Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टँकरमालक संघटना आजपासून संपावर

0
0

टँकरमध्ये दरवाढ केल्याचा निषेध नोंदविणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात महापालिकेने केलेली १५० रुपयांची वाढ मागे घेण्यास पालिका प्रशासनाने असमर्थता दाखविल्याने आज, मंगळवारपासून संप करण्याचा निर्णय टँकरमालक संघटनांनी घेतला आहे. गेल्या सात महिन्यांत पालिकेने टँकरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ केल्याने खासगी टँकरचालकांना ३०० रुपयांच्या टँकरसाठी ५५० रुपये मोजावे लागत आहेत. पालिकेची दरवाढ अन्यायकारक असल्याने हा निर्णय घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गोंधळे यांनी सांगितले

या दरवाढीमुळे नागरिकांना पाण्याच्या एका टँकरसाठी १३०० ते १६०० रुपये मोजावे लागणार आहे. ही दरवाढ रद्द करावी यासाठी गेले आठवडाभर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाने दरवाढ मागे घेण्यास नकार दिल्याने संप करण्याशिवाय पर्या‍य राहिला नसल्याचे गोंधळे म्हणाले. महापालिकेने टँकरच्या दरात केलेली १५० रुपयांची वाढ अन्यायकारक असून, त्याचा भूर्दंड सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. पालिकेने ही दरवाढ मागे घेऊन जुन्याच दराने टँकरचालकांना पाणी द्यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. गेल्या आठ दिवसांपासून महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, तसेच सर्व पक्षांचे गटनेते यांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न देता दर मागे घेणार नसल्याची भूमिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतल्याने खासगी टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गोंधळे यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष गणेश यादव, अप्पा निकम, सुनील जोगदंड, बाबा दस्तुर, आबा चव्हाण, दिलीप कुर्पे उपस्थित होते.

पाणीपुरवठा करताना शहरातील बहुतांश भागात समान आणि सुरळित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिकांना टँकर घ्यावा लागतो. या पूर्वी खासगी टँकरचालकांना ४०० रुपयांना पालिकेकडून पाण्याचा टँकर दिला जात होता. त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये घेण्यात आला. मुख्य सभेने या दरवाढीला मान्यता दिल्याने टँकरचालकांना १ एप्रिलपासून प्रत्येक टँकरसाठी ५५० रुपये द्यावे लागत असल्याने हा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
..
पालिकेकडून पर्यायी व्यवस्था
पुणेकरांना टँकरने पाणी पुरविणाऱ्या टँकरचालकांनी संप करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तरीही संप झाल्यास पुणेकरांना पाणी पुरविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्ट्रेचरवरच पडल्या नवरोबावर अक्षता

0
0

चऱ्होलीतील विवाहाची दबक्या आवाजात चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लग्नघटिका समीप आली तरी नवरा मुलगा येणार की नाही, या विषयी वऱ्हाडी मंडळी चिंताक्रांत असतानाच चक्क अॅम्बुलन्समधून स्ट्रेचरवर बेशुद्ध अवस्थेत नवरदेवाला स्टेजवर आणण्यात आले. आणि तशाच अवस्थेत वधूने त्याला वरमाला घातली आणि विवाह समारंभ पार पाडला!

एखाद्या हिंदी चित्रपटालाही लाजवेल असा हा प्रकार चऱ्होली येथील मंगल कार्यालयात नुकताच घडला असून, त्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील तरुणाचा जवळच्याच गावातील तरुणीशी विवाह निश्चित झाला. लग्नाची तयारी महिनाभरापासून सुरू होती. परंतु, लग्नास काही दिवस शिल्लक असताना वराचा तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने अपघात झाला. त्याला उपचारासाठी मोठ्या हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. विवाहाचा दिवस उजाडेपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते.

या अपघातानंतर विवाह समारंभ होणार की नाही, याची कुजबूज वऱ्हाडी मंडळींमध्ये चालू होती. मात्र, विवाहाच्या दिवशी मंगल कार्यालयात विवाहाची जोरदार तयारी होत असल्याचे पाहून आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते. सर्व काही आलबेल असल्याच्या थाटात वधू आणि वर पक्षाकडील मंडळी सजली होती. लग्नघटिका जवळ आल्यावर व्यासपीठाच्या मागील बाजूने अॅम्बुलन्स दाखल झाली. त्यातून नवरदेवाला स्ट्रेचरवर आणि सलाइन लावलेल्या बेशुद्धवजा स्थितीत आणण्यात आले. त्यानंतर मंगलाष्टका म्हणण्यात आल्या. नवरदेवाला काही समजत होते की नाही, याची उपस्थितांना जाणीव नव्हती; परंतु वधूच्या डोळ्यांतून मात्र, घळाघळा अश्रू वाहत होते. त्या दोघांवर हातातील अक्षता टाकताना प्रत्येकाचे मन हेलावत होते, हात थरथरत होते. उपस्थित महिला आणि छोटी मुले या प्रकाराने धास्तावलेल्या स्थितीतच काही काळ वावरत होते.
..
उपस्थितांमध्ये प्रश्नांचा डोंगर

कशासाठी हा हट्ट, मुहूर्त गाठण्यासाठी की, केलेली तयारी वाया जाऊ नये यासाठी.. कसलीही तक्रार न करता निमूटपणे बोहल्यावर चढलेल्या वधूची स्थिती काय असेल? वधू आणि वराच्या आई-वडिलांचा हट्ट म्हणायचा की हौस? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीचा बनाव उघडकीस

0
0

कर्जातून सुटकेसाठी पिंपरीतील व्यापाऱ्याने रचले कुभांड

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बँकेतून काढलेली साडेतेरा लाख रुपयांची रोकड घेऊन जात असलेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून पैसे चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली होती; मात्र ही चोरी म्हणजे बनाव असल्याचे दरोडाप्रतिबंधक पथकाने तपास करून सहा तासांत उघडकीस आणले. थकित कर्जातून सुटका करून घेण्यासाठी सदर व्यापाऱ्याने हा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून साडेआठ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील व्यापारी मांगीलाल नागारामजी देवासी (४०, रा. काळेवाडी) पिंपरीतील एका बँकेतून साडेतेरा लाख रुपये काढून कारमधून घेऊन जात असताना, मोटरसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी मांगीलाल यांच्या कारला धडक देऊन डोळ्यात मिरचीची पूड टाकून रोकड घेऊन गेले होते. सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पाचपीर चौकाजवळ ही घटना घडली होती, असे फिर्यादीत म्हटले होते.

गुन्ह्याची खबर मिळताच दरोडा प्रतिबंधक पथकातील प्रभारी अधिकारी गणपत पिंगळे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन फिर्यादी मांगीलाल याच्याकडे सखोल चौकशी केली. तसेच बँकेतही चौकशी करण्यात आली. थकबाकी वसुलीसाठी तगादा लावलेल्यांकडून सुटका करून घेण्यासाठी मांगीलाल यांनी हा चोरीचा बनाव रचला असल्याचे तपास चालू असताना समोर आले. या दिशेने आणखी तपास केला असता, त्यांनी आपला मित्र मांगीलाल प्रजापती (३८) यांच्या मदतीने शिल्पा सोसायटी ते काळेवाडी या परिसरात हा बनाव घडवून आणल्याचे उघड झाले. तसेच घरातून आणलेली मिरचीपूड स्वतःच्या हाताने अंगावर टाकून घेऊन खोटी फिर्याद दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

.....

चार आरोपींना अटक

या तपासासाठी पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये शहरातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथील तडीपार आरोपी गणेश महिपती कुडले (२६, रा. कात्रज) आणि बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथील तडीपार आरोपी किरण राजू खवळे (२२, रा. सुखसागरनगर), हडपसर पोलिस ठाणे येथील 'आर्म अॅक्ट'मधील फरारी आरोपी सोमनाथ शिवाजी शिंदे (२८, रा. हडपसर) आणि बंडगार्डन पोलिस स्टेशन येथील आरोपी रमेश राजाराम धेंडे अशा एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावीर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर असलेल्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जैन धर्मीयांनी मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन जयंती साजरी केली. अहिंसा रॅली, आरोग्य शिबिर, सामाजिक संस्थांना मदत असे विविध कार्यक्रम शहरात राबवण्यात आले.

अहिंसा सप्ताह

महावीर जयंतीनिमित्ताने १२ ते १९ एप्रिल हा अहिंसा सप्ताह म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. नचिकेत बालग्रामच्या विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. पिंपळे सौदागरच्या मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या रक्तदान आणि आरोग्य तपासणीच्या मोफत शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. अजमेरा कॉलनीत जैन एकता मंडळाच्या वतीने महावीरांच्या गीतांवर संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला. चिंचवडगाव जैन श्रावक संघाच्या वतीने भक्तिमय जप, भगवान महावीर ट्रस्टच्या वतीने पाककला स्पर्धा, मुनोत ट्रस्टच्या वतीने स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी कर्करोग आणि मॅमोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नेत्रतपासणी आणि आरोग्य शिबिर

पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने महावीर जयंती महोत्सवानिमित्त आणि अखिल शरद लुणावत यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिरात ११५ पेशंटची तपासणी करण्यात आली. चिंचवडमधील माणिक स्टोअर्स येथे हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पेशंटना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. डॉ. सौरभ चावरे, नेत्रतज्ज्ञ डॉ. जतीन दुगड यांनी पेशंटची तपासणी केली. प्रा. अशोक पगारिया, सूर्यकांत मुथियान, मोतिलालाजी चोरडिया, पोपटलाल नहार, संजय जैन, संदीप कांकरिया आदी उपस्थित होते.

श्राविका संघाची वृद्धाश्रमाला भेट

रुपीनगर येथे महावीर जयंतीच्या निमित्ताने माता वामादेवी जैन श्राविका संघाच्या वतीने किनारा वृद्धाश्रमास सदिच्छा भेट व अल्पोपहार देण्यात आला. या वेळी पिंपरी-चिंचवड जैन महासंघाचे महामंत्री सतीश खाबिया उपस्थित होते. आश्रमाचे व्यवस्थापक विजय गांधी यांचा महावीरांची प्रतिमा व रोप देऊन सन्मान करण्यात आला.

विद्यादान उपक्रम

मोहननगरच्या जय भवानी माध्यमिक विद्यालयात मोफत वह्यावाटप करण्यात आले. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष होते. या वर्षी तीनशे विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. प्रमोद नहार, अनिल लुंकड, संतोष लुंकड आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मेहेर, प्रास्ताविक सुरेश गादिया, आभार उज्वला लुंकड यांनी मानले.

मावळात व्याख्याने, धार्मिक कार्यक्रम

लोणावळा : वरघोडा मिरवणुका, नवकार मंत्रपठण, भंडारा, भजन व व्याख्यानासह विविध उपक्रमांनी मावळातील लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव आणि देहूरोड येथे जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

लोणावळा येथील वर्धमान जैन स्थानकवासी संघ, जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ आणि वलवण येथील चंद्रप्रभू जैन सखल संघ यांच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जैन बांधवांच्या वतीने सकाळी भगवान महावीर व महावीर स्वामींच्या प्रतिमा आणि मूर्तीचे पूजन करण्यात आले. मुकुंद शहा, सुरेश श्रीश्रीमल, बच्चूभाई पत्रावाला, गिरीश शहा, राजू गदिया, गिरीश मुथा, अभय पारेख, प्रकाश चौहान, नितीन शहा, शांतिलाल भंडारी, प्रकाश पोरवाल, चंदनमल चौहान, छगनलाल परमार, थानमल परमार, राजेंद्र चौहान, दीपक परमार व दिनेश चौहान उपस्थित होते.

शिरूरमध्ये प्रतिमेची मिरवणूक

शिरूर : भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरातून त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. शिरूरमधील जैन मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात झाली. जैन साध्वीच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.महावीर जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत पाणीपुरवठा करणाऱ्यांचा सत्कार

0
0

शिरूर : शिरूर शहराला पाणीटंचाईच्या काळात स्वतःच्या खासगी विहिरीतून, बोअरवेलमधून पाणी उपलब्ध करून देणाऱ्यांचा व टँकरने शहराला मोफत पाणीवाटप करणाऱ्यांचा लोकशाही क्रांती आघाडी व समविचारी पक्षांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

मागील आठ दिवसांपासून शिरूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. या टंचाईच्या काळात स्वतःच्या घरातील बोअरवेलमधून, विहिरीवरून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणारे, तसेच टँकरने मोफत पाणीवाटप करणाऱ्या संघटना अशा शहरातील चाळीसहून अधिक जणांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

माजी नगरसेवक रवींद्र धनक म्हणाले, 'टंचाईच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या लोकांनी केलेल्या कामाचे मोल फार मोठे आहे. त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.'

या वेळी जिल्हा जनता दलाचे संजय बारवकर, रिक्षा पंचायतीचे अनिल बांडे, मोहम्मद हुसेन पटेल, मनसेचे संदीप कडेकर, सुशांत कुटे, रामभाऊ इंगळे, विक्रम पाचंगे, मंगेश खांडरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी मृत्यूप्रकरणी सतरा जणांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुरुड येथे सहलीला गेल्याल्या अबेदा इनामदार कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे (आझम कॅम्पस ) अध्यक्ष, संचालक, शिक्षक अशा १७ जणांवर मुरुड पोलिस ठाण्यात मंगळवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत कॉलेजमधील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे वडील शिवाजी माधव सलगर (वय ४५, रा. महम्मदवाडी, हडपसर) यांनी यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पिरपांशा इनामदार, अबेदा इनामदार, लतीफ मगदुम, इरफान शेख, मुजफर शेख, सहलीचे नियोजक शैला बुटवाला व सहलीबरोबर असेलेल शिक्षक शकीला बानू अब्दुलवहाब सिद्धवटम, अल्फीया जहागीरदार, जस्मीन आतार, समृद्धी सावंत, कविता अग्रवाल, सुमय्या शेख, अर्चना बनसोडे, नमिता मराठे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रफीक बांगी, हुसेन शेख, आरीफ शेख अशा १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलगर यांची यांची मुलगी स्वप्नाली ही अबेदा इनमादार कॉलेजमध्ये सायन्स विभागात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. ती कॉलेजकडून जाणाऱ्या विविध ठिकाणच्या सहलीला जात होती. त्याप्रमाणे याही सहलीसाठी तिला पाठवण्यात आले होते. एक एप्रिल रोजी जाणाऱ्या सहलीसाठी स्वप्नाली हिने वडिलांकडून सहलीसाठी ५०० रुपये घेऊन ते कॉलेजमध्ये भरले. तसेच, महाविद्यालयाने मागितल्याप्रमाणे वडिलांचे सहलीला जाण्यासाठीचे ना हरकरत प्रमाणपत्रही भरून दिले होते. त्यांनी स्वप्नालीला ठरल्याप्रमाणे १ एप्रिल रोजी कॉलेजमध्ये सहलीला जाण्यासाठी सकाळी सव्वासहा वाजता सोडले. त्या वेळी तिचे मित्र तसेच इतर विद्यार्थी होते. ते खाजगी बसमध्ये बसले होते.
स्वप्नाली हिने दुपारी दोन वाजता तिच्या आईच्या मोबाइल फोन केला. तो फोन सलगर यांनी उचलला. त्या वेळी स्वप्नाली हिने सांगितले, आम्ही बिचवर पोहचलो असून, आता जेवण करुन बीचवर फिरण्यासाठी निघालो असल्याचे सांगितले. सलगर हे जेवणकरुन कामावर निघून गेले. सायंकाळी साडे सहा वाजता त्यांना मुलीच्या अपघाताची बातमी समजली. अपघात होऊन समुद्रात बुडूल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाइक व त्यांनी कॉलेजमध्ये धाव घेतली. त्याठिकाणी गेल्यानंतर स्वप्नालीचा मृत्यू झाल्याचे त्यांना कळले. त्यांना मृतदेह ताब्यात देण्यासाठी स्वतः पालकांनाच बोलावल्याने त्यांनी मुरड येथून स्वप्नालीचा मृतदेह ताब्यात घेतला.
सहलीच्या ठिकाणी समुद्र आहे, ही बाब मला तसेच कॉलेज व्यवस्थापनाला माहिती होती. सहल समुद्र किनारी नेत असताना, त्यांनी कोणताही जलपटू शिक्षक सोबत नेलेला नव्हता. माझी मुलगी व तसेच इतर विद्यार्थ्यांना पोहता येत नव्हते. हे कॉलेज प्रशासनाला माहित असताना, सुद्धा त्यांनी सहल धोकादायक ठिकाणी नेली. निष्काळजीपणे व बेजबादारपणा मुळेच माझ्या मुलीसह इतर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

'तक्रारीची कल्पना नाही'

मुरुड पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीविषयी आमच्याकडे अद्यापपर्यंत कोणतीही बाब अधिकृतपणे आलेली नाही. संस्थेकडे त्या विषयीची विचारणा झाल्यानंतर आम्ही आमची कायदेशीर बाजू पोलिसांकडे निश्चितच मांडू. या प्रकरणात नेमके काय घडले आहे, याची माहिती संस्थेकडून निश्चितच पोलिसांना दिली जाईल.

- डॉ. पी. ए. इनामदार, अध्यक्ष, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मवीरगडाचा होणार लवकरच कायापालट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यादवकालीन शिल्पवैभवाचा वारसा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या धर्मवीरगडाचा (पेडगावचा भुईकोट) कायापालट होणार आहे. गडाच्या तीन किलोमीटरवरील तटबंदीची साफसफाई करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

पुण्याच्या श्रीशिवदुर्ग संवर्धन संस्थेने संवर्धनाचे काम हाती घेतले असून, या प्रकल्पासाठी सतरा लाख रुपये खर्च येणार आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर भीमा नदीकाठी बहादूरगड उर्फ पेडगावचा भुईकोट किल्ला आहे. छत्रपती संभाजीराजे औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यांच्या स्मृतीमुळे या गडाला धर्मवीरगड म्हणून ओळखले जाते. गडाचा इतिहास थेट यादवकाळापर्यंत मागे जातो. पैठण, देवगिरी ही ठिकाणे जेव्हा व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीला आलेली होती, तेव्हा पेडगावही प्रसिद्ध होते.

गडावर शिल्पकलेचा अद्वितीय नमुना असणारी सहा शिवमंदिरे आहेत. गडातल्या वास्तूंचे अनेक अवशेष मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. भीमा नदीच्या पात्रालगत गडातून बोटींसाठी धक्काही काढण्यात आलेला आहे. गडाला सुमारे तीन किलोमीटरची मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या स्वच्छतेचे काम नुकतेच सुरू झाले. त्याबाबत बोलताना संस्थेचे पंडित अतिवाडकर म्हणाले, 'राज्य सरकारने तटबंदीच्या स्वच्छतेसाठी परवानगी दिली आहे. मुख्य प्रवेशद्वार, लोहार वेस या वास्तूंची दुरूस्ती होईल. तटबंदीची सफाई झाल्यावर गडात फळझाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न गडासाठी वापरले जाईल. पुरातत्व खात्याचे अधिकारी त्यासाठी मार्गदर्शन करत आहे. ग्रामस्थांचाही या कामात उत्तम सहभाग आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शीतपेये यकृतासाठी ठरतात जीवघेणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उन्हाळ्यातच नव्हे तर बाराही महिने कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण पीत असलेली शीतपेये आता जीवघेणे ठरत असल्याचे निष्कर्ष वैद्यकतज्ज्ञांनी काढले आहेत. दारू न पिताही (नॉन अल्कोहोलिक स्टिअॅटो हिपॅटायटिस-नॅश) अर्थात कोल्ड्रिंक्समुळे 'लिव्हर सिरॉसिस' होऊन २० ते ४० वर्षांच्या व्यक्तींमध्ये 'लिव्हर डॅमेज' होत असल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे.
जागतिक यकृतदिनाच्या पार्श्वभूमीवर यकृताचा आजार उदभवणाऱ्या विविध कारणांचा आढावा घेतला. त्या वेळी दैनंदिन जीवनात सर्वजण घेत असलेल्या कोल्ड्रिंक्सच्या दुष्परिणामांवर वैद्यकतज्ज्ञांनी लक्ष वेधले. याबाबत तज्ज्ञांनी 'मटा'ला माहिती दिली.
'सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वच ठिकाणी कोल्ड्रिंक घेतले जाते. परंतु, त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. विविध माध्यमांतून दहा ग्रॅम साखर शरीरामध्ये जाणे अपेक्षित असते. परंतु, एकाच वेळी घेतलेल्या कोल्ड्रिंक्समुळे दिवसभरातील प्रमाणापेक्षा अधिक साखर शरीरात जाते. त्यामुळे दुसऱ्यांदा साखर घेऊ नये. कोल्ड्रिंक्स, चहा, गोड पदार्थ, फळे घेतली तरी साखर शरीरात जाते. लिव्हरमध्ये फॅट असल्याने साखरेचे त्यात रूपांतर होते. कोल्ड्रिंक्समध्ये फ्रुक्टोज असून ते शरीरात वेगाने जळते. फ्रुक्टोजचे शरीरावर कोणतेही नियंत्रण नसते. अतिरिक्त फ्रुक्टोजचे रूपांतर फॅटमध्ये होते. त्यामुळे लिव्हरमध्ये फॅटचे प्रमाण वाढल्याने ते शरीराबाहेर काढता येत नाही. त्यामुळे 'लिव्हर सिरॉसिस' होऊन लिव्हर डॅमेज होते,' अशी माहिती पचनविकार व यकृततज्ज्ञ डॉ. विनय थोरात यांनी दिली. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे यकृततज्ज्ञ डॉ. हर्षल घडीकर म्हणाले, 'सध्या जीवनशैली बदलत आहे. यकृताचे आजार उद् भवण्यासाठी बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. त्यामुळे यकृताच्या आजाराला जीवनशैलीचे आजार असे म्हटले जाते. लहान मुलांपासून प्रौढांमध्ये हा आजार होतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलेजांचा खर्च कोटींच्या घरात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभ कॉलेज पातळीवर देण्याच्या निर्णयामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नऊशेहून अधिक कॉलेजांना एकत्रितरीत्या मिळून काही कोटींच्या घरात खर्च करावा लागणार असल्याचे दावे आता पुढे येत आहेत. विद्यापीठाच्या आवारात आयोजित कार्यक्रमाच्या काही लाखांच्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च अव्वाच्या सव्वा होत असल्याने, विद्यापीठाने हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी थेट निगडीत असलेल्या या विषयाचा निर्णय होत असताना, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याची बाब 'मटा'ने मंगळवारी उघड केली. ही बाब समोर येताच, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील कॉलेजांनी 'मटा'कडे या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून, 'व्यवस्थापन परिषदेत चर्चा झाली नसेल, तर हा निर्णय घेणारे विद्यापीठाचे संबंधित अधिकारी कॉलेज पातळीवरील कार्यक्रमांचा खर्च पेलणार आहेत का,' असा सवाल उपस्थित केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे एकीकडे अनेक बाबतीत खर्चात कपात केली जात असताना, विद्यापीठाच्या या एका निर्णयामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्वच कॉलेजांना नाहक खर्च करावा लागत असल्याची ओरडही कॉलेजांनी केली.
विद्यापीठाच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या एका प्राचार्याने या खर्चाचे गणित 'मटा'कडे मांडून दाखविले. संबंधित प्राचार्य म्हणाले, 'विद्यापीठामध्ये दरवर्षी आयोजित होत असलेल्या पदवीप्रदान सोहळ्याचा खर्च दहा लाखांच्या वर कधीही गेलेला नाही. यंदा विद्यापीठाने कॉलेज पातळीवरील पदवीप्रदान कार्यक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्याचा अवलंब करून कार्यक्रम करायचा झाल्यास एका कॉलेजला किमान ५० हजार रुपयांच्या घरात खर्च करावा लागत आहे. प्रत्येक कॉलेजला हा कार्यक्रम आपल्या प्रतिष्ठेला साजेसा करावाच लागणार आहे. अन्यथा कॉलेजकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलू शकतो. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नऊशेहून अधिक कॉलेजे आहेत. या किमान खर्चाच्या हिशेबाने अशा सर्व कार्यक्रमांचा एकत्रित खर्च विचारात घ्यायचा झाल्यास हा आकडा साडेचार कोटी रुपयांवर जातो आहे.' विद्यापीठाने हा निर्णय घेताना अशा व्यावहारिक बाबींचा विचारच न केल्याने ही समस्या समोर येत असल्याची टीकाही याच निमित्ताने मंगळवारी करण्यात आली. विद्यापीठाला, कॉलेजांना आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना खर्चात टाकणारा हा निर्णय मागे घेण्याची मागणीही शहरातील काही कॉलेजांच्या प्राचार्यांनी मंगळवारी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राइसवॉरमध्ये ‘आप’ची उडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रवासी मिळविण्यासाठी कॅब कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या 'प्राइसवॉर'मध्ये आता आम आदमी ऑटो रिक्षा संघटनेने उडी घेतली आहे. 'खासगी कंपन्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत असून, कॅब चालकांना सबसिडी देत आहेत. त्याप्रमाणे सरकारने आम्हाला बससिडी द्यावी. आम्हीही पाच किलोमीटर दराने प्रवाशांना सेवा देऊ,' असे संघटनेने जाहीर केले.
ओला, उबेर या कॅब कंपन्यांमध्ये प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रति किलोमीटरचा दर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याची होर्डिंग्जच्या माध्यमातून शहरभर जाहिरातही केली जात आहे. त्याचे वृत्त 'मटा'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर आम आदमी ऑटो रिक्षा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे याबाबतची मागणी करण्यात आली आहे.
ओला, उबेर या परदेशी खासगी कंपन्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या गुंतवणुकीमुळे प्रवाशांना स्वस्तात सेवा देणे शक्य होते. मात्र, रिक्षा चालकांना स्वतःच्या पैशातूनच रिक्षाचा सर्व खर्च करावा लागतो. त्यामुळे या स्पर्धेमध्ये रिक्षा चालकांना कमी दराने सेवा देणे परवडत नाही. सरकारने सीएनजी किट बसविण्यासाठी अनुदान दिले, त्याप्रमाणेच आम्हाला सबसिडी द्यावी, अशी मागणी संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी केली.
खासगी कंपन्यांकडून 'राइड टायमिंग चार्जेस' किंवा अन्य अधिकचे शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे नागरिकांची एकप्रकारे फसवणूकच होत आहे. शहराअंतर्गत प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना या कॅब कंपन्या शहरात राजरोसपणे सेवा देतात. त्यावर कारवाई करावी किंवा आम्हाला सबसिडी द्यावी. म्हणजे आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकतो, असे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, आरटीओमध्ये रिक्षा चालकांकडून आकारले जाणारे विविध प्रकारचे कर व शुल्कात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांवर आधीच आर्थिक भार पडणार आहे. त्यात ही पाच किमी दराने सेवा देण्याची घोषणा म्हणजे रिक्षा चालकांचे अवसान घात आहे. सबसिडीच्या बदल्यात कमी दर आकारण्याचा प्रस्ताव सरकारकडून आल्यास त्याचा विचार करू, अशी भूमिका रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची ‘स्मार्ट’ हजेरी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या सूचनांचे पालन झालेले नसतानाही, स्मार्ट सिटीसाठी पुणे महापालिकेने स्थापलेल्या विशेष कंपनीच्या (एसपीव्ही) संचालक मंडळाच्या बैठकीस महापौर, सभागृह नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष उपस्थित राहिल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेले काही दिवस पालिकेमध्ये 'एसपीव्ही' हा चर्चेचा विषय आहे. या कंपनीच्या संचालक मंडळावर लोकप्रतिनिधींना पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले नसल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी व नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. त्याच वेळेस इतर पक्षातील नेत्यांनीही पवार यांनी या सर्व प्रकारामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्या वेळी पवार यांनी संचालक मंडळातील नगरसेवकांची संख्या वाढविण्याबाबत, तसेच कंपनीच्या अध्यक्षपदी आयुक्तांच्या ऐवजी महापौरांची निवड करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना करण्याचे आश्वासन दिले होते.
प्रत्यक्षात पवार यांच्या सूचनेला केंद्राने आणि राज्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. पवार यांनी सूचना केल्यानंतर याबाबतचे बदल करण्याबाबत सरकार गंभीरपणे विचार करीत होते. मात्र, पुण्याच्या महापालिका आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करून कंपनीच्या अध्यक्षपदी लोकनियुक्त प्रतिनिधी राहिल्यास काम अपेक्षित वेगाने होऊ शकणार नसल्याचा दावा करून अध्यक्षपदासाठी आयुक्तांचा आग्रह धरला होता. त्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही हस्तक्षेप करण्याची त्यांनी विनंती केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विनंतीचा विचार करून एसपीव्हीच्या रचनेमध्ये कोणतेही बदल केले नाहीत.
वास्तविक महापालिकेत सत्तेत आणि राज्य व केंद्रामध्ये विरोधात असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने याच्या विरोधात दंड थोपटणे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. विरोधाऐवजी सोमवारी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले. हे कमी की काय म्हणून कंपनीच्या अध्यक्षपदी आयुक्तांची निवड करीत असल्याचा ठरावही एकमताने मंजूर केला गेला. याबाबतची माहिती पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या घूमजावची चर्चा पालिका वर्तुळात मंगळवारी रंगली होती. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धाडस एवढे कसे वाढले अशी चर्चा एका गटात होती, तर पक्षानेच स्मार्ट सिटीबाबतची भूमिका बदलली असल्याचे काहींचे म्हणणे होते.


'दादांचेच मार्गदर्शन'

पुणे : राष्ट्रवादीचे कामकाज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच चालले असल्याचा खुलासा पक्षाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केला आहे. शहराच्या विकासासाठी घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा अजित पवारांच्या पाठपुराव्यामुळेच होत असल्याचे पाटील यांनी केलेल्या खुलाशामध्ये म्हटले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेप्रमाणेच पुणे शहराचाही विकास माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी केला आहे. शहराच्या विकासासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर, शहरातील आणि पालिकेतील सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. नदी सुधार प्रकल्प, चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्प, मेट्रो, बीआरटी, यासह पीएमपीएमएलचे सक्षमीकरण, उड्डाणपूलांची निर्मिती, भामा आसखेड प्रकल्प, मुंढवा जॅकवेल, खडकवासला बंद पाइपलाइन तसेच वडगाव, वारजे जलशुद्धीकरण प्रकल्प, पर्वती आणि लष्कर जलकेंद्राचे विस्तारीकरण, नूतनीकरण, कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यास अजित पवार कारणीभूत असल्याचे पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील रस्त्यांची होणार पुनर्रचना

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील सुमारे शंभर किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्मार्ट सिट‌ी योजनेच्या माध्यमातून पुनर्रचना करण्यात येणार आहे. अर्बन स्ट्रीट डिझाइन गाइडलाइन्सच्या मार्गदर्शन सूचनांनुसार रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. शहरातील एकूण ४३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची पुनर्रचना या प्रकल्पाच्या माध्यमातून केली जाणार असून पहिल्या टप्प्यात प्रशासन १०० किलोमीटरचे रस्ते तयार करणार आहे.
शहरातील रस्ते करताना अर्बन स्ट्रीट डिझाइनच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत वेगवेगळ्या पद्धतीने महापालिका रस्ते तयार करत असल्याची टीका केली जाते. रस्ते, फूटपाथ तयार करताना नियमांना डावलून मनमानी कारभार करत असल्याची ओरड सतत होत असल्याने शहरातील प्रमुख काही रस्त्यांची नव्याने पुनर्रचना करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हे सर्व रस्ते अर्बन स्ट्रीट गाइडलाइन्सच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केले जातील, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. ही मार्गदर्शन तत्त्वे निश्चित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने एका पॅनलची नियुक्ती केली होती. या पॅनेलमधील सदस्यांनी आपला अहवाल प्रशासनाला सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका हद्दीत सुमारे २०६५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी ४३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची पुनर्रचना टप्प्याटप्याने केली जाणार आहे. पहिल्या टप्यात शंभर किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. या सर्व रस्त्यांवर फूटपाथ, सायकल ट्रॅक, सर्व्हिस रोड, पार्किंग, पावसाळी गटारे अशा काही गोष्टींची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी चार विभागांमधील प्रत्येकी पंचवीस किलोमीटर लांबीचे असे सुमारे शंभर किलोमीटरचे रस्ते निवडण्यात येणार आहेत. लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, यासह शिवाजी रोड, नरवीर तान्हाजी मालुसरे रोड (सिंहगड रोड), जंगली महाराज, गोपाळकृष्ण गोखले रोड (फर्ग्युसन कॉलेज), गणेशखिंड रोडचा प्रामुख्याने समावेश राहणार असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूगडाळीनेही खाल्ला ‘भाव’

0
0


पुणे : तूरडाळीसह उडीदडाळीचे दर गगनाला भिडू लागले असताना त्यात मूगडाळही मागे राहिली नाही. गेल्या दोन दिवसांत मूगडाळीच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे. मूगडाळ आता दहा हजार रुपयांच्या घरात पोहोचू लागली आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथून डाळीची मोठ्या प्रमाणावर आवक होते. या वर्षी भीषण दुष्काळामुळे डाळींच्या उत्पादनाला फटका बसला आहे. दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी डाळींचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहे. घाऊक बाजारात मूगडाळीला क्विंटलला रविवारी ९००० ते ९५०० रुपये दर मिळाला होता. दोन दिवसात क्विंटलमागे २०० रुपयांची दरवाढ झाली आहे. पुण्याच्या भुसार बाजारात मूगडाळीची १० टन आवक होत आहे. हंगामामध्ये उन्हाळी मूगडाळीची आवक मोट्या प्रमाणावर होत असते. परंतु, सुरुवातीलाच पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळी मूगडाळीचे उत्पादन घटले आहे. त्यात उत्पादन आणि मागणी यामध्ये तफावत असल्याने डाळींच्या किंमती वाढलेल्या आहेत, अशी माहिती डाळीचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली. आगामी काळात डाळींच्या किंमती कमी होण्याबाबत शंका असल्याचे स्पष्ट केले.

डाळींचे दर (क्विंटलमध्ये)

डाळींचे प्रकार.................... दर (रुपयांमध्ये)

तूरडाळ .......................१३,२००० ते १४,७००

हरभरा डाळ ............. ७,००० ते ७,६००

उडीद डाळ .............. १७,००० ते १७,५००

मसूर डाळ ............. ७,४०० ते ७,६००

मटकी डाळ ........... ८,८०० ते ९,०००

मूगडाळ .............. ९,२०० ते ९,७००


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश मोतेवार यांच्या मालमत्तेचे पंचनामे

0
0

पुणे : समृद्ध जीवन फूड इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूकीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवनचे प्रमुख महेश मोतेवार यांना अटक करण्यात आलेली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मोतेवार यांच्या सर्व मालमत्तेचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत सर्व माहिती एकत्रित करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे, अशी माहिती सीआयडीचे पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी दिली.
सीआयडीने मोतेवार यांना अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी महेश मोतेवार यांचे पुण्यातील सातारा रस्त्यावरील पद्मावती येथील एक कार्यालय सील केलेले आहे. मात्र, समृद्ध जीवनच्या इतर प्रॉपर्टी अद्याप सीआयडीने सील केलेल्या नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. समृद्ध जीवन फूड इंडिया लिमिटेडच्या संदर्भात माहिती घेण्याचे काम सीआयडीकडून सुरू आहे.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराटे प्रशिक्षण योजना वादात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान योजनेअंतर्गत शालेय पातळीवर राबविण्यात आलेली कराटे प्रशिक्षण योजना वादात सापडली आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षकांनी आपल्याला वेळच्या वेळी पैसे मिळले नसल्याची ओरड केल्याने, शिक्षण खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या विषयी संबंधित प्रशिक्षकांनी 'मटा'ला दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानांतर्गत माध्यमिक शाळांमधून मुलींसाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण योजना राबविण्यात आली होती. राज्यातील १ हजार ३७५ शाळांमधून इयत्ता नववी आणि दहावीच्या एकूण ९६ हजार ८१ विद्यार्थिनींना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्याचा विचार मांडण्यात आला होता. स्वसंरक्षणाच्या या किमान दहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थिनीमागे जास्तीत जास्त ४५० रुपये इतका खर्च अभियानाच्या माध्यमातून शाळांना दिला जाणार होता. वीस तासांच्या प्रशिक्षणासाठी स्थानिक तज्ज्ञ प्रशिक्षण संस्था वा प्रशिक्षकांच्या मदतीने शाळांमधून ज्युदो, कराटे, तायक्वांदो आदी कौशल्ये शिकविण्याच्या सूचना सरकारने केल्या होत्या. खर्चासाठी उपलब्ध रक्कमेमधून प्रशिक्षणाच्या मानधनासह विद्यार्थिनींसाठी अल्पोपहारही दिला जावा, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. असे असतानाही शहर आणि परिसरातील शाळांमधून या योजनेचा निधी मिळाल्यानंतरही विद्यार्थिनींसोबतच, प्रशिक्षकांचीही हेळसांड झाल्याचा आरोप संबंधितांनी केला.
'दोन वर्षांपूर्वी झालेल्या या प्रशिक्षणादरम्यान मी तीन शाळांमधील जवळपास ४९९ विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण दिले. तिन्ही शाळांनी मला प्रत्येक विद्यार्थिनीमागे ५० रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार मला या शाळांकडून जवळपास २५ हजार रुपये मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून संबंधित शाळांपासून ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापर्यंत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही हे मानधन मिळालेले नाही,' अशी माहिती जनक हांडे या प्रशिक्षकाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेपल’च्या पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पाच लाखांत घर' अशी फसवी जाहिरात देऊन फ्लॅट नोंदणीसाठी पैसे गोळा करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून मेपल कंपनीचे भागीदार, पदाधिकाऱ्यांवर शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन दिवस चौकशी केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. या योजनेत आतापर्यंत वीस हजार नागरिकांनी घरासाठी नोंदणी केली आहे.
या बाबत पोलिस उपनिरीक्षक नारायण मनोहर पालमपल्ले (वय ३५, रा. दापोडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून 'मेपल'चे व्यवस्थापकीय संचालक सचिन अशोक अगरवाल, नवीन अशोक अगरवाल, सेल्स मॅनेजर प्रियंका अगरवाल आणि त्यांचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात ' पाच लाखांमध्ये घर मिळवा,' अशी 'मेपल'ने जाहिरात केली होती. त्यासाठी नावनोंदणी देखील सुरू केली होती. नागरिकांची दिशाभूल करून फ्लॅट नोंदणीसाठी पैसे गोळा केले. या योजनेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी देखील 'मेपल'च्या योजनेची गुप्तपणे चौकशी सुरू केली. चौकशीनंतर त्यांनी जाहिरात करताना पंतप्रधान आवास योजनेचे संचालक निर्मल देशमुख यांची परवानगी न घेतल्याचे आढळून आले.
ही जाहिरात फसवी आणि दिशाभूल करणारी असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. खटके तपास करत आहेत.
..
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
पाच लाखांत घर अशी जाहिरात करून कंपनीने नावनोंदणीसाठी प्रत्येकाकडून एक हजार रुपये घेतले आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात वीस हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात दहा हजारच घरे बांधण्यात येणार होती. त्यामुळे या गुन्ह्याची व्यापकता पाहता हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोहिनूर हिऱ्याची लूटच

0
0

इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांची पुराव्यांसह माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'कोहिनूर हिरा ब्रि​​टिशांनी लूट करूनच भारतातून नेला. एवढी मौल्यवान वस्तू भेटीत कोणीही देत नाही. त्यामुळे तो परत मागता येणार नाही, या दाव्यात काहीही अर्थ नाही. त्याबाबतचे पुरावे उपलब्ध असताना संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष करणे सखेद आश्चर्यकारक आहे,' असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
कोहिनूर हिऱ्याबाबत सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे. हा हिरा ब्रिटिशांनी चोरून अथवा बळजबरीने नेला नसल्याने तो परत मिळवण्याचा दावा करता येणार नाही, असे केंद्र सरकारने नुकतेच सुप्रीम कोर्टात सांगितले. त्याबाबत सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी बाजू मांडली. या पार्श्वभूमीवर डॉ. मोरे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी ऐतिहासिक संदर्भांचे दाखले देऊन या अद्‍भुत हिऱ्याच्या प्रवासाची माहिती दिली.
कोहिनूरबाबत बोलताना मोरे म्हणाले, 'कोहिनूर म्हणजे प्रकाशाची किंवा तेजाची राशी. गोवळकोंडा येथील खाणीतील हा हिरा आहे. कुतुबशहाच्या दरबारी मीर जुमला नामक अधिकारी होता. तो अतिशय महत्त्वाकांक्षी होता. त्याने कुतुबशाहीची चाकरी सोडून दिल्लीला शहाजहानची चाकरी पत्करली. तेव्हा त्याने कोहिनूर शहाजहानला दिला. त्यानंतर तो परंपरेने औरंगजेबाकडे आला. त्यानंतरचे मुघल बादशाह प्रभावहीन ठरले. इराणचा बादशहा नादिरशहा याने दिल्लीवर स्वारी केली. तेव्हा त्याने मयूर सिंहासन आणि कोहिनूर या मौल्यवान वस्तू लुटल्या आणि मायदेशी नेल्या. दरम्यान, नादिरशहाचा खून झाला. त्यानतंर अहमदशहा अब्दालीने अफगणिस्तानची निर्मिती केली आणि गादी बळकावली. त्यानतंर कोहिनूर त्याच्याकडे आला. त्याच्या पश्चात तैमूर बादशहा झाला. त्याला २४ मुले होती. त्यापैकी शहा झमान आणि शहा शुजा ही मुले महत्त्वाकांक्षी होती. त्यापैकी शहा झुमान बादशहा झाला. शहा शुजाची नजर गादी आणि हिऱ्यावर होती. तिकडे बंडाळी माजली. तत्कालीन पंजाब प्रांतात महाराजा रणजितसिंग यांचा दबदबा होता. गादी मिळवण्यासाठी त्यांची मदत व्हावी, या हेतूने शहा शुजाच्या बेगमेने कोहिनूर त्यांना दिला. मात्र गादी मिळवण्यासाठी शुजाला त्यांचा उपयोग झाला नाही. नंतर इंग्रजांच्या मदतीनेच शहा शुजा गादीवर बसला. त्याचवेळी भारतावर अफगणिस्तानच्या दिशेने रशियाची स्वारी होईल अशी भीती इंग्रजांना होती. इंग्रज आणि अफगाणिस्तानचा असा संबंध आला. कोहिनूर सुवर्णमंदिराला द्यावा अशी रणजितसिंग यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अल्पवयीन मुलगा दिलीपसिंग गादीवर आला. त्याचा फायदा घेऊन १८४८-४९ दरम्यान इंग्रजांनी पंजाबवर स्वारी केली आणि हिरा त्यांच्याकडे गेला. जॉन लॉरेन्स आणि हेन्री लॉरेन्स या इंग्रज बंधूंनी हिरा इंग्लंडला नेला आणि तो इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचवला. राणीच्या मुकुटात बसवण्यासाठी त्याचा आकारही बदलण्यात आला. इतिहास अभ्यासक विनायक कोंडदेव ओक यांच्या 'हिंदुस्थान कथारस' आणि प्रसिद्ध संशोधक विल्यम डालरिंपल यांच्या 'द रिटर्न ऑफ द किंग' तसेच हिऱ्याची लूट करणारे लॉरेन्स बंधू यांच्या चरित्रात याचे उल्लेख आलेले आहेत. एवढे पुरावे असताना ते नाकारण्याची संबंधितांची भूमिका चुकीची आहे.'
..........
वैशिष्ट्यपूर्ण कोहिनूर
कोह-इ-नूर : प्रकाशाची किंवा तेजाची राशी
वजन : १०५ कॅरेट
मूळ : गोवळकोंडा खाण (सध्याचे हैदराबाद)
प्रवास : गोवळकोंडा-दिल्ली-इराण-अफगणिस्तान-पंजाब-इंग्लंड.
आकार : इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात बसवण्यासाठी हिऱ्याच्या आकारमानात बदल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसैनिकांनी फोडले ‘मेपल’चे कार्यालय

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच लाखांत घर देण्याचा दावा करणाऱ्या 'मेपल शेल्टर ग्रुप'चे कार्यालय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी फोडले. कार्यालयाची तोडफोड करून मनसे कार्यकर्त्यांनी या योजनेची नोंदणीही बंद पाडली.
राज्य सरकारने सोमवारीच मेपल ग्रुपला योजनेची नोंदणी थांबवून यापूर्वी नोंदणी केलेल्या ग्राहकांना रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. शिवाजीनगर येथील रमारमण मंगल कार्यालयात मेपल ग्रुपने योजनेची नोंदणी सुरू केली आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त होता, तसेच बाउन्सर्सही तैनात करण्यात आले होते. या बाउन्सर्सकडून पैसै परत मागायला येणाऱ्यांना दमदाटी करण्यात येत होती. हा सर्व प्रकार योजना राज्य सरकार पुरस्कृत असल्यासारखा सुरू होता. त्यामुळे मनसेने आपल्या पद्धतीने हा प्रकार उधळून लावला, असे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, कामगार सेनेचे नरेंद्र तांबोळी, उपाध्यक्ष जयराज लांडगे, सचिन पांगारे, प्रशांत मते, सुधीर धावडे, आशिष साबळे, रवींद्र खेडेकर, साईनाथ बाबर, संजय भोसले आदी सहभागी झाले होते. 'मेपल'ने जाहिरातीत पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचे फोटो वापरले होते. त्यामुळे जनतेची दिशाभूल होत होती. सरकारला याची कल्पना नव्हती, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्‍यांकडे करणार आहोत, असे अजय शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १११ जणांवर मोक्का

0
0

कोल्हापूर परिक्षेत्रातील अठरा टोळ्यांचा समावेश; वर्षातील कामगिरी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि साताराच्या पोलिस अधीक्षकांनी गेल्या वर्षभरात पाठविलेल्या अठरा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा प्रस्तावाला (मोक्का) कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय कुमार वर्मा यांनी मंजुरी दिली. परिक्षेत्रातील एकूण १५७ जणांविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक तेरा टोळ्यांअंतर्गत १११ जणांवर पुणे ग्रामीणकडून मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी मध्य प्रदेशातील झांबुआ टोळीचा सूत्रधार सोबन उर्फ गांडो हिमला मछर याच्यासह चौदा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी म्हणून वर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर झांबुआ टोळीविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच, सासवड येथील पप्पू उत्तेकर टोळीतील १५, जेजुरी येथील महेश कमलापुरे टोळीतील १२, लोणी काळभोर येथील तुषार हंबीर टोळीतील १२ आणि पौड येथील तुषार गोगावले टोळीतील सहा जणांविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांनी वीस जणांविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कराड शहरातील सलीम उर्फ सल्या चेप्या महंमद शेख आणि त्याच्या टोळीतील आठ आरोपींविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्या आरोपींविरुध्द देखील वर्मा यांनी परवानगी दिली आहे. तर, फलटण येथील योगेश अहिवळे टोळीतील ११ आरोपींविरुध्द देखील मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एक जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१६ दरम्यान १०३ पिस्तुले आणि ३२१ जिवंत काडतुसे जप्त करून करून १३० आरोपींना अटक केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्याधुनिक कार्बाइन देखील जप्त केली आहे.
..
'डिजिटल पुराव्यांवर भर देणार'
पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दोषींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक गुन्ह्यात 'हॅश व्हॅल्यू' काढणे आणि डिजिटल पुरावा संकलित करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक संजय कुमार वर्मा यांनी पाचही जिल्ह्याच्या अधीक्षकांना आदेश दिले. 'हॅश व्हॅल्यू' आणि डिजिटल पुरावे दोषारोप पत्रासोबत कोर्टात सादर करण्यात येत आहे. 'व्हॅश व्हॅल्यू' आणि डिजिटल पुराव्यांमुळे गुन्ह्यातील फिर्यादी आणि पंच फितूर होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट होऊन दोषींचे प्रमाण वाढण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरकार करणार शंभर गडांचे जतन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांचे जतन करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून कोणीही वाली नसलेल्या शंभर किल्ले केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील साठ किल्ले, काही सागरी जलदुर्ग आणि राज्याच्या इतर भागातील किल्ल्यांचा समावेश आहे. राज्य सरकारतर्फे या किल्ल्यांना संरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेली कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये लहान मोठे, गडकोट, जलदुर्ग असे सहाशेहून अधिक किल्ले अस्तित्त्वात आहेत. यातील केवळ ४७ किल्ले केंद्र सरकारच्या तर ४९ किल्ले राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे संरक्षित आहेत. उर्वरित किल्ल्यांवर तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्ष ठेवणे अपेक्षित होते. परिणामी यातील अनेक किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. तर काही किल्ले पर्यटनासाठी उत्तम ठिकाण असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत किल्ल्यांना संवर्धनासाठी निधी मिळत असल्याने आत्तापर्यंत अनेक किल्ले वंचित राहिले होते. याची दखल घेऊन राज्याच्या सांस्कृतिक विभागाने नेमलेल्या दुर्ग संवर्धन समितीने गेल्या वर्षी पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या किल्ल्यांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सरकारने यास मान्यता दिली आहे.

महाराष्ट्रातील अनेक किल्ले सध्या संवर्धनापासून वंचित आहेत. ब्रिटिशांच्या काळापासून आजपर्यंत राज्यात किती गड किल्ल्यांची नोंद झाली आहे, याचा अभ्यास करून समितीने राज्याच्या विविध भागातील अशा महत्त्वपूर्ण शंभर किल्ल्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये तुंग-तिकोना, रोहिडा, वासोटा, जिवधन, चावंड, देवगड अशा विविध किल्ल्यांचा समावेश केला आहे. यात सह्याद्रीतील साठ किल्ल्यांबरोबरच जलदुर्ग आणि विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील दुर्गांना आम्ही सहभागी केले आहे. केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या यादीत त्यांचा समावेश होण्यासाठी शास्त्रीय प्रक्रियेला सुरुवात झाली असून पुढील वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या संवर्धनासाठी परिणामकारक पावले उचलता येतील, अशी माहिती राज्य दुर्गसंवर्धन समितीचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे यांनी दिली.



'दुर्गसंवर्धन समितीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात आम्ही पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या पाचही विभागात अभ्यासक, इतिहासप्रेमी, वन विभाग, स्थानिक लोक आणि स्वयंसेवी संस्थांसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत. पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी स्थानिक लोकांना गाइडचे प्रशिक्षण तसेच पर्यटकांच्या आदरातिथ्याचेही प्रशिक्षण देत आहोत. काही महिन्यापूर्वीच प्रशासनाने आयोजित केलेला रायगड महोत्सव लोकप्रिय ठरला. याला तीन लाख लोकांनी भेट दिली. यातूनच विविध किल्ल्यांच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीचे धडे मिळाले आहेत. त्याचा सहभाग संवर्धनामध्ये महत्त्वाचा आहे,' असे बलकवडे यांनी सांगितले.

किल्ल्यांचा दस्तावेज


राज्यातील सर्व प्रकारच्या किल्ल्यांच्या माहितीचे एकत्रिकरण करण्यास दुर्ग संवर्धन समितीने सुरुवात केली आहे. याशिवाय चौदा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने बजेटमध्ये साठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. समितीमार्फत या किल्ल्यांचे फोटो, ऐतिहासिक महत्त्वावर आधारित लेखन, चित्रिकरण करण्यात येणार आहे. किल्ल्यांवरील जैववैविध्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणार आहेत. या निधीतून दुर्गसंवर्धन, पर्यटन आणि स्थानिक लोकांना रोजगार या तिन्हीचा समन्वय साधरण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images