Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खास सुट्ट्यांसाठी ‘थीम टूर’

0
0

एका दिवसांत महत्त्वाच्या ठिकाणांना भेट; एक मेपासून बुकिंग
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि परिसरातील विविध उद्याने, प्रेक्षणीय स्थळे, शैक्षणिक संस्था, ऑटोमोबाइल कंपन्या यांना एका दिवसात भेट देता येणे शक्य नसल्याने पुणे महापालिकेतर्फे आता खास सुट्ट्यांसाठी 'संकल्पना सहल' (थीम टूर) राबविण्यात येणार आहेत. पुढील महिन्यातील 'वीकएन्ड'ला या 'थीम टूर'चे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठीचे बुकिंग येत्या एक मेपासून सुरू होणार आहे.
'पुणे दर्शन'च्या एक दिवसीय सहलीमध्ये शहरातील सुमारे १४-१५ ठिकाणे पर्यटकांना दाखविण्यात येतात. त्यापैकी, काही ठिकाणी पर्यटकांना अधिक वेळ हवा असतो; तसेच काही महत्त्वाची ठिकाणे वेळेअभावी दाखविली जात नाहीत. त्यामुळे, शहराचे वैविध्य पर्यटकांना उलगडून सांगण्यासाठी 'थीम टूर' राबविण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी दिली. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यावेळी उपस्थित होत्या.
शहरातील ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांसाठी 'पुणे बस टूर', शहराच्या परिसरातील महत्त्वाच्या औद्योगिक संस्था-कंपन्यांची सफर घडविणारी 'पुणे औद्योगिक टूर', शहरातील उद्यानांमध्ये फेरफटका मारण्यासाठी 'ग्रीन पुणे टूर' आणि विविध शैक्षणिक संस्थांची माहिती देणारी 'शैक्षणिक पुणे टूर' अशा चार विभागांमध्ये संकल्पना सहलींचा विस्तार केला गेला आहे. ७ आणि १४ मे अशा दोन शनिवारी आणि २२ आणि २९ मे या दोन रविवारी या 'थीम टूर'चे आयोजन केले आहे. या सहलींचा कालावधी प्रत्येकी सहा तासांचा असेल. या सर्व सहलींचे बुकिंग
www.geodirect.in या वेबसाइटवरून एक मेपासून करता येणार आहे. प्रत्येक सहलीसाठी एसी बसचे शुल्क पाचशे रुपये असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसी बसमुळे झाली पर्यटक संख्येत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महापालिकेच्या 'पुणे दर्शन' सेवेमध्ये वातानुकूलित बस दाखल झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांत पर्यटकांच्या संख्येत सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये परीक्षांच्या काळातही 'पुणे दर्शन'ला मिळालेला प्रतिसाद कायम असून, उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
पर्यटकांना शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा समजण्यासह प्रेक्षणीय स्थळांची भेट घडविणाऱ्या 'पुणे दर्शन' सेवेमध्ये सुधारणा करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यामुळे, महापालिकेने १० एसी बस खरेदी करून त्या पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) सुपूर्द केल्या. पीएमपीने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर 'पुणे दर्शन'ची सेवा सुरू केली. गेल्या ऑक्टोबरपासून अत्यंत आकर्षक एसी बसमधून ही सेवा सुरू झाली; तसेच त्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, 'पुणे दर्शन'च्या प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरमहा सरासरी सहाशे ते सातशे प्रवासी 'पुणे दर्शन'चा लाभ घेत असताना, त्यात गेल्या सहा महिन्यांत सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये सर्वाधिक १६५० पर्यटकांनी 'पुणे दर्शन'मधून शहरातील विविध प्रसिद्ध ठिकाणांची सफर केली. 'पर्यटनासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे. पर्यटनाच्या नकाशावर पुण्याला महत्त्वाचे स्थान असून, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याची संधी मिळाली आहे. पुणे दर्शन सेवेचा कायापालट केल्यामुळे पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत हा प्रतिसाद आणखी वाढेल', असा ठाम विश्वास राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केला.
................
'पुणे दर्शन' सेवेचा प्रतिसाद
महिना पर्यटकांची संख्या
सप्टेंबर २०१५ ६००
ऑक्टोबर ९८५
नोव्हेंबर ११२०
डिसेंबर १६५०
जानेवारी २०१६ १२५०
फेब्रुवारी १०००
मार्च ११००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणजी संघात निवडीच्या आमिषाने फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी ओळख असल्याचा दावा करत गुजरातच्या रणजी संघात निवड करण्याच्या बहाण्याने, पुण्यातील एकाला पाच लाख रुपयांना फसवण्यात आल्याचे प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणी उत्तर प्रदेश येथील तरुणाविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रताप जाधव (वय ४७, रा. पिसोळी, ता. हवेली) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राहुल मुकेशकुमार गोयल (वय २१, रा. नई मंडी, ता. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा प्रेम हा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून १९ वर्षांखालील गटात खेळतो. त्याची रणजी करंडक स्पर्धेसाठी निवड व्हावी म्हणून ते प्रयत्नशील होते. या दरम्यान त्यांची एका व्यक्तीच्या माध्यमातून गोयल याच्याशी ओळख झाली. गोयल याने त्याची शहा यांच्याशी आपली चांगली ओळख असल्याचा बनाव केला. शहा यांच्यामार्फत प्रेमची निवड ही गुजरातच्या संघात करून देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. शहा गुजरात क्रिकेट असोशिएशनचेही अध्यक्ष असल्याने जाधव यांचा गोयलवर विश्वास बसला.

गोयल याने प्रेमच्या निवडीसाठी जाधव यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार जाधव यांनी पाच लाख रुपयांचा 'डिमांड ड्राफ्ट' फातिमाननगर येथील एका हॉटेलमध्ये गोयल याला दिला. त्यांनी एक वर्ष वाट पाहिल्यानंतरही त्यांच्या मुलाची गुजरात संघात निवड झाली नाही. त्यामुळे त्यांनी गोयलकडे त्यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली. सुरुवातीला त्याने पैसे परत करतो म्हणून जाधव यांना सांगितले; परंतु पैसे परत न मिळाल्यामुळे जाधव यांनी गोयलविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फौजदार डी. एन. ढोले तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमाचा ओलावा बाळासाहेबांनी जपला : पवार

0
0

शरद पवार यांनी उलगडले मैत्रीचे ऋणानुबंध; कलादालनाचे उद् घाटन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राजकारणात कायमच संघर्षाची भूमिका घेणाऱ्या, व्यंगचित्रांद्वारे मार्मिक शब्दांत माझ्यावरही टीका-टिप्पणी करणाऱ्या बाळासाहेबांनी व्यक्तिगत आयुष्यात मैत्रीचा, प्रेमाचा ओलावा सातत्याने कायम जपला,' या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या आठवणींना शुक्रवारी उजाळा दिला.

निमित्त होते, पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या उद्घाटनाचे. पवार यांच्या हस्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कलादालनाचा लोकार्पण सोहळा झाला. बाळासाहेबांशी निगडित अनेक आठवणींचा पट उलगडतानाच, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या हजरजबाबीपणाचे आणि त्यांच्या मित्रत्त्वाचे अनेक पैलूही पवार यांनी उलगडले. राज्यसभेसाठी सुप्रिया सुळे यांनी अर्ज भरल्यावर त्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी जाहीर कौतुक केले.

'स्वतःच्या पक्षाला, सहकाऱ्यांना विपरित परिणाम भोगावे लागण्याची कल्पना असूनही, सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी एकही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेणारा त्यांच्यासारखा नेता माझ्या ५० वर्षांच्या कारकि‍र्दीत कधीही पाहिला नाही,' असे गौरवोद्गार पवार यांनी काढले. शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्या सभेला आपणही हजर होतो अन् केवळ भाषणाच्या जोरावर लाखोंमध्ये स्फुल्लिंग चेतवण्याचे काम त्यांनी कसे केले, याचा अनुभव जवळून घेतल्याची आठवणही पवारांनी काढली. 'कोणतीही पार्श्वभूमी नसताना, केवळ कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून नवीन नेतृत्त्व तयार करण्याची बाळासाहेबांची हातोटी विलक्षण होती. त्यांचा दृष्टिकोन, पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे काम करणारी नेतृत्वाची नवीन पिढी शिवसेनेत उभी राहिली,' असेही पवार म्हणाले.

'बाळासाहेबांच्या जन्मगावी अर्थात पुण्यात त्यांच्या नावाने कलादालन उभे राहिले, याचा सार्थ अभिमान आहे. त्याबद्दल, पुणे महापालिकेचे महापौर आणि सर्व पक्षांचे मनापासून आभार,' या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. व्यंगचित्रकाराने इतिहास घडवलेले एकमेव उदाहरण म्हणजे बाळासाहेब, असे सांगून हे कलादालन पुढील पिढीसाठी सतत मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, संजय राऊत, वंदना चव्हाण, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेते बंडू केमसे, मनसेचे गटनेते बाबू वागसकर, शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आणि उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले आदी या वेळी उपस्थित होते.

ठाकरेंकडून कौतुक; पवारांकडून परिपूर्णतेची अपेक्षा

कागदावर पाहिलेल्या चित्रापेक्षा प्रत्यक्षातील कलादान अधिक चांगले झाल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच, घाईगर्दीमध्ये कलादालन व्यवस्थित पाहता आले नसले, तरी ते पाहण्यासाठी पुन्हा आवर्जून येऊ, असेही स्पष्ट केले. कलादालनातील बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची माहिती अपुरी असून, ती अधिक परिपूर्ण असायला हवी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्स अॅपवरील कॉमेंटमुळे विद्यार्थ्यावर हल्ला

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात व्हॉट्स अॅप ग्रुपवरच्या कॉमेंटवरून २०-२२ विद्यार्थ्यांनी एकाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत अक्षय दिनकर गंभीर जखमी झाला असून हा हल्ला करणाऱ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्स अॅप ग्रुपवरील चॅटिंगदरम्यान बऱ्याचदा शाब्दिक चकमकी होत असतात. त्यामुळे अनेक ग्रुप बंदही होतात किंवा काही सदस्य तो ग्रुप सोडतात. परंतु, व्हॉट्स अॅप ग्रुपवरच्या एक कॉमेंटमुळे पुण्यातील कॉलेजचा विद्यार्थी अक्षय दिनकर आज हॉस्पिटलमध्ये आहे. अक्षयच्या कॉलेजमधील २०-२२ विद्यार्थ्यांनी आज त्याला बेदम मारहाण करून डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. व्हॉट्स अॅप ग्रुपवरील एका कॉमेंटमुळेच हा प्रकार घडल्याचं समजतं.

या प्रकरणी सुमीत बाटुंगे, हर्षद चौघुले, शुभम गांगुर्डे, रोहन पेटकर आणि अनिरुद्ध भालेराव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून या मारहाणीमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल. उर्वरित विद्यार्थ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरकट्यारीने घेतला रसिकांचा ठाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भर उन्हाळ्यातही थंड वाऱ्याच्या झुळूकांनी धरलेला फेर अन् प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, महेश काळे यांच्या भावपूर्ण स्वरांची रसिकमनाला भिडलेली कट्यार, 'सूर निरागस हो' पासून ते 'दिल चाहता है'पर्यंत विविध रसपूर्ण गाण्यांनी रंगलेली एक अविस्मरणीय मैफल शनिवारी पुणेकरांनी अनुभवली.
निमित्त होते 'कट्यार ते कजरारे' या कार्यक्रमाचे... 'तथास्तु' शॉपिंग मॉलच्या दशकपूर्तीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या सहकार्याने ही मैफल झाली. रमणबाग शाळेच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात शंकर महादेवन यांचे व्यासपीठावर आगमन होताच रसिकांनी टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले.
'पुणेकर जाणकार आहेत. सवाई महोत्सवानंतर त्यांच्यासमोर येणे हा मी माझा सन्मान समजतो,' अशी भावना व्यक्त करून महादेवन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर 'सूर निरागस हो' या प्रसिद्ध रचनेने त्यांनी मैफलीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर 'दिल चाहता है', 'घेई छंद मकरंद', 'रॉकऑन', 'तेरे नैना' ही गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. निवेदक सुबोध भावे यांनी कवी मंगेश पाडगावकरांची 'माझं काय तुमचं काय' ही कविता सादर केली. त्यानंतर 'तू ही रे माझा मितवा' तसेच 'झूम बराबर झूम' या गाण्यांना साथ करून रसिकांनी नृत्याचा आनंदही लुटला. मैफलीचा कळसाध्याय गाठला तो महेश काळे आणि शंकर महादेवन यांनी सादर केलेल्या मराठी भजन आणि अभंगांनी.. 'जय जय विठ्ठल', 'इंद्रायणी काठी', 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती', 'माझे माहेर पंढरी' या अजरामर रचना सादर करून त्यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि पं. कुमार गंधर्व आदींना आदरांजली वाहिली.
त्यानंतर सादर झालेल्या 'कोई कहे कहता रहे' या रचनेवर युवादिलांनी मनसोक्त थिरकण्याचा आनंद लुटला. उत्तरोत्तर रसिकांच्या दमदार प्रतिसादात ही मैफल रंगत गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोडलेल्या पाण्याचा हिशेब देण्याची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
दौंडला पाणी सोडण्यास पुणेकरांची काहीही हरकत नाही, मात्र, गेल्या काही दिवसांत सोडलेल्या पाण्याचा कसा वापर केला, याचा हिशेब देण्याची मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. टंचाईच्या काळात कालव्यातून पाणी सोडण्याऐवजी दौंडच्या गरजेएवढे पाणी रेल्वेने द्यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना आणखी पाणीकपातीला तोंड द्यावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. या पूर्वी दौंड आणि इंदापूरसाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, त्याचे नियोजन फसल्यामुळे पुणेकरांच्या पाण्यात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
'गेल्या वर्षी दौंड आणि कुरकुंभ एमआयडीसीसाठी अर्धा टीएमसी पाणी आठ महिन्यांसाठी सोडण्यात आले होते. यंदा ऑक्टोबर आणि जानेवारीमध्ये त्यापेक्षाही अधिक पाणी सोडण्यात आले. पाणी नेमके किती सोडले, त्याचा वापर कसा झाला, नेमकी कशी काटकसर केली, याचा हिशेब नागरिकांना मिळाला पाहिजे,' अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. त्याबरोबरच दौंडच्या पिण्याच्या पाण्याची साठवण क्षमता नेमकी किती आहे, याची माहिती जाहीर केली पाहिजे. ही क्षमता कमी असेल, तर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट प्रमाणात पाणी सोडून ते वाया जाण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडण्याऐवजी रेल्वे किंवा टँकरने पाणी पुरविणे पाणीटंचाईच्या काळात व्यवहार्य ठरेल, अशीही मागणी वेलणकर यांनी केली.
पूर्वीपासूनच पुणेकर पाणीकपातीचा सामना करीत आहेत आणि त्यामुळे त्यांना मोठ्या त्रासात दिवस काढावे लागत आहेत, आता पाणी पुरवठ्याचे नियोजन चुकल्याची शिक्षा पुणेकर घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकेबाज बिल्डरांचा ‘सातबारा’तयार

0
0

ग्राहक पंचायतीकडून चाळीस कंपन्यांची यादी तयार; कारवाई मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ग्राहकांची विविध पद्धतीने फसवणूक करणाऱ्या बिल्डरांच्या चाळीस कंपन्यांची यादी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने शनिवारी पत्रकार परिषदेत सादर केली. गुगलवरून सर्व्हेक्षण आणि तक्रारदारांकडून मिळालेल्या माहितीवरून ही यादी तयार करण्यात आली आहे. यादीतील बिल्डरांनी ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप पंचायतीचे विजय सागर यांनी केला. बिल्डरांरवर कारवाई व्हावी, या साठी ही यादी राज्य सरकारकडे सोपविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
'पाच लाखांत घर' अशी फसवी जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी 'मेपल' कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेपलप्रमाणे शहरात चाळीस कंपन्या असून, त्यांनीही ग्राहकांची नागरिकांची फसवणूक केल्याचे सागर यांनी सांगितले. 'ग्राहक पंचायतीने गुगल सर्वे केला. तसेच, रोज ग्राहक स्वतः मार्गदर्शन केंद्रात येऊन तक्रारी करतात. त्यावरून ही यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने बिल्डर फ्लॅटचे बुकिंग करताना दिलेली आश्वासने पाळत नाहीत, काही मजले बेकायदेशीरपणे बांधून विक्री करतात. प्लॅन मंजूर करीत नाही, तसेच हरित लवादाची परवानगीही घेत नसल्याचे आढळून आले आहे. कबूल केलेल्या सुविधा न देणे, मोबाइल टॉवर, जाहिरात फलकांसाठी टेरेस भाड्याने देणे, करारनामा न करणे, पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाइन न टाकणे, फ्लॅटचा ताबा उशिरा देणे, प्रोजेक्ट अर्धवट सोडणे, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न देणे, ग्राहकांना दमदाटी करणे, पोलिसांमार्फत दबाव टाकणे, आदी तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे,'असे सागर यांनी नमूद केले.
..
'जनहित याचिका दाखल करणार'
पुण्यात बिल्डर, पोलिस आणि राजकारणी यांची युती झाली आहे. अशा घोटाळेबाज बिल्डरांची यादी लवकरच मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि पालकमंत्री यांना देणार आहोत. राज्य सरकारने या सर्वांवर कडक कारवाई न केल्यास ग्राहक पंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. तसेच, या बाबत जनहित याचिका दाखल केली जाईल, असे ही सागर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्री, महापौर यांच्यात कलगीतुरा

0
0

शहरात आणखी पाणीकपात नाही : महापौर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महापौर, पाणी वाचविण्यासाठी तुम्ही काय केले?, पाण्याची काटकसर करण्यासाठी पालिकेचा प्रतिसाद कमी आहे, पाणीगळती रोखण्यावर महापालिकेने खर्च का केला नाही,' पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहरातील पाण्याच्या नियोजनावरून पालिकेच्या कारभाऱ्यांना शनिवारी कालवा समितीच्या बैठकीत चांगलेच फैलावर घेतले.
पालकमंत्र्यांच्या या टीकेला महापौर प्रशांत जगताप यांनीही पुणेकरांनी गेल्या आठ महिन्यांत केलेल्या पाणीबचतीची आकडेवारी सादर करून चोख प्रत्युत्तर दिले. शहरात सप्टेंबर महिन्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीवापरासाठी आयोगाने दिलेल्या आदेशांनुसार शहरात पाणीवापर होत आहे. सद्य परिस्थितीत खडकवासला प्रकल्पामध्ये उरलेले पाणी शहराच्या हक्काचे आहे. त्यातून दौंड, इंदापूर यांना पाणी सोडायचा निर्णय झाल्यास शहराला पाणी पुरणार नाही, अशी वस्तुस्थितीही महापौरांनी मांडली.
'पुणेकरांनी दिवसाआड पाणीपुरवठा सहन करून पाणीबचत केली. इतकेच नव्हे तर, बेबी कालव्यात प्रक्रिया केलेले एक टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहरात सध्यापेक्षा अधिक पाणीकपात करणे अशक्य आहे,' अशी ठोस भूमिकाही महापौरांनी घेतली. 'पालिकेने शहराच्या पाण्यात कपात केलेली नाही. पाणी वाचविण्यासाठी पालिकेचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. पाणी गळती रोखण्यावरही पालिका खर्च करीत नाही. पालिकेने पालकमंत्र्यांचे ऐकायचेच नाही हे ठरविलेले दिसते. पण ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. पालकमंत्री म्हणून याबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने पाणीवापरात आणखी किती काटकसर करता येईल याचे नियोजन करावे,' अशी सूचना बापट यांनी केली. खडकवासल्याच्या कालव्यातून होणाऱ्या पाणीगळतीची आपण पाहणी करणार आहोत. त्यातून किती पाणी वाचवता येईल हे पाहून दौंड आणि इंदापूरला पाणी देण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. हे पाणी ग्रामीण भागाला सोडताना कालव्यावरचे वीजपंप काढण्याबरोबरच बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याचे नियोजन पालकमंत्र्यांनी बैठकीत जाहीर केले.
..
'वाढीव पाणीकपातीला विरोध करू'
दरम्यान, खडकवासला धरणात शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आणखी पाणीकपात करू शकत नाही. या संदर्भात महापालिकेच्या पक्षनेत्यांची बैठक घेऊन कपातीला विरोध करणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामने हलविल्याने दुष्काळ हटणार नाही

0
0

'आयपीएल'च्या निर्णयावर चव्हाणांची टिप्पणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'दुष्काळामुळे राज्यातील आयपीएलचे सामने दुसऱ्या राज्यात खेळविण्याचा निर्णय घेतला. सामने दुसरीकडे खेळविल्याने दुष्काळ हटणार नाही,' असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केले. बंदी घालायची असेल, तर आयपीएल सामन्यांबरोबरच अन्य खेळांवरही बंदी घातली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
वसंत व्याख्यानमालेत 'महाराष्ट्रातील दुष्काळ व पाणी टंचाईचे आव्हान- कठोर निर्णयांची गरज' या विषयावर चव्हाण यांचे व्याख्यान झाले. 'आयपीएलचे सामने राज्यातून हलविल्याने राज्य सरकारला मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. कोर्टात सरकारी वकिलाने बाजू व्यवस्थित मांडली असली, तर सामन्यांचे ठिकाण बदलले नसते. तसेच, बिअर उत्पादनांवरही बंधने घातली आहेत. पाण्याचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो, अशा उद्योगांसाठी पाण्याच्या वापराबाबत नियमावली तयार केली पाहिजे. सरकार या उद्योगांना परवानगी देते आणि नंतर त्यांच्या उत्पादनावर बंधने घातली जातात, ही बाब योग्य नाही. किंवा त्यांना परवानगी देतानाच अशा गोष्टींची माहिती दिली पाहिजे,' असेही चव्हाण म्हणाले.
नदी, तलाव आणि विहिरींमधील गाळ काढून पुनर्भरण, बंधाऱ्यांची दुरूस्ती, पीकनियोजन करणे, वनीकरण वाढविणे, सौरउर्जेवरील पाणी उपसा केंद्र, सांडपाण्याचा पुनर्वापर, पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कामे झालेल्या मोठे जलसिंचन प्रकल्पांना मान्यता देणे, चितळे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी अशा उपाययोजना त्यांनी या वेळी सुचविल्या. राजकीय इच्छाशक्ती असेल आणि कालबद्ध नियोजन असेल तर दुष्काळावर मात करता येवू शकते, असेही चव्हाण म्हणाले.
----------
'मीटरद्वारे पाणीपुरवठा करा'
पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या महापालिकांकडून शंभर टक्के मीटरने पाणी दिले जात नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मलकापूर ग्रामपंचायतीने तो आदर्श घालून दिला आहे. मलकापूरला जमले, ते मोठ्या महापालिकांना का जमत नाही, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. यापुढील काळात मोठ्या महापालिकांनी मीटरद्वारेच पाणीपुरवठा केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
-----------
स्वेच्छाधिकाराचा वापर हवा
घटनेतील कलम ३५६चा दुरुपयोग करून अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काँग्रेसशासित स्थिर राज्य सरकारे अस्थिर करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. राष्ट्रपती आणि राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कामकाज करण्याची तरतूद आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी स्वेच्छाधिकाराचा वापर करायला पाहिजे होता. तो त्यांनी येथे केलेला दिसत नाही, असे निरीक्षणही चव्हाण यांनी नोंदवले.
---------
राज्यात ७० हजार ते एक लाख कोटी रुपयांची सिंचनाची कामे अपूर्ण आहेत. राज्याचे बजेट पाहता, हे प्रकल्प पूर्ण केव्हा पूर्ण होतील हे नक्की सांगता येणार नाही. आमच्या सरकारच्या काळात सिंचनासाठी निधी दिला जात होता; मात्र सिंचनाचे प्रमाण वाढत नव्हते.
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजाराला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डॉक्टरने आजाराला कंटाळून स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. पोलिसांना घटनास्थळी लेटरपॅडवर लिहून ठेवलेली सुसाइड नोट मिळाली आहे. त्यामध्ये आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
डॉ. नितीन सुरेश अंबिके (वय ५५, रा. आनंदी प्रसाद निवास, शुक्रवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये अंबिके यांचे हॉस्पिटल आहे. गेल्या २० ते २५वर्षांपासून ते याठिकाणी व्यवसाय करत होते. शनिवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे हॉस्पिटल उघडले. दहाच्या सुमारास पत्नी त्यांना भेटून गेली. दवाखान्यामध्ये कोणीही नसताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी आतील खोलीमध्ये गादी टाकली. तेथे बसून ब्लेडने स्वत:चा गळा कापला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दुपारी एकच्या सुमारास त्यांची पत्नी दवाखान्यात परत आली; तेव्हा डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले.
ते पाहताच आरडाओरडा करीत त्या बाहेर आल्या. पोलिसांना घटनास्थळावर सुसाइड नोट मिळाली आहे. शारीरिक आणि मानसिक आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असून, या प्रकरणी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, आपले अवयव दान करण्यात यावेत, असेही डॉ. अंबिके यांनी लिहून ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधन क्षेत्रात ‘आयसर’ची झेप

0
0

मयुरेश प्रभुणे, पुणे


जगभरातील संशोधन संस्था आणि देशांच्या संशोधनाचा दर्जा सांगणाऱ्या जागतिक क्रमवारीत (नेचर इंडेक्स) भारताने स्थान मिळविले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या या क्रमवारीतील पहिल्या पाचशे संशोधन संस्थांत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी, ५१ व्या स्थानी), कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिज रिसर्च (सीएसआयआर, ८०), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस्सी, १३७), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर, १५९), टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर, २६८), इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (आयएसीएस, २९५), जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड रिसर्च (जेएनसीएएसआर, ३९७), हैदराबाद विद्यापीठ (४७२) या फक्त आठ संस्थांचा समावेश आहे. आयसर या तुलनेने नव्या संस्थेने चमकदार कामगिरी केली आहे.



जगभरातील ६८ प्रख्यात नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या शोधनिबंधांच्या संख्येवरून आणि दर्जावरून दर वर्षी 'नेचर इंडेक्स' जाहीर केला जातो. २०१५ च्या नेचर इंडेक्सनुसार चीनच्या 'चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस'ने (३४४९ शोधनिबंध) जगात अव्वल स्थान पटकावले असून, जगातील देशांच्या यादीत अमेरिका (२६६३९ शोधनिबंध) अव्वल स्थानावर आहे. या यादीत भारत तेराव्या स्थानावर आहे. २०१५ मध्ये भारतातर्फे १५८९ शोधनिबंध प्रख्यात नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले. दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या शोधनिबंधांची संख्या ९६६६ आहे. मूलभूत संशोधनात विकसित देशांशी बरोबरी करण्याची सरकारची आणि मान्यवर शास्त्रज्ञांची विधाने किती पोकळ आहेत, याचा पुरावा या आकडेवारीतून समोर आला आहे.



मात्र, भारताच्या दृष्टीने या आकडेवारीतील आशादायक कामगिरी केली आहे ती आयसरने. दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आयसरने गेल्या चार वर्षांत संशोधन संस्थांच्या क्रमवारीत ९८ स्थानांची प्रगती केली आहे. २०१३ मध्ये २५७ व्या स्थानी असणाऱ्या आयसरने २०१४ मध्ये २१३, २०१५ मध्ये १६३ आणि २०१६च्या यादीत १५९व्या स्थानापर्यंत मजल मारली. देशात संशोधनाचा मोठा इतिहास असणाऱ्या टीआयएफआर आणि आयएसीएस या संस्थांच्याही पुढे आयसरने मारलेली मजल विज्ञान जगताला आणि धोरणकर्त्यांना विचार करायला लावणारी आहे.



प्रख्यात नियतकालिकांमध्ये २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भारताच्या १५७८ शोधनिबंधांपैकी ८१६ शोधनिबंध भौतिकशास्त्रामधील, ६०० रसायनशास्त्रातील, १५६ जैविक विज्ञानामधील आणि ५५ शोधनिबंध पृथ्वी आणि पर्यावरणशास्त्रातील आहेत. जगातील पाचशे सर्वोत्तम संशोधन संस्थांमध्ये समाविष्ट असणाऱ्या देशातील आठ संस्था (संशोधन संस्था आणि विद्यापीठ) या केंद्र सरकारच्या अखत्यारित असून, राज्य सरकारांच्या अंतर्गत येणाऱ्या एकाही विद्यापीठाचा त्यात समावेश नाही.



............



शिक्षण-संशोधनाचे 'आयसर' मॉडेल



प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी आयसरची स्थापना झाली असून, पुण्यासह देशात सात ठिकाणी या संस्था आहेत. जागतिक दर्जाचे शिक्षण, सर्वोत्तम प्रयोगशाळा, तरुण संशोधकांचे मार्गदर्शन, पहिल्या वर्षापासून परीक्षेऐवजी प्रकल्पांवर आधारित शिक्षण आणि संशोधन, हवा तो विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, आंतरशाखीय संशोधन, जगभरातील नामवंत शास्त्रज्ञ आणि नोबेल विजेत्यांचे मार्गदर्शन आणि जगभरातील संशोधन संस्थांचे सहकार्य या वैशिष्ट्यांच्या जोरावर आयसरने अत्यंत कमी कालावधीत संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आयसरचे प्रारूप समोर ठेवून देशातील विज्ञान शिक्षणामध्ये आवश्यक ते बदल करण्याची गरज 'नेचर इंडेक्स'च्या क्रमवारीतून समोर आली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालगंधर्व’ला येणार छावणीचे स्वरूप

0
0

कन्हैयाच्या आजच्या सभेसाठी चोख पोलिस बंदोबस्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्रसंघाचे अध्यक्ष कन्हैयाकुमार यांच्या आज, रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी एक वाजता होणाऱ्या सभेला पोलिसांकडून चोख बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. कन्हैयाकुमार यांचे रविवारी सकाळी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून सभेच्या ठिकाणापर्यंत येईपर्यंत त्यांना पोलिसांचे सुरक्षा कवच पुरविण्यात येणार आहे, अशी मा​हिती अतिरिक्त पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी दिली.

पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीने कन्हैयाकुमार यांची सभा पर्वती पायथ्याजवळील साने गुरुजी स्मारक येथे सभा आयोजित केली होती. मात्र, सभेसाठी हे ठिकाण योग्य नसल्याचे पोलिसांकडून आयोजकांना सांगण्यात आले. याच ठिकाणी सभा घ्यावयाची असल्यास आयोजकांना काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सभेचे ठिकाण बदलून बालगंधर्व रंगमंदिर करण्यात आले आहे. रंगमंदिरात ९९०ची आसनक्षमता आहे. रंगमंदिरातील व्यासपीठावर वीस जण असणार आहेत. कन्हैयाकुमार यांच्या सभेला पोलिसांनी यापूर्वी कधीही परवानगी नाकारली नव्हती. आयोजकांचा अर्ज न आल्यामुळे त्यांना परवानगी देण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नव्हता. त्यानंतर आयोजकांनी सभेच्या परवानगीसाठी अर्ज केला असून तो पोलिसांनी मंजूर करून सभेला परवानगी दिली आहे.
..
असा असेल पोलिस बंदोबस्त
सभा चालू असताना अथवा त्यापूर्वी सभेच्या ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणुन बंदोबस्तासाठी एक पोलिस उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, आठ पोलिस निरीक्षक, २२ उपनिरीक्षक / सहायक निरीक्षक, १२० पुरुष कर्मचारी, दहा महिला कर्मचारी, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकडया आणि वज्र तैनात करण्यात आले आहे, असे वाकडे यांनी सांगितले. विमानतळावरून सभेच्या ठिकाणापर्यंत पोहचेपर्यंत कन्हैयाची गाडी अडवणे, अडथळा निर्माण करणे, दगडफेक अथवा काळे फासणे असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी विमानतळ, येरवडा, कोरेगांव पार्क, बंडगार्डन, फरासखाना, शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यावर ११० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
-------------
कन्हैयाला नोटीस बजावणार
या सभेला चौदा संघटनांनी पाठिंबा असल्याची माहिती पोलिसांकडे उपलब्ध झाली असून, सभेला पाच ते सहा संघटनांनी विरोध दर्शविला आहे. विरोध दर्शविणाऱ्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटिसा दिल्या आहेत. तर कन्हैयाने देशविरोधी आणि धार्मिक भावना भडकतील, असे आक्षेपार्ह वक्तव्य करू नये म्हणून 'सीआरपीसी १४४' प्रमाणे नोटीस दिली आहे. विमानतळावर आगमन झाल्यानंतर ही नोटीस कन्हैयाला देण्यात येणार आहे.
..
एफटीआयआय, फर्ग्युसन कॉलेजला भेट नाही
कन्हैयाकुमार बालगंधर्व रंग​मंदिर येथे सभा घेणार असले तरी, ते एफटीआयआय आणि फर्ग्युसन कॉलेजला भेट देणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या सभेमुळे बालगंधर्व रंगमंदिर आणि परिसरात मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ओळखपत्र असणाऱ्यांनाच सभेला प्रवेश देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात पुन्हा पाणीकपात?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दौंड व इंदापूरमध्ये पाणी वापराचे नियोजन पूर्णपणे फसल्यामुळे गेले आठ महिने दिवसाआड पाणीपुरवठा सहन करणाऱ्या पुणेकरांवर आणखी पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या दिवसाआड पाणी दिले जात असले, तरी ही पाणीकपात अपुरी असल्याची भूमिका घेऊन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. दौंड व इंदापूरला एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्यासाठी पुण्याच्या पाण्यात आणखी कपात करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.

खडकवासला प्रकल्पातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक विधानभवनात झाली. धरणांतील पाणीसाठा, बाष्पीभवन, शहरातील पाण्याची गळती व ग्रामीण भागाचा पाणीवापर यावरून या बैठकीत शाब्दीक खडाजंगी झाली. 'पुणे महापालिकेने काय पाणीकपात केली,' असा सवाल बापट यांनी या वेळी केला. शहराच्या पाणीवापरात किती काटकसर करता येईल, याचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. दौंड व इंदापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे ठरले.

दौंड शहराला पिण्यासाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी देण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी बैठकीच्या सुरुवातीला केली. त्यावर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी, दौंड शहराला पिण्यासाठी खडकवासला प्रकल्पातून मध्यंतरी पाणी सोडण्यात आले. दौंडला १५ मेपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा त्यासाठी तलावात करण्यात आला; परंतु दौंडमध्ये जादा पाणीवापर झाल्याने पाण्याचे नियोजन फसले आणि हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. कपोले यांच्या या माहितीमुळे आमदार कुल हे चिडले आणि 'खोटी माहिती देऊ नका. बाष्पीभवन व अन्य कारणांमुळे पाणी कमी झाले आहे,' असा दावा त्यांनी केला. त्याच वेळी इंदापूर शहरासाठीही खडकवासला धरणातून पिण्याचे पाणी सोडण्याची मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत केली.

खडकवासला प्रकल्पात सद्यस्थितीत ५.६५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यातील १.०६ टीएमसी दौंड व इंदापूरला देण्याचा आग्रह दोन्ही तालुक्यांच्या आमदारांनी धरला. या दोन्ही तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडावे लागेल, अशी भूमिका पालकमंत्री बापट यांनी घेतली. तथापि, पुणे शहराला पुढील अडीच ते तीन महिन्यांसाठी चार टीएमसी पाणी लागणार आहे; तसेच जवळपास एक टीएमसीहून अधिक पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. याचा विचार केला, तर दौंड व इंदापूरला पाणी सोडल्यानंतर पुण्याचे पाणी कमी करावे लागणार आहे.

नियोजनाच्या सूचना

पुण्यात सध्या दिवसाआड पाणी पुरविले जाते. त्यात आणखी कपात केली, तर दौंड, इंदापूर तालुक्यांना पाणी देणे शक्य आहे, असा युक्तिवाद केला जात आहे. त्या दृष्टीने महापालिकेने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या आहेत. धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा पार्किंग धोकादायक

0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन बारामती न्यायमंदिरापासून ते रुई पाटीपर्यंत सर्व्हिस रोडवर पूर्ण केला. मात्र, या रस्त्यावर होणारे बेकायदा पार्किंग अपघाताला निमंत्रण ठरत आहे. न्यायमंदिराच्या लगत गुंठामंत्री, बांधकाम व्यवसायिक, वकील यांनी पार्क केलेल्या अशा वाहनांवर कारवाई करण्याऐवजी पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत.

पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे बेकायदा पार्किंग हटवण्यासाठी तक्रार केली, तर ते पालिकेकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात. बारामती शहरातील सर्व्हिस रोड मोकळा ठेवण्यासाठी, तसेच रस्त्यावरील बेकायदा पार्किंग हटवण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यासंदर्भातील नियोजन कागदावर करून घेण्यात आले. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे समोर आले आहे. गुंठामंत्री, बांधकाम व्यवसायिक, वकील यांनी पार्क केलेल्या अशा वाहनांवर कारवाई करण्याऐवजी पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत.

दरम्यान, वाहतूक पोलिसांना पाठवून तेथील परिस्थितीची माहिती घेतो, असे बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय जाधव

यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाषाणमध्ये गवताला आग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) ५० एकर जागेवरील गवताला रविवारी दुपारी आग लागली होती. वाऱ्याममुळे आग भडकून तब्बल २५ एकरावरील गवत जळाले. या आगीची धग लागून कॉलनीतील काही नारळाची झाडे आणि दोन बंगल्यांच्या छतावर असलेला कचरा पेटला. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि दोन टँकरच्या मदतीने पाच तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

पाषाण येथे एनसीएलची सुमारे ५० एकर मोकळी जमीन आहे. या परिसरातच तीस सेवक बंगले आहेत. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मैदानातील गवताला आचाकन आग लागली. हे गवत वाळलेले असल्याने वाऱ्यामुळे आग वेगाने वाढत होती. त्यामुळे मोठा धुरही निर्माण झाला होता. या आगीमध्ये परिसरातील लहान-मोठी झाडे जळाली. या मोकळ्या जागेपासून काही अंतरावर अभिमानश्री सोसायटी आहे. त्यातील दोन बंगल्यांच्या टेरेसपर्यंत ही आग गेली होती. सोसायटीमधील नारळाची झाडेही पूर्णपणे जळून गेली. याच भागात परिसरात एनसीएलचे गॅस गोडाउन आहे. त्या दिशेने जाणाऱ्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा धोका टाळला. ही आग मोठी असल्याने या ठिकाणी पाषाण, सिंहगड रस्ता, मध्यवर्ती केंद्र, खडकी कँटोन्मेंट, कोथरूड, नायडू या केंद्रातून अग्निशमन गाड्या बोलविण्यात आल्या होत्या. चतुःश्रृंगी पाणी पुरवठा केंद्रातून टँकरने मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात आला. अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजी मेमाणे, विजय भिलारे, प्रभाकर उमराटकर, सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर, जवान जालिंदर मुंजाळ, अंकुश पालवे, सुभाष हंडाळ, बाळासाहेब कारंडे, बालराज संगम, बंडेराव पाटील आदींनी ही आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’च्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची रविवारी निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक असलेले डॉ. कसबे अध्यक्ष म्हणून एकमताने निवडले गेले. साहित्य परिषदेचे पुढील पाच वर्षे ते अध्यक्ष असतील. 'मटा'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवीन कार्यकारिणीची पहिली बैठक कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. डॉ. रावसाहेब कसबे यांनी मराठी साहित्य, संस्कृती, समाजविषयक लेखन केले आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना', 'झोत', 'दलित चळवळीची वाटचाल', 'आंबेडकर आणि मार्क्स', 'आंबेडकर-तत्त्व आणि व्यवहार', 'हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदूराष्ट्रवाद', 'मानव आणि धर्मचिंतन' या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वाङ्मयीन क्षेत्रातील मूलतत्त्ववादाची परखडपणे चिकित्सा केली आहे. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती प्रा. जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार व अन्य सदस्य उपस्थित होते.
परिषदेच्या प्रमुख विश्वस्तपदी प्रा.डॉ. शिवाजीराव कदम तर विश्वस्तपदी माजी आमदार उल्हास पवार आणि यशवंतराव गडाख यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर, निर्मला ठोकळ व चंद्रकांत शेवाळे यांची निवड झाली. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकपदाची जबाबदारी डॉ. पुरुषोत्तम काळे तर सहाय्यक संपादकपदाची जबाबदारी सुरेश देशपांडे यांच्याकडे असेल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर परिषदेचे तीन प्रतिनिधी म्हणून प्रा. जोशी, पायगुडे व रवींद्र बेडकीहाळ यांची निवड करण्यात आली. विभागीय साहित्य संमेलनाच्या निमंत्रकपदी पद्माकर कुलकर्णी, तर सहनिमंत्रक म्हणून राजन लाखे यांची निवड झाली आहे. विनोद कुलकर्णी आणि शशिकला पवार हे या समितीचे सदस्य असतील. पुण्याबाहेरील कार्यवाह म्हणून विनोद कुलकर्णी (सातारा) , प्राचार्य तानसेन जगताप (जळगाव) यांची निवड करण्यात आली आहे.

विभागप्रमुख डॉ. अरुणा ढेरे

'संशोधनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेत संशोधन हा नवीन विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाच्या प्रमुख म्हणून ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. या विभागाच्या माध्यमातून अनेक संशोधन प्रकल्प पुढील काळात हाती घेतले जाणार आहेत,' असे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

'वैचारिक साहित्याचा सन्मान'

दीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी माझी एकमताने निवड करण्यात आली, याचा आनंद आहे. मी हा वैचारिक साहित्याचा सन्मान मानतो. ही संस्था लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- डॉ. रावसाहेब कसबे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्चिक संमेलनाची ‘श्रीमंती’ कळणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पिंपरी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाची मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केली आहे. येत्या चार दिवसांत संमेलनाच्या खर्चाचा अहवाल आयोजक संस्थेला महामंडळाला द्यावा लागणार आहे. संमेलनाचा खर्च किती कोटी असेल, या खासगीत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळणार असून सर्वांत 'श्रीमंत' ठरलेले साहित्य संमेलन किती कोटींच्या घरात पोहोचले ते लवकरच उघड होणार आहे.
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत झाले होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडे संमेलनाच्या आयोजनाचा मान होता. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. पिंपरीत झालेले संमेलन सर्वात खर्चिक ठरले. सारस्वतांच्या मेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याने हे संमेलन अनेकांचे डोळे दिपवणारे होते. किमान दहा कोट रुपये खर्च या संमेलनासाठी झाला असेल, अशी चर्चा दबक्या आवाजात साहित्य वर्तुळात सुरू होती. संमेलनाचा खर्च उघड करण्याचे स्वागताध्यक्ष डॉ. पाटील यांनी टाळले होते. मात्र, महामंडळानेच खर्चाबाबत विचारणा केली असल्याने संमेलनाचा खर्च किती झाला हे आयोजकांना आता जाहीर करावे लागणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे महामंडळावर असणारे तीन प्रतिनिधी निवडायचे राहिल्याने महामंडळाचे कार्यालय सध्या साहित्य परिषदेकडेच असून परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे हे एकमेव पदाधिकारी महामंडळावर आहेत. साहित्य महामंडळाचे कार्यालय आता तीन वर्षासाठी विदर्भ साहित्य संघाकडे जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तीन वर्षातील खर्चाचा अहवाल नवीन कार्यकारिणीकडे द्यावा लागणार असल्याने पिंपरी येथील संमेलनाचा खर्च किती झाला, अशी विचारणा आयोजकांना करण्यात आली आहे.
'तीन वर्षांतील खर्चाचा ताळेबंद सादर करायचा असल्याने साहित्य संमेलनात किती खर्च झाला याबाबत अहवाल द्या, असे पत्र डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला पाठवण्यात आले आहे. सात दिवसात माहिती द्यावी, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले असून ही माहिती देणे आयोजकांवर बंधनकारक आहे. माहिती मिळाल्यानंतर ती बैठकीमध्ये मांडण्यात येईल,' अशी माहिती पायगुडे यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

श्रीपाद जोशी अध्यक्ष?

साहित्य महामंडळावर महाराष्ट्र परिषदेचे तीन प्रतिनिधी म्हणून प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे व रवींद्र बेडकीहाळ यांची निवड करण्यात आली आहे. ३० एप्रिल रोजी महामंडळाची बैठक नागपूरला होणार असून त्यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड होणार आहे. डॉ. श्रीपाद जोशी यांचे नाव महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद मोडकांचा ‘खजिना’ खुला

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
'एक झोका एक झोका, चुके काळजाचा ठोका,' 'शब्दाविना ओठातले', 'शोधीत गाव आलो...' अशा एकापेक्षा एक तरल गीतांचे संगीतकार आनंद मोडक यांच्या वापरातील रेकॉर्ड प्लेअर, त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील पुस्तके, ध्वनिमुद्रिका आणि सीडी असा अनोखा संग्रह आता रसिकांना समृद्ध करणार आहे. मराठीमध्ये अभिजात, लोकसंगीत व भावगीतांची एकाचवेळी मेजवानी देणाऱ्या या संगीताशी रसिकांना जोडून घेता येणार आहे.
'संगीत या समान धाग्यातून प्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांच्याशी स्नेह जुळला. संग्रहातील संगीताचा वारसा जतन करण्यासाठी स्वर-ताल साधना संस्थेकडे देणार असल्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी रागिणी मोडक यांनी स्वर-ताल साधना संस्थेच्या ग्रंथालयाकडे हा ठेवा सुपूर्द केला आहे. संस्थेच्या आनंद मोडक संगीत अभ्यासिकेमध्ये ठेवण्यात आलेल्या या संग्रहाचा लाभ रसिकांना घेता येणार आहे,' अशी माहिती संस्थेचे संस्थापक आणि प्रसिद्ध तबलावादक संजय करंदीकर यांनी दिली. 'आनंद मोडक यांचा हा अमूल्य खजिना स्वर-ताल साधना संस्थेला मिळाला याचा आनंद आहे,' अशी भावना करंदीकर यांनी व्यक्त केली.
'थिएटर अॅकॅडमी'च्या 'घाशीराम कोतवाल' नाटकासाठी झालेल्या परदेश दौऱ्यांमध्ये आनंद मोडक यांनी संग्रह केलेल्या रेकॉर्डसचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्या संग्रहातील सातशे ध्वनिमुद्रिकांमध्ये शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपटसंगीत, लोकसंगीत यांसह वेगवेगळ्या पाश्चात्त्य संगीत प्रवाहांचा तसेच दोनशेहून अधिक सीडी आणि डीव्हीडींचा समावेश आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या 'स्वरार्थरमणी' या पुस्तकासह सलील चौधरी, महंमद रफी, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, किशोरकुमार यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर प्रकाश टाकणाऱ्या सुमारे पाचशे पुस्तकांचा ठेवा त्यामध्ये आहे. मोडक यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांच्या संहिताही आहेत. या संहितांमध्ये मोडक यांनी शोधलेल्या संगीताच्या जागांसंबंधीच्या खुणाही आढळून येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफटीआयआय’मध्ये विद्यार्थ्यांचे ‘जय हनुमान’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) विद्यार्थी सरकारविरोधी, हिंदुत्वाचे विरोधक, परंपरा न मानणारे असे चित्र गेल्या काही महिन्यांत रंगवले गेले असताना ते खोटे ठरवणारी घटना संस्थेत घडली. हनुमान जयंतीनिमित्त संस्थेत उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. 'जय हनुमान' असा घोष संस्थेत सुरू होता. विशेष म्हणजे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान व इतर सदस्यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप पुकारला होता. 'एफटीआयआय संस्था देशाला लागलेली कीड आहे. एफटीआयआयमध्ये मुले-मुली एकत्र राहतात; तसेच अनेक भयानक प्रकार तेथे चालतात. तेथे सर्व प्रकारचे अमली पदार्थ मिळत असून, अफू आणि गांजाची शेती पिकवली जाते. तिरंग्याचा अपमान केला जातो,' असा आरोप एफटीआयआय सोसायटीच्या सदस्य अनघा घैसास यांनी मध्यंतरी केला होता, या पार्श्वभूमीवर 'एफटीआयआय'मध्ये हनुमान जयंतीला 'धार्मिक' व 'उत्सवी' वातावरण होते. या उत्सवामध्ये विद्यार्थी रंगून गेले होते.
एफटीआयआय संस्थेत मारुतीचे मंदिर असून प्रभात स्टुडिओ स्थापन झाल्यापासून हे मंदिर असल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात दर वर्षी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. 'एफटीआयआयमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी सर्व घटक एकत्र येतात. सर्वांना जोडणारा हा उत्सव असल्याने तो उत्साहात साजरा केला जातो,' असे एफटीआयआयचे कुलसचिव उत्तमराव बोडके यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images