ट्रीय पातळीवरचे आहे. त्यामुळे देशाचे वैचारिक नेतृत्व महाराष्ट्राकडे असले पाहिजे. मात्र, दुफळी, भाषेकडे दुर्लक्ष, इंग्रजी शाळांचा वाढता प्रभाव ही अडचण आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्वसन गैरव्यवहाराची चौकशी

$
0
0

विशेष अधिकारी नेमणार; महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्ह्यात पुनर्वसनाच्या जमिनीच्या वाटपामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी दिले. त्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी केली.
जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात महसूल मंत्र्यांनी विधन भवनात बैठक घेतली. त्या वेळी पुनर्वसनाच्या जमीन वाटपात झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार बाबुराव पाचर्णे, राहुल कुल, सुरेश गोरे, दत्तात्रय भरणे तसेच विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरव राव, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील, पुनर्वसन अधिकारी नयना बोंदार्डे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले आदी उपस्थित होते.
पुनर्वसनाच्या जमीन वाटपाचे बोगस दाखले तयार करून पुणे जिल्ह्यातील शेकडो एकर जमीन लाटली गेल्याची वृत्तमालिका 'मटा'ने प्रसिद्ध केली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यातील पाचशे ते सहाशे एकर जमीन ताब्यात घेतली आणि त्यावर पुन्हा सरकारचे नाव लावले. दौंड तसेच शिरूरमधील सुमारे दीड हजार एकर जमीन बोगस वाटप दाखल्याद्वांरे हडप केली असल्याची शंका आहे. हा गैरप्रकार शोधून काढण्यासाठी मूळ प्रकल्पग्रस्त आणि त्यांना झालेले वाटप याची शहानिशा केली जात आहे. त्यात बोगस वाटप झाल्याचे निदर्शनास आल्यावर तहसीलदारांमार्फत जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु, असे बोगस दाखले तयार करणाऱ्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. एखाद दुसऱ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल मंत्र्यांनी घेतलेल्या पुनर्वसन आढावा बैठकीत आमदारांनी पुनर्वसनाच्या जमीन वाटप घोटाळ्याबद्दल तक्रारी केल्या. तसेच याची चौकशी करण्याची मागणी केली. त्याची गंभीर दखल घेऊन महसूल मंत्र्यांनी पुनर्वसनाच्या जमीन वाटपातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच त्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्याची सूचना विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना केली.
पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांच्या पुनर्वसनाचा वस्तुस्थितीदर्शक आराखडा तयार करावा, असे स्पष्ट करताना महसूल मंत्र्यांनी, सिंचन प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घेण्यात येईल. त्यात प्रत्येक प्रकल्पाशी निगडीत महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल आणि त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.
...
'लाचप्रकरणाशी संबंध नाही'
जमिनीच्या निकालासंदर्भात ३० कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या गजानन पाटील याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 'पाटील हा आमच्या मतदारसंघातील आहे. त्याला आपण ओळखतो. मतदारसंघातील रुग्णांना मुंबईला उपचारासाठी नेण्याचे काम तो करायचा. ज्या जमिनीसंदर्भात लाच मागितल्याचा आरोप आहे, त्याचा निर्णय आपण यापूर्वीच दिला. ही जमीन देता येत नसल्याचा निकालही आपण दिला आहे. त्यामुळे याच्याशी आपला संबंध नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी,' असेही महसूल मंत्र्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार ओळखपत्रांमधीलदुरुस्तीचे काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
निवडणुकीतील बोगस मतदान टाळण्यासाठी मतदारांना देण्यात आलेल्या निवडणूक ओळखपत्रातील चुका दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले असून नाव, पत्ता तसेच छायाचित्र चुकलेली ओळखपत्रे बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे चुका असलेली ओळखपत्रे मतदारांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.
सार्वजनिक निवडणुकीत अधिक सुलभता व पादर्शकता आणण्याबरोबरच बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी देशात निवडणूक ओळखपत्रे देण्यात आली. या मोहिमेमध्ये पुण्यातील मतदारांनाही ओळखपत्रे देण्यात आली. ही ओळखपत्रे दिल्यानंतर त्यात असंख्य प्रकारच्या चुका राहिला. राज्य सरकारने यासंबंधी वेळोवेळी मोहीम राबवून या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच नवीन ओळखपत्रेही देण्यात आली. तथापि, या चुका शंभर टक्के दुरुस्त झाल्या नाहीत.
'मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी नाव, पत्ता, लिंग तसेच छायाचित्रामध्ये चूक असलेली ओळखपत्रे जमा करण्यात येत आहेत. ही ओळखपत्रे जमा केल्यानंतर संबंधितांना त्यातील चुकांची दुरुस्ती करून नवीन ओळखपत्रे दिली जाणार आहेत. त्यासाठी अशी ओळखपत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघात परत करावीत,' असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार-गोकुळे यांनी केले आहे.
नवी ओळखपत्रेही देणार
पुण्यातील तील २१ विधानसभा मतदार संघांची मतदार संख्या ६७, २३, ९९८ इतकी आहे. त्यातील ९३ टक्के मतदारांना निवडणूक ओळखपत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित सात टक्के मतदारांनाही ओळखपत्रे देण्यात येत आहेत. त्यासाठी संबंधित मतदारसंघाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बायोसीएनजी’ची वापरातपुणे आघाडीवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पात बायोसीएनजी इंधन तयार करण्यात येणार आहे. या इंधनाचा वापर 'पीएमपी'च्या बस चालविण्यासाठी केला जाणार आहे. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या इंधनावर बस धावणारे पुणे हे राज्या‌तील एकमेवर शहर ठरणार आहे.
शहरात सर्वसाधारण दररोज १२०० ते १३०० टन कचरा निर्माण होतो. यापैकी ओला आणि सुका कचरा वेगळा करुन त्यावर प्रक्रिया केली जाते. शहरात सुमारे ३०० टनापेक्षा अधिक ओला कचरा तयार होतो. यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने तळेगाव दाभाडे येथे प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात दररोज ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोसीएनजी इंधन तयार केले जात आहे. मात्र, अद्याप या बायोसीएनजी इंधनाचा वापर वाहनांमध्ये करण्यात आलेला नाही. बायोसीएनजी इंधनाचा वापर करण्याबाबत केंद्र शासनाकडून परवानगी घेणे गरजचे आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून ही परवागनी येत्या काही दिवसात मिळेल. त्यानंतर या इंधनाचा वापर 'पीएमपी'च्या गाड्यांमध्ये केला जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप म्हणाले, 'तळेगाव दाभाडे येथील कचरा प्रकल्पात सध्या १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या बायोसीएनजी इंधनाच्या वापराबाबत केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जाईल. त्यामुळे या प्रकल्पातून दररोज १० हजार क्युब बायोसीएनजी गॅस तयार होणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड स्प्रिंगडेलच्यापालकांचा आंदोलनाच इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सिंहगड स्प्रिंगडेल शाळेच्या प्रशासनाने (वडगाव व आंबेगाव) आवास्तव वाढवलेले शालेय शुल्क दोन सत्रात भरण्यास परवानगी द्यावी, शुल्क भरण्यासाठी डिमांड ड्राफ्टची सक्ती करू नये आणि स्कूलबसचे वाढवलेले शुल्क रद्द करावे, अशा प्रमुख मागण्या सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल पॅरेंट्स असोशिएशनने शनिवारी केल्या. शालेय प्रशासनाने या मागण्या त्वरित मान्य न केल्यास पालकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल,' असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सिंहगड स्प्रिंगडेल शाळेच्या प्रशासनाने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर मनमानी नियम लादले आहे. या नियमांना विरोध करण्यासाठी आणि पालकांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी असोशिएशनने पत्रकार परिषदेचे आयोजन केले. असोशिएशनचे अध्यक्ष शिवा पासलकर, सचिव अनिल महाजन, जयश्री देशपांडे, प्रज्ञा शेलार आदी उपस्थित होते. शाळेच्या प्रशासनाने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण शालेय शुल्क शाळा सुरू होण्यापूर्वी एकदाच केवळ डीडीद्वारे भरण्याची सक्ती केली आहे. 'स्कूलबसच्या शुल्कात २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी १८ टक्क्यांची वाढ केली. त्यानंतर २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी तब्बल ३० टक्क्यांची वाढ केली आहे. शालेय साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके ठरवून दिलेल्या विक्रेत्यांकडून घेण्याची सक्ती केला जात असून, विक्रेता पालकांशी उर्मटपणे बोलतो. याबाबत शैक्षणिक संस्थाप्रमुखांशी चर्चा करूनही निर्णय झाला नाही. शाळेच्या प्रशासनाने शालेय शुल्क दोन सत्रात भरण्यास धनादेश किंवा रोख भरण्याची परवानगी द्यावी, स्कूलबसचे प्रचंड प्रमाणात वाढवलेले शुल्क रद्द करावे, अन्यथा पालकांना सोबत घेऊन लवकरच आंदोलन करण्यात येईल,' असे पासलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंसेवक संघाचे वर्ग सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्राथमिक शिक्षा व संघ शिक्षा वर्ग पुण्यात सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी स्वयंसेवक या वर्गांमध्ये सहभागी झाले आहेत. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य आणि पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया आदी या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.

पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा प्रथम वर्षाचा संघ शिक्षा वर्ग ८ मेपासून रमणबाग शाळेत सुरू झाला असून यामध्ये ५८ तालुक्यातील ९२ गावांमधील तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक महानगरातील ३१३ प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थ्यांना शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण दिले जाते.

रोज सकाळी पावणेपाचपासून सुरू होणाऱ्या दिनक्रमात सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोन तास शारीरिक प्रशिक्षणात योगासने, दंड (लाठी), लेझीम, नियुद्ध, संचलन, घोष व शाखा लावण्याचे प्रशिक्षण दिले जाते. बौद्धिक कार्यक्रमात विषय मांडणी, गटचर्चा, वक्तृत्व, पथनाट्य प्रशिक्षणाचा समावेश आहे. सेवेच्या संस्कारासाठी दररोज सेवा साधना उपक्रमाअंतर्गत परिसर स्वच्छता, श्रमदान व रोपे तयार करणे आदीचा समावेश आहे. वर्गाधिकारी म्हणून सातारा जिल्ह्याचे सहसंघचालक जयवंत सामंत तर कार्यवाह म्हणून येरवडा भागाचे कार्यवाह नरेश करपे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदाच्या टंचाईमुळेआरसी बुकची छपाई बंदच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कागदांअभावी नोंदणी प्रमाणपत्रांची (आरसी) छपाई बंद हा प्रकार ताजा असतानाच, राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये कागद उपलब्ध नसल्याने आर सी बुक्सची छपाई जवळपास एक महिन्यांपासून बंद आहे. या कारणाने राज्यात आरसी बुक्सची छपाई प्रलंबित असण्याची संख्या काही लाखात गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे दर वर्षी राज्याला सुमारे हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या परिवहन विभागाकडे कागद उपलब्ध नाही, या कारणामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
दीड वर्षांपूर्वी राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये आरसी या स्मार्टकार्डमध्ये मिळत होत्या. त्यासाठी परिवहन विभागाने एका खासगी कंपनीसोबत करार केला होता. मात्र, काही कारणास्तव ही प्रक्रिया बंद पडली. त्यानंतर या कार्यालयांमध्ये आरसी बुक्सची छपाई कागदांवर होण्यास सुरुवात झाली. कागद उपलब्ध होण्यासाठी परिवहन विभागाने मुंबईतील एका कंपनीसोबत करार केला. मात्र, या कराराविरुद्ध पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीकडून कागदाचा पुरवठा कार्यालयांमध्ये सुमारे एका महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे या कार्यालयांमध्ये आरसी बुक्सची छपाई पूर्णपणे बंद असल्याची माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून ठोस कारवाई केलेली नाही. कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी कागद उपलब्ध होण्याबाबत कोणत्याच प्रकारचे ठोस उत्तर देत नाही.
परिवहन विभागाच्या नियमानुसार परिवहन कार्यालयांमध्ये वाहनांची नोंदणी झाल्यानंतर सात दिवसांमध्ये आरसी वाहनमालकाला घरपोच द्यायची असते. त्यासाठी विभागाने पोस्ट खात्यासोबत करार केला आहे. त्यानुसार राज्यभरातील कार्यालये वाहनमालकाकडून १०० रुपये आरसी शुल्क, ५ रुपये कागद शुल्काबरोबरच पोस्टामार्फत घरपोच आरसी देण्यासाठी सुमारे ५० रुपये शुल्क आकारण्यात येते. मात्र, यामध्ये काही शहरांमध्ये कार्यालये आणि पोस्ट ऑफीसांमध्ये समन्वय नसल्याने तसेच नागरिकांकडून परिपूर्ण पत्ते लिहिण्यात येत नसल्याने घरपोच आरसी मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे या परिस्थितीत आरसी बुक्सची छपाई कधी होणार, आणि त्या घरपोच कधी मिळणार असा संभ्रम असंख्य वाहनमालकांमध्ये निर्माण झाला आहे.
...
प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना कागदांची उपलब्धता लवकर करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, नेमक्या किती दिवसांत कागद उपलब्ध होणार सांगता येणार नाही.' मात्र, यामुळे वाहनचालकांना आरसी मिळण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.
- सतीश सहस्रबुद्धे, अतिरिक्त परिवहन आयुक्त
............
नागरिकांच्या सोयीसाठी त्यांना आरसी स्मार्ट कार्ड स्वरूपात मिळण्यासाठी एका कंपनीसोबत करार केला. मात्र, काही कारणाने हा करार रद्द करावा लागला. त्यानंतर या आरसी कागदाद्वारे मिळण्यासाठी एका नव्या कंपनीसोबत करार केला. मात्र, या कराराविरोधात कोणीतरी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना सध्या कागद पुरवठा बंद आहे. स्थानिक स्तरावर कागद खरेदी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नव्या बस कशासाठी?

$
0
0

प्रवासी संख्येत घट झाल्याने पीएमपी प्रवासी मंचाचा सवाल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येत फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात अनपेक्षित अशी ७० हजाराने घट झाली आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत 'पीएमपी'कडून नवीन बस खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, दुसरीकडे प्रवासी संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे नवीन गाड्या ताफ्यात समाविष्ट करून काय उपयोग होणार आहे, असा प्रश्न पीएमपी प्रवासी मंचाने उपस्थित केला आहे. आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राजकीय स्वार्थापोटी नव्या गाड्या खरेदीचा घाट घातला जात असल्याचा आरोपही मंचाने केला.
'पीएमपी'च्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी २०१६ मध्ये १० लाख ८० हजार होती. ती संख्या मार्च महिन्यात १० लाख १० हजारांपर्यंत खाली आली आहे. एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्या कमी झाल्याने 'पीएमपी'च्या सेवेवरच मंचाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, बस खरेदी करताना प्रवाशांना चांगली सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 'पीएमपी'च्या ताफ्यातील एकूण बसच्या संख्येत २००९ ते २०१५ या कालावधीत पंधराशे वरून दोन हजारापर्यंत वाढ झाली आहे. मात्र, सरासरी प्रवासी संख्येत वाढ झाली नसून ती १० लाखाच्या जवळपासच आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढल्यानंतरही प्रवासी संख्येत वाढ होत नसल्याचा आरोप मंचाने केला.
'पीएमपी'ची प्रतिबस प्रवासी संख्या आणि ताफ्यातील बसचा प्रत्यक्ष वापर कमी होत चालला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २००९ मध्ये सुमारे प्रतिबस प्रवासी संख्या ८०० होती. ती आता सहाशे झाली आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय, आणि अनियमित सेवा ही प्रवासी संख्या घटण्यामागील कारणे आहेत. त्यामुळे बससाठी वाहनतळ, प्रवाशांसाठी सुरक्षितता, संचलनातील कार्यक्षमता, डेपोंची संख्या वाढविणे, 'पीएमपी'वर आर्थिक बोजा न टाकता मिनी बस व टप्प्या-टप्प्याने गरजेनुसार गाड्यांची वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,' असे उपाय त्यांनी सुचविले आहेत.
-----------
'पीएमपी'ची कामगिरी
---
वर्ष (फक्त मार्च महिना) २००९ २०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ (फेब्रुवारी २०१६)
बस ताफा १५११ १६२० १५३७ १७४४ १७४४ २०५२ २१४८ २०४५ (२०४७)
दैनिक प्रवासी (लाखात) १०.० १२.८ ११.२ १०.० १०.१ १०.७ १०.७ १०.१ (१०.८)
प्रति बस प्रवासी ८१० ९२८ ९२५ ८२५ ७६७ ७५६ ७२१ ६९३ (७२७)
बस ताफ्याचा वापर ८० ८२ ७८ ६६ ६९ ६४ ६३ ६१ (६३) (टक्क्यांमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे राज्य सरकारचे अपयश

$
0
0

'पीएमआरडीए'ला पालिकेने पैसे देण्यावरून काँग्रेसची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) महापालिकेने पैसे द्यावे, अशी अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. विकासासाठी शहराला निधी द्यायचा सोडून शहराकडूनच अशी अपेक्षा ठेवणे, हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश चिटणीस संजय बालगुडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात एक चकार शब्द शहरातील भाजपच्या आमदारांनी न काढणे ही पुणेकरांची फसवणूक असल्याची टीका बालगुडे यांनी केली.
अनेकदा वेळ मागून देखील प्रत्येक वेळी त्याकडे दुर्लक्ष करणारे मुख्यमंत्री सहा महिन्यानंतर पुणे शहरात येऊन बैठक घेत असल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी, कचरा, रस्ते याबरोबरच रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाबाबत ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा पुणेकरांना वाटत होती. या प्रश्नांवर कोणताही ठोस निर्णय न घेता मुख्यमंत्र्यांनी महापालिकांनी 'पीएमआरडीए'साठी पैसे द्यावेत, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे बालगुडे यांनी सांगितले.
'शहराचा विकास आराखडा, रिंगरोड, अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. स्थानिक संस्था करापोटी (एलबीटी) पालिकेला दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात करून राज्य सरकारने महापालिकेला गेल्या दोन महिन्यात ७६ कोटी रुपये कमी दिले आहेत. दुसरीकडे पालिकेने 'पीएमआरडीए'ला १२० कोटी रुपये देण्याची अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठेवली, हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. ज्या पुणेकरांनी लाखोंच्या मताधिक्याने भाजपच्या आठही आमदारांना विजयी केले, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर एक शब्दही न काढणे म्हणजे नागरिकांचा विश्वासघात करण्याचा प्रकार आहे. शहराच्या विकासासाठी विविध योजनांद्वारे महापालिकेला निधी उपलब्ध करुन द्यायचे सोडून पुणेकरांच्या निधीवरच डोळा ठेवण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत,' अशीही टीका बालगुडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू

$
0
0

भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ झालेल्या तवेरा कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी मध्यरात्री झाला. जखमींपैकी कारचालकाची प्रकृती चिंताजनक आहे.
राहूल छिन्नू ननवरे (वय २५, रा. वाशीम, शहापूर, ठाणे), कमल दगडू पाटोळे (वय ५०, रा. चोपडा, कल्याण, ठाणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये कारचालक सुरेश भाऊ तारमाळे (वय २७, रा. शेरे, शहापूर, ठाणे) व भूषण संदीप पाटोळे (वय १५, रा. चोपडा, कल्याण, ठाणे) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये कारचालक सुरेश तारमाळे याची प्रकृती चिंताजनक आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा कारचालकाचे अतिवेगामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार सुमारे दोनशे मीटर अंतर कापत मार्गालगतच्या खड्ड्यात असलेले एक झाड मुळासह तोडून पुढे असलेल्या दुसऱ्या झाडावर जोरात धडकली. त्यानंतर ती पुन्हा मार्गालगतच्या संरक्षण जाळीवर आदळून अडकली. ही धडक इतकी भीषण होती, की गाडीतील एका महिलेचा मृतदेह दुसऱ्या झाडावर चेंदामेंदा व लटकलेल्या अवस्थेत होता. अपघातग्रस्त कार झाडीत असल्यामुळे या अपघाताबाबत सकाळपर्यंत कोणालाही कल्पना नव्हती. सकाळी साडेसहाच्या सुमारास गाडीतील जखमी मुलाने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने मार्गाने जाणाऱ्या एका वाहनचालकाचे लक्ष त्या मुलाच्या ओरडण्याच्या दिशेने गेले. त्या चालकाने या घटनेबाबत तत्काळ नजिकच्या आयआरबीच्या कार्यालयाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गाडीतील जखमींना बाहेर काढून त्यांच्यावर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लोकमान्य रुग्णालयात रवाना केले. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून स्थानिक व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाडीत पडलेल्या व झाडावर लटलेला मृतदेह बाजूला केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेत्रीला अश्लील मेसेज

$
0
0

अभिनेत्रीला अश्लील मेसेज

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलाने पुण्यातील एका अभिनेत्रीला मोबाइल व फेसबुकवरील अकाउंटवर अश्लील मेसेज पाठवण्याचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या अभिनेत्रीच्या वडिलांनी गुन्हे शाखेच्या महिला सहाय्य कक्षात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अमरावती येथे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या तरुणाला चौकशीसाठी बोलावून घेतले; परंतु त्याच्या घरची हलाखीची परिस्थिती पाहून अभिनेत्रीच्या वडिलांनी त्याची समजूत काढत पुन्हा असे न करण्याची समज दिली. पोलिसांनीही त्याचे भविष्य खराब होऊ नये, म्हणून तंबी देऊन त्याला सोडून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा बोपखेलचा आहे. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात, तर आई घरीच कपडे शिवण्याचे काम करते. त्यांची घरची स्थिती हलाखीची आहे. या मुलाला अमरावती येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याचा मामा अमरावतीला राहायला असून, हा मुलगा मामाकडेच राहतो. त्याने दोन महिन्यांपूर्वी या अभिनेत्रीचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यासाठी तब्बल आठवडाभर प्रयत्न केले. त्यानंतर त्याने मोबाइलवर; तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्याने अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे ही अभिनेत्री वैतागून गेली होती. हे सर्व असह्य झाल्यावर अभिनेत्रीच्या वडिलांनी महिला सहाय्य कक्षात धाव घेत तक्रार दाखल केली. कक्षाच्या वरिष्ठ निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी मोबाइल क्रमांकावरून मुलाचा शोध घेतला. त्यावेळी मेसेज पाठविणारा मुलगा अमरावतीला असल्याचे समजले. मात्र, नेमकी त्याच वेळी त्याची परिक्षा सुरू होती. परीक्षा झाल्यावर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले.
दरम्यान, या मुलाची माहिती झाल्यानंतर अभिनेत्रीचे वडील त्याच्या घरी जाऊन आले. त्याच्या घरची परिस्थिती पाहिल्यावर त्यांचे हृदय द्रवले. त्यांनी मुलाच्या आई-वडिलांकडे पाहून तक्रार देण्याचे टाळले. मुलाने चूक उमगल्यामुळे माफी मागितली. निरीक्षक जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तरुणाचे समुपदेशन करून आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेव असे सांगितले. मुलानेही असे कृत्य पुन्हा करणार नसल्याची ग्वाही पोलिसांना दिल्यावर त्याला सोडून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरूने केला घरमालकाचा खून

$
0
0

भाडेकरूने केला घरमालकाचा खून

म. टा. प्रतिनिधी, पुणे
थकलेले भाडे न दिल्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या घरमालकाचा भाडेकरूने धारदार शस्त्राने वार करून खून केला. हडपसर परिसरातील गोंधळेनगर येथील होले चाळीत शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रवीण ज्ञानदेव होले (वय ४२, रा. महात्मा फुले शाळेजवळ होले चाळ, गोंधळेनगर, हडपसर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सुमीत चंद्रकांत होले (वय २५) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी भाडेकरू धीरजकुमार लोंढे (वय १९, मुळ रा. दांडेकर पूल, पर्वती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंधळेनगर परिसरात प्रवीण होले यांच्या मालकीची होले नावाची चाळ आहे. या चाळीत लोंढे त्याच्या आई आणि बहिणीसह भाड्याने राहतो. त्याने घराचे भाडे थकवले होते. त्यामुळे होले यांनी त्याच्याकडे भाडे देण्याबाबत तगादा लावला होता; पण भाडे न दिल्याने होले यांनी लोंढेच्या आईला शिवीगाळ केली. त्याच्या बहिणीकडे तो वाईट नजरेने पाहत असल्याचा त्याचा आरोप होता. हाच राग मनात ठेवून लोंढेने शुक्रवारी मध्यरात्री होलेच्या डोक्‍यात हत्याराने वार करून खून केला. सहायक पोलिस निरीक्षक एस. व्ही. तासगावकर पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images