Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

..तीच माझी संगीताची शाळा

0
0

पंडित जसराज यांनी उलगडले साधनेचे मर्म

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'संगीतात काहीतरी आश्वासक करण्याची संधी असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आमचे सगळे आयुष्यच बदलून गेले. खडतर प्रवास सुरू झाला. हैदराबादमध्ये असताना एका कँटिनच्या जवळच्या फुटपाथवर बसल्याबसल्या मला कधीतरी बेगम अख्तर यांचे गाणे रेडिओवर ऐकायला मिळायचे. दिवाना बनाना है तो दिवाना बना दे, वरना कही तकदीर तमाशा ना बना दे' ही अख्तरीबाईंची गझलची रेकॉर्ड तेथे लागलेली असायची. अख्तरीबाईंच्या त्या आर्त सुरांनी मी संगीताकडे ओढला गेलो. तीच माझी संगीताची शाळा होती...' संगीतमार्तंड रसराज अर्थात पं. जसराज आपल्या साधनेचे मर्म उलगडत होते.

विख्यात शास्त्रीय गायक पं. जसराज यांना आदित्य प्रतिष्ठानतर्फे शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते 'लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कारा'ने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. अभ्यंकर यांनी अनुवादित केलेल्या 'गीतासागर'च्या ११ व्या आवृत्तीचे आणि 'मुलांसाठी पाठ' या पुस्तिकेचे प्रकाशन पं. जसराज यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या मुलाखतीत जसराज यांनी हृद्य आठवणी उलगडत रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या.

'संगीत हे एखाद्या महालाप्रमाणे असते. त्यात, प्रत्येकाला त्याच्या वकुबाप्रमाणे नवे काही सापडत जाते. प्रत्येक घराण्याची खासियत वेगळी असते. त्यामुळे, प्रत्येकातूनच संगीताला काहीतरी मिळत असते. मी तर माझ्या गुरूंकडून सतत सात वर्षं फक्त राग भैरवची तालीम घेत होतो,'पं. जसराज सांगत होते.

'मी तबलाही शिकलो आहे. मला मोठं होऊन तबलावादकच व्हायचे होते. मात्र, एका घटनेने मला तबल्यापासून दूर नेले. मेवाती घराणे किराणा घराण्याइतकेच समृद्ध आहे. पण, चांगला कलाकार हा चोर असावा लागतो. प्रत्येक घराण्यातील चांगले ते उचलून ते आपल्या घराण्यामध्ये चपखल बसविणे ही कलाच आहे,' असेही त्यांनी सांगितले. उत्तरार्धात पं. जसराज यांचे शिष्य गायक पं. संजीव अभ्यंकर यांचे गायन रंगले. अपर्णा अभ्यंकर यांनी स्वागत केले. जितेंद्र अभ्यंकर यांनी मानपत्राचे वाचन केले. आदित्य अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.

पंडितजींच्या आठवणींना उजाळा

पंडितजींच्या (पं.भीमसेन जोशी) सहवासाने मला खूप काही दिले. ते म्हणायचे की,'मी जेव्हा स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला तूच दिसतोस.' माझ्यासाठी या शब्दांहून मोठं आजवर दुसरं काही नाही, अशी आठवण जागवत पं. जसराज यांनी मनाच्या कुपीतील ठेवा उलगडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवेशशुल्कात तिप्पट वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 'अतिथी देवो भव' अशी साद घातली असली तरी, केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे ऐतिहासिक वास्तूंचे प्रवेश शुल्क दुप्पट करून पर्यटकांच्या खिशाला कात्री लावली आहे. ऐतिहासिक वास्तूंचे प्रवेश शुल्क पाच रुपयांवरून पंधरा रुपये, तर जागतिक वारसास्थळ असलेल्या वास्तूंचे तिकीट दहा रुपयांवरून तीस रुपये करण्यात आले आहे.

देशभरातील सर्वच ऐतिहासिक वास्तूच्या प्रवेश शुल्कामध्ये १ एप्रिलपासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाने पंधरा वर्षानंतर देशभरात ही नवीन दरवाढ जाहीर केली आहे. सध्या भारतीय पर्यटकांकडून जागतिक वारसा स्थळांना दहा रुपये, तर इतर वास्तूंसाठी पाच रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आता हे प्रवेश शुल्क अनुक्रमे तीस रुपये आणि पंधरा रुपयांपर्यंत वाढविले आहे. परदेशी पर्यटकांच्या प्रवेश शुल्कातही दुपटीने वाढ झाली आहे. यापुढे परदेशी पर्यटकांना अडीचशे ऐवजी पाचशे तर इतर वास्तूंसाठी शंभर ऐवजी दोनशे रुपये शुल्क भरावे लागते आहे. पुण्यामध्ये पुरातत्त्व विभागाच्या शनिवारवाडा, आगाखान पॅलेस या शहरात तर जिल्ह्यात लोणावळ्यामध्ये कार्ला आणि भाजे या लेण्या आहेत. पुण्यामध्ये जागतिक वारसा स्थळ नसल्याने दुसरे स्थळ शहरात लागू होणार नाहीत. पर्यटकांकडून नवीन दरांना विरोध झालेला नाही. मात्र, प्राथमिक सुविधा सुधाराव्यात, अशा अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय सुविधांची वानवाच

0
0

यू- डाएसच्या अधिकृत आकडेवारीमधून वास्तव उघड

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणाऱ्या शाळांची संख्या २८४... मुलींसाठी स्वच्छतागृहे नसणाऱ्या शाळांची संख्या १,२३२... मुलांसाठी स्वच्छतागृहे नसणाऱ्या शाळांची संख्या २,१२४...वीजपुरवठा नसणाऱ्या शाळांची संख्या ६,५२४... सर्वच्या सर्व शाळा शंभर टक्के डिजिटल करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांचे हे वास्तव आहे. एकीकडे पायाभूत सुविधांची वानवा असताना आभासी विश्वात गुणवत्तेचे धडे शोधण्यासाठी याच वास्तवातून प्रयत्न होणार आहेत का, असा सवाल ही आकडेवारी उपस्थित करत आहे.

राष्ट्रीय पातळीवरील युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन (यू-डाएस) या शैक्षणिक उपक्रमामध्ये राज्याच्या शिक्षण खात्याने सादर केलेल्या आकडेवारीमधून हा विरोधाभास समोर आला आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशनने (न्यूपा) तयार केलेल्या यंदाच्या आकडेवारीमधून राज्यातील शैक्षणिक वास्तवाविषयीचे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.

या आकडेवारीनुसार, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये राज्यातील एकूण शाळांचा आकडा एक लाख ७ हजार ६११ इतका आहे. त्यामध्ये शाळेसाठी स्वतंत्र इमारती नसणाऱ्या शाळांची संख्या ३१६ इतकी आहे. शाळेसाठी स्वतंत्र वर्गखोल्या नसणाऱ्या शाळांची संख्या ३८७ इतकी आहे. तर वर्गखोल्यांसाठी जागा नसणाऱ्या शाळांची संख्या राज्यभरात एकूण ४४ हजार ९७५ इतकी आहे. पायाभूत सुविधांच्या या असुविधेमध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांचेही हाल होत असल्याचे राज्याची आकडेवारी सध्या सांगते आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार राज्यातील ५३ हजार ३४८ शाळांमधून विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. तर राज्यातील ६ हजार ५२४ शाळांमध्ये अद्यापही वीजपुरवठा नाही. राज्याची शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रसारखी योजना आखणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षण खात्यासाठी विविध सुविधा नसणाऱ्या शाळांचा हा आकडा सुधारणांची गरज असल्याची जाणीव करून देणारच ठरत आहे.

000

क्रीडांगण नसणाऱ्या शाळा - १३ हजार १२५

कम्प्युटर नसणाऱ्या शाळा - ४३ हजार ४३०

ग्रंथालय नसणाऱ्या शाळा - ४ हजार २६८

000

पुणे जिल्ह्यामध्येही राज्याचाच कित्ता...

शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्येही सुविधा नसणाऱ्या शाळांचा आकडा मोठा असल्याचे ही आकडेवारी सांगत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण ७ हजार १६५ शाळा आहेत. त्यापैकी तीन हजार ३०२ शाळांना वर्गखोल्यांसाठी जागा नाही. एक हजार ७९३ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली नाही. जिल्ह्यातील १३५ शाळांमध्ये मुलांसाठी, तर ८९ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत. विशेष मुलांसाठी स्वच्छतागृहे नसणाऱ्या ३ हजार ४७८ शाळा जिल्ह्यामध्ये असल्याचेही ही आकडेवारी स्पष्ट करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या उत्पन्नाला मोबाइल टॉवरचा टेकू

0
0

प्रशासनाने दिली ३९४ जागांवर परवानगी; नगरसेवक अनभिज्ञच

Chaitanya.Machale@timesgroup.com

पुणे : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोबाइल टॉवरच्या माध्यमातून प्रशासनाने स्मशानभूमी, बागा, शाळांची मैदाने, जलतरण तलाव, जॉगिंग ट्रॅक, हॉस्पिटलांच्या जवळ मोबाइल टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील ३९४ जागांवर नव्याने टॉवर उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केल्याने पालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यातच सर्वच क्षेत्रात निर्माण झालेल्या मंदीमुळे पालिकेच्या उत्पन्नाला गळती लागली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने उत्पन्नवाढीसाठी विविध शक्कल लढविण्याचे ठरवले आहे. मालमत्ता कर, थकित पाणीपट्टीसाठी अभय योजना राबवून उत्पन्नात वाढ करण्यात आली. याच विभागांचा आदर्श घेऊन पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने मोबाइल टॉवरद्वारे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील सुमारे ३९४ जागांवर मोबाइल टॉवर उभारण्यासाठी परवानगीचा निर्णय या विभागाने घेतला आहे. प्रत्यक्षात मात्र, टॉवर नक्की कोठे उभारले जाणार आहेत, या विषयी विभागाने नगरसेवकांना अ​नभिज्ञ ठेवले आहे. परस्पर या जागा निश्चित केल्या आहेत. शहरात उभारण्यात येणाऱ्या मोबाइल टॉवरची सविस्तर माहिती देण्याची मागणी सभासदांनी प्रशासनाकडे वारंवार केली. मात्र, अद्याप कोणतीही माहिती प्रशासनाने दिलेली नाही.

मोबाइल टॉवरमुळे ‌निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यामुळे शाळा, हॉस्पिटल, मैदाने, बागा तसेच सतत नागरिकांची वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मोबाइल टॉवर उभारण्यात येऊ नये, असा नियम आहे. मात्र, पालिका प्रशासनाने नियमाला केराची टोपली दाखवली आहे. मुख्य सभेत हा प्रस्ताव मान्य करून घेतना मोबाइल टॉवर्सच्या ठिकाणांची यादी न जोडल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला गेला. मोबाइल कंपन्यांच्या फायद्याबरोबरच स्वत:चे आर्थिक हित जोपासण्यासाठी पालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रस्ताव मान्य करून घेतल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.

..

येथे उभारणार टॉवर

एम्स हॉस्पिटलजवळ (औंध), डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, संत नामदेव स्कूल, मेंगडे जलतरण तलाव, कर्वे नगर बॅडमिंटन हॉल, वैकुंठ स्मशानभूमी, ठोसरपागा, हडपसर, येरवडा, लिंगायत स्मशानभूमी, पालिकेची विविध उद्याने, पेशवे पार्क, भिकारदास मारुती पीएमपी बसस्टॉप,

मंगला थिएटर, चित्तरंजन वाटिका, डेक्कन जिमखाना क्रिकेट ग्राउंड, राजीव गांधी हॉस्पिटल, शीलाराज साळवे भाजी मंडई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस रेशनकार्डे उघड

0
0

मोहिमेनंतर धान्यात बचत होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्याच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर बोगस रेशनकार्ड आढळले असून, जोडणी पूर्ण होताच रेशनकार्डच्या संख्येत २० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही रेशनकार्डे कमी झाल्यावर अन्नसुरक्षा योजनेच्या धान्यातही बचत होणार आहे.

दरम्यान, रेशनकार्डची आधार क्रमांकाशी जोडणी झाल्यानंतर बोगस कार्ड रद्द होणार आहेत. या रद्द झालेल्या कार्डांचे वाचलेले धान्य दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) कुटुंबांना देण्याचा सरकारचा विचार आहे.

रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्याची मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. धान्य पुरवठ्यामधील गळती रोखण्याबरोबरच बोगस रेशनकार्डांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर आधार क्रमांक रेशनकार्डशी जोडण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत आधार क्रमांक जोडण्याचे काम ७७ टक्के झाले आहे. अद्याप २३ टक्के काम शिल्लक आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात रेशनकार्डची संख्या अडीच कोटींहून अधिक आहे. रेशनला आधार क्रमांक जोडणीचे काम शंभर टक्के झाल्यास वीस टक्के बोगस रेशनकार्ड कमी होऊ शकतात, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा परिणाम अन्नसुरक्षा योजनेवर होणार आहे. अन्नसुरक्षेच्या योजनेत शहरातील लाभार्थ्यांसाठी ५९ हजार रुपये, तर ग्रामीण भागात ४५ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे. तसेच शहर व ग्रामीण भागातील लोकसंख्येचीही अट घालण्यात आली आहे. या योजनेच्या निकषाबाहेर असतानाही अनेक बोगस लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेच्या धान्याचा लाभ घेत आहेत. मध्यंतरी अशी काही बोगस लाभार्थ्यांची नावे कमी करण्यात आली. या शिवाय दुबार, मयत, स्थलांतरामुळे देखील रेशनकार्डची संख्या वाढली आहे. आधार क्रमांक जोडणीमुळे ही बोगस कार्डे समोर आली आहेत. ही कार्डे रद्द झाल्यानंतर काही लाख किलो धान्याची बचत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरकटलेले इंजिन रूळावर येणार का?

0
0

पुणे : लोकसभा-विधानसभा निवडणुकांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणित पूर्णतः बिघडले असून, आगामी पालिका निवडणुकांना वर्षभरापेक्षाही कमी कालावधी राहिला असताना पुन्हा यशाकडे नेणाऱ्या मार्गाचे समीकरण त्यांना सापडणार का, याबद्दल उत्सुकता आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सध्या सर्वच जण गोंधळलेल्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत असून, भरकटलेले इंजिन पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

पुणेकरांनी २०१२ च्या निवडणुकीत मनसेच्या पदरात भरभरून दान टाकले. जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका मनसेने घ्यावी, अशी अपेक्षा होती. परंतु, सर्वसाधारण सभेत विविध विषयांवरून आंदोलन करतानाही, सभ्यता आणि मान राखण्याचे भान मनसेच्या सभासदांना राहिले नाही. त्यामुळे, पालिका आयुक्तांना बांगड्या देण्यापासून ते नगरसचिवांना धक्काबुक्की करण्यापर्यंत अतिशय निंदनीय प्रकार मनसेने सातत्याने केले. सभागृहात मनसेचे बहुसंख्य सदस्य नवखे असल्याने काही चुकीच्या गोष्टी घडल्याचा दावा गटनेते आणि पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केला. परंतु, हाच नवखेपणा घालवण्यासाठी निवडणुकीपूर्वी सर्व इच्छुकांची 'परीक्षा' घेण्याचा अनोखा प्रयोगही याच मनसेने केला होता, हे विसरून कसे चालेल?

वाहतुकीपासून ते कचऱ्याच्या समस्येपर्यंत शहराला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांनी नागरिक ग्रासले असताना, त्याबाबत सभागृहात अथवा सभागृहाबाहेरही मनसेने आग्रहाने भूमिका घेतली, त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि त्यावर तोडगा निघाला, असे एकदाही दिसले नाही. उलट, मनसेचे बहुसंख्य नगरसेवक केवळ स्थानिक प्रश्न मांडत राहिले आणि शहरासाठी म्हणून एकत्रित विषय मांडण्याची संधी त्यांनी दवडली. अगदी, ताजे उदाहरण द्यायचे, तर स्मार्ट सिटीला सुरुवातीला जाहीर विरोध करत, आयुक्तांनाही बोलू न देण्याची भूमिका घेणाऱ्या मनसेने अचानक टोपीच फिरवली. निवडणुकीपूर्वी नागरिकांना आश्वासने देतानाच्या जाहीरनाम्याला 'माझा शब्द' असे म्हणणाऱ्या मनसेने गेल्या चार वर्षांत अनेकदा 'शब्द' फिरविले.

कधी सत्ताधाऱ्यांना सोयीची असलेली तटस्थ भूमिका, कधी सत्ताधाऱ्यांशी थेट हातमिळवणी तर कधी-कधीच विरोधी पक्षाची जबाबदारी, असे मनसेचे गेल्या चार वर्षांतले संचित आहे. मनसेचे काही नगरसेवक त्या-त्या भागांत चांगले काम करत असतील, त्यांना नागरिकांचा पाठिंबाही मिळत असेल; पण शहर म्हणून एकत्रित विचार करताना, मनसेच्या कार्यपद्धतीवर नाराजी, नापसंती व्यक्त करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

पालिकेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची अशी तऱ्हा असताना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही पक्ष व्यवस्थित चालेल, यासाठी फार कष्ट केल्याचे दिसत नाही. किंबहुना, पदाधिकाऱ्यांमधील दुफळी, वैयक्तिक हेवेदावे याचे पर्यावसान थेट शहर कार्यालयावरच हल्लाबोल करण्यात काही महिन्यांपूर्वी झाले होते. शहरावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दलही वारंवार नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यातून, संपूर्ण शहर कार्यकारिणीच गेल्यावर्षी बरखास्त करण्यात आली होती. आता, पुन्हा नव्याने त्याची मोट बांधण्याचे काम मनसेने हाती घेतले आहे. अर्थात, निव्वळ पदाधिकारी बदलून उपयोग होणार नाही, तर शहराच्या हितासाठी काही ठोस धोरण, भूमिका मनसेला घ्यावी लागेल. गेल्या पाच वर्षांतील पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे अपयश आणि केंद्र-राज्यातील भाजप-सेना सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्याने मतदार मनसेला आपलेसे करणार नाहीत. तर, त्यांच्याशी संबंधित प्रश्नांवर मनसेची भूमिका काय आहे, हे पटवून द्यावे लागेल.

मनसेवर नागरिक नाराज

निवडणुकीपूर्वी नागरिकांना आश्वासने देतानाच्या जाहीरनाम्याला 'माझा शब्द' असे म्हणणाऱ्या मनसेने गेल्या चार वर्षांत अनेकदा 'शब्द' फिरविले.कधी सत्ताधाऱ्यांना सोयीची असलेली तटस्थ भूमिका, कधी सत्ताधाऱ्यांशी थेट हातमिळवणी तर कधी-कधीच विरोधी पक्षाची जबाबदारी, असे मनसेचे गेल्या चार वर्षांतले संचित आहे. मनसेचे काही नगरसेवक त्या-त्या भागांत चांगले काम करत असतील, त्यांना नागरिकांचा पाठिंबाही मिळत असेल; पण शहर म्हणून एकत्रित विचार करताना, मनसेच्या कार्यपद्धतीवर नाराजी, नापसंती व्यक्त करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदीतही बांधकामे वाढली

0
0

मंदीतही बांधकामे वाढली

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बांधकाम क्षेत्रात मंदीसदृश परिस्थिती असल्याचा दावा केला जात असला, तरी पुण्यातील परिस्थिती त्यापेक्षा वेगळी असल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल सव्वाचार हजार बांधकामांना मंजुरी दिली असून, त्याद्वारे तब्बल ३२ लाख स्क्वेअर मीटरचे नवे बांधकाम शहर आणि परिसरात झाल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेला बांधकाम परवानगी शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नात यंदा भरघोस वाढ झाली आहे. बांधकाम परवानग्यांची वाढलेली संख्या आणि त्यासोबतच एकूण मंजूर केलेल्या क्षेत्रफळात झालेली भरघोस वाढ, यामुळे महापालिकेला गेल्या दोन-तीन वर्षांपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त करणे शक्य झाले आहे.
गेल्या वर्षभरात बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. शहराच्या हद्दीत बांधल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पांना उठाव नसल्याचा दावा केला जात आहे. मात्र, महापालिकेने मंजूर केलेल्या बांधकाम परवानग्यांमध्ये सरासरी १० टक्के वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेने २०१४-१५ या वर्षात तीन हजार ८७० बांधकामांना मंजुरी दिली होती. गेल्या आर्थिक वर्षात (२०१५-१६) त्यामध्ये वाढ झाली असून, ४ हजार २२२ नव्या बांधकामांना पालिकेने मान्यता दिली आहे.
महापालिका हद्दीत नवीन बांधकामेच वाढली आहेत असे नाही, तर बांधकामाच्या क्षेत्रफळातही सरासरी १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २८ लाख स्क्वेअर मीटर बांधकामाला गेल्यावर्षी मंजुरी देण्यात आली होती. २०१५-१६ या वर्षात त्यातही वाढ झाली आहे. ३२ लाख स्क्वेअर मीटर बांधकामाला महापालिकेने मंजुरी दिली आहे.
................
महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) सध्या अंतिम मान्यतेसाठी सरकार दरबारी प्रलंबित आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डीपीला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला, तर वाढीव एफएसआय आणि इतर तरतुदींमुळे शहरातील बांधकाम क्षेत्राला उभारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पालिकेकडे मंजुरीसाठी दाखल होणाऱ्या प्रकल्पांमध्ये वाढ होईलच; पण त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रफळातही आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
.....................
हद्दीलगतच्या गावांमध्ये कमी किमतीत घर घेण्यापेक्षा नागरी सोयी-सुविधा उत्तम असलेल्या पुण्यासारख्या शहराला ग्राहक नेहमीच अधिक पसंती देतात. विकास आराखडा मान्य झाल्यास, त्यातील प्रिमियम आणि इतर तरतुदींमुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. त्यातून, महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल.
प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीतूनच करा ‘सर्फिंग’

0
0

प्रादेशिक भाषांसाठी 'सी-डॅक'चा पुढाकार; केंद्राकडे प्रस्ताव

Harsh.Dudhe@timesgroup.com

पुणे : नागरिकांना सरकारी कामे, सोशल मीडिया साइट्वरील सर्फिंग, पैशांचे व्यवहार, ऑनलाइन शॉपिंग, विविध प्रकारच्या वेबसाइट्सवरील ऑनलाइन कामे आता मराठीतूनच करता येणार आहेत. मराठीसह देशात प्रादेशिक भाषांचे अस्तित्व टिकवण्यासाठी 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग'ने (सी-डॅक) पुढाकार घेतला आहे.

'सी-डॅक'च्या मराठी भाषा उत्कृष्टता केंद्राने (सीओई) देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे तेथील भाषांसाठी स्वतंत्रपणे भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाकडे तो प्रस्ताव पाठविला आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने सी-डॅकच्या सीओई केंद्राची स्थापना सुमारे चार वर्षांपू्र्वी झाली.

या केंद्राच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी भाषा वापरण्यासाठी विविध प्रयोग करण्यात येतात. त्याची सुरुवात राज्यातील शासकीय संकेतस्थळांचे मराठीत रुपांतर, मराठी विश्वकोश व कुमार विश्वकोश यांचे डिजिटायजेशन, मराठीत फाँट, टुल्स, सॉफ्टवेरची निर्मिती आदी यशस्वी प्रयोग राबवून केली आहे. मात्र, हा प्रयोग केवळ मराठी भाषेपुरता मर्यादित न ठेवता तो इतर भाषांमध्ये राबवण्याचा प्रस्ताव 'सी-डॅक'च्या सीओई केंद्राने तयार केला.

सरकारच्या मान्यतेनंतर देशातील प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासीत प्रदेशात तेथील प्रादेशिक भाषेत भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र उभे राहणार आहे. यामुळे संबंधित राज्यांच्या वेबसाइट प्रादेशिक भाषेत रुपांतरीत होतील. तेथे संबंधित प्रादेशिक भाषेत व्यवहाराची आणि लिहिण्याची सुविधा असेल. त्यामुळे त्या राज्यातील नागरिकांना विविध प्रकारच्या संकेतस्थळांवरील ऑनलाइन कामे कम्प्युटर आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून स्थानिक भाषेत करता येतील.

राज्यात स्थापन होणाऱ्या या केंद्राद्वारे प्रादेशिक भाषेचा वापर वाढविण्यासाठी त्या भाषेत टुल्स, सॉफ्टनेअर आणि फाँट विकसित करण्यात येईल. माहिती तंत्रज्ञानात या भाषेचा वापर वाढविण्यासाठी राज्यातील विद्यापीठ, माहिती तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, साहित्य क्षेत्राशी निगडीत संस्थांची मदत घेतली जाईल. पुण्यातील सी-डॅक येथील मुख्य केंद्रातून इतर राज्यातील केंद्रांना मार्गदर्शन करण्यात येईल.

...............

एकोणीस भाषांचा अंतर्भाव

या केंद्रांद्वारे मराठी, हिंदी, कोकणी, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमि‍ळ, ऊर्दु, सिंधी, पंजाबी, संस्कृत, ओडिया, काश्मिरी, मणिपुरी, मल्याळम आदी भाषा माहिती तंत्रज्ञानात आणि संगणकाच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

...........

माहिती तंत्रज्ञानात प्रादेशिक भाषांचा वापर वाढविण्यासाठी टुल्स, फाँट यांसारख्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता केली जात आहे. मात्र, आता त्या प्रादेशिक भाषांमध्ये विविध साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. नागरिकांनी देखील त्यांची ऑनलाइन कामे स्थानिक भाषांमध्ये करण्यासाठी इनस्क्रीप्ट आणि युनिकोडचा वापर केला पाहिजे.

महेश कुलकर्णी, सहसंचालक, सी-डॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


... तर माझा कन्हैय्याकुमार होईल!

0
0

नाना पाटेकर यांचा उपरोधिक टोला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गेल्या अनेक वर्षांत राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. शेतकऱ्यांना याच अवस्थेत ठेवणे ही त्यांची गरज आहे का,' असा प्रश्न नाना पाटेकर यांनी शुक्रवारी उपस्थित केला. तसेच, नट म्हणून ते मला पुरस्कार देतील. पण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आरडाओरडा केल्यास माझाही कन्हैय्या होईल. मला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, असा उपरोधिक टोलाही नाना यांनी लगावला.

मनोविकास प्रकाशनतर्फे अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांच्या 'लाइमलाइट' या पुस्तकाचे प्रकाशन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, प्रकाशनाचे अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.

'स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आतापर्यंत वीज आणि पाणी या दोन गोष्टीही योग्य प्रमाणात देता आलेल्या नाहीत. पक्ष कोणताही असो, त्याने फारसा फरक पडत नाही. कारण, सत्तेतील पक्षाचे नाव बदलते, पण मंडळी तिच असतात. मुळातच एका पक्षातून काढलेल्या नालायक मनुष्याला दुसऱ्या पक्षात स्वीकारलेच कसे जाते. त्यामुळे लेबले बदलत आहेत,' अशी खंत नाना यांनी व्यक्त केली.

मराठवाडा, विदर्भात पाण्याचे ३६५ किमी अंतराएवढ्या पाण्याच्या स्त्रोतांचे रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे करण्यात येत आहे. त्यासाठी सरकारला तीन वर्षे लागली असती आणि खर्चही शेकडो कोटींच्या पुढे गेला असता, असेही नाना म्हणाले.

'मी उत्तम स्वयंपाकी'

मी नटा पेक्षाही स्वयंपाकी जास्त चांगला आहे. उद्या जर मी पुण्यात हॉटेल सुरू केले, तर नटापेक्षाही जास्त पैसे त्यातून कमावेन, असे मत नाना यांनी व्यक्त केले. तसेच, स्वयंपाक या विषयावर अच्युत गोडबोले पुस्तक लिहिणार असल्यास, त्यांनी सहलेखक म्हणून मला घ्यावे, असेही नाना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघात नव्हे; प्रेमप्रकरणातून स्वतःला पेटवून घेतले

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

हडपसर येथे गाडीला लागलेल्या आगीत होरपळून चालकाचा झालेल्या मृत्यू अपघातीनसून आत्महत्या करण्यासाठी चालकाने गाडी पेटवल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत मृत्यू झालेल्या अजित इंगळे याने प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्याने तिच्याच घरासमोर अजितने गाडीमध्ये स्वतःला पेटवून देऊन आत्महत्या केली.

काय आहे हे प्रकरण

शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास हडपसरच्या गाडीतळाजवळ धावत्या ओमनी कारने अचानक पेट घेतला होता. यात चालक अजित आत्माराम इंगळे या तरुणाचा होरपळून मत्यू झाला होता. ही गाडी गॅसवर चालणारी होती त्यामुळे गाडी चालवताना अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र पोलिसांच्या अधिक तपासानंतर अजितचा अपघाती मृत्यू झाला नसून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

अजितचे नात्यातील एका तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नासाठी अजितने मुलीच्या कुटुंबियांना विचारले होते. परंतु मुलीच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला होता. या मुलाचा विवाह दुसऱ्या मुलासोबत २० डिसेंबर २०१५ रोजी झाला. लग्नानंतरही अजितने तिचा पिच्छा पुरवण्यास सुरुवात केली होती. इतक नव्हे तर त्याने पुन्हा लग्न करण्याची तयारी दर्शवली होती. तसेच लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती.

गुढी पाडव्यासाठी संबंधित तरुणी माहेरी आली असताना अजितने फलटणहून एक मोटार घेतली आणि पुण्यात आला. हडपसर येथील तिच्या घरासमोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मोटार उभी करून त्याने स्वतःला पेटवून घेतले. गाडीला आग लागल्याचे कळताच नागरिकांनी काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. माज्ञ, वाऱ्यामुळे आग आणखी भडकली. या आगीत अजित इंगळेचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा वाढल्या, विद्यार्थी घटले

0
0

पुणे : राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर गेल्या वर्षीच्या तुलनेत शाळांची संख्या एक हजार १२९ने वाढली असली, तरी एकूण विद्यार्थी संख्या एक लाख २८ हजार ६४५ने घटली असल्याचे सरकारी आकडेवारी स्पष्ट झाले. एकीकडे शालाबाह्य मुलांना शाळांकडे वळविण्यासाठीचे मर्यादित प्रयत्न, तर दुसरीकडे शाळा मान्यतांच्या टप्प्यावर होणारे गैरव्यवहारांचे आरोप, अशा परिस्थितीत विद्यार्थी शाळांपासूनच दुरावतो आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्याच्या शिक्षण खात्याने राष्ट्रीय पातळीवरील युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन (यू-डाएस) या शैक्षणिक उपक्रमामध्ये सादर केलेल्या आकडेवारीमध्ये शाळा आणि विद्यार्थी संख्यांच्या बाबतीत असणारी व्यस्तता असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या आकडेवारीत शैक्षणिक वर्ष २०१४-१५ आणि वर्ष २०१५-१६ साठी झालेल्या तुलनेतून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शाळांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्या घटल्याचे दिसून येत आहे.
या आकडेवारीनुसार, वर्ष २०१४-१५ मध्ये राज्यात एक लाख ६ हजार ४९५ शाळा होत्या. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये शाळांचा हाच आकडा एक लाख ७ हजार ६२४ इतका झाला. राज्यात शाळांची संख्या एक हजार १२९ नी वाढल्याचे आकडेवारी सांगते. त्याच वेळी राज्यातील एकूण विद्यार्थी संख्या मात्र एक कोटी ६१ लाख ७२ हजार ४२० वरून एक कोटी ६० लाख ४३ हजार ७७५ वर आली आहे. विद्यार्थी संख्येमधील ही घट एक लाख २८ हजार ६४५ इतकी आहे.
000
(इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांसाठीची यू-डाएसची आकडेवारी)
वर्ष..................................२०१४-१५ ......................... २०१५-१६
शाळांची संख्या............. १ लाख ६ हजार ४९५...............१ लाख ७ हजार ६२४
विद्यार्थी संख्या..............८५ लाख ९६ हजार २२...............८५ लाख २४ हजार ५१४
विद्यार्थिनींची संख्या........७५ लाख ७६ हजार ३९८.............७५ लाख १९ हजार २६१
एकूण विद्यार्थी संख्या......१ कोटी ६१ लाख ७२ हजार ४२०......१ कोटी ६० लाख ४३ हजार ७७५
000
राज्यात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये शाळांची संख्या किंचितशी घटल्याचे 'यू-डाएस'ची आकडेवारी स्पष्ट करत आहे.
विवरण..................................... संख्या
शाळांची संख्या घटलेले जिल्हे............. पाच
विद्यार्थी संख्या घटलेले जिल्हे.............. २८
विद्यार्थिनींची संख्या घटलेले जिल्हे.........२९
एकूण घट आढळून आलेले जिल्हे.........२८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकांविना शाळा...

0
0

शिक्षणमंडळाच्या ३५ शाळांमधील परिस्थिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळावे, यासाठी काम करत असलेल्या महापालिकेच्या शिक्षणमंडळाच्या शाळेतील सुमारे ३५ शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याचे समोर आले आहे. यामुळे शिक्षणमंडळाच्या कारभाराचा एक नमुना चव्हाट्यावर आला आहे.
वारजे येथील कै. वनाबाई बाळासो बराटे या शिक्षणमंडळाच्या शाळेत गेल्यावर्षभरापासून तसेच न्यू अहिरे येथील कै. गुलाबराव तुकाराम वांजळे पाटील प्राथमिक शाळेमध्येही दोन वर्षापासून मुख्याध्यापक नसल्याचा आरोप माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप बराटे यांनी केला. शाळेत मुख्याध्यापक नसल्याने इतर शिक्षकांवर त्याची जबाबदारी पडते. मुख्याध्यापक नसल्याने शिक्षकांनाही शिस्त राहत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या १७ एप्रिलपर्यंत शिक्षणमंडळाने तसेच महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या शाळांवर मुख्याध्यापकाची नेमणूक न केल्यास १८ एप्रिलला शिक्षणमंडळात धरणे आंदोलन करण्याचा इशारा बराटे यांनी दिला आहे. मंडळात 'राष्ट्रवादी'च्या अध्यक्षा असतानाही, अशा पद्धतीने आंदोलन करण्याची वेळ येते ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे बराटे यांनी सांगितले. 'महापालिका शिक्षणमंडळामध्ये सध्या १४५ मुख्याध्यापक आहेत. शिक्षणमंडळाच्या अनेक शाळांमधील विद्यार्थी पट कमी झाला आहे. त्यामुळे दोनशेपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक देण्यात आले आहेत,' असे मंडळाच्या शिक्षण उपप्रमुख शुभांगी चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या गाळेधारकांकडे ३३ लाखांची थकबाकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या विविध गाळेधारकांकडे गेली पंधरा वर्षात ३३ लाख ५८ हजार ३८० रुपयांची थकबाकी असल्याचे ऑडिट रिपोर्ट (लेखापरीक्षण अहवाल) मध्ये समोर आले आहे. संबधित विभागांना ही थकबाकी वसूल करण्याच्या सूचना देऊनही त्यांच्याकडून कोणताही खुलासा होत नसल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील मटण, सुकी मासळी विक्रीसाठी देण्यात‌ आलेल्या रजिस्टरची तपासणी केली असता, त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने परवाना शुल्काची आकारणी करण्यात आल्याचे दिसून आले आहे. वर्षाच्या अखेर असलेली थकबाकी पुढील वर्षारंभी ओढताना त्यामध्ये अनेक चुका झाल्या आहेत. याची माहिती संबधित विभागाला कळवून तातडीने यावर खुलासे पाठवावेत, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही त्यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
वडगावशेरी, वानवडी, कोथरूड, हडपसर विभागाकडील बांधकाम प्रस्तावांना मंजुरी देताना बांधकाम विभागाने १० लाख २६ हजार ४३५ रुपयांची कमी वसुली केली असल्याचे पालिकेचे मुख्य लेखापरीक्षक अंबरिष गालिंदे यांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. यामध्ये बांधकाम विकास शुल्क सात लाख २५ हजार, लिफ्ट प्रीमियम दोन लाख ८८ हजार, कामगार कल्याण निधी उपकर १२ हजार ३८१ रुपये अशी १० लाख २६ हजार रुपयांची रक्कम वसूल होणे आवश्यक असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

0
0

चारचाकी गाडीतच पेटवून घेतले

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून हडपसर येथील गाडीतळ रोडवर स्वतःच्या चारचाकी वाहनात पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडीत पेटवून घेतल्यामुळे तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

अजय आत्माराम इंगळे (२८, रा. मंगळवार पेठ, फलटण) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण फलटण येथे इलेक्ट्रिक कामाचा ठेकेदार आहे. त्याची विवाहित प्रेयसी गुढीपाडव्याच्या निमित्ताने माहेरी आली होती. अजयने तिला फोन करून भेटायला येण्यास सांगितले आणि 'तू भेटायला आली नाहीस, तर मी तुझ्या घरासमोर आत्महत्या करेन' अशी धमकी दिली.

ती भेटायला न आल्याने अजयने हडपसर-सासवड रोडवर ग्लायडिंग सेंटरच्या गेट समोर चारचाकी वाहन बाजूला थांबवले. त्यानंतर त्याने गाडीमध्येच स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यामध्ये अजयचा होरपळून मृत्यू झाला. गाडीतच पेटवून घेतल्याने गाडीनेही पेट घेतला. त्यामुळे रस्त्यावरील नागरिक गाडीच्या जवळ जाऊ शकले नाहीत. अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. या प्रकरणी अधिक माहिती अशी, नागेश संभाजी घाडगे (रा. फलटण ) या मित्राची ओम्नी कार घेऊन अजय फलटण येथून शुक्रवारी कराडला जातो असे सांगून निघाला होता. त्याप्रमाणे तो कराडला जाऊन त्याच्या मित्राला भेटला. त्या वेळी तो काहीसा अस्वस्थ दिसत होता. शुक्रवारी मध्यरात्री तो कराडून पुण्याला यायला निघाला. हडपसरला पोहोचल्यावर त्याने त्याच्या विवाहित मैत्रिणीला फोन करून भेटायला बोलावले आणि न आल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. अजयला संबंधित मैत्रिणीने नकार दिला होता. मात्र, तो तिला वारंवार लग्न करण्यासाठी गळ घालत होता. तिने नकार दिल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारतीय संगीतात खूप काम बाकी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीय संगीतात खूप काम होणे बाकी आहे. नव्या पिढीला रूचेल अशा स्वरूपात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत त्यांच्यासमोर यायला हवे, असे मत प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी शनिवारी व्यक्त केले.
'कट्यार ते कजरारे : क्लासिकल टू बॉलिवूड' या कार्यक्रमानिमित्त डेक्कन इथे आयोजित पत्रकार परिषदेत महादेवन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'कट्यार काळजात घुसली' सिनेमात केलेला अभिनय आणि गायन, बदलता मराठी सिनेमा आणि संगीत, संगीतकार म्हणून निवडक काम करण्यावर असलेला भर तसेच रिअॅलिटी शोच्या माध्यमातून गायकांना मिळणारे व्यासपीठ अशा विविध विषयांवर महादेवन यांनी या वेळी संवाद साधला.
'कट्यार' सिनेमातली भूमिका माझ्या गायक म्हणून असणाऱ्या व्यक्तित्त्वाला शोभणारी होती म्हणून केली. पुन्हा अभिनय करेन की नाही हे माहिती नाही. मात्र संगीतात खूप काही करणे बाकी आहे. त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. शास्त्रीय संगीत नव्या पिढीलाही आवडू शकते, हे 'कट्यार'ने सिद्ध केले. नव्या पिढीसमोर त्यांना रूचेल अशा स्वरूपात हे संगीत आणणे आवश्यक आहे. मराठी सिनेमाचा आणि संगीताला पूर्वीपासूनच एक दर्जा आहे तो पुन्हा सकारात्मक दिशेने वाढतो आहे, असेही ते म्हणाले.
००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निगडीत चोरीच्या चौदा दुचाकी जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पार्किंगमध्ये तसेच रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चौदा दुचाकी जप्त केल्या आहेत. सुधीर मधुकर कांबळे (२५, रा. पत्राशेड, अजंठानगर, निगडी) आणि अक्षय बाळू सोनवणे (१९, रा. रत्नदीप हाउसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरणारे चोरटे निगडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सचिन गायकवाड यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ निरीक्षक संजय नाईक-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, कर्मचारी संजय चव्हाण, विकास शिर्के, किशोर पढेर, रमेश मावसकर, किरण खेडकर, सचिन गायकवाड या पथकाने त्रिवेणीचौक, तळवडे रस्ता येथे सापळा रचला होता. संशयीत दोघे दुचाकीवरून आल्यानंतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दुचाकीची कागदपत्रे मागितली असता दोघांनी उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोघांना अटक करून पुन्हा चौकशी सुरू केली. त्या वेळी या दोघांनी पिंपरी-निगडी परिसरात वाहन चोरी करून त्या ग्रामीण भागात तसेच इतर जिल्ह्यात विक्री केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरीच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकींपैकी निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आठ आणि पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक चोरलेली दुचाकीचा समावेश आहे. इतर सात दुचाकी या अन्य पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या आहेत. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरच्या ‘जीपीएस’ची होणार तपासणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे उन्हाच्या झळा वाढत असतानाच, पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने टँकरचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्याचे निश्चित केले आहे. महापालिकेसह खासगी टँकरच्या 'जीपीएस डेटा'ची तपासणी केली जाणार असून, त्यानुसार टँकरमालकांचे बिल अदा केले जाणार आहेत. दरवर्षीच्या उन्हाळ्यात टँकरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. महापालिकेतर्फे शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवणाऱ्या भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पालिकेच्या टँकरची संख्या मर्यादित असल्याने नागरिकांना खासगी टँकरमार्फतही पाणी घ्यावे लागते. खासगी टँकरमधील पाण्याचा वापर पालिका हद्दीबाहेर होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेकदा केल्या गेल्या आहेत. तसेच, पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग बांधकाम आणि इतर वापरासाठी केला जात असल्याचा आरोपही केला जातो. या पार्श्वभूमीवर सर्व टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्याचे बंधन पाणीपुरवठा विभागाने यापूर्वीच काढले होते. सुरुवातीच्या टप्प्यात त्याला तीव्र विरोध झाला; पण त्यानंतर बहुतेक सर्व टँकरला जीपीएस यंत्रणा बसली आहे. आता याच यंत्रणेचा वापर करून टँकरच्या फेऱ्या किती झाल्या, यानुसारच बिल अदा करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत. टँकरमालक-चालकांकडून जीपीएसचा सर्व डेटा मागून घेण्यात येणार आहे. या डेटानुसार किती फेऱ्या झाल्या, त्या शहरात झाल्या की, शहराबाहेर झाल्या, हे समजू शकणार आहे. त्याचा आढावा घेऊन मगच टँकरचे बिल अदा केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली. टँकरला लावण्यात आलेले जीपीएस विविध कंपन्यांचे असल्याने एकाचवेळी त्यांचा सर्व डेटा प्राप्त करण्याचे आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले आहे. पालिकेच्या 'आयटी' विभागाला त्यातून तोडगा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे देशभ्रतार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात सर्वत्र एकशिक्षकी शाळा

0
0

Yogesh.Borate@timesgroup.com पुणे : राज्यात एकशिक्षकी शाळा नसणारा एकही जिल्हा सध्या अस्तित्त्वात नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हणविल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये एक आणि मुंबई उपनगरामध्ये ५१ एकशिक्षकी शाळा आहेत; तर मुख्यमंत्र्‍यांच्या नागपूरमध्ये एकूण ६२ एकशिक्षकी शाळा आहेत. गेल्या वर्षभरात राज्यात जवळपास दहा हजार शिक्षकांची भरती झाली असतानाही राज्यात अशा तीन हजार १०८ एकशिक्षकी शाळांची समस्या कायमच असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर येत आहे. राज्यात गेल्या वर्षभरापासून शालेय पातळीवर शैक्षणिक गुणवत्ता साध्य करण्यासाठी नानाविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या चळवळीपासून ते प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेपर्यंत सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही काळामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक उपक्रम पोहोचविण्याचा ध्यासही शिक्षण खात्याने घेतला आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुलभक (फॅसिलिटेटर) म्हणून शिक्षकाचे महत्त्व सातत्याने चर्चेला येत आहे. शिक्षकांचे समायोजन, शिक्षकांची अतिरिक्त संख्या असे विषयही चर्चेला येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील एकशिक्षकी शाळांच्या या आकडेवारीमधून सरकारच्या शिक्षकांविषयीच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने केंद्र सरकारकडे यू-डाएसच्या माध्यमातून सादर केलेल्या शैक्षणिक आकडेवारीमधील शाळा आणि शिक्षकांच्या आकडेवारीमधून असे सर्व मुद्दे समोर येत आहेत. राज्यभरातील शिक्षकांच्या आकडेवारीनुसार, राज्यात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत शिक्षकांची संख्या ९ हजार ९९६ ने वाढली. मात्र त्यानंतरही रायगड (३४९), पालघर (३२४), नाशिक (३०८), ठाणे (२४१), पुणे (१९०), रत्नागिरी (१७१), नांदेड (१२४), सांगली (११४), सोलापूर (९०), जळगाव (८४), नगर (७७), लातूर (७१), यवतमाळ (७०), गडचिरोली (६५), नागपूर (६२), औरंगाबाद (६१), सिंधुदूर्ग (५४), जालना (५३), मुंबई उपनगर (५१) आदी जिल्ह्यांमध्ये एकशिक्षकी शाळांची संख्या पन्नासच्या खाली येऊ शकलेली नाही. शिक्षणातील नव्या प्रवाहांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे विभागामध्ये एकूण ३५७ एकशिक्षकी शाळा असल्याचे ही आकडेवारी सांगत आहे. राज्यभरातील अशा तीन हजार १०८ शाळांमधून शिकणाऱ्या ७५ हजारांवर विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर त्यामुळेच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्यात नववीच्या टप्प्यावर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१५-१६ मध्येही लक्षणीय राहिली आहे. दहावीचा निकाल वाढविण्यासाठी शाळांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सक्तीने नापास करण्याची प्रथा राज्यात रुजली आहे. ही प्रथा मोडीत काढण्यासाठी शिक्षण खात्याने आता प्रयत्न सुरू केले असले, तरी ही आकडेवारी पाहता, त्याला कितपत यश मिळेल, या विषयीही साशंकता उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेराशे लिटर दुधाची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी गोकूळ कंपनीकडून चिंचवड येथील गगनगिरी एजन्सीला पाठवलेले तेराशे लिटर दूध चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार रविवारी पहाटे तीनच्या सुमारास (१० एप्रिल) घडला. दूध टेम्पोचालक जनार्दन दामू काळे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्याम माहितीनुसार, काळे यांनी मांजरी येथून टेम्पोत गोकूळ कंपनीचे दूध भरले. पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी चिंचवड येथून मथुरा यांचे दूध दिले. त्यानंतर अडीचच्या सुमारास गगनगिरी मिल्क एजन्सीचे तेराशे लिटर दूध टेम्पोतून काढून दिले. त्यानंतर काळे हे पुढील ठिकाणी दूध करण्यासाठी गेले होते. दरम्यान, तीनच्या सुमारास गगनगिरीचे वितरक नवनाथ जगदाळे तेथे आले. त्या वेळी तेथे दूधाचे कॅरेट दिसले नाहीत. जगदाळे यांनी काळे यांना फोन करून दूध टाकले नाही का, याची चौकशी केली. त्या वेळी काळे यांनी दूध ठेऊन मी पुढे गेलो असल्याचे सांगितले. यावरून चोरट्यांनी दूधाच्या पिशव्या कॅरेटसह चोरून नेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पुढील तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उमदा’ची मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मदत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या श्यामसुंदर कणके गुरुजी यांच्या 'आपली मुले' संस्थेला सव्वा दोन लाख रुपयांचा निधी सुपूर्त करण्याचा सोहळा नुकताच पार पडला. 'उमदा समाज विकास प्रतिष्ठान'ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 'उमदा'चे अध्यक्ष डॉ. श्रीपाद दाबक, 'एनआयओ'चे डॉ. श्रीकांत केळकर आणि डॉ. दीपक उपस्थित टिळक आदी या वेळी उपस्थित होते. 'उमदा' प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी सामाजिक संस्था किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना निधी सुपूर्त केला जातो. यंदाचे या उपक्रमाचे पाचवे वर्ष होते. यंदाच्या वर्षी मदतनिधीत वाढ करून तो एक लाख रुपये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मित्रपरिवार आणि इतर सहकारी संस्था यांनी जमा केलेला असा एकूण सव्वा दोन लाख रुपयांचा निधी कणके गुरुजींना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे अनाथ हिंदू महिलाश्रम या संस्थेलाही रुपये २५ हजारांची मदत करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे पालनपोषण कणके गुरुजी करीत आहेत. आता त्यांच्याकडे २१६ विद्यार्थी-विद्यार्थिनी असून त्यांचे शिक्षण आणि संगोपन कणके गुरुजींची 'आपली मुले' ही संस्था करते. कणके गुरुजी यांनी आपल्या मनोगतात मराठवाड्यातील भीषण परिस्थितीची माहिती दिली. मराठवाड्यातील निर्माण झालेल्या या आपत्तीमध्ये समाजाने दुष्काळग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि 'उमदा'ने राबविलेल्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कणके गुरुजींच्या हृदय हेलावून टाकणाऱ्या भाषणामुळे कार्यक्रम संपल्यानंतरही अनेक उपस्थितांनी मदतीचा हात पुढे केला. मदतनिधी सुपूर्त करण्याच्या कार्यक्रमानंतर डॉ. संजय उपाध्ये यांचा 'मन करा रे प्रसन्न...' या कार्यक्रमाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद दुगड यांनी केले. गीतांजली जेधे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images