Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कडेपठार देवस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील देवतालिंग कडेपठार देवस्थानच्या विश्वस्त तसेच पुजाऱ्यांच्या गैरकारभारामुळे ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले. त्याचबरोबर ट्रस्टच्या प्रशासकपदी सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांची नियुक्ती करून संबंधितांवर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
ट्रस्टच्या कारभाराबाबत भक्तांकडून तक्रारी येत होत्या. तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आयुक्तालयातील निरीक्षक रविंद्र गव्हाणे यांनी देवस्थानला भेट देऊन विश्वस्तांच्या जबाबाचा अहवाल सहायक धर्मादाय आयुक्तांकडे दिला होता. ट्रस्टचे विश्वस्त पुजारी म्हणून काम पाहतात. तसेच ट्रस्टला वर्षभरात केवळ दोन महिने १८ दिवसांचे उत्पन्न मिळते. उर्वरित उत्पन्न हे पुजारी किंवा विश्वस्त आपसात वाटून घेतात.
देवस्थानला दिलेले मौल्यवान दागिने पुजारी वाटून घेतात. मंदिराच्या आजूबाजूस अतिक्रमण वाढले असून, बेकायदा दुकानांची संख्या वाढली आहे. या बाबत ट्रस्टच्या विश्वस्तांनी कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, वार्षिक हिशेबात देखील मौल्यवान वस्तूंचा उल्लेख नसल्याचे आढळून आले. काही विश्वस्त बाहेरगावी राहत असून, मुख्य विश्वस्त मुंबईला राहतात. ते सहा महिन्यांत एकदा येऊन जातात, असे अहवालात आढळून आले.
या बाबी ट्रस्टच्या विकासाला मारक आहेत. तसेच विश्वस्त व पुजाऱ्यांनी ट्रस्टची योजना स्वतःच्या फायद्यासाठी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून रकमा, दागिने आपसात वाटून घेणे ही बाब गंभीर आहे. पुजारीच विश्वस्त असल्याने ट्रस्टचे नुकसान होत आहे. विश्वस्त म्हणून काम पाहण्यास ते अपात्र आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४७ (ग़) आणि ४७ (२) या प्रमाणे एखाद्या विश्वस्त न्यासाचे काम पाहण्यास अपात्र असल्यास त्यांना पदावरून हटवता येते. या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, असे डिगे यांनी आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीओच्या कारवाईत १२ लाखांचा महसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२२ वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिमअंतर्गत कारवाई करून १२ लाख रुपयांचा दंड वसूल केला.
मोहिमेसाठी १३ तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रत्येक पथकामध्ये दोन मोटार वाहन निरीक्षक नेमण्यात आले होते. शहर आणि उपनगरातील तीन व सहा आसनी रिक्षा आणि टॅक्सी या प्रवासी वाहनांची विशेष तपासणी यावेळी करण्यात आली. यामध्ये एकूण ५०३ वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनांची कागदपत्रे, कर भरणा, प्रवाशांची अतिरिक्त संख्या, स्क्रॅप रिक्षा, वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) आदी प्रकारची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये १२२ वाहने दोषी आढळली. त्यापैकी ८६ वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ कायदा लांबणीवरच

$
0
0

विधेयक मसुद्यावर चर्चेसाठी नवी चिकित्सा समिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हिवाळी अधिवेशनापासून रखडलेले महाराष्ट्र विद्यापीठ विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही कायद्यात रूपांतरित होऊ शकले नाही. विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार, या विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची नवी चिकित्सा समिती नेमून, पावसाळी अधिवेशनात विधेयक पुन्हा चर्चेला मांडण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे नव्या विद्यापीठ कायद्याची निर्मिती पुन्हा लांबणीवर पडली.

नव्या विद्यापीठ कायद्याच्या निर्मितीसाठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने चर्चा सुरू होत्या. डॉ. अरुण निगवेकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. राम ताकवले यांच्या समित्यांनी कायद्यासाठी आवश्यक सूचना केल्या होत्या. त्या संबंधीच्या विविध मुद्द्यांच्या आधारे कायदा निर्मितीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या चर्चांना सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात वेग आला होता. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतः या चर्चांसाठी पुढाकार घेत, राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये कायदा निर्मितीविषयी सर्व घटकांच्या मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तयार झालेल्या विद्यापीठ विधेयकाचा मसुदा हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता.

अधिवेशनाच्या अंतिम टप्प्यात मांडलेल्या या विधेयकामधील वादग्रस्त मुद्द्यांमुळे या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सहा आमदारांची संयुक्त समिती नेमून उन्हाळी अधिवेशनात विधेयकाला चर्चेला आणण्याचा निर्णय घेतला होता. या चर्चेअंती तयार झालेले महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे सुधारित विधेयक गेल्या आठवड्यात विधिमंडळात मांडण्यात आले होते. विधानसभेमध्ये मंगळवारी दुपारी विधेयकाविषयीच्या चर्चेदरम्यान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी विधेयकाविषयी सर्वपक्षीय आमदारांच्या भावना विचारात घेणे महत्त्वाचे असल्याचे मत मांडले होते. त्यानुसार तावडे यांनी २१ आमदारांचा समावेश असलेली चिकित्सा समिती नेमण्याची तयारी दर्शवली. या समितीमार्फत विधेयकाची व्यापक चर्चा करून, हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

..............

शिक्षण क्षेत्राची नाराजी

कायद्याची निर्मिती लांबल्याच्या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. कायद्याची निर्मिती होण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मतही तज्ज्ञांनी नोंदवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक पिशव्यांना सिंहगडावर बंदी

$
0
0

एक मेपासून अंमलबजावणीला सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्लास्टिकचा कचरा रोखण्यासाठी वन विभागाने येत्या १ मेपासून सिंहगडावर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांना प्लस्टिक पिशवी स्वयंसेवकाकडे जमा करून कापडी पिशवी विकत घ्यावी लागणार आहे. गड फिरून झाल्यानंतर पिशवी परत दिल्यास वन विभागातर्फे पैसे परत दिले जाणार आहेत.
सिंहगडावर फिरायला जाणाऱ्यांकडून अनेकदा प्लॉस्टिकच्या पिशव्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ नेण्यात येतात. अनेक पर्यटक खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर पिशव्या कोठेही टाकून देत असल्याने गडावरील प्लास्टिकच्या कचरा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने गडावर प्लास्टिक पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्यांवर बंदी आणण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार पुढील पंधरा दिवसात गडावरील वन कर्मचाऱ्यांकडे कापडी पिशव्यांचा साठा उपलब्ध होणार आहे. १ मेपासून गडावर जाणाऱ्या पर्यटकांकडून प्लास्टिक पिशव्या काढून घेण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक विजय माने यांनी सांगितले.
सध्या पाणीटंचाई असल्याने पर्यटकांना पाण्याच्या बाटल्या गडावर घेऊन जाण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडील प्लास्टिकच्या पिशव्या आम्ही ताब्यात घेणार आहोत. पर्यटकांसाठी गडावरील वाहनतळाजवळ वन विभागाचे कर्मचारी कापडी पिशव्यांचे स्टॉल ठेवणार आहेत. पर्यटकांना दहा रुपये भरून कापडी पिशवी विकत घ्यावी लागेल. गड फिरून झाल्यावर त्यांनी पिशवी परत दिल्यास आम्ही पैसे परत करणार आहोत. प्लास्टिकच्या पिशव्याबद्दल गडावरील व्यावसायिकांबरोबर आमची चर्चा झाली आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारीही लोकांचे याबद्दल प्रबोधन करणार आहेत, असेही माने म्हणाले
..
सुरक्षा कठड्यांचे काम सुरू
शाळांना सुट्ट्या लागल्याने पुढील महिन्यापासून गडावरील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर पर्यटकांच्या उल्लेखनीय वाढ होते. या धर्तीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी घाट रस्त्यावरील धोकादायक कठड्यांच्या दुरुस्तीचे काम आम्ही सुरू केले आहेत दरडीतून कोसळलेल्या दगडांचा वापर करून कठडे बनविण्यात येत आहेत. या शिवाय घाट रस्त्यावर ठिकठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जनजागृती करणारे फलकही लावले आहेत, असेही माने म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशेच्या ढगांची दाटी

$
0
0

देशात यंदा १०६ टक्के पाऊस; हवामान खात्याचा अंदाजही सकारात्मक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशावर पसरलेली दुष्काळछाया यंदा नाहीशी होणार असल्याची आशा मंगळवारी जाहीर झालेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) पहिल्या दीर्घकालीन अंदाजाने जागवली गेली आहे. 'आयएमडी'च्या सांख्यिकी मॉडेलनुसार, देशात यंदा दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडासाठी यंदाचा मोसम आशादायी असेल, असा अंदाज आहे. समुद्र आणि वातावरणाच्या सद्यस्थितीवर आधारित प्रायोगिक डायनॅमिक मॉडेलनुसार मान्सूनच्या हंगामात सरासरीच्या १११ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा १०५ टक्के पाऊस पडेल असा अंदाज 'स्कायमेट' या खासगी संस्थेने सोमवारी वर्तवला होता.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि सरकारसाठीही आनंदाची बातमी घेऊन आला आहे. तळ गाठलेले पाणीसाठे, कमी पावसामुळे धान्य उत्पादनात झालेली घट, टंचाई अशा प्रतिकूल स्थितीमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा असलेला अंदाज सर्वांनाच दिलासा देणारा आहे. 'एल निनो'चा ओसरता प्रभाव आणि 'इंडियन ओशन डायपोल'चा सकारात्मक परिणाम अशा दुहेरी अनुकूल स्थितीमुळे गेल्या वर्षीची पावसाची तूट यंदा भरून निघण्याची शक्यता 'आयएमडी'ने वर्तवली आहे.

'आयएमडी'च्या सांख्यिकी मॉडेलनुसार, देशात यंदाच्या मान्सून काळात दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी हवामानाचे पाच घटक गृहीत धरण्यात आले आहेत. 'मान्सून मिशन'अंतर्गत पुण्याच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी'ने विकसित केलेल्या 'कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीम' (सीएफएस) मॉडेलनुसार, देशात यंदा सरासरीच्या १११ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन्ही अंदाजांमध्ये पाच टक्के कमी-अधिक होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

एल निनो सक्रिय असताना भारतात ६५ टक्के वर्षांमध्ये अपुऱ्या पावसाची नोंद झाली आहे; मात्र 'एल निनो'नंतर येणाऱ्या वर्षी मान्सूनचे ७१ टक्के हंगाम सरासरीइतके किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस घेऊन आले आहेत, असे आकडेवारी सांगते. इतिहासातील आकडेवारी आणि अनुकूल हवामानाच्या अंदाजाला गृहीत धरून यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज देण्यात आल्याचे 'आयएमडी'ने म्हटले आहे. 'आयएमडी'तर्फे मान्सूनच्या आगमनाच्या तारखेचा अंदाज मे महिन्याच्या मध्यात, तर हंगामातील पावसाचा सुधारित अंदाज जूनमध्ये देण्यात येणार आहे.


चांगल्या पावसाची शक्यता ९४ टक्के!

यंदा मान्सून काळात सर्वसाधारण (सरासरीच्या ९६-१०४ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता ३० टक्के असून, सरासरीपेक्षा जास्त (सरासरीच्या १०४-११० टक्के) पावसाची शक्यता ३४ टक्के आहे. तसेच अति पावसाची (सरासरीच्या ११० टक्क्यांहून अधिक) शक्यता ३० टक्के असल्याचे अंदाजात म्हटले आहे. या तिन्ही शक्यता गृहीत धरल्यास यंदा सरासरीच्या ९६ टक्क्यांहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता तब्बल ९४ टक्के असून, अपुऱ्या पावसाची शक्यता पाच टक्के, तर दुष्काळी स्थितीची शक्यता फक्त एक टक्का असल्याचे 'आयएमडी'ने म्हटले आहे.

- 'एल निनो'ची स्थिती असणारे वर्ष आणि मान्सूनचे सरासरीच्या तुलनेत प्रमाण

१९७२ (-२३.४ टक्के); १९८२ (-१३ टक्के); १९८७ (-१८.२ टक्के); २००२ (-२२.३ टक्के); २००४ (-१२.६ टक्के); २००९ (-१२ टक्के); २०१५ (-१४ टक्के)


- 'ला निना/न्यूट्रल' स्थिती असणारे वर्ष आणि मान्सूनचे सरासरीच्या तुलनेत प्रमाण

१९७३ - ला निना (+७ टक्के); १९८३ - ला निना (+१२ टक्के); १९८८ - ला निना (+१२.८ टक्के); २००३ - न्यूट्रल (-०.८ टक्के); २००५ - न्यूट्रल (-०.७ टक्के); २०१० - ला निना (-०.७ टक्के)


दीर्घकालीन अंदाजासाठी वापरण्यात आलेले घटक

- उत्तर अटलांटिक आणि उत्तर प्रशांत महासागराच्या समुद्रपृष्ठाच्या तापमानातील डिसेंबर-जानेवारीतील फरक

- विषुववृत्तीय दक्षिण हिंदी महासागराच्या समुद्रपृष्ठाचे फेब्रुवारी-मार्चमधील तापमान

- पूर्व आशियातील समुद्रसपाटीवरील फेब्रुवारी-मार्चमधील दाब

- वायव्य युरोपमधील जानेवारी महिन्यातील जमिनीलगतच्या हवेचे तापमान

- विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील उबदार पाण्याचे फेब्रुवारी-मार्चमधील प्रमाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक प्रभागात ‘ओपीडी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्याचा निर्णय बुधवारी पालिकेच्या मागासवर्गीय कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ओपीडी सुरू करण्यासाठी प्रत्येक प्रभागात जागा, तसेच पायाभूत सुविधा आहेत की नाही, याची सविस्तर माहिती येत्या सोमवारपर्यंत (१८ एप्रिल) प्रशासनाने द्यावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत झाली. आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनील गोगले, सुधीर जानजोत, सुभाष जगताप, अविनाश बागवे, अर्चना कांबळे, रोहिणी चिमटे यांच्यासह अनेक सभासद या वेळी उपस्थित होते. मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली जाते. यंदाच्या वर्षी यासाठी २२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रभागातील नागरिकांना चांगल्या प्रकारचे औषधोपचार मिळावेत, यासाठी या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून ओपीडी सुरू करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. प्रत्येक प्रभागात ओपीडी सुरू करण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या (एनयूएचएम) माध्यमातून निधी दिला जातो. हा निधी घेण्यासाठी महापालिकेला केवळ प्रस्ताव सादर करायचा आहे. केंद्र सरकारकडून निधी मिळत असताना, महापालिकेने यामध्ये मागे पडू नये, यासाठी प्रत्येक प्रभागात ओपीडी सुरू करण्यासाठी आवश्यक जागा, पायाभूत सुविधा आहेत की नाही, याची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. प्रभागात ओपीडी सुरू करण्याबरोबरच शहरातील चार झोनमध्ये अद्यावत हॉस्पिटल तसेच डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्कॉलरशिपचा प्रस्ताव आणणार
दहावी बारावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. ही वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवून मान्य करून घेतला जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी दिले.

विधवांसाठी पेन्शन योजना
वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असलेल्या विधवा महिलांसाठी रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने पेन्शन योजना सुरू केली जाणार आहे. महापालिकेच्या वतीने ही योजना सुरू केली जाणार असून यंदाच्या वर्षीपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली. विधवा महिलांच्या मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण होइपर्यंत महापालिकेच्या वतीने ही पेन्शन दिली जाईल, असे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधीक्षकाला लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वयंपाक खर्चाच्या विशेष अनुदानाची रक्कम मंजूर केली म्हणून २८ हजारांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कार्यालय अधीक्षकासह एका महिलेला बुधवारी रंगेहात पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी ही कारवाई केली.

कार्यालय अधीक्षक विठ्ठल दिगंबर ढेपे (वय ४०) व आणि सावित्री बचत गट महासंघाच्या सभासद शोभा रमेश साखरे (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ५५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

तक्रारदार महिला बचत गटाच्या सभासद असून शालेय पोषण आहाराचे काम करतात. त्यांचे बचत गटाचे स्वयंपाक खर्चाचे विषेश अनुदान (कुकिंग कॉस्ट) ७० हजार रुपये मंजूर झाले होते. हे अनुदान मंजूर करून दिले म्हणून अनुदानाच्या चाळीस टक्के म्हणजे २८ हजार रुपये देण्याची मागणी आरोपींनी तक्रारदार यांना केली होती. त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता ढेपे याने २८ हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसबीने सापळा रचून साखरे व ढेपे यांना २८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १०६४, ०२०-२६१२२१३४, २६१३२८०३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकवीरेच्या दर्शनाला गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
'आई एकवीरा माऊलीचा उदो, उदो', 'एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यांवरी' अशा जयघोषात लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेला लाखो हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले. विविध धार्मिक आणि पारंपारिक रिवाज, तसेच कोळी नृत्य, लोकगीते, कोळी बाजा वाद्यांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात देवीची यात्रा पार पडली.

महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेला मंगळवारी धार्मिक उपक्रमांनी प्रारंभ झाला. मंगळवारी सायंकाळी देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ देवाची पालखी देवघरकरांनी गडावर आणली. यात्रेसाठी गडावर कोकण, तळ कोकणासह महाराष्ट्रातील भाविक आणि कोळी बांधव दाखल झाले होते. बुधवारी पहाटे देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने देवीचा अभिषेक, पूजा, महाआरती करण्यात आली. या वेळी देवस्थानचे विश्वस्त मदन भोई, संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विजय देशमुख, विलास कुटे, पार्वतीबाई पडवळ उपस्थित होते.

बुधवारी सायंकाळी देवीच्या पालखीची पारंपारिक वाद्याच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. शेकडो पालख्या वाजत गाजत गडावर दाखल झाल्या होत्या. गेले दोन दिवस गडावर देवीच्या दर्शनासाठ लाखो भावकांनी मोठी गर्दी करून दर्शन घेतले. सायंकाळी साडेसहा वाजता देवस्थानच्या वतीने अध्यक्ष अनंत तरे, तसेच मानाच्या पालखीचे मानकरी चौलचे आग्रावकर यांचे हस्ते पालखीची पूजा करून पालखी मिरवणुकीत सामिल झाली. देवस्थानच्या वतीने भाविकांना देवीचे दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांची सुरक्षा, तसेच कायदा-सुव्यवस्थेसाठी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक ढाकणे, लोणावळा शहर पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप येडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकवीरा देवीच्या पालखीच्या मुद्द्यावरून ठाणे आणि पेण कोळीवाडा या दोन गटांमध्ये काहीसा वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि समज दिल्यानंतर पालखी उत्साहाने मार्गस्थ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊसतोडणी मजुरांच्या नावाने बोगस कर्ज?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
कराड येथील कृष्णा शेतकरी आणि शेतमजूर सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक, तसेच बँक ऑफ इंडियाच्या कराड शाखाधिकाऱ्यांनी संगनमताने ऊसतोडणी वाहतूक करणारे मजूर आणि शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्जप्रकरणे करून सुमारे २० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप खासदार अमर साबळे आणि काही शेतकऱ्यांनी बुधवारी (१३ एप्रिल) पत्रकार परिषदेत केला. मात्र, आरोप चुकीचे आणि हा राजकीय स्टंट असल्याचा दावा करीत संघाचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी केला आहे.

बँक ऑफ इंडियाच्या कराड शाखेतून प्रत्येकी सात लाख रुपये कर्जवसुलीची पत्रे शेतकऱ्यांना आली आहेत. त्यासंदर्भात अशोक मोहिते, जगन्नाथ मोहिते, शिवाजी मोरे, भाऊसाहेब कोळेकर, वसंत पाटील, महादेव देसाई आदींनी बँकेत चौकशी केली. त्या वेळी या शेतकऱ्यांनी २०१३-१४मध्ये सेवा संघाशी ऊसतोडणीसाठी करार केले होते. त्यासाठी आर. सी. बुक, फोटो, ओळखपत्र, रहिवासी दाखला, पॅन कार्ड आदी कागदपत्रे दिली होती. त्याचाच वापर करून बनावट कर्जप्रकरणे करण्यात आली, असा आरोप करण्यात आला. तसेच कर्ज प्रकरणाची कागदपत्रे आम्ही करून दिली नाहीत. त्यावरील सह्या बनावट आहेत आणि बँकेत आम्ही बचत खातेही काढलेले नाही, असा दावा करण्यात आला.

यानंतर संबंधित व्यक्तींविरोधात तक्रारीसाठी कराड पोलिस चौकी गाठली असता त्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर कोर्टात धाव घेतली असता गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेकडून कर्जवसुलीचा तगादा आणि प्रशासकीय पातळीवर दखल घेतली न घेणे अशा दुहेरी कचाट्यात सापडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात बँकेची बाजू समजू शकली नाही.

'आमचा सहभाग नाही'
शेतकऱ्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. हा राजकीय स्टंट आहे. बँकेने कर्ज दिले असल्यास काही तरी गहाणखत असेल की नाही? शिवाय संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे अन्य कोणी कसे काढून घेऊ शकेल? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. या प्रकरणात बँक आणि संबंधित शेतकरी असा मुद्दा उपस्थित होणार असेल तर आमचा सहभाग येत नाही, असे कृष्णा शेतकरी शेतमजूर सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएला साडेचार लाखांना फसवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'तुमचा मोबाइल क्रमांक लकी कस्टमर म्हणून निवडला आहे. कोणतीही वस्तू घेण्यासाठी तुम्हाला फक्त व्हॅट भरावा लागेल,' असा फोन एका चार्टर्ड अकाउंटटला (सीए) आला. त्या प्रमाणे सीएने एक लाख ३२ हजार रुपयांच्या कॅनॉन कॅमेऱ्याची निवड केली. फोन करणाऱ्या व्यक्तीने वेगवेगळी कारणे सांगून सीएकडून साडेतीन महिन्यात चार लाख ६८ हजार रुपये घेऊनही कॅमेरा व रक्कम परत दिली नाही. कोथरूड परिसरात हा प्रकार घडला असून या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीए पंकज शंकर मोदाणी (वय ३८, रा. वैदेही सोसायटी, पौड रोड, कोथरूड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार दिल्लीतील शॉप इट टुडे कम्युनिटी इंडिया प्रा. लि.च्या अधिकरी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदाणी हे सीए असून त्यांचे आपटे रोडवर कार्यालय आहे. जानेवारी २०१६मध्ये त्यांना दिल्लीवरून एका महिलेचा फोन आला. तुमचा मोबाइल क्रमांक 'लकी कस्टमर' म्हणून निवडला आहे. तुम्ही आमच्या कंपनीकडे ऑनलाइन कोणतीही वस्तू मागवल्यास त्यासाठी फक्त व्हॅट भरावा लागेल, असे सांगितले. त्याप्रमाणे मोदाणी यांनी लागलीच कॅनॉन ७० डी या कॅमेऱ्याची निवड केली. या कॅमेऱ्याची मार्केट किंमत १ लाख ३२ हजार रुपये आहे. मात्र, तो फक्त १९ हजार २२४ रुपयांना मिळेल. ७२ तासांत कुरिअरने घरी पोहच केला जाईल, असे सांगितले. त्याप्रमाणे आरोपींनी दिलेल्या बँकेच्या खात्यात मोदाणी यांनी पैसे भरले. मात्र, त्यांना कॅमेरा मिळाला नाही. त्यानंतर त्यांना कुरियर कंपनीत पाठविलेला कॅमेरा अडकल्याचे सांगून २२ हजार भरण्यास सांगितले. ते पैसे भरले तरीही कॅमेरा मिळाला नाही. त्यानंतर मोदाणी याबाबत कंपनीला विचारणा केली. त्यावेळी त्यांना २६ जानेवारीमुळे दिल्लीत बंदोबस्त आहे. त्यामुळे तुमचे प्रोडक्ट पाठवला जाणार नसल्याचे सांगितले. तसेच तुम्ही आतापर्यंत भरलेले पैसे, तुम्हाला त्रास झाल्याबद्दल पाच हजार आणि ५३ हजार रुपयांची पी. एन. गाडगीळ येथील २० ग्रॅमचे दोन सोन्याची नाणी, असा एकूण दोन दोन लाख २३ हजार ३६८ रुपये परत केली जातील. त्यामुळे मोदाणी यांनी ही 'ऑफर' स्वीकारली. मात्र, त्यांना विविध प्रभोलणे आणि कारणे देऊन त्यांची ४ लाख ६८ हजार ४१४ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीपीपी’मधून पेशंटची लूट

$
0
0

Mustafa.Attar
@timesgroup.com

पुणे : सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफीसारख्या रोगनिदानाच्या चाचण्या स्वस्तात देण्यासाठी आरोग्य खात्याने सरकारी खासगी भागीदारीतून (पीपीपी) सुविधा उभारली. मात्र, औंधच्या जिल्हा हॉस्पिटलमधील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गरीब, दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) पेशंटना 'कोटा संपला आहे', 'दोन महिन्यानंतर या' असे सांगत नाकारले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी, गरीब पेशंटना जादा पैसे खर्च करून चाचण्या करून घेण्याची वेळ येत असून पेशंटकडून पैसे लुटण्याचा प्रकार सुरू आहे.

महागड्या वैद्यकीय सेवा परवडत नाहीत. गरिबांना सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफीसारख्या रोगनिदान चाचण्या करण्यासाठी सरकारी खासगी भागीदारीचे (पीपीपी) मॉडेल आरोग्य खात्याने राबविण्याचा निर्णय घेतला. औंध जिल्हा हॉस्पिटलमधील डायग्नोस्टिक सेंटरसाठी काही जागा उपलब्ध करून देण्यात आली. दोन वर्षापासून हे 'पीपीपी'चे डायग्नोस्टिक सेंटर कार्यरत आहे. राजीव गांधी जीवनदायी योजना, बीपीएल, हॉस्पिटलमधील गरीब पेशंटना तसेच खुल्या गटातील पेशंटना त्या त्या प्रकारानुसार सवलतीच्या दरात अथवा मोफत सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, एक्स रेच्या चाचण्या केल्या जातील, असे करारात ठरले आहे.

'पीपीपी'च्या कराराचा भंग करीत थेट हॉस्पिटलमधून चाचणीसाठी जाणाऱ्या गरीब, दारिद्र्य रेषेखालील पेशंटना मात्र 'कोटा संपला आहे', 'दोन महिने वेटिंगवर आहे', असे उत्तर दिले जात आहे, अशा तक्रारी जिल्हा हॉस्पिटलमधील पेशंटनी केल्या आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना तक्रारींची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपनीच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कोणत्याही पेशंटना सवलत अथवा मोफत चाचण्या आहेत याचा फलक लावण्यात आला नाही. हॉस्पिटलच्या 'पीपीपी' सेंटरमध्ये जादा पैसे भरून चाचण्या करून घेण्याची वेळ पेशंटवर आली आहे. राष्ट्रीय स्वास्थ बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत लहान मुलांचे सिटी स्कॅन करण्यास देखील सेंटरच्या डॉक्टरांकडून नकार दिला जातो. हॉस्पिटलमधील डॉक्टरांना देखील हा अनुभव आला आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

जिल्हा हॉस्पिटलमधील 'पीपीपी'मधील खासगी डायग्नोस्टिक सेंटरमधून पेशंट नाकारले जात असल्याच्या आमच्याकडे तक्रारी आल्या नाहीत. सेंटरमध्ये गरीब पेशंटसाठी २० टक्के कोटा आहे. पेशंटना नाकारण्याचा प्रश्न येतच नाही. तसे होत असेल तर चौकशी केली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील वाहतूक सुरळीत कधी होणार ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे पीएमपी बसेससाठी बीआरटी लेन, त्याच्या दोन्ही बाजूस खासगी वाहनांसाठी लेन, सायकल ट्रॅक आणि फूटपाथ... हे वर्णन आहे एकेकाळच्या सातारा रस्त्याचे. पुण्यात बीआरटी योजना सर्वप्रथम येथे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. तेव्हा या पद्धतीने रस्त्याची पुनर्रचना केली होती. मात्र, गेल्या काही वर्षात या रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या व पादचारी भुयारी मार्गांच्या कामामुळे रस्त्याचा चेहरा-मोहराच बदलला आहे. आता स्वारगेट व लक्ष्मीनारायण चौकातील उड्डाणपुलाचे काम वगळता अन्य सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या रस्त्याला गतवैभव केव्हा प्राप्त होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सातारा रस्त्यावर सर्वप्रथम साईबाबा मंदिराच्या येथे पादचारी भुयारी मार्गाचे काम करण्यात आले. त्यानंतर सिटीप्राइड थिएटरजवळील चौकात भुयारी मार्ग करण्यात आला. या कामांना अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागला. ही काम पूर्ण होत नाहीत, तोपर्यंतच शंकर महाराज मठ ते बालाजीनगर या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याआधीच स्वारगेट येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. ते आजतायगायत सुरू आहे. या सर्व कामांमुळे सातारा रस्त्याची रचनाच बदलली आहे. काही ठिकाणी सायकल ट्रॅक असूनही नसल्यासारखे आहेत. तर, काही ठिकाणी बीआरटी मार्ग 'पंक्चर' झाला आहे. या रस्त्यावर आता बीआरटी योजना आहे की नाही, असा प्रश्न पडतो. त्यामुळे अनेक वाहने बीआरटी लेनमधून जाताना दिसतात. त्यातून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी बीआरटी मार्गासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड निघाले असून रस्त्यात आले आहेत. तर, काही ठिकाणी दुभाजक अर्धे तुटलेलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळे चारचाकी वाहने दुभाजकरवर जाऊन अपघात होतात. आदिनाथ सोसायटीच्या येथील चौपाटीवर येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने येथे वाहतुकीला अडथळा होतो. ही वाहने रस्त्यावर लावली जाणार नाहीत, याची काळजी फार क्वचित घेतली जाते. तसेच, वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होते. दुगड चौकात (सिटीप्राइडच्या पुढील) पादचारी भुयारी मार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे येथे मुख्य चौकातच रस्त्याला काही प्रमाणात उंचवटा प्राप्त झाला आहे. येथे बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. बालाजीनगरकडून स्वारगेटच्या दिशेने येताना, पद्मावतीच्या येथे (स्वामी विवेकानंद पुतळा) रस्ता खूपच अरुंद आहे. येथील पुलाची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे येथे रस्ता दुभाजक हलविण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही स्वारगेटकडे जातानाची लेन तुलनेने अरुंद आहे. त्यातच पुढे डी-मार्टच्या येथे सिग्नल आहे. सिग्नल लागल्यानंतर व अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे बहुतांश वाहने सायकल ट्रॅक व फूटपाथवरून जातात. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची रुंदी वाढविण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बाबासाहेबांवर सरकारची पुस्तिका

$
0
0

पुणे : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश आता 'महाराष्ट्राच्या शिल्पकारां'मध्ये होणार आहे. राज्य सरकारतर्फे काढण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्राचे शिल्पकार' पुस्तिकांच्या मालिकेत बाबासाहेबांवर चरित्रात्मक पुस्तिका काढण्यात येणार आहे. अगदी माफक शुल्कात हाताळायला सोपे अशा या पुस्तिकेतून बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे जीवनकार्य समजून घेता येईल. वीस वर्षांनंतर बाबासाहेबांचा यामध्ये समावेश झाला आहे. राज्य शासनाच्या राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळातर्फे 'महाराष्ट्र शिल्पकार योजना' राबविण्यात येते. रानकवी ना. धों. महानोर यांनी आपल्या आमदारपदाच्या कारकीर्दीत सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना सरकारशी भांडून ही योजना सुरू केली होती. महाराष्ट्राला घडवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा उत्तुंग व्यक्तिमत्वांची चरित्रे छोटेखानी स्वरूपात व दहा रुपयांत प्रसिद्ध करून ती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे मंडळाचे अध्यक्ष असताना १९९४-९५ या काळात ही योजना सुरू झाली. महानोर यांनी यासाठी सरकारकडे महनीय व्यक्तींची यादी दिली होती. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बालगंधर्व, दादासाहेब फाळके अशा उत्तुंग व्यक्तिमत्वांचा समावेश होता. मात्र ही यादी डावलून दुसऱ्याच व्यक्तींवर मंडळाने चरित्रात्मक पुस्तके प्रसिद्ध केली. अखेर मंडळाला वीस वर्षानंतर जाग आली असून बाबासाहेबांवर लवकरच चरित्रात्मक पुस्तक काढण्यात येणार आहे. 'घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'महाराष्ट्राचे शिल्पकार' हे चरित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीमध्ये झाला आहे. लवकरच यावर शासनातर्फे शिक्कामोर्तब होईल व पुस्तक प्रसिद्ध केले जाईल', अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी 'मटा'ला दिली. 'नॅशनल बुक ट्रस्ट व साहित्य अकादमी यांच्यातर्फे चरित्रात्मक पुस्तकांची निर्मिती होते. महाराष्ट्राचे जे शिल्पकार आहेत, त्यांच्यावर अशाच छोट्या पुस्तिका काढण्यात याव्यात. सर्व घटकांना माफक दरात चरित्रात्मक पुस्तकातून उत्तुंग व्यक्तिमत्वांचे विचार दर्शन घडावे, या विचाराने मी यासाठी पाठपुरावा केला होता', अशी प्रतिक्रिया महानोर यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

शिवाजी महाराजांचा समावेश नाही 'महाराष्ट्राचा शिल्पकार' या पुस्तिकेच्या योजनेमध्ये जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा समावेश नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंडळातर्फे आतापर्यंत ३९ पुस्तिका काढण्यात आल्या असून त्यामध्ये सर्वांत आधी ज्यांच्यावर पुस्तिका काढायला हव्या, त्यांच्यावर पुस्तिका काढल्याच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ना. धों. महानोर यांनी दिलेल्या यादीतील बाबासाहेबांवर आता पुस्तक निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे साने गुरुजी तरुण मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त यंदा राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील सव्वा लाख विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी मंडळ लोकसहभागातून साहित्य गोळा करणार असून, त्यासाठी दानशूर नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन मंडळाने बुधवारी पत्रकार परिषदेत केले. मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी उपक्रमाची माहिती दिली. घाटे म्हणाले, 'मंडळाने या पूर्वी दुष्काळग्रस्त भागात धान्य वाटपाचा उपक्रम राबविला होता. त्याला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यंदा मंडळ दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना साहित्याच्या माध्यमातून मदत करणार आहे. त्यासाठी शहरातील विविध सोसायट्या आणि इतर ठिकाणी नागरिकांना आवाहन करून, हे साहित्य गोळा केले जाणार आहे.' आजपासून (गुरुवार) पुढील महिनाभर विविध ठिकाणी मोहीम राबविली जाणार आहे. उपक्रमाविषयी अधिक माहिती आणि सहभागासाठी इच्छुकांनी ९८२२८७१५३०, ९९२३१०००८५, ८१८००९९०९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उर्वरित आयुष्यामध्ये विधायक लेखन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'माझे उर्वरित आयुष्य विधायक लेखन करण्यासाठी व्यतीत करणार आहे. पुण्याने माझ्या अंगी असलेल्या विविध पैलूंना घडवले', असे मनोगत डॉ. कृ. पं. देशपांडे यांनी व्यक्त केले. 'फुले शाहू आंबेडकर एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन'तर्फे डॉ. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवपूर्ती समारंभ नुकताच पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनीअरिंग कॉलेज सभागृहात झाला. या वेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, महापौर प्रशांत जगताप, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष रामचंद्र शेटे, डॉ. विक्रम घोले, निवृत्त न्यायाधीश मान्धाता झोडगे, निर्मला गद्रे, शुभदा देशपांडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. देशपांडे यांची ग्रंथतुला करण्यात आली; तसेच रघुनाथ ढोक लिखित 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले' या पुस्तकाचे जर्मन अनुवादित जीवनचरित्र, डॉ. देशपांडे लिखित 'गावाकडच्या आठवणी', 'दीनांची साउली' पुस्तके; तसेच गौरव अंकाचे प्रकाशन झाले. 'शिक्षक हा अध्यापन क्षेत्राव्यतिरिक्त विविध कौशल्य असणारा असावा. सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी शिक्षकांनी व्यासंगी असले पाहिजे', असे डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना दुर्वे यांनी केले, तर राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुर्मीळ रानभाज्या खाद्यप्रेमींच्या भेटीला

$
0
0

पश्चिम घाटातील १४२ भाज्यांचे पुस्तकरूपी संकलन
म. टा. प्रतिनिधी, पुणे
दैनंदिन आहारात निवडक भाज्यांचे सेवन करण्यात समाधान मानणाऱ्या पुणेकरांना अंकोळ, आटकी, कांडोळ, कुकर, धावडा, नेपती, कोष्ट, फणसाडा या आणि अन्य जंगली भाज्यांची ओळख करून देण्यासाठी वनस्पती अभ्यासक डॉ. मंदार दातार आणि अनुराधा उपाध्ये यांनी पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात राज्यातील पश्चिम घाटात आढळणाऱ्या आणि स्थानिक लोकांच्या दैनंदिन आहाराचा भाग बनलेल्या १४२ जंगली भाज्यांची माहिती देण्यात आली आहे.
बदलत्या जीवनपद्धतीमुळे रोजच्या जेवणातील खाद्यपदार्थांमध्ये बदल होत असल्याने अनेक ग्रामीण पदार्थ हद्दपार होत आहेत. या धर्तीवर पश्चिम घाटातील ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या जेवणातील जंगली खाद्य वनस्पतींचा अभ्यास डॉ. दातार आणि उपाध्ये यांनी केला. वन विभागाच्या आर्थिक सहकार्यातून या दोघांनी गेल्या दोन वर्षांत पश्चिम घाट पिंजून 'वाइल्ड एडिबल प्लान्टस ऑफ नॉर्दन वेस्टर्न घाट' हा अहवाल तयार केला. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून भाज्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटने या अहवालावर आधारित पुस्तक तयार केले. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी डॉ. डी. आर. बापट, डॉ. के. एम. पाकणीकर, डॉ. दातार आणि डॉ. उपाध्ये उपस्थित होते.
'पश्चिम घाटातील स्थानिक लोक आजही जंगली भाज्या खातात. जंगली भाज्यांच्या सेवनाचा ऋतुनुसार कालावधी निश्चित असतो. काही आजार बरे करण्यासाठी काही भाज्या उपयोगात आणल्या जातात. या भाज्या सेवन करण्याची प्रक्रिया आणि त्यांचे महत्त्वदेखील त्यांना माहित आहे. भविष्यात ही माहिती लुप्त होऊ नये, या साठी भाज्यांच्या शास्त्रीय माहितीचे डॉक्युमेंटेशन केले आहे. पुस्तकामध्ये सहजसोपी माहिती दिल्याने शहरी लोकांनाही या भाज्या शोधता येणार आहेत,' असे डॉ. दातार आणि उपाध्ये यांनी सांगितले.
..
भाज्या चवीला कडवट
पुस्तकामध्ये पश्चिम घाटात समावेश असलेल्या कोकणासह बारा जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणातील १४२ भाज्यांची माहिती देण्यात आली असून, बहुतांश भाज्या विविध ऋतुनुसार पिकवल्या जातात. सर्व भाज्या चवीला कडवट असल्या तरी, स्थानिकांच्या शिजविण्याच्या विशिष्ट प्रक्रियेमुळे त्या चविष्ट लागतात, असेही लेखकांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सुरक्षिततेला प्राधान्य

$
0
0

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची ग्वाही
म. टा. प्र​तिनिधी, पुणे
'शहरातील संघटित गुन्हेगारी चिरडणे, जमीन बळकावण्याचे गुन्हे रोखणे, स्ट्रिट-क्राइम रोखण्यासह महिलांची सुरक्षितता याला माझे प्राधान्य राहील,' अशी ग्वाही नवनियुक्त पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.
'नागरिकांनी निसंकोचपणे आपली तक्रार नोंदवावी. ती वेळेत नोंदवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. तक्रार नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असेल, तर माझ्यासह कुठल्याही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधावा,' असे आवाहन शुक्ला यांनी केले. पुणे शहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी असताना पुण्यातील अनेक समस्यांची मला माहिती झाली आहे. पुण्यात संघटित गुन्हेगारी; तसेच जमीन बळकावण्याची समस्या आहे. या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई सुरू केली आहे, असेही त्या म्हणाल्या.
..
'व्हिजिबल पोलिसिंग'वर भर
शहरात 'व्हिजिबल पोलिसिंग' वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व पोलिस उपायुक्तांशी चर्चा केली आहे. 'पिपल फ्रेंडली पोलिस' असे वातावरण तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. याबाबत नागरिकांच्या काही सूचना असतील, तर त्यांनी अवश्य माझ्यापर्यंत पाठवाव्यात, असे शुक्ला म्हणाल्या.
..
खुनाचे क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणार
खुनांचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे पोलिसांकडे उत्तम अशी गुन्हे शाखेची टीम आहे. चांगले अधिकारी शाखेत असून क्लिष्ट असे खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष पथकांपेक्षाही पोलिस दलांचे काम चांगले आहे.
..
वाहतुकीचे विषय सोडवण्यासाठी प्रयत्न
शाहीर अमर शेख ते मालधक्का चौक, सिमला ऑफिस चौक ते इंजिनीअरिंग कॉलेज चौक आणि विद्यापीठ चौक अशा तीन ठिकाणांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त म्हणाल्या. या रस्त्यांवर पंधरा दिवसांसाठी प्रयोग करण्यात येणार असून, वाहतूक नियमनासाठी लागतील तितके मनुष्यबळ वापरणे, बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे.
..
पोलिस, नागरिकांच्या समस्यांसाठी दरबार
शहरातील सर्व पोलिस लाइनच्या परिस्थितीची पाहणी करणार असून, लाइनमध्ये राहणारे कर्मचारी, त्यांच्या कुटुबीयांशी संवाद साधणार आहेत. महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी १० ते ११.३० या वेळात तक्रार निवारण दिन असेल. यामध्ये नागरिकांनी दिलेल्या तक्रारी, त्यावर केलेली कार्यवाही, चौकशी, सद्यस्थिती यावर चर्चा करण्यात येईल. सर्वसामान्य नागरिक कुठलाही पोलिस कर्मचारी, अधिकारी मला पूर्वपरवानगीशिवाय दुपारी साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान भेटू शकेल. पोलिसांच्या वेलफेअरसाठी शक्य तितके प्रयत्न करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
..
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करा
पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करताना अडचणी येत असतील, पोलिसांकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत नसेल, तर थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. माझ्यासह सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर पोलिस ठाण्यांत दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहेत. मलाही ७७१९८८१००७ यावर संपर्क साधा, असे आवाहन शुक्ला यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजनिहाय पदवीप्रदान सोहळे वादात

$
0
0

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कार्यक्रमांच्या वैधतेवर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात यंदापासून सुरू झालेल्या कॉलेज पातळीवरील पदवीप्रदान सोहळ्यांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सोहळ्यांचे स्वरूप, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी होणारा खर्च आणि कॉलेज पातळीवरील अशा कार्यक्रमांची कायदेशीर योग्यायोग्यता अशा सर्वच मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विद्यापीठाने यंदापासून कॉलेज पातळीवरही पदवीप्रदान सोहळ्यांचे आयोजन करण्याची परवानगी कॉलेजांना दिली आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या नगर आणि नाशिक उपकेंद्रांसह विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कॉलेजांमधून हे सोहळे सुरू झाले आहेत. शहरातील काही कॉलेजांमधून त्यासाठी झालेल्या कार्यक्रमांमधून मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याची तक्रार होत आहे.
विद्यापीठाकडून अशा कार्यक्रमाच्या आयोजनासाठी काही निर्देश देण्यात आले असले, तरी खर्चाच्या बाबतीत मोजका निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने, हा प्रकार घडत असल्याचेही दिसून येत आहे. पदवी वाटपाचे स्वरूप ठरविण्याची जबाबदारी कॉलेजांची असली, तरी विद्यापीठाने त्यासाठी निर्देश दिल्याने या समारंभापोटी अकारण खर्च वाढत असल्याचेही या निमित्तानेच समोर आले. त्या पार्श्वभूमीवर कॉलेजांच्या पातळीवर अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचा मुद्दा कायदेशीररीत्या अडचणीचा असल्याचे बुधवारी समोर आले.
'पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्याचा अधिकार हा केवळ विद्यापीठालाच असतो. विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांना पदवीप्रदान करण्याचा कोणताही अधिकार नसतो. कॉलेज पातळीवर केवळ पदवीचे वाटप होऊ शकते. पदवीप्रदान सोहळ्याची चौकट पाळण्याची सर्वाधिक जबाबदारी ही संबंधित कुलगुरूंवर असते. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) किंवा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अशा प्रकारे कॉलेज पातळीवर पदवीप्रदान सोहळ्यांच्या आयोजनाविषयी आदेश दिल्याचे ऐकिवात नाही. राज्य सरकारनेही तसे आदेश दिलेले नाहीत,' असे यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी 'मटा'ला सांगितले. हा निर्णय केवळ पुणे विद्यापीठापुरताच मर्यादित असल्याने, त्याचा फेरविचार होऊ शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या विषयी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
.......
मुक्त विद्यापीठाचा अनुभव
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासाठी (इग्नू) डॉ. राम ताकवले यांनी १९९७ पासून वेगवेगळ्या केंद्रांमधून पदवीप्रदान सोहळ्याचा उपक्रम राबविला होता. मात्र, हा उपक्रम आयोजित करताना विद्यापीठाच्या मुख्य कार्यक्रमानंतर लगेचच इतर सर्व केंद्रांवर एकाच वेळी स्थानिक पदवीप्रदान सोहळ्यांचे आयोजन करण्याचा निकष पाळल्याचे डॉ. ताकवले यांनी सांगितले. 'विद्यार्थ्यांशी थेट संपर्कासाठी स्थानिक पातळीवरील पदवीप्रदान रास्त ठरते. पदवीप्रदान सोहळा, त्याचे स्वरूप आणि एकूणच पदवीचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी संबंधित संस्थेचीच आहे,' अशी भूमिका डॉ. ताकवले यांनी या मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील तापमान पोहोचले चाळिशीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि परिसरात उन्हाच्या तप्त झळा बुधवारीही कायम होत्या. पुढील दोन दिवसांत पारा ४० अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरात ३९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, तर लोहगावमध्ये पारा ४०.६ अंशांवर पोहोचला.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. आकाश निरभ्र असल्याने दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. सकाळी दहा-साडेदहापासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून, घामाच्या धारांनी पुणेकर हैराण झाले आहेत. बुधवारी पारा चाळिशीच्या जवळ पोहोचला. पुढील एक-दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत.
दरम्यान, शहरासह राज्याच्या सर्वच भागांत उन्हाची काहिली वाढली आहे. विदर्भात सर्वच ठिकाणी पारा चाळिशीच्या पुढे आहे, तर मराठवाड्यातही कमाल तापमानात वाढ झाली असून, कोकणाच्या काही भागांतही उन्हाच्या तप्त झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद भिरा येथे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकर जयंतीमुळे वाहतुकीत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उद्यानात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच, शहराच्या अन्य भागातही वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बदलांची दखल घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि कॅम्प परिसरातील हॉटेल अरोरा टॉवर्स येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येतात. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवरून वाहतूक सुरू ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे या परिसरातील बहुतांश महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
दरम्यान, विश्रांतवाडी चौकातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर सायंकाळी चार वाजतापासून गर्दी कमी होईपर्यंत वाहतुकीत बदल असणार आहे.
---
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक बदल
चर्च रोडवरील समाज कल्याण आयुक्तालयासमोरून मुद्रणालय रोडने फोटो झिंको प्रेसकडे प्रवेश बंद.
बोल्हाई चौकातून (बंडगार्डन पोलिस स्टेशन समोरील चौक) पुणे रेल्वे स्टेशनकडे जाण्यास मनाई.
बोल्हाई चौकातून साधू वासवानी चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद.
जीपीओकडून बोल्हाई चौकाकडे जाण्यासाठी मनाई.
----------
पुणे स्टेशनवरून येरवडा, नगर रोडकरीता जाण्यासाठी पर्यायी मार्ग
शाहीर अमर शेख (जुना बाजार) चौकातून आरटीओकडे जाऊन उजवीकडे वळून राजा बहादूर मिल रस्त्याने जावे.
पाटील इस्टेट येथून संगमवाडी रोडने सादलबाबा चौकापर्यंत जावे. तेथून विश्रांतवाडी, येरवडा-नगर रोडला जाणे शक्य.
----------
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पार्किंगबाबत
आरटीओ शेजारील एसएसपीएमएस मैदानात वाहने लावावीत.
शाहीर अमर शेख चौक (जुना बाजार) ते कुंभारवेस ते गाडगीळ पुतळा या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा न होण्याची काळजी घ्यावी.
मालधक्का चौक ते बोल्हाई चौक ते पुणे स्टेशन, बोल्हाई चौक ते साधु वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जीपीओ चौक, बोल्हाई चौक ते नरपतगीर चौक या रस्त्यांवर सर्व ठिकाणी वाहने लावण्यास मनाई आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images